ऍमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषद

ऍमस्टरडॅम येथील परिषदेला अद्यापि अवधी असल्याने हा मधला जुलै-ऑगस्ट असा दोन महिन्यांचा काळ विठ्ठल रामजी शिंदे यांना वेगवेगळ्या ठिकाणी उपासना चालविण्यासाठी, परिचितांकडे राहण्यासाठी आणि काही स्थळे बघण्यासाठी मिळू शकणार होता. ऑक्सफर्ड सोडल्यानंतर ते प्रथमतः चेल्टनहॅम येथे रेव्ह. जोन्स जे. फिशर ह्यांच्याकडे एक आठवडा राहण्यासाठी गेले. तेथील बेंझ हिल् चर्चमध्ये रविवारी सायंकाळची उपासना त्यांनी चालविली. चेल्टनहॅम हे गाव त्यांना टुमदार व सुंदर वाटले. तेथे अँग्लो इंडियन व आय. सी. एस्. पेन्शनरांची वसाहत होती. नंतरच्या भ्रमंतीत ३१ जुलैला सेव्हन स्प्रिंगज् ह्या नावाने प्रसिद्ध असलेला टेम्स नदीचा उगम पाहिला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते कार्डिफला गेले. तेथे वेस्ट ग्रुव्ह चर्चमध्ये रविवारच्या सकाळ-संध्याकाळ अशा उपासना चालविल्या.

तेथे त्यांनी ब्राह्मसमाज ह्या विषयावर उपदेश केला. हा उपदेश नंतर इंग्रजीत पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. कार्डिफ येथील वास्तव्यात ते फ्रेडरिक चाईल्ड यांचे पाहुणे म्हणून राहिले. न्यूटन एबेट ह्या गावातील युनायटेड फ्री चर्चमध्ये १६ ऑगस्टच्या रविवारी सायंकाळी उपासना चालविली. अशा प्रकारे भ्रमंती करून ते लंडनला परत आले.

इंग्लंडहून हिंदुस्थानला परत येण्याच्या खर्चाबाबत मध्यंतरी उपस्थित झालेले विघ्न दूर झाले होते. युरोपमधील वास्तव्याचा काळ वाढल्याने लागणा-या अधिकच्या खर्चाची व्यवस्था झाली होती. आर्थिक अडचणींचा भार त्यांच्या मनावर राहिला नव्हता. परिषदेत वाचावयाचा निबंध त्यांनी लिहून आधीच पाठविला होता. ह्या सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे हे निर्वेध मनाने ऍमस्टरडॅमला निघू शकले.

३१ ऑगस्ट १९०३ रोजी सकाळी होबर्न येथून निघणा-या बोटीने इंग्लंडमधील प्रतिनिधी मंडळीही निघणार होती. शिंदे हेही त्यांच्यासमवेत या बोटीने निघाले. लंडनला व इंग्लंडला त्यांनी शेवटचा राम राम केला. जर्मन सीमधून प्रवास करून ही बोट ऍमस्टरडॅम येथे पोहोचली.

परिषदेस १ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. तो उन्हाळ्यातील एक आल्हाददायक दिवस होता. ऍमस्टरडॅमची शोभा याच दिवसात सर्वोत्तम असते. ऍमस्टरडॅमला उत्तर युरोपकडील व्हेनिस म्हटले जात असले तरी ते एक अतुलनीय शहर आहे. समुद्राच्या उच्छवासाच्या टप्प्यात सूर्यप्रकाशाने शोभिवंत दिसणारे रस्ते आणि रंगविलेली त-हेदार घरे, कितीएक कालव्यांची वर्तुळे असलेली ऍमस्टेल नदी आणि वृक्षांनी आच्छादित अनेकविध गल्ल्या या सा-यामुळे ऍमस्टरडॅम शहराला पूर्णपणे शोभा आलेली आहे. नदीच्या काठावरच्या सुंदर ऍमस्टेल हॉटेलात काही पाहुण्यांची व्यवस्था केली होती. विठ्ठल रामजी शिंदे येथेच उतरले होते.

परिषद
हॉल ऑफ द काँग्रेगेशन नावाच्या भव्य इमारतीत परिषदेचे काम सुरू झाले. येशू ख्रिस्त व अनेक ख्रिश्चन संतांची, त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या धर्मसुधारकांची व विचारवंतांची भव्य चित्रे तेथे लावलेली होती. १ सप्टेंबरला संध्याकाळी ओल्ड वॅलून चर्च ह्या फ्रेंच प्रॉटेस्टंट चर्चमध्ये रेव्ह. जे. व्हॉन लोयनेन मार्टनेट यांची डच भाषेतून अत्यंत प्रभावी उपासना झाली. या उपासनेनंतर फ्री काँग्रेगेशनच्या नेदरलँड कमिटीच्या वतीने प्रतिनिधींच्या स्वागताचा कार्यक्रम झाला. डॉ. वुर्ट हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आणि मि. ह्यूजेनहोल्ड यांनी इंग्लिश, जर्मन व फ्रेंच भाषांमधून विविध देशांतील प्रतिनिधींचे मनापासून स्वागत केले. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, हंगेरी, हिंदुस्थान आणि जपान ह्या प्रत्येक देशाच्या प्रतिनिधींपैकी एकेकाने उत्तरादाखल भाषण केले.१

डी हरव्होर्मिंग (दि रिफॉर्म) ह्या साप्ताहिकाने २९ ऑगस्ट १९०३ च्या अंकामध्ये म्हणजे परिषद सुरू होण्याआधी सर्व महत्त्वाच्या प्रनिनिधींची माहिती त्यांच्या छायाचित्रांसकट प्रसिद्ध केली होती. पाश्चात्त्य धर्तीचा पोशाख, मात्र डोक्याला फेटा असा विठ्ठल रामजी शिंदे यांचा फोटो त्यामध्ये छापण्यात आला व त्यांच्या जीवनातील चरित्रविषयक महत्त्वाच्या बाबी ग्रथित करणारा परिचय देण्यात आला. त्यांचे जन्मसाल, त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, हिंदू धर्मातील रूढीबद्दल त्यांच्या मनात निर्माण झालेले असमाधान, त्यांचा उदार धर्माकडे ओढा वगैरे बाबींचा त्यामध्ये मार्मिकपणे निर्देश केलेला असून लवकरच ते हिंदुस्थानात परत जाऊन धर्मप्रचाराचे कार्य सुरू करणार आहेत व प्रस्तुत परिषदेमध्ये हिंदुस्थानातील उदार धर्मासंबंधी विवेचन करणार आहेत असे नमूद केले आहे.

उदार धर्माच्या ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी एकंदर एक हजार प्रतिनिधी आले होते. त्यांपैकी सुमारे अडीचशे प्रतिनिधी अन्य देशांतील होते. प्रो. जे. ई. कार्पेंटर, प्रो. जाँ रेव्हील, प्रो. आर्मस्ट्राँग यांसारखे अनेक निष्ठावंत युनिटेरियन व नामवंत विद्वान आलेले होते. २ सप्टेंबर रोजी म्हणजे परिषदेच्या दुस-या दिवशी प्रो. क्रॅमर, आर्मस्ट्राँग, ब्रुइनिंग, होकार्ट, शिलर आणि त्याचप्रमाणे शिंदे यांची व्याख्याने झाली. न्यू रॉटरडॅम करंट ह्या डच वृत्तपत्राने इतर महत्त्वाच्या वक्त्त्यांच्या बरोबरीने शिंदे यांच्या व्याख्यानाचे संपूर्ण प्रतिपादन थोडक्यात ग्रथित करणारा सविस्तर वृत्तान्त दिलेला आहे.२

विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या व्याख्यानात अलीकडच्या काळात उदय पावलेल्या उदार सुधारक धर्मपंथाच्या स्वरूपाची माहिती देऊन वस्तुनिष्ठपणे विवेचन केले आहे. व्याख्यानाच्या प्रारंभी त्यांनी हिंदुस्थानातील पारंपरिक हिंदू धर्माचे स्वरूपही नेमकेपणाने विशद केले. “धर्म ही बाब प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणाची असल्यामुळे आस्थेवाईक मनुष्याचा खरा धर्म सर्वत्र सारखाच असणार व मनुष्याच्या सुधारणेबरोबरच धर्माच्या प्रगतीची दिशाही सारखीच असणार” ही गृहीत भूमिका नमूद करून त्यांनी असे विधान केले की, ह्या दृष्टीने पाहता पाश्चात्त्य देशांतील प्रसिद्ध विद्वान मनुष्यांनी हिंदू धर्माची तत्त्वे आणि आदर्श जितक्या मानाने समजून घेतलेले आहेत तितक्या मानाने पाश्चात्त्य देशातील धर्मशास्त्रवेत्यांनी घेतले नाहीत.

हिंदुस्थानातील नव्या आणि उदार धर्माच्या चळवळीचे वर्णन करण्यापूर्वी तेथील पुराण धर्माची स्थिती कशी आहे हे सांगणे आपल्याला अगत्याचे वाटते असे म्हणून हिंदुस्थानातील सनात हिंदू धर्माची ठळक वैशिष्ट्ये त्यांनी प्रारंभी नमूद केली. “मागे किंवा आता हिंदुस्थानामध्ये धर्मग्रंथाचे प्रामाण्य मानता येते, परंतु मृत भाषेतील या धर्मग्रंथाच्या अर्थाची ओढाताण पाहिजे तशी करता येत असल्यामुळे साधारण माणसाच्या मार्गामध्ये धर्मग्रंथाचा फारसा अडथळा येत नाही. उपासना ही एक स्थानिक बाब होऊन बसली आहे. म्हणजे काही विशिष्ट स्थळे आणि प्रतिमा ह्यांनाच महत्त्व आलेले आहे. प्राचीन काळापासून पवित्र मानली गेलेली क्षेत्रे आहेत. शहरोशहरी शृंगारलेली भव्य देवळे आहेत. इतकेच नव्हे तर घरोघरी देवघर म्हणून एक स्वतंत्र खोली असते व त्यामध्ये काही निवडक देवांचा देव्हारा असतो... पाश्चात्त्य देशातल्याप्रमाणे हिंदू धर्माची संघसंस्था (चर्च) कधीच बनलेली नाही.” हे सांगून ते म्हणाले, “हिंदू धर्म म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे व हल्ली त्याचे शासन आणि नियमन असंख्य जातींचा जो एक मोठा व्यूह बनलेला आहे त्याचे द्वारा होत आहे आणि त्याचा पाया आध्यात्मिक तत्त्वावर रचलेला नसून सामाजिक आणि कौटुंबिक हितसंबंधावर रचला आहे... हिंदुस्थानामध्ये ज्याचे खरे जुलमी साम्राज्य चालू आहे तो आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ ह्यांच्यापैकी कोणी नसून चालू वहिवाट हीच होय.”
 
ख्रिस्ती आणि महंमदी हे दोन धर्म बाहेरून आलेले आहेत त्यांचा कल साह्य करण्यापेक्षा जय मिळविण्याकडे विशेष असल्याने आध्यात्मिक बाबतीत ते काही करू शकले नाहीत. आत्म्याच्या खास उत्पत्तिस्थानात उगम पावून सर्व मनुष्यजातीचा जो एक साधारण धर्म निघणार आहे त्यातच हिंदू धर्माची शुद्धी व उद्धार होणार आहे, असे त्यांनी विधान केले व ह्या साधारण धर्माची वाट खुली करणारी हिंदुस्थानातील ब्राह्मसमाज ही एक मोठी वैभवशाली शक्ती आहे असे त्यांनी सांगितले व ब्राह्मधर्माचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांच्या थोरवीचे मार्मिक वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे, “त्याचा धर्म म्हणजे एक मत किंवा मनोवृत्ती नसे तर साक्षात जीवन होता व ते जीवनही सर्व बाजूंचे असे. राजकारण आणि आर्थिक अभ्युदय, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा ह्या सर्वांसाठी त्याचे जिणे, त्याचा प्रयत्न व त्याचे मरण ही घडली.” ब्राह्मसमाजात सत्य, न्याय व सहिष्णुता यांची एकवाक्यता आढळते. जगातील बहुतेक सर्व मुख्य धर्मग्रंथांत आपल्या सनातन धर्माची बीजे आढळतात हे राजा राममोहन रॉय यांना आढळून आले. जगातील सर्व पवित्र वाङ्मय ही देवाने दिलेली सामाजिक देणगी मानावे असे ब्राह्मधर्माचे एक तत्त्व आहे. ब्राह्म हा सदैव स्वतःच्या विवेकशक्तीचा उपयोग करीत असतो. धर्माध्ययनाच्या सर्व क्षेत्रांत तो आधुनिक शोधाचे महत्त्व मानतो. त्याचे शास्त्र व त्याचा धर्म (विवेक आणि विश्वास) यांच्यामध्ये विरोध निर्माण होत नाही. अथवा ही दोन्ही एकमेकांपासून फटकून वागत नाहीत. ब्राह्मांच्या जाणिवेचा मुख्य उगम आणि आधार हा चैतन्यच असतो; त्यांचे मन नव्हे. धर्माच्या बाबतीत भाव आणि भक्ती ही तत्त्वे प्रधान वाटतात. ब्राह्म धर्माचा आणखी एक विशेष सांगताना शिंदे म्हणाले, पूर्ण ब्राह्म व्हावयाचे तर नुसत्या विचाराने किंवा मनोवृत्तीच्या द्वारे होता येणार नाही. प्रथम स्वतःला व नंतर जगाला प्रत्यक्ष सेवा करून आपल्या धर्माची प्रतीती दाखवावयाची असते.

ब्राह्मधर्माच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना ब्राह्म हा आपल्या तत्त्वाशी तडजोड करून कर्मठ लोकांशी जुळवून घेण्याची भूमिका पत्करीत नाही. मूर्तिपूजा आणि विधीचे अवडंबर ह्याचे दुर्भेद्य कवच फोडून आत अडकून राहिलेले धर्मबीज मोकळे करण्याचा त्याचा प्रयत्न अखंडपणे सदैव चालू असतो. मात्र स्वतःच्या मताचा दुस-यावर जुलूम किंवा आग्रह करण्याचा ब्राह्माचा प्रयत्न नसतो. जड शास्त्रांचा अतिशयित नकार आणि धर्मशास्त्रांचा अतिशयित होकार ह्या दोहोंचा अढथळा धर्ममार्गात सारखाच येतो हे ब्राह्म ओळखून असतो. ब्राह्म हा जखडबंद पंथ नाही. ब्राह्मसमाजाची द्वारे सर्वांना सर्व काळ खुली असतात.

हिंदुस्थानात शंभराहून अधिक समाज आहेत हे सांगून ब्राह्मसमाजाचे कार्य कसे चालते याची त्यांनी माहिती दिली. ब्राह्मसमाजात धंदेवाईक पुरोहित नसतात. समाजातील प्रमुख गृहस्थ उपासना चालवितात. जातिभेद नाहीसा करणे, स्त्रीशिक्षण वाढविणे, बालविवाह बंद करणे, विधवाविवाहाची आडकाठी काढणे ह्या सामाजिक सुधारणांचा ब्राह्ममंडळी नेटाने पुरस्कार करतात. अशा प्रकारे माहिती सांगून व विवेचन करून ब्राह्मधर्माचे स्वरूप त्यांनी विशद केले. निबंध केवळ नुसताच न वाचता त्यामध्ये ते अधूनमधून भर घालीत होते. ब्राह्ममंदिर कसे असते, तेथील वेदी कशी असते इत्यादी माहितीही त्यांनी विवेचनाच्या ओघात सांगितली.

त्यानंतर शिंदे यांनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी ह्या अन्य दोन उदार धर्मपंथांचा परिचय करून दिला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये आर्यसमाजाची स्थापना केली. चार वेदांचे प्रामाण्य ही एक बाब वगळली तर मूर्तिपूजेचा निषेध, ईश्वराचे एकत्व व शुद्ध स्वरूप आणि सामाजिक सुधारणेची सर्व अंगे ह्या बाबतीत ब्राह्माइतकीच जोरदार व प्रांजळ भूमिका ते घेतात.

पंचवीस वर्षांच्या अल्पशा अवधीत विचार, संघटना आणि प्रचार या बाबतीत आर्यसमाजाने आश्चर्यकारक प्रगती केली असून हल्ली दोनशे पन्नास आर्यसमाज आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

हिंदुस्थानातील तिसरा उदार धर्मपंथ म्हणजे थिऑसॉफिकल सोसायटी. अमेरिकेत उगम पावलेल्या या चळवळीचे हिंदुस्थान हे मुख्य ठाणे झाले आहे. अनेक धर्मातील मंडळींनी ह्या चळवळीत प्रवेश केला आहे. या पंथातील गूढवादाच भाग वगळल्यास काशी येथील सेंट्रल हिंदू कॉलेज, मद्रासमधील पारिया ह्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतील मुलांकरिता काढलेल्या शाळा हे त्यांचे प्रयत्न आदरणीय आहेत, असे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानातील ह्या तिन्ही चळवळींपैकी ब्राह्मसमाजाची दिशा प्रस्तुत युनिटेरियन महासभेच्या धोरणाला अगदी अनुकूल वाटते असा अभिप्राय शिंदे यांनी प्रकट केला. पुढील काळात हिंदुस्थानातील अन्य दोन्ही चळवळींशी आमचे ऐक्य होईल अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. भावी काळामध्ये होणारे युद्ध हे अमुक वाद व तमुक धर्म यांमध्ये नसून एकापक्षी सर्व जुन्या धर्माची शुष्क हाडे व दुस-यापक्षी धर्माचे रसभरित व उचंबळणारे जीवन यांमध्ये होणार आहे आणि प्रस्तुत महासभा (कौन्सिल) ही आगामी युगाची मोठी पताका आहे, असा विश्वास व्याख्यानाच्या अखेरीस त्यांनी प्रकट केला. सर्व उदार धर्म परस्परांच्या जवळ यावेत व समान उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्या सर्वांनी प्रगती साधावी ही कळकळच त्यांच्या बोलण्यातून प्रकट झाली.

ही परिषद अत्यंत यशस्वी झाली या प्रकाराचे अभिप्राय सर्वच युनिटेरियन वृत्तपत्रांनी नमूद केले. दि इन्क्वायररच्या संपादकांनी “उदार धर्मविचाराच्या मंडळींना परिषदेमुळे प्रोत्साहन मिळाले. धर्मविषयक प्रश्नांना काहीएक नवी अंतर्दृष्टी मिळाली” असा स्वतःचा अभिप्राय नमूद केला. प्रो. जाँ रेव्हील यांनी ला प्रोतस्तंत ह्या वृत्तपत्रात परिषदेचे फलित नमूद केले. “परिषदेचे उद्दिष्ट कुणा एका पंथाचे हित बघणे नव्हे तर सर्व उदार पंथांना नैतिक आणि धार्मिक तत्त्वांच्या अनुरोधाने एकत्र आणणे हे असून कर्मठ धर्ममताच्या असहिष्णुतेच्या विरोधात उभे राहण्याचा आत्मविश्वास तिने निर्माण केला.”३ डॉ. एच्. एच्. वुर्ट यांनी लिहिलेल्या लेखमालेच्या अखेरीस “अनेक विद्वानांत मतभेद दिसून आला तरी एकोप्याला बाधा आली नाही. सत्याची आणि बंधुत्वाची भावना अनुभवाला येत होती” असे मत प्रकट केले.४ डी हरव्होर्मिंगच्या संपादकांनी म्हटले, “जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले प्रतिनिधी पाहता उदार धर्मजीवनाचा प्रवाह किती बळकट आहे याची जाणीव झाली.”५

कर्मठ धर्ममताच्या मंडळींकडून या परिषदेवर टीका होणे हेही स्वाभाविक होते. दि तीज् (De Tijd) हे ऍमस्टरडॅम येथील त्या वेळचे कॅथॉलिक वृत्तपत्र उदारमतवादी आणि लोकशाहीवादी विचारांच्या विरोधात होते. २ सप्टेंबर १९०३च्या अंकामध्ये ‘बरळणा-या जिव्हा’ (Bebel of tongues) या शीर्षकाचा प्रतिकूल लेख लिहिलेला असून लेखाच्या अखेरीस म्हटले आहे, “येथे जी व्याख्याने झाली ती एक प्रकारची बरळ होती. सर्व ख्रिश्चन श्रद्धा ह्या बांधून ठेवणा-या अंधःश्रद्धा आहेत म्हणून फेकून देणे, सर्व सनातन परंपरांवर भ्रमाचे जंजाळ म्हणून शिक्का मारणे, श्रद्धेची परिभाषा ही रास्त विश्वासाला नष्ट करणारी आहे असे समजून तिचा तिरस्कार करणे, कोणत्याही श्रद्धेशिवाय ख्रिश्चॅनिटीची शिकवण देणे आणि परंपरा मान्य न करता फक्त ख्रिश्चन हे नाव तेवढे पत्करणे ह्यामुळे हे आधुनिक धर्मवेत्तेदेखील अडचणीत येतात ह्यात नवल ते काय. अनेक प्रकारच्या विसंगती ह्या सत्य म्हणून कशा बरे पत्करता येतील? ख्रिस्ताचे दैवीपण नाकारणे; ख्रिस्ती धर्माची उलथापालथ करणे; ख्रिस्ती धर्मकल्पना समाजातून आणि लोकांच्या अंतःकरणातून हद्दपार करणे आणि तरीही ख्रिश्चन म्हणवून घेणे हा दिशाभूल करणारा दांभिकपणाच नव्हे काय? ह्या वृत्तपत्राच्या पुढील ३ व ५ सप्टेंबरच्या अंकांतही परिषदेवर टीका असली तरी तिचा चांगला वाटणारा भागही त्यांनी मान्य केला आहे. ५ सप्टेंबरच्या अंकात, “हे सगळे असले तरी त्यामध्ये आपल्या हृदयाला आणि आत्म्याला हात घालणारा असा काही भाग आहे. शेकडो विद्वान जमलेले असताना दैवीपणाबद्दल जरी आदर दाखविला नाही तरी ख्रिश्चन धर्मामध्ये असलेल्या अतिमानवी श्रेष्ठतेसाठी ख्रिश्चन ही संज्ञा वापरणे यात त्यांच्या आदराच्या भावनेचा पुरावा मिळतो. अश्रद्धेला आणि अश्रद्ध माणसांना ते थारा देत नाहीत आणि ढोबळ भौतिकवाद्यांना अशास्त्रीय असे जाहीर प्रमाणपत्र देतात ही समाधानाची बाब आहे.” लेखाच्या अखेरीस मात्र संपादकाने शापवाणीच उद्गारली. त्यांनी ह्या युनिटेरियन लोकांबद्दल म्हटले आहे, “ह्या दुराग्रही लोकांबद्दल परमेश्वर दैवी न्याय करीलच. सामान्य, नम्र आणि साध्या माणसांना परमेश्वर जे प्रकट करील ते या दुराग्रही लोकांपासून मात्र लपवून ठेवील.”६

कर्मठ धर्ममताचा कडवेपणा कसा प्रकट होतो हे शिंदे यांना या परिषदेच्या निमित्ताने चांगलेच ध्यानात आले असणार.

डी हरहोर्मिंगच्या १२ सप्टेंबर १९०३च्या अंकात परिषदेचे अध्यक्ष प्रो. वुर्ट यांचा संपूर्ण परिषदेचे सिंहावलोकन करणारा एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. ह्या लेखामध्ये परिषदेतील कोणते प्रसंग विशेषत्वाने अधिक ठसले याचे त्यांनी काव्यमय निवेदन केले आहे. ह्यामध्ये शिंदे यांच्या प्रभावी भाषणाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. ते म्हणतात, “प्रो. फ्लेडरर हे हारलेम्स स्ट्रीटवरील परिषदेच्या सभागृहात ज्या वेळेला पटवून देत होते की, हारनॅक यांचे मूळ ख्रिश्चन धर्माचे विश्लेषण किती दूरदर्शीपणाचे होते, त्या वेळचा त्यांचा जर्मन ठसक्याचा आवाज माझ्या कानात अजूनही घुमत आहे. रेखीव चेहरेपट्टीचा, मजेदार फेटा बांधलेला सुसंस्कृत हिंदू तरुण माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा उभा राहतो आणि तो ज्या वेळेला आपल्या देशामध्ये धार्मिक उपासना कशा चालतात; बायबल, वेद, कुराण यांसारखे धर्मग्रंथ व्यासपीठावर कसे असतात, तसेच तेथे क्रूस, चंद्र आणि विष्णूचे प्रतीक कसे असते व ते एकाच अनंतत्वाच्या वर्तुळामध्ये एकात्म कसे होतात ह्याबद्दल सांगत होता, त्या वेळचा त्याचा आवाज मला पुन्हा ऐकू येत आहे.”७

ऍमस्टरडॅमच्या परिषदेत अनेक मान्यवर निष्ठावंत, विद्वान युनिटरियन बोलले. त्यामध्ये शिंदे यांचे गुरू जे. ई. कार्पेंटर होते. पॅरिसमध्ये शिंदे ज्यांना आवर्जून भेटले ते प्रो. जाँ रेव्हील होते. लिव्हरपूल येथील डॉ. आर. के. आर्मस्ट्राँग, बेल्जियमचे जेम्स होकार्ट, बोस्टनचे डॉ. एस. के. इलियट आणि ऍमस्टरडॅमचे प्रो. एस. क्रॅमर, प्रो. ए. ग्रोनिंग इत्यादी ज्येष्ठ विचारवंत, धर्मनिष्ठ मंडळी होती. त्यांच्यासमवेत बोलण्याची, आपले विचार मांडण्याची संधी विठ्ठल रामजी शिंदे यांना मिळाली आणि विशेषतः अलीकडील दोन वर्षांत त्यांनी हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम इत्यादी पारंपारिक धर्माचा आणि युरोपमधील युनिटेरियन व भारतातील ब्राह्मसमाज, आर्यसमाज, थिऑसॉफी इत्यादी सुधारक धर्मपंथांचा जो व्यासंग केला होता, जे चिंतन केले होते ते त्यांनी आपल्या भाषणातून प्रगल्भपणे, स्पष्टपणे आणि निर्भीडपणे मांडले. शिंदे यांचा निबंध, त्यांनी दिलेले व्याख्यान व त्यांचा परिषदेतील वावर ह्या सा-याच गोष्टी प्रभावी ठरल्या असे वृत्तपत्रांत आलेल्या त्यांच्या भाषणाच्या सविस्तर वृत्तान्तावरून तसेच परिषदेचे अध्यष प्रो. वुर्ट यांनी त्यांच्यासंबंधी जो खास उल्लेख केला त्यावरूनही दिसून येते.

ह्या आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषदेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ब्राह्मसमाजाने विठ्ठल रामजी शिंदे यांची जी निवड केली होती ती सर्वथैव योग्य होती याचा प्रत्यय शिंदे यांनी दिला.८
संदर्भ
१.    दि इन्क्वायरर, लंडन, १२ सप्टेंबर १९०३.
२.    न्यू रॉटरडॅम करंट, अँमस्टरडॅम, ३ सप्टेंबर १९०३.
३.    दि इन्क्वायरर, लंडन, १९ सप्टेंबर १९०३.
४.    न्यू रॉटरडॅम करंट, अँमस्टरडॅम.
५.    डी हरव्होर्मिग, अँमस्टरडॅम, १२ सप्टेंबर १९०३.
६.    दि तीज्, अँमस्टरडॅम, ५ सप्टेंबर १९०३.
७.    अँमस्टरडॅम येथील तरुण संशोधक व्हॅन ह्यूब वेर्ख (Van Hub Versch) यांनी प्रस्तुत परिषदेचे डच वृत्तपत्रात आलेले सगळे संदर्भ अँमस्टरडॅम येथील त्या त्या वृत्तपत्राच्या कचेरीत प्रस्तुत लेखकास नेऊन दाखविले. तसेच सर्व आवश्यक संदर्भ निवडून त्याचे इंग्रजीत भाषांतर करून प्रस्तुत लेखकास उपलब्ध करून दिले.
८.    विठ्ठल रामजी शिंदे, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १५५-१६०. शिंदे यांच्या भाषणातील अवतरणे व प्रतिपादन त्यांनी स्वतः मराठीत केलेल्या त्यांच्या वरील अनुवादातून घेतले आहे.