मुंबईतील बि-हाड आणि प्रार्थनासमाजातील नवचैतन्य

१९०४च्या पावसाळ्याच्या आत शिंदे यांचे वडील रामजीबाब जमखंडीचे बि-हाड हालवून कुटुंबातील सगळ्या मंडळींना घेऊन मुंबईस आले. प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला यांच्या प्रेरणेने व आर्थिक साह्याने राममोहन राय आश्रम ही चार मजली भक्कम इमारत उभी करण्यात आली होती. प्रचारकाच्या निवासाची सोय ह्या इमारतीत करण्यात आली होती. दुस-या मजल्यावर लाकडाच्या पडद्या लावून निरनिराळ्या खोल्या करून शिंदे यांच्या कुटुंबाची व्यवस्था करण्यात आली होती. तळमजल्यात भांडारकर लायब्ररी होती.

तिस-या मजल्यावरील प्रशस्त दालनात संमेलने करण्याची व्यवस्था होती. चौथ्या मजल्यावर पुढे थोडी मोकळी जागा सोडून एक खोली काढण्यात आली. बाहेरून आलेल्या मिशन-यांची सोय करण्यात येत असे. मुख्य इमारतीपासून स्वयंपाकाकरिता खोल्यांची वेगळी सोय केली होती व स्नानासाठी थोड्याशा दूर स्वतंत्र खोल्या होत्या. एकंदरीत त्यांच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था चांगली झाली.

शिंदे यांच्या राहण्याची व्यवस्था प्रशस्त झाली. मात्र खर्चाच्या व्यवस्थेत तुटपुंजेपणा जाणवावा अशीच परिस्थिती होती. त्यांचे कुटुंब दहा-बारा माणसांचे. समाजाचे प्रचारक या नात्याने त्यांची नेमणूक झाली तेव्हा दरमहा त्यांच्यासाठी साठ रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रचारकामासाठी करावा लागणारा खर्च यातूनच त्यांना भागवावा लागत असे. एवढेच नव्हे तर समाजाची इतर काही जास्तीची कामे त्यांनी काढली तर त्याची जबाबदारीही त्यांच्यावर पडे. एकदा केलेल्या साठ रुपयांच्या नेमणुकीत पुढच्या काळात काही वाढ झाली नाही आणि शिंदे यांना ती कधी मागावी असेही वाटले नाही. मुंबईतील राममोहन आश्रमात पाहुण्यांची वर्दळही बरीच असे. प्रार्थनासमाजाचे सभासद, प्रागतिक मताचे सन्माननीय पुढारी आणि बाहेरदेशी जाणारे व येणारे प्रतिष्ठित गृहस्थ यांसारख्या पाहुण्यांची वर्दळ असे. त्यांच्या सरबराईकडेही शिंदे यांच्या कुटुंबाला लक्ष द्यावे लागत असे. आर्थिक ओढाताणीची सवय असलेले शिंदेकुटुंब ही जबाबादारीही समाधानपूर्वक पार पाडीत असे.

मुंबईतील प्रार्थनासमाजीय मंडळींनी शिंदे यांच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे सामावून घेतले. जमखंडीसारख्या साध्या राहणीच्या खेडवळ भागातून आलेल्या या मंडळींना मुंबईसारख्या शहरी वस्तीत जुळवून घेणे प्रारंभी थोडे कठीण गेले. परंतु प्रार्थनासमाजाच्या प्रतिष्ठित कुटुंबातील मंडळी शिंदे कुटुंबीयांना मानाने वागवीत असत. भांडारकर, माडगावकर, चंदावरकर वगैरे घराण्यातील स्त्रिया शिंदे यांच्या वृद्ध आईशी मिळून-मिसळून वागत. मुंबईचा परकेपणा व तुटकपणा त्यांना जाणवू दिला नाही. वासुदेव बाबाजी नवरंगे, सदाशिवराव केळकर, द्वारकानाथ वैद्य, सौ. लक्ष्मीबाई रानडे यांची कुटुंबे शिंदे मंडळींना आपलीच वाटत एवढा त्यांच्यात घरोबा निर्माण झाला. बाबणराव कोरगावकर हे तर प्रथमपासूनच शिंदे यांची प्रेमपूर्वक काळजी घेत. वामवनराव सोहोना व सय्यद अब्दुल कादर यांच्याशी शिंद्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. काशीबाई नवरंगे, डॉ. वैकुंठ कामत वगैरे तरुण मंडळी त्यांच्या घरगुती अडचणी भागविण्यात नेहमी तत्पर असत. असा हा प्रेमळ गोतावळा त्यांच्याभोवती जमल्यामुळे मुंबई शहरातल्या राहणीचा आर्थिक तणाव त्यांना सह्य होत असे. विठ्ठलरावांना घरातील भावंडे अण्णा म्हणत असत. त्यांच्या घरोब्यातील मित्रमंडळीही त्यांना अण्णासाहेब असे म्हणू लागली. बाहेरही त्यांचा उल्लेख अण्णासाहेब शिंदे असा होऊ लागला.

मुंबई प्रार्थनासमाजाच्या स्थानिक कामाचा आराखडा शिंदे यांनी केला होता. त्याप्रमाणे ते कामास लागले. दिवसभराची कामे आटोपल्यावर सभासदांच्या भेटी घेणे, रात्रीच्या शाळांची देखरेख करणे वगैरे कामे संपवून घरी येण्यास शिंदे यांना रात्रीचे अकरा-बारा वाजत. मुंबईसारख्या अफाट वस्तीत सभासदांची घरे लांबवर पसरलेली व रात्रीच्या शाळाही दूरदूरच्या अंतरावर असत. त्यामुळे कामात वक्तशीरपणा राखणे त्यांना जड जाई. कामाची जुळणी करणे प्रारंभी कठीण जात होते. परंतु सोबती तरुणांचा उत्साह वाढत होता.

विसाव्या शतकाच्या आरंभकाळात मुंबई प्रार्थनासमाजात क्रांतिकारक बदल घडून आला. वृद्ध पिढी जाऊन तिची जागा नवीन पिढीने घेतली होती. प्रार्थनासमाजाच्या जुन्या संस्थांचे काम नव्या उत्साहाने सुरू झाले होते. व त्यामध्ये काही नवीन संस्थांची भर पडली होती. ह्यामुळे एक प्रकारे नवचैतन्याचे वारे खेळू लागले. द्वारकानाथ वैद्यांनी सुबोधपत्रिकेची जबाबदारी उचलली, तर वामनराव सोहोनी यांनी रात्रीच्या शाळा हाती घेतल्या. कोरगावकर प्रार्थनासमाजाच्या जमाखर्चाची काळजी घेऊन लागले. इतरही तरुण वेगवेगळ्या कामासाठी पुढे येऊ लागले. ह्याचा परिणाम पुढील काही वर्षे समाजाच्या वार्षिक उत्सवाच्या वेळी स्पष्टपणे दिसू लागला. दूरदूर राहणा-या सर्व कुटुंबीयांची स्नेहसंमेलने पार पडू लागली. निरनिराळ्या दर्जाच्या कुटुंबांमध्ये परिचय वाढून निरनिराळ्या कुटुंबांमध्ये कौटुंबिक उपासना होऊ लागल्या. सगळा समाज म्हणजे एक कुटुंब अशी भावना रुजू लागली. समाजाकडे बाहेरच्यांचेही लक्ष वेधू लागले. हितचिंतक सभासद होऊ लागले आणि सभासद कार्यवाह होऊ लागले. गिरिजाशंकर त्रिवेदीसारखी गुजराथी मंडळीदेखील सभासद होऊ लागली. कराचीचे डॉ. रुबेन व स्वामी स्वात्मानंदजी हे आर्यसमाजी. त्यांचे सहकार्य प्रचारकार्यामध्ये मिळू लागले. सय्यद अब्दुल कादर व त्यांची बहीण हाजराबाई हे तर शिंदे यांच्या घरोब्यातील होते. सय्यद अब्दुल कादर यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली व शिंदे यांच्या कामाशी ते सहकार्य करू लागले. केरो रावजी भोसले या मराठा तरुणाने प्रर्थनासमाजाची दीक्षा तर घेतलीच शिवाय पंढरपूर येथील अनाथ आश्रमाची जबाबदारी स्वतःकडे घेतली व पुढील काळात तो मोठ्या नावारूपास आणला.१ नवीन उपक्रमाला प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला आर्थिक पाठबळ देत राहिले. डॉ. भांडारकरांसारख्या पूज्य विभूतीचा समागम मुंबईकरांन घडून त्यांचे उन्नत आध्यात्मिक विचार ऐकावयाल मिळत. शिवरामपंत गोखले ह्या वृद्ध प्रचारकाचा रसाळ उपदेश बायकामुलांनाही आवडू लागला. मुंबई प्रार्थनासमाजात अवतरलेल्या या नवचैतन्याच्या पाठीमागे विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्रेरक, उत्साही व्यक्तिमत्त्व होते. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रभावाबद्दल वामनराव सोहोनी यांनी लिहिले आहे, “प्रार्थनासमाजाचे प्रचारक झाल्यावर त्यांनी समाजातील व समाजाबाहेरील अनेक तरुणांना एकत्रित करून प्रार्थनासमाजाच्या जीवनात नवचैतन्य उत्पन्न केले.”२ त्यांच्या ठिकाणी धर्मकार्याबद्दल आत्यंतिक निष्ठा, अमाप उत्साह होता व त्याला कुशल योजकतेची व सुसंस्कृत वर्तनाची जोड होती. समाजाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर होते. मुंबईचे ते प्रतिष्ठित नागरिक होते. सरकार दरबारात तसेच लोकमानसामध्ये त्यांना मोठी मान्यता होती. त्यांचे नेतृत्व आणि त्यांची मान्यता यांचा लाभ समाजालाही होत राहिला. आधीच्या पिढीतल्या श्रेष्ठ विभूतींनी प्रार्थनासमाजाला जे उच्च अधिष्ठान मिळवून दिले ते त्यांपैकी अद्यापि मागे उरलेल्या डॉ. भांडारकरांनी आणि नव्याने आलेल्या चंदावरकरांनी कायम ठेवले.

प्रार्थनासमाजात संचारलेल्या उत्साहाचा परिणाम १९०५ सालच्या ३८व्या वार्षिक उत्सवामध्ये स्पष्टपणे दिसून आला. स्त्री-पुरुष, लहान-थोर, तरुण-वृद्ध, सभासद आणि हितचिंतक वगैरे सर्वांनी उत्सवामध्ये जोमाने भाग घेतला. प्रीतिभोजनामध्ये प्रो. गोपाळ कृष्ण गोखले, प्रिं. र. पु. परांजपे, श्री. बंडोपंत भाजेकर अशा कितीतरी बाहेरच्या मान्यवर हितचिंतकांनी भाग घेतला. इतकेच नव्हे तर अस्पृश्य समाजातील काही मंडळी पंक्तीस हजर होती. त्यामुळे थोडीशी आतबाहेर खळबळ उडाली पण एका नव्या रास्त प्रथेला प्रारंभ झाला.

याच कालखंडामध्ये उपासना पद्धतीत महत्त्वाची भर पडली. सिंधमधून डॉ. रुबेन आणि लाहोरहून रामरखामल ही भजनाची रसिक मंडळी राममोहन आश्रमात येऊन राहत. त्यामध्ये कलकत्ता ब्राह्मसमाजातील प्रसिद्ध तरुण गायक प्रबोधकुमार दत्त मुंबईत शिक्षणासाठी येऊन राहिले होते. ह्या सर्वांचा शिंदे कुटुंबाशी निकटचा संबंध जडला. त्यांच्या सहवासामुळे प्रार्थनासमाजाच्या साप्ताहिक उपासनेच्या आधी वेदीखाली बसून अर्धा तास भजन करण्याची प्रथा पडली. त्यामध्ये सिंध प्रांतातील हिंदी भजने व रवींद्रनाथ टागोरांची सुंदर बंगाली पदे यांचा समावेश अधिकाधिक होऊन लागला. उपासनेच्या वेळी ब्राह्म-संगीत म्हणण्याच्या बाबतीत भगिनीमंडळाकडून पुढाकार घेण्यात येऊ लागला. द्वा. गो. वैद्य यांच्या पत्नी गुलाबबाई, सीतारामपंत जव्हेरे यांची दुसरी कन्या कृष्णाबाई आणि अण्णासाहेबांच्या भगिनी जनाबाई यांचा पुढाकार असे. सत्येंद्रनाथ टागोर साता-यास जज्ज असतानाच सीतारामपंत जव्हेरे यांच्या गुलाबबाई, कृष्णाबाई, इंदिराबाई या मुलींनी बंगाली गाणी घेतली होती व त्यांच्या मराठी भाषांतराचा प्रार्थनासंगीतात समावेश करण्यात आला होता. प्रबोधकुमार दत्त यांचा गळा मधुर व ब्राह्मसंगीतावर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. जनाबाईंनी बंगाली भाषेची आणि विशेषतः संगीताची त्यांच्याकडून माहिती करून घेऊन इकडील संगीतात त्याचा प्रसार केला.

रात्रींच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि बहुजन समाजात ब्राह्मोपासनेचा प्रसार करण्यासाठी ब्राह्मो पोस्टल मिशनच्या द्वारे सुलभ संगीत या नावाचे लहानसे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. या कामी सदाशिवराव केळकरांचे चिरंजीव माधवराव केळकर यांनी बरीच मदत केली. उपासनेच्या वेळचे संगीत भगिनीमंडळींनी म्हणावे आणि उपासनेच्या आधीच्या वेळचे भजन तरुणांनी म्हणावे असा प्रघात सुरू झाला. सुलभ संगीत पुस्तक लोकप्रिय झाले. डॉ. रुबेन यांच्या भजनामुळे सिंधप्रांतीय गाणी इकडील मंडळींना विशेष आवडू लागली. म्हणून त्या प्रकारच्या गाण्यांचे ‘प्रेमलहरी’ या नावाचे एक पुस्तकही प्रसिद्ध करण्यात आले. प्रार्थनासमाजाच्या उपासनेच्या वेळच्या संगीतातही लोकांना आवडावा असा फरक पडला होता.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, २६ जून १९०४. शिंदे यांनी विशेष उपासना चालवून श्री. सय्यद अब्दुल कादर व श्री. केरो रावजी भोसले यांना २१ जून १९०४ रोजी ब्राह्मधर्माची दीक्षा दिली. या प्रसंगी केलेल्या आशीर्वादपर भाषणात पं. शिवनाथशास्त्री यांनी विशेषतः सय्यदांना उद्देशून सांगितले की, त्यांनी आपले जुने संबंध व परंपरा यांपासून जाणीवपूर्वक फारकत घेण्याचे कारण नाही. तसेच महंमदाबद्दल एक धर्मप्रेषित म्हणून पूर्ण आदर ठेवून वागावे.
श्री. किसन फागुजी बनसोडे व श्री. गणेश आकाजी गवई ही अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गातीली मंडळीही शिंदे यांच्यामुळे प्रार्थनासमाजाकडे आकृष्ट झाली. प्रार्थनासमाजाचे पांढरपेशी स्वरूप काही प्रमाणात बदलण्यास शिंदे यांचा प्रभाव कारणीभूत झाला.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३३४.