मिशनच्या स्थापनेचा संकल्प

विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) हि संस्था अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाची उन्नती करण्याचे कार्य करण्यासाठी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी स्थापन केली. या संस्थेची स्थापना ही केवळ अस्पृश्यवर्गाच्या दृष्टीनेच नव्हे तर भारतीय समाजाची पुनर्घटना करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना होती. ही संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने शिंदे यांची पूर्वतयारी कसकशी होत गेली व अखेर त्यांच्या ठिकाणी ही प्रेरणा कशी निर्माण झाली ते पाहू.

घरच्या उदारमतवादी वातावरणाचे संस्कार तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर बालपणीच झाले होते. मॅट्रिकच्या वर्गात आणि कॉलेजमध्ये गेल्यावर ह्या संस्कारांना बुद्धीवादी विचाराची जोड मिळाली. परंतु विठ्ठल रामजी हे केवळ विचाराच्या पातळीवर थांबणारे व्यक्तिमत्त्व नव्हते. विचार आचरणात आणण्याचा सच्चेपणा आणि धडाडी त्यांच्या ठिकाणी होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या सुधारणेची पहिली कृती त्यांच्याकडून १८९३ मध्ये घडली. विठ्ठलराव फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रीव्हियसच्या वर्गात शिकत असताना मे महिन्याच्या सुटीत जमखंडीला आले. त्या वेळी त्यांना एक अस्पृश्य जातीची पाच-सात वर्षांची मुलगी देवाला मुरळी म्हणून वाहिलेली आढळली. मुरळी म्हणून तिचे आयुष्य नासले जाऊ नये, तिला माणुसकीचे जिणे जगता यावे यासाठी त्यांनी कळकळीचे प्रयत्न करावयाचे ठरविले. त्यांनी तिला शाळेत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळी अस्पृश्य मुलीस जमखंडीसारख्या संस्थानातील शाळेत प्रवेश मिळणे शक्य नव्हते. म्हणून ते तिला आपल्या घरीच शिकवीत असत. विठ्ठलरावांच्या आईनेही त्या मुलीला प्रेमळपणे वागविले. नंतर ही मुलगी जमखंडी येथील अस्पृश्य मुलींच्या शाळेत शिक्षिका झाली.१ अस्पृश्यवर्गीयांबद्दल शिंदे यांनी पहिले कार्य केले ते हे.

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबाबत आपण काहीएक कार्य करावे ही जाणीव त्यांच्या मनात उद्भूत झाली होती. बारामतीचे रा. कळसकर यांची आणि विठ्ठलरावांची भेट झाली, याचा वृत्तान्त त्यांनी २२ मे १८९८ या तारखेस रोजनिशीमध्ये लिहिला आहे. ह्या नोंदीवरून महार, मांग या अंत्यज समजल्या जाणा-या जातींबद्दल त्यांना वाटणारी कळकळ किती उत्कट स्वरूपाची होती व या लोकांच्या उन्नतीसाठी आपण काहीएक करावयास पाहिजे याबद्दलची जाणीव कशी तीव्र स्वरूपाची होती याची कल्पना येऊ शकते.२

इंग्लंडमधील दोन वर्षांच्या वास्तव्यात युनिटेरियन धर्ममताच्या मंडळींनी चालविलेल्या डोमेस्टिक मिशनसारख्या संस्था ह्या लंडन, मँचेस्टर वगैरे औद्योगिक शहरात दीन, दुबळे अपंग, बाल आणि वृद्ध इत्यादिकांसाठी परोपकराची कामे करतात व दीन-दुबळ्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात ह्याचे त्यांनी जवळून निरीक्षण केले होते. अशा प्रकारची मिशन चालविणारी मंडळी ही कामे जीव ओतून समर्पणशील वृत्तीने करतात म्हणूनच ह्या प्रकारच्या मिशनची कामे सातत्याने व सफळपणाने चालू शकतात हेही त्यांच्या अनुभवास आले होते. दीन-दुबळ्यांची सेवा करणे हे धर्मकार्यच आहे, अशी ह्या मंडळींची धारणा ह्या कामाच्या मुळाशी होती.

इंग्लंडमध्ये बघितलेल्या मिशनचा विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला.३ अशा प्रकारच्या कामाची गरज सगळ्यात अधिक कुणाला असेल तर ती अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाला असेच त्यांच्या डोळ्यांसमोर आले असणार. शिंदे १९०१च्या डिसेंबरमध्ये नाताळची सुटी लंडनमध्ये घालविण्यासाठी गेले होते. त्या वेळी २२ तारखेस पोर्टलंड स्ट्रीटमधील युनिटेरियन देवळात रेव्ह. पेरिसचे आफ्रिकेतील लढाईसंबंधी जोरदार प्रतिकूल मत प्रकट करणारे व्याख्यान ऐकले होते. रेव्ह. पेरिसची भूमिका त्यांच्या मनाला एकदम पटली. व्याख्यानात त्यांनी म्हटले होते, “धर्म जर व्यवहारात येत नसेल, अगर कोणताही नीतीचा अथवा न्यायाचा व्यवहार धर्मात गणला जात नसेल तर मी आजच प्रचारकपदाचा राजीनामा देईन.”४

विठ्ठल रामजी शिंदे हिंदुस्थानात परत आले ते तेथील मिशनच्या कामाचे निरीक्षण करून. लोकोपयोगी काम कृतज्ञतेची भावना आणि धर्मकार्य यांची एकरूपताही त्यांच्या मनाला पटली होती. हिंदुस्थानात परत आल्यानंतर बडोद्यास गेले असता अस्पृश्यवर्गाच्या शाळांची तपासणी त्यांनी केली होती. श्रीमंत सयाजीरावमहाराजांनी चालविलेले हे कार्य किती उच्च दर्जाचे आहे हे त्यांच्या मनाला भावलेच. मात्र महाराजांच्या या उदात्त कार्याला रूढीमुळे पडलेली मर्यादाही त्यांच्या ध्यानात आली. ही मुले मराठी पाचवी किंवा इंग्रजी दुसरी-तिसरीनंतर शाळा सोडून देतात. कारण त्यांनी परिश्रमपूर्वक विद्या संपादन केली तरी त्यांना तिचे फळ पुढे मिळण्याची कोणतीच सोय असत नाही. “हिंदू समाज त्यांना आपल्यातील एक म्हणून स्वीकारीत नाही. नोकरीच्या बाबतीत इतरांबरोबर समान संधी देत नाहीत म्हणून महाराजांची राजसत्ता आणि अमर्याद सहानुभूतीचा ओघ असूनदेखील हिंदू समाजाच्या सहानुभूतीच्या अभावी ह्या शाळांची फारशी प्रगती होऊ शकत नाही,”५ असा आपला अभिप्राय त्यांनी कथन केला.

बडोत्यात सयाजीरावमहाराजांनी चालविलेले अस्पृश्यांच्या शिक्षणाचे हे कार्य पाहून विठ्ठल रामजी शिंदे प्रभावित झाले. ह्या वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करण्याची गरज आहे हे त्यांना तीव्रपणाने जाणवले. येथील शाळांत शिकणारी मुले भविष्यकालीन संधीच्या अभावी वैफल्याने शिक्षण अर्ध्यावरच सोडून देतात व अशोभनीय असा पारंपरिक धंदा करण्याकडे प्रवृत्ती न राहिल्याने ते आळशीपणा जास्त प्रतिष्ठेचा मानू लागतात असे त्यांच्या पाहण्यात आले. ह्याच वेळी त्यांनी आपल्या मनामध्ये अशी खूणगाठ बांधली असेल की, ह्या मुलांना केवळ शालेय शिक्षण देणे पुरेस ठरणार नाही. जोडीला औद्योगिक शिक्षण देण्याचीही गरज आहे.

ह्या सा-या निरीक्षणामुळे, अनुभवामुळे व अस्पृश्य मानलेल्या वर्गाबद्दल त्यांच्या ठिकाणी असणा-या आंतरिक कळकळीमुळे ह्या लोकांच्या सुधारणेसाठी आपण काहीएक करावे अशी प्रबळ ऊर्मी शिंदे यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ह्याच सुमाराला म्हणजे १९०३च्या अखेरीस नागपूरजवळील मोहपा या गावचे महार तरुण श्री. किसन फागुजी बनसोडे हे त्यांच्या सहवासात आले. एका मराठा तरुणाच्या प्रेरणेने त्यांनी मोहपा येथे सोमवंशीय हितचिंतक मंडळी ही संस्था स्थापन केली.६ तेव्हापासून व्याख्याने, चर्चा आणि पंधरवड्यातून धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्यासाठी आणि भजन करण्यासाठी होणा-या बैठका अशा प्रकारच्या प्रयत्नातून या संस्थेने स्वोद्धाराचे काम चालविले आहे. मोहपा येथील अंत्यज लोकांनी स्वोद्धाराच्या प्रेरणेने स्थापन केलेली ही संस्था एकत्रितपणे कार्यरत होती. ह्या संस्थेचे सेक्रेटरी किसन फागुजी बनसोडे यांचा पोस्ट मिशनच्या द्वारा मुंबई प्रार्थनासमाजाशी संबंध आला होता. प्रार्थनासमाजाच्या वार्षिकोत्सवाला त्यांना प्रतिनिधी म्हणूनही निमंत्रित केले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी २४ डिसेंबर १९०५ रोजी सुबोधपत्रिकेमध्ये लिहिलेल्या लेखात एका मराठा सद्गृहस्थाच्या प्रेरणेने मोहपा येथील ही संस्था सुरू झाल्याचे सेक्रेटरीकडून कळते असे लिहिलेले आहे. हे मराठा गृहस्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द विठ्ठल रामजी शिंदे हेच असावेत. प्रेरणा देणारे गृहस्थ त्यांच्याशिवाय अन्य कोणी असते तर मात्र शिंदे यांनी त्या व्यक्तीचे नाव यथायोग्य श्रेय देण्याच्या हेतूने निश्चित दिले असते. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये पाहता हे मत मांडावेसे वाटते.

धर्मकार्य आणि अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे कार्य ह्यांच्यामध्ये शिंदे यांनी एकरूपता मानली होती. प्रार्थनासमाजाच्या कार्याचा दौरा करीत असताना धर्मप्रचाराच्या जोडीने गोरगरिबांसाठी काय करता येईल व अस्पृश्यवर्गासाठी काय करता येईल याबद्दल त्यांचा विचार व प्रयत्न सतत चालू असत. १९०५ सालच्या प्रारंभी पुण्यात प्रार्थनासमाजाचे काम करीत असताना त्यांनी मीठगंज पेठेत अस्पृश्यांसाठी रामनवमीच्या दिवशी एक शाळा उघडली. पुढील काळात धर्मप्रचार कार्यासाठी केलेल्या दौ-यातही अस्पृश्यवर्गासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसतात.

ज्या काळामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी व अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्यासंबंधी कळकळीचे विचार होत होते व त्या दृष्टीने त्यांच्याकडून काहीएक प्रयत्न होण्यास सुरुवात झाली होती त्या काळात जातिभेदाचे आणि उच्चनीचपणाचे कडक निर्बंध समाजातील सगळ्याच थरांमध्ये पाळले जात असत. जातिभेदविषयक हे निर्बंध केवळ खेडवळ वा अशिक्षित लोकांतच पाळले जात असत असे नव्हे, तर इंग्रजी शिक्षण घेतलेले, राष्ट्रकार्य करावयास प्रवृत्त झालेले राष्ट्रसभेतील ब्राह्मण पुढारीही हे निर्बंध काटेकोरपणाने पाळावेत याबद्दल दक्ष असत. “राष्ट्रसभेच्या अधिवेशनात सहभागी होणारे प्रतिनिधी आपल्याबरोबर खाण्यापिण्याचे जिन्नस घेऊन येत वा स्वतःचा वेगळा स्वयंपाक करीत आणि आपल्या सहप्रतिनिधींची अशुभ दृष्ट लागू नये म्हणून दरवाजा लावून जेवण उरकीत.”७ काही सधन मंडळी तर आपल्यासाठी ब्राह्मण स्वयंपाक्याची व्यवस्था केली जावी, इतकीच मागणी करून थांबत नसत, तर स्वयंपाकी विवक्षित उपजातीचा असला पाहिजे असाही आग्रह धरीत. अलाहाबाद काँग्रेसच्या आधी ११ एप्रिल १९०८ रोजी आर. सप्रू यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना लिहिले आहे, "आपण फार तर ब्राह्मण स्वयंपाकी पुरविण्याची व्यवस्था करावी, पण एखाद्या विवक्षित उपजातीचा ब्राह्मण स्वयंपाकी हवा, असा ज्यांचा आग्रह असेल त्यांनी आपल्याबरोबर स्वतःचा स्वयंपाकी आणावा असे आपण ठरविले तर बरे होईल.”८ सप्रू यांनी गोखल्यांना केलेल्या या सूचनेत सुधारणेचा टप्पासुद्धा किती मर्यादित होता याची कल्पना येऊ शकेल. अशा या काळात सवर्णातील जातिभेद ओलांडण्याचा प्रश्न नव्हे तर हजारो वर्षांपासून ज्या जातीच्या लोकांना अस्पृश्य मानण्याचा निर्बंध शेकडो वर्षांपासून चालत आलेला होता ते मोडून त्यांच्याशी केवळ स्पर्शाचा व्यवहार नव्हे तर त्यांच्यासमवेत भोजनादिक व्यवहार करणे केवढे धाडसाचे म्हणावे लागेल. ह्या जातीच्या सुधारणेसाठी शाळा सुरू करणे ह्यासारखे उपक्रम तर त्यांनी सुरू केले होतेच. पण व्यक्तिगत पातळीवर अस्पृश्यता न पाळता ह्या मंडळींशी भोजनादिक व्यवहार स्वतःच्या घरामध्ये अत्यंत स्वाभाविकपणे सुरू केला होता. बडोद्याचे जागृतीकार भ. ब. पाळेकर यांनी लिहिले आहे, “१९०५ साली प्रसिद्ध अस्पृश्योद्धारक विठ्ठल रामजी शिंदे त्या वेळी प्रार्थनासमाजाच्या राममोहन आश्रमात राहत होते. त्यांचा माझा परिचय झाला. एके वेळी त्यांचेकडे नागपूरचे अस्पृश्य समाजातील मुख्य कार्यकर्ते रा. किसन फागुजी बनसोडे, गणेश आकाजी गवई वगैरे मंडळी जेवावयास होती. श्रीयुत शिंदे यांनी मला व माझ्या पत्नीलाही जेवणाचे आमंत्रण दिले. १९०६ सालची ही गोष्ट. माझ्या पत्नीला इतक्या जुन्या काळी अस्पृश्य जातीच्या पंक्तीला जेवण्यास आपण अधर्माचरण करीत आहोत असे वाटले नाही. खुद्द शिंदे यांनाही आम्हा दोघांविषयी आदर वाटला.”९ राष्ट्रसभेतील उच्चवर्णीय प्रतिनिधींपेक्षा विठ्ठल रामजी शिंदे यांची वृत्ती आणि आचरण किती पुढारलेले होते याची कल्पना ह्या प्रसंगावरून येऊ शकते.

राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनाच्या वेळी भरविल्या जावयाच्या धर्मपरिषदेच्या कामानिमित्त विठ्ठल रामजी शिंदे यांचा १९०३ डिसेंबरपासून भारताच्या ह्या ना त्या प्रांतात सदैव प्रवास चाललेलाच होता. भारताच्या विविध प्रांतांमध्ये अस्पृश्यता किती काटेकोरपणाने पाळली जाते व अस्पृश्य मानलेल्या या लोकांवर किती भयंकर अन्याय केला जातो याचे विदारक चित्र त्यांना पाहावयाला व ऐकावयाला मिळत होते. जुन्या मलबार प्रांतात अस्पृश्यवर्गीयांना साक्षात पशूचे अथवा गुलामाचे जिणे जगावे लागत असे हे शिंदे यांनी पाहिले होते. तेथील शेतावर प्रत्यक्ष देह झिजवून कष्ट करणारे चेरुमा जातीचे लोक हे वंशपरंपरेने त्या जमिनीवरच झोपड्या बांधून राहत असत. एखाद्या जमिनीची विक्री झाली म्हणजे जमिनीवरील झाडे, माती जशी नवीन मालकाच्या ताब्यात कायदेशीरपणे जात असे त्याचप्रमाणे ह्या चेरुमांचीही मालकी नवीन शेतमालकामकडे जात असे. शेतावरची ही कुळे जनावराप्रमाणेच इतरांना भाड्यानेसुद्धा दिली जात असत. एवढेच नव्हे तर अशा गुलामांची रीतसर खरेदी विक्री होत असे व यासंबंधीचे खटलेही कोर्टात जात असत. कर्नल अल्कॉट यांनी आपल्या पुअर पारिया ह्या पुस्तकात २२ मे १९००चा एक कर्जरोख्याचा उतारा दिलेला आहे. ह्या कर्जरोख्यात कुटुंबकर्ता, त्याची बायको व मुले कर्जापोटी स्वतःला गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज काढीत असे नमूद केल्याचे पाहावयास मिळते.१० धर्मांतर केल्यानेही ह्या लोकांच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला नव्हता. ते पूर्वीच्याच हीन दशेत होते असे त्यांना दिसून आले. त्रिचनापल्ली या शहरात एक भयंकर दृश्य त्यांना दिसले. ते पूर्वीच्याच हीन दशेत होते असे त्यांना दिसून आले. त्रिचनापल्ली या शहरात एक भयंकर दृश्य त्यांना दिसले. एके दिवशी ते मोठ्या रस्त्याने चालले असताना समोरून म्युनिसिपालटीचा अवजड केराचा छकडा रखडत येताना दिसला. त्यास एकीकडे एक म्हातारा रेडा जुंपला होता व दुस-या बाजूस एका तरुण मजुरानेच आपली मान लावली होती. मोठ्या करुणेने शिंदे यांनी त्याची जात विचारली तेव्हा त्याने मोठ्या आढ्यतेने आपण रोमन कॅथॉलिक(ख्रिस्ती) असे सांगितले. त्यांनी अत्यंत सहानुभूतीने त्याची पूर्वाश्रमीची जात विचारली तेव्हा त्याने पारिया असे सांगितले. केरळ अथवा मलबार प्रांतात धर्मांतरित पारियांची अवस्था साक्षात पशूचीच असल्याचे त्यांना दिसून आले.११

काठेवाडातील आगगाडीमध्ये धेडांना डबा राखून ठेवीत असत. त्यांना इतरांच्या डब्यात प्रवेश करता येत नसे हे शिंदे यांनी स्वतः पाहिले होते.

गुजराथ येथील नवसारी प्रांतातील जंगलामध्ये असलेल्या सोनगड या गावी विठ्ठल रामजी शिंदे १९०५ साली गेले होते. ढाणके या जंगली जातीतील मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशी वसतिगृहे श्रीमंत सयाजीरावमहाराजांनी स्थापन केली होती. ह्या वसतिगृहाचे सुपरिटेंडेंट फत्तेखाँ नावाचे मुसलमान गृहस्थ प्रार्थनासमाजीय होते. त्यांनी ह्या लोकांबाबत एक मनोरंजक हकिकत सांगितली. श्रीमंत सयाजीरावमहाराज हे ह्या लोकांची परिस्थिती स्वतः बघण्यासाठी जंगली प्रदेशात आले असता तेथे त्यांना कोणीच माणसे दिसेनात. हे गूढ काय आहे याचा तपास केल्यावर पुरुष व बायकामुले ही सर्व झाडावर उंच चढून बसलेली दिसली. महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला पाहून या लोकांची सुधारणा अवश्य केली पाहिजे असा महाराजांनी निश्चय केला. मानवी संस्कृतीपासून कितीतरी योजने अशा प्रकारचे लोक दूर आहेत हे या हकिकतीवरून शिंदे यांना जाणवले.

हिंदुस्थानच्या विविध प्रांतांत अस्पृश्यवर्गाची होणारी दुर्दशा पाहून विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनाची तळमळ वाढत चालली होती. ह्या वर्गातील लोकांची स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी केले पाहिजे अशी त्यांच्या मनाला ओढ लागून राहिली. मनाच्या या अवस्थेत त्यांच्या जीवितकार्याची दिशा निश्चित करणारा एक प्रसंग घडला. २८ ऑक्टोबर १९०५च्या अमावस्येच्या रात्री ते अहमदनगरच्या मुक्कामी असताना भिंगार गावची अस्पृश्य मंडळी त्यांना भेटावयास आली व सभेला येण्याबद्दल त्यांना विनंती केली. ह्या प्रसंगी सभेला गेल्यानंतर भाषण करीत असताना आपले सगळे आयुष्य ह्या लोकांच्या उन्नतीसाठी क्षणाचाही वेळ न दवडता समर्पित करावे अशी त्यांना अंतःप्रेरणा होऊन त्यांनी त्याच रात्री तसा संकल्प केला. ह्या प्रसंगाचे वर्णन पुस्तकाच्या प्रारंभी केले आहे. भिंगारच्या ह्या सभेनंतर प्रार्थनासमाजाचे कार्य करीत असताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यवर्गाची सर्वांगीण उन्नती कशी होईल ह्याचा ध्यास घेतला. ता. १७, २४ व ३१ डिसेंबर १९०५च्या सुबोधपत्रिकेच्या अंकामधून त्यांनी ‘अस्पृश्य मानलेल्या वर्गाची उन्नती’ ह्या विषयावर इंग्रजीमधून एक विस्तृत लेख लिहिला. ह्या लेखामध्ये त्यांनी अंत्यजवर्गाच्या उन्नतीच्या प्रश्नाचा आणि प्रयत्नाचा अनेक अंगांनी सखोल ऊहापोह केला. ख्रिस्ती मिशन-यांनी ह्या जातीकरिता जे कार्य केले ते बरेच आणि उदात्त स्वरूपाचे आहे हे त्यांनी मोकळेपणाने मान्य केलेले आहे. मात्र त्यांचा परकीपणा आणि धर्मांतराचा हेतू हे ह्या कामामधील दोन मोठे अडथळे ठरतात असेही नमूद केले. ब्रिटिश सरकारने मात्र कधी काळी जो अलिप्तपणाचा सोपा मार्ग अथवा सात्त्विक निष्क्रियतेचा दृष्टिकोण पत्करला होता त्यालाच ते अजूनही चिकटून आहेत व सरकारचा हा दृष्टिकोण अधिकाधिक बिघडत चालला आहे अशी परखड टीका त्यांनी केली आहे. (इतर प्रार्थनासमाजीयांपेक्षा विठ्ठल रामजी शिंदे यांची ख्रिस्ती मिशनरी व इंग्रज सरकार ह्या दोहोंबद्दलची मते काहीशी भिन्न व विरुद्ध स्वरूपाची होती. ख्रिस्ती मिशन-यांबद्दल सातत्याने सुबोधपत्रिकेमधून तीव्र स्वरूपाचा विरोधाचा सूर लावलेला आढळतो. त्यांच्या चांगल्या कामाबद्दल कधीही उल्लेख केलेला दिसून येत नाही. इंग्रज सरकारबद्दल मात्र टीकेचा सूर प्रार्थनासमाजीयांकडून काढलेला फारसा आढळत नाही. जिथे विरोध प्रकट करणे योग्य वाटते त्या ठिकाणीही प्रार्थनासमाजीय मौन बाळगतात असेच दिसते. या दोहोंबाबत शिंदे यांचा दृष्टीकोण अन्य प्रार्थनासमाजीय मंडळींपेक्षा कसा वेगळा हे अस्पृश्यांबाबतच्या प्रश्नाबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून दिसून येते.)

ह्या लोकांचे भले होण्यासाठी दोन महत्त्वाचे प्रयत्न म्हणून सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा व प्रार्थनासमाजाकडून होणा-या प्रयत्नाचा त्यांनी निर्देश केला आहे. अस्पृश्यवर्गात जी जागृतीची चिन्हे दिसू लागली होती तीही त्यांना महत्त्वाची वाटली. ख्रिस्ती मिशनरी, इंग्रज मालक आणि थोडेफार शिक्षण ज्यांच्या वाट्याला आले होते त्याचा परिणाम त्या वर्गातील तरुण पिढीवर दिसून येत होता व काही म्हातारी आणि जुन्या वळणाची माणसे तरुण पिढीशी सहकार्य करीत होती. हे लोक आपल्या नव्या आकांक्षांशी जुळणा-या जुन्या धार्मिक प्रथांशी संबंध ठेवीत होते.

ह्या लेखाच्या शेवटी त्यांनी असे प्रतिपादले की, “परोपकारी व्यक्तिंकडून ह्या निराश्रित लोकांच्या सुधारणेसाठी होणारे प्रयत्न व खुद्द त्या वर्गातील मंडळींकडून स्वोद्धारासाठी होणारे प्रयत्न हे हल्लीच्याप्रमाणे अलग चालू राहिले तर ते थकून बंद पडतील. म्हणून मुंबईची ‘सोशल रिफॉर्म असोसिएशन’ आणि ‘प्रार्थनासमाज’ ह्या दोन्ही संस्था एकत्र येऊन विचारविनिमय करून या दोन्ही प्रयत्नामध्ये सहकार्य निर्माण होईल अशी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.”१२

विठ्ठल रामजी शिंदे यांची अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दलची तळमळ लक्षात घेऊन मुंबई येथील सामाजिक मंडळाचे (बाँम्बे प्रेसिडन्सी सोशल रिफॉर्म असोसिएशनचे) अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांनी मंडळापुढे त्यांचे ह्या विषयावर व्याख्यान करविले. या व्याख्यानात त्यांनी हिंदुस्थानातील बहिष्कृतवर्गाची प्रांतवार संख्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या निवारणार्थ वरिष्ठवर्गाकडून होणारे निरनिराळे प्रयत्न आणि स्वतः त्या लोकांकडून होणारे स्वोद्धाराचे प्रयत्न ह्यांची प्रथमच व्यवस्थेशीर मांडणी केली. दक्षिण कानडामधील त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सांगितले की, तेथील पंचम जातीची स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. दिवसभर मजुरी करूनही त्यांना दिवसातून एकदाच जेवण मिळते व दुपारची भूक त्यांना ताडी पिऊन भागवावी लागते. युरोपियन अधिकारी हे ह्या वर्गातील माणसाला नोकरीत नेमून आपल्या हाताखालच्या हिंदूंचा असंतोष कशाल ओढवून घ्या, म्हणून खालच्या दर्जाचीही नोकरी त्यांना देत नाहीत.

ह्या निबंधात त्यांनी पुढे म्हटले आहे की, “शतकानुशतके अशा प्रकारच्या दुःस्थितीत हे लोक राहात असूनही देशाचा उद्धार करायला निघालेले राजकारणी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देताना आढळत नाहीत. अशा प्रकारे परिस्थितीचे बळी असणा-या या व्यक्ती थोड्याथोडक्या आहेत असे नव्हे. खानेसुमारीच्या आकड्यांवरून या लोकांची संख्या किती प्रचंड आहे याची कल्पना येऊ शकते. १९०१ सालच्या खानेसुमारीतील अस्पृश्य गणलेल्या चांभार, मोची, डोंब, भंगी, होलिया, मांग, महार, पारिया इत्यादी प्रमुख अस्पृश्य जातींची लोकसंख्या चार कोटी छप्पन लाख नव्याण्णव हजार दोनशे साठ एवढी आहे. हिंदुस्थानच्या एकंदर २९, ४३, ६१, ०५६ लोकसंख्येपैकी ह्या वर्गांची लोकसंख्या साडेचार कोटींपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ प्रत्येक सात हिंदुस्थानी माणसांमध्ये एक दुर्दैवी अस्पृश्य मानला गेलेला प्राणी असतो. तो सवर्ण हिंदूच्या बोलण्याइतक्या अंतराजवळ जाऊ शकत नाही. एकंदर लोकसंख्येत ब्राह्मण शेकडा ४.७ आहेत. तर अंत्यजांची संख्या १५% आहे. एकूण हिंदू १९, ०४,३३,६९६ एवढे आहेत. ह्या दुर्दैवी बहिष्कृत जातीच्या लोकसंख्येइतकी इतर कोणत्याही जातीची संख्या नाही. जगातील ह्या मोठ्या देशातील एकसप्तमांश लोकांना निष्कृष्ट ठरवून बहिष्कृत केले आहे. ह्या खंडप्राय देशात परकीय स्वा-या, राजकीय क्रांत्या, धार्मिक सुधारणा आणि सामाजिक उत्क्रांत्या होऊन गेल्या तरी विसाव्या शतकातील आजमितीला हे साडेचार कोटी लोक अस्पृश्य मानून त्यांच्यास्पर्शाने माणूस दूषित होतो असे समजावे याला काय अर्थ? इतिहासकाळापासून चालत आलेल्या ह्या राष्ट्रीय पापाची आणि राष्ट्रीय दुष्कृत्याची व्याप्ती आणि खोली किती भयंकर आहे याची आपणाला कल्पना येऊ शकते.”

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रस्तुत लेखात हिंदुस्थानातील अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींची एकूण लोकसंख्या किती आहे हे दाखवून देऊन तिची व्याप्ती किती मोठी आहे हे पहिल्यांदाच मनावर ठसविले गेले. देशाचा उद्धार करायला प्रवृत्त झालेले राजकारणी ह्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत अशी परखडपणे त्यांनी तक्रार केलेली आहे. ह्या अस्पृश्यतेचा उल्लेख त्यांनी ‘राष्ट्रीय पाप’ आणि ‘राष्ट्रीय दुष्कृत्य’ अशा भेदक शब्दांनी केलेला आहे.
 
ह्या लेखामध्ये ख्रिस्ती मिशनांनी जे काम केले आहे त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला असला तरी “आपल्या वाढत्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये एक अस्वस्थता निर्माण करणारा परकीय घटक असे त्याचे वास्तव स्वरूप ध्यानात घ्यावे लागते” असेही म्हटले आहे.

अस्पृश्य मानलेल्या लोकांची सर्वांगीण उन्नती करावयाची असेल तर ती केवळ त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार केल्याने होण्याजोगी नाही, तर त्यांच्यासाठी देशी मिशनची आवश्यकता आहे असे त्यांना जाणवत होते. प्रस्तुत लेखात त्यांनी पुढे म्हटले आहे, “ह्या लोकांच्या उद्धारासाठी नुसती शिक्षणसंस्था, मग ती कितीही मोठ्या प्रमाणात असो, स्थापून चालावयाचे नाही तर ज्यामध्ये जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे अशा मिशनची आवश्यकता आहे असो, स्थापून चालावयाचे नाही तर ज्यामध्ये जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे अशा मिशनची आवश्यकता आहे आणि दुसरी याहीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रांती न करता आपला धर्म, परंपरा व सामाजिक जीवन यांमध्ये क्रमशः विकास म्हणजेच उत्क्रांती घडवून आणली पाहिजे.”१३

या लेखाच्या अखेरीस शिंदे यांनी असेही मतप्रदर्शन केले की,  “असे मिशन स्थापन करण्यासाठी मुंबई शहर हे योग्य ठिकाण व मुंबई प्रार्थनासमाज ही असे मिशन चालविण्यास योग्य संस्था आहे. उदारमतवादानुसार कार्यरत असणारी दुसरी संस्था म्हणजे ‘दि प्रेसिडेन्सी सोशल रिफॉर्म असोसिएशन’ ही असून ती प्रार्थनासमाजाला उत्तम सहकार्य करू शकेल.” मिशनचा प्रारंभिक आराखडाही शिंदे यांच्या मनात याच वेळी तयार होता. त्यांनी म्हटले आहे, “दिवसाची एक माध्यमिक शाळा व खेडेगावातून आलेल्या अस्पृश्य मुलांसाठी एक छोटेखानी बोर्डींग हे अशा मिशनचे चांगले केंद्र ठरू शकेल. ह्या शाळेतील शिक्षक अशाच प्रकारे निवडले पाहिजेत व प्रशिक्षित केले पाहिजेत की, जे ह्या मुलांच्या घरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन पालकपणाचे काम करतील.” शाळेशिवायच्या इतर वेळी साधारण धर्माची उपासना करणे; नैतिक शिक्षणाच्या हेतूने व सर्वसाधारण विषयावर व्याख्याने घडविणे; जवळपासच्या वस्तीत सभा घेऊन या वर्गाची आत्मिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या. अशा प्रकारचे काम प्रार्थनासमाजाने सुरू करावे यासाठी हिंदुस्थानातील परोपकारी व देशप्रेमी नागरिकांनी आर्थिक साहाय्य करावे असे आवाहन त्यांनी या लेखाच्या शेवटी केले.

अशा प्रकारे मिशन स्थापन करण्याचा संकल्प सोडून विठ्ठल रामजी शिंदे यांनी एका कठीणतम कार्याला प्रारंभ करावयाचेच ठरविले असे म्हणावे लागेल.

इंग्लंडमध्ये असताना शिंदे यांनी दीन-दुबळ्यांसाठी काम करणा-या संस्था, मिशने पाहिली होती. परंतु इंग्लंड वगैरे ख्रिस्ती धर्मीयांच्या देशातल्यापेक्षा दीन-दुबळ्यांसाठी येथे काम करणे बिकट होते. तेथील दुबळ्यांचे दैन्य आणि दुःख मुख्यतः आर्थिक परिस्थितीमुळे, भांडवलदारी अर्थव्यवस्थेतील विषमतेमुळे व शोषणामुळे निर्माण होणारे होते. मात्र दुःखितांचे दुःख दूर करावे, त्यांचे अश्रू पुसावे यासाठी ख्रिस्ती शिकवणीला कालोचित कलाटणी देणे हे ख्रिस्ती धर्माच्या मूळ मांडणीला सुसंगत ठरणारे होते. ही  ख्रिस्ती शिकवण साहाय्यभूत ठरणारी होती.

हिंदुस्थानातील स्थिती नेमकी उलट होती. येथील अस्पृश्यवर्गाच्या हीन-दीन स्थितीला, त्यांच्यावरील अस्पृश्यतारूपी बहिष्काराला येथील धर्मच-हिंदू धर्मच-कारणीभूत ठरलेला होता. येथील समाजव्यवस्था धर्माधिष्ठित होती व ती वर्णव्यवस्थेवर आधारलेली होती. वर्णव्यवस्थेला पाठबळ धर्माचे-म्हणजे स्मृतिरूप धर्माचे-व रूढीचे होते व ही धर्माधिष्ठित समाजरचना अपरिवर्तनीय आहे अशीच येथे सार्वत्रिक धारणा होती. म्हणजे अस्पृश्यवर्गाची स्थिती सुधारावयाची असेल, येथील अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर धर्माने निर्माण केलेल्या ह्या जाणीवा नष्ट करणे, रूढीमुळे पाळले जाणारे आचार बंद करणे आवश्यक होते. म्हणजेच एक प्रकारे धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या भ्रामक अंधश्रद्धा व आनुषंगिक जाणिवा नष्ट करून लोकांच्या मनामध्ये पालट घडवून आणण्याचे काम येथे करावे लागणार होते आणि स्वाभाविकपणेच हे काम अत्यंत बिकट स्वरूपाचे होते. अशा कामाला हात घालायचा व आपले आयुष्य अस्पृश्यवर्गीयांच्या उन्नतीसाठी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी वाहावयाचे असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठरविले.

संदर्भ
१.    कृ. भा. बाबर, कर्मवीर विद्यार्थी, पुणे, १९३०, पृ. २४.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. २८.
३.    दि ख्रिश्चन लाइफ, लंडन, १० मे १९१३, पृ. २६७.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८४.
५.    सुबोधपत्रिका, १७ डिसेंबर १९०५.
६.    सुबोधपत्रिका, २४ डिसेंबर १९०५.
७.    बलराम नंदा, गोपाळ कृष्णा गोखले, (अनु.) वसंत पळशीकर, विश्वकर्मा साहित्यालय, पुणे, १९८६, पृ. १३२.
८.    तत्रैव, पृ. १५२.
९.    भ. ब. पाळेकर, जागृतिकार पाळेकर, आत्मवृत्त आणि लेखसंग्रह, बडोदे, १९६१, पृ. २३. समाविष्ट, (संपा.) सदानंद मोरे, जागृतिकार पाळेकर, डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष, महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे, १९९६, पृ. ५५.
१०.    विठ्ठल रामजी शिंदे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, पृ. १२९-१३२. मूळ संदर्भ, हेन्री एस्. ऑल्कॉट, दि पुअर पारिया, थिऑसॉफिकल सोसायटी, अड्यार, मद्रास, पृ. ५.
११.    तत्रैव, पृ. १३३.
१२.    व्ही. आर्. शिंदे, ‘इलेव्हेनशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस’, सुबोधपत्रिका, १७, २४ व ३१ डिसेंबर १९०५.
१३.    व्ही. आर्. शिंदे, ‘ए मिशन फॉर दि डिप्रेस्ड क्लासेसः ए प्ली’, इंडियन सोशल रिफॉर्मर, २९ जुलै १९०६. प्रस्तुत इंग्रजी लेखात शिंदे यांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या मिशनचे स्वरूप ख्रिस्ती मिशनसारखे असू नये, तर ते देशी असावे असे ठासून म्हटले आहे.
“What is wanted therefore is not merely a machinery of education however grand but a real mission i.e. an organization in which the personal element presides over and energizes the mechanism; and 2ndly, which is still more essential, a mission which is not exotic but indigenous or in other words a mission which is bent upon working an evolution but not a revolution, as Christian Missions are, in the religion, traditions and social life of these people.”
शिंदे यांच्या आत्मचरित्रपर ‘माझ्या आठवणी व अनुभव’ ह्या ग्रंथात शेवटच्या वाक्याचा आशय चुकीमुळे नेमक्या विरुद्ध स्वरूपात आला आहे तो असाः ‘अशा मिशनने ख्रिस्ती मिशन-यांप्रमाणे ह्या लोकांच्या जीवितामध्ये क्रांती व विकास घडवून आणला पाहिजे.’ (माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २१७.). वस्तुतः हे वाक्य ‘अशा मिशनने ख्रिस्ती
मिशन-यांप्रमाणे ह्या लोकांच्या जीवितामध्ये क्रांती नव्हे, तर विकास घडवून आणला पाहिजे.’ असे असावयास पाहिजे होते. शिंदे यांच्या हस्तलिखितात ते दुरुस्त स्वरूपात असेच आहे.