विठ्ठल रामजी शिंदे यांनी आरंभिलेले अस्पृश्यतानिवारण्याचे कार्या अशा स्वरूपाचे होते की, समाजातील स्रव थरांकडून साहाय्य मिळण्याची त्याला आवश्यकता होती आणि अण्णासाहेब शिंदे हे तर स्वभावाने स्पष्ट, परखड बोलणारे, आपल्या तत्त्वाखातर कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे, स्वतंत्र बाणा राखणारे पुरुष होते. तसे असले तरी अस्पृश्यतानिवारणाच्या कामी त्यांच्या वृत्ती अतिशय हळुवार होत्या व ह्या कामासाठी त्यांनी सर्व स्तरावरील मिशनच्या कामाच्या संदर्भात त्यांचा राजकीय बाणा कधीच आड आला नाही. आपल्य राजकीय मतप्रणालीचा ह्या कामी अडथळा येणार नाही याची ते दक्षता घेत होते. ह्या कामामध्ये सवर्ण हिंदूंमधील जहाल-मवाळ पुढारी, अस्पृश्य समजल्या जाणा-या भिन्न भिन्न जातींतील पुढारी यांचे साहाय्य घेणे हे जसे त्यांना आवश्यक वाटत होते, त्याचप्रमाणे संस्थानिक, इंग्रज राज्यकर्ते यांचेही साह्म घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांनी इंग्लंडमध्ये दोन वर्षे वास्तव्य केलेले असल्यामुळे व तेथे चालणा-या सार्वजनिक स्वरूपाच्या कामाचे निरीक्षण केलेले असल्यामुळे येथील इंग्रज अधिका-यांशी कसे वागावे; त्यांचे साहाय्य कसे घ्यावे याबद्दलची रास्त कल्पना त्यांच्या मनामध्ये असणार. म्हणूनच मुलकी आणि लष्करी इंग्रज अधिकारी यांचे साहाय्य ते उत्तम रीतीने घेऊ शकले. ख्रिश्चन धर्माचे हे ब्रिटिश अधिकारी अस्पृश्यतानिवारण्याच्या कामाचे आणि ह्या वर्गाच्या उन्नतीच्या कार्याचे महत्त्व तात्काळ ओळखीत असत. आधीचे गव्हर्नर सर जॉन क्लार्क यांनी आपली मुलगी मिस् व्हायोलेट क्लार्क हिला संगीताचा जलसा करण्याची व त्याद्वारे मिशनला आर्थिक साहाय्य करण्याची अनुमती दिली होती. मिस् व्हायोलेट क्लार्क हिचा जलसा मिशनच्या कार्याला आर्थक साहाय्य मिळवून देण्याच्या दृष्टीने जसा उपक्त ठरला त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गाच्या सहानुभूतीचे क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीनेही तो अतिशय फलदायी ठरला. हा जलसा झाल्यनंतर लगेचच दुदैवाने मिस् व्हायोलेट क्लार्क ह्या प्रेमळ, गुणी तरुणीचा अकाली मृत्यू झाल्यामुळे ह्या अस्पृश्यतानिवारणाच्या कामालाही एक कारुण्याची छटा प्राप्त झाली होती.
विठ्ठल रामजी शिंदे पुण्यास येऊन राहू लागले त्या सुमारास मुंबईच्याच गव्हर्नरपदी लॉर्ड विलिंग्डन ह्यांची नेमणूक झाली. त्यांची पत्नी लेडी विलिंग्डन यांच्या कानावर ख्रिस्तवासी मिस् व्हायोलेट क्लार्क हिची हकिकत गेली असावी. लेडी विलिंग्डन ह्या पुण्यास मुक्कामासाठी आल्यानंतर पुण्यातील मिशनचे काम समक्ष बघण्याची इच्छा त्यांनी मिशनचे सेक्रेटरी या नात्याने विठ्ठल रामजी शिंदे यांना कळवली. त्यानुसार त्यांनी लेडी विलिंग्डन यांच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित केला.
शिंदे यांनी मिशनची एक जाहीर सभा बोलाविली. मोठा शामियाना घातला. अस्पृश्य बायकामुले व ह्या कार्यला मदत करणा-या गावातील प्रतिष्ठित स्त्रिया यांनाही बोलाविले. ठरल्या वेळी लेडी विलिंग्डन सभास्थानी आल्या. जमलेला मोठा स्त्री-पुरुषांचा मिश्र समाज पाहून त्यांना आनंद झाला तसेच आश्चर्य वाटले. शाळेची टापटीप, प्रसन्नमुख विद्यार्थी, तालासुरावर त्यांची झालेली कवायत लेडी विलिंग्डनना चित्तवेधक वाटली. पुणे शाखेच्या शाळेतील मुलांना कवायती शिकविण्यासाठी अस्पृश्यवर्गातील लष्करी पेन्शनर मिळत असत. ह्या मुलांची कवायत मोठी चित्तवेधक ठरत असे. मुलांची कवायत बघून प्रभावित झाल्यामुळे लेडी विलिंग्डन अण्णासाहेब शिंदे यांच्या कानात विनोदाने म्हणाल्या,”मिस्ट शिंदे, हे गरीब लोक पुढे एकेकाळी हिंदुस्थानचे राजे होतील.” तितक्याच विनोदाने शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले, “बाईसाहेब, आपला आशीर्वाद खरा होणार यात मला तिळमात्र संदेह वाटत नाही; पण हे लोक राजे झाल्यावर आपण तशरीफ कोठे न्याल?” यावर बाई मनःपूर्व हसल्या. पुढील काळात लॉर्ड विलिंग्डन यांनी मिशनला वेळोवेळी उदार मदत केली आणि मिशनच्या चालकाशी ते सौहार्दपणे वागले याचे हे पूर्वचिन्हच शिंदे यांना वाटले.
पुणे शाखेला स्वतंत्र इमारत असावी, असे शिंदे यांना वाटत होतेच व त्या दृष्टीने १९१२ सालच्या ऑक्टोबरमध्ये व्यापक प्रमाणात मिशनची महाराष्ट्र परिषद त्यांनी आयोजित केली होती. त्याचाच एक परिणाम म्हणून इंदूर संस्थानचे अधिपती श्रीमंत तुकोजीराव होळकर यांच्याकडून वीस हजार रुपयांची रोख देणगी मिळाली हा वृत्तान्त आपण पाहिलेला आहेच. ह्या देणगीतून पुणे शाखेतून ज्या इमारती व्हावयाच्या होत्या त्यांना अहल्याश्रम हे नाव देण्याचे ठरले होते. ह्या इमारतीसाठी जागा शोधण्याच्या प्रयत्नाला विठ्ठल रामजी शिंदे लागले. पुण्याच्या नाना पेठेत त्या वेळेला भोकरवाडी म्हणून अस्पृश्यांची कंगाल वस्ती होती. ही जागा अत्यंत गलिच्छ होती. वस्तीच्या आजूबाजूला दोन फर्लांग मैदानाची उघडी बाजू होती. ते सर्व स्थळ उजाड आणि भयाण दिसत असे. खाचखळगे, काटे एवढेच नव्हे तर जनावरांच्या हाडांचे मोठमोठे सापळे, चिंध्या, मोडके डबे वगैरे ‘कंगालांच्या संपत्ती’ चे हे मैदान उघडे भांडारच होते. जवळच पोलिसांचे ठाणे असले तरी येथील रस्ता कधी दुरुस्त आणि स्वच्छ नसायचा. मेलेल्या प्राण्यांचे आजूबाजूला अवशेष असल्याने भोवतालच्या जुन्या वाढलेल्या वटवक्षावर भयानक पांढ-या गिधाडांचे कळप वस्ती करून होते. प्रसंगी खून मारामा-याही तेथे होत. अशा स्थितीतले सात एकरांचे हे मैदान पुणे शहर म्युनिसिपालटीने संकल्पित अहल्याश्रमासाठी ९९ वर्षांच्या कराराने दोन निरनिराळ्या भाडेपट्ट्याने ही सात एकराची जागा मिशनच्या स्वाधीन केली. प्रथम तारीख २२-५-१९१५ रोजी पहिला पट्टा दोन एकर, तीस गुंठ्यांचा दरसाल एक रुपया भाड्याने करण्यात आला. पुढे ही जागा पुरणार नाही असे वाटल्यावरून उरलेल्या तीन एकर, तेवीस गुंठ्याची जागा तारीख १३-४-१९२२ रोजी घेण्यात आली. म्हणजे एकंदर सात एकराचे हे मैदान ९९ वर्षांच्या कराराने दरसाल दोन रुपये भाड्याने मिशनने पुणे म्युनिसिपालटीकडून घेतले. भाड्याचे हे दोन रुपयो केवळ मालकी हक्कासाठी ठरविण्यात आले होते.१
ही जागा अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी आणि अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करणा-या मिशनसाठी निवडण्याचे अण्णासाहेब शिंदे यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचे कारण होते. ही जागा म. जोतीबा फुले यांनी अस्पृश्यवर्गासाठी शाळा चालविण्याच्या हेतूने आपल्या संस्थेसाठी सरकारडून घेतलेली होती. ती पुढे सरकराकडे जाऊन म्युनिसिपालटी स्थापन झाल्यानंतर म्युनिसिपालटीकडे गेली होती. म. जोतीबा फुले यांचेच कार्य चालविण्यासाठी मिशनला ही जागा पाहिजे अशी ऐतिहासिक परंपरा सिद्ध करून दाखविल्यानंतर पुणे शहर म्युनिसिपालटीने एवढी मोठी जागा मिशनला देण्यासाठी आढेवेढे घेतले नाहीत आणि कार्याचे महत्त्व ध्यानात घेऊन सरकारनेही या व्यवहाराला सहज मंजुरी दिली.२
श्रीमंत तुकोजीराव होळकरांकडून वीस हजार रुपयांची आरंभी मिळालेली मोठी देणगी व त्यानंतर पुणे शहर म्युनिसिपालटीकडून मिळालेली एवढी मोठी जागा ह्या क्रमानंतर इमारत बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळविणे हे ओघानेच येत होते. अण्णासाहेब शिंदे यांनी संकल्पित इमारतीचे नकाशे व खर्चाची अंदाजपत्रके वगैरे जोडून सरकारी विद्याखात्याकडे अर्ज पाठविला. १९१३च्या जुलैमध्येच लॉर्ड विलिंग्डन यांच्याकडे एक खास डेप्युटेशन नेण्यात आले. त्यावरून संकल्पित अहल्याश्रमाच्या इमारतीसाठी वीस हजार रुपयांची मदत देण्याचा सरकारी ठरावही झाला. पण पुढे १९१४ साली आकस्मिकपणे महायुद्धाचे संकट ओढवल्यामुळे परिस्थितीत पालट झाला. सरकार इमारतीसाठी लगेच आर्थिक साहाय्य करू शकत नव्हते. म्हणून इमारतीचे बांधकामही पुढे ढकलण्यात आले. मात्र वरील शिष्टमंडळाने मिशनच्या मुंबई, पुणे हुबळी येथील शाखांतील विद्यार्थी वसतिगृहाचो काम कसे चालले आहे व मुंबई आणि पुणे येथे वाडिया ट्रस्टीच्या देणगीतून औद्योगिक शिक्षणाचे काम कसे चालले आहे हे लॉर्ड विलिंग्डन यांना नीट समजावून सांगितले. मिशनच्या कामाचे महत्त्व त्यांना भावले असल्यामुळे त्यांनी मिशनला विशेष सवलतीचे ‘ग्रँट इन एड’ देण्याचे आश्वासन दिले व वसतिगृहाच्या मदतीसाठी दरसाल दोन हजारापर्यंतची मदत युद्धाची अथवा अन्य कोणतीही सबब न सांगता दरसाल करण्याचे मान्य केले व ही मदत सालोसाल पुढे मिळत राहिली.३
संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २७९.
२. तत्रैव, पृ. २७९.
३. तत्रैव, पृ. २८०.