सत्याग्रहात सहभाग आणि नेतृत्व

विठ्ठल रामजी शिंदे हे मिशनच्या दगदगीच्या कामातून निवृत्त झाले होते. मात्र त्यांच्या आस्थेचे अनेक प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. धर्मकार्य ही तर त्यांची जीवननिष्ठा होती. मंगलोरहून परत आल्यावर पुण्यात कौटुंबिक उपासना मंडळाच्या कार्याला त्यांनी चालना दिली. १९२९ साली ब्राह्मसमाजाच्या शतसावंत्सरिक उत्सवनिमित्त त्यांनी मोठाच प्रचारदौरा काढला व उत्तरेकडील मोठा प्रवास संपवून ते परत आले. १९३०च्या आरंभीच्या काळात देशातील वातावरण बदलून गेले होते. म. गांधींच्या नेतृत्वाने सर्व हिंदुस्थानात एक प्रकारे चैतन्याचे वारे खेळत होते व भारतीय समाज स्वातंत्र्याच्या आकांक्षेने प्रभावित झाला होता. म. गांधींचे द. आफ्रिकेतील कार्य जेव्हापासून प्रकाशात येऊ लागले तेव्हापासून शिंदे म. गांधीच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. गांधींच्या राजकारणाला धर्माचे अधिष्ठान आहे ही गोष्ट त्यांच्यामध्ये इतर राजकारण्यांहून वेगळी व अपूर्व आहे असे शिंदे यांना वाटत होते. ह्या कारणाने म. गांधीबद्दल त्यांच्या मनात नितांत आदराची भावना निर्माण झाली होती व ते म. गांधींना आजपर्यंत जगात निर्माण झालेल्या लोकोत्तर विभूतींपैकी मानू लागले होते. म. गांधीबद्दलची ही आदराची भूमिका त्यांच्या लेखनामधून, व्याख्यानांतून स्पष्टपणे जाहीर होऊ लागली होती. १९३० च्या प्रारंभी गांधीच्या प्रभावाने हिंदुस्थानातील वातावरण बदलले असतानाच स्वत: विठ्ठल रामजी शिंदे कृतिशील राजकारणात ओढले जावेत अशा प्रकारची घटना घडली.


पुणे शहर सत्याग्रही मंडळाधिकारी
दे. भ. बाळूकाका कानिटकर व हरिभाऊ फाटक यांनी विठ्ठल रामजींची मार्च १९३० मध्ये भेट घेतली व एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यातील कायदेभंग चळवळीचे त्यांनी नेतृत्व करावे अशी विनंती केली.१ ह्या प्रकारच्या कामाला शिंदे यांच्या मनाची सर्वथैव अनुकूलताच होती. कानिटकर, फाटक यांची विनंती शिंदे यांनी मान्य केली. विठ्ठल रामजी शिंदे यांचा प्रभाव आणि देशातील राजकीय परिस्थितीचा बदललेला देखावा याचा परिणाम होऊन केशवराव जेधे हे काँग्रेसच्या राजकारणाला अनुकूल झाले होते. सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर पक्ष यांच्याकडे असलेला त्यांचा ओढा कमी झालेला होता वक काँग्रेसच्या राजकारणाकडे ते आकृष्ट झाले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच्या चळवळीत केशवराव जेधे यांनीही सामील व्हावयाचे ठरवले  त्याप्रमाणे ते झालेही.


पुणे जिल्ह्यातील खेडोपाडी पायी दौरा करुन लोकांमध्ये जागृती करणे व अखेरीस मिठाचा सत्याग्रह करणे असे या चळवळीचे स्वरुप होते.


अण्णासाहेब शिंदे यांनी एप्रिल महिन्याच्या तिस-या आठवड्यात सोमवारी सकाळपासून आपला पहिला दौरा हवेली तालुक्यात काढायचे ठरवले. त्यांच्याबरोबर दहा-पंधरा स्वयंसेवकांची तुकडी होती. बरोबर प्रो. धर्मानंद कोसंबी व केसवराव जेधे होते. दौ-यासाठी तुकडी जेव्हा निघत असे तेव्हा सत्याग्रहाचा मोठा झेंडा पथकाच्या अग्रभागी फडकत असे.

बाजाची पेटी, टाळ ही साधने पथकाबरोबर असत. त्याचप्रमाणे प्रभातफेरीच पद्यावली प्रत्येकाच्या हातात असे.

 

डफ-तुणतुण्यासहित पोवाडेवाल्यांचा एक ताफाही त्यांच्याबरोबर असायचा. खेडेगावात प्रचारदौरा काढण्याच्या दृष्टीनेच अनुरुप अशी ही सगळी सिद्धता शिंदे यांनी केली होती. खरे तर ब्राह्मधर्माच्या प्रचारार्थ शिंदे ज्या वेळेला खेडेगावात व अस्पृश्य वस्तीत फेरी काढत असत, तेच स्वरुप या सत्याग्रहाच्या दौ-यामध्ये त्यांनी ठेवले होते.


फर्ग्युसन कॉलेज ही अण्णासाहेबांच्या दृष्टीने केवळ शिक्षणाच्या बाबतीतच मातृसंस्था होती असे नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने उदात्त कार्याचे ते एक पवित्र ठिकाणही होते. १९०९ साली मिशनचा पहिला त्रैवार्षिक बक्षीस समारंभ श्रीमंत सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरातच साजरा केला होता. त्याप्रमाणे डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली १९९२ साली मिशनची ऐतिहासिक स्वरुपाची महाराष्ट्र परिषदही तेथेच भरविली होती. असा या फर्ग्युसन कॉलेजच्या समोर येऊन त्यांच्या पथकाने प्रथम झेंडावदन केले व दापोडी गावास जाण्यासाठी कूच केले.


तेथून पुढे प्रत्येक खेडेगावात प्रथम प्रभातफेरी म्हणत उभ्या उभ्याच व्याख्याने देत ते पुढच्या गावी जात असत. ह्या सत्याग्रही पथकाचे स्वागत करण्याच्या बाबतीत खेडेगावच्या लोकांत अतिशय उत्साह दिसून येत होता. दोन प्रहरी एखाद्या गावी जेवणाचा बेत आधीच ठरलेला असे. स्नान वगैरे आटोपल्यावर जेवणास वेळ असल्यास पोवाडे सुरु होत.

चिचवड, देहू, आळंदी, लोणी, लोहगाव वगैरे लहान-मोठी सर्व गावे करुन पाहिल्या आठवड्यात बहुतेक हवेली तालुक्यातील प्रचारदौरा संपविला. या पहिल्या आठवड्यात जवळ जवळ शंभर मैलाचा पायी प्रवास झाला. दौ-याचा कार्यक्रम वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असे. पथकाच्या स्वागतार्थ बायकामुले झेड्यांची वाट पाहत हद्दीवर येऊन बसत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा दौरा इतका लोकप्रिय झाली की, एका गावचे लोक त्यांना निरोप देण्यासाठी गावाच्या हद्दीपर्यंत पोहोचवायला जात, तर दुस-या गावचे लोक स्वागतासाठी सामोरे येत.


ह्या काळात स्वातंत्र्याच्या आकांक्षेने सगळे वातावरण कसे भारुन गेले होते याचा निदर्शक हा एक प्रसंग पहिल्या आठवड्याचा हा दौरा संपवून शेवटचे खेडेगाव-लोहगाव-तेथून त्यांचे पथक येत होते. येरवड्याच तरुंग वाटेवरच होता. तुरुंगाच्या बाहेर उभे राहून पथकाने एक गाणे म्हटले.  झेंड्याचा जयजयकार झाला. त्यामध्ये कौद्यांनीही भाग घेतला व पोलीसही कौतुकाने पाहत होते.


येरवड्याजवळील धर्मशाळेत पथकाची उतरण्याची सोय केली होती. तेथे सहभोजन झाले. त्यामध्ये खेडेगावातील शिष्टमंडळीही सहभागी झाली. सायंकाळी पुण्यात प्रवेश करुन शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास हार घालून बुधवार चौकातून मिरवणुकीने सदाशिव पेठेतील शिवाजी मंदिरात सर्वजण आले. तेथील सभेत शिंद्यांनी आपल्या आठवड्याच्या दौ-याचा वृत्तान्त सांगितला. हा दौरा म्हणजे धार्मिक वारक-यांची एक दिंडीच बनलेली होती. कारण त्यांचे नेतृत्व हे राजकारणाकडेही धर्मनिष्ठ वृत्तीने बघणा-या विठ्ठल रामजींकडे होते. भल्या पहाटे उठून साडेपाच वाजता सर्वजण उपासनेस बसत. उपासनेच्या वेळीं शिंदे त्यांना पथकाची शिस्त, त्यांनी चालविलेल्या कार्याचे पावित्र्य आणि जबाबदारी, अनत्याचार आणि सहनशीलता यांचे महत्त्व समजावून सांगत असत. शिंद्यांचा उपदेश हा केवळ शिस्तीच्या पालनासाठी नव्हता, तर राजकारणात आवश्यक असलेल्या नैतिक आचरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.


अण्णासाहेबांनी दुसरा दौरा खेड तालुक्यामध्ये काढला. यावेळी पथकात वीस स्वयंसेवक होते. मंचर, जुन्नर, नारायणगाव वगैरे खेड्यांतून दौ-याचे मोठ्या थाटाने स्वागत झाले. ह्या दौ-यात प्रथम मीठ विकण्याचा कायदेभंग सुरु केला. दांडी येथून मिठाची मडकी आणली होती. त्याला गांधीमीठ असेही म्हणण्यात येत असे. केव्हा केव्हा मिठाचा लिलाव होऊन पैसे जम. स्वयंसेवक कॅप्टन कृष्णाराव महादेव काळे हे तडफदार तरुण होते. गाडगीळ व लिमये ही दोन मुले बहारदार पोवाडे म्हणत, असे त्यांनी नमूद केले आहे.


उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही ठिकाणी जत्रा भरलेल्या होत्या. याचा फायदा दौ-याला झाला. सभेतील व्य़ाख्यान झाल्यावर विदेशी कापडाची होळी होत असे. मात्र त्या वेळी कोणावरही जुलूम होणार नाही याची दक्षता घेतली जाई. काही सरकारी अधिका-यांची मुले आपल्या वडिलांच्या देखत आपल्या डोक्यावरच्या किमती विदेशी टोप्या होळीत फेकीत असत. सभेला पाचृसात हजारांचा जमाव जमत असे. लोकांना जणू काय या दौ-याचे वेडच लागले होते.


तिसरा दौरा भीमाशंकर व त्यापलीकडील गावी निघाला. ह्या बाजूला कोळ्यांची वस्ती विशेष प्रमाणात होती. त्यांना दारु न पिणे, चोरी न करणे, अत्याचार न करणे वगैरे सात्त्विक तत्त्वे समजावून सांगणे कठीण गेले. एक-दोन ठिकाणी सभेमध्ये ज्या वेळेला अस्पृश्यांना वेगळे बसविल्याचे शिंदे यांना दिसून आले त्या वेळी पथकाने आपले ठाणे अस्पृश्य जमावात नेले व अस्पृश्येतरांनाच वेगळे ठेवले. अस्पृश्यता मोडण्याचे असे प्रात्यक्षिक फारच परिणामकारक होते. दौ-यामधील व्याख्यानांतून समतोल स्वरुपाची शिकवण सांगितली जात असे. सरकारचा द्वेष करावा असे कधीच सांगितले गेले नाही. सरकारचे पुष्कळ कायदे आपल्या हिताचेच आहेत, ते अवश्य पाळावे असे सांगितले जाई. जे कायदे प्रजेच्या हिताचे नसतात व जे प्रजेच्या विरोधात न जुमानता केलेले असतात असेच कायदे पाळू नयेत, असे प्रतिपादन दौ-यामधून केले जात असे.


दौ-याचे स्वरुप चैतन्यदायी होते. आपला पहिला दौरा संपवून विठ्ठल शिंदे, धर्मानंद कोसंबी व केशवराव जेधे पथकासह पुण्यास परत आले. ह्या तिघांचीही सत्याग्रहाच्या दौ-यात आलेल्या अनुभवाचे कथन करण्यासाठी ता. १६ एप्रिल रोजी सायंकाळी पुण्याच्या शिवाजी मंदिरमध्ये सभा भरविण्यात आली. 'शांततामय स्वातंत्र्ययुद्धास मदत करा.', 'मिठाचा कायदा मोडा, मीठ तयार करा', 'गांधीमीठ विका', अशा पाट्या झळकवीत व महात्मा गांधीचा जयघोष करीत ते तिघे सत्याग्रही वीर शिवाजी मंदिरात पोहोचले. सभेला रा. ब. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. पुणे शहर सत्याग्रही मंडळाधिकारी बाळूकाका कानिटकर यांचे 'लाभेल त्याच काळा स्वातंत्र्य भारताला' हे पद झाल्यावर अध्यक्ष डोंगरे यांनी अण्णासाहेबांना भाषण करण्याची विनंती केली. शिंदे यांना दौ-याचे फारच श्रम झाले होते, त्यांचा आवाज बसला होता, तरीही त्यांनी ह्या प्रसंगी भाषण केले. "आपण या कामाला का पडलो, खेडेगावातच जाण्याचे कारण काय ह्याबद्दलची भूमिका मांडणे तसेच खेडेगावात आलेले अनुभव सांगणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे" त्यांनी म्हटले.

"अलीकडील पाच-दहा वर्षांत चळवळ करण्याबाबतीत आपण वस्तुत: निवृत्त झालो होतो. राष्ट्रीय चळवळीत पडण्यापूर्वी सर्वांनी म्हणजे-ब्राह्मण-अब्राह्मण यांनी-एक झाले पाहिजे व एका राष्ट्रीय पक्षात असावयास पाहिजे ही माझी भूमिका आहे. मी शहर सोडून खेड्यात गेलो याचे कारण शहरातील सुशिक्षित लोकांची प्रवृत्ती खेडेगावाकडे नाही.

कलकल्ता, मद्रास वगैरे मोठ्या शहरांत सत्याग्रहाचा वणवा पेटला आहे. परंतु माझे मत वेगळे होते. ब्राम्हण विद्वान पंडित जागृत झाले आहेत. तरी नोकरशाहीच्या पोटाला चिमटा बसविणारा एकच वर्ग म्हणजे शेतकरी हे आहेत. (टाळ्या). पंचम जॉर्ज, पार्लमेंट, कोणीही दोषी नाही. नोकरशाही दोषी आहे. यांचा पगार २१,००० पासून खाली येण्याकरिता शेतकरी जागे झाले पाहिजेत. शेतकरी खरे मालक आहेत. नोकरशाहीला पगार देण्याला तेच समर्थ आहेत.... शेतक-यांना भेटायला आम्ही मोटारीतून जाऊ नये. पायी गेले पाहिजे.

मोटारीतून गेल्यास त्यांना वाटते, कलेक्टर आला की काय! आम्ही त्यांच्यासारखे होऊन खेड्यातून, काट्यांतून गेलो, मिठाचा कायदेभंग ही सरकारला 'डेंजरस सेंटिमेंट' वाटते स्वातंत्र्याची भावनाही त्यांना 'डेंजरस' वाटते. म. गांधीची सक्त आज्ञा आहे की दोषयुक्त वर्तन कराल तर मी प्रायोपवेशन करीन, मात्र आम्हाला अन्यायाची चीड आली पाहिजे. पण शेतक-यांना राग कसा आणणार? जर शेतक-याला सांगितले की, सरकार तुमचे नोकर आहे तर त्यांना वाटणार मायबाप सरकार आमचे नोकर कसे होतील? त्यांची मन:सरणी पहावयास आम्ही तेथे गेलो. सरकार उत्तम प्रकारचे नोकर नाहीत, अशी त्यांची समजूत पाडावी, असा आम्ही प्रयत्न  केला.


"ह्या दौ-यात आम्ही एकंदर २६ गावे हिंडलो. ४० व्याख्याने झाली. सर्व प्रवास पायी केला. ह्या प्रवासात काही विशेष गोष्टी आढळल्या. एखाद्या वेळी खेडेगावात दूध मिळणे मुश्कील होऊन जाई. हे ऐकून तुम्हास आश्चर्य वाटेल. आम्हांस गुरे भेटली, पण दूध मात्र नाही. याचे कारण दूध शहराकडे. दूध, तूप पाहिजे असेल तर मुंबई, पुण्यासच राहिले पाहिजे; खेडेगावात मिळणे मुश्कील. दुसरी अडचण भाषेची. शेतक-यांची भाषा मराठी. आमची भाषा मराठी पण फरक इतका की, आमची सुधारलेली मराठी असल्याने त्यांना समजण्यास कठीण जाते. खेड्यांतील कुणब्यांची मराठी आम्हांस आली पाहिजे. आपणास इंग्रजी येत असल्यामुळे पूर्ण मराठी येत नाही.


"शेतक-याला कायद्याची भीती वाटते, तितकी दुष्काळाची, एखाद्या भुताचीसुद्धा वाटत नाही. खेड्यांत आणखी एक विशेष गोष्ट पाहण्यास येते. पुरुषवर्ग फारसा घरी नसतो. खेड्यांत दुसरे साधन न राहिल्यामुळे हे पुरुष शहरांतून फॅक्टरीमध्ये कामाला गेलेले आढळले. पुण्यातील पंचक्रशीतील बरेच शेतकरी खडकीच्या दारुगोळ्याच्या फॅक्टरीत आहेत.
"आम्ही खेड्यांतून फिरत असता आणखी एक गोष्ट माझ्या नजरेस आली. एक खेड्यात-चिंचोळीला मराठ्यांच्या मुलाबरोबर महारांच्या मुलाला शाळेत घेतले जात नाही. त्यांच्या उलटही प्रकार दिसला. मराठ्यांजवळ महारांची मुले बसली होती.


"एकंदर आम्ही सतराजण अकरा गावी गेलो. येथील विद्यार्थिवर्ग खेड्यापाड्यांतून फिरून येईल. तर त्यांना दिसेल की, खेड्यांतच खरे हिंदुस्थान भरले आहे. गांधींचे नाव खेडोपाडीसुद्धा माहीत आहे. गावची मुले आमच्यामागे लागून 'गांधीजी की जय' ओरडत. एक खेड्यात तर एकाने आम्हांस विचारले, गांधींचे मीठ आणले आहे काय? हा प्रश्न विचारणारा मारवाड्याचा मुलगा होता. आम्ही शेवटी येरवड्यास जाऊन आलो. तेथे जाताच राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. तेथील त्या उंच उंच भिंती, पोलीस सार्जेंट. त्यांच्यासमोर तुरुंगाच्या दारात झेंडा उभा केला. इतक्यात मिलिटरी ऑफिसर येऊन प्रथम झेंड्याला सलामी करुन म्हणाला, "परेड चालली आहे, गाणे बंद करा." समोरून कैद्यांचा एक तांडा येत होता, त्यांच्यासमोर म. गांधी की जय म्हणताच आतील दोन हजार कैदी म. गांधी की जय करु लागले." व्याख्यानाच्या शेवटी अण्णासाहेबांनी आणखी एक चित्तवेधक घटना सांगितली. "पुढे जाताना येरवड्यास एक तमाशा सुरु होता. मी प्रथम तेथे गेलो. मी तेथे जाताच एकाने मला म्हटले पुढे बसू नका. त्याला वाटले की मी तमाशा बघण्यास आलो आहे. मी सांगितले की मी एकटाच नसून आमची आणखी पंधरा माणसे यावयाची आहेत. आम्ही गांधींचा निरोप तुम्हास सांगावयास आलो आहे. हे सांगताच सर्व मंडळी तो तमाशा सोडून आमचा निरोप ऐकण्यास येऊन उभी राहिली. त्याच कित्येक वडारी बायकासुद्धा येऊन उभ्या राहिल्या. याप्रमाणे कार्य करुन परत आता येथे आलो आहोत."


शिंदे यांनी जागृतीचे कार्य खेडेगावांतील शेतक-यांतच करणे कसे आवश्यक आहे हे प्रारंभी सांगितले. आपल्या भाषणातून म. गांधीची अनत्याचारी सत्याग्रहाची भूमिका कोणत्या पायावर उभी आहे, याबद्दलचा संदेश खेडेगावातील लोकांपर्यंत आपण कसा पोहोचविला याचे कथन केलेच, पण खेडेगावांतील वातावरणसुद्धा म. गांधींच्या प्रभावाने कसे भारले होते याचे यथातथ्य चित्र उभे केले.


प्रो. धर्मानंद कोसंबीनी आपल्या भाषणात तरुणांना सांगितले की, " एक वर्ष तुम्ही शाळा सोडली तरी चालेल पण बाळूकाकाच्या पथकात नाव नोंदवून खेडेगावची सफर करा." केशवराव जेधे म्हणाले, "आम्ही म. फुले पथक काढणार आहोत, ब्राह्मणेतर सत्याग्रहात सामील होण्यास तयार आहेत. आम्ही या चळवळीविरुद्ध नाही. स्वराज्य अज्ञजनाकरिता पाहिजे. शेतकरी लोकांकरिता पाहिजे. आम्ही लोकगावच्या म्हारवाड्यात गेलो. तेथे त्यांना उपदेश केला, की ही चळवळ तुमच्या हिताकरिता आहे. गुरुवर्य शिंदे, प्रो.कोसंबी हे तुरुंगात जाण्यास तयार आहेत. मी मराठा आहे हे विसरुन अस्पृश्यांकरिता या मडळीस सामील झालो. ब्राह्मणेतर सत्याग्रहात भाग घेण्यासाठी तयारच आहेत," सभेच्या शेवटी बाळूकाका कानिटकरांनी साकल्याने सत्याग्रहाबद्दलची माहिती सांगितली व "तारीख १७ला संध्याकाळी पेण व मालवण येथे दोन पथके रवाना होत असून त्यामध्ये दोन मुसलमान बोहरी दाखल झाले आहेत," हे सांगून गांधींच्या "या सत्याग्रहास मुसलमानांची सहानुभूती नाही" हा टाइम्सकाराचा आरोप खोटा असल्याचे प्रतिपादिले. हिंदू, मुसलमान, अस्पृश्य, शहरी लोक आणि खेडेगावांतील शेतकरी ह्या सर्वांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव व एकोप्याची भावना जागृत झाल्याचे ह्या सत्याग्रहाच्या रुपाने दिसून आले.


केशवराव जेधे आपल्या भाषणात म्हणाले होते की, "गुरुवर्य़ शिंदे, प्रो. कोसंबी तुरुंगात जाण्यास तयार आहेत." दोघांपैकी निदान शिंदे यांच्याबाबतचे जेध्यांचे भाकीत खरे ठरले. तीन आठवड्यांनंतर शिंदे यांना १२ मे रोजी तुरुंगाच्या दारातून आत प्रवेश करावा लागला.


पुणे जिल्ह्यातील सत्याग्रह चळवळीला नेतृत्व देऊन व तीमध्ये सहभागी होऊन राजकीय चळवळीला आध्यात्मिक अधिष्ठान देऊन तिचे कसे उन्नयन करता येते याचा एक आदर्श वस्तुपाठच अण्णासाहेब शिंदे यांनी दिला असे म्हणता येते. महात्मा गांधींचे ते खरेखुरे समानधर्मी होते याचा उत्तम प्रत्ययही आपल्याला या निमित्ताने येतो.