अखेरचे दिवस

अण्णासाहेबांची प्रकृती मुळातच कणखर होती, त्यामुळे १८९२ मध्ये पुण्यात आल्यापासून ते आयुष्याच्या पुढील सर्व कार्यकाळात ते अतोनात शारीरिक कष्ट घेऊ शकले. विद्यार्थिदशेमध्ये शिकवणीच्या निमित्ताने, कॉलोजमध्ये जाण्यासाठी, तसेच व्याख्याने ऐकण्याच्या निमित्ताने लांबलांबच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी रोजची कित्येक मैल पायपीट करावी लागे. त्या वेळेला ह्या पायपिटीला दारिद्र्य कारणीभूत होते. १९०३ सालापासून ते मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक झाले. प्रचारकाचे काम करण्यासाठी मुंबईसारख्या अफाट विस्तार पावलेल्या नगरीमध्ये सभासदांच्या घरी अनुष्ठानकर्मे करण्यासाठी अथवा समाजाच्या प्रचारकार्याचा भाग म्हणून व्याख्याने देणे, उपासना चालविणे ह्यासाठीही मुंबई शहरामध्ये दूरदूरच्या ठिकाणी त्यांना जावे लागे. शक्य असेल तर ट्रामने, शक्य नसेल तिथे कित्येक मैल पायीच जावे लागत असे. प्रार्थनासमाजाच्या प्रचारकार्यानिमित्त मुंबईबाहेरील इतर गावी तसेच अन्य प्रांतांमध्ये अण्णासाहेबांना प्रवासदौरे काढावे लागत. दरमहाच्या तुटपुंज्या साठ रुपयाच्या मासिक वेतनातूनच त्यांना आपल्या कुटुंबाचा खर्च भागवावा लागत असे आणि धर्मप्रचारार्थ कराव्या लागणा-या प्रवासाचा खर्चही ह्या तुटपुंज्या वेतनातूनच त्यांना करावा लागत असे. ऑक्टोबर १९०६ पासून डिप्रेस्ड क्लासेस मिशन सुरू केल्यानंतर धर्मप्रचारकार्याच्या जोडीने मिशनचे काम करण्यासाठीही त्यांना सतत प्रवास करावा लागत असे. मिशनच्या कार्यासाठी त्यांना वेगळे वेतन मिळत नसे. आपल्या प्रचारकार्यासाठी कराव्या लागणा-या प्रवासखर्चाचा जास्तीचा भार मिशनवर पडू नये, याची अण्णासाहेब दक्षता घेत असत. मुळातच त्यांचा स्वभाव काटकसरी. ही काटकसर त्यांना लहानपणापासूनच दुसरी सख्खी बहीण असलेल्या दारिद्र्याने शिकविली. सार्वजनिक कार्यासाठी जम केलेल्या पैशाचा विनिमय करताना तर ते अतिशयच काळजी घेत असत. त्यांचे मिशनमधील सहकारी वामनराव सोहोनी यांनी अण्णासाहेब कोणत्या प्रकारे प्रवास करतात हे पाहिले होते. त्यांच्या प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे, “रा. विठ्ठलराव येथील काम मजवर सोपवून अस्पृश्यतेच्या कार्याची जागृती करण्यासाठी देशभर दौरे काढीत. ऊन, पाऊस, थंडी, वारा ह्यांना न जुमानता सापडेल तेथे वस्ती करावी, मिळेल ते जाडेभरडे जेवावे, तिस-या वर्गातून-कधी कधी चौथ्या वर्गातून (काठेवाडात)-प्रवासा करावा. अशा प्रकारचे त्यांचे दगदगीचे जीवन होते. त्यांची शरीरयष्टी बळकट व काटक म्हणूनच ते इतक्या प्रचंड गैरसोयी साहू शकले.”१ आयुष्यभर अशा प्रकारचे शारीरिक कष्ट, अनियमितता व विविध प्रकारचे त्रास सहन करावे लागल्याचा परिणाम अण्णासाहेबांच्या शरीरावर उतारवयामध्ये दिसून येणे स्वाभाविक होते. १९३० साली येरवड्याच्या तुरुंगात तीन बोटे नखाजवळ पाळीपाळीने दुखू लागली. दहा दिवस त्यांना हॉस्पिटमध्ये राहावे लागले. त्यानंतर थोडासा आराम पडल्यानंतर रोज काथ्या वळण्याचे काम त्यांना करावे लागत असे. त्यामुळे हाताची बोटे दुखत. तुरुंगात आल्यापासून त्यांचे वजन १५६ पौंडावरून १४४ पौंडावर घसरले. म्हणजे बारा पौंडानी कमी झाले.


अण्णासाहेबांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिण्याच्या कामात ते व्यग्र झाले. कौटुंबिक उपासनामंडळाचे काम चालू होतेच. १९३३ साली श्री. ना. बनहट्टी यांनी नवभारत ग्रंथमालेच्या वतीने अण्णासाहेबांचा ग्रंथही प्रसिद्ध केला. ह्या काळात त्यांच्या हाताची बोटेही गाऊटने सुजू लागली. अंगात ताप वगैरे नसतानाही शीण वाटू लागला. २ जानेवारी १९३५ रोजी डॉ. चिंचणकरांकडे त्यांची लघवी तपासणीसाठी पाठवली. तीत सुमारे शेकडा ८-९ साखर आढली. डॉक्टरांनी मधुमेहाचे निदान केले. त्यांच्या बोटाची जखम भरून येत नव्हती, याचे कारणही त्यांना जडलेली मधुमेहाची व्याधी हे लक्षात आले. ही व्याधी अण्णाना त्यंच्या तुरुंगवासातच जडलेली असणार, तुरुंगातून सुटल्यानंतर ३३-३४ साली तिचे स्वरूप तीव्र झालेले आढळले. गाऊट, मधुमेह ह्या ताकद खच्ची करणा-या व्याधींनी त्यांना गाठले. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे इथपासून त्यांची धडाडीची कामगिरी संपुष्टात आली.


त्यांचे बंधू एकनाथराव पुण्यास आलेले होते. अण्णासाहेबांना डॉक्टरी उपचारासाठी मुंबईला घेऊन जाण्याचे त्यांनी ठरविले. डॉ. देशमुखांना भेटून अण्णांना किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्याचे त्यांनी योजिले. सुभेदार घाटगे यांना बरोबर घेऊन अण्णासाहेब मुंबईला १२ जानेवारीला गेले. दुस-या दिवशी डॉ. देशमुखांना तपासणी केली. हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नव्हती. मात्र इन्शुलिन टोचण्याचा उपाय त्यांनी सुरू केला. मुंबईच्या वास्तव्यात यज्ञेश्वरपंत भांडारकर, गद्रे, जयरामनाना, द्वा. गो. वैद्य, डॉ. काशीबाई नवरंगे, बलभीमराव केसकर इत्यादी मंडळी त्यांना भेटून जात होती. इन्शुलिनच्या उपायाने रक्तातील साखरेचे प्रमाणे योग्य तेवढे झाले. बोटाची जखमही भरून येऊ लागली. मात्र उतारवयात शरीर विकल झाले असताना मधुमेहासारखा रोग अखेरपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. डॉ. देशमुखांनी कोणकोणते अन्न, भाज्या व फळे किती प्रमाणात खावीत ह्याचे तोळ्याच्या वजनात कोष्टक करू दिले. पथ्यपाणी कडकपणे सांभाळणे आवश्यक होते. आपल्यासारख्या दरिद्र्याला ही श्रीमंताघरची व्याधी का व्हावी, असे त्यांनी खेदाने नमूद करून ठेवले.


आजारपणासाठी करावा लागलेल्या मुंबई येथील वास्तव्यकाळात, त्यांनी आपल्या मनात खोलवर दडपून टाकलेले दुःख वर यावे, अशी घटना घडली. नोव्हेंबर १९१० मध्ये अण्णासाहेबांचा प्रार्थनासमाजाशी संबंध संपुष्टात आलेला होता. प्रार्थनासमाजाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत “इतःपर श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांना प्रार्थनासमाजाचे प्रचारक मानण्यात येऊ नये” असा एक ओळीचा ठराव मंजूर करण्यात आला होता व तेव्हापासून गेली २५ वर्षे मुंबई प्रार्थनासमाजाने अण्णासाहेब शिंदे यांची कोणतीही दखल घेतली नव्हती. एकदाही उत्सवासाठी, व्याख्यानासाठी वा उपासनेसाठी त्यांना बोलाविले नव्हते. ज्या प्रार्थनासमाजाचे प्रचारक होऊन धर्मकार्य करण्यासाठी अण्णासाहेबांनी आयुष्यभरासाठी फकिरीचे व्रत घेतले होते, त्या प्रार्थनासमाजाने त्यांना दूर लोटले. एक प्रकारे त्यांना प्रार्थनासमाजातून बहिष्कृत केले. अण्णासाहेबांनी पुण्यात वास्तव्य करायला सुरुवात केल्यापासून म्हणजे १९१२ पासून त्यांच्या अस्तित्वाची प्रार्थनासमाजाने दखल घेतली नव्हती. मार्च ३४ पासून मात्र मुंबई प्रार्थनासमाजाच्या धोरणाता एकदम बदल झाला व अण्णासाहेबांच्या सहकार्याची मागणी करावयास त्यांनी प्रारंभ केला. मुंबई समाजाच्या ह्या बदललेल्या सहकार्याच्या धोरणाने अण्णासाहेबांना आनंद होण्यापेक्षा विषाद वाटणे व अंतःकरणातेल दुःख उमाळून येणे जास्त स्वाभाविक होते. १९३५च्या छोट्या रोजनिशीत १७ जानेवारीला केलेल्या नोंदीत त्यांनी आपले अंतरंग प्रकट केले आहे. “माझे व मुंबई प्रार्थनासमाजाचे सहकार्य आज जवळ जवळ २०-२५ वर्षे बंद पडले होते. कारण १. राजकारणी मते, २. मी स्वतंत्र ‘अस्पृश्यांसाठी’ मिशन काढले. ३. माझा स्वतंत्र व सरळ बहाणा, ४. शेवटचे विशेष कारण, माझा तीस वर्षांपूर्वीचा स्पष्ट नवमतवाद. ह्यात हितशत्रू स्नेही म्हणविणा-यांच्या वैयक्तिक कारवाईची भर पडून मी या समाजाला पारखा झालो व छळ सोसला. आता प्रार्थनासमाजाला आपली चूक कळली की काय? त्याने आपले विरोधाचे धोरण पार बदलून माझे सहकार्याविषयी मागणी गेल्या वर्षाच्या त्यांच्या उत्सवापासून (मार्च १९३४) आग्रहाने चालविली आहे.


“नाइलाजाने पुढच्या रविवारी मी मंदिरात उपासना चालविण्याचे कबूल केले. हा माझ्याविरोधी बेइमानीपणा केला. परमेश्वरी कार्यापुढे मी माझ्या अभिमानाची आहुती दिली. अखबरनवीस काय म्हणतील ते म्हणोत. मी मुंबईत तीन आठवडे होतो, तेव्हा समाजातील माझे खाजगी मित्रांनी फारच प्रेमळपणा दाखविला.”२


रोजनिशीतील ह्या नोंदीवरून मुंबई प्रार्थनासमाजाच्या धोरणाने अण्णासाहेबांच्या अंतःकरणाला किती वेदना झाल्या होत्या व प्रार्थनासमाजाचे हे निमंत्रण स्वीकारण्याच्या बाबत केवढा अंतःकलह त्यांच्या मनात चालला होता, याची कल्पना येऊ शकते. व्यक्तिगत अहंकारापेक्षा त्यांच्या अंतःकरणात असलेली ईश्वरी कार्याबद्दलची श्रद्धा ही अधिक बलवान ठरली. मुंबई प्रार्थनासमाजाच्या निमंत्रणावरून गिरगाव येथील प्रार्थना मंदिरामध्ये २० जानेवारीला त्यांनी उपासना चालविली. २५ जानेवारी हा ब्राह्मसमाजाच्या माघोत्सवाचा मुख्य दिवस होता. या दिवशीही अण्णासाहेबांनी प्रार्थनासमाज मंदिरात राजा राममोहन रॉय, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, डॉ. भांडारकर यांच्या ग्रंथांतील उतारे वाचले व प्रार्थना केली. रविवारी २७ तारखेला यज्ञेश्वरपंत भांडारकरांनी चालविलेल्या उपासनेस ते उपस्थित राहिले. ३ फेब्रुवारीला विलेपार्ले येथील प्रार्थनासमाजाच्या अनाथालयात अण्णासाहेबांनी साप्ताहिक उपासना चालविली, तर सायंकाळी गिरवागातील मंदिरातील उपासनेस ते हजर राहिले. मुंबई प्रार्थनासमाजानेच जो पडदा टाकून अंतराय निर्माण केला होता, तो पडदा समाजानेच काढून घेतल्यानंतर अण्णासाहेब शिंदे हे समाजाने चालवलेल्या ईश्वरी कार्यामध्ये अशा त-हेने मनापासून सहभागी झाले. ६ फेब्रुवारीस मुंबईहू निघून ते पुण्यास परत आले.


मुंबईच्या मुक्कामात त्यांच्या मनाला समाधान देणारी दुसरी घटना म्हणजे बंधू एकनाथरावांचे बदललेले वर्तन. एकनाथराव हे बर्माशेलमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होते. मधल्या काळात त्यांच्यावर आलेल्या कौटुंबिक आपत्तीमुळे व वर्तनक्रमात काहीसे वाहत गेल्यामुळे ते स्वतःच अण्णासाहेब शिंदे व अन्य कुटुंबीय यांच्यापासून दूर गेले होते. अण्णांना मधुमेहाचा विकार झाल्याचे पाहताच त्यांचे बंधुप्रेम उसळून आले. त्यांनी अण्णांना जानेवारी महिन्यात मुंबईस आपल्याकडे नेले. खर्चाकडे व दिवसरात्र अंगमेहनतीकडे न पाहता त्यांनी अण्णांची शुश्रुषा केली. एक क्षणही ते त्यांना विसंबत नसत. अण्णासाहेबांना एकनाथरावांचे हे बदलेले वर्तन पाहून आनंद तर झालाच, पण आश्चर्यही वाटले. परत पुण्यास निघताना त्यांना हूरहूर वाटू लागली. त्यांच्या मनात आले, “जर तो आम्हांमध्ये गेल्या ३० वर्षात मिसळून असता, तर तो घरदार, मुलेबाळे ह्मत आनंदात राहिला असता.”3 बंधू एकनाथबद्दल त्यांचे मन आनंदाने भरून आले. परंतु ह्या आनंदाला तो, आपणही स्वतः ३०-३५ वर्षं आचवलो, याचा विषादही वाटल्यावाचून राहिला नाही.
येरवड्याच्या तुरुंगात असताना अण्णासाहेबांची प्रकृती जी बिघडली, ती पुन्हा ताळ्यावर काही आली नाही. वय उतरणीला लागले होते. शरीरातील रोगाची प्रतिकारक्षमता कमी झालेली होती व औषधी उपाययोजनेला दाद न देणा-या गाऊट, कंपवात यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव त्यांच्या शरीरात झाला होता व १९३४ सालीच खाली येणा-या प्रकृतिमानाचे कारण मधुमेहासारख्या आजाराने शरीरात ठाणे दिले, हे लक्षात आले होते. शारीरिक विकलतेचा स्वाभाविकपणे परिणाम दिसून येत होता. बहुधा मधुमेहामुळे असेल, ते दिवसातील बराचसा वेळ झोपून काढीत असत. १९३३साली अण्णासाहेब शिंदे वेताळपेठेतील सणसांच्या माडीवर राहत असत. त्यांचे वाईचे स्नेही नारायणराव चव्हाण यांचे चिरंजीव रामचंद्र म्हणजेच रा. ना. चव्हाण हे मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्यासाठी पुण्यात वास्तव्य करून राहिले होते. ते अधूनमधून अण्णासाहेबांच्या घरी जात असत. अण्णासाहेबांचे धाकटे चिरंजीव रवींद्र हे त्यांचे मित्रच होते, त्यांनी सांगितलेल्या आठवणीप्रमाणे अण्णासाहेबांना शारीरिक थकवा बराच जाणवत असे. मग ते झोपाळ्यावर अथवा खुर्चीवर बसलेले असतील तर तेथून उठून त्यांच्या भल्या मोठ्या पलंगावर जाऊन निजत असत.४


मात्र ह्या शारीरिक विकलतेच्या काळातही त्यांची बौद्धिक स्वरूपाची अथवा धर्मप्रचाराची कामे चालूच होती. सदाशिव पेठेतील इतिहास संशोधन मंडळींच्या बैठकीला ते जात असत. य. रा. दाते यांच्या शब्दकोश मंडळावर सदस्य म्हणूनही ते काम करीत होते. अनेक भारतीय भाषा आणि कन्नडसारखी द्राविड भाषा त्यांना अवगत असल्यामुळे त्यांच्या चर्चेचा व त्यांनी प्रकट केलेल्या मताचा लाभ शब्दकोश मंडळाला होत होता.५ क्वचित वसंत व्याख्यानमालेसारख्या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठीही जात असत. कौटुंबिक उपासना मंडळाचे काम ते निष्ठापूर्वक करीत असत. धर्मकार्य हे त्यांचे जीवितकार्यच होते, त्यामुळे जोपर्यंत शरीरात कार्यशक्ती आहे तोपर्यंत ते कार्य थांबणे शक्य नव्हते. ह्या शारीरिक विकलतेच्या काळातही ते पुण्यातील कौटुंबिक उपासनी मंडळाच्या कार्याला चालना देत होते, मार्गदर्शन करीत होते. पुण्यातील बरीचशी बहुजन समाजातील मंडळी त्यांनी धर्मबंधनाने एकत्र बांधली होती. त्यांच्या कुटुंबांतील बायकामुलांना उन्नत धर्मभावनेची जाणीव करून देण्याचे त्यांचे काम चाललेच होते. ह्या काळातच वाई येथे ब्राह्मसमाजाची स्थापना करण्याची प्रेरणा वाईकर मंडळींना त्यांनी दिली. बहुमोल असा सल्ला ते सतत देत राहिले. वाई येथे ब्राह्मसमाज कार्यप्रवण होईल असेही त्यांनी पाहिले. प्रकृती फारशीर बरी नसतानाही वाई येथील ब्राह्मसमाजाच्या कामानिमित्त प्रवासाची दगदग सोशीत होते. वाईच्या आजूबाजूस असलेल्या भुईंज, केंजळ इत्यादी गावी जाऊन सभा घेऊन, फे-या काढून, उपासना चालवून धर्मप्रचाराचे व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य ते ब्राह्मसमाजाकडून घडवून आणीत होते.


खरे तर, १९३० नंतर त्यांच्या कौटुंबिक वातावरणात आनंदायक बदल होऊ लागला होता. तो म्हणजे त्यांच्या घरात सुरू झालेले नातवंडांचे आगमन. १९२८ साली त्यांचे थोरले चिरंजीव प्रतापराव यांचा विवाह बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याशी संबंधित असलेल्या कुटुंबातील लक्ष्मीबाईंशी झाला. अण्णासाहेब येरवड्याच्या तुरुंगात असताना प्रतापरावांच्या पहिल्या कन्येचा, उर्मिलेचा, जन्म १९३० साली झाला. त्यानंतर दोन वर्षांनी दमयंती ह्या दुस-या नातीचा व १९३४च्या डिसेंबरात सुजाता ह्या त्यांच्या तिस-या नातीचा जन्म झाला. अण्णासाहेबांना लहान मुलांची अत्यंत आवड. त्यामुळे त्यांना ह्या नातींचा फारच लळा होता. तिस-या नातीच्य जन्माच्या बाराव्या दिवशी नामकरण विधी करून त्यांनी सुजाता हे नाव ठेवले. तिच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांनी मधुमेहावरील उपचारासाठी ते मुंबईस गेले असताना तिची आठवण त्यांना येत असे. आईसारखीच ती सुंदर असल्याचे त्यांनी छोट्या रोजनिशीत नमूद करून तिचे कौतुक केले आहे, तर दुस-या एका नोंदमध्ये ‘सुजाताचे डोळे मला निववितात’ असे म्हटले आहे. १९३५च्या फेब्रुवारीत मधुमेहावर मुंबईतील डॉ. देशमुखांचा उपचार व सल्ला घेऊन पुण्यास परतल्यानंतर उर्मिला व दमयंती हो दोन नातवंडे त्यांना बिलगली आणि सुजाताला पाहून त्यांना फार आनंद झाला. पुढील काळातही सकाळच्या वेळी ते नातवंडांना बरोबर घेऊन फर्ग्युसनच्या टेकडीवर फिरायला जात. नातवंडांच्या क्रीडांनी त्यांच्या मनाला समाधान होत असे.६


प्रेम करणे हा अण्णासाहेबांच्या स्वभाव होता. घरातील माणसांत ते रमून जात असत. कधी कधी सून लक्ष्मीबाई, बहीण जनाबाई अथवा पत्नी रुक्मिणीबाई यांच्यासमवेत ते पत्ते खेळत. आल्यागेल्याचे स्वागत करण्यातही त्यांना समाधान वाटत असे. वाईचे त्यांचे स्नेही नारायणराव चव्हाण यांचा मुलगा रामचंद्र हा पुण्यस १९३३च्या सुमारास मॅट्रिकच्या अभ्यासासाठी येऊन राहिला होता. त्याला ते रविवारी आपल्या घरी जेवावयास बोलवीत. मिशनमधील विद्यार्थी दौलत जाधव आता कर्ते गृहस्थ झाले होते. तेही एकदा पंगतीला असल्याचे रा. ना. चव्हाणांनी नमूद केले आहे.७ मित्रमंडळींचा राबताही त्यांच्या घरी असे. कर्मवीर भाऊराव पाटील, कोल्हापूरचे गोविंदराव सासने हे अनेकदा त्यांच्या घरी येत असत. सुजाता, दमयंती, उर्मिला ही लहान मुले त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असत. कर्मवीर भाऊराव पाटलांचे पाय लहानग्या सुजाताला किती भलेमोठे वाटत असत. गोविंदराव सासने हे लोकविलक्षण वागणारे होते. ते गळ्यामध्ये घड्याळ घालून वावरायचे. तिघेही दाढीवाले. म्हणून सुजाता त्यांना आमचे तीन अण्णा असे म्हणत असे.


ह्या मित्रांचा सहवास अण्णांना मिळणार तो अधूनमधूनच. त्यांच्या सहवासात, एकत्र बोलण्यात मन मोकळं करण्यात त्यांना आनंद वाटणार तो तेवढा भेटीतच.


आजारपणाच्या काळातच १९३५ पासून भांबुर्ड्याला घर बांधण्याच्या दृष्टीने अण्णासाहेबांनी कामाला सुरुवात केली. दोन वर्षांत तेथील ‘रामविहार’ ही वास्तू बांधून झाली व अण्णासाहेब शिंदे गुरुवार पेठेतील भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात आले. लक्ष्मीबाईंची बडोदा येथील शेतजमीन आणि त्यांच्याजवळचे सोनेनाणे विकून जे पैसे आले, ते प्रामुख्याने नवे घर बांधण्यासाठी उपयोगात येऊ शकले. ह्या नव्या वास्तूत अण्णासाहेबांना फार काळ राहण्याचा योग नव्हता व तेथील अखेरचे दिवसही फारसे समाधानाचे गेले असे दिसत नाही. अण्णासाहेबांच्या सार्वजनिक आयुष्यातील अखेरची कामगिरी घडली ती ‘रामविहारा’त १९३७ साली. ही कामगिरी म्हणजे मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळाला आणि पुणे, सातारा येथील प्रतिष्ठित राजकीय, सामाजिक कार्यकर्तांना निमंत्रित करून भरविलेले अपूर्व स्नेहसंमेलन.
‘रामविहार’ ह्या वास्तूत अण्णासाहेबांच्या हातून घडलेली साहित्यिक कामगिरी म्हणजे त्यांच्या माझ्या आठवणी व अनुभव ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन पूर्णतेस गेले.

अण्णासाहेबांनी येरवड्याच्या तुरुंगात असताना आपल्या आई-वडिलांच्या बालपणीच्या आठवणीत रमून जावे यासाठी लिहावयास प्रारंभ केला होता. सुमारे छापील पुस्तकांची शंभरेक पाने एवढा मजकूर त्यांना तुरुंगात असतानाच लिहिला होता. अण्णासाहेबांचे दुसरे चिरंजीव रवींद्र हे इंदुरास नोकरी करत होते. १९३९ साली ते रजेवर पुण्यास आले असताना अण्णासाहेबांनी लिहिलेले आठवणींचे हस्तलिखित बाड त्यांच्या नजरेस पडले. अण्णांनी आपले हे आत्मचरित्रपर लेखन पूर्ण करावे अशी तळमळ रवींद्राना लागून राहिली.

अण्णासाहेब वार्धक्याने आणि आजाराने जर्जर झाले होते. मुख्य म्हणजे त्यांच्या मनाची उभारी टिकून राहिली नव्हती. याही अवस्थेत रवींद्रांनी अण्णांकडून हे लेखन पूर्ण करून घेण्याचा निश्चय केला. त्यांनी आपल्या नोकरीतून दीर्घकाळाची बिनपगारी सुटी घेतली. आत्मचरित्रपर लेखनासाठी आवश्यक असणारी सामग्री गोळा करण्याचा प्रयत्न केला. रोजनिशा, वर्तमानपत्रांतील आवश्यक कात्रणे काळाच्या व विषयाच्या अनुरोधाने करून दिली. आवश्यक ती माहिती मिळविण्याच्या दृष्टीने परिचितांकडे हेलपाटे घातले व या आत्मचरित्रपर लेखनाचे निवेदन करण्यासाठी वडिलांचे मन वळविले. अण्णासाहेबांनी तोंडी सांगितलेला मजकूर ते उतरून घेत असत. अशा त-हेने त्यांनी प्रयत्नपूर्वक हे आत्मचरित्रपर लेखन तडीला नेले. अण्णासाहेबांच्या शारीरिक आणि मानसिक विकलतेच्या अवस्थेत रवींद्रांनी त्याची मनधरणी करून त्यांच्याकडून हे जे लेखनकार्य करून घेतले, ही फार मोठी कामगिरी म्हणावी लागेल. रवींद्रांनी त्यांचे हे लेखन उपलब्ध करून देऊन भावी पिढ्यांवर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत.


अण्णासाहेबांच्या आयुष्याचा अखेरचा चार-पाच वर्षांचा काळ हा त्यांच्य शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने फार कष्टप्रद गेला. गाऊटचा विकार तर होताच. त्यांची बोटे सुजत असत, वेदना होत असत. त्यातच कंपवाताची भर पडली. त्यांचे दोन्ही हात सदैव थरथर कापत असत. शरीर विकल झाले होते, डोळे मात्र पूर्वीपेक्षाही जास्तच भेदक वाटत असत. जणूकाय मनुष्यजातीचा, मनुष्यस्वभावाचा ते वेध घेत असत. पूर्वीसारखे कुटुंबातील वातावरणही सौख्यापूर्ण राहिले नव्हते. पत्नी रुक्मिणीबाई ह्या आर्थिक ओढगस्तीमुळे असंतुष्ट असत. त्यांच्यातही एकांगीपणा वाढला होता. अण्णासाहेबांना मधुमेहाची व्याधी जडलेली आहे, हे लक्षात येऊनही त्या पाचसहा महिन्यांसाठी जमखंडीला शेताच्या कामाला निघून गेल्या. ही गोष्ट अण्णासाहेबांच्या मनाला लागणे स्वाभाविक होते. सगळ्या थोर पुरुषांच्या चरित्रात एक दुदैवी प्रकार आढळून येतो, तो म्हणजे पिता-पुत्र यांमध्ये निर्माण होणारा विरोध. जे चित्र महात्मा गांधींच्या, लो. टिळकांच्या चरित्रात दिसते तेच अण्णासाहेबांच्या चरित्रातही दिसून येते. अण्णासाहेबांच्या व त्यांच्या मुलांमध्ये या अखेरच्या काळात अंतराय निर्माण झाला. बालपणापासून अखेरपर्यंत अण्णासाहेबांना साथ मिळाली, ती म्हणजे त्यांच्या भगिनी जनाबाईंची. प्रेम करणे हा ज्यांचा स्वभावधर्म होता, त्यांच्या वाट्याला केवळ सामजिक पातळीवरच नव्हे, तर कौटुंबिक पातळीवरही प्रेमाचा हा अभाव आला होता. स्वाभाविकपणे तो त्यांना दुःखसह वाटत होता. त्यांचे मनःस्वास्थ्य अनेकदा बिघडून जात असे. अण्णासाहेब शिंदे यांचे प्रार्थनासमाजातील एक जुने सहकारी व मित्र केरो रावजी भोसले यांचे चिरंजीव अनंत (भाई अ. के. भोसले) हे अण्णासाहेब शिंदे यांच्या घरी कधीमधी जात असत. वेताळपेठेतील त्यांच्या घरी घडलेला एक प्रसंग त्यांनी सांगितला. पंडित मालवीयजी हे अण्णासाहेबांकडे आले होते. अण्णासाहेबांच्या बरोबर ते झोपाळ्यावर बसले होते, त्या दोघांत बोलणे चालले होते. पंडित मालवीयजी  अण्णासाहेबांना म्हणाले, “आय अँम अ डिफीटेड हीरो.” त्यावर अण्णासाहेब उद्गारले, “अ हीरो हॅज टु बी डिफीटेड.”८

अण्णासाहेबांच्या या उद्गारातून त्यांचे मन प्रकट होते असे वाटते. हीरो हा उदात्त ध्येय आपल्यासमेर ठेवतो. ध्येयसिद्धीसाठी अपरंपार कष्ट करीत असतो. परंतु त्या ध्येयाच्या उच्चतेमुळे व खडतरपणामुळे ते ध्येय संपादन होण्याजोगे नसते, असाच भाव अण्णासाहेबांच्या ह्या उद्गगारातून दिसून येतो आणि त्यांचे आत्मचरित्रही त्यांच्या ह्या उद्गारातून प्रकट होते. थोर विभूतीचे विचार व्यावहारिक पातळीवर जगणा-या इतरांना नीटसे कळत नाहीत, त्यांच्या हेतूचे यथार्थ आकलन होत नाही, त्यांचा विपर्यास केला जातो. बहुमानाच्याऐवजी मानहानी त्यांच्या वाट्याला येते. त्यांच्या दृष्टीने सगळ्यात वेदनादायक वाटणारा भाग म्हणजे हेतूचा विपर्यास हा असतो.


अण्णासाहेबांनी त्यांच्या माझ्या आठवणी व अनुभव ह्या पुस्तकाच्या पहिल्या भागाला १९४० साली जी प्रस्तावना लिहिली आहे, त्यामध्ये त्यांच्या अंतःकरणातील वेदना प्रकट होते. ह्या प्रस्तावनेत प्रारंभी महाभारताच्या वनपर्वातील २८व्या अध्यायातील श्लोक उदधृत केल आहे, तो असा :

 

मृदुना दारुणं हन्ति मृदुना हन्त्यदारुणम्।
नासाध्यं मृदुना किंचित् तस्मात्तिव्रतरं मृदु।।३२।।
वनपर्व, २८ अध्याय

 

धर्म-द्रौपदी संवादांतील बळी आणि प्रल्हाद ह्यांच्या संवादात प्रल्हाद आपला नातू बळी ह्याला म्हणतो, “मऊपणाने (दयेने) कठिणाला जिंकता येते, मऊपणाने अकठिणाला तर जिंकिता येतेच. मऊपणाला असाध्य असे काहीच नाही. म्हणून मऊ (दया) हे तीक्ष्णाहूनही अधिक तीक्ष्ण होय.”


प्रस्तावनेत अण्णासाहेब पुढे लिहितात, “माझ्या आयुष्याचे सार जर काढावयाचे असेल तर वर महाभारतकारकांनी प्रल्हादाच्या तोंडी जो उदगार घालता आहे, तोच माझ्या अनुभवाचा आहे. महात्मा गांधी यांच्या अहिंसावादाची ही तन्मात्राच होय. असा कठीण अनुभव मला कळू लागल्यापासून निदान माझ्या सार्वजनिक कामात तरी मला पदोपदी आला. ह्यावरून मी स्वभावतः मृदू आहे, असे सांगण्याचा माझा हेतू नाही. जी वस्तुस्थिती नाही ती आहे असे कसे सांगू? तसे मी म्हणेन तर पुढे ज्या आठवणी व अनुभव लिहिले आहेत, ती सर्व असत्यमिश्र आणि म्हणून कवडीमोल ठरतील. माझा जन्मस्वभाव मृदू नसून कठीण होता. दारुण नसला तरी, कठीण होता हे खरे. निदान वरील श्लोकातल्याप्रमाणे मृदू तर नव्हता हे खास. पण माझ्या आयुष्यात, विशेषतः माझ्या प्रौढपणात जी जी कामे केली, सत्याची, धर्माची आणि निर्मळ प्रेमाची म्हणून त्यांची धुरा माझ्या दुर्बल खांद्यावर घेतली, त्यात मला कठीण अनुभव आला. त्यामुळे आता मी पूर्णपणे नाही तरी अंशतः बराच मऊ झालो आहे आणि ह्यात माझ्या सेवेच फळ मला मिळाले असे समजून मी जगतचालकाचाच नव्हे, तर जगाचाही आभारी आहे.”


आयुष्याच्या अखेरच्या काळात अण्णासाहेब शिंदे आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात. त्यांच्या मनाला कोणती वेदना होत होती, हे त्यांनी प्रकट केले आहे. ते म्हणताता, “माझ्या कामात यश मिळाले नाही म्हणून मला कठीण अनुभव आला असे नव्हे. यशाची मला आकांक्षा नव्हती. यशाची मला नीट व्याख्याच करिता येत नाही, तर मी त्याची इच्छा तरी कशी करू? माझ्या कामात माझ्या साथीदारांचा, इतरांचा, फार काय ज्यांच्यासाठी मी घरदारही कमी समजून ती ती कामे करीत होतो, त्यांचाही माझ्यासंबंधी गैरसमज, दुराग्रह, नव्हे उघड विरोधही झाला. हाच माझ्या अनुभवाचा कठीणपणा किंवा दारुणपणा होय. ह्यामुळे माझ्या मनाची शांती ढासळली आणि अकाली बहुतेक स्वीकृत कामातून विराम पावलो. मात्र धर्माचा प्रचार ह्या माझ्या अस्सल कामातून मी विराम पावणे शक्यच नाही. कारण मी धर्माचा स्वीकार केला हे खरे नसून धर्मानेच माझा स्वीकार केला अशी माझी समजूत असल्याने ह्या शरीरातून विराम पावेपर्यंत तरी धर्माने मला पछाडले आहेच व पुढेही तो मला अंतरणार नाही, ही मला आशा आहे.”९ आपल्या मनातील ही वेदना प्रकट करीत असताना त्यांची धर्मावर कशी अढळ श्रद्धा होती हेही दिसून आल्यावाचून राहत नाही.


जीवनातील सर्वच अंगांकडे अण्णासाहेब शिंदे उत्क्रांतीच्या किंवा विकासक्रमाच्या भूमिकेतून पाहत असत. धर्मासारखी बाब किंवा एखाद्या व्यक्तीचे मन असो, त्यांचा विकास न्याहाळण्याची त्यांची दृष्टी असे. आयुष्याच्या या अखेरच्या टप्प्यातही ते स्वतःकडे अंतर्मुख होऊन ह्या विकासाच्या दृष्टीने पाहतात. ह्या प्रस्तावनेतच ते पुढे लिहितात, “माझ्या अनुभवातून मी वाचलो आहे व मला निर्वाण जरी नाही, तरी मनाला थोडी बहुत अलीकडे शांती मिळत आहे. कारण मी मृदू होऊ लागलो हेच होय. माझी कामे कठीणपणाने होण्यासारखी नव्हती, पण मी जर प्रथमपासून मृदूपणाने ही सर्व कामे केली असती, तर इतके कठीण अनुभव आले नसते. ते स्वभावदोषामुळे आले. त्या सर्वांतून मी पार पडलो, ह्याचे कारण मी माझ्या कामामुळे मृदुतेचे धडे मला कळत किंबहुना नकळतही शिकलो हे खास. जी मृदुता माझ्यामध्ये स्वभावतः नव्हती, केवळ कामामुळे आली, ती माझ्या आईमध्ये मूर्तिमंत होती आणि तिच्याद्वारे ती मजमध्ये मला नकळत का होईना आली होती. एरवी तिचे धडे मी कामामुळे तरी शिकण्यास कसा पात्र असतो.” आयुष्याच्या अखेरच्या काळात, त्यांनी केलेले आत्मचिंतन व आत्मनिरीक्षण त्यांच्या ठिकाणी असणा-या अपूर्व सत्यनिष्ठेला व विशुद्ध धर्मभावनेला धरून आहे, असे म्हणावे लागेल. त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचाच आविष्कार त्यांच्या ह्या प्रांजळ निवेदनातून होतो. त्यांच्या आयुष्यातील अखेरची दोन-तीन वर्षे तर जास्तच वेदनामय गेली. आयुष्यभर सतत कार्यप्रवण राहिलेल्या कार्यशक्ती शारीरिक विकलतेमुळे जराजर्जर देहामध्ये कुंठित होऊन राहिल्या होत्या. संधिवाताचा वेदनादायक विकार बळावला होता. कंपवाताने दोन्ही हात सदैव कापत असत. शारीरिकदृष्ट्या पूर्ण विकलता आलेली होती. दिवसातील बराचसा वेळ बाहेरच्या खोलीत असलेल्या पलंगावरील बिछान्यावर निजून काढीत. हळूहळू त्यांच्या शरीरातील ताकद कमी होऊ लागली.


अखेरीस २ जानेवारी १९४४ रोजी पहाटेस त्यांचे चैतन्यतत्त्व अति कष्टविलेल्या शरीराला सोडून अनंतात विलीन झाले.

 

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ३३४-३३५, श्री. वामनराव सोहोनींचे निवेदन.
२.    शिंदे यांची १९३५ ची छोटी रोजनिशी, १७ जानेवारी १९३५.
३.    तत्रैव, नोंद ता. ६ फेब्रुवारी १९३५.
४.    रा. ना. चव्हाण ‘गुरुवर्य अण्णासाहेब शिंदे’ कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे जन्मशताब्दी स्मृतिग्रंथ, (संपा.)एस्.एस्.भोसले, शिवाजीराव सावंत, कोल्हापूर, १९७४.
५.    शिंदे यांच्या कागदपत्रात काही शब्दांच्या व्युपत्ती लिहिलेली कार्डे आहेत. शिंदे यांची कागदपत्रे.
६.    शिंद यांची नात सौ. सुजाता पवार यांनी सांगितलेली माहिती.
७.    रा. ना. चव्हाण, उपरोक्त.
८.    भाई अ. के. भोसले यांची मुलाखत, सोलापुर, १५ एप्रिल १९९६.
९.    वि. रा. शिंदे, ‘प्रस्तावना’, माझ्या आठवणी व अनुभव, भाग १, वत्सला प्रकाशन, पुणे, १९४०, पृ. ८-९.