रविवार तारीख ११ मे १९३० रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कौटुंबिक उपासना मंडळाची साप्ताहिक उपासना श्री शिवाजी शाळेमध्ये चालविली दौ-याच्या दगदगीने ते थकलेले असल्यामुळे दिवसभर घरीच विश्रांती घेतली. दुस-या दिवशी सोमवारी वैशाख पौर्णिमा ही गौतम बुद्धांची जयंती होती. परंतु अण्णासाहेब कायदेभंगाच्या चळवळीत गुंतलेले असल्यामुळे वार्षिक सभा भरविण्याची व्यवस्था करणे शक्य झाले नव्हते. मात्र ते स्वत: एकटेच पर्वतीच्या डोंगरावर गेले. तेथे त्यांनी दोन तास ध्यान केले; शांतीचा जप केला व घरी परतले. ह्या वेळी ते वेताळ पेठेतील सणस बखळीतील घरामध्ये राहत होते.
दोन प्रहरी बारा वाजता जेवण करुन ते आपल्या दिवाणखान्यात येऊन बसतात न बसतात तो पुणे शहराचे पोलीस इन्स्पेक्टर मि. मिलर व डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर शिंदे हे दोघे त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या दिवाणखान्याच्या दारात येऊन दाखल झाले. आपल्याला अटक होणार याची कुणकुण अण्णासाहेबांना दोन तास आधीच लागली होती. मिलर हे त्यांच्या ओळखीच युपोपियन अधिकारी होतो. " I am afraid, I am coming on an upleasant" असे शब्द त्यांच्या तोंडून येताच शिंदे त्यांना म्हणाले, "तुमची मी वाटच पहात आहे. इतका उशीर का केला? अंमळ खुर्चीवर बसा. एक लहानशी कामाची चिठ्ठी लिहायची आहे. तितका वेळ द्याल काय?" त्यांनी आनंदाने कबुली दिली. चिठ्ठी लिहून झाल्यावर अण्णासाहेबांनी आपली प्रवासाची पडशी तयार केली. तीमध्ये जरुरीचे कपडे व पुस्तके घातली. भगवद्गगीता, धम्मपद, बायबल, सुलभ संगीत, छोटी डायरी, चष्मा आणि विंचरण्याची फणी हे त्यांचे प्रवासातील नित्याचे सोबती. अण्णांना अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी आले आहेत हे कळताच घरात गडबड उडाली. त्यांना निरोप देण्यासाठी घरातील मंडळी पाया पडू लागली. त्यांच्या सुनेचे-लक्ष्मीबाईंचे-डोळे पाण्याने भरलेले त्यांना दिसले. जिना उतरण्यापूर्वी दारात जनाक्काने त्यांच्या पायावर डोके ठेवले.
"घाबरायचे मुळीच कारण नाही, बरे" असा कुटुंबीयांना धीर देत ते पोलीस अधिका-याबरोबर खाली अंगणात आले. बाबुराव जेधे यांचा मोठा मुलगा यशवंत समोर दिसला. त्याला ते 'मला खेडला नेत आहेत' असे म्हणाले. कारण मिलरने त्यांना तसे सांगितले होते. रस्त्यात मोटारलॉरी व चार शिपाई त्यांना घेऊन जाण्याच्या तयारीत होते. एवढ्या अवधीत रस्त्यावर गर्दी जमली. पत्नी सौ. रुक्मिणीबाई व मुलगा रवींद्र हे लॉरीपर्यत आले. रुक्मिणीबाई डोळे पुशीत होत्या. अण्णासाहेबांना घेऊन मोटार शंकरशेट रोडवरुन निघाली. पोलीस सुपरिटेंडेंटचे ऑफीस आल्यावर मोटार थांबली. मिलर खाली उतरले व त्यांनी अण्णासाहेबांना लष्करी सलाम केला व गुडबाय म्हणून निरोप घेतला. मोटार खेडची वाट सोडून चिंचवड स्टेशनवरुन खंडाळ्याकडे निघाली. पोलिसांनी खेडला नेणार ही खोटी हूल उठविली होती हे त्यांच्या ध्यानात आले.
दुपारी तीन-चारच्या सुमारास खंडाळा येथील सरकारी बंगल्यावर अण्णासाहेबांना नेण्यात आले. त्यांच्या खटल्याची सुनावणी श्री. माधव नारायण हुल्याळ बी.ए., पुणे पश्चिम भागाचे प्रांत ह्यांच्यापुढे होणार होती. अटक करावयास आल्यानंतर अण्णासाहेबांना पोलीस अधिका-यांनी वॉरंट दाखविले नव्हते व त्यांनाही विचारले नव्हते. त्यांच्यावर आरोप पिनलकोडच्या ११७व्या कलमानुसार गुन्ह्याला चिथावली देण्याचा व ४७-८ अन्वये बेकायदेशीर मिठाची विक्री केल्याचा होता. अर्ध्या तासातच खटल्याचा फार्स आटोपला गेला. हे मॅजिस्ट्रेट हुल्याळ म्हणजे त्यांच्या जमखंडी गावचे बालमित्र व कॉलेजमध्ये बी.ए.चे सहाध्यायी होते. फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना १८९८ सालच्या एप्रिल महिन्यात ते तापाने सडकून आजारी पडले होते. त्यांची जवळ राहून शुश्रूषा करण्याची इतर कोणाचीही तयार नव्हती. त्या वेळेला रामजी शिंदे यांनी १८९८ सालच्या ७ एप्रिलपासून एक आठवडा सतत त्यांच्यासमवेत राहून बारा बारा तास सलग शुश्रूषा केली होती. त्यांचा ताप अगदीच कमी होईना हे बघून गुलाबपाण्याने थबथबलेली पट्टी सतत बारा तास त्यांच्या डोक्यावर ठेवली व ह्या शुश्रूषेने त्या साथीच्या दिवसांतील तापातून माधव हुल्याळ बरा झाला होता. आज योगायोगाने चमत्कारिक स्थितीमध्ये ते एकमेकांना भेटत होते.
हुल्याळ मॅजिस्ट्रेटसमोर आरोपी म्हणून अण्णासाहेब शिंदे खोलीत शिरताच हुल्याळांनी आपणहून त्यांना नमस्कार केला. आपल्या टेबलाला लागूनच बसावयास खुर्ची दिली. प्रॉसिक्युटर, दोन पोलीस व एक मॅजिस्ट्रेट ह्यांच्याशिवाय ह्या तात्पुरत्या कोर्टात इतर कुणीच नव्हते. शेवटी गुन्हा कबूल आहे काय, असे मॅजिस्ट्रेटने विचारल्यावर अण्णासाहेब उत्तरले, "खेड येथील दहा हजार लोकांपुढील सभेत मी अध्यक्ष होतो. भाषण केले व मिठाचा लिलाव केला, वगैरे पोलिसांची हकिकत खरी आहे. पण गुन्हा केला की कसे हे सांगणे माझे काम नव्हे. तो कोर्टाने वाटेल तसे ठऱवावे." ( अण्णासाहेब शिंदे यांनी कायद्याचा अभ्यास केला होता. फर्स्ट एल् एल् बी ची परीक्षाही ते पास झाले होते. त्या दृष्टीने त्यांनी दिलेले उत्तर मार्मिक म्हणावे लागेल.) मॅजिस्ट्रेटने सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सांगितली. 'बी क्लास' अशी शिफारस केली. पण ती वॉरंटवर न लिहिता तोंडीच पोलीस इन्सफेक्टरला बजावली.
श्री. हुल्याळ फिरतीवर या बंगल्यात उतरले होते. आता मॅजिस्ट्रेटचे नाते संपले होते. मित्राच्या नात्याने त्यांच्या कुटुंबाला-सौ. रमाबाईंना-भेटण्याची हरकत आहे काय, असे त्यांनी विनोदाने विचारले. अर्थात आनंदाने भेटा म्हणून हुल्याळ त्यांना आता घेऊन गेले. भेटीस गेल्यावर सौ. रमाबाईंचे डोळे अश्रूंनी भरलेले पाहून अण्णासाहेब विनोदाने म्हणाले, "आपल्याच नव-याचा मी कैदी असून आपणच पुन्हा अश्रू गाळता." एक अंजीर खाऊन, पाणी पिऊन ते मोटारीत येऊन बसले.
तारीख १२ मे १९३० ची संध्याकाळ. सात वाजले होते. वैशाख पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. ह्या वेळी अण्णासाहेब येरवड्याच्या तुरुंगाच्या दारात आत प्रवेश करण्यासाठी उभे होते. दरसालच्या नियमाप्रमाणे खरे तर बुद्ध जयंतीवर व्याख्यान देण्याची अण्णासाहेबांची ही वेळ शिवाजी शाळेच्या अंगणात त्यांनी ते दिलेही असते. पण या वर्षीचा योगायोग वेगळा. 'सर्वे सुखिन: सन्तु| सर्वे सन्तु निरामय:| सर्वे भद्राणि पश्यन्तु | एष बुद्धानुशासनम् || ह्या श्लोक म्हणून अण्णासाहेबांनी त्या प्रचंड कारागृहात पाय टाकला.
१३ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या नवाकाळ, केसरी, प्रभात इत्यादी पुण्याच्या वृत्तपत्रांत अण्णासाहेब शिंदे यांना कायदेभंग केल्याबद्दल सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून येरवड्याच्या तुरुंगात रवानगी केली आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली. सत्याग्रह मंडळाचे मुख्याधिकारी बाळूकाका कानिटकर अजून बाहेरच होते. मंगळवार तारीख १३ मे १९३० रोजी सत्याग्रह मंडळाच्या वतीने एक जाहीर विनंतीपत्रक काढण्यात आले. १२ तारखेलाच देशभक्त अब्बास तय्यबजी यांनाही अटक झाली होती. त्यानिमित्त व अण्णासाहेब शिंदे यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली ह्याबद्दल एक दिवसाचा हरताळ पाळावा व सायंकाळी सहा वाजता शनिवारवाड्यासमोरील पटांगणात जाहीर सभेला जावे अशी विनंती छापील पत्रके वाटून करण्यात आलेली होती. ह्या पत्रकातच पुढील सूचनाही होत्या : हरताळ चालू असता १) नागरिकांनी शिस्तीने व शांततेने वागावे, २) कुणाचाही कपडा अथवा टोपी मर्जीविरुद्ध काढून घेऊ नये अथवा जाळू नये, ३) एखाद्या जातीस वाईट वाटू चीड येईल अशा त-हेचे चित्र अथवा सोंग मिरवू नये ह्या सूचनांवरुनही कायदेभंगाची ही चळवळ शांततेने व शिस्तीने चाललेली होती याची कल्पना येऊ शकते. अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या वयोवृद्ध, त्यागशील पुढा-याला सक्तमजुरीची शिक्षा झाली, याबद्दल वृत्तपत्रांतून हळहळ प्रकट करण्यात आली. वा. रा. कोठारी यांच्या दै. प्रभातमध्ये त्यांच्याबद्दलची ही बातमी देताना म्हटले आहे, "अस्पृश्यवर्गाचे पाठीराखे व ब्राह्मणेतर पक्षाचे भीष्माचार्य श्री. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांस सध्याच्या सत्रात पुणे मुक्कामी पकडण्यात आले, हे कळविण्यास फार मन:कष्ट होत आहेत. श्री. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यासारखा निर्भय व निश्चयी पुरुष आजपर्यंत कोणत्याही सामाजिक छळास डगमगला नाही. स्वत: मराठा कुळातील असता त्यांनी अस्पृश्य लोकांशी एवढे तादात्म्य करुन घेतले की त्यांच्या जातीतले लोक त्यांचा अपमान करुन त्यांस अस्पृश्याप्रमाणे वागवीत, त्यांचे ताट बाहेर मांडीत. आता त्यांस राजकीय त्रास भोगण्याची पाळी आली असून कैदी म्हणवून घेण्याचा प्रसंग आला आहे. पण त्यांसारख्या पुढा-यास उपवास आणि पक्कवान्न, तुरुंग आणि मृदुशय्या व काटेरी जमीन ही सारखीच असल्यामुळे त्यांचे वर्तन सध्याच्या प्रसंगीही उदात्त प्रकारचे राहील ही सर्वांची खात्री आहे."
अण्णासाहेब शिंदे व अब्बास तय्यबजी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी १३ तारखेस पुणे शहरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. सकाळी दुकाने उघडल्याबरोबर पुन्हा ती ताबडतोब बंद करण्यात आली व काही दुकाने हरताळाची बातमी आगाऊ कळल्यामुळे अजिबात उघडलीच नाहीत. हरताळनिमित्त रे मार्केट बंद ठेवण्यात आल्यामुळे मंडईत सर्वत्र शुकशुकाट होता. बुधवार, रविवार, भवानी, नाना पेठ वगैरे व्यापारी पेठांतील सर्व व्यवहार थंडावला होता. चहाची व फराळाची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. सराफआळी, भांडेआळी, दाणेआळी या सर्व भांगात हरताळ पाळण्यात आला होता. शिंदे व तय्यबजी यांच्या अटकेमुळे पुण्यातील लोकांना कसा सात्त्विक संताप आला होता ह्याचा पडताळाच ह्या हरताळाच्या द्वारा दिसून आला.
दुपारी ४ वाजता सरकारचा निषेध करण्यासाठी आणि अण्णासाहेब शिंदे व देशभक्त अब्बास तय्यबजी यांच्या अभिनंदनासाठी एक प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक लो. टिळकांच्या पुतळ्यापासून निघून शुक्रवार पेठेतून जेधे मॅन्शनवरुन वेताळ पेठेत जाऊन तेथून रविवार, मोती चौक, बुधवार चौक ह्या मार्गाने शनिवार वाड्यासमोर सहा वाजता पोहोचली. मिरवणुकीत म. गांधीच्या तसबिरी आणि राष्ट्रीय निशाणे होती. शिवाय परकीय सरकाराची नोकरी करणे, दारु पिणे, ताडी पिणे हराम आहे, अशा प्रकारचे बोर्डही होते. हा हरताळ शांततेने पार पडला. पोलिसांनीही मधे न पडण्याचे ह्या खेपेला ठरविले होते. या मिरवणुकीत विशेषत: ब्राह्मणेतर व मुसलमान बोहरी यांचाच समाज जास्त होता. शहरात निरनिराळ्या भागांत लहान लहान तुकड्याही ब-याच हिंडत होत्या व सरकारचा निषेध आणि पुढा-यांचा जयजयकार करीत होत्या. हरताळाप्रमाणे ही मोटी मिरवणूक व छोटया मिरवणुका शांततेने पार पडल्या.
मुख्य मिरवणूक सहा वाजता शनिवारवाड्यासमोर आल्यानंतर प्रो. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा भरली. सभेला सुमारे पंधरा हजार स्त्री-पुरुषांचा मोठा जमाव हजर होता. सभेत श्री. का. गो. पाषाणकर, का. ह. जाधव, हरिभाऊ वाघिरे, पोपटलाल शहा, उमरावतीचे बामनगावकर, बाबुराव भिडे, दत्तोपंत गुप्ते, रंगोबा लडकत, व्यं. बो. हरोलीकर, बोहरी व्यापारी शेख हुसेन स्वयंसेवक अभ्यंकर वगैरे वक्त्यांची जोरदार भाषणे झाली. तेथील विणकरवर्गातील लोकांनी दारु आणि ताडी न पिण्याचा निश्चय केला असून विलायती सूट न वापरण्याची प्रतिज्ञा केली व स्वदेशी वस्तूशिवाय इतर जिन्नस घेणार नाही अशा काही विणकरांनी शपथा घेतल्या. समाजाच्या सगळ्याच थऱांत जागृतीची कशी लाट आहे हे सभेच्या निमित्ताने दिसून आले.
अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या त्यागी व सत्त्वशील पुढा-यास सहा महिन्यांची सक्तमजुरीची कडक शिक्षा दिली गेली, तसेच त्यांना 'सी वर्ग' देण्यात आला. त्याबद्दलही लोकांना आलेला सात्त्विक संताप केसरी. जागृती अशा भिन्न मतप्रणालीच्या वृत्तपत्रांतूनही सारख्याच प्रमाणात प्रकट झाला. केसरीमध्ये 'पत्रकर्त्यांच्या स्फुट सूचना' ह्या कमलाखआली अण्णासाहेब शिंदे यांच्याबद्दल अतिशय आदराने लिहिलेले दिसून येते. "श्रीयुत शिंदे हे काही पूर्वीपासून राजकीय चळवळीत नसून सुधारणेच्या विशेषतः अस्पृश्योद्धाराच्या चळवळीलाच त्यांनी स्वत:स वाहून घेतलेले आहे आणि डिप्रेस्ड क्लास मिशनला आज जी स्थिती प्राप्त झाली आहे ती त्यांच्या परिश्रमाचेच फळ होय. असे समाजसुधारकदेखील आपली सामाजिक चळवळ बाजूस सारून राजकीय चळवळीत प्रमुखत्वाने भाग घेऊ लागले आहेत, यावरुनच राजकीय चळवळीचे महत्त्व व सर्वव्यापकत्व सिद्ध होते." या स्फुटात पुढे असेही म्हटले आहे की, "दोन वर्षांपूर्वी पुणे शहरात शेतक-यांची जी परिषद जमीन महसुलाच्या बिलाचा विचार करण्यासंबंधी भरली होती, तिचे अध्यक्षस्थान श्री. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी स्वीकारले होते व त्या वेळेपासून ते सरकारच्या डोळ्यांवर येऊ लागले असावेत... शेतकरीवर्गात त्यांचे वजन मोठे असल्यामुळे त्यांची चळवळ सरकारला बरीच जाचक वाटू लागली असावी असे दिसते, किंबहुना एवढ्याच कारणावरुन त्यांच्यावर मिठाच्या कायदेभंगाचा खटला भरून सहा महिने सक्तमजुरीची जबर शिक्षा देण्यात आली असावी.
त्यांना अटक पुमे शहरातच करण्यात आली, पण येथून ४० मैल अंतरावरील खंडाळे या गावी नेऊन तेथे श्री. मा. ना. हुल्याळ यांच्यापुढे त्यांस उभे करण्यात आले." श्री. शिंदे यांचे बालमित्र व सहाध्यायी अशा या हुल्याळकरांनी साठीच्या घरास पोहोचलेल्या अशा या आपल्या लंगोटीमित्रास सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून त्यांच्या लहानपणाच्या उपकारांची कृतज्ञतापूर्वक वाटते. कारण करंदीकर हे बालपणापासूनचे शिंदे यांचे मित्र होते व फर्ग्युसन कॉलेजात शिंदे, हुल्याळ यांचे सहाध्यायी होते. ह्याच हुल्याळांनी दुष्काळविरुद्ध शिरोळ तालुक्यात सक्तीची केलेली सारावसुली, महायुद्धाच्या काळात वाई तालुक्यात केलेली रिक्रुटिंगची सक्ती वगैरे स्वकीयांविरुद्ध केलेल्या दुष्कृत्याचा व त्यांच्या इंग्रजधार्जिणेपणाच्या वृत्तीचा उल्लेख करुन हुल्याळांनी अण्णासाहेब शिंदे यांना अशी जबर शिक्षा ठोठावली हे स्वाभाविक असल्याचे सुचविले. ह्या स्फुटात असे म्हटले आहे, "ज्या स्वार्थत्यागी पुरुषाने स्वार्थ-साधनाचे सर्व व्यवसाय मुद्दाम लाथाडून देऊन ब्राह्मोसमाजाच्या व अस्पृश्योद्धाच्या चळवळीस स्वत:ला आजन्म वाहून घेतले, त्याची डिप्रेस्ड क्लासेस मिशनची कामगिरी पाहू माजी गव्हर्नर विलिंग्डन व त्या वेळचे शिक्षणमंत्री ना. चौबळ, श्रीमंत सयाचीरावमहाराज गायकवाड, कै नारायण चंदावरकर अशासारख्यांनी वेळोवेळी प्रशंसापूर्वक उद्गार काढले आणि ज्याचा सध्याचा व्यवसाय म्हणजे वाड्मयसेवकाचाच होता अशा उच्च दर्जाच्या पुढा-यास नवीन नियमाने राजकीय कैद्यास मिळू शकणा-या सवलतीचा काहीच फायदा न मिळता केवळ बदमाशगिरी करुन तुरुंगात जाणा-या कैद्याच्या सक्तमजुरीची पाळी यावी यात श्रीयुत शिंदे यांना कोणत्याही प्रकारचा कमीपणा नसून मुंबई सरकारच्या अब्रूस मात्र कलंक लागणार आहे. तेव्हा स्वत: मुंबई सरकारने यात मन घालून व श्रीयुत शिंदे यांना 'अ' वर्गाच्या सवलती देऊन तरी स्वत:ची अब्रू साफ करून घ्यावी."
जागृतीच्या संपादकांनीही गुरुवर्य शिंदे यांनी विद्वता, लौकिक, कर्तबगारी व वय यांचा विचार केला असता दाखविला नाही व अधिका-यांनी आपला अनुदार व्यक्त केला तरी कायदेकौन्सिलचे ब्राह्मणेतर पक्षाचे सदस्य व ब्राह्मणेतर दिवाण यांनी तरी आपले कर्तव्य करावयास हवे होते. अण्णासाहेबांशी त्यांचा मतभेद असेल परंतु हा प्रश्न माणुसकीचा होता, असे म्हणून त्याचप्रमाणे वृत्तपत्राच्या संपादकांनीहीह्या बाबीचा उल्लेख करावयास पाहिजे होता असे म्हणून त्यांच्यावरील जबाबदरीची जाणीव जागृतीकारांनी करुन दिली."
मॅजिस्ट्रेट हुल्याळ यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना ठोठावलेल्या शिक्षेच्या आदेशात "बी क्लास'चा उल्लेख नसल्यामुळे त्यांची रवानगी 'सी वर्गा"तल्या कैद्यांमध्येच करण्यात आली. बी वर्गाच्या कैद्यांच्या तुलनेस सी वर्गातल्या कैद्यांना मिळणारे अन्न व इतर सुविधा निकृष्ट प्रतीच्या होत्या. हुल्याळ्यांच्या हलगर्जीपणामुळे म्हणा, ही हेतुपूर:सरपणे म्हणा, बी वर्गाचा त्यांनी निर्देश केलेला नसल्याने अण्णासाहेब शिंदे यांना तुरुंगातील पहिले पंधरा दिवस सी वर्गातील कैद्याचे जिणे जगावे लागले. सी व बी वर्गातील फरक होता तो असा. सी वर्गाच्या कैद्यांना सकाळी वाडगाभर जोंधळ्याची कांजी, दहा वाजता एक किंवा दोन बाजरीच्या भाक-या व मुगाची आमची, संध्याकाळी तेच जेवण, नेसावयास खादीचे दोन मांड-चोळणे व दोन सदरे मिळत. निजावयास एक काथ्याचे तरट व दोन कांबळी . बी वर्गातील कैद्यांना कांजीऐवजी सकाळी सात वाजता अर्धा शेर दूध, दहा वाजता चपाती, भात, वरण, भाजी, लोणी व साखर; संध्याकाळी सात वाजता पुन्हा तेच जेवण. बी क्लासला नेसावयास ठरावीक धोतराची पाने, दोन सदरे व खादीची उंच गांधीटोपी, निजावयास एक गादी, चादर, उशी आणि अंथरावयास दोन कांबळी. सी वर्गाला एक उथळा वाडगा व कथलाचे टमरेल एवढीच भांडी मिळत. तर बी वर्गातील कैद्यांना अॅल्युमिनियमचे ताट, तांब्या, दोन वाडगे ही भांडी मिळत. कैद्यांनी ही भांडी स्वच्छ ठेवावीत अशी अपेक्षा असे व त्यांची तपासणी होत असे. रोज सकाळी डॉक्टर कैद्यांची तपासणी करत असत. बी-क्लासमधल्यांना खोलीत औषधे मिळत. सी क्लासला दवाखान्यात जावे लागे. बी क्लासचे सगळे कैदी एकाच वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांना एकमेकांच्या खोल्यात जाण्याची परवानगी नसे. मात्र व्हरांड्यात किंवा अंगणात एकमेकांशी बोलता येत असे.
सी क्लासच्या कैद्याला बाहेरची कष्टाची कामे करावी लागत असत. धट्टाकट्टया माणसास चक्की मिळे. बी क्लासच्या सक्तमजुरीच्या कैद्यांना काथ्याची जुनी तरटे उकलणे आणि उकललेल्या काथ्याची पुन्हा नवीन दोरखंडे बनविणे हे काम सकाळी ७ पासून १० पर्यंत व दुपारी १२ पासून ४ पर्यंत असे सात तास करावे लागे. पंधरा दिवसांनी अण्णासाहेबांना बी-वर्गात ठेवावे असा हुकूम झाला. मात्र ठरावीक प्रकारचे काम करावे लागत असल्यामुळे व एकांतवासात राहावे लागल्यामुळे त्यांच्या मनाला औदासीन्य येई. बी. क्लासात त्यांची रवानगी अंधारी म्हणून ओळखल्या जाणा-या वॉर्डात केली गेली. त्या मोठ्या दालनात एकंदर चौदा कैदी होते. अण्णासाहेब शिंद्यांच्या पाठोपाठ बाळूकाका कानिटकरांनाही अटक झाली व तेही त्यांच्यासमवेत अंधारी वॉर्डमध्ये आले. १२ ऑगस्टला त्यांच्या वॉर्डमध्ये ए वर्गाच्या प्रतिष्ठित पाहुण्यांची व्यवस्था करावयाची असल्यामुळे ह्या मंडळींना सर्कलनंबर ३च्या नं. १ च्या बराकीत नेले व एका विस्तीर्ण बराकीतच या चौदा जणांची मांडमी केली. सर्वांची एकाच मोठ्या दालनात पथारी पडल्याने बोलण्यास, एकत्र बसण्या-उठण्यास 'पूर्ण स्वराज्य' आजच मिळाले असे शिंदे यांनी नमूद केले आहे. सर्कलमध्ये आलेल्या चौदा कैद्यांमध्ये बाळकाका कानिटकर व स्वत: अण्णासाहेब शिंदे हे पुण्याचे, पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर हे वाईचे, तर रामभाऊ बळवंत हिरे व त्र्यंबक अण्णाजी देवचके व स्वामी सहजानंदभारती हे अहमदनगरचे एवढी महाराष्ट्रीय मंडळी होती. बाकीची बार्डोली, भडोच, अहमदाबाद, आणंद इत्यादी ठिकाणची गुजराती मंडळी होती.
१२ ऑगस्टपासून ह्या मंडळींनी सामूहिक जीवन जगण्याचा आनंद अनुभवता आला. एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे शक्य झाले. अण्णासाहेबांची स्वामी सहजानंद ह्यांच्याबरोबर धर्मपर चर्चा कधी होई. ह्या बराकीत आल्यानंतर ह्या मंडळींच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक जीवनालाही प्रारंभ झाला. मडळी अधूनमधून भजन करीत असत. अण्णासाहेब प्रार्थना म्हणतव उपासना करीत.अण्णासाहेबांचे भजन व प्रार्थना सगळ्याच मंडळीना आवडत असत. एक दिवस त्यांनी भाषाशास्त्रावर व्याख्यान दिले, तर एकदा छोटालाल घेलाभाई गांधी यांचे जैनधर्मावर एक तासभर भाषण झाले. स्वामी सहजानंदांचेही व्याख्यान होई. अण्णासाहेबच नेहमी अध्यक्ष असत. मात्र सात दिवसानंतर ह्या चौदा मडळींचे सहजीवनाचे सौख्य संपुष्टात आले. १८ ऑगस्ट रोजी ह्या मंडळींना पूर्वीप्रमाणे अंधारी वॉर्ड एक व दोनमध्ये टाकण्यात आले.
सामूहिक पद्धतीने उपासना करण्याकडे अण्णासाहेबांचा ओढा असल्यामुळे अशा प्रकारची उपासना होते काय याची त्यांनी चौकशी केली. खडकीचे धर्मोपदेशक फादर लॉडर हे दर मंगळवारी तरुंगातील कैद्यांसाठी उपासनेला येत असत. ह्या कॅथॉलिक उपासनेला अण्णासाहेब शिंदे नेमाने जात असत.विनोदाने ते ह्या उपासनेला मंगळागौर म्हणत असत. सर्व विधी व प्रार्थना लॅटिनमध्येच होत असल्याने व त्यात कॅथॉलिकांचे कर्मकांड असल्याने अण्णासाहेबांना या उपासनेत फारसा आध्यात्मिक आनंद होत नसे. कधी कधी पहाटेच्या वेळी उठल्यानंतर ध्यान व चिंतन करीत असताना त्यांना आध्यात्मिक सुख मिळत असे.
तुरुगातील निर्बंधाचा जाच स्वाभाविपणेच अण्णासाहेबांच्या मनाला होत असे.वाचण्यासाठी फार थोडी इंग्रजी, मराठी नियतकालिके मोठ्या मुश्किलीने परवानगी घेऊन मिळत असत. भेटावयाला येणा-या मंडळींबाबतही असेच निर्बंध असत. तरी पूर्वपरवानगीने आठवड्यातून त्यांना भेटावयास येणा-या मंडळींमध्ये त्यांच्या कुटुंबातील मंडळी म्हणजे सौ. रुक्मिणीबाई, बहीण जनाक्का, मुलगा प्रताप व मित्रमंडळीपैकी श्री. बाबुराव जेधे, गणपतराव शिंदे व त्यांच्या पत्नी अहल्याबाई शिंदेही असत थोडा वेळ होणा-या ह्या भेटीमुळे त्यांना समाधान वाटण्यापेक्षा हूरहूरच जास्त वाटत असे. कौटुंबिक वातावरणाची आवड असणा-या आणि कुटुंबीयांत प्रेमपूर्वकपणे रममाण होणा-या अण्णासाहेबांना ह्या स्नेहाच्या मंडळींना भेटण्याची ओढ लागत असे. प्रत्यक्ष वस्तुस्थितीतली उणीव त्यांचे काव्यात्म मन कल्पनेने भरून काढीत असे. अंधा-या वॉर्डात आल्यानंतर त्यांना अंगणात तीन झाडे दिसत असत. या झाडांची आकारवैशिष्टये ध्यानात घेऊन त्यावर ते आपली पत्न रुक्मिणीबाई, भगिनी जनाक्का व सून लक्ष्मीबाई ह्यांच्या व्यक्तित्वाचा आरौप करुन आपल्या मनाला रिझवीत असत. संध्याकाळच्या वेळेला एक साळुंकीचे जोडपे खोलीतील उंच छपराच्या वाशावर येऊन बसत असे. हे जोडपे म्हणजे त्यांचे कविमित्र गणपतराव शिंदे व त्यांच्या पत्नी अहल्याबाई हेच होत अशी गोड कल्पना करुन ते त्यांच्याशी मनोमन संवाद करीत असत. आपल्या प्रेममय व काव्यात्म वृत्तीमुळे अशा प्रकारे ते काही काळ हा होईना मनाचे औदासीन्य दूर करू शकत असत.
इतर सर्वच राजकीय कैद्यांप्रमाणे तुरुंगातून आपली सुटका कधी होईल ह्याबद्दलची उत्कंठा अण्णासाहेबांनाही लागून राहिली होती. सप्रू-जयकरांच्या समेटाच्या प्रयत्नाला यश येईल काय वगैरेबद्दलच्या बातम्या सर्वच मंडळी उत्सुकतेने समजून घेण्याचा प्रयत्न करीत होती. असे असले तरी आपल्या राष्ट्रीय वृत्तीला मुरड घालून आपली सुटका करुन घेण्याची यात्किंचितही तयारी अण्णासाहेबांनी नव्हती. याबाबत ना. भास्करराव जाधव यांनी तुरुंगात येऊन त्यांची घेतलेली भेट ही एक बोलकी घटना म्हणता येईल. १ जुलै १९३० रोजी नामदार भास्करराव जाधव अण्णासाहेबांना भेटण्यासाठी मुद्दाम तरुंगात आले. त्यावेळी ते शिक्षणमंत्री होते. रुप्याची छडी घेतलेला भालदार घेऊन ते आल्यामुळे तुरुंगात खळबळ उडाली. अण्णासाहेबांना त्यांच्या भेटीसाठी सुपरिटेंडेंटच्या खोलीत नेण्याचा आले. त्यांना पोहोचवून सुपरिटेंडेंट जाऊ लागले असता अण्णासाहेबांनी त्यांनाही बसण्याची विनंती केली. भास्कररावांशी काही आपला गुप्त गोष्टी करण्याचा अथवा भलतेच काही सुचविण्याचा इरादा नाही हेच अण्णासाहेबांना अभिप्रेत होते. सामान्यतः कैद्याला भेटण्यासाठी पंधरा मिनिटांपेक्षा कोणाला अधिक अवधी देण्यात येत नसे. भास्करराव जाधव मात्र अण्णासाहेबांशी दोन तास बोलत बसले आणि तरीही त्यांचे उठण्याचे चिन्ह दिसेना. ते मराठी बोलत होते. अण्णासाहेबांनी या भेटीचे वर्णन केले आहे ते असे. भास्कररावांना मी का आलात असे विचारले. 'एरवी समाचाराला आलो' असे सांगून ते म्हणाले, "आता तुम्ही वृद्ध झालात. तुम्हास विश्रांतीची जरुरी आहे, ती घेण्याचे निश्चित करीत असाल तर, मी तुम्हास नेण्यासाठी आलो आहे." मी म्हटले, "विश्रांतीच जर मला पाहिजे आहे तर मला येथल्या इतकी बाहेर दुसरीकडे कोठे मिळणार नाही आणि आमच्यासारखी मंडळी येथे असली तरी बाहेरचीही थोडी गडबड कमी होईल." भास्करराव म्हणाले, "अहो, काय बाहेर वणवा पेटला आहे. शहरांतून आणि खेड्यांतून सारखीच धामधूम चालली आहे." असे जर आहे तर आम्हाला येथेच राहू द्या" मी म्हणले, "मी येथे येण्यापूर्वी जर तुम्ही मनात आणले तर मी येथे आलोही नसतो. येथे आल्यावर मला बाहेर नेण्याचे मनात आणून काय उपयोग?" असा एकमेकांच्या मनातील भाव एकमेकांस कळल्यावर मग ब्राह्मणेतर पक्षाविषयी बोलणे सुरु झाले..."
भास्करराव जाधव हे अण्णासाहेब शिंदे यांच्यासाठी मनात काही योजना ठरवून आले होते, असे त्यांच्या बोलण्यावरुन दिसते. चळवळीत आपण भाग घेणार नाही असे आश्वासन अण्णासाहेब शिंदे यांनी दिले तर आपण सुटका करु असा भास्कररावांच्या बोलण्याचा रोख होता, असे त्यांच्या सूचक बोलण्यावरुन दिसते. अशा प्रकारच्या माघारीला आणि तडजोडीला सूचनेला अण्णासाहेब शिंदे यांनी बाणेदारापणे रोखठोक उत्तर दिले व भास्कररावांची सूचना फेटाळून लावली हे त्यांच्या वृत्तीशी व स्वतंत्र बाण्याशी सुसंगत म्हणावे लागेल.
दुसराही एक असाच प्रसंग २ सप्टेंबर १९३० रोजी घडला. दर तीन महिन्यांनी एक अॅडव्हायजरी कमिटी तुरुंग पाहावयास येत असे. ह्या दिवशी पुणे विभागाचे कमिशनर मि. मॅकी व त्यांच्याबरोबर पुण्याचे कलेक्टर व इतर युरोपियन अधिकारी अशी सात-आठ मंडळी तुरुंगातील कैद्यांना भेटण्यासाठी आली होती. ही माणसे नुसती आमच्याकडे जणू काय आम्ही म्हणजे प्राणिसंग्रहातील प्राणीच आहोत असे पाहून जातात असे अण्णासाहेबांना वाटत असे. मंगळवारच्या ह्या दिवशी ते कॅथॉलिक उपासनेवरुन नुकतेच आले होते. दूध घ्यावयाला ते खाली बसणार इतक्यात हा कळप आला, दुस-या कोणाजवळही उभे न राहता ही मंडळी अण्णासाहेबांच्या जवळ आली. त्यांचे हिस्ट्री टिकेट दाखविण्यात आले. मंडळी मुक्याचे व्रत दाखवून चालती झाली. कोणी एक शब्दही बोलले नाही हे अण्णासाहेबांना फारच दु:सह वाटले. किंबहुना ह्या कमिटीचे पुढारी असलेले कमिशनर मॅकी ह्यांच्याशी मागच्या वेळी जो संवाद झालेला होता त्यानंतर आपण काही बोलावे असे त्यांना वाटले नसणार.
अॅडव्हायजरी कमिटीच्या मागच्या भेटीच्या वेळी कमिशनर मि. मॅकी यांनी अण्णासाहेबांची ओळख मनात धरुन अण्णासाहेबांजवळ ते असे उद्गारले, "You have changed your occupation." तुम्ही आपली वृत्ती बदलली," असे म्हटले. अण्णासाहेब शिंदे यांनी, आपली ओळख लागत नाही, असे म्हटल्यावर आपण डी.सी.मिशनवर वरचेवर येत होतो असे म्हणाले. त्यावर अण्णासाहेबांनी आपली ओळख ठेवल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो, असे म्हटले. मात्र मि. मॅकीचा हा टोमणा आवडलेला नाही, हे दाखविण्यासाठी ते त्यांना म्हणाले, "ही वृत्ती नसून, वृत्तीचा अभाव आहे." १०
ह्या तुरुंगवासाचा अण्णासाहेबांच्या दृष्टीने एक मोठा लाभ झाला, तो म्हणजे त्यांनी आपल्या आत्मचरित्रपर लेखनाला येथे प्रारंभ केला. ह्या तरुंगावरील एकांतवासात आपल्या पूर्वजीवनातील घटना आठवणे हाच मोठा विरंगुळा होता. तुरुंगात आल्याबरोबर त्यांनी लिहिण्याचे साहित्य मिळविण्याचा प्रयत्न केला. जवळ जवळ अडीच महिन्यांनी त्यांना लिहिण्याचे साहित्य मिळाले. १२ मे रोजी ते तुरुंगात आले. एक महिन्याने त्यांची दौत, टाक हे लेखनसाहित्य मिळावे, ही मागणी सफल झाली. तरी टाक असला तर दौत नाही, दौत असली तर टाक नाही, हे सर्व असेल तर दिवा नाही असाच प्रकार चालला होता. अखेर २४ जुलै रोजी त्यांच्या खोलीत दिव्याची व्यवस्था करण्यात आली. अडीच महिन्यानंतर दिव्याचा प्रकाश त्यांना पाहावयास मिळाला. त्याचा त्यांना एवढा आनंद झाली की आपण लिहिण्याचे सोडून दिव्याकडेच पाहत बसलो, असे त्यांनी म्हटले. ह्या दिवसापासून त्यांनी आपल्या आयुष्यातील "आठवणी व अनुभव" लिहिण्यास सुरुवात केली. विशेषत: बालपणीच्या आठवणीच ह्या काळात त्यांनी लिहिल्या. त्या लिहीत असताना आपल्या बालपणाच्या, आपल्या कुटुंबाच्या आठवणी, विशेषत: आईबद्दलच्या आठवणी लिहिण्यात त्यांचे मन तल्लीन होत असे. एक प्रकारे बाल्याचा तो काळ ते ह्या तुरुंगाच्या कोठडीत पुन्हा जगत होते. ह्या आठवणींचे लेखन म्हणजे त्यांच्या मनाला मोठाच विरंगुळा होता. तुरुंगाच्या बाहेर प्रत्यक्ष काम करण्यात, व्याख्याने देण्यात व गंभीर स्वरुपाचे लेखन करण्यात त्यांना स्वत:ला गुंतवून घ्यावे लागत असे. तुरुंगातील एकांतवासात मात्र आठवणी लिहिण्याची सवड त्यांना मिळाली. व्याख्यान वगैरे देण्याचे इतरांकडून दडपण नव्हते.
तुरुंगातील एकांतवास हाही अशा प्रकारच्या आठवणी लिहिण्यास अनुकूल होता. सुमारे २०० पानांचा मजकूर त्यांनी तरुंगवासातील उरलेल्या अवधीत लिहिला. पुढे पुस्तकरुपाने छापलेल्या ह्या आठवणीतील सुमारे १०० पृष्ठांइतका मजकूर त्यांनी ह्या तुरुंगवासात लिहिला. हा सगळा भाग एखाद्या कादंबरीइतका रोचक व अत्यंत वाचनीय झालेला आहे. आत्मचरित्रपर लेखनाचा एवढा भाग तुरुंगात लिहिलेला असल्यामुळे पुढे तो नजरेला आल्यावर त्यांचे धाकटे चिरंजीव रवींद्र ह्यांनी १९३९ साली त्यांना आत्मचरित्रपर लेखन पूर्ण करण्याचा तगादा त्यांच्या आयुष्याच्या ह्या अखेरच्या काळात केला व हे आत्मचरित्रपर लेखन अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले. ह्या आत्मपर लेखनाच्या जोडीलाच येरवड्याच्या तुरुंगात असताना आपली रोजनिशीही ते लिहीत होते. अण्णासाहेब शिंदे यांचे हे आत्मपर स्वरुपाचे लेखन म्हणजे त्यांच्या तुरुंगवासाचे कायम टिकून राहणारे वाड्मयीन फल आहे असे म्हणावे लागेल.
तुरुंगवासात घडलेली अथवा निदान उघडकीला आलेली अनिष्ट गोष्ट म्हणजे अण्णासाहेबांना जडलेला गाऊट अथवा बोटाचा संधिवात हा विकार होय. हा विकार जडल्याचे तुरुंगवासातच आढळून आले व या विकारामुळे त्यांचे वजनही सुमारे १०-१२ पौंडांनी कमी झाले. ता ९ ते १९ जूनपर्यंत दहा दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावे लागले.
अण्णासाहेब शिंदे हे आपल्या विनोदात्म वृत्तीने हा तुरुंगवासही सुसह्म करण्याचा प्रयत्न करीत होते. मि. रॉजर ह्या जेलरशी त्यांचे सलगीचे संबंध निर्माण झाले होते. व्हीलर या युरोपियन वॉर्डरशी त्यांचा हास्यविनोद चालत असे. एकदा हा वॉर्डर त्यांच्या खोलीत खिळे मारण्यासाठी आला असता. 'रघुपटी राघव राजाराम, पटिट पावन सीताराम' हे भजन गुणगुणत होता. तेव्हा अण्णासाहेब त्याला म्हणाले, "तुझा खाईस्ट आणि पाद्री, मीच माझा पाद्री' चार खिळे मारुन "आठ आणे लाव," म्हणून त्याने हात पुढे केला. त्यावर अण्णासाहेब म्हणाले, "एवढी उधारी राहू दे, जा." त्यावर हासत खिदळत तो चालता झाला.११
अण्णासाहेबांच्या हिस्ट्री टिकिटवर सुटकेचा दिवस म्हणून २६ ऑक्टोबर नमूद केला होता, तरी त्यांची सुटका अनपेक्षितपणे काहीशी लवकर झाली. ऑक्टोबरच्या १३ तारखेस सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल रामजी शिंदे व बाळूकाका कानिटकर वॉर्डसमोरच्या अंगणात शतपावली करीत असता वॉर्डर सखाराम धोत्रे एकदम अण्णासाहेबांकडे येऊन पायावर पडून रडू लागला. १०-१५ मिनिटे काही कारण सांगेना. आपल्याला पश्चात्ताप झाला एवढेच तो म्हणत होता. अण्णासाहेबांना नंतर कळले की त्यांची सुटका दुस-या दिवशी १४ तारखेस होणार होती हे त्याला कळले होते मात्र ते त्याला अण्णासाहेबांना कळविण्याचा अधिकार नव्हता. दुस-या दिवशी सकाळी तो येण्यापूर्वीच अण्णासाहेबांची सुटका होणार होती. म्हणून त्याचे हे रडे होते. रात्री कोंडल्यावर दुसरे वॉर्डर येऊन "उद्या आपली सुटका होणार आहे काय," असे विचारु लागले. पाळीच्या जमादारानेही सर्व बांधाबांधीची तयारी आहे काय, असा प्रश्न त्यांना केला. उद्या आपण सुटणार याची त्यांना एक प्रकारे सूचनाच मिळाली व आनंद झाला.
दुस-या दिवशी सकाळी उठल्याबरोबर जमादारांनी त्यांच्या सुटकेची बातमी सांगितली व सामानाची तयार करुन ऑफिसात येण्याची वर्दी दिली. पुणे शहर काँग्रेस कमिटीने सेक्रेटरी हरिभाऊ जोशी हेही त्यांच्याबरोबर सुटले. तरुंगाच्या अधिका-यांनी टेलिफोन वापरण्याची परवानगी दिल्यावर त्यांनी गावातून एका मित्राकडून मोटार मागवली. सकाळी नऊ-दहाच्या दरम्यान अण्णासाहेब घरी पोहोचले. लागलीच जोशी ह्यांच्या घरी एक अभिनंदनाची छोटेखानी सभा झाली. दुस-या दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबर १९३० रोजी अण्णासाहेब शिंदे यांच्या अभिनंदनार्थ रे मार्केटमध्ये प्रचंड जाहीर सभा झाली. अण्णासाहेबांचा गौरव करणारी अनेक वक्त्यांनी भाषणे केली व त्यांचे अभिनंदन केले. शेवटी माळ घातल्यावर अण्णासाहेब शिंदे म्हणाले, "आता कायदेभंग करुन तुरुंगात जाणे इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की, अशा माळा तुरुंगातून परत आलेल्यांच्या गळ्यात न घालता त्या माळा अद्यापि तरुंगात न गेलेल्यांच्याच गळ्यात घातलेल्या ब-या." हे ऐकून सभेत मोठाच हशा पिकला आणि टाळ्या झाल्या. अण्णासाहेबांच्या तुरुंगवासाचा हा शेवट त्यांच्या प्रगल्भ आणि विनोदात्म वृत्तीशी सुसुंगतच म्हणावा लागेल.१२