ब्रह्मदेशाची यात्रा

मंगलोरहून परत आल्यानंतर १९२५-२६ साली विठ्ठल रामजी शिंदे यांनी बौद्ध धर्मासंबंधी विशेष अभ्यास केला. डी.सी. मिशनपासून वियुक्त होण्याचा प्रसंग व त्यानंतर मंगलोर येथे ब्राह्मधर्माचे आचार्य म्हणून गेल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर तेथूनही पुण्यास परत यावे लागण्याची घटना, यामुळे त्यांच्या मनाला एक प्रकारची अशांतता जाणवत होती. म्हणून पुण्यास आल्यानंतर बौद्ध धर्माचाच त्यांनी विशेष अभ्यास सुरु केला. विशेषतः पाली भाषेतील धम्मपद हा ग्रंथ प्रो. चिं.वि.जोशी यांच्याजवळ वाचल्यापासून मनाला शांती वाटू लागली, असा अनुभव त्यांना आला. याचा वेळेला आपण ब्रह्मदेशाला जावे व तेथील बौद्ध धर्मातील जीवन प्रत्यक्ष पाहावे आणि स्वतः अनुभवावे हा विचार त्यांच्या मनात बळावत चालला. बौद्ध धर्माच्या जिज्ञासेबरोबर ब्रह्मदेशाबद्दल दुसरी एक जिज्ञासा विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात होती. ती म्हणजे तेथील सामाजिक स्थितीचे स्वरुप न्याहाळावे. ब्रह्मदेशातील सामाजिक व कौटुंबिक स्थितीबद्दल त्यांना कुतूहल वाटत होते. ब्रह्मदेशात तर जातिभेद नाही, स्त्री-पुरुषांत समानतेचे नाते आहे, किंबहुना स्त्रियांचा वरचष्मा आहे असे त्यांनी ऐकले होते. या दुहेरी कुतूहलापोटी शिंदे यांनी ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे ठरविले. बौद्ध धर्माचे जीवन पाहावे, विशेषतः एकांत विहारात राहून त्या धर्माचे रहस्य अनुभवावे असाही विचार त्यांनी पक्का केला  ते ब्रह्मदेशाच्या यात्रेसाठी निघाले.


१९२७ सालच्या २४ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत कलकत्त्याला ब्राह्मसमाजाचा वार्षिकोत्सव म्हणजे माघोत्सव होता. या उत्सवाला उपस्थित राहून मग कलकत्त्याहून पुढे रंगूनला जावे असे त्यांनी योजिले. माघोत्सवामध्ये ब्राह्मधर्माच्या प्रचारकांची ऊर्फ मिशनरींची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भाषण करीत असताना शिंदे यांनी 'मी बौद्ध आहे' हे विधान केले. त्यांचे हे विधान ऐकून ब्राह्म मिशनरी बंधू चमकले. अनेकांना त्यांचे हे विधान ऐकून आश्चर्य वाटले, तर काहींना त्यांचे हे विधान रुचले नाही. याबाबतीत शिंदे यांची भूमिका स्वच्छ होती. १९०१ ते ०३ पर्यंत ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षण घेत असताना प्रो. कार्पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पाली भाषा व बौद्ध धर्म यांचा विशेष अभ्यास केला होता. धर्माच्या अभ्यासासंदर्भात एक प्रकारची ऐतिहासिक दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती. १९१० साली पुण्यास 'बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार' या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी बौद्ध धर्म हा आमचा बिनमोल वरसा आहे असे सांगितले होते. आपल्या हल्लीच्या धार्मिक व सामाजिक जीवनाचा बौद्ध धर्म हा एक मोठा घटक आहे, अशी त्यांची धारणा होती. आपल्या हल्लीच्या धार्मिक व सामाजिक जीवनाचा बौद्ध धर्म हा एक मोठा घटक आहे, अशी त्यांची धारणा होती. बौद्ध धर्म हा प्रत्यक्षार्थवादी (पॉझिटिव्हिस्ट), व्यवहारवादी आणि प्रागतिक आहे ह्या धारणेमुळे बौद्ध धर्माकडे त्यांचा ओढा होता. शिवाय ब्राह्याला तत्त्वत: कोणताच धर्म परका नव्हता. म्हणून ब्राह्म मिशनरीच्या सभेमध्ये त्यांनी वरील प्रकारचे उद्गार काढले. आमच्या ब्राह्मसमाजात जर वेगवेगळ्या धर्मातून माणसे येतात, तर मी बौद्ध धर्मातून आलो असलो तर त्याच वावगे काय? आज जर गौत्मबुद्ध जिवंत होऊन आले तर त्यांना तुम्ही ब्राह्मसमाजात घेणार नाही काय? या प्रकारे शिंदे यांना ह्या वादंगामध्ये युक्तिवाद करावा लागला. अध्यक्षस्थानी गुरुदास चक्रवर्ती हे बौद्ध प्रचारक होते. या विषयावर वाद माजू लागला आहे हे पाहून त्यांनी उठून सांगितले, "श्रीयुत शिंदे यांचा आध्यात्मिक भाव मनात आणा. शब्दावर वाद नको. ब्राह्मसमाज सर्वसंग्राहक आहे आणि शिंदे हे त्याचे नमुनेदार उदाहरण होय. आता ते लवकरच ब्रह्मदेशात बौद्ध धर्म पहावयास जाणार आहेत. त्यांच्या ब्राह्मधर्माचा उदारभाव पाहून तेथील मंडळींचा, त्याप्रमाणे ब्राह्मसमाजाचा फायदाच होईल."


८ फेब्रुवारी १९२७ रोजी रात्रौ शिंदे रंगूनला पोहोचले. रंगून येथील डॉ. पी. के. मुजुमदार यांच्या घरी पाहुणा म्हणून ते राहिले. ब्रह्मदेशात आल्यानंतर धर्मविचाराची देवाणघेवाण करणे हाही त्यांनी आपला एक उद्देश ठेवला होता. ११ फेब्रुवारीला रंगून येथील ब्राह्ममंदिरात त्यांनी 'धर्माचा आत्मा" ( दि सोल ऑफ रिलिजन) या विषयावर व्याख्यान दिले व १२ तारखेस उपासना चालविली. स्थानिक ब्राह्मांच्या मेळाव्यामध्ये शिंदे यांनी 'ब्राह्मबंधूंमध्ये जास्तीजास्त सहकार्य व ऐक्य निर्माण होण्याची आवश्यकता' या विषयावर भाषण दिले आणि ब्रह्मदेशात ब्राह्मधर्माचा प्रसार करण्याच्या चळवळीची आवश्यकता यासंबंधीही प्रतिपादन केले. १३ तारखेस रविवारी रंगून येथील ब्राह्मसमाज मंदिरात इंग्रजीमध्ये त्यांनी उपासना चालविली. रंगून ब्राह्मसमाजाने शिंदे यांच्या गौरवार्थ तारीख १९ रोजी बेगॉल अॅकॅडेमीमध्ये चहापार्टी दिली. दुस-या दिवसापासून त्यांनी आपल्या प्रवासाला प्रारंभ केला.१ दक्षिण ब्रह्मदेशात पाश्चात्त्य सुधारणेचे संस्कार विशेष प्रमाणात झाले होते. शिक्षण, व्यापार, राजकारण यांमध्ये ते संस्कार दिसून येत होते. तर उत्तर ब्रह्मदेशात जुने वळण प्राधान्याने प्रचलित होते. प्रथमत: दक्षिण ब्रह्मदेशामध्ये यात्रा करण्यास विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवात केली.


२० फेब्रुवारीला सकाळी रंगूनहून निघून ते मेलोमनला पोहोचले. तेथील मुख्य पॅगोडे पाहून एका वृद्ध फोंजीला(भिक्षूला) भेटून त्याचा मठ पाहिला. नंतर थाईन या इतिहासप्रसिद्ध गावी शिंदे गेले. तेथे एक हजार फूट उंचीवर टेकडीवर असलेला म्या दबे नावाचा रमणीय पॅगोडा पाहिला. ह्या निर्जन आणि एकांतस्थळी शिंदे यांची ध्यानधारणा चांगल्या प्रकारे झाली. तेथील एक विहारात उ कोडन्ना नावाच्या फोंजीला ते भेटले. ते पूर्वाश्रमीचे डेप्युटी कलेक्टर होते. कोणाही प्रांपंचिक गृहस्थास काही काळ बुद्ध भिक्षूची दीक्षा घेऊन परत गृहस्थाश्रमास जाण्याला मुभा असते. ह्या सवलतीला अनुसरून उ कोडन्ना यांनी विश्रांतीसाठी आणि अध्ययनासाठी हा चतुर्थ आश्रम स्वीकारला होता. कोडन्ना यांची भेट शिंदे यांच्या मनाला फार समाधान देणारी वाटली. त्यांच्या भेटीने शांती आणि गंभीरपणा ह्याचा परिणाम त्यांच्या मनावर झाला. त्या विहाराचे वातावरणही आध्यात्मिक भावनांनी भारलेले होते. ह्या वातावरणाचा परिणाम होऊन विठ्ठल रामजी शिंदे यांना वाटले की, आपणही काही काळ बौद्ध धर्माची उपसंपदा (दीक्षा) घ्यावी. उ कोडन्ना हे विचारात अगदी नवीन वाटले. शिंदे यांनी त्यांना विचारले, "बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, ही तीन शरण्यरत्ने आहेत खरी. पण बुद्धालाच तेवढे शरण जाऊन माझा बौद्ध धर्मात प्रवेश होऊ शकणार नाही काय? आणि तुम्ही मला दीक्षा देऊ शकाल काय?" शिंदे यांच्या प्रश्नावर त्यांनी स्मितपूर्वक उत्तर दिले, "तुमचा आध्यात्मिक भाव पाहून मला आनंद वाटतो. तुम्हाला बाह्म उपसंपदेची जरूरी तरी काय उरली? शिवाय दीक्षा देण्याचा अधिकार मला नाही. तो मठाधिपतीकडे असतो. मी अद्यापि साधकच आहे.

एकंदरीत तुमच्या भेटीमुळे मला मोठे समाधान झाले." बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची प्रबळ उर्मी अण्णासाहेबांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तिचा आविष्कार अशा प्रकारे झाला.


२४ फेब्रुवारीला ते पेगूला गेले. तेथे श्वे थ याँ बुद्ध ( उजव्या हातावर मान टेकून निजलेला मोठा पुतळा) पाहिला. मोलेमन, थाटन आणि पेगू अशी स्थळे पाहून २५ ला सायंकाळी ते रंगूनला परत आले व मुजुमदार यांचे पाहुणे म्हणून राहिले. तारीख २६ ला रामदासनवमी होती. त्याचप्रमाणे तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथीही त्याच दिवशी होती. या निमित्ताने सायंकाळी महाराष्ट्र मंडळाच्या विद्यमाने अण्णासाहेबांनी मयेकर यांच्या घरी 'महाराष्ट्र धर्म' या विषयावर कीर्तन केले. ह्या कीर्तनासाठी त्यांनी मुद्दाम पुढील पद तयार कले. हे पद तयार करताना तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आहे, ही गोष्ट त्यांनी मनात वागविली.

महाराष्ट्र धर्म


बंधु हो भवाचा किल्ला    सर करणे आम्हा सकला ।।धृ।।
सिंहगड तो एकची नोहे    महाराष्ट्रामधला साचा ।।
तान्हाजि नव्हे एकुलता    शेलार मामाचा भाचा ।।
श्री शिवाजी होऊनि गेला   कधी काळी इतिहासाचा ।।


अशी गोष्ट न बोला कधीहि ।।
जीवन ये युद्धहि पाही ।।
दिनरात अंतरी बाहीं ।।


मग काहो स्वस्थसे बसला? ।।१।। बंधुहो...
संत आजवरी जे झाले ते संत नव्हत शिपाई ।।
भव-रणांगणा माझारी झुंझती ते ठाईठाई ।।
येरयेरा देती हाक या म्हणती आम्हालाहि ।।


आम्ही पहा कसे हे भ्रांत ।।
ठेवुनि कपाळी हात ।।
करितसे स्वत:चा घात ।।
चला उठा लागू कामाला ।।२।। बंधुहो...


जग नव्हे मराठ्यापुरते, पसरे ते अनाद्यनंती
राहणीचे जे जे साधे स्वार्थाबहिर जे पाहती ।।
सत्याची भूक जयांना अन्याया जे ना सहती ।।


ते सर्वची अस्सल मराठे ।।
कालदेश केव्हा कोठे ।।
सोडा हे विचार झूट ।।
महाराष्ट्र धर्म अपुला ।।३।। बंधुहो...


रामदास स्वर्गातुनिया ऐकुनि हे आनंदेल ।।
तान्हाजि शिवाचा कलिजा राखेतुनि पुन: उठेल ।।
तुक्याची म-हाटी वाणी कानीमनीं गुंजेल ।।


मग मी-तुपणाचे वारे ।।
निवारुनि जाईल सारे ।।
जगि उठा तुम्ही बारे ।।
महाराष्ट्र । जय जय बोला ।।४।। बंधुहो...


शिंदे यांनी या प्रसंगी गायिलेल्या प्रस्तुत पदावरुन त्यांनी भाषणात केलेल्या प्रतिपादनाची कल्पना येऊ शकते. आपले संत म्हणजे संत नसून संसाररुपी युद्धभूमीवर रात्रंदिवस लढणारे शूर शिपाई होत. सत्यासाठी, नैतिक आचरणासाठी त्यांचा सदैव लढा चाललेला असे ही भूमिका ते विशद करतात. त्याचप्रमाणे मराठा म्हणजे कोण ह्याबद्दलची व्यापक कल्पना ते मांडतात. ज्यांची ज्यांची राहणी साधी आहे; जे स्वार्थाच्या पलीकडे बघतात; ज्यांना सत्याची भूक आहे व ज्यांना अन्याय असह्म वाटतो, ते सर्व अस्सल मराठे होत. मग ते कोणत्याही काळातील व कोणत्याही देशातील असोत. अशा मराठ्यांचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म होय असे व्यापक स्वरुपाचे प्रतिपादन त्यांनी केलेले दिसते.

 

महाराष्ट्रापासून दूर ब्रह्मदेशासारख्या ठिकाणी असणा-या वेगवेगळ्या जातीच्या मराठी भाषिक मंडळींना त्यांचे हे प्रतिपादन आणि उन्नत विचार स्वाभाविकपणे आवडले असणार.
ब्रह्मदेशातील आपल्या ह्या मुक्कामात विठ्टल रामजी शिंदे विविध महत्त्वपूर्ण विषयांवर श्रोत्यांच्या स्वरुपानुसार भाषणे देत होते. २ मार्चला मिसेस मुजुमदार यांनी आपल्या घरी काही बायकांना बोलावले होते. ह्या स्त्रियांच्या पुढे त्यांनी 'महाराष्ट्रातील बायकांची कामे' ह्या विषयावर भाषण केले. आपल्या कुटुंबव्यवस्थेत स्त्रियांची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते याचे शिंदे यांनी वेळोवेळी आपल्या लेखनातून तसेच भाषणातून प्रतिपादन केलेले आहे.


मुख्यत: कौटुंबिक पातळीवरील महत्त्वाचे निर्णय घेणे व मुलांवर योग्य संस्कार करणे हे मौलिक स्वरुपाचे काम आपल्याकडील स्त्रिया करीत आलेल्या आहेत व जिजाबाईंसारख्या स्त्री-रत्नांची परंपरा महाराष्ट्रात पूर्वीपासून आहे असे त्यांचे मत होते. या स्वरुपाचे स्त्रियांना रुचेल असे व अमलात आणता येऊ शकेल अशा प्रकारचे प्रतिपादन विठ्ठल सामजी शिंदे यांनी केले असावे. तारीख ५ मार्च रोजी लक्ष्मीनारायण धर्मशाळेत 'बृहद् हिंदू धर्म आणि जनतेचा उद्धार' या विषयावर इंग्रजीत भाषण केले.


६ मार्च १९२७ रोजी अण्णासाहेबांनी 'महाराष्ट्र मित्रमंडळी'च्या वार्षिक सभेत अध्यक्ष या नात्याने भाषण केले. त्यांच्या भाषणाचा विषय 'हिंदू धर्माची जागृती' हा असावा असे उपलब्ध टिपणावरुन दिसून येते.२ अण्णासाहेबांनी 'हिंदू धर्माची जागृती' ह्या विषयावर दिलेल्या व्याख्यानात ऐतिहासिक दृष्टिकोणातून हिंदुस्थानात झालेल्या धर्मविषयक उलाढालींचा वेध घेत मौलिक स्वरुपाचे विचार मांडले. ह्या टिपणात हिंदू धर्माचे विशेष नोंदविले आहेत, ते अस: १) अनैतिहासिक २) व्यापक ३) संग्राहक ४) म्हातारा धर्म आणि ५) झोपाळू. टिपणात पुढे त्यांनी नमूद केले आहे की, हिंदू, ख्रिस्ती, मुसलमान, चिनी, बौद्ध, जैन वगैरे भिन्न धर्म नाहीत. धर्म एक; पंथ निराळे.


मोक्षधर्म आणि व्यवहारधर्म असा भेद कल्पून त्यांनी म्हटले आहे. मोक्षधर्म सर्वत्र एकच. तरी व्यवहारधर्मामुळे पंथ निराळे. एकं सत् विप्रा: बहुधा वदंति.


मोक्षाची बाजू सनातन असल्याने तिला झोप नाही व ती असामान्य ऋषिप्रणीत आहे. पण व्यावहारिक बाजूत मात्र झोप व जागृती असे हेलकावे (दिसतात.)


धर्माची सुधारणा म्हणून जी आहे ती ह्या व्यावहारिक ऊर्फ युगधर्मातच आहे. इतर धर्मपंथ जन्मण्यापूर्वी म्हणजे बुद्धकालीच हिंदू धर्मपंथाला म्हातारपण आले. बौद्ध व जैन धर्म ही पहिली सुधारणा ऊर्फ जागृती. बौद्ध सुधारणा ही जुनी झाल्यावर भागवत धर्माची दुसरी जागृती. हल्लीच्या (प्रार्थना) समाजधर्माच्या हेटाळणीप्रमाणेच सर्व पूर्व जागृतीचीही (हेटाळणी) झाली. झोपाळू मनुष्य झटकन न उठता आळेपिळे देतो तशीच ही हेटाळणी आहे. एक जागा झाला म्हणजे दुस-या झोपाळूची थट्टा करतो.


शंभर वर्षांत ह्या समाजाने जी कामगिरी केली ती आज म्हातारा हिंदू धर्म आता कबूल करीत आहे. ७ मार्च रोजी ते उत्तर ब्रह्मदेश पाहण्यासाठी मंडालेला निघाले. ८ मार्च रोजी मंडालेला पोहोचल्यानंतर दत्तात्रय सखाराम नागवंशे यांच्याकडे त्यांनी मुक्काम केला. नागवंशे हे मंडाले-मदाया रेल्वेत उपविभागीय अधिकारी होते. अहमदाबादचे डॉ. पायगुडे हे त्यांना भेटले. तारीख १० ला मंडाले येथील टेकडीवर श्वे या दो बुद्धाचा २५ फूट उंचीचा हात वर करुन उभा असलेला पुतळा पाहिला. मंडाले येथील मुख्य देवळातील महात्मा मुनीचा (बुद्धाचा) भव्य पितळी पुतळा तारीख ११ रोजी पाहिला. ह्या देवळामध्ये भाविकांची सतत गर्दी असे. बाहेरच्या अंगणात असलेल्या स्वच्छ तळ्यातून जिवंत मासे धरून काही लोक विक्रीस ठेवीत, आपण ते विकत घेऊन पुन्हा पाण्यात सोडल्यास पुण्य लागते अशी भाविक लोकांची समजूत असे. शिंदे यांनी म्हटले आहे, "पुन्हा पुन्हा तेच तेच मासे धरल्याने ते इतके माणसाळून गेले होते की, ते आपोआप टोपलीत येऊन पडत."


मंडाले येथील मुक्कामात शिंदे यांनी जुन्या राजाचा वाडा पाहिला. टिळकांना जेथे ठेवले होते तो राजकीय तुरुंगही पाहिला. अण्णासाहेब शिंदे जेथे जातील-मग ते पॅरिस असो की मंडाले असो-तेथील समाजशास्त्रज्ञांची आवर्जून भेट घेत असत व त्यांच्याकडून नवी माहिती मिळविण्याचा व आपले कुतूहल पूर्ण करुन घेण्याचा प्रयत्न करीत असत. मंडालेहून काही अंतरावर मेमियो हे हवा खाण्याचे सुमारे ३५०० फूट उंचीवर वसलेले ठिकाण आहे. तेथे टॉ सिन को या नावाच्या वास्तुशास्त्रज्ञाकडे एक दिवस त्यांनी पाहुणा म्हणून व्यतीत केला. हे विद्वान त्यांना ब्रह्मदेशाचे डॉ. भांडारकरच वाटले. त्यांच्याशी ब्रह्मी पुरातत्त्व वास्तुविषयासंबंधी शिंदे यांनी विचारविनिमय केला. शिंदे यांची फकिरीवृत्ती दिसत असूनही त्यांच्या ठिकाणी असलेली शोधक बुद्धी पाहून त्यांना आश्चर्य वाटले व तसे त्यांनी बोलून दाखविले. हे विद्वान गृहस्थ युरोपियन थाटात राहत असत. टेबलावर जेवीत असताना शिंदे यांनी एका चमत्कारिक विषयाबद्दलची पृच्छा केली. ब्रह्मी लोक मृतमांस खातात असे त्यांनी ऐकले होते. परंतु अधिकारवाणीने कोणी उलगडा अद्यापि त्यांच्याजवळ केलेला नव्हता म्हणून हा विषयमोठ्या नम्रपणे टॉसाहेबांकडे काढला. ब्रह्मी माणसे मृतमांस खातात हे त्यांनी कबूल करुन सगळीच माणसे मेलेल्या जनावराचेच मांस खातात, मग तो प्राणी मेलेला असो की मारलेला असो, असे एक प्रकारच्या आक्रमकपणाने सांगितले. खाते वेळी त्या प्राण्याचे मांस शुद्ध असणे महत्त्वाचे होय असे त्यांनी सांगितले.