नाताळची सुट्टी लंडनमध्ये घालवावी असे विठ्ठल रामजींनी ठरविले. होते. त्याप्रमाणे ८ डिसेंबरला सुट्टी लागताच दुपारी एक वाजता ऑक्सफर्डहून निघून दोन तासांत ते लंडनला पोहोचले. ग्रेज इन् रोडवर त्यांनी एक खोली भाड्याने घेतली. त्यांच्या शोजारच्या खोलीतच राजाराम भास्कर पानवलकर आणि नाशिकचे श्री. पंगे हे मुक्काम करून होते. पानवलकरांशी त्यांची लगेच मैत्री जुळली. पानवलकर तिघांसाठी उत्तम सात्त्विक शाकाहारी स्वयंपाक तयार करीत. ह्या सोबत्यांच्या जोडीने त्यांचे लंडन पाहणे चांगले झाले.
विठ्ठल रामजी हे मनात काही हेतू धरून लंडनमध्ये सुट्टी घालवावी या इराद्याने आले होते. “ज्या पाश्चात्त्य सुधारणेचे गोडवे आपण शाळांतून, कॉलेजांतून, ग्रंथांतून, गुरुमुखातून ऐकतो; इतकेच नव्हे तर जे हे सुधारणाचक्र खाऊनपिऊन घरी स्वस्थ रामराम म्हणत बसणा-या आमच्या साध्याभोळ्या राष्ट्रास आज सुमारे शंभर वर्षे चाळवीत आहे त्याची काही कळसूत्रे वरील अचाट शहरात दिसतील तर ती पाहावी असा एक हेतू निघतेवेळी मनात दडून राहिला होता. कारण ऑक्सफर्डचे विद्यापीठ हे एक थोरला आश्रम असल्यासारखे आहे. येथे विद्याव्यासंगाशिवाय दुस-या कोणत्याही भानगडीचे वारे नाही आणि आधुनिक सुधारणारूपी चीज तयार होण्याची लंडनएवढी मोठी वखार तर जगात कोठे नाही.”१
लंडन शहराचा प्रथमदर्शनी त्यांच्या मनाला जर कोणता जबरदस्त धक्का बसला असेल तर तेथील अफाट लोकसंख्येचा. छप्पन लाख वस्तीच्या या शहरात गेल्याबरोबर “मानवी महासागरात आपण जणू काय गटांगळ्या खातो आहो” असे त्यांना वाटू लागले. “कुठल्याही रहदारीच्या रस्त्यात गेल्याबरोबर स्त्री-पुरुषांच्या लाटांवर लाटा थडकत असताना पाहून जगावर मनुष्यप्राणी फार सवंग झाला आहे असे वाटते,” अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. “शेकडो मंडळ्या, हजारो संस्था, अनेक भानगडी व असंख्य चळवळी सार्वजनिक हिताकरिता चाललेल्या आहेत हे गाईड बुकावरून कळते. पण त्या कोणत्या कोप-यात आहेत व त्यांचे ह्या जनसमूहावर काय कार्य घडते ह्याचा काही बोध होत नाही.”२ विठ्ठल रामजी शिंदे यांना आपल्या उद्दिष्टांबद्दल कळकळ होती. भारतात परत गेल्यानंतर आपल्याला धर्मकार्याच्या जोडीनेच दीनदलितांची सुधारणा करण्याचे काम करावयाचे आहे ही त्यांच्या मनाची पक्की धारणा होती. त्यामुळे त्यांच्या उद्दिष्टाला अनुसरून धर्मकार्य व सामाजिक कार्य करणा-या संस्थांची त्यांनी आवर्जून पाहणी केली. अशा प्रकारचे काम करणा-या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. ज्ञानात भर पडावी अशा प्रकारची वस्तुसंग्राहालये, प्राणिसंग्रहालये बघितली. त्याचप्रमाणे लंडन शहरातील सांस्कृतिक जीवनाची अंगे सौंदर्यबुद्धीने निरखिली. १३ डिसेंबरला दोन प्रहरी ते मिस् मॅनिंगच्या घरी गेले. मिस् एलिझाबेथ ऍडलेड मॅनिंग ह्या नॅशनल इंडियन असोसिएशनच्या ऑनररी सेक्रेटरी होत्या.३ शिंदे यांच्या भेटीने त्यांना फार आनंद झाला. मिस् मेरी कार्पेंटरप्रमाणेच मिस् मॅनिंग ह्या सामाजिक सुधारणा व शिक्षण ह्याबद्दल झटत असत. रेव्ह. चार्लस् व्हायसे (१८२८-१९१२) ह्या कडक एकेश्वरी सुधारकाच्या त्या अनुयायी होत्या. युनिटेरियन सेक्रेटरी बोवी यांची त्यांनी १७ तारखेला भेट घेतली. त्यांच्याबरोबर ‘युनिटेरियानिझम’ ह्या विषयावर ते बोलले. त्यांच्या विनंतीवरून शिंदे यांनी ‘युनिटेरियन वर्ल्ड’ या मासिक पुस्तकासाठी प्रार्थनासमाजाबद्दल छोटास लेख लिहून दिला.
शहराच्या मध्यभागी गिल्डफर्ड रस्त्यावर असलेले ‘बालहत्यानिवारकगृह’ त्यांनी काळजीपूर्वक पाहिले व गृहाबद्दल तपशीलवार माहिती मिळविली. टॉमस कोरम नावाच्या एका परोपकारी व्यापा-याने १७३९ मध्ये ही संस्था स्थापन केली. पार्लमेंटने व प्रस्तुत संस्थेने व्यापक औदार्याची जी भूमिका घेतली होती तिचा परिणाम पापाचरणाला उत्तेजन मिळण्यात झाला व गृहात दाखल केलेल्या अनाथ मुलांची संख्या पंधरा हजारापर्यंत वाढली हे लक्षात येता संस्थेने काटेकोर निमय केले. गृहात ठेवावयाचे मूल एक वर्षापेक्षा मोठे असू नये. मूल हवाली करण्यास स्वतः आईनेच आणले पाहिजे व झालेला सर्व प्रकार तिला निवेदन करावा लागतो. फसवल्या गेलेल्या पण चांगल्या वर्तणुकीच्या बाईलाही गृहात आधार दिला जातो व त्या बाईलाही सन्मार्गास लावून ती समाजात मिसळली जाईल अशी व्यवस्था केली जाते. ही सर्व नाजूक कामे पोक्त व थोर अशा माणसांची कमिटी कसून चौकशी करून न्यायबुद्धीने करते. हल्ली गृहात मुले, मुली मिळून ३२३ असून निरनिराळ्या खेड्यांत २२९ तान्ही मुले दायांजवळ ठेवली आहेत इत्यादी माहिती विठ्ठल रामजी शिंदे यांना मिळाली. प्रार्थनासमाज पंढरपुरास या प्रकारचे गृह चालवीत असल्याचे स्वाभाविकपणेच त्यांच्या मनात आले असणार.४
२७ तारखेस ‘पोस्टल मिशन’ च्या अध्यक्ष मिस् टॅगर्ट यांच्या घरी विठ्ठल रामजी हे राजाराम पानवलकरांबरोबर जेवायला गेले. तेथे ‘पोस्टल मिशन’च्या चिटणीस मिस् फ्लॉरेन्स हिल्ल ह्या आल्या होत्या. मार्गारेट टॅगर्ट ह्या पासष्टीच्या आणि फ्लॉरेन्स हिल् ह्या अठ्ठावन्न वर्षांच्या होत्या. पोस्टल मिशनची चळवळ अमेरिकेत सुरू करणारे रेव्ह. रॉबर्ट स्पीअर्स ह्यांनी ह्या दोघी मैत्रिणींना हे काम इंग्लंडमध्येही करावे असे आग्रहपूर्वक सुचविले. त्यावरून १८८६ मध्ये ह्या दोघींनी इंग्लंडमध्ये पोस्टल मिशनचे काम अत्यंत प्रभावीपणे सुरू केले. त्यामुळे या दोघींचे नाव पोस्टल मिशनच्या कामाशी कायमचे जोडले गेले.५ ह्या दोघींकडून शिंदे यांनी पोस्टल मिशनची माहिती करून घेतली. २ जानेवारीस मिस् हिल्लच्या निमंत्रणावरून पोस्टल मिशन कौन्सिलच्या सभेला ते गेले. सभेमध्ये त्यांनी मुंबईच्या बाजूला ‘ब्रह्मो पोस्टल मिशन’ची एक शाखा काढण्याचा आपला विचार त्यांनी ठेवला. कमिटीला तो फारच पसंत पडून त्यांना लागतील त्याप्रमाणे पुस्तके पुरविण्याचे आश्वासन दिले. लंडन येथील पोस्टल मिशनचे काम दहा-बारा स्त्रियांची कमिटी पाहत असे. युनिटेरियन वाङ्मय पोस्टामार्फत पाठवून व पत्रव्यवहार करून प्रसार करण्याचे काम सर्व देशभर स्त्रियाच करतात. पुढे ब्राह्मधर्म प्रसाराचे काम या धर्तीवरच आपल्याकडील स्त्रियांनी हाती घ्यावे अशा प्रकारचे जाहीर आवाहन विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुबोधपत्रिकेतून “सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र”६ लिहून केले. मुंबईस ब्रह्मो पोस्टल मिशनची स्थापना करून श्री. वासुदेवराव सुखटणकर ह्या आपल्या मित्राकरवी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ह्या कामाला आरंभ आधीच केला होता.
ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळे इत्यादी पाहावीत, नवीन माहिती मिळवावी अशी शिंदे यांच्या ठिकाणी तीव्र जिज्ञासा त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनच दिसून येते. एका नवीन देशात व वेगळ्या सांस्कृतिक वातावरणात आल्यानंतर पाहण्यासारखे त्यांना कितीतरी होते. १६ डिसेंबरला त्यांनी रीजंट पार्क येथील विशाल प्राणिसंग्रहालय पाहिले. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातारणात राहतील अशी व्यवस्था या उद्यानातील प्राणिसंग्रहालयामध्ये केलेली पाहून ते विस्मित झाले. ब्रिटिश म्युझियममधील ‘नॅचरल हिस्टरी’ हा विभाग २१ आणि २४ डिसेंबर असे दोन दिवस तेथे जाऊन काळजीपूर्वक बघितला. “डार्विनच्या विकासवादावर हजारो व्याख्याने ऐकण्यापेक्षा ही म्युझियम एकदा नीटपणे पाहून ही अधिक माहिती होते” असे त्यांना वाटले.७
भिन्न भिन्न मताच्या समाजामधील उपासनासाठी ते जात होते व त्यांच्या कार्यपद्धतीच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण करीत होते. पोर्टलंड स्ट्रीटमधील युनिटेरियन देवळात स्टॉफर्ड ब्रुकची उपासना त्यांनी ऐकली. साऊथ प्लेसमधील नैतिक समाजात उपासना ऐकण्यासाठी २९ तारखेच्या रविवारी ते तेथे गेले. ऑगस्ट कोम्त या फ्रेंच तत्त्वज्ञाची पॉझिटिव्हिझम् (प्रत्यक्षार्थवाद) ही विचारप्रणाली ह्या समाजाला मान्य आहे. या संप्रदायात ईश्वर, आत्मा वगैरे अज्ञेय गोष्टींना फाटा दिलेला असतो. केवळ नीतीपलीकडे धर्म म्हणून कोणतीही बंधने पाळण्याची त्यांना आवश्यकता वाटत नसे. उपासनापद्धती ख्रिश्चन देवळातल्याप्रमाणेच होती. मात्र परमेश्वर वगैरेचा तेथे उल्लेख होत नाही. लोकांना जबरीने लढाईवर पाठविणे हे निंद्य आहे असे मत उपासकाने दिले. अर्थशास्त्रज्ञ अँडम्स् स्मिथ, नीतिशास्त्रज्ञ सिज्विक वगैरेंचे उतारे वाचले. टेनिसनची काही पदे गाइली. १ जानेवारीला एसेक्स हॉलमध्ये म्हणजे युनिटेरियन समाजाच्या कार्यालयाच्या जागी संध्याकाळी शिंदे थिऑसॉफिकल सोसायटीचा वर्ग पाहण्यास गेले. ‘पुनर्जन्म’ या विषयावर व्याख्यात्याने प्रतिपादन केले. प्रश्नोत्तरे व चर्चा शांतपणे झाली. व्याख्यात्यांशी विठ्ठल रामजी शिंदे ऍनी बेझंट यांच्याबद्दल बोलले. व्याख्यात्यांनी सांगितले की, बेझंटबाईंनी हिंदुस्थानात जे काम चालविले आहे त्याचा जगात इतरत्र चाललेल्या थिऑसॉफिकल चळवळीशी कोणताही संबंध नाही. हिंदुस्थानातील काम त्या स्वतःला हिंदू म्हणवून करीत आहेत. ५ जानेवारीच्या रविवारी ते संडे स्कूल असोसिएशनचे चेअरमन इयन प्रिचर्ड यांच्या घरी जेवणास गेले. नंतर उपासनामंदिरात मिस् प्रिचर्डने मुलांसाठी एक उपासना चालविली. विठ्ठल रामजी शिंदे यांनीही विनंतीवरून छोटेसे भाषण केले. सुमारे दोनशे मुले उपस्थित होती. २० वर्षांवरच्या सात तरुणांचा रविवारचा वर्ग प्रिचर्ड स्वतः आपल्या घरी घेत असत.
विठ्ठल रामजी यांना स्वीकृत कामाबद्दल आणि आपल्या ध्येयविषयाबद्दल जशी तळमळ होती त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या कलानिर्मित सौंदर्याचा आस्वाद घ्यावा याबद्दलची उत्कट ओढ होती. लंडनमध्ये आल्याच्या दुस-या दिवशी त्यांनी ट्रफालगर स्क्वेअरमधील ‘नॅशनल पिक्चर गॅलरी’ हे चित्रसंग्रहालय पाहिले. राफील, रुबेन इत्यादी प्रसिद्ध चित्रकारांची सुंदर चित्रे तेथे होती. एकेक चित्र त्यांना इतके सुंदर वाटे की ते सोडून त्यांना पुढे जाववत नसे. ही चित्रे पाहताना रसिकांची अवस्था कशी होते ते सांगताना त्यांनी नमूद केले आहे की, “दालनाच्या मधोमध खुर्च्यांची रांग आहे. त्यावर बसून कित्येक रसिक प्रेक्षक भिंतीवरील तसबिरीकडे पुष्कळ वेळ टक लावून स्वतःही चित्राप्रमाणेच तटस्थ दिसतात.”८
२० तारखेच्या रात्री त्यांनी ‘शार्लाक होम्स’ या नाटकाचा प्रयोग पाहिला. त्यामधील वास्तव स्वरूपाच्या अभिनयाचे त्यांना कौतुक वाटले. “ह्या लोकांचे लक्ष अभिनयाकडे फार आहे. ते त्यांनी फार चांगले साधले आहे. रंगभूमी व नेहमीची रहाटी ह्यात मुळीच फरक दिसला ही हीच खुबी आहे.” मात्र नाटकाबद्दल एकंदर अभिप्राय देताना त्यांनी हे नाटक उत्तम गणले जात असले तरी आपल्याला म्हणण्यासारखा आनंद झाला नाही, असे नमूद केले९ नाटकाबद्दल त्यांचा असा अभिप्राय पडावा याचे कारण असे असणार की, एक प्रकारची आध्यात्मिकता असेल तरच ती कला त्यांना खरीखुरी सुंदर वाटत असे.
लंडनच्या मुक्कामात शिंदे यांच्या मनावर परिणाम करणा-या दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. २२ तारखेच्या रविवारी पोर्टलंड स्ट्रीटवरील युनिटेरियन देवळात ते गेले होते. रेव्ह. हेनरी वड्स पेरिस यांचे 'शांती' या विषयावर व्याख्यान झाले. युनिटेरियन देवळातील व्यासपीठातून चालू विषयाचा ऊहापोह होतो ही बाब त्यांना विशेष वाटली. आफ्रिकेत चालू असलेल्या लढाईविषयी रेव्हरंड पेरिस यांनी जोरदारपणे प्रतिकूल मत मांडले. स्वतःची भूमिका मांडताना ते म्हणाले, “धर्म जर व्यवहारात येत नसेल, अगर कोणताही नीतीचा व न्यायाचा व्यवहार धर्मात गणला जात नसेल तर मी आजच प्रचारकपदाचा राजीनामा देईन.”१० त्यांची स्वतःची भूमिका अशीच होती, हे त्यांच्या फर्ग्युसनच्या रोजनिशीतील नोंदीवरून जाणवते. पेरिस यांचे हे मत विठ्ठल रामजी यांना चांगलेच भावले असणार. उन्नत पातळीवरून केलेले लौकिकातील कार्य व धर्म, नीती आणि धर्म यांना एकरूप मानण्याची शिंदे यांची भूमिका त्यांच्या पुढील आयुष्यातील कृतीतून आणि विचारातून दिसून येते. ही भूमिका दृढ होण्यामध्ये रेव्ह. पेरिस यांच्या ह्या उद्गाराचा मोठा प्रभाव पडला असावा, असे मानण्यास जागा आहे.
३० डिसेंबरला विठ्ठल रामजी शिंदे यांनी डोमेस्टिक मिशनपैकी रेव्ह. समर्स यांचे जॉर्जेस रोमधील मिशन पाहिले. ह्या भागातील गरीब लोकांची स्थिती चार-पाच घरात प्रत्यक्ष नेऊन रेव्ह. समर्सने दाखविली. पैकी तीन ठिकाणी अगदी म्हाता-या बाया फार आजारी होत्या. दोघा आजारी बायांजवळ जाऊन विठ्ठल रामजींनी प्रार्थना केली. ह्या दिवशी चहाची पार्टी होती. या प्रसंगी विठ्ठल रामजींनी छोटेसे भाषण दिले. सर्व कामकरी बाया दिवसभर कामावर गेल्या असता त्यांची मुले सांभाळण्याची व्यवस्था एका घरामध्ये केली होती. अशी २३ मुले त्या घरात देखरेखीसाठी ठेवलेली होती. ह्या कामासाठी माफक मोबदला आकारला जात असे. युनिटेरियन असोसिएशनमार्फत मिशनचा खर्च भागविला जात असे.
शिंदे यांनी या डोमेस्टिक मिशनचे काम पाहिले आणि इतिहास माहीत करून घेतला. डॉ जोसेफ टकरमान (१७७८ ते १८४०) ह्यांनी बोस्टन परिसरातील चेल्सी ह्या चर्चची जबाबदारी २५ वर्षे सांभाळली. त्यांची प्रकृती खालावली व आवाज बसला. त्यामुळे त्यांना निवृत्त व्हावे लागले. मिशनरी वृत्तीने काम करण्याची त्यांच्या ठिकाणी ओढ शाबूत असल्याने त्यांनी आपल्या कार्यासाठी नवे क्षेत्र शोधले. गरीब वस्तीतील दुबळ्यांचे दुःख व्यक्तीव्यक्तींशी संपर्क साधून दूर करण्याचा प्रयत्न करावा ह्या हेतूने त्यांनी १८३५ मध्ये ‘लंडन डोमेस्टिक मिशन सोसायटी’ ही संस्था स्थापन केली. रेव्ह. फ्रेडरिक समर्स हे जॉर्जेस रो ह्या मिशनमध्ये १८७९ मध्ये दाखल झाले. तरुणपणी ते बर्मिंगहॅम येथे उद्योग करीत होते. भरपूर संपत्ती मिळवून देणारा धंदा त्यांनी सोडून दिला व मिशनरी होऊन गरिबांची सेवा करण्यासाठी आपले आयुष्य वाहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १८७७ मध्ये त्यांची लिव्हरपूल येथे मिशनरी म्हणून नेमणूक झाली. लंडन मिशन कमिटीने त्यांना लंडनमध्ये बोलावून घेतले व १८७९ पासून ते जॉर्जेस रो मिशनमध्ये मिशनरी म्हणून काम करीत होते. गरिबांची सेवा करण्याची तळमळ, प्रचंड उद्योगशीलता आणि कामातील तत्परता हे विशेष गुण त्यांच्या ठिकाणी होते. जोडीला आपल्या सहका-यांचे साहाय्य घेऊन मिशनची विविध कार्ये करण्याचे संघटनाकौशल्य त्यांच्या ठिकाणी होते. रविवारची उपासना, रविवारची शाळा, बायबलवाचनाच्या बैठकी, ग्रंथालय अशी विविध प्रकारची कामे मिशनच्या वतीने चालू होती. ह्या सोसायटीच्या वतीने स्पायटल फील्ड मिशन, क्रिपल गेट मिशन, किन्सिंगटाऊन मिशन, नॉर्थ स्ट्रीट मिशन अशा ह्या डोमेस्टिक मिशनच्या शाखा होत्या.
मिशन चालविण्याचे उद्दिष्ट हे गरीब, दुःखार्त, अज्ञ आणि पतित अशांची ऐहिक आणि आध्यात्मिक सुधारणा करावी हे होते. अशा दीनदुःखार्तांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन साहाय्य करावे व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा ही मिशनची काम करण्याची पद्धती होती. हे काम करण्यासाठी आपला पूर्ण वेळ आणि शक्ती उपयोगात आणू शकतील अशा प्रकारचे पगारी मिशनरी संस्थेने नेमण्याची पद्धती अवलंबिली होती.११ रेव्ह. समर्स यांनी गरिबांचे दुःख दूर करण्याचे हे काम मिशनच्या वतीने अत्यंत सेवाभावी आणि समर्पणशील वृत्तीने चालविले होते. रेव्ह. समर्स यांची सेवाभावी वृत्ती आणि त्यांची काम करण्याची पद्धती ही शिंदे यांना फारच प्रभावी वाटली. कळसकरांची भेट झाल्यापासून म्हणजे १८९८ पासून विद्यार्थिदशेतच विठ्ठल रामजी शिंदे यांना आपण आपल्या देशातील हतभागी अस्पृश्यवर्गाची सर्वतोपरी सुधारणा करण्यासाठी काम करावे अशी प्रेरणा झाली होती. काही एक कार्य करण्यासाठी एखादी मंडळी स्थापन करावी या प्रकारचा विचारविनिमय त्यांनी सासने, हुल्याळ ह्या मित्रांसमवेत केला होता. रेव्ह. फ्रेडरिक समर्स यांचे जॉर्जेस रो मिशनमधील हे काम व कामाची पद्धती बघितल्यानंतर आपण हिंदुस्थानात परत गेल्यानंतर अस्पृश्य मानलेल्या लोकांसाठी ह्या मिशनच्या धर्तीवर संस्था स्थापन करून काम करावे असा विचार त्यांच्या मनात आला. म्हणून रेव्ह. समर्सच्या मिशनला विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिलेली भेट ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना ठरली.
विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी धर्मप्रेरणा उत्कट होती. समाजसुधारणेची खरीखुरी कळकळ होती त्याचप्रमाणे त्यांच्या ठिकाणी देशप्रेमाची भावनाही उत्कट स्वरूपाची होती. त्यामुळे लंडनात त्यांचे नव्याने झालेले मित्र राजाम भास्कर पानवलकर यांच्यासमवेत लंडन इंडियन सोसायटीच्या १४ डिसेंबर १९०१च्या सभेस ते गेले. ह्या लंडन इंडियन सोसायटीची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी १८६५ मध्ये केली. सोसायटीचे अध्यक्ष दादाभईच होते पानवलकरांचे ‘इंग्रजी साम्राज्याखाली हिंदुस्थानातील स्वराज्याची आवश्यकता’ ह्या विषयावर एक तास व्याख्यान झाले. त्यानंतर इतर चौघे जण बोलले. त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनीही भाषण केले. शिंद्यांनी या सभाप्रसंगाचे वर्णन केले आहे. “बोलणारे सगळेही अजाण व अननुभवी होते. तरी दादाभाई सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकत होते व त्यांचे आपल्या नातवाप्रमाणे कौतुक करीत होते. व्याख्यान आटपल्यावर मुलांनी त्यांस अनेक प्रश्न मोठ्या सलगीने विचारले. त्यांची फोड त्यांनी मोठ्या आवेशाने केली. म्हातारा देहाने वृद्ध आहे खरा पण त्याचा उत्साह तरण्यापेक्षा तरुण आहे. सभेचे सेक्रेटरी वाघळे ह्यास बोलता बोलता ते सत्तेने म्हणाले, ‘अरे, तू किती मूर्ख आहेस रे? आता मी तुला शिव्या हासडीन पाहा.’१२
लंडन इंडियन सोसायटीचे काम दादाभाई नौरोजी एरव्ही खेळीमेळीने चालवीत असले तरी तत्त्वाच्या बाबतीत तडजोड करायची नाही याबद्दल ते ठाम असत. व्यापक देशहिताचा विचार ते नेहमी दूरदृष्टीने करीत असत. १८९९च्या जूनमध्ये लंडन इंडियन सोसायटीची सभा भरली व पुण्याच्या काळ पत्राने लिहिलेल्या लेखातून राजद्रोह प्रकट होतो काय ह्याबद्दल आणि रँड आणि आमर्स्ट ह्यांच्य खुनाबद्दल चर्चा होऊन खुनाच्या घटनेचा निषेध करून नये ह्याबद्दल ह्या पक्षास एक मत जास्त मिळाले. त्यावर पुन्हा मोठी सभा बोलावून तीमध्ये विचार करण्याचा निर्णय दादाभाईंनी घेतला व त्या सभेतही मत आपल्या विरुद्ध म्हणजे खुनाच्या बाजूने गेले तर आपण राजीनामा देऊ असे त्यांनी निक्षून सांगितले. ते म्हणाले, “मी आपला जन्म जरी देशहितासाठी घालविला आहे (व त्यामुळे पुष्कळ इंग्रज लोक मला दूषण देत आहेत तितके इतर कोणास नाहीत.) तरी खुनासारखे दुष्ट राक्षसी कृत्य करणा-यांचा पक्ष मी कधीही घेणार नाही.” सुबोधपत्रिकेने हा वृत्तान्त देऊन म्हटले, “एकूण पुण्यातील खोट्या देशाभिमानाचे वारे लंडनपर्यंत एतद्देशीयांत पसरले आहे! दादाभाई शेटजींनी केलेला निश्चय त्यांच्या ख-या देशभक्तीस अनुरूप आहे.१३
लंडन इंडियन सोसायटीच्या सभा जशा कळकळीने पार पडावयास पाहिजेत तशा पडत नसत असे दिसते. ४ जानेवारी १९०२च्या शनिवारच्या होणा-या दर पंधरवड्याच्या बैठकीसाठी विठ्ठल रामजी शिंदे गेले होते. अध्यक्ष दादाभाई नौरोजी व दुसरी पाच-सात मंडळी केवळ हजर होती. पण शेवटपर्यंत व्याख्याते आणि दोन्ही चिटणीस आले नाहीत. म्हणून सभा लांबणीवर टाकावी लागली. स्वतः कमालीचे वक्तशीर असणा-या शिंदे यांना हा प्रकार अगदी रुचला नाही. उपरोधाने त्यांनी लिहिले आहे, “इंडियन लंडनात गेला म्हणून काय झाले. इंडियनच तो! ह्या सभेस कोणी युरोपियन येत नाहीत हे एक भाग्यच. नाहीतर ही हिंदी व्यवस्था त्यास कळली असती.”१४
अर्ध्याअधिक जगाला चाळवणा-या इंग्रजांच्या सुधारणाचक्रांची काही कळसूत्रे लंडन शहरात आपल्याला पाहावयास मिळतील अशी उमेद बाळगून विठ्ठल रामजी शिंदे येथे आले होते आणि त्यांनी उमेद बाळगल्याप्रमाणे त्यांना काही कळसूत्रे निश्चितच पाहावयास मिळाली. लंडन शहराचे भौतिक रूपही त्यांना फार वेधक वाटले. केवळ बाह्यरूपाचेच नव्हे, तर ह्या व्यापारी राष्ट्राचे अंतरंगही त्यांनी नीट ओळखले. आपल्याकडच्या आणि त्यांच्या दुकानात असणारा फरक तसेच दुकानदाराच्या वृत्तीत असणारा फरक ते मार्मिकपणे सांगतात. “माल तर मोहक खराच, पण तो दुकानात मांडून आपण दाराशई येऊन बसतात. एखाद्यास वाटावे की हे जणू रखवालीच करीत आहेत. इखडे काही निराळाच प्रकार. दुकान म्हणजे एक जंगी पारदर्शक पेटी अथवा पदार्थसंग्रहालय अथवा एक लहानसे प्रदर्शनच. रस्त्यातून धावतानादेखील दुकानातील सर्व जिन्नस किमतीसहित दिसतील.”१५ “मात्र यांचा व्यापार नुसत्या भपक्याने वाढला असे नव्हे. अनियंत्रित व्यापार आणि कायदेशीर स्पर्धा ह्या तत्त्वाचा या लाकांवर असा फायदेशीर परिणाक झाला आहे की, गि-हाईकांशई बेशिस्तपणा, आडदांडपणा, बेविश्वास अगर किमतीत अफरातफर केल्यास व्यापारी आपले भांडवल लवकरच गमावून घेईल. एकंदरीत सौंदर्य, बुद्धी आणि नीती या तीनही मुख्य तत्त्वांची समान सांगड घालून दीर्घोद्योग, अचाट साहस व निश्चल श्रद्धा ह्यांच्या पायावर ह्या लोकांनी आपल्या व्यापारशास्त्राची इमारत उभारली आहे. म्हणून लंडन शहरातून हल्लीचे वैभव आले आहे.”१६
इंग्रजांच्या स्वभावातील आत्मिक अंग हे विठ्ठल रामजींनी ध्यानात घेण्याचा प्रयत्न केला. हे लोक स्वार्थी, सुखार्थी, जडवादी आहेत असा समज इथले ऐश्वर्ययुक्त जीवन बघितल्यावर वाटण्याची शक्यता आहे. शिंदे यांना वाटले, “पाश्चात्त्य सुधारणेचे सर्व रहस्य केवळ चैनीतच नाही. जगात राहून सुख भोगण्याची अत्यंत लालसा ह्या लोकांस आहे हे खरे, पण पृथ्वीवर राहून आकाशातील स्वर्गाकडे उडी न घेता इथेच स्वर्ग उतरविणयाची ह्यांची दिशा आहे. हे लोक स्वार्थी आहेत हे तर खरेच. पण स्वार्थ साधल्याबरोबर परमार्थास ते कसे लागतात हे आम्हांस समजून घेणे आहे.”१७ शिंदे यांनी हे नुसतेच समजून घेतले होते असे नव्हे तर काही नमुनेदार उदाहरणांवरून स्वतःच्या भावी कार्याची प्रेरणाही घेतली होती.
विठ्ठल रामजी शिंदे यांचा लंडनमधील हा सुट्टीचा मुक्काम खूप धावपळीचा तसाच खूप उपयुक्त आणि आनंददाक झाला. ५ जानेवारी १९०१ रोजी लंडनहून सातच्या गाडीने ते ऑक्सफर्डला जायला निघाले. साडेनऊ वाजता तेथील आपल्या बि-हाडी पोहोचले. त्यांना फार दिवसांनी घरी आल्याप्रमाणे वाटले.१८
संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, ‘लंडन शहर,’ लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १५
२. तत्रैव, पृ. १५-१६.
३. दि इन्क्वायरर, लंडन, १९ ऑगस्ट १९०५, पृ. ५३१.
४. विठ्ठल रामजी शिंदे, ‘लंडन येथील बालहत्याप्रतिबंधक गृह’, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. २१-२५.
५. दि इन्क्वायरर, ३० मे १९२५, ६ जून १९२५, १२ ऑक्टोबर १९३५.
६. सुबोधपत्रिका, ९-८-१९०३.
७. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८४-८६.
८. तत्रैव, पृ. ७८.
९. तत्रैव, पृ. ८३-८४.
१०. तत्रैव, पृ. ८४.
११. व्ही. डी. डेव्हिस, द लंडन डोमेस्टिक मिशन सोसायटीः रेकॉर्ड ऑफ हंड्रेड इयर्स – १८३५-१९३५, द लिंडसे प्रेस, एसेक्स हॉल, लंडन, १९३५, पृ ९-१०, ५३.
१२. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८०.
१३. सुबोधपत्रिका, १८ जून १८९९.
१४. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८९.
१५. विठ्ठल रामजी शिंदे, ‘लंडन शहर, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १६.
१६. तत्रैव, पृ. १७.
१७. तत्रैव, पृ. १७.
१८. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८९-९०.