अण्णासाहेब शिंदे यांचे सामाजिक स्वरुपाचे कार्य; इतिहाससंशोधन, समाजशास्त्रीय व तत्त्वज्ञानात्मक स्वरुपाचे लेखन याबाबतचा त्यांचा अधिकार मोठा असल्यामुळे विविध प्रकारच्या परिषदा व संमेलने यांमध्ये अध्यक्ष, उद्घाटक या प्रकारचा बहुमान त्यांना मिळणे स्वाभाविक होते. खरे तर शिंदे यांची निर्भीड व सत्याचा वेध घेणारी मते या क्षेत्रातील मान्यवरांना पटणारी व भावणारी अशी बहुधा नसत. ते काही सर्वच लोकांना रुचेल, पटेल अशा प्रकारचे बोलणारे वा लिहिणारे, वक्ते वा लेखक नव्हते. त्यामुळे अशा प्रकारचे बहुमान त्यांना महाराष्ट्रात सातत्याने मिळत होते असे काही दिसत नाही. तरी पण सामाजिक क्षेत्रात त्यांनी अलौकिक कर्तृत्व गाजविले असल्यामुळे व संशोधनाच्या व वैचारिक साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र प्रज्ञा दाखविली असल्यामुळे त्यांची सर्वस्वी उपेक्षा करणेही सुशिक्षित समाजाला शक्य नव्हते. दुसरी गोष्ट अशी की, सर्वसामान्य सुशिक्षितांच्या मताला धक्का देणारे विचार शिंदे यांच्याकडून प्रकट होत असले तरी त्यांची योग्यता जाणणारा लहानसा का होईना पण एक प्रभावी वर्ग सुशिक्षितांमध्येही अस्तित्वात होता. या कारणाने अशा परिषदांत व संमेलनांत सहभागी होण्याची. निदान काही वेळ तरी कळकळीची निमंत्रणे शिंदे यांना मिळत असत व नवा स्वतंत्र विचार प्रकट करण्याची संधी म्हणून अण्णासाहेब शिंदे हे अशा प्रकारची निमंत्रणे स्वीकारीत असत. अशा प्रत्येक सभास्थानावरुन त्यांनी जे विचार प्रकट केले त्यामधून त्यांच्या विचारांचा स्वतंत्रपणा व मैलिकताही प्रकट झाल्यावाचून राहत नाही.
विठ्ठल रामजी शिंदे हे धार्मिक, सामाजिक सुधारणांसाठी स्वतःचे आयुष्य वाहणारे कृतिवीर होते. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांनी जे विचार मांडले आहेत त्यांच्या पाठीमागे स्वाभाविकपणे स्वानुभवाचे बळ होते. १९२५ साली प्रांतिक सामाजिक परिषदेच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी महत्त्वाचे विचार मांडले आहेत. स्वतः शिंदे यांनी आधी अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला प्रारंभ केला व नंतर त्या कार्याचा अधिकाधिक विस्तार व्हावा, त्या कामाला उठाव मिळावा म्हणून परिषदांचे आयोजन अतिशय परिणामकारक रीतीने केले होते. ह्याबाबतीत १९१२ साली पुणे येथे त्यांनी डॉ. भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली भरविलेली मिशनची महाराष्ट्र परिषद ही एक नमुनेदार परिषद म्हणावी लागेल.
त्याचप्रमाणे मार्च १९१८ मध्ये मुंबईत श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मिसनच्या साहाय्याने भरविलेली अखिल भारतीय पातळीवरील परिषद ही केलेल्या कामाची माहिती देऊन भावी कार्याला चालना देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची परिषद ठरली. आधी काम करावे व त्यानंतर भावी काळातील कामाला उठाव मिळण्याच्या दृष्टीने परिषदेच्या द्वारा आवश्यक विचारमंथन करावे हे अशा परिषदांमागचे उद्दिष्ट असले पाहिजे असे शिंदे यांचे धोरण होते. ज्या प्रांतिक सामाजिक परिषदा आयोजित केल्या जातात त्या पाठीमागे प्रत्यक्ष कृतीचे बळ नसते ही उणीव बहुधा शिंदे यांना जाणवलेली असावी. म्हणूनच त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या प्रास्ताविकात प्रारंभी असे म्हटले की, "पाठीमागे विधायक कार्य करणा-या संस्था नसताना भरविल्या जाणा-या परिषदा ह्या नुसत्या आवाज करणा-या घंटांसारख्या किवा पर्जन्यरहित वावटळीसारख्या विफल होऊन त्यांच्या योगाने सार्वजनिक शांततेचा भंग मात्र होत असतो!" या परिषदेत सामाजिक सुधारणेच्या संदर्भात त्यांनी मूलभूत स्वरुपाचे विचार मांडले.
आपल्याकडे सामाजिक सुधारणांचा वेग मंद का असतो, ह्या प्रश्नाची चर्चा करताना आपल्याकडे सामाजिक सुधारणा ह्या शब्दाची व्याप्तीच मर्यादित समजली जाते, ह्या मोठ्या उणिवेकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. सामाजिक सुधारणा म्हणजे जुन्या कर्मठ धार्मिक भावना व जुन्या रुढी यांच्याविरुद्ध चाललेला झगडा आहे, एवढे सांगितल्याने त्या शब्दांची निम्मी-अर्धी व्यापतीही सांगितल्यासारखी होत नाही असे विधान करुन धार्मिक भावनेच्या पलीकडे सामाजिक सुधारणांचा कितीतरी मोठा भाग आहे, याचा ते निर्देश करतात. आतापर्यंतच्या सामाजिक सुधारणा ह्या धर्माने घातलेले निर्बंध व धर्माच्या पाठबळावर असलेल्या रुढी यांच्या संदर्भातच प्रामुख्याने केल्या जात होत्या. वस्तुतः खेडेगावातील आरोग्यसंवर्धन, शहरातील मजूरवर्गाची सुधारणा, शिशुसंगोपन वगैरे अनेक महत्त्वाच्या बाबींचा सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात समावेश त्यांना अगत्याचे वाटते.
सामाजिक सुधारणा मंद गतीने होण्याच्या आणखी एक महत्त्वाच्या कारणाचा ते निर्देश करतात. ते कारण म्हणजे, शुद्ध सामाजिक सुधारणेचे म्हणविले जाणारे कार्य धर्मापासून बुद्धिपुरःसर अलिप्त ठेवले जाते. कै. आगरकरांसारखे जुन्या परंपरेतील समाजसुधारक या कार्याची उभारणी अद्यापही उपयुक्ततावाद, युक्तिवाद, भूतदया वगैरे दुस-या कोणत्याही तत्त्वावर करण्यास तयार असतात; पण धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर उभारण्यास तयार नाहीत. अशा त-हेची धर्मविन्मुख प्रवृत्ती समाजसुधारकांमध्ये असावी ही गोष्ट त्यांना अयोग्य वाटते. सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी ह्या आध्यात्मिक चळवळी असतात ही त्यांची भूमिका होती.
विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी सांगितलेला हा विचार अत्यंत मौलिक स्वरुपाचा वाटतो व त्याला प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे पाठबळ आहे. भारतात आणि महाराष्ट्रात आजपर्यंत सामाजिक सुधारणेची व सामाजिक पुनर्घटना करण्याची प्रत्यक्षामध्ये जी मूलभूत स्वरुपाची मोठमोठी कामे झाली आहेत, ती धर्मनिष्ठ पुरुषाकडूनच झालेली आहेत असे आपल्याला ध्यानात घ्यावे लागते. येथे अर्थातच धर्म म्हणजे आध्यात्मिक आशय असलेला धर्म अभिप्रेत आहे आणि निरर्थक कर्मकांड अभिप्रेत नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. भारतीय समाजाच्या धार्मिक अंधश्रद्धांना हादरे देऊन सामाजिक सुधारणांना जोराची चालना देऊन न्यायाच्या व माणुसकीच्या पायावर भारतीय समाजाची पुनर्घटना करण्याचे काम फार मोठ्या प्रमाणात राजा राममोहन रॉय, महात्मा जोतीबा फुले, खुद्द महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहूमहाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांनी केलेले आहे व हे सर्व पुरुष धर्मनिष्ठ होते. समाजसुधारणा व धर्माच्या आद्य तत्त्वांचे आचरण ह्या दोहोंच्या बाबतीतील ध्येयात्मक प्रयत्नाचे ऐक्य होणे त्यांना आवश्यक वाटते. या ऐक्याच्या योगाने आमच्या सुधारकांची सुधारणा होऊन त्यांच्या ध्येयास अधिक उत्कटता प्राप्त होवो अशी शुभेच्छा ते प्रकट करतात.
सामाजिक सुधारणेच्या तपशिलाचा विचार करताना ते अस्पृश्यतानिवारण, ब्राह्मणेतरांचा असंतोष, हिंदू-मुसलमानांचे ऐक्य व हिंदू-संघटन यांचा निर्देश करतात. ह्या बाबी ते सर्वस्वी भिन्न समजत नाहीत, तर बृहत हिंदू समाजास जडलेल्या एकाच अंतर्गत रोगाची ही भिन्न भिन्न लक्षणे आहेत, असे ते सांगतात, ह्या समस्यांच्या मुळाशी असणारी व्याधी म्हणून ते एका गोष्टीचा निर्देश करतात. "काल्पनिक भेद काढून त्यांना केवळ खाजगी व्यवहारातच नव्हे तर सार्वजनिक व्यवहारामध्येसुद्धा उच्च दर्जाचे राजकारण व चारित्र्याचे पावित्र्य यांच्या वर स्थान देण्याची जी हिंदी जनतेच्या मनोवृत्तीला स्वयंस्फुरित सवय आहे, तीच हिंदुस्थानला विशिष्ट असलेली मानसिक व्याधी होय." ह्या व्याधीमुळेच बेकीची अथवा दुहीची बीजे निर्माण होतात.
स्पृश्यास्पृश्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, हिंदू-मुसलमान हा भेद निर्माण करुन काहीजण स्वतःलाच श्रेष्ठ व इतरांना कनिष्ठ समजतात. ह्या काल्पनिक भेदामुळे व श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या जन्मजात कल्पनेमुळे हिंदुस्थानात सामाजिक पातळीवर हे प्रश्न निर्माण झालेले आहेत, असे विश्लेषण ते करतात. शिंदे यांची मूलभूत स्वरुपाची ही भूमिका असल्यामुळे अस्पृश्यतेचा प्रश्न धर्मग्रंथाच्या आधारे सोडविण्यासाठी शास्त्रीपंडितांकडे सोपवू नये. कारण हा प्रश्न सोडवण्यास सर्वात नालायक कोण असतील तर ते शास्त्रीपंडितच होत, अशी त्यांनी ठाम भूमिका येथील भाषणात मांडली, महात्मा गांधीशी झालेल्या चर्चेच्या वेळी शिंदे यांनी म. गांधींना ठामपणे हेच सांगितले असल्याचे लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी नमूदही करुन ठेवले आहे.
ब्राह्मण-ब्राह्मणेतरांचा प्रश्न अलीकडचा नसून जुना असल्याचे ते नमूद करतात. ध्वनी आणि प्रतिध्वनी अशा प्रकारचे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे स्वरुप आहे असे ते विश्लेषण करतात. ब्राह्मणवर्गाने आपला ताठा सोडावा. राजकीय महत्तवाकांक्षेच्या पटांगणात ब्राह्मणेतर खेळाडूंचे स्वागत करावे अशी अपेक्षा प्रकट करतात. ब्राह्मणेतरवर्गानेही उभय पक्षात सलोखा नांदेल अशी व्यवस्था घडवून आणणे त्यांना आवश्यक वाटते. मराठी बांधवांना ते उपदेश करतात की, सत्यशोधक समाजाची विस्कळीत घडी त्यांनी नीट बसवावी. म्हणजे वाटेल त्या बेजबाबदार वेड्या पिराला ही संस्था म्हणजे ब्राह्मणवर्गाचा सूड उगवण्याचे हत्यार म्हणून उपयोग करुन गेता येणार नाही. हिंदुसंघटनेच्या प्रश्नाचा विचार करताना ते हिंदुसभेच्या पुढा-यांनी आधी हिंदूंची म्हणजेच अस्पृश्यांचीच मने दुखावणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगतात.
या अध्यक्षीय भाषणातच त्यांनी स्त्रीदास्यविमोचन, सहकाराची चळवळ, खेड्यांतील व शहरातील मजूरवर्ग इत्यादींच्या समस्यांचा थोडक्यात निर्देश करुन त्या समस्या सोडविण्याची दिशा दाखविली.
१९३३च्या डिसेंबर अखेरीस नागपूर येथे महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले. संमेलनाचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक वस्तूंचे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. २६ डिसेंबर १९३३ रोजी ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन विठ्ठल रामजी शिंदे यांनी करावे अशी त्यांना विनंती करण्यात आली होती. सिटी कॉलेजातल्या खोल्यांतून प्रदर्शनातील वस्तू मांडल्या होत्या. औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम संमेलनाच्या मुख्य मंडपातच सकाळी साडेआठ वाजता सुरु झाला. प्रदर्शन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अनेक स्त्री-पुरुष श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.
प्रदर्शनाचे उद्घाटक विठ्ठल रामजी शिंदे यांचा परिचय करुन देणारे भाषण नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु न्या. भवानीशंकर नियोगी यांनी केले. भाषणामध्ये त्यांनी शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या कार्याचे ऐतिहासिक महत्व उत्तम प्रकारे विशद केले. शिंदे यांच्या कार्याची योग्यता सांगताना न्या. नियोगी म्हणाले, "शिंद्यांचा जिला भरीव हातभार लागला नाही, अशी लोकसेवेची, समाजोन्नतीची चळवळ दाखवून देणे कठीण आहे आणि अशी परिस्थिती आहे यात आश्चर्यही नाही. कारण ज्याचा जनसेवा हा धर्म आणि तो धर्म तेच नित्य कर्तव्य किंबहुना ज्याचा स्वभाव झाला आहे, त्याचा एखाद्या जनहितकारक चळवळीशी संबंध न आला तरच आश्चर्य.
राजकारण, समाजकारण, धर्मकार्य, शिक्षणकार्य इतकेच नव्हे तर वाड्मयसेवा आणि इतिहाससंशोधन या सर्वांत शिंद्यांचा भाग आहे आणि फार महत्त्वाचा भाग आहे. सत्य अथवा प्रामाणिकपणा हा फार मोठा किंबहुना सर्वात मोठा सद्गगुण आहे असे म्हटले पाहिजे. आपल्याला जे सत्य वाटेल त्याप्रमाणे निश्चयाने वागणे ही गोष्ट असामान्य पुरुषच करु जाणे. शिंद्यांनी या गोष्टीला लागणारा आवश्यक त्याग, तितिक्षेचे धैर्य दाखविण्यातच आपले सर्व आयुष्य खर्च केले आहे. त्यांना ब्राह्मसमाजाची तत्त्वे पटली, ते ब्राह्मो झाले व इंग्लंडहून सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करुन येऊन अनेक वर्षांपर्यंत त्यांनी ब्राह्मोसमाजाच्या प्रचारकाचे काम केले. हे काम करीत अनेक ठिकाणी हिंडत असता हिंदू समाजाच्या एका फार मोठ्या घटकाची दुर्दशा त्यांच्या नजरेस आली व अस्पृश्योद्धाराच्या चळवळीला त्यांच्याकडून आरंभ झाला.
"ज्या काळी विधवाविवाहासारखे साधे प्रश्न सुटणेदेखील दुरापास्त होते अशा त्या घनदाट धर्मवेडाच्या काळात अस्पृश्योद्धाराची चळवळ सुरु करणे व त्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढणे, इतकेच नव्हे तर अस्पृश्यांत जाऊन त्यांच्यापैकी एक झाल्याप्रमाणे त्यांच्यात वागणे या गोष्टीसाठी अतुल स्वमतधैर्याचीच आवश्यकता होती. एवढेच नव्हे तर मूलमार्गी बुद्धीची व समाजाविषयी ख-या कळकळीचीही गरज होती. अस्पृश्योद्धाराच्या चळवळीचे महत्त्व लक्षात घेता ती शिंद्यांच्या आयुष्यातील फार मोठी कामगिरी झाली यात नवल नाही. स्वत: स्थापन केलेली डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था अस्पृश्यांच्या हाती देऊन त्यांनी आपल्या कामाची योग्य परिणती करुन दाखवली ते कोणीही कबूल करेल. मराठी जाती व अस्पृश्य यांच्यातील त्यांची शैक्षणिक कामगिरी फार महनीय आहे आणि समाजाच्या उन्नतीच्या मार्गात शिक्षण हीच मुख्य बाब असल्यामुळे ती त्यांच्याकडून हाती घेतली जाणे साहजिकच होते. परंतु शिमग्याची घाणेरडी व लाजिरवाणी चाल आणि मुरळ्या देण्याची दक्षिणेतील पद्धत यांच्याविरुद्धही त्यांनी पूर्वीच्या काळात चळवळी केल्या हे पाहून तर आश्चर्य वाटल्यावाचून व कार्यकर्त्यांच्या सुधारणेविषयीच्या जिव्हाळ्याबद्दल कौतुक वाटल्यावाचून राहात नाही. इतक्या व्यापक व सूक्ष्म दृष्टीच्या कार्यकर्त्यांची दृष्टी संकुचित असून शकत नाही. ती संबंध देशाइतकी विशाल व विस्तुत असावी लागते. म्हणूनच श्रीयुत शिंदे हे सामाजिक चळवळीप्रमाणेच अनेक राजकीय चळवळीतही भाग घेताना दिसत. तर दोन्ही ठिकाणी त्यांची राष्ट्रीय व्यापक दृष्टी छपली नव्हती ही गोष्ट अभिनंदनीय असली तरी शिंद्यांच्या बाबतीत साहजिकच होती.
"परंतु परिस्थितीमुळे आपदधर्मच धर्म होऊन बसत असतो. लो. टिळकांना गणिताची आवड असून त्यांना देशासाठी राजकारणात पडावे लागले. तसेच श्री. शिंदे यांनाही राष्ट्रकारण व जातीकारण यात पडावे लागले. वास्तविक त्यांचा आवडता विषय इतिहाससंशोधन हा होय. यासंबंधात त्यांची कामगिरी फार प्रशंसनीय असून तिच्याशीच आज आपल्या मुख्यत: संबंध आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या त्यांच्या अनेक दृष्टींनी महत्त्वाच्या पुस्तकात त्यांचे जसे विलक्षण प्रवासाचे परिश्रम दिसून येतात, त्याचप्रमाणे संशोधनाची कौतुकास्पद कामगिरीही दिसून येते. त्यांची अनेक भाषाभिज्ञता सर्वविदित असून मराठी व कानडी यांचा परस्परसंबंध याविषयीचे त्यांचे लेख फार मननीय व उद्बोधक आहेत.
तेव्हा राष्ट्रीय कामगिरी व सार्वजनिक कार्य आणि संशोधनप्रेम व वाड्मयसेवा यांचा ज्यांच्या जीवनात सुंदर संगम झाला आहे, असा अध्यक्ष या प्रसंगाला लाभल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाल्याबद्दल आपणाला आश्चर्य वाटायला नको. वास्तविक मी आपणाला आतापर्यंत कर्मवीर शिंदे यांचा परिचय करुन दिला असे वाटत असेल, पण ते बरोबर नाही.
कारण शिंद्यांचा परिचय करुन देणे महाराष्ट्रात तरी आवश्यक नाही. या संमेलनाबरोबर भरविण्यात येत असलेली हे प्रदर्शन वाङ्मयीन व ऐतिहासिक आहे. रा. शिंदे यांची या संबंधीची कामगिरी महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचे मान्य केले हे किती उचित झाले, याच मी आपणासमोर मोठ्याने विचार करीत होतो. तो झाल्यावर मी आता कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी त्यांना विनंती करतो." ह्या कामाला हात घालण्यात शिंदे यांची मूलगामी बुद्धी व समाजविषयीची खरी कळवळ दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.
प्रिन्सिपॉल पांढरीपांडे यांनी प्रदर्शनाचा थोडक्यात इतिहास सांगून प्रदर्शनात कोणकोणत्या दुर्मिळ, मौल्यवान व ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाच्या वस्तू मांडल्या आहेत यासंबंधी माहिती दिली.
अण्णासाहेब शिंदे यांनी सुमारे एक तासभर उद्घाटनपर भाषण केले. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या मासिकासंबंधाने ते म्हणाले की, "मासिके व वृत्तपत्रे यांतून सर्व प्रकारच्या मतांना अवसर मिळावा पाहिजे. अब्राह्मणांची अगर अस्पृश्यांची नियतकालिके आमच्या भागात बुडतात हे ठीक नाही." यानंतर इतिहाससंशोधनासंबंधी ते म्हणाले की, "इतिहाससंशोधकाची दृष्टी नेहमी निर्दोष असावी. त्याचे मत निर्विकार असल्याशिवाय शास्त्र या संज्ञेत पात्र होणारा इतिहास लिहिता येणे शक्य नाही. तसेच पेशवाई व मराठेशाही एवढ्यावरच संशोधनकार्य संपत नाही. वेदाच्या पूर्वकाळसंबंधीही माहिती मिळाली पाहिजे. कारण वेदपूर्वकाळातही येथे सुसंस्कृतता संशोधनकार्य संपत नाही.
वेदाच्या पूर्वकाळासंबंधीही माहिती मिळाली पाहिजे. कारण वेदपूर्वकाळातही येथे सुसंस्कृतता वाढली असली पाहिजे. प्राचीन इतिहास जाणण्यासाठी भाषांचे तैलनिक अध्ययन करणे जरुर आहे. यासाठी केवळ संस्कृतावर अवलंबून न राहता पाली वगैरे प्राकृत भाषा व मराठीच्या सरहद्दीवरील द्रवीड भाषा यांचा उपयोग करुन घेतला पाहिजे." अशा प्रकारे अण्णासाहेबांनी समकालीन इतिहासकारांमध्ये असणा-या उणिवांवरच अप्रत्यक्षरीत्या बोट ठेवून इतिहासकाराची दृष्टी पूर्वग्रहरहित, व्यापक असावयास पाहिजे असे सांगून कालाच्या दृष्टीने इतिहासाची व्याप्ती वेदपूर्वकाळापर्यंत नेणे आवश्यक असल्याचेही सांगितले. समकालीन इतिहासकार संस्कृत भाषेवर वाजवीपेक्षा जास्त अवलंबून राहतात हे अण्णासाहेबांना योग्य वाटत नव्हते. म्हणून इतिहासकारांची अनेकभाषाभिज्ञता कशी आवश्यक आहे त्याचाही त्यांनी निर्देश केला. भाषणाच्या अखेरीस इतिहासलेखनाच्या क्षेत्रात असलेल्या एका उणिवेवरही त्यांनी बोट ठेवले. ती म्हणजे मराठ्यांनी इतिहासलेखन केले नाही. मराठ्यांनी मराठ्यांबद्दलच्या इतिहासाचे लेखन केले तर विशेष गोडी येऊ शकेल. सध्या या क्षेत्रात मराठे मागासलेले आहेत म्हणून पुढारलेल्या लोकांनी त्यांना उ्ततेजन देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आवाहन केले.
१९३३ च्या डिसेंबरात नागपूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनात इतिहासप्रदर्शनाचे उद्घाटक या नात्याने अण्णासाहेब शिंदे यांनी भाग घेतला, तर त्याच्या पुढील वर्षी बडोदा येथे भरविण्यात आलेल्या १९ व्या साहित्य संमेलनामध्ये तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या विभागाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी अण्णासाहेब शिंदे यांना विनंती करण्यात आली व ती त्यांनी मान्यही केली. श्रीमंत संपतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन भरविण्यात येणार होते. बडोदे सरकारबद्दल अण्णासाहेब शिंदे यांच्या मनात अतीव आदराची भावना होती. म्हणूनही अण्णासाहेब शिंदे यांनी विभागीय अध्यक्षपद स्वीकारण्यास आनंदाने अनुमती दिली असावी. संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ ना. गो. चापेकर हे होते व स्वागताध्य जनरल नानासाहेब शिंदे होते. समाजशास्त्र हा शिंदे यांच्या आवडीचा व व्यासंगाचा विषय. नियोजित अध्यक्ष चापेकर यांच्याबद्दलचा आदरभाव, बडोद्याचा स्नेहसंबंध ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळे अण्णासाहेब शिंदे यांनी स्वाभाविकपणेच ह्या संमेलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
साहित्य संमेलनास प्रारंभ २५ डिसेंबर १९३४ रोजी न्यायमंदिराच्या भव्य हॉलमध्ये सुरु झाला. दुस-या दिवशी विविध विभागांच्या अध्यक्षांची भाषणे श्रोत्यांच्या विनंतीवरुन न्यायमंदिर हॉलच्या प्रशस्त सभागृहामध्ये झाली. तत्त्वज्ञान व समाजशास्त्र हे दोन्ही विषय अण्णासाहेब शिंदे यांच्या आस्थेचे व व्यासंगाचे असल्यामुळे त्यासंबंधी मूलभूत विचार मांडण्याची ही संधी स्वाभाविकपणेच त्यांनी घेतली.
खरे तर अण्णासाहेब शिंदे कोणत्याही विषयावर भाषण करीत असोत, त्यामध्ये त्यांच्या विचाराचा स्वतंत्रपणा प्रकट झाल्यावाचून राहत नसे. त्यांच्या भाषणात श्रोत्यांना प्रत्येक वेळी पूर्वी कधीही न ऐकलेले नवे विचार हमखासपणे ऐकावयास मिळत. कोणत्याही विषयाचा विचार करताना शिंदे यांच्या दृष्टीचा ठाव हा इतरांहून वेगळा असल्यामुळे चर्चविषयाचे वेगळेच स्वरुप श्रोत्यांना पाहावयास मिळत असे. तत्त्वज्ञान व समाजशास्त्र ह्या विभागाच्या अध्यक्षपदावरुन केलेल्या त्यांच्या भाषणामध्ये अण्णासाहेब शिंदे यांच्या स्वतंत्र दृष्टीचा प्रत्यय येतो.
प्रारंभीच त्यानी सांगितले की तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र ह्या दोन्ही विषयांवर मराठीत स्वतंत्र वाङ्मय फारच थोडे, किंबहुना गणनेत घेण्याइतकेही नाही, इतके अल्प आहे. तत्त्वज्ञानपर श्रेष्ठ दर्जाचे वाड्मय आपल्या देशात निर्माण झाले, पण तो फार पूर्वीचा काळ. प्राकृत भाषेत व पुढील काळामध्ये केवळ भाष्यग्रंथच निर्माण झाले व भाष्याची ही प्रथा आद्यशंकराचार्यांनीच घालून दिली. स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याऐवजी भाष्यग्रंथ लिहिण्याचा गौण मार्गच ज्ञानेश्वर, एकनाथ ह्या आपल्या भाषेतील तत्त्ववेत्यांनी स्वीकारला. अण्णासाहेब शिंदे त्यानंतर म्हणाले की, "पुढे पुढे तर एका गीतेच्या घाण्याभोवती मराठीतील समग्र तात्त्विक विचारचक्र फिरु लागले."
आधुनिक काळातील तत्त्वज्ञानपर वाङ्मयाच्या निर्मितीचा विचार करताना पाश्चात्य देशात जे विचार निर्माण होत आहेत त्याचा प्रभाव पूर्वीच्या मानाने अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठीमध्ये स्वतंत्र तत्त्वज्ञानविचाराची निर्मिती न होता पूर्वीच्या काळी संस्कृतमधून तर आधुनिक काळात पाश्चात्त्य देशांतून आयाक केली जाते, ह्या वस्तुस्थितीचा निर्देश करुन शिंदे म्हणाले, "आमचा देश तूर्त तरी विचारसंपत्तीची नुसती उतारपेठ होऊन राहिला आहे. सध्याच्या काळात सारे जगच वैज्ञानिक क्रांतीमुळे आणि त्याहूनही अधिक तीव्र अशा राजकीय-सामाजिक-आर्थिक क्रांतीने हादरु लागले असल्याने ह्यापुढे नुसत्या तार्किक अर्थवादाचा खप कमी होईल." अशी अपेक्षाही त्यांनी प्रकट केली. मराठीमध्ये कोणत्याही प्रकारच्या तत्त्वज्ञानात्मक वाड्मयाची निर्मिती होणे आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी म्हटले आहे, "अमक्याचे तत्त्वज्ञान किंवा तमक्याच्या तत्त्वज्ञानाचा इतिहास वगैरे आकाशाला गवसणी घालण्याचा आव आणणारी पुस्तके मराठीत न झाली तरी चालेल. त्यात काही नावीन्य अगर गांभीर्य नसणार. ह्यापेक्षा जास्त स्वतंत्र आणि सुटसुटीत ग्रंथ तयार करावयाचे नसल्यास आमच्यातील काही कॉलेजातील प्रोफेसरांप्रमाणे आधुनिक विद्याविशारदांनी लघुकथा, भावगीते, फार तर विनोदी कादंब-या लिहिलेल्या ब-या. त्याही खपत नसल्या तर परीक्षेचे कागद तपासण्यात अधिक किफायत मिळेल तर पाहावी. मग उगाचच वाचकांचा वेळ घेणारी तत्त्वज्ञाने कशाला? ह्याबाबतीत जबलपूर कॉलेजचे प्रोफेसर श्री. द. गो. मंटगे, एम. एस्सी ह्यांनी नुकत्याच लिहिलेल्या अपेक्षावाद ह्या चोपड्याची मला स्वाभिमान आठवण होत आहे. ह्या चोपड्याचा आकार एखाद्या बेकार तरुण कवीच्या कवितासंग्रहाहूनही लहान आहे आणि त्यांचा विषय पहावा तर 'जगता व्यापून दशांगुळे उरला' सापेक्षातावाद सिद्ध असो वा नसोत; जाड्या विद्वानाला बारके पुस्तक लिहिणे शक्य आहे, ही अपूर्व गोष्ट ह्या प्रोफेसरांनी सिद्ध केली, म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो. अशी क्षुद्र पुस्तके आमच्या पुण्यात कोणी प्रसिद्ध करीत नाही, ते आपण काम केले म्हणून बडोदावासीयांचेही अभिनंदन करतो." आमच्याकडील प्रोफेसरांनी नवीन शोध लावले नाही तरी परकीयांच्या ख-या शोधाची साध्या भाषेत रुपांतरे करुन आम्हा अडाणी मराठ्यांना त्यांची ओळख करुन दिली तर ते मोठेच काम होईल अशी अपेक्षा त्यांनी ह्या विषयाचा समारोप करताना प्रकट केली.
सर्वसामान्य लोकांना नवे विचार सोप्या भाषेच्या द्वारा कळविणे आवश्यक आहे, ही शिंदे यांची त्यांच्या विद्यार्थिदशेपासून असलेली धारणा त्यांच्या या अध्यक्षीय भाषणातून जसी प्रकट होते, त्याचप्रमाणे पुण्याच्या पोकळ पंडिती संस्कृतीबद्दलही त्यांच्या मनात असणारी नापसंतीची भावना प्रकट झाल्यावाचून राहत नाही.