भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मुंबई येथील समाजाचे काम विविध प्रकारे जोरदारपणे चालविले त्याचप्रमाणे मुंबईबाहेरील अनेक स्थानिक प्रार्थनासमाजाच्या कामाला चालना देण्याचा प्रयत्न केला. परंतु एवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांचे लक्ष ब्राह्मधर्माच्या विश्वव्यापक तत्त्वाकडे आणि त्या उच्च अधिष्ठानावरून ब्राह्मधर्माच्या भारतीय कार्याकडे नेहमी लागून राहिलेले असे. ह्या कार्याचा मुख्य भाग एकेश्वरी धर्मपरिषद हा होता.

१८८५ मध्ये हिंदू राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले. त्यात न्या. रानडे ह्यांचा अप्रत्यक्ष पुढाकार होता. त्यांच्या डोळ्यांसमोर समग्रपणे भारताची भवितव्यता होती. राष्ट्रसभेद्वारा सामाजिक सुधारणेचे कार्य त्यांनी सामाजिक परिषदेच्या द्वारे करविले. अलाहाबादच्या चौथ्या अधिवेशनापासून राष्ट्रीय कार्याला उदार धर्माचा पाठिंबा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अलाहाबाद येथील राष्ट्रसभेच्या १८८८च्या अधिवेशनाच्या वेळेपासून उदार धर्मपरिषदेचे अधिवेशन भरविण्याचे त्यांनी निश्चित केले होते. न्या. रानडे हे ह्या धर्मपरिषदेचे अध्यक्ष होते व पंडित शिवनाथ शास्त्री ह्यांना सेक्रेटरी म्हणून नेमले.

ब्राह्मसंघ : खरे तर ह्या प्रकारच्या कामाला १८८९ पासून प्रारंभ झाला होता. मुंबईला थीइस्ट्स युनियन (ब्राह्मसंघ) ह्या नावाची एक मध्यवर्ती संस्था स्थापन झाली. ब्राह्म समाजाच्या निरनिराळ्या पक्षाच्या एकत्र उपासना व संमेलने व्हावीत, प्रचारासाठी एकत्र प्रयत्न व्हावा, वगैरे गोष्टी ठरविण्यात आल्या होत्या. नवीनचंद्र राय ह्यांना ह्या संघाचे सेक्रेटरी नेमले. कलकत्त्यास आदि ब्राह्मसमाज, नविधान व साधारण ब्राह्मसमाज असे निरनिराळे पक्ष पडून ब्राह्मसमाजाच्या कामात फूट पडली होती. ह्या नवीन संघामुळे ही फूट भरून निघण्याचा संभव होता. न्या. रानडे ह्यांनीच ह्या कामी पुढाकार घेतला होता. १८९५ मध्ये पुण्याच्या काँग्रेसच्या वेळी पुणे प्रार्थनामंदिरात ही बैठक झाली. त्या वेळी अमेरिकेचे युनिटेरियन धर्माचे प्रसिद्ध प्रचारक रेव्ह. जे. टी. संडरलँड हे उपस्थित होते. १९०३ पर्यंत जरी ह्या परिषदेच्या बैठकी भरल्या तरी तिचे काम मंदावले होते. १९०३च्या नाताळात ह्या परिषदेची स्थिती विस्कळीत झाली आहे हे शिंदे ह्यांच्या मनात विशेषत्वाने भरले व पुढील साली म्हणजे मुंबईला झालेल्या राष्ट्रीय सभेच्या वेळी ही धर्मपरिषद चांगल्या प्रकारे संघटित करून बोलावण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे एक-दोन अधिवेशने सोडू कराचीत भरलेल्या १९१३ सालच्या अखेरच्या बैठकीपर्यंत सेक्रेटरी म्हणून ह्या सर्व कामाचा भार शिंदे ह्यांनी स्वेच्छेने पत्करला व तळमळीने पार पाडला. धर्मपरिषदेच्या कामाची कल्पना पुढे दिलेल्या तक्त्यावरून येऊ शकते.

तक्ता (तक्ता वाचण्यासाठी इथे क्लीक करावे )

१९०३ सालच्या अखेरीस मद्रास, बंगालच्या सफरीमुळे शिंदे ह्यांना हिंदुस्थानातील ब्राह्मसमाजाची बरीच माहिती प्रत्यक्ष स्वरूपात झाली होती. १९०४ साली मुंबई येथील एकेश्वरी धर्मपरिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर होते, तर सेक्रेटरी शिंदे. मुंबईच्या ह्या धर्मपरिषदेत निरनिराळ्या प्रांतांतील प्रमुख पुढा-यांचा शिंदे ह्यांच्याशी परिचय झाला. कलकत्त्याच्या खालोखाल मुंबई प्रार्थनासमाजाचे महत्त्व असल्याने धर्मपरिषदेच्या कामात मुंबईच्या प्रचारकाने पुढाकार घेणे हे योग्यच होते. मुंबई येथील १९०४च्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या वेळी होणा-या सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे भूषविणार होते. तेव्हा ह्याच वेळी भरणा-या धर्मपरिषदेमध्ये श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्यांना सहभागी करून घेण्यासाठी निमंत्रित करावे ही कल्पना शिंदे ह्यांना सुचली. धर्मपरिषदेचे अध्यक्ष डॉ. भांडारकर हे होते व स्वागताध्यक्ष सर नारायण चंदावरकर हे होते. त्यामुळे धर्मपरिषदेचे काम उत्तम प्रकारे झाले.

प्रार्थनासमाजाच्या निमंत्रणानुसार सयाजीराव गायकवाड हे एकत्रित भोजनासाठीही उपस्थित राहिले. आर्यसमाजाच्या मंडळीने भोजनाला येण्याचे कबूल केले होते. परंतु काही मुसलमान गृहस्थांना प्रार्थनासमाजाची दीक्षा दिलेली आहे हे कळल्याबरोबर त्यांनी भोजनाला उपस्थित राहण्याचा बेत रहित केला व प्रत्यक्ष कृतीच्या वेळी मंडळी माघार कशी घेतात ह्याचा नमुना दाखविला. आर्यसमाजी मंडळीमध्ये गुजराथी लोकांचाच मोठ्या प्रमाणात भरणि होता. श्रीमंत सयाजीरावांनी मात्र ह्या भोजनास उपस्थित राहून उच्च धर्मनिष्ठ वर्तनाचा एक आदर्श दाखवून दिला. पुढील वर्षाची परिषद वाराणसी येथे काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भरणार होती. अशा परिषदांच्या जनरल सेक्रेटरीचे काम विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनीच पाहावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

पुढच्या वर्षीची म्हणजे १९०५ सालची धर्मपरिषद पंडित शिवनाथशास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली वाराणासी येथे भरली. सेक्रेटरी शिंदेच होते. काशी येथे स्थानिक ब्राह्मसमाज नव्हता व गाव जुन्या मताचा आणि क्षेत्राचा. त्यामुळे शिंदे ह्यांना स्वागतमंडळ स्थापन करणे जड गेले. मात्र ह्या परिषदेचे महत्त्व प्रांतोप्रांतीच्या पुढा-यांना कळले असल्याने शिंदे ह्यांनी काढलेल्या परिपत्रकाला उत्तेजनपर उत्तरे आली व वर्गणीच्या रकमाही आल्या. पंडित शिवनाथशास्त्री हे वाराणसी येथील परिषदेचे अध्यक्ष होते व त्यांनी अध्यक्ष म्हणून उत्तम प्रकारे काम चालविले. परिषदेचे काम एखाद्या स्थानिक समाजाच्या वार्षिक उत्सवाप्रमाणे २४ डिसेंबरपासून ३१ तारखेपर्यंत मोठ्या सोहळ्याने पार पडले. उपासना, भजने व्याख्याने, नामसंकीर्तने व शेवटी प्रीतिभोजन इत्यादी कार्यक्रम निर्वेधपणे पार पडले. निरनिराळ्या प्रांतांतून सुमारे ७५ ठिकाणांहून ब्राह्मसमाजाचे प्रतिनिधी आले होते. ह्या ब्राह्मधर्माच्या परिषदेसाठी लंडन ख्रिश्चन मिशनच्या प्रशस्त हायस्कुलाशिवाय काशी ह्या क्षेत्रस्थानी दुसरीकडे कोठेही जागा मिळाली नाही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. दोन-तीन वर्षांच्या अनुभवामुळे हिंदुस्थान ह्या खंडप्राय देशातील ब्राह्मसमाजाची सर्व प्रकारची माहिती मिळवून त्यांची एक सूची (डिरेक्टरी) तयार करण्याची आवश्यकता शिंदे ह्यांना भासू लागली होती. त्यांच्यासारख्या समाजकार्यासाठी भ्रमंती करणा-या माणसाच्या लक्षात ही उणीव विशेषत्वाने आली. वाराणसी येथील परिषदेने ब्राह्मधर्मसूचिग्रंथ शिंदे ह्यांनी तयार करून प्रसिद्ध करावा असा ठराव एकमताने मंजूर केला.

तारीख ३० हा परिषदेचा मुख्य दिवस होता. बाबू प्रथमलाल सेन ह्यांनी प्रातःकाळची उपासना उत्तम प्रकारे चालविली. “खरी प्रार्थना म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही देवावर प्रीती करतो त्याचप्रमाणे सर्व मनुष्यजातीवर प्रेम करणे, हीच ईश्वराची खरी भक्ती आणि उपासना. ईश्वराविषयी हे प्रेम मनात पूर्ण बाणले म्हणजे आत्म्याचा पालट होतो आणि जणू काय आम्ही पुनर्जन्म पावतो,” असे त्यांनी प्रतिपादन केले.१

परिषदेसाठी अनेक मान्यवर प्रतिष्ठित मंडळी आली होती. न्या. चंदावरकर, बाबू सत्येंद्रनाथ टागोर, मि. नटराजन, प्रो. रुचिराम सहानी, बाबू हेमचंद्र सरकार इत्यादी मंडळी त्यामध्ये होती. शिंदे ह्यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी सांगितले, गेल्या वर्षी परिषद भरली तेव्हा फक्त ६० समाजाची नावे ठाऊक होती. आज १५० समाजांचा पत्ता लागला आहे. गेल्या वर्षी जो पत्रव्यवहार होता तेव्हा १०० पत्रे लिहावयास लागली. यंदा सुमारे ५०० पत्रे लिहिली गेली. ४७ समाजांकडून खर्चासाठी ३४३ रुपये मिळाले आहेत. सुमारे १०० प्रतिनिधींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. शिंदे ह्यांच्या प्रास्ताविकावरून धर्मपरिषद आयोजित करण्यापाठीमागे असणारा त्यांचा हेतू, प्रचाराची तळमळ व त्यांचा कामाचा उरक ह्यांची कल्पना येऊ शकते.

अध्यक्ष पंडित शिवनाथशास्त्री ह्यांचे परिषदेत मोठे उद्बोधक भाषण झाले. धर्म अबाधित राहण्यासाठी मनुष्यास स्वातंत्र्य, सयुक्तिकता, सार्वत्रिकता आणि आध्यात्मिकता अथवा सात्विकभाव ह्या चार गोष्टींची आवश्यकता असते असे त्यांनी सांगितले. ब्राह्मधर्म आणि भक्तिपंथ हे एकच आहेत. फरक कायतो मूर्तिपूजा व जातिबंधन ह्या दोन गोष्टींत आहे. प्रचारातील धर्माचा विचार केला असता त्याला ‘आध्यात्मिक धर्म’ हे नाव देण्यापेक्षा ‘सामाजिक धर्म’ हे नाव शोभते. ह्या प्रकारचे प्रतिपादन केल्यानंतर त्यांनी ब्राह्मधर्माला सनातनी मंडळी विरोध का करतात, ह्यासंबंधी वस्तुनिष्ठ विवेचन केले.

सबजेक्ट कमिटीच्या बैठकीमध्ये विविध ठरावासंबंधी निर्णय झाला. त्यमध्ये एका ठरावामुळे परिषदेच्या कमिटीमध्ये शिंदे ह्यांचा समावेश करण्यात आला व दुस-या एका ठरावामुळे हिंदुस्थानातील सर्व समाजांच्या संक्षिप्त माहितीचे एक पुस्तक (डिरेक्टरी) तयार करून प्रसिद्ध करण्याचे काम शिंदे ह्यांनी आपल्याकडे घ्यावे अशी परिषदेने विनंती केली.

ब्राह्मधर्माचा प्रसार वाढविण्याच्या आवश्यकतेसंबंधी न्या. चंदावरकर ह्यांचे प्रभावी भाषण झाले. ब्राह्मधर्माचा प्रसार स्त्रियांमध्ये होणे आवश्यक आहे ह्या सूचनेसंबंधी सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्यांनी फार कळकळीने भाषण केले. दुस-या एका गृहस्थाने शिंदे ह्यांना एका विद्यार्थ्याचे पत्र आले आहे व त्यांनी विद्यार्थ्यांसाठी धर्मविषयक वृत्तपत्र चालवावे असे सुचविले असल्याचा उल्लेख केला.२

एकंदरीत वाराणसी येथील धर्मपरिषदेचे हे अधिवेशन यशस्वीपणे पार पडले. हे अधिवेशन आयोजित करण्यात शिंदे ह्यांनी फार कष्ट घेतले हे जसे दिसून येते त्याचप्रमाणे त्यांची दूरदृष्टी व संघटनाकौशल्य ह्यांचाही प्रभाव ह्या अधिवेशनात पडल्याचे स्पष्टपणे जाणवते.
 
वाराणसी येथील परिषदेत बंगालमधील तीनही ब्राह्मसमाजाची परस्पर सहानुभूती बरीच वाढली. निरनिराळ्या प्रांतातील ब्राह्मांचा स्नेह झाला. ह्या परिषदेचा हितकारक व उत्साहवर्धक वृत्तान्त अन्यत्र सांगावा; मुंबई प्रार्थनासमाजाची माहिती दूरदूरच्या समाजास कळावी; काही प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करवून घ्यावी; मुख्य मुख्य स्थानिक समाज पाहावे असा हेतू धरून शिंदे ह्यांनी बंगाल, बिहार, आसाम ह्या प्रांतातून एक मोठा विस्तृत दौरा काढला. ब्राह्मसमाजाची अखिल भारतीय पातळीवर संघटना होण्याच्या दृष्टीने व त्यांची कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीने असा दौरा काढणे शिंदे ह्यांना आवश्यक वाटले.

प्रथमतः बिहार प्रांताची राजधानी बांकीपूर येथे ते २ जानेवारी १९०६ रोजी गेले. मुख्य ब्राह्मसमाज नवविधान मताचा होता व भाई प्रकाशचंद्र राय हे त्यांचे पुढारी होते. साधारण ब्राह्मसमाजाची तेथे एक राममोहन रॉय सेमिनरी नावाची शाळा होती व साधारण ब्राह्मसमाजाची उपासना तेथेच होत असे. तारीख ४ रोजी शिंदे ह्यांनी प्रमुख मंडळी जमवून मुंबईकडची हकिकत सांगितली. उत्सवात ब्राह्मसमाजाच्या दोन्ही पक्षांनी मिळून कार्यक्रम ठरवावा, एकमेकांच्या उपासनेस पाळीपाळीने जावे असे ठरले. ह्या दोन पक्षांमध्ये सामंजस्य निर्माण व्हावे असा शिंदे ह्यांचा हेतू होता. बॅ. दास ह्यांच्या घरी ता. ५ रोजी दोन्ही पक्षांच्या स्त्रियांची सभा भरली. पोस्टल मिशन, डोमेस्टिक मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामे स्त्रियांनी कशी करावयाची हे शिंदे ह्यांनी सांगितले. काशी परिषदेस आलेल्या सौ. हेमंतकुमारी चौधरी ह्या सिल्हेटहून मुद्दाम आल्या होत्या. त्यांनी हिंदीमधून भाषण केले. ब्राह्मधर्माच्या प्रचारकार्यात स्त्रियांना सहभागी करून घ्यावे असा शिंदे ह्यांचा विचार व प्रयत्न नेहमीच होता.

बांकीपूरनंतर शिंदे यांनी मोंघीरला एक दिवसाची भेट दिली व दुस-या दिवशी जानेवारी ७ला शिंदे भागलपूरला गेले. तेथील समाजात बडी बडी प्रमुख व वृद्ध मंडळी थोड्या प्रमाणात होती. सुमारे ५-६ तरुण पदवीधर ब्राह्ममंडळींपुढे मुंबईच्या तरुण ब्राह्ममंडळाचे छापील नियम शिंदे ह्यांनी वाचून दाखविले व तेथील पूर्वीच्या तरुणांची संस्था पुन्हा स्थापन करावी असे आवाहन केले.

काठीहर येथे समाजमंदिराचे बांधकाम अर्धवट स्थितीत असलेले शिंदे ह्यांनी पाहिले. तेथे समाज मात्र अस्तित्वात नव्हता. पूर्णिया येथे आल्यावर तेथील वजनदार मंडळींच्या सहकार्याने काठीहारमधील इमारत पूर्ण व्हावी व तेथे समाज चालू व्हावा असा प्रयत्न शिंदे ह्यांनी केला. पूर्णिया भेटीनंतरची कुचबिहारची भेट समाजकार्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची होती.

भूतान संस्थानच्या हद्दीस लागून कुचबिहार हे संस्थान आहे. तेथील मूळचे रहिवासी कुचकोल नावाचे जंगली लोक आहेत. तेथील राजघराणे ह्याच जंगली जातीचे आहे. फक्त अधिकारीवर्ग मात्र बंगाली लोकांचा होता. येथे एम. ए. पर्यंत पूर्ण दर्जाचे एक कॉलेज होते. “सुधारणेची ही थोडी चिन्हे सोडून दिल्यास कुचबिहार नगरावर व तेथील अस्सल प्रजेवर अद्यापि हिमालयाचेच पुरातन वन्य साम्राज्य चालू आहे. राजमहाल, चार बड्या लोकांची घरे आणि काही सरकारी इमारती सोडून दिल्यास बाकी सर्व लहानमोठ्यांची घरे अक्षरशः झोपड्याच! गावाकडे नजर फेकल्यास असे वाटते की, केळी व पोफळी ह्यांच्या सुंदर बनात एकांत जागा पाहून आधुनिक सुधारणेच्या प्लेगला कंटाळून जणू एक सेग्रिगेशन कँपच बांधला आहे, “असे कुचबिहारचे वर्णन शिंदे ह्यांनी केले आहे.३

बंगालमधील ब्राह्मसमाजात दुफळी निर्माण होण्यास हा कोप-यातील कुचबिहार कारणीभूत झाला होता. १८७८ मध्ये केशवचंद्र ह्यांच्या थोरल्या मुलीचा विवाह कुचबिहारचे राजे नृपेंद्रनारायण यांच्याशी झाला. त्या वेळी केशवचंद्रांच्या कन्येचे वय १४ वर्षांहून कमी होते. म्हणून केशवचंद्रांच्या नवविधान समाजात दुफळी पडून नवा साधारण ब्राह्मसमाज निर्माण झाला. शिंदे तेथे गेले त्या वेळी नवविधान समाजाची ११ आनुष्ठानिक कुटुंबे होती. त्यात एकंदर ७० मुले-माणसे होती. शिवाय ४० हितचिंतक होते. स्वतः राजे समाजाचे अध्यक्ष होते. मात्र सर्व व्यवस्था राणीसाहेब म्हणजेच केशवचंद्र सेन यांची कन्या पाहत होती.

“इतके सुंदर ब्राह्ममंदिर निदान माझ्यातरी पाहाण्यात कुठे आले नाही”, असे शिंदे ह्यांनी कुचबिहार येथील ब्राह्ममंदिराबद्दल म्हटले आहे. रविवारी त्यांची तेथे उपासना झाली व तारीख १३ रोजी टाऊन हॉलमध्ये ‘रिलिजन अँड दि बेसिस ऑफ लाईफ’ (धर्म हा जीवनाचा पाया) ह्या विषयावर इंग्रजीमध्ये त्यांचे व्याख्यान झाले. शिंदे कुचबिहार येथे असताना कॉलेजकुमारांनी जी जिज्ञासा, तत्परता व उत्सुकता दाखविली, ती शिंदे ह्यांना उत्साहवर्धक वाटली. ती पाहून शिंदे ह्यांच्या मनात असा विचार आला की, कुचबिहार येथे एखाद्या ताज्या दमाचा प्रचारक पाठविला तर पुष्कळ काम होण्याजोगे आहे. पण लगेच समाजांतर्गत असलेल्या राजकारणामुळे ते शक्य होणार नाही ह्याचीही खात्री पटली. तेथील कार्यक्रम आटोपून १५ जानेवारीस ब्रह्मपुत्रेच्या काठी असलेल्या डुब्री ह्या गावी ते दाखल झाले.

आसाम प्रांतातील डुब्री ह्या ब्रह्मपुत्रा नदीने कवटाळलेल्या गावी नदीच्या तीरावर शिंदे उभे होते. सोबत बाबू उपेंद्रनाथ बोस हे ब्राह्मसमाजाचे वजनदार पुरस्कर्ते उपस्थित होते. सनातन ब्राह्मसमाजाचा शुभमहिमा शिंदे यांच्या मनाला जाणवत होता. भोवतालच्या शांत गंभीर देखाव्याचे व साक्षात ब्रह्मपुत्रेचे विराट दर्शन त्यांना घडले. त्याक्षणी त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, “ब्राह्मधर्माचा प्रचारक होण्यात मला जी धन्यता व सुख वाटत आहे त्यापुढे राजसुखही तुच्छ होय.” हा विराट गंभीर देखावा बघितल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे हे चिंतनामध्ये काही क्षण मग्न झाले.

येथील समाजामध्ये मंडळींची एकजूट व एकमेकांविषयी कळकळ दिसून आली. ती पाहून शिंदे ह्यांना फार आनंद झाला. विशेषकरून स्त्रियांमध्ये उपासनेविषयी विशेष उत्कंठा दिसून आली. त्यांच्यासाठी शिंदे ह्यांनी हिंदीमध्ये उपासना केली. दुस-या दिवशी सायंकाळी समाजामध्ये ‘आधुनिक भारतासाठी काही आदर्श’ ह्या विषयावर इंग्रजीत व्याख्यान दिले. आजूबाजूचा आल्हाददायक निसर्ग, ब्रह्मपुत्रेचे विराट दर्शन आणि ब्राह्मबंधूंमध्ये असलेला प्रेमभाव व ब्राह्मभगिनींची कळकळ ही सारी बघावयास व अनुभवास मिळाल्यामुळे शिंदे ह्यांचा डुब्री येथील मुक्काम फारच आनंददायक झाला.

डुब्रीवरून निघून तारीख १८ रोजी शिंदे मैमनसिंग ह्या गावी आले. नवविधानसमाज व साधारणसमाज अशा दोन्ही समाजातील माणसे तेथे होती. मैमनसिंगचा विशेष असा की, साधारणसमाजाचे आचार्य श्रीनाथ चंदा ह्यांनी गावाबाहेर बरीच जागा घेऊन तेथे ब्राह्म लोकांचे एक खेडे वसविले होते.

पूर्व बंगालची राजधानी असलेल्या डाक्का येथील समाज कलत्त्याच्या खालोखाल महत्त्वाचा गणला जात होता. आतापर्यंतच्या प्रवासाचा परिणाम शिंदे यांना डाक्का येथे विशेषत्वाने जाणवला. बंगालमधील गोड अन्न व मोहरीच्या तेलाचा वापर यांचा वीट आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला. मँचेस्टर कॉलेजमधून उच्च धर्मशिक्षण घेऊन आलेल्या धर्मप्रचारक तरुणाचे व्याख्यान आहे असे समजल्याने शिंदे ह्यांच्या व्याख्यानाला तेथील समाजात अलोट गर्दी जमली होती. शिंदे ह्यांनी इंग्रजीत दहा-पंधरा मिनिटे भाषण केल्यावर त्यांना भोवळ आली व ते खुर्चीत गळून पडले. सभेचा मोठा विरस झाला. दोन दिवस विश्रांती घेऊन ब्रह्मपुत्रा नदीवरील बोटीने ते बारीसाल येथे पोहोचले. ह्या जलप्रवासाने प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. बारीसालमध्ये त्यांचे व्याख्यानही परिणामकारक झाले. व्याख्यान आटोपून शिंदे व्यासपीठावरून खाली उतरल्याबरोबर त्यांच्या हातात पूर्वी उल्लेखिलेली तातडीची तार देण्यात आली. मुंबई येथे त्यांची पत्नी फार आजारी आहे व अहमदनगरास बहीण चंद्राक्का अत्यवस्थ आहे असा तारेतील मजकूर होता. त्यामुळे पुढचा दौरा तसाच टाकून शिंदे यांना मुंबईस परत यावे लागले. मात्र ह्या दौ-याने बंगाल, बिहार, आसाम, या प्रांतांमध्ये ब्राह्मसमाजाची स्थिती कशी आहे; स्थानिक स्वरूपाचे कोणते प्रश्न तेथे आहेत; ब्राह्मसमाजाची पुनर्घटना करण्याची शक्यता कितपत आहे वगैरेबद्दलची प्रत्यक्ष माहिती त्यांना मिळाली व समाजातील अनेक वजनदार पुढा-यांचा प्रत्यक्ष परिचय झाला. अखिल भारतीय पातळीवर धर्मपरिषदेचे काम करण्याच्या दृष्टीने हा त्यांचा लाभच होता.

एकेश्वर धर्मपरिषद आयोजित करण्याचा उपक्रम शिंदे यांनी उत्साहाने चालू ठेवला. १९०६ सालच्या नाताळात भारतीय एकेश्वर धर्मपरिषद कलकत्ता येथे मोठ्या थाटाने भरली. कोकोनाडाचे डॉ. व्यंकटरत्नम् नायडू हे अध्यक्ष होते. ब्रिटिश ऍण्ड फॉरेन असोसिएशनचे एक प्रतिनिधी मि. जी. ब्राऊन हे परिषदेसाठी आले होते. सुरुवातीची उपासना प्रि. बाबू उमेशचंद्र ह्यांनी चालविली. प्रसिद्ध गायक त्रैलोक्यनाथ संन्याल ह्यांचे भजन झाले.

ह्या वेळी शिंदे हे त्यांचे मित्र बिपिनचंद्र पाल ह्यांच्या घरी उतरले. बिपिनचंद्र पाल हे शिंदे ह्यांच्याप्रमाणेच मँचेस्टर कॉलेजमधून ब्राह्मप्रचारक झाले होते, परंतु स्वदेशी आल्यानंतर ते राजकारणाकडे वळले. मात्र ब्राह्मसमाजाच्या कामात ते सहभाग घेत होते. बिपिनचंद्र पाल ह्यांच्याकडून शिंदे ह्यांना कलकत्त्यामध्ये वृद्ध व तरुण ब्राह्मसमाजी ह्यांच्यामध्ये चाललेल्या झगड्याची माहिती मिळाली. मतभेदाचा विषय असा होता की, ब्राह्म तरुणांनी रंगभूमीवर कामे करावीत की करू नये. हेरंबचंद्र मैत्र ह्यांच्यासारखा वृद्ध पुढा-यांचा विरोध होता. तर कविवर्य रवींद्रनाथ टोगोर ह्यांची अनुकूलता होती. अखेरीस रवींद्रबाबूंच्या मताचा विजय होऊन पुढे १९११ सालच्या ब्राह्मसमाजाच्या महोत्सवात तरुण मुलामुलींनी एक सुंदर नाट्यप्रयोग केला. ब्राह्मसमाजातील दोन पिढ्यांमध्ये संघर्षाचे विषय कोणकोणते असू शकतात ह्याची शिंदे ह्यांना ही माहिती नवीनच होती.

पुढील वर्षी म्हणजे १९०७च्या नाताळात सुरतेस धर्मपरिषद भरली. रवींद्रनाथ टागोरांचे वडील बंधू व हिंदुस्थानचे पहिले आय. सी. एस. श्री. सत्येंद्रनाथ टागोर हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते. अहमदाबाद समाजाचे अध्यक्ष लालशंकर उमियाशंकर हे स्वागत मंडळाचे अध्यक्ष होते. सुरतेस ब्राह्मसमाज नसतानाही ही बैठक समाधानकारक रीतीने पार पडली. प्रारंभी उपासना स्वामी स्वात्मानंदजी ह्यांनी चालवली. जाहीर सभेत डॉ. भांडारकर, गुजराथचे प्रसिद्ध कवी नानालाल, लाहोरचे प्रोफेसर रुचिराम सहानी ह्यांची भाषणे झाली. ह्या परिषदेत दुष्काळ निवारण्याचे प्रयत्न करण्यासाठी लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार ह्यांच्या नेतृत्वाखाली एख कमिटी स्थापन करण्यात आली.

१९०७ सालचे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मात्र ह्यावेळी गोंधळाने गाजले. मवाळ व जहाल ह्यांच्यातील झगडा विकोपास जाऊन मवाळांच्या हाती असलेली ही सभा लोकमान्य टिळकांनी उधळून लावली व पुढे काही वर्षे आपल्या मुठीत ठेवली.

१९०६ सालच्या ऑक्टोबरमध्ये शिंदे ह्यांनी मुंबईस डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना करून अस्पृश्यतानिवारणाच्या व त्यांच्या उन्नतीच्या कामासाठी अखिल भारती पातळीवर संस्थात्मक प्रयत्न सुरू केला. ह्या मिशनची एक जाहीर सभा शिंदे ह्यांनी सुरतमध्ये आयोजित केली. मुंबई येथे स्थानिक समाजात प्रार्थनासमाजाचे कार्य करीत असताना धर्मकार्याचा एक भाग समजून शिंदे हे अस्पृश्यवर्गासाठी काही ना काही कार्य करीत होते. मिशनचे काम अखिल भारतीय पातळीवर करण्याची शिंदे ह्यांना ह्या परिषदेच्या निमत्ताने संधी प्राप्त झाली.

१९०८च्या नाताळात मद्रास शहरामध्ये धर्मपरिषदेचे अधिवेशन झाले. लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार हे परिषदेचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष मंगळूर समाजाचे अध्यक्ष उल्लाळ रघुनाथय्या ह्यांचे सुंदर भाषण झाले. सरोजिनी नायडू, अहमदाबादचे रमणभाई नीलकंठ, लाहोरचे धर्मदास सुरी आणि शिंदे ह्यांची जाहीर भाषणे ह्या सभेमध्ये झाली. ब्रिटिश ऍण्ड फॉरेन असोसिएशनचे प्रतिनिधी प्रो. डेव्हिस हे मुद्दाम परिषदेसाठी आले होते.

३० डिसेंबर रोजी शिंदे ह्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची जाहीर सभा रावबहादूर एम. आदिनारायणय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली भरवली. मुख्य भाषण शिंदे ह्यांनीच केले. ह्याचवेळी येथे मिशनची शाखा उघडली. ह्या कामासाठी परिषदेनंतरही ५-६ दिवस ते मद्रासमध्ये राहिले.

१९०९ सालची एकेश्वरी धर्मपरिषद लाहोर येथे भरली. अध्यक्ष कलकत्त्याचे विनयेंद्रनाथ सेन हे होते. पंजाब येथील आदि, नवविधान व साधारण ह्या तीनही ब्राह्मसमाजाच्या पक्षांनी व ह्या तीनही पक्षांच्या ब्राह्मसमाजिस्टांनी मिळून मिसळून काम केले. ह्या परिषदेसाठी बडोद्याचे श्रीमंत सयाजीरावमहाराज ह्यांनी आपला प्रतिनिधी पाठविला.

परिषद आटोपल्यानंतर मुंबईचे श्री. गिरिजाशंकर त्रिवेदी हे शिंदे ह्यांच्यासमवेत लाहोरच्या जाता-येतानाच्या प्रवासात होते. त्यांनी अहमदाबाद, पालनपूर, जयपूर, आग्रा, मथुरा, वृंदावन आणि दिल्ली ही शहरे बारकाईने पाहिली. परिषद आटोपल्यानंतर अमृतसर येथील शिखांचे सुवर्णमंदिरही त्यांनी पाहिले होते. परत येताना अजमीरजवळील अबूच्या पहाडात त्यांनी दोन दिवस धर्मचिंतनात घालविले. तेथील सुप्रसिद्ध जैनमंदिर दिलवारा आणि प्रेक्षणीय स्थळे पाहिली.

ह्या प्रवासास निघण्यापूर्वी शिंदे ह्यांच्या मातोश्री कॅन्सरच्या व्यथेने अत्यवस्थ होत्या. तिला सोडून त्यांना प्रवासास निघवेना आणि गेल्याशिवाय राहवेना असा पेच त्यांच्यापुढे पडला. तू परत येईपर्यंत मी तुला सोडून जात नाही असे आश्वासन त्यांच्या आईने दिले व प्रवासाला जाण्याची अनुज्ञा दिली. शिंदे परत आल्यानंतर फेब्रुवारी १९१० रोजी त्यांच्या प्रेमळ मातोश्री ७० वर्षांच्या होऊन निवर्तल्या.

लाहोर येथील धर्मपरिषदेचा वृत्तांत देताना सुबोधपत्रिकेने लिहिले आहे - “परिषदेचे जनरल सेक्रेटरी रा. वि. रा. शिंदे यांनी परिषदेपुढे आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, १९०३ साली भरलेल्या मद्रासच्या बैठकीत या परिषदेची मंदावलेली स्थिती पाहून १९०४ साली मुंबईच्या बैठकीत हिची पुनर्घटना करण्यात आली. तेव्हापासून मुंबई, वाराणसी, कलकत्ता, सुरत, मद्रास आणि लाहोर या सहा ठिकाणी परिषद भरल्यामुळे तिची भरतखंडात एक फेरी संपूर्ण झाली असून तिच्या विकासाचा एक टप्पा संपला आहे. म्हणजे ब्राह्मसमाजाच्या सामान्य गरजा निरनिराळ्या प्रांतिक पुढा-यांच्या द्वारे एकमेकांस कळून चुकल्या आहेत. ह्यापुढे ह्या परिषदेची अधिक पद्धतशीर घटना व्हावी; मध्यवर्ती कचेरी, निधी आणि वाहून घेतलेले कार्यवाह नेमून त्यांच्या द्वारे वेळोवेळी करण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी व्हावी अशी कळकळीची विनंती रा. शिंदे यांनी केली. ह्यावर पुढे दोन तास कडाक्याचा वाद होऊन शेवटी परिषदेला अद्याप अशी घटनेची वेळ आली नाही, असे बहुमताने ठरले. या निराशेचे कारण कलकत्त्यातील ब्रह्मसमाजाच्या शाखांची मने अद्यापि परस्परांविषयी कलुषित राहिल्यामुळे एकत्र कार्य करणे अशक्य होते.”४

शिंदे ह्यांनी इंग्लंडमध्ये युनिटेरियन पंथाचे काम मध्यवर्ती संस्था कशी करीत असते हे पाहिले होते. लंडन येथील एसेक्स हॉलमध्ये युनिटेरियन पंथाचे कार्यालय होते. गावोगावच्या युनिटेरियन संस्थांबद्दलची एकत्रित माहिती तेथे संग्रहित केलेली असते. व्याख्यानांसारखे कार्यक्रम तेथे होतात. लिव्हरपूल येथील युनिटेरियनांच्या त्रैवार्षिक धर्मपरिषदेमध्ये त्या पंथाची मध्यवर्ती घटना कशी करावयाची ह्यासंबंधी ऊहापोह होऊन निर्णय घेण्यात आले होते व केंद्रीय पद्धतीने युनेटिरियन समाजाच्या कार्याला चालना मिळालेली होती. शिंदे ह्यांनी तेथील कामाची परिणामकारक पद्धती बघितलेली होती. तिचा उपयोग येथेही करून घ्यावा म्हणून धर्मपरिषदेची घटना करण्यासंबंधी त्यांनी लाहोरच्या ह्या परिषदेमध्ये कळकळीची विनंती केली होती. परंतु कलकत्ता येथील ब्रह्मसमाजाच्या तीन पक्षांची मने परस्परांविषयी साफ नसल्यामुळे हे काम होऊ शकले नाही असाच त्यांना अनुभव आला.

मुंबई प्रार्थनासमाजाचे, भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेचे आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम जोरात चालले असतानाच १९१०च्या नोव्हेंबर महिन्यात विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आयुष्यातील अत्यंत दुदैवी घटना घडली. शिंदे यांनी १९०६ मध्ये अस्पृश्य मानलेल्या वर्गाची उन्नती करण्याच्या हेतूने डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापन केली व ते काम जोराने सुरू केले. शिंदे मुंबई प्रार्थनासमाजाचे पगारी प्रचारक होते व समाजाचे काम ते मनापासून करीत असेल तरी आता मिशनच्या कामासाठी त्यांना बराचसा वेळ लागत असला पाहिजे. ह्या व अन्य काही कारणांमुळे प्रार्थनासमाजाच्या धुरिणांमध्ये शिंदे यांच्याबद्दल नाराजी वाढत चालली व अखेरीस तिचे पर्यवसान शिंदे यांना प्रचारकपदावरून दूर करण्यात झाले. म्हणजे १९१०च्या अखेरीस शिंदे यांचा प्रार्थनासमाजाशी अथवा ब्राह्मसमाजाशी औपचारिक स्वरूपाचा कोणताही संबंध राहिला नाही. परंतु या बाबीचा त्यांनी अंगीकारलेल्या भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेच्या संघटनेच्या कार्यावर अथवा एकंदरीतच धर्मकार्यावर कोणताही परिणाम झाला नाही. कारण धर्मकार्य हे आयुष्याचे जीवितध्येय म्हणून त्यांनी पत्करले होते. त्यामधून त्यांना निवृत्त होणे अशक्य होते. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेची त्यांनी १९०४ पासून पुनर्घटना केली होती व ही परिषद दरवर्षी नेमाने भरू लागली होती. अखिल भारतीय पातळीवरील धर्मपरिषदेचे हे काम शिंदे यांनी चालूच ठेवले.

१९१०च्या नाताळमध्ये ही परिषद अलाहाबाद येथे भरण्याचे ठरले होते. ह्या प्रांतातील माहीतगार म्हणून लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार हे शिंदे ह्यांच्या जोडीला सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले होते. परिषदेचे अध्यक्षपद पं. शिवनाथशास्त्री ह्यांनी स्वीकारण्याचे मान्य केले.

परिषेदच्या पूर्वी एक आठवडा शिंदे हे अलाहाबादला पोहोचले. प्रत्येक परिषदेपूर्वी सर्व ब्राह्म व प्रार्थनासमाजांना सर्क्युलर काढून खर्चाची तरतूद करण्याचे काम शिंदे ह्यांना करावे लागत असे. कधी पुरेसे पैसे मिळत, तर कधी मिळतही नसत. शिंदे ह्यांच्या प्रवासखर्चाची नेहमी पंचाईत असे. त्यातून प्रार्थनासमाजाकडून मिळणारा पगारही त्यांना प्रचारकपद सोडल्यामुळे बंद झाला होता. नाताळचे थंडीचे दिवस, आगगाडीतून भयंकर गर्दी व थर्डक्लाची दगदग सहन करून ते अलाहाबादला पोहोचले.

अलाहाबादच्या परिषदेपुढे एक विशेष काम होते ते म्हणजे परिषदेच्या संघटनेचा मसुदा तयार करून मंजूर करून घेणे. हा मसुदा तयार करण्यासाठी हेमचंद्र सरकार, नृत्यगोपाळ राय, लाहोरचे लाला रघुनाथ सहाई आणि स्वतः शिंदे ह्यांची एक पोटसमिती नेमण्यात आली होती. मसुद्यामध्ये पुढील मुद्दे होतेः १) नावः थीइस्टिक कॉन्फरन्स असे असावे, २) उद्देशः एकेश्वरी धर्माचा प्रसार, ३) एकेश्वरी धर्माचे कोणतेही रीतसर निवडून आलेले अनुयायी हे सभासद, ४) परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष, चार सभासद, एक किंवा दोन सेक्रेटरी ह्यांची स्टँडिंग कमिटी, ह्या सर्वांची निवडणूक दरवर्षी परिषदेत व्हावी. वर्षभर काम करून शेवटी अहवाल सादर करणे, ५) ठरावांचा अंमल करणे वगैरे स्टँडिंग कमिटीची कामे, ६) परिषदेच्या ठिकाणी स्थानिक सभासदांची स्वागत कमिटी नेमून आपले आवश्यक ते अधिकार स्टँडिंग कमिटीने ह्या स्थानिक स्वागत कमिटीस तात्पुरते देणे. ह्या नियमात बदल करावयाचा असल्यास परिषदेच्या प्रकट जाहीर सभेत दोनतृतीयांश सभासदांच्या अनुमतीची जरुरी.

वस्तुतः हे नियम संघटना चालविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे होते. परंतु त्यावर लवकर एकमत होईना. म्हणून हा मसुदा निरनिराळ्या ब्राह्म व प्रार्थनासमाजाच्या अभिप्रायासाठी सर्व देशभर फिरविण्यात यावा आणि कलकत्त्याच्या पुढच्या वर्षीच्या परिषदेत हे सर्व प्रकरण सादर करावे, असा ठराव मांडल्यावर तो संमत झाला.

प्रचाराचे जे काम चालले होते ते व्यवस्थित रीतीने चालले नव्हते. तत्कालीन प्रचारक आपापली कामे सोडून बाहेरगावी फारसा संचार करीत नसत. म्हणून शिंदे ह्यांनी एक ठराव आणला; तो असा की, देशातील मुख्य मुख्य ब्राह्मसमाजांनी आपापल्या प्रचारकांना निवडक प्रांतातून निदान तीन महिने तरी संचारास पाठवीत जावे. परंतु हा ठराव बंगाली प्रतिनिधींनी हाणून पाडला. बंगाली माणासाच्या मनोवृत्तीबद्दल शिंदे आपला अनुभव लक्षात घेऊन ह्या संदर्भात म्हणतात, “एकत्र काम करा म्हटले की त्यांचा मस्तकशूळ उठत असे.” १९१०च्या अलाहाबाद येथील ह्या परिषदेचतच शिंदे ह्यांनी दुसरा ठराव आणला तो असा, “बहुजन समाजात ब्राह्मधर्माचा प्रचार करावा.”५ ह्या ठरावाबाबत मात्र एकमत झाले. कारण ठराव बराचसा मोघम होता. शिंदे ह्यांनी हा जो ठराव केला त्या पाठीमागे त्यांचे निश्चित असे धोरण होते. ब्राह्मधर्माचे उज्ज्वल स्वरूप ध्यानात आल्यानंतर १८९८ सालापासून ते प्रार्थनासमाजास जाऊ लागले असता त्यांना असे वाटले की, ह्या धर्माचा प्रचार खेडवळ लोकांत होणे अगत्याचे आहे. शिंदे ह्यांची दृष्टी त्यांच्या अगदी विद्यार्थिदशेपासून बहुजन समाजाचे हित विचारात घेणारी होती. मुंबई, पुणे येथील प्रार्थनासमाजाचा आणि बंगाल व इतर प्रांतातील ब्राह्मधर्माचा अनुभव घेतल्यानंतर शिंदे ह्यांना स्वाभाविकपणे असे जाणवले असणार की, ब्राह्मधर्माचा प्रसार केवळ शिक्षितवर्ग आणि प्राधान्याने उच्च जातीपुरताच मर्यादित होता. शिंदे ह्यांना प्रार्थनासमाजाची ही मोठी उणीव वाटत होती. कारण आपल्या देशात जो बहुसंख्य समाज आहे त्यामध्ये ह्या उन्नत धर्माचा प्रसार केल्यानेच धर्माचे खरे कार्य घडणार असे त्यांना वाटत होते.
 
पुढील वर्षासाठी विठ्ठल रामजी शिंदे, अविनाशचंद्र मुझुमदार, विनयेंद्रनाथ सेन व्यंकटरत्नम् नायडू, गुरुदास चक्रवर्ती आणि नृत्यगोपाळ राय ह्यांची स्टँडिंग कमिटी नेमण्यात आली. पुढील वर्षाचे अधिवेशन कलकत्ता येथे होणार असल्याने हेमचंद्र सरकार ह्यांना जनरल सेक्रेटरी नेमण्यात आले.

१९११च्या नाताळात कलकत्त्यास सिटी कॉलेजमध्ये ही परिषद भरली होती. मंगळूर ब्राह्मसमाजाचे अध्यक्ष उल्लाळ रघुनाथय्या यांना अध्यक्ष नेमण्यात आले. जर्मनीतील गॉटिंजन युनिव्हर्सिटीचे प्रख्यात प्रोफेसर डॉ. रुडॉल्फ ऑटो हे परिषदेसाठी मुद्दाम आले होते. पहिली उपासना सत्येंद्रनाथ टागोर ह्यांनी संस्कृतमधून चालविली. निरनिराळ्या ठिकाणच्या अनेक प्रसिद्ध सभासदांनी महत्त्वपूर्ण भाषणे करून निवेदन वाचले. मागील वर्षीचा परिषदेबद्दलच्या संघटनेचा मसुदा आणि समाजाच्या अभिप्रायाचा अहवाल वाचल्यानंतर संघटनेसंबंधीचा ठराव थोड्याफार फरकाने मंजूर झाला. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी चालविलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे कार्य महत्त्व पावू लागले होते, ह्याचा पुरावा कलकत्त्याच्या ह्या अधिवेशनात पाहावयास मिळतो. बाबू अविनाशचंद्र मुझुमदार ह्यांनी एक ठराव मांडला तो असाः “मुंबई, कलकत्ता, मद्रास, मंगळूर व डाक्का आणि इतर ठिकाणी चाललेले डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे जे कार्य आहे त्याला सर्व ब्राह्म आणि प्रार्थनासमाजांनी सहानुभूती प्रकट करून साहाय्य करीत जावे.” बाबू ललितमोहन सेन ह्यांनी ठरावास अनुमोदन दिल्यावर तो एकमताने पास झाला.

उदार धर्ममतवादी लोकांची जागतिक परिषद आतापर्यंत युरोप व अमेरिका येथे भरविण्यात आली होती. युनिटेरियन लोकांच्या नेतृत्त्वाखाली भरणारी ही धर्मपरिषद हिंदुस्थानमध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न करावे असा एक ठराव कलकत्त्याच्या अधिवेशनात मंजूर झाला. विठ्ठल रामजी शिंदे हे स्वतः १९०३ साली ऍमस्टरडॅम येथे भरलेल्या ह्या जागतिक परिषदेसाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. अशा प्रकारची धर्मपरिषद हिंदुस्थानमध्ये भरविल्यास धर्मकार्याला चांगलीच चालना मिळेल असे शिंदे ह्यांना वाटले. कलकत्ता येथे हे अधिवेशन मोठ्या थाटाने पार पडले. नंतर मेरी कार्पेटर हॉलमध्ये समाजीयांचे स्नेहसंमेलन सुंदर प्रकारे पार पडले. त्यात प्रो. रुडाल्फ ऑटो ह्यांचे सहानुभूतीपूर्ण भाषण झाले. पुढील परिषद बांकीपूर येथे घ्यावयाचे ठरले.

१९१२ सालची ही परिषद सर नारायण चंदावरकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली बांकीपूर येथे भरली. साधारण ब्राह्मसमाज व नवविधान ब्राह्मसमाज येथे असल्यामुळे आणि बाबू हेमचंद्र सरकार सेक्रेटरी असल्याने शिंदे ह्यांना पूर्वतयारीचा त्रास पडला नाही. परिषद सुरळीतपणे पार पडली.

शिंदे ह्यांचे लक्ष डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम वाढविण्याकडे लागले होते. १९०८ सालापासून धर्मपरिषदेच्या वेळी डि. क्ला. मिशनचीही सभा घ्यायला त्यांनी सुरुवात केली. ह्या वेळी डि. क्ला. मिशनचे एक आस्थेवाईक कार्यकर्ते अमृतलाल ठक्कर हे शिंदे ह्यांच्याबरोबर बांकीपुरास गेले होते. तेथे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष नामदार आर. एन. मुधोळकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली मिशनची एक जाहीर सभा झाली. अमृतलाल ठक्कर ह्यांनी अस्पृश्यतेसंबंधी सर्व आकडेवारी तयार ठेवली होती. तिच्या आधारे त्यांनी प्रभावी भाषण केले. त्यांच्या सहकार्याने मिशनची ही सभा उत्तम त-हेने पार पडली.

पुढील अधिवेशन कराची येथे भरावयाचे ठरविले व तेथ नवविधान पक्षाचा जोर असल्यामुळे जनरल सेक्रेटरी म्हणून शिंदे ह्यांना नेमण्यात आले.

१९१३ सालच्या नाताळमध्ये कराचीस खालिकदिना हॉलमध्ये ही परिषद भरविण्यात आली. अमेरिकेचे जे. टी. संडरलँड हे ह्या परिषदेसाठी मुद्दाम आले होते व त्यांनाच अध्यक्ष नेमण्यात आले. १९११ साली कलकत्ता येथे भरलेल्या परिषदेत उदार धर्ममतवादी लोकांच्या जागतिक परिषदेचे अधिवेशन लवकरच हिंदुस्थानात भरवावे असा ठराव पास करण्यात आला होता व त्या दृष्टीने हालचाली केल्यामुळे अमेरिकेतील युनिटेरियन असोसिएशनने डॉ. संडरलँड ह्यांचा भारतातील एकेश्वरी धर्मपंथात परिचय झाला होता. १८९५ मध्ये पुण्यास राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले असता ते उपस्थित राहिले होते व त्याचवेळी पुणे येथील प्रार्थनासमाजात भरलेल्या एकेश्वरी धर्मपरिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला होता. हिंदुस्थानाबद्दल त्यांना कळकळ वाटत होती. १८९७ मध्ये हिंदुस्थानात दुष्काळ पडला असता त्यांनी इंग्लंडमध्ये ६०० पौंड जमा करून दुष्काळ फंडासाठी मदत पाठविली होती.६ शिंदे ह्यांचा त्यांच्याशी चांगलाच परिचय झाला होता.

रेव्ह. संडरलँड ह्यांनी ह्या वेळी आपल्या मुलीस बरोबर आणले होते व त्यांच्या राहण्याची व्यवस्था कराचीमध्ये एका युरोपियन हॉटेलात करण्यात आली होतो. ह्या हॉटेलच्या बाबतीत शिंदे ह्यांना चमत्कारिक अनुभव आला व आपला स्पष्टवक्तेपणा दाखविण्याची त्यांच्यावर वेळ आली. रेव्ह. संडरलँड हे परिषदेचे नियोजित अध्यक्ष म्हणून सेक्रेटरी ह्या नात्याने शिंदे ह्यांना एका महत्त्वाच्या कामासाठी हॉटेलमध्ये भेटावयास जावे लागले. हॉटेलच्या मॅनेजरांनी शिंदे ह्यांना संडरलँडसाहेबांस भेटण्यास मनाई केली. शिंदे ह्यांनी हॉटेलच्या मॅनेजरजवळ आपल्याला आत जाता येत नसल्यास साहेबमजकुरांस आपल्याला भेटण्यासाठी बाहेर आणलेच पाहिजे, असा आग्रह धरला. डॉ. संडरलँड त्यांना भेटण्यासाठी बाहेर आले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी खेद प्रदर्शित केला. शिंदे ह्यांनी त्यांना स्पष्ट बजावले, “कामानिमित्त मला वेळोवेळी भेटावे लागणार. ह्या प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास येथील पाहुणचार सोडून आम्ही व्यवस्था करू तेथे साहेबांना अवश्य जावे लागेल. साहेब सध्या अमेरिकेच्या स्वतंत्र वातावरणात नाहीत, आमच्या देशात आमच्याइतकेच परतंत्र आहेत.”७ त्यानंतर अशा प्रकारची पुनरावृत्ती मात्र झाली नाही. ब्राह्मपरिषदेची सर्व कामे रीतसर पार पडली.

सर नारायण चंदावरकर आणि इतर प्रांतातील बडी मंडळी ह्या परिषदेस हजर होती. पुढील जागतिक परिषद हिंदुस्थानात भरावायाची असल्यामुळे तिच्या पूर्वतयारीसंबंधी विचारविनिमय करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली. हिंदुस्थान देशाची मोठी व्याप्ती लक्षात घेता केवळ ह्या अधिवेशनात जागतिक परिषदेची पूर्वतयारी करणे कठीण होते. म्हणून १९१४ साली कलकत्ता, मद्रास, मुंबई व लाहोर ह्या चार मुख्य ठिकाणी अधिवेशने भरविण्याची योजना ठरली. अमेरिका, युरोप आणि हिंदुस्थान या तीन देशांतील उदार धर्माच्या मंडळींनी निधी जमविण्याची जबाबदारी घेतली. अधिवेशनासाठी कलकत्त्यास हेमचंद्र सरकार, मद्रासला डॉ. व्यंकटरत्न नायडू, मुंबईस शिंदे व लाहोरास प्रो. रुचिराम सहानी ह्या चौघांना आपापल्या प्रांतांतील अधिवेशनाचे सेक्रेटरी नेमण्यात आले.

नियोजित जागतिक परिषदेसाठी बडोद्याचे श्रीमंत सयाजीरावमहाराज ह्यांची सहानुभूती व साहाय्य मिळवावे असे शिंदे ह्यांच्या मनात आले. त्या दृष्टीने श्रीमंत सयाजीराव महाराजांची व डॉ. संडरलँड ह्यांची भेट व्हावी ह्या दृष्टीने महाराजांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला आगाऊ भेटून शिंदे ह्यांनी पूर्वतयारी केली. डॉ. संडरलँड, त्यांची कन्या व शिंदे हे महाराजांचे पाहुणे म्हणून दोन-तीन दिवस राहिले. महाराजांनी आंतराष्ट्रीय धर्मपरिषदेच्या अधिवेशनास साहाय्य करण्याचे आश्वासन दिले व राजवाड्यात डॉ. संडरलँड ह्यांचे एक व्याख्यान करविले. डॉ. संडरलँड ह्यांनी 'इमर्सन' ह्या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर डॉ. संडरलँड ह्यांनी हिंदुस्थानातील प्रमुख शहरी जाऊन तेथील पुढा-यांस समक्ष भेटून जागतिक परिषदेची ठरलेली योजना त्यांना समजावून सांगितली व त्यानंतर ते अमेरिकेस परत गेले.

विठ्ठल रामजी शिंदे हे ह्या जागतिक परिषेदेच्या कामाला वेगाने लागले. जाहीर विनंती करणारे एक लहानसे पुस्तक त्यांनी छापून घेतले आणि ते हिंदुस्थान, युरोप आणि अमेरिका येथील परिचित गृहस्थांस वाटून पत्रव्यवहार सुरू केला. बरीच समाधारकारक उत्तरे आली. युरोपमधील त्या काळचे प्रसिद्ध व अग्रगण्य जर्मन तत्त्वज्ञ प्रो. रुडॉल्फ ऑयकेन ह्यांचे “परिषदेस हजर राहून भाग घेतो” असे अनुकूल उत्तर आले. ते पुढील वर्षी जपानला जाणार होते म्हणून हिंदुस्थानातील त्या परिषदेला हजर राहणे त्यांना जुळवून घेता येण्याजोगे होते. शिंदे ह्यांची पूर्वतयारी अशा त-हेने जोरदार चालली होती. मात्र विधिघटना वेगळीच होती. १९१४ सालच्या ऑगस्ट महिन्यात जागतिक महायुद्धाला अकस्मात प्रारंभ झाला. हे जागतिक महायुद्ध केवळ युरोपच्याच नव्हे तर हिंदुस्थानच्या भविष्यावरही परिणाम करणारे ठरले. नियोजित स्वरूपाची ही जागतिक एकेश्वरी धर्मपरिषद तर हिंदुस्थानात भरली नाहीच परंतु शिंदे ह्यांनी ज्या भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेला सुसंघटित असे रूप दिले होते व दरवर्षी तिची अधिवेशने नियमितपणे भरू लागली होती ती परिषदही विस्कळीत झाली व तिच्या वार्षिक अधिवेशनातही खंड पडला.

शिंदे ह्यांचा मुंबई प्रार्थनासमाजाच्या प्रचारक ह्या नात्याने असलेला औपचारिक संबंध १९१० सालीच संपुष्टात आला. परंतु डि. क्ला. मिशनचे काम मुंबईस असल्यामुळे पुढील ३ वर्षे त्यांना मुंबईतच वास्तव्य करावे लागले. ह्या वास्तव्यामध्ये ते धर्मप्रचारकाचे कार्य त्यांच्या पद्धतीने करीतच असत. १९११ सालच्या नोव्हेंबर मध्ये झालेल्या मुंबई प्रार्थनासमाजाच्या वार्षिक उत्सवात त्यांनी ‘आत्म्याची यात्रा’ ह्या विषयावर मुख्य व्याख्यान दिले. तर १९१२च्या नोव्हेंबरमधील वार्षिक उत्सवात त्यांनी ‘आत्म्याची वसती’ ह्या विषयावर व्याख्यान दिले. त्यांचे भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेचे कार्यही चालू होते. परंतु ह्या कामामध्ये जागतिक महायुद्धाने खंड पडला. इकडे त्यांनी स्थापन केलेल्या मिशनचे काम झपाट्याने वाढू लागले होते. त्यामुळे मिशनचे मुख्य ठाणे मुंबईवरून हलवून त्यांनी पुण्यामध्ये आणले. त्यांचा प्रार्थनासमाजाशी प्रचारक म्हणून असलेला औपचारिक संबंध संपुष्टात आला होताच. मात्र अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी जे कार्य सुरू केले ते त्यांच्या दृष्टीने धर्मकार्यच होते. मिशनमधील शाळांमधून धार्मिक संस्कार करण्याचे कार्य त्यांनी चालवले. त्यांचे स्वतःचे जीवन आणि त्यांचे हे कार्य धर्ममय होते, हा एक वेगळा भाग.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, ७ जानेवारी १९०६.
२.    तत्रैव, ७ जानेवारी १९०६, वा. गो. संत यांनी पाठविलेला वृत्तान्त.
३.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १९१-१९२.
४.    तत्रैव, पृ. १९९.
५.    तत्रैव, पृ. २००.
६.    सुबोधपत्रिका, ८ एप्रिल १९००.
७.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २०२.