मंगलोरमधील कार्य

अण्णासाहेब शिंदे यांनी १५ एप्रिल १९२३ रोजी पुणे शाखेच्या सभासदांच्या सभेत पुणे शाखेच्या नव्या घटनेनुसार बहुसंख्य अस्पृश्य सभासद असलेले पदाधिकारी निवडून मिशनचा सर्व कारभार ह्या नव्या पदाधिका-यांच्या स्वाधीन केला व आपण मिशनच्या मुख्य जबाबदारीतून मुक्त झाले. अण्णासाहेबांनी आधीच आपला मनोदय जाहीर केल्याप्रमाणे मिशन अस्पृश्यवर्गीयांच्या स्वाधीन केलेले पाहून ज्या अस्पृश्यवर्गीय पुढा-यांच्या मनात त्यांच्याबद्दल आशंका होत्या त्या दूर झाल्या. मिशन ताब्यात घ्यायला उतावीळ झालेले पुढारी मिशनची निंदा करीत होते ते आता मिशनचे कृतज्ञ अनुयायी व साह्मकर्ते बनले. शिंदे यांनी मिशन सोडल्यावर त्यांच्याबद्दलची प्रतिकूलता नाहीशी होऊन त्यांच्याबद्दल सद्भाव जागृत झाला. अर्थात घोगरे, कांबळे, थोरात, घाडगे, उबाळे ह्यांसारख्या पोक्त अनुभवी मंडळींनीच मिशनच्या पुनर्घटनेचा मनापासून मदत केली.


मात्र आयुष्यातील ऐन उभारीचा दीड तपाचा काळ अण्णासाहेबांनी मिशन स्थापन करुन ते नावारुपाला आणण्यात. अस्पृश्यवर्गाच्या ज्वलंत प्रश्नांची जाणीव अखिल भारतीयांना करुन देण्यात खर्च केला होता. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस जिवापाड परिश्रम केले होते. ते मिशन अशा प्रकारच्या वादंगानंतर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला म्हणून स्वाभाविकपणेच त्यांच्या मनाला वेदना झाल्या असणार. परंतु त्या आंतरिक वेदनेचा परिणाम अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबाबतच्या त्यांच्या कळकळीवर यत्किंचितही झाला नाही. ते काही असो ! ह्या अधिकारसंन्यासानंतर मिशनमधून ते व भगिनी जनाबाई जे अल्पस्वल्प वेतन घेत असत ते थांबले, एवढ्या थोर कर्तृत्ववान पुरुषापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या उभी राहावी हा केवळ दैवदुर्विलास. शिवाय आता वेळ मोकळा पडल्याने आपल्या वृत्तीला व ध्येयधोरणाला अनुसरुन काय करावे याचाही त्यांना निर्णय करणे आवश्यक होते.


संशोधन करावे ही एक अण्णासाहेबांच्या मनातील स्वाभाविक उर्मी होती. अलीकडे आर्य-द्रविड ह्या वादविषयाकडे त्यांचे लक्ष लागले होते. काही लेखही त्यांनी लिहिले. त्याहून व्यापक अशा विषयाची म्हणजे हिंदुस्थानच्या पुरातन इतिहासाची सामग्री जुळवून लेखन करावे असेही त्यांना वाटत होते. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांची त्यांनी या संदर्भात भेटही घेतली होती. इंदूर, ग्वाल्हेर, धार ह्या संस्थानांशी पत्रव्यवहाराही केला. परंतु एवढे मोठे काम आपल्या एकट्याच्या हातून होणे कठीण आहे, त्यासाठी आवश्यक ते साह्म मिळविणे दुष्कर आहे, हे त्यांच्या लक्षात आले व तो विषय त्यांनी मनावेगळा केला.


१९२३च्या मध्यावर अण्णासाहेब मुंबईस गेले असता राममोहन आश्रमांत त्यांचे जुने मित्र व कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाचे प्रचारक बाबू हेमचंद्र सरकार यांची भेट झाली. अण्णासाहेबांनी चार महिने कलकत्याच्या साधारण ब्राह्म समाजाच्या साधनाश्रमात येऊन स्वस्थ राहावे असा त्यांचा फारच आग्रह पडला. त्याप्रमाणे अण्णासाहेब १९२३ च्या सप्टेंबरमध्ये पत्नी रुक्मिणीबाई व चिरंजीव रवींद्र यांना घेऊन तेथे राहिले.तेथील चार महिन्याच्या वास्तव्यात खेडोपाडी हिंडून बॅकवर्ड क्लासेसची कामगिरी त्यांना पाहिली. ह्या सुमारासच कलकत्त्याच्या साधारण ब्राह्म समाजाने अण्णासाहेबांनी मंगळूरच्या ब्राह्मसमाजाचे आचार्य म्हणून काम पाहावे असे त्यांना सुचविले व तसा ठराव केला.


हिंदुस्थानच्या नैऋत्य किना-याकडील मंगळूर जिल्हा तसेच ब्रिटिश मलबारमधील कालिकत जिल्हा आणि त्याच्या दक्षिणेस असलेला त्रावणकोर व कोचीन हा संस्थांनी मुलूख या भागातील प्रचारपदाची मुख्य जबाबदारी साधारण ब्राह्मसमाजाने अण्णासाहेब शिंदे यांच्यावर सोपवली. प्रचारकाचे मुख्य ठाणे मंगलोर हे ठेवावे असे ठरले. ह्या निर्णयाला अनुसरून अण्णासाहेब शिंदे हे १९२४च्या एप्रिल महिन्यात मंगळूरला आले. पत्नी रुक्मिणीबाई व दोन मुले यांना आपले कनिष्ठ बंधू एकनाथराव यांजकडे मुंबईस ठेवले व भगिनी जनाबाई आणि धाकटा मुलगा रवींद्र यांच्यासमवेत ते मंगळूर येथे आले.


मंगळूर येथील ब्राह्मसमाजाचा अण्णासाहेब शिंदे यांचा पहिला परिचय १९०७ साली झाला होता. त्या वेळी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अपूर्व स्वागत तेथील ब्राह्मसमाजी असलेल्या बिल्लव मंडळीनी केले होते. अस्पृश्यवर्गातील मुलांना शिक्षण देण्यासाठी के. रंगराव यांनी या ठिकाणी १९०४ पासूनच आरंभ केला होता. पंचमवर्गातील मुलांसाठी शाळा व उद्योगशाळा त्यांनाी चालविल्या होत्या. डी.सी. मिशनच्या स्थापनेनंतर के. रंगराव यांनी आपली संस्था मिशनशी संलग्न केली होती. ह्या मिशनच्या कामानिमित्तही अण्णासाहेबांचे जाणे-येणे मंगलोर भागामध्ये अधूनमधून होत असे. ह्या प्रांतातल्या ब्राह्मसमाजाच्या पुढा-यांशी त्यांचा चांगला व्यक्तिगत परिचय झालेला होता. ही पूर्वपीठिका असल्याने शिंदे यांना मंगलोर येथे राहून ब्राह्मधर्म प्रचारकाचे काम करणे आवडण्यासारखे होते. ब्राह्मधर्माचा ह्या प्रांतामध्ये प्रचार करण्याची निकड कलकत्ता येथील साधारण ब्राह्मसमाजाला जाणवली होती. हिंदुस्थानच्या या नैऋत्य भागात मंगलोर, कालिकत, कॅनानोर, कोईमतूर वगैर शहरांत लहानमोठ्या ब्राह्मसमाजाचे नव्हते. त्यामुळे ह्या प्रांतात ब्राह्मसमाजाचे काम अव्यवस्थित व विस्कळीतपणे चालले होते. हे काम सुसंघटितपणे, उत्तम त-हेने चालविण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यारुपाने एक सुयोग्य व्यक्ती आपली प्रतिनिधी म्हणून ब्राह्मसमाजाला मिळाली. शिंदे यांना कानडी भाषा उत्तम अवगत होती, ही बाबही त्यांच्या प्रचारकार्यात साह्मभूत ठरणारी होती. ब्राह्मसमाजाचे कार्यकर्ते त्यांच्या चांगल्या परिचयाचे होते. त्यामुळे मंगलोर येथे या भागासाठी मुख्य प्रचारक म्हणून काम करण्यास विठ्ठल रामजी शिंदे यांना उत्साह वाटला.


१९०७ साली अण्णासाहेब शिंदे ज्या वेळी प्रथम मंगलोर येथे आले, त्या वेळेला समाजबंधूंच्या प्रेमाचा त्यांना अपूर्व अनुभव आला होता. मंगलोरचा सर्व ब्राह्मसमाज त्यांच्या स्वागतासाठी बंदरावर लोटला होता. परंतु १९०७ मधील हे वातावरण आता १९२४ च्या एप्रिल महिन्यात राहिले नव्हते. राजकारणाने हिंदुस्थानमधील लोकांच्या मनात आणि ब्राह्म वातावरणात मोठाच पालट घडवून आणला होता. ही किमया महात्मा गांधींच्या राजकारणातील अपूर्व प्रभावामुळे घडून आली होती. लो. टिळकांनी त्यांच्या आधीच्या मवाळ काँग्रेसला जहाल स्वरुप प्राप्त करुन दिले होते. परंतु महात्मा गांधीनी बहिष्कार, सत्याग्रह इत्यादी चळवळींनी सा-या भारतवासीयांच्या मनावर विलक्षण प्रभाव टाकून त्यांना राजकारणाकडे आकृष्ट केले होते व राजकारणाला उग्र स्वरुप प्राप्त करुन दिले होते. म. गांधींच्या प्रभावाने देशाच्या कानाकोप-यांत जागृती झाली होती.


मंगलोर ब्राह्मसमाजात चार-पाच सारस्वत घराणी पूर्वीपासून प्रविष्ट झाली होती. पं. उल्लाळ रघुनाथय्या, पं. परमेश्वरय्या, रा. कृष्णाराव गांगोळी, वकील, समाजाचे अध्यक्ष असलेले के. रंगराव आणि समाजाचे सेंक्रेटरी असलेले तरुणांचे पुढारी व म. गांधीचें कट्टर अनुयायी के. सदाशिवराव, वकील ही पाच सारस्वत घराणी प्रमुख होती. बाकी सर्व सुमारे पाऊणशे सभासद मडळी बिल्लव जातीची होती. मंगलोर भागाकडील बिल्लव जातीची मंडळी अस्पृश्यवर्गात गणली जात होती व त्यांचा पारंपरिक व्यवसाय ताडी काढण्याचा होता. परंतु ह्या जातीचे लोक ब्राह्मसमाजात गेल्यापासून सामाजिक व आर्थिक दृष्टीने बदलून गेले होते. ब्राह्मणसमाजात गेल्यानंतर दोन-एक पिढ्यानंतर त्यांच्यामध्ये हा फरक स्पष्ट दिसू लागला. त्यांना शिक्षण मिळू लागले व सरकारी नोकरीत त्यांचा प्रवेश झाला. कलकत्यातील ब्राह्मांप्रमाणे जणू काय त्यांची स्वतंत्र जात झाली होती. मोठमोठ्या सरकारी हुद्यापर्यंत ही मंडळी पोहोचलेली असल्याने त्यांचा प्रभाव पडून मंगलोर शहरात ब्राह्मांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीही देण्यात आली होती. ही परिस्थिती भारतात अन्यत्र कुठेही नाही. बिल्लवांच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीत हा पालट झाल्याने आपले पूर्वीचे अस्पृश्यपण ती विसरुन गेली होती व सध्याच्या अस्पृश्यवर्गाला दूर ठेवीत असत. सरकारी नोकरीत व मोठमोठ्या युरोपियन कंपन्यांत ह्या वर्गातील लोक अधिकाराच्या जागांवर असल्यामुळे राजकारणापासून ती चार हाच दूर असत. इंग्रज सरकारबद्दल त्यांच्या मनात एकनिष्ठेची भावना तीव्रपणाने वसत होती, म्हणून राजकारण वगळून केवळ धर्मकार्य एवढीच गोष्ट आता त्यांच्या पसंतीची उरली होती.


मंगलोर येथील लोक विविध धर्माचे व विविध पंथाचे होते. रोमन कॅथॉलिक व प्रोटेस्टंट पंथाचे बरेच ख्रिस्ती लोक होते. काही काही भांगात तर खिश्चनांची बहुसंख्या होती. ही मंडळी ख्रिस्ती झाली असली तरी आपल्या पूर्वाश्रमातील हिंदू धर्मातील जातिभेद पाळीत असत व थोड्याशा बदललेल्या स्वरुपात मूर्तिपूजाही करीत असत. त्यामुळे हिंदूंचे व त्यांचे सख्यत्वाचे संबंध असत. मुसलमानांचीही थोडीफार लोकसंख्या या प्रांतात होतीच. ब्राह्मधर्माच्या उदार भुमिकेनुसार विठ्ठल रामजी शिंदे धर्मप्रचाराचे कार्य सर्व धर्मांच्या विविध पंथीयांत व मुले आणि स्त्रिया ह्या वर्गासाठीही जाणीवपूर्वक करीत असत. स्वदेशाभिमानी या मंगलोर येथून प्रसिद्ध होणा-या कन्नड साप्ताहिकामधून शिंदे यांची व्याख्याने, उपासना व अन्य उपक्रम यांबद्दलची निवेदने वेळोवेळी प्रसिद्ध होत असत. ह्या निवेदनावरुन शिंदे यांचे कार्य किती जोमदारपणे, व्यापकपणे व समाजाच्या सर्व स्तरांवर चालले होते याची कल्पना येऊ शकते. ४ मे १९२४ रोजी 'ब्राह्मसमाज आणि त्याचे कार्य', २९ जून १९२४ रोजी 'प्रार्थनेचे महत्त्व', ६ जुलै रोजी 'परमेश्वराचे सुगणत्व', १३ जुलै रोजी 'आत्म्याची अनश्वरता', २८ जुलै रोजी 'बौद्ध धर्म', २ ऑगस्ट रोजी 'प्रेमलक्षण', १७ ऑगस्ट रोजी 'अवतार' इत्यादी विषयांवर ब्राह्मधर्माच्या व्यापक भूमिकेवरुन त्यांनी प्रवचने केली.


त्यांनी सुरु केलेला एक विशेष उपक्रम म्हणजे ऑगस्ट १९२४ पासून भगवद्गीतेचे विवेचन करण्यासाठी उघडलेला वर्ग. हा वर्ग दर गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता व संध्याकाळी साडेसहा वाजता डोंगरकेरी ब्राह्मसमाज मंदिरात चालवीत असत. प्रत्येक गुरुवारी भगवद्गीतेतील दोन अध्यायांचे विवरण करुन बारा आठवड्यांमध्ये हे विवेचन संपविण्याचा त्यांचा इरादा होता. वेळेच्या बाबत अण्णासाहेब शिंदे मोठे दक्ष असत. या वर्गांना हजर राहणा-यांनी वेळेवर यावे, बरोबर अॅनी बेझंटनी केलेले भगवद्गीतेचे भाषांतर तसेच वही आणावी अशा सूचना त्यांनी निक्षून केल्या होत्या. मुलांप्रमाणेच स्त्रियांमध्ये धर्मप्रचारक्राय करण्याबद्दलची त्यांचा कटाक्ष होता. महिलांसाठी ते मुद्दाम व्याख्याने देत असत. बावटेकट्टे येथील महिला समाज मंदिरात 'समाजाच्या सुधारणेसाठी स्त्रियांची कर्तव्ये' या विषयावर २ ऑगस्ट १९२४ रोजी त्यांनी व्याख्यान दिले. १६ ऑगस्ट १९२४ रोजी त्यांनी महिलासभेत 'जनकसुलभासंवाद' ह्या विषयावर व्याख्यान दिले. शिंदे हे अन्य अधिकारी व्यक्तींची व्याख्याने आणि प्रवचने धर्मप्रचारकार्याचा भाग म्हणून आयोजित करीत. के. सदाशिवराव, बी. बाबू, कुमारी एम्. घोष, के. सुब्रह्मण्यम, के. रंगराव, के. लक्ष्मण इत्यादिकांची व्याख्याने व प्रवचने त्यांनी आयोजित केली. १२ ऑगस्ट १९२४ रोजी मोहरमच्या दिवशी के. सदाशिवराव यांचे 'पैगंबर महम्मद आणि मोहरम' या विषयावर व्याख्यान आयोजित केले. हिंदू, मुस्लीम, खिश्चन यांचे सण-उत्सव ब्राह्म मंदिरांमध्ये साजरे करण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला.


व्याख्यान-प्रवचनाशिवाय स्वत: अण्णासाहेब शिंदे हिंदू पद्धतीने कीर्तनेही करीत असत. २४ ऑगस्ट १९२४ रोजी कृष्णाष्टमीसंबंधी, १२ ऑक्टोबर रोजी केशवचंद्र सेन यांच्यावर, तसेच १२ मार्च १९२५ रोजी तुकारामबीजेच्या दिवशी तुकारामांवर इत्यादि कीर्तने त्यांनी केली. अण्णासाहेबांची कीर्तनाची पद्धत हिदू वा मराठी परंपरेतली असली तरी त्यांच्या निरुपणाचा विषय नवीन व दृष्टिकोण सुधारणावादी असल्याने ख्रिश्नच व मुसलमान श्रोतेदेखील त्यांच्या कीर्तनास हजर राहत असत. काही कीर्तने मराठीतून तर काही कीर्तने कानडी भाषेतून त्यांनी केली. त्यांच्या छोट्या रोजनिशीमध्ये अशा कीर्तनप्रसंगी म्हणावयाची अनेक कानडी पदे टिपून ठेवलेली आहेत. मंगलोरच्या सरकारी कॉलेजमध्ये एकदा त्यांनी सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी ह्या ख्रिश्चन संताचे आख्यान लावून इंग्रजीमध्ये कीर्तन केले.


शिंदे यांचे धर्मप्रचाराचे कार्य मंगलोर प्रांतात असे जोमदारपणाने चालले होते. एक नवे चैतन्य येथील ब्राह्ममंडळीत निर्माण झाले होते. मात्र असे असले तरी अण्णासाहेब शिंदे यांच्यावर ब्राह्मांचा एक वर्ग असंतुष्ट होता. तो म्हणजे बिल्लवांचा. वर नमूद केल्याप्रमाणे ही बिल्लव मंडळी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी एकनिष्ठ होती. स्वराज्यासाठी चाललेले चळवळीचे राजकारण त्यांना पसंत नव्हते. महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे स्वतंत्रपणे राजकारणात भाग घेत होते, याची जरी ह्या मंडळींना माहिती नव्हती तरी त्यांची राजकारविषयक मते जहाल असली पाहिजेत अशी शंका त्यांना ते डोक्यावर घालत असलेल्या गांधीटोपीवरुन आली होती व प्रवचनाच्या ओघात राजकारणाच्या संदर्बात त्यांची राजकारणविषयक मते ऐकून त्यांचा बाणा जहाल आहे याविषयी त्यांची खात्री होऊन चुकली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांची धर्मविषयक भूमिका ही केवळ अध्यात्मापुरती मर्यादित नव्हती; तर राजा राममोहन रॉय यांच्याप्रमाणे राजकारण, समाजकारण, अर्थकारण ह्या सर्वांचा सामग्य्राने विचार करणारी व्यापक, समग्रलक्ष्यी अशी भूमिका होती. समाजकारण असो की, राजकारण, धर्माप्रमाणेच त्यांचा ते उन्नत भूमिकेवरुन विचार करीत असत. जीवनाची ही विविध अंगे त्यांच्या दृष्टीने एकमेकांपासून विभक्त असणारी नव्हती तर परस्परांचा संबंध ध्यानात घेणारी होती. ह्या भूमिकेमुळेच राजकारणाचा विचार त्यांना वर्ज्य नव्हता; उलट धर्मकारण, समाजकारण यांच्याप्रमाणे तो विषय त्यांना जिव्हाळ्याचा वाटत असे. त्यांची ही मते इंग्रजी सत्तेशी एकनिष्ठ असणा-या बिल्लव मंडळींना फारशी रुचणारी नव्हती. उदाहरणार्थ, मंगलोर येथील सरकारी कॉलेजात सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी ह्या ख्रिश्चन संतावर केलेल्या कीर्तनामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी असे प्रतिपादिले की, ब्रिटिश राज्यकतें हे राजकारण व धर्म वेगवेगळे ठेवतात. राजकारण करताना त्यामध्ये त्यांची धार्मिक दृष्टी नसते. महात्मा गांधीचे हे वेगळेपण आणि मोठेपण आहे की ते धर्माचे अधिष्ठान देऊन राजकारण करतात. मंगलोर ब्राह्म समाजाच्या ३४व्या वार्षिकोत्सवात विठ्ठल रामजी शिंदे यांनी ५ ऑक्टोबर १९२४ रोजी जे प्रवचन केले त्याचा विषयच मुळी ब्राह्मसमाज व उच्चतर राष्ट्रवाद (Brahm Samaj and Higher Nationalism ) असा होता. ब्राह्मसमाजाच्या तत्त्वाचे विवरण करण्याच्या ओघात त्यांनी असे म्हटले की, गांधीजी हे राजा राममोहन रॉय, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन ह्यांच्यानंतरचा चौथा अवतार होत. "मी जर कवी असतो तर सर्व राष्ट्राच्या परमेश्वराचे गौरवगीत लिहिले असते व त्यात महात्मा गांधी हे राजा राममोहन रॉयांचे केशवचंद्र सेन यांच्यानंतरचा चौथा अवतार होता असे वर्णन केले असते.. महात्मा गांधींनी कॉंग्रेसचे व्यासपीठ हे खालच्या पातळीवरील राष्ट्रवादावरुन उचलून ब्राह्मसमाजाच्या व्यासपीठापर्यंत उंचावले आहे. " याच प्रवचनात त्यांनी असेही म्हटले आहे की, "माझ्या मनात असे येते की आणि ही माझी श्रद्धा आहे, गांधीजी काँग्रेसचे व्यासपीट हे खालच्या पातळीवरील राष्ट्रवादावरुन उचलून ब्राह्मसमाजाच्या व्यासपीठापर्यंत उंचावले आहे." याच प्रवचनात त्यांनी असेही म्हटले आहे की, "माझ्या मनात असे येते की आणि ही माझी श्रद्धा आहे, गांधींजी काँग्रेस म्हणजे अखिल भारतीय ब्राह्मसमाजाचे कार्यकारी मंडळ आहे आणि काँग्रेसमध्येच अदृश्य स्वरुपात ब्राह्मसमाजरुपी परमेश्वराची धर्मसंस्था वसत आहे."


धर्म आणि राजकारण यांचे ऐक्य साधू पाहणारी, राजा राममोहन रॉय व म. गांधी यांच्या भूमिकांमध्ये आध्यात्मिक समानता पाहणारी विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका त्या वेळच्या बिल्लव ब्राह्मांना रुचणारी नव्हती. कदाचित शिंदे यांची भूमिका त्यांना यथार्थ स्वरुपात समजलीही नसेल. पण याचा स्पष्ट रुपात परिणाम असा झाली की, शिंदे यांच्याबद्दल संशयाचे, अविश्वासाचे वातावरण तेथील बिल्लव मंडळींत निर्माण झाले व त्याचे पर्यवसान शिंदे यांच्याविरुद्ध कलकत्याच्या साधारण ब्राह्मसमाजाकडे तक्रार करण्यामध्ये झाले.


संदर्भ
१. स्वदेशाभिमानी या मंगलोर येथील प्रसिद्ध होणा-या कन्नड साप्ताहिकामधून अण्णासाहेब शिंदे यांनी चालविलेल्या उपक्रमाच्या सूचना व त्यांचे वृत्तान्त प्रसिद्ध होत असत. मंगलोर विद्यापीठातील कन्नड भाषा साहित्याचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. विवेकराय यांनी कन्नडमधील मजकूर मला भाषांतर करुन इंग्रजीमध्ये सांगितला.
२. शिंदे यांचे हे विचार सरकारी कॉलेजच्या इंग्रज प्रिन्सिपॉलला स्वाभाविकपणे पटेल नसावेत. या वर्षाच्या कॉलेजच्या वार्षिक अहवालामध्ये शिंदे यांच्या प्रस्तुत व्याख्यानाची नोंद आढळली नाही.
३. विठ्ठल रामजी शिंदे यांची मंगलोर येथील १९२४ मधील छोटी डायरी, शिंदे यांची कागदपत्रे.