मिशनची महाराष्ट्र परिषद

१९१२ साली घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची ऑक्टोबर महिन्यात पुणे येथे भरविण्यात आलेली महाराष्ट्र परिषद. १९०६ साली मिशनची स्थापना झाल्यापासून विविध प्रकारचे मिशनच्या कामाचा प्रचार करण्याचा जोरदार प्रयत्न शिंदे यांनी चालविला होता. वेगवेगळ्या गावी जाऊन तेथील हितचिंतक पुढा-यांची मने वळवून लोकमत तयार करण्यासाठी त्या गावी मोठमोठ्या सभा भरविणे, विविध ठिकाणी शाखा स्थापन करून निधी जमविण्यासाठी दौरा काढणे, ह्या मार्गाप्रमाणेच मिशनच्या खास सभा भरविणे हा एक अस्पृश्यतानिवारणकार्याचा आणि त्या वर्गाची उन्नती करण्याचा दुसरा परिणामकारक मार्ग होता.


मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक ह्या नात्याने काम करीत असताना शिंदे ह्यांनी अखिल भारतीय पातळीवरील राष्ट्रसभेचे अधिवेशन भरविण्याच्या ठिकाणी एकेश्वरी धर्मपरिषद भरविण्याचा उपक्रम सुरू केला होता हे आपण पाहिलेच आहे. १९०६ साली डिप्रेस्ड क्लासेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या वेळी शिंदे हे मिशनची परिषदही भरवू लागले. १९०७ साली सुरत, १९०८ साली मद्रास, १९०९ साली लाहोर, १९१० साली अलाहाबाद, १९१२ साली बांकीपूर आणि १९१३ साली कराची येथे राष्ट्रसभेच्या वेळी ह्या परिषदा भरविण्यात आल्या. बांकीपूर येथील काँग्रेसचे अध्यक्ष अमरावतीचे नामदार मुधोळकर वकील हे मिशनच्या परिषदेचेही अध्यक्ष होते. कराचीच्या परिषदेत लाला लजपतराय हे मिशनचे अध्यक्ष होते. मिशनच्या ह्या परिषदांमुळे हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या प्रांतांतून आलेल्या पुढा-यांचे लक्ष मिशनच्या ह्या कार्याकडे लागत असे. अस्पृश्यतानिवारणाच्या ह्या कामाबद्दल सहानुभूतीचे क्षेत्र वाढत असे. शिवाय त्या त्या प्रांतात मिशनच्या कार्याची उभारणी करण्यासाठी शिंदे ह्यांना माहिती व मदत मिळणे शक्य होई. प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यामध्ये अस्पृश्यतानिवारणाच्या बाबीचा शिरकाव व्हावा असा शिंदे ह्यांनी ह्या वेळी सतत प्रयत्न करून पाहिला. परंतु हा प्रश्न धर्माचा आहे, त्याची भेसळ राजकारणात नको अशी सबब सांगून त्या वेळचे जहाल अथवा मवाळ राजकीय पुढारी ह्या प्रश्नाची टाळटाळ करीत असत. मात्र मिशनच्या परिषदा भरवून अनुकूल प्रचाराचे हे कार्य शिंदे ह्यांनी नेटाने चालविले होते. ते मिशनच्या पुणे शाखेच्या कामाची पाहणी करण्यासाठी १९१२ सालच्या ऑगस्टमध्ये पुण्यास गेले असताना त्यांच्या मनामध्ये पुणे शाखेच्याच हितचिंतकांची एक लहानशी परिषद अल्प प्रमाणात भरवावी असा विचार आला होता. पुढे रा. सीतारामपंत जव्हेरे, ल. म. सत्तूर, जी. एन. सहस्त्रबुद्धे, दा. ना. पटवर्धन ह्यांच्याशी चर्चा करून परिषदेचे काम कोणत्या धर्तीवर चालवावे ह्यासंबंधी विचार झाला. परंतु पुढे विचारांती केवळ पुणे शाखेच्या हितचिंतकांची छोटी परिषद भरविण्याऐवजी विस्तृत प्रमाणावर मिशनच्या महाराष्ट्रातील हितचिंतकांचीच एक व्यापक परिषद भरवावी असे ठरले. ही परिषद ५, ६ व ७ ऑक्टोबर ह्या तारखांना सर रामकृष्णपंत भांडारकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात यावी असे ठरले. तसेच परिषदेची जागा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे अँम्फी थिएटर हे स्थळ निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे परिषदेची कार्यकमिटी भरविण्यात आली. कार्यकमिटीच्या ह्या रचनेत सर्व अस्पृश्य जातीचे निवडक प्रतिनिधी घेतले. शिवाय पुण्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधीही समाविष्ट केले.


महाराष्ट्रीय निराश्रित वर्गाच्या उन्नतीसंबंधी व्यावहारिक विषयांची त्यांच्या हितचिंतकांमध्ये व्यवस्थित रीतीने चर्चा व्हावी; नि. सा. मंडळीने चालविलेल्या कार्याची इतर शिक्षणविषयक व परोपकारी संस्थांच्या चालकांना माहिती मिळून त्यांच्याशी मंडळींनी सहकार्य साधावे व सर्वसाधारण लोकसमूहामध्ये ह्या कार्याविषयी सहानुभूती वाढवावी, हे हेतू परिषद भरविण्यामागे निश्चित करण्यात आले. वरील हेतूला धरून परिषदेत व्हावयाच्या चर्चेसाठी पुढील विषय निश्चित करण्यात आले.


१)मंडळीला वाहिलेल्या माणसांची जरुरी, २) पुणे येथील शाखेसाठी बोर्डिंगची आवश्यकता, ३) निराश्रित वर्गाच्या औद्योगिक शिक्षणाची दिशा, ४) निराश्रित वर्गाच्या विशेष अडचणी, ५) निराश्रितवर्गाच्या वाङमयात्मक शिक्षणाची दिशा, ६) मुंबई व पुणे येथील मंडळींच्या स्वतःच्या इमारतीची आवश्यकता, ७) म्युनिसिपालट्या, खाजगी शिक्षणसंस्था आणि परोपकारी शिक्षणसंस्था ह्यांच्याशी मंडळीचे सहकार्य, ८) सरकारी विद्यापीठे व देशी संस्थानिक ह्यांच्याशी शिक्षणाविषयक बाबतीत मंडळीचे सहकार्य, ९) आध्यात्मिक व सामाजिक बाबतीत निरनिराळ्या धर्मपंथातील अनुयायांशी मंडळींचे सहकार्य.


परिषदेच्या स्वागतकमिटीची रचना डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन ह्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यामध्ये प्रो. के. रा. कानेटकर, प्रो. गो. चि. भाटे, प्रो. द. ल. सहस्त्रबुद्धे, श्री. ल. म. सत्तूर, श्री. ए. के. मुदलियार, सीताराम जव्हेरे, मा. ह. घोरपडे इत्यादी, तसेच स्थानिक निराश्रित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून श्री. शिवराम जानबा कांबले, श्री. श्रीपतराव नांदणे, श्री. रखमाजी कांबळे, श्री. अनंता दा. खांडेकर, श्री. नुरासिंग पिरू मेहतर, श्री. वजीर मन्नू इत्यादी वेगवेगळ्या जातींतील मंडळींना घेण्यात आले. परिषदेचे सेक्रेटरी म्हणून श्री. विठ्ठल रामजी शिंदे आणि दा. ना. पटवर्धन ह्यांनी काम पाहावयाचे ठरविले. स्वयंसेवक मंडळींमध्ये श्री. व्ही. आर. मुदलियार, श्री. रा. ना. राजाज्ञे ह्यांच्यासमवेत अँग्रिकल्चर कॉलेजमधील विद्यार्थी श्री. बसानी, जडेजा, भाटरकर, बेंडीगिरी, साने इत्यादी होते. डॉ. मॅन ह्यांचे मिशनच्या कामी सदैव साहाय्य होत असे. त्यांनी परिषदेच्या स्वागतकमिटीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे मान्य केले.


विठ्ठल रामजी शिदे ह्यांनी ते इंग्लंडमध्ये असताना युनिटेरियन लोकांची लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक परिषद कशी पद्धतशीरपणे आयोजित केली होती हे प्रत्यक्ष पाहिले होते. अँमस्टरडॅम येथील जागतिक परिषदेमध्ये त्यांनी स्वतः भागही घेतला होता. म्हणून महाराष्ट्र परिषदेची योजना करताना त्यांच्यासमोर उत्तम नमुना होता व परिषद यशस्वी करण्यासाठी अविश्रांतपणे झटणारी श्री. दा. ना. पटवर्धन ह्यांच्यासारखी सहकारी मंडळी होती. प्रारंभापासून ते परिषदेची इतिश्री होईपर्यंतचे कामकाज अत्यंत काळजीपूर्वकपणे त्यांनी केले. ही एक अत्यंत नमुनेदार अशा प्रकारची परिषद त्या काळी आयोजित केली गेली असे म्हणावे लागेल.


स्वागतमंडळाची बैठक ७ सप्टेंबर रोजी भरली. त्या वेळी परिषदेसंबंधीच्या सर्व व्यवस्थेचे टाचण करण्यात आले व व्यवस्थापकांनी कामाची वाटणी केली व त्याप्रमाणे कामाला जोराने सुरुवात झाली. ह्या परिषदेकरिता बाहेरगावाहून अस्पृश्यवर्गाचे प्रतिनिधी, मिशनच्या शाखेचे प्रतिनिधी व इतर हितचिंतक विद्वान वक्ते ह्यांना आमंत्रित करावयाचे ठरविले व ही सर्व मंडळी परिषदेसाठी आल्यावर त्यांची उतरण्याची, राहण्याची, जेवण्याची वगैरे सर्व सोय करण्याचे परिषदेच्या स्वागतमंडळीने पत्करले. परिषदेसाठी पैशाची गरज होतीच. त्या बाबतीत खटपट करण्याचे काम प्रो. सहस्त्रबुद्धे, भाटे व शिंदे ह्यांनी पत्करले व ह्या कामी प्रो. धर्मानंद कोसंबी, प्रो. भाटे, रा. हिवरगांवकर, भारत सेवक समाजाचे रा. आपटे ह्यांनी फार परिश्रम घेऊन मदत केली. परिषदेच्या खर्चाचा प्राथमिक अंदाज ५००/- रु. केला होता. परंतु एकंदर परिषदेचा खर्च ७३१/- रु. एवढा झाला.


परिषदेस येण्याकरिता बाहेरगावच्या अस्पृश्यवर्गातील त्याचप्रमाणे वरिष्ठ मानलेल्या जातीतील व्यक्तींना परिषद कमिटीच्या सेक्रेटरीने सुमारे २ हजार पत्रे बाहेरगावी पाठविली व त्यांची उत्तरेही आली. हे सर्व काम एक-दीड महिन्याच्या आतच करावे लागले. बाहेरगावावरून येणा-या परिषदेच्या निमंत्रितांना रेल्वेची व आगबोटीची सवलत मिळावी असा प्रयत्न सेक्रेटरींनी केला. परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. परिषदेची कल्पना समजावून देण्यासाठी स्थानिक अस्पृश्यवर्गाच्या वस्तीमध्ये जाऊन सभा घेण्यात आल्या. भवानी पेठ, गंज पेठ, कसबा पेठ, भांबुर्डा, हडपसर व वानवडी ह्या ठिकाणी अशा एकंदर ८ सभा घेण्यात आल्या.


ह्या सर्व ठिकाणी जमलेल्या मंडळींना सभेस येण्यासंबंधी निमंत्रित करण्यात आले व बरीचशी मंडळी परिषदेला उपस्थितही राहिली.


परिषदेकरिता स्वयंसेवकांची फळी उभी करण्यात आली होती. स्वयंसेवकांखेरीज सर्व्हंट्स ऑफ इंडियाचे सभासद श्री. वझे ह्यांनी परिषदेच्या कामात रात्रंदिवस साहाय्य केले. पुणे येथे शेतकी कॉलेजमधील त्याचप्रमाणे इतर कॉलेजमधील तरुण विद्यार्थ्यांनी उन-वारा-पाऊस ह्यांना न जुमानता स्वयंसेवक म्हणून रात्रंदिवस मेहनत केली. परिषदेकरिता आलेल्या सर्व जातींच्या दूरदूरच्या पाहुण्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था मिशनच्या पुणे येथील लष्करातील शाळेच्या इमारतीत केली होती. पाहुणेमंडळा परिषदेसाठी पुण्यात आल्यानंतर त्यांच्या नावांची नोंद होई. ह्या नोंदीमध्ये प्रतिनिधींचे नाव, जात व ते कोणत्या गावाहून आले ह्याचा निर्देश केला जात असे. प्रातःकालचे विधी आटोपल्यानंतर प्रतिनिधींचे चहापान होई व इतर मंडळींशी परिचय व बोलणेचालणे होई. जेवणासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. सर्व जातींचे मिळून २६० पाहुणे आले होते. त्यांची एकत्र भोजने तीन दिवस मिळूनमिसळून होत होती.


परिषदेच्या दुस-या दिवशी म्हणजे रविवारी परिषदेसाठी आलेले गावोगावचे प्रितनिधी, पाहुणे, स्वयंसेवक व वरिष्ठ जातीतील हितचिंतक मंडळी ह्यांचे प्रीतिभोजन झाले. भोजनप्रसंगी डॉ. मॅन ह्यांनी स्वागतकमिटीचे अध्यक्ष म्हणून मुख्य यजमान ह्या नात्याने पाहुणे मंडळींचा मोठ्या प्रेमाने समाचार घेतला व ते स्वतःही इतरांप्रमाणे देशी पद्धतीने बूट काढून जमिनीवर सर्वांबरोबर जेवावयास बसले. ह्या भोजनप्रसंगी अस्पृश्य मानलेल्या वर्गातील ४०० मंडली व वरिष्ट मानलेल्या जातीतील ५० मंडळी उपस्थित होती. भव्य प्रमाणात साजरा झालेला हा सहभोजनाचा सोहळा त्या काळामध्ये अपूर्व होता व अस्पृश्यतानिवारण करण्याची कळकळ असणा-या व ह्या कामासाठी झटणा-या मंडळींना हा देखावा अनुपम आनंददायक वाटला.


ह्या सहभोजनाच्या दिवशी एक विघ्न उपस्थित झाले. परिषदेतील पाहुण्यांचा दोन दिवसांच्या जेवणाचा स्वयंपाक ब्राह्मण आचारी खुशीने करीत होते. परंतु रविवारच्या मोठ्या सहभोजनाच्या दिवशी पुणे शहरातील बरीच ब्राह्मण मंडळी जेवण्यास येणार हे ऐकून सकाळी १० वाजता स्वयंपाक्यांनी संप करून मोठा अडथळा आणला. चालकांनी त्यांना लगेच मंडपातून जाण्यास सांगितले. बाहेरून आलेल्या पाहुण्यामंडळींपैकी ब्राह्मण बायकांनी आणि स्वागत कमिटीतील अस्पृश्य सभासदांच्या बायकांनी स्वयंपाकाचे सर्व काम एकदम अंगावर घेऊन ठरल्याप्रमाणे १२ वाजता सर्व तयारी केली. ह्या कामी अण्णासाहेब शिंदे ह्यांच्या पत्नी सौ. रुक्मिणीबाई ह्यांनी पुढाकार घेऊन बिनबोभाट तयारी केली व आकस्मिक उपस्थित झालेल्या ह्या विघ्नाचे निवारण झाले. ह्या प्रसंगाने पुण्याचा सुधारकीपणा आणि सनातनीपणा ह्या दोन्ही प्रवृत्तींचे एकाच वेळी वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडले.


ह्या परिषदेसाठा महाराष्ट्रामधून व बाहेरून थोर पुढारीमंडळी आलेली होती. डॉ. भांडारकर हे तर परिषदेचे अध्यक्ष होते. आलेल्या मंडळींत सर चंदावरकर, भावनगर संस्थानचे दिवाण प्रभाशंकर पट्टणी, ना. मौलवी रफिउद्दीन, इचलकरंजीचे अधिपती श्रीमंत बाबासाहेब घोरपडे, कोल्हापूरचे भास्करराव जाधव, पुण्यातील गोपाळराव देवधर, बी. एस्. कामत, प्रो. धोंडोपंत कर्वे, रेव्ह. रॉबर्टसन, तेलगू समाजाचे पुढारी डॉ. कोरेज, अस्पृश्यांपैकी सुभेदार मेजर भाटणकर, नगरचे डांगले, पुण्याचे कांबळे, भंग्यांचे पुढारी नाथामहाराज, सातारचे मातंग पुढारी श्रीपरराव नांदणे वगैरे अनेक पुढारी होते.


बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांत अमरावती, अकोला वगैरेसारख्या लांबच्या पल्ल्यावरून रा. भांगले, रा. परचुरे हे आले होते. भावनगरहून रा. वैद्य हे सहकुटुंब आले होते. अहमदनगर, बेळगाव, सातारा, मुंबई, नाशिक, कोल्हापूर वगैरे ठिकाणाहून अस्पृश्य मानलेल्या वर्गातील त्याचप्रमाणे वरिष्ठवर्गातील मंडळी आली होती. विशेष लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे त्या परिषदेसाठी असलेली स्त्रियांची उपस्थिती. अमरावतीहून सौ. भांगले, अकोल्याहून सौ. इंदिराबाई परचुरे व श्रीमती बेंद्राबाई, मुंबईहून सौ. लक्ष्मीबाई रानडे, जनाबाई शिंदे, भावनगरहून सौ. चंपुताई वैद्य व सातारा, मिरज वगैरे ठिकाणावरून कितीतरी अस्पृश्य भगिनी परिषदेसाठी उपस्थित राहिल्या होत्या. ह्या बाहेरगावाहून आलेल्या भगिनींनी त्याचप्रमाणे सौ. रुक्मिणीबाई शिंदे ह्यांनी व सौ. कांबळे, सौ. थोरात, सौ. सदाफळे वगैरे भगिनींनी व्यवस्थापनाच्या कामातही मदत करून सामानसुमानाची व्यवस्था लावणे व प्रसंग पडल्यावर स्वयंपाकाची जबाबदारी घेणे ह्या कामी मोठे सहकार्य केले.


शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर १९१२ रोजी दोन प्रहरी फर्ग्युसन कॉलेजच्या अँम्फी थिएटरमध्ये परिषदेला प्रारंभ झाला. अध्यक्षपदी डॉ. भांडारकर हे स्थानापन्न झाले. जमलेल्या थोर मंडळींमध्ये सर नारायण चंदावरकर, डॉ. बाबासाहेब घोरपडे, कोल्हापूरचे भास्करराव जाधव, पुण्याचे गोपाळराव देवधर, बी. एस्. कामत. प्रो. धोंडो केशव कर्वे, रेव्हरंड रॉबर्टसन, तेलगू समाजाचे पुढारी डॉ. कोरेज, अस्पृश्यांपैकी सुभेदार मेजर भाटणकर, नगरचे डांगळे, पुण्याचे शिवराम जानबा कांबळे, भंग्यांचे पुढारी नाथमहाराज, सातारचे मातंग पुढारी श्रीपतराव नांदणे वगैरे अनेक पुढारी होते.


परिषदेसाठी मोठा स्पृश्य-अस्पृश्यवर्ग जमलेला होता. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणाला मोठ्या आनंदाने व उत्साहाने सुरुवात केली. ते म्हणाले, “आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आमच्या पुढच्या विश्वबंधुत्वाचे ध्येयशिखर स्पष्ट दिसत आहे. त्याच्या चढणीची एक महत्त्वाची पायरी आम्ही चढणार आहोत. जातिभेदामुळे आमच्या देशाचे असंख्य तुकडे झाले आहेत. याजबद्दल आम्ही पुष्कळ वेळा दुःख मानले आहे, परंतु आज त्यांपैकी बहुतेक तुकडे एकत्र आणि एकोप्याने जुळून आलेले दाखविणारा आम्हाला सुखाचा दिवस आला आहे. ह्याबद्दल प्रथम आपण आपल्या विश्वजनकाचे आभार मानूया.”१ आपल्या भाषणात त्यांनी अस्पृश्यतानिवारणकार्याच्या चळवळीचा थोडक्यात इतिहास सांगून मिशनने चालविलेल्या आधुनिक धर्तीच्या प्रयत्नामुळे झालेल्या कार्याचा विस्तार पुढीलप्रमाणे सांगितला.


तक्ता  (तक्ता वाचण्यासाठी इथे क्लीक करावे )

सध्या एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुले, ५ वसतिगृहे, १२ इतर संस्था व ५ प्रचारक असून खर्च एकंदर रु. २४,४८५/- आहे.

 

"अशा त-हेने निरनिराळ्या ४ भाषा चालू असलेल्या ७ प्रांतातून मिशनला आपले प्रयत्न करावयाचे आहेत असे सांगून त्यासाठीच हल्ली भरलेल्या परिषदेसारख्या निरनिराळ्या ठिकाणी प्रांतिक परिषदा भरविण्याची गरज असल्याचे" त्यांनी सांगितले. प्रस्तुत परिषदेमध्ये कामाचा विस्तार परिणामकारक रीतीने करता यावा यासाठी कोणते प्रश्न आहेत व कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे इत्यादी बाबींचा प्रमुख्याने व्यावहारिक अंगाने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

 

प्रस्तुत परिषदेचा वेगळेपणा सांगताना शिंदे ह्यांनी म्हटले की, आजकाल आपल्या देशात विवक्षित जातीच्या अनेक परिषदा भरत आहेत. पण त्या परिषदांपेक्षा ही परिषद अगदी भिन्न स्वरुपाची आहे. अनेक जाती ह्या परिषदेत एकत्रित आल्यावर अखेर "सरकार संस्थानिक, म्युनसिपालट्या आणि परोपकारी संस्था, सर्व जाती आणि सर्वधर्म एकूण ह्या प्रचंड देशातील सर्व शुभशक्ति ह्यांचे केंद्र ह्या कार्यात जितक्या अंशाने जास्त साधेल तितक्याच अंशाने अधिक यश येईल,"२ असा आशावाद प्रकट केला.

 

डॉ. मँन ह्यांनी डॉ. भाडारकर ह्यांचा यथायोग्य परिचय श्रोतुवर्गाला करून देऊन अध्यक्षस्थान स्वीकारण्याची सूचना केली व तिला रा. रखमाजीराव कांबळे व रा. पांडुरंगराव डांगळे ह्यांचे अनुमोदन व पुष्टी मिळाल्यावर ते अध्यक्षपदी स्थानापन्न झाले.

 

डॉ. भांडारकर ह्यांनी आपल्या विद्वताप्रचुर आणि संशोधनात्मक भाषणात अस्पृश्यतेचे मूळ कशात आहे ह्याबद्दलची मीमांसा वेद-उपनिषिदे, पाली ग्रंथ, मराठी संतकवी ह्यांच्या आधारे व प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासाला धरून मोठ्या अधिकारयुक्त वाणीने केली.

परिषदेच्या ३ दिवसाच्या कालावधीमध्ये निरनिराळ्या व्यक्तिंनी पुढील विषयावर विद्वत्तापूर्व व माहितीपूर्ण अशी व्याख्याने दिली. ह्या व्याख्यात्यांच्या यादीतून किती विविध सामाजिक स्तरावरील व्यक्तिंनी परिषदेमध्ये आस्थेवाईक पणे भाग घेतला ह्याची कल्पना येऊ शकेल.

तक्ता (तक्ता वाचण्यासाठी इथे क्लीक करावे )


प्रस्तुत परिषदेत झालेल्या भाषणातील काही मुद्द्यांचा निर्देश करणे आवश्य वाटते. रा. गणेश आकाजी गवई काही दिवस मुंबई येथे मिशनच्या निराश्रित सदनामध्ये वसतिगृहातील विद्यार्थी म्हणून राहिले होते. त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली होती व अमरावतीजवळील थुगाव ह्या आपल्या गावी स्वतःच्या अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याच्या दृष्टीने कार्य चालविले होते. तेथे त्यांनी प्रार्थनासमाजही चालविला होता. आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की, “व-हाडात रोमन कॅथॉलिक निराश्रित ख्रिस्ती मिशन-यांनी महार लोकांसाठी शाळा काढून मोठे काम चालविले होते. त्या तुलनेने भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीचे काम कितीतरी कमी प्रमाणात आहे हे जाणवते. मात्र ह्याचा अर्थ निराश्रित साहाय्यकारी मंडळींच्या प्रयत्नाचे मोल कमी आहे असे नव्हे.” असे सांगून ते म्हणाले, “स्वार्थावर लाथ मारून गळ्यात झोळी अडकवून संस्थेकरिता- अर्थात आमच्या लोकांकरिता – संस्थेचे जे चालक भिक्षांदेही करीत दारोदारी बाहेर फिरतात व त्यांना यात कितीही अल्प यश आले तरी त्याची ते पर्वा न करता चंदनासारखे स्वतः झिजून दुस-यांना- आम्हांला- सुख देण्याकरिता, आमची स्थिती सुधारण्याकरिता आपला प्रयत्न चालू ठेवतात त्या संतांची किंमत आजपर्यंत झालेल्या कोणत्याही संतापेक्षा आम्हांला यत्किंचितही कमी वाटत नाही. कित्येकांना ती जास्त वाटेल.”३


मुंबईस निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या सेवासदनात गवई स्वतः राहिलेले असल्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे आणि त्यांचे सहकारी किती स्वार्थत्यागपूर्वक अविश्रांत परिश्रम घेतात हे त्यांनी प्रत्यक्ष बघितले होते. म्हणून त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे गौरवोद्गार त्यांच्या तोंडी स्वाभाविकपणे आले. ही आपण केलेली तुलनाही आमच्या उद्धाराचा प्रश्न हिंदी राष्ट्राने नव्हे आमच्या स्वधर्मीय हिंदू लोकांनीसुद्धा अजून सोडविला नाही हे निदर्शनास आणण्याच्या हेतूने केली असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. नि. सा. मंडळींच्या हेतूची आणि कामाची नीट माहिती पुण्यातील लोकांनासुद्धा नाही. ही मंडळी नि. सा. मंडळींच्या हेतूचा विपर्यास कसा करतात हे त्यांनी सांगितले व मंडळीसाठी अनेक प्रचारक मिळण्याची आवश्यकता प्रतिपादली. गवई ह्यांच्या भाषणानंतर श्री. एस्. बी. कामत, सौ. लक्ष्मीबाई रानडे, श्री. गोपाळराव देवधर ह्या वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये अस्पृश्यवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची आवश्यकता असून गुरुकुल पद्धतीच्या ह्या वसतिगृहात राहिल्याने त्या वर्गातील मुलांचे चांगले शिक्षण होऊन त्यांचे शील सुधारण्यास मदत होईल असे प्रतिपादिले. प्रो. केशवराव कानिटकर ह्यांनी निराश्रितांच्या औद्योगिक शिक्षणाची आवश्यकता सांगितली. उद्योगधंद्यांचे शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या साहाय्याने निराश्रित लोकांनी कारखाने वगैरे काढले तर आपल्या पदरी वाटेल तितके पांढरपेशे कारकून ठेवण्याची त्यांना ऐपत येईल. मात्र आपला धंदा सोडून कारकून होण्याची हाव धरू नये असे त्यांनी सांगितले.


कोल्हापूरचे रा. सा. भास्करराव जाधव ह्यांनीही गाव निराळा व महारवाडा निराळा असे होणे बरोबर नाही असे सांगून, निराश्रितांच्या धंदेशिक्षणास प्राधान्य दिले पाहिजे असे मत मांडले. दुस-या दिवशी झालेल्या भाषणात नामदार श्री. बाबासाहेब इचलकरंजीकर ह्यांनी जातिभेद नाहीसा होण्याच्या दृष्टीने आजची परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे असे सांगून सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू झाल्यास निराश्रितवर्गातील मुलांना मोठाच लाभ होईल असे सांगितले. शक्य असेल तेथे वेगळी शाळा न काढता उच्च वर्गाच्या मुलांबरोबर त्या वर्गातील मुलांचेही एकत्रित शिक्षण होणे स्पृहणीय ठरेल असे सांगितले. उच्चवर्णीयांना उद्देशून ते म्हणाले, “तुम्हाला जर एकराष्ट्रीयत्व मिळवावयाचे असेल तर तुम्ही निराश्रितांची उन्नती करण्याच्या कामी मदत केली पाहिजे.” निराश्रितवर्गास उद्देशून बोलताना ते म्हणाले की, “आपली उन्नती व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर उच्चवर्गाशी फटकून वागल्याने ती होणे शक्य नाही. झाल्या त्या गोष्टी झाल्या. त्याच हरहमेश उगाळीत बसू नका. ह्या संबंधाने समाजाचे जे दोष दिसून येतात ते चालू पिढीचे नसून मागील पिढ्यांचे आहेत हे लक्षात बाळगा. आम्हांलाही तुमच्या सहानुभूतीची गरज आहे तर निष्कारण दुही माजवून नसत्या अडचणी उत्पन्न न करता सध्याच्या अडचणीतून वाट काढण्याची सदैव दृष्टी ठेविली पाहिजे.”४ आपल्या भाषणानंतर त्यांनी ह्या परिषदेच्या खर्चासाठी ५० रु. देणगी दिल्याचे जाहीर केले.


न. चिं. केळकर ह्यांनी आपल्या भाषणात म्युनिसिपालटी व लोकलबोर्ड ह्यात निराश्रितवर्गाचा प्रतिनिधी असावा. निराश्रित साहाय्यकारी मंडळी, म्युनिसिपालटी व लोकलबोर्ड आणि खाजगी संस्था ह्यांमध्ये सहकार्य वाढवावे असे मत प्रदर्शित केले.


कोल्हापूरचे रा. सा. भास्करराव जाधव आपल्या भाषणात म्हणाले, निराश्रितांना सरकारी नोकरीत प्रवेश मिळणे आवश्यक आहे. इंग्रज सरकारला ते कठीण वाटत असले तरी संस्थानिक ते करू शकतात. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती ह्यांनी आपल्या हत्तीवर महार माहूत असल्याचे त्यांनी सांगितले.


कुर्तकोटीचे भावी शंकराचार्य श्री. महाभागवत विद्याभूषण ह्यांचे संस्कृतमध्ये भाषण झाले. उच्चवर्गीय हिंदू व मागासलेले अस्पृश्य हे एकाच हिंदू समाजाचे घटक असून त्यांच्या हिताहितसंबंधाचा विचार एकत्रितपणे झाला पाहिजे असे सांगून त्यांनी समन्वयाची भूमिका मांडली. त्यानंतर रा. लक्ष्मशास्त्री लेले ह्यांनी आपल्या भाषणात ३० कोटी हिंदी लोकंपैकी ६ कोटी हिंदू लोकांवर धार्मिक व सामाजिक बहिष्कार असावा ही गोष्ट मोठ्या खेदाची आहे असे सांगितले कोणत्याही स्थळी कोणत्याही व्यक्तीला अबाधितपणे जो धर्म आचरिता येतो त्याला सनातन धर्म म्हणतात अशी सनातन धर्माबद्दलची व्यापक कल्पना त्यांनी मांडली. आपण सर्वजण परमेश्वराची लेकरे आहोत ह्या दृष्टीने आपणामध्ये भावंडांचे नाते येते. ह्या दृष्टीने आपण सगळे सारखे आहोत. ह्यात उच्चनीच भाव व जातिभेद नाही अशा प्रकारचे उन्नत विचार श्री. लक्ष्मणशास्त्री लेले ह्यांनी मांडले.


रा. न. चिं. केळकर, श्री. महाभागवत व प्रो. लक्ष्मणशास्त्री लेले ह्यांच्यासारख्या सनातन हिंदू धर्माच्या कैवा-यांनी भाषणे करून अस्पृश्यतानिवारणाच्या व त्या वर्गाची उन्नती करण्याच्या कार्याला पाठिंबा दर्शविला व ह्याबाबतीत निराश्रित साहाय्यकारी मंडळीचे कार्य स्पृहणीय मानले व त्या कामाला सहकार्य करण्याची भूमिका प्रकट केली. ही ह्या परिषदेची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागले.


तिस-या दिवशी श्रीमती रमाबाई रानडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रियांची सभा मिशनच्या लष्कर येथील शाळेत भरली. त्या सभेला वरिष्ठवर्गातील सुमारे ५० व अस्पृश्य समाजातील सुमारे २०० स्त्रिया हजर होत्या. जमलेल्या स्त्रियांमध्ये मिसेस हारकर, सौ. लक्ष्मीबाई रानडे, सौ. रुक्मिणीबाई शिंदे वगैरे मंडळी उपस्थित होती. प्रारंभी सौ. जनाबाई शिंदे ह्यांनी जमलेल्या स्त्रियांचे स्वागत करून दिली. नंतर त्यांचे बंधू अण्णासाहेब शिंदे ह्यांनी अध्यक्ष श्रीमती रमाबाई रानडे व सौ. काशीबाई कानिटकर ह्यांची श्रोतृवर्गास ओळख करून दिली. श्रीमती रमाबाई अध्यक्षपदावरून म्हणाल्या, “अशी कामे आम्हां बायकांच्या अंगवळणी पडली नाहीत, पण ती पडेपर्यंत कामाला खरा जोर येणार नाही. निराश्रितवर्गातील स्त्रियांची सुधारणा करण्यासंबंधाने पुणे, मुंबई, यवतमाळ, अकोला, अमरावती वगैरे ठिकाणी जे प्रयत्न होत आहेत ते सर्व मी पाहिले आहेत. अकोला येथे श्रीमती बेंद्राबाई यांनी आपल्या महार जातीतील १४-१५ मुलांचे एक स्वतंत्र वसतिगृह चालविले आहे. त्यात इतकी स्वच्छता व टापटीप दिसली की, ही मुले निकृष्ट जातीची आहेत असे कोणालाही ओळखता येत नाही.”५ शिक्षणाप्रमाणे निराश्रितवर्गातील लोकांनी स्वच्छतेकडे लक्ष पुरविले पाहिजे असे त्यांनी सांगितले. शेवटी उच्चवर्गाच्या लोकांना निराश्रितांस अंतःकरणपूर्वक साहाय्य करण्याचा उपदेश करून अध्यक्षांनी आपले भाषणे झाले.त्यांनी भाषणाच्या प्रारंभी सांगितले की, “ह्या कॉन्फरन्सला आल्यानंतर कोठे उतरावे वगैरेसंबंधी बरीच काळजी वाटत होती. परंतु येथे पाहुण्यांकरिता जो कॅम्प आहे तेथे आल्यानंतर ५-६ मिनिटांनी ३-४ बाया मजवळ आल्या आणि जिथे बसणे-उठणे मला सोयीचे वाटले अशाच जागी त्यांनी माझी उतरण्याची सोय केली. माझ्यासारख्या इतर ज्या बाया आल्या त्यांनाही कोणत्याच प्रकारची अडचण पडू दिली नाही. उलट त्या आमच्याशी जशा मोकळेपणाने व प्रेमाने वागल्या त्याची फेड लाजून लाजूनच पुरे होण्यापलीकडे आमच्या हातून काही झाली नाही.” अशा शब्दांमध्ये वरच्या वर्गातील स्त्रियांनी आपल्याशी कसे प्रेमळपणाचे वर्तन केले हे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, तेथे महार, मांग, चांभार, ब्राह्मण ह्यांपैकीच बहुतेक सर्वजण होते. कित्येक अशी शंका काढू लागले की आता आपल्या सर्व जातींचे जेवण एकाच ठिकाणी होणार की काय? आलेल्या महार मंडळींची मांगांच्यासमवेत एका पंक्तित जेवायला बसण्याची तयारी दिसत नव्हती. त्याबाबतीत सौ. पार्वतीबाई म्हणाल्या, “तुम्हांस ब्राह्मणांसच्या पंक्तीस बसण्याची हौस वाटते आणि मांगास पंक्तीत येऊ देण्यासंबंधाने तुम्ही नाराज होता. वगैरे वगैरे काही वाद होऊन शेवटी सर्वजण काहीएक संकोच न बाळगता एकाच पंक्तीत बसले ही गोष्ट मोठी आश्चर्यकारक झाली असे मला तरी निदान वाटते. त्यांना तसे करण्यासा कुणी आग्रह किंवा जुलूम केला नव्हता. परंतु ब्राह्मण महारास जितके अस्पृश्य मानतात तितकेच महार लोक मांगांस अस्पृश्य मानीत असूनही आज निरनिराळ्या ठिकाणचे निदान ३०० बहुतेक महार आणि मांग एका ठिकाणी जेवलेले पाहून मला वाटते कोणासही आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.”
ह्या परिषदेच्या निमित्ताने वातावरण कसे बदलले होते. वरिष्ठवर्गातील स्त्रिया, महार, मांग ह्या जातीतील स्त्रियांशी कशा प्रेमळपणाने, अस्पृश्यत न बाळगता वागत होत्या दिसून येते, तसेच अस्पृश्यवर्गातील जातीतही असलेली श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची जाणीव कमी होऊन त्यांमध्ये एकोपा निर्माण व्हावयाला सुरुवात झाली, ह्याचे स्पृहणीय दृश्य परिषदेत दिसून आले. सौ. पार्वतीबाई जाधव ह्यांच्या धन्योद्गारात पुढील सुधारणेची गती कशी वेगवान राहील ह्याची कल्पना येऊ शकते.


विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या मार्गदर्शनाने परिषदेचे संयोजन उत्तम प्रकारे झाले. परिषदेमध्ये वाचण्यासाठी अस्पृश्य व स्पृश्य अशा विविध जातींतील मंडळीकडून निबंध मागविण्यात आले. ह्या निबंधांमध्ये अस्पृश्यवर्गातील विविध जातींच्या कोणत्या समान अडचणी आहेत व कोणत्या काही विशिष्ट जातीच्या अडचणी आहेत याची आपल्याला कल्पना येऊ शकते. श्री. राजाराम नारायण राजाज्ञे ह्या महार गृहस्थाने खेडेगावातील शाळांत निराश्रित मुलांना घेत नाहीत, ही अडचण नमूद करून नवीन शाळा देताना त्या शाळेत अस्पृश्य मुलांना घेण्यास आमची हरकत नाही अशी गावक-यांची लेखी कबुली घ्यावी व ह्याविरुद्ध कोणाचे वर्तन झाल्यास त्या गावातील शाळा उठवावी किंवा अस्पृश्यांकरिता मुलांच्या संखेकडे न पाहता निराळी शाळा द्यावी व त्याचा खर्च लोकलबोर्डातर्फे किंवा गावक-यांपासून घ्यावा, अशी सूचना केली आहे. श्री. ना. शिवतरकर ह्यांनी ‘मराठी भाषा बोलणा-या चांभारांची स्थिती’ ह्या आपल्या निबंधामध्ये देशावरील व कोकणातील चांभार जातीतील मुलांची शिक्षणाची मजल ३-४ इयत्तेपलीकडे जात नाही, असे सांगून ह्या जातीतील शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे असे सांगितले. देशावर पुष्कळ शाळांमधून आमच्या मुलांना शाळेत घेत नाहीत. बाहेर उन्हात वगैरे त्यांना बसावे लागते अशी परिस्थिती नमूद केली. शिक्षणाचा प्रसार वाढावा ह्यासाठी व्याख्याने, पुराणे ह्या द्वारा मंडळींनी ह्यांना उपदेश केला पाहिजे व ह्या जातींच्या मुलांसाठी मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिपा ठेवल्या पाहिजेत असे सुचविले. पुणे येथील महार समाजाचे पुढारी शिवराम जानबा कांबले यांनी ‘निराश्रितांच्या उन्नतीच्या मार्गातील मुख्य अडचण’ ह्या निबंधात अस्पृश्यपणा हाच ह्या लोकांच्या उन्नतीच्या मार्गातील अडथळा होय व तो दूर करण्याचे काम सरकारचे नाही तर ते आमच्या हिंदू समाजाचे आहे असे प्रतिपादिले. अहमदनगर येथील निराश्रितांच्या शाळेचे अनुभवी हेडमास्तर श्री. पांडुरंगराव डांगळे ह्यांनी ‘अस्पृश्य जातींच्या लोकांकरिता सक्तीच्या शिक्षणाची आवश्यकता’ ह्या आपल्या निबंधात ‘दयाळू इंग्रज सरकाराने नामदार गोखले ह्यांनी वरिष्ठ सरकारी कौन्सिलात ठेवलेल्या सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी निदान अस्पृश्य जातीत तरी करावी, कारण सक्तीखेरीज सरकारने दयाळूपणाने जरी आमच्याकरिता निराळ्या शाळा दिल्या तरी त्या शाळांतून अस्पृश्य लोक आपली मुले नियमितपणे पाठवीत नाहीत. ह्याचे कारण त्यांना ज्ञानाची किंमत समजत नाही. म्हणून सरकारने निदान ४ ते १४ वर्षांच्या मुलांना सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा करावा.’ अशी आग्रहाची विनंती केली.


अहमदनगर येथील असिस्टंट मास्तर श्री. नरसू शिदू सूर्यवंशी ह्यांनी आपल्या निबंधात गरिबीमुळे मुलांना आईबापांना शाळेतून काढावे लागेत. म्हणून हुशार व होतकरू मुलांची विद्या पुढे चालावी ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अस्पृश्य मुलांसाठी एक फ्री बोर्डिंग सुरू करावे अशी निराश्रित साह्यकारी मंडळींस त्यांनी विनंती केली. जनक साधू शेलार ह्या लोणावळा येथील केबिनमन असलेल्या महार गृहस्थांनी खेडेगावातील शाळांतून अस्पृश्य मुलांस वेगळे बसवितात व त्या मुलांच्या अभ्यासाकडे शिक्षक काळजीपूर्वक लक्ष पुरवीत नाहीत, तसेच अस्पृश्य लोकांना सरकारी नोक-या मिळत नाहीत, योगायोगाने मिळाली तर वरिष्ठ जातीतील हिंदू ती टिकू देत नाहीत, अशी वस्तुस्थिती नमूद केली. लोणावळे येथील आपला अनुभव नमूद करताना त्यांनी असे म्हटले आहे की, मुलगे ८-९ वर्षांचे झाल्याबरोबरच त्यांचे पालक कोणातरी साहेबांकडे अगर रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये क्लिनरची नोकरी लावतात व त्या मुलांना अज्ञानामुळे व वाईट संगतीमुळे जुगार, चो-या करणे व दरू पिणे ह्या सवयी बालपणापासूनच लागतात. तरी हया मुलांकरिता रेल्वेच्या अधिका-यांनी व नि. सा. मंडळींनी मिळून रात्रीची शाळा व भजनसमाज काढून त्यांची सुधारणा करावी अशा सूचना केल्या.


सातारा येथील मांग समाजातील श्री. श्रीपतराव नांदणे ह्यांनी मांग जातीबद्दलची वस्तुस्थिती आपल्या ‘मांग लोकांच्या गरजा’ ह्या निबंधात मांडल्या. त्यांनी असे म्हटले की, “आमची मांग लोकांची संख्या सुमारे २० लक्ष आहे. परंतु इतर जातींस म्हणजे महार, चांभार, कुंभार वगैरेंना मूळच्या जमिनी व इनाम जमिनी आहेत, पण मांग लोकांस मुळीच नाहीत. जंगलखात्यातून मुलकी खात्याकडे गेलेल्यांपैकी शिल्लक जमिनी मांग लोकांना देण्याची इंग्रज सरकारने तजवीज करावी. त्याचप्रमाणे मांग लोकांना ते कोठेही असले तरी चौकीवर हजेरी देण्याची तसदीही आहे. तरी ती जातीवर न ठेवता सरकारांनी माणसावर ठेवून निदान चांगल्या माणसांना ती माफ करावी अशी सूचना आहे. मांग लोकांना वाखाची लागवड कशी करावी हे शिकवावे व वाखाच्या दो-या करण्याची यंत्रे देववून त्यांची स्थिती सुधारावी.” यासाठी काहीतरी उपाय योजावे अशी सरकारास त्यांनी विनंती केली. पुण्याच्या गंज पेठेतील विश्वनाथ विष्णू साळवे ह्या मांग गृहस्थाने आपल्या निबंधात बोर्डिंग, शाळा व रात्रीच्या शाळा सुरू कराव्या असे सुचविले, तर पुण्याच्या गंज पेठेतील श्री. सीताराम लांडगे ह्या म्युनिसिपालटीच्या शाळेतील शिक्षकांनी आपल्या निबंधात अस्पृश्य लोकांनी गलिच्छपणाने राहणे व व्यसने करणे ह्या गोष्टी टाकून द्याव्या असे सुचविले.


पुण्याच्या भवानी पेठेतील नाथामहाराज मेहतर ह्यांनी आपल्या निबंधात पुण्यातील मेहतर लोकांच्या अडचणी नमूद केल्या. मेहेतर मंडळींना पगार अत्यंत कमी असोत. त्यामुले कर्जबाजारीपणा वाढतो. ह्यासाठी म्युनिसिपालटीने पगार वाढवावा अशी विनंती केली आहे. आमच्या मुलांना दुपारी १२ वाजेपर्यंत काम करावे लागते म्हणून त्यांच्यासाठी शाळेची वेगळी व्यवस्था करावी. पुण्यामध्ये ड्रेनेजचे काम सुरू झाल्याने आम्हा लोकांना आमचा धंदा बुडेल म्हणून फार चिंता लागून राहिली आहे. तरी सरकार, म्युनिसिपालटी व वरिष्ठ जातीचे लोक ह्यांनी आमच्याबद्दल उदारबुद्धीने विचार करून मार्ग दाखवावा, अशी विनंती केली.


अस्पृश्यवर्गातील विचार करणा-या पुढारी मंडळींनी लिहिलेल्या ह्या निबंधामधून त्या वर्गाच्या तत्कालीन दुरवस्थेचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येते. ब-याच मंडळींनी अंतर्मुख होऊन आपल्या वर्गातील स्वच्छतेचा अभाव, व्यसनीपणा ह्या दुर्गुणांवर बोट ठेवले आहे, तर शाळेसारख्या सार्वजनिक ठिकाणीही अस्पृश्यता पाळल्यामुळे आपल्या मुलांच्या शिक्षणात कसा अडथळा येतो हे त्यांनी सांगितले आहे. धंदेशिक्षणाची आवश्यकताही ह्या समाजातील मंडळींना जाणवली आहे असेही दिसून येते. केवळ मांग जातीत जन्मल्यामुळे सातारा येथील मांगांवर जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसून ते कुठेही असले तरी चौकीवर हजेरी देणे भाग पडते. हा जातिविशिष्ट अधिकचा अन्याय त्यांच्यावर घडत असतो. पुण्यात मैला वाहून नेण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था होणार व पोट कसे भरायचे असा घोर पुण्याच्या मेहेतर समाजाला लागून राहिला होता. मैला वाहण्याचा अत्यंत घाणेरडा असा धंदा टिकून राहावा असे मेहेतर समाजाला वाटावे हा केवढा दारुण दैवदुर्विलास. एकंदरीत नव्याने जागृत होऊ पाहणा-या अस्पृश्य मानल्या गेलेल्या ह्या समाजामध्ये स्वतःचा उद्धार करून घेण्याची तळमळ त्यांनी केलेल्या भाषणांमधून व वाचलेल्या निबंधांतून दिसून येते.


 एकंदरीत परिषदेचा हेतू उत्तम प्रकारे सफल झाला. वरिष्ठवर्गातील कित्येक वक्त्यांनी अस्पृश्यता पाळणे हे कसे अन्यायाचे आहे हे सांगितले. त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गातील लोकांनीही भूतकाळात झालेला अन्याय उगाळीत न बसता वरिष्ठवर्गाबद्दल समंजसपणाची व एकोप्याची भावना ठेवणे कसे आवश्यक आहे ह्याचा निर्देश केला. सनातनी मताच्या मंडळींमध्येही अस्पृश्यता नष्ट करून ह्या वर्गातील लोकांशी बंधुभावाने व प्रेमपूर्वकपणे व्यवहार करावा अशी जाणीव निर्माण झाल्याचे सुचिन्ह उत्तम त-हेने प्रकट होताना दिसते. भारतीय निराश्रित मंडळीने व्यापक प्रमाणामध्ये अस्पृश्यतानिवारणाचे व अस्पृवर्गाची उन्नती घडवून आणण्याचे जे काम सुरू करून वाढविले होते त्याची योग्य प्रकारची दखल स्पृश्य आणि अस्पृश्य अशा दोन्ही वर्गातील व्यक्तींनी स्पृहणीय त-हेने घेतली असे दिसते. एवढेच नव्हे तर निराश्रित साहाय्यकारी मंडळींना सर्व थरांतून अधिकाधिक मदत करण्याची भावना जशी दिसून येते त्याचप्रमाणे नि. सा. मंडळींबद्दल कामाच्या बाबतीत अपेक्षा उंचावल्या होत्या असे आढळते. नि. सा. मंडळाच्या कार्याला महाराष्ट्राने दिलेला हा चांगला प्रतिसाद म्हणावा लागेल.
ह्या परिषदेमधून काही महत्त्वाची नवीन कामे उत्पन्न झाली हेही परिषदेचे उत्तम फलित म्हणावे लागते.


संदर्भ
१.    भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची महाराष्ट्रीय परिषद, जनरल सेक्रेटरी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, पुणे, १९१२. पृ. ९-१०.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २६१.
३.    महाराष्ट्र परिषद अहवाल, पृ. २३.
४.    तत्रैव, पृ. ३१.
५.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २६२.