मँचेस्टर कॉलेज

११ ऑक्टोबर १९०१ रोजी सायंकाळी चार वाजता विठ्ठल रामजी शिंदे यांनी ऑक्सफर्ड रेल्वेस्टेशनच्या फलाटावर पाय ठेवला आणि खोलगट भागात दिसणा-या ऑक्सफर्ड शहराचे आणि विद्यापीठाचे दर्शन घेतले व त्यांचे अंतःकरण अननुभूत आनंदाने भरून आले. हिंदुस्थानातील जमखंडीसारख्या गावातील आपल्यासारखा खेडवळ मुलगा जगातील नावाजलेल्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येऊ शकला ही धन्यतेची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि तेही ज्या धर्मशिक्षणाची आपल्याला ओढ लागली होती ते घेण्याची संधी प्राप्त झाली याचे समाधान त्यांना वाटत होते. आपले जुने इतिहासकालीन भारदस्त स्वरूप टिकवून ठेवलेल्या ह्या ऑक्सफर्ड नगरीचे निरुंद रस्ते व बोळ ओलांडीत ते मॅन्सफील्ड रोडवरील मँचेस्टर कॉलेजच्या भव्य इमारतीसमोर आले. दारावार सुंदर व सुवाच्य शिलालेख कोरलेला त्यांना दिसला. ‘सत्य, स्वातंत्र्य व धर्म ह्यांस वाहिलेले’. मँचेस्टर कॉलेजची भव्य इमारत आणि शिलालेखात कोरलेले बाणेदार ब्रीद पाहून त्यांचे अंतःकरण अतीव आदराने भरून आले. देवडीवाल्याने त्यांना आत नेले. थोड्याच वेळाने “वयाने व त्याहून अधिक विद्येने वाकलेली एक लहानगी आकृती त्यांचेपुढे आली. ती होती कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. ड्रमंडसाहेब.” प्रिन्सिपॉलसाहेबांनी ह्या परकीय विद्यार्थ्याचे इतक्या कळकळीने स्वागत केले की, जणू त्यांची ह्यांच्याशी फार दिवसांची ओळख होती. प्रिन्सिपॉल ड्रमंडसाहेबांच्या या पहिल्या भेटीतच त्यांच्या मनातील परकेपणाची भावना नाहीशी होऊन आपण जणू काय कुटुंबातच आलो आहोत अशी भावना त्यांच्या मनात उदित झाली. त्यांची भेट विठ्ठल रामजी शिंदे यांना फार आश्वासक व आनंददायक वाटली. दुस-या दिवशी १२ ऑक्टोबर १९०१ रोजी सकाळी ते कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याची नोंद असलेल्या भल्या मोठ्या रजिस्टरमध्ये त्यांनी स्वतःबद्दलच्या सगळ्या नोंदी पूर्ण करून सही केली व ते मँचेस्टर कॉलेजचे रीतसर विद्यार्थी बनले.

भारतातून विद्यार्थ्याने मँचेस्टर कॉलेजात येऊन धर्म का शिकावा? आणि धर्म तो काय शिकणार? ह्या प्रश्नाचे आणि शंकेचे उत्तर डॉ. भांडारकरांनी दिलेले होतेच. या बाबतीत विठ्ठल रामजींची कल्पना सुस्पष्ट होती. त्यांच्या मते, धर्म ही बाब मुळी पढीक शिक्षणाची नव्हेच. येथे परमेश्वरच गुरू, विश्व हीच शाळा आणि सृष्टी हेच पुस्तक. मनुष्य काय मनुष्यास धर्म देणार? धार्मिक कर्मकांड तर ह्या कॉलेजात मुळीच शिवकविले जाणार नव्हते. विठ्ठल रामजींच्या मनात आले धर्माची देणगी देवाने माणसास आधीच देऊन ठेवली आहे व हल्लीही हरघडी तो देत आहे. पण ह्या बीजरूपी देणगीची लागवड करणे हे माणसाचे काम आहे. ह्या शुद्ध बुद्धीच्या काळात श्रद्धेची बाजू उदार धर्माने बरीच राखली आहे आणि शुद्ध बुद्धीच्या पायावर धर्मशिक्षण देण्याचे काम हे कॉलेज करते. इतिहास, तत्त्वज्ञान, श्रुतिग्रंथ, तुलनात्मक टीका, धर्मोपदेश आणि शुद्ध खासगी वर्तन इत्यादी अनेक द्वारा धर्मशिक्षणाचे काम हे कॉलेज निःपक्षपाताने, कळकळीने, दक्षतेने आणि शांतपणे बजावीत आहे.

धर्मशिक्षणासाठी हिंदुस्थानातून येथे आलेले विठ्ठल रामजी शिंदे हे चौथे विद्यार्थी. त्यांच्या आधी बंगालमधून प्रमथलाल सेन (१८९६) बिपीनचंद्र पाल (१८९८) व हेमचंद्र सरकार (१८९८) हे तीन विद्यार्थी आलेले होते.१ ह्या वर्षी जपानमधून टोयोसाकी हा विद्यार्थी ह्या कॉलेजात धर्मशिक्षणासाठी दाखल झाला होता. विद्यार्थी कोणत्याही वंशाचा असो, कोणत्याही देशातील असो ह्या कॉलेजची दारे सर्वांनाच सारखी उघडी असतात.

धर्मशिक्षण देणा-या ह्या कॉलेजचा वेगळेपणा व वैशिष्ट्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे.२ “धर्माच्या इतर कॉलेजातील अध्यापकांस व विद्यार्थांसही ख्रिस्ती शकाच्या तिस-या व चौथ्या शतकात मतांचे जे एकदा जुने नमुने ठरून गेले आहेत त्याप्रमाणे आपला विश्वास आहे अशी उघडपणे प्रतिज्ञा घ्यावी लागते.” असल्या फार्सात ह्या कॉलेजास काही करमणूक वाटत नसल्यामुळे ते येथे घडत नाही. शिंदे यांनी म्हटले आहे, “ह्याचा बहाणा अट्टल सुधारकी असल्यामुळे कोणत्याही बुढ्ढ्या युनिव्हर्सिटीस ह्याचा संसर्ग सोसत नाही. आणि ह्या कॉलेजासही त्याविषयी पर्वा नाही. म्हणून अर्थात कॉलेजातील अध्ययनाचा युनिव्हर्सिटीच्या परीक्षांशी कसलाही संबंध नाही. सुधारकी धर्मविचाराचे संबंध युरोपात मँचेस्टर हे एकच एक कॉलेज आहे. तथापि, धर्मसुधारणेचा रेटा असा तीव्र आहे की, ह्या कॉलेजची उदार मते नकळत इंग्लंडच्या सा-या चर्चमधून झिरपत असतात. आधुनिक शास्त्रास व तत्त्वज्ञानास पटेल अशा प्रकारचे धर्माचे उदार मत उघडपणे प्रतिपादणे व समाजाच्या सर्व थरांत ते पसरविणे यासाठी दरवर्षी ताज्या दमाचे तरुण उपदेशक तयार करण्याचे काम केवळ ह्या कॉलेजात होते.”

अठराव्या शतकात युरोपात आधुनिक शास्त्र ज्या वेळेला नव्यानेच उदयाला येऊ लागले तेव्हा जुना धर्म नवे शास्त्र ह्यामध्ये मोठा संघर्ष सुरू झाला. अशा आणीबाणीच्या प्रसंगी १७५७ मध्ये निघालेल्या वॉरिंग्टन अकॅडमी या संस्थेने आपल्या संस्थेचे रूपांतर करून १७८६ मध्ये मँचेस्टर कॉलेज काढले. १८८२ मध्ये युनिटेरियन समाजाच्या प्रतिनिधींची मिळून त्रैवार्षिक युनिटेरियन परिषदेची स्थापना करण्यात आली. ह्या परिषदेने घेतलेल्या एका निर्णयानुसार मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड येथे आणण्यात आले. ह्या कॉलेजच्या संस्थापकांचा धर्म व शास्त्र ह्या दोहोंवरही सारखाच विश्वास होता. म्हणजे ह्यांचा धर्म शास्त्रीय होता व ह्यांचे शास्त्र धार्मिक होते. वॉरिंग्टन अकॅडमीतील धर्मशास्त्राचे पहिले अध्यापक डॉ. जॉन टेलर (१७५७ ते १७६१) हे वर्षाच्या आरंभी आपले व्याख्यान सुरू करण्यापूर्वी चार तत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवत असत.

१.    सत्यदेवतेच्या नावाने मी तुम्हांस बजावितो की, तुम्ही आताच्या व पुढच्या धर्माध्ययनात, श्रुतिग्रंथातील साधकबाधक प्रमाणे आणि तुमची स्वतःची सदसद्विवेकबुद्धी ह्या दोहींकडे दक्षतेने, निःपक्षपाताने व कसोशीने नेहमी लक्ष पुरवा; कल्पनेचा झपाटा आणि निराधार तर्क ह्यासंबंधी सावध असा.
२.    मी प्रस्थापिलेले कोणतेही तत्त्व अगर विचार ह्यांचा जो भाग तुम्हांस सप्रमाण दिसेल, त्यापेक्षा अधिक मुळीच पत्करू नका.
३.    मी हल्ली शिकविलेले व तुम्ही मानलेले कोणतेही तत्त्व तुम्हांस पुढे कच्चे अगर खोटे दिसेल, तर शंका बाळगा किंवा ते मुळीच टाकून द्या.
४.    आपले मन नेहमी मोकळे ठेवा, दुराग्रह व पक्षाभिमान ह्यांस थारा देऊ नका, इतर ख्रिस्ती बंधूशी प्रेमाने व सलोख्याने राहण्याचे साधन करा, स्वतः विचार करून स्वतः निवाडा करण्याचा जो तुम्हांस जन्मतः हक्क आहे, त्याच्या आड दुस-यास येऊ देऊ नका आणि दुस-याच्या हक्काच्या आड तुम्ही जाऊ नका.
डॉ. मार्टिनो हेही विवेकबुद्धीला महत्त्व देण्याची, नव्या विचारांचे स्वागत करण्याची भूमिका प्रतिपादीत असत. धर्माच्या जोडीनेच सत्य आणि स्वातंत्र्य हे ब्रीद केवळ बोधवाक्यातच न ठेवता अमलात आणण्याची परंपरा असलेले हे एकमेव आणि नमुनेदार कॉलेज होते.

प्रा. जॉन टेलर (१७५७ ते ६१), डॉ. मार्टिनो (१८२७-१८९७) यांसारखे निष्ठावंत, प्रांजळ व कळकळीचे अध्यापक असण्याची परंपरा पुढील काळातही चालू होती. विठ्ठल रामजींनी प्रवेश घेतला त्या वर्षी जेम्स ड्रमंड हे प्रिन्सिपॉल होते. ते विद्येने, श्रद्धेने आणि शीलाने फार मोठे गृहस्थ होते. आपल्या आध्यात्मिक तेजोबलाने सुधारक-सनातनी, नवे-जुने ह्या विशेषणांच्या पलीकडे असणारे डॉ. ड्रमंड यांना पाहून विठ्ठल रामजींना आदरणीय अशा डॉ. भांडारकरांची आठवण झाली. कॉलेजात पाच कायमचे व दोन हंगामी अध्यापक या वेळी होते. कायमच्या पाचांपैकी रेव्ह. ऍडिस हे जुन्या मताचे होते की, ते युनिटेरियन आहेत की नाहीत अशी शंका यावी. मात्र ह्यांना कॉलेजमधून कोणताही उपसर्ग पोहोचत नाही. उलटपक्षी तत्त्वज्ञानाचे प्रो. सी. बी. ऍप्टन, तुलनात्मक धर्म व पाली भाषा शिकविणारे प्रो. जे. ई. कार्पेंटर हे अगदी बावनकशी होते. प्रो. आर. बी. ऑजर्स ख्रिस्तीसंघाचा इतिहास शिकवीत असत. ‘हिबर्ट जर्नल’चे संस्थापक व संचालक असणारे प्रो. जॅक्स हे समाजशास्त्र शिकवीत. प्रो. ड्रमंड हे बायबल आणि धर्मशास्त्र शिकवीत. सगळेच अध्यापक हे त्यांच्या त्यांच्या विषयाचे जाडे पंडित होते. प्रो. कार्पेंटर हे विठ्ठल रामजींच्या तुलनात्मक धर्म ह्या ऐच्छिक विषयाचे विशेष गुरू होते. त्यांच्याजवळ त्यांनी पाली भाषा आणि बुद्ध धर्म ह्या विषयाचा विशेष अभ्यास करावयास प्रारंभ केला.

कॉलेजमधील अध्यापकांची विविध विषयांवरील व्याख्याने मन लावून ऐकणे, नेमलेल्या विषयांचा अभ्यास करणे, पंधरवड्याला निबंध लिहिणे असा त्यांचा कॉलेजचा अभ्यास नियमितपणे चालला होताच. त्याशिवाय त्यांचे अवांतर वाचन, धर्मसाधन चालले होते. पाश्चात्त्यांची जीवनरहाटी, सामाजिक संस्थांची कार्यपद्धती हीही ते निरखीत होते. एका नव्या संस्कृतीचा त्यांना जवळून परिचय घडत होता.

संर्दभ
१.    मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड येथील नोंदवही.
२.    सुबोधपत्रिका, २७ ऑगस्ट १९०२.