जनाबाईंचे शिक्षण

१८९५च्या मे महिन्याच्या सुटीत विठ्ठलरावांचा आणि गोविंदरावांचा पत्रव्यवहार चालला होता. घरातील स्त्री-व्यक्तींपैकी कुणाला तरी बरोबर आणून पुण्यास बि-हाड करावे असा दोघांचा विचार होता त्याला निश्र्चित स्वरूप प्राप्त झाले. जनाबांईंच्या सासरच्या छळामुळे आणि विठ्ठलरावांच्या कठोर निश्र्चियामुळे ती कायमची माहेरी आली होती. जनाबाईंना माहेरी आणण्याचा निश्चय केवळ विठ्ठलरावांच्या आग्रहामुळे अमलात आणला होता. स्वाभाविकपणेच जनाबाईंच्या भावी आयुष्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेणे त्यांना स्वतःचे नैतिक कर्तव्य वाटले. अखेरीस १८९५ च्या दुस-या टर्ममध्ये मातोश्री व भगिनी जनाबाई या दोघींना बरोबर घेऊन विठ्ठलराव पुण्यास बि-हाड करण्याच्या इराद्याने आले. कोल्हापुराहून गोविंदरावही आपली पत्नी व मुलगी यांना घेऊन आले. सदाशिव पेठेतील नागनाथ पाराजवळचा पालकरांच्या वाडयात आपले कुटुंब थाटले. या दोघांच्या जोडीला विठ्ठलरामजींचे मित्र जनुभाऊ करंदीकर आणि रामचंद्र नारायण सावंत असे राहू लागले.

आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी जनाबाईंचे शिक्षण सुरू करणे विठ्ठलरावांना भाग होते. आपल्या पायावर ऊभे राहून स्वतःच्या हिमतीवर आयुष्य काढायचे असेल तर जनाबाईने जास्तीतजास्त शिक्षण घेतले पाहिजे. अशी विठ्ठलरावांची धरणा होती. प्रथमतः त्यांनी सदाशिव पेठेतील चिमण्या गणपतीजवळच्या अमेरिकन ख्रिस्ती मिशनच्या शाळेत जनाक्काला घातले. मात्र ख्रिस्ती धर्ममताचा प्रभाव पाडून विद्यार्थिनींना ख्रिस्ती धर्मात ओढण्याचा संस्थाचालकांचा हेतू त्यांच्या लक्षात आला. सहा महिन्यानंतर त्यांनी जनक्काचे नाव त्या शाळेतून काढून घेतले.

पंडिता रमाबाई यांच्या नावाचा त्या काळामध्ये बराच गवगवा होता. सुधारक मंडळींत त्यांना मोठीच मान्यता होती. पुण्यातील लष्कर भागामध्ये त्यांनी ‘शारदा सदन’ नावाची बोर्डिंग शाळा ऊघडली होती. जनाबाईंची तिथे काही सोय होते का हे पाहण्यासाठी विठ्ठलरावांनी त्यांची भेट घेतली. तिच्या निराधारपणाची कहाणी ऐकून त्या एकेक अटी घालू लागल्या. मुलगी त्यांच्या स्वाधीन कल्यावर पाच वर्षे तिला सुट्टी मिळणार नाही. कारण मुलीच्या शिक्षणक्रमात अडथळे येतील असे त्यांनी सांगितले. ह्या अटीमागचा अंतःस्थ हेतू विठ्ठलरावांच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. त्यांनी या संदर्भात लिहिले आहे, “पण ज्या नवमताचे पाणी पंडिता प्याली होती त्याचे चार थेंब माझ्याही पोटात गेले होते. मी उत्तर दिले, “बाई, शिक्षणात अडथळे आणण्यासाठी मी बहिणीस तुमच्याकडे पाठवण्याचे नाकारीन हे खरे कारण नाही. तिने ख्रिस्ती होण्यास आम्ही अडथळे आणू ही भीती तुम्हांस असणे साहजिक आहे. मुलीस नियमाप्रमाणे (विद्याखात्याच्या) सर्व सुट्ट्या तुम्हांला देणे आवश्य आहे. मुलीच्या हिताची काळजी निदान तुमच्याइतकी तरी मला व मुलीच्या आईबापांना आहेच, हा विश्वास तुम्हांला असावा. तुमच्या शिक्षणाने मुलगी आपखुशीने व अक्कलहुशारीने ख्रिस्ती होऊ लागल्यास निदान मी तरी अडथळा आणणार नाही. तिच्यावर तिला नकळत जबरी तर राहोच, पण भुलभुलावणी होऊ लागली तर ते  मी सहन करणार नाही. बेहत्तर आहे अशी तुमची अटीतटीची मदत न मिळाली तरी!’’१ विठ्ठलरावांच्या या परखड बोलण्यानंतर पंडीता रमाबाईने त्यांच्याबद्दल चौकशी केली. ते फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी आहेत असे ऐकल्यावर ह्या कॉलेजचे प्रोफेसर नास्तिक आहेत, असा शेरा त्यांनी मारला. त्यावर “जखडलेल्या धर्मापेक्षा मोकळा नास्तिकपणा बरा,’’ असा टोमणा प्रत्युत्तरादाखल देण्यावाचून त्यांना राहवले नाही.

ख्रिस्ती शिक्षणसंस्थेची ही स्थिती, तर अण्णासाहेब कर्वे यांच्या सुधारकी कार्यक्रमाची दुसरी त-हा त्यांच्या अनुभवास आली. प्रो. अण्णासाहेब कर्वे यांनी हिंगणे येथे ‘अनाथ बालिकाश्रमाची मंडळी’ ह्या नावाने विधवा, परित्यक्ता वा गरजू महिलांना आधार देण्यासाठी ह्या संस्थेची १८९६ मध्ये स्थापना  केली होती. डॉ. रा. गो. भांडारकर हे तिचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या आश्रमात त्या वेळी दहा-पंधरा विधवा मुली होत्या. “माझ्या बहिणीला आपल्या आश्रमात घ्याल काय,’’ ह्या विठ्ठलरावांच्या प्रश्नाला “ब्राम्हणेतरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही” असे स्पष्ट उत्तर देऊन जनाक्काला आश्रमात घेण्याचे प्रोफेसर कर्वे यांनी साफ नाकारले. कर्वे यांच्या ह्या धोरणाबद्दल अतिशय संयमाने विठ्ठल रामजी शिंदे यांनी अभिप्रायकथन केले ते असेः “तत्कालीन महाराष्ट्रात एक सुधारणा करताना दुस-या सुधारणेला कसा अडथळा येई ह्याचे हे उदाहरणच आहे.’’२ जनाक्काच्या शिक्षणासाठी त्यांना पुष्कळच धडपड करावी लागली. शेवटी पुणे येथील प्रसिद्ध हुजूरपागा म्हणून ओळखल्या जाणा-या फिमेल हायस्कूलमध्ये नाव घातले. जमखंडीस तिच्या चार मराठी इयत्ता झाल्याच होत्या. त्यामुळे इंग्रजी पहिल्या इयत्तेत नाव घालण्यास वस्तुतः कोणतीच हरकत नव्हती. ह्या निमित्ताने हिंदू स्त्रीच्या पारतंत्र्याचा आणखी एक नमुना विठ्ठलरांवाच्या अनुभवास आला. जनाक्काच्या शिक्षणासाठी शाळेचे अधिकारी तिच्या नव-याची परवानगी मागू लागले. शिंदे यांना आपल्या बहिणीच्या आयुष्याची कर्मकथा मुख्याध्यापिकाबाई मिस हरफर्ड आणि प्रख्यात शिक्षिका मिस् मेरी भोर यांना सांगावी लागली. या दोघींनाही जनाक्काची परिस्थिती ऐकून तिच्याबद्दल फार कळवळा आला. मिस मेरी भोरकडे ह्या दोघांचे जाणे-येणे सुरू झाले. विठ्ठलरावांची सुधारणेती मते व वागण्याचा बाणेदारपणा ह्यांमुळे ह्या दोघांबद्दल त्यांचा फार अनुकूल ग्रह झाला. जनाक्काच्या नव-याला शाळेने पाठविलेल्या पत्राला त्यांच्याकडून “माझ्या पत्नीला शाळेत दाखल करण्यास परवानगी नाही” असे स्पष्ट उत्तर आले. त्यामुळे तर ह्या दोघी प्रेमळ शिक्षिकांना जनाक्काबद्दल अधिकच कणव वाटू लागली. जनाक्काची सासरची करुण अवस्था, विठ्ठलरावांचा स्त्री-शिक्षणाकडे असणारा ओढा, रूढ आचाराविरुद्ध माहेरी ठेवून घेण्यात त्यांनी दाखविलेले अपूर्व धाडस आणि आपली सुधारकी मते प्रत्यक्षात आचरून दाखविण्याची आंतरिक तळमळही त्यांनी ध्यानात घेतली. त्यांनी ह्यातून एक मार्ग काढला. जनाबाईने माहेरचे शिंदे आडनाव लावून घेतल्यास शाळेत प्रवेश मिळणे सोपे जाऊन तिचा पुढील अभ्यासक्रम सुरळीतपणे पार पडेल असा मार्ग मिस हरफर्ड व मिस भोर या दोघींनी सुचविला. त्याप्रमाणे सासरच्या केवळ नावापुरत्याच असलेल्या कामते ह्या आडनावाचा त्याग करून जनाबाईने शाळेत शिंदे हे आडनाव लावले व ते कायमचे झाले. विठ्ठलरावांच्या प्रयत्नांमुळे जनाक्काला मुधोळ संस्थानची दरमहा दहा रूपयांची स्कॉलरशिप मिळाली. शाळेतील प्रवेश पक्का झाला. अखेरीस जनाबाई हुजूरपागेची विद्यार्थिनी बनली.

महात्मा जोतीबा फुले यांनी स्त्री- शिक्षणाला प्रारंभ करून जवळ जवळ पन्नास वर्षे झाली होती. परंतु पुण्यातील सांस्कृतिक वातावरणात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फारशी सुधारणा झाली नव्हती. शाळेत जाणा-या मुलींची कुचाळकी करण्याची टवाळखोरीची वृत्ती अद्यापि तशीच होती. याचा संकोचून टाकणारा अनुभव जनाबाईंना घ्यावा लागला. जनाबाई पालकरांच्या वाड्यातून शाळेत जात असताना रस्त्यावरील लोक मुद्दाम उघडपणे तिच्या पोशाखावरून, डोक्यावरून पदर घेण्याच्या पद्धतीवरून कुचेष्टेचे उद्गार काढीत असत. त्यामुळे तिला भारी लाजल्यासारखे होई. जनाबाई नुकतीच खेड्यातून शहरात आलेली. मराठा स्त्रिया गोल पातळ नेसुन डोक्यावर पदर घेतात, तशी तिची नेसण्याची पद्धत. पुस्तके पदराआड उराशी कवटाळून सर्वांग लुगड्याने लपेटून खालच्या मानेने अनवाणी जाणा-या जनाक्काचा वेश व आकृती पाहून कुत्सित शेरे मारण्याची कुचाळखोरांना ऊर्मी येत असे. शाळेच्या ठिकाणी पूर्वी पागा होती हे ध्यानात घेऊन ह्या मोठ्या वयाच्या मुली शाळेला चालल्या म्हणजे त्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने “ह्या पहा घोड्या तालल्या” असे कुत्सित उद्गार ते काढीत असत. केवळ पुरुषच नव्हे तर चांगल्या पोक्त बायादेखील तोंडाआड पदर धरून टवाळी करण्यास कचरत नसत. या कुचाळखोरीमुळे खट्टू झालेली जनाबाई बंधू विठूअण्णाजवळ तक्रार करी. ते मोठ्या समंजसपणे आणि वडिलांच्या मायेने तिची समजूत काढीत असत.  
           
    संदर्भ
१.विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १०४.
२.तत्रैव, पृ.१०५