इंग्रजी सहावीत असताना जनाक्का आजारी पडल्या. खोकल्याने त्या प्रचंड बेजार झाल्या. चंद्राबाई नुकतीच क्षयाच्या विकाराने वारली होती. शांता सुखटणकरचा संसर्ग तिला झाला असावा अशी शंका सर्वांच्याच मनात होती. जनाक्कालाही तीच बाधा झाली की काय अशी भीती सर्वांना पडली. पण त्यांचा हा आजार क्षयाचा नसून प्लुरसीचा आहे असे डॉक्टरांनी निदान केले. या आजाराने तीन महिने त्यांना अंथरुणाला खिळून पडावे लागले. अभ्यासात खंड पडला होता. परीक्षा जवळ येत चाललेली. आपण परीक्षा नीटपणे पास झालो नाही तर स्कॉलरशिप बुडेल म्हणून जनाक्का डॉक्टरांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून व जवळच्या माणसांची नजर चुकवून रात्री अभ्यास करीत असत. आजारातून उठल्यावर इंग्रजी सहावीची परीक्षा त्यांनी दिली व त्यामध्ये चांगल्या त-हेने पास झाल्या; पण पुन्हा आजारी पडल्या. आईबाबा आणि अण्णा नको म्हणत असतानाही आपला हेका चालवून त्यांनी मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश घेतला. पण प्रकृती इतकी अशक्त झाली होती की, वाडिया डॉक्टरांनी मदरना स्पष्टपणे सांगितले, या मुलीला संपूर्ण विश्रांतीची जरुरी आहे. फुफ्फुसे फारच कमजोर झाली आहेत. यापुढे तिला अभ्यास करू देणे योग्य नाही. डॉक्टर मोदींनीही जनाक्काची शाळा बंद करावी असाच सल्ला दिला.
अण्णासाहेबांचे मन धाकटी बहीण चंद्राबाई हिच्या अकाली निधनाने आधीच हळवे बनले होते. तशात जनाक्काच्या बाबतीत डॉक्टरांनी दिलेला सल्ला डावलून धोका पत्करायला ते तयार नव्हते. अखेरीस १९०६ सालातल्या पहिल्या सहामाहीत जनाक्काला आपल्या आवडत्या हुजूरपागेलाच नव्हे तर पुढच्या अभ्यासक्रमालाही कायमचे अंतरावे लागले. हिंडण्याफिरण्यासारखी परिस्थिती झाल्यावर आपल्या वडीलबंधूसमवेत त्या नगर, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी जात. अण्णासाहेबांचे धर्मप्रचाराचे काम कसे चालते हे जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. समाजातील कितीतरी मंडळींच्या ह्या निमित्ताने ओळखी झाल्या. डॉ. भांडारकर, चंदावरकर यांसारख्या थोरामोठ्यांना समाजाच्या उत्सवप्रसंगी जवळून पाहता आले.
मुंबईला आल्यानंतर श्री. बलभीमराव केसकर यांच्याशी जनाक्काची भेट झाली. केसकर हे विठ्ठल रामजींचे कळकळीचे जिवलग मित्र व प्रार्थनासमाजाचे निष्ठावंत सभासद होते. मुंबईची हवा कोंदट, जनाक्काच्या प्रकृतीला न मानवणारी. म्हणून केसकरांनी जनाक्काला अशी सूचना केली की, पनवेल येथील म्युनिसिपल शिक्षिकेची जागा त्यांनी पत्करावी. पनवेलची हवा कोरडी असल्याने ती त्यांच्या प्रकृतीला मानवेल व कामामध्ये वेळही चांगला जाईल. जनाक्कांनी अण्णासाहेबांचा विचार घेऊन तयारी दाखविली. पनवेल येथील मामलेदार श्री. तेंडुलकर हे केसकरांच्या परिचयाचे होते. म्युनिसिपल बोर्डाचे ते चेअरमन असल्यामुळे जनाक्काची शिक्षिका म्हणून नेमणूक करणे त्यांना शक्य होते. जनाक्काची इंग्रजी सहावी पूर्ण झालेली. शिवाय गायन, शिवणकला इत्यादी विषय त्यांना अवगत होते. जनाक्काची पात्रता ध्यानात घेऊन मुलींच्या शाळेत हेडमिस्ट्रेसच्या जागेवर दरमहा २५/- रु. पगारावर शिक्षिका म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. मुलींची संख्या सुमारे ६० पर्यंत होती. शाळेत हेडमिस्ट्रेस व एक शिक्षक एवढाच शिक्षकवर्ग होता. शाळेच्या इमारतीजवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था झाली होती. केसकरांची विधवा बहीण भागीरथीबाई ही आपल्या पाचसहा वर्षांच्या मुलाला घेऊन तेथे राहत होती व चांगल्या प्रकारे प्रगती करीत होती. जनाबाईंच्या सोबतीस वडील रामजीबाबा पाच-सहा वर्षांचा छोटा प्रताप ह्या नातवाला घेऊन राहत होते.
जनाक्कांच्या मनावर जातिभेदाचा संस्कार घरातूनच झालेला नव्हता. त्यामुळे पनवेलमध्ये परिचित मुसलमान कुटुंबात त्यांचा होणारा वावर व त्यांच्या लग्नकार्यात त्यांनी घेतलेला भाग यामुळे व एकंदरीतच त्यांच्या सुधारकी वागण्याने पनवेलच्या कर्मठ मंडळींचा त्यांच्यावर रोष झाला होता. आपण पनवेलमध्ये जाऊन सुधारणेसंबंधी व्याख्यान दिल्याने आपल्या बहिणीवरील तिथल्या मंडळींचा रोष काहीसा कमी होईल अशी विठ्ठल रामजी शिंदे यांची अटकळ होती म्हणून ते स्वामी स्वात्मानंदजींना बरोबर घेऊन व्याख्यान करण्याच्या इराद्याने पनवेलला आले.
शिंदे हे इंग्लंडला जाऊन विद्याविभूषित होऊन आलेले व्याख्याते म्हणून त्यांच्याबद्दल एक प्रकारचे आदरयुक्त कुतूहल निर्माण झाल्यामुळे श्रोत्यांचा मोठा वर्ग उपस्थित राहिला होता. परंतु व्याख्यात्यांनी त्या वेळी नुकत्याच अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या संस्थेची माहिती सांगितली व अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याची निकड प्रतिपादली तेव्हा जुन्या मताच्या लोकांची व्याख्यात्याबद्दल व व्याख्यात्याच्या बहिणीबद्दलची प्रतिकूलताच वाढली. त्यातून रामजीबाबा शिंदे यांनी पनवेलचे गंगारामभाऊ सुभेदार या लष्करातून पेन्शन घेतलेल्या महार गृहस्थाला आपल्या घरी चहाला बोलावले. यामुळे पनवेल येथील लोकमत जनाक्काच्या विरोधात फारच प्रक्षुब्ध झाले. गावातल्या सनातनी वर्गाने त्यांच्या घरावर जवळ जवळ बहिष्कार टाकला. शाळेमध्ये काम करणारी बाई अधिकचे पैसे घेऊन जनाबाईच्या घरी पाणी भरणे वगैरे काम करीत असे. तिने यापुढे आपण तुमच्या घरातील काम करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. कारण गावातील लोक तुमचे काम करते म्हणून आपल्याला फार त्रास देतात असे तिने सांगितले. इतकेच नव्हे तर रामजीबाबांना हजामत करण्यासाठी न्हावीदेखील मिळेनासा झाला. त्या कारणाने त्यांना मुंबईला जाऊन आपली हजामत करून घेणे भाग पडू लागले. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासही त्यांना हरकत घेऊ लागले. समंजस घरमालकीण मात्र त्यांची साह्यकर्ती झाली. ती जनाबाईंकडे आली व तिने सांगितले, “आपल्या वाड्यातल्या विहिरीचे पाणी मी तुम्हाला स्वतः पोहोचते करीन. तुम्ही चिंता करू नका. हे असेच चालायचे. एकनाथमहाराजांनादेखील असाच जाच सहन करावा लागला. काही दिवसांनी सारे ठीक होईल. बाईमाणूस म्हणून धीर सोडू नका.”१
जनाबाईंना आणि आपल्या वडिलांना पनवेलला छळ सहन कराव लागत आहे हे ध्यानात येताच विठ्ठल रामजी शिंदे यांनी जनाक्काला कळविले की, “तू मुंबईला निघून ये, तू तेथे नोकरी करणे जरुरीचे नाही. उलट आपल्या मिशनच्या संस्थेत तुझी फार गरज आहे. अस्पृश्यवर्गाच्या स्त्रियांत जागृती करण्याचे मोठे काम तुला करावे लागणार आहे.” इत्यादी.
आपल्या वडील भावाचे पत्र त्यांनी म्युनिसिपल बोर्डाचे चेअरमन तेंडुलकर यांना दाखविले. त्यांनी ‘वार्षिक परीक्षा जवळ आलेल्या आहेत त्या आटोपल्यावर तुम्ही नोकरी सोडलेली बरी. म्हणजे लोकमताला भिऊन तुम्ही नोकरी सोडून गेलात असे व्हावयाचे नाही,’ अशा प्रकारचा सल्ला दिला. जनाक्कांनाही तो पटला. अण्णांना कळवून त्या शाळेच्या कामात पूर्ववत लक्ष घालू लागल्या.
शाळेच्या वार्षिक परीक्षा पार पडल्या. जनाक्काने शिवकविलेल्या वर्गातील दुसरीपासून चौथीच्या वर्गातील सर्व मुलींच्या उत्तपत्रिका तपासण्यासाठी गावातील एका हेडमास्तरकडे गेल्या. हे गृहस्थ जनाबाईंच्या विरोधातील होते. तरीही सगळ्या मुली चांगल्या त-हेने पास झाल्या. जनाबाईंना तर आनंद झालाच. शिवाय तेंडुलकरांना, जनाबाईंना पाणी
पोहोचविणा-या ब्राह्मण मालकिणीला फार आनंद झाला. शेवटी शाळा सोडून जनाबाई आणि कुटुंबीय मुंबईस जावयास निघाले. पण पावसाळ्यात वाहतूक बंद असे. मचव्यात बसून मुंबईला जाणे भाग पडे. त्या वेळी ह्याच हेडमास्तरांनी मचव्यातून त्यांना सोबत करून सुखरूपणे मुंबईस पोहोचवले.
विरोधाच्या वातावरणात एक वर्षभर राहून जनाक्कांनी आपली शिक्षिकेची भूमिक यशस्वीपणे पार पाडली. आता त्या आपल्या बंधूंनी आरंभिलेले अस्पृश्यतानिवारणाचे जनाक्कांनी आपली शिक्षिकेची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. आता त्या आपल्या बंधूंनी आरंभिलेले अस्पृश्यतानिवारणाचे जे अपूर्व कार्य होते त्यामध्ये त्यांना साह्य करण्यासाठी सिद्ध झाल्या होत्या.
संदर्भ
१. जनाबाई शिंद, स्मृतिचित्रे, तरुण भारत, २४-६-१९४९.