मनोगते

“मला राहून राहून एका गोष्टीविषयी दु:ख होते. अस्पृश्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला हात घातला रा. विठ्ठ्लरावांनी. त्या कामी कमालीचा स्वार्थत्याग करून त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी देशभर जागृती घडवून आणली. ह्या प्रश्नाला राष्ट्राची मान्यता मिळण्याचे श्रमही त्यांचेच. पण अलीकडे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या प्रश्नाचा जेव्हा जेव्हा उल्लेख करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ज्यांनी ह्या बाबतीत केवळ वाचिक कार्य केले आहे अशांनाच जागृतीचे श्रेय अर्पण करण्यात येते व भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी व विठ्ठ्ल रामजी शिंदे ह्यांच्यावर पद्धतशीर बहिष्कार घालून त्यांचा चुकूनही नामनिर्देश केला जात नाही. अशा संघटित बहिष्काराने सत्याचा अपलाप होतो.”

वामन सदाशिव सोहोनी
आत्मनिवेदन
मुंबई - १९४०

 

“विठ्ठ्ल रामजी शिंदे हे माझ्या चार गुरूंपैकी एक होते. माझ्या जन्मदात्यानंतर मी त्यांनाच मानतो. त्यांच्या पायांशीच मी सार्वजनिक कार्याचे धडे घेतले. माझ्यापेक्षा ते वयाने लहान असले तरी राष्ट्रहितासाठी करावयाच्या चळवळीबाबतच्या अभ्यासात त्यांची फार मोठी प्रगती होती. ही गोष्ट सर्वज्ञात आहे की, मुंबईकडे प्रांताकडील अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे ते जनक होत. पंजाब व उत्तरप्रदेश सोडला तर सर्व भारतातील या प्रकरणाच्या कार्याचा प्रारंभ करणारे ते पहिले पुरूष व या कार्याचे अग्रदूत होते.”

अमृतलाल व्ही. ठक्कर उर्फ ठक्करबाप्पा
इंडियन सोशल रिफॉर्मर
८ एप्रिल १९४४

 

“स्वार्थावर लाथ मारून गळ्यात झोळी अडकवून संस्थेकरता- अर्थात् आमच्या लोकांकरिता- संस्थेचे जे चालक भिक्षांदेही करीत दारोदार फिरतात व त्यांना त्यात कितीही अल्प यश आले तरी ते पर्वा न करता चंदनासारखे स्वत: झिजून दुस-यांना- आम्हांला- सुख देण्याकरिता, आमची स्थिती सुधारण्याकरिता आपला प्रयत्न चालू ठेवतात त्या संतांची किंमत आजपर्यंत झालेल्या कोणत्याही संतापेक्षा आम्हांला यत्किंचितही कमी वाटत नाही. कित्येकांना ती जास्त वाटेल.”

श्री. गणेश आकाजी गवई
डी. सी. मिशनच्या महाराष्ट्र परिषदेत केलेले भाषण
पुणे, १९१२

 

“इतिहास असे सांगतो की, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो अशा सर्व प्रकारच्या चळवळींचा उगम थोड्याशा व्यक्तींच्या कार्यात सापडतो. प्रस्तुतच्या बाबतीत त्या व्यक्ती म्हणजे ज्यांची प्रथम हेटाळणी झाली ते डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे गृहस्थ होत. त्यांच्या कार्याने प्रचंड अशा हिंदू समाजाची सदसदविवेकबुद्धी जागृत झाली.”

न्यायमूर्ती सर नारायणराव चंदावरकर
डी. सी. मिशनची अस्पृश्यतानिवारक परिषद
मुंबई, १९१८

 

“मराठ्यांतील कार्यशक्ती काय करू शकते असा जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर अण्णासाहेब शिंद्यांच्या कार्याकडे बोट करा. मराठयांतील स्वार्थत्यागाचे उदाहरण दाखविण्याचा प्रसंग आला तर आपण अण्णासाहेब शिंद्यांचे नाव घ्या. परकीय सत्तेचा विध्वंस शिवाजीमहाराजांनी केला व अस्पृश्यतेच्या विध्वंसनाचे कार्य करण्याकरिता तितक्याच धडाडीने अण्णासाहेबांनी आपले आयुष्य वेचले.”

श्री. बाबुराव जेधे
मुंबई इलाखा शेतकरी परिषद
पुणे, १९२८

 

“शिंद्यांचा जिला भरीव हातभार लागला नाही अशी लोकसेवेची व समाजोन्नतीची चळवळ दाखवून देणे कठीण आहे. राजकारण, समाजकारण, धर्मकार्य, शिक्षणकार्य इतकेच नव्हे तर वाड्मयसेवा आणि इतिहास संशोधन या सर्वांत शिंद्यांचा भाग आहे, आणि फार महत्त्वाचा भाग आहे.

ज्या काळी विधवाविवाहासारखे साधे प्रश्न सुटणे दुरापास्त होते अशा त्या घनदाट धर्मवेडाच्या काळात अस्पृश्योद्धाराची चळवळ सुरू करणे, त्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढणे, इतकेच नव्हे तर अस्पृश्यांत जाऊन त्यांच्यापैकी एक झाल्याप्रमाणे त्यांच्यात वागणे या गोष्टीसाठी अतुल स्वमतधैर्याची, एवढेच नव्हे तर मूलमार्गी बुद्धीची व समाजाविषयी ख-या कळकळीचीही गरज होती. इतक्या व्यापक व सूक्ष्म दृष्टीच्या कार्यकर्त्याची दृष्टी सबंध देशाइतकी विशाल विस्तृत असावी लागते. म्हणूनच श्री. शिंदे सामाजिक चळवळीप्रमाणेच अनेक राजकीय चळवळीतही भाग घेताना दिसत.”

न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी
महाराष्ट्र साहित्य संमेलन
नागपूर, १९३३