मुंबई ते ऑक्सफर्ड

‘पर्शिया’ ह्या बोटीने मुंबईचा किनारा साडेतीन वाजता सोडला आणि तासाभरात विठ्ठलरावांना मुंबई शहर दिसेनासे झाले. आणखी अर्ध्या तासाने डोंगरही दिसेनासे झाले. वरती आकाश आणि खाली पाणी असा निसर्गाचा वैविध्यरहित परंतु भव्य देखावा दिसू लागला. विठ्ठलरावांच्या मनाला अजून स्वस्थपणा आलेला नव्हता. बोटीच्या पिछाडीस बसून पाऊण तास त्यांनी चिंतन केले.

‘पर्शिया’ बोट बरीच मोठी असली आणि तिच्यामध्ये ५३० प्रवाशांची सोय असली तरी ह्या फेरीमध्ये तिच्यात केवळ ७५ प्रवासी होते. त्यांपैकी हिंदुस्थानातील सातजण होते. विठ्ठलरावांच्या केबिनमध्ये कलकत्त्याचे श्री. मित्र, मुंबईचे श्री. कोतवाल नावाचे पार्शी गृहस्थ व लाहोरचे श्री. जलालुद्दिन मिर्झा हे मुसलमान गृहस्थ होते. हैदराबादचे श्री. नायडू व आग्र्याचे आणखी एक मुसलमान गृहस्थ व एक भारतीय ख्रिश्चन अन्य केबिनमध्ये होते. कोतवाल हे व्यापारी सोडले तर इतर पाचजण हे कायद्याचा अभ्यास करण्यासाठी चालले होते. ह्या सगळ्यांमध्ये व्यावहारिकदृष्या बिनकिफायतीच्या धर्मशिक्षणासाठी जाणारे लोकविलक्षण गृहस्थ विठ्ठल रामजी शिंदे हेच होते.
 
विठ्ठल रामजींच्या ठिकाणी धर्मांबद्दल तीव्र आस्था, नवे जाणून घेण्याची उत्कट जिज्ञासाबुद्धी आणि चर्चा करण्याची दांडगी हौस होती. संध्याकाळी पाचच्या सुमाराला त्यांच्या केबिनमधील सोबती श्री. जलालुद्दिन मिर्झा ह्यांच्यासमवेत धर्मासंबंधी तासभर संभाषण केले. संभाषणामुळे दोघांचेही समाधान झाले.१ दुस-या दिवशी म्हणजे २२ सप्टेंबरला सकाळीच शेजारच्या खोलीतील हैदराबादचे नायडू यांच्याबरोबर ब्रह्मधर्मासंबंधी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विवेचन केले. २३ तारखेला सकाळी मित्र यांच्याबरोबर त्यांचे धर्मासंबंधी बोलणे झाले.

बोटीने हिंदुस्थानचा किनारा सोडल्याला तीन दिवस झाले तरी कुटुंबीय मंडळीच्या वियोगाचे त्यांना झालेले दुःख ओसरले नव्हते. २३ तारखेस सायंकाळी ते झोपले असताना स्वप्नात घरची मंडळी भेटली. उठल्यावर त्यांना वाईट वाटू लागले.२

बोटीवरील वातावरण आणि स्वतःची मनःस्थिती ह्याबद्दल त्यांनी म्हटले आहे, “सभोवती लोकांची इतकी गर्दी असून, सुख-दुःखाचे दोन शब्दही कोणाशी बोलण्यास मन धजत नाही. आणि आत तर विरह धुमसत असतो. अशा स्थितीत, बायरन कवीने एके ठिकाणी वर्णिलेला हा गर्दीतला एकांतवास निर्जन एकांतवासापेक्षाही फार दुःसह होतो. पण अशी स्थिती बहुतकरून आमच्याच लोकांची होते. गोरे लोक लगेच एकमेकांशी मिसळून अनेक प्रकारचे खेळ खेळत दिवस काढतात. लहान मुले, पोक्त बाया आणि मोठे धटिंगण ह्यांचा दिवसभर धांगडधिंगा चालू असतो. ह्या गुलहौशी पाश्चात्त्य लोकांनी सर्व जगभर-जमिनीवरच नव्हे तर पाण्यावरही- आपले घर पसरून टाकिले आहे, तेणेकरून हे कोठे गेले तरी ह्यांचा उल्हास कमी होत नाही. आम्हाला येथे धरून आणल्याप्रमाणे होते. असो. हा प्रकार रजोगुणाचा झाला, पण मनाची जर सात्त्विक वृत्ती होऊन ते धर्माच्या उच्च वातावरणात वावरू लागले तर हीच परिस्थिती त्यास अत्यंत अनुकूल होते. लाटांचे एकसारखे उत्क्रमण, वायूचे सतत वाहणे, अपार आकाशमंडळात फाकणारी निःसीम प्रभा वगैरे पाहून विश्वाचे आनंत्या व सृष्टिव्यापाराचे सातत्य आणि अखेरीस परमेश्वराचे सर्वत्र भरलेले मंगल वास्तव्य साक्षात दृगोचर होते.३

विठ्ठल रामजींनी निघताना आपल्या सामानामध्ये एकतारा घेतलेला होता. प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतल्यापासून एकतारा घेऊन भजन करण्याचा त्यांचा परिपाठ होता. बोटीवर ते एकतारा घेऊन भजन करीत असत.४ रोज सायंकाळी भजन व प्रार्थना करण्याचा क्रम बोटीवर त्यांनी चालू ठेवला. २६ सप्टेंबरला एडनजवळची टेकडी दिसू लागली. पाच दिवस दगड आणि माती नजरेस न पडल्यामुळे ही टेकडी दुरून दिसताच त्यांना अतिशय आनंद झाला. सात वाजता बोट बंदरास लागली. किरकोळ वस्तू विकणारी सोमाली शिद्दी मुले धमाल उडवीत होती. विठ्ठल रामजींनी त्यांच्याकडून १ शिलिंगाला एक शिंपल्याचा हार व टिक्का विकत घेतला. साडेनऊ वाजता बोट सुरू झाली. शिंदे यांच्या ठिकाणी चर्चेचा उत्साह असल्याने पाच सोबत्यांसह त्यांच्या खोलीत सभा झाली. श्र. कोतवाल यांनी व्यापारासंबंधी माहिती दिली तर विठ्ठल रामजी शिंदे हे विश्वात्मक एकेश्वर धर्मासंबंधी बोलले. २७ तारखेला सकाळी समुद्र इतका शांत होता की त्यांना वाटले सायंकाळच्या वेळेला तळेही इतके शांत नसेल. मंद वारा वाहत होता. समुद्रावरचा हा देखावा त्यांना रमणीय वाटला. सभेचा उपक्रम चालूच होता. दुपारी दोन वाजता त्यांच्या खोलीत सहा सोबत्यांची सभा भरली. मित्र आणि नायडू यांची भाषणे झाली. नायडूंनी सुमारे तासभर भाषण करून हैदराबाद संस्थानातील आधुनिक शिक्षणप्रसार, तेथील लोकस्थिती, राज्यव्यवस्था, दरबार, नबाबसाहेब व प्रधानमंडळ ह्याबद्दल सविस्तर माहिती चांगली सांगितली.५

१ ऑक्टोबरला रात्री बारा वाजता बोट पोर्टसैदला पोहोचली. त्या वेळी विठ्ठल रामजी शिंदे गाढ झोपेत होते. चार वाजता त्यांना जाग आली. अंधारात पोर्टसैद पाहिले. मोती बुलासाची त्यांना आठवण होऊन फार वाईट वाटले. सकाळी सहा वाजता डेकवर जाण्यापूर्वी बोट बंदरातून निघाली होती. ते उठले आणि त्यांनी आजूबाजूला पाहिले तेव्हा बोटीवर कोळसा घेण्याची गडबड चाललेली दिसली. चमत्कारिक भयाण देखावा दिसत होती. विठ्ठल रामजींच्या मनात आले अशा परदेशात आमचा मोती स्वस्थ निजला होता.६

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या ठिकाणी शिस्त, निष्ठा आणि जबाबदारीची जाणीव उत्तम प्रकारची होती. बोटीवरून त्यांनी बाबा, जनाबाई ह्या कुटुंबीयांना तसेच प्रार्थनासमाजातील आणि बाहेरच्या मित्रमंडळींना नियमितपणे पत्र पाठविण्यास सुरूवात केली. द्वा. गो. वैद्य हे सुबोधपत्रिकेचे संपादक होते. पत्रिकेसाठी नियमितपणे लेख पाठविण्याचे विठ्ठलरावांकडून त्यांनी कबूल करून घेतले होते. त्याप्रमाणे बोटीवरूनच प्रवासवर्णनपर लेख पत्रिकेसाठी पाठविण्यास त्यांनी सुरूवात केली. एकंदरीत समुद्रप्रवासाचे आणि एडन बंदर, सुवेज कालवा इत्यादिकांचे शब्दचित्रमय व माहितीपर वर्णन सुबोधपत्रिकेत केले आहे. २ ऑक्टोबरला दुपारी त्यांची आगबोट कॅडिया व क्रीट बेटाजवळ आली. दोन-दोन पुरुष उंच अशा लाटा येत होत्या, त्यामुळे बोट फारच हालू लागली. दुस-या दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना इतालीचा किनारा दिसू लागला. इतालीच्या किना-यावरील मेलिटो, रेजियो ही शहरे दिसू लागली. संध्याकाळच्या वेळेला स्ट्रंबोलीचा ज्वालामुखी पर्वत दिसू लागला. सहा वाजण्याच्या सुमारास ह्या पर्वताच्या शिखरातून निघणारा धुराचा लोटही दिसत होता. ४ तारखेस जलप्रवासानंतर त्यांची आगबोट मार्सेय ह्या फ्रान्समधील बंदरावर पोहोचली. सकाळची न्याहरी आटोपून विठ्ठरावांनी आणि त्यांच्या सोबत्यांनी पर्शिया बोटीचा निरोप घेतला व साडेनऊ वाजता युरोपच्या किना-यावर पाय ठेवला.

विठ्ठलराव आणि त्यांचे पाच सोबती हे मिळूनच लंडनला जाणार होते. मार्सेयमध्ये त्यांना बारा तासच राहावयास मिळणार होते. ह्या सगळ्यांनी थॉमस कुक कंपनीच्यामार्फत तिकीट काढले होते. त्यांचे दुभाषे बंदरावर ह्या प्रवाशांची वाट पाहात होते. त्यांनी ह्या सगळ्या प्रवाशांचे सामान ताब्यात घेतले. हॉटेलची व्यवस्था केली. विठ्ठलराव आणि त्यांचे सोबती जेवण करून शहर पाहण्यासाठी म्हणून बाहेर पडले. मार्सेय हे फ्रान्सचे दुस-या क्रमांकाचे शहर. फ्रान्समध्ये फ्रेंच भाषेशिवाय इतर भाषेत बोलावयाचे नाही हा प्रघात जुनाच. इंग्रजीची मातब्बरी फ्रान्सात कुणास वाटत नाही. मि. कोतवाल यांना थोडीशी फ्रेंच भाषा अवगत होती. त्यासंबंधी विठ्ठल रामजींनी लिहिले आहे, “आमच्या व्यापारी पार्शी सोबत्यास फ्रेंच भाषेत थोडीशी जीभ हालविता येत होती त्याचा आम्हांस अतोनात फायदा झाल.”७

स्वच्छता, सौंदर्य, फ्रेंच नखरा आणि नटवेपणा याबद्दलच्या फ्रान्सच्या लौकिकाला शोभेल असेच मार्सेयचे रूप असल्याचे त्यांना जाणवले. त्यांच्या स्वतःच्या पोशाखाबद्दलच्या प्रतिक्रियेचा जो अनुभव पुढची दोन वर्षे युरोपात त्यांना येत राहिला त्याची पहिली प्रचीती मार्सेयमध्येच अनुभवावी लागली. युरोपातील हवामानाच्या दृष्टीने कोट, विजार वगैरे पाश्चात्य धाटणीचा पोशाख करणे जरी त्यांना भाग होते तरी देशीपणाचा किमान भाग टिकवावा म्हणून त्यांनी डोक्यावर पाश्चात्य धर्तीची हॅट न घातला फेटाच वापरावयाचा ठरविले होते. गुलाबी रंगाचा फेटा बांधून ज्या वेळेला मार्सेयमध्ये ते आपल्या सोबत्यांबरोबर रस्त्यातून जाऊ लोगले त्या वेळेला त्यांना पाहण्यासाठी स्त्री-पुरुषांची मोठी गर्दी जमत असे. बायका आपल्या लहान मुलांस कडेवर घेऊन त्यांच्याकडे बोट दाखवू लागल्या. तरुण मुली घरात पळत जाऊन इतरांस बाहेर बोलावून त्यांना पाहत उभ्या राहत. ह्या त्रासामुळे त्यांचे सोबतीही कुरकुरू लागले. खरे त्यांच्या फेट्यासंबंधी चर्चेला सुरुवात बोटीवरच झाली होती. मार्सेय बंदरावर बोटीवरून उतरताना त्यांच्याबरोबर
येणा-या एका इंग्रज सिव्हिलियनाने त्यांच्याजवळ जाऊन मोठ्या आस्थेने विचारले की, “काय हो, हे तमुच्या डोक्यावरचे तुम्ही लंडनपर्यंत कायम ठेवणार की काय? लंडनची मुले वात्रट आहेत. ती तुम्हांस त्रास देतील.” शिंदे त्याला म्हणाले, “विलायतेस पोलीसची व्यवस्था चांगली आहे ना?” यावर तो सिव्हिलियन निरुत्तर झाला.

फ्रेंच लोकांचा उल्हासीपणा आणि सुखोपभोग घेण्याची वृत्ती रस्त्यावरून फिरतानाही ध्यानात येत होती. हॉटेलसमोरच्या स्वच्छ सुंदर प्रशस्त जागी रस्त्याला लागूनच खुर्च्या टाकून रस्त्यावरची मौज पाहत चकाट्या पिटीत लोक उपाहार घेताना दिसत असत. विठ्ठल रामजींना दुसरा एक आल्हाददायक प्रकार दिसला. रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावलेली झाडे उंच व दाट होऊन एकमेकांत इतकी मिसळून गेलेली होती की, भर दोन प्रहरीदेखील ह्या रुंद रस्त्यात गर्द छाया होती. अशा ठिकाणास तेथे ‘बुलवर्ड’ असे म्हणतात. जागजागी विश्रांती घेण्यास बाके ठेवलेली आढळली. ह्या रस्त्यामधून लोक हिंडताना अथवा बाकावर बसलेले दिसून येत.

विठ्ठल रामजी आणि त्यांचे सोबती मार्सेय येथे ‘नॉटर डेम द ला गार्ड’ हे उंच टेकडीवर असलेले, येशू ख्रिस्ताची आई मेरी हिचे देऊळ पाहावयास गेले. येशू ख्रिस्त मुलास खेळवीत आहे, दुःखितांचे अश्रू पुसत आहे अशी येशू ख्रिस्ताच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवरची सुंदर चित्रे देवळामध्ये टांगलेली होती. हे देऊळ पाहत असताना तुळजापूरची भवानी, सौंदत्तीची यल्लमा, कोल्हापूरची महालक्ष्मी या देवस्थानांची त्यांना आठवण येऊन त्यांच्या मनात काही विचार आले. ख्रिस्त्याने हिंटूस हीदन, ऑयडोलेटर (मूर्तिपूजक) इत्यादी नावे ठेवून कितीही हिणविले असेल तरी त्याने आपली आकारप्रियता येथे पूर्ण व्यक्त केली आहे. ही उणीव आपल्यास पूर्ण ब्रह्मज्ञानी, अद्वैती इत्यादी इत्यादी जाड्या संज्ञा देऊनही त्याच्या पाठीची लिंगपूजा अद्याप सुटली नाही आणि इकडे पाश्चात्त्य पॅगनचा ख्रिस्ती झाला तरी मूर्तिपूजा आणि विभूतिपूजा याने कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने घेरले आहेच.”८ ह्या देवळात गणपती, मारुती आणि देवी ह्यांच्या मूर्तीचा शेंदूर, तेल आणि बेढब वस्त्रालंकार यांच्याखाली मूळच्या रूपाच्या लोप झालेला असतो. देवळाच्या भिंतीवर चित्रे गावठी जिनगरांनी काढलेली असतात आणि त्यांचे विषय कोठे मारुतीने कुंभकर्णाच्या बाबतीत चित्रकार व शिल्पकार ह्यांची मदत घ्यावयाची झाल्यास सौंदर्यशास्त्री आणि नीतिशास्त्री ह्यांच्या सल्ल्याने घ्यावयास पाहिजे. आमच्यात कलाकौशल्य कमी नाही. आम्ही नीतीने कमी नाही, की आमची पुराणे, दंतकथा, इतिहास यामध्ये उदात्त विषयाची वाण नाही. तेव्हा गौतमबुद्धाचा स्वार्थत्याग, बाबा नानकाची सुधारणा, कबीराची सत्यप्रीती आणि तुकोबाची भक्ती इत्यादी अनेक सुबोधपर विषयांची निवडणूक करून रविवर्म्यासारखा मार्मिक चित्रकारांनी त्यावर आपले चातुर्य खर्चिले, तर आमच्या देवळांच्या सौंदर्यात पावित्र्यात किती भर पडेल बरे.”९

जेवण आटोपल्यावर ‘पॅलेस डी ला शांप’ नावाचा, टेकडीत पहिले दोन मजले कोरलेला व बाकीचे मजले त्यावर बांधलेला महाल त्यांनी पाहिला. सुंदर व तरुण स्त्रियांची चित्रे आणि शिल्पे पाहून ते प्रभावित झाले.

रात्री जेवण आटोपून विठ्ठल रामजी आणि त्यांचे सोबती रेल्वेने पॅरीसला जाण्यास निघाले. डी जॉन स्टेशनापासून पॅरीसपर्यंत वाटेत शेते, कालवे, द-या, बोगदे, गावे इत्यादिकांचा सुंदर देखावा गाडीतून दिसत होता. त्यांना जाणवले, फ्रेंच लोकांची सौंदर्याभिरुची त्यांच्या शेतातूनही दृष्टीस पडते. ह्यांची शेते म्हणजे केवळ बागाच! फ्रान्सची शेते सकाळच्या वेळी गाडीतून धावत असताना प्रथमच पाहून एखाद्या नवख्यास इतर ठिकाणी राजा होण्यापेक्षा फ्रान्स मध्ये शेतकरी होणे बरे, असे वाटल्यास त्यात नवल काय.

सकाळी दहा वाजता ते पॅरीसला पोहोचले. पॅरीस येथे त्यांचा मुक्काम जेमतेम बारा तासांचाच होता. मुद्दाम बांधलेले मोठेमोठे सुंदर महाल पाहत ते ऐतिहासिक राजपुरुषांची थडगी असलेली स्मशानभुमी पाहवयास गेले. तेथे नेपोलियनचे भव्य कबरस्तान पाहिले. ‘द बिग व्हील’ ह्या नावाचे प्रचंड राक्षसी चक्र बघितले. सुप्रसिद्ध एफेल टॉवर अर्धा चढून गेल्यावर जोराचा पाऊस व सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळे वरपर्यंत जाण्याचा विचार त्यांनी रहित केला. हा मनोराही १८८९च्या प्रदर्शनासाठी बांधलेला होता. हा मनोरा पाडावा यासंबंधी त्या वेळी वाद चालला होता. पाडावा असे म्हणणा-यांचा एक मुद्दा असा होता की, मनोरा बेढब झाला आहे.

रात्री साडेनऊ वाजता पॅरीसचा मुक्काम संपवून विठ्ठल रामजी बोटीने निघाले. रात्री एक वाजता कॅले येथे पोहोचले. तेथून निघून सात ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता लंडन येथे पोहोचले.

लंडनला आल्यानंतर टालबट रोडवरील ८२ क्रमांकाच्या घरात रोमेशचंद्र दत्त यांच्या
बि-हाडी विठ्ठल रामजी उतरले. रोमेशचंद्र दत्त हे बंगालमधील अगदी प्रारंभीचे आय़. सी. एस अधिकारी, थोर लेखक व अभ्यासू होते. १८९९ मध्ये राष्ट्रसभेचे अध्यक्षही झाले होते. १८९७ मध्ये आय. सी. एस अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर लंडन विद्यापीठात भारतीय इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे त्यांचे चाहते होते. त्यांच्या इच्छेवरून दत्त हे १९०४ साली संस्थानच्या मुलकी सेवेत रुजू झाले व १९०९ साली ते संस्थानचे दिवाण म्हणूनही नियुक्त झाले. १० संस्थानचा व रोमेशचंद्र दत्त यांचा स्नेहाचा संबंध ध्यानात घेऊन कारभा-यांपैकी कोणीतरी शिंदे हे लंडनला गेल्यावर त्यांची दत्त यांच्या बि-हाडी राहण्याची व्यवस्था केली असावी. दत्त हे हवा पालटण्याकरिता बाहेरगावी गेलेले होते. त्यांच्याच बि-हाडी शिंदे राहिले होते. लंडनच्या मुक्कामात युनिटेरियन समाजाचे सेक्रेटरी कोपलंड बोवी यांची त्यांनी भेट घेतली. ८ ऑक्टोबरचा सगळा दिवस युनिटेरियन प्रॉव्हिन्शियल असेम्ब्लीच्या वार्षिक सभेमध्ये घालविला. दोन दिवस लंडनमध्ये मुक्काम करून ११ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता रेल्वेने ऑक्सफर्डला जाण्यासाठी निघाले व तासाभराने ऑक्सफर्डला पोहोचले. मुंबईहून सुरू झालेला त्यांचा प्रवास संपला. तो सुखाचा झाला ह्याबद्दल त्यांनी परमेश्वराचे मनोमन फार आभार मानले.

संदर्भ
१.    शिंदे यांची १९०१ सालातील छोटी डायरी, शिंदे यांची कागदपत्रे.
२.    तत्रैव.
३.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘जलप्रवास’, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. ५.
४.    शिंदे यांची १९०१ सालातील छोटी डायरी, शिंदे यांची कागदपत्रे.
५.    तत्रैव.
६.    तत्रैव.
७.    विठ्ठल रामजी शिंदे, ‘मासेय शहर’, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. ९.
८.    तत्रैव, पृ. १३-१४.
९.    तत्रैव, पृ. १४-१५
१०.    दा. ना. आपटे, (लेखक व प्रकाशक), श्री सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र, खंड २, बडोदा, १९३६, पृ. ७४०-७४५.