प्रस्तावना

डॉ. गो. मा. पवार यांच्या स्नेहापोटी आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विनंतीनुसार मोठ्या आनंदाने मी ही प्रस्तावना लिहीत आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे एवढे सविस्तर, सांगोपांग, समतोल, गौरवपर पण त्याच वेळी तटस्थ आणि अस्सल साधनांवर आधारलेले हे पहिलेच चरित्र कर्मवीर जाऊन जवळ जवळ अर्धशतकाचा काळ होऊन गेल्यानंतर का होईना प्रसिद्ध होत आहे. अशा ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने महर्षींना आदरांजली वाहण्याची संधी मला मिळत आहे याबद्दल डॉ. पवार आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांचे मी आभारच मानतो.

या प्रस्तावनेत प्रस्तुत चरित्राबद्दल व चरित्रनायकाबद्दल मी वेळोवेळी माझी मूल्यमापनात्मक विधाने अत्यंत संक्षेपाने व नम्रपणे वेळोवेळी मांडली आहेत. प्रस्तावनेच्या शेवटच्या विभागात माझे स्वतःचे महर्षींच्या जीवनाबद्दलचे आकलनही विनीत भावाने सादर केले आहे. तरीसुद्धा ही प्रस्तावना प्राधान्येकरून वर्णनात्मक आहे; विश्लेषणात्मक नाही याची नोंद वाचकांनी कृपया घ्यावी. डॉ. पवार यांनी महर्षींचे जीवन कसकसे, कोणत्या सूत्रांनुसार आणि कोणत्या पद्धतीने उलगडून दाखविले आहे हे बहुतांशी त्यांच्याच शब्दांत मी स्पष्ट केले आहे. एवढ्या मोठ्या समाजधुरिणाच्या एवढ्या मोठ्या चरित्राचा आशय थोडक्यात सादर करण्यात जर मी थोडाफार यशस्वी झालो तर बहुसंख्य आणि त्यातही नव्या पिढीच्या वाचकांना ती गोष्ट सोयीची होईल याच आशेने मी हे लिखाण करत आहे.


गेल्या दोन दशकांमधील महाराष्ट्राचा साक्षेपी वेध घेणा-या अभ्यासकांमध्ये एका गोष्टीविषयी एकवाक्यता आढळते. ती म्हणजे महर्षी रामजी शिंदे यांच्या असाधारण अशा सर्वगामी कार्याची आपण आजवर केलेली उपेक्षा. याचा उलगडा करण्याचा यत्न जाणत्यांनी वेळोवेळी केला आहे. उदाहणार्थ, डॉ. वि. भि. कोलते ह्यांच्या मते या उपेक्षेची मीमांसा अनेक दृष्टींनी करता येईल. “ज्या मराठा समाजात ते जन्मले तो त्यांच्याविषयी उदासीन आहे. ज्या दलित समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले त्याला त्याचे महत्त्व कळत नाही आणि राजकारणात ब्राह्मणेतर पक्षाशी सूत न ठेवता ज्या राष्ट्रीय पक्षाला ते मिळाले त्यांच्या महाराष्ट्रीय वारसदारांनी सोयिस्कर रीतीने त्यांची उपेक्षा चालविली आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रात अण्णासाहेबांची कामगिरी अगदीच उपेक्षणीय आहे असे नाही, पण खास पुण्यात भरणा-या साहित्य संमेलनांच्या व्यासपिठावरून जेथे अतिसामान्य व्यक्तिंच्या चोपड्यांचा आवर्जून गौरव केला जातो तेथे आण्णासाहेबांच्या किंवा त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीचा नुसता उल्लेखही होत नाही असा प्रत्यक्ष अनुभव आहे.” अण्णासाहेबांचे अस्पृश्योद्धाराचे कार्य स्पृश्य आणि त्यातूनही वरिष्ठ वर्णांना मनापासून रुचण्यासारखे होते असे नाही तर अस्पृश्यांमध्ये राजकारणाचे नवीन वारे शिरल्याने तेही शिंद्यांची उपेक्षा करू लागले अशी डॉ. कोलते यांची मीमांसा आहे. (कोलते, पृ. २-३).

डॉ. ध. रा. गाडगीळ यांच्या मते कर्मवीरांचे ‘ब-याच अंशी विस्मरण’ झाल्याची कारणे धर्मकारण, संशोधन, अस्पृश्यतानिवारण आणि राजकारण या चारही क्षेत्रांत पुढीलप्रमाणे आहेत. त्यांच्या मते, “आपल्या आयुष्यात कोणत्याच प्रचलित विचारात अथवा कार्यप्रवाहात कर्मवीर शिंदे पूर्णपणे समरस झालेले दिसत नाहीत.” धर्मकार्यात महाराष्ट्रात ब्राह्मोसमाज राहोच, पण त्याची विशिष्ट मराठी आवृत्ती प्रार्थनासमाज यासही कधी महत्त्व प्राप्त झाले नाही. इतिहास व भाषाशास्त्र या दोन्ही क्षेत्रांत कर्मवीर शिंदे यांच्या चिकित्सक, सखोल व स्वतंत्र विद्वतेची खोली व बुद्धीची चमक आपल्याला जाणवते. पण त्यांचे हे लेखन “प्रसंगोपात, वेळात वेळ काढून केलेले... मधून मधून कोठेतरी प्रकाशित झाले असल्यामुळे” त्याचे वजन पडले नाही. डॉ. गाडगीळांच्या मते, “त्या वेळचे मान्यवर संशोधक व विचारांची रूढ दिशा याबाबतचे बरेचसे लिखाण टीकात्मक असल्यामुळे त्याची उपेक्षा झाली हेही घडले असावे.” कर्मवीरांच्या कार्याचा अस्पृश्यतानिवारण हा गाभा होता. पण “त्यांच्या या कार्याच्या पूर्वार्धात स्पृश्य समाजाची फारशी सहानुभूती व मदत त्यांस मिळाली नाही. पुनरुज्जीवित सत्यशोधक समाजाची दृष्टी ब्राम्हणांवरील हल्ल्यात केंद्रित झाली व महात्मा जोतीबांच्या कार्याच्या या दुस-या बाजूकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. पुढील काळात स्पृश्यांची वृत्ती व त्यांच्या कार्याची गतिमानता यांबद्दल अधिकाधिक निराशा उत्पन्न झाल्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अस्पृश्यांनी चढाऊ धोरण व स्वावलंबी मार्ग पत्करला आणि शिंदे साहजिकच बाजूला पडले. राजकरणातही तीच गत झाली.

“कर्मवीर शिंदे यांचा पिंड राजकरणी दिसत नाही. ....परंतु ब्राह्मणेतरांचा सवतासुभा ज्यायोगे होईल असे काही करू नये, असे म्हणणा-याला त्या वेळेस मान्यता न मिळणे साहजिक होते आणि जे तरुण त्यांच्या विचाराशी सहमत होते त्यांचा कल मार्क्सवादाकडे वळल्यामुळे श्री. शिंदे यांच्या व्यापक भूमिका त्यांस पटणे शक्य नव्हते.’’ (मंगुडकर; १९६३, पृ. ७-८). ही झाली कर्मवीर का उपेक्षित राहिले याची डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची मीमांसा. (गाडगीळ, पृ. ७-१०).

कर्मवीर शिंदे यांच्या जीवनाचे मर्म व वर्म उलगडताना श्री. रा. ना. चव्हाण यांच्या मते कर्मवीर उपेक्षित राहिले याचे कारण म्हणजे त्यांनी “कोणालाच सर्वांशी प्रमाण किंवा सर्वांशी अप्रमाण मुळीच मानले नाही..... सत्य हे बहुमतमान्य व लोकमान्य नसते, तरी त्याची साधना त्यांनी सोडली नाही. सत्यासाठी ते एकाकी (अलग-अस्पृश्य!) देखील होत.... विग्रह घेण्याच्या मागे त्यांची जी मौलिक दृष्टी व स्वतंत्र वागणूक झाली, हीच महत्त्वाची ठरते..... तटस्थतेत व त्रयस्थतेत त्यांनी विषाद मानिला नाही. व लोकरंजन व लोकाराधना केली नाही. प्रामाणिक मतभेद झाल्यामुळे व स्वशोधित स्वत:चे पण तात्त्विक सत्यच महत्त्वाचे मानण्याची आग्रही, हट्टी म्हणजे अशा स्वरूपाची सत्याग्रही प्रवृत्ती त्यांच्यात असल्यामुळे मतभेद विकोपाला जाऊन त्यांना जीवनात जबर किमती द्याव्या लागल्या व त्यांनी त्या दिल्या. हेच त्यांच्या जीवनाचे मर्म व वर्म होय, एवढेच नव्हे तर तत्त्वप्रधान मतभेद हाच पाया व शिखर ठरले. ...यामुळेच त्यांचे सारेच जीवन गतिमान व क्रांतिकारक झालेले आढळते..... (त्यांचे विग्रह व तटस्थता) ही सर्व त्यांचा मनोनिग्रह व त्याग दाखवते व ‘ग्यानबाची मेख’ या त्यांच्या हट्टी (!) व आनुष्ठानिक आग्रही स्वभावातच शोधता येते व शोधिली पाहिजे. त्यांची उपेक्षा म्हणजे भारतीय जटिल अस्पृश्यतेच्या चिवट प्रश्नाची व समस्येची उपेक्षा ठरते.” (चव्हाण, पृ. ३०-५६).

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या मते “महर्षी फार पूर्वी जन्माला आले. ते द्रष्टे सेनानी होते. परंतु त्यांच्या विचारांची आणि तत्वज्ञानाची झेप फार उंच आणि लांब पल्ल्याची होती. ती समाजाला त्या काळी पेलण्यासारखी नव्हती. समाजाचे नेतृत्व करणा-या माणसाने समाजापुढे नेहमीच असले पाहिजे. परंतु त्यानं किती पुढे असावे, याला मर्यादा असते. तो समाजाचा वाटाड्या असावा. त्याने दृष्टिक्षेपापलीकडे जाता कामा नये. तो तसा गेला तर मार्गदर्शनाचे कार्यच संपुष्टात येते. शिंद्यांचे जवळ जवळ असेच झाले.’’ (सावंत, पृ. ६-८).

महर्षी शिंदे हे उपेक्षित महात्मा का राहिले ह्याची अगदी अलीकडील भेदक व विचारदर्शक मांडणी भाई डॉ. एन. डी. पाटील यांनी केली आहे. त्यांच्या विवेचनानुसार महर्षींनी “त्यांनी ऐतिहासिक कार्य केलं, तथापि आपण इतके कर्मदरिद्री व करंटे ठरलो की त्यांच्या क्रांतिकारक सामाजिक विचाराचा आणि आचाराचा आशयच आपण ओळखू शकलो नाही. मराठा समाज त्यांच्याबाबतीत इतका अनुदार आणि असहिष्णू वृत्तीने वागला की त्याने त्यांना ‘महार शिंदे’च मानलं आणि त्या वेळी अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणा-या ज्या समाजासाठी त्यांनी आयुष्याची अक्षरशः बाजी लावली व आई, वडील, पत्नी, बहिणी व मुलेबाळे घेऊन महारवाड्यात आपले बि-हाड केले त्या समाजाला त्यांच्या रक्तामांसाचे नेतृत्व मिळाल्यानंतर त्या वर्गाने अण्णासाहेबांचा दुस्वास करायला सुरुवात केली. तशातच ज्या जाणत्या वर्गाला अण्णासाहेबांच्या कार्याचं महत्त्व समजत होतं, त्या वर्गाला त्यांचं कार्य नको होतं.” (पाटील, पृ. ४).

खुद्द प्रस्तुत चरित्रकाराच्या म्हणण्यानुसार महर्षी कोणत्याच मतांशी, पक्षांशी, चळवळींशी तादात्म्य पावले नाहीत. “कारण अशा तादात्म्यामुळे स्वतःच्या मतांना मुरड घालण्याची पाळी येते. शिंदे यांच्या भूमिकेत ही गोष्ट बसणारी नव्हती.’’ (पृ. २६८). म्हणूनच, “ज्या ज्या कामामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणतीही लौकिक स्पृहा मनात न ठेवता स्वतःला समर्पित केले त्या संस्थेमधून बाहेर पडण्याचे, तिच्याशी फारकत घेण्याचे दुर्धर, शोकात्म प्रसंग शिंदे यांच्या आयुष्यात येत राहिले.’’

ब्राह्मणेतर समाजातर्फे २३ एप्रिल १९२५ रोजी महर्षींना पुण्यामध्ये मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी उत्तरादाखल बोलताना स्वतः श्री. शिंदे यांनी “मी माझ्या मुख्य किंवा आनुषंगिक कार्यामध्ये कोणत्याही एका पक्षाच्या अथवा पंथाच्या अधीन झालो नाही. माझा पक्ष केवळ परमेश्वराचा आणि माझी सदसद्विवेकबुद्धी माझा प्रतोद. मला माहीत आहे, की अशा प्रकारचा मनुष्य कोणालाही खूष ठेवू शकत नाही’’ असे उद्गार काढले होते हे आपण विसरता कामा नये.

माझ्या मते तत्कालीन ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात इतरांनीही आपापल्या भूमिका, कार्यक्रम व हितसंबंध यांच्याविषयी आग्रही राहून आपापल्या अग्रक्रमांनुसार कर्मवीरांशी त्या त्या वेळी फारकत घेतली तर ऐतिहासिक विकासक्रमाच्या गतिशास्त्राप्रमाणे समजूनही घेता येते. पण त्या त्या स्थळकाळाचे संदर्भ ओसरल्यानंतरही पुढच्या पुढच्या पिढ्यांनी महर्षी शिंदे यांच्याविषयीचे पूर्वग्रह, किंतू, दुरावा व उपेक्षा सोडू नये यात मात्र ऐतिहासिक दृष्टीचा आपल्याकडे सर्रास आढळणारा अभावच दिसून येतो. आपापल्या जन्मजात जातवर्गाच्या अहंकारातून व हितसंबंधांतून मुक्त होऊन ऐतिहासिक सत्य व सामाजिक वास्तव यांना मुक्तिशील लोकहितपर भूमिकेतून सामोरे जाणे हे किती अवघड असते हीच गोष्ट या उदाहरणाने स्पष्ट होते. आपण जोवर सर्वांगीण सम्यक व सत्यनिष्ठ मुक्तीची दृष्टी स्वीकारणार नाही तोवर कर्मवीर शिंदे यांच्यासारखा महात्मा व महापुरुष उपेक्षेच्याच कक्षेत वारंवार ढकलला जाईल असेच चित्र आज तरी दिसते.

महर्षींचे विस्तृत असे चरित्र आजवर सिद्ध होऊ शकले नाही याचे कारण कोणत्या परिस्थितीत दडलेले असावे एवढ्याकरिता त्यांना भोगाव्या लागलेल्या उपेक्षेची त्रोटक का होईना एवढी मांडणी करावी लागली.


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनाविषयी तसेच विचारधनाविषयी आजवर उल्लेखनीय असे काहीच लिहीले गेले नव्हते असा मात्र उपरोक्त प्रतिपादनाचा अर्थ नाही. प्रस्तुत प्रस्तावनेच्या म्हणजेच कर्मवीरांचे जीवन, व्यक्तिमत्त्व व कार्य यांच्याचपुरत्या मर्यादित संदर्भात बोलावयाचे म्हटले तर १९३० पासून ते थेट आजवर त्यांची अनेक छोटी-मोठी चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. कृष्णराव भाऊराव बाबर (१९३०), डॉ. गंगाधर मोरजे (१९७३), प्रा. संभाजीराव पाटणे (१९७६), डॉ. मा. प. मंगुडकर (१९७६), डॉ. ह. कि. तोडमल (१९८६), डॉ. भि. ना. दहातोंडे (१९९५), श्री. ए. के. घोरपडे गुरुजी (१९९८) व अगदी अलीकडे श्री. अनंतराव पाटील (१९९९) आणि ऍड. पी. के. चौगुले (१९९९) आदींनी महर्षींच्या चरित्र व कार्याचा लक्षणीय परामर्श घेतलेला आहे. १९९० साली प्रा. एम्. एस्. गोरे यांनी कर्मवीरांच्या कार्याचा परिचय एका इंग्रजी ग्रंथातही सादर केला आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखक डॉ. गो. मा. पवार यांनीच १९९० साली नॅशनल बुक ट्रस्टकरिता अठ्ठावन्न पानांची एक पुस्तिका लिहिली होती. तिचा इंग्रजी अनुवादही (२०००) उपलब्ध आहे.

इतके असूनही महर्षींचे अगदी सविस्तर, सर्वगामी, सखोल व चिकित्सक असे चरित्र आजवर उपलब्ध नव्हते. ही उणीव सामान्य वाचक, कार्यकर्ते आणि विचारवंत यांना चांगलीच खटकत होती. ही मोठी उणीव डॉ. गो. मा. पवार यांच्या प्रस्तुत ग्रंथाने फार जिव्हाळ्याने, कसोशीने आणि व्यासंगनिष्ठ पद्धतीने दूर केलेली आहे. कर्मवीरांचे हे चरित्र विस्तृत, अस्सल साधनांवर आधारलेले व विचारप्रवर्तक आहे, याविषयी दुमत होण्याची शक्यता मला तरी फार दिसत नाही.

या चरित्राचे दोन विशेष प्रकर्षाने जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही चरित्रकाराला भेडसावणा-या एका पेचातून डॉ. पवार यांनी अगदी स्पष्ट भूमिका घेऊन चांगलीच वाट काढली आहे. पेच असा की, त्या त्या स्थलकालाचा यथासांग तपशील न देता नुसताच चरित्रपट रेखाटला तर मांडणी सूत्रमय दिसते व ग्रंथ आटोपशीर होतो. पण यातली अडचण अशी असते की तत्कालीन इतिहासाचे ज्ञान असलेला जाणता अभ्यासवर्ग सोडला तर इतरांना असा ग्रंथ रोचक वाटला तरी दुर्बोध ठरतो. मुख्य म्हणजे त्यामुळे चरित्रव्यक्तीची त्या त्या वेळची विवक्षित निवड व वर्तन यांचे मर्म सामान्य वाचकाच्या आटोक्यात येत नाही. याउलट चरित्रव्यक्तीच्या जीवनक्रमाचा उलगडा तत्कालीन स्थलकालाच्या दमदार चित्रणातून करावयाचा म्हटला तर ग्रंथाची गुणवत्ता वाढते पण त्याचा विस्तार घसघशीत आकार घेतो. यामुळे जाणत्या अभ्यासकांना या सर्वपरिचित (!) गोष्टींचा एवढा प्रपंच का मांडला गेला आहे, असे वाटू लागते. तर दुसरीकडे एवढा मोठा ग्रंथविस्तार नव्याने विषयप्रवेश करणा-यांचा हिरमोडही करू शकतो.
डॉ. पवार यांनी यांपैकी दुसरा पर्याय डोळसपणे पण निर्धाराने स्वीकारला आहे. तरुण पिढीतील सामान्य वाचक व कार्यकर्ते या निवडीचे स्वागतच करतील, याविषयी मला शंका नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मातब्बर संस्था पाठीशी असल्यामुळेच डॉ. पवार यांना असले धाडस जमले असेल. त्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानावेत तेवढे अपुरेच ठरतील. पण त्याच वेळी असा ग्रंथविस्तार फापटपसारा ठरणार नाही, याकरिता लेखकापाशी सम्यक दृष्टी, विकारनिरपेक्ष तटस्थता, अस्सल साधनांवर आधारलेला निखळ व्यासंग आणि रसाळ व चित्रमय निवेदनशैली हवी. डॉ. पवार याबाबतीत उणे पडत नसल्याने हे चरित्र एकाच वेळी मनोवेधक तसेच विचारप्रवर्तक असे ठरणार आहे.

दुसरा विशेष म्हणजे डॉ. पवार यांनी महर्षींच्या अतिशय समृद्ध व बहुआयामी विचारधनाची त्यांच्या चरित्राइतकीच विस्तृत व चिकित्सक मांडणी करण्याचा मोह या ग्रंथात टाळला आहे. ही पण एक पेचाचीच बाब होती. पुढच्या अनेक पिढ्यांना वारंवार दखल घ्यावी लागेल एवढा संपन्न वैचारिक वारसा श्री. शिंदे यांच्या विविध लिखाणांत उपलब्ध आहे. तो बाजूस ठेवला तर कर्मवीरांच्या महत्तेचे पूर्ण स्वरूप आपल्याला उमजणार नाही. पण त्यांच्याविषयीच्या विस्तृत चरित्राची उणीव प्रथमतःच भरून काढावयाची ठरविल्यावर डॉ. पवार यांना त्यासाठी दुस-या खंडाची जोड द्यावी लागली असती. हे कार्य स्वत: डॉ. पवार यांना किंवा अन्य कोणाला केव्हातरी करावेच लागेल. पण प्राप्त परिस्थितीत डॉ. पवार यांनी श्री. शिंदे यांच्या लिखाणाचा चिकित्सक परामर्श प्रस्तुत ग्रंथात घेतला नाही, ही गोष्ट मला तरी समर्थनीय वाटते.

चरित्रलेखनाविषयी डॉ. पवार यांनी घेतलेले परिश्रम आपल्याला लगेच जाणवतात. कर्मवीरांसंबधीच्या हस्तलिखित सामग्रीचा धांडोळा त्यांनी चिकाटीने घेतला आहे. त्यामुळेच इंग्लंडमधील मँचेस्टर कॉलेजमधील ग्रंथालयात श्री. शिंदे यांच्या कॉलेजप्रवेशाच्या तारखेची नोंद व सही असलेले रजिस्टर, श्री. शिंदे यांनी पाठविलेली डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माहितीसंबंधीची पुस्तिका, त्यांचे गुरू प्रो. कार्पेंटर यांच्याशी श्री. शिंदे यांचा झालेला पत्रव्यवहार, पॉझ व मार्टिनो क्लब या वादविवादसंस्थांची वृत्तान्त पुस्तके व त्यामुळेच “धर्मप्रसाराच्या कार्यात स्त्रियांना सहभागी करून घेतले तर ते काम अधिक जोमाने चालेल’’, असा श्री. शिंदे यांनी पॉझ क्लबमध्ये मांडलेला ठराव आणि त्या कॉलेजमधील प्रथेप्रमाणे श्री. शिंदे यांच्यावरील कविता व त्यांचे एका समकालीनाने ‘कॉलेज ब्यूटी’ या नावाने काढलेले व्यंगचित्र हस्तगत करू शकले.

समकालीन इंग्रजीच नव्हे तर आपल्या हितचिंतकांच्या साहाय्यामुळे डॉ. पवार यांनी फ्रेंच व डच वृत्तपत्रे, नियतकालिके व ग्रंथ यांचाही अस्सल चरित्रलेखनाकरिता चांगलाच तलास घेतला आहे. त्यामुळेच इंग्लंडमधील युनिटेरिअन चर्चमध्ये श्री. शिंदे यांनी चालविलेल्या उपासना व केलेली भाषणे, कर्मवीरांनी हिंदू गृहस्थितीबद्दल दिलेले व्याख्यान व सादर केलेला नाट्यप्रयोग, ऍमस्टरडॅममधील १९०३ च्या युनिटेरिअन जागतिक त्रैवार्षिक परिषदेत श्री. शिंदे यांनी केलेल्या प्रभावशाली भाषणाचे वृत्तान्त, त्या संदर्भात शिंदे यांच्या फोटोसह डच वृत्तपत्रात आलेली माहिती, तसेच ३० ते ३२ इंग्रजी ग्रंथालयांतून श्री. शिंदे यांनी उल्लेखिलेल्या युनिटेरिअन धर्मपुरुष व संस्था यांच्याबद्दलची माहिती प्रस्तुत चरित्रात प्रतिबिंबित होऊ शकली.

विशेष म्हणजे श्री. शिंदे इंग्लंडमधील एकूण सतरा शहरी आणि त्याच्याच जोडीला ऍमस्टरडॅम, पॅरिस, रोम व पाँपी या नगरात जिथे जिथे गेले तिथे तिथे (म्हणजे विद्यापीठीय व महाविद्यालयीन ग्रंथालये, सार्वजनिक वाचनालये, वस्तुसंग्रहालये व प्राणिसंग्रहालये, वने, उपवने, उपहारगृह, इतकेच नव्हे तर पॅरिसमधील ‘पेर ला शाज’ ही स्मशानभूमी व अन्य प्रेक्षणीय स्थळे) डॉ. पवार आवर्जून जाऊन आले. मुळात डॉ. पवार साहित्याचे रसिक व व्यासंगी प्राध्यापक व समीक्षक, रसाळ लेखक व त्यातही वरील खटाटोप. त्यामुळे कर्मवीर शिंदे यांच्या इंग्लंडमधील वास्तव्याचे व युरोपमधील प्रवासाचे प्रत्ययकारक, चित्रमय व लोभस असे रूप या चरित्रग्रंथातून आपल्यापुढे साकार होते.

महर्षींच्या प्रदीर्घ चरित्रलेखनाचे शिवधनुष्य डॉ. पवार यांनी सहजपणे पेलले आहे. त्याचे त्यांच्या उपरोक्त परिश्रमाच्या जोडीला आणखी एक कारण आहे. डॉ. पवार हे कर्मवीरांच्या जीवनाचा व विचारधनाचा गेली अनेक दशके मागोवा घेत आलेले आहेत. महर्षींचे चिरंजीव श्री. प्रतापराव शिंदे हे डॉ. पवार यांचे सासरे. श्री. प्रतापरावांच्या संग्रहात असलेल्या मोठ्या रोजनिशांचे साक्षेपी व काटेकोर असे संपादन डॉ. पवारांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी या नावाने १९७९ च्या प्रारंभीच ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले होते. महर्षी शिंदे यांच्या “असाधारण व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय देणारी ही रोजनिशी’’  डॉ. पवार यांच्या ४७ पानी प्रस्तावनेमुळे अधिकच खुललेली आहे. डॉ. पवारांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामुळे त्या रोजनिशीचे वाङ्मयीन मूल्यही तिच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांच्याच जोडीला वाचकांच्या प्रत्ययाला येत असते. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महर्षी वि. रा. शिंदे जन्मशताब्दी समारोह समितीने श्री. शिंदे यांच्या ग्रंथसंपादनाचे कार्य ज्या संपादक मंडळावर सोपविले त्याचे डॉ. पवार हेही एक घटक होते. याच मंडळाने १९७६ च्या एप्रिलमध्ये कर्मवीरांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा व १९७९ च्या फेब्रुवारीमध्ये धर्म, जीवन व तत्त्वज्ञान हा असे दोन ग्रंथ संपादून प्रसिद्ध केले. यानंतर मागेच नमूद केल्याप्रमाणे डॉ. पवार यांनी नॅशनल बुक ट्रस्टकरिता विठ्ठल रामजी शिंदे यांचे ट्रस्टच्या याबाबतीतील रिवाजाप्रमाणे ५८ पानांचे एक छोटेखानी पण फार मार्मिक व सुबोध असे चरित्र लिहिले. केवळ सात प्रकरणात महर्षींच्या जीवनकार्याचे रेखीव चित्रण केल्यानंतर आठव्या प्रकरणात केवळ सहा पानात महर्षींच्या ‘संशोधनकार्य आणि साहित्यसेवा’ या क्षेत्रातील असाधारण गुणवत्तेवर त्यांनी अचूक बोट ठेवले आहे. अशा प्रकारे चरित्रलेखनाकरिता घेतलेल्या परिश्रमाला एवढ्या प्रदीर्घ आणि आस्थापूर्ण अभ्यासाची जोड लाभल्याने प्रस्तुत चरित्राला चांगलेच वजन लाभले आहे.


डॉ. पवार यांनी या चरित्राचा पोत मोठ्या कुशलतेने गुंफला आहे. महर्षी शिंदे यांचा जीवनपट एकूण पाच परिवर्तनांतून उलगडत गेला, असे त्यामागचे सूत्र आहे. डॉ. पवार यांच्या मांडणीनुसार कर्मवीरांच्या आयुष्याचे पाच कालखंड असे :

१. १८७३ ते १८९३ हा कर्मवीरांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेईपर्यंतचा आयुष्यातील पहिल्या वीस वर्षांचा कालखंड;

२. १८९३-१९०३ हा कर्मवीर ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजमधून आपला अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परततात तोपर्यंतचा दुसरा कालखंड;

३. १९०३-१९१२ हा कर्मवीर मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून धर्मप्रचारकार्याला प्रारंभ करून १९१० साली मुंबई प्रार्थनासमाजाच्या धुरिणांशी मतभेद झाल्याने प्रार्थनासमाजाचा संबंध सोडतात आणि १९१२ साली भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे मुंबई येथील ठाणे पुण्यास हालवितात तोपर्यंतचा तिसरा कालखंड;

४. १९१२-१९२३ हा कर्मवीर उपरोक्त मंडळ अस्पृश्यवर्गाच्या हाती सुपूर्द करून बाहेर पडतात तोपर्यंतचा कालखंड; आणि

५. १९२३-१९४४ हा महर्षींचे देहावसान होते तोपर्यंतचा अंतिम कालखंड.

कर्मवीरांच्या आयुष्यातील या पाच परिवर्तनांना केंद्रस्थानी मानून ही कहाणी मग आपल्या आंतरिक सुसंगतीने पुढे पुढे विनासायास सरकत जाते.

डॉ. पवार हे साहित्याचे अभ्यासक असल्याने ते एकदम पहिल्या कालखंडाकडे वळत नाहीत. श्री. शिंदे यांच्या जीवनाला वळण देणा-या दोन उत्कट, हृदयस्पर्शी आणि सारभूत घटना सादर करीत डॉ. पवार महर्षींच्या जीवनाची गुरुकिल्लीच सर्वप्रथम वाचकाच्या हातात देतात.

अन्नाची भ्रांत पडावी एवढे दारिद्र्य लहानपणी वाट्याला आलेले असताना आणि आपला बुद्धिमान व कर्तबगार मुलगा आपल्याला सुखाचे आणि समृद्धीचे दिवस दाखविणार अशी आस लागलेल्या वृद्ध आई-वडिलांना धक्का देणारा आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवून आयुष्यभर फकिरी पत्करणारा एक निर्णय महर्षींनी १९०० च्या सप्टेंबर महिन्यात पुणे येथे घेतला. कायद्याची शेवटची परीक्षा अखेरच्या टप्प्यामध्ये आली असताना आणि घेतलेल्या निर्णयापोटी इंग्लंडला धर्मशिक्षणाला जाण्यासंबंधीच्या अटी बिकट असताना तो घेतला हे त्याहूनही विशेष. ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजमध्ये दोन वर्षांच्या धर्मशिक्षणासाठी ब्राह्म व प्रार्थनासमाजांनी निवड केलेल्या श्री. मोतीबुलासा यांचे विलायतच्या वाटेवरच पोर्टसय्यद येथे अकस्मात देहावसान झाले. त्या संदर्भात उपरोक्त महिन्यात पुणे येथे शोकसभा झाली. त्या सभेचा व विशेषत: डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या व्याकूळ भाववृत्तीचा परिणाम म्हणून ‘अंत:प्रेरणेच्या एका प्रबळ क्षणी‘ शिंदे यांनी आयुष्याला कलाटणी देणारा व आयुष्याचे ध्येय निश्चित करणारा निर्णय घेतला.

या घटनेसारखीच दुसरीही एक निर्णायक घटना कर्मवीरांच्या आयुष्यात ‘अशाच एका अंत:प्रेरणेच्या क्षणी‘ घडली. ती म्हणजे प्रार्थनासमाजाच्या प्रचारकपदाची जबाबदारी सांभाळत असताना २८ ऑक्टोबर १९०५ च्या मध्यरात्री भिंगार येथील अस्पृश्यवर्गाचे शिष्टमंडळ त्यांच्या जाहीर सभेसाठी श्री. शिंदे यांनी यावे म्हणून त्यांना भेटले. महारवाड्यातील सभेमुळे भारलेल्या, त्यांच्या आत्यंतिक गरिबीमुळे हळूवार झालेल्या आणि या लोकांची हजारो वर्षांची कहाणी अभ्यासून मन कातर झालेल्या कर्मवीरांनी अस्पृश्यांच्या उद्धाराच्या कामाला वेळ न दवडिता लागण्याचा संकल्प त्याच रात्री केला. त्यानुसार १८ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांनी भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी ही संस्थाही पुढे स्थापन केली. वरील दोन्ही निर्णयाच्या मुळाशी विशिष्ट संस्कारामुळे झालेली कर्मवीरांची घडणच कारणीभूत होती, असे सांगून मगच डॉ. पवार श्री. शिंदे यांच्या मनाची घडण कशी झाली, हे समजावून घेण्यासाठी कर्मवीरांच्या आयुष्याच्या पहिल्या कालखंडाकडे वळतात.

या कालखंडाच्या सुमारे ३५ पानांच्या चित्रणाच्या अखेरीस डॉ. पवार याबाबतचे आपले निष्कर्ष ठामपणे आपल्यापुढे मांडतात. धार्मिक, सामाजिक सुधारणेसाठी आपले आयुष्य वाहून, फकिरी पत्करून एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर कार्य केले हे उदाहरण एक विठ्ठल रामजी सोडता निदान अन्य कुणाही मराठी माणसामध्ये दिसून येत नाही, असे डॉ. पवारांना वाटते. विठ्ठल रामजींच्या हातून भावी आयुष्यात जे अपवादात्मक वाटावे, असे मौलिक स्वरूपाचे कार्य घडले त्याची तयारी त्यांच्या कौटुंबिक वातावरणात झाली होती. त्यालाही त्यांच्या आई-बाबांचा धर्म आणि शील हीच कारणीभूत होती.

आपली भावी सामाजिक सुधारणा बाबांच्या भागवत धर्मातून उदय पावली असे विठ्ठल रामजी शिंदे यांना वाटे. त्यामध्ये ब्राह्मसमाजाचे ते प्रचारक झाल्यानंतरही विशेष भर पडली, असे त्यांना वाटत नव्हते. प्रार्थना अथवा ब्राह्मसमाजांचा मराठ्यांवरच नव्हे तर इतरही महाराष्ट्रीयांवर फारसा परिणाम झालेला नसताना विठ्ठल रामजी मात्र त्याचे आजीव प्रचारक झाले. ह्याचे श्रेय समाजापेक्षाही त्यांच्या वडिलांनी घालून दिलेल्या आचरणाच्या धड्याकडेच जास्त जाते.

विठ्ठल रामजींच्या मातापित्यांच्या घरात पडदानशीनपणा नव्हता की सोवळेपणा राखून जातिभेदाला थारा देणे त्यांना माहीत नव्हते. रामजीबाबांची विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना मुलगा-मुलगी असा भेद न करता शिक्षण देण्यात उत्साह दाखविला होता. ही त्या काळाच्या मानाने व मराठा समाजाच्या बाबतीत अपवादात्मक गोष्ट म्हणावी लागेल. जमखंडीत पहिल्या प्रथम मुलींची शाळा स्थापन करण्यात रामजीबाबांनी सुमारे १८७० मध्येच पुढाकार घेतला होता. ब्राह्मण-लिंगायतांसारख्या ज्या जाती मराठ्यांकडे जेवत नाहीत, त्या जातीची माणसे रामजीबाबांच्या विश्वकुटुंबी घरात जेवत. न्हावी, धोबी वगैरे तसेच मुसलमानांसारख्या परधर्मींयांकडे मराठे जेवत नसत. त्या जातींच्या लोकांशीही त्यांच्या घरी पंक्तिभेद कधी घडत नसे. त्यांच्या व एका सय्यद मुसलमानाच्या दोन कुटुंबांत मोठीच समरसता निर्माण झालेली होती.

अंत:करणाचा जिव्हाळा, हेतूचा शुद्धपणा आणि अकृत्रिम प्रेम हा सर्व सुधारणांचा अटळ पाया असतो; देवाणघेवाणीच्या व्यापारी तत्त्वाने अथवा आधुनिक सुधारकाच्या शुद्ध बुद्धिवादाने ख-याखु-या सुधारणा घडत नसतात अशी विठ्ठल रामजींच्या मनाची जी धारणा पुढील काळात प्रकट होत राहिली त्याचा वस्तुपाठ त्यांना बालपणीच घरच्या घरी गिरवावयास मिळाला होता. स्वातंत्र्याची आवड, नव्या जीवनाची स्पृहा आणि सत्याचा छडा लावण्याची हौस ही विठ्ठल रामजींच्या स्वभावाची मुख्य लक्षणे लहानपणापासूनच दिसून येत होती. त्याला आळा घालण्याचा प्रयत्न विठूच्या लहानपणी आई-बाबांनी कधी केला नाही. या निष्कर्षांच्या संदर्भात “आधुनिक सुधारकाप्रमाणे जातिभेद मोडण्याची उठाठेव करण्याची आम्हांवर कधी पाळीच येत नसे. कारण तो जातिभेदाचा संस्कारच आम्हांवर घडला नव्हता’’ हे महर्षी शिंदे यांचे विधान डॉ. पवार आवर्जून आणि मोठ्या औचित्याने नमूद करतात.

श्री. शिंदे यांच्या पहिल्या कालखंडाच्या संदर्भात जमखंडीचे वातावरण, कर्मवीरांच्या दोन्ही बाजूंकडील आज्या व आजोबा, आई-वडील आणि घर इत्यादींच्या संदर्भात डॉ. पवार यांनी वेळोवेळी चित्रमय व मार्मिक रेखाटने केली आहेत. जमखंडीच्या ब्राह्मणी संस्थानामध्ये शिक्षणाला अनुकूल असलेले वातावरण, त्यांच्या एका आजोबांचा दरबारी मराठेशाही खानदानीपणा, आजोबांतली मराठ्यांची व आजीतील कर्नाटक्यांची लक्षणे, आईवर या वैष्णव ब्राह्मण संस्काराचा असलेला प्रभाव, तरी तिच्यात धर्मभोळेपणा व कर्मठपणा या दोघांचाही असलेला पूर्ण अभाव, शिंद्यांच्या दोन्ही बाजूंकडील घराण्यांचे ब्राह्मणी वळण, त्यांच्या आईवडिलांची संतोषी वृत्ती, रामजीबाबांची फार रागीट स्वाभिमानी वृत्ती तसेच त्यांच्या अकृत्रिम, साध्या व जोमदार रसवंतीचा विठ्ठल रामजींवर झालेला संस्कार इत्यादी गोष्टी डॉ. पवार बारकाईने टिपतात.

“श्री. शिंदे यांची कुलदेवता अंबाबाई, माहेरकडील आजीची कुलदेवता यल्लमा. धर्माचे पहिले संस्कार माझ्या कोमल मेंदूवर आजीच्या त्या द्राविडी देवतेने उठवले”  हे त्यांचे विधान डॉ. पवार आवर्जून नोंदवतात. इतकेच नव्हे तर मोठेपणी द्राविड संस्कृतीबद्दल अनुकूल ग्रह निर्माण व्हायला त्या बालपणातील संस्काराची मदत झाली असणार असा सूचक निष्कर्ष पुढच्याच पानावर नोंदवितात.

याच्याच जोडीला रामजीबाबा वारकरी संप्रदायाशी समरस झाले होते. विठ्ठल रामजींच्या धार्मिक विकासावर त्यांचा मोठा परिणाम झाला. पण मध्यंतरी बबलादीच्या लिंगायत स्वामींचे प्रस्थ व देवधर्माचे कर्मकांड फार वाढले. विविध पंथांच्या अतिथी-अभ्यागतांच्या ‘टोळधाडी‘ मुळेच मिळकत सुटलेली म्हणून सुखवस्तूपणा जाऊन रामजीबाबांच्या हाती भयंकर दारिद्र्य आले. पण घरच्या शेतकरी पेशाकडे न जाता कारकुनी शिक्षण घेऊन प्रथम शिक्षक व नंतर संस्थानी कारभारात भाग घेतलेल्या रामजीबाबांनी आपला प्रतिष्ठितपणा शाबूत ठेवला होता. त्यामुळे ह्या दारिद्र्याचे सावट विठ्ठल रामजींच्या बाल्यावर पडले नाही, याची सर्व हकिगत डॉ. पवार सादर करतात.

सासूसासरे असेपर्यंत त्यांच्या आईला स्वातंत्र्य म्हणजे काय हेही माहीत न करू देणारा जाचक सासुरवास आणि वीस बाळंतपणे, मुलांचे आजार किंवा मृत्यू यामुळे आईची खचलेली शक्ती यांची आठवण डॉ. पवार जागी ठेवतात, एवढेच नव्हे तर “या सर्व करुणरसाने भरलेल्या नाटकात मुख्य नायिकेचे पात्र माझी आई साध्वी यमुनाबाई ही होय. तिची आनंदी आणि विनोदी वृत्ती हीच आमची विश्रांती होती. एकंदर आईच आमची खेळगडी होती. माझ्यामध्ये पुढे पुढे जे स्त्रीदाक्षिण्य आणि हिंदू विवाहपद्धतीसंबंधी कायमची तेढ उत्पन्न झाली, तिचे पहिले बीज ह्या आईच्या खडतर सासुरवासातच आहे. निसर्गाच्याही आधी आपण पहिले हृदयदान दिले ते आईला” , अशी विठ्ठल रामजींनी स्वत:च प्रकट केलेली निरीक्षणेही डॉ. पवार योग्य त्या जागी वेळोवेळी नोंदवून ठेवतात. स्त्रीची महती विठ्ठल रामजींना जाणवली ती आपल्या आईमुळेच असे ते साररूपाने सांगतातही.

तिस-या प्रकरणात विठूच्या आयुष्यातील १८८५ ते १८९१ अखेरच्या आयुष्यातील काळातील सात वर्षांचा समाचार डॉ. पवार घेतात. वडीलभावाच्या अकाली मृत्यूमुळे अकराव्या वर्षीच विठ्ठलाचा बनलेला गंभीर, विचारी व अभ्यासी स्वभाव, त्याची तीव्र ग्रहणशीलता आणि तरल संवेदनशीलता, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेचा आणि साहित्याचा झालेला उत्तम परिचय इत्यादी गोष्टींचा निर्देश यात येऊन जातो. “आपण जातीने मराठा म्हणून शास्त्रीबुवांनी (श्री. गणेशशास्त्री जोशी) कधीही भेदभाव दाखविला नाही, असे विठ्ठल रामजींनी आवर्जून नमूद केले आहे” हीही गोष्ट डॉ. पवार आपल्यापुढे ठेवतात.

हायस्कूलमध्ये विठ्ठल रामजींनी अभ्यासात जी गती दाखविली तिचे श्रेय त्यांनी आपल्या रसिकतेला दिले आहे; बुद्धिमत्तेला नव्हे. त्यांनीच म्हटले आहे की, “(नानाविध विषयांत) माझी गती सारखीच अकुंठितपणे चाले. सर्व हायस्कूलच्या अभ्यासक्रमात मला अभ्यासाचे श्रम म्हणून कधी भासलेच नाहीत. ह्याचे कारण माझ्या बुद्धीचे तेज नसून (मी बुद्धीने साधारण आहे) केवळ माझ्या हृदयाची निर्मळ रसिकताच होय, हे येथे मला नमूद करावयाचे आहे. ही रसिकता मला शाळेपेक्षा घरातच अधिक, गुरूपेक्षा माझ्या आई-बापांकडूनच जास्त मिळाली हे खास. माझ्या घरी जातिभेद नव्हता, तसा माझ्या हृदयात संस्कृतिभेदाचा किंवा पक्षपाताचा कृत्रिमपणाही नव्हता. सौंदर्य जेथे भेटेल तेथे ऊर्ध्वहस्ताने स्वीकारण्यास मी लहानपणापासूनच एका पायावर तयार आहे. मग ते इंग्लंडातले असो, शहरातले असो की, खेड्यातील असो, संस्कृत असो की प्राकृत असो, ते सहज व स्वाभाविक असले की पुरे. मी त्याला बिलगलोच म्हणून समजावे.” उतारा मोठा अतीव नितळ व मनोज्ञ आहे.

“तिस-या इयत्तेपासून सातवीअखेर पाच वर्षापर्यंत त्यांचा वाडा म्हणजे एक अनरजिस्टर्ड शाळा, एक मोफत वाचनालय, एक मुक्तद्वार वसतिगृह, एक धांगडधिंग्याचा जिमखाना होता“  हे कर्मवीरांनी स्वत:च केलेले वर्णन उदधृत केल्यावर डॉ. पवार हे विठ्ठलच्या खेळगड्यांत सर्व जातींचे विद्यीर्थी असत, जातिभेद त्यांच्या गावी नव्हता, सोवळी पोरे ह्या कंपूच्या वा-यालाही उभी राहत नसत, विठ्ठल रामजींच्या भावी चरित्राची, समाजसुधारणेची ही पूर्वचिन्हेच होती, त्यांचे चरित्र असे अंगणातल्या जिवंत धांगडधिंग्यात आणि समानशील सवंगडयांच्या धसमुसळेपणाच्या जिव्हाळ्यात जन्म पावत होते, असा निष्कर्ष आपल्या हातात देतात. त्याच वेळी लहान विठ्ठलाच्या वर्तनातील वेगळेपणा, धाडशीपणा, विक्षिप्तपणा, कधी कधी ‘अर्कटपणा,’ काही अतिरेक आणि व्यक्तिगत व सामुदायिक खेळांचे आणि व्रात्यपणाचे कितीतरी प्रकार यांचा उल्लेखही टाळत नाहीत.’ ही स्पार्टन सहिष्णुता आपाल्यात जन्मजात नसून ती मानीपणाने आणल्याचे’ कर्मवीरांनी नमूद केले असून पुढे इंग्लंडमधील मुक्कामातही धाडसाची आणि विक्षिप्तपणाची लकेर त्यांच्या पुढच्या आयुष्यातही अनेकदा चमकून जाताना दिसते, असे डॉ. पवार सांगतात.

पण याही वयात एकाकीपणे निसर्गात रममाण होण्याची व स्वत:मध्येच गुंग होऊन जाण्याची विठ्ठलाची वृत्ती दिसून येत असे. त्याच्या कल्पनाशील व भावनामय वृत्तीला चौफेर व विपुल अशा अवांतर वाचनाची जोड मिळाली. त्यामुळे त्यांच्या मराठी व कानडी भाषेच्या अभ्यासालाही मोठी मदत झाली. निसर्गाच्या विविध विभ्रमात रंगून जाता जाताच इंग्रजी तिस-या-चौथ्या इयत्तेत असताना वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी आपल्या भावनाशील अंत:करणात स्पष्टरूपाने भक्तिभावनेचा उद्रेक झाल्याचे विठ्ठल रामजींना जाणवले. श्री. शिंदे स्वत:च लिहितात की, “ आईच्याच पुण्यप्रभावाने माझ्या हृदयाचा परिपाक प्रथम धर्माच्या भक्तिरसात व नंतर तत्वज्ञानाच्या शांतरसात झाला.” अर्थातच हा काल व वय यांचा प्रारंभ. आई-बाबांच्या साध्या, सहज आणि निर्हेतुक धर्मभावनांमध्ये आपल्या भावी धर्माचा आणि सामाजिक सुधारणांचा उगम असल्याचे त्यांना जाणवले. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंतचा काळ अशा प्रकारे कर्नाटकामध्ये गेला. कर्नाटकाशी असलेले संबंध पुढील काळातही अखंड, घनिष्ठ व जिव्हाळ्याचेच राहिले. या संदर्भात मला स्वत:ला एक गोष्ट येथे नमूद कराविशी वाटते. कन्नड संस्कृतीचा खोल ठसा शिंदे यांच्या विचारांवर झाला यात शंकाच नाही आणि हा प्रभाव आपणा सर्वांनाच यापुढेही सतत विचारप्रवर्तक व उपकारक ठरणार आहे.

भारतीय इतिहास व संस्कृती आणि त्या चौकोटीत महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व भाषाव्यवहार यांची निकोप, समतोल व अभिनव (ओरिजिनल) मांडणी करण्याच्या दृष्टीने शिंद्यांना संस्कारक्षम वयातील कन्नड संस्कारांचा लाभ तर झालाच पण ह्या विचारांच्या अभ्यासकांनाही अप्रत्यक्षपणे का होईना, यापुढेही सतत होत राहील.

हा कालखंड वैचारिक दृष्टिकोणांच्या संदर्भात प्रामुख्याने प्राचीवादाचा होता. बहुतेक सर्व पंडितांची दृष्टी विविध योग्यायोग्य कारणांमुळे उत्तरेभोवती, आर्यांना केंद्रस्थानी मानणारी आणि संस्कृत भाषासाधनांवरच खिळलेली होती. अशा काळात उपजत व सहजी प्राप्त झालेल्या संस्कारामुळे आणि नंतर त्यात प्रथम कन्नड व पुढे पाली भाषांच्या अभ्यासाची जोड मिळाल्याने विठ्ठल रामजींचे पुढच्या काळातील चिंतन आणि धर्मशास्त्रीय व समाजशास्त्रीय लेखन यामध्ये सतत दक्षिणेचा, आर्येतर समूहांचा आणि द्राविड परंपराचा पोत जिव्हाळ्याने व प्रगल्भपणे गुंफला गेला. त्यांनी आपल्याकडील विविध भाषिकसंबंधांची जी मांडणी केली त्यावरही याचा ठसा चांगलाच उमटला गेला आहे.”मराठीचा जन्म व तान्हेपण कोठे आणि कसेही होऊन गेले असो, तिचे सर्व वर्धन, शील, कौमार्य... खास कर्नाटकांतच बनले” असे त्यांचे मत झाले होते. (शिंदे लेखसंग्रह, संपा. मंगुडकर, पृ. १६७). विविध धार्मिक, सांस्कृतिक संप्रदाय तसेच जातिसंस्था व जाती यांची मांडणी करतानाही शिंद्यांना वरील वारशाचा लाभ झाला. ”मी स्वत: जरी मराठाच असलो तरी कानडीचे उपकार झाले आहेत ते महाराष्ट्राने विसरावेत असे मला कधीही वाटणार नाही” असे उद्गार त्यांनी स्वत:च नोंदविलेले आहेत. (उपरोक्त, पृ. १६९). गेल्या वीसएक वर्षांत भारतीय इतिहास, संस्कृती आणि भाषाव्यवहार यांविषयी जी मौलिक मांडणी बिगर भारतीय आणि भारतीय विद्वान करीत आहेत, ती विठ्ठल रामजींच्या संबंधित मांडणीला पुष्टी देणारीच ठरत आहे.

श्री. शिंदे मॅट्रिक परीक्षा पुणे केंद्रात बसून १८९१ मध्ये अठरा वर्षांचे असताना पास झाले. त्यानंतर जमखंडी येथे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून एक वर्षभर काम केल्यावर १८९३ मध्ये ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसनमध्ये दाखल झाले. येथून त्यांच्या शैक्षणिक जीवनाचा दुसरा कालखंड सुरू होतो.

घरच्या वातावरणाचे संस्कार, वाङ्मय व शास्त्र यांच्या अभ्यासामुळे त्यांच्यात निर्माण झालेला सुसंस्कृतपणा यामुळे त्यांच्या ठिकाणी उच्चतर आकांक्षा निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यामुळे ‘मला जनावरांचा डॉक्टर व्हावयाचे नाही. आटर्स कॉलेजमधील स्कॉलरशिप दिल्यास जावयास तयार आहे’, असे बाणेदार उत्तर जमखंडी संस्थानिकांना दिल्यामुळे स्कॉलरशिपही गेली, नोकरीही गेली व दीपवाळीचा पगारही गेला. हायस्कूलमधील शिक्षकी पेशाची अशी समाप्ती झाल्यावर कुणाच्या ओळखीपाळखीचा आधार नाही, अशा स्थितीत ते पुण्यासारख्या विस्तीर्ण शहरात येऊन पोहोचले.

या संदर्भात श्री. गंगाराम भाऊ म्हस्के यांची पाश्चात्त्य धर्तीची व सुधारकी वळणाची राहणी, वृत्ती व वर्तन तसेच श्री.गोपाळ आगरकरांचे त्यांच्या सुधारक प्रतिमेशी न जुळणारे दर्शन व त्यांनी दिलेले तुटक, तडकाफडकी उत्तर यांची डॉ. पवार यांनी नोंद घेतली आहे. डॉ. शेळके यांनी तर “मराठयाच्या कुळात जन्मून असे हे भिक्षापात्र मिरविण्याची तुला लाज वाटत नाही? जवळ पैसे नसल्यास गुरे राखावीत. कशास शिकावे?’’ वगैरे आयुष्यभर लक्षात राहील अशी तासडणूक केली.

त्यांना साहाय्य झाले ते श्री. गोविंदराव सासने या कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचे व तेरदाळचे बालमित्र विष्णुपंत देशपांडे यांच्या कुटूंबाचे. त्यांच्या पत्नीने भाऊबीजेच्या ओवाळणीत मिळालेले वीस रूपये विष्णुपंतांमार्फत विठ्ठलरावांना पोहोचवले. प्रीव्हियस परीक्षेसाठी मुंबईच्या खर्चाचा प्रश्न असा सुटला.

कॉलेजचे वातावरण व शिक्षणपद्धती बघितल्यावर विठ्ठलरावांचा हिरमोड झाला. त्याचा त्यांच्या मनावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यांना गांजवणा-या आर्थिक अडचणी, एक प्रकारचा लाजाळूपणा, संकोचीपणा व धीटपणा अभाव आणि कॉलेज विदयार्थ्यांमधील आपण ‘सभ्य गृहस्थ ‘ झालो असल्याची आढयता व स्वयंमन्यता यामुळे ठरीव अभ्यासावरून मनही उडू लागले. प्रीव्हियसच्या परीक्षेच्या निमित्ताने विठ्ठलरावांना मुंबईचेही प्रथम दर्शन अनुकूल झाले नाही. एकीकडे खुद्द पुण्याचा म्हणता येईल, अशा एकही विदयार्थ्याने विठ्ठलरावांच्या बाबतीत अंगाशी लावून घेतले नव्हते. तर मुंबईकरांचा स्वभाव त्यांना आत्मशून्य व वरपांगी वाटला.

त्यांची परिस्थिती एवढी बेताची होती की शिक्षणाच्या काळात सुट्टीच्या दिवसात बैलगाडीच्या प्रवासाचे चारआठ आणे वाचवण्याकरिता कुडची स्टेशन ते जमखंडी असा तेहतीस मैलांचा प्रवास ते पायी करत असत. अशा प्रतिकूल परिस्थितीत व औपचारिक कॉलेज शिक्षणाबद्दल दुरावा निर्माण झाल्याने इंटरमीजिएट परिक्षेत त्यांना अपयश आले. पण “स्वत:बद्दलच्या एका खोलवर आत्मविश्वासामुळे सगळा दोष स्वत:कडे घ्यायला त्यांचे मन होत नसावे” असे रास्त मूल्यमापन डॉ. पवार यांनी केले आहे.

मुख्य म्हणजे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही विठ्ठलरावांच्या मनाचा व बुद्धीचा विकास थांबला नाही. अभ्यासक्रमाबाहेरील तात्त्विक महत्वाची पुस्तके त्यांनी पचवली. आगरकर, मिल्, स्पेन्सर वाचून ते स्वत:च्याच शब्दांत ‘पुण्यातल्या विद्यार्थ्यांत एक पठ्ठ्या नास्तिक’ बनले. या काळात त्यांनी पुण्याला एक छोटेखानी चर्चामंडळही स्थापन केले.

१८९५ च्या दुस-या टर्ममध्ये विठ्ठलराव पुण्यास आले ते त्यांची मातोश्री आणि बहीण जनाबाई यांना बरोबर घेऊनच. मात्र पुण्यात बि-हाड करण्याचे स्वत:च्या घरचे जेवण व त्यामुळे होणारी काटकसर हे कारण नसून घरातील स्त्री-नातलगांना स्त्री-शिक्षण व प्रवासाचा लाभ देण्याचा सुधारकी हेतूही त्यांच्या मनात निर्माण झाला होता. हा प्रत्यक्ष परिणाम हरी नारायण आपटे यांच्या कादंब-यांचा असे विधान डॉ. पवार ‘जनाबाई शिंदे : स्मृतिचित्रे,’ तरूण महाराष्ट्र या लेखाच्या आधाराने करतात. १८९६ मध्ये पत्नीलाही त्यांनी पुण्यात आणून बहिणीबरोबर शाळेत घातले.

या टप्प्यावर डॉ. पवार आपल्या निवेदनाच्या संदर्भात एक वळण घेतात. पुढच्या तीन प्रकरणांत त्यांनी विठ्ठ्लरावांची पाठोपाठची बहीण जनाबाई ऊर्फ जनाक्का आणि त्यांच्या मित्रवर्गापैकी कोल्हापूरचे श्री. वासुदेवराव सुखटणकर या अत्यंत गरीब गृहस्थाची बहीण शांता यांची करूण सांगितली आहे.

आईला सोसाव्या लागणा-या दु:खाप्रमाणे श्री. शिंद्यांनी जनाक्काचे सासरचे दु:खही अनुभवले. त्यातून त्यांचा स्त्रीविषयक सहानुभूतीचा, समानतेचा आणि सुसंस्कृतपणाचा दृष्टिकोण तयार झाला असे सार्थ प्रतिपादन डॉ. पवार याबाबतीत करतात. जनाक्काला माहेरी परत आणण्याचा आग्रह धरून ते तिला पुण्याला आईबरोबर घेऊनच परतले. पुढील काळात जनाबाईंनी शिंदे यांच्या उन्नत धर्मप्रसार आणि अस्पृश्यतानिवारण या दोन्ही कार्यांत आयुष्यभर समर्थ साथ दिली. त्याला पोषक अशा व्यक्तिमत्वाची जनाबाईंची जडणघडण पुण्यालाच होऊ शकली. या संदर्भात अमेरिकन ख्रिस्ती मिशनशाळा, पंडिता रमाबाई व प्रो. अण्णासाहेब कर्वे यांच्या कार्याच्या विविध त-हा डॉ. पवार यांनी पेश केल्या आहेत. कर्व्यांनी “ब्राह्मणेतरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही”  असे विठ्ठलरावांना सांगितले. ”कर्वे यांच्या धोरणाबद्दल अतिशय संयमाने विठ्ठल रामजी शिंदे यांनी अभिप्रायकथन केले” असे यथार्थपणे सांगितल्यावर डॉ. पवार श्री. शिंदे यांचा “तत्कालीन महाराष्ट्रात एक सुधारणा करताना दुस-या सुधारणेला कसा अडथळा येई, ह्याचे हे उदाहरणच आहे,” हा अभिप्राय मार्मिक दृष्टीने नोंदवितात.

हुजूरपागा शाळेत जाताना पुण्यात वाट्याला आलेल्या असभ्य कुचाळीचा उल्लेख करून डॉ. पवार स्पष्टपणे म्हणतात की, महात्मा जोतीबा फुले यांनी स्त्री-शिक्षणाला प्रारंभ करून जवळ जवळ पन्नास वर्षे झाली होती. परंतु पुण्यातील सांस्कृतिक वातावरणात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फारशी सुधारणा झाली नव्हती.

इंटरमीजिएटच्याच वर्गात १८९५ साली विठ्ठलराव राष्ट्रीय पक्षाचे झाले. त्यासाठी राष्ट्रीय सभेच्या पुण्यातील अधिवेशनाचे ते स्वयंसेवक बनले. हा राष्ट्रीय बाणा आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या ठिकाणी उत्कटत्वाने वास करीत राहिला, असा संपूर्ण सत्यनिष्ठ असा अभिप्राय डॉ. पवार येथे नोंदवून ठेवतात. पुण्यातल्या सनातनी मंडळींनी सामाजिक परिषदेच्या मंडपाचे निमित्त करून घातलेला गोंधळही विठ्ठलरावांना आपोआपच पाहावयास मिळाला. याच सुमारास अमेरिकन युनिटेरिअन असोसिएशनच्या डॉ. जे. टी. संडरलॅंड यांच्या भेटीत विठ्ठलरावांनी पुण्याला त्यांच्याशी विचारविनिमय केला. पुढे इंग्लंडला जाण्याच्या दृष्टीने त्याचा मोठा उपयोग झाला. याच कालावधीत सयाजीराव महाराजांनी त्यांना दरमहा पंचवीस रूपये स्कॉलरशिप दिली. या दोन्ही कहाण्या डॉ. पवार तपशिलाने मांडतात.

पुढच्या प्रकरणात डॉ. पवारांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या पुण्याचे वर्णन श्री. शिंदे यांच्या दृष्टिकोणातून अचूकपणे रंगविले आहे. विठ्ठलरावांच्या आयुष्यावर अनुकूल परिणाम करणा-या महत्वाच्या घटना पुण्यामध्ये घडल्या. ही वस्तुस्थिती असली तरी पुण्यामध्ये विठ्ठलरावांचे व्यक्तिमत्व घडण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. किंबहुना ते पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाशी कधी समरस होऊ शकले नाहीत. पुण्यामध्ये ते सदैव परकेच राहिले. त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक एवढेच नव्हे तर धार्मिक बाबतीतही दृष्टिकोण पुणेरी मंडळींच्या भूमिकेच्या विरूद्ध स्वरूपाचा होता, असे जाणवते. त्या वेळचा पुण्यातील सर्वसामान्य सुशिक्षित समाज राष्ट्रवादी झाला होता खरा, परंतु सामाजिक बाबतीत सुधारणाविरोधी, प्रतिगामी, रूढ धर्माचे म्हणजे एक प्रकारे सनातन रूढीचेच गोडवे गाणारा होता. व्यापक, उन्नत धर्मकल्पना फारशी लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. बहुजन समाजाचे हित आणि सुधारणा यांकडे फारसे कुणाचेच लक्ष नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांची त्यांना जाणीवही दिसत नव्हती, असे सडेतोड चित्रण डॉ. पवार यथार्थपणे सादर करतात. स्वत: श्री. शिंदे मोठ्या समजल्या जाणा-या माणसांचेही स्वतंत्रपणे मूल्यमापन करतात आणि त्यांचा हा स्वतंत्रपणा आपल्याला जाणवत राहतो, असेही ते रास्तपणे सांगतात. या काळात सोशॅलिझमची बाजू सर्वांनी उचलून धरली पाहिजे, असे विठ्ठलरावांना वाटू लागले होते, याचीही नोंद डॉ. पवार घेतात.

व्यावहारिक कारणांमुळे बी.ए.ला आवडीचे विषय सोडून इतिहास आणि कायदा हे ऐच्छिक विषय श्री. शिंदे यांना घ्यावे लागले. पण एव्हाना जीवनाच्या सगळ्या अंगांकडे विठ्ठल रामजी शिंदे यांचा ओढा होता. राजकारण व राष्ट्रकार्य, स्वार्थत्यागपूर्वक समाजसुधारणेचे कार्य व उन्नत स्वरूपाचे धर्मकार्य यांत विरोध आहे, असे त्यांना वाटत नव्हतेच. उलट या गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये एकमेळ होऊन गेला होता, असे त्यांचे यथार्थ चित्र डॉ. पवार या संदर्भात रेखाटतात.

१८९८ चे वर्ष विठ्ठलरावांच्या दृष्टीने अंत:स्थ कोलाहलाचे गेले. धर्मविषयक विचार व व्यक्तिगत भावनिक पातळी या दोन्ही दृष्टीने श्री. शिंदे यांच्या आत्म्याची भूक शमविण्याची शक्ती नास्तिकपणाच्या वाळवंटात नव्हती. म्हणून शिंदे आगरकर, मिल, स्पेन्सर यांच्या वलयातून बाहेर पडले. पाश्चात्य युनिटेरिअन धर्मपंथाच्या विचारांची रीत, मॅक्सम्युसरचे ग्रंथ, पुण्यातील प्रार्थनासमाजातील वातावरण व उपासना यांचा प्रभाव सरस ठरला. प्रार्थनासमाजाच्या उपासनेमध्ये त्यांना हिंदू धर्माचे निर्मळ आणि उज्ज्वल स्वरूप दिसले. प्रपंच साधून परमार्थ कसा करावा, ह्याचे विवरण त्यांना चित्तवेधक आणि पटण्यासारखे वाटले. वारकरी पंथाच्या आचारविचारांना जुळणारीच ही भूमिका आहे, असे त्यांना वाटले असणार. त्याच्याच जोडीला या कालावधीत श्री. रामचंद्र अण्णाजी कळसकर यांच्यासारख्या उदारमनस्क कर्त्या पुरूषाचा सहवास त्यांना लाभला. महात्मा जोतिबा फुल्यांनंतर अस्पृश्यासंबंधी स्वार्थत्यागपूर्वक काम करणारे कळसकर हे एकमेव गृहस्थच एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस दिसतात, असे डॉ. पवार यांचे याबाबतचे निदान आहे. तेही कार्य करावे, अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती.

मध्यंतरी प्रतापचंद्र मुजुमदार यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या केशवचंद्र सेन यांच्या चरित्राचे व विशेषत: त्याला जोडलेल्या केशवचंद्रांच्या आत्मचरित्राचे व त्यातही त्यातील ‘अग्निस्नान’ हे प्रकरण वाचून प्रार्थनासमाजाचे केवळ सभसदच नव्हे तर आजन्म प्रचारक व्हावे, अशी अनिवार ओढ त्यांना लागून राहिली. परिणामी त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली व ते रीतसर ब्राम्ह्यसमाजाचे अनुयायी बनले. शिंद्यांनी पुणे प्रार्थनासमाजात आपली पहिली उपासना त्याच साली सादर केली. आपला मुलगा प्रार्थनासमाजाचा सभासद झाला हे रामजीबाबांना आणि यमुनाबाईंना फार आवडले. प्रार्थनासमाज म्हणजे आपल्या भागवत धर्माचीच सुधारलेली आवृत्ती आहे, असे त्यांना वाटू लागले, असा अभिप्राय डॉ. पवार येथे जाणीवपूर्वक नोंदवून ठेवतात. डॉ. पवारांनी वरील सर्व वाटचाल सांगोपांग वर्णन केली आहे. इतकी की उपरोक्त ‘अग्निस्नान’ चे भाषांतरही त्यांनी या संदर्भात आपल्याला सादर केलेले आहे. तसेच पूर्ण प्रकरणात हिंदुस्थानातील व बाहेरील उन्नत स्वरूपाच्या एकेश्वरी धर्मपंथांच्या कार्याचे अत्यंत तपशीलवार वर्णन, कर्मवीरांचा त्यांच्याशी राहिलेला आयुष्यभरचा अतूट संबंध लक्षात घेऊन, रेखाटले आहे. बहुतेक वाचकांना ही मोलाचीच सोय झाली आहे, असे वाटते.

अंत:स्थ भावजीवनातील खळबळ या सहा पानी प्रकरणात डॉ. गो. मा. पवार यांनी एका अत्यंत नाजूक, संवेदनक्षम अशा विषयाला हात घातला आहे. असा विषय न टाळता डॉ. पवार यांनी त्याची मांडणी प्रगल्भ, समंजस आणि प्रांजळ अशी केली आहे. आपल्याकडचे बहुतेक चरित्रकार- आजमितीलासुद्धा-थोर स्त्री-पुरूषांविषयी लिहिताना अशा बाबतीत असमर्थनीय मौन बाळगतात. या तुलनेत त्यांच्या प्रस्तुत चरित्राचा एक मानबिंदू ठरावा, असे हे प्रकरण पवारांनी लिहिले आहे.

तत्कालीन प्रथेप्रमाणे विठ्ठलरावांचा विवाह त्यांच्या बालपणी वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे १८८२ मध्ये झाला होता. दोघांच्या वयामध्ये सुमारे साडेआठ वर्षांचे अंतर होते. त्यांच्या पत्नीचा जन्म ऑक्टोबर १८८१ चा. १८९८-९९ मध्ये शिंदे पंचवीस वर्षांचे व त्यांच्या पत्नीचे वय सतरा वर्षांचे होते. या वर्षातील श्री. शिंदे यांच्या वैवाहिक जीवनातील शारीरिक व भावनिक अस्वस्थता व खळबळ यांचे संयमित चित्रण या प्रकरणात आहे. डॉ. पवारांच्या शब्दांत “शारीर विकाराचा उपशम न झाल्यामुळे शरीराची होणारी हानी, एकाकी अवस्थेत होणारे भावनिक व शारीरिक हाल संपण्याची आणि सुंदर, आल्हाददायक वैवाहिक जीवन नव्या संबंधाने निर्माण करण्याची उद्भवलेली आशा व अखेरीस त्याबाबतीतही झालेली निराशा असा हा विठ्ठलरावांच्या भावनिक अस्वस्थतेचा ढोबळ आलेख आहे.”

पत्नीच्या बाबतीतही शारीरिक व मानसिक संवादाची अशी दुहेरी निराशा वाटयाला आल्यामुळे प्रागतिक, नागर व सुसंस्कृत वातावरण असलेल्या कोल्हापूरच्या केळवकर कुटुंबातील तीन बहिणींपैकी बहुधा कृष्णाबाई जीवनाची सहचारिणी व्हावी याबाबत श्री. शिंदे यांनी अत्यंत मर्यादशील पद्धतीने केलेल्या अयशस्वी प्रयत्नाचा निर्देश या प्रकरणात केला आहे. पण पुढच्या दोन-अडीच वर्षांत पत्नीच्या वाढत्या वयानुसार दोघांच्यातील सामंजस्याची भावना क्रमश: वाढत गेलेली दिसते. त्याचे मधुर व मंगल फळ म्हणजे त्यांचे पहिले अपत्य प्रताप याचा ९ सप्टेंबर १९०१ रोजी जन्म झाला. पत्नीच्या विसाव्या व विठ्ठलरावांच्या अठ्ठाविसाव्या वर्षी. ”विठ्ठलरावांचे वैवाहिक जीवन निर्वेधपणे सुरू झाले” असा समारोप करून डॉ. पवार हे प्रकरण पूर्ण करतात.

२१ सप्टेंबर १९०१ रोजी विठ्ठल रामजी शिंदे बोटीने इंग्लंडला प्रयाण करतात.” आज आपल्या कृत्यात्मक अथवा कार्यकारी जीवनाचा आरंभ झाला इत्यादी विचार त्यांच्या मनात येत होते.” याविषयी स्वत: श्री. शिंदे यांचेच उद्गार उपलब्ध आहेत. सयाजीराव गायकवाड यांनी विठ्ठलरावांना इंग्लंडचा प्रवासखर्च तर मंजूर केलाच. त्याशिवाय बी. ए. व एल्. एल्. बी. यांच्या खर्चासाठी मिळालेल्या स्कॉलरशिपच्या बदल्यात संस्थानामध्ये नोकरी करण्याच्या अटीतूनही मुक्तता केली. सयाजीरावांची दूरदर्शक, विधायक, पुरोगामी बांधिलकी इतर अनेक उदाहरणांप्रमाणे याही बाबतीत स्पष्टपणे दिसून येते. इंग्लंडला धर्मशिक्षणासाठी जाण्याच्या आधी लोकमान्य टिळकांचे दर्शन घेण्याकरिता शिंदे त्यांना भेटले. त्यांच्या प्रत्यक्ष भेटीने टिळकांच्या स्वभावाचा “मोकळा दिलदारपणा व दृष्टिकोणाचा उदारपणा “ शिंद्यांना जाणवला असणार. म्हणून पुढच्या काळात शिंद्यांनी लो. टिळकांचे सहकार्य “नि:शंकपणे” मागितलेले दिसते वा सहकार्य केलेले दिसते असा अभिप्राय डॉ. पवार या संदर्भात नमूद करतात. अर्थात कर्मवीर शिंदे हे, त्यापुढच्या काळात टिळकांनी सार्वजनिक जीवनात ज्या ज्या वेळी प्रतिगामी व कचखाऊ भूमिका घेतली त्या त्या वेळी टिळकांवर कठोर टीका करण्याबाबत हयगय करीत नाहीत हेही आपण ध्यानात ठेवले पाहिजे.

प्रवासाला निघताना आपल्या सामानामध्ये विठ्ठलरावांनी आवर्जुन घेतलेला एकतारा, वाटेत मार्सेयचे नॉटर डेम द ला गार्डचे मेरीचे देऊळ पाहिल्यावर “ सौंदर्यशास्त्री आणि नीतिशास्त्री ह्यांच्या सल्याने” चित्रकार व शिल्पकार यांना धर्मसाधनेच्या बाबतीत मदत झाल्यास “आमच्या देवळांच्या सौंदर्यात व पावित्र्यात किती भर पडेल बरे” हे शिंदे यांचे चिंतन, सुधारकी धर्मविचाराचे सबंध युरेपात असले एकच मॅंचेस्टर कॉलेज व त्याचे “सत्य, स्वातंत्र्य व धर्म “हे ब्रीद यांचे सुरेख चित्रण डॉ. पवार करतात.  ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे, कलात्मक सौंदर्य याबद्दल शिंद्यांना उत्कट ओढ होती. पण कोणत्याही कलाकृतीत आध्यात्मिक स्वरूपाचा आनंद देण्याची क्षमता असेल तरच ती त्यांना खरोखरी सुंदर वाटत असे हा अभिप्रायही डॉ. पवार नोंदवून ठेवतात.

त्या वर्षीची नाताळची सुट्टी विठ्ठलरावांनी लंडनला घालविली. याबाबत डॉ. पवार “आधुनिक सुधारणारूपी चीज तयार होण्याची लंडनएवढी मोठी वखार तर जगात कोठे नाही”  हे शिंद्यांचे सूक्ष्म व सखोल वचन उद्धृत करण्यास विसरत नाहीत. लंडनच्या मुक्कामात श्री. शिंदे यांच्या मनावर खोल परिणाम करणा-या दोन गोष्टी घडल्या. २२ डिसेंबर १९०१ च्या रविवारी रेव्हरंड हेन्री वुडस् पेरिस यांचे ‘शांती’ या विषयावरील व्याख्यान त्यांनी एकले. युनिटेरिअन देवळातील व्यासपीठावरून चालू विषयांचा ऊहापोह होतो ही बाब त्यांना विशेष वाटली. उन्नत पातळीवरून केलेले लौकिकातील कार्य व धर्म, नीती आणि धर्म यांना एकरूप मानण्याची विठ्ठल रामजी शिंदे यांची त्यांच्या पुढील आयुष्यातील कृतीतून आणि विचारातून जी भूमिका दिसून येते ती घडण्यामध्ये पेरीस यांच्या ह्या उद्गाराचा मोठाच प्रभाव पडला असावा असे डॉ. पवार यांना वाटते.

३० डिसेंबर १९०१ रोजी शिंद्यांनी डोमेस्टिक मिशनपैकी रेव्ह. समर्स यांचे ‘जॉर्जेस रो’ मधील गरिबांचे दुख: दूर करण्याचे काम अत्यंत सेवाभावी आणि समर्पणशीलवृत्तीने पाहिले. डॉ. पवारांच्या प्रतिपादनानुसार अस्पृश्य मानलेल्या लोकांसाठी ह्या मिशनच्या धर्तीवर संस्था स्थापन करून काम करावे असा विचार शिंद्याच्या मनात आला. ही भेट त्यांच्या आयुष्यातील महत्वाची ठरली.

विठ्ठलरावांचे एक समर्पक निरीक्षण ह्या संदर्भात डॉ. पवार आपल्या नजरेस आणून देतात. श्री. शिंदे म्हणतात की, ”पाश्चात्य सुधारणेचे धर्मरहस्य केवळ चैनीतच नाही. जगात राहून सुख भोगण्याची अत्यंत लालसा ह्या लोकांस आहे हे खरे. पण पृथ्वीवर राहून आकाशातील स्वर्गाकडे उडी न घेता इथेच स्वर्ग उतरविण्याची ह्यांची दिशा आहे. हे लोक स्वार्थी आहेत हे तर खरेच. पण स्वार्थ साधल्यावर परमार्थास ते कसे लागतात हे आम्हांस समजून घेणे आहे.” इंग्लंडमधल्याच पुढील काळातील एका उपासनेत शिंदे यांनी केशवचंद्राचे एक मननशील विधान सांगितले. ’’मी इंग्लंडमध्ये ख्रिस्त शोधण्यासाठी आलो नाही. ही परमेश्वराची कृपा आहे की, माझा ख्रिस्त माझ्याजवळ आहे.” विशेष म्हणजे १९०२ च्या ३० मे रोजी विठ्ठलरावांनी एका अनुभवाची नोंद आपल्या छोट्या रोजनिशीत केली. तीव्र स्वरूपाच्या आध्यात्मिक तळमळीचा परिणाम असेल, परमेश्वराचा आपल्याला साक्षात्कार झाल्याची अनुभूती त्यांना आल्यासारखी वाटली. लवकरच दुसरा असाच एक अनिर्वचनीय आनंदाचा आध्यात्मिक अनुभव सरोवर प्रांतात प्रो. कार्पेंटर यांच्याकडे ते मुक्कामाला असताना आला. जुलै महिन्यात बॉरोडेल दरीमध्ये शतपावली करताना व ऑगस्ट महिन्यात स्कॉटलंडमधील बेन लोमंड डोंगराच्या शिखरावर व पुढे भारताच्या परतीच्या मार्गावर बोटीत त्यांना असेच खाजगी आध्यात्मिक अनुभव आले. ”आध्यात्मिक अनुभव मिळविण्याची किंवा देव पाहण्याची किंवा अनंताचे भान म्हणजेच साक्षात्कार घडण्याची साधने सौंदर्य, सत्त्व, सत्य ही असून देव कारणरूपाने अथवा प्रेमरूपाने व नीतिरूपाने प्रकट होतो” असे श्री. शिंदे यांना वाटे. ”वाचकास ही आत्मप्रौढी आहे असे वाटेल” असे ते म्हणतात. पण विठ्ठलरावांचा एक मनोज्ञ गुणविशेष असा की गूढत्वाचे व व्यक्तिस्तोमाचे अवडंबर न माजवता ते मोकळेपणाने ही गोष्ट स्पष्ट करतात की, “पण खरा प्रकार तसा नाही.” या प्रकाराचा आध्यात्मिक अनुभव हा ह्या जगात काही योग्य अधिकारी धर्मपुरुषास येणारा अनुभव आहे असे नव्हे, तर सर्वच माणसांना हा अनुभव येऊ शकतो अथवा येत असतो” असे सांगून केवळ वृत्तिभिन्नत्वामुळे काहीजण त्या अनुभवाकडे लक्ष पुरवितात, काहीजण पुरवीत नाहीत. मात्र आपल्याला येणा-या अनुभवाचे स्वरुप हे सारखेच असते,” अशी श्री. शिंदे यांची धारणा दिसते असा अभिप्रात्र डॉ. पवार या संदर्भात प्रकट करतात. इंग्लंडमधील व स्कॉटलंडमधील काही अनुभवांती जी आध्यात्मिक तळमळ शिंद्यांना लागून राहिली होती ती शांत झाली असे दिसते असेही डॉ. पवार म्हणतात.

मला तर महर्षी शिंदे यांची याबाबतची भूमिका तुकारामांचीच आठवण करून देते. ‘मेघवृष्टीने करावा उपदेश परि गुरुने न करावा शिष्य |’ अशी उन्नत दृष्टी तुकारामांनी जोपासली होती. शिंद्यांना आपल्या मातापित्यांकडून वारकरी पंथाचा जो समताशील साधनेचा वारसा लाभला होता त्याचाच या संदर्भातील शिंद्यांची भूमिका हा परिपाक असावा. निसर्गसौंदर्यातून मानवतावादी आध्यात्मिक विकास व अनुभव साधण्याच्या संदर्भात येथे आपल्याला श्री. रवींद्रनाथ ठाकूर यांचीही आठवण येईल. महर्षीची सौंदर्यदृष्टी ठाकूरांइतकीच तरल होती. पण गुरूदेवांच्या अध्यात्मपर सौंदर्यानुभवात डोकावणारी व्यक्तिकेंद्रितता महर्षीच्या अनुभवात आपल्याला तिळमात्र आढळणार नाही.

“(निसर्गसुंदर) उच्च वातावरणात उदात्त व पवित्र विचार सुचणे फार सोपे आहे. अशा एकांतवासात मन शुद्ध राखणे व तत्त्वज्ञानी होणे साहजिक आहे. पण जनसमूहात मिसळून जीवनकलहात गुंतलो असता मनाची अशी स्थिती ठेवणे मात्र अत्यंत कठीण. थोर पुरूषांस ते साधते” अशी शिंदे यांची एक मननीय नोंद लक्षात ठेवण्यासारखी आहे. (शिंदे, १९७९, पृ. १२६). ”पर्वतशिखरांच्या वाटेने येताना अंधारात व आडवळणीस कित्येक प्रेमी जोडपी प्रियाराधनात गर्क झालेली दिसली. हे मानवी संसारातील अत्यंत गोड पवित्र चित्र मला येथे वारंवार दिसते.” हा शिंद्यांचा अनुभव उद्धृत करण्यात डॉ. पवार यांनी चांगलीच सूक्ष्म दृष्टी व औचित्य दाखवले आहे. डॉ. पवार यांनी याच संदर्भात शिंद्यांचे दुसरेही एक निरीक्षण अगत्यपूर्वक नोंदवले आहे ते असे की, ’’मानवी प्रेमाचे हे स्वाभाविक प्रदर्शन पाहून ज्यास विषाद वाटेल तो खरा हतभागी, करंटा, खोट्या तत्त्वज्ञानाने बिघडलेला, खोट्या नीतीच्या कल्पनांनी कुजलेला म्हणावयाचा.” विठ्ठलराव पुढे असेही म्हणतात की, ’’आम्हा पौरस्त्यांना ह्या सर्व प्रकारांत केवळ अनीतीच दिसण्याचा संभव आहे. पण दिसणे व असणे ह्यात दोहोंपक्षी पुष्कळ वेळा कितीतरी फरक दिसतो.” (शिंदे, १९७९, पृ. ११९). ”जीवनातील सारभूत वस्तू प्रेम ही असून ह्या प्रेमावीण जीवन जीवनालाच मुकते आणि मागे नुसते अस्तित्वच उरते” असे विठ्ठलरावांनी महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या मृत्यूनंतर केलेल्या उपदेशसमयी तीनएक वर्षांनंतर म्हटले होते. या गोष्टीचीही आवर्जून दखल घ्यावयास डॉ. पवार विसरत नाहीत.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कामजीवनाविषयीच्या उपरोक्त मतांमुळे ज्यांना ते जन्मभर फार श्रेष्ठ कोटीचे मानव मानत त्या महात्मा गांधींच्या एतद्विषयक मतांचीही आठवण आपल्याला होणे स्वाभाविक आहे. स्त्री-पुरुष संबंधाविषयी व कामजीवनाबद्दल गांधींनी जेवढा मूलगामी, सर्वांगीण विचार आयुष्यभर केला तेवढा कोणत्याच राष्ट्रपुरुषाने केला नसेल. दुर्दैवाने त्यांच्या या संदर्भातील विचारांची व प्रयोगांची सवंग व उथळ पद्धतीने नेहमी टिंगल किंवा संवेदनशून्य मांडणी होत असते. आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून गांधीजी ब्रम्ह्यचर्याचे प्रयोग नोआखालीत का करीत राहिले याचा मागोवा घेण्याची तसदीसुद्धा सहसा घेतली जात नाही. अर्थात याबद्दल मतमतांतरे होतच राहणार अशी मान्यता स्वत: गांधींनीच दिली असती. पण गांधीच्या या महान प्रयोगांचे असाधारण महत्त्व गृहीत धरूनही त्यांच्या तुलनेत मला स्वत:ला विठ्ठल रामजींची कामविषयक भूमिका जास्त मोकळी, निकोप, स्वाभाविक आणि भारतीय परंपरांमध्ये मुरलेली दिसते. गांधी लैंगिक जीवनाविषयीची ख्रिश्चन व व्हिक्टोरिअन अपराधी भावना कधीच पूर्णपणे झटकून टाकू शकले नाहीत. याउलट इंग्रज आणि पाश्चात्य मिशन यांच्यात गांधींएवढ्याच सहजपणे वावरलेल्या विठ्ठल रामजींच्या भूमिकेत पाश्चात्य कामजीवनाच्या मोकळ्याढाकळ्या अविष्काराबद्दल कौतुक आहे. पण त्याच वेळी त्याविषयी असणारी ख्रिश्चन धर्मशास्त्रीय अढी मात्र त्यांनी दूर ठेवली. 'अलौकिका न होये लोकांप्रती' असा समरस भाव त्यांच्या जीवनाचा स्थायीभावच दिसतो.

या निसर्गाच्या भटकंतीत विठ्ठल रामजी शिंदे यांची चिकित्सक व समाजशास्त्रीय दृष्टी जागीच  होती. १९०२ च्या जुलैमधील केसिक कन्व्हेनशनच्या संदर्भात “आमच्याकडे जशा वार्षिक क्षेत्राच्या ठिकाणी यात्रा जमतात तसेच हे कन्व्हेनशन मला दिसले. पण आध्यात्मिक दृष्टीने दोहोंत फारच मोठा फरक आहे. आमच्या ज्या कर्मठ यात्रा (काशी, रामेश्वर इत्यादी उच्च वर्गाच्या आणि जोतिबा, जेजुरी, सौंदत्ती इत्यादी खालच्या जातीच्या,) (आणि) भक्तीच्या म्हणजे पंढरपूर, आळंदी वगैरेच्या अशा दोन प्रकारच्या यात्रा आहेत. (त्यामध्ये) केसिकची दुस-यांत गणना होईल. सुधारणेला अनुरूप अशा समाजावर जोराचा व काही अंशी इष्ट परिणाम होतो. तितका आमच्याकडे हा परिणाम होत नाही” असे श्री. शिंदे सांगतात.

त्याचप्रमाणे 'लेक डिस्ट्रिक्ट्स'च्या वाटेवर असता कारखान्यांनी गजबजलेल्या प्रदूषणयुक्त प्रदेशातून जाताना “प्रगतीची ही काळी खरखरीत बाजू जाणवून श्री. शिंदे अंतर्मुख झाले. सुधारणेच्या बाह्म भपक्यामागे तिचे हे कष्ट, घामाच्या धारा कशा असतात हे त्यांना जाणवले” याही गोष्टीची नोंद घ्यावयास डॉ. पवार विसरत नाहीत.

या “संपूर्ण प्रवासात आणि युरोपमधील (पुढील) वास्तव्यात (शिंद्यांच्या) ठिकाणी सामान्यत: भारतीय प्रवाशाची त्या काळात दिसून येणारी न्यूनगंडाची भावना यत्किंचितही दिसून येत नाही. धर्मविषयक आणि संस्कृतीविषयक विचारावर दुरभिमान किंवा न्यूनगंड यांचा प्रभाव पडलेला जाणवत नाही. त्यांची भूमिका सदैव निरामय सत्यनिष्ठतेचीच प्रकट होताना दिसते” असा रास्त निर्णय डॉ. पवार या सर्व नोंदीतून काढतात.

विठ्ठलरावांच्या ऑक्सफर्ड येथील वास्तव्याच्या अखेरच्या दिवसांत त्यांनी तेथील युनिटेरियन समाजाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात हिंदुस्थानातील गृहस्थिती व समाजस्थिती या विषयावर एक व्याख्यान दिले. जोडीला मध्यम स्थितीतील कुटुंबाचे नाट्यरूप देखावेही त्यांनी सादर केले. चोविसाव्या प्रकरणात डॉ. पवारांनी सादर केलेले हे व्याख्यान व तो प्रसंग हा विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या जीवनातील एक अतिमहत्त्वाची घटना होती, असे आपल्याला नि:शंकपणे म्हणता येते. हे व्याख्यान अजूनही त्याच्या मौलिक ताजेपणाने आणि अचूक व संवेदनक्षम समाजशास्त्रीय मांडणीमुळे आपल्याला प्रभावित करते. एकेश्वरी धर्माच्या उदात्त, व्यापक अशा आध्यात्मिक जाणिवेने प्रगल्भ बनलेल्या भूमिकेतूनच विठ्ठलरावांनी संपूर्ण जगाच्या इतिहासाचे व संस्कृतीचे भान ठेवत पण त्याच वेळी डोळस राष्ट्रीय आत्मविश्वासाने ही मांडणी केली आहे, असे या संदर्भात डो. गो. मा. पवार म्हणतात. त्यांचे हे विधान योग्य व तरलस्पर्शी असेच आहे.

यानंतर ऍमस्टरडॅम येथील सप्टेंबर १९०३ च्या आंतरराष्ट्रीय धर्मपरिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या संदर्भात शिंद्यांनी केलेल्या कामगिरीचे यथार्थ वर्णन करण्याच्या बाबतीत डॉ. पवार यांनी घेतलेले कष्ट व दक्षता उल्लेखनीय आहे. डॉ. पवार यांनी दोन गोष्टी साक्षेपाने नोंदविल्या आहेत. “हिंदू धर्माची तत्त्वे आणि आदर्श पाश्चात्त्य विद्वानांनी जितक्या मानाने समजून घेतली आहेत त्या मानाने पाश्चात्त्य देशातील धर्मशास्त्रवेत्यांनी घेतली नाहीत” हे शिंदे यांचे एक निरीक्षण तसेच “हिंदू धर्म म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे व हल्ली त्याचे शासन आणि नियमन असंख्य जातींचा जो एक मोठा व्यूह बनलेला आहे त्याचे द्वारा होत आहे आणि त्याचा पाया आध्यात्मिक तत्त्वावर रचलेला नसून सामाजिक आणि कौटुंबिक हितसंबंधावर रचला आहे. हिंदुस्थानमध्ये ज्याचे खरे जुलमी साम्राज्य चालू आहे तो आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ ह्यांच्यापैकी कोणी नसून चालू वहिवाट हीच होय” असे श्री. शिंदे यांचे दुसरे विधान. या दोन्ही गोष्टी निश्चितच मननीय आहेत.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या परदेशातील वास्तव्यात प्रकट झालेली आध्यात्मिक साधना, सामान्यजन व समता याबद्दलची कळकळ, सौंदर्यबुद्धी, समाजशास्त्रीय दृष्टिकोण, मनोरम्य वङमयीन शैली तसेच शिंद्यांचे छाप टाकणारे व्यक्तिमत्त्व, शालीनता, प्रगल्भता व रसिक विनोदबुद्धी, मुख्य म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल त्यांनी दाखविलेली विशेष आस्था या सर्वांचीच दखल जागोजागी डॉ. पवारांनी कुशलतेने घेतलेली आहे. म्हणूनच ऑक्सफर्ड सारख्या कर्मठ विद्यापीठाने स्त्रियांना पदवी देण्याची तयारी दाखविल्यावर पुरुष विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ आणि केलेला दंगा याविषयी शिंद्यांनी केलेल्या विधानांचाही ते रास्त उल्लेख करतात.

विठ्ठलरावांच्या जीवनाच्या दुस-या कालखंडाचा समारोप करताना डॉ. पवार सांगतात की, “इंग्लंडमधून परत येत असताना एक प्रकारची सफलतेची जाणीव ते (शिंदे) अनुभवीत होते. वृत्ती शांत, अधिक प्रगल्भ झाल्या होत्या. मन व्यासंगाने, चिंतनाने, अनुभवाने अधिक अध्यात्मप्रवण बनले होते.” अशा प्रकारे शिंदे ६ ऑक्टोबर १९०३ रोजी मुंबईत परत पोहोचले.


१९०३-१९१२ या कालखंडात विठ्ठल रामजी शिंदे यांचे रूपांतर कर्मवीर शिंदे यांच्यात व १९१२-१९२३ या पुढच्या कालखंडात कर्मवीर शिंदे यांचे रूपांतर महर्षी शिंदे यांच्यात झाले असे आपण म्हणू शकतो. इंग्लंडहून परतताच कर्मवीरांनी क्षणाचीही उसंत न घेता प्रार्थनासमाजाच्या धर्मप्रचारकाच्या कार्याला निश्चयी व जोरकास सुरुवात केली. या काळातील त्यांनी हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या भागांत वारंवार केलेल्या दौ-यांची, हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची, वेळोवेळी भरविलेल्या परिषदांची आणि या संदर्भात दिलेल्या भाषणांची सविस्तर पण काटेकोर तशीच वर्णनपर आणि विश्लेषक मांडणी प्रकरणवार पद्धतीने सादर करून डॉ. गो. मा. पवारांनी एक मोठेच काम केले आहे. याच कालावधीत कर्मवीरांनी केलेल्या अस्पृश्यविषयक कार्याच्या प्रारंभिक प्रयत्नांची परिणती भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या स्थापनेत कशी झाली व नानाविध अडचणींना तोंड देत ते कार्य कर्मवीर कसे पार पाडत गेले याचाही रोचक वृत्तान्त डॉ. पवार सादर करतात. मिशनच्या स्थापनेनंतर प्रार्थनासमाजाच्या वातावरणात झालेला बदल आणि प्रार्थनासमाज व शिंदे यांच्यात वाढत गेलेला दुरावा आणि अंतिम फारकत यांची कहाणीही डॉ. पवार विस्ताराने व चिकित्सक रीतीने सांगतात. हे करताना शिंद्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अनुभवांचे, अडचणींचे चित्रणही ते जागोजाग करतात.

या टंकलिखित दोनशे पाच पानांच्या निवेदनातील डॉ. गो. मा. पवार यांनी अधोरेखित केलेल्या नानाविध मनोज्ञ बाबींपैकी फारच थोड्या गोष्टींचा आशय पुढीलप्रमाणे : स्वदेशी आगमन झाल्यानंतर बडोद्याला दिलेल्या भेटीत अस्पृश्यांच्या शिक्षणाची व नोकरीची सांगड घालणारी व्यवस्था हवी असे श्री. शिंद्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराजांना सुचविले. बडोद्याच्याच पानसुपारी समारंभात ‘मी मराठा म्हणून फक्त मराठ्यांकरता नाही’ अशी स्पष्ट व परखड जाहीर भूमिका त्यांनी घेतली. व्यापार करण्याच्या पद्धतीत जर ख्रिस्ती लोकांची व्यावहारिकता आम्ही मुकाट्याने उचलतो, तर धर्मप्रचाराबद्दल का हेटाळावी असे म्हणून त्यातील जोरकसपणा, सहानुभूती आणि व्यावहारिकता या गणांचा स्वीकार सर्वांनी करावा असे आवाहन शिंद्यांनी केले. आचार्य व प्रचारकार्य ही त्यांच्या धर्मकार्याची दोन प्रमुख अंगे पोस्टल मिशन, उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग आणि तरुण ब्राह्मसंघ या तीन नवीन संस्थांची भर त्यांनी समाजाच्या कार्यात घातली. सुबोधपत्रिकेत लेखन करतानाच मुंबईच्या प्रार्थनासमाजाच्या अस्पृश्यांसाठीच्या शाळा व पंढरपुरातील बालहत्या प्रतिबंधक जागृत देखरेख ठेवून त्यांना चेतना दिली.

कर्मवीर जमखंडीला गेले असताना एका लहान मुलीला मुरळी सोडण्याच्या कामी त्यांनी प्रतिबंध केला म्हणून लोकक्षोभ उसळला. तरी पण आपला कृतिशील सुधारक बाणा त्यांनी बोथट होऊ दिला नाही. १९०५ च्या अडतिसाव्या प्रार्थनासमाजीय वार्षिक उत्सवात अस्पृश्यांतील काही मंडळींना पंक्तीत घेऊन एका नव्या प्रथेला प्रारंभ केला. त्याच वेळी उपासनेत संगीतातही लोकांना आवडावा असा फरक केला. कर्मवीरांनी त्याच वर्षी रामनवमीच्या दिवशी पुणे येथे मीठगंज पेठेत अस्पृश्यांसाठी एका रात्रीची शाळा उघडली. मीठगंज पेठ हे महात्मा जोतीराव फुले यांचे वास्तव्याचे ठिकाण. ‘ही घटना फुले यांचे खंडित झालेले कार्य शिंदे यांनी नव्याने सुरू करावयाचे ठरविले याची द्योतक म्हणावी लागेल’ असे डॉ. पवार सार्थपणे म्हणतात. याच सुमारास शिंद्यांच्या प्रचारकार्यावर नियंत्रण पडावे म्हणून प्रार्थनासमाजात तापदायक हालचाली सुरू झाल्या. कोणत्या प्रतिकूल वा-याला तोंड देत देत कर्मवीरांना यापुढे समाजाचे कार्य करावे लागेल याची ही सुरुवात होती. वावदुकांना वाव न देण्याची कर्मवीरांच्या कार्यपद्धतीतील खुबी तर उल्लेखनीय होती.

१९०५ च्या ऑक्टोबरमध्ये अहमदनगर येथील व्याख्यानात राष्ट्रघटनेचा सात्त्विक व दैवी हेतू काय याचे विवरण कर्मवीरांनी केले. आमच्या लहान लहान जाती व प्रांतिक राष्ट्रे यांचे एकच भारतीय महाराष्ट्र बनविणे ही ब्राह्मधर्माची एक आज्ञा आहे. पुढे त्याच वर्षी सोलापुरात बोलतानाही देशसेवेचे आद्य तत्त्व म्हणजे राष्ट्रीय ऐक्य अशी मांडणी त्यांनी केली. १९०३ ते १९०६ या कालावधीत ब्राह्मधर्म प्रचाराच्या जोडीला ते एकेश्वरी धर्मपरिषदेचे कार्यही संघटित करत होते. अखिल भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेचे कार्यही त्यांनी पुढे १९०४ ते १९१३ च्या दरम्यान चिटणीस म्हणून तडाख्याने केले. १९१० च्या अलाहाबादच्या धर्मपरिषदेत कर्मवीरांनी एक ठरावच मान्य करून घेतला तो असा की बहुजन समाजात ब्राह्मधर्माचा प्रचार करावा. यापाठीमागे शिंद्यांचे निश्चित असे धोरण होते. त्यांची दृष्टी अगदी विद्यार्थिदशेपासूनच बहुजन समाजाचे हित विचारात घेणारी होती. त्यामध्ये ह्या उन्नत धर्माचा प्रचार केल्यानेच धर्माचे खरे कार्य घडणार असे त्यांना वाटत होते, असा सार्थ व विचारार्ह निष्कर्ष डॉ. पवार यांनी येथे नोंदविला आहे.

धर्मकार्याचा एक भाग म्हणून कर्मवीरांनी १९१२ साली ‘दि थिइस्टिक डिरेक्टरी‘ (ब्राह्मधर्मसूची) ह्या ग्रंथाचे संपादन व लेखन केले. पण याबाबतीतही ब्राह्मधर्मप्रचारकांची असलेली अनास्था त्यांना जाणवली. ”ब्राह्मधर्म ही प्रार्थना करणारी संस्था आहे. प्रयत्न करणारी नव्हे, असे केव्हा केव्हा विनोदाने सांगण्यात येत. त्यात सत्याचा अंश बराच आहे, असे हा (धूळ खात पडलेला) ग्रंथ जोराने पुकारीत आहे” असे श्री. विठ्ठल रामजींनी त्याबद्दल लिहिले. ‘व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, प्रयत्नाला व स्वाभाविक विकासाला महत्त्व देण्याची शिंदे यांची भूमिका होती. आध्यात्मिक विकासातही ते याच भूमिकेचा पुरस्कार करताना दिसतात,’ असा अभिप्रायही नमूद करण्यास डॉ. पवार विसरत नाहीत. अस्पृश्यांकरता औद्योगिक व्यवस्था हवी, असे सुचविणा-या दूरदर्शी कर्मवीरांनी स्वत:च्या घरात अस्पृश्यांबरोबर भोजनादिक व्यवहार केव्हाच सुरू केला होता. उच्चवर्गीय सुधारकसुद्धा याबाबतीत पूर्णतया मागास असण्याच्या काळातील ही कर्ती धडाडी आहे. याच संदर्भात शिंदे कुटुंबीयांच्या वाट्याला अनेक अवमान आले. कर्मवीरांच्या वडिलांना व जनाबाईंना अस्पृश्यता पाळत नाहीत म्हणून जवळ जवळ बहिष्काराला तोंड द्यावे लागले. सर्वच शिंदे कुटुंबीय मुंबईत अस्पृश्य वस्तीत राहून त्यांच्याशी समरस झाले. महात्मा गांधी भंगी वस्तीत राहू लागण्याच्या आधीची कित्येक दशकांची ही गोष्ट आहे हे आपण विसरता कामा नये.

२८ ऑक्टोबर १९०५ च्या भिंगारच्या अस्पृश्य मंडळींच्या रात्रीच्या सभेत अस्पृश्यतानिवारणाच्या कामाकरिता जीवन समर्पित करण्याचा निर्णय कर्मवीरांनी अंत:प्रेरणेतून घेतला हे आपण मागे पाहिलेच आहे. भिंगारच्या त्याच वर्षातील दुस-या सभेमध्ये अंत्यज सुधारक मंडळींच्या पंधरवड्याच्या सभेत श्री. डांगळे मास्तर यांनी सभेचे नियम वाचून दाखविले. ते नियम ऐकून, ”नीच म्हणविणा-यांनी उच्च म्हणविणा-यांस सभ्यतेचा मोठाच धडा शिकविला ह्यात काही नीचांशिवाय इतरांस शंका येणार नाही” असा शेरा कर्मवीरांनी रोखठोकपणे मारला आहे.

१७, २४ व ३१ डिसेंबर १९०५ च्या ‘सुबोधपत्रिके’ च्या अंकात विठ्ठल रामजींनी अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी मिशन स्थापण्याच्या आवश्यकतेबाबत विस्तृत लेख लिहिले. अस्पृश्यतेचा उल्लेख त्यांनी ‘राष्ट्रीय पाप’ आणि ‘राष्ट्रीय दुष्कृत्य’ अशा शब्दांत केला. ह्या लेखांमध्ये ख्रिस्ती मिशनांनी जे काम केले आहे त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला असला तरी “आपल्या वाढत्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये एक अस्वस्थता निर्माण करणारा परकीय घटक असे त्याचे वास्तव स्वरूप ध्यानात घ्यावे लागते” असेही म्हटले आहे असे डॉ. पवार सांगतात. हे मिशन परकीय असून चालणार नाही तर ते देशी असले पाहिजे व ह्या मिशनने एकदम क्रांती न करता आपला धर्म, परंपरा व सामाजिक जीवन यांमध्ये क्रांती नव्हे, तर विकास घडवून आणला पाहिजे अशी भूमिका कर्मवीरांनी घेतली असे प्रतिपादन या लेखांच्या आधाराने डॉ. पवार करतात.

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपला निर्धार संस्थारूपाने साकार केला. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांनी भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) या अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्योद्धारासाठी कार्य करणा-या संस्थेची स्थापना केली. तिचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर तर ते स्वत: जनरल सेक्रेटरी झाले. मिशनच्या पहिल्या बक्षीस समारंभात सयाजीराव महाराजांचा केवळ महार जातीकडूनच गौरव व्हावा व इतर अस्पृश्य जातींचा त्यात सहभाग असू नये असे दडपण याबाबतीत कर्मवीरांवर आले. मानपत्र एकत्रितपणेच द्यावे अशी भूमिका त्यांनी घेतली. एरव्ही “त्यांच्यासाठी काम करण्यामध्ये वरिष्ठ वर्गालाही विघ्ने येऊ लागतील” अशी स्वत:ची भूमिका त्यांनी नोंदवूनही ठेवली आहे. मिशनचे काम हे व्यापक पायावर व जातिनिरपेक्ष भूमिकेवरून चालले पाहिजे हा शिंदे यांचा आग्रह ठाम स्वरूपाचा होता असा आपला स्वत:चा अभिप्राय डॉ. पवार या संदर्भात देतात.

कर्मवीरांनी १९०७ डिसेंबरच्या सुरत येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनापासून जोडीलाच अस्पृश्यतानिवारक परिषदेचे अधिवेशनही सुरू केले. या संदर्भात ह्या कामाबद्दलचा योग्य प्रकारचा दृष्टिकोण राष्ट्रीय पातळीवर कसा कसा वाढत गेला याचाही विस्तृत परामर्श डॉ. पवार यांनी सादर केला आहे.

विठ्ठल रामजींनी मुरळी सोडण्याच्या प्रथेला प्रतिबंध बसावा म्हणून ‘पश्चिम हिंदुस्थानातील मुलांचे रक्षण करणारी संस्था’ याच साली स्थापन केली. १९०८ साली श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बडोदे येथे लक्ष्मीविलास पॅलेस येथे अस्पृश्यवर्गाच्या स्थितीबद्दल कर्मवीरांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. बहिष्कृत भारत या नावाने पुस्तिकेच्या रूपाने तसेच सुबोधपत्रिकेमध्येही ते प्रसिद्ध झाले. मात्र हा कालखंड कर्मवीरांच्या कौटुंबिक हालअपेष्टांचाही कालखंड ठरला. त्यांची चंद्राबाई ही बहीण १९०७ साली क्षयाने वारली. १९१० नंतरच्या दोन वर्षांत त्यांचे आईवडीलही वारले. १९१० सालीच त्यांचा प्रार्थनासमाजाचा पगारी प्रचारक या नात्याने असलेला संबंध जिव्हारी घाव बसून संपला. योगक्षेमाचे तुटपुंजे का होईना जे साधन होते तेही नाहीसे झाले. घरातील मंडळी रोगग्रस्त झाली. शिंदे रंजीस आले. पण ते आपले सार्वजनिक कार्य निर्धाराने कसे वाढवीत राहिले हे आपण पुढे पाहूया.

या सर्व संदर्भात डॉ. गो. मा. पवार यांनी ‘मुंबई प्रार्थनासमाजाशी दुरावा आणि फारकत’ असे वीस पानांचे एक प्रकरणच लिहिले आहे. हे प्रदीर्घ प्रकरण महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास समजण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. मिशनचे काम करताना दुरावा क्रमश: वाढत गेला व त्याचे पयर्वसान संबंध तुटण्यात झाला. पुढील काळात तर शिंदे यांची दखल घेण्याचेच मुंबई प्रार्थनासमाजाने बंद केले. डॉ. पवार असे सार्थपणे म्हणतात की हा प्रसंग शिंदे यांनी मोठ्या धैर्याने सहन केला याची प्रमुख दोन कारणे संभवतात. एक म्हणजे परमेश्वरावर असलेला त्यांचा अढळ विश्वास व दुसरे आपण अस्पृश्यतानिवारणाचे जे कार्य करीत आहोत ते ईश्वराचेच काम आहे, ते धर्मकार्यच होय ही त्यांची दृढ श्रद्धा. कर्मवीरांची सत्यनिष्ठ, उदात्त, बाणेदार, निर्भीड आणि कृतिनिष्ठ भूमिका आणि धैर्य या वादाच्या निमित्ताने चांगलेच दिसून आले यात मुळीच शंका नाही. दुरावा निर्माण झाला त्याचे एक कारण मुख्यत: मुंबई प्रार्थनासमाजातील मंडळींचा सामाजिक सुधारणेबद्दल असलेला दृष्टिकोण व त्यांची कार्यपद्धती यामध्येच पाहावा लागतो. शिंदे यांनी अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याच्या कार्यात जी धडाडी दाखविली व त्यांनी या कामात स्वत:ला जे झोकून दिले ते मंडळींना फारसे भावण्याजोगे नव्हते. या संदर्भात न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या लोकोत्तर पुरुषाची एकंदरीत सामाजिक सुधारणेबद्दल मनोवृत्ती काय होती हे पाहिले असता प्रार्थनासमाजाच्या (कातर) दृष्टिकोणाचीही आपल्याला कल्पना येऊ शकते असे म्हणून डॉ. पवारांनी पुणे येथील प्रार्थनासमाजात प्रारंभीच्या काळात झालेल्या एका चर्चेचा वृत्तान्तच सादर केला आहे. त्यामुळे या प्रश्नावर चांगलाच झगझगीत प्रकाश पडतो. रावबहादूर रानडे यांच्या मते “जोपर्यंत पुष्कळांची समजूत आपल्या समजुतीहून निराळी आहे तोपर्यंत आपल्या समजुतीप्रमाणे आचरण करणे बरोबर नाही” असे होते. याउलट शिंदे यांचा विद्यार्थिदशेपासूनच उक्ती व कृतीमध्ये संगती व ऐक्य असा सदैव कृतिशील, सत्याग्रही आग्रह होता. यामुळेच कर्मवीरांना चीड येत असे. जातिभेद राखण्याच्या बाबतीत इतर सुधारक व प्रार्थनासमाजीय यांच्यात म्हणूनच काही भेद करणे शिंद्यांना मान्य नसे.

श्री. शिंदे यांच्या जिव्हाळ्यातील काही मंडळींनाही त्यांचे धोरण नापसंत होते. उदाहरणार्थ, बाबण बापू कोरगावकर. कोरगावकरांचा दृष्टिकोण समाजातील सभासदांचा प्रातिनिधिक दृष्टिकोण म्हणता येईल. प्रचारकाचे काम हे मुख्यत: धर्मप्रचार करणे व समाजाची आनुष्ठानिक काम करणे हे होय व मिशनसारखे लोकोपयोगी काम करणे याला कोरगावकर दुय्यम स्थान देत. तर शिंदे यांच्या मताने धर्मकार्य व अस्पृश्यतानिवारणाचे काम यामध्ये अभेद होता. कोरगावकरांनी शिंद्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये असाही एक मुद्दा मांडला होता की धर्मविषयक कामातूनच मिशनचे काम करण्यासाठी लोक पुढे येतील. याविषयी डॉ. गो. मा. पवार यांनी खरी वस्तुस्थिती निर्भीडपणे मांडली आहे. प्रार्थनासमाजाच्या तोवरच्या चाळीस वर्षांच्या अवधीत असले काम करणारा कोणीही पुरुष पुढे आलेला दिसत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राधान्याने पांढरपेशा मनोवृत्तीच्या समाजाच्या सभासदांच्या अंत:करणामध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची खरी आचच नव्हती. शिंदे समाजातून बाहेर पडल्यानंतरच्या काळातही समाजातून अशा प्रकारचे कार्य करणारा कोणी पुरुष पुढे आला नाही हा मुद्दा डॉ. पवार खणखणीतपणे मांडतात. खरोखरी मिशन स्थापन झाल्याबरोबरच ते कोणाच्या ताब्यात असावे यासंबंधी प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर वर्षभरातच सुरू झालेले वादंग १९१० च्या मध्याला तीव्र स्वरूपाचे बनले. प्रार्थनासमाजाच्या पहिल्या प्रचारकांचे चिरंजीव डॉ. माधव केळकर ह्यांनीच मुंबई समाजाच्या तोवरच्या तिन्ही मिशन-यांना समाजाच्या कमिटीपुढे हात टेकावे लागले” हे स्पष्ट केले आहे.

कर्मवीर व प्रार्थनासमाज यात अंतराय घडण्याचे दुसरे कारण म्हणजे शिंदे यांची राजकारणविषयक भूमिका ही होती. समाजीय मंडळी मवाळ, पांढरपेशी व बहुसंख्येने ब्रिटिशधार्जिणी होती. लोकमान्य टिळकांच्या मद्यपाननिषेधाच्या चळवळीतील त्यांचा सहभाग, टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाल्यावर शिंद्यांनी साप्ताहिक उपासनेत टिळकांकरिता गहिवरून केलेली प्रार्थना नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या खुनानंतर मिशनसंबंधी संशयाचे उठलेले काहूर, याच संदर्भात खुद्द चंदावरकरांच्या मनातले शिंद्यांविषयीचे काहीसे किल्मिष, शिंदे यांच्या कार्याचा वाढता बोलबाला यांमुळे त्यांच्याबद्दलचा समाजाचा दुरावा वाढीस लागला. अशा परिस्थितीत कर्मवीरांनी एक लोकोत्तर, सत्याग्रही भूमिका घेतली. “समाजाचे काम मी माझे आध्यात्मिक काम म्हणून पत्करले होते. एखाद्या ऐहिक नोकरीप्रमाणे लेखी राजीनामा देऊन तीमधून सुटून जाणे मला इष्ट वाटेना. ज्या नोकरीसाठी मी अर्ज केला नव्हता ती कशी संपणार?’’ असे स्पष्टीकरण शिंद्यांनीच नोंदवून ठेवले आहे. डॉ. पवार सांगतात की ह्यातून सुटण्याचा एकच मार्ग त्यांना दिसू लागला. तो हाच की, समाजाने देऊ केलेले अल्पसे वेतन बंद करावे. पण समाजाची नोकरी सोडू नये. अंतिमत: मुंबई प्रार्थनासमाजाच्या कमिटीने १९१० च्या नोव्हेंबर महिन्यात ठराव करून प्रचारक म्हणून श्री. शिंदे यांना दूर केले. 
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 
१९१२ साली कर्मवीरांनी धर्मप्रचारार्थ लिहिलेले लेख, व्याख्याने इत्यादिकांचे पुस्तक विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश या नावाने बी. बी. केसकर यांनी संपादित केले. याच वर्षी भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे मुंबई येथील ठाणे शिंदे यांनी पुण्यास हालविले. याच वर्षी शिंद्यांनी मिशनची महाराष्ट्र परिषद पुणे येथे यशस्वीपणे भरविली. सुमारे ४०० स्पृश्य- अस्पृश्य जातींचे पुढारी व प्रतिनिधी यांचे सहभोजन झाले. यावेळी ब्राह्मण आचा-यांनी संप केला. तेव्हा पाहुण्या मंडळींपैकी ब्राह्मण बायकांनी आणि स्वागत कमिटीतील अस्पृश्य सभासदांच्या बायकांनी स्वयंपाक केला. ह्या प्रसंगाने पुण्याचा सुधारकीपणा आणि सनातनीपणा या दोन्ही प्रवृत्तींचे एकाच वेळी वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडले हे स्पष्ट करण्यास डॉ. पवार विसरत नाहीत. याच परिषदेत आलेल्या महार मंडळींची मांगाच्यासमवेत एका पंक्तिस जेवायला बसण्याची तयारी दिसत नव्हती. तेव्हा महार जातीच्याच पार्वतीबाई जाधव यांनी सडेतोड मांडणी करुन तो प्रश्न सोडविला. १९१३ च्या प्रारंभी कर्मवीर सर्व कुटुंबासह पुण्यात राहावयास आले. अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील तिसरे पर्व संपून चौथे पर्व सुरू झाले. १९१३ ते १९२३ हा तो कालखंड.

ह्या पर्वातील त्यांची कामगिरी साधारणपणे अस्पृश्यतानिवारण व त्या संदर्भात प्राधान्येकरून भारतीय निरिश्रित साह्यकारी मंडळीचे कार्य, मराठा समाजाच्या, सांस्कृतिक व राजकीय जागृतीचे कार्य आणि सर्वांगीण परिवर्तनाकरता अत्यावश्यक असलेल्या काही मागण्या व चळवळी ह्यांच्याभोवती केंद्रित झाली होती असे आपण म्हणू शकतो. त्यांपैकी पहिल्या कार्याच्या संदर्भात ऑक्टोबर १९१२ ते १९१४ ह्या काळात शिंद्यांनी अहल्याश्रमाची पूर्वतयारी केली. ही सात एकराची जागा त्यांनी निवडण्याचे एक महत्त्वाचे कारण होते. महात्मा फुले ह्यांनी हीच जागा अस्पृश्यवर्गासाठी शाळा चालविण्याच्या हेतूने आपल्या संस्थेसाठी सरकारकडून घेतली होती. परंतु ती पुढे सरकारकडे व नंतर पुणे म्युनिसिपालटीकडे गेली. या जागेला अशी ऐतिहासिक परंपरा होती. वरील परिषदेच्या निमित्ताने मांग लोकांसाठी एक शेतकरी खेडे वसवावे असा अभूतपूर्व प्रयोग करण्याची कल्पना शिंदे यांना स्फुरली. भर उन्हात पाहणी करत हल्लीच्या सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील जंगल खात्याची नांगरटयोग्य पडीक जमीन निवडली. हे खेडे कृषिऔद्योगिक स्वरूपाचे झाले. परंतु याच सुमारास पहिल्या महायुद्धाचे विघ्न आले. कर्मवीर श्री. विठ्ठल नामदेव काळे आणि डॉ. मॅन ह्यांनी एतद्विषयक केलेल्या चौकशीचा लाभ सरकारलाच झाला. शिपायांच्या कुटुंबास मदत देण्याच्या नावाने व नंतर तेथल्याच काही भागावर आताचे विलिंग्डन कॉलेज उभारण्याकरिता ही जमीन हातची गेली. “सावकाशपणे विचार करून वाचकांनीच काय वाटेल ते वाटुन घ्यावे” असे काहीसे हताश पण तितकेच विचारांना चालना देणारे विधान याबाबतीत शिंद्यांनी लिहून ठेवले आहे. शिंदे ह्यांनी अत्यंत विषादाने व संयमाने हे उद्गार काढले आहेत. 'कुणी सांगावे ही कल्पना जर अस्तित्वात आली तर अस्पृश्यवर्गाच्या भवितव्यतेला वेगळे वळणही यामुळे लागले असते' असा मार्मिक अभिप्राय डॉ. गो. मा. पवार येथे नोंदवितात. मला तर एकोणिसाव्या शतकात अगदी वेगळ्या संदर्भात रॉबर्ट ओवेनने वसविलेल्या याच धर्तीच्या वसाहतीच्या प्रयोगाची यानिमित्ताने आठवण होते.

ह्या म्हणजे १९१३ ते १९२३ ह्या दशकात विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्यात अथक परिश्रम घेतले. १९१६ साली अस्पृश्यवर्गासंबंधी माहिती गोळा करण्यास हिंदुस्थान सरकारने प्रारंभ केला. ह्यासंबंधी मध्यवर्ती सरकारने मिशनला पत्र पाठविले. डॉ. गो. मा. पवार म्हणतात त्याप्रमाणे सरकारने मिशनच्या कामाला अशा प्रकारे मान्यताच दिली होती. मिशनच्या निवेदनात अस्पृश्यवर्गातील शालेय, औद्योगिक व नैतिक शिक्षण करवून त्यांची सर्वांगीण सुधारणा घडवून आणण्याचा आपला प्रयत्न कसा चालला आहे याविषयी प्रथमत: माहिती दिली होती. त्यानंतर विविध प्रकारच्या मौलिक सूचना केलेल्या आहेत. काही सूचना तर क्रांतदर्शी आहेत व आजच्या संदर्भातही कळीच्या आहेत असे मला वाटते. उदाहरणार्थ, ह्या वर्गासाठी सहकारी पतपेढ्या काढण्याची दूरदर्शी मागणी विठ्ठल रामजींनी मिशनच्या निवेदनात आवर्जून समाविष्ट केली होती, ह्या निवेदनातून शिंदे यांचे अस्पृश्यवर्गाच्या प्रश्नांचे सर्वांगीण आणि सखोल आकलन प्रकट होते असे डॉ. पवार म्हणतात ते बरोबरच आहे.

१९१७-१८ साली दोन प्रमुख घटना शिंदे यांच्या प्रेरणेने घडल्या. १९१७ च्या ऍनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात त्यांच्या पुढाकाराने अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर झाला ही ती पहिली घटना. अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यात राष्ट्रीय सभेच्या मागोमाग तीनच महिन्यांनी म्हणजे मार्च १९१८ मध्ये कर्मवीरांच्या पुढाकाराने श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्यांच्या अध्यक्षेतखाली मुंबई येथे पहिली अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषद पार पाडली ही १९१७-१८ या वर्षातील शिंदे ह्यांच्या जीवनातील दुसरी महत्त्वाची घटना. या परिषदेची अत्यंत रोचक व सर्वांगीण माहिती डॉ. गो. मा. पवार ह्यांनी सादर केलेली आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे म्हटले तर “देणेक-याप्रमाणे धरणेच धरून बसल्यामुळे लोकमान्य टिळकांचा नाइलाज झाला व ते परिषदेला गेलेही. त्यांचे भाषण सदर परिषदेतील आकर्षणाचा व कुतूहलाचा मोठा भाग होता व प्रत्यक्षात ते ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले. मात्र केसरीकर्ता म्हणून नव्हे, तर केवळ टिळक म्हणूनच मी परिषदेस येतो असे बजावून सांगण्यास लोकमान्य विसरले नव्हते. परिषदेत आधीच ठरल्याप्रमाणे एक जाहीरनामा तयार करून त्यावर प्रांतोप्रांतीच्या पुढा-यांच्या सह्या मिळविण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली होती. या संदर्भात सगळ्यात विसंवादी गोष्ट दिसून आली लोकमान्य टिळकांच्या बाबतीत. प्रत्यक्ष भेटीत त्यांची सही घेण्याचा शिंदे यांचा प्रयत्न निष्फळ झाला. परिषदेचा एका ओळीचाही वृत्तान्त केसरीत प्रसिद्ध झाला नाही. तरी पण सर्व प्रांतांतील जवळ जवळ तीनशेच्या वर महत्त्वाच्या पुढा-यांच्या जाहीरनाम्याकरिता स्वाक्ष-या मिळाल्या होत्या हे विशेष.’’

टिळकांच्या मताची दुसरी बाजू काही कालावधीनंतर लोणावळे येथे पुणे जिल्हा राजकीय परिषदेत दिसून आली, ही गोष्टही डॉ. पवार अगत्यपूर्वक नोंदवितात. त्याच वेळी टिळकांच्या द्विधा भूमिकेच्या संदर्भात शिंदे ह्यांची सम्यक, निग्रही व सडेतोड भूमिकाही ते सादर करतात. ह्या परिषदेत टिळकांनी श्री. शंकरराव लवाटे ह्यांची धर्मविषयक सबब मोडीत काढून त्यांनी शिंद्यांच्या सत्याग्रही भूमिकेला धरून अस्पृश्यतानिवारणाचाही ठराव स्वराज्याच्या ठरावाप्रमाणे एकमताने पास करवून घेतला. हे अत्यंत कठीण असे काम शिंदे यांनी केले असेच म्हणावे लागेल, असे डॉ. पवार म्हणतात ते यथार्थच आहे.

मुंबई येथील उपरोक्त परिषदेच्या संदर्भात डॉ. पवार आणखीही एका गोष्टीची नोंद घेतात. ती म्हणजे ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी श्री. वालचंद कोठारी यांनी काहीशी अनपेक्षित वाटावी, अशी टीकाकाराची घेतलेली भूमिका. पुढच्या काळातही ब्राह्मणेतर पक्षाची भूमिका अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यात संदिग्ध राहिल्याचे दिसते, हीही गोष्ट डॉ. पवार यानिमित्ताने स्पष्ट करतात. अस्पृश्यतानिवारक परिषद हे या ग्रंथातील प्रकरण डॉ. पवार यांची सर्वांगीण व समतोल मांडणी परत एकदा सिद्ध करते.

२७ जानेवारी १९१९ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांची साउथबरो कमिटीपुढे साक्ष झाली. त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही साक्ष दिली. या संदर्भातील शिंदे यांची साक्ष आजवर वादग्रस्त ठरलेली आहे. खुद्द डॉ. आंबेडकरांनी या संदर्भात मिशनच्या कथित भूमिकेत आपल्या स्वत:च्या साक्षीत गंभीर आक्षेप घेतले होते. डॉ. गो. मा. पवार यविषयी शिंदे यांनी दिलेले लेखी निवेदन व प्रत्यक्ष कमिटीपुढे दिलेली साक्ष तपशिलाने व काळजीपूर्वक सादर करतात. कमिटीच्या वृत्तान्तात साक्ष घेतलेल्या व्यक्तींचे मत तेवढे नमूद केलेले असते. विचारलेला प्रश्न त्यामध्ये नमूद केलेला नसतो. ही गोष्ट ते आपल्या नजरेस आणून देतात.

शिंदे यांची या संदर्भातील भूमिका अस्पृश्यवर्गाचे खरेखुरे हित जपणारी व त्याच वेळी राजकीय वातावरणाची व वस्तुस्थितीची जाणीव ठेवणारी होती. शिंदे व आंबेडकर ह्या दोघांच्या साक्षीत तफावत दिसण्यापेक्षा साधर्म्यच आढळते. तसेच निदान काही बाबतीत सरकारची भूमिका आधीच निश्चित झाली होती व कमिटीच्या अंतिम शिफारशींवर सरकारच्या भूमिकेचाच प्रभाव दिसून येतो. निदान अस्पृश्यांच्या प्रश्नांबाबत या निमित्ताने उठलेल्या वादंगामुळे अस्पृश्य व सवर्ण समाज मनाने जवळ येण्याच्या प्रक्रियेत अडथळा मात्र निर्माण झाला. शिंद्यांवर टीकेची झोड उठविणा-या अस्पृश्यवर्गीय पुढा-यांनी सरकारच्या या निर्णयावर मात्र एका शब्दानेही टीका केली नाही. ही बाब जशी आश्चर्यकारक तशीच शिंदे ह्यांच्यावर टीका करणा-यांच्या हेतूवर सूचकपणे प्रकाश टाकणारी म्हणावी लागेल, असे स्वत:चे मूल्यमापनात्मक निष्कर्ष डॉ. गो. मा. पवार या प्रकरणात जागोजागी मांडतात. तसेच अस्पृश्यांची दुरवस्था लक्षात घेऊन शिंदे यांनी स्वत:च्या भूमिकेला मुरड घालून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र जातवार संघाची आग्रहपूर्वक मागणी केली, ही गोष्टही डॉ. पवार अधोरेखित करतात.

विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या साउथबरो कमिटीपुढील साक्षीच्या संदर्भात जे ‘गैरसमज’ १९१९ च्या प्रारंभी निर्माण झाले ते अजूनही टिकून आहेत. ही बाब व्यक्तिगतरीत्या शिंदे ह्यांच्यावर अन्याय करणारी व दुर्दैवी आहे. त्याचप्रमाणे सामाजिक इतिहास यथार्थ स्वरूपात कळण्याला अडथळा आणणारी आहे, असे डॉ. पवार यांना वाटते. म्हणून ह्या गैरसमजाची परंपरा शोधून त्याचा एक प्रदीर्घ मागोवा ते पुढच्याच सबंध प्रकरणात सादर करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मिशनसंबंधीचे आक्षेप ‘कदाचित ऐकीव माहिती’मुळे घेतले गेले असावे म्हणून त्यांची ह्याबाबतची टीका ‘सर्वस्वी निराधार’ होती आणि त्यांचे आक्षेप ‘एक प्रकारच्या (सभय) आशंके’ पोटी घेतलेले असावेत, असे डॉ. पवार यांना वाटते. डॉ. आंबेडकर यांच्या आशंकेचे मूळ, अस्पृश्यता व जातिनिर्मूलन ह्या प्रश्नाशी जोडलेले अस्पृश्यांचे राजकारण अस्पृश्य नेतृत्वाखाली केले जावे, या त्यांच्या धारणेत असणे स्वाभाविक होते, असेही आपले मत ह्या संदर्भात डॉ. पवार नोंदवून देतात. समजावून देण्यासाठी डॉ. पवार यांनी श्री. चां. भ. खैरमोडे यांच्या डॉ. आंबेडकर चरित्राच्या पहिल्या खंडातून तसेच डॉ. धनंजय कीर यांच्या डॉ. आंबेडकर चरित्रातून विस्तृत उतारे सादर केले आहेत. शिंदे यांच्याविषयी जे विपरीत चित्र उभे करण्यात आले ही बाब कुणी न्यायाची म्हणणार नाही, असे स्वत:चे प्रांजळ मत ते नोंदवितात.

डॉ. पवारांनी यानंतर शिंदे यांच्यावर त्या काळात मूकनायकाने केलेल्या टीकेची दखल घेतली आहे. शिंदे यांच्या उपरोक्त साक्षीबद्दलचे गैरसमज अजूनही टिकून राहिलेले आहेत, असे त्यांना वाटते. म्हणून डॉ. धनंजय कीर, डॉ. गंगाधर पानतावणे, श्री. रा. ना. चव्हाण व डॉ. सदानंद मोरे यांसारख्या मातब्बर अभ्यासकांचे अभिप्राय त्यांनी सादर केले आहेत. मात्र डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ह्यांनी आपल्या १९९५ च्या निबंधात शिंदे आणि आंबेडकर यांच्या साक्षींचा तुलनात्मक विचार करून दोघांच्या भूमिकांमध्ये फारसे मतभेद नाहीतच, असा स्पष्ट निष्कर्ष काढलेला आहे, ही गोष्ट डॉ. पवार आपल्या नजरेस आणून देतात. तसेच १९९९ च्या आपल्या ग्रंथात ऍड. पी. के. चौगुले-पारगावकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या शिंद्यांवरील टीकेच्या स्वरूपाबद्दल जे बोट ठेवले आहे, त्याचीही ते नोंद घेतात.

शिंदे-आंबेडकर वादासंबंधी माझे स्वत:चे योग्यायोग्य मत न मांडता पुढे जाणे मला इष्ट वाटत नाही. माझ्या समजुतीप्रमाणे अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व अस्पृश्यच करू शकतात, हा मुद्दा तत्कालीन राजकारणात डॉ. आंबेडकरांना तत्त्वत: व व्यवहारात कळीचा बनवायचा होता. प्राप्त परिस्थितीत त्यांना ही गोष्ट दलितांची सर्वोच्च, सर्वांगीण व म्हणूनच राजकीय गरज वाटत होती. दलितमुक्ती व जातिनिर्मूलन यांच्या एकवटलेल्या तत्त्व आणि रणनीती यांच्या संदर्भात डॉ. आंबेडकरांची ही भूमिका समर्थनीय व यथोचितच होती. इतिहासक्रमाच्या या चालीमुळे शिंदे मात्र कैचीत सापडले गेले. इतिहास घडविणा-या परस्परस्पर्धक शक्तींच्या उदयास्ताच्या सार्वजनिक निष्ठुर खेळात प्रसंगी इतिहास सुजाण व त्यागी व्यक्तींनाही किंमत द्यावयास लावतो. विकासाचा इतिहासक्रम हा असाच कठोर व्यक्तिनिरपेक्ष रीतीने पुढे दौडत जात असतो. प्रश्न त्या त्या काळाच्या नायकांवर झालेल्या तक्तालीन व्यक्तिगत न्याय-अन्यायाचा किंवा निर्गुणनिराकार पातळीवर मूल्यमापन करण्याचा नसतो. पण खरी जबाबदारी असते पुढील पिढ्यांची. त्यांनी मात्र आपल्यापुढील पेचांवर मात करणारी ऊर्जा इतिहासमंथनातून मिळविताना आधीच्या पिढ्यांपुढील अंतर्विरोधांचे स्वरूप समग्रपणे जाणून घेतले पाहिजे आणि कालबाह्म ग्रह-पूर्वग्रहांना जाणीवपूर्वक रजा दिलीच पाहिजे. नाहीतर त्यांचेच नुकसान होत राहील, पूर्वकालीनांचे नव्हे. अशी भविष्यसन्मुख क्रांतिशील समंजस भूमिकाच विठ्ठल रामजी शिंदे यांना बहिष्कृत न बनविता त्यांचा यथोचित गौरव करीत राहील, हे निश्चित.

१९०६ पासून सुरू झालेल्या मिशनच्या कार्याचा विस्तार याही कालखंडात शिंदे करत राहिले. एकीकडे शिरोळ, कुरुंदवाड, बेळगाव, हुबळी, गोकाक या भागांत तर दुसरीकडे नागपूर आणि त्याही पलीकडे मध्यप्रांतातील हिंदी जिल्ह्यातून त्यांनी दौरे केले व संस्था उभारल्या.

१९२१ च्या मार्चपर्यंत दुष्काळाच्या आपत्तीतून मातंग लोकांना सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचे काम संपत आले आणि पहिल्या महायुद्धामुळे लांबणीवर पडलेले अहल्याश्रमाची इमारत उभी करण्याचे काम कर्मवीरांनी हातात घेतले. पण मिशनच्या कार्याला स्थायी स्वरूप येत असताना मूकनायकाच्या प्रत्येक अंकातून १९२१ मध्ये ‘अत्यंत निर्दय स्वरूपा’ चा हल्ला शिंदे यांच्यावरही सुरू झाला. त्यांना स्वाभाविकपणेच वेदना झाल्या. ते स्वत:च म्हणतात की, “ज्यांच्यासाठी मी जीवाचे आणि घरादाराचे रान केले तेच माझ्यावर असंतुष्ट होते. कारण काय तर आता मोठमोठ्या इमारती होऊ लागल्या.” अहल्याश्रमाचा कोनशिला समारंभ ५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. त्याच वेळी मिशनचा कारभार प्रामुख्याने अस्पृश्यवर्गीय मंडळींवर सोपविण्याची महत्त्वाची घोषणा शिंद्यांनी केली. तरी पण अस्पृश्यवर्गीयांच्या विरोधाच्या जोडीनेच मुंबई येथील मिशनची मातृसंस्था आणि शिंदे यांच्यातील विसंवादाची भर पडली. प्रार्थनासमाज व मिशन यांमधील काही सहकारी शिंदे ह्यांच्याबद्दल असंतुष्ट होते. कारण टिळक तसेच मदनमोहन मालवीय इत्यादींना कर्मवीरांनी मार्च १९१८ च्या परिषदेला बोलाविले होते. तसेच त्यांनी मिशनच्या कार्यकारी मंडळावर जहाल विचारसरणीची काँग्रेसमधील मंडळी निवडून येऊ दिली अथवा घेतली. प्रत्यक्षात टिळक, गांधी आणि शिंदे यांचे मत अस्पृश्यवर्गींयांना सरकारी सवलतीची अद्यापि गरज असल्याने मिशनला राजकारणात ओढू नये असेच होते. प्रार्थनासमाजाची धुरीण मंडळी ब्रिटिशधार्जिण्या धोरणामुळे अगदीच हळुवार बनली होती, ही गोष्ट स्पष्ट आहे.

अशा परिस्थितीत कर्मवीरांनी १९२३ च्या २९ मार्चला एक जाहीर निवेदन वृत्तपत्रातून प्रकट केले. मिशनची घटना बदलून मिशन अस्पृश्यवर्गाच्या स्वाधीन करावयाचा निर्धार त्यांनी या निवेदनात व्यक्त केला. मुळात पाच मराठे, तीन ब्राह्मण व एक मुसलमान प्रार्थनासमाजिष्ट अशा बहुतेक ब्राह्मधर्मीय सात बंधू व दोन भगिनी यांनी जातिभेद टाकूनच अस्पृश्य वस्तीत आपल्या कुटुंबासह राहून कामाला सुरूवात केली होती. आता अस्पृश्यांकडे मिशनची जबाबदारी सोपविण्याइतका विकास साधला गेला होता. या निवेदनामुळे श्री. शिवराम जानबा कांबळे व त्यांचे अन्य महार, मातंग, रोहिदास समाजांचे मिशनमधील सहकारी यांच्या मनातील आशंकांची पटले दूर झाली व त्यांनीच जाहीरपणे शिंद्यांची कड घेतली.

आपल्या वचनाला व ब्रीदाला जागून कर्मवीरांनी १९२३ साली मिशन अस्पृश्यवर्गाच्या हाती सुपूर्द केली व ते मिशनच्या कामातून बाहेर पडले. त्यांची व जनाबाईंची अल्पवेतनाची नेमणूकही त्यांनी सोडली. निर्वाहाचे नियमित स्वरूपाचे कोणतेही साधन आता उरले नव्हते. आपणच काढलेल्या मिशनमधून व आपणच मिळविलेल्या पैशामधून पेन्शन घेणे, हा विचारही शिंदे यांना दु:सह वाटला ही गोष्ट डॉ. गो. मा. पवार आवर्जून सांगतात. आपण “पुन्हा एकवार उघडे पडलो” असे उद्गार कर्मवीरांनीच नमूद केलेले आहेत.

तरी पण दुर्दैव असे की, मिशनच्याच मातृसंस्थेच्या साधारण सभेने ह्यांना काढावे, असा नोव्हेंबर १९२२ मध्येच निर्णय घेतला व दोन वर्षे गुलदस्त्यातच ठेवला. अतिरेक म्हणजे मातृसंस्थेने शहाजोगपणे शिंद्यांविरुद्धच  दोन वर्षांनंतर फिर्याद केली. १९२५ साली हायकोर्टाने निकाल दिला. तो शिंदे यांच्या बाजूने लागला व कर्मवीरांच्या नावाला विनाकारण कलंक लागला नाही. ज्या संस्थेकरिता आयुष्यभराचा स्वार्थत्याग केला त्याच संस्थेने शिंद्यांवर आरोपी म्हणून खटला भरावा, यापेक्षा दैवदुर्विलास तो काय! मिशनसंबंधीच्या उपरोक्त आपदांना आपल्या ऋषितुल्य वृत्तीमुळे व अपार क्षमाशीलतेमुळेच अण्णासाहेब धैर्याने तोंड देऊ शकले व डॉ. पवार यांचा निष्कर्ष संवेदनक्षम व अचूक असाच आहे. अस्पृश्यवर्गीयांच्या प्रश्नाबद्दल विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मिशनद्वारा अपूर्व असे कार्य देशाच्या पातळीवर केले. अशाच स्वरूपाच्या १९२० नंतर स्थापन झालेल्या संस्था का अपयशी झाल्या व मिशनला का यश आले, याचे डॉ. पवार यांनी केलेले विश्लेषण साधार पण भेदक आहे. १९२० साली महात्मा गांधींच्या दांडीच्या सत्याग्रहाच्या वेळी मिठाचा सत्याग्रह करण्यापूर्वी अस्पृश्यतेविरुद्ध गांधींनी सत्याग्रह करावा, असा आग्रह धरून त्याकरिता आपला स्वत:चा सत्याग्रह करणा-या कर्मवीरांच्या श्री. कृष्णराव गोविंदराव पाताडे आणि सुभेदार राघोराम सज्जन घाडगे या दोन सहका-यांची कामगिरी उद्बोधक व लक्षणीय आहे.

१९१३ ते १९२३ ह्या आपल्या जीवनातील चौथ्या पर्वात कर्मवीरांनी अस्पृश्यतानिवारण व त्या संदर्भात मिशन यांच्या जोडीला मराठा समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जागृतीचे दुसरे मोठे कार्य केले. इतिहासकाळापासून स्वातंत्र्यप्रिय असलेल्या मराठा समाजाला जणू काय राजकीय स्वातंत्र्याची स्पृहा नाही, हा अपसमज दूर होण्याचे अगत्याने वाटल्यामुळे तसेच मराठा समाज व विशेषत: सुशिक्षित मराठा तरुण ह्यांच्यामध्ये राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जाणिवा जागृत होण्याकरिता शिंद्यांनी या कालखंडात जे परिश्रम घेतले त्याचा इतिहास डॉ. गो. मा. पवार ह्यांनी अनेक प्रकरणांतून साधार व तपशीलवार मांडला आहे.

१९११ मध्ये स्थापन झालेल्या मराठा स्टुडंट्स ब्रदरहूड या संस्थेने आपल्या चौथ्या वार्षिक संमेलनप्रसंगी शिंदे यांना बोलाविले होते. त्या वेळीच विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सुशिक्षित मराठ्यांची नागरिक कर्तव्ये’ या विषयाची मांडणी करून आपल्या भूमिकेची व भावी काळातील या संदर्भातील कार्याची प्रस्तावना केली होती. हे व्याख्यान मराठा समाजातील, एवढेच नव्हे तर, एकंदरीतच तरुणवर्गाला उत्तम प्रकारचे मार्गदर्शन करणारे म्हणून तर महत्त्वाचे होतेच; त्याशिवाय शिंदे यांचा जातिसंस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोण काय होता; मराठा समाज व इतर जाती यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संबंध त्यांना अभिप्रेत होते; हे कळण्याच्या दृष्टीनेसुद्धा प्रस्तुत व्याख्यान महत्त्वाचे होते, असे डॉ. गो. मा. पवार म्हणतात ते सर्वतोपरी योग्यच आहे.

हे व्याख्यान सर्वांनीच आजसुद्धा परत परत वाचले पाहिजे, एवढ्या मोठ्या मोलाचे आहे. या व्याख्यानात मराठा या शब्दाचा अन्वय प्रांत, पेशा, भाषा, पिढी आणि जात या पाच विषयांशी संबंधित आहे. मराठ्यांच्या अवनतीची दोन अंतस्थ कारणे आहेत. ती म्हणजे ऐक्य नाही आणि आपल्या नागरिक कर्तव्यांची मराठ्यांनी करून घेतलेली जवळ जवळ फारकत. आज विकल आणि मागासलेला बनलेल्या एवढ्या मोठ्या जनसमूहाचा हितसंबंध राष्ट्रीय हितसंबंधच होय. म्हणून त्याची प्रगती साधणे हे महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्यच होय. मराठा समाजाचा विकास साधण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा फैलाव करा; पोरकट व खोट्या वादांमध्ये गुंतू नका; आपली आवड, मगदूर आणि साधने लक्षात घेऊन स्वत:चा मार्ग शोधा; आत्मपरीक्षणात्मक प्रश्न स्वत:स वारंवार विचारा; स्त्रियांची शोचनीय स्थिती नाहीशी करा; पूर्ण आधुनिक बना. मराठ्यांच्या बाळबोध राहणीचे चित्रण मराठी साहित्यात आणा. इतिहासलेखनाच्या रेखा वक्र व भेसळयुक्त होऊ नयेत, म्हणून ब्राह्मणांच्या जोडीने इतिहासलेखन अहमहमिकेने करा. मुख्य म्हणजे तलवारीच्या युद्धाचा काळ आता गेला. नैतिक युद्ध पुढे चालणार आहे हे ओळखून कार्याला लागा इत्यादी अतिशय मौलिक, सूक्ष्म, प्रेरणादायी आणि सखोल व जिव्हाळ्याच्या समाजशास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झालेले विचार कर्मवीरांनी मांडले. मराठा स्टुडंट्स ब्रदरहूडने १९१४ साली प्रसिद्ध केलेल्या व आज दुर्मीळ झालेल्या व्याख्यानपुस्तिकेतून हा मजकूर मिळवून डॉ. पवार यांनी प्रस्तुत ग्रंथात मोलाची भर टाकली आहे.

आधीच्या कालखंडात दिलेल्या ह्या व्याख्यानाच्या प्रकाशातच कर्मवीरांनी उपरोक्त सर्व क्षेत्रांत अपूर्व कार्य करून दाखविले हे नि:संशय. त्यांच्या भूमिकेनुसार समाजकारण, राजकारण, अर्थकारण इत्यादी व्यवहार एकंदर जनतेच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळी अंगे नव्हतीच. राजा राममोहन राय यांच्यासंबंधीच्या त्यांच्या स्वत:च्याच आकलनातून साकल्यावर भर देणारी त्यांची भूमिका स्पष्ट होते. ”त्यांचा (रायचा) धर्म म्हणजे केवळ एक मत किंवा मनोवृत्तीच नसे, तर साक्षात जीवन होता जीवनही सर्व बाजूचे असे. राजकरण आणि आर्थिक अभ्युदय, धर्मसुधारणा आणि समाजसुधारणा ह्या सर्वांसाठी त्याचे जिणे, त्याचा प्रयत्न व त्याचे मरण ही घडली.’’ म्हणूनच शिंद्यांनी आयुष्यात वेगवेगळ्या वेळी आवश्यकतेनुसार जीवनाच्या ह्या विविध क्षेत्रांत प्राधान्याने कार्य केले असे डॉ. पवार सार्थपणे सांगतात.

त्यामुळेच शिंद्यांनी राजकरण कधीही वर्ज्य मानले नसताना १९१६-१७ पर्यंत आपल्या राजकीय भूमिकेचा जाहीर उच्चार केलेला दिसत नाही. अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यासाठी इंग्रज सरकार, संस्थानिक, मवाळ इत्यादिकांची सहानुभूती आवश्यक वाटत असावी. परंतु १९१६-१७ च्या सुमारास राजकीयदृष्टया अलिप्त राहण्याची गरज त्यांना वाटेनाशी झाली. एवढ्या काळामध्ये हिंदुस्थानमधील सामाजिक अंत:प्रवाहांमध्ये बरीच उलटसुलट गतिमानता निर्माण झाली होती. पहिल्या महायुद्धामुळे भारतमंत्री लॉर्ड माँटेग्यूमार्फत ब्रिटिश सरकारला नवे धोरण जाहीर करावे लागले. भारतीय राजकरणाचे चित्र अशा प्रकारे बदलत असताना महाराष्ट्रातील राजकरण वेगळ्याच दिशेने सरकत गेले. ब्राह्मणवर्गाची बहुजन समाजाकडे बघण्याची वृत्ती तुच्छतेची व अवहेलनेची होती. वेदोक्त प्रकरणात खुद्द श्रीमंत शाहू छत्रपतींना त्याचा चटका बसला म्हणूनच राजकारणाच्या पातळीवर स्वराज्यवादी तर सामाजिक पातळीवर सनातनी ब्राह्मण धर्माचा कैवार घेणा-या टिळकपंथीय राजकरणाच्या विरोधात सत्यशोधक शक्ती इंग्रजी सत्तेला प्रतिकूल नसलेले राजकारण राबवू लागली.

पण डॉ. गो. मा. पवार यांच्या प्रतिपादनानुसार १९०५ च्या सुमारास टिळकांची जी परंपरावादी भूमिका होती ती १९१६ साली राहिलेली नव्हती. इतकेच नव्हे तर मुस्लिमांशी सहकार्य करण्याकरिता त्यांनी १९१६ सालीच लखनौ करारास मान्यता दिली होती. अशा बदलत्या परिस्थितीत राष्ट्रीय ऐक्याची गरज नितांतपणे वाढलेली असताना नवा होऊ घातलेला ब्राह्मणेतरवाद ऐक्याला फार घातक होईल असे कर्मवीरांना वाटू लागले होते. शिंदे यांना भवितव्याची चाहूल यथार्थपणे लागली होती असे डॉ.पवार म्हणतात. शिवाजी उत्सव राष्ट्रीय स्वरूपाचा कसा करण्यात यावा याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांना बोलविण्यात आले होते. त्या प्रसंगी त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यांनी मांडलेल्या विचारांतूनच १९१७ साली ‘मराठा राष्ट्रीय संघ’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. ह्या संघटनेच्या वतीने लखनौ कराराला पाठिंबा देण्याकरिता पुण्याला कर्मवीरांच्या अध्यक्षतेखाली ८ नोव्हेंबर १९१७ रोजी एक प्रचंड सभा झाली. ‘स्वराज्याची तृष्णा सर्वांना सारखीच आहे. ती वारंवार बोलून दाखविण्याचे काम या मराठा संघाकडून होईल’ अशी घोषणा शिंदे ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली. याच सभेत बोलताना आता आपल्याला पूर्वीचे स्वराज्य नको असून पाश्चिमात्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे असा स्पष्ट खुलासा लोकमान्य टिळकांनी केला. मराठा समाजाला, ब्राह्मणेतर समाजाला राजकारणाच्या स्वराज्यानुकूल राष्ट्रीय प्रवाहात आणण्याच्या प्रक्रियेला विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ह्या प्रयत्नामुळे प्रारंभ झाला असा रास्त निष्कर्ष डॉ. पवार आपल्याला सादर करतात.

पण या सभेच्या दिवशीच त्याच वेळेला जेधे मॅन्शनमध्ये मराठा समाजाची एक वेगळी सभा झाली. त्यात मराठा राष्ट्रीय संघाच्या भूमिकेला कडक विरोध करण्यात आला. ह्या दोन सभांमुळे मराठा समाजात ‘राष्ट्रीय मराठा’ या नावाने व ‘सत्यशोधक मराठा’ या नावाने असे दोन तट, दोन पक्ष पडले. पहिला पक्ष हा काँग्रेसमध्ये आला व दुसरा पक्ष ब्राह्मणेतर पक्षात सामील झाला. पुढील काळात श्री. गोविंद कृष्णाजी बोत्रे, श्री. त्र्यंबक हरी आवटे व विशेषत: श्री. केशवराव जेधे यांसारखे कर्तबगार मराठा पुढारी काँग्रेसकडे वळले त्याला कर्मवीरांचा हा मराठा राष्ट्रीय संघच कारणीभूत झाला.

सरकारी योजनेनुसार नोव्हेंबर १९२० मध्ये निवडणुका होतील असे जाहीर झाले होते. या योजनेत राखीव तसेच सर्वसाधारण मतदारसंघ होते. विठ्ठल रामजी शिंदे तसेच श्री. भगवंतराव पाळेकर यांची भूमिका पहिल्यापासूनच मराठा जातीसाठी स्वतंत्र अथवा राखीव जागा असू नये अशी होती. ह्यावेळी जेधे मॅन्शनमध्ये एरव्ही एकमेकांना विरोध करणा-या मराठा राष्ट्रीय संघ आणि अ. भा. मराठा लीग ह्यांनी एकत्रितपणे सभा बोलावली. दोन्ही पक्षाच्या मंडळींनी आग्रह केला. पण शिंदे यांनी मी राखीव जागेसाठी उभा राहणार नाही. त्यातील जातिवाचक तत्त्वाच्या मी विरूद्ध आहे असे ठामपणे सांगितले. मात्र पुणे शहराच्या सर्वसाधारण जागेसाठी सर्व पक्षांनी मिळून मदत करावयाची ठरवल्यास आपण निवडणुकीस उभे राहण्याचे ठरविले आहे. या संदर्भातील आपली भूमिका विशद करण्याकरिता त्यांनी १ सप्टेंबर १९२० रोजी ‘बहुजनपक्ष’ ह्या नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

या जाहीरनाम्याची वेगळी पुस्तिका काढून तो सर्वपरिचित झाला पाहिजे एवढी त्याची अंगभूत योग्यता आहे. वर्तमानकाळाच्याही संदर्भात तो कालबाह्म झालेला नसून उलट तो अधिकच वस्तुदर्शी व पथदर्शक बनला आहे, अशी माझी स्वत:ची धारणा आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ऐतिहासिक दृष्टीचा पल्ला व खोली त्यातून प्रकट होते. ख-या अर्थाने ते क्रांतदर्शी समाजधुरीण होते. जाहीरनामा म्हणतो की हल्लीचे जहाल अथवा मवाळ किंवा राष्ट्रीय व प्रागतिक पक्ष केवळ कार्यपद्धतीच्या पायावरच उभे राहिले आहेत. ते तत्त्वभेदांवर उभे नाहीत. पण भावी राजकरणात नवीन पक्षांच्या पुनर्घटना होत जाण्याचा आज-उद्या संभव आहे. त्यांपैकी बहुजनपक्ष उभारण्याची शक्यताच नव्हे तर इष्टता, किंबहुना आवश्यकता आहे.

ह्यानंतर कर्मवीरांनी एक प्रतिभाशाली मांडणी केली आहे. ती अशी की हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीयदृष्टया दोन मुख्य व स्पष्ट भाग पडत आहेत. ते हे की एक, विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबलाने पुढारलेला वर्ग; आणि दुसरा ह्यातील कोणतेच बल अंगी नसल्यामुळे व नाइलाजामुळे मागासलेला वर्ग, किंवा बहुजन समाज. ह्या दुस-या वर्गातच अगदी तिरस्कृत अशा ‘अस्पृश्य’ वर्गाचा अंतर्भाव होतो. राजकीय सुधारणेचा नुसता अरूणोदय होतो तोच न होतो ह्या दोन भागांमध्ये मोठा विरोध भासू लागला. ह्या विरोधानुसार बहुजन समाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाचा एक आता जवळ जवळ पक्षच होऊन चुकला आहे. ह्यालाच केव्हा केव्हा ब्राह्मणेतर पक्ष असेही नाव दिले जाते, पण नाइलाज आणि बलहीनता ही जी मागासलेल्या वर्गाची मुख्य लक्षणे, ती ह्या वर्गाच्या पक्षास ‘ब्राह्मणेतर पक्ष’ असे केवळ जातिविशिष्ट नाव दिल्याने अगदी काटेकोर रीतीने सार्थ होत नाही. म्हणूनच ह्या नवीन पक्षास ‘बहुजनपक्ष’ अथवा ‘जनपदपक्ष’ असे अगदी सार्थ आणि निर्विकल्प नाव दिले आहे. हा पक्ष केवळ ऐहिक हितसंबंधाच्या भरीव पाय़ावर रचलेला आहे. जात, धर्म अथवा देश तसेच सामाजिक डामडौल एतद्विषयक व्देषाच्या किंबहुना प्रेमाच्याही पोकळ भावनात्मक पायावर नव्हे.

कार्यपद्धतीच्या बाबतीत बहुजनपक्ष इतरांशी स्वतंत्रपणाने समानतेचा दर्जा सांभाळून समान हितसंबंधापुरतेच सहकार्य करण्यास तयार राहील, पण त्यांच्यात सामील होणार नाही. आमच्या दुष्मनांचाही द्वेष करण्यास आम्ही तयार नाही. बहुजनपक्षाच्या हितसंबंधांची व्याख्या करताना विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात की, ते मनोभावनांवर  किंवा एखाद्या तात्त्विक सामान्य सिद्धान्तावर अवलंबून नाहीत. ते नित्याच्या व्यवहारांशी व ऐहिक नफ्या-तोट्यांशी निगडित आहेत. अर्थात राजकारण हे व्यवहारशास्त्र असल्याने तो अत्युच्च कर्मयोग्याप्रमाणे डावपेच खेळेल पण निभ्रांत प्रामाणिकपणा राखूनच. ह्यानंतर शिंदे ह्यांनी दूरदृष्टी शाबूत ठेवूनच शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर, अस्पृश्य आणि स्त्रिया या आठ वर्गांत बहुजनपक्षाच्या हितसंबंधाची मांडणी केली आहे. या सर्व वर्गांच्या त्यांनी केलेल्या व्याख्या वस्तुनिष्ठ व अभिजात अशा आहेत. ज्यांची वर्गवारी मुळीच करता येत नाही अशा पुष्कळ हितसंबंधाच्या संदर्भात जेव्हा प्रस्थापित पक्ष हात टेकतात तेव्हा बहुजन समाज जागे करून त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्याचे कठीण काम आमच्यासारख्या नवीन व स्वतंत्र पक्ष करील. ह्या मननीय जाहीरनाम्याचा संपूर्ण अंतर्भाव हा डॉ. गो. मा. पवार यांनी लिहिलेल्या प्रस्तुत चरित्राचा एक अतिमौलिक असा अविभाज्य भाग आहे, याविषयी दुमत होणार नाही.

निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या प्रारंभिक अवस्थेत दोन्ही मराठी पक्षांनी जोराचा पाठिंबा दर्शविला खरा परंतु हे चित्र शेवटपर्यंत तसेच टिकून राहिले नाही. ह्यामध्ये दिसून आलेल्या मतमतांतरांचा व चित्तवेधक पालटांचा व त्या संदर्भात विशेषत: श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या डावपेचांचा तपशीलवार इतिहास डॉ. पवारांनी नंतर सादर केला आहे. या धामधुमीत शिंद्यांनी क्षात्र जगदगुरूच्या निर्मितीच्या कल्पनेलाही तत्त्वनिष्ठ विरोध केला. शिंदे ह्यांना भविष्याची चाहूल यथार्थपणे लागल्यानेच त्यांनी आर्थिकदृष्ट्या गांजलेल्या बहुजन समाजासाठी तसेच बहुसंख्य मराठा समाजाची राष्ट्रीय स्वातंत्र्याची आकांक्षा सिद्ध करण्यासाठी राजकारण केले. नावही ज्या वेळी पुढे आले नव्हते त्याच वेळी शिंद्यांनी ब्राह्मणेतरवाद हा शब्द वापरला होता. सगळ्या महाराष्ट्राचा हितसंबध तोच मराठा जातीचा हितसंबध अशी त्यांची भूमिका होती अशी डॉ. पवार यांची मांडणी आहे.

ब्राह्मणेतर चळवळीचे सामाजिक सुधारणेचे व्यापक अधिष्ठान ढळून प्रखर ब्राह्मणविरोध असे काहीसे स्वरूप या चळवळीला येत गेले. पण विठ्ठल रामजी शिंदे यांनीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, ”ब्राह्मणेतरांचा जातिवाद हा ब्राह्मणांच्या जातिवादाची प्रतिक्रिया असतो.” पण महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्मीय उन्नत धर्मदृष्टीला छेद देत सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर पक्षातील पुढा-यांना अस्पृश्यांच्या उद्धाराविषयी कळकळ वाटत नव्हती म्हणून शिंदे त्यांच्याशी सहमत होऊ शकत नव्हते. त्याच वेळी कर्मवीर लोकमान्य टिळकांना मवाळ व ब्राह्मणेतर पुढा-यांप्रमाणे, सरसकट नव्हे तर सामाजिक बाबतीत टिळकांचे धोरण समतेच्या व स्वयंनिर्णयाच्या तत्त्वास विघातक असल्याने, विरोध करीत होते ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणूनच ब्राह्मणेतर पक्षाबद्दल आत्मीयता व दुरावा असा ताण शिंदे यांच्या भूमिकेत प्रकट होतो. ब्राह्मणेतर समाजातर्फे विठ्ठल रामजी शिंदे यांना २३ एप्रिल १९२५ रोजी पुण्यामध्ये मानपत्र दिले. हे भाषण बहुतांशी उदधृत करून डॉ. पवारांनी मोठेच औचित्य दाखविले आहे. हे भाषणही मार्मिक, मौलिक व मूलगामी स्वरूपाचे आहे.

१९१३ ते १९२३ या पर्वात अस्पृश्यतानिवारण आणि मराठा जागृती या दोन कार्यांच्या जोडीला काही सर्वांगीण मागण्या व चळवळी यांकरताही कर्मवीरांनी बरीच कामगिरी केली. मुलींच्या सक्तीच्या शिक्षणाबाबत टिळक पक्षीयांच्या भूमिकेला जोरदार विरोध करताना अण्णासाहेबांनी ‘ज्ञानप्रकाश’मध्ये एक लेखमाला लिहिली. १२ फेब्रुवारी १९२० रोजी त्यांनी स्त्रियांची एक अपूर्व अशी जंगी मिरवणूक काढली. ह्या संदर्भात ८ फेब्रुवारी १९२० रोजी झालेल्या सभेचा डॉ. पवार यांनी सादर केलेला सर्व वृत्तान्त व त्यातही टिळकांचे भाषण ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या श्रोत्यांमुळे उधळलेली सभा याची हकिगत आजही मनोरंजक तशीच उद्बोधक ठरेल.

१९०६-१९०७ सालापासूनच मद्यपानबंदीच्या चळवळीकडे विठ्ठल रामजींचे लक्ष गेले होते. १९२२ साली वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ह्या प्रश्नावर ‘दारूचा व्यापार, सरकार आणि बहुजन समाज’ या विषयावर व्याख्यान दिले व सरकारच्या दुटप्पी व दांभिक भूमिकेवर परखड शब्दांत टीका केली. तसेच १९०७ सालापासूनच कर्मवीरांनी शिमग्याच्या अनिष्ट प्रथेला विरोध करणारे कार्य सुरू केले होते. त्याला सुसंस्कृत कार्यक्रमाचे स्वरूप मिळावे म्हणून धडपडही केली.

१९२०-२१ च्या दुष्काळात अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे एक हजार मातंग मंडळी पुण्याच्या मिशनच्या पटांगणात उतरली. ह्या प्रसंगी अण्णासाहेबांनी सर्व स्तरांतील व्यक्तींचे साहाय्य कुशलतेने संपादन करून मोठेच कार्य केले.

१९१३ ते १९२३ या कालखंडात कर्मवीरांनी एवढे मोठे विविध कार्य केले, बाह्य आघात सोसले आणि त्याच वेळी १९१७ सालापासूनच्या पुढच्या पाच-सहा वर्षांत कौटुंबिक जीवनातही जिव्हाळ्याच्या माणसांच्या मृत्यूचे दु:ख त्यांच्या वाट्याला आले. अण्णासाहेबांच्या धाकट्या बंधूंचे नवजात मूल वारले. पाठोपाठ इन्फ्लुएंझाच्या आजाराने ती भावजयही वारली. ३ जानेवारी १९२० रोजी कर्मवीरांची धाकटी बहीण सौ. मुक्ताबाई काळे ह्यांचा मृत्यू झाला. शेवटच्या यात्रेत अस्पृश्यांसह सगळ्या जातींच्या लोकांनी खांदा दिला. श्री. पां. नं. भटकर यांच्या संपादकत्वाखाली निघणा-या ‘मूकनायका’ने म्हटले की, “हिंदू धर्माच्या किंवा हिंदुस्थानच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग असावा. मुक्ताबाईंना ओळखणा-या सगळ्यांना त्यांच्या मृत्यूचा चटका बसला.” पुढे सहाच महिन्यांनी अण्णासाहेबांच्या एकुलत्या एक चिमुकल्या मुलीचा अंत झाला. एकीकडे मिशनच्या इमारती पूर्ण बांधून झाल्याचे साफल्य अनुभवतानाच शिंद्यांना हे कौटुंबिक आघात सोसावे लागले होते.


विठ्ठल रामजी शिंदे मिशनमधून बाहेर पडले. पेन्शनही घेतली नाही. ‘पुन्हा एकवार उघडे’  पडलेल्या अवस्थेतच आयुष्य म्हणजे आत्मयज्ञ ठरविलेल्या महर्षींनी आयुष्याच्या १९२३ ते १९४४ या अंतिम पाचव्या पर्वात प्रवेश केला. सुरुवातीला यापुढील सर्व आयुष्य समाजशास्त्रीय व साहित्यिक लिखाणालाच अर्पण करावे असे त्यांना वाटले असावे. ‘इतिहास’ नावाचे मासिक काढावे. त्यातून भारताचा प्राचीन आणि अर्वाचीव सामाजिक इतिहास सिद्ध करावा. या कारणाकरिता २७ ऑक्टोबर १९२२ रोजी बडोदे संस्थानातील मध्यवर्ती ग्रंथालय आणि बडोदे संस्थानचे दप्तर यांचे ‘क्युरेटर’ म्हणून काम मिळावे म्हणून त्यांनी श्रीमंत सयाजीरावांकडे अर्ज केला. (मंगुडकर इत्यादी, पृ. ६६२).

पण १९२३ च्या मध्यावर कलकत्त्याच्या साधारण ब्राह्मसमाजाने अण्णासाहेबांनी मंगळूरच्या ब्राह्मसमाजाचे आचार्य म्हणून काम पाहावे असा ठराव व त्याप्रमाणे १९२४ च्या एप्रिल महिन्यात भगिनी जनाबाई आणि धाकटा मुलगा रवींद्र यांच्यासमवेत ते मंगळूर येथे आले. पत्नी व दोन मुले यांना त्यांनी मुंबईला आपल्या कनिष्ठ बंधूंकडे ठेवले.

मंगलोरला शिंदे ह्यांनी आपल्या नेहमीच्या उपक्रमशीलतेनुसार आणि धडाडीने नानाविध स्वरूपाचे कार्यक्रम चौफेर सुरू केले. पण सुरुवातीपासूनच त्या कार्यात एक तणाव होता. ब्राह्मसमाजाचे तेथील बहुसंख्य सभासद पूर्वी अस्पृश्य समाजात गणल्या जाणा-या ताडी काढणा-या बिल्लव जातीचे होते. ब्राह्मो वातावरणात दोन-चार पिढ्यांत त्यांनी स्वत:चा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक कायापालट घडवून आणला होता. इतका, की ते आता अस्पृश्यवर्गाला दूर ठेवू लागले होते. सरकारी नोकरीत व मोठमोठ्या युरोपियन कंपन्यात अधिकारपदांवर असल्यामुळे त्यांच्या मनात इंग्रज सरकारबद्दल एकनिष्ठेची भावना तीव्रपणे वसत होती. पण शिंदे हे तर राजकारण व धर्म वेगवेगळे न ठेवणारे. याबाबतीत गांधींची भूमिका रुचणारे. त्यांनी ऑक्टोबर १९२४ च्या मंगलोर ब्राह्मसमाजाच्या वार्षिकोत्सवात प्रवचन करताना ‘गांधीजी हे राजा राममोहन राय, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन ह्यांच्यानंतरचा चौथा अवतार होत आणि गांधींच्या काँग्रेसमध्ये अदृश्य स्वरूपात ब्राह्मसमाजरूपी परमेश्वराची धर्मसंस्था वसत आहे’ असे उदगार काढले.

विशेष म्हणजे शिंदे यांनी भारतभर गाजलेल्या मार्च-एप्रिल महिन्यातील त्रावणकोर संस्थातील वायकोम सत्याग्रहात ब्राह्म साधू शिवप्रसाद या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यासमवेत मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. शिंदे यांची गांधी टोपीही न रुचणा-या मंगलोर समाजाशी मतभेद झाल्यावर शिंदे ह्यांनी मंगलोर समाजाकडून मिळणारे वेतन घेण्याचे आपणहून स्वार्थत्यागी वृत्तीने थांबविले. पण मंगळूर ब्राह्मसमाजाचे लब्धप्रतिष्ठित बिल्लव धुरीण व शिंदे यांच्यातील तणाव वाढत गेला. सरतेशेवटी जिथे मन लावून काम केले त्या आणखी एका संस्थेशी फारकत घेऊन शिंदे पुण्यास परतले. अशा प्रकारे त्यांच्या धर्मविषयक कार्याचे एक आवर्तन मंगलोर येथे पूर्ण झाले असे डॉ. गो. मा. पवार म्हणतात.

१९२५ च्या एप्रिलमध्ये पुण्यास आल्याबरोबर शिंदे ह्यांनी पांढरपेशावर्गात गुंतून पडलेली प्रार्थनासमाजाची चळवळ बहुजन समाजात आणि विशेषत: बायका-मुलांत पोहोचण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. ‘धर्म म्हणजे केवळ मत नव्हे. तत्वज्ञान किंवा बाह्मकर्मेही नव्हेत. धर्म ही बाब अंत:करणाची व भावनांची आहे. म्हणून धर्माचा उदय आणि प्रचार कुटुंबाच्या द्वारा होणेच उचित आहे. तसे इतिहास सांगत आहे.’ महर्षींनी अशी भूमिका घेऊन १६ जून १९२६ रोजी कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली. कोल्हापूर येथेही दोन वर्षांनंतर मंडळ स्थापन झाले. उपासना मंडळाचे कार्य १९३० सालापर्यंत जोमाने चालू होते. अण्णासाहेबांचे आजारपण आणि वार्धक्य यामुळे ते काम १९४० नंतर मंदावले. मंडळाच्या विविध कार्याचा फार मनोवेधक इतिहास डॉ. पवार यांनी सादर केला आहे. प्रपंचलंपटच कुरकुरणारे व निराशवादी असतात. तर उलट गौतम बुद्ध अथवा तुकाराम यांसारखे संतच आनंदवादी व आशावादी असतात या भूमिकेतून हे सर्व कार्य शिंदे करीत असत.

मंगलोरहून परत आल्यानंतर १९२५-२६ साली विठ्ठल रामजी शिंदे यांनी बौद्ध धर्माचा विशेष अभ्यास केला. बौद्ध विहारात राहून त्या धर्माचे रहस्य अनुभवावे आणि तेथील सामाजिक स्थितीचे स्वरूप न्याहाळावे या दुहेरी हेतूने त्यांनी १०२७ च्या फेब्रुवारी-एप्रिलमध्ये ब्रह्मदेशचा प्रवास केला. १९०१ ते १९०३ सालीच शिंदे यांनी मॅंचेस्टर कॉलेजमध्ये पाली भाषा व बौद्ध धर्म अभ्यास सुरू केला होता. पुण्यामध्ये प्रा. धर्मानंद कोसंबी तसेच प्रा. चि. वि. जोशी यांच्याही सहवासाचा लाभ ह्याबाबतीत त्यांनी घेतला. १९१० साली पुण्यास ‘बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार’ या विषयावर व्याख्यानही दिले व आमचा बिनमोल वारसा म्हणून त्याचा गौरव केला. १९२७ च्या कलकत्ता ब्राह्मसमाजाच्या वार्षिकोत्सवात, “मी बौद्ध आहे” असे विधान करून त्यांनी मोठीच खळबळ निर्माण केली होती. बौद्ध धर्माच्या तीन शरण्यरत्नांपैकी फक्त बुद्धालाच शरण जाऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची प्रबळ उर्मी ब्रह्मदेशात पोहोचल्यावर शिंदे यांच्या मनात निर्माण झाली होती.

रंगूनला कर्मवीरांनी २६ फेब्रुवारीला तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथि आणि रामदासनवमी यानिमित्ताने महाराष्ट्र धर्म ह्या विषयावर कीर्तन करताना एक स्वरचित पद म्हटले. ते डॉ. गो. मा. पवार यांनी संपूर्णपणे आपल्या ग्रंथात घेतले आहे. हे पद शिंद्यांच्या प्रतिभेची आणि सामाजिक बांधिलकीची मनोहर साक्ष देते. ब्रह्मदेशातील महाराष्ट्र मंडळांपुढे व ब्राह्मसमाजापुढे शिंदे ह्यांनी दिलेल्या सर्वच व्याख्यानांचा उत्कृष्ट परिचय डॉ. पवार यांनी घडवून आणला आहे.

शिंदे यांची निरीक्षणशक्ती व चौफेर दृष्टी यांचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. तेथल्या मुक्कामात ब्रह्मी पुरातत्त्ववास्तूविषयी स्थानिक नामवंत विद्वांनाबरोबर ते चर्चा करतात. ब्रह्मदेशात ऐहिकबाबतीत स्त्रियांना पुरुषांपेक्षा काकणभर अधिकच मान दिला जातो. पण धार्मिकबाबतीत नाही. या भेदाला ब्रह्मदेश जबाबदार नसून हिंदुस्थानातून आलेला बौद्ध धर्म कारणीभूत आहे असा शिंदे ह्याचा अर्थ लावतात. ऐतिहासिकदृष्ट्या बुद्धाचा प्रतिनिधी म्हणून बौद्धांचे शास्ता हे पद नसते. पण ते अधिकारपद शिंदे यांना ब्रह्मदेशात पाहावयास मिळाले. बौद्ध भिक्षू व मठाधिपती यांचे वजन लक्षात घेता राजकीय धुरिणांनी हे पद हेतुत: निर्माण केले असावे असा अंदाज शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ब्रह्मदेशातील विवाहपद्धती स्वाभाविक आणि निसर्गभावाशी सुसंगत असल्यामुळे तेथे वेश्या व्यवसायाला अवसरच मिळत नाही असे शिंदे यांना जाणवले.

ब्रह्मदेशात जातिभेद नाही. तेव्हा तेथे अस्पृश्यता अथवा बहिष्कृतवर्ग नसला पाहिजे अशी समजूत होते. प्रत्यक्षात गेल्या हजार वर्षांपासून तो तेथे आहे. तेव्हा विठ्ठल रामजींनी त्या वर्गाचा पद्धतशीर अभ्यास करण्याची संधी सोडली नाही. अस्पृश्यता हा त्यांच्या संशोधनविषयक आस्थेचा विषय १९०३ पासूनच होता. त्याची निर्मिती व प्रक्रिया समजून घेण्याच्या दृष्टीने ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाचे त्यांनी जे निरीक्षण केले त्याचा शिंद्यांना मोठाच उपयोग झाला असा रास्त अभिप्राय डॉ. गो. मा. पवार यांनी नोंदविला आहे. शिंदे यांनी त्यानंतरच्या काळात पुणे येथे ‘ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्ग’ म्हणून एक विस्तृत लेख इतिहास संशोधक मंडळात वाचला व नियतकालिकांतही प्रसिद्ध केला. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या त्यागी वृत्तीचा, त्यांनी केलेल्या अपूर्व कार्याचा व त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा मोठाच प्रभाव ब्रह्मदेशातील मराठी व बंगाली मंडळींवर पडला होता. ह्याविषयी डॉ. पवार ह्यांनी आस्थापूर्वक माहिती सादर केली आहे.

१९३० साली पुणे शहर सत्याग्रही मंडळाधिकाराचे श्री. बाळूकाका कानिटकर व श्री. हरिभाऊ फाटक यांनी श्री. विठ्ठल रामजींची भेट घेतली व एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यातील कायदेभंग चळवळीचे त्यांनी नेतृत्व करावे अशी विनंती केली व ती शिंद्यांनी मान्य केली. त्याप्रमाणे श्री. शिंदे, प्रो. धर्मानंद कोसंबी व श्री. केशवराव जेधे यांनी एप्रिलच्या तिस-या आठवड्यात हवेलीनंतर खेड, नंतर भीमाशंकर भागांत दौरा केला. हा सर्व दौरा पायी व जणू वारकरी दिंडीसारखाच होता. ‘मी शहर सोडून खेड्यातच गेलो. याचे कारण शहरातील सुशिक्षित लोकांची प्रवृत्ती खेडेगावाकडे नाही. नोकरशाहीच्या पोटाला चिमटा बसविणारा एकच वर्ग म्हणजे शेतकरी हे आहेत’ अशी भूमिका घेऊन महर्षींनी हे कार्य केले होते. खेड्यातील कुणब्यांची मराठी आम्हाला आली पाहिजे. आपणास इंग्रजी येत असल्यामुळे पूर्ण मराठी येत नाही ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली.

एक-दोन ठिकाणी सभेमध्ये ज्या वेळेला अस्पृश्यांना वेगळे बसविल्याचे दिसून आले त्या वेळी पथकाने आपले ठाणे अस्पृश्य जमावात नेऊन स्पृश्यानांच वेगळे ठेवले.

कायदेभंगाच्या चळवळीतील सहभाग व झंझावाती प्रचार ह्यामुळे ११ मे १९३० रोजी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना त्यांच्या राहत्या घरात अटक केली. खटल्याची सुनवणी योगायोगाने त्यांचेच बालमित्र श्री. हुल्याळ यांच्यापुढे झाली. ते उभयता फर्ग्युसनमध्ये असताना विठ्ठलरावांनी साथीच्या दिवसांत त्यांची शुश्रूषा केली होती. प्रत्यक्षात श्री. हुल्याळ यांनी शिंद्यांना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व तोंडीच बी क्लास अशी दिली. अस्पृश्यवर्गाच्या व ब्राह्मणेतरांच्या या भीष्माचार्याला पकडण्यात आले. त्याबद्दल वृत्तपत्रांतून हळहळ प्रकट करण्यात आली. शेतकरीवर्गात त्यांचे वजन मोठे असल्यामुळे त्यांची चळवळ सरकारला बरीच जाचक वाटू लागल्याने एवढी जबर शिक्षा देण्यात आली असे केसरीने म्हटले. केसरीकार व जागृतीकार ह्या दोघांनीही त्यांना क वर्गात ठेवले गेले ह्याचा निषेध केला. अटकेच्या दुस-या दिवशी पुणे शहराने कडकडीत हरताळ पाळला. या सर्व घटनांचे चित्रमय वर्णन डॉ. गो. मा. पवार यांनी रेखाटले आहे.

पुढे जुलैमध्ये नामदार भास्करराव जाधव तुरुंगात येऊन त्यांना भेटले. चळवळीत सहभाग न घेण्याचे आश्वासन दिल्यास सुटका करू असा श्री. जाधव यांच्या बोलण्याचा रोख होता. त्याला अण्णासाहेबांनी बाणेदारपणे, स्वतंत्र बाण्याने, रोखठोक उत्तर दिले असे डॉ. पवार यथार्थपणे सांगतात.

या तुरुंगवासात कर्मवीरांनी सुमारे शंभर छापील पानांचा आत्मचरित्रपर मजकूर लिहिला. पण ह्याच काळात त्यांना गाऊट अथवा बोटाचा संधिवात जडला व त्यांचे वजनही दहा-बारा पौंडांनी कमी झाले. १३ ऑक्टोबरला त्यांची सुटका काहीशी लवकर अशी अनपेक्षितपणे झाली. दोन दिवसांनी रे मार्केटमध्ये त्यांच्या अभिनंदनार्थ प्रचंड जाहीर सभा झाली. हाही सर्व वृत्तान्त डॉ. पवार यांनी तपशिलाने दिला आहे.

यापुढील एका प्रकरणात डॉ. गो. मा. पवार ह्यांनी कर्मवीर शिंदे व महात्मा गांधी ह्यांच्यातील अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याच्या संदर्भातील परस्परसंबंधाचे मार्मिक व चिकित्सक विवेचन सादर केले आहे. हे प्रकरणही वारंवार काळजीपूर्वक वाचण्यासारखे आहे. हे दोघेही आपापल्या भूमिकेशी एकनिष्ठ होते. अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्याची जी नड शिंद्यांना वाटत होती तेवढी आणि त्या स्वरूपात गांधींना वाटत नव्हती. पण ह्या पलीकडे दोघांमधील असणा-या अंतराचा अर्थ लावणे फारसे योग्य ठरणार नाही. सुबोधपत्रिकाकारांचे “दोन कडक प्रवृत्तीची माणसे एकत्र आली असता एक-दुस-याच्या ओंजळीने पाणी प्यावयाचे नाही” हे विधान रास्त म्हणावे लागेल असा निष्कर्ष डॉ. पवार यांनी साधार माहितीच्या आधाराने सादर केलेला आहे. त्या दोघांच्यात संवाद व विसंवाद दोन्ही होता. महात्मा गांधींचा वर्णाश्रमधर्माचा अभिमान हा शिंदे यांना पटणारा नव्हता. दोघांचे अग्रक्रमही भिन्न होते. शिंदे ह्यांच्या अंत:करणात अस्पृश्यतेला पहिले स्थान होते. तर गांधींच्या अंत:करणात खादी, हिंदू-मुस्लीम ऐक्यानंतर कदाचित अस्पृश्यतेला तिसरे स्थान होते असे शिंद्यांचे मत होते. तर गांधींच्या मते अन्य बाबींबरोबरच अस्पृश्यतेलाही समान स्थान होते. पण चतुरपणात सरस असलेल्या गांधींनी शिंद्यांना ‘तुम्ही सरस आहात. कारण तुमच्या दृष्टीने ते सर्वस्व आहे’ असे सांगून वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला.

या संदर्भात डॉ. पवार यांनी शिंदे व गांधी यांच्या संबंधांचा एक प्रदीर्घ आलेखच सादर केला आहे. 'गेल्या तीन शतकांतील हतभागी हिंदुस्थानात पुण्यश्लोक श्री शिवाजीमहाराज आणि महात्मा गांधी हे दोन लोकोत्तर पुरुष निर्माण झाले' असे १९२२ सालीच शिंद्यांनी लिहिले होते. पण काँग्रेसमधील (अस्पृश्यतानिवारण या काँग्रेसच्या मते) तिय्यम दर्जाच्या कामाला काही अपवाद सोडता वेळ देण्याइतकी निकड व सवड कोणालाही वाटत नाही असे कर्मवीरांचे साधर व अचूक निदान होते.

शिंदे कमालीचे धर्मनिष्ठ होते, परंतु ते विश्वधर्माचे उपासक होते. कोणत्याही एका विशिष्ट धर्माची विशिष्ट प्रणाली व विशिष्ट परंपरा त्यांना मान्य नव्हती. धर्माच्या चौकटीत राहूनच अस्पृश्यतानिवारण करण्याची महात्मा गांधींची भूमिका शिंदे यांना सुसंगत वाटत नव्हती. त्यांना प्रमाण मानलेला धर्म हा विवेकनिष्ठ होता. म्हणून ह्या दोघांमध्ये सूक्ष्म मतभेद वेळोवेळी प्रकट होत होता. विरोधभक्तीच्या काचात शिंदे सापडले होते, असा सडेतोड निष्कर्ष डॉ. गो. मा. पवार यांनी नोंदविला आहे व तो बरोबरच आहे.

या संदर्भात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी शिंदे-गांधी संवादाबद्दल केलेले व डॉ. पवारांनी या ग्रंथात उतरवून घेतलेले निवेदन विचारप्रवर्तक आहे. या सर्व काळात दक्षिण भारतात खेडीच्या खेडी धर्मांतर करून ख्रिस्ती बनवली जात असता काँग्रेसचे व शिंद्यांच्या मिशनचे दलितांमधील काम अत्यंत असंघटित आहे अशी गोष्टही गांधींच्या नजरेस आणून देण्यास कर्मवीर हयगय करीत नसत.

१९२६ ते १९३२ या कालखंडात महर्षी शेतकरी चळवळीतही उत्कटतेने भाग घेत होते. शेतकरीवर्गाबद्दल स्वाभाविक आस्था असल्याने त्यांनी ते युरोपमध्ये असतानाच तेथील शेतकरीवर्गाची अवस्था काय आहे याची चौकशी केली होती. उपरोक्त कालखंडातच त्यांनी शेतक-यांना त्यांचे शत्रू कोण कोण आहेत याचे यथायोग्य विश्लेषण केले. काँग्रेस पक्षाच्या शेतकरीविषयक उणिवांचाही मार्मिक समाचार त्यांनी घेतला. अस्पृश्यांची शेतकरी परिषद (१९२६) पुणे, मुंबई इलाखा शेतकरी परिषद (१९२८) पुणे, वाळवे तालुका शेतकरी परिषद (१९३१) बोरगाव, संस्थांनी शेतकरी परिषद (१९३२) तेरदाळ व चांदवड तालुका शेतकरी परिषद (१९३२) वडणेर या पाच परिषदांमध्ये कर्मवीरांनी भाग घेऊन शेतक-यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे मोलाचे काम केले.

बहुतेक सर्व इलाख्यात अस्पृश्य समाजाची स्थिती शेतीवरच्या बिनमुदतीच्या गुलामासारखी आहे. अस्पृश्य हे दंडकारण्याचे मूळ मालक होत. एकी करून जमिनीवरील गेलेली सत्ता त्यांनी मिळवली पाहिजे. खेड्यात आणि कसब्यात मारवाडी-ब्राह्मणादी जातीचे लोक अडाणी शेतक-यास सावकारी जाळ्यात गुंतवून ऐतोबा मालक बनले आहेत शेतकरीवर्ग मजूर बनत चाललेला आहे. मुंबई येथे असलेल्या, शेतीचा थोडाफार आधार असलेल्या कामगारांचा गावाकडील शेतीचा आधार काढून त्यांना नि:शक्त करण्याचा सरकारचा हेतू आहे. बार्डोलीप्रमाणे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात शेतकरी सत्याग्रहाची मेढ रोवावी लागेल. संस्थानी अमलात शेतकरी जास्तच दु:खी असतात व तेथे परकीय राज्यकर्त्यांपेक्षा जास्त जुलूम प्रजेवर होतो. सारा नगद रकमेच्या स्वरूपात न घेता धान्यरूपाने घ्यावा. बळीराजा उभा राहील तरच स्वराज्याची आशा. जो आपल्या कुटुंबाच्या व आश्रितांच्या पोषणाकरता आप्तांकडून व आश्रितांकडून वाहवेल इतकीच जमीन बाळगतो आणि जो त्यांच्याच श्रमाने शेती करतो तोच शेतकरी; बाकीचे भांडवलदार किंवा दावेदार किंवा प्रतिस्पर्धी. तालुकानिहाय शेतकरी संघ इतकेच नव्हे तर कामकरी संघ निघाले पाहिजेत. तरच सहा महिने शेतकरी व उरलेले सहा महिने कामकरी असलेला बहुजन समाज भांडवलशाहीला आळा घालू शकेल. स्वत:चे आर्थिक स्वातंत्र्य मिळवा व सामाजिक घडण करा. श्रीमंत सत्ताधारी शेतक-याच्या प्रतिकारार्थ जमीन कसणा-या शेतक-यांची एकजूट करा. वरीलप्रमाणे शास्त्रशुद्ध, सत्याग्रही प्रतिकाराची ऊर्जा निर्माण करणारी, दूरदर्शी व मूलगामी भूमिका घेऊन विठ्ठल रामजी शिंदे ह्या शेतकरी चळवळीत अहोरात्र खपले.

त्याकरिता, ब्राह्मसमाजाच्या शतसांवत्सरिक उत्सवासाठी कलकत्त्यास निघाले आसताना त्यांनी पुणे शेतकरी परिषद धर्मकार्य मानून आपला प्रवास स्थगित केला. आपल्या मार्गदर्शनाखाली प्रचंड शिस्तबद्ध मोर्चे काढले. दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक यांमधील संस्थानांतील शेतक-यांच्यात व प्रजेत मौलिक स्वरूपाची जाणीवजागृती केली. श्री. दिनकरराव जवळकर यांनी ‘कैवारी’ मधून ब्राह्मणधार्जिणेपणाचा आरोप जोरदारपणे केला. तो सोसला. श्री. केशवराव जेधे ह्यांनीच मौन राखलेल्या शिंद्यांची बाजू जाहीरपणे घेतली. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता प्रत्यक्ष जमीन कसणा-या शेतक-यांशी एकरूप होऊन महर्षींनी आपले सत्त्व व स्वतंत्र बाणा कायम टिकविला. डॉ. पवार यांनी हा एकूण विषय चांगला खुलवून व पुराव्यानिशी मांडला आहे.

आपल्या आयुष्याच्या या अखेरच्या टप्प्यात विठ्ठल रामजींनी वाई व त्याच्या आसपासच्या ग्रामीण भागांमध्ये ब्राह्मसमाज संघटित करण्याकरिता बहुमोल कार्य केले. प्रार्थनासमाज व ब्राह्मसमाज यांची मूलतत्त्वे एकच होत. पण तत्त्वाप्रमाणे आचरण बंगाल्यात फार होतो, तसे महाराष्ट्रात होत नाही, ही गोष्ट त्यांनी वाईकरांच्या नजरेस आणून दिली होती. मराठा कुणब्याच्या बाणेदारपणाचे व स्वतंत्रवृत्तीचे वर्णन करून तो आपल्या व्यवहारात आणि धर्मात भूपतीला किंवा वर्णगुरूला ओळखीत नसतो, असेही त्यांनी वाईकरांच्या निदर्शनास आणून दिले. सत्यशोधक समाजाने सातारा जिल्ह्यातील खडकाळ जमीन नांगरली व रूढीचे तण उपटले; पुण्याकडील उपासनामंडळीने बी पेरले आणि अंकुर फुटल्यानंतर मुंबई व पुणे प्रार्थनासमाजाच्या पुढा-यांनी योग्य वेळी पाणी शिंपले असे त्यांना वाटले. वाईच्या या कार्यात शिंदे यांचे जे गुण प्रकट झाले त्याचा तपशीलवार व साधार निर्देश डॉ. गो. मा. पवार यांनी केला आहे. नव्या समाजात एकाच जातीचे लोक असून चालणार नाही याविषयीचा शिंदे यांचा आग्रह एतद्विषयक पत्रव्यवहारातून स्पष्ट होतो.

श्री. अण्णासाहेब शिंदे यांच्या आयुष्यातील अखेरचे स्वाक्षरीचे पत्र ११ मार्च १९४३ रोजी त्यांनी वाई प्रार्थनासमाजालाच पाठविले.

कर्मवीर भाऊराव पाटील आणि अण्णासाहेब यांचे संबंध घनिष्ठ होते. श्री. भाऊराव त्यांना गुरुस्थानी मानीत असत. सातारा येथील त्यांनी सुरू केलेल्या बोर्डिंगमध्ये अस्पृश्यता व जातपात पाळली जात नव्हती. दोघेही श्रेष्ठ दर्जाचे कर्मवीर होते. कर्मवीर पाटील यांनी रयत शिक्षणसंस्थेच्या आजीव सेवकांच्या शपथविधीस शिंद्यांना आवर्जून बोलावले. आजारी स्थितीत महर्षी १९३७ सालच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व त्यांनी सर्वांना शुभाशीर्वाद दिले.

श्री. अण्णासाहेब शिंदे यांचे वार्धक्यातील राजकीय, सामाजिक स्वरूपाचे अखेरचेच महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी निवडक ५२ मंडळींचे त्यांच्या राहत्या घरी योजिलेले स्नेहसंमेलन. ते झाले १८ सप्टेंबर १९३७ रोजी. मुंबई इलाख्यातील १९३७ साली अधिकारावर आलेल्या काँग्रेस सरकारने शिक्षणविषयक फेररचनेचा भाग म्हणून मुंबई इलाख्यातील १४ सरकारी हायस्कुले लोकांच्या स्वाधीन करण्याची घोषणा मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री श्री. बाळासाहेब खेर ह्यांनी केली होती. असा निर्णय घाईने घेणे हे अण्णासाहेबांना धोक्याचे वाटत होते. बहुजन समाजाच्या शिक्षणाबद्दल आस्था नसलेल्या शहरी शिक्षणसंस्थांच्या स्वाधीन जर ही हायस्कुले केली तर ही गोष्ट बहुजन समाजाच्या हिताची ठरणार नाही, असेही त्यांना वाटत असावे असा अचूक तर्क डॉ. गो. मा. पवार यांनी या संदर्भात नोंदविला आहे.

निमंत्रणपत्रिकेत क्रांतीचा उद्देश कृतीत उतरत नाही, तसेच संमेलनाचे यश वक्तशीर आगमन व मुद्देसूद चर्चा यांवर अवलंबून आहे असे म्हणण्याइतका अधिकार व स्पष्टवक्तेपणा त्यांच्याकडे होता. मंत्री, विधिमंडळ चिटणीस तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांतले कार्यकर्ते व विचारवंत अशा सुमारे शंभर माणसांचा समुदाय हजर होता.

सर्व खर्च धनिक लोकांकडून घेऊन प्राथमिक शिक्षणाची तातडीने सोय करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करताना सर्व जातींच्या आणि दर्जाच्या लोकांच्या हितसंबंधांचे संरक्षण झाल्याची खातरजमा होणे आवश्यक आहे. बहुजनपक्षाच्या प्रतिनिधींची संमती मिळवून त्यांच्या योजनेनुसार १४ हायस्कुले खाजगी संस्थांकडे द्यावीत. शिक्षणाचा काही भाग लोकांकडे सोपविणे हे फार सुचिन्ह आहे अशा प्रकारचे प्रास्ताविक शिंद्यांनी केले होते. त्यांची आंतरिक तळमळ सर्वांना भिडली असणार. नामदार खेर यांनी सर्व जातींच्या हितसंबंधांना धरूनच हायस्कुले खाजगी संस्थांकडे सोपविण्यात येतील असे स्पष्ट आश्वासन दिले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या कालखंडात पूर्वीप्रमाणेच विविध स्वरूपांच्या परिषदा तसेच संमेलने यांत भाग घेत होतेच. १९२५ च्या प्रांतिक सामाजिक परिषदेत त्यांनी महत्त्वाचे विचार मांडले. पाठीमागे विधायक कार्य करणा-या संस्था नसताना असल्या परिषदा नुसत्या घंटा अथवा वावटळी ठरतात. सामाजिक सुधारणा म्हणजे निव्वळ कर्मठ धार्मिक भावना व रूढी यांच्याविरूद्धचा झगडा असे नसून त्याचा फार मोठा व्याप आरोग्यसंवर्धन, शिशुसंगोपन, मजूरवर्गाची सुधारणा इत्यादी विषयांतही पसरला आहे, असे शिंदे अचूकपणे सांगत. आगरकरांसारखी धर्मविन्मुख प्रवृत्ती समाजसुधारकामध्ये असावी ही गोष्ट त्यांना अयोग्य वाटे. डॉ. गो. मा. पवार ह्यांना श्री. शिंदे यांचा हा विचार अत्यंत मौलिक व वस्तुस्थितीचे पाठबळ असलेला वाटतो. ह्याबाबतीत ते राय, फुले स्वत: शिंदे, शाहूमहाराज, गांधी आणि आंबेडकर या धर्मनिष्ठ नेत्यांचा उल्लेख करतात.

सामाजिक सुधारणेच्या संदर्भात शिंदे अस्पृश्यतानिवारण, ब्राह्मणेतरांचा असंतोष, हिंदू-मुसलमान ऐक्य व हिंदू संघटना ह्या बाबी भिन्न समजत नसत. बृहत हिंदू समाजास जडलेल्या काल्पनिक भेदाभेद या एकाच अंतर्गत रोगाची ती भिन्न भिन्न लक्षणे मानत. म्हणून तर अस्पृश्यतेचा प्रश्न धर्मग्रंथांच्या आधारे शास्त्री-पंडितांवर सोपवू नये असे ठाम मत गांधींना विरोध करत ते मांडत. स्त्रीदास्यविमोचन, सहकाराची चळवळ इत्यादींचाही समावेश ते ह्या कार्यात करत.

१९३३ च्या नागपूर येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनातील ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन विठ्ठल रामजींनी केले. अब्राह्मणांची अगर अस्पृश्यांची नियतकालिके आपल्या भागात बुडतात हे ठीक नाही. पेशवाई व मराठेशाही एवढ्यावरच संशोधनकार्य संपत नाही. केवळ संस्कृतवर अवलंबून न राहता पाली वगैरे प्राकृत भाषा व द्रवीड भाषा यांचाही अभ्यास व उपयोग केला पाहिजे. मराठ्यांनी इतिहासलेखन केले तर विशेष गोडी येऊ शकेल असे विचार त्यांनी मांडले.

१९३५ च्या बडोदे येथील मराठी साहित्य संमेलनात तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या विभागांच्या संमेलनाचे शिंदे अध्यक्ष होते. त्यांच्या दृष्टीचा ठाव इतरांपेक्षा नेहमीच वेगळा असे. भाष्यग्रंथ लिहिण्याचा गौण मार्ग ज्ञानेश्वर, एकनाथ या तत्त्ववेत्त्यांनी स्वीकारला. पुढे एका गीतेच्या घाण्याभोवती आपला तात्विक विचार फिरला. पूर्वीच्या काळी संस्कृतमधून आणि अधुनिक काळात पाश्चात्य देशांतून विचारांची आयात केली होती व जाते. आमच्या प्रोफेसरांनी नवीन शोध लावले नाहीत तरी परकीयांच्या ख-या शोधाची साध्या भाषेत रूपांतरे करून आम्हा अडाणी मराठ्यांना त्याची ओळख करून दिली तर ते मोठेच काम होईल असे विचार महर्षींनी मांडले. ‘पुण्याच्या पोकळ पंडिती संस्कृतीबद्दलची शिंदे यांच्या मनातील नापसंतीची भावना प्रकट झाल्यावाचून राहत नाही’ असा टोकदार शेरा ह्यानिमित्ताने डॉ. पवार सादर करतात.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या जीवनाच्या या पाचव्या अंतिम पर्वात बाकी सर्व व्याप सांभाळत १९३३ साली ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ या विषयावरील पहिला ठरणारा अव्वल दर्जाचा संशोधनपर प्रबंध प्रसिद्ध केला. यानिमित्ताने डॉ. गो. मा. पवार यांनी शिंदे यांचे विचारविश्व आणि साहित्यसेवा आणि संशोधनकार्य या विषयांवर दोन स्वतंत्र प्रकरणे लिहिली आहेत. शिंदे यांच्या बहुआयामी, चिकित्सक व अभिनव मांडणीचे समग्र वर्णन, विश्लेषण व वेध घेण्याकरिता चरित्रलेखनाच्या पहिल्या खंडाच्या जोडीला तेवढाच मोठा दुसरा खंड लिहावा लागेल असे मी प्रस्तावनेच्या सुरूवातीला म्हटलेच आहे पण या दोन प्रकरणात विठ्ठल रामजींचे समग्र चिंतन साररूपाने मांडण्याचा आटोकाट कठीण प्रयत्न करून डॉ. गो. मा. पवार यांनी प्रस्तुत ग्रंथाला पूर्णता मिळवून दिली आहे व त्याच वेळी आपणा सर्वांपुढील उपरोक्त दुस-या खंडाची जबाबदारी पर्यायाने सूचित केली आहे. या दोन प्रकरणांचे साररूप देण्याचे अवास्तव धाडस न करता मी उरलेल्या प्रकरणांकडे वळतो.

कर्मवीर शिंदे यांना जे अवमान सोसावे लागले, जो बहुमान झाला आणि अशा दोन्ही संदर्भात शिंदे यांची कणखर पण शालीन आत्मनिष्ठा कशी प्रकट होत असे हे डॉ. गो. मा. पवार यांनी चांगल्या प्रकारे दाखवून दिले आहे. शिंदे हे मराठेतरांकरिता काम करत म्हणून मराठा समाजातील अनेकांचा त्यांच्यावर रोष होई. त्यांच्यावर अस्पृश्य समाजातील अनेक जाणत्या मंडळींकडून सतत आघात झाले. पुण्यासारख्या शहराबद्दल व तेथे नेतृत्वाचा गंड मिरविणा-या पुढा-यांबद्दल तर बोलायलाच नको.

पण अण्णासाहेब शिंदे हे टीकेचे निराकरण करण्याच्या भरीस पडताना कधी दिसत नाहीत. स्तुती मात्र त्यांना अगदीच सहन होत नाही असे दिसते. ही स्तुती अथवा गौरव झटकून टाकल्याशिवाय त्यांना बरे वाटत नसे. ‘त्यांची विनोदबुद्धीच अशा वेळी त्यांना उपयोगी पडे’, असे मार्मिक विधान डॉ. पवार या संदर्भात करतात. शिंद्यांच्या स्वत:च्या भूमिकेवरील व कार्यावरील निष्ठा अढळ आणि उत्कट अशाच राहत. महर्षी शिंदे यांना मिळालेल्या काही ठळक मानपत्रांचा उल्लेख करून १८ जून १९३४ रोजी मुंबई येथे एकूण ४१ संस्थांच्या वतीने त्यांचा जो मानपत्र देऊन भव्य प्रमाणात सत्कार साजरा झाला त्याचा सविस्तर वृत्तान्त डॉ. पवार यांनी सादर केला आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक लवकर न संपल्यानेच महात्मा गांधी त्या समारंभाला अध्यक्ष म्हणून हजर राहू शकले नाहीत एवढी प्रतिष्ठा या समारंभाला लाभली होती. याही प्रसंगी शिंद्यांनी आपली नि:स्पृहता शाबूत ठेवली होती.

डॉ. गो. मा. पवार यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कौटुंबिक वातावरणाविषयीही अगत्याने आणि जिव्हाळ्याने लिहिले आहे. शिंद्यांची प्रेममय मनोवृत्ती, तिचा व्यापक आविष्कार, बालमित्रांविषयीची समरसता, कुटुंबातील सर्व घटकांबद्दलची आस्था व काळजीवाहू वर्तन, लहान मुलांबद्दलचे वात्सल्य, त्यांचा विनोदी स्वभाव, व्यक्ती नव्हे तर कुटुंब हेच प्रेमाचे एकक मानण्याचा त्यांचा गुणविशेष, आर्थिक ओढाताण चालू असतानासुद्धा आतिथ्यशीलता आणि स्त्रियांविषयी सदैव निर्मळ, उदारमनस्क व समजूतदार आस्था या सर्वच गोष्टींचा परामर्श डॉ. पवार यांनी घेतला आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अखेरच्या दिवसांचे हृदयस्पर्शी चित्रण डॉ. पवार यांनी शेवटच्या प्रकरणात सादर केले आहे. सदैव आर्थिक ओढाताण, अतोनात शारीरिक कष्ट, सार्वजनिक कार्याच्या धावपळीतून उद्भवणारी अनियमितता ह्यामुळे अण्णासाहेबांना उतारवयात अनेक शारीरिक व्यथांना तोंड द्यावे लागले. १९३० साली येरवड्याच्या तुरुंगवासात लक्षात आलेला संधिवाताचा विकार, त्यानंतर पाच वर्षींनी झालेले मधुमेहाचे निदान इत्यादी व्याधींनी ते उत्तरोत्तर शारीरिकदृष्ट्या विकल झाले. कौटुंबिक जीवनात आशा-निराशा यांचा खेळ आलटूनपालटून चालू होताच.

१९३९ साली आपले दुसरे चिरंजीव रवींद्र याच्या आग्रहामुळे व साहाय्यामुळे अण्णासाहेब आपले आत्मचरित्रपर लेखन कसेबसे पूर्ण करू शकले. याच कालखंडात त्यांच्या भेटीला आलेले पंडित मदनमोहन मालवीयजी त्यांना म्हणाले की, ‘आय ऍम अ डिफिटेड हिरो.’ त्यावर अण्णासाहेब उद्गारले की, ‘अ हिरो हॅज टु बी डिफिटेड.’ या उद्गारातून त्यांचे मन प्रकट होते असे डॉ. पवार सुचवितात.

आपल्या ‘आठवणी व अनुभव’ या पुस्तकाच्या पहिल्या भागाला विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करून आपले मनोगत प्रकट केले. “माझ्या कामात माझ्या साथीदारांचा, इतरांचा, फार काय ज्यांच्यासाठी मी घरदारही कमी समजून ती ती कामे करीत होतो, त्यांचाही माझ्यासंबंधी गैरसमज, दुराग्रह, नव्हे उघड विरोधही झाला. हाच माझ्या अनुभवाचा कठीणपणा किंवा दारुणपणा होय. त्यामुळे माझ्या मनाची शांती ढासळली आणि अकाली बहुतेक स्वीकृत कामातून विराम पावलो. मात्र धर्माचा प्रचार ह्या माझ्या अस्सल कामातून मी विराम पावणे शक्यच नाही. कारण मी धर्माचा स्वीकार केला हे खरे नसून धर्मानेच माझा स्वीकार केला अशी माझी समजूत असल्याने ह्या शरीरातून विराम पावेपर्यंत तरी धर्माने मला पछाडले आहेच व पुढेही तो मला अंतरणार नाही, ही मला आशा आहे.” ते पुढे म्हणतात की, “अलीकडे शांती मिळत आहे. कारण मी मृदू होऊ लागलो हेच होय.”

डॉ. गो. मा. पवार समारोपात म्हणतात की, महर्षींनी केलेले आत्मचिंतन व आत्मनिरीक्षण त्यांच्या ठिकाणी असणा-या अपूर्व सत्यनिष्ठेला व विशुद्ध धर्मभावनेला धरून आहे असे म्हणावे लागले. त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचाच आविष्कार त्यांच्या ह्या प्रांजळ निवेदनातून होतो. अखेरीस २ जानेवारी १९४४ या दिवशी पहाटेस विठ्ठल रामजी शिंदे यांचे चैतन्यतत्त्व अति कष्टविलेल्या शरीराला सोडून अनंतात विलीन झाले.


अर्वाचीन काळात महाराष्ट्राची आणि भारताचीही जडणघडण केलेल्या महान मराठी भाषिक शिल्पकारांच्या गणनेत महात्मा जोतीराव फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती शाहूमहाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच बरोबरीत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे नाव सर्वच अभ्यासकांना आणि सर्जनशील शक्तींना आज ना उद्या घ्यावे लागेलच.

स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि शील यांच्यावर आधारलेल्या जीवनाच्या सर्वांगीण लोकशाहीकरणाला जेवढी गती येईल आणि त्याच्याच बरोबरीने आजच्या विपरीत धर्मभावनेऐवजी मानवधर्मीय दृष्टीचा अंगीकार जेवढा वाढत जाईल तेवढ्या प्रमाणात उपरोक्त अन्य थोर समाजधुरिणांच्या तुलनेत उपेक्षित राहिलेल्या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या महत्तम कार्याचा सार्थ गौरव वर्धिष्णू होत राहील.

ह्या सर्व इतिहासकर्त्यांमध्ये योगायोगाने नव्हे तर अटळपणे एक गोष्ट समान आढळते. एरव्ही त्यांच्या वृत्ती, संस्कार, आवडीनिवडी व राजकारणे वेगळी. पण एका गोष्टीबद्दल त्यांची धारणा समान दिसते. बधिर व विकलांग झालेल्या समाजात चैतन्य निर्माण करण्यात व भावी काळात असा सचेतन व डोळस समाज निर्माण झाल्यावर त्याची अखंडता टिकविण्यासाठी त्यांनी धर्मचिंतनात खोल व सुजाण रस घेतला.

सर्वांगीण जातिनिर्मूलन हे संकल्पित मानवधर्मीय समाजाचे प्राणतत्त्व ठरणार आहे हे उपरोक्त यादीतील ज्या थोर व्यक्तींना अधिक निकडीने व तीव्रतेने जाणवले त्यांनी तर ह्याबाबतीत अधिकच वस्तुनिष्ठ व क्रांतदर्शी दक्षता घेतलेली दिसते. महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म निर्मिला, न्यायमूर्ती रानड्यांनी नवभागवत धर्माचा पुरस्कार केला, तर डॉ. आंबेडकरांनी धम्माचा सिंहनाद केला.

विठ्ठल रामजी शिंदे यांचेही सारे जीवन प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने घडवू पाहणारे अखंड धर्मसाधनच होते. प्रवृत्तिपर रसिकता, भक्ती आणि प्रेम या एकरूप गोष्टी असून ईश्वरही कृपा करो न करो, प्रेमच खरे आणि म्हणूनच ते पुरे अशा भूमिकेतून त्यांनी विशुद्ध धर्माचा सदैव सश्रद्ध, चिकित्सक, वस्तुनिष्ठ जीवनदृष्टीने शोध घेतला. मी ब्राह्म आहे, बौद्ध आहे असा कृतिरूप घोष करणारे शिंदे म्हणून ब्राह्मसमाज आणि सत्यशोधक समाज यांचा गाभा एकच आहे, असे मानून आपले धर्मशील जीवन व्यतीत करताना दिसतात.

परमेश्वरी साक्षात्काराच्या बाबतीत गूढतेचे वलय जाणीवपूर्वक धिक्कारणारी विठ्ठल रामजींची धर्मदृष्टी निकोप, भेदातीत बंधुत्वाची असल्यानेच वर्गजातिनिष्ठ अंधपणा आणि समाजरचना ह्यांमुळे ग्लानी आलेल्या आपल्या समाजात अस्पृश्यतानिवारण हा आध्यात्मिक आचारधर्माचा सर्वाधिक अग्रक्रमाचा, तातडीचा अनिवार्य मार्ग आहे, अशा धारणेतून त्यांनी जीवनाचा आत्मयज्ञ केवढीतरी किंमत सतत देऊन तडीस नेला. “भारतवासीयांनो, स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरून हा घातकी, पातकी आत्मबहिष्कार नाहीसा करा” अशी सिंहगर्जना करणा-या महर्षी शिंद्यांनी आपल्या ऐन तरुणवयापासूनच कृती आणि उक्ती यांतील याबाबतचे अंतर भरून काढले होते ते याच निकोप धर्मनिष्ठेच्या साक्षात्काराने.

‘सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा यांच्यामध्ये साहचर्य नाही, हे म्हणणे जसे पोकळ व अर्थशून्य आहे, त्याचप्रमाणे समाजसुधारणा व धर्माच्या आद्य तत्त्वांचे आचरण यांमध्ये साहचर्य नाही, असे म्हणणेही तितकेच भ्रामक आहे’, असे त्यांचे ठाम मत होते. सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी या आध्यात्मिक चळवळी असतात. पण आध्यात्मिक दृष्टी व विवेकशीलता यांच्यात एकमेळ प्रस्थापित केल्यानेच सर्व काल्पनिक भेदांचे विकार दूर होऊन ऐहिक वैभव व समाधान लाभेल, अशी शिंद्यांची धारणा होती. शिंद्यांच्या ह्या आध्यात्मिक ठेवणीमुळेच राष्ट्रनिष्ठा आणि प्रागतिकता, ब्राह्मसमाज व सत्यशोधक समाज, टिळक आणि गांधी, फुले व आंबेडकर अशा भिन्न भिन्न वृत्तींना ऐहिक हितसंबंधांवर आधारलेल्या एका सूत्रात त्यांना गुंफून घेता आले. त्यांचे हे कार्य कधी व्यक्तरूपाने दिसते व मान्य होते, कधी अव्यक्त राहते व स्मृतिभ्रंशाने सादळते. पण कधीही स्वत:चा टवटवीतपणा व कणखरपणा गमावत नाही.

प्रेममय आत्मज्ञानाचा अस्पृश्यतानिवारण आणि जातिनिर्मूलन यांच्याशी किती घनिष्ठ संबंध आहे, हे ओळखायला कर्मवीरांच्या तुलनेत महात्मा गांधींनी किती दीर्घ कालावधी किती वळणावळणांनी घेतला हे लक्षात घेतले तर विठ्ठल रामजींच्या उन्नत धर्मजीवनाचे मर्म आपल्याला अधिकच भावते. ख-याखु-या धर्मसंस्थापनेकरिता आणि सामाजिक पुनर्घटनेकरिता अस्पृश्योद्धार आणि जातिनिर्मूलन यांना संस्थात्मक पायावर संघटित रूप देणारे अर्वाचीन भारतातले पहिले कर्मवीर म्हणून इतिहास त्यांना ओळखत राहील. स्त्रीदास्यविमोचनासंबंधातही त्यांची भूमिका हीच होती. या प्रश्नाची हयगय केली तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल, असे ते बजावीत. या संदर्भात बहुजन समाजातील शहरी व ग्रामीण स्त्रिया जागरूक व्हाव्यात म्हणून कर्मवीरांनी जे कळकळीचे व आपलेपणाचे काम केले ते अमोल स्वरूपाचे आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या शेतकरी चळवळीचे महत्त्वही खूप मोठे आहे. पांढरपेशावर्ग व पुढारी आपणावर बोल्शेव्हिक असल्याचा आळ घेतील, याची तमा न बाळगता कर्मवीरांनी शास्त्रशुद्ध भूमिकेतून आणि विशेष म्हणजे भारतातील ऐतिहासिक वस्तुस्थितीचा किमपिही विसर न पडू देता शेतक-यांच्यात जागृती करून त्यांचे स्वावलंबी संघटन करण्याकरिता फार दगदग सोसली.

‘एका दृष्टीने पाहता हिंदुस्थानमधल्या शेतक-यांची स्थिती अस्पृश्यवर्गाहून अधिक कीव येण्यासारखी झाली होती’, असे त्यांचे रास्त मत होते. ‘बळी राजा उभा राहील तरच स्वराज्याची आशा. एरवी सर्वच गप्पा,’ अशी त्यांची भूमिका होती. भांडवलदार कोणत्याही जातीचा, दर्जाचा, स्वकीय किंवा परकीय असो अथवा संस्थानिक असो, इनामदार असो किंवा खोत असो, हेच सारे शेतक-याचे दावेदार होत. ते बहुतकरून शेतक-यांचे हितशत्रू आणि कित्येकदा तर अगदी उघड शत्रू असतात.

पण शेतकरी हा खेड्याशी, जमिनीशी बांधलेला असतो. त्याचा गोतावळा दूरदूरच्या खेड्यांत पांगलेला असतो. त्याचा संबंध अमुक एका निश्चित भांडवलदाराशीच येतो, असे नाही. या कारणाकरिता शेतक-यांमध्ये जागृती व संघटना निर्माण करणे कठीण गोष्ट आहे, याची कर्मवीरांना जाण होती.

ऐहिक हितसंबंधाच्या भरीव पायावर रचलेली शेतकरी चळवळ शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहील, त्याच वेळी सिद्ध होईल, याचीही जाण अण्णासाहेबांना होती. म्हणूनच आपल्या मागासलेल्या व दुहीने सडलेल्या देशात शेतकीच्या भरभराटीचा प्रश्न केवळ अर्थशास्त्राच्या पोकळ तत्त्वांवर किंवा प्रदर्शनाच्या परकीय भपक्यावर अवलंबून नसून तो सामाजिक शिक्षणावर व हितसंबंधांच्या सहकार्यावर जास्त अवलंबून आहे, अशी शिंद्यांची धारणा होती. म्हणूनच शेतकरी आणि कामक-यांनीही इतरांच्या तोंडाकडे पाहत न राहता स्वावलंबी संयुक्त संघाची तयारी केल्याशिवाय, इतर सर्व वल्गना व्यर्थ आहेत, असे अचूक निदान अण्णासाहेब करू शकले. म्हणून १९३१ च्या चांदवड तालुका परिषदेत त्यांनी सर्व वर्गाच्या कल्याणासाठी विचार व कार्य करणारी काँग्रेससारखी संस्था शेतक-यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वयंनिर्णय आयतेच आणून देण्याइतकी परिणामकारी ठरेल, असे समजणे म्हणजे निव्वळ दूधखुळेपणाचे ठरेल, अशी वस्तुनिष्ठ, शास्त्रशुद्ध व परखड भूमिका घेतली. तसेच शेतकरी श्रीमंत झाला की तोच जमीनदार बनतो, मग तो इतर गरीब शेतक-यांशी फटकून वागतो आणि इतर श्रीमंत सत्ताधा-यांच्या पंक्तीस बसतो, असे म्हणून आपल्या ऐतिहासिक व भविष्यदर्शी सत्यनिष्ठ प्रज्ञेचा आविष्कार प्रकट केला व आपसांतील अखंड जुटीचा मंत्र त्यांनी श्रमजीवी शेतक-यांना दिला. नेहमी काबाडकष्ट करणारे नांग-ये म्हणूनच काळ न कंठता राष्ट्राच्या अर्थकारणाचा गाडा खेचण्याकरिता नेहमी एक हात मोकळा ठेवा, असा चिरंतन स्वरूपाचा मार्ग विठ्ठल रामजींनी शेतक-यांना दाखविला. मजूर व मालक हा भेदच नव्हे, तर खेडे आणि शहर हाही भेद भविष्यकाळी टिकणार नाही, असे फार पुढचे भविष्य रंगविण्याइतकी प्रज्ञा असणा-या विठ्ठल रामजींनी केलेले शेतकरीजागृतीचे कार्य त्यांच्या जीवनकार्याचा अविभाज्य भाग होता.

बहुजन समाज आणि विशेषकरून मराठा समाज यांच्याविषयीही कर्मवीरांनी लक्षणीय व यथोचित कार्य केले. त्यांची स्वत:ची भूमिका “मला ‘इतर’ मीमांसा नको. ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर अशी मीमांसा मला मान्य नाही. मला जातींचा आणि जातिभेदांचा अगदी वीट आला आहे” अशी होती.

तरी पण मराठा समाज महाराष्ट्राच्या पाठीचा कणा आहे, हे ओळखण्याइतकी खोल समाजशास्त्रीय जाणीव त्यांना होती. त्यांचे “घराणे मूळ दक्षिणेकडील अस्सल कर्नाटकातले. साध्या राहणीचे व बाळबोध वळणातले. यांचा मराठमोळा पडदानशीन नख-याचा नाही किंवा ब्राह्मणी सोवळेपणाचाही नाही.” यामुळे विठ्ठल रामजी शिंद्यांना, श्रेष्ठत्वाचा अहंकार न मिरवता मराठा समाजाविषयी व विशेषत: शेती कसणा-या बहुसंख्य स्तरांविषयी आपुलकी व जिव्हाळा वाटत असे. आपल्या व्यासंगामुळे ते स्वतंत्र बाण्याच्या मराठा समाजाचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील कळीचे स्थान खोलवर ओळखून होते. म्हणूनच मराठा समाजाने इतिहास-संशोधन व इतिहासलेखन या क्षेत्रांत पुढाकार घेऊन महाराष्ट्राचा अस्सल व प्रातिनिधिक इतिहास पुढे आणावा; मराठी साहित्यात मराठा राहाटीचे चित्र अस्सल मराठमोळा भाषेत यावे, मराठा समाजाने प्राथमिक शिक्षणापासून सर्वोच्च शिक्षणापर्यंत भरीव अशी संस्थात्मक वाटचाल करावी, मराठा समाजातील स्त्रियांची शोचनीय परिस्थिती दूर व्हावी आणि शेतक-यांची भरभराट व्हावी म्हणून वेळोवेळी चिवट संस्थात्मक प्रयत्न केले.

या संदर्भात श्री. बा. ग. जगताप यांनी श्री. कृष्णराव भाऊराव बाबरलिखित शिंद्यांच्या चरित्राच्या प्रस्तावनेत पुढील मार्मिक विवेचन केले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे,  “मराठा हा बिनहिशेबी आहे” असे गुरुवर्य अण्णासाहेब नेहमी थट्टेने म्हणत असतात. हीच जर मराठा शब्दाची कसोटी असेल तर गुरुवर्य अण्णासाहेब मराठे आहेत, हे त्यांच्या चरित्रावरून सिद्ध होत आहे. जे खडतर कार्य आपण अंगीकारीत आहोत त्यायोगे आपली, आपल्या कुटुंबाची काय स्थिती होईल, ज्या मराठा समाजातून मी आलो आहे त्या समाजाला काय वाटेल वगैरे विचार त्यांच्या मनात आले नाहीत. आले असले तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. आज राष्ट्राला कशाची जरूर आहे, याचा विचार करून त्यांनी आपले ध्येय ठरविले व ते गाठण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इतर संसारी माणसाप्रमाणे रुपये आणि पैकडे त्यांनी पाहिले नाही आणि म्हणूनच आम्ही त्यांना कर्मवीर म्हणतो.” (जगताप, पृ. ३).

गुरुवर्य अण्णासाहेबांचा “सत्याग्रही हेकेखोरपणा हा विशेष होता. तो जर नसता तर त्यांनी जे कार्य, यश संपादन केले ते त्यांना करता न येते” असे मार्मिक उद्गार श्री. बा. ग. जगताप यांनी काढले होते. (उपरोक्त, पृ. ३).

कन्नड-मराठी संस्कृतीचे आदर्श फळ असलेले शिंदे आपल्यात नाहीत. पण श्री. शांताराम गरूड म्हणतात त्याप्रमाणे “जाताना आपल्यासाठी परिवर्तनाच्या क्षेत्रातील अनेक अवघड चढणी कशा चढायच्या, वळणे कशी पार पाडायची आणि अंतिम उद्दिष्टावरील नजर ढळू कशी द्यायची नाही याचा कृतिपाठ त्यांनी ठेवलेला आहे. आजच्या परिस्थितीला जुळणारी अशी कोणतीही सामूहिक कृतियोजना आखायची असेल तर तीसाठी आपली मानसिकता व्यापक, उदार आणि सदृढ कशी ठेवायची याची शिकवण केवळ अण्णासाहेबांच्या स्मृतीतून आपल्याला वेळोवेळी मिळू शकणार आहे.” (गरूड, पृ. २).

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ब्रह्मानंद केशवचंद्र सेन यांच्या कार्याचे जे सार काढले ते खुद्द शिंद्यांच्याच कार्याविषयही तंतोतंत खरे ठरते याविषयी माझ्या मनात कोणताही संदेह नाही. कर्मवीर म्हणाले होते की, “हे सर्व कशाने झाले ? धर्माची दोन अंगे, अंत:साधन व ब्राह्मसेवा ह्या दोन्हीला केशवाने आपल्या आयुष्याचे सर्वस्व अर्पण केले होते. उरी ठेवली नव्हती. अनासक्तीने त्याने प्रपंच केला, तो धर्मसाधनासाठी, समाजोन्नतीसाठी केला. शेवटचा काळ जरी शारीरिक व मानसिक क्लेशात गेला तरी त्यांचा जो अंत झाला तो अकाली मात्र म्हणता येत नाही. त्यांचे कार्य संपले होते. पुढे मनूही पालटला.” (मंगुडकर (संपा.), पृ. २५०).

अशा महात्म्याचे एवढे प्रदीर्घ, साधार व रसाळ चरित्र सिद्ध केल्याबद्दल डॉ. गो. मा. पवार यांचे अभिनंदन करून मी येथेच थांबतो.
प्रा. राम बापट

संदर्भ
१. कोलते, वि. भि, ‘प्रस्तावना’, समाविष्ट शिंदे, वि. रा. माझ्या आठवणी व अनुभव, पुणे, लेखन वाचन भांडार, १९५८, पृ. १-१४.
२. गरूड, शांताराम, ‘आरंभीचे निवेदन’, समाविष्ट, पाटील, एन. डी., महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा, कोल्हापूर, प्रबोधन प्रकाशन ज्योती, १९९९, पृ. २.

३. गाडगीळ, ध. रा., ‘पुरस्कार’ मंगुडकर, मा. प. (संपा.), शिंदे लेखसंग्रह, पुणे, ठोकळ प्रकाशन, १९६३, पृ. ७-१०.

४. चव्हाण, रा. ना., ‘कर्मवीर शिंदे यांच्या जीवनाचे मर्म व वर्म’,  नवभारत, ऑक्टोबर १९७४, पृ. ३०-५६.

५. जगताप, बा. ग., ‘प्रस्तावना’, समाविष्ट, बाबर, कृष्णराव भाऊराव, कर्मवीर विद्यार्थी, सातारा, विद्यार्थी पुस्तकमाला, १९३०, पृ. ३.

६. पवार, गो. मा., (संपादक), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनीशी, औरंगाबाद, मराठवाडा साहित्य परिषद, १९७९, पृ. १२६.

७. पाटील, एन. डी., महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक उपेक्षित महात्मा, कोल्हापूर, प्रबोधन प्रकाशन ज्योती, १९९९, पृ. ४.

८. सावंत, पी. बी, ‘विठ्ठल रामजी शिंदे : एक उपेक्षित महात्मा’, महाराष्ट्र टाइम्स, २३-४-१९८३.
 समाविष्ट, दहातोंडे, भि. ना., (संपा.) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे विशेषांक - २००१, अहमदनगर,    २००१, पृ. ६-८.

९. शिंदे, वि. रा., ‘ब्रह्मानंद केशवचंद्र सेन इ,’ समाविष्ट मंगुडकर, मा. प. (संपा.), शिंदे लेखसंग्रह, पुणे, ठोकळ प्रकाशन, १९६३, पृ. २५०.