1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

अस्पृश्यवर्गाची उन्नती

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसंबंधीचा ठराव पुढे आणताना रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी पदोपदी आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणींचे अगदी कळकळून वर्णन केले.  हे भाषण करताना ते म्हणाले की, ''मुंबई इलाख्यातील हिंदूंमध्ये एकसष्ठमांश लोक अस्पृश्य मानिलेल्या वर्गातील आहेत.  या लोकांना नालायक, निकामी समजून आम्ही दूर लोटलेले आहे.  या जीतांना गावाबाहेर ठेवण्यात येते.  हल्लीपर्यंत माझी अशी समजूत होती की, आगबोटी, आगगाडया वगैरेमध्ये या लोकांची इतर लोकांशी सरमिसळ होते.  युरोपियन लोक व बायका यांच्यासाठी आगगाडीचे डबे राखून ठेवण्यात येतात.  असे आपल्याला साधारणपणे आढळते.  परंतु काठेवाडमध्ये ''फक्त धेडांकरिता,'' असे आगगाडीच्या एक डब्यावर लिहिलेले मला आढळले.  बरे या डब्यात इतरांनी शिरावयाचे नाही, असेही नाही.  असल्या एका डब्यात पोलीसची हत्यारबंद पार्टी शिरली व त्यांनी तो डबा बळकावला.  पुढे दुसऱ्या स्टेशनवर गार्डाने (हा गार्ड नेटिव ख्रिस्ती होता.)  या पोलीसपार्टीला त्या डब्यातून जाण्यास लावले.  सारांश, दुसऱ्या कोणास तो डबा नको असेल तर तो धेडांसाठी राखून ठेवलेला म्हणून समजावयाचा.  महार, चांभार वगैरे लोकांना आम्ही कसे शिवावे, त्यांची स्थितीच तशी घाणेरडी असते, असे कित्येक म्हणतात.  परंतु ह्या लोकांना आम्ही दूर ठेवीत गेलो.  त्यामुळेच त्यांची स्थिती दूर ठेवण्यासारखी झाली हे आपण विसरता कामा नये.  हे लोक ओंगळ आहेत, म्हणून आम्ही त्यांना शिवत नाही असे म्हणण्यापूर्वी आम्ही शिवत नसल्यामुळे ते ओंगळ झाले, हे लक्षात आणले पाहिजे.  आम्हाा जर आमची स्वच्छता व आमचे शील यांविषयी खात्री आहे तर अस्पृश्याला आम्ही मिठी मारली तरी आम्ही अमंगल होणार नाही.  अस्पृश्य लोकांची उन्नती करण्याच्या बाबतीत एक एक पाऊल पुढे पडत आहे.  आजपर्यंत आम्ही याविषयी ठराव पास केले.  आता प्रत्यक्ष कृतीने सुधारकांनी सहानुभूती दाखविली पाहिजे.  बाहेरगावी मी जातो, तेव्हा या वर्गांना शिक्षण द्या म्हणून वरिष्ठ जातींच्या लोकांना मी सांगतो.  त्यांना 'शिवा' म्हणून तेथे सांगता येत नाही.  या प्रश्नावर मोठया बंदोबस्ताने बोलावे लागते.  हल्लीच मुंबईच्याजवळ एका जिल्ह्याच्या शहरी माझ्या व्याख्यानास जागा मिळू नये म्हणून तेथल्या कर्मठ लोकांनी कडेकोट बंदोबस्त केला होता.  शेवटी मोठा वशिला बांधून जागा मिळवावी लागली.  परंतु येथे आज आपण मुंबईत आहो, बाहेरगावी नाही.  येथे भित्रेपणा किंवा अर्धवटपणा नको.  बाहेरगावी काम करणारा मनुष्य तेथील परिस्थिती पाहून धोरणाने वागतोच.  आजच्या परिषदेत अर्धवटपणा न ठेवताच ठराव पास झाला पाहिजे.  शिक्षणाच्या द्वारे अस्पृश्य मानिलेल्या वर्गाची सुधारणा केली पाहिजे हे खरेच आहे; परंतु या जातीतील लोकांशी स्पर्शास्पर्श विचार न ठेविता मिळून मिसळून वागणे, हेही मुख्य काम आहे.  

----------------------------------------------------------------
* सुबोधपत्रिका, १४ एप्रिल १९१२
----------------------------------------------------------------

अस्पृश्यतेचा प्रश्न

(इ.स. १९३५ मध्ये म.वि.रा. शिंदे यांनी 'किर्लोस्कर' मासिकाला दिलेल्या मुलाखतीतील भाग)

प्रश्न :  अस्पृश्यतेच्या प्रश्नाला हल्ली जे तीव्र स्वरूप आले आहे, त्याविषयी आपणांस काय वाटते ?

उत्तर :  माझे असे मत आहे की, सर्वांनी मिळून हा अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवावा.  नाही तर तो एक कायमचा काटा होऊन बसेल.  आपण जर स्वखुषीने अस्पृश्यांस स्वतंत्र केले नाही, तर त्यांस आपल्या उलट जावयास तयार केल्यासारखे होईल व ते तसे तयार झाले व आम्हांला विरोध करून पुढे येऊ शकले, तर त्यास नाव ठेवण्यास आपणांस काहीही हक्क नाही.  म्हणून आपण उदार दृष्टीने अस्पृश्यांस आपणास अगदी मिळवून घेतले पाहिजे.  इतके की, त्यांचा वेगळा नामनिर्देशसुध्दा करावा लागू नये.  असे जर आपण केले नाही तर 'अस्पृश्यांचा मुसलमानांसारखा सवतासुभा होईल व तो झाल्यास अखेरपर्यंत जाचक होऊन बसेल.  तेव्हा आपण आत्महिताच्या दृष्टीने विचार केला, तरी अस्पृश्यांस वर आणणे आपले कर्तव्य ठरते.  राजकारणामध्ये ब्राह्मणेतर, मुसलमान हे जसे सवतेसुभे आतापर्यंत झाले आहेत तशीच अस्पृश्यांची ही तिसरी मेख तयार होत आहे.  याचा सर्वांनी, विशेषतः ब्राह्मणांनी, विचार करावा.  सनातन्यांचा बोजा ब्राह्मणांवर आहे.  त्यांची सर्व जबाबदारी ब्राह्मणांवर आहे, तेव्हा त्यांनी आपले कर्तव्य नीट रीतीने पार पाडावे.

अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास*

उत्पत्ती  :  अस्पृश्यतेचा इतिहास निदान हिंदुस्थानात तरी आर्यन् लोकांच्या आगमनाइतकाच जुना आहे.  चांडाल हा शब्द वैदिक वाङमयात आणि बौध्द ग्रंथांतून आढळतो.  बुध्दाच्या वेळेच्या पूर्वीपासून तरी निदान चांडाल आणि इतर जित राष्ट्रे अस्पृश्य गणली जात होती असे उल्लेख आढळतात.  इराणातील झरथुष्ट्रपंथी आर्य हिंदुस्थानातील देवयज्ञी व इतर देवोपासक आर्यांनाही अस्पृश्य आणि तिरस्करणीय समजत असत, असे पार्श्यांच्या जुन्या व अर्वाचीन ग्रंथांत पुरावे मिळतात.  आर्यांचा हिंदुस्थानात कायमचा जम बसल्यावर त्यांनी येथील दस्यू ऊर्फ शूद्र नावाच्या जित राष्ट्रांना आपल्या वस्तीजवळच पण बाहेर रहावयास लावून त्यांच्या व आपल्या संस्कृतीत भेसळ होऊ नये म्हणून त्यांना अस्पृश्य ठरविले.  ज्या अर्थी जपानात हेटा, हीना नावाच्या अस्पृश्य जाती अद्यापि आहेत; त्या अर्थी अस्पृश्यता ही संस्था आर्यांनीच निर्माण केली नसून तिचा प्रादुर्भाव मोगल लोकांतही पूर्वी होता हे सिध्द होते.  हेटा किंवा ऐटा ही जात फिलीपाईन बेटातून जपानात गेली असावी.  अथ्रवण (ब्राह्मण), रथेस्ट्र (राजन्य), वस्ट्रय (वैश्य) आणि हुइटी (शूद्र) असे झरथुष्ट्राच्या वेळी इराणात चार भेद होते.  वेदात शूद्र हा शब्द आढळत नाही, पण महाभारतात अभिर आणि शूद्र ह्यांचा उल्लेख असून सिंधू नदीच्या मुखाजवळील भागात त्यांची वस्ती असावी असे दिसते.  (ॠग्वेदात पुरुषसूक्तात शूद्र हा शब्द आला आहे व शुल्क यजुर्वेदात ८ वेळा या शब्दाचा उल्लेख आला आहे.  २३.३०.३१  इ.-संपादक :  ज्ञानकोश)  'कास्टस् ऑफ इंडिया' या पुस्तकात वुईल्सनने म्हटले आहे की, कंदाहार प्रांतात शूद्रोई नावाचे प्राचीन राष्ट्र होते आणि सिंधू नदीवर शूद्रोस नावाचे शहर होते (रसेल ह्यांचे कास्टस् ऍण्ड ट्राईब्स् सी.पी. हे पुस्तक पहा).  इराणातील हुइटी अथवा शूद्रोई आणि फिलीपाईन बेटातील ऐटा ह्या जातींचा संबंध असल्याचे सिध्द करता आल्यास अस्पृश्यतेचा उत्पत्तीवर बराच प्रकाश पडण्यासारखा आहे.

--------------------------------------------------------------  
* महाराष्ट्रीय ज्ञानकोश, विभाग ७ वा
--------------------------------------------------------------
आर्यांचा विसतार उत्तर हिंदुस्थानात होऊन आर्यावर्ताची स्थापना झाल्यावर शूद्र राष्ट्रांचा आर्यांच्या वर्णव्यवस्थेत समावेश होऊन पुढे दुसरी जी कोणी जंगली जित राष्ट्रे आर्यांच्या खिदमतीस राहण्यास कबूल झाली; ती हळूहळू अस्पृश्य गणली जाऊन गावाच्या शिवेबाहेर राहू लागली, अशी उपरिनिर्दिष्ट उपपत्ती रसेलच्या ग्रंथात आहे.  मनुस्मृतीच्या काळानंतरची अलीकडच्या अस्पृश्य जातीची चांगली माहिती मिळण्यासारखी आहे.  मनुस्मृतीत ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष यामधील प्रतिलोक संततीस 'चांडाल' अशी संज्ञा आहे.

इंग्रजी शिक्षणामुळे हिंदुस्थानात जी आधुनिक सुधारणेची प्रवृत्ती सुरू झाली, तिच्यामुळे वरील अस्पृश्यतेच्या निवारणार्थ केवळ हिंदू लोकांकडून जे प्रयत्न होत आहेत, त्यांचा संक्षिप्त इतिहास एवढाच प्रस्तुत विषय आहे.

ह्या विषयाचे दोन मुख्य भाग पडतात, ते असे :  इ.स. १९०६ मध्ये भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) मुंबई येथे स्थापन झाली.  हिचा पूर्वकाळ आणि उत्तरकाळ असा : पूर्वकाळी अनुक्रमे महाराष्ट्र, बंगाल, बडोदे आणि मद्रास प्रांती काही उदार व्यक्तींनी थोडेसे प्रयत्न केले, पण त्यांच्यांत सातत्य, संघटना, परस्पर संबंध नसल्यामुळे त्यांना यावी तशी दृढता आली नाही; पण ही मंडळी मुंबईत स्थापन झाल्यावर सर्व हिंदुस्थानभर हिच्या शाखा झपाटयाने पसरल्या.  त्यांच्यांत कमी अधिक परस्परसंबंध जडल्यामुळे व त्यांच्या द्वारा सर्वत्र लोकमताचा विकास झाल्यामुळे शेवटी सन १९१८ साली कलकत्त्याच्या काँग्रेसने मंडळीचे जनरल सेक्रेटरी रा. शिंदे ह्यांच्या पत्रावरून अस्पृश्यतानिवारणाचा ठराव सर्वानुमते पास केला व पुढे लवकरच महात्मा गांधी ह्यांच्या पुरस्कारामुळे ह्या प्रयत्नाला आता अखिल राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.  कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये मिसेस बेझंट या अध्यक्ष होत्या व त्यांचा ह्या मंडळीशी बराच परिचय होता.  म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांच्या जोरावर हा ठराव पास केला.

रा. फुले यांचा प्रयत्न  :  इंग्रजी विद्येचा उगम एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी तरी प्रथम बंगाल्यात झाला, आणि तेथे राजा राममोहन रॉय ह्यांनी इ.स. १८३१ त ब्राह्मसमाजाच्या रूपाने सर्व आद्य प्रगतीची ध्वजा उभारती.  तरी अस्पृश्यतानिवारणाचा अग्र आणि अंतिम मान महाराष्ट्रसच आणि विशेषतः जोतीबा फुले ह्या महात्म्यानेच मिळविला.  ह्यांचा जन्म पुणे येथे फुलमाळी जातीत झाला.  सन १८४७ पर्यंत ह्यांचे मराठी आणि इंग्रजी शिक्षण मिशनरी शाळेत झाले.  रा. लहूजी नावाच्या एका तालीमबाज मांग जातीच्या गृहस्थाच्या आखाडयात ह्यांचे शारीरिक शिक्षण झाले होते.  तेव्हापासून अस्पृश्योध्दाराकडे ह्यांचे लक्ष वेधले होते.  पुढे बंगाल्यात बाबू शशिपाद बानर्जी ह्या गृहस्थांनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, अस्पृश्योध्दार वगैरेसंबंधी सामाजिक प्रगतीची जी कामे चालविली; ती त्याच्या पूर्वीच २० वर्षे आधी महाराष्ट्रात ह्यांनी चालविली.  ''डेक्कन असोसिएशन'' नावाची एक प्रागतिक विचारप्रसारक संस्था पुण्यास होती.  तिच्या वतीने सरकारांनी जोतीबास २०० रुपयांची शाल, मोठी जाहीर सभा करून १८५२ साली नजर केली.  त्याचे कारण १८४८ साली जोतीबांनी मुलींची पहिली शाळा स्थापन केली, आणि १८५२ साली आरंभी महारमांगांच्या मुलांसाठी पहिली शाळा स्थापन केली.  ही शाळा मुंबई इलाख्यातच नव्हे, तर अखिल जगात अस्पृश्यांसाठी हिंदू लोकांनी उघडलेली पहिलीच खासगी शाळा होय.  सरकारी इन्स्पेक्टर मेजर कँडीसाहेबांनी हिची पहिली परीक्षा, ता. २१ मार्च १८५२ रोजी शुक्रवार पेठेतील शाळेत घेतली असे त्या दिवशी प्रसिध्द झालेल्या ज्ञानप्रकाशाच्या अंकात नमूद झाले आहे.  ''त्या वेळेस शुध्द लिहिणे व वाचणे वगैरे गोष्टींत ह्या शाळेतील मुलांनी विश्रामबागेतील (वरिष्ठ वर्गाच्या) किती एक विद्यार्थ्यांपेक्षाही उत्तम परीक्षा दिली, असे मेजरसाहेबांनी म्हणून दाखविले, असे ज्ञानप्रकाशने त्याच अंकात प्रसिध्द केले आहे.  ता. ५ डिसेंबर १८५३ च्या ज्ञानप्रकाशात शाळेच्या पहिल्या वाषर्िाक रिपोर्टासंबंधाने संपादकांनी जे स्पष्ट व सविस्तर मत दिले आहे त्यातील खालील उतारे विशेष लक्षात घेण्यासारखे आहेत.  ''एक मुलींची शाळा आपल्या घराजवळ घातली.  त्या कालावधीत व पुढेही त्यास त्यांच्या जातीच्या लोकांकडून फार त्रास सोसावा लागला.  त्यास शेवटी तीर्थरूपांनी त्याच कारणावरून घरातून काढले.  आपल्या नीच बंधुजनांस अज्ञानसागरातून काढून ज्ञानामृताचे सेवन करण्याकरिता त्यांनी संकटे भोगली, हा त्यांचा त्या जातीवर मोठा उपकार आहे.  आम्हीही त्यांचे आभार मानितो.  ब्राह्मण लोकांमुळे अतिशूद्रांचे ज्ञानेकरून व द्रव्येकरून बिलकुल बरे होऊ नये, अशी उंच जातीची इच्छा खरी, परंतु त्यात ब्राह्मण काय ते अग्रेसर असा ह्यांचा लिहिण्याचा हेतू कळून येतो.  त्याशिवाय स्पष्टीकरण करण्याचे कारण नाही.  प्रायः आम्ही ही गोष्ट खरी समजतो, असे फुलेराव जाणत असता, ज्या ब्राह्मणांनी अशाच कामात द्रव्याची वगैरे मदत केली, त्यापेक्षा त्यांची स्तुती तर इतरांपेक्षा जास्त केली पाहिजे व त्यांचे स्मरण सवा्रंस राहावे यास्तव त्यांचे नावे जोतीरावांनी (रिपोर्टात) अवश्य लिहावी असे आम्हास वाटते.''  ह्या शाळेत चांभाराच्या मुलींस जोतीबा स्वतः व त्यांची बायको किती कळकळीने शिकवीत असत, ह्याविषयी एक पत्र ज्ञानप्रकाशात प्रसिध्द झाले आहे.  ह्यांचे तीन मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे ह्यांची जोतीबांना बरीच मदत असे.  ''महारमांगांच्या शाळांत बरीच गर्दी होत असे.  ह्या लोकांस त्यांनी आपल्या राहत्या घराच्या विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली.''  (अ. ए. गवंडीकृत फुले यांचे परित्र, पान ८) ता. ४ सप्टें. १८५६ च्या ज्ञानप्रकाशाच्या अंकात खालील मजकूर आहे :  ''गेल्या शुक्रवारी येथील अति शूद्रांच्या शाळांची परीक्षा झाली.  मुख्य स्थानी मिस्तर स्विससाहेब रिविन्यू कमिशनर हे बसले होते, युरोपियन, नेटिव्ह बरेच आले होते.  आरंभी कमिटीने रिपोर्ट इंग्रजीत व नंतर मराठीत वाचला व त्यावरून असे समजते की, एकंदर शाळा तीन आहेत व त्यांमध्ये मुलांची संख्या सुमारे ३०० वर आहे.  परंतु महारमांग आदिकरून नीच जातीखेरीजकरून इतर मुले पुष्कळ होती.  शिक्षक सुमारे ८ आहेत.  ह्या शाळांत मुली मुळीच नाहीत.  गेल्या दोन वर्षात मुली असत, परंतु एक शाळा ह्या वर्षी जास्त वाढविली आहे.  स्थापन झाल्यापासून दिसत आहे की, त्या शाळांच्या अभ्यासाची धाव पलीकडे जात नाही व ह्याचे कारण काय ते कळत नाही.  कमिटी असे म्हणते की, शिक्षक चांगले मिळत नाहीत.''

सन १८७५ सप्टेंबर ता. २४ च्या मुंबई सरकारच्या रेव्हिन्यू खात्याच्या नं. ५४२१ च्या ठरावावरून जोतीबांच्या ह्या शाळांविषयी खालील ठराव १८५५-५६ च्या सुमारास महारमांगांच्या मुलांच्या शाळेसाइी इमारत बांधण्याकरता सरकारांनी पुणे येथे एक जागेचा तुकडा दिला असे दिसते व तसेच इमारत खर्चासाठी दक्षिणा फंडातून ५००० रुपये देण्याचे सरकारांनी वचन दिले.  ही रक्कम वसूल करण्यात आली नाही.  तरी ह्या जागेवर एक झोपडी उभारण्यात येऊन तिच्यात गेल्या वर्षापर्यंत महारांसाठी एक शाळा भरत होती.  आता शाळा बंद आहे.  ह्या शाळेच्या मंडळीचे सेक्रेटरी रावबहादूर सदाशिवराव बल्लाळ.  त्यांच्या ताब्यात ही जागा आहे.  शाळेला लागणाऱ्या जागेखेरीज इतर भाग एका मांगाला लागवडीने सेक्रेटरी देत आहेत.  तिचे लावणी उत्पन्न दरसाल ८० ते १०० रुपये येत असते.  रावबहादूर सदाशिव ह्यांच्या मनात ही जागा व शाळा सरकारास द्यावयाची आहे.  ही जागा लोकलफंड कमिटीस द्यावयाची आणि शाळा तिच्या उत्पन्नातून सदर कमिटीने पुढे चालवावी.  दक्षिणाफंडातून ८०० रुपये ग्रँट देण्यास सरकारांना हरकत वाटत नाही.  मुंबई सरकारच्या विद्याखात्याचा तारीख १३ नोव्हेंबर १८८४ नंबर १९, २१ चा ठराव झाला, त्यावरून ही शाळा लोकफंड कमिटीकडून पुणे म्युनिसिपालिटीकडे येऊन सरकारातून वेगळी ग्रँट मिळण्याची तजवीज झाली.  येणेप्रमाणे महारमांगांसाठी जोतीबांनी जी प्रथम संस्था काढली, तिच्या मिळकतीची हकीकत आहे.  भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीने नानापेठेत पुणे म्युनिसिपालिटीकडून सन १९१४ तारीख १८ माहे जून रोजी भोकरवाडीजवळील ७ एकन जागा आपल्या प्रशस्त इमारतीकरिता ९९ वर्षांच्या कराराने घेतली आहे, ती हीच मिळकत होय.  सरकारकडून म्युनिसिपालिटीला जी शाळा मिळाली तीदेखील हल्ली ह्या मंडळीच्या शाळांतच सामील झाली आहे.


शशिपाद बंदोपाध्यायांचे प्रयत्न  :  बंगाल्यात अस्पृश्यतानिवारणाचा प्रथम मान वरील ब्राह्मण गृहस्थांकडे आहे.  हे कलकत्त्याजवळील बारानगर गावी सन १८४० त कुलीन ब्राह्मण जातीत जन्मले.  १८६६ साली ब्राह्मधर्मी झाले. तेव्हापासून ते अगदी खालच्या जातींशी मिळूनमिसळून जेवूखाऊ लागले.  सन १८६५ च्या नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेस ह्यांनी बारानगर येथील गिरणीतील मजूरवर्गाची एक सभा भरविली.  त्यात ठराव होऊन त्यांच्यासाठी रात्रीच्या आणि दिवसाच्या शाळा काढल्या.  हा अनाचार, टवाळ लोकांस न खपून त्यांनी त्या उठविल्या.  पण ह्यांनी स्वतःच्या खर्चाने इमारती बांधून त्या कायम केल्या.  इकडील चोखामेळयाप्रमाणे बंगल्यातील कर्ताभजापंथी चांडाळवर्ग भजनाचा शोकी आहे.  त्यांचा बिहालपारागावी एक उत्तम सारंगी तयार करण्याचा कारखाना आहे.  तेथे जाऊन बाबूजी चांडाळांचे कीर्तन ऐकत.  सन १८७० च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी अशा मजूरवर्गाचा एक क्लब काढला.  त्याच्या द्वारा त्यांना वाचनाची गोडी लाविली आणि मद्यपान वगैरे दुष्ट चाली सोडविल्या.  वेडीवाकडी गाणी सोडून ही मंडळी सात्त्वि कीर्तने करू लागली.  १८७१त जेव्हा बाबूजी विलायतेस निघाले, तेव्हा ह्या गरीब मजुरांनी त्यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक मानपत्र दिले.  ह्या दीनांच्या सेवेबद्दल बाबूजींचा सत्कार ते विलायतेस गेल्यावर ब्रिस्टल शहरी एका मिशनरी संस्थेने त्यांना एक मोठे मानपत्र देऊन केला.  परत आल्यावर त्यांनी गरिबांसाठी एका पैशाचे एक मासिकपत्र काढले.  दर महिन्यास त्याच्या १५००० प्रती खपू लागल्या.  त्यात पंडित शिवनाथशायांसारख्यांनी लेख लिहिले व श्रीमंतांची चांगली मदत असे.  'बारानगर समाचार' नावाचे साप्ताहिकही काढले.  ते चांडालाबरोबर जेवीत, मेहेतरांच्या मुलांची शुश्रूषा करीत. सरकारने नुकत्याच उघडलेल्या सेव्हिंग बँकेत त्यांचे पैसे ठेवून त्यांना काटकसर शिकवीत.  बारानगर येथे ब्राह्मसमाज स्थापन झाल्यावर ह्या लोकांसाठी बरेच काम होऊ लागले.  ह्या मजुरांच्या संस्थेच्या २३ व्या वार्षिक उत्सवाचे वर्णन १८८९ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या २० ता. च्या 'इंडियन डेली न्यूज' नावाच्या इंग्रजी पत्रात सविस्तर आले आहे.  बक्षीस-समारंभात १०० वर मुलांस व गडयांस बक्षिसे दिली.  बडया मंडळींनी सहानुभूतीची भाषणे केली.  याशिवाय बंगाल्यास दुसरे कोणते प्रयत्न झालेले ऐकिवात नाहीत.  हल्ली जे डिप्रेस्ड मिशनचे काम गावोगावी चालले आहे, त्याचे मूळ महाराष्ट्रातील मिशनमध्ये आहे.  वरील माहिती सीतानाथ तत्त्वभूषण यांनी निवेदिलेल्या शशिपाद बाबूंच्या चरित्रावरून व इतर साधनांवरून मिळविलेली आहे.

श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे प्रयत्न :   महाराजांनी आपल्या राज्यात वेळोवेळी कानाकोपऱ्यात स्वतः जाऊन अस्पृश्य, जंगली, गुन्हेगार जातींची स्थिती स्वतः निरखिली.  नवसारीजवळ सोनगड म्हणून महाराजांचा एक जंगली मुलूख आहे.  तेथे ढाणका नावाची जंगली जात आहे.  तेथे महाराज गेले तेव्हा हे सर्व लोक वानरांप्रमाणे झाडांवर चढून बसले.  ते काही केल्या खाली उतरेनात.  महाराजांनी ३२ वर्षांपूर्वी या लोकांच्या १०० मुलामुलींसाठी दोन बोर्डिंगे आणि शेतकीची नमुनेदार शाळा काढलेली मी स्वतः १९०५ साली पाहिली.  तिचा उत्तम परिणाम दिसून आला.  तेथील सुपरिंटेंडेंटने ह्या लोकांसाठी एक प्रार्थनासमाज चालविला होता, तो मी दोनदा पाहिला.  त्याच्या द्वारा मुलांस उच्च धर्माची तत्त्वे शिकण्याची सोय होती.  गुजराथी व इंग्रजी शिकलेले प्रौढ मुलगे व मुली बोर्डिंगात मी पाहिल्या.  त्यांच्यात लग्ने लावून कायमची सुधारणा करण्याची महाराजांची कल्पना घेण्यासारखी दिसली.  थक्क झालो. अस्पृश्यांच्या शिक्षणाचे एक निराळे खातेच आहे.  त्याचे मुख्य अधिकारी पंडित आत्माराम ह्यांनी पाठविलेल्या रिपोर्टाचा अल्प सारांश खाली दिला आहे :

सन १८८३ सालापासून 'अस्पृश्यां'करिता निराळया मोफत शाळा उघडण्यास सुरुवात झाली.  १९८४त ७ व १८९१त १० शाळा झाल्या व हिंदू शिक्षक मिळणे अशक्य असल्यामुळे मुसलमानांवरच काम भागवावे लागे.  अधिकाऱ्यांतही सहानुभूती कमी असल्यामुळे फार अडचणी आल्या.

ह्याचसाठी मुंबईत नि. सा. मंडळी स्थापण्यात आली आणि बडोद्यात सक्तीच्या शिक्षणाचा ठराव पास होऊन शिक्षणाचा प्रसार झपाटयाने चालला.
तक्ता (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

Read more: अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास*

अस्पृश्यता व हिंदूंचा संकोच *

ब्राह्मसमाजाचा अखिल भारतीय प्रचारक या नात्याने मला सन १९२४-२५ ह्या दोन साली मुंबई इलाख्याबाहेर सामान्यतः आणि मद्रास इलाख्यात विशेषतः सतत संचार करावा लागला.  त्यांपैकी मलबार प्रांत व दक्षिण कानडा जिल्ह्यात माझे एक वर्ष गेले.  माझे निरीक्षण अर्थात 'अस्पृश्य' समाजातच विशेष झाले.  ह्या नैर्ॠत्य कोपऱ्यात अस्पृश्यांवर अद्यापि दुःसह अन्याय चालू असल्यामुळे तेथील 'तिय्या' नामक अत्यंत पुढारलेल्या व सुशिक्षित 'अस्पृश्य' समाजाचे लक्ष बौध्द धर्माकडे लागले आहे.  हा भाग सिंहलद्वीपाला जवळ असल्यामुळे काही बौध्द भिक्षूंनी त्रावणकोर संस्थानात कायमचे ठाणे दिलेले मी पाहिले.  कालीकत येथे बौध्द धर्मप्रचारक मंडळाचे काम पूर्वाश्रमीचे ब्राह्मण गृहस्थ श्री. मंजेरी रामय्या आणि प्रसिध्द श्रीमंत श्री. सी. कृष्णन् (तिय्या जातीचे) ह्यांनी नेटाने चालविले आहे.  मोपल्यांच्या बंडात किती हिंदू आपल्या जुन्या धर्मास मुकले हे प्रसिध्दच आहे.  गेल्या महायुध्दाचे पूर्वी त्या प्रांतात मोठा दुष्काळ पडला तेव्हा पुष्कळ निराश्रित अस्पृश्यांनी पोटासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.  खेडीच्या खेडी ख्रिस्ती धर्मात शिरली होती किंवा तसे मानण्यात येत होते.  महायुध्दानंतर अशा पोटाळया ख्रिस्त भक्तांना पोसणे ख्रिस्ती मिशनांना अत्यंत कठीण झाले.  अशा संकटात त्या प्रांताच्या प्रसिध्द (प्रोटेस्टंट) मिशनला जर्मनीचा आधार राजकीय कारणांवरून नाहीसा झाला.  त्यामुळे नामधारी नूतन ख्रिस्ती शिष्यांची स्थिती फार करुणास्पद झाली.  ह्याचे एक ढळढळीत उदाहरण माझ्या डोळयांनी पाहिले, ते खाली देत आहे.

इ.स. १९२४ साली स्वामी श्रध्दानंद मंगळूर येथील आर्यसमाजाच्या उत्सवानिमित्त पश्चिम किनाऱ्यावर आले.  मी तेथे बरेच दिवस अगोदरच होतो.  अस्पृश्योन्नतीचे कार्यात आर्यसमाजाचे व ब्राह्मसमाजाचे प्रयत्न मिळूनच चालले होते.  मंगळूराहून पूर्वेकडे वेणूर नावाच्या एका खेडयातील अस्पृश्याकडून आम्हा दोघांना आमंत्रण आले.  दोहो समाजाचे आम्ही सुमारे ७८ जण तेथे गेलो.  त्या जंगली गावातील सुमारे २००।२५० अस्पृश्य मंडळी वाट पाहत बसली होती.  त्या प्रदेशात ख्रिस्ती मंडळीचे प्रयत्न पैशांचे अभावी आखुडले होते, असे आम्हाला दिसले.  व्याख्यान, भजन, उपहार वगैरे झाल्यावर जमलेल्या सर्व मंडलीस हिंदुधर्माची परत दीक्षा देण्यात आली.  विधायक कामासाठी एक आश्रमही उघडण्यात आला.

--------------------------------------------------------
* सुबोधपत्रिका, १ ऑगस्ट १९२६.
------------------------------------------------------

गेल्या वर्षी विशेषतः आंध्र देशात माझ्या तीन सफरी झाल्या.  त्या देशातील खेडयांत विशेषतः प्रोटेस्टंट ख्रिस्ती मिशनचे काम झपाटयाने चालले आहे.  काही ठिकाणी त्या कामामुळे बऱ्याच अस्पृश्यांची पुष्कळशी भौतिक उन्नती झाली हे मला निर्विकार मनाने कबूल करणे भाग आहे.  पण इतर पुष्कळ ठिकाणी अस्पृश्यांची जी खेडीच्या खेडी ख्रिस्ती झाली आहेत; त्यांचे धर्मांतर झाले म्हणण्यापेक्षा नामांतरच झाले आहे म्हणणे जास्त शोभेल.  ही खेडी हिंदू म्हणवू लागतील तर लागलीच सुखात पडतील असेही माझे म्हणणे नाही.  माझ्या लिहिण्याचा प्रस्तुत मुद्दा हा आहे की, अशा नवीन ख्रिस्त्यांना पूर्वीइतका भौतिक फायदा अलीकडे मिळत नसून उलट आपल्या हिंदू अस्पृश्य जातीपासून फुटून राहावे लागल्यामुळे प्रसंगी अपमान सोसावा लागतो.  असा देखावा पाहून मला ख्रिस्ती प्रचारकांच्या उत्साहाचे जितके कौतुक करावेसे वाटले; तितकेच आमच्या हिंदू म्हणविणाऱ्या बोलघेवडयांची कीव आली.  गुंतूर जिल्ह्यातील बापएला आणि एपुरीवाल्यं ह्या दोन गावांतील महार व मांगवाडयांची मी घरोघर तपासणी केली.  दोन्ही गावांत ह्या वाडयांतून मला एकदोनच कुटुंबे हिंदुधर्मात उरलेली दिसली.  ह्या जिल्ह्यात शाळा, धर्ममंदिरे व दवाखाने वगैरे जे ख्रिस्ती प्रयत्न जोरात चालले आहेत, ते पुष्कळ अंशी स्तुत्य वाटतात.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मछलीपट्टण जिल्ह्यातील गुडीवाडा येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची एक परिषद भरली.  तेथे स्वामी श्रध्दानंदांची व माझी पुन्हा गाठ पडली.  त्यांनी वेलोर येथे जाऊन त्या शहराजवळील खेडयातील दोन हजार ख्रिस्ती अस्पृश्यांना हिंदुधर्मात घेतल्याची बातमी चोहोकडे वर्तमानपत्रातून पसरली होती.  ती अगदी खरी आहे असे स्वामींनी मला स्वतःही सांगितले.  त्या प्रांताचे माझे अनुभव मी स्वामींना सांगितले आणि कायमचे प्रचारक ठिकठिकाणी ठेवून शिक्षण, उद्योग, उदार हिंदुधर्माचा सक्रिय उपदेश वगैरे विधायक प्रयत्न केल्याशिवाय अस्पृश्यतेचे उच्चाटन होणार नाही, असे आमचे दोघांचे एकमत झाले.  विशेषतः आंध्र देशात काँग्रेसच्या स्वयंसेवकांनी तेथील तरुण 'अस्पृश्य' वर्गात फार स्तुत्य स्फूर्ती उत्पन्न केली आहे.  पण विधायक कामाच्या अभावी न जाणे; तीही मावळून जाण्याची भीती आहे.

निदान संख्येच्या दृष्टीने तरी हिंदुधर्माचा झपाटयाने ऱ्हास होत आहे.  खुद्द आमच्या पुणे शहरात गेल्या वर्षी गुलटेकडीवरच्या ५० मांगांना मुसलमान करण्यात आले अशी हूल उठली होती.  तिचा परिणाम आमच्या अहल्याश्रमाजवळील भोकरवाडीतील मांगांवर काही झाला नाही इतकेच.  तेथील सार्वजनिक सभेत जाहीर सभा होऊनही हूल जेथल्या तेथेच जिरविण्यात आली.  पण खेडयात इतकी सुरक्षितता राहिलेली नाही हे ध्यानात ठेवणे बरे.

ब्राह्मसमाज, आर्यसमाज, हिंदू मिशनरी सोसायटी, हिंदुसभा, भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी आणि सोशल सर्व्हिस लीग ह्या व इतर धार्मिक व सामाजिक मंडळयांनी एकत्र होऊन विधायक कामाची कायमची घटना जमवीपर्यंत केवळ तात्ुपरत्या चळवळीने काही चालणार नाही.

अस्पृश्यता घालविण्याचा बिनतोड उपाय*

ता. ८ फेब्रुवारी हा दिवस रा. विठ्ठलराव रामजी शिंदे ह्यांच्या परलोकवासी पूज्य मातोश्रींच्या श्राध्दाचा असतो.  दरवर्षी ह्या दिवशी ते कीर्तन करीत असतात.  पण ह्या वर्षी त्यांनी तो बेत रहित करून ब्राह्मोपासना चालविली.  सायंकाळी साडेसात वाजता भजनसमाजाचे मंदिर साफसूफ करून बिछायती पसरून आत रोषणाई करण्यात आली होती.  दिवसाच्या व रात्रीच्या शाळेतील मुलामुलींनी व त्यांच्या पालकांनी मंदिर गच्च भरले होते.  प्रथम भगवद्गीतेतील 'अर्जुनविषाद' हा भाग वाचून दाखवून ''अशोच्यानन्वशोचत्स्वं प्रज्ञावादांश्च भाषसे'' ह्या वाक्यावर निरूपण करण्यात आले.  ''जाऊ देवाचिया गावा ।  देव देईल विसावा''  हा अभंग उपदेशास घेण्यास आला होता.  मृताविषयी उल्लेख करताना परलोकवासी यमुनाबाईंच्या कोवळया अंतःकरणाचे कित्येक दाखले सांगण्यात आले.  घरी अतिथी आल्यास तो कोणत्याही जातीचा असो, त्याचे ताट ह्या माउलीने आपल्या हातानेच धुवावे हे व्रत त्यांनी शेवटपर्यंत चालविले.  पंचवीस वर्षांपूर्वी जमखंडीस असता एक दहा वर्षांची महाराची अनाथ मुलगी रा. विठ्ठलराव ह्यांनी घरी आणून ठेवली.  तिचेही ताट यमुनाबाई स्वतःच धूत असत.  हा प्रकार शेजाऱ्यापाजाऱ्यांस उघड माहीत असूनही बाईंच्या सात्त्विपणाच्या जोरावर सर्वच खपून जात असे.  आपल्या कुटुंबातील अशा घडलेल्या कित्येक गोष्टी रा. विठ्ठलराव उघडपणे सांगत असूनही त्यांच्या जातीकडून त्यांचा छळ किंवा अनादर होत असलेला फारसा दिसत नाही.  अस्पृश्यतानिवारणासंबंधी जातवार सभेमध्ये पुण्याच्या लोकांशी वाटघाट करीत बसण्यात वेळ घालविण्यापेक्षा आम्हा गरीब लोकांमध्ये अशा प्रकारे उपासना चालविणे, आपला आणि वडिलांचा अनुभव सांगणे हाच मार्ग रा. शिंदे ह्यांनी अधिक चालू ठेवावा असे आम्हांस वाटू लागले आहे.  अस्पृश्य लोकांशी उघडपणे शिवाशिव करतात; ह्या गोष्टीपेक्षा प्रार्थनासमाजाच्या पध्दतीप्रमाणे डोळे मिटून प्रार्थना करण्यात ख्रिस्ती लोकांचे अनुकरण करतात, ह्याच गोष्टीसाठी कित्येक लोक पूर्वी नाके मुरडीत असत.  पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून उपासनेचा साधा आणि धोपट मार्ग आमच्या भजनमंदिरात दर आठवडयास नित्याच्या वेळी आणि नामकरण, वाढदिवस, श्राध्दादी नैमित्तिक प्रसंगी आज कित्येक वर्षे बिनबोभाट चालू आहे.  त्याचा परिणाम असा झाला आहे की, आजूबाजूचे लोक अशा प्रसंगी ह्या उपासनांस श्रध्देने जमतात.  समाजाच्या तत्त्वांचा स्वीकार करून ते जरी सभासद होण्यास तयार नसले, तरी निश्चितपणे भजन करून प्रार्थना करणे, ह्यासाठी स्त्रीपुरुष, लहानथोर सर्व जातींच्या लोकांनी एका बिछायतीवर बसणे आणि शेवटी खिरापत, प्रसाद एकत्र घेणे, ह्या गोष्टी आता लोकांच्या अंगवळणी पडू लागल्या आहेत.  ह्यावरून जी गोष्ट वादविवादाने साध्य होत नाही; ती भजनाने सहज होते हे लक्षात घेण्यासारखे आहे.

आपला नम्र
बाबू धोंडी वायदंडे
अहल्याश्रम, भोकरवाडी
पुणे ता. ११-२-१९२३

------------------------------------------------------------------------
*सुबोधपत्रिका, १८ फेब्रुवारी १९२३
------------------------------------------------------------------------

  1. V. R. Shinde : Thakkar Bapa
  2. The Sixth Annual Report
  3. The Second annual Report (Depressed Classes Mission Society of India
  4. The Mission for the Depressed Classes (1906-1912)
  • 133
  • 134
  • 135
  • 136
  • 137
  • 138
  • 139
  • 140
  • 141
  • 142
Page 138 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी