विठ्ठल रामजी शिंदे हे मंगलोर येथे ब्राह्मधर्मप्रचारक म्हणून जाईपर्यंतच्या काळात तेथील ब्राह्मसमाजी मंडळी राजकारणाच्या बाबतीत मोठी सोवली होती. शिंदे हे धर्मविषयक विवेचन करताना, आपल्या प्रतिपादनाला व्यापक बैठक देत असताना स्वाभाविकपणे राजकारणाचा निर्देश करीत असत. म. गांधींचा उल्लेख मोठ्या गौरवपूर्ण रीतीने करीत असत. राजकारणाच्या संदर्भातील शिंदे यांचे नवे विचार ऐकून विशेषत्वाने तेथील तरुणांचा वर्ग ब्राह्मसमाजाकडे आकृष्ट होऊ लागला. ब्राह्मधर्मप्रचारक म्हणून शिंदे यांचा प्रभाव वाढत होता. मात्र त्यांचे राजकारणविषयक नवे विचार प्रतिष्ठित बिल्लव मंडळीना रुचत नव्हते. त्यांच्याबद्दल एक प्रकारची असंतुष्टपणाची अविश्वासाची भावना प्रतिष्ठित बिल्लव मंडळींत निर्माण झाली. मंगलोर ब्राह्मसमाजाचे वातावरण असे अंत:स्थपणे खदखदत असतानाच केवळ ब्राह्मसमाजच नव्हे तर मंगलोर, कालिकत हा ब्रिटिश अमलाखालचा भाग व त्रावणकोर, कोचीन हा संस्थानी मुलूख सामाजिक व राजकीयदृष्टया ढवळून निघावा अशी एक घटना घडली. ती म्हणजे, व्हायकोम येथील मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह.
उत्तर व मध्य भारताच्या तुलनेत दक्षिण भारताचा भाग आचारविचारांच्या बाबतीत अत्यंत सोवळा होता. त्यातल्या त्यात पूर्वीच्या मलबार प्रांतात तर अस्पृश्य गणल्या गेलेल्या लोकांवर फारच जाचक निर्बंध लादलेले होते. त्रावणकोर संस्थानच्या व्हायकोम गावातील देवळातच नव्हे, तर देवळात जाण्या-येण्याच्या वाटेवरही अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना, मग ते कितीही प्रतिष्ठित असोत, जाण्यास कायदेशीर मनाई होती. हिंदुस्थानात अन्यत्र दिसून येणारी विसंगती येथेही तीव्र स्वरुपात आढळून येत होती. ती विसंगती म्हणजे देवळाच्या वाटेवर जाण्याला ख्रिस्ती, मुसलमान वगैरे परधर्मीयांना कोणतीही मनाई नव्हती. एवढेच नव्हे तर देवळाच्या बाहेरच्या व आतील मंडपात अशा परकीयांना मोठ्या प्रतिष्ठितपणे नेण्यात येत असे. म्हणजे मंदिरप्रवेशाबाबात असलेला हा निर्बंध केवळ हिंदू धर्मात असलेल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीपुरताच मर्यादित होता. हा अन्यायकारक निर्बंध उठवावा म्हणून व्हायकोमला १९२४च्या ३० मार्च रोजी मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रहाला प्रारंभ झाला होता. लाहोरचे स्वामी श्रद्धानंद हे आर्यसमाजाच्या वतीन सत्याग्रह करण्यासाठी आले होते. कालिकतेच मंजिरी रामय्या हे थिऑसॉफीच्या वतीने सत्याग्रहात भाग घेण्यासाठी आले होते. हा सत्याग्रह होण्यापूर्वी कित्येक वर्षांपासून ब्राह्मसमाज, आर्यसमाज व थिऑसॉफी ह्या उदारमतवादी धर्मपंथांमध्ये कित्येक अस्पृश्यवर्गीय मंडळी सभासद महणून दाखल झाली होती. त्यांनादेखील देवळाच्या रस्त्यावरुन जाताना अटक होऊ लागली होती. अस्पृश्यवर्गीयांवरील हा अन्याय दूर करावा म्हणून या तीनही उदार धर्मपंथांच्या अग्रणींनी या सत्याग्रहामध्ये भाग घेण्याचे ठरविले होते. ब्राह्मसमाजाच्या वतीने हे धुरीणत्व विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडे आले.
साधू शिवप्रसाद ह्या नावाचे पूर्वीच्या अस्पृश्य समजल्या जाणा-या तिय्या या जातीचे तरुण ब्राह्मसमाजामध्ये दाखल झाले होते, एवढेच नव्हे तर ते मलबार प्रांतात धर्मप्रचारक म्हणूनही काम करीत होते. साधू शिवप्रसादांनादेखील इतर अस्पृश्यांप्रमाणे व्हायकोम येथील मंदिराच्या वाटेवर जाण्यासाठी बंदी करण्यात आली. त्यांनी हा वृत्तान्त कलकत्याच्या साधारण ब्राह्मसमाजाच्या कमिटीकडे लिहून कळविला. साधारण ब्राह्मसमाजाचे त्या वेळचे अध्यक्ष डॉ. प्राणकृष्ण आचार्य यांनी त्रावणकोर दरबाराकडे जाहीर विनंतीपत्र पाठवून ह्या बाबतीत दाद मागितली आणि या पत्राची प्रत विठ्ठल रामजी शिंदे हे या भागातील मुख्य धर्मप्रचारक असल्यामुळे त्यांच्याकडे पाठविली व त्यांनी व्हायकोम येथे जाऊन या बाबतीत शक्य असेल तो प्रयत्न करावा असे सुचविले. साधू शिवप्रसाद यांचीही विठ्ठल रामजी शिंदे यांना वारंवार पत्रे येऊ लागली व व्हायकोम येथेच नव्हे तर त्या प्रांतात प्रचारकार्यासाठी त्यांनी मदत करावी अशी निकडीची विनंतीही त्यांनी चालविली होती. शिंदे यांनी हे सर्व प्रकरण मंगलोर समाजाच्या कमिटीपुढे ठेवले. कमिटीची मोठीच पंचाईत झाली. शिंदे यांच्या या प्रयत्नाला अनुमती देणे हे त्यांना रुचेना व नाही म्हणण्याचे धैर्यही त्यांना होईना. दौ-याच्या खर्चाचा प्रश्न असेल तर तो आपण पाहून घेऊ असे शिंदे यांनी कमिटीस सांगितले. म्हणजे व्यावहारिक अडचण कोणतीच उरली नव्हती. प्रश्न तेथील मंडळीच्या इच्छाशक्तीचा होता. त्यांच्या दृष्टीने मंदिरप्रवेशाचा हा प्रश्न केवळ धार्मिक अथवा सामाजिक स्वरुपाचा प्रश्न नव्हता. त्याला राजकारणाचेही एक अंग होते. अशा प्रकारच्या सत्याग्रहात भाग घेणे म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या तसेच संस्थानी अंमलाच्या विरोधात जाणे होय अशी त्यांची धारणा होती. म्हणून त्यांना शिंदे यांच्या संकल्पित दौ-याला व सत्याग्रहातील सहभागाला हो म्हणण्याचे धाडस होत नव्हते. शिंदे यांनी अखेरीस कमिटीचा असे सांगितले की, ज्या अर्थी कलकत्याच्या ब्राह्मसमाजाच्या अध्यक्षांनी आपण व्हायकोमला जावे म्हणून सुचविले या अर्थी हा दौरा काढणे आपले कर्तव्य आहे. शिंदे यांच्या या म्हणण्याला मंगलोर ब्राह्मसमाजाच्या कमिटीचा हरकत घेता आली नाही व शिंदे यांनी व्हायकोमला जाण्याचा निश्चय केला.
कालिकत ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी डॉ. गोपालन् हे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य होते. त्यांना शिंदे यांचा दौरा एकदम पसंत पडला. त्यांनी शिंद्यांना कालिकतला बोलावले खर्चाची तजवीज केली. साधू शिवप्रसाद यांनाही त्यांनी कालिकतला बोलावून घेतले. दौ-याला कार्यक्रम निश्चित करुन मे महिन्यात शिंदे व सादू शिवप्रसाद व्हायकोमला गेले. व्हायकोमला प्रयाण करण्याच्या आधी कालिकत येथे व्हायकोम येथील सत्याग्रहाविषयी प्रचंड जाहीर सभा झाली. तीत अनेक स्तानिक पुढा-यांनी भाषणे झाली. त्याचप्रमाणे शिंदे यांचेही भाषण झाले. त्यांचे हे भाषण मद्रास येथील वर्तमानपत्रांतून जाड मथळ्याखाली प्रसिद्ध झाले. ते पाहून मंगलोर येथील सोवळ्या ब्राह्मसमाजी बिल्ल्व मंडळींमध्ये विलक्षण अस्वस्थता निर्माण झाली. इकडे व्हायकोम येथे हजारो सत्याग्रहींचा प्रचंड तळ पडला हता. आर्यसमाजाचे आणि शीख समाजाचे जथ्थे तेथे येऊन थडकत होते. शिखांनी तर एक मोफत भंडारा सत्यग्रहींसाठी चालविला. ह्या सत्याग्रहांमध्ये केवळ अस्पृश्यच नव्हेत तर नायर लोकांचाही भरणा होता व काही नबुंद्री तरुणही होते. अस्पृस्याविषयक प्रश्नाबद्दल विलक्षण जागृती झाल्याचे हे चिन्ह होते. शिंदे व साधू शिवप्रसाद तेथे गेल्यावर सत्याग्रह्यांनी त्यांचे मोठे उत्साहाने व आनंदाने स्वागत केल.
दुस-या दिवशी साधू शिवप्रसाद यांना घेऊन शिंदे सत्याग्रहासाटी मंदिराकडे निघाले. शिंदे तेथे पोहोचण्याआधीच त्यांची सविस्तर वर्णने फोटोसहित पोलिसांकडे गेलेली होती. मुख्य पोलीस कमिशनर सत्याग्रहाच्या स्थानी सज्ज उभे होते. त्यांनी शिंदे यांना ओळखले. सत्याग्रहाच्या ठिकाणी शंभर शंभर सत्याग्रहींचे जथ्थे रस्त्यातील कुंपणाजवळ आडवे बसत. वाव मिळाला की आत घुसण्याचा प्रयत्न करीत असत व पोलीस त्यांना पिटाळून लावीत, असा संघर्ष तेथे चालू होता. एका वेळी एका माणसालाच प्रवेश करता येईल इतके अरुंद फाटक ह्या कुंपणास ठेवण्यास आले होते व फाटकाच्या दोन्ही बाजूस पोलीस अधिकारी उभे असत. शिंदे हे शिवप्रसादांना आपल्यासमवेत नेऊन सत्याग्रह करणार हे आधीच प्रसिद्ध झाले होते. शिंदे यांनी शिवप्रसादांच्या बगलेत हात घातला व फाटकात प्रवेश केला. पण पोलीस कमिशनरनी शिंदे व शिवप्रसाद यांच्यामध्ये दांडके घालून हसत हसत शिंदे यांना म्हटले, " आपण खुशाल जा, पण यांना जाता येणार नाही," शिंदे म्हणाले, "आम्ही दोघे ब्राह्मधर्माचे प्रचारक बंधू आहोत. आम्हा दोघांनाही न ओळखता तुम्ही असा पंक्तिप्रपंच का करता." ते म्हणाले, "आम्ही आपणाला पूर्ण ओळखतो." शिंदे यांनी त्यांना बजावले की, "मी येथून त्रिवेंद्रम येथे दरबारला भेटावयास जाणार आहे. तुम्ही आम्हाला बेकायदेशीर अटक करीत आहात याची पूर्ण जबाबदारी घेत आहात ना?" अधिकारी म्हणाले," आम्ही जे करीत आहोत ते दरबारच्याच आज्ञेने करीत आहोत. आपल्याला आम्ही अटक केली नाही; उलट पोलीस बरोबर देऊन तुम्हा एकट्यालाच सन्मानपूर्वक देऊळ दाखविण्याची आमची तयारी आहे. मात्र तुमच्या बंधूस तसे करता येणार नाही. कारण पूर्वाश्रमीचे ते कोण आहे ते आम्ही ओळखतो."
त्यानंतर शिंदे साधू शिवप्रसादांना बरोबर घेऊन त्रिवेंद्रम येथे गेले व संस्थानचे दिवाण राघवय्या यांची त्यांनी भेट घेतली. "ब्राह्मसमाजाच्या धर्मप्रचारकावर व्हायकोम येथे होणा-या अन्यायासंबंधीची दाद मागणारा अर्ज आपणास मिळाला काय," असे शिंदे यांनी दिवाणांना विचारले व "त्याचे उत्तर अद्यापि का मिळाले नाही." असा प्रश्न केला. दिवाणांनी उत्तर केले की, "त्या प्रश्नाचा विचार चालू आहे." त्यावर शिंदे म्हणाले, "आपला इकडे विचार चालू आहे. तर तिकडे व्हायकोमला परवा आम्हाला अटक झाली याची वाट काय?" ते म्हणाले, "झालेल्या प्रकरणात थोडी कसूर झाली हे खरे आहे. पण ज्या अस्पृश्यांनी ब्राह्मसमाजाची दीक्षा घेतली आहे त्यांनी आपण हिंदू नाही असे जाहीर करावे, म्हणजे त्यांची वाट खुली होईल." शिंदे यांनी १९०८ साली बडोद्यास दिलेल्या आपल्या सुप्रसिद्ध 'बहिष्कृत भारत" या व्याख्यानात जी विदारक विसंगती दाखवून दिली होती तिचाच पडताळा याही प्रसंगी त्यांना आला. त्या भाषणात शिंदे यांनी असे म्हटले आहे की, "अस्पृश्य मानलेल्यांनी धर्मांतर केले, म्हणजे तो ख्रिस्ती किवा मुसलमान झाला, तर आपण त्याला शिवून घेतो, तो हिंदू म्हणून राहिला तर शिवून घेत नाही. याचा अर्थ ह्या लोकांमध्ये असणारे हिंदूपण हेच आपण अस्पृश्य ठरवीत आहोत." शिंदे दिवाण राघवय्यांना पुढेल म्हणाले, "ब्राह्मसमाज हिंदू आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. ब्राह्मसमाज कुणीही असो. हिंदू नसलेल्या परधर्मीय गृहस्थास मज्जाव नाही आणि ब्राह्मसमाजी आपण हिंदू नाहीत असे जाहीर करेपर्यंत त्यांना मज्जाव असा तुमच्या कायद्याचा अर्थ आहे काय? असे असेल तर मी स्वत: महाराजांना भेटून खुलासा विचारणार आहे." त्यावर दिवाण म्हणाले, "महाराजांनी सर्व अधिकार दरबारकडे दिले आहेत. ते तुम्हाला भेटणार नाहीत." यापुढे हुज्जत घालीत बसण्यात अर्थ नाही असे ध्यानात घेऊन शिंदे यांनी दिवाणांना नम्रपणे सांगितले, "या सर्व विसंगत प्रकाराचा पुकारा मी ठिकठिकाणी जाहीर सभा भरवून करणार आहे. आपली हरकत असल्यास कळवा." तेव्हा ते म्हणाले, "तुमचे व आमचे मार्ग भिन्न आहेत व ते दोघांनाही मोकळे आहेत. यापेक्षा जास्त काही मी सांगू शकत नाही."
सत्याग्रहाचा हा अध्याय अशा त-हेने संपवून विठ्ठल रामजी शिंदे साधू शिवप्रसादांना बरोबर घेऊन कोचीन व त्रावणकोर संस्थानात ब्राह्मसमाजाच्या प्रचारासाठी निघाले. कोचीनची राजधानी असलेल्या अर्नाकुलम येथे प्रेस असोसिएटेडच्या एजंटने बॉम्बे क्रॉनिकल पत्राचा एक अंक शिंदे यांच्या हाती देऊन एक बातमीकडे त्यांचे लक्ष वेधले. ती बातमी अशी होती, "पुण्याचे प्रसिद्ध पुढारी श्री. व्ही.आर. शिंदे हे व्हायकोम येथे गेले असता त्रावणकोर पोलीस अधिका-यांनी त्यांना देवळाच्या वाटेवर जाण्यास मनाई केली हे बरे झाले नाही. श्री. शिंदे यांच्यामागे संबंध महाराष्ट्र आहे हे त्रावणकोर दरबारने पक्के ध्यानात ठेवावे" बातमीतील मजकूर सर्वांशी खरा नाही हे ध्यानात घेऊन शिंदे यांनी बॉम्बे क्रॉनिकललला दुरुस्तीचे पत्र तात्काळ लिहिले. "व्हायकोमला मला स्वत:ला मनाई झाली नाही. उलट सन्मानाने देऊळ दाखविण्याची पोलीस खात्याने तयारी दाखविली. मात्र माझे ब्राह्मप्रचारक बंधू शिवप्रसाद यांना ते पूर्वाश्रमीचे अस्पृश्य म्हणून अशी बंदी झाली." प्रेस असोसिएटेडच्या ज्या एजंटने चुकीची बातमी पाठविली होती त्याने आपल्या चुकीबद्दलचे दिलगिरी पत्र शिंदे यांना दिले.
अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल थोडीफार जाणीव झाली, एवढेच व्हायकोमच्या सत्याग्रहाचे फलित म्हणावे लागेल. मंदिरात किंवा मंदिराच्या वाटेवर कोणाही स्पृश्य हिंदूला तसेच खिश्चन, मुसलमान अशा परधर्मीयाला जाण्याला परवानगी होती; मात्र हिंदू असणा-या अस्पृश्याला तेवढी अशी परवानगी नव्हती. शिंदे यांना वाटले की ह्या सर्व धर्मातील लोकांनी अस्पृश्यांविरुद्ध केलेली ही एकी असून ह्या एकीला त्रावणकोर व कोचीन या संस्थानांचा पाठिंबा आहे व ब्रिटिश सरकार ह्या प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहे.
विवेकानंदांनी ह्या दक्षिणेकडील प्रांतांना तेथील अजब चालीरीती व मागासलेपणाचा कडेलोट पाहू वेड्याचे हॉस्पिटल म्हटले होते असा उल्लेख शिंदे यांनी १९०३ साली लिहिलेल्या एका लेखात केली होता. वीस-एकवीस वर्षांनंतर शिंद्यांना विवेकानंदांच्या त्या शे-याचे पुन्हा स्मरण झाले असणार.