विचारविश्व

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विचारवंत, लेखक आणि संशोधक म्हणून जे लेखनकार्य केले, त्याचा सांगोपांग परामर्ष घेणे विस्तारभयामुळे शक्य होणार नाही, मात्र त्यांच्या जीवनचरित्रग्रंथास परिपूर्णता येण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले वैचारिक स्वरुपाचे लेखन,ललित स्वरुपाच्या साहित्याची निर्मिती व संशोधनकार्य यांचा साररुपाने का होईना परिचय करुन देणे आवश्यक वाटते.


महर्षी शिंदे यांचे जीवन प्राधान्याने कृतिरुप होते. धर्मप्रसारकार्य व त्यातूनच उद्भूत होणारे विविध प्रकारचे सामाजिक कार्य, राजकीय चळवळी आणि सांस्कृतिक उपक्रम यांमध्ये भाग घेण्यात त्यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ गेला. मुंबई प्रार्थनासमाजाचे १९०३ साली ते प्रचारक झाल्यापासून १९२३ सालापर्यंत मिशनच्या कामाच्या जबाबदारीपर्यंत ते अखंडपणे कार्यव्यापृत राहिले. त्यानंतरच्या काळात त्यांनी राजकारणात भाग घेतला. शेतकरी चळवळीला तसेच संस्थानी प्रजापरिषदेला मार्गदर्शन करण्याच्या कामी ते सहभागी होत होते. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य असो, की धर्मप्रसाराचे कार्य असो, त्यामधून संपूर्णपणे निवृत्ती ही त्यांना शक्यच नव्हती. म्हणून या विविध प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कामामध्ये ते अखंडपणे गुंतून राहिले होते. मात्र शिंदे यांचा ह्या कामाकडे जसा ओढा होता, तसाच सामाजिक प्रश्नसंबंधी चिंतन करण्याकडे, संशोधन करण्याकडेही त्यांचा ओढा होता. धर्म आणि धर्माचे तत्त्वज्ञान या विषयात तर त्यांना आंतरिक स्वरुपाची आस्था वाटत होती. त्यांच्या ठिकाणी असणा-या स्वाभाविक रसिकतेमुळे साहित्यकडेही त्यांचा ओढा होता. मात्र सदैव कोणत्या ना कोणत्यातरी धार्मिक, सामाजिक वा राजकीय कार्यात ते गुंतलेले असल्यामुळे संशोधन वा साहित्यानिर्मिती यांकडे त्यांना जितके लक्ष देणे आवडले असते तेवढे देता आले नाही. असे असूनही विविध प्रकारच्या कार्याच्या अखंड धावपळीतसुद्धा त्यांनी जे वैचारिक स्वरुपाने ललित स्वरुपाचे व संशोधनात्मक वाड्मय निर्माण केले आहे ते उपेक्षणीय तर नाहीच उलट गुणवत्तेच्या आणि व्याप्तीच्या दृष्टीने भरघोस म्हणता येईल असे आहे. सुमारे ती हजार पृष्ठे भरतील एवढे लेखन त्यांच्या हातून झाले आहे.


ह्या प्रकरणामध्ये त्यांच्या वैचारिक स्वरुपाच्या लेखनाचा तर पुढील प्रकरणात त्यांच्या ललित स्वरुपाच्या व संशोधनपर लेखनाचा आपण परिचय करुन घेऊ.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या एकंदर लेखनापैकी त्यांच्या वैचारिक वाड्मयाची व्याप्ती पुष्कळच मोठी आहे. मराठी साहित्यिकांमध्ये लेखक म्हणून शिंदे यांचा वेगळेपणा अनेक बाबतीत जाणवतो. ते केवळ पेशाने लेखन असणा-यापैकी एक नव्हते. ते मूलत: एक धर्मपुरुष होते. धर्म हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता आणि धर्मप्रेरणा ही त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा होती मात्र याचा अर्थ असा नव्हे की ते व्यक्तिगत पातळीवर स्वत:ची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी एकांतात धर्मसाधना करणारे पुरुष होते. धार्मिक जीवन आणि ऐहिक जीवन अशी फारकत त्यांच्या धर्मविषयक धारणेत नव्हती. धर्मसाधना करणे, धर्मप्रचार करणे आणि समाजाची धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक उन्नती करणे या गोष्टी त्यांच्या धर्मविचारामध्ये एकरुप झालेल्या होत्या. त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणेला आणि त्यांच्या राजकारणातील सहभागाला अधिष्ठान होते ते त्यांच्या उन्नत अशा धर्मविचाराचे. या कारणाने त्यांची धार्मिक भूमिका, त्यांचे जीवन आणि त्यांनी केलेले सामाजिक-राजकीय स्वरुपाचे कार्य यांमध्ये पूर्णतया सुसंगती दिसून येते. त्यांच्या जीवितात या सा-याचा एकमेळ झालेला आहे असे प्रत्ययाला येते. या कारणाने समकालीन लेखकांनी मांडलेले धर्मविषयक तसेच सामाजिक, राजकीय स्वरुपाचे विचार यांच्यापेक्षा शिंदे यांचे विचार वेगळे आहेत, मूलगामी स्वरुपाचे आहेत असे जाणवते.


शिंदे यांच्या वैचारिक स्वरुपाच्या लेखनामध्ये त्यांनी केलेला धर्मविचार, अस्पृश्यतेसंबंधी सामाजिक अंगाने केलेला विचार, शेतक-यांच्या समस्येबद्दल मांडलेले विचार, त्याचप्रमाणे स्त्रियांचा प्रश्न, जातीयतेचा प्रश्न आणि शिक्षण या संबंधी केलेले वैचारिक स्वरुपाचे लेखन यांचा समावेश होतो.


ईश्वर व धर्मकल्पना

प्रथमतः आपण शिंदे यांच्या ईश्वर व धर्मविषयक विचारांचे स्वरुप ध्यानात घेऊ. लहानपणी घरातच त्यांच्यावर वारकरी ऊर्फ भागवत संप्रदायातील विचारांचे संस्कार झाले होते. विषमतेवर आधारलेल्या जातिजमातींमधील श्रेष्ठ-कनिष्ठभावाचा निषेध करणारा आणि निरर्थक कर्मकांड त्याज्य मानून नैतिक पातळीवर सदाचरणाला महत्त्व देणार असा हा धर्मपंथ.


शिंदे यांच्या घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे उदार स्वरुपाचे होते. वारकरी संप्रदायाला पहिला धार्मिक संस्कार शिंदे यांच्या धर्मविषयक विचाराच्या घडणीत प्रभावी ठरला. १८९२ मध्ये ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकावयास गेले असता मिल्, स्पेन्सर आणि आगरकर यांच्या नास्तिक्यवादी विचाराकडे ते काही काळ आकृष्ट झाले. परंतु नास्तिकपणाच्या वाळवंटात आपल्या मनाची तहान भागणे शक्य नाही हे त्यांना जाणवले. प्रो. मॅक्समुल्लरच्या धर्मविषयक वाड्मयाचे वाचन केल्यामुळे आणि मुळातील वारकरी संप्रदायाच्या बळकट प्रभावामुळे, काही काळ त्यांच्या मनावर पडलेले नास्तिकवादाचे पटल दूर झाले. १८९५ मध्ये रेव्ह. जी. टी संडरलॅंड या अमेरिकन युनिटेरियन धर्मनिष्ठाने व्याख्यान ऐकून व त्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर युरोपातील युनिटेरियन या उदार धर्ममताचा त्यांना परिचय घडला. वैचारिकदृष्ट्या वारकरी संप्रदायाशी व युनिटेरियन धर्मप्रणालीशी जुळणा-या प्रार्थनासमाजाकडे ते आकृष्ट झाले. प्रार्थनासमाजातील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर, का.बा. मराठे इत्यादी वडीलधा-या मडळींच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. एकनाथ, तुकारामादी संतांच्या वचनांच्या आधारे रानडे, भांडारकर करीत असलेले प्रतिपादन त्यांच्या मनाला भावले व उदार धर्माचे स्वरुप त्यांना अधिक सुस्पष्ट होत गेले.


इंग्लंडमध्ये मॅचेस्टर कॉलेजात त्यांनी विविध धर्मांचा ऐतिहासिक भूमिकेतून तुलनात्मक दृष्टीने व्यासंग केल्यामुळे सर्व धर्मांतील मूळ तत्त्वांचे उदार स्वरुप स्वाभाविकपणे त्यांच्या ध्यानात आले. तसेच हेगेल, कांट, बर्गसाँ यांच्या तत्त्वज्ञानाचे त्यांनी परिशीलन केले. स्पेन्सरच्या तत्त्वज्ञानातील उत्क्रांतिवाद त्यांच्या मनाला भावला होता, तरी त्याचा अपुरेपणाही त्यांना जाणवत होता. बर्गसाँच्या 'क्रिएटिव्ह इव्होल्यूशन'मधील विचाराने ही उणीव भरुन काढली व स्पेन्सरच्या जडवादी यांत्रिक स्वरुपाच्या उत्क्रांतिवादाऐवजी बर्गसाँच्या निर्माणक (क्रिएटिव्ह) विकासवादाचा प्रभाव त्यांच्यावर विशेषत्वाने पडला. विवेचकबुद्धी(रीझन) ही समग्र आकलन करण्याच्या बाबतीत अपुरी पडते, तिच्यापलीकडे जाऊन भावना (इमोशन्स) आणि उपजतबुद्धी (इन्सिंटक्ट) यांचे महत्व मानणे आवश्यक आहे अशी त्यांची धारणा झाली. एकंदरीत धर्माचाच नव्हे, तर जीवनाच्या सगळ्याच अंगांचा विचार करता विवेचकबुद्धीच्या पलीकडे जाऊन भावनेला महत्त्व देणे योग्य होय अशी त्यांची धारणा होती.


ऑक्सफर्ड येथे ते अध्ययनाला गेले तेव्हापासून त्यांच्या धर्मविषयक लेखनाला प्रारंभ झाला. आयुष्याच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते, म्हणून आयुष्यभर ते धर्मचिंतन करीत राहिले, धर्मप्रसार करीत राहिले. धर्मविषयक लेखन हा त्यांच्या धर्मप्रसारक कार्याचा भाग होता. प्रार्थनासमाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेसाठी त्यांनी इंग्लंडहून लिहून पाठविलेले लेख, नंतर भारतात आल्यावर प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद पत्करल्यानंतर त्यांनी वेळोवेळी दिलेली व्याख्याने, कौटुंबिक उपासनेच्या वेळी तसेच सार्वजनिक नित्य आणि नैमित्तिक उपासनेच्या वेळी केलेले उपदेश असे एकंदर शहाऐंशी लेख समाविष्ट करुन बी. बी. केसकर यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश हे पुस्तक १९९२ साली प्रसिद्ध केले. नंतरच्या काळातही त्यांचे या प्रकारचे विपुल धर्मविषयक लेखन वेळोवेळी प्रसिद्ध झाले असून एकंदरीत त्यांचे धर्मपर सर्व लेखन धर्म, जीवन व तत्त्वज्ञान या पुस्तकामध्ये एकत्रित केले आहे.


शिंदे यांच्यावर ऐतिहासिक विचारपद्धतीचा मोठाच प्रभाव पडला होता. धर्माचा आणि ईश्वराचा तात्त्विक विचार ते या भूमिकेतून करतात असे दिसून येते. मात्र ईश्वराचे तात्त्विक स्वरुप ते केवळ बौद्धिक पातळीवर समजून घेतात व प्रतिपादन करतात असे नव्हे. ते त्यांनी स्वत:च्या प्रेरणाबळाने व भावनाबळाने अनुभवले आहे, आत्मसात केले आहे असेच आपल्या प्रत्ययाला येते. अशा प्रकारे आत्मसात केलेल्या ईश्वरकल्पनेनुसार, धर्मकल्पनेनुसार ते आपले आयुष्य जगत राहिले. भले मग त्यांना कितीही यातना झालेल्या असोतl; त्यांचा ईश्वरी तत्त्वावर व ख-याखु-या धर्मावर विश्वास असल्यामुळे ते त्यांना शक्य झाले असावे असे दिसते.


मानववंशशास्त्र तसेच तुलनात्मक धर्मशास्त्र यांची ईश्वरविषयक विचार करण्याची दिशा शिंदे यांना मान्य आहे. "ईश्वर हा कोणी शरीरविशिष्ट व्यक्ती नसून सर्वव्यापी शुद्ध चैतन्य आहे; तो भोगायतन नसून केवल गुणाश्रय आहे. मनुष्यही स्वतः गुणाश्रय आहे, परंतु त्याच्या गुणाला शरीराची अपेक्षा आहे तेव्हा या त्यांच्या दोषामुळे तो कितीही ज्ञानी झाला तरी तो आपला स्वतःचा देहभाव सूक्ष्म मानाने नकळत का होईना, ईश्वरावर आरोपितोच. तो देहभाव (अँथ्रॉपॉमॉर्फिझम) पूर्ण नाहीसा करुन ईश्वर हा केवळ गुणाश्रय आहे, असे जाणणे ही त्याविषयी सम्यक भावना होय. म्हणजे ईश्वर आमच्यासारखा सुखी किंवा दुःखी नसून केवळ सुखस्वरुपच आहे, आमच्याप्रमाणे दयाळू किंवा निर्दय नसून दयेचा प्रेरक आहे, आमच्यासारखा प्रेमी किवा द्वेषी नसून प्रेमाचा प्रवर्तक आहे, हे आम्ही उत्तरोत्तर अधिक जाणिले पाहिेज."


गुण आणि दुर्गुण असे विरोधात्म द्वैत मानवी जीवनव्यवहारात दिसत असता ईश्वर मात्र चांगल्या गुणाला कारण आणि मनुष्य मात्र वाईटाला कारण असे म्हणणे म्हणजे ईश्वरावर ही मोठी मेहेरबानी करु पाहणे होय, असे सांगून ते या विरोधात्म मानल्या गेलेल्या चांगल्य-वाईट गुणांची वेगळी संगती लावतात. ते सांगतत, "मनुष्य प्रेमामुळे दुस-यावर उपकार करतो व लोभामुळे दुस-याला अपकार असतो असे दिसते, पण प्रेम आणि लोभ हे परस्परविरोधी पदार्थ नाहीत, तर उत्क्रांतीच्या निरनिराळ्या पायरीवरचे गुण असून दोन्ही सत्कार्याची साधनेच आहेत. प्राणिमात्रांनी आत्मसंरक्षण करावे, यासाठी ईश्वर लोभाचा प्रवर्तक होतो; आत्मसंरक्षणाचे खालचे कार्य चांगले स्थापित झाल्यावर त्याहून उच्च दर्जाचे जे परहितपोषण-उत्क्रांतीचे कार्य-त्यासाठी प्रेमाचा प्रवर्तक ईश्वरच होतो. आपण मात्र वरच्या पायरीवर पोहोचूनही वरच्या प्रेरणांना न जुमानता खालच्या प्रेरणांना वश झालो, तर आपल्याला दिलेल्या स्वतंत्रतेचा आपण दुरुपयोग केला असे होते. ईश्वर दुर्गुणांचा प्रवर्तक होत नाही. कारण दुर्गुण असा कोणताच नाही. याचप्रमाणे शौर्य आणि भीती, सहिष्णूता आणि क्रोध, जितेंद्रियता आणि काम, या सर्व गुणांचे प्रयोजन समजावे."


अशा सत्त्वप्रेरक ईश्वराचा आणि आपला संबंध जडतो कसा? तो बुद्धीपेक्षा विश्वासाच्या द्वारे अधिक जडतो अशी शिंदे यांची धारणा होती. बुद्धी आणि विश्वास यांचे स्वरुप सांगताना ते म्हणतात, " बुद्धी म्हणजे पुष्कळ प्रयत्नानंतर पुष्कळ सामग्रीच्या साहाय्याने अल्पज्ञान करुन देणारी शक्ती आणि विश्वास म्हणजे काहीच प्रयत्न न करता अल्पशा सामग्रीने पुष्कळसे ज्ञान प्राप्त करुन देणारी शक्ती. माणसामध्ये विश्वास म्हणून अधिक मोलाची आणि नवलाची शक्ती आहे. विश्वामध्ये सत्त्वाचा, शुभाचा आणि मांगल्याचा प्रसार करणारी ईश्वर ही शक्ती भरली आहे हे ज्ञान प्राचीन काळापासून कमी-अधिक मानाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे अवगत झाले आहेच. "थोडा कोठे एक विशेष प्रकारचा अंगस्पर्श होतो न होतो तोच नूतन बालकाचा आईवर केवढा दृढ आणि कायमचा विश्वास बसतो ! थोडी खुणेला खूण पटली की तरणी आपल्या माहेरचा सर्व वारसा सोडून देऊन परक्या तरुणावर आपल्या सर्व आयुष्याचा भार टाकते. ही विश्वासाची जादू होय. 'आकारैरिंगितैर्गत्या गृह्मतेsन्तर्गतं मनः' मनुष्याचा आतला मतलब समजण्याला आकार, हावभाव, बसणे, उठणे इत्यादीवरुन सहज उपजणारा विश्वास हा कारण होतो. येथे तर्काची प्रमाणे पंगू पडतात आणि मनुष्याप्रमाणेच अखिल विश्वाचा मतलब समजण्यालाही बुद्धीच्या कृत्रिम खटपटीपेक्षा उपजत विश्वासच कामाला येतो."


विश्वामध्ये सत्त्वाचा प्रवर्तक ईश्वर आहे असे केवळ अस्तित्वबोधक ज्ञान बुद्धीच्याही द्वारे मिळू शकते. मात्र सत्याचा आग्रह धरुन राहायला हे आयते ज्ञान उपयोगी पडत नाही, भाग पाडीत नाही किवा त्यांना धीरही देत नाही. तेथे विश्वासाची आवश्यकता असते असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात. "ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही तर तो सत्त्वाचा आणि शुभाचा प्रवर्तक आहे म्हणून मी सत्याचा आग्रह धरुन राहिलो तर माझे कितीही हाल झाले तरी माझी किवा कुणाचीही हानी मुळीच होणार नाही असा विश्वास पाहिजे आहे. अशा विश्वासामुळेच ईश्वराचा व आपला खरा किंवा निकट संबंध जडतो. बुद्धीचे जडत नाही."


आपल्या आत्म्याचा विकास करणे म्हणजे मीपणाचा सर्वस्वी नायनाट करणे नव्हे तर मीपणाला अमर्याद विस्तार करणे होय. त्याला कुटुंबाची, राष्ट्राचीसुद्धा मर्यादा पडणे संकुचितपणाचे ठरते, असे त्यांचे मत आहे. अहंकाराचा परीघ अमर्याद करणारा जो पुरुष असतो त्याला अवतार म्हणणेच योग्य. सर्वसामान्य माणसाचा हे कसे शक्य होणार, ही शंका शिंदे यांना रास्त वाटत नाही. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असणा-या आध्यात्मिक क्षमतेवर त्यांचा विश्वास आहे व प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. ते म्हणतात, "जी काय आमच्यात आत्मकला अंशभूत आहे; इच्छाशक्ती, बाहुबल, एक एक पाऊल स्वतः पुढे टाकण्याची शक्ती आहे; ती जाऊन, अवतारी व्यक्तीच्या विद्युदाकर्षणाने एकदम फार कामे होणार असतील, तर तो अवतार नको, व ती कामेही नकोत ! विकास विकासच झाला पाहिजे अवतारवादाने प्रदर्शित केलेला एक फार उंच व इतर सर्व अत्यंत नीच, खालावलेले असा विषम भाव मला पसंत पडत नाही. तर सर्वांची सर्व बाजूंनी व तीही स्वतःचे प्रयत्नांनी उन्नती होत जावी," हे शिंदे यांना श्रेयस्कर वाटते.


शिंदे यांनी हिंदू धर्मात सांगितलेल्या चार पुरुषार्थाचा आपल्या भूमिकेतून अर्थ सांगितला असून आत्म्याने परमात्म्याशी ऐक्य कसे साधावायाचे हे स्पष्ट केले आहे. अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी अर्थ हा केवळ साधनीभूत आहे आणि काम व धर्म या पुरुषार्थाचा स्वाभाविक घडणारा परिणाम म्हणजे मोक्ष हा आहे. म्हणजे खरे पुरुषार्थ दोनच राहतात. ते म्हणजे काम आणि धर्म हे होत. "काम म्हणजे विवादित दुष्ट वासना आणि धर्म म्हणजे देवाविषयी आणि परमार्थाविषयी काही गोष्ट," हा संकुचित आणि रुढ अर्थ त्यांना मान्य नाही. काम याचा अर्थ इच्छा किंवा मनाची भूक आणि धर्म याचा अर्थ कर्तव्यबुद्धी असा ते करतात. माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकपणे दोन प्रवृत्ती दिसून येतात. अमुक एक गोष्ट रुचकर आहे, अमुक एक हितकर आहे, अमुक एक सुंदर आहे, ती आपणास पाहिजे अशी इच्छा होणे ही एक प्रवृत्ती. अमुक गोष्ट रुचकर असो वा नसो, सुंदर दिसो वा न दिसो, किबहुना आपल्या स्वत:स हितकर असो वा नसो ती योग्य आहे म्हणून आचरलीच पाहिजे किवा अयोग्य आहे म्हणून टाकलीच पाहिजे अशी आतून प्रेरणा होणे ही दुसरी प्रवृत्ती. पहिलीचे नाव कामना व दुसरीचे नाव कर्तव्यबुद्धी. या दोन्ही प्रवृत्तींना अनुसरुन आत्म्यांना दोन भिन्न पुरुषार्थ साधावयाचे असतात. कामना आणि कर्तव्यबुद्धी वा दोन भिन्न प्रवृत्ती असल्या तरी प्रत्येकीचा विकास परस्परांवर अवलंबून आहे. कर्तव्यजागृतीच्या मुळाशी कामनेचा हव्यास असल्यामुळे जगाचे कल्याण झालेले आहे. संगीत, चित्रलेखन, शिल्प, वाड्मय इत्यादी कलांचा विकास कामनेमुले झालेला आहे. कामना आणि कर्तव्यबुद्धी या दोन्ही पुरुषार्थांचे आचरण करता करता त्यामधील अलगपणा नाहीसा होऊन त्यांची सांगड जुळते आणि कर्तव्यबुद्धी हीच एक कामना आणि कामना हेच एक कर्तव्य असे या दोन्ही पुरुषार्थांचे ऐक्य भासू लागते. असे झाल्यावर तेच एक पूर्णतेचे किंवा मोक्षाचे लक्षण होय, असे शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे.

माणसाचा अहंकार, त्याची एकदेशीयता नष्ट होऊन अनंतत्वाची प्रचिती येणे, विश्वचैतन्याचा अनुभव येणे यालाच शिंदे ईश्वरी तत्त्वाचा अनुभव येणे, साक्षात्कार होणे असे मानतात. या भूमिकेवरुन ते मरणाचा आणि जीवनाचा तात्त्विक अर्थ लावतात. जीवनात सारभूत असणारी वस्तू प्रेम ही आहे. या प्रेमावीण जीवन जीवनत्वास मुकते आणि मागे केळव अस्तित्व उरते. "आम्ही व इतर आत्मे यांमध्ये असणारे उपाधीचे पडदे बाजूला सारणे म्हणजे प्रेम करणे होय. ईश्वराचे ठिकाणी आम्हा सर्वांचा जो ऐक्यसंबंध आहे व जो या संसारात अनेक अदृष्ट कारणांमुळे तुटलेला असतो तो पुन्हा जोडणे म्हणजे प्रेम होय." या मॅक्समुल्लरच्या वचनाचाही ते आधार घेतात. व्यक्तीच्या जीवनाचा विकास जसजसा अधिक होतो तसतसा व्यक्ती आणि कुटुंब, व्यक्ती आणि जात, व्यक्ती आणि राष्ट्र आणि अखेरीस व्यक्ती आणि विश्व यांमधील पडदा क्रमाक्रमाने गळून पडतो. अशा प्रकारे व्यक्तीची मर्यादा अनंतत्वाप्रत पावल्यावर तिच्या आतापर्यंतच्या मर्यादित जीवनाचा शेवट अगर कळस होऊन तिच्या अमर्याद जीवनास सुरुवात होते. या दृष्टीने मरण म्हणजे मर्यादित अथवा एकदेशीय जीवनाचा अंत अथवा आत्म्याचे पूर्णपणे जागे होणे. या भूमिकेतून ते तुकाराममहाराजांच्या 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' या अंभगाचा अर्थ लावतात. अथवा हा अभंग मनात वागवून वरील विवेचन करतात असेही म्हणता येऊ शकेल.


अशा प्रकारे मनुष्य आणि त्याच्याभोवतीचे मानवी जग, मनुष्य आणि ईश्वर, आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध ते स्पष्ट करतात. या एकत्वाची आणि अनंतत्वाची प्रचिती येणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने ईश्वरी साक्षात्कार होय.

परमेश्वरी साक्षात्काराच्या बाबतीत असणारे गुढतेचे वलय शिंदे यांच्या भूमिकेमध्ये नाही.श्रद्धा आणि भावना यांच्या बळावर या प्रकारचा साक्षात्कार होतो. निसर्गाचे अति भव्य, अति सुंदर स्वरुप पाहिल्यानंतर अथवा एकांतामध्ये चिंतनावस्थेत असताना अंतःकरणातील श्रद्धा अतिशय उत्कट झाल्यानंतर अशा प्रकारचा साक्षात्काराचा अनुभव येऊ शकतो असा शिंदे यांचा स्वतःचाही अनुभव आहे. मॅंचेस्टर कॉलेजातील ग्रंथालयात ते बसले असताना, स्कॉटलंड येथील बेन लोमंड पर्वतावर आसमंत न्याहाळताना त्यांना हा अनुभव आला होता. तसेच इंग्लंडमध्ये असताना प्रो. कार्पेंटर या गुरुकडे वास्तव्य करीत असताना एकदा रात्री भोजनोत्तर ते बॉरोडेल दरीत शतपावलीस गेले होते त्यावळी त्यांना जो अनुभव आला तो या प्रकारचा होता, हे आपण यापूर्वी एका प्रकरणात पाहिले आहेच.


जगातील सर्व प्रमुख धर्माचा अभ्यास ऐतिहासिक व तुलनात्मक दृष्टीने त्यांनी केलेला असल्यामुळे त्यांच्या आकलनाला सखोलपणा व दृष्टिकोणाला व्यापकपणा आलेला होता, हे विविध धर्म अथवा धर्मपंथ यांचे त्यांनी जे आकलन प्रकट केले आहे त्यांमदून आपल्याला जावणते. भारतातील ब्राह्मधर्म म्हणजे पाश्चात्त्य युनिटेरियन धर्ममताची नक्काल नसून हिंदू धर्माची ती स्वाभाविक उत्क्रांती आहे असे मत ते मांडतात, मात्र मागील शतकारंभीच्या हिंदू धर्माचे वास्तव स्वरुप सांगताना हिंदुस्थानात खरे जुलमी साम्राज्य चालू आहे ते आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ यांच्यापैकी कुणाचे नसून रुढीचे आहे, असे त्यांनी प्रतिपादले आहे. हिंदू धर्मातील उन्नत धर्मविचारावर रुढीने कशी मात केली आहे ते त्यांनी नेमकेपणाने सांगितले आहे. शास्त्र, तत्त्वज्ञान, मीमांसा व इतिहास यांनी मानवी विचाराची व शोधाची जी प्रगती केली तिचे फळ युनिटेरियन पंथाच्या उत्क्रांत धर्मविचारात सापडले, म्हणून ते युनिटेरियन समाज म्हणजे सुधारलेल्या पाश्चात्य जगाचे 'प्रबुदध अंतर्याम' (एन्लायटन्ड कॉन्शन्स) होय असे मानतात. भेदापेक्षा अभेद पाहण्याची त्यांची दृष्टी असल्यामुळे ब्राह्मसमाज आणि आर्यसमाज या दोन धर्मपंथांतप्रधान गोष्टींमध्ये कसे साम्य आहे ते दाखवून देतात. "ईश्वर हे सर्वत्र जिवंत, जागृत, व्यापारमय, केवळ चिन्मय तत्त्व आहे म्हणून त्याला अवयवाची जरुरी नाही. आम्हा सर्व जीवांमध्ये जो अहंकारमूलक आत्मा आहे, तोही वस्तू आहे, केवळ भास नव्हे. ईश्वराच्या ठायीच त्याची वसती आणि वाढ आहे. ईश्वराची जी उपासना करावयाची ती बाह्योपचारिक नसावी. त्याच्या उपासनेत कल्याही जड साधनाची गरज नाही. याप्रमाणे एक ईश्वर, सतत विकास पावणारा आत्मा. आध्यात्मिक उपासना इत्यादी धर्माच्या पारमार्थिक तत्त्वासंबंधी ब्राह्म आणि आर्य या दोघांचे साम्यच नव्हे तर ऐक्य आहे." इतकेच नव्हे तर धर्म म्हणजे हे शुद्ध विचार इतके ठरवून स्वस्थ न बसता त्यांच्या पायावरच आपले ऐहिक आचरण करण्याचा दोघांचाही आग्रहपूर्वक यत्न आहे असे ते सांगतात. ब्राह्मसमाज आणि जोतीराव फुल्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज यांचा गाथा एकच आहे, हेही ते दाखवून देतात.


शिंदे यांनी आपल्या आयुष्यात अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व इतर सुधारणेची जी कामे केली ती धर्मभावनेनेच. लौकिक जीवन आणि धार्मिक जीवन यांमध्ये ते एकात्मताच पाहतात. लैकिक व्यवहार करण्याच्या पाठीमागे जर उन्नत भावना असेल तर अशी भावना आणि धर्मभावना या एकच होत. ते लिहितात, "लहानपणी मुलांची खेळाची आवड, तरुणपणी तरुणीसंबंधी उदात्त रस आणि म्हातारपणी एखाद्या ऐहिक बाबतीतीत सात्त्विक चिंतामग्नता या तिन्ही भावनांहून भक्तीची भावना तत्त्वत: अगदी भिन्नच आहे असे म्हणता येणार नाही. ह्या भावनांत जी वयपरत्वे अंत:करणाची परिणती होत जाते तीची किंचित आणकी थोडी जास्त शुद्ध, जास्त व्यापक आणि जास्त जोरदार झाली की, तिला आम्ही भक्ती हे नाव देतो, ज्या सहज आनंदाने मूल खेळते, तरुण रमतो आणि वृद्ध सात्त्विक चिंतेने व्याकूळ होतो तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तीत आहे, हे माझे मत कित्येकांना विपरीत वाटेल. ऐहिक रस आणि पारमार्थिक रस यांना मी एकच माळेत गोवतो." रसिकता, भक्ती आणि प्रेम या गोष्टी त्यांच्या दृष्टीकोन एकरुप आहेत. ते म्हणतात, "माझ्या जीवनात सहज रसिकता ऊर्फ प्रेम ऊर्फ भक्ती ऊर्फ Love- कोणी काही म्हणोत, कोणी निंदोत, कोणी वानोत - प्रत्यक्ष ईश्वरही कृपा करो न करो - माझे प्रेमच मला खरे आणि म्हणूनच मला ते पुरे. त्यांच्या धर्मकल्पनेत निवृत्ती नसून प्रवृत्ती आहे व ते श्रद्धेच्या जोडीनेच निर्लोभ प्रेमाचा समावेश धर्मकल्पनेत करतात. प्रेमाचे स्वरुप सांगतात ते म्हणतात, "प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे, प्रेम म्हणजे जीवन, जीवनाचा कंटाळा नव्हे." समाजसेवेलाही या प्रेमाचेच अधिष्ठान असल्याचे ते सांगतात. त्यांच्या दृष्टीने प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधना होय. द्वा. गो. वैद्यांच्या लेखसंग्रहाला संपादकांनी दिलेल्या 'संसार आणि धर्मसाधन' या नावाला आक्षेप घेतातना ते म्हणतात, "धर्मसाधन म्हणजे काय? पोथी वाचणे, प्रार्थना करणे, स्तब्ध बसणे, तप करणे म्हणजेच धर्मसाधन काय? मुळीच नव्हे ब्राह्मसमाज म्हणतो, प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. एखादा प्रामाणिक सुतार, हुशार न्हावी, विशेषत: प्रेमळ भंगीदेखील पोटभरू पुरोहितापेक्षा शतपटीने धार्मिक म्हणता येणार नाही काय? असे जर आहे, तर संसार म्हणजेच धर्मसाधन ठरते."


अस्पृश्यताविषयक विचार
अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे व अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचे प्रत्यक्ष कार्य करण्याच्या बाबतीत शिंदे जसे अग्रेसर ठरतात त्याप्रमाणे अस्पृश्यताविषयक संशोधन करण्याच्या बाबतीत आणि अस्पृश्यतेचा प्रश्न सामाजिक पातळीवरुन मांडण्याच्या बाबतीतही हे प्रथमारंभीचे विचारवंत ठरतात.


माणसामाणसांत भेद पाळणे हे अमंगळ आहे अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाचा संस्कार त्यांच्या मनावर बालपणीच झाला होता. ज्या प्रार्थनासमाजाचे अथवा ब्राह्मणसमाजाचे ते अनुयायी झाले होते, त्याचे एक तत्त्व हे आहे की, सर्व मनुष्ये परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून भेद न राखता परस्परांशी बंदुभावाने वागावे, विठ्ठल रामजी शिंदे हे ब्राह्मधर्माचे सच्चे अनुयायी होते. म्हणून या तत्त्वाचे पालन केवळ व्यक्तिगत पातळीवरील व्यवहारात करुन त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते. या दुबळ्या आणि पीडितवर्गाच्या उन्नतीसाठी आपण आपले आयुष्य वाहून कार्य करावे अशी त्यांना प्रेरणा झाली व त्याचप्रमाणे आयुष्यभर त्यांनी कार्य केले व त्यानुसार विचार मांडले. त्यांच्या अस्पृश्यताविषयक संशोधनाचा अन्यत्र विचार केला आहे. येथे आपण त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी सामाजिक पातळीवरुन कोणते विचार मांडले हे ध्यानात घेऊ.

अस्पृश्यताविषयक कार्य करती असताना त्यामागे त्यांची जी वैचारिक भूमिका होती तिचाही आपण आवशयक तेथे निर्देश करु. कारण या कार्यामधूनही त्यांची वैचारिकता दिसून येते.


डिसेंबर १९०५ मध्ये सुबोधपत्रिकेतून त्यांनी 'इलेव्हेशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस' या शीर्षकाचा निबंध लिहून तीन भांगात प्रसिद्ध केला. त्यामध्ये सामाजिक पातळीवर अस्पृश्यता मानण्यामुळे या वर्गावर कसा अन्याय होतो याचे वर्णन करुन त्यांची उन्नती करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. १९०६ साली 'इंडियन सोशल रिफॉर्मर'मध्ये 'ए प्ली फॉर दि मिशन फॉर डिप्रेस्ड क्लासेस' या शीर्षकाचा निबंध लिहून त्यामध्ये अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या अडचणी, त्यांची प्रांतवार संख्या, त्यांच्या निवारणार्थ वरिष्ठवर्गाकडून आणि स्वतः त्या लोकांकडून होणारे प्रयत्न यांची प्रथमच पद्धतशीर मांडणी केली. लेखाच्या अखेरीस या अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या उद्धारासाठी नुसती शिक्षणसंस्था, मग ती कितीही मोठ्या प्रमाणावर असो, स्थापून चालवयाचे नाही, तर ज्यामध्ये जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे असे मिशन तयार झाले पाहिजे. अशा मिशनने ख्रिस्ती मिशन-यांप्रमाणे या लोकांच्या जीवितांमध्ये क्रांती घडवून न आणता विकास घडवून आणला पाहिजे, असे प्रतिपादन केले. या भूमिकेनुसारच पुढे त्यांनी ऑक्टोबर १९०६ मध्ये देशी मिशनच्या स्वरुपाची संस्थाही स्थापन केली, हा वृत्तान्त मागील एका प्रकरणात आपण पाहिल आहेच.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे मिशन स्थापन करताना ते एतद्देशीय असावे, ख्रिस्ती मिशनप्रमाणे या लोकांच्या जीवनात क्रांती करण्याची भूमिका न ठेवता या वर्गातील व्यक्तींचा विकास घडवून आणावा ही भूमिका ठेवली. ख्रिस्ती मिशनचा सेवाभाव त्यांना अनुकरणीय वाटत होता व त्याबद्दल त्यांना अशा मिशनबद्दल आदरभावही होता. परंतु बहुधा धर्मांतराच्या मार्गाने ते या लोकांच्या लौकिक स्थितीमध्ये, राहाटीमध्ये एकदम क्रांती घडवून आणू पाहतात. ही मिशन-यांची भूमिका शिंदे यांना योग्य वाटत नव्हती. ख्रिस्ती मिशनच्या धोरणामुळे या वर्गातील काही लोकांच्या स्थितीमध्ये बाह्यात्कारी पालट घडेल,परंतु या मार्गाने त्यांचा खराखुरा सर्वांगीण विकास होणार नाही, अस्पृश्य मानलेल्या समाजामध्ये स्वाभिमानाची व आत्मोन्नतीची जाणीव निर्माण होणार नाही असे शिंदे यांना वाटत होते. या वर्गातील लोकांचा क्रमशः विकास घडवून आणल्यामुळेच त्यांच्यात खरीखुरी सुधारणा होणार आहे अशी त्यांची धारणा झाली होती.


अशी धारणा होण्याला त्यांची पक्की वैचारिक बैठक कारणीभूत होती. त्यांच्या आध्यात्मिक विचारात आणि समाजसुधारणाविषयक विचारात सुसंगती आढळून येते. आध्यात्मिक बाबतीत अवतारवाद त्यांना मान्य नव्हता. त्याचप्रमाणे सामाजिक सुधारणेच्या बाबतीत विभूतिवाद त्यांना मंजूर नव्हता. म्हणूनच क्रांतीपेक्षा ते उत्क्रांतीला महत्त्व देतात.

समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने थॉमस कार्लाइलचा विभूतिवाद आणि हर्बर्ट स्पेन्सचा सामान्य माणसाचा प्रयत्नवाद या दोहोंची तुलनात्मक मीमांसा केल्यानंतर विभूतिवादावरील त्याचा विश्वास कमी होऊन सामान्य माणसाच्या विधायक प्रयत्नाकडे त्यांचा कल झालेला होता. त्यांच्या प्रयत्नवादाला श्रद्धेचे आध्यात्मिक पाठबळ होते. त्यांनी लिहिले आहे, "अस्पृश्यतानिवारणाच्या कामी आधुनिक काळात कोणी विभूती पुढे येत नाहीत आणि मी तर स्वत: अत्यंत सामान्य माणूस. ही वस्तुस्थिती पाहून ती हताश झालो नाही. श्रद्धेने पर्वत हलतात या ख्रिस्तोक्तीची प्रचिती पाहण्याची वेळ आली होती. श्रद्धा, मग ती एखाद्या विभूतीची असो वा सामान्य माणसाची असो, श्रद्धा ती श्रद्धाच ! तिने पर्वतही हलले पाहिजेत."