विठ्ठलरावांचा वस्तुतः कल तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे असल्यामुळे बी. ए. मध्ये ऐच्छिक विषय तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्र (लॉजिक आणि मॉरल फिलॉसॉफी) हे विषय घेणे स्वाभाविक ठरले असते. परंतु त्यांनी इतिहास आणि कायदा हे विषय ऐच्छिक म्हणून घेतले. आपल्या आवडीचे विषय त्यांना सोडून द्यावे लागले ह्याची सबळ कारणे होती. इंटरमीजिएटच्या परीक्षेत पहिल्या वेळी त्यांना नापास व्हावे लागले होते आणि तेही त्यांना आवडणा-या तर्कशास्त्र ह्या विषयात. त्यामुळे आपण आपल्या आवडीचे लॉजिक आणि मॉरल फिलॉसॉफी हे विषय घेऊन बी. ए. ची परीक्षा पास होऊ अशी त्यांना खात्री वाटत नव्हती. बी. ए. ला कायदा हा विषय घेऊन त्या पेपरमध्ये शेकडा साठपेक्षा जास्त मार्क मिळाल्यास फर्स्ट एल्. एल्. बी. ची परीक्षा पास झाली असे गणण्यात येत असे. दुसरे असे, की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःला कुठेही सरकारी नोकरीत अडवून न घेता सार्वजनिक कार्यात पडावे असा त्यांचा इरादा होता. त्यासाठी स्वतंत्रपणे वकिली करणे श्रेयस्कर होते. केवळ या व्यावहारिक कारणामुळे तत्त्वज्ञान हा विषय त्यांना सोडून द्यावा लागला होता, याची टोचणी त्यांच्या मनाला लागून राहिली होती. २ एप्रिल १८९८च्या रोजनिशीमध्ये विठ्ठलरावांनी जी.एच. लेविस याच्या हिस्टरी ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथातील काही उतारे लिहून त्यावर स्वतःचे थोडेफार भाष्य केले आहे. अखेरीस ते म्हणतात, “अरेरे! माझा आवडता विषय तात्त्विकशास्त्र हा सोडून मी ऐच्छिक विषय इतिहास व कायदा हे घेतले ही मी केवढी चूक केली! डेक्कन कॉलेजात २-३ वर्षे अध्ययन करून शेवटी मी बी. ए. ला नापास झालो तरी बरे. पण मागच्याच वर्षीचा इतिहास आणि तो घाणेरडा कायदा पुन्हा वाचून (केवळ पोकळ पदवीसीठी!) अखेर विद्याक्रम आटपावयाचा म्हणजे मला फार वाईट आहे!! कसेही करून ह्या युनिव्हर्सिटीचा एखादा शिक्का घेऊन हिच्या कष्टमय कचाट्यातून सुटावे असे मला वाटत होते व आहे. पण माझे आवडते विषयच माझे ऐच्छिक विषय घेऊन मी पास होईन असे मला धैर्य त्या वेळी आले नाही हे किती कमनशीब अथवा नामर्दाई. आवडीपेक्षा सोयीला अधिक मान दिला याबाबत हे फार खडतर शासन झाले.”१ रोजनिशीच्या ह्या नोंदीतच कॉलेजात न जाण्याचे सबळ कारण म्हणजे “माझ्या प्रिय जनाक्काचे शिक्षण व तिजसंबंधी माझी महत्त्वाकांक्षा” असल्याचे नमूद करून त्यात आपल्याला मनाजोगती सिद्धी मिळाली तर हे शासन सोसोण्यास अगदी तयार आहोत असेही त्यांनी नमूद केले आहे. कायदा ह्या विषयावरील व्याख्याने डेक्कन कॉलेजात होत होती. त्या वेळी विठ्ठलराव हे जनुभाऊ करंदीकर, माधवराव हुल्याळ ह्या मंडळींसोबत शनिवारातल्या जमखंडीकरांच्या वाड्यात राहत होते. तेथून फर्ग्युसन कॉलेजात जाऊन तेथून डेक्कन कॉलेजात आठवड्यातून दोन वेळा पायी जावे लागत. टांग्याचे जबर भाडे परवडत नसल्यामुळे व त्या काळी सायकलीचा सुळसुळाट झाला नसल्याने विठ्ठलरावांना पावसाळ्यात ‘भिजत’ आणि उन्हाळ्यात ‘शिजत’ एवढा मोठा पल्ला गाठावा लागत असे. परंतु एवढे अंतर पायी चालण्याचे त्यांना काही वाटत नसे. संगमावर होडी चालू असे. तीत बसून शेतावर जाता येत असे. तिथून डेक्कन कॉलेजात जाण्यास एक जवळची वाट होती. एकदा तर असे झाले, की त्यांना कॉलेजवरून परत निघण्यास रात्र झाली आणि होडी बंद झाली होती. तेव्हा विठ्ठलरावांची धाडशी वृत्ती उफाळून आली. अंगावरचे सारे कपडे डोक्याला गुंडाळून ते पोहत संगमावर आले. विठ्ठलरावांच्या मित्रमंडळींना मात्र त्यांच्या धाडसाचे फार आश्चर्य वाटले.
१८९७ मध्ये पुण्यास प्लेगचा कहर सुरू झाला. शाळा-कॉलेजे बंद झाली. विठ्ठलरावांना मुंबई बी. ए. ची परीक्षा द्यावयास जावे लागणार होते. म्हणून घरच्या मंडळींस त्यांना जमखंडीस घेऊन जावे लागले. या सुमारास मुंबईस हिंदू-मुसलमानांचा दंगा सुरू झाला होता. लोकमान्य टिळकांनी पुण्याला सार्वजनिक गणपतीचा उत्सव राष्ट्रीय पायावर सुरू केला. म्हणून सार्वजनिक जीवन अशांत झाले होते. पुण्यात प्लेगचा उपद्रव जोरात सुरू झाला होता व प्लेगच्या बंदोबस्तासाठी इंग्रज सरकारने सुरू केलेल्या उपाययोजनेचा उपसर्ग तर लोकांना जास्तच होत होता. स्वच्छतेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज सरकारने पठाण व बलुची लोक बाहेरून बोलावले होते. तेव्हा या पठाण व बलुची लोकांना राहण्यासाठी त्यांना जमखंडीकरांचा वाडा मोकळा करून देण्याचा हुकूम झाला व तो रिकामा करून देणे भाग पडले. १८९७च्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याहून सर्वजण जमखंडीला गेले. विठ्ठलराव तिथूनच बी. ए. ची. परीक्षा देण्यासाठी मुंबईस गेले. परंतु एकंदरीतच दंगे, उत्सव, प्लेग इत्यादी कारणांमुळे वर्षभर वातावरण अस्वस्थ रहिले. ह्या धामधुमीत विठ्ठलरावांच्या अभ्यासाची आबाळ झाली. ते आणि त्यांचे बरेचसे मित्र १८९७ साली बी. ए. परीक्षेत नापास झाले. १८९८ मध्ये पुन्हा बी. ए. च्या परीक्षेचा अभ्यास करणे त्यांना भाग पडले. ठरावीक अभ्यासक्रमाची जरी त्यांना शिसारी आली होती तरी त्यांच्या विचाराच्या व विकासाच्या चक्राची गती मुळीच मंदावली नव्हती.
विठ्ठल रामजी शिंदे यांनी मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास होऊन जमखंडीहून कॉलेज शिक्षणासाठी १८९३ मध्ये आल्यापासून १८९८ पर्यंतची सहा वर्षे पुण्यात काढली. ह्या अवधीत त्यांचा स्वतःचा प्रार्थनासमाजाकडे ओढा निर्माण होऊन प्रार्थनासमाजाची त्यांनी रीतसर दीक्षा घेतली. त्यांची बहीण जनाबाई हिच्या इंग्रजी शिक्षणाची सोय लागली. ते स्वतः बी. ए. परीक्षा पास होऊन एल्. एल्. बी. च्या अखेरच्या दोन वर्षांचा अभ्यास करण्यास पात्र ठरले. आपण पुढील आयुष्यात सामाजिक कार्य करावे अशी प्रेरणाही त्यांच्या ठायी ह्या काळातच निर्माण झाली. विठ्ठलरावांच्या आयुष्यावर अनुकूल परिणाम करणा-या महत्त्वाच्या घटना पुण्यामध्ये घडल्या, ही वस्तुस्थिती असली तरी पुण्यामध्ये विठ्ठलरावांचे व्यक्तिमत्त्व घडण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की, विठ्ठलराव पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाशी कधी समरस होऊ शकले नाहीत. पुण्यामध्ये ते सदैव परकेच राहिले.
पुण्यामध्ये ते आले त्या वेळेलाच त्यांच्या मनाची धारणा चांगल्या प्रकारे झालेली होती. घरातील संस्कारामुळे वारकरी संप्रदायाच्या उन्नत धर्मविचाराचा संस्कार त्यांच्या मनावर झाला होता व त्यांची जातिभेदातीत अशी उदारमतवादी सामाजिक भूमिका तयार झाली होती. त्या काळात पुण्यातील वातावरण असे होते की, पुण्यात बघितलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींबाबत त्यांच्या मनाचा मेळ बसण्याऐवजी सामान्यतः प्रतिकूलतेचीच भावना निर्माण होताना दिसते. पुण्याशी घडणा-या ह्या विसंवादातून विठ्ठलरावांच्या व्यत्किमत्त्वाचा प्रगल्भपणा ठळकपणाने जाणवतो.
महात्मा जोतीबा फुले ह्यांनी १८४८ मध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली व १८५१ मध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा उघडली. महात्मा फुले ह्यांचे अस्पृश्यांसाठी सुरू केलेले काम युगप्रवर्तक स्वरूपाचे होते. परंतु १८५६ नंतर अस्पृश्यांच्या शाळेचे काम आपले सहकारी गावंडे, वाळवेकर, परांजपे या सहका-यांवर सोपवून त्यांना बाहेर पडावे लागले. कालांतराने हे शाळेचे काम बंद पडले. १८७० नंतर न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्याच्या सामाजिक जीवनामध्ये प्रवेश केला. सार्वजनिक सभेच्या द्वारा शेतक-यांवर होणा-या अन्यायाची दाद लागावी यासाठी प्रयत्न केले व सार्वजनिक सभेचे काम नावारूपाला आणले. परंतु बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला तो मुळी रानडे आणि त्यांच्यासारखे मवाळ ह्यांना विरोध करण्याचा पवित्रा घेऊनच. टिळकांनी हरएक प्रयत्न करून रानड्यांच्या वर्चस्वाखाली असलेली सार्वजनिक सभा स्वतःच्या ताब्याखाली आणली व शिवरामपंत परांजपे यांना सार्वजनिक सभेचे चिटणीस केले.
महात्मा जोतीबा फुले यांनी १८७३ मध्ये ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. बहुजन समाजामध्ये थोड्याफार प्रमाणात त्यांचे कार्य चालले होते. परंतु जहाल राष्ट्रवादी विचारसरणीच्या चिपळूणकरांसारख्यांच्या विरोधामुळे शिकलेल्या वर्गात त्यांचा प्रभाव पडला नाही. फुल्यांच्या व्यापक विचारसरणीकडे दुर्लक्ष होऊन फुले ब्राह्मणविरोधातच काम करतात अशा प्रकारचा त्यांच्याबद्दलचा ठसा उमटविला गेला. फुल्यांनंतर अस्पृश्यवर्गात शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने खेड्यापाड्यांत शाळा व वसतिगृहे चालवण्याचा उपक्रम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बारामतीचे रामचंद्र अण्णाजी कळसकर हे होत. खेडेगावात आणि अस्पृश्य मानलेल्या लोकांत शिक्षणप्रसाराचे कार्य करणारी त्या काळात अस्तित्वात असलेली एकमेव संस्था कळसकर हे चालवीत होते. प्रथमतः त्यांनी १८८५च्या सुमारास ‘वांगी व्हिलेज एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था स्थापन करून आपल्या कार्याला प्रारंभ केला. नंतर तिचे ठाणे बारामती येथे हालवून संस्थेचे रूपांतर ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ असे केले. ह्या सोसायटीच्या कळस, अकोले, काजळ, मेघळी, कटफळ, बारामती ह्या गावी एकंदर आठ शाळा चालविल्या जात होत्या. त्यांपैकी सहा निव्वळ मराठी शाळा वरील खेड्यांत चालविल्या जात होत्या. एक इंग्रजी व एक उद्योगशाळा बारामती येथे चालविली जात होती. ह्या आठ शाळांपैकी पाच अतिशूद्रांसाठी होत्या व त्यामधून १४६ विद्यार्थी १८९८च्या सुमारास शिकत होते. न्या. रानडे ह्यांचे संस्थेस मार्गदर्शन व साह्म असे. परंतु दुष्काळाच्या तडाख्यात ह्या संस्थेचीही आर्थिक स्थिती बिकट झाली होती. न्या. रानडे यांच्याप्रमाणेच अन्य प्रार्थनासमाजीयांची कळसकरांच्या कार्य़ाला सहानुभूती व प्रोत्साहन असे.२ संस्थेला मदत करावी अशी वारंवार आवाहने सुबोधपत्रिकेमधून पुढील पंधरा-एक वर्षे तरी केलेली आढळतात.
१८९८ ह्या वर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना बी. ए. च्या परीक्षेला पुन्हा बसण्याची पाळी आली होती. अभ्यासाची तीच तीच पुस्तके डोळ्यांसमोर धरण्याचा त्यांना तिटकारा आला होता. न वाचलेल्या विषयावरची पुस्तके वाचावीत; नवीन ज्ञान मिळण्याच्या अपेक्षेने व्याख्याने ऐकावीत; ताजी नियतकालिके, वृत्तपत्रे वाचावीत व त्यातून आपल्या विचारासाठी खाद्य मिळवावे हे विठ्ठलरावांना अधिक रूचत होते. त्यांनी १८९८-९९ मध्ये लिहिलेल्या रोजनिशीत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुण्याची शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अवस्था कोणत्या प्रकारची होती; ह्या विविध क्षेत्रांत संस्था कोणत्या प्रकारची भूमिका ठेवून कार्य करीत असत याबद्दलची माहिती येते, त्याचप्रमाणे बघितलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींबाबत विठ्ठलराव स्वतःच्या प्रतिक्रियाही प्रकट करताना आढळतात. त्यांच्या या प्रतिक्रियांवरून खास पुणेरी मंडळींहून त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक एवढेच नव्हे तर धार्मिक बाबतीतही दृष्टिकोण वेगळा होता; पुणेरी मंडळींच्या भूमिकेच्या विरुद्ध स्वरूपाचा होता असे जाणवते. कोणत्याही बाबतीत मत बनविताना प्रभावी मताचे त्याचप्रमाणे तथाकथित विभूतींचे दडपण त्यांच्या मनावर पडत नाही. उलट मोठ्या समजल्या जाणा-या माणसांचेही स्वतंत्रपणाने ते मूल्यमापन करतात. ह्या सगळ्या प्रतिक्रियांतून विठ्ठलरावांच्या मताचा स्वतंत्रपणा आपणास जाणवत राहतो.
ह्या वर्षी अभ्यासक्रमाबाहेरचे त्यांचे वाचन उत्साहाने चाललेले होते. तत्त्वज्ञान हा त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिला नसतानाही लेविसच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचे ते मन लावून वाचन करतात. मराठेशाहीच्या अवनतीचे खापर एका बाजीच्या माथी न फोडता सर्व महाराष्ट्रीय त्याला जबाबदार असल्याचे सांगून आपली ऐतिहासिक दृष्टी व निःपक्षपातीपणा प्रकट करतात. प्रो. बेनच्या अर्थशास्त्रावरील पुस्तकाच्या विविध अंगांवर ते अभिप्राय देतात. त्यांना पसंत पडलेल्या भागाचे कौतुक करतात. परंतु प्रो. बेनची सोशॅलिझमवरची टीका त्यांना मंजूर नाही. भांडवलशाहीचा अतिरेक व मजूरवर्गाची उपेक्षा यांच्याविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून सोशॅलिझमची बाजू सर्वांनी उचलून धरावयास पाहिजे असे त्यांना वाटते. डेव्हिड लिव्हिंगस्टनचे चरित्र वाचून त्याचा दृढ निश्चय, स्वीकृत कार्यावरील निष्ठा इत्यादी नैतिक गुणांनी ते भारावून जातात. प्रत्यक्ष अनुभवाचा आधार नसलेल्या व केवळ कल्पनेने निर्माण केलेल्या पोतळ कादंब-यांचे वर्णन “घरकोंबड्या कादंबरीकारांनी लिहिलेली खोटीनाटी चरित्रे” अशा शब्दांत करतात. मात्र वास्तवाचे भेदक चित्रण करणारे व प्रसाद्युक्त मराठी भाषा लिहिणारे कादंबरीकार हरिभाऊ आपटे यांच्याबद्दल त्यांच्या मनात कादंबरीकार म्हणून आदरातची भावना आहे. लिव्हिंगस्टनच्या चरित्रामध्ये इंग्रजांच्या सुधारणेचे, द्यार्द्रतेचे, दृढ निश्चयाचे आणि मानसिक व शारीरिक शक्तींचे धडधडीत उदाहरण ह्या चरित्रनायकात दिसते असे ते नमूद करतात. लिव्हिंगस्टनची अपार परार्थता, उद्योगाची एकतानता आणि मानलेल्या देवावरची शुद्ध बावनकशी श्रद्धा त्यांना कौतुकास्पद वाटते.
इतिहास हा तर त्यांच्या आवडीचा तसेच अभ्यासाचा विषय होता. मल्हार रामराव चिटणीस यांची बखर वाचून चिटणीसांनी उपलब्ध कागदपत्रांचा नीट उपयोग केला नाही अशी शंका ते प्रकट करतात. सर्व प्रसंगी पेशव्यांची केलेली तरफदारी त्यांना पक्षपातीपणाची वाटते. “कोठे शिवाजीने केलेला महाराष्ट्रशाईचा उद्य व कोठे दुस-या बाजीने चालविलेला अनागोंदीचा अंत!!! पण या राक्षसी भेदाची जबाबदारी एका शिवाजीवर नाही की एका बाजीवर नाही तर सर्व महाराष्ट्रीयांवर आहे, एवढे तरी पक्के समजल्यास पुष्कळ झाले. नाही तर बाजीस शिव्यांची लाखोली व शिवाजीचे महोत्सव यातच आम्ही दमून जाणार,”३ असे आपले मत नोंदवितात. ऐतिहासिक घटनांकडे निःपक्षपातीपणे बघण्याचा, विभूतिपूजेपासून दूर राहण्याचा यथायोग्य दृष्टिकोण विठ्ठलरावांच्या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थिदशेत तयार झालेला दिसून येतो.
१८९८ मध्ये मोजकीच वृत्तपत्रे निघत होती. १८८१ पासून टिळकांचा केसरी निघू लागला होता. १८८८ पासून आगरकरांचे सुधारक पत्र सुरू झाले होते. सनातनी पक्षाचे पुणेवैभव साप्ताहिकरूपात १८८० पासून निघत होते. अशात शि. म. परांजपे ह्यांनी साप्ताहिक काळ सुरू केला. काळाबद्दल विठ्ठलरावांचे काहीसे प्रतिकूल मत निर्माण झाले. काळाचे पहिले चार अंक वाचल्यानंतर विठ्ठलरावांनी आपली प्रतिक्रिया सुस्पष्टपणे नमूद केली आहे. “काळ म्हणजे केसरीची नक्कलच दिसते. पण केसरीचा स्वभाविक खरमरीतपणा, जाज्ज्वल्य अर्थगांभीर्य, शब्दाचा नेमकेपणा व साधी ढब, नखरेबाज अलंकाराविषयी निष्काळजीपणा वगैरे चांगले गुण काळात तंतोतंत उतरलेले दिसत नाहीत. पण केसरीचा कुत्सितपणा व व्यक्तीला व पक्षाला टोचून लिहिण्याची सवय मात्र ब-याच ठिकणी काळात चमकते.’’४ काळ पत्राबद्दलचा अभिप्राय नमूद करताना विठ्ठलरावांनी केसरीचे चांगले गुण आणि दोष नेमकेपणाने दाखविले होते. ह्या निमित्ताने लिहिताना वृत्तपत्राची भूमिका व नीती कशी असावी ह्याबद्दल मार्मिक विचार प्रकट केले आहेत. “काळाचे चार अंक वाचले परंतु मनाला तल्लीन करणारा एखादा विचार किंवा विकार मला दिसला नाही” असे ते म्हणतात. वृत्तपत्रात सखोल विचार व उन्नत भावना प्रकट व्हावी ही अपेक्षाच ते एक प्रकारे बोलून दाखवितात. आपली वृत्तपत्रे एकांगी विचार करणारी आहेत याबद्दलची नाराजी प्रकट करताना ते लिहितात, बहुतेक पत्रांना पक्षाघात झालेला आढळत आहे. ख-या स्थितीचे दिग्दर्शन करणारा व आपले मत निर्भयणे प्रकट करणारा आगरकरांचा अवतार त्यांना अपेक्षित होता. खरी स्थिती कळणे ही एक अडचण व कळल्यावर प्रामाणिकपणे व बिनधोक प्रसिद्ध करणे ही खडतर अडचण त्यांना वाटत होती. नाइंटिन्थ सेंच्युरी ह्या मासिकाच्या फेब्रवारी १८९८ मधील जी. एम. चेस्नी ह्यांनी देशी पत्रावर केलेल्या टीकेचा निर्देश ते करतात. प्रस्तुत लेखात हिंदुस्थानातील वर्तमानपत्रे केवळ राजकारणापुरती बंदिस्त असून खेळ, संगीत, शास्त्र इत्यादी विषयांना जागा देत नाहीत. एवढेच नव्हे तर हा शेतकीप्रधान देश असून शेती विषयालाही जागा देत नाहीत. येथील लोकांना इंग्रजांचे सरकार उलथून टाकावयाचे आहे; परंतु पर्यायी व्यवस्थेची कल्पना त्यांच्या डोळ्यांसमोर नाही. दर दोन माणसामागे एकाची आकांक्षा सरकारी नोकरी मिळावी ही असल्याने नोकरीच्या जागा वाढवा अशी त्यांची हाकाटी असते अशा प्रकारच्या येथील लोकांच्या उणिवा आणि विसंगती त्या लेखात स्पष्टपणाने दाखवून दिल्या आहेत.विठ्ठलरावांना त्यांनी दाखविलेल्या उणिवा मान्य होत्या व हिंदुस्थानातील वृत्तपत्रांनी आपली वृत्ती व नीती सुधारली पाहिजे असे तीव्रपणाने वाटत होते.
ह्या सुमारास विठ्ठलराव धर्माकडे जोराने ओढले गेले होते. धर्म विषयाला वाहिलेले एखादे वर्तमानपत्र असावे असे त्यांना ताव्रतेने वाटत होते. २२ मे १८९८च्या रोजनिशीत त्यांनी लिहिले, “हल्ली देशात वर्तमानपत्रांचा दररोज इतका केर पडतो पण त्यात धर्माच्या नावाने एक निर्माल्यही आढळत नाही.” ४ मे १८७३ पासून वस्तुतः प्रार्थनासमाजाचे मुखपत्र सुबोधपत्रिका निघू लागले होते.
अभासक्रमाबाहेरील अवांतर वाचन करण्याप्रमाणेच विठ्ठलराव वेगवेगळ्या विषयांवरील भाषणे उत्साहाने ऐकत. कॉलेजमधील प्रासंगिक वसंत व्याख्यानमालेतील त्याचप्रमाणे नव्याने सुरू झालेल्या शिवजयंत्युत्सवातील भाषणे ते नेमाने ऐकत. यातील बहुसंख्य भाषणे त्यांच्या पसंतीला उतरली नाहीत. त्यांना आवडलेल्या भाषणांपैकी एक म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांचे ‘इंग्लंडातील व हिंदुस्थानातील शिक्षण’ या विषयावरील इंग्रजीत झालेले भाषण. ‘एकाग्रतेने भाषण ऐकण्याची उत्कंठा दाबवेल तितकी दाबवून’ त्यांनी ह्या भाषणाची टिपणे घेतली व त्याचा तीन-चार पानी गोषवारा त्याच दिवशी म्हणजे १६ एप्रिल १८९८ रोजी लिहिलेल्या रोजनिशीत दिला आहे. गोखल्यांनी सांगितलेले इंग्लंडातील शिक्षणाचे प्रकार, प्रसार व पद्धत ते नमूद करतात. सातव्या वर्षापासून मुलांना तेथे ‘बोर्ड स्कुला’त सक्तीचे प्राथमिक शिक्षण मोफत मिळते. शिक्षाणाच्या प्रसारामुळे गाडीवाले मजूर इत्यादी कामकरी फावल्या वेळात वर्तमानपत्रे वाचताना आढळतात. वरच्या वर्गामधील ऐपत असणारे लोक मुलांना ‘पब्लिक स्कुला’त पाठवितात. तेथिल शिक्षणपद्धती मनोवेधक असून मुलांच्या ठिकाणी नागर गुणाचे परिणाम करणारी असते. तेथे मानसिकतेइतकेच शारीरिक शिक्षणाकडेही लक्ष पुरविले जाते. कॉलेजमध्ये प्रोफेसरांची विद्वता व योग्यता फार वरच्या दर्जाची असते. तेथील शिक्षणविशेषाच्या अनुरोधाने इंग्रज माणसाच्या ठिकाणी असणा-या नैतिक शक्तीची मीमांसा त्यांनी केली. गोखले यांच्या वाणीच्या विलासास केवळ त्यांचे जिव्हाचापल्यच कारणीभूत नसून त्यांच्या अंतःकरणाची मार्मिकता व रसिकताही आहे हे उघड दिसते, असे म्हणून केवळ भाषेवरचे प्रभुत्व आणि बौद्धिकता यांच्या जोरावर व्याख्यान चांगले होत नसते असे सुचवितात. मात्र गोखल्यांच्या व्याख्यानाची तारीफ करूनही शिंदे आपले विवेचकत्व, बहुश्रुतता व मूल्यमापनाचा स्वतंत्रपणा प्रकट करतात. व्याख्यानाचा गोषवार दिल्यावर अखेरीस “गोखल्यांनी तेथील शिक्षणपद्धतीचे वर्णन केले आहे ते सर्व एकतर्फीच दिसते, कारण खुद्द इंग्लंडातही तेथील पद्धतीबद्दल सारखी ओरड आहे. ते केवळ निर्दोष असेल असे मुळीच वाटत नाही.”५ असा स्वतःचा अभिप्राय देतात. ह्या एकतर्फीपणाची मीमांसा करताना ते म्हणतात की, येथील पद्धती इतकी दुष्ट आहे की हीत रुळलेल्यास तेथल्या पद्धतीतले फार दोष दिसणे संभवनीय नाही.
शिवजयंती उत्सवातील व्याख्याने त्याचप्रमाणे वसंत व्याख्यानमालेतील व्याख्याने यावरील शिंदे यांचे अभिप्राय त्यांच्या व्यापक, उदारमतवादी दृष्टिकोणाचे, प्रगल्भ मनाचे व चोखंदळ अभिरुचीचे द्योतक आहेत. तत्कालीन सुशिक्षित पुणेकर समाज आणि विठ्ठलराव यांच्या दृष्टिकोणात व अभिरुचीत फार मोठी तफावत होती हे जाणवते. सार्वजनिक सभेसारख्या संस्थेतून न्यायमूर्ती रानड्यांसारख्यांनी अंग काढून घेतले होते. लोकमान्य टिळकांचा प्रभाव तेथेही पडला होता. ह्या वर्षी शि. म. परांजपे वसंत व्याख्यानमालेचे चिटणीस होते ही गोष्ट त्याचीच द्योतक आहे. त्या वेळीचा पुण्यातील सर्वसामान्य सुशिक्षित समाज राष्ट्रवादी झाला होता खरा; परंतु सामाजिक बाबतीत सुधारणाविरोधी, प्रतिगामी, रूढ धर्माचे म्हणजे एक प्रकारे सनातन गोडवे गाणारा बनला होता. व्यापक, उन्नत धर्मकल्पना फारशी लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. बहुजन समाजाचे हित आणि सुधारणा यांकडे फारसे कुणाचेच लक्ष नव्हते. एवढेच नव्हे तर त्याची त्यांना जाणीवही दिसत नव्हती. तत्कालीन वातावरण असे असल्याने व विठ्ठलरावांची संवेदनशीलता पुणेकरांहून भिन्न असल्याने त्यांचे व्याख्यानावरील त्याचप्रमाणे श्रोतृवर्गासंबंधीचे अभिप्राय प्रतिकूल पडलेले दिसतात.
सनातनी वृत्तीचा तत्कालीन पुणेरी नमुना प्रो. जिन्सिवाले यांच्या रूपाने पाहावयास मिळतो. शिवजयंती उत्सवात प्रो. जिन्सिवाल्यांचे व्याख्यान झाले. भाषणातून विद्यार्थ्यांना त्यांनी रास्त उपदेश केला. परंतु एक-दोन उदाहरणे जी घेतली ती कुत्सित व खोडसाळपणाची होती. एका संदर्भात उदाहरण देताना प्रो.जिन्सिवाले म्हणाले, “तुम्ही आपली सोय पाहिली पण लोक मला हळदीकुंकवाला बोलावीत नाहीत ना, असे एक पुनर्विवाहिता आपल्या नव्या नव-यास बोलल्यावर मग त्यास पश्चात्ताप होतो.” हे उदाहरण ऐकल्याबरोबर काहींची तोंडे खुलली व टाळ्यांचा गजर झाला. ह्या प्रसंगावर भाष्य करताना विठ्ठलराव शिंद्यांनी लिहिले आहे, “पुण्याच्या सार्वजनिक सभांतून एखाद्या वक्त्यास टाळ्या मिळाल्या की त्याने काहीतरी पोरकटपणा (केला) असावा असे बाहेरच्याने समजावे अशी स्थिती झाली आहे.”६ पुण्यातील सर्वसाधारण श्रोतृवर्ग आणि विठ्ठल रामजी शिंदे यांचे दृष्टिकोण व अभिरूची यामध्ये फरक जाणवून देणारा हा प्रसंग आहे. शिवजयंती उत्सवातील प्रो. परांजपे यांचे जे पुराण झाले त्याबद्दलची शिंदे यांची प्रतिक्रियाही अशीच तिखट आहे. ते म्हणतात, “बिचा-यात एक म्हणजे एकच गुण दिसला. तो हा की ‘सुधारक’ नाही! टाळ्या मिळण्याला इतकेच बस्स आहे! लेखाप्रमाणेच यांचे भाषणही बुळबुळीत, निःसत्त्व, असंबंद्ध, अशुद्ध, तुटक, विपुल व पोकळ शब्दांनी भरलेले असे असते.”७ वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानांमुळे बहुशः त्यांची निराशाच झाली. सेटलूर यांच्या विचारात ‘नवेपणा अगर खोलपणा’ आढळून न आल्याने शिंदे यांचे समाधान होत नाही. न. चि. केळकर यांचा सुधारणेचा बाबतीतला मोघमपणा त्यांना न आवडून त्यांच्या व्याख्यानाचे “काहीतरी दुतोंडी अर्धवट भाषण करून वेळ मारून नेण्याची व शिंगे मोडून वासरात शिरण्याची कला गुरूपासून चेल्याने चांगली साधली आहे, असे वर्णन ते करतात. प्रो. परांजपे यांनी केलेले विधान तर भयंकरच होते. ते म्हणाले की, “सती बंद झाल्यामुळे विधवाविवाहाची अडचण उपस्थित झाली.” सेटलूरही त्याच धर्तीवर बोलताना म्हणाले, “आता विधवाविवाह सुरू होईल तर पाश्चात्त्य समाजातल्या घोर अपायकारक गोष्टी उद्भवतील.” वसंत व्याख्यानमालेचे चिटणीस शि. म. परांजपे झाले होते व मालेवर सनातनी पक्षाने कब्जा मिळविला होता याचे गमक म्हणजे या प्रकारची भाषणे होत.
मालेतील दहाबारा व्याख्याने ऐकल्यानंतर एकंदरीत अशा मालेचे स्वरूप कसे असावे याबद्दल गंभीरपणे ते विचार करताना दिसतात व तिच्या उथळ स्वरूपाबद्दल तीव्र नाराजी प्रकट करतात. “माझ्या मते असल्या मालेच्या द्वारा काही ख-या विद्येचे विलास लोकांपुढे आले पाहिजेत. नुसते वक्तृत्व पाजळणे किंवा शाळेच्या चार पोरांकडून टाळ्या घेणे, किंवा सर्वांस माहीत असलेल्याच चालू चळवळीचे पाणचट चर्वितचर्वण करणे वगैरेंकरता ही माला नव्हे. महाराष्ट्रातल्या चार विद्वान डोक्यांत ज्या काही विचारांची वर्षभर घालमेल होत असेल ती सर्व ह्या मालेच्या रूपाने लोकांपुढे आली पाहिजे. म्हणजे मालाही ह्या अंतःस्थ उलाढालीचे कार्य झाली पाहिजे.” मालेतील व्याख्यानातून प्रकट होणारी विचारांची दिशा शिंदे यांना पटणारी नव्हती. कारण “यंदाच्या सर्व मालेचा रोख बहुतेक निवृत्त मार्गाकडेच दिसतो,” असे त्यांना जाणवले. “आमचे पूर्वीचे चांगले” हा सूर त्यांना पटणारा नव्हता. न रूचणारा स्वतंत्र विचार प्रकट झाला तर सभा उग्र रूप धारण करील ही भीतीही व्याख्यात्यांच्या मनात असायची. “एकंदर आमच्यात स्वतंत्र विचार कमी व जर काही असलाच तर तो पुण्याच्या लोकांपुढे उघडपणे येण्याचा संभव मुळीच नाही” असे ते आपले दुहेरी निरीक्षण नमूद करतात. ही सारी व्याख्याने कोणी थट्टेखोराने जर छापून काढली तर त्यांची खरी योग्यता कळेल असे उपहासाने ते नमूद करतात.८
विठ्ठलरावांच्या ठिकाणी राष्ट्राभिमानी वृत्तीचा आविष्कार स्वभाविकपणे घडत होता. सामाजिक बाबतीत आणि सामाजिक सुधारणेच्या बाबतीत पुरोगामी असणारे विठ्ठल रामजी शिंदे राष्ट्रीय बाबतीत जहाल होते. नाइंटिन्थ सेंच्युरीच्या अंकामध्ये ‘भारतीय सरहद्दीवर कायमची शांतता’ ह्या विषयावर मेजर जी. जे. यंगहजबंड ह्याचा लेख वाचून १ एप्रिल १८९८च्या रोजनिशीमध्ये ते संतापून नोंद करतात. सरहद्दीवरील टोळ्यांतील आदिवासींचे संपूर्ण निःशस्त्रीकरण करून त्यांना सुसंस्कृत (कायमचे गुलाम) बनविणे व त्यांत्याकडून मोफत सक्तिने पक्के रस्ते तयार करून घेणे हा यंगहजबंडने सुचविलेला मार्ग त्यांना संतापजनक वाटून त्यावर ते टीका करतात. अशा प्रतिक्रियांतून त्यांचा जहाल राष्ट्रवादी दृष्टिकोण प्रकट होतो.
समाजात आजूबाजूला घडणा-या घटनांचे त्यांच्या मनावर तीव्र पडसाद उमटतात. समाजामध्ये दिसून येणारी जातीयता त्यांना चीड आणणारी वाटते. बुधवारात कोतवाल चावडीजवळ एक रामदासी बोवा पृथ्वीच्छंदी श्लोक ठेक्यात म्हणत जात असताना तेथील रिकामटेकड्या लोकांनी बुवांना अडवून त्यांची जात विचारली व ते गौड ब्राह्मण आहेत असे समजता नगररस्त्यातून ब्राह्मणाकडून पाया पडून का घेता असे मोठ्या उर्मटपणे विचारले व त्यांची अती टर उडविली. ह्या जात्यभिमान्याला दक्षिणी ब्राह्मण वानप्रस्थाश्रमी गौड ब्राह्मणाच्या पाया पडलेले खपले नाही. हा जातिमत्सर बघून विठ्ठलरावांना सात्त्विक संताप आला. २९ मे १८९८च्या रोजनिशीत त्यांनी मुंबई येथील प्रार्थनासमाजाविषयी त्यांच्या मनात निर्माण झालेली प्रतिकूलतेची भावना नमूद केली आहे. समाजाचे उद्देश, भाषण व मेंबरांची कृती यांमधील विरोध त्यांना चीड आणण्यासारखा वाटतो. समाजात कसल्याही प्रकारे जातिभेद असता कामा नये, ही भूमिका असताना समाजातील मंडळी जातिभेद उघडपणे झुगारण्यास तयार नाहीत. त्यामुळे नुसती सुधारणेची भाषा करणारे सुधारक व प्रार्थनासमाजातील मंडळी त्यांना सारखीच दांभिक वाटतात.
विठ्ठल रामजी शिंदे यांचा वेगळेपणा आणखी एका बाबतीत विशेषत्वाने जाणवतो. ते स्वतः जवळ जवळ ग्रामीण असणा-या जमखंडीसारख्या गावातून आलेले होते. ग्रामीण भागातील शेतक-यांची, गरिबांची, स्त्रियांची दुःखे त्यांना नीट माहीत होती. ती त्यांच्या अंतःकरणाला झोंबणारी होती. मात्र पुण्यात सभा-संमेलनांतून जो विचार प्रकट होत असे अथवा वर्तमानपत्रांतून जो विचार होत प्रसृत होत असे त्यामध्ये त्यांना बहुजन समाजाच्या हिताचा विचार आढळत नसे. त्यांना वाटत असे की, व्याख्यात्याने नवीन शास्त्रीय शोधाचे समाजास द्यावे. प्रार्थनासमाजाच्या उच्च धर्ममताचा प्रसार तर गावंढळात म्हणजे सर्वसामान्य बहुजन समाजात होणे त्यांच्या दृष्टीने निकडीचे होते. ह्या सा-यांतून विठ्ठल रामजींची वैचारिकता ही पुण्याच्या तत्कालीन सुशिक्षित समाजापेक्षा वेगळ्या प्रकारे बनलेली होती हे जाणवते. त्या वेळच्या व्याख्यानांतून, वर्तमानपत्रांतून, जे विचार प्रकट होत होते ते सामान्यतः परंपराभिमानातून निघालेले सनातनी वा राष्ट्रवादी विचार असायचे. मग त्यांचा हा जो व्यापक दृष्टिकोण बनलेला दिसतो त्याला कारणीभूत त्यांच्या घरचे उदारमतवादी संस्कार, त्यांचा व्यापक सहानुभाव, त्यांचा स्वाभाविक चांगुलपणा व त्यांनी केलेले चिंतनच असावे. रा. कळसकरांसारख्या उदारमनस्क कर्त्या पुरुषाचा सहवास त्यांना जो मिळाला तो ह्या बाबतीत साह्मकारक ठरला असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून महात्मा फुले यांनी अस्पृश्यवर्गासाठी जे काही कार्य केले त्याबद्दल थोडीफार माहिती मिळाली असणे शक्य आहे.
विठ्ठल रामजी शिंदे हे उत्साहाने एवढे भारलेले असायचे की, नुसता विचार करून गप्प बसणे त्यांच्याबाबतीत केवळ असंभवनीय. कळसकरांच्या उदाहरणाने ते प्रभावित झाले होते व आपणही अशाच प्रकारचे काहीएक काम स्वतंत्र मंडळी स्थापन करून करावे असे त्यांना वाटत होते व त्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेऊन आपले मित्र गोविंदराव सासने, केशवराव कानिटकर, माधवराव हुल्याळ या मित्रांसमवेत वाटाघाट चालविली होती. आपले भावि जीवन स्वार्थत्यागपूर्वक सार्वजनिक कार्याला वाहून घ्यावे याबद्दल त्यांची पूर्वतयारी या काळातच झालेली दिसते.
जीवनाच्या सगळ्या अंगांकडे विठ्ठल रामजी शिंदे यांचा ओढा होता. आपण राजकारणात पडावे व राष्ट्रकार्य करावे असे त्यांना वाटत होते. आपण स्वार्थत्यागपूर्वक समाजसुधारणेचे कार्य करावे ही प्रबळ ऊर्मीही त्यांच्या ठिकाणी होती व उन्नत स्वरूपाचे धर्मकार्यही करावे अशी ओढ त्यांच्या मनाला लागून राहिली होती. ह्या तीनही बाबींचा एकमेकांत विरोध आहे असे तर त्यांना वाटत नव्हतेच, उलट या तीनही गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये एकमेळ होऊन गेला होता.
संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, गो. मा. पवार (संपा.), मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, १९७७, पृ. ११-१२.
२. सुबोधपत्रिका, २४ डिसेंबर १८९९.
३. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८-९.
४. तत्रैव, पृ. १६.
५. तत्रैव, पृ. २२.
६. तत्रैव, पृ. २३.
७. तत्रैव, पृ. २३.
८. तत्रैव, पृ. ३०.