१८९८ हे वर्ष विठ्ठलरावांच्या जीवनात अंतःस्थ खळबळीचे तसेच बाह्य उलाढालींचे गेले. सार्वजनिक काम प्रत्यक्षात कसे सुरू करता येईल याबद्दल गंभीरपणे त्यांची वाटाघाट आपल्या मित्रांसमवेत चालाली होती. वैवाहिक जीवनामध्ये पडलेला नाजूक पेच कसा सोडवावा ह्या विचाराने त्यांच्या मनामध्ये खळबळ माजून राहिली होती व त्यांचे अंतःस्थ भावजीवन ढवळून निघाले होते. लौकिक जीवानातील या प्रश्नाइतकाच आध्यात्मिक जीवनातील प्रश्न निकराचा होऊन बसला होता व प्रार्थनासमाजाची रीतसर दीक्षा घेऊन तो प्रश्न त्यांनी अखेरीस मनासारखा सोडविला.
आदल्या वर्षी बी. ए. च्या परीक्षेला बसून विठ्ठलरावांना अपयश पदरी घ्यावे लागले होते. परीक्षेचा तोच अभ्यास १८९८ मध्ये करणे त्यांना भाग पडले. एक तर सतत नवे वाचावे, नव्या विचारांचा परिचय करून घ्यावा ही उत्कंठा असणा-या विठ्ठलरावांना तीच ती अभ्यासाची जुनी पुस्तके डोळ्यांसमोर धरणेही तिटका-याचे वाटत असणार. परंतु एकदाची या परीक्षेच्या फे-यातून सुटका करून घेणे भाग असल्यामुळे त्यांनी अभ्यास करून मुंबई विश्वविद्यालयाची ही परीक्षा दिली. विठ्ठलरावांना एकदा इंटरमीजिएटच्या परीक्षेत व त्यानंतर बी.ए.च्या परीक्षेत असे दोनदा अपयश पचवावे लागले होते. ह्या अपयशामुळे व्यावहारिक पातळीवरून त्यांना दुःख वाटले असले तरी त्यांचा स्वतःबद्दल वाटणारा खोलवरचा आत्मविश्वास अभंग राहिला होता. उलट विश्वविद्यालयाच्या परीक्षेच्या चढाओढीच्या पद्धतीचा त्यांना तिटकारा आला होता. अशा पद्धतीने जे स्कॉलर ठरतात ते पुढील आयुष्यक्रमात मोठ्या विद्वतेची कामे करताना दिसत नाहीत हे त्यांना जाणवत होते. त्याचे कारणही त्यांनी नमूद केले आहे. “याचे कारण ऐन तारुण्यात त्यांची अनैसर्गिक पिळवणूक होऊन ते खच्ची होतात. नुसत्या शर्यतीने कोण विद्वान होईल? विद्वता हा नैसर्गिक विकास आहे. शर्यतीचे घोडे आणि औताचे घोडे यांची तुलना केली तर अश्वशक्ती (Horse Power) कुणाची व का जास्त असते हे कोळून येईल.”१ बी.ए. परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर तर परीक्षापद्धतीबद्दलची ही घृणा त्यांच्या मनामध्ये दाटून आली. शेवटचा पेपर संपल्यावर युनिव्हर्सिटीच्या पटांगणावरील भिंतीवर बसून युनिव्हर्सिटीच्या राजाबाई टॉवरकडे ते पाहत होते. हा टॉवर त्यांना प्राचीन बाबिलोनिया शहरातील बॉल मरढॉक नावाच्या उग्र देवतेचा पुतळाच भासला. त्या पुतळ्याच्या हातात एक तापलेला लाल तवा असून गावातील मातांनी आपल्या प्रथम जन्मलेल्या मुलास त्यात टाकून आहूती देण्याची चाल होती. तशीच चाल ह्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेच्या खाईत आपला पोटच्या पोरास होरपळून काढण्याची आहे अशी त्यांची त्या वेळी झालेली कटू आणि जहाल भावना त्यांनी नमूद केली आहे.
१८९८ सालात अखेरीस बी. ए. ची परीक्षा विठ्ठलराव पास झाले. कायद्याच्या पेपरामध्ये फर्स्टक्लासचे मार्क पडून फर्स्ट एल्. एल्. बी. ही परीक्षाही ते पास झाले.
संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ १०९.