विठ्ठल रामजी शिंदे हे पारीसहून आल्यानंतर लिव्हरपूल येथे २१ ते २४ एप्रिलमध्ये भरलेल्या त्रैवार्षिक युनिटेरियन परिषदेला उपस्थित राहिले. ह्या परिषदेचा शिंदे यांना मोठाच लाभ झाला. धर्मप्रसाराच्या कामासाठी मध्यवर्ती संस्थेची स्थापना करून तिच्या द्वारा हे काम परिणामकारकपणे करता येते याबद्दलची स्पष्ट जाणीव त्यांना झाली. त्याचप्रमाणे अशा मोठ्या परिषदा कोणत्या प्रकारे भरविल्या जातात, त्याची कार्यवाही कशी चालते हे आदर्श स्वरूपात त्यांना पाहावयास मिळाले.
इ. स. १८१३ मध्ये युनिटेरियन लोकांस कायद्याने पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. १८२५ मध्ये ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनची स्थापना झाली. उदारमतवादी धर्माचे काम करू
पाहणा-यांनी उत्साहाच्या पहिल्या भरात युनिटेरियन मताच्या प्रसाराला जोरदार आरंभ केला. १८४०च्या सुमाराला इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड येथे साडेतीनशेपेक्षा जास्त युनिटेरियन मंदिरे बांधण्यात आली. मात्र ह्यानंतर साठ वर्षांच्या अवधीनंतरही विसाव्या शतकाच्या प्रारंभी तीनही देशांत मिळून युनिटेरियन मंदिरांची एकंदर संख्या तीनशे चौसष्ट एवढी म्हणजे पूर्वीइतकीच राहिली. ठिकठिकाणच्या युनिटेरियन समाजाची सर्व अंतर्बाह्य व्यवस्था लोकसत्तात्मक पद्धतीने तेथील स्थानिक सभासदांकडून होत असे. मात्र ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनची कमिटी केवळ काही व्यक्तींची, सभासदांची बनलेली असे. त्या पाठीमागे कायमस्वरूपी कोणत्याही संस्थेचे बळ नसे. या कारणाने ह्या असोसिएशनच्या कामाला बळ येत नाही अशी तेथील विचारी लोकांची धारणा बनली. तीमधून असा विचार पुढे आला की, सा-या युनिटेरियन समजाची एक मध्यसंस्था स्थापून तिच्याकडू केंद्रीय व्यवस्थेचे व प्रसाराचे काम करवून घेणे परिणामकारक ठरेल. ह्या विचारानुसार सन १८८२ मध्ये सर्व युनिटेरियन समाजाच्या प्रतिनिधींची ही परिषद स्थापन करण्यात आली. दर तीन वर्षांनी तिची एक सभा होत असे. ह्या परिषदेने स्थापनेपासूनच्या वीसेक वर्षांत उपदेशकांचा पगार वाढविणे, त्यांना पेन्शन देणे, मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड येथे आणणे वगैरे कामासाठी मोठमोठे फंड जमविण्याची कामे केली होती. ह्या परिषदेचीच आठवी सभा २१ ते २४ एप्रिलपर्यंत भरविण्याचे ठरविले होते. ह्या सभेपुढे एक महत्त्वाचा प्रश्न होता. परिषदेची आतापर्यंत एक कमिटी असे. सभेमध्ये अनेकविध ठराव होत, परंतु त्यांची समाधानकारकपणे अंमलबजावणी होत नसे. यासाठी कमिटीचे रूपांतर कार्यकारी संस्थेत करावे. तिच्या सेक्रेटरीने नेहमी देशभर हिंडून सर्व समाजाचा प्रत्यक्ष समाचार घ्यावा व लागेल ती मदत करावी, ह्या कामासाठी त्यांनी आपल्यास वाहून घ्यावे. त्यास पूर्ण पगार द्यावा, थोडक्यात युनिटेरियनांचा एक मोठा संघ स्थापावा, ह्या विषयांवर वर्षभर चर्चा चालली होती. तिचा वृत्तान्तही ‘दि इनक्वायरर’ या पत्रामध्ये येत असे. अखेरीस परिषदेच्या सभेचा दिवस उजाडला.
लिव्हरपूल हे इंग्लंडमधील अत्यंत श्रीमंत व पुढारलेले शहर आहे. परिषदेच्या व्यवस्थापक मंडळीने बाहेरून आलेल्या सहाशे प्रतिनिधींची उत्तम व्यवस्था आपल्या खर्चाने केली होती. टाऊन हॉलमध्ये चार दिवस सकाळी दहापासून ते रात्री दहापर्यंत सभेचे काम चालत असे. नेहमी सुमारे एक हजाराच श्रोतृवर्ग शांतपणे बसून ऐकत असे. मध्यंतरी एका जवळच्या मोठ्या हॉटेलात सर्व प्रतिनिधींचा व पाहुण्यांचा एकाच स्थळी मोठ्या समारंभाने भोजनविधी होत असे. तिस-या प्रहरी चहाच्या वेळी निरनिराळ्या भागांतून येणा-या बंधुभगिनींचा परस्परांचा परिचय होऊन अगत्यपूर्वक संभाषण होत असे. समाजात स्त्री-पुरुषांची संख्या बहुतेक समसमान होती. मुख्य दिवसाचे काम महत्त्वाचे आणि बरेच वादग्रस्त असूनही वादविवाद अगदी सुरळीतपणे झाले. परिषदेच्या प्रारंभीचे वर्णन करताना शिंदे यांनी म्हटले आहे, “पहिले दिवशी परिषदेच्या उपासनेच्या वेळी फिलार्मोनिक (Philharmonic) हॉल नावाच्या अत्यंत भव्य, सार्वजनिक मंदिरात सुमारे तेराशे स्त्री-पुरुषांची गर्दी जमली होती. प्रार्थनेच्या आरंभी Awake our souls! Away our fears! ह्या पद्याचा टाहो एकदम जेव्हा तेराशे कंठातून फुटून बाहेर आला, तेव्हा इमारतीच्या दगडांनाही जणू हरूप येऊन प्रतिध्वनींच्या मिषाने ते आम्हांस हाक देऊ लागले. जाहीर सभेत श्रोतृवृंद सोळाशेवर हजर होता. मी मागे एकदा युनिटेरियन समाज म्हणजे सुधारलेल्या जगाचे ‘प्रबुद्ध अंतर्याम’ असे म्हटले होते त्याची मला येथे चांगली प्रचिती आली. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ह्या सर्व बाजूंनी जरी जहाल सुधारकी भाषणे झाली तरी चहूकडून टाळ्यांचा गजर झाला. जणू चेतलेल्या अंतर्याम देवतेची ही गर्जनाच.”१
विठ्ठल रामजी शिंदे यांचे गुरू रेव्ह. जे. एस्लिन कार्पेंटर हे या परिषदेचे अध्यक्ष होते. प्रो. जाँ रेव्हील(पारीस), प्रो. सी. एच्. टॉय(हॉवर्ड) शिवाय रेव्ह. आर. ए. आर्मस्ट्राँग, जोसेफ वूड, एल्. पी. जॅक्स, डब्ल्यू. एच्. ड्रमंड इत्यादी अनेक नामवंत, विद्वान व निष्ठावंत युनिटेरियन हजर होते. प्रो. जाँ रेव्हील व प्रो. टॉय यांचे अध्यक्षांनी अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले. युनिटेरियन परिषदेसाठी अधिक निधी जमविण्यात यावा यासाठी सभेचे अध्यक्ष प्रो. कार्पेंटर यांनी अत्यंत कळकळीचे आवाहन केले. ते म्हणाले, “समजा विविध युनिटेरियन समाजाकडून वर्षाला पन्नास हजार पौंडांचा निधी जमत असेल तर आपण पाच वर्षांमध्ये सहा वर्षांएवढा निधी जमवू शकणार नाही का? जे वर्षाला पन्नास पौंड देतात त्यांनी साठ पौंड द्यावे. जे दहा पौंड देतात त्यांनी बारा पौंड द्यावे त्यामुळे
देणा-यावर फारसा आर्थिक ताणही पडणार नाही. लक्षाधीशाने द्यावी अशा प्रकारची देणगी माझ्याकडे नाही. मात्र चार-पाच वर्षांची आणखी नोकरी असलेला माझ्यासारखा धर्मशास्त्राचा व्याख्याता वर्षाला शंभर पौंडाची मदत पाचसहा वर्षे आनंदाने करू शकेल याची मला खात्री आहे. कारण ही योजना आपले बळ एकत्र करू शकणारी, सामूहिक कृती करू शकणारी, सहानुभूती आणि गैरसमज यांची दरी भरून काढणारी; नवे चैतन्य, नवी ताकद निर्माण करून आपल्या समान ध्येयाकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारी आहे.”२
सभेचे मुख्य काम जे मध्य संघ स्थापन करणे ह्याविषयी सर्व समाजांच्या मतानुरूप सविस्तर विचार करून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार परिषदेच्या कमिटीला देण्यात आला. युनिटेरियन त्रैवार्षिक परिषदेचा सोहळा अनुभवल्यानंतर आणि प्रो. कार्पेंटर यांच्यासारख्यांची कळकळीने व्याख्याने ऐकल्यानंतर शिंदे अंतर्मुख झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या देशातील ब्राह्म आणि प्रार्थनासमाजाच्या चळवळीचे वास्तव चित्र उभे राहिले. ह्या सभेचा वृत्तान्त कथन केल्यानंतर लेखाच्या अखेरीस त्यांनी म्हटले आहे, “वाचक हो, आणि विशेषतः ब्राह्मबंधूंनो, ह्या सातासमुद्रापलीकडच्या सात हजार मैलांवरच्या परदेशी गप्पा तुम्हाला सांगण्यास काय तात्पर्य बरे. आज आम्ही ब्राह्मबंधू युनिटेरियनांप्रमाणे सारख्याच नावेत बसून संगतीने एकाच तीराकडे निघालो आहोत. त्यांच्यासारख्याच पण शतपट अधिक अडचणी आम्हांपुढे आहेत. त्यांच्यासारखीच अधिक जबाबदारी आमच्यावर आहे. पण ते करीत आहेत त्या खटपटी नजरेने पाहून त्यांच्या अंशमात्रही खटपट करण्यास आम्ही कचरतो ह्याला काय म्हणावे! येथे कोणी नव्या पंथाचा असो की जुन्या पंथाचा असो, मानवी प्रगतीच्या बाबतीत हरत-हेने तो आपले पाऊल पुढेच टाकीत असतो. आमचे तसे आहे काय?... प्रत्येकाने आपली शिकस्त केली तरी आमच्या अवजड राष्ट्रांची गाडी हालेल की नाही, ह्याची भीती असूनही आम्ही धरसोड चालविली आहे. आमचे समाज थोडे, आमचे सभासद कमी ह्याबद्दल वाईट वाटावयाला नको. आहोत त्याच समाजांचा परस्परसंबंध समाधानकारक नाही, आहेत त्याच सभासदांच्या कर्तव्यांची वाटणी न्यायाची नाही याबद्दल मात्र आवश्य वाईट वाटले पाहिजे, वाटत नसेल तर मग सभासदांची संख्या कशी वाढेल आणि वाढून तरी काय फळ.”३
लिव्हरपूल येथील ही परिषद बघितल्याने एखादी परिषद पद्धतशीरपणे कशी आयोजित करावी याबद्दलचा वस्तुपाठच शिंदे यांना मिळाला. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात परत गेल्यानंतर अखिल भारतीय पातळीवर राष्ट्रसभेच्या अधिवेशनाला जोडून भरत असलेल्या उदारमतवादी धर्मपरिषदेचे काम जे मंदावले होते त्याला चालना देण्याचा आणि या धर्मपरिषदेत नवचैतन्य निर्माण करण्याचा त्यांनी जो पुढील काळात प्रयत्न केला त्याची प्रेरणाही त्यांना ह्या परिषदेपासूनच मिळाली असावी.
संदर्भ
१. सुबोधपत्रिका, २४ मे १९०३.
२. दि इन्क्वायरर, लंडन, २५ एप्रिल १९०३.
३. सुबोधपत्रिका, २४, मे १९०३.