लेखकाचे मनोगत

आधुनिक महाराष्ट्राची आणि भारताची सामाजिक पुनर्घटना विवेकाच्या आणि न्यायाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करणा-या मोजक्या विभूतींपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे होत. ते मूलतः धर्मनिष्ठ पुरुष होते. मात्र उन्नत भूमिकेवरील धर्मकार्य आणि सामाजिक-राजकीय कार्य एकरूपच आहेत, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांच्या जीवनात अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्याला मध्यवर्ती स्थान होते. हे कार्य त्यांनी धर्मकार्य म्हणूनच केले. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हा त्यांचा आयुष्यभराचा ध्यास होता.

महात्मा जोतीबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला युगप्रवर्तक प्रारंभ केला. मात्र समकालीन पांढरपेशा समाजाकडून त्यांच्या या कार्याला प्रतिसाद न मिळाल्याने ते खंडित झाले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये माणुसकीला कलंकभूत असणारा अस्पृश्यतेसारखा एक भयंकर प्रश्न अस्तित्वात आहे, याची फारशी कोणाला जाणीव नव्हती. अशा काळात महर्षी शिंदे यांनी अस्पृश्य मानलेल्या वर्गाची उन्नती करण्याचे व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य संस्थात्मक प्रयत्नाच्या द्वारा अखिल भारतीय पातळीवर करण्याचा द्रष्टेपणा आणि कर्तेपणा दाखविला. या कामासाठी त्यांनी अतुलनीय स्वार्थत्याग केला, अविश्रांत परिश्रम घेतले व अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याबद्दल पंचवीसएक वर्षांत भारतभर अपूर्व अशी जागृती केली.

अस्पृश्यतानिवारण कार्याची दोन महान पर्वे आहेत. पहिले पर्व जागृतीचे. त्याचे धुरीण महर्षी शिंदे होत. दुसरे पर्व संघर्षाचे. त्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. महर्षी शिंदे यांच्या कार्यामुळे पुढच्या संघर्षपर्वाची स्वाभाविकपणेच पूर्वतयारी झाली.

अशा प्रकारचे असाधारण कार्य करणा-या महर्षी शिंदे यांचे जीवन व कार्य साधार व विस्तृतपणे चित्रित करणारा चरित्रग्रंथ सिद्ध करावा असे मला उत्कटत्वाने वाटले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी या ग्रंथाच्या संपादनापासून मी महर्षींच्या जीवनकार्याविषयक अभ्यासाकडे वळलो. मी संपादित केलेल्या प्रस्तुत रोजनिशीचे प्रकाशन एप्रिल १९७९ मध्ये पुण्यास मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते, मा. शरदराव पवार हे समारंभाचे मुख्य पाहुणे असताना झाले, हा माझ्या आयुष्यातील अभिमानाचा व संस्मरणीय प्रसंग होय. मा. यशवंतरावजींचा परिचय झाल्यापासून ते मला म. शिंदे यांच्यासंबंधी संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित करून साहाय्य करीत होते, याचा मी कृतज्ञतापूर्वक निर्देश करतो.

महर्षी शिंदे यांच्याबद्दल चाललेल्या माझ्या संशोधनकार्याबद्दल मा. शरदराव पवार यांनीही विशेष आस्था दाखविली. हे संशोधन पूर्ण करून चरित्रलेखन करण्याच्या प्रस्तुत प्रकल्पासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने मला आर्थिक साह्म केले याबद्दल 'प्रतिष्ठान'चे अध्यक्ष मा. शरदराव पवार यांचा मी फार आभारी आहे. तसेच 'प्रतिष्ठान'चे आधीचे कार्याध्यक्ष मा. अण्णासाहेब शिंदे व विद्यमान कार्याध्यक्ष मा. मोहन धारिया यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचाही आभारी आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०१ ते १९०३ अशी दोन वर्षे धर्मशिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्ड येथे वास्तव केले होते व इंग्लंडमध्ये व अन्य देशांत प्रवास केला होता. त्यासंबंधी माहिती मिळविणे त्यांच्या चरित्रलेखनाच्या दृष्टीने आवश्यक होते. विद्यापीठ अनुदान मंडळाने मला त्यांच्या एका योजनेनुसार इंग्लंडमध्ये जाऊन महर्षी शिंदे यांची चरित्रविषयक साधनसामग्री गोळा करण्यासाठी सहा आठवड्यांची प्रवासवृत्ती मंजूर केली होती. त्यामुळे मी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड, लंडन, एडिंबरो, ब्रिडपोर्ट इत्यादी शहरांतून तसेच युरोपमधील पॅरिस, ऍम्स्टरडॅम, रोम, पाँपी या शहरी जाऊन शिंदे यांच्या चरित्राला अत्यंत उपयुक्त ठरेल, अशा प्रकारची माहिती मिळवू शकलो. विद्यापीठ अनुदान मंडळाने उपलब्ध केलेल्या आर्थिक साह्याबद्दल मी आभारी आहे.

महर्षी शिंदे यांच्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी अनेक गावांतील ग्रंथालयांचा व व्यक्तींचा अतिशय उपयोग झाला. पुणे येथील विद्यापीठाचे बॅरिस्टर जयकर ग्रंथालय, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेचे ग्रंथालय, शासकीय ग्रंथालय, मंगलोर येथील विद्यापीठातील कन्नड विभागातील ग्रंथालय, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील बॅरिस्टर खर्डेकर ग्रंथालय व तेथील धनंजय कीर संग्रह, बडोदा येथील सरकारी दप्तरखाना, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालय व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, सचिवालय ग्रंथालय, मुंबई तसेच ऑक्सफर्ड, लंडन, एडिंबरो व कॉरिंडेल येथील ग्रंथालयांचा माहिती मिळण्याच्या दृष्टीने मोठा लाभ झाला. मंगलोर विद्यापीठातील कन्नडचे प्राध्यापक डॉ. विवेकराय यांनी कन्नड वृत्तपत्रातील शिंदे यांच्यासंबंधीच्या मजकुराचा शोध घेऊन तो मला इंग्रजीत सांगितला. ऍम्स्टरडॅम येथील तरुण संशोधक व्हॅन ह्यूब वेर्ख यांनी शिंदे यांच्या आंतरराष्ट्रीय युनिटेरियन जागतिक परिषदेत केलेल्या भाषणासंबंधीचा डच वृत्तपत्रात आलेला वृत्तान्त माझ्यासाठी इंग्रजीमध्ये यथातथ्य स्वरूपात करून दिला. मँचेस्टर कॉलेजच्या ग्रंथपाल मिसेस् बार्बरा स्मिथ यांचेही फार साह्म झाले. त्याशिवाय पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमधील प्रा. डॉ. आर. एस. देशपांडे, मुंबईतील सचिवालय ग्रंथालयाचे श्री. दि. श्री. चव्हाण, लंडन विद्यापीठातील डॉ. इअन रेसाइड, पॅरिस येथील डॉ. पियर लॅशियर यांनी विशेष साहाय्य केले. मी या सर्व ग्रंथालयांतील पदाधिका-यांचा व वर नमूद केलेल्या व्यक्तींचा विशेष आभारी आहे.

प्रस्तुत चरित्रलेखनासाठी आवश्यक ती माहिती मिळविण्यासाठी अनेक व्यक्तींचे मला साहाय्य झाले. महर्षी शिंदे यांच्या कुटुंबीयांपैकी महर्षींचे चिरंजीव श्री. प्रतापराव शिंदे व महर्षींच्या सूनबाई सौ. लक्ष्मीबाई शिंदे यांनी मोठ्या विश्वासाने महर्षी शिंदे यांच्या संग्रही असलेली साहित्यसामग्री माझ्या स्वाधीन केली. श्री. प्रतापरावांचे चिरंजीव श्री. अशोक, दिलीप व शंतनू शिंदे व कन्या सौ. सुजाता ह्यांनी प्रस्तुत लेखनाच्या कामी सदैव आस्था दाखवून साहाय्य केले व उत्तेजन दिले. महर्षी शिंदे कुटुंबीयांचा मी अत्यंत ऋणी आहे.

महर्षी शिंदे यांच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांच्याबद्दलची पुष्कळशी महत्त्वाची माहिती मिळविणे शक्य झाले. श्री. रा. ना. चव्हाण, वाई; रा. कृ. बाबर, वाई; ए. के. घोरपडे, पुणे; भाई ए. के. भोसले, सोलापूर; श्री. भाऊराव देशपांडे, तेरदाळ; श्री. नरहर के. कानिटकर व म. म. दत्तो वामन पोतदार, पुणे यांच्या भेटी व मुलाखती घेता आल्या. श्रीमती लक्ष्मीबाई शिंदे व शकुंतलाबाई जमदग्नी यांनी महर्षी शिंदे यांच्याबद्दलच्या आठवणी लिहून मला उपलब्ध करून दिल्या. ह्या सर्व व्यक्तींचा मी आभारी आहे.  

मजबद्दल लोभ असणारे श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. कृ. भ. पवार आणि ज्येष्ठ मित्र प्रा. गंगाधर गाडगीळ यांनी प्रस्तुत चरित्रग्रंथाच्या पूर्ततेसंबंधी वारंवार आस्था दाखविली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

माझे मित्र डॉ. चंद्रशेखर जहागिरदार, डॉ. नागनाथ कोतापल्ले, श्री. सदा डुंबरे, श्री. अनंत दिक्षित आणि डॉ. विलास खोले यांनी प्रस्तुत चरित्रग्रंथाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे साह्म केले हे मी मोठ्या आनंदाने नमूद करतो.

या ग्रंथाची सुवाच्य प्रत तयार करण्याचे काम माझे विद्यार्थी डॉ. विजया वाडकर व प्रा. रणधीर शिंदे यांनी मोठ्या आत्मीयतेने केले याचाही मी आवर्जून उल्लेख करतो.

प्रस्तुत चरित्रग्रंथाला प्रा. राम बापट यांची प्रस्तावना लाभावी असे मला वाटले व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननेही त्यांना तशी विनंती केली; व ती त्यांनी मान्य केली. त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याचा मला फारच उपयोग झाला. त्यांच्या व्यासंगपूर्ण व विचारप्रवर्तक प्रस्तावनेमुळे प्रस्तुत चरित्रग्रंथाचे मोल निश्चितच वाढले आहे. मी प्रा. राम बापट यांचा फार आभारी आहे.

'लोकवाङ्मय गृहा'चे श्री. प्रकाश विश्वासराव यांनी प्रस्तुत ग्रंथाचे प्रकाशन करण्याचे मान्य करून आपल्या लौकिकाला शोभेल अशा देखण्या स्वरूपात त्याची निर्मिती केली, याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.

गो. मा. पवार
मुदिता,
१० अ, भगवंत हा. सोसायटी,
विजापूर रस्ता, सोलापूर – ४१३ ००४