येरवड्याच्या तुरुंगात

रविवार तारीख ११ मे १९३० रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कौटुंबिक उपासना मंडळाची साप्ताहिक उपासना श्री शिवाजी शाळेमध्ये चालविली दौ-याच्या दगदगीने ते थकलेले असल्यामुळे दिवसभर घरीच विश्रांती घेतली. दुस-या दिवशी सोमवारी वैशाख पौर्णिमा ही गौतम बुद्धांची जयंती होती. परंतु अण्णासाहेब कायदेभंगाच्या चळवळीत गुंतलेले असल्यामुळे वार्षिक सभा भरविण्याची व्यवस्था करणे शक्य झाले नव्हते. मात्र ते स्वत: एकटेच पर्वतीच्या डोंगरावर गेले. तेथे त्यांनी दोन तास ध्यान केले; शांतीचा जप केला व घरी परतले. ह्या वेळी ते वेताळ पेठेतील सणस बखळीतील घरामध्ये राहत होते.


दोन प्रहरी बारा वाजता जेवण करुन ते आपल्या दिवाणखान्यात येऊन बसतात न बसतात तो पुणे शहराचे पोलीस इन्स्पेक्टर मि. मिलर व डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर शिंदे हे दोघे त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या दिवाणखान्याच्या दारात येऊन दाखल झाले. आपल्याला अटक होणार याची कुणकुण अण्णासाहेबांना दोन तास आधीच लागली होती. मिलर हे त्यांच्या ओळखीच युपोपियन अधिकारी होतो. " I am afraid, I am coming on an upleasant" असे शब्द त्यांच्या तोंडून येताच शिंदे त्यांना म्हणाले, "तुमची मी वाटच पहात आहे. इतका उशीर का केला? अंमळ खुर्चीवर बसा. एक लहानशी कामाची चिठ्ठी लिहायची आहे. तितका वेळ द्याल काय?" त्यांनी आनंदाने कबुली दिली. चिठ्ठी लिहून झाल्यावर अण्णासाहेबांनी आपली प्रवासाची पडशी तयार केली. तीमध्ये जरुरीचे कपडे व पुस्तके घातली. भगवद्गगीता, धम्मपद, बायबल, सुलभ संगीत, छोटी डायरी, चष्मा आणि विंचरण्याची फणी हे त्यांचे प्रवासातील नित्याचे सोबती. अण्णांना अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी आले आहेत हे कळताच घरात गडबड उडाली. त्यांना निरोप देण्यासाठी घरातील मंडळी पाया पडू लागली. त्यांच्या सुनेचे-लक्ष्मीबाईंचे-डोळे पाण्याने भरलेले त्यांना दिसले. जिना उतरण्यापूर्वी दारात जनाक्काने त्यांच्या पायावर डोके ठेवले.

"घाबरायचे मुळीच कारण नाही, बरे" असा कुटुंबीयांना धीर देत ते पोलीस अधिका-याबरोबर खाली अंगणात आले. बाबुराव जेधे यांचा मोठा मुलगा यशवंत समोर दिसला. त्याला ते 'मला खेडला नेत आहेत' असे म्हणाले. कारण मिलरने त्यांना तसे सांगितले होते. रस्त्यात मोटारलॉरी व चार शिपाई त्यांना घेऊन जाण्याच्या तयारीत होते. एवढ्या अवधीत रस्त्यावर गर्दी जमली. पत्नी सौ. रुक्मिणीबाई व मुलगा रवींद्र हे लॉरीपर्यत आले. रुक्मिणीबाई डोळे पुशीत होत्या. अण्णासाहेबांना घेऊन मोटार शंकरशेट रोडवरुन निघाली. पोलीस सुपरिटेंडेंटचे ऑफीस आल्यावर मोटार थांबली. मिलर खाली उतरले व त्यांनी अण्णासाहेबांना लष्करी सलाम केला व गुडबाय म्हणून निरोप घेतला. मोटार खेडची वाट सोडून चिंचवड स्टेशनवरुन खंडाळ्याकडे निघाली. पोलिसांनी खेडला नेणार ही खोटी हूल उठविली होती हे त्यांच्या ध्यानात आले.


दुपारी तीन-चारच्या सुमारास खंडाळा येथील सरकारी बंगल्यावर अण्णासाहेबांना नेण्यात आले. त्यांच्या खटल्याची सुनावणी श्री. माधव नारायण हुल्याळ बी.ए., पुणे पश्चिम भागाचे प्रांत ह्यांच्यापुढे होणार होती. अटक करावयास आल्यानंतर अण्णासाहेबांना पोलीस अधिका-यांनी वॉरंट दाखविले नव्हते व त्यांनाही विचारले नव्हते. त्यांच्यावर आरोप पिनलकोडच्या ११७व्या कलमानुसार गुन्ह्याला चिथावली देण्याचा व ४७-८ अन्वये बेकायदेशीर मिठाची विक्री केल्याचा होता. अर्ध्या तासातच खटल्याचा फार्स आटोपला गेला. हे मॅजिस्ट्रेट हुल्याळ म्हणजे त्यांच्या जमखंडी गावचे बालमित्र व कॉलेजमध्ये बी.ए.चे सहाध्यायी होते. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना १८९८ सालच्या एप्रिल महिन्यात ते तापाने सडकून आजारी पडले होते. त्यांची जवळ राहून शुश्रूषा करण्याची इतर कोणाचीही तयार नव्हती. त्या वेळेला रामजी शिंदे यांनी १८९८ सालच्या ७ एप्रिलपासून एक आठवडा सतत त्यांच्यासमवेत राहून बारा बारा तास सलग शुश्रूषा केली होती. त्यांचा ताप अगदीच कमी होईना हे बघून गुलाबपाण्याने थबथबलेली पट्टी सतत बारा तास त्यांच्या डोक्यावर ठेवली व ह्या शुश्रूषेने त्या साथीच्या दिवसांतील तापातून माधव हुल्याळ बरा झाला होता. आज योगायोगाने चमत्कारिक स्थितीमध्ये ते एकमेकांना भेटत होते.


हुल्याळ मॅजिस्ट्रेटसमोर आरोपी म्हणून अण्णासाहेब शिंदे खोलीत शिरताच हुल्याळांनी आपणहून त्यांना नमस्कार केला. आपल्या टेबलाला लागूनच बसावयास खुर्ची दिली. प्रॉसिक्युटर, दोन पोलीस व एक मॅजिस्ट्रेट ह्यांच्याशिवाय ह्या तात्पुरत्या कोर्टात इतर कुणीच नव्हते. शेवटी गुन्हा कबूल आहे काय, असे मॅजिस्ट्रेटने विचारल्यावर अण्णासाहेब उत्तरले, "खेड येथील दहा हजार लोकांपुढील सभेत मी अध्यक्ष होतो. भाषण केले व मिठाचा लिलाव केला, वगैरे पोलिसांची हकिकत खरी आहे. पण गुन्हा केला की कसे हे सांगणे माझे काम नव्हे. तो कोर्टाने वाटेल तसे ठऱवावे." ( अण्णासाहेब शिंदे यांनी कायद्याचा अभ्यास केला होता. फर्स्ट एल् एल् बी ची परीक्षाही ते पास झाले होते. त्या दृष्टीने त्यांनी दिलेले उत्तर मार्मिक म्हणावे लागेल.) मॅजिस्ट्रेटने सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सांगितली. 'बी क्लास' अशी शिफारस केली. पण ती वॉरंटवर न लिहिता तोंडीच पोलीस इन्सफेक्टरला बजावली.


श्री. हुल्याळ फिरतीवर या बंगल्यात उतरले होते. आता मॅजिस्ट्रेटचे नाते संपले होते. मित्राच्या नात्याने त्यांच्या कुटुंबाला-सौ. रमाबाईंना-भेटण्याची हरकत आहे काय, असे त्यांनी विनोदाने विचारले. अर्थात आनंदाने भेटा म्हणून हुल्याळ त्यांना आता घेऊन गेले. भेटीस गेल्यावर सौ. रमाबाईंचे डोळे अश्रूंनी भरलेले पाहून अण्णासाहेब विनोदाने म्हणाले, "आपल्याच नव-याचा मी कैदी असून आपणच पुन्हा अश्रू गाळता." एक अंजीर खाऊन, पाणी पिऊन ते मोटारीत येऊन बसले.


तारीख १२ मे १९३० ची संध्याकाळ. सात वाजले होते. वैशाख पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. ह्या वेळी अण्णासाहेब येरवड्याच्या तुरुंगाच्या दारात आत प्रवेश करण्यासाठी उभे होते. दरसालच्या नियमाप्रमाणे खरे तर बुद्ध जयंतीवर व्याख्यान देण्याची अण्णासाहेबांची ही वेळ शिवाजी शाळेच्या अंगणात त्यांनी ते दिलेही असते. पण या वर्षीचा योगायोग वेगळा. 'सर्वे सुखिन: सन्तु| सर्वे सन्तु निरामय:| सर्वे भद्राणि पश्यन्तु | एष बुद्धानुशासनम् || ह्या श्लोक म्हणून अण्णासाहेबांनी त्या प्रचंड कारागृहात पाय टाकला.


१३ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या नवाकाळ, केसरी, प्रभात इत्यादी पुण्याच्या वृत्तपत्रांत अण्णासाहेब शिंदे यांना कायदेभंग केल्याबद्दल सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून येरवड्याच्या तुरुंगात रवानगी केली आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली. सत्याग्रह मंडळाचे मुख्याधिकारी बाळूकाका कानिटकर अजून बाहेरच होते. मंगळवार तारीख १३ मे १९३० रोजी सत्याग्रह मंडळाच्या वतीने एक जाहीर विनंतीपत्रक काढण्यात आले. १२ तारखेलाच देशभक्त अब्बास तय्यबजी यांनाही अटक झाली होती. त्यानिमित्त व अण्णासाहेब शिंदे यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली ह्याबद्दल एक दिवसाचा हरताळ पाळावा व सायंकाळी सहा वाजता शनिवारवाड्यासमोरील पटांगणात जाहीर सभेला जावे अशी विनंती छापील पत्रके वाटून करण्यात आलेली होती. ह्या पत्रकातच पुढील सूचनाही होत्या : हरताळ चालू असता १) नागरिकांनी शिस्तीने व शांततेने वागावे, २) कुणाचाही कपडा अथवा टोपी मर्जीविरुद्ध काढून घेऊ नये अथवा जाळू नये, ३) एखाद्या जातीस वाईट वाटू चीड येईल अशा त-हेचे चित्र अथवा सोंग मिरवू नये ह्या सूचनांवरुनही कायदेभंगाची ही चळवळ शांततेने व शिस्तीने चाललेली होती याची कल्पना येऊ शकते. अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या वयोवृद्ध, त्यागशील पुढा-याला सक्तमजुरीची शिक्षा झाली, याबद्दल वृत्तपत्रांतून हळहळ प्रकट करण्यात आली. वा. रा. कोठारी यांच्या दै. प्रभातमध्ये त्यांच्याबद्दलची ही बातमी देताना म्हटले आहे, "अस्पृश्यवर्गाचे पाठीराखे व ब्राह्मणेतर पक्षाचे भीष्माचार्य श्री. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांस सध्याच्या सत्रात पुणे मुक्कामी पकडण्यात आले, हे कळविण्यास फार मन:कष्ट होत आहेत. श्री. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यासारखा निर्भय व निश्चयी पुरुष आजपर्यंत कोणत्याही सामाजिक छळास डगमगला नाही. स्वत: मराठा कुळातील असता त्यांनी अस्पृश्य लोकांशी एवढे तादात्म्य करुन घेतले की त्यांच्या जातीतले लोक त्यांचा अपमान करुन त्यांस अस्पृश्याप्रमाणे वागवीत, त्यांचे ताट बाहेर मांडीत. आता त्यांस राजकीय त्रास भोगण्याची पाळी आली असून कैदी म्हणवून घेण्याचा प्रसंग आला आहे. पण त्यांसारख्या पुढा-यास उपवास आणि पक्कवान्न, तुरुंग आणि मृदुशय्या व काटेरी जमीन ही सारखीच असल्यामुळे त्यांचे वर्तन सध्याच्या प्रसंगीही उदात्त प्रकारचे राहील ही सर्वांची खात्री आहे."


अण्णासाहेब शिंदे व अब्बास तय्यबजी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी १३ तारखेस पुणे शहरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. सकाळी दुकाने उघडल्याबरोबर पुन्हा ती ताबडतोब बंद करण्यात आली व काही दुकाने हरताळाची बातमी आगाऊ कळल्यामुळे अजिबात उघडलीच नाहीत. हरताळनिमित्त रे मार्केट बंद ठेवण्यात आल्यामुळे मंडईत सर्वत्र शुकशुकाट होता. बुधवार, रविवार, भवानी, नाना पेठ वगैरे व्यापारी पेठांतील सर्व व्यवहार थंडावला होता. चहाची व फराळाची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. सराफआळी, भांडेआळी, दाणेआळी या सर्व भांगात हरताळ पाळण्यात आला होता. शिंदे व तय्यबजी यांच्या अटकेमुळे पुण्यातील लोकांना कसा सात्त्विक संताप आला होता ह्याचा पडताळाच ह्या हरताळाच्या द्वारा दिसून आला.


दुपारी ४ वाजता सरकारचा निषेध करण्यासाठी आणि अण्णासाहेब शिंदे व देशभक्त अब्बास तय्यबजी यांच्या अभिनंदनासाठी एक प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक लो. टिळकांच्या पुतळ्यापासून निघून शुक्रवार पेठेतून जेधे मॅन्शनवरुन वेताळ पेठेत जाऊन तेथून रविवार, मोती चौक, बुधवार चौक ह्या मार्गाने शनिवार वाड्यासमोर सहा वाजता पोहोचली. मिरवणुकीत म. गांधीच्या तसबिरी आणि राष्ट्रीय निशाणे होती. शिवाय परकीय सरकाराची नोकरी करणे, दारु पिणे, ताडी पिणे हराम आहे, अशा प्रकारचे बोर्डही होते. हा हरताळ शांततेने पार पडला. पोलिसांनीही मधे न पडण्याचे ह्या खेपेला ठरविले होते. या मिरवणुकीत विशेषत: ब्राह्मणेतर व मुसलमान बोहरी यांचाच समाज जास्त होता. शहरात निरनिराळ्या भागांत लहान लहान तुकड्याही ब-याच हिंडत होत्या व सरकारचा निषेध आणि पुढा-यांचा जयजयकार करीत होत्या. हरताळाप्रमाणे ही मोटी मिरवणूक व छोटया मिरवणुका शांततेने पार पडल्या.


मुख्य मिरवणूक सहा वाजता शनिवारवाड्यासमोर आल्यानंतर प्रो. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा भरली. सभेला सुमारे पंधरा हजार स्त्री-पुरुषांचा मोठा जमाव हजर होता. सभेत श्री. का. गो. पाषाणकर, का. ह. जाधव, हरिभाऊ वाघिरे, पोपटलाल शहा, उमरावतीचे बामनगावकर, बाबुराव भिडे, दत्तोपंत गुप्ते, रंगोबा लडकत, व्यं. बो. हरोलीकर, बोहरी व्यापारी शेख हुसेन स्वयंसेवक अभ्यंकर वगैरे वक्त्यांची जोरदार भाषणे झाली. तेथील विणकरवर्गातील लोकांनी दारु आणि ताडी न पिण्याचा निश्चय केला असून विलायती सूट न वापरण्याची प्रतिज्ञा केली व स्वदेशी वस्तूशिवाय इतर जिन्नस घेणार नाही अशा काही विणकरांनी शपथा घेतल्या. समाजाच्या सगळ्याच थऱांत जागृतीची कशी लाट आहे हे सभेच्या निमित्ताने दिसून आले.


अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या त्यागी व सत्त्वशील पुढा-यास सहा महिन्यांची सक्तमजुरीची कडक शिक्षा दिली गेली, तसेच त्यांना 'सी वर्ग' देण्यात आला. त्याबद्दलही लोकांना आलेला सात्त्विक संताप केसरी. जागृती अशा भिन्न मतप्रणालीच्या वृत्तपत्रांतूनही सारख्याच प्रमाणात प्रकट झाला. केसरीमध्ये 'पत्रकर्त्यांच्या स्फुट सूचना' ह्या कमलाखआली अण्णासाहेब शिंदे यांच्याबद्दल अतिशय आदराने लिहिलेले दिसून येते. "श्रीयुत शिंदे हे काही पूर्वीपासून राजकीय चळवळीत नसून सुधारणेच्या विशेषतः अस्पृश्योद्धाराच्या चळवळीलाच त्यांनी स्वत:स वाहून घेतलेले आहे आणि डिप्रेस्ड क्लास मिशनला आज जी स्थिती प्राप्त झाली आहे ती त्यांच्या परिश्रमाचेच फळ होय. असे समाजसुधारकदेखील आपली सामाजिक चळवळ बाजूस सारून राजकीय चळवळीत प्रमुखत्वाने भाग घेऊ लागले आहेत, यावरुनच राजकीय चळवळीचे महत्त्व व सर्वव्यापकत्व सिद्ध होते." या स्फुटात पुढे असेही म्हटले आहे की, "दोन वर्षांपूर्वी पुणे शहरात शेतक-यांची जी परिषद जमीन महसुलाच्या बिलाचा विचार करण्यासंबंधी भरली होती, तिचे अध्यक्षस्थान श्री. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी स्वीकारले होते व त्या वेळेपासून ते सरकारच्या डोळ्यांवर येऊ लागले असावेत... शेतकरीवर्गात त्यांचे वजन मोठे असल्यामुळे त्यांची चळवळ सरकारला बरीच जाचक वाटू लागली असावी असे दिसते, किंबहुना एवढ्याच कारणावरुन त्यांच्यावर मिठाच्या कायदेभंगाचा खटला भरून सहा महिने सक्तमजुरीची जबर शिक्षा देण्यात आली असावी.

त्यांना अटक पुमे शहरातच करण्यात आली, पण येथून ४० मैल अंतरावरील खंडाळे या गावी नेऊन तेथे श्री. मा. ना. हुल्याळ यांच्यापुढे त्यांस उभे करण्यात आले." श्री. शिंदे यांचे बालमित्र व सहाध्यायी अशा या हुल्याळकरांनी साठीच्या घरास पोहोचलेल्या अशा या आपल्या लंगोटीमित्रास सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून त्यांच्या लहानपणाच्या उपकारांची कृतज्ञतापूर्वक वाटते. कारण करंदीकर हे बालपणापासूनचे शिंदे यांचे मित्र होते व फर्ग्युसन कॉलेजात शिंदे, हुल्याळ यांचे सहाध्यायी होते. ह्याच हुल्याळांनी दुष्काळविरुद्ध शिरोळ तालुक्यात सक्तीची केलेली सारावसुली, महायुद्धाच्या काळात वाई तालुक्यात केलेली रिक्रुटिंगची सक्ती वगैरे स्वकीयांविरुद्ध केलेल्या दुष्कृत्याचा व त्यांच्या इंग्रजधार्जिणेपणाच्या वृत्तीचा उल्लेख करुन हुल्याळांनी अण्णासाहेब शिंदे यांना अशी जबर शिक्षा ठोठावली हे स्वाभाविक असल्याचे सुचविले. ह्या स्फुटात असे म्हटले आहे, "ज्या स्वार्थत्यागी पुरुषाने स्वार्थ-साधनाचे सर्व व्यवसाय मुद्दाम लाथाडून देऊन ब्राह्मोसमाजाच्या व अस्पृश्योद्धाच्या चळवळीस स्वत:ला आजन्म वाहून घेतले, त्याची डिप्रेस्ड क्लासेस मिशनची कामगिरी पाहू माजी गव्हर्नर विलिंग्डन व त्या वेळचे शिक्षणमंत्री ना. चौबळ, श्रीमंत सयाचीरावमहाराज गायकवाड, कै नारायण चंदावरकर अशासारख्यांनी वेळोवेळी प्रशंसापूर्वक उद्गार काढले आणि ज्याचा सध्याचा व्यवसाय म्हणजे वाड्मयसेवकाचाच होता अशा उच्च दर्जाच्या पुढा-यास नवीन नियमाने राजकीय कैद्यास मिळू शकणा-या सवलतीचा काहीच फायदा न मिळता केवळ बदमाशगिरी करुन तुरुंगात जाणा-या कैद्याच्या सक्तमजुरीची पाळी यावी यात श्रीयुत शिंदे यांना कोणत्याही प्रकारचा कमीपणा नसून मुंबई सरकारच्या अब्रूस मात्र कलंक लागणार आहे. तेव्हा स्वत: मुंबई सरकारने यात मन घालून व श्रीयुत शिंदे यांना 'अ' वर्गाच्या सवलती देऊन तरी स्वत:ची अब्रू साफ करून घ्यावी."