1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

प्रकरण अकरावे : राजकारण

ह्या पुस्तकाची मागील १० प्रकरणें १९३२ सालच्या आगष्ट महिन्यांतच तयार करुन छापखान्याकडे पाठविण्यांत आलीं होती. अलीकडे दोन चार वर्षांत अस्पृश्यांच्या राजकारणाला अगदी चुरशीचें स्वरुप आल्यामुळें विशेषत: महात्मा गांधीच्या १९३२ सालच्या सप्टेंबर महिन्यांतील उपोषणामुळें हें प्रकरण लिहिण्याचें लांबणीवर टाकून कांही काळ वाट पाहावी लागली. पुढे पुण्याचा करार झाला. चालू (१९३३) सालच्या मे महिन्यांत महात्माजींनी पुन: २१ दिवस उपोषण केलें. आता ह्यापुढें हें पुस्तक ताबडतोब प्रसिद्ध झालें पाहिजे. म्हणून हें प्रकरण लिहून संपविलें आहे.

अस्पृश्यांचे राजकारण किंवा त्याच्यासंबंधी स्पृश्यांचे राजकारण म्हणजे कांही नुसती आजकालची धामधूम आहे अशांतला मुळीच अर्थ नव्हे. हें राजकारण अस्पृश्यतेइतकेंच पुरातन आहे, असें म्हणण्यांत मुळींच अतिशयोक्ति होणार नाही. माझी तर स्वत:ची अशी खात्री होऊन चुकली आहे की, हिंदूंतील अस्पृश्यता म्हणजे त्यांच्या दूषित राजकारणाचा एक मासला होय. पहिल्या प्रकरणांत केलेल्या व्याख्येप्रमाणें अस्पृश्यतेचें संघटित स्वरुप म्हणजे प्राचीन वर्णाभिमानी हिंदूंच्या दूषित राजकारणाचा यशस्वी विकासच होय. ह्या विकासाची पोलादी चौकट मागे केव्हा एकदा जी घडविली गेली, ती आजवर जशीच्या तशीच जवळ जवळ शाबूत आहे. म्हणून घडविणाराच्या दृष्टीने हिला यशस्वी म्हटलें आहे. मूळ चार वर्णाच्या कालांतराने पुढे हजारो जाती पोटजाती झाल्या, कालमाहात्म्याने त्यांचे आपसांत स्थलांतर व रुपांतरही झालें. पण ह्या चौकटीबाहेरील अस्पृश्यांवर प्रत्यक्ष काळाच्या हातूनही कांही अनुकूल परिणाम घडवितां आले नाहीत. उलट वहिवाटीच्या दाबाखाली जणूं काय ते कायमचेच दडपले गेले आहेत असें दिसतें. 'सवय म्हणजे प्रति सृष्टिच' ही म्हण सार्थ झाली आहे.

ह्या प्राचीन राजकारणाचा खडान् खडा इतिहास उपलब्ध नाही, हें खरें आहे. त्या काळचा प्रत्यक्ष जेत्यांचाच इतिहास उपलब्ध नाही, तेथे जितांचा कोठून असेल? ज्याचें सर्वस्व गेलें, त्या जितांचा इतिहास तरी कसा उरणार? असा कोण जेता आहे की जो आपल्या कृतकर्मांची कथा जशीच्या तशीच लिहून ठेवील? आणि स्वत:चा इतिहास लिहिण्याची अक्कल आणि करामत असती तर हे बिचारे आजचे अस्पृश्य जिततरी कां झाले असते? ह्या प्रकरणीं इतिहास मागणें म्हणजे बाप दाखीव नाही तर श्राद्ध कर म्हणण्याप्रमाणेंच आहे. बिचारे बाप कोठून दाखवतील? मुकाट्याने श्राद्ध करीत आहेत. झाले ! तथापि अगदी तपशीलवार इतिहास नाही तरी त्याचें दिग्दर्शन कांही अशी मागील प्रकरणांतून आलेलेंच आहे. त्यावरुनही ज्यांना अंदाज करण्याची इच्छा होत नाही, त्यांच्यापुढे समग्र इतिहास आणून ठेविला, म्हणून तरी काय लाभणार आहे?

ह्या इतिहासाची पुनरावृत्ति जगांत वेळोवेळी पुष्कळदा झाली आहे. गेल्या पांच शतकांत अमेरिका खंडांत ती झाली आहे व हल्ली आफ्रिकेंत, आस्ट्रेलियांत वगैरे चालली आहे. यूरोपांतून सुधारलेलीं म्हणविणारी अनेक राष्ट्रें वेळोवेळीं आली. त्यांनी एतद्देशीयांचा नाश केला, त्यांच्यापैकी कित्येकांना घालवून दिलें व कित्येकांना आपल्या दास्यात ठेविलें. अमेरिकेंतील अत्याचारांचा इतिहास उपलब्ध आहे व तो प्रसिद्धही होत आहे. येथला होण्याची आशा नाही. हाच काय तो फरक. अमेरिका हें नांवही जेत्यांनी आपलें दिलें तसेंच भारत हें नांवही जेत्यांचेंच आहे. अमेरिकेंतील मूळ एतद्देशीयांचा नायनाट झाला आणि ते अगदी थोडे उरले ते उप-या जेत्यांच्या खिजमतीला खुशी अगर लायख नव्हतें, म्हणून नवीन वसाहत करणारांना आपल्या काबाडकष्टासाठी इतर खंडांतून दासांना धरुन जबरीने आणावें लागलें. हिंदुस्थानांत वसाहत करणारांची गरज येथल्या येथेच भागली. पण जोरजबरीचा मामला दोहोकडे सारखाच आहे. अमेरिकेंतील प्रकार निष्ठुर होता आणि येथला फार कनवाळूपणाचा होता असें भासविण्याचा वेळोवेळी आमच्यांतले कांही इतिहासकार प्रयत्न करितात, तो एक नुसता कोडगेपणाचा मासला आहे ह्यापेक्षा अधिक कांही म्हणवत नाही. गेल्या दहा प्रकरणांत, मलबारांत नंबुद्री आणि नायर जातींच्या जमीनदारांनी आज हजारो वर्षें तेथील चेरुमा, पुलया वगैरे अस्पृश्य जातींना किती घोर अवस्थेंत आपल्या मालकीच्या अगर खंडाच्या शेतांवर गुरांप्रमाणे राबविले आहे, ह्याचा उल्लेख आलाच आहे. त्यावरुन, ज्या ज्या काळीं अशा क्रांत्या घडून आल्या त्या काळच्या राजकारणाचें उग्र स्वरुप दिसून येणार आहे.

जगांतील राजकारणाचें मुख्य लक्षण म्हणजे बलिष्ठाने दुबळ्यावर सत्ता चालविणें हें आजकालच्या सुधारलेल्या काळांतही खरेंच आहे. ही सत्ता एकदा आपल्या हाती आल्यावर नामोहरम झालेल्या जातींनी अथवा राष्ट्रांनी पुन: आपलें डोकें वर काढू नये म्हणून त्यांचा राजकीयच नव्हे तर सामाजिक दरजाही खाली दडपून बेपत्ता करण्यासाठी सामुदायिक अस्पृश्यता हें प्राचीन राजकारणांतील एक घोर साधन आहे व हें साधन हिंदुस्थान व सरहद्दीवरील देशांत मध्ययुगांतही उपयोगांत आणिलें गेलें ह्याचा पुरावा ब्रह्मदेशाचा जो मिळतो त्याचें वर्णन सहाव्या प्रकरणांत केलेंच आहे. इतकेंच नव्हे तर बौद्ध धर्मांतून हिंदू धर्मोत, बंगाल व मद्रासकडे परत क्रांति झाली तेव्हा, ज्या पाखंडी समजलेल्या जमाती हिंदु शासनाखाली सहजासहजीं आल्या नाहीत, त्यांना हिंदु धर्मांधिका-यांच्या कारवाईला बळी पडावें लागलें. तत्कालीन हिंदु राजांनी अशा स्पृश्य जमातींना एकजात अस्पृश्य आणि बहिष्कृत कसें ठरविलें तें पांचव्या प्रकरणांत सांगण्यांत आलें आहे. ह्यावरुन प्राचीन राजकारणाचा हा तोडगा, ह्या देशांत अगदी मध्ययुगाच्या अंतापर्यंत बिनदिक्कत चालविण्यांत आला आहे हें दिसून येत आहे. आता आपण ह्या वर्णद्वेषाच्या पायावर उभारलेल्या राजकारणाच्या टप्प्यांचे कालानुक्रमें पुरावे म्हणून वाड्यांतून कांही उतारे मिळाल्यास पाहूं.

वैदिक कालांतील कटकट
ऋग्वेदकालीन आर्यांची शासनपद्धति कशी होती ह्यासंबंधी, कलकल्ता विद्यापीठांतील एक अध्यापक प्रफुल्लचंद्र वसु ह्यांनी Indo Aryan Polity ह्या नांवाचा इ.स. १९९१ साली इंग्रजींत एक प्रबंध प्रसिद्ध केला आहे. त्यांतील सहावें प्रकरण, Polity ( राज्यव्यवस्था) मननीय आहे. अर्थात् ही आर्यांच्या किंवा आर्य म्हणविणा-या जमातींशीं मिळतें घेऊन राहणा-या आर्येंतर जमातीपुरतीच होती, हें सांगवयास नको. ह्या काळी आर्यांची समजली जाणारी तीन वर्णांची किंबहुना चार वर्णांची व्यवस्था बनत चालली होती. पण ह्या चातुर्वर्ण्याबाहेर ज्या आर्येतर जमाती हिंदुस्थानांत पूर्वीच ठाणें मांडून राहिलेल्या होत्या, ज्यांच्याशी आर्यांच्या लढाया होत, त्या जमाती सर्व आर्यांहून कमी संस्कृतींच्या होत्या असें मुळीच नव्हे. उलट कांही जमाती तर आर्यांहून पुष्कळ सुसंपन्न व सुसंघटित स्थितींत होत्या. कांही असो; ह्या दोन्ही दर्जांचे आर्येंतर अस्पृश्य किंवा बहिष्कृत स्थितींत मुळीच नव्हते. ते येथील मूळचे रहिवाशी किंवा आर्यांच्या पूर्वी बाहेरुन आलेले व येथे कायम वसाहत करुन राहिलेले, पण भिन्न संस्कृतीचे होते. मात्र त्यांच्याशीं आर्यांचे संधिविग्रह होऊन (१) जे आर्यांशीं समानबल किंवा अधिक सुसंपन्न होते ते आर्यांच्या तीन्ही वरिष्ठ वर्णांत गुणकर्मश: समाविष्ट झाले; (२) जे किंचित् कमी संस्कृतीचे होते ते आर्यांतील चवथा शुद्रवर्ण झणून त्यांच्यांत मिसळले; ह्याशिवाय जो मोठा कमी अधिक संस्कृत वर्ग आर्यांनी अगदी पाडाव केला (३) तोच कालवशाने पुढे अस्पृश्यत्वाप्रत पोचला; आणि (४) जो कधी विशेष संस्कृत नव्हता, आणि ज्यांचा आर्यांशी संबंधच आला नाही, किंवा ते आर्यांच्या कटकटीला कंटाळून डोंगर, झाडी, किनारा, बेटें वगैरेंचा आश्रम करुन दूर राहिले, ते अद्यापि त्याच स्थितींत आहेत. पण ह्या चारी प्रकारच्या आर्येतरांना वेदमंत्रांतून दस्यु अथवा दास, हें एकच सामुदायिक नांव आहे. ह्याशिवाय कित्येक विशेषणवाचक नावें ऋग्वेदांतून आढळतात, त्यांच्याशी आर्यांचा किती द्वेष होता व त्यांच्या एकमेकांशी कशा लढाया होत हें वर पाहिल्या खंडांतील दुस-या प्रकरणाचे शेवटी ज्या ऋचा अवतीर्ण केल्या आहेत. त्यांवरुन कळण्यासारखें आहे.

ह्या परजातीच्या द्वेषाचें मुख्य एक कारण, त्यांच्या धार्मिक भावना, उपासना व आचार भिन्न असत हें होय. ह्यामुळे परकीयांना अब्रह्मा, अव्रत, अयज्यु, अश्रद्ध, अक्रतु, अकर्म, अमानुष, अदेव्य, अशा अनेक शिव्या दिलेल्या वेदमंत्रांतून आढळतात. ह्याच शिव्यांचा व द्वेषभावनांचा विकास, पुढे ज्या काळी ह्या परकीयांचा पूर्ण पाडाव होऊन ते आर्यांच्या राजकीय व आर्थिक गुलामगिरींत दडपून गेले त्या काळीं आताच्या अस्पृश्यतेंत व बहिष्कारांत झाला हें उघड आहेत.

अच्छा कविं नृमणोगा अभिष्टौ स्वर्षांता मधवन् नाधमानम् ।
ऊतिभिस्तमिषणो द्युन्नहूतौ नि मायावानअब्रह्मा दस्युरर्त ।।
ऋग्वेदसंहिता मं. ४ स्. १६. क्र ९.

ह्यांत मायावान् व अब्रह्मा म्हणजे 'जादूगार' व 'ब्रह्म म्हणजे स्तुति किंवा प्रार्थना न करणारा' अशी निंदा आहे.
न्युकतूनू ग्रथिनो मूधवाच: पनीरश्रद्धाँ अवृधाँ अयज्ञाने ।
प्र प्र तानू दस्यूँरग्निर्विवाय पूर्वश्चकारापराँ अयज्यून् ।।

ह्यांत पणी नांवाचें दस्यूंचे एक निराळेंच राष्ट्र निर्दिष्ट झालें आहे.  मद्रासेकडील हल्लीचे पळ्ळ नांवाचे अस्पृश्य किंवा प्राचीन फिनिशयन त्यांच्याशीं ह्याचा संबंध येतो की काय हा संशोधनीय विषय आहे. अग्रीने त्यांचा अत्यंत नाश केला असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे.
प्रान्यच्चक्रमवृह: सूर्यस्य कुत्सायान्यद्वरिवो यातवेSक:।
अनासो दस्यूँरमृणो वधेन नि दुर्योण अवृणड् मृधवाच: ।।

ऋग्वेदसंहिता
ह्यांत दस्यूंना अनास असें म्हटलें आहे. अनास=तोंड, भाषा नसलेले= म्लेच्छ, असें सायणाचार्य म्हणतात, अनास = नाक नसलेले = नकटे असें मॅक्स मूलर म्हणतात.
हे दस्यू किती जरी अधार्मिक, कुरूप व दुर्गुणी असले तरी त्यांच्याशी लढण्याची हींच तेवढी कारणें नसून, ते संपत्तिमान्, सुसंस्कृतिवान आणि सुंसघटित होते आणि त्यांच्या संपत्तीचा आर्यांना हेवा वाटत होता, हें दुसरें अधिक बलवत्तर कारण होतें. दस्यू हे किल्ले बांधून शहरांत राहत असत. आर्यांपेक्षाही ते अधिक स्थाईक झालेले होते.

इंद्राग्नी नवर्ति पुरो दासपत्नीरधूनुतम् । साकमेकेन कर्मंणा ।।
ऋग्वेदसंहिता, ३, १२, ६

इंद्र व अग्नि ह्या दोघांनी दासांच्या आधिपत्याखालील नव्याण्णव पुरें म्हणजे किल्ले एकदम पाडून टाकले. असा ह्या मंत्राचा अर्थ आहे.
प्र ते वोचाम वीर्या या मन्दसान आरुज: । पुरो दासीरभीत्य ।।
ऋग्वेदसंहिता, ४,३२,१०

मन्दसानः= सोम पिऊन माजलेला ( इंद्र )
आरुजः = ( किल्ल्याचा ) फडशा उडविला.

आभिः स्पृधो मिथतीररिषण्यन् अभित्रस्य व्यथया मन्युमिन्द्र ।
आभिर्विश्वा अभियुजो विषूचीरार्याय विशोSवतारीर्दासीः ।।
ऋग्वेदसंहिता, ६, २५, २

ह्या मंत्रांत, आर्यांभोवती दासांचा वेढा पडला आहे, किंवा आर्यांच्या वस्तीभोवताली दस्यूंच्या वसाहती आहेत: इंद्राने त्यांचा नाश करुन आर्यांच्या सेनेचें रक्षण करावें, असा अर्थ आहे.

प्र ये गावो ग भूर्णयस्त्वेषा अयासो अक्रमु: ।
व्रन्त: कृष्णामपत्वचम् ।।
ऋग्वेदसंहिता, ९,४१,१

कृष्ण नांवाचा एक काळ्या रंगाचा असूर होता, तो दहा हजार सेनेसह अंशुमती नदीचे काठापर्यंत चाल करुन आला, त्याचा पराभव झाला, त्यांच्या अंगाची कातडी सोलून काढिली, वगैरे कथा आहे. म १ सू. १३० क्र ८ पहा. अमेरिकेंतील हल्लीचा लिंचिंगचा असाच प्रकार आहे.

उत दासं कौलितरं बृहत: पर्वतादधि । अवाहन्निन्द्र शम्बरम् ।।
ऋग्वेदसंहिता ४.३०.१४

कुलितराचा मुलग शंबर ह्याला इंद्राने मोठ्या पर्वताच्या खाली ओढून मारिलें.

त्वं तदुक्थमिन्द्र बर्हणा क: प्र यच्छता सहस्त्रा शूर दर्षि ।
अव गिरेर्दोस शम्बरं हनू प्रावो दिवोदासं चित्राभिरुती ।।

हा शंबरासुर व दिवोदोस (आर्य ) ह्यांच्यामध्यें बरीच कटकट झालेली दिसते. ह्या कटकटीला कंटाळून शंबर डोंगरी किल्ल्याचा आश्रय घेऊन राहिला. हा शंबर, वरील कृष्ण व इतर अेक आर्येंतर नायक सुसंपन्न व सुसंघटित नेते होते. त्यांच्या संस्कृतीचा एक विशेष असा होता की ते अभिचार उर्फ चादूक्रिया वगैरे गुढविद्येंत प्रवीण होते. सुमारें २३०० वर्षांपूर्वी लिहिला गेलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र नामक ग्रंथाच्या प्रलभने भैषज्यमन्त्रयोग: । ह्या १७८ व्या प्रकरणांत ह्या आर्येंतर राजांचा खालील पुन: उल्लेख आढळत -

बलिं वैरोचनं वन्दे शतमायं च शम्बरम् ।
भण्डीरपाकं नरकं निकुम्भं कुम्भमेव च ।।

देवलं नारदं वन्दे वन्दे सावर्णिगालवम् ।
एतेषामनुयोगेन कृतं ते स्वापनं महत् ।।

यशा स्वपन्त्यजगरा: स्वपन्त्यपि चमूखला:।।
तथा स्वपन्तु पुरुषा ये च ग्रामें कुतूहला:।।

कौटिलीय अर्थशास्त्र ( श्यामशास्त्री यांची आवृत्ति ), पान ४१९ वरील मंत्राचा प्रयोग केला असतां रक्षक व इतर माणसांना झोप लागते अशी समजूत होती. हा प्रयोग करण्यापूर्वी एक श्वपाकी ( मांगीण) कडून हातापायांची नखें विकत घेऊन ती कृष्ण चतुर्दशीला स्मशानांत पुरावींत. ती पुढच्या चतुर्दशीला उकरून कुठून त्यांच्या गोळ्या तयार कराव्यात. त्यामुळें सर्व निद्रिस्त होतात असें ह्याच प्रकरणांत सांगितले आहे. आंध्र देशांत जादूटोणा करणारी एक विशिष्ट अस्पृश्य जात आहे. त्या जातींच्या बायकांची मदत वरिष्ठ वर्गही अशा कार्मी घेतात असें मी त्या प्रांतात फिरत असतांना ऐकिलें आहे. ह्याच प्रकरणांत पुन: खालील श्लोक आढळतात.

बर्लि वैराचनं वन्दे शतमायं च शम्बरम्
निकुम्भं नरकं कुम्भं तन्तुकच्छं महासुरम् ।।

अर्मालवं प्रमीलं च मंडोलूकं घटोद्वलम् ।
कृष्णाकंसोपचारं च पोलोमीं च यशस्विनीम् ।।
अभिमन्त्रय्य गृहामि सिद्धार्थ शवसारिकामे ।।
कौटिलीय अर्थशास्त्र ( श्यामशास्त्री यांची आवृत्ति ) पान ४२१

चण्डालीकुम्वीतुम्भकटुकसाराघ: सनीरीभगोसि स्वाहा ।
सदर, पान ४२३

हा मंत्र म्हटला असतां कसलेंही बळकट दार उघडतें आणि सर्वांना झोप लागते ! वरील मंत्रांतील पौलोमी ही चंडाली मोठी यशस्विनी होती ! अशा प्रकारें अस्पृश्यांतील प्रवीण स्त्रीपुरुषांचा गतयुगांतील राजकारणांतही उपयोग होत असें हें ह्या पुस्तकांतील उल्लेखांवरुन दिसतें.

प्रत्यक्ष वेदकाळांत अस्पृश्यता नव्हती. पण त्या काळी ज्या आर्येतर कमकुवत जमातींना आर्यांनी पाडाव केलें त्या पुढे अस्पृश्य व बहिष्कृत झाल्या. बुद्धोदयकालीं त्या पूर्णपणें ह्या हीन स्थितीला पोचल्या होत्या हें वर पाहिल्या खंडांतील दुस-या तिस-या प्रकरणांत सांगण्यांत आलें आहे. बौद्ध-जैन-काली अस्पृश्यता थोडी शिथिल झाली. पण अजीबात नष्ट झाली असें मुळीच नव्हे. गौतम बुद्धाने आपल्या भिक्षुसंघात अगदी हीन अस्पृश्यांनाही घेतलें व ते अती अर्हत् पदाला पोचले, असे पाली ग्रंथांत उल्लेख आहेत. ते असे :-

सोपाक (श्वपाक ) नांवाच्या भिक्षूच्या थेरगाथेंत सात पाली गाथा आहेत. त्यांचे मराठी भाषांतर :-
(१) प्रासादाच्या छायेंत चंक्रमण करीत असतांना नरोत्तमाला पाहून मी तिकडे गेलों, आणि त्याला वंदन केलें. (२) चीवर एका खांद्यावर करुन व हात जोडून त्या विशुद्ध सर्वसत्त्वोत्तमाच्या मागोमाग मीही चंक्रमण करु लागलों. (३) तेव्हा त्या कुशल प्रश्न विचारणा-याने मला प्रश्न विचारले आणि न भितां मी त्या गुरुला उत्तरें दिली. (४) प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल तथागताने माझें अभिनंदन केलें, व भिक्षुसंघाकडे वळून तो म्हणाला:- (५) 'ज्या अंगांचे व मगद्यांचे चीवर, पिंडपात, भैषज्य आणि शयनासन हा स्वीकारतो, तो त्यांचा मोठा फायदा समजला पाहिजे जे ह्याचा मानमरातब राखतील, त्यांनाही फायदा होतो. (६) सोपाक तूं आजपासून माझ्या भेटीला येत जा; व हीच तुझी उपसंपदा झाली असें समज.' (७) सात वर्षांचा असताना मला उपसंपदा मिळाली. आणि आता मी हें अंतिम शरीर धारण करीत आहें. धन्य धर्माचें सामर्थ्य !

सुनीत हा भंग्याच्या कुळांत जन्मला. थेरगाथेच्या बाराव्या निपातांत ह्याच्या गाथा आहेत. त्यांत ह्याचें चरित्र आलें आहे. त्याचें मराठी रुपांतर येणेंप्रमाणें :-
(१) मी नीच कुळांत जन्मलो. मी दरिद्री होतों. आणि खाण्यापिण्याचे माझे हाल होत असत. माझा धंदा हलकट होता. मी भंगी (पुप्फ छड्डुक ) होतों. (२) लोक माझा कंटाळा करीत. निदा करीत. तरी मी नम्र मनाने किती तरी लोकांना नमस्कार करीत असें. (३) अशा स्थितींत भिक्षुसंघासहवर्तमान मगघांच्या श्रेष्ठ नगरांत प्रवेश करणा-या महावीर संबुद्धाला मी पाहिलें (४) मी कावड (सोनखताची, मूळ पालींत हिला व्याभंगि असा शब्द आहे ) खाली टाकिली आणि नमस्कार करण्यास पुढे सरसावलो. केवळ माझ्या अनुकंपेने तो पुरुषश्रेष्ठ उभा राहिला. (५) त्या गुरुच्या पायां पडून एका बाजूला उभा राहून  त्या सर्वसत्त्वोत्तमाजवळ मी प्रव्रज्या मागितली. (६) तेव्हा सर्व लोकांवर करुणा करणारा तो कारुणिक गुरु " भिक्षु इकडे ते" असें मला म्हणाला, तीच माझी उपसंपदा झाली. (७) तो मी एकाकी सावधानपणें अरण्यांत राहिलों, व जसा त्या जिनाने उपदेश केला, त्याप्रमाणें त्या गुरुच्या वचनाला अनुसरून वागलों. (८) रात्रीच्या पहिल्या यामांत पूर्वजन्मींची आठवण करण्यास मी समर्थ झालों. रात्रीच्या मध्य यामांत मला दिव्य दृष्टि प्राप्त झाली व रात्रीच्या पश्चिम यामांत मी तमोराशीचा (अविद्येचा) नाश केला. (९) तदनंतर रात्र संपत आली असतां व सूर्योदय जवळ आला असला इंद्र आणि ब्रह्मा येऊन मला नमस्कार करुन हात जोडून उभे राहिले. (१०) ते म्हणाले "हे दान्त पुरुषा, तुला नमस्कार असो. ज्या तुझे आसव क्षीण झाले आहेत, तो तूं, हे भित्रा ! दक्षिणार्ह आहेस." (११) नंतर देवसंघाने माझा आदरसत्कार केलेला गुरुने पाहिला, आणि स्मित करुन तो असें बोलला. (१२) "तपाने, ब्रह्मचर्याने, संयमाने आणि दमाने ब्राह्मण होतो, हेंच ब्राह्मण्य उत्तम आहे."

- प्रो. धर्मानंद कोसंबीकृत "बौद्ध संघाचा परिचय" पान २५४-५६. ही उदार वृत्ति बौद्ध भिक्षूंची झाली. केवळ ध्येयदृष्टीने पाहूं गेल्यास हिंदू धर्मांतील कांही परमहंस संन्याशांचीही वागणूक अशीच उदात्त झाली असेल. पण ह्यावरुन अशा काळी सामान्य लोकव्यवहारांतून अस्पृश्यतेचे उच्चाटन झालें होते, किंवा अशा उदार वृत्तीचा फायदा घेऊन अस्पृश्यांनी आत्मोद्धाराचें मोठें बंड उभे केलें, किंवा त्याच्या वतीने स्पृश्यांची मोठी राजकारणी अथवा सामाजिक पुनरुद्धाराची एखादी राष्ट्रीय चळवळ चालविली असे ऐतिहासिक दाखले मुळीच उपलब्ध नाहीत. इ.स. च्या १९ व्या शतकाच्या मध्यसमयी महात्मा जोतीबा फुले ह्यांनी महारामांगांसाठी शाळा काढल्या, त्यांना आपली स्वत:ची विहीर मोकळी केली, किंबहुना आगरकरांनी, त्या शतकाचे शेवटीं सामाजिक समसमानतेची आपल्या "सुधारक" पत्रात मोठी झोड उठविली म्हणून सामान्य लोकव्यवहारांत तेव्हा तादृश खऱीच क्रांति घडली असें झालें नाही; तोच प्रकार बौद्ध जैनांच्या ह्या अपवादक औदार्याचा झाला. इतकेंच नव्हे, तर पुढे जेव्हा प्रत्येक बौद्ध भिक्षुसंघांतच, ज्यांच्या हाडींमासीं वर्णाश्रम भेदभावाची संस्कृति बेमालूम खिळली होती, अशा ब्राह्मणवर्गाचा बेसुमार शिरकाव झाला तेव्हा 'महायान' नांवाचें रुपांतर घडून बौद्ध धर्मांचें हें वैशिष्टय लोपून गेलें. ह्यापुढचाही खेदकारक परिणाम असा घडला की राजकारणांत क्रांति घडून पुन: हिंदु मताभिमानी राजे व बादशहा प्रमुखपदारुढ झाल्यावर त्यांचे मंत्रिपद व गुरुपद ज्या वर्णाश्रम अतिवाद्यांकडे (extremists ) सहजच गेलें त्यांच्याकडून अस्पृश्यांच्या बाबतींत मोठी जोरीच प्रतिक्रिया सुरु झाली हें मनुस्मृतीसारख्या ग्रंथांतून ह्यांच्यासंबंधी जे निर्घुण दंडक ठरविले गेले त्यावरुन उघड दिसत आहे. ह्या दंडकांचा ऐतिहासिक पोकळपणा व कृत्रिमपणा कसा होता हें वर चवथ्या प्रकरणांत स्पष्ट झालेंच आहे. आता एवढें खरें आहे की जरी बौद्ध काळांतील सामान्य जनतेंत अस्पृश्यांच्या बाबतींत राजकीय अथवा सामाजिक क्रांति घडली असें दर्शविणारीं ऐतिहासिक उदाहरणें उलब्ध नाहीत, तरी तत्कालीन सुशिक्षित व बहुश्रुत लोकमतांत केव्हा केव्हा बरेच उदार व प्रागतिक विचार प्रचलित झाले असावेत हें पाली वाड्मयांतूनच नव्हे तर संस्कृत वाड्मयांतीलही खालील उता-यांवरुन दिसून येण्यासारखें आहे.

बौद्धांचे औदार्य अगदीच नष्टप्राय झालें असें नसून तें भगवद्गीतेसारख्या हिंदूंच्या धर्मग्रथांतूनच नव्हे तर शुक्रनीतीसारख्या राजकारणावर लिहिलेल्या ग्रंथांतूनही केवळ विचारसृष्टींत व उपदेशसृष्टीत अद्यापि चमकत आहे. चातुर्वर्ण्य हें गुणकर्मानुसार आहे. असें गीता म्हणते तशीच शुक्रनीतींत खालील शिकवण स्पष्ट आहे. ही गीता, ही निति वगैरे हल्लीच्या स्वरुपांत आढळणारी जी मनुस्मृति तिच्या काळातल्या म्हणजे बौद्ध धर्मांला उतरली कळा लागल्यावर. म्हणजे गुप्त साम्राज्यानंतरच्या इ.स. च्या ४ थ्या ५ पांचव्या शतकांतल्या किंवा पुढच्या आहेत. शुक्रनीतिसार ह्या ग्रंथांत पहिल्या व चौथ्या अध्यायांत व इतर ठिकाणींही पुढच्यासारखी विधाने स्पष्ट आढळतात.

न जात्या ब्राह्मणश्चात्र क्षत्रियो वैश्य एव न ।
न शूद्रो नच वै म्लेच्छो, भेदिता गुणकर्मभि: ।।३८।।

ब्रह्मणस्तु समुत्पन्ना: सर्वे ते किं नु ब्राह्मणा:?।
न वर्णतो न जनकादू ब्राह्मतेज: प्रपद्यते ।। ३९ ।।
शुक्रनीतिसार, अ. १

अर्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा म्लेंछ हे वर्ण जातीने झालेले किंवा होणारे नसून केवळ गुण व कर्म ह्यांच्या भेदानेच होणारे आहेत. केवळ ब्रह्मापासून झाले म्हणून काय ते सर्व ब्राह्मण झाले ? ब्राह्म तेज कांही केवळ वर्णापासून किंवा बापापासून ठर नाही.

त्यक्तस्वधर्माचरण निर्घुणा: परपीडका:।।
चंडाश्च हिंसका नित्यं म्लेच्छास्ते ह्यविवेकिन: ।। ४४
सदर , अ. १

अर्थ - ज्यांनी आपलें कर्तव्य सोडलें, जे निर्दय, परपीडक, उग्र, नेहमी हिंसा करणारे, अविवेकी तेच म्लेच्छ होत. चवथ्या अध्यायाच्या तिस-या प्रकरणाच्या आरंभी, जे सनातन देशधर्म, जातिधर्म आणि कुलधर्म आहेत त्यांची धारणा राजाने करावी; कारण तोच एक देव आहे दुसरा देव नाही, असें म्हटलें आहे; व पुढे प्रस्तुत जातिभेदाची मीमांसा अशी केली आहे.

चतुर्धा भेदिता जातिर्ब्रह्मणा कर्मभि: पुरा ।
तत्तत् सांकर्यसांकर्यात् व्रतिलोमानुलोमत: ।।
जात्यानन्त्यं तु संप्राप्तं तद् वत्कुं नैव शक्यते ।।१२

यन्ते जातिभेंद ये मनुष्याणां तु जन्मना ।
त एव हि विजानन्ति पार्थक्यं नामकर्मभि:।।१३

कर्मणोत्तरमनीश्वत्वं कालतस्तु भवेग्दुणै: ।
विद्या कलाश्रयेणैव तन्नाम्ना जातिरुच्यते ।।१५

अर्थ : पूर्वी देवाने चारच जाती निर्माण केल्या. प्रतिलोम अनुलोम संकारमुळें ह्या मूळ जाती आता अनंत झाल्या आहेत. त्यांची आता व्याख्या करणें केवळ अशक्य आहे. जन्माने जे जाती मानतात त्यांनाच पृथक्पणें ह्या जातींचीं नांवे व कामें माहीत असावीत! ( हा औपरोधिक टोमणा दिसतो !) पण खरें पाहतां कर्मापासूनच उत्तमपणा नीचपणा अंगी येतो व कालांतराने ह्या कर्मज संस्कारांचे स्वभावगुणांत रुपांतर होतें. म्हणून विद्या आणि कलांच्या आश्रयामुळेच त्या त्या जातीची घटना तयार होते.

येणेंप्रमाणें शुक्राचार्यांच्या नांवावर विकणारा ह्या मध्ययुगीन ग्रंथाचा कर्ता बराच प्रागतिक मताचा दिसतो व तो स्वत: वर्णाश्रमधर्माभिमानी असूनही बौद्ध विचारांच्या वळणाचा दिसतो. ह्याचीं विधानें नुसती तात्त्विकच नसून राजकारणांतही तो स्पष्टपणें प्रागतिक, शुद्ध बुद्धिवादी आणि निर्विकार आहे. सैन्याची भरती करतांना व सेना पतीची निवडणूक करतांना कोणत्या तत्त्वावर ती करावी हे सांगतांना याने दुस-या अध्यायांत असें स्पष्ट म्हटलें आहे. 

नीतिशास्त्रास्त्रव्यूहादिनतिविद्याविशारदा: ।
अबाला मध्यवयस: शूरा दान्ता दृढाड्गका: ।।१३७

स्वधर्मनिरता नित्यं स्वामिभक्ता रिपुद्विष: ।
शूद्रा वा क्षत्रिपा वैश्या म्लेच्छा: संकरसंभवा: ।। १३७

सेनाधिपा: सैनिकाश्र्च कार्य्या राज्ञा जयार्थिना ।। १३९

अर्थ : नीति, शास्त्रें, अस्त्रें, व्यूह ( सैन्याची मांडणी ) जाणणारे, लहान नव्हेत व म्हातारे नव्हत असे मध्यवयाचे, शूर, आत्मसंयमी, बळकट शरीराचे, केवळ आपल्याच कर्तव्यांत निरंतर लक्ष्य घालणारे, स्वामिभक्त व शत्रूला कधीही फितूर न होणारे, अशांनाच जय चिंतणा-या राजाने सैनिक व सेनापति म्हणून निवडावें. मग ते जन्माने शूद्र असोत क्षत्रिय, वैश्य, किंबहुना मिभ्र जातीचे म्लेच्छही असोत ! केवळ लष्करी खात्याचेंच नव्हे तर मुलकी राज्यव्यवस्थेचे धोरण ठरवितांनाही ह्या शुक्राचार्यांनी स्पष्ट म्हटलें आहे :

व्यवहारविद: प्राज्ञा वृत्तशीलगुणान्विता: ।
रिपौ मित्रे समा ये च धर्मज्ञा: सत्यवादिन: ।। १६६

निरालसा जितक्रोधकामलोभा: प्रियंवदा: ।
सभ्या: सभासद: कार्या वृद्धा: सर्वासु जातिषु ।।१६७
शुक्रनीतिसार, अ. २ (पृ. १३६)

लष्करांतील निवडणुकीहून भिन्न तत्त्वांवर दिवाणी आणि मुलकी कार्यसभेंतील सभासदांची निवड सांगितली आहे. पण तींत सर्व जातीतून वरील सद्भणी माणसें निवडावीत असें स्पष्ट म्हटलं आहे. हे सर्व खरें असलें तरी ह्या उदार धोरणाची अम्मलबजावणी प्रत्यक्ष अस्पृश्य मानलेल्या ग्रामबहिष्कृतांच्या वाट्याला कितपत आली होती ह्यांची उदाहरणें दाखविणारें तपशीलवार ऐतिहासिक वाड्मय ह्या मध्ययुगीन काळांतील तूर्त तरी उपलब्ध नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. इतकेंच नव्हे तर ह्या उदारमतवादी ग्रंथांतही मधून मधून मनुस्मृतिकारांना शोभणारे खालच्या प्रमाणें पक्षपाती विचार कालमाहात्म्याने चमकतात हा मोठा चमत्कार आहे ! आणि तेंही ह्या दुस-याच अध्यायांत !! नौकरी आणि पगार देतांना शूद्र आणि ब्राह्मण ह्यांमध्ये तारतम्य कसें राखावें हें निर्भीडपणें ठऱविलें आहे !

अन्नाच्छादनमात्रा हि भूति: शूद्रादिषु स्मृता ।
तत्पापभागन्यथा स्यातू पोषको मांसभोजिषु ।। ४०१

यद् ब्राह्मणेनापह्तं धनं तत् परलोकदम् ।
शुद्राय दत्तमपि यच्चरकायैव केवलम् ।। ४०२
अध्याय २ ( पान १९५)

अर्थ : शूद्र नोकरीस ठेवावयाचा झाल्यास नुसतें पोटाला अन्न आणि पाठीला वस्त्र इतकेंच द्यावें. मांस खाणा-यांना ह्यांहून जास्त वेतन दिल्यास धन्याला पाप लागतें ! ब्राह्मणाने एखाद्याच्या घरचें धन चोरलें तरी ज्याचें धन गेलें त्याला स्वर्गप्राप्ति घडते. पण शूद्राला हात उचलून कांही दिलें तर उलट देणारा केवळ नरकालाच जातो !

"शूद्राला सामर्थ्य असलें तरी त्याने धनसंचय करु नये; असा श्रीमंत झालेला शूद्र ब्राह्णाला बाधा करितो." ह्या मनुस्मृतीच्या शिकवणीची ( मागे पृ. ६० पहा) ही अस्सल नक्कल दिसते. राणीच्या जाहीरनाम्यांत अघळपघळ समसमानता जाहीर करुन प्रत्यक्ष किफायतीच्या कामावर नेमतांना विलायतेहून आलेल्या अस्सल गो-या बाळांची ज्या धोरणामुळे वरणी लागते तें पाश्चात्यांनी ह्या शुक्रनीतींतूनच जणूं उचललें आहे की काय, अशी क्षणमात्र शंका येते !

सुमारे ख्रिस्ती शकाच्या ५०० वर्षांनंतर हिंदुस्थानांत बौद्ध धर्मास कायमची उतरती कळा लागून वर्णाश्रमाच्या पायांवर ब्राह्मणी उर्फ शब्द संस्कृतीच्या सनातनी म्हणविणा-या दुहीप्रिय सोवळ्या हिंदुधर्माची घडी कायम बसल्यावर बहिष्कृत अस्पृश्यतेचें उच्चाटन होण्याची शेवटची आशा नष्ट झाली. इतकेंच नव्हे तर हजारों वर्षांच्या सवयीने मानीव अस्पृश्यांना देखील ह्या सोवळ्या धर्माने ठरविलेली अत्यंत हीन स्थिति आपला स्वभावच आहे असें वाटूं लागलें. त्यांतच तृप्त राहणें हाच आपला स्वधर्म असून त्याच्या उलट प्रयत्न करणें मोठा अधर्म आणि सामाजिक गुन्हा होय अशी त्यांची स्वत:ची मनोरचना झाली. मग अशा अभाग्यांचे स्वतंत्र राजकारण तें काय उरणार? जगाच्या कृत्रिम इतिहासांत जें आजपावेतों चमकत आलें आहे असें राजकारण चट सारें जेत्यांचेंच असणार. जितांच्या राजकारणाला वाव तरी कसा मिळणार !

चुकून माकून अपवाद म्हणून कदाकाळीं वाव मिळालाच, तरी त्याला लेखी इतिहासांत प्रवेश कसा मिळणार ? ही अपवाद घटना जितकी मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे, तितकीच सृष्टिक्रमाच्याही उलट आहे. कारण मानवी स्वभाव हा तरी एक सृष्टिक्रमच आहे ना ? ह्या क्रमाला स्थितीस्थापकतेच्या दडपणाखाली गारद झालेला हिंदुस्थआनच कसा अपवाद होणार ? असो. धर्मक्रांति आणि राजक्रांति हीं जुळी भावंडेच होत. धर्म म्हणून जो शब्द येथे योजिला आहे, त्याचा अर्थ मतलब येवढाच खऱा आहे. शुद्ध अध्यात्मांत क्रांतीला वावच नाही. तें स्वयंभू स्वप्रकाशित आणि निरंतर सरळ उन्नतीच्या मार्गानेच जाणारें असतें. त्याच्या उलट धर्म म्हणून जो रज आणि तमोगुणाचा प्रकार आहे, तो राजकारणाहून मुळीच भिन्न नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादि वरुन भिन्न भासणारे किती तरी बैल ह्या धर्म उर्फ राजकारणाच्या गाड्याला जुंपले असले, तरी गाडा एकच आहे. ह्या सर्वांची आपसांत एकी असते, तोंवर हें गाडें सुरळीत चाललेलं दिसतें. वितुष्ट माजलें की क्रांति झाली असें इतिहासांत नमूद होतें.

हिंदुस्थानांत अशा क्रांत्या वेळोवेळी झाल्या आहेत. पण ज्या क्रांत्या वर्णव्यवस्थेच्या अभिमानी चालकांनी घडवून आणिल्या त्यांना बहुतकरुन क्रांति हें नांव मिळत नाही. ज्या वर्णव्यवस्थेच्या उच्छेदकांनी घडवून आणिल्या त्या एक तर यशस्वी झाल्या नाहीत, आणि जो त्यांचा भाग यशस्वी झाला तो इतर सामान्य विकासांत असा बेमालूम समरस झालेला आहे. की त्याला ही क्रांती हें नांव मिळत नाही; कारण त्याची क्रिया हळू व अदृश्य पद्धतीने घडलेली असते. म्हणून ती कोणाच्याही डोळ्यावर येऊं शकत नाही. अर्थात् कृत्रिम इतिहास तर अशा विकासाला बोलून चालून डोळ्यांआडच राखणार. येरवी त्याला तरी कृत्रिम हें नांव कोण देऊ शकेल?

Read more: प्रकरण अकरावे : राजकारण

प्रकरण सहावे - ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग

ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे मनांत आणून मी जेव्हा इ. स. १९२७ च्या फेब्रुवारीत कलकत्त्याहून निघालों, तेव्हा माझे मनांतील मुख्य उद्देश केवळ बौद्ध धर्मांचे साधन प्रत्यक्ष पाहण्याचाच होता. हा निर्वेधपणाने साधावा म्हणून इतर माझे व्यवसाय आणि अभ्यास कांही काळ तरी बाजूस ठेवावेत, असे मला वाटत होतें. पण मी जेव्हा या विचित्र देशांत संचार करु लागलों, तेव्हा प्राचीनवस्तुशास्त्र, तुलनास्मक भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादि ज्या माझ्या आवडीच्या गोष्टी त्यांनी मजवर एकदम हल्ला चालविला. ब्राह्म धर्माचा प्रचारक या नात्याने तुलनात्मक धर्मशास्त्राचे अवलोकन मला आजन्म करणें भाग आहे. आणि वरील शास्त्रें तौलनिक धर्मशास्त्राच्या अगदी हद्दीवरची व त्याशीं सजातीय असल्याने त्यांच्या अध्ययनापासून अगदी हद्दीवरची व त्याशी सजातीय असल्याने त्यांच्या अध्ययनापासून, विशेषत: इतक्या भिन्न परिस्थितींत आल्यावर, स्वतः अलिप्त राहणें मला फार कठीण पडलें.


ब्रह्मदेशांत हिंदुस्थानांतला जातिभेद मुळीच नाही, ही गोष्ट खरी आहे. तेवढ्यावरुन येथे कोणत्याही प्रकारचा बहिष्कृत वर्ग मुळीच नाही, किंवा पूर्वी नव्हता, असा माझा समज होता. इतकेंच नव्हे, तर या देशांत पुष्कळ वर्षे राहून वरवर पाहणाराचाही असाच समज असलेला मला दिसून आला. पण खरा प्रकार असा नसून, अगदी अलीकडच्या काळापर्यंत या देशांत बहिष्कृत स्थितींत निदान एक हजार वर्षे तरी खितपत पडलेले चार पांच तरी मानववर्ग मला आढळले. श्वे यो या टोपणनांवाच्या एक इंग्रजाने लिहिलेल्या Burman-His Life and Nation या इंग्रजी ग्रंथांत मी जेव्हा या निरनिराळ्या बहिष्कृत दास-वर्गांचे वर्णन वाचिलें तेव्हा मला फार आश्चर्य वाटले. जातिभेद नसताही बहिष्कृत वर्ग असू शकतो, ही गोष्ट अमेरिकेंतील अत्यंत सुधारलेल्या संयुक्त संस्थानांतील सामान्य लोकांचे तेथील निग्रोशी जें वर्तन घडतें व दक्षिण आफ्रिकेंतील गौरकार्याचे इतर वर्णीयांशी जें वर्तन घडतें, तें ज्यांनी पाहिलें आहे, त्यांना सहज पटण्यासारखी आहे.


गेल्या वर्षी भारत-इतिहास-संशोधक-मंडळापुढे 'अस्पृश्यतेचें मूळ आणि तिचा हिंदुस्थानांतील विकास' या विषयावर मी माझा निबंध वाचला. तेव्हापासून या विषयाचा मी अधिकच शोध करीत आहें. ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गांची मला जी माहिती शोधाअंतीं मिळाली व प्रत्यक्ष निरखिली, तिच्यामुळें माझ्या स्वीकृत विषयावर अधिक प्रकाश पडणार आहे, म्हणून मी पुढील माहिती संक्षेपाने देत आहे.


ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गाचा उगम ब्रह्मदेशांतील गुलामगिरीच्या संस्थेंत आहे. ब्रिटीश राज्याची संस्थापना ब्रह्मदेशांत इ. स. १८८५ सालीं पूर्णपणे झाली. यापूर्वींच्या स्वराज्यांत या देशांत गुलामगिरीची संस्था होती. ती तेथे किती पुरातन होती हें ठरविण्याची निश्चित साधनें तूर्त उपलब्ध नाहीत. अनेकविध सामग्री जमवून मि. जी. ई. हावें, आय.सी.एस. यांनीनुकताच एक ब्रह्मदेशाचा नमुनेदार आमूलाग्र इतिहास दिलेला आहे. त्यांत त्यांनी इसवी सनाच्या चालू सहस्त्रकाच्या आरंभी सुरु झालेल्या पगान येथील राजघराण्यापासून विश्वसनीय इतिहास दिला आहे. हे घराणें अनिरुद्ध नांवाच्या पराक्रमी थोर पुरुषाने स्थापिले. या देशांत मन्वंतर घडवून आणण्यासाठी अनेक राष्ट्रीय हिताचीं जी कामें ह्या राजाने केली. त्यांत देशांतील बौद्ध धर्मांची सुधारणा करुन मोठमोठी बौद्ध देवस्थानें बांधिली, हे एक काम होय. ही देवळे बांधण्यासाठी खेड्यांतून शेतकीवरील पुष्कळशा लोकांना जबरीने धरुन आणून गुलाम करुन त्यांच्याकडून काम घेतलें. याशिवाय कायमच्या गुलामगिरीचें दुसरें एक कारण ब्रह्मदेशांत असें आहे. देवस्थानांत झाडलोट व इतर राखणदारीचीं कामें करणें, हे गुलामांचेचं काम आहे. कित्येक भाविक लोक गुलामगिरी आपण होऊन पत्करीत असत. पण साधारणपणें राजाज्ञेने हा जबरीचा गुरवपणा खेड्यांतून धरुन आणिलेल्या लोकांवर किंवा लढाईंत जिंकून आणिलेल्या लोकांवर लादण्यांत येत असे. मि. हावें यांनी पान ३३१ वर एक इ.स. ११७९ च्या शिलालेखाचा उतारा दिला आहे. त्यांत 'अभिनंदथू नांवाच्या एका श्रीमंत दरबारी गृहस्थाने एक मोठें देऊळ बांधून त्याच्या साफसफाईसाठी स्वत:ला, आपल्या बायकोला व मुलांना गुलाम म्हणून वाहिलें', असा उल्लेख आहे.


अशा देवळी गुलामांवर व त्यांतल्या त्यांत लढाईंत जिंकून आणिलेल्या गुलामांवर वंशपरंपरेचा बहिष्कार पडत असे. त्यांच्याशी इतर साधारण स्वतंत्र समाज मिळून मिसळून राहत नसे. म्हणजे ब्रह्मदेशांत जातिभेद मुळीच नसला तरी स्वतंत्र आणि गुलाम असे दोन मुख्य सामाजिक भेद असत. व घरकामाकरिता ठेविलेल्या गुलामांना जरी समाजांत वावरण्यास मुभा असली, तरी देवळी गुलामांना फारच हीन व तिरस्करणीय समजण्यांत येत असे. याप्रमाणे गुलामगिरींतून ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्गाचा उगम झाला असावा.एकंदरीत ब्रह्मदेशांतील हल्लीची धार्मिक संस्कृति व कांही अशी घरगुती व सामाजिक संस्कृतीही हिंदी संस्कृतींतून आली आहे, असें दिसतें. निदान कांही वर्गांची ग्रामबहिष्कृतता तरी हिंदुस्थानातूनच गेली असावी, असें म्हणण्यास हिंदी बौद्ध संस्कृतीचाच पुरावा नसून इतरही असा पुरावा आहे की, हल्लीही जे हीन स्थितींतले बहिष्कृत वर्ग तेथे आढळतात, त्यांची संडाला, डून संडाला, तुबायाझा अशीं जीं नावें आहेत. ती हिंदी भाषेंतून तिकडे गेलीं आहेत. ती नावें चंडाल, डोम चंडाल, अशुभराजा या हिंदी नांवांचेच अपभ्रंश होत, यांत संशय नाही. संस्कृत अथवा पाली भाषांतील शब्दांचे उच्चार ब्रह्मी लोकांना नीट व करतां आल्यामुळें त्या भाषेंतील च श र या अक्षरांच्या उच्चारांचा ब्रह्मी भाषेंत अनुक्रमें स त य असा विपर्यास व्हावा, असा ब्रह्मी अपभ्रंशाचा नियम आहे, त्यावरहुकूम ब्रह्मी बहिष्कृत वर्गांची नांवें हल्ली तेथे प्रचारांत आहेत. अशुभराजा यांतील पहिल्या अचा लोप झाला व वरील नियमाप्रमाणे तुबायाझा असें शेवटलें नांव सिद्ध झालें आहे.


ब्रह्मदेशांत ब्रिटीश राज्य स्थापन होईपर्यंत खालील पांच प्रकारचे बहिष्कृत हीन वर्ग आढळत असत.


(१) युद्धांत जिंकलेले कैदी आणि त्यांचे वंशज यांना देवळातील सेवेला वाहिलेले गुलाम करण्यांत आलेलें असे. यांना फयाचून हें नावं आहे. फया हा शब्द बुद्ध या शब्दाचा चिनी भाषेंतून आलेला अपभ्रंश आहे. बुद्ध-बुढ-भूर-फुर-फया अशी ही अपभ्रंशपरंपरा आहे. फया हा शब्द ब्रह्मदेशांत बुद्ध त्याची मूर्ति, देऊळ आणि कोणी मोठा सन्माननीय माणूस या सर्वांबद्दल उपयोजिला जातो. चून म्हणजे नोकर असा अर्थ आहे.


(२) स्मशानांतील मार्तिकादि अशुभ संस्कारांशी संबंध असलेलीं, थडगी खणण्याची व ती सांभाळण्याची वगैरे हीन कामें करणारे ग्रामबाह्य वर्ग यांना तुबायाझा ( अशुभराजा), संडाला, डून संडाला अशीं नांवें आहेत.


(३) केवळ भिकेवर निर्वाह करणारे महारोगी व इतर असाध्य रोगांनी पछाडलेले, हातपाय किंवा दुसरा एकदा महत्त्वाचा अवयव तुटून अपंग बनलेले यांना केबा असें नांव आहे. केबा हें नांव तुबायाझानाही लावण्यांत येते, कारण तेही भीकच मागतात. के=मदत, वा=हो (संबोधन). 'मला मदत करा', असें म्हणत भीक मागणारे असा या नांवाचा मूळ अर्थ आहे.


(४) माफीचे भयंकर गुन्हेगार - अशा गुन्हेगारांना पूर्वी स्वराज्यांत राजाच्या विशेष कृपेने किंवा इतर कारणांनी माफी मिळून त्यांना पोलीसचें, जेलरचें, फांशी देण्यांचे वगैरे तिरस्कृत कामे आणि अधिकार मिळत असत. त्यांना पॅगवे म्हणजे पोलिस, लेयाटों=चोपदार, छडीदार अशी नांवें असत. अशा अधिका-यांना जनतेमध्ये मोठा दरारा असला तरी त्यांच्याविषयी सर्वत्र तिरस्कार असून ते समाजबाह्य मानले जात.


(५) ह्याशिवाय तु-डै-डो म्हणजे राजे लोकांचे हलालखोर म्हणून एक वर्ग पूर्वी असे. व यांचा एक लहान गाव मंडळालेपासून १०-१२ मैलांवर आहे, असें माझे ऐकण्यांत आलें. पण प्रत्यक्ष जाऊन पाहण्यास मला वेळ मिळला नाही. ह्यांचा समावेश वरील दुस-या वर्गांत मी केला असता, पण हल्ली हे फारसे ग्रामबाह्य नाहीत, असेंही मी ऐकलें.


वरील पांचही बहिष्कृत वर्गांतील लोकांची हल्लीची संख्या हिंदुस्थानांतील बहिष्कृतांच्या मानाने फारच थोडी म्हणजे फार तर सा-या ब्रह्मदेशांत ५/६ हजार असेल. यांची स्थितीही हिंदुस्थानांतल्या इतकी करुणास्पद नाही. हे आपलें ठिकाण सोडून, धंदा सोडून व मूळ लपवून सर्वसाधारण समाजात छपून गेल्यास हल्लीच्या राज्यांत कोणी पर्वा करती नाहीत. हे जरी आपल्या मूळ गावींच बहिष्कृत स्थितींत राहिले तरी, व पूर्वीदेखील, हिंदुस्थानांतल्या इतक्या कडक रीतीने यांना अस्पृश्य मानण्यांत येत नसे. तरी पण त्यांना गावांत येण्याला व इतर धंदे करण्याला व लोकांत मिसळण्याला परवानगी नसे. म्हणून अजूनी हे मागासलेल्या विपन्नावस्तेंत खितपत पडलेले मी प्रत्यक्ष गावोगावीं मुद्दाम जाऊन पाहिले. ब्रह्मदेशांत कडक अस्पृश्यता नव्हती-निदान हल्ली नाही-हें खरें असलें तरी तेथील बहिष्कृतांचा व अंतःकृतांचा भेटीव्यहार पूर्वी होत नसे व आताही होत नाही; मग रोटीव्यवहार व बेटीव्यवहाराची गोष्टच नको. हल्ली देखील कोणी उघडपणें आपलें मूळ वरील चार पांच प्रकारापैकी एकांत आहे, असें सांगेल, तर त्याच्याशीं ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी बहुसंख्या नुसता भेटीव्यवहार करण्यासही तयार नाही. म्हणजे गृह्य आणि सामाजिक प्रसंगी समानतेने बहिष्कृतांस आमंत्रण करण्यास अंतःकृत वर्ग अद्यापि तयार नाही. ब्रह्मदेशांतील पुराणमतवाद हिंदस्थानांतल्यापेक्षा कमी दृढमूल आहे व जो आहे तो झपाट्याने मावळत आहे, तरी पण तो मुळीच नव्हता किंवा नाही असें नांही. म्हणून तेथील बहिष्कृत वर्ग हा एक संशोधनीय विषय आहे.


वरील पांचही प्रकारच्या बहिष्कृतांचा इतिहास माझ्या अल्पशा संशोधनांत जो आढळला तो मी संक्षेपाने पुढे देत आहें. ब्रह्मदेशाचा इतिहास अद्याप तयार व्हावयाचा आहे. उपलब्ध साधनसमाग्रीचा भारतीय सामाजिक इतिहासाशीं निकट संबंध भासत आहे आणि तो रंजक व तसाच बोधकही आहे.


फयाचून : ह्या नांवाचा अर्थ देवळी गुलाम असा आहे. ब्रह्मदेशांतील देवस्थानें अत्यंत पवित्र मानलीं जातात; इतकीं की, युरोपियनांना देकील पादत्राण घालून देवळांतच नव्हे तर भोंवतालच्या विस्तीर्ण आवारांतही पाय टाकण्याची छाती होत नाही. अशा बाबतींत युरोपियनांचेही खू पडले म्हणून पादत्राण घालून मंदिरांतच नव्हे तर प्राकारांतही प्रवेश करण्यासंबंधी सरकारी ठराव आणि वटहुकूम मोठमोठ्या पाट्यांवर आवारापासून कांही अंतरावर जाहीर केलेले आढळतात. देवळें पवित्र तरी देवळी गुलाम अपवित्र, हें मोठे कोडेंच मला पडले! शोध करिता देवळी गुलामच नव्हे तर देवळांत वाहिलेल्या इतर, फळें, फुलें, सुगंधी पदार्थ व नैवेद्य, इत्यादि सर्वच वस्तु मनुष्यांना अग्राह्य आहेत. ह्या न्यायाने फयाचून म्हणून जो देवळी गुलाम वर्ग आहे तोही पूर्वी अग्राह्य असला पाहिजे. तो कालांतराने त्याज्य व नंतर अपवित्र मानला असणें अगदी संभवनीय आहे. ह्या गुलाम वर्गांत पूर्वी बहुतेक धरुन आणलेले राजकैदी असत. ह्यांचें एक उदाहरण अत्यंत हृदयद्रावक पण अगदी इतिहासप्रसिद्ध आहे, तें असें.


दक्षिण ब्रह्मदेशांत मोलमेन शहराचे उत्तरेस २०/२२ मैलांवर किना-यालगत थटून म्हणून एक इतिहासप्रसिद्ध प्राचीन राजधानीचा गांव आहे. तेथे इ. स. च्या ११ व्या शतकाच्या मध्यसमयी मनुहा नांवाचा तेलंग राज राज्य करीत होता. ह्या प्रांतांत द्रविड देशांतून कांची येथून गेलेला 'हीनयान' बौद्ध धर्म जोरावत होता. उत्तरेकडे ऐरावती नदीचे काठी पगान येथे अनिरुद्ध नांवाच्या ब्रह्मी जातीच्या राजाने जेव्हा पहिली ब्रह्मी बादशाही स्थापिली, तेव्हा दक्षिणेंत थटून येथे मनुहा राज्य करीत होता. अनिरुद्धाला उत्तरेकडील भ्रष्ट बौद्ध धर्मांची सुधारणा करावयाची होती. थटूनकडून एक नामांकित बौद्ध भिशु पगान येथे जाऊन अनिरुद्धाच्या राष्ट्रीय कार्यांत मार्गदर्शक झाला. त्याने, थटून येथे बौद्ध त्रिपिटक ग्रंथाच्या प्रती आहेत, त्या मिळविण्याचा अनिरुद्धास मंत्र दिला. सामोपचाराने मागन मनुहा त्रिपिटक ग्रंथ देत नाही; म्हणून त्यावर रागावून अनिरुद्धाने मनुहाच्या राज्यावर मोठी चाल करुन त्रिपिटकच नव्हे तर त्याचें अक्षरश: सर्वस्व हरण केलें. म्हणजे त्याच्या राज्यांतील सर्व मौल्यवान चिजा ऐनजिनशी आपल्या राज्यांत नेल्या, इतकेंच नव्हे तर प्रजाही गुलाम म्हणून आपल्या राज्यांत नेली. तेव्हा पर्यंत दक्षिण ब्रह्यादेशांतील संस्कृति दक्षिण हिंदुस्थानांतील आंध्र आणि द्राविड देशांतून दक्षिण ब्रह्मदेशांत हीनयान बौद्ध संस्कृतीचे मार्गाने गेली होती. ती या युद्धापुढे उत्तर ब्रह्मदेशांत पसरू लागली. थटूनचे बौद्ध ग्रंथ, बौद्ध भिक्षू, आचार्य आणि कारागीर नेले इतकेंच नव्हे, सर्व राजघराणें आणि दरबारही गिरफदार करुन पगान येथे नेण्यांत आलें. शेवटी त्या थटून राजघराण्यासह सर्व नामांकित प्रजेला पगान येथे बांधलेल्या असंख्य नवीन पगोडांमध्ये बहिष्कृत देवळी गुलाम म्हणून कायमचे वंशपरंपरा नेमण्यांत आलें. मी थटून आणि पगान हीं जुन्या संस्कृतीची दोन्ही ठिकाणें शिल्पशास्त्र, समाजशास्त्र आणि धर्मशास्त्र अशा तीन्ही दृष्टीने निरखून पाहिली. दक्षिण ब्रह्मदेशांत ब्रिटिशांचा अंमल जसा इ.स. १८२५ चे सुमारास बसला, तसाच तो उत्तर ब्रह्मदेशांत १८८५ साली बसून सर्व ब्रह्मदेश नव्या मनूंत आला. ह्या साठ वर्षांच्या अंतरामुळे मला दक्षिण देशांत बहिष्कृत वर्ग कोठेच आढळला तो पाहण्यास उत्तरेकडे पगानला जावें लागलें. पगान येथील बहिष्कृत वाड्यांत मनुहा राजाचें घराणें, वाडा व त्याचा हृदयस्पर्शी लवाजमा अद्यापि आहे. शेवटचा पुरुष उबाल्विन हा २६ वर्षे वयाचा बाणेदार तरुण व त्याची खानदानी वृद्ध आई यांना मी डोळ्यांनी पाहिलें. त्यांची गा-हाणीं ऐकली. न्यऊ ह्या बंदराजवळ श्रेझीगो नांवाच्या मोठ्या राष्ट्रीय पगोडाजवळ एक फायाचूनांचे वेगळें खेडें आहे. त्याचा थजी उर्फ पाटील म्हणून ब्रिटिश सरकारने उ बा ल्विनची नेमणूक केली आहे. कारण तो मोठ्या राजवंशातील पिढीजाद फयाचून आहे !


फयाचून हे लोक लहान मोठ्या देवळांत हल्ली फुलें, माळा, उदकाड्या, मेणबत्त्या विकण्यासाठी दुकानें मांडून बसलेले आढळतात. हा धंदा किफायतीचा असल्याने अलीकडे फयाचून नसलेल्या इतर अंत:कृत लोकांचींही अशी दुकानें आहेत. उलट फयाचूनही आपलें मूळ लपवून व हा धंदा सोडून अंत:कृत वर्गांत सररास मिसळत आहेत. ह्यामुळें खरा फयाचून कोण, हें ओळखून काढणें मोठें मुष्किलीचें काम आहे. विशेष तपशील निरीक्षण नं. ४ ह्यांत पुढे दिला आहे.


तुबायाझा : ह्या नांवांतील मूळ शब्द वर सांगितल्याप्रमाणें 'अशुभ राजा' ह्यासंबंधीं मी एक दंतकथा ठिकठिकाणीं ऐकली ती अशी : एकदा एका ब्रह्मी राजाची एक गर्भवती राणी अत्यवस्थ आजारी पडली. ती मेलीच, असें समजून तिला स्मशानांत पाठविलें. थडग्यांत उतरवितांना ती जिवंत आहे, असें आढळले. स्मशानांत नेलेली राणी राजाने पुन्हा स्वीकारणें शक्यच नव्हतें. तिला थडगें खणणा-या संडाला जातींतच ठेवून दिलें व तिचे पोटी पुढे जो राजपुत्र झाला त्याला 'अशुभ राजा' हें नाव पडलें. त्याला संडालांचे मुख्य पद मिळून, स्मशानांतील धार्मिक संस्कारांत बौद्ध फौंजीला (भिक्षूला) जी दक्षिणा मिळेल तितकीच या राजवंशालाही मिळावी, असें राजशासन मिळालें. ही दंतकथा मला पगान येथील तुबायाझाच्या खेड्यांतील पाटलाने व सगाईन येथील एका सभ्य गृहस्थानेही स्वतंत्रपणें सांगितली. कथा खरी असो नसो, ब्रह्मी चंडाल उर्फ संडाला लोक राजवंशाशी आपला संबंध कसा पोंचवितात, हें ह्यावरून दिसते. मलबारांतील पुलया व चिरुमा ह्यांचाही अन्य रीतीने राजवंशाशीं कसा संबंध येतो, हें मी हिंदुस्थानांत पाहिलेलें मला स्मरलें. तुबायाझा हे बहिष्कृत असले तरी कधी जित नव्हते, असें त्यांचें म्हणणें आहे. हे संडाला, डून-संडाला लोक मणिपूरच्या बाजूने हिंदु संस्कृतीच्या राजाने प्राचीन काळी ब्रह्मदेशांत नेले असावेत. याशिवाय माझा तर्क दुसरा धावत नाही. अलीकडे दक्षिण हिंदुस्थानांतील लक्षावधि, परैया, पुलया इत्यादि अस्पृश्य जातींचे लोक पोट भरण्यासाठी ब्रह्मदेशांत अगदी हीन धंदा करुन राहिले आहेत. ते मुळीच बहिष्कृत नाहीत. पण हे संडाल मात्र प्राचीन काळीं गेलेले अद्यापि तुरळक तुरळक आपल्या जुन्या वतनाच्या गांवी थडगें खणण्याचे आपलें जुनें वतनच चालवीत असलेले आढळतात; त्याअर्थी हें प्राचीन हिंदी संस्कृतीचें वतन प्राचीन हिंदी राजांनीच स्थापिलें असेल असें माझे मत आहे. विशेष तपशिलासाठी पुढे निरीक्षण नंबर १ व ३ हीं पहा.


केबा : पूर्वीप्रमाणे हे महारोगी अपंग बेवारशी भिकारी लोक असून मोठमोठ्या देवळांच्या वाटेवर याचना करीत बसलेले आढळतात. असे अपंग याचना करीत बसलेले इतालीसारख्या प्राचीन अमदानींतल्या रोम व इतर क्षेत्राच्या ठिकाणी मी युरोपांतही प्रत्यक्ष पाहिले. आमच्या हिंदुस्थानांतल्या क्षेत्रांतल्या भिका-यांचा येथे उल्लेखही करण्याची गरज नाही हा वर्ग समाजबाह्य आहे, ह्यांत कांहीच नवल नाही. मंडालेपासून ८ ते १० मैलांवर असलेल्या मेंढाई नांवाच्या खेड्याजवळ केबांची मीं एक स्वतंत्र लहानशी वसाहतच पाहिली. ती मीं पुढे एका निरीक्षणामध्यें विस्ताराने वर्णिली आहे.


चौथा वर्ग जो माफीचा गुन्हेगार तो हल्ली ब्रिटिश अमदानींत कोठेच आढळणें शक्य नाही. पूर्वींच्या स्वराज्यात 'राजा कालस्य कारणम्' हे तत्व जोरावर होतें. राजाची वैयक्तिक मर्जी संपादन केल्यावर 'प्याद्याचा जसा फर्जी' तसाच सात खून करुनही आपली हुशारी दाखविणाराला माफी मिळून उलट शहर कोतवाली मिळविणारांची उदाहरणें पाहाण्यासाठी संशोधकाला ब्रह्मदेशापर्यंत लांब जावयास नको. हल्लीच्या कोठल्याही लोकछंदानुवर्ती ब्यूराक्रसीच्या सी.आय.डी. मध्ये असले पाणीदार माफीबहादूर शोधीत बसल्यास मिळणार नाहीत, अशी कोण हमी घेईल? मात्र पूर्वीच्या ब्रह्मी स्वराज्यांत अशा लोकांना दरबारांत जरी वेतन मिळे, तरी तेवढ्यावरुन समाजांत त्यांना मान्यता न मिळतां उलट बहिष्कार पडे, असें मीं ब्रह्मदेशाच्या वाड्प्रयांत वाचिलें आहे. पॅगवे हें अशा पोलीस व जेलर लोकांना नांव पडण्याचे कारण ह्यांच्या गालांवर ह्यांनी पूर्वी केलेल्या गुन्ह्याची कायमची निशाणी म्हणून एक गोलाकार शिक्का मारलेला असे. अलीकडच्या कांही गुन्हेगारांना पाश्चात्य सुधारलेल्या समाजाकडून सोन्याच्या तलवारी नजर करण्यांत आल्या आहेत! हा जुन्या नव्यांत एक फरक ध्यानांत धरण्यासारखा आहे. एरव्ही पाणीदार गुन्हेगारांना उगाच शिक्षेंत खितपत न टाकतां आताप्रमाणेंच पूर्वीही कोठे कोठे समाजकार्याला लावण्यांत येत होतें., हें ब्रह्मदेशांतील उदाहरणांवरुन उघड होतें.


तु डैं. डो ह्या पांचव्या वर्गांचें प्रत्यक्ष निरीक्षण करावयाला मला वेळच मिळाला नाही म्हणून त्यांचें जास्त वर्णन मला करतां येत नाही ह्याबद्दल मी दिलगीर आहे.


असों येथपर्यंत मी पांच बहिष्कृत वर्गांचा उल्लेख व वर्णन केलें. ब्रह्मदेशांत जाईपर्यंत व गेल्यावरही कित्येक आठवडे तेथे आमच्या देशांतल्याप्रमाणे ग्रामबहिष्कृत वर्ग असेल, अशी कल्पनाही माझ्या मनाला शिवली नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे अकस्मात मी जेव्हा असे वर्ग कांही विवक्षित प्राचीन ठिकाणीं आढळण्यासारखे आहेत असें ऐकले तेव्हा मी त्याचा फारच जारीने शोध चालविला. दक्षिण ब्रह्मदेशांतील पुराणमतवादी अशिक्षित ब्रह्मी लोकांकडून मला त्यांची थोडीबहुत माहिती मिळाली पण तीही उडवाउडवीनेच मिळूं लागली. म्हणून मी उत्तर ब्रह्मदेशांत बौद्ध धर्मांचे खरें साधन पाहावयास गेलों असतां खालील पांच खेडीं मी या निरनिराळ्या वर्गांची वस्तुस्थिति प्रत्यक्ष घरोघर जाऊन निरीक्षण करण्याकरिता निवडून काढिली. त्यापैकी तू- डै-डो या (हलालखोर ) वर्गाचें खेडें मात्र प्रत्यक्ष पाहण्याला मला वेळ मिळाला नाही. पण बाकीच्या चार ठिकाणी मात्र मी चांगल्या सुशिक्षित जाणत्या ब्रह्मी दुभाष्याला घेऊन घरोघरी फिरुन या निरनिराळ्या वर्गातल्या वृद्ध आणि वजनदार लोकांना भेटून त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन व शिवाय प्रत्यक्ष स्थिति निरखून पाहून तयार केलेलीं खालचीं सविस्तर टिपणें लिहिलीं आहेत. तीं माझ्या रोजनिशीवरून येथे थोडक्यांत उतरुन घेत आहें. प्रोम शहराजवळील खेड्यांत मात्र माझी जी खडतर निराशा झाली, ती पुढे दिलीच आहे.


येथे मला एक गोष्ट नमूद करणें अवश्य वाटत हे की, ह्या बहिष्कृत वर्गाची स्थिती आता अगदी झपाट्याने सुधारत आहे. आणखी दहापंधरा वर्षांत, मला दिसलीं तितकीं तरी कुटुंबे मी पाहिलेल्या स्थितींत पुढील संशोधकांस आढळतील की नाही याला मला जबर शंकाच वाटत आहे. फार तर काय, आताही या बहिष्कृत वर्गांना त्यांच्या मूळ नांवाने संबोधणें हें मोठें शिताफीचें व धैर्यांचे काम आहे. ब्रह्मी लोकांचा समाज अत्यंत चिडखोर, उतावळा व तापट आहे. थोड्या कारणावरुन हे लोक वर्दळीला येऊन हातघाई करितात. त्यामुळे दुभाष्याचें काम करुन ही नसती उठाठेव करण्यास मला शांत व समजस माणसें मिळणेंही ब-याच वेळा मुष्किलीचें झालें; व पुष्कळदा अर्ध्या दमाच्या दुभाष्यांनी माझी ऐन वेळीं निराशा करुन माझा बेत ढासळून टाकला. म्हणून माझा सर्व भार माझ्या दुभाष्यावर किंवा वाटाड्यावर न टाकतां अगोदर अनेक उपायांशी खालील ठिकाणच्या लोकांचा विश्वास मला संपादावा लागला. ब्रह्मी लोक जितके उतावळे तितकेच भोळे व दिलदारही आहेत. विश्वास बसल्यावर ते आपले हितगुज आपल्या उलट असलें तरी मोकळ्या मनाने सांगतील, हा भरंवसा मला अंत:कृत आधुनिक सुशिक्षणाने अर्धवट भाजून निघालेल्या ब्रह्मी लोकांच्या समागमाने जो आला नाही, तो तेथील बहिष्कृतांच्याच समागमांत आला. हिंदुस्थानांत काय किंवा कोठेही काय, वरिष्ठ म्हणून गाजलेल्यापेक्षा त्यांनी पायांखाली तुडविलेल्या कनिष्ठ वर्गांतच त्या त्या राष्ट्रांच्या ख-या माणुसकीचीं व स्थानिक स्वभावाची लक्षणे सूक्ष्म संशोधकांना जास्त आढळून येण्यासारखी आहेत. हें मी माझ्या निरनिराळ्या देशांतील आजन्म घेतलेल्या अनुभवावरुन म्हणूं शकतो !

Read more: प्रकरण सहावे - ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग

प्रकरण पाचवे : उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्य

येथपर्यंत मध्ययुगीन अस्पृश्यतेचें विवेचन झालें. आता तिसरा टप्पा जो उत्तरयुगीन म्हणजे ज्या काळीं बौद्ध धर्माचा नायनाट जैन, शैव, वैष्णवादिकांनी अनुक्रमाने चालविला आणि त्यानंतर मुसलमानांची धाड येऊन तो (बौद्ध धर्म) नाहीसा झाला, तो काळ होय. ह्या काळांतील अस्पृश्यतेचें एक मुख्य लक्षण म्हणजे तत्कालीन अस्पृश्यांच्या संख्येमध्ये निरनिराळ्या प्रांतांतून आंधळें राजकारण आणि जुलमी राज्यक्रांति ह्यामुळें भली मोठी ठोकळ भर पडली, हें होय. तरी तिकडे आपण आता वळूं. इ.स. १८९४ सालीं मद्रास येथे थिऑसॉफिकल सोसायटीने तेथील पारियांची स्थिती सुधारण्यासाठी प्राथमिक शिक्षणाच्या शाळा सुरु केल्या. ह्या प्रयत्नास प्रोत्साहन देण्यासाठी ह्या सोसायटीने तत्कालीन उदारधी अध्यक्ष कर्नल ऑल्कॉट यांनी सन १९०१ साली The Poor Pariah ('बिचारा पारिया') ह्या नांवाची एक इंग्रजी चोपडी प्रसिद्ध केली. तिच्या २४ व्या पानापासून शेवटपर्यंत एक नवीन कल्पनेचा निर्देश आणि पुरस्कार केला आहे. ती कल्पना म्हणजे हल्लीचे पारिया हे एके काळी बौद्ध होते, आणि पुढील धर्मक्रांतीच्या काळी ते हिंदुधर्मांत सामील न झाल्यामुळे राजशासनावरुन त्यांना अस्पृश्य ठरवण्यांत आलें, ही होय. १८९८ च्या सुमारास कर्नल ऑल्कॉटकडे पारिया जातीचे कांही पुढारी आले आणि म्हणू लागले की अशोकाचे वेळी आपण बौद्ध होतों, म्हणून आमच्यासाठी ऑल्कॉट साहेबांनी बौद्धांचा एक नवीन संघ काढून त्यांत आम्हांस घ्यावे. ऑल्कॉट साहेबांनी त्यांना कोलंबो येथील H. Sumongala (एच्. सुमंगल) ह्या मुख्य बौद्ध भिक्षूकडे नेलें. त्यांनी एक मोठ्या जाहीर सभेंत त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. परंतु हे लोक पूर्वी बौद्ध होते ह्याविषयींची पुरावा ऑल्कॉट साहेबाला मिळाला नाही. अश्वघोषाचा कांही लेख आपणाजवळ होता असें पारियांचे म्हणणें होतें. पण तो लेख त्यांना त्यांचेकडून मिळाला नाही. तथापि असा पुरावा पुढे मागे मिळेल अशा ऑल्कॉट साहेबांनी खात्री होती. कोलंबो येथील एक तामिळ हिंदु मि. व्ही. जी. टी. पिल्ले यांनी सिद्धांतदीपिका नांवाच्या एक मासिकांत लिहिलेल्या लेखांतून पान २५ वर खालील उतारा दिला आहे :-

 

" इ.स. ५३४ च्या सुमारास सिलोनच्या एका बौद्ध राजाने पुष्कळ तामिळ शैव ग्रंथाचा नाश केला, त्यावरुन शैवाचा बौद्ध किती तिटकारा करितात हें कळणें कठीण नाही. उलटपक्षी जेव्हा तामिळ हिंदूंनी सिंहलद्धीपावर स्वारी केली तेव्हा त्यांनी तालवृक्षाइतके उंच बौद्धधर्माचे ग्रंथ जाळिले आणि बौद्धांचा नायनाट केला. मधुरेचा बौद्ध राजा कण्ह पांड्य याने इ. स. च्या सहाव्या शतकांत शैव धर्म स्वीकारिल्यापासून बौद्धांच्या -हासास सुरुवात झाली." तामिळ भाषेंतील सर्वात मोठे आणि सन्मान्य काव्य 'कुरळ' हें होय. ह्याचा कर्ता तिरुवल्लुवर हा पारिया होता. ( वाल्मीक ऋषिच म्हणावयाचा!) इ. स. १८८५ च्या मॅन्युअल ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पान ३३-३६ वर म्हटलें आहे की तामिळ पारिया हे दुस-या कोणत्याही जातीपेक्षा शारिरिक गुणाने श्रेष्ठ ठरतात. सर्व दक्षिण देशांत यांचें महत्त्व अधिक आहे. पारिया हे वायव्य दिशेने आर्यांच्या पूर्वी दक्षिण हिंदुस्थानांत येऊन तेथील राज्यकर्तें झाले असावेत असें ह्या मॅन्युअलमध्ये म्हटलें आहे. ऑलकॉट यांच्या चोपडींत पान २९ वर 'हालस्य महात्म्यं' नावाच्या ग्रंथांत ६९ व्या भागामध्ये ८००० द्रविडियनांना ज्ञानपूर्ण ह्या नांवाच्या एक संन्याशने शैव धर्मांत कसें घेतले ह्याचा उल्लेख केला आहे. ह्यापैकी जे शैव धर्मांत येण्यास नाखूष होते त्यांचे हालहाल करुन सिरश्छेद केले. तेलाच्या घाण्यांत त्यांची डोंकी घालून रगडली आणि त्यांची शरीरें सुळावर लोंबत ठेवून कोल्ह्याकुत्र्याकडून फाडविली ह्यांचे एक दृश्य चित्र मदुरा येथील मीनाक्षीच्या भव्य देवालयाच्या भिंतीवर कोरलेलें आहे. ऑल्कॉट साहेबांनी आपल्या चोपडीच्या शेवटच्या पानावर ह्या चित्राचा ब्लॉक दिला आहे.


ह्याप्रमाणे कर्नल ऑल्कॉट यांनी आपल्या वरील कल्पनांना अनुकूल व प्रतिकूल असलेली व आपणास सहज उपलब्ध झालेली माहिती प्राजलपणें जशीच्या तशी दिली आहे. पण ती माहिती अर्थातच अपुरी आहे. ह्याच मुद्यावर दुस-या अनपेक्षित दिशेने सुदैवाने बळकट पुरावा सांपडत आहे, तो खाली दिला आहे :-


आंध्रदेशांतील विजयनगर येथील कॉलेजातील दोन तरुन प्रोफेसर एम्. एस्. रामस्वामी आयंगार आणि व्ही शेषगिरिराव यांनी मिळून ब-याच श्रमाने प्राचीन तामिळ वाड्मयाचें अवगाहन करुन Studies in South Indian Jainism ( 'दक्षिणेंतील जैन धर्मांचे अध्ययन') ह्या नांवाचा एक विस्तृत शोधग्रंथ अलीकडे प्रसिद्ध केला आहे. आयंगार हे वैष्णव व राव हे तेलगु ब्राह्मण असून ते केवळ संशोधक असल्यामुळे पक्षपाताचा आरोप त्यांचेवर येण्याचा संभव नाही. त्यांनी दक्षिणेंत शैव आमि वैष्णव ब्राह्मणांनी बौद्धांचा आणि विशेषत: जैनांचा किती अनन्वित छळ केला हें अगदी निर्भीडपणें ठिकठिकाणी वर्णिले आहे. मदुरेच्या कण्हपांड्य राजाला तिरुज्ञानसंबंदर या शैव संन्याशाने आणि कांचीच्या महेंद्रवर्मा नांवाच्या पल्लव राजाला तिरुना बुक्करसर उर्फ आप्पार नांवाच्या शैव आचार्याने जैन धर्मांतून शैवधर्मांत घेतल्याने जैन धर्मांच्या उलट जो इ. स. ७५० सालच्या सुमारास भयंकर वणवा पेटला त्यांत ८००० दिगंबर जैन साधूंना सुळावर चढवून ठार करण्यांत आलें, ही गोष्ट दंतकथा नसून ऐतिहासिक आहे अशी येथे पुष्टि देण्यांत आली आहे. कर्नल ऑल्काटच्या 'हालस्य महात्म्या'तील वरील उता-याला याप्रमाणे दुजोरा मिळत आहे. वरील दोन प्रोफेसरांनी पारियांच्या बाबींत कांहीच उल्लेख केला नाही हें खरें आहे. या बाबतींत संशोधकांनी आणखी पुष्कळ श्रम केल्यास अधिक पुरावा मिळण्याची निराशा बाळगण्याचें कारण नाही.


इ.स. १९०८ सालीं मी जेव्हा मद्रास येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची एक शाखा स्थापण्यासाठी गेलों तेव्हा तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजांतील तेव्हांचे भौतिकशास्त्राचे प्रोपेसर लक्ष्मीनरसु यांची गांठ घेतली. त्यांनी त्या पारिया लोकांत बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची त्यावेळी चळवळ चालविली होती. हे थिऑसॉफिस्ट नाहीत. पूर्वाश्रमीचे हिंदु नायडू असून ते आता सहकुटुंब बौद्ध झाले आहेत. त्यांनी आता पारियांचा एक बौद्ध संघ स्थापिला असून स्वत: त्या संघाचे ते अध्यक्ष आहेत. तामिळ आणि मल्याळ देशांत विशेषत: पश्चिम व पूर्व किना-यावरील 'अस्पृश्य' वर्गाची स्थिती मी स्वत: बारकाईने जसजशी अधिक निरखून पाहूं लागलों तसतसें ऑल्काटच्या ह्णण्याप्रमाणे हे लोक फार पूर्वी ह्या प्रांतांतील राज्यकर्ते असावेत व मध्ययुगांत त्यांचा धर्म बौद्ध अगर जैन असावा असे अंधुक पुरावे दिसूं लागले. मलबारांत मलयगिरीवर पुलया(पुल्कस) नांवाच्या अस्पृश्य वर्गीयांचे कांही जुने किल्ले आढळले. त्यांच्या देवांना 'चाटन' म्हणजे 'शास्ता' ह्या बौद्ध नांवाचा प्रचार कांही ठिकाणी आढळला. 'चाटन' हा शब्द शास्ता ह्या संस्कृत शब्दाचें अपभ्रष्ट रूप आहे. शास्ता=चाट; 'न' असा आदेश द्राविड भाषेंत प्रत्येक नावापुढे येतो. उदाहरणार्थ, राम=रामन्. शास्ता हें एक बुद्धाचे नांव अमरकोषांत आढळते. असो. 'चिरुमा' आणि विशेषत: 'यझवा' अथवा 'तिय्या' या अस्पृश्य जाती पूर्वापार संस्कृतचें उत्तम अध्ययन करीत असलेल्या आढळल्या. तिय्या बातीमध्ये नारायणस्वामी नावाच्या एक संन्याशाने आत्मोद्धाराची नवीन धार्मिक चळवळ मोठ्या जोरांत चालविलेली पाहिली. या आत्मोद्वाराच्या चळवळीचें मुख्य लक्षण म्हणजे हजारों रुपयांचे फंड जमवून ह्या तिय्या जातीच्या लोकांसाठी ठिकठिकाणी सुंदर व प्रशस्त देवळें बांधणें व त्यांतून संस्कृत उत्तम शिकलेले त्याच जातीचे तरुण देवपूजक तयार करणें व त्यांच्या वृत्तीची योजना करणें, हें होय. ह्या तपस्वी स्वामींची मी पुन:पुन्हा भेट घेऊन त्यांच्या चळवळीचें आध्यात्मिक स्वरुपही निरखून पाहिलें. या अस्पृश्य जातीमध्ये शेंकडो सुशिक्षित इंग्रजी पदवीधर सरकारी नोकरींत हायकोर्ट जजाच्या पायरीपर्यंत चढलेले, व्यापारांत मोठ-मोठ्या पेढ्या स्थापन केलेले, वकील, डॉक्टर इत्यादि नवीन धंदे यशस्वी रीतीने चालविलेले, नव्या कौन्सिलचे सभासद आणि लोकधुरीण असे झालेले असून त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच आहे. तथापि त्यांनाही हिंदु देवळाच्या वाटेवर चालण्याची मुभा नाही. हा विपरीत प्रकार पाहून पाहून ऑल्कॉटच्या वरील म्हणण्याचा पुरावा मिळविण्याची निराशा मला तरी वाटत नाही.


ढोबळ मानाने इतकेंच म्हणतां येईल की ब्राह्मणी संस्कृतीची वर्णव्यवस्था बौद्ध आणि जैन धर्माची अमदानी जोरांत होती तेव्हा शिथिल झाली असली तरी नष्ट झाली नव्हती. ह्या क्रांतीच्या काळी ब्राह्मणी संस्कृतीच्या हिंदूंनी जेथे जेथे आपल्या वसाहती केल्या तेथे तेथे त्यांच्या ग्रामसंस्थेमुळे मूळच्या तद्देशीयांचे अधिराज्यच नव्हे तर वैयक्तिक मालकी हक्कही नष्ट होऊन, ते केवळ बलुतेदार बनून ग्रामबाह्य व अस्पृश्य ठरले. महाराष्ट्रांत बलुतेदारी तरी त्यांना मिळाली पण दक्षिण देशांत तामिळ, मलबारकडे ते केवळ गुलामगिरींत गडप झाले. अशा वसाहती पुष्कळशा बौद्ध धर्मांच्या अमदानींतच आणि कांही तत्पूर्वीही झाल्या असाव्यात. शेवटी जेव्हा दक्षिणेकडील व पूर्वेकडील प्रांतांत ह्या पाखांडी म्हणून समजले जाणा-या धर्मांचा उच्छेद झाला तेव्हा त्यांतील वरच्या दर्जोच्या लोकांचा, गरजेपुरता आणि पारस्थितीप्रमाणे, नवीन हिंदुधर्मांत समावेश होऊ शकला. परंतु खालच्या तेजोहीन, मांसाहारी, हीनकर्मी व केवळ अकुशल श्रमजीवी बहुजनसमाजाची भर ठोकळ मानाने 'अस्पृश्य' आणि ग्रामबाह्य वर्गांत होणें अगदी साहजिक आहे. मागे पान ४३ वर " पाषंड चंडालानाम् स्मशानाते वास:।" असा कौटिलीय अर्थशास्त्राचा उतारा दिला आहे त्यांतील पाषंड याचा अर्थ मगध देशांत जरी बौद्ध जैन असा होणें कठीण असलें, तरी खाली दक्षिण देशांत बौद्ध-जैनांच्या नायनाटांनंतर पाषंड म्हणजे बौद्ध-जैनच असा होणे साहजिक आहे. मनुस्मृतीने ब्राह्मणप्रधान वर्णव्यवस्थेचा करडा अम्मल चालविस्यावर तेजो. हीन खालच्या वर्गाची, विशेषत: पाषंडी मतांची, अशीच अवनति होणे सहज आहे. मनुस्मृतीत स्पष्ट खालील आज्ञा राज्यकर्त्यांना फर्माविल्या आहेत.


यो लोभादधमो जात्या जीवदुस्कृष्टकर्मंभि:।
तं राजा निर्धनं कृत्वा क्षिप्रमेव प्रवासयेत् ।।
मनुस्मृति , १०. ९६


अर्थ : अधम जातीचा जो कोणी उत्कर्षांच्या लोभाने वरिष्ठ जातीची
वृत्ति चालवील त्यांचे राजाने सर्वस्व हरण करुन ताबडतोब त्याला देशोघडीला लावावें. कारण


शक्तेनापि हि शूद्रेण न कायों धनसंचय्:।।
शूद्रो हि धनमासाद्य ब्राह्मणानेव बाधते ।।
मनुस्मृति, १०. १२९


अर्थ : शूद्राला धनसंचय करण्याला परवानगी असूं नये. तो ब्राह्मणास बाधक होईल.


ह्याच भीतीने ह्या निराधार पाखंड्यांना महाराष्ट्रांतल्याप्रमाणे बलुतेदारही न बनविता केवळ पिढीजाद पशुतुल्य गुलामगिरीची सनद दक्षिण देशांत विशेषत: मलबारांत दिलेली आज आढळते. हे प्राणी एके काळी स्वत:च्याच असलेल्या शेतांत नंबुद्री ब्राह्मण आणि त्यांचे हस्तक नायर क्षत्रिय ह्यांच्या तैनातींत वंदे गुलाम बनलं आहेत. हे मनुस्मृतींचे जुलमी राजकारण !


वरील एकंदर विवेचनावरुन द्राविड आणि मलबार देशांतील हल्लीच्या प्रचंड संख्येच्या अस्पृश्यांच्या विकासांचे तीन टप्पे होतात असें मला वाटतें. (१) पान ३९-४० वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे द्राविड देशांत अस्पृश्यतेची संख्या आर्यांच्या आगमनापूर्वाही असावी. पण ही कशी व किती उग्र स्वरुपाची होती ह्याचा पुरावा आता उपलब्ध नाही. (२) उत्तरेकडे बौद्ध जैनाचा विजय होऊन आर्यांच्या वर्णव्यवस्थेला जो अडथळा झाला त्या वेळी, किंबहुना कदाचित् त्यापूर्वीही, आर्यांच्या दक्षिणेकडे ज्या थोड्या नंबुद्री ब्राह्मणांच्यासारख्या वसाहती झाल्या त्यांच्या ग्रामसंस्थेमुळे अस्पृश्यतेचा दुसरा मजला तयार झाला. (३) नुकतेंच वर वर्णिल्याप्रमाणे हट्टी पाखाड्यांची मोठ्या प्रमाणात अस्पृश्यांत गणना करुन हल्लीचा प्रचड तिसरा मजला तयार झाला.


ह्या शेवटच्या टप्प्यासंबंधी दक्षिण हिंदुस्थानांत जरी भरपूर पुरावा अद्यापि गोळा करण्यांत आला नाही तरी तो उत्तर आणि पूर्व हिंदुस्थानांतील संशोधकाना सुदैवाने निश्चित उपलब्ध झाला आहे. तो कसा ते पुढींल परिच्छेदांत पाहूं.


वर वर पाहतां अखिल भरतखंडांत हिंदूची वर्णव्यवस्था रूढ झालेली जरी दिसत आहे तरी तिचा तपशील आणि जोर निरनिराळ्या प्रांतात अगदी निराळा आहे. ह्या भिन्नतेचें कारण ब्राह्मणी आणि बौद्ध संस्कृतीची भिन्नाभन्न काळीं भिन्नभिन्न कारणांनी झालेली झटापट हें होय. पंजाब आणि वायव्येकडील प्रांतांत जी व्यवस्था आहे, ती बिहार, बंगाल ओरिसाकडे आढळत नाही आणि खाली द्राविड देशांत अगदीच निराळी आहे. बिहार, बंगाल देशांत बौद्ध धर्माचा उदय आणि अंमल जारी असल्याने आणि हिंदुस्थानांत याच भागांत बौद्ध धर्म उद्य पावन तो येथेच सर्वांत अधिक काळ टिकल्याने येथील जातिभेदाची रचना इतर प्रांताहून अगदी निराळी दिसते. येथे ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन उच्च वर्णांची जी तुरळक वस्ती आहे ती बाहेरूनच आलेली आहे. वैद्य, कायत्थ हा जो मोठा मध्यम वर्ग आहे तो क्षत्रिय आणि वैश्य यांचे मिश्रण आहे. आणि बाकी उरलेला जो मोठा बहुजनसमाज ते निर्भेळ आर्येंतर आणि एकेकाळीं पूर्ण बुद्धानुयायी होता. बाराव्या शतकांत मुसलमानांची अकस्मात् धाड येऊन जी राज्यक्रांति झाली तिचा धक्का जीर्ण झालेल्या बौद्धधर्माला लागून, तो नष्ट झाला. मुसलमानी हल्ल्याची ही लाट ओसरून गेल्यावर बौद्धांच्या ठिकाणी ब्राह्मणांनी तत्कालीन क्षत्रिय राजांच्या साह्याने समाजाची हल्ली रुढ असलेली पुनर्घटना केली. ह्या घडामोडींत बल्लाळसेन हा राजा प्रमुख होता. त्याने नवीनच स्मृति बनवून केवळ ब्राह्मणांच्या दृष्टीने आचरणीय, अनाचरणीय, अस्पृश्य आणि ग्रामबाह्य वगैरे जनसमूहाचे नवीन वर्ग बनविले. अर्थात् ह्या उलाढालींत नवीनच एका मोठ्या अस्पृश्य वर्गाची समाजात भर पडली. ही गोष्ट आधुनिक संशोधनामुळे कशी सिद्ध होत आहे ते पांहू.


संशोधनाचे कार्मी बंगाली पंडितांनी अलीकडे बरीच आघाडी मारली आहे. हिंदुस्थानांतून बौद्ध धर्म अजीबाद नष्ट झाला आहे अशी असून पुष्कळांची समजूत आहे. पण खरा प्रकार तसा नसून बंगाल्यातील कांही भागांतून आणि विशेषत: ओरिसांतील कांही कानाकोप-यात हा धर्म काही अप्रसिद्ध आणि मागासलेल्या जातींत अद्यापि प्रचलित आहे. व त्याची गणना चुकून हिंदुधर्मांतच होते, असा शोध प्रसिद्ध संशोधक महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री ह्यांनी केला आहे. ओरिसांत मयूरभंज म्हणून एक लहानसें संस्थान आहे. तेथील महाराजांच्या साह्याने बाबू नगेंद्रनाथ वसू, बंगाली विश्वकोशाचे संपादक, ह्यांनी १९०८ साली त्या संस्थानच्या जंगलांत प्रवास केला, तेव्हा त्यांना जे शोध लागले ते त्यांनी इ. स. १९११ साली Modern Buddhism and its followers in Orissa ( 'आधुनिक बौद्धधर्म आणि त्याचे ओरिसांतील अनुयायी') ह्या नांवाच्या पुस्तकाच्या रुपाने प्रसिद्ध केले आहेत. त्या पुस्तकाला सदर हरप्रसाद शास्त्री यांनी आपली विस्तृत आणि अधिकारयुक्त प्रस्तावना जोडिली आहे. पान २४ वर शास्त्री महाशय लिहितात :

 

" इ.स.च्या १२ वे शतकाचे शेवटी मुसलमानांची टोळधाड हिंदुस्थानावर पडली. त्यांनी प्रमुख बौद्ध मठांचा आणि विश्वविद्यालयांचा नाश करुन त्या ठिकाणी आपल्या लष्कराचें ठाणें केलें. हजारों साधूंचा शिरश्छेद करुन त्यांची संपत्ति लुटली, पुस्तकांलयें जाळलीं,... ब्राह्मणांनी ह्या संधीचा फायदा घेऊन बौद्धधर्म हिंदुस्थानांतून समूळ नाहीसा झाला असें भासविण्यास सुरुवात केली. सुशिक्षित आणि बुद्धिवान बौद्ध मारले गेले, अथवा दूरदेशी पळून गेले. मागे त्यांचा प्रांत ब्राह्मणांच्या कारवाईला मोकळा झाला. पुष्कळ बौद्धांना जबरीने किंवा फुसलाऊन मुसलमानी धर्मांत कोंबण्यांत आलें. अशिक्षित बौद्ध बहुजनसमाज कोकरांच्या कळयाप्रमाणे निराश्रित झाला. त्याला मुसलमानी किंवा हिंदु धर्माचा नाइलाजाने आश्रय घ्यावा लागला. अशा निराश्रितापैकी जे पूर्णपणे आपल्या कह्यांत येण्यास कबूल होते. त्यानाच दुराग्रही ब्राह्मणांनी हिंदु धर्मांत घेतले. अशांना नवशाखा शूद्र अशी बंगाली समाजांत संज्ञा आहे. ह्याशिवाय इतर जो बौद्धांचा मोठा भाग स्वतंत्रपणे राहूं लागला, तो बहिष्कृत होऊन अनाचरणीय उर्फ अस्पृश्य ठरला."


ह्या अनाचरणीय जाती हल्ली जरी अस्पृश्य हिंदु समजण्यांत येत आहेत तरी त्या पूर्वी चांगल्या सन्माननीय बौद्ध होत्या. त्यापैकी हल्ली सर्वच अस्पृश्य नाहीत. नुसत्या अनाचरणीय म्हणजे ज्यांचे पाणी ब्राह्मणास चालत नाहीत अशा होत. वणिक् सोनाराची जात अतिशय श्रीमंत व वजनदार असूनही ती अशीच अनाचरणीय आहे. त्यांची गणना नवशाका शूद्रापेक्षाही अधिक खालची गणली जात आहे. ते पूर्वी चांगले बौद्ध होते. पण त्यांच्यावर ह्या धांदलीच्या काळांत बल्लाळसेन ह्या हिंदु राजाचा कांही इनामी कारस्थानामुले राग होऊन ते असे खाली दडपले गेले. मग इतर सामान्य पण स्वातंत्र्येच्छु जाती अगदी हीन व अस्पृश्य बनल्या ह्यांत काय नवल ! मुसलमानांची पहिली धडाडी संपून त्यांचा जम बसल्यावर आणि बौद्धधर्म दडपून गेल्यावर बंगाल्यांत हिंदु धर्मांची नवी घडी पुन: बसू लागली. ह्या संबंधी ह्या शास्त्रीपंडितांचे असें मत आहे की लोकांना आपल्या पूर्वापार ख-या संबंधांचा विसर पडला. आणि ब्राह्मण सांगतील त्याप्रमाणे हल्लीचे जातिभेद संकरजन्य अगर बहिष्कारजन्य आहेत असा समज दृढ झाला. ह्या नवीन रचनेच्या शिरोभागी ब्राह्मण विराजमान झाले. इतकेंच नव्हे तर उलटपक्षीं कित्येक कुशल कारागीर जाती आणि संपन्न व्यापारी वर्ग देखील ते पूर्वी सन्मान्य बौद्ध होते ते या मनूंत हीनत्वाप्रत पोचले. ज्यांच्या पूर्वजांनी कांही शतकापूर्वी बुद्धधर्मांची तत्त्वे तिबेट आणि चीन देशांत पसरलीं, ज्यांनी जलप्रवास करुन हिंदुस्थानचा उद्योग आणि व्यापार वाढविला अशी 'मनसार भाषान्' इत्यादि आद्य बंगाली ग्रंथांतून भडक वर्णनें आहेत, तेच आज केवळ ब्राह्मणांच्या कटाक्षामुळें अनाचरणीय व तिरस्करणीय बनले आहेत ! ( Modern Buddhism प्रस्तावना पान २३ पहा.)


पण अशा विपन्नावस्थेमध्येंही बौद्ध धर्म अगदीच नष्ट झाला नसून तो गुप्तरुपाने हीनदीन समाजाच्या वहिवाटींत अद्यापि असला पाहिजे अशी बळकट शंका आल्यावरुन तो शोधून काढण्याचे काम गेल्या शतकाचे शेवटी व चालू शतकाचे आरंभी धाडसी आणि सहानुभूतिसंपन्न शोधकांनी चालविलें होतें. अशापैकी एक संशोधक बाबू नगेद्रनाथ बसू हे ओरिसा प्रांतांतील मयूरभंज संस्थानचे मालक महाराज श्री रामचंद्र भेज देव ह्यांच्याबरोबर त्या संस्थानांतील जंगलांत फिरत होते. ते खिचिंग नावाच्या खेड्याजवळ पोहोचले असता त्यांना 'पान' नावाच्या अस्पृश्य जातीच्या काही तरुण पोरांनी मनोहर गाणी गाऊन दाखविली. धर्मगीता नांवाच्या जुन्या ग्रंथांशी त्याचा संदर्भ जुळल्याने नगेंद्र बाबूंना साश्चर्य आनंद झाला. त्यानंतर त्यांना कांही वृद्द माणसें भेटलीं. त्यांनी जुन्या बुद्धानुयायी पाल राजांची गाणी गाऊन दाखविली. अशा रीतीनें ह्या ओसाड जंगलांत विस्मृतिगर्तीत दडपून गेलेल्या बौद्ध धर्माचा आकस्मिक सुगावा लागल्यामुळें या बाबूंनी आपला शोव पुढे नेटाने चालविला. बडसाई आणि खिचिंग गांवांजवळ त्यांना ओरिया भाषेंतील कांही हस्तलिखित पोथ्या, एक जुना बौद्ध स्तूप, धर्मराज आणि शीतला ह्या महायान बौद्ध पंथाच्या मूर्ति व इतर खाणाखुणांचा शोध लागला. पण सर्वांत आश्चर्यांची गोष्टी ही की ह्या सर्व गत वस्तु आजवर भक्तीने संभाळून ठेवल्याचें सर्व श्रेय नगेंद्रबाबू बाथुरी अथवा बाउरी या हीन व अस्पृश्य मानिलेल्या जातीलाच देत आहेत !


सोळाव्या शतकांतील ओरिसाला राजा प्रतापरूद्र ह्याच्या कारकीर्दीत बलरामदास नांवाचा कवि होऊन गेला. हा प्रतापरुद्राच्या छळाला भिऊन आपला बुद्ध धर्म छपवून ठेऊन हिंदूधर्मांत मिळून मिळवून रहात होता. त्याने आपल्या 'गणेश विभूति' नांवाच्या ओरिसा भाषेंतील काव्यावर आपणच 'सिद्धांताडंबर' नांवाची टीका केली आहे. त्यांत त्याने बाथुरी जातीची पूर्वपीठिका अशी सांगितली आहे.
खालील उता-यावरुन आपल्यास जातां जातां ओरिया भाषेशीं मराठीचे किती साम्य आहे हेंही दिसेल.

Read more: प्रकरण पाचवे : उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्य

प्रकरण पहिले : सामान्य आलोचन

अस्पृश्यता ही एक पुरातन सामाजिक जागतिक संस्था आहे.  तिचा व्याप सर्व जुनें जग भरून, निदान आशिया खंड भरून तरी, असल्याचे पुरावे प्राचीन इतिहासांत, व हल्लीच्या काळांतही, वर्तमान असलेले आढळतात.  पूर्वेकडे चीनांत व जपानांत अस्पृश्यता अद्यापि रेंगाळते.  ब्रह्मदेशांत तर मी स्वतः शोधून स्पष्ट पाहिली आहे.  पश्चिमेकडे सामान्यतः भूमध्यसमुद्राच्या पूर्वेकडील प्राचीन राष्ट्रांत, विशेषतः इश्रायल लोकांत, ही संस्था होती.  जेथे जेथे देवपूजकांची व पुरोहितांची एक निराळी जात आणि वृत्ति स्थापित झाली आणि अशा वार्तिकांच्या प्रेरणेने राजकर्त्यांच्या व त्यांच्या प्रभावळींतल्या उच्चवर्णीयांच्या रक्ताला जेथे जेथे सोवळेपणा आला, तेथे तेथे ही संस्था जुन्या नव्या जगाच्या इतिहासांत उदयास आली आहे. म्हणून ही संस्था आर्यांचेंच अगर कोणा एका विशिष्ट मानववंशाचें एक विशेष कृत्य आहे, असें मानण्याचें कारण नाही. तथापि इतकें मात्र निर्विवाद आहे की आपल्या भरतखंडांत, विशेषतः दक्षिणेकडील द्राविड देशांत, ह्या सामाजिक तोडग्याचा प्रयोग आर्य अथवा द्राविड म्हणविणारांकडून जितक्या पद्धतशीर रीतीने अगदी ह्या घडीपर्यंत करण्यांत आला आहे, आणि ह्या प्रयोगाला येथे जें यश आलें आहे, तो प्रयोग, ती पद्धत आणि तें यश इतरत्र कोठेच-निदान येथील प्रमाणांत तरी - आढळणार नाही.  म्हणून अस्पृश्यता ही भारतीय सामाजिक संस्कृतीचें एक विशिष्ट आणि मुख्य लक्षण आहे, असें म्हणणें इतिहासज्ञाला भाग पडेल, असें मला वाटतें.
 

व्याख्या
प्रस्तुत विषयासाठी अस्पृश्यतेची थोडक्यांत एक कामचलाऊ व्याख्या करणें अवश्य आहे.  सोयेर, सुतक, रजोदर्शन, सांसर्गिक रोग, इत्यादि वैयक्तिक, कौटुंबिक आणि प्रासंगिक बाबींसंबंधीं अस्पृश्यता हल्ली देखील हिंदुस्थानांत, तशीच बाहेरील राष्ट्रांतही, पाळलेली पुष्कळ ठिकाणीं आढळते.  फरक इतकाच की पहिल्या तीन बाबी जंगली लोकांत व चौथी सुधारलेल्या देशांतील रुग्णालयांतच आढळते. पण ही नैमित्तिक अस्पृश्यता ह्या निबंधाचा विषय नव्हे.  नित्य अस्पृश्यता हीच केवळ ह्या निबंधाचा विषय आहे; आणि ह्या निबंधाच्या हेतूपुरती, ह्या अस्पृश्यतेची कामचलाऊ व्याख्या मी करीत आहें.

विवक्षित जातीच्या जाती उर्फ राष्ट्रें वंशपरंपरेने अस्पृश्य मानणें, त्या जाती अशा अस्पृश्य राहाव्यात म्हणून त्यांना अगदी गांवाबाहेर, पण फार दूर नाही, अशा निराळ्या वस्तींत डांबणें, व जर कोणी स्पृश्यांनी किंवा अस्पृश्यांनी हा बहिष्काराचा नियम मोडला तर त्या दोघांवरही प्रचलित धार्मिक आणि राजकीय कायद्यांची अंमलबजावणी करणें, ह्या तीन्ही गोष्टी भारतीय अस्पृश्यतेचीं मुख्य लक्षणें आहेत.  म्हणजे ही अस्पृश्यता केवळ स्थानिक अथवा धार्मिक नसून ती जातीय उर्फ राष्ट्रीय आणि नित्य स्वरूपाची आहे. एखाद्या मानीव अस्पृश्याने आपला धर्म बदलला, किंबहुना प्रचलित राजसत्तेनेही आपला धर्म बदलला, तरी भारतीय रूढि आणि ह्या देशांत वेळोवेळीं स्थापित होणार्‍या राजसत्तेच्या कायद्यांनी तिला दिलेली मान्यता कायम असेपर्यंत, अस्पृश्यता ही कायमच असावी अशी भारतीय अस्पृश्यतेची उपपत्ति आहे. मुसलमान भंगी, मजबी शीख, आणि मद्रासेकडील रोमन कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मांत घेतलेले पारिया, हे हल्ली हिंदु नसूनही अस्पृश्यच आहेत.  केवळ अस्पृश्यच नव्हे तर ग्रामबाह्यही आहेत.  हल्लीचें हिंदुस्थान सरकार स्वतः ख्रिस्ती म्हणवीत असलें तरी त्यानें आपला कायदा, रूढि आणि तिर्‍हाईतपणा ह्या दोन विक्षिप्‍त आणि लवचीक तत्त्वांवर स्थापिला असल्यामुळें, ह्या कायद्याचा आश्रय अस्पृश्यांना उपपत्तीच्या दृष्टीनेही मिळणें शक्य नाही; मग व्यवहारांत त्याची अंमलबजावणी उलटच होत असल्यास त्यांत आश्चर्य काय !  इ. स. १८४३ त हिंदुस्थान सरकारने कायदा करून येथील गुलामगिरी बेकायदेशीर केली; पण अस्पृश्यता अद्यापि कायदेशीरच आहे !  हल्लीची राउंडटेबल परिषद संपली, किंबहुना गेल्या सप्टेंबर महिन्यांत महात्मा गांधींनी केलेल्या प्रायोपवेशनामुळें घडलेला अस्पृश्यांसंबंधाचा ''पुण्याचा करार'' राजमान्य झाला, तरी अस्पृश्यता ही अवदसा कायमच राहील अशीं चिन्हें दिसत आहेत.  जातीय अस्पृश्यता, सार्वत्रिक बहिष्कार आणि कायद्याच्या दृष्टीने सार्वकालिक निराश्रितपणा हीं तीन लक्षणें भारतीय अस्पृश्यतेचीं आजतागायत तरी कायम आहेत.  मुसलमानी अमदानींत धर्मांतराने ही अस्पृश्यता नष्ट होत असे.  कारण मुसलमानी कायदा हिंदु रूढीला मुळींच जुमानीत नसे.  पण ब्रिटिश हिंदी सरकार ह्या बाबतींत अधिक भित्रें आणि कावेबाज आहे.  आणि ख्रिस्ती धर्मही महंमदी धर्मापेक्षा अधिक लवचीक आहे.  ख्रिस्ती झालेल्याची अस्पृश्यता नष्ट होत नसून केवळ बेपत्ता होते.  म्हणजे तिचा नीट नेमकां पत्ता न लागल्यामुळें बहिष्काराची कुर्‍हाड तिच्यावर नेमकी उगारणें कठीण जातें.  पण जर का पत्ता लागला तर ह्या कुर्‍हाडीच्या उलट आश्रय देण्याचें सामर्थ्य प्रचलित ब्रिटिश कायद्यांतही नाही, ख्रिस्ती धर्मांत तर नाहीच नाही हें उघड आहे.  पुण्याच्या शेजारच्याच अहमदनगर जिल्ह्यांत-अहमदनगर शहराला लागूनही- ख्रिस्ती झालेल्यांचे महारवाडे व मांगवाडे ख्रिस्ती न झालेल्यांच्याप्रमाणेंच बहिष्कृत स्थितींत आहेत.  ज्यांना ह्या विधानाविषयीं शंका येत असेल त्यांनी मद्रास इलाख्यांतील मागासलेल्या ख्रिस्ती समाजाची आणि मुंबई इलाख्यांतील अहमदनगर, गुजराथ, काठेवाड कडील ख्रिस्ती अस्पृश्यांची स्थिति किती ग्रामबाह्य आणि हलाखीची आहे हें जाऊन पाहावें. जावें त्याच्या वंशा तेव्हा कळे !  'नित्य विटाळ मानणें, गांवाबाहेर राहावयास लावणें व कायद्याच्या दृष्टीने निराश्रित असणें, ह्या तीन लक्षणांनी अन्वित एक राष्ट्रीय संस्था अशी आमची व्याख्या तयार झाली; आणि ह्या व्याख्येने ओळखली जाणारी अस्पृश्यता केवळ आमच्या भरतखंडांत आणि शेजारच्या ब्रह्मदेशांतच आढळून येणारी आहे.

उदय
अस्पृश्यता ही एक स्वतंत्र मानवी संस्था आहे. हिचा उदय मानवी जातीच्या अगदी प्राथमिक स्थितींतच झाला असला पाहिजे.  भूत, प्रेत, पिशाच इत्यादि कल्पना मानवी जातीच्या प्राथमिक म्हणजे अगदी रानटी स्थितींत सर्वत्र पसरलेल्या होत्या.  तौलनिक धर्मशास्त्रांत ह्या कल्पनासमुच्चयाला 'भूतवाद' (Animism) असें नांव आहे.  हा भूतवाद व ह्याप्रमाणेंच इतर प्राथमिक धर्माच्या अडाणी कल्पना व त्यांवरून बनलेल्या जादू टोणा, थातुर मातुर इत्यादिकांना मी पुढे 'अपधर्म' असें नांव दिलें आहे.  ज्या धर्माचा पाया मानवी प्रज्ञा आहे तो जरी पुढे निष्काळजीपणामुळें विकृत झाला तरी त्याला मी 'अपधर्म' हें नांव देणार नाही.  रागावलेल्या भूतांना संतुष्ट करणें किंवा एखाद्या भूताला लालूच दाखवून किंवा भेवडावून त्याच्याकडून आपल्याला इष्ट असा अर्थ किंवा अनर्थ घडवून आणणें शक्य आहे, अशी प्राथमिक मानवाची समजूत असे. ह्या समजुतीप्रमाणें जादू, टोणा, मंत्र, तंत्र, यंत्र वगैरे जे अपधर्माचे अनेक प्रकार असत, त्याला 'अभिचार' (Magic) असें एक सामान्य नागर नांव देतां येईल.  ह्याचे 'कृष्ण अभिचार' (Black Magic) आणि 'भेषज' (Medicinal) अथवा 'शुक्ल अभिचार' (White Magic) असे दोन मुख्य प्रकार सुधारलेल्या वैदिक काळांतही होते.  पहिला प्रकार विशेषतः अथर्व वेदांत आणि दुसरा ॠग्वेदादि वेदत्रयींत विपुल आढळतो. दोन्ही प्रकारचा अपधर्म प्राचीन काळीं सर्व प्राथमिक जगांत होता, इतकेंच नव्हे तर हल्लीच्या रानटी जातींत आणि पुष्कळ ठिकाणीं सुधारलेल्या पाश्चात्य राष्ट्रांतूनही अद्यापि आढळतो.  तो मी युरोपांत रोमन कॅथॉलिक चर्चमध्यें सौम्य रूपांत आढळणारा स्वतः पाहिला आहे.  जन्म, मृत्यु, साथीचे रोग व इतर आकस्मिक आपत्ति ह्यांचा संबंध प्राथमिक जगांत भुतांखेतांकडे आणि क्रुद्ध देवतांकडे लावण्यांत येत असे.  त्यांचें निवारण करण्यांत निष्णात असे पंचाक्षरी अथवा वैदू (Medicine Men) होते, तेच पूर्वकाळचे ॠषि आणि पुरोहित असत.  त्यांच्या बर्‍या वाईट क्रियांना जादू किंवा अभिचार म्हणतां येईल.  ह्याप्रमाणें ह्या जादूचा प्राचीन धर्मांत समावेश झाला, तो अद्यापि पुष्कळ ठिकाणीं सामान्य जनतेंत प्रचलित आहे.  ह्या अपधर्मांतच अस्पृश्यतेचा उगम आहे.

अभिचारापासून अस्पृश्यतेचा उगम
प्रथम प्रथम ही अस्पृश्यता वैयक्तिक व प्रासंगिक उर्फ नैमित्तिक होती.  बाळंतीण व तिची खोली, मृतांची जागा व आप्‍त, विशिष्ट रोगी, झपाटलेलीं माणसें, विक्षिप्‍त झाडें, खुनासारख्या अपघाताचीं ठिकाणें वगैरे बाबी अस्पृश्य आणि वर्जनीय ठरल्या.  जादू करणारे जादूगार आणि पुरोहित हे देखील सोंवळे म्हणजे एकप्रकारें अस्पृश्यच असत.  देवपूजा करणार्‍या ब्राह्मणाला आणि यज्ञपरिषद चालू असे तोंपर्यंत सर्व ॠत्विजांना आणि इतर याज्ञिकांना नेहमी सोवळ्यांत म्हणजे अस्पृश्य अथवा अलग स्थितींतच राहावें लागे.  कर्नाटकांत मादिग (मातंग) जातीचे ढकलगार म्हणून जे धर्मगुरु आहेत त्यांना स्वतः त्यांचे अनुयायी मादिगही शिवत नाहीत, इतकेंच नव्हे तर त्यांना आपल्या पाणवठ्यांनाही शिवूं देत नाहीत, हें मी प्रत्यक्ष पाहिलें आहे. कर्नाटकांत गदग तालुक्यांत डॉ. कुर्तकोटीच्या बंधूंनी मला हा प्रकार दाखविला. अशा अपधर्माला उत्तरोत्तर जसजसें गूढ आणि दृढ स्वरूप प्राप्‍त होऊन पुरोहितांच्या द्वारें त्याची परंपरा आणि घटना बनत चालली तसतशी ह्या अस्पृश्यतेच्या वैयक्तिक आणि स्थानिक स्वरूपाची परिणति जातीय आणि सार्वत्रिक ऊर्फ नित्य स्वरूपांत होऊं लागली.  निरनिराळ्या मानव जातींत आणि वंशांत पूर्वी अभेद्य शत्रुत्वच असणें साहजिक होतें.  मित्रत्व केवळ अपवादच.  एका जातीचीं पूजेचीं स्थानें आणि उपकरणें परक्या जातीला अगम्य आणि अस्पृश्य असत.  सुधारलेल्या वैदिक काळांत देखील ही परस्पर अस्पृश्यता फार जोरांत होती.  इराणी आर्य व हिंदी आर्य हे झरदुष्ट्राच्या काळानंतर विभक्त झाले. त्यानंतर इराणी आपल्यास 'असुरयज्ञ' म्हणजे असुराची पूजा करणारे आणि हिंदी आपणास 'देवयज्ञ' म्हणजे देवांची पूजा करणारे म्हणवूं लागले. हे असुरयाजी व देवयाजी परस्परांना परस्परांच्या यज्ञस्थानांच्या वार्‍यालाही उभे राहूं देत नसत व तीं स्थानेंही स्वतः अस्पृश्य समजत.  म्हणजे परकीयांचें यज्ञस्थान स्वतःला अस्पृश्य आणि त्याज्य व स्वकीयांचें यज्ञस्थान स्वतालाही सोंवळें (अगम्य) अशी वहिवाट असे.  एकाचा धर्म तो दुसर्‍याचा अपधर्म आणि दुसर्‍याचा धर्म तो पहिल्याचा अपधर्म अशी समजूत बळावून जातिद्वेष माजत असे.  आणि अस्पृश्यतेचें मूळकारण हा जो अभिचारमूलक अपधर्म तो जरी पुढे लुप्‍त होऊन विस्मृत झाला तरी जातीय अस्पृश्यता शिल्लक उरलीच.  यहुदी लोक शेजारच्या सुमेरिया देशांतील लोकांना अस्पृश्य मानीत असत हें बायबलांतील भल्या सम्यारिटनच्या गोष्टींतील तात्पर्यावरून आजमावितां येतें.  येशू ख्रिस्ताला तहान लागली असतां त्याने एका सुमेरियन बाईजवळ पाणी मागितलें; तेव्हा ती म्हणते, ''तूं ज्यू असून कसें मला पाणी मागतोस ?  कारण ज्यूंचा सुमेरियन लोकांशीं कोणत्याही प्रकारें व्यवहार घडत नाही.''  (सेंट जॉनकृत शुभवर्तमान अध्याय ४, श्लोक ९ पहा.) अशीं दुसरींही अनेक उदाहरणें सामाजिक इतिहासांतून देतां येतील.

व्याप्ति
वैयक्तिक आणि जातीय अस्पृश्यतेची व्युत्पत्ति वर सामान्यतः सांगितली.  असली अस्पृश्यता प्राचीन आर्यांतच होती असें नसून बर्‍याच प्राथमिक राष्ट्रांत, विशेषतः सुधारलेल्या संराष्ट्रांत होती. अस्पृश्यतेचा विकास वैयक्तिक स्वरूपांतून जातीय स्वरूपांत होण्यापूर्वीं राज्यांचा विकास साम्राज्यांत झाला असणें समाजवर्धनशास्त्राच्या दृष्टीने आवश्यक आहे.  जी जात अथवा राष्ट्र दुसर्‍या सबंध जातीला किंवा राष्ट्राला ज्या काळीं कायमचें अस्पृश्य मानितें व तें राष्ट्र मानून घेतें, ती विजयी जात त्या काळीं सम्राट स्थितीला पोचली असावी लागते.  अशा विजयी जातीने दहा पांच इतर मागासलेल्या जातींचा पराजय केल्यावर अशाच एका पराजित जातीला कायमचें हस्तगत करून आपल्या शुश्रूषेस ठेवण्याच्या कल्पनेचा त्या विजयी जातीमध्यें उदय होतो. म्हणजेच साम्राज्याचा उदय होणें होय.  आणि तेव्हाच जातीय गुलामगिरीचा उर्फ अस्पृश्यतेचा उदय होणें शक्य असतें.  जातीय अस्पृश्यता हा एक गुलामगिरीचाच प्रकार - अर्थात अत्यंत कठोर प्रकार-होय.  असा प्रकार असीरिया, बाबिलोनिया इत्यादि द्राविड, इस्त्रायल, आरब वगैरे सेमिटिक, इराणी, मीड इत्यादि आर्य, चीन, जपान वगैरे मोंगल - अशा अनेक वंशांच्या अनेक देशांत आढळून येत होता.

ताबू उर्फ विटाळ
वर ज्या अस्पृश्यतेचा उदय आणि व्याप्ति सामान्यत्वेंकरून निर्दिष्ट केली ती कालतः दोन प्रकारची म्हणजे नैमित्तिक आणि नित्य अशा दोन स्वरूपांची आहे हें वर सांगितलें आहेच.  ह्याशिवाय वरील अस्पृश्यतेचे आणखी दोन प्रकार आहेत ते असे.  एक तिरस्करणीय व दुसरा आदरणीय.  लौकिक मराठी भाषेंत एकीला विटाळ व दुसरीला सोवळें अशीं नांवें आहेत.  ह्या दोन्ही प्रकारांची व्याप्ति हिंदुस्थानच्या बाहेरही होती व आहे.  ज्याला मराठींत सोवळें असें नांव आहे त्याला इंग्रजींत ताबू (Taboo) असें म्हणतात.  अद्यापि जंगली जातींत, विशेषतः आग्नेय आशियांतील बेटांतून राहाणार्‍या जंगली जातीच्या लोकांत, ह्या अस्पृश्यत्वाचा व तद्दर्शक शब्दांचा प्रचार जास्त आहे.  ह्या शब्दांत जरी तिरस्करणीय आणि माननीय ह्या दोन्ही अर्थांच्या अस्पृश्यत्वाचा समावेश होतो तरी दुसर्‍या म्हणजे सोवळेपणाच्या प्रकाराचा प्रचार इंग्रजी शब्दाने जास्त दाखविण्यांत येतो.  ह्या विचित्र शब्दाची उत्पत्ति मी बरींच वर्षें शोधीत आहें.  इंग्रजी कोशांतून, ह्या शब्दाचें मूळ पॉलिनेशियन जंगली भाषांत आहे, ह्यापेक्षा जास्त खुलासा सांपडत नाही.  प. लो. बा. टिळकांचा एक इंग्रजी निबंध "Khaldian and Indian Vedas" (खाल्डियन आणि भारतीय वेद) हा डॉ. सर रामकृष्ण भांडारकर ह्यांच्या स्मरणार्थ लिहिलेल्या निबंधसमूहांत मी वाचला.  त्यांत टिळकांनी अथर्ववेदांतील ॠचेचा उतारा दिला आहे.  ती ॠचा ही :
ताबुवं न ताबुवं न घे त्वमसि ताबुवम् । ताबुवेना रसं विषम् ॥
अथर्वसंहिता, ५. ३. १०.

प्रो. ब्लूमफील्डने Sacred Books of the East Series, Vol.XLII, Page २८ वर पुढीलप्रमाणें तिचें भाषांतर केलें आहे. _ "Tabuvam (or) not Tabuvam, thou (O serpent) art not Tabuvam.  Through Tabuvam the poison in bereft of force." अर्थ :- 'ताबुव असो वा अताबुव असो.  (रे सर्पां) तूं ताबुव नाहीस.  ताबुवामुळें तुझ्या विषाचा जोर नाहीसा होतो.'  अथर्ववेदांतील हा ताबुव शब्द आणि इंग्रजी कोशांतील Taboo हा शब्द एकच असावेत अशी मला जबर शंका येऊं लागली आहे.  तिला खालील कारणें आहेत.  ताबुव शब्दांत मूळरूप 'ताबू' इतकेंच असावें. 'व' हा केवळ आदेश आहे.  तो आर्य आणि अनार्य उकारान्त शब्दांना विभक्तींच्या पूर्वीं लागणें साहजिक आहे.  'एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका' आणि 'हेस्टिंग्स एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन ऍन्ड एथिक्स' ह्या दोन कोशांतून अशी माहिती मिळते की ताबू हा शब्द प्रथम कॅपटन कुक ह्यांस पॉलिनेशिआंतील टोंगा नांवाच्या बेटांत इ. स. १७७७ सालीं आढळला.  त्यापूर्वीं युरोपीय भाषांतून ह्याचा प्रचार नसे. पश्चिम मादागास्करमध्यें 'फादी', मलाया द्वीपकल्पांत 'पंमाल्ली', मलानेसियामध्यें 'ताबु, तापु' वगैरे ह्याच अर्थाचे निराळे शब्द आहेत.  एकंदरींत ही ताबूची संस्था हिंदुस्तानांतील सोवळें आणि विटाळ ह्याच स्वरूपाची तंतोतंत आहे.  वरील शब्दांपैकी पंमाल्ली हा शब्द द्राविड भाषेंतील 'पंबाडा' ह्या शब्दाशीं संबद्ध असावा.  दक्षिणेंतील मल्याळी, तामीळ व तेलगु भाषांतून अस्पृश्य पारिया जातीच्या पुरोहितांना 'पंबाडा' असें म्हणतात, हें पुष्कळ ठिकाणीं मी पाहिलें आहे.  आणि दक्षिण महासागरांतील बेटांतून ताबू ह्या संस्थेचे जनक तिकडील जंगली जातींचे पुरोहित व नाईक हेच असत.  ते सोवळेपणा इतका पाळतात कीं त्यांना नुसतें पाहाणेंही धोक्याचें असतें असें सांगतात.  कर्नाटकांतील मादिग जातीचे पुरोहित ढकलगार हे आपल्या शिष्य मातंगांतही अस्पृश्य असतात हें मी वर सांगितलें आहेच.  ते नेहमी एकांतवासांत असतात.  त्यांतील एका ढकलगारांला मी एक रुपया देऊं लागलों.  तो त्याने जमिनीवर ठेवण्यास सांगितला.  हा सोवळेपणाचा मासला ढकलगारांतच नसून हिंदुस्थानांतील वरिष्ठ वर्गांत म्हणजे ब्राह्मण पुरोहितांत नैमित्तिकपणें व ब्राह्मणांच्या जुन्या वळणाच्या बायकांत नित्यपणानेच नांदत आहे.  हे सर्व प्रकार तंतोतंत ताबू ह्या संस्थेचेच होत.  हे प्रकार उत्तरेपेक्षा दक्षिण हिंदुस्थानांत, विशेषतः द्राविड देशांत आणि त्यांतल्या त्यांत मलबारांत फारच आढळतात हें विशेष ध्यानांत ठेवण्यासारखें आहे.  कारण फार प्राचीन काळीं मलबार, मादागास्कर बेट व दक्षिण आफ्रिकेचा किनारा ह्यांना जोडणारें 'लिमूरिया' नांवाचें एक खंड होतें.  तें आता आरबी समुद्राखाली बुडालेलें आहे असें प्राचीन भूगोलशात्र्यांचें मत आहे.

ताबू ह्याचें मूळरूप तापू असून त्यांत ता = खूण करणें अशी धातु असून पु हें एक अतिशयत्वबोधक क्रियाविशेषण असावें असा एनसायक्लोपीडियांतील लेखकाचा कयास आहे.  मला वाटतें कानडी भाषेंत तप्पु = चूक, दोष, असा एक शब्द आहे त्याच्याशीं ताबू ह्या शब्दाचा संबंध असावा.  भाषाशास्त्राअन्वयें तप्पूचें तापू = वू = बू अशीं रूपें होण्यास हरकत नाही, असें मला वाटतें.  वरील अथर्ववेदांतील जो उतारा दिला आहे त्याशिवाय इतरत्र कोठेही हा विक्षिप्‍त शब्द आढळत नाही.  असे विक्षिप्‍त शब्द व चाली अथर्ववेदांत पुष्कळ आढळतात, त्यावरून हा वेद आर्येतरांचा असून तो ॠग्वेदाच्याही पूर्वीचा असावा असा कित्येक विद्वानांचा कयास आहे.

हिंदी अस्पृश्यतेचें संशोधन
असो.  आपण येथवर ह्या सामान्य संस्थेचा जगांत कसा उदय आणि विकास झाला ह्याचा निर्देश केला. शिवाय प्रस्तुत निबंधापुरती आमच्या विषयाची विशिष्ट व्याख्याही वर दिली.  आता ह्यापुढे आमच्या हिंदुस्थानांत वरील तीन लक्षणांनी युक्त अशी अस्पृश्यता केव्हा रूढ झाली ह्या गोष्टीचा छडा लावण्याचा आपण प्रयत्‍न करूं या.  हें काम सोपें नाही.  कारण ह्या संस्थेविषयीं ग्रांथिक अथवा शिलालेखीय पुरावा मिळणें अशक्य आहे.  तथापि ही संस्था पुरावा नसतांही आमच्या देशांत अगदी अनादि कालापासून होतीच असेंही मानण्याचें कारण नाही. पुढील भागांत शक्य तितका प्रयत्‍न करून ह्यासंबंधीं जितके ग्रांथिक संदर्भ मिळतील तितके संकलित केले आहेत.  इतकेंच नव्हे तर ज्या काळामागे असे संदर्भ सापडत नाहीत त्या काळांत, पुढे अस्पृश्य व तिरस्करणीय ठरलेल्या कांही प्राचीन जातींच्या नांवांचा जो केवळ विरळ विरळ उल्लेख आढळतो तो हुडकून त्या जातींचा सामाजिक दर्जा काय होता तोही पुढे निर्दिष्ट केला आहे.

ऐतिहासिक व प्रागैतिहासिक कालविभाग
वेदपूर्वकालीन भारतीय इतिहासाचे पुरावे लेखी मिळणें तूर्त तरी असंभवनीय आहे.  आर्यांपूर्वीं भारतवर्षांत द्राविड अथवा मिसरी-(मित्री)-इजिप्शियन-लोक आले. तेही बाहेरूनच आले होते. त्यांचें तत्कालीन भारतीय वाङ्‌मय अद्यापि उपलब्ध नाही. इजिप्‍त (मित्र-मिस्त्र-मिसर), असिरियाकडे जें उपलब्ध असेल त्याचा संबंध भारताशीं नाही. आर्यांच्या आगमनानंतरही पुष्कळ शतकें अखिल भरतखंडांत द्राविड भाषा पसरली होती.  पैशाची, बलूची उर्फ ब्राहुवी, सिंधी, बंगाली वगैरे प्राचीन व अर्वाचीन राष्ट्रें किंवा भाषाही मुळात द्राविडी होत्या.  बलुचिस्थानांतील हल्लीची ब्राहुवी भाषा वगळली तर बाकीच्या प्राचीन द्राविडी भाषा उत्तर हिंदुस्थानांतील अर्वाचीन देशी भाषांत निरुक्तरूपाने व दक्षिण भारतांत उघड रूपाने अद्यापि विद्यमान आहेत. पण ह्या भाषांतील वाङ्‌मयावरूनही अस्पृश्यतेच्या उत्क्रमाविषयीं नीट पुरावा मिळविणें अद्यापि सुगम झालें नाही.  त्यानंतरच्या इतर सांताळादि भाषांची तीच स्थिति.  ह्यापुढच्या पाली आणि प्राकृत भाषांचें कांही ग्रंथ रोमन लिपींत आणि सिंहली लिपींत असल्यामुळें त्यांच्यांतूनही हा पुरावा शोधीत बसणें फार मुष्किलीचें आहे.  म्हणून तूर्त येऊन जाऊन संस्कृत वाङ्‌मयावरच विसंबून राहणें भाग आहे.  त्याचा आता विचार करूं.

'आर्य' ह्या नांवाचा एक विशिष्ट मानववंश नव्हता. युरोप आणि आशियांत राहणार्‍या कांही मानववंशांमध्यें एक सामान्य भाषा रूढ होती असा गेल्या शतकांत शोध लागल्यावरून त्या भाषेच्या सर्व शाखांना 'आर्य' हें नांव पाश्चात्य भाषापंडितांनी दिलें.  त्या शाखांचा मूळ संबंध हल्ली ज्या ज्या आशियांतील व युरोपांतील जातींशीं पोहोचतो त्या सर्व जातींना देखील 'आर्य' हेंच नांव कांही पाश्चात्य मानव-वंश-शास्त्री दडपून देतात.  पण हें नामाभिधान चुकीचें आहे.  हिंदुस्थानांतील ह्या भाषेला संस्कृत असें जें नांव पडलें आहे तें तर अगदी अलीकडचें, पतंजलीच्या नंतरचें, म्हणजे फार तर दोन हजार वर्षांपूर्वीचें आहे.  त्यापूर्वीं तिला वेद आणि अवेस्ता ह्या ग्रंथसमूहाची भाषा किंवा 'छांदस' ऊर्फ 'झेंद' भाषा असें नांव असे.  ह्या प्राचीन आर्य किंवा छांदस भाषेंत जें वाङ्‌मय आज उपलब्ध आहे, त्या वैदिक आणि अवेस्तिक अशीं नांवें आहेत.  ह्या वैदिक वाङ्‌मयांत संहिता, ब्राह्मण, आरण्यकें, उपनिषदें, सूत्रें इतक्यांचाच समावेश होतो.  ह्यांच्या काळाला प्राचीन अथवा प्रागैतिहासिक काळ असें म्हणतां येईल.  ह्यापुढे श्रीगौतमबुद्धाचा उदय (इ. स. पूर्वी ५६७ मध्यें ) झाला.  येथून ऐतिहासिक काळ चालू झाला.

प्रकरण दुसरे : पुरातन अस्पृश्यतेचे रुपनिदर्शन

बुद्धोदयकालीन अस्पृश्यता
गौतम बुद्धाचा उदय म्हणजे भारतीय इतिहासातील किंबहुना आशियाखंडाच्या इतिहासांतील एक मोठी मुहूर्तमेढ होय. कोणत्याही ऐतिहासिक विषयांचे विवेचन करावयाचें झाल्यास ह्या मेढीपासून पुढे, म्हणजे अलीकडे ऐतिहासिक काळात, व मागे, म्हणजे पलीकडे प्रागैतिहासिक काळांत, शोध करीत जावें लागतें. आणि आम्हालांही अस्पृश्यतेचा छडा लावण्यासाठी ह्या दोन भिन्न दिशांनी ह्या मेढीपासून आगेमागे गेलें पाहिजे. म्हणून प्रथम प्रत्यक्ष बुद्धोदयकालीं म्हणजे इ. स. पूर्वी ६०० वर्षांच्या सुमारास अस्पृश्यतेची उपरिनिर्दिष्ट व्याख्येच्या दृष्टीने किती प्रतिष्ठा झाली होती ते पाहू या. ह्या काळी उत्तर भारतांत चार वर्णांची आर्योनी तर पूर्ण स्थापना केली होतीच. ती वर्णव्यवस्था जवळ जवळ जन्मसिद्ध मानली जात असे. इतकेंच नव्हे तर ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्या दोन्ही जाती डोईजड झाल्या असून त्यांच्यांत परस्पर वर्चस्वासाठी तीव्र तंटा चालू होता. स्वत: बुद्ध आणि महावीर, तसेंच त्यांचे अनुयायी, क्षत्रिय वर्णाला सर्वश्रेष्ठ मानीत आणि ब्राह्मण वर्गास त्यांचे आश्रित समजत. पुढे जी ब्राह्मणी संस्कृतीची पुराणें झालीं त्यांतही राम, कृष्ण इत्यादि अवतारी पुरुष आणि जनकादि तत्त्वद्रष्टे हे क्षत्रियच होते; म्हणून क्षत्रियांविषयीची पूज्यबुद्धि ब्राह्मणांमध्येही पुढे रुढ झालेली आढळते. तथापि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा जातिमत्सरविषयक तंटा बुद्धाच्या पूर्वीच विकोपाला गेला होता, हें पाली आणि संस्कृत वाद्यावरुन उघड होतें. ह्या दोन डोईजड वर्णेानी वैश्य नांवाच्या सामान्य आर्य वर्गालाही तुच्छ मानिलें होतें; मग आयेंतर शूद्रांची काय कथा?


स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेsपि यांति परां गतिमे । - भगवद्गीता, ९.३२ ह्या भगवदगीतेच्या उदार उद्गारावरुनच सिद्ध होतें की त्या काळी शूद्रांप्रमाणे वैश्यांचा दर्जाही ब्राह्मण-क्षात्रियांकडून कमीच मानला गेला होता. आध्यात्मिक बाबतींत स्त्रियांचा दर्जा शूद्रांपेक्षाही कमी होता. प्रत्यक्ष गौतम बुद्धालाही स्त्रीसमाजाविषयीं म्हणण्याइतका आदर नव्हता. अशा वेळी शूद्रत्वाचाही मान ज्यांना मिळाला नव्हता अशा अतिशूद्र वर्गेाची स्थिती वरील व्याख्येप्रमाणे पूर्णपणाने बहिष्कृत होती. मानीव चार वर्णोचा हळूहळू लोप होऊन हल्ली दृढ झालेल्या जाती पोटजाती ह्यांची आर्थिक पायावर झपाट्याने उभारणी चालली होती. आणि ह्या उभारणींत अतिसूद्रांना कोणत्याही वृत्तीचा अधिकार अथवा धंद्याची मान्यता दिली गेली नव्हती. अस्पृश्य जाती ग्रामबाह्य ठरून त्या वंशपरंपरागत नीच आणि व्यवहारवर्ज्य उर्फ अनाचरणीय ठरल्या होत्या. म्हणूनच ह्या सर्व अन्यायाला विरोध करण्यासाठी गौतमाचा शुद्ध बुद्धिवाद उदय पावला. त्याच्या काळीं चंडाल, निषाद, वृषल, पुक्कस(पुल्कस) इत्यादि ज्या अस्पृ्श्य आणि ग्रामबाह्य होत्या त्यांनाही तो उपदेश करी व त्यांतील कोणी योग्य दिल्यास त्यास आपल्या भिक्षुसंघांतही नि:शंक घेई. थोडक्यांत सांगावयाचे तें हें की उत्तर भारतात, म्हणजे आर्यावर्तोत, चार वर्ण आणि त्यांतील सर्व पोटभेदांचाच तत्कालीन ग्रामव्यवस्थेंत समावेश झाला होता. आणि ह्या वर्णव्यवस्थेबाहेरील अतिशूद्रांची किंवा असतूशूद्रांची गावाबाहेर पण जवळच वस्तीची व्यवस्था झाली होती. आपस्तंब धर्मसूत्र मनुस्मृतीपेक्षा आणि भगवद्गीतेपेक्षाही जुनें आहे. तें बुद्धपूर्वकालीन असावें, निदान बुद्धसमकालीन तरी असावें. त्यांत ब्राह्मणादि उच्च वर्णींयाचा स्वयंपाक सतूशूद्रांनी करावा आणि स्वयंपाक करते वेळी आचमन म्हणजे आंघोळ कशी करावी ह्याविषयी खालील नियम आहे.


आर्याधिष्ठीता वा शूद्रा: संस्कतोर: स्यु: ।।४।। तेषां स एवाच
मनकल्प: ।।५।। अधिकमहरह: केशश्मश्रुलोमनखवापनम् ।।६।।
- आपस्तंब धर्मसूत्र, प्रश्न २, खण्डिका ३.


आर्यांच्या घरी स्वयंपाक करतांना त्यांच्या देखरेखीखाली सतूशूद्रांनी आर्यांप्रमाणेंच आचमन करुन म्हणजे हस्तपादादि अवयव धुवून रोज रोज केस, मिशा, नखें काढून कामाला लागावें, असा संप्रदाय होता. हल्लीही अस्पृश्य मानलेल्या बटलरांना युरोपियन साहेबांच्या बंगल्यांत हेच नियम हुबेहूब पाळावे लागतात. पुढे ह्याच आपस्तंब सूत्रांत म्हटलें आहे की..


अप्रयतोपहतमर्त अप्रयर्त न त्वभोज्यम् ।।२१।। अप्रयतेन तु शूद्रेणे उपहृतमभोज्यम् ।।२२।।


रा. सातवेळकरांनी प्रयत शब्दाचा अर्थ स्वच्छ असा केला आहे. त्यांचा अर्थ आर्योच्या नियमनाखाली आलेला किंवा वर्णव्यवस्थेत स्वीकारलेला शूद्र असाही होईल. शिकवून तयार केलेला-ट्रेन्ड-असा अर्थ होईल. अशा शिकलेल्या शुद्राने आणलेलें अन्न घ्यावें, अप्रयत म्हणजे न शिकलेल्या -अन्टे्रन्ड असतशूद्राचें घेऊ नये, आता अर्थ होतो. ह्यावरून अप्रयत शूद्र हेच ग्रामबाह्य अतिशूद्र असावेत असा तर्क होता. अशाच एका बहिष्कृत बाईजवळ तथागताने म्हणजे गौतम बुद्धाने पाणी पिण्यास मागितलें अशी एक बौद्ध कथा वर सांगितलेल्या ख्रिस्ताच्या कथेसारखीच आहे. सोपाक (श्वपच) नांवाच्या एका चांडाळाला भिक्षुसंघांत घेतलें हें प्रसिद्धच आहे. बुद्धकालीन समाजव्यवस्थेसंबंधी साधार ऐतिहासिक माहिती पाली वाड्पयावरुन तयार केलेली प्रसिद्ध बौद्धवाड्यमयसंशोधक प्रो. र्हिस डेव्हिड्स ह्यांच्या 'बुद्धिस्ट इंडिया' ह्या ग्रंथाच्या ४ थ्या भागांत चांगली मिळण्यासारखी आहे. ती पुढे यथानुक्रम आढळेल. असो.


आता आपण प्रथम ह्या बुद्धोदयकालाच्या मागे मागे अस्पुश्यतेचा छडा लावीत, प्राचीन वाड्यप्रयांत मिळतील तितके संदर्भ शोधीत जाऊं. अगदीच गति खुंटल्यावर मागे परंतु. मग तिस-या प्रकरणांत बुद्धोदयकालापुढील बौद्धकालांतील अस्पृश्यतेचें निरीक्षण करूं तदनंतर क्रमाक्रमाने अगदी आताच्या काळाला येऊन भिडू.


बुद्धपूर्वकालीन उर्फ प्रागैतिहासिक अस्पृश्यता


१. पाणिनीचा काल
संस्कृतचा आद्य व्याकरणकार पाणिनि ह्याचा काल नक्की ठरत नाही. सर डॉ. भांडारकर त्याच्या कालाचा सुमार इ. स. पूर्वी ६००-७०० असावा म्हणतात. पाणिनीच्या अष्टाध्यार्यीत पुढील सूत्र आहे.


शूद्राणाम् अनिरवसितानाम् ।
- पाणिनीय अष्टाध्यायी, २.४.१०


ह्या सूत्रावर भट्टोजी दीक्षितकृत सिद्धान्तकौमुदीत पुढील टीका आहे :
अबहिप्कृतानां ( अनिरवासितांना) शूद्राणां प्राग्वत् । तक्षायस्कारम् । पाग्राद्धहिष्कृतांना तु चण्डालमृतपा:।


हाणजे भावार्थ असा की तक्षा=सुतार, अयस्कार=लोहार वगैरे अबहिष्कृत शूद्रांच्या नांवाचा द्वद्व समास पूर्वीच्या नियमाप्रमाणे नपुंसकलिंगी आणि चंडाल मृतप इत्यादि बहिष्कृत शूद्रांच्या नांवाचा द्वंद्व समास पुल्लिंगी असा पाणिनिकृत निर्णय आहे. आमचा प्रस्तुत मुद्दा व्याकरणाचा नसून, पाणिनीच्या कालांत बहिष्कृत उर्फ निरवसित अस्पृश्यता इतकी रूढ झाली होती की तिच्या विधिनिषेधाचा प्रवेश व्याकरणाच्या सूत्रांतही आढळावा, हा आहे. निरवसित ह्या शब्दाचा अर्थ भट्टोजी दीक्षितांनी 'पात्राद् बहिष्कृत' असा केला आहे. पात्राद् बहिष्कृत म्हणजे ज्यांनी वापरलेली भांडी वरिष्ठ वर्गास चालत नव्हतीं ते असा अर्थ होता. अशा अस्पृश्यांना बंगाल प्रांतात 'अनाचरणीय जाती'  अशी संज्ञा अद्यापि आहे. 'ग्रामाद् बहिष्कृत' असा अर्थ केला असता तर आम्ही ठरविलेल्या व्याख्येप्रमाणे पाणिनीच्या काळीं आजकालची अस्पृश्यता रूढ झाली होती असा ठाम सिद्धान्त ठरला असता. तथापि बहिष्काराचा उल्लेख, मग तो 'पात्रात्' असा की 'ग्रामात्' असो, इतका स्पष्ट पाणिनीच्या पूर्वी दुसरा मिळेपर्यंत पाणिनीच्या काळांतच आमच्या प्रस्तुत अस्पृश्यतेचें प्रस्थान ठेवणे तूर्त भाग आहे. पाणिनीचा देश हिंदुस्थानचा हल्लीच्या पश्चिम शिवेवरचा पेशावर प्रांत होता. अर्थात् हें प्रस्थान उत्तर हिंदुस्थानपुरतेंच ठरत आहे. दक्षिणेकडील अस्पृश्यतेचा विचार पुढील टप्प्यांत करुं.


२. अव्वल औपनिषद काल


चांडाल आणि पौल्कस
सुदैवाने आपल्यास बृहदारण्यकोपनिषदांतील चवथ्या अध्यायांतील तिस-या ब्राह्मणांतील २२ व्या सत्त्कांत अस्पृश्यांच्या स्थितीसंबंधी मोठा मार्मिक उल्लेख आढळतो तो असा :-


अत्र पिताsपिता भवति माताsमाता लोका अलोका देवा अदेवा वेदा अवेदा अत्र स्तेनोsस्तेनो भवति भ्रूणहाsभ्रूणहा चाण्डालोsचाण्डाल: पौल्कसोsपौल्कस: श्रमणोsश्रमस्तापसोsतापसोनन्वागतं पुण्येनानन्वागतं पापेन तीर्णो हि तदा सर्वानू शोकान्हृदयस्य भवति।


ह्याच्या पूर्वीच्या २१ व्या सूत्क्तांत आत्मस्थितीप्रत पोचलेल्या प्राज्ञ पुरुषांची जी अत्यंत उच्च स्थिती वर्णिली आहे तिचेंच वर्णन ह्या २२ व्या सूत्क्तांत अधिक विस्ताराने केलें आहे. ह्याचा भावार्थ हा कीस ह्या अत्यच्च स्थितीला पोहोचलेला पुरुष बापाला बाप म्हणून अथवा आईला आई म्हणून ओळखीत नाही, ह्या अभेद्य स्थितीत चांडालाचे चांडालत्वं पौल्वसाचे पौल्कसत्वही विलय पावतें, इत्यादि इत्यादि. म्हणजे आपल्या नेहमीच्या व्यावहारिक स्थितीत चांडाल व पौल्कस इत्यादि भेद तेव्हा पाळले जात असत असे दिसते. बौद्ध वाक्यप्रयात या स्थितीला प्रज्ञानपारमिता असें पारिभाषिक नावं असे. जुन्या मताचे हिंदु चांडालादि वर्णबाह्य लोकांना दूर ठेवीत, केवळ प्रज्ञापारमितावस्थेंतच त्यांचा अभेद कल्पीत असत. तर उलट पक्षीं बौद्धमतवादी व्यावहारिक स्थितींतही त्यांना स्पृ्श्य मानीत असत, असें सिंद्ध होतें. बौद्ध जरी अस्पृश्यता मानीत नव्हते तरी इतर हिंदु ती मानीत असल्याने बुद्दोदयकाळी ती होती हे आम्ही वर सिद्ध केलेंच आहे. परंतु त्याच्या पूर्वी सुमारे दोनतीनशे वर्षांच्या काळात म्हणजे बृहदारण्यक व छांदोग्य ह्या उपनिषदांच्या काळांत अस्पृश्यता होती की नव्हती हे ठरविणें कठीण आहे. ह्या काळीं चांडाल व पौल्कस ह्या जाती तिरस्करणीय मानल्या जात होत्या असे उल्लेख सापडतात पण त्या आजच्यासारख्या अस्पृश्य व बहिष्कृत होत्याच असा स्पष्ट उल्लेख नाही. निदान तूर्त सापडत नाही.


ह्याच प्रकारचे दोन उल्लेख छांदोग्य उपनिषदांत आढळतात. हें उपनिषदही जवळ जवळ बृहदारण्यकाइतकें जुनें व विस्तृत आहे. ह्याच्या ५व्या अध्यायाच्या १० व्या खंडांतील ७ वा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे :-


तद्य इह रमणीयचरणा अभ्याशो ह थत्ते रमणीयां योनिमापद्येरन् ब्राह्मणयोनिं वा क्षत्रिययोनिं वा वैश्ययोनिं वाथ य इह कपूयचरणा अभ्याशो ह यत्ते कपूयां योनिमापद्येरन् श्वयोनि वा सूकरयोनिं वा चाण्डालयोनि वा ।।


अर्थ : पुण्यचरण करणारे पितृयानांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इत्यादि आर्य उर्फ शुभ योनि प्राप्त करुन घेतात व अशुभ आचरण करणारे कुत्रा, डुक्कर किवा चांडालादि हीन योनीप्रत जन्म घेतात. पुन: ह्याच उपनिषदाच्या ५व्या अध्यायाच्या २४व्या खंडांतील ४था श्लोक असा आहे.


तस्मादु हैवं विद्यद्यपि चण्डालायोच्छिष्टं प्रयच्छेदात्मनि हैवास्य तद्वैश्वानरे हुतं स्यादिति ।

 
अर्थ : ह्या खंडांत अग्निहोत्राचें महत्त्व सांगून शेवटी म्हटलें आहे की जो ब्रह्मविद् आहे त्याने चंडलाला आपले उष्टे दिलें तरी वैश्वानर आत्म्यामध्ये आहुति दिल्याप्रमाणेच पुण्य आहे. ह्या दोन्ही श्लोकांचा भावार्थ बृहदारण्यकोपनिषदांतील भावार्थांप्रमाणेच आहे. एकंदरीत ह्या उपनिषदांच्या काळात आर्यांचे तीनच वर्ण होते आणि हल्लीचा जाति भेद नव्हता. हे वर्ण केवळ जन्मावरच अवलंबून नसून कर्मावरुन आणि ज्ञानावरुनही क्वचित् घडत असत. ह्या तीन वर्णांच्या बाहेरचा मोठा जो आर्येतर समाज त्यांतील कांही जाती आर्यांच्या स्वाधीन होऊन त्यांची परिचर्या करुन रहात. त्यांचा शूद्र नांवाच्या चौथा वर्ण पुढे बनविण्यांत आला ह्या चौथ्या वर्णांत समाविष्ट न झालेल्या चांडाळ व पौप्लकस इत्यादि तिरस्करणीय जाति. वर्णबाह्य अशाच राहात होत्या. यांनाच पुढे अप्रयत शूद्र अशी संज्ञा मिळून पुढे बुद्धोदयकाळीं किंवा त्याच्या आगेमागे आपस्तंब सूत्राच्या काळीं त्यांना हल्लीची अस्पृश्यता प्राप्त झाली असावी. परंतु ह्या अव्वल उपनिषतकाळीं चांडाल पुल्कस इत्यादि जाती जरी हीन मानल्या जात होत्या तरी त्या खरोखरच अस्पृश्य आणि ग्रामबाह्य होत्या की नाही हें ठरविण्यास निश्चित पुरावा नाही. तरी बहुतकरुन त्या तशा असाव्यात असाच अंदाज करणें जास्त योग्य होईल.


३. ब्राह्मणकालीन अस्पृश्यता
प्राचीनांत प्राचीन जें बृहदारण्यक उपनिषद त्याच्याही मागे वाडायांत ब्राह्मणकाल आहे. कृष्णजुवेंदीय तैत्तिरीय ब्राह्मणाच्या तृतीय कांडांत चांडाल व पौल्कस ह्या दोन राष्ट्रांचा केवळ नामनिर्देश मात्र आढळतो. पण त्यावरुन हीं राष्ट्रे अगदी अस्पृश्य व ग्रामबाह्य होतीं. असा तर्क काढण्यास मुळीच जागा नाही. त्रैवार्णिक आर्यांहून त्या भिन्न वंशाच्या होत्या. फार तर त्या किंचित कमी गणल्या जात असाव्यात इतकेंच सिद्ध होते. ह्या तैत्तिरीय ब्राह्मणाच्या कालांत पुरुषमेध करण्याची चाल अद्याप शिल्लक राहिलेली होती. पण ह्या मेघांत पूशंच्या ऐवजी ज्या पुरुषांचा बळी देण्यांत येत असे त्या पुरुषाला ठार न मारतां जिवंत सोडून देण्यांत येत असे. अद्यापि कांही अस्सल मराठ्यांच्या घरीं रानसटवाईची अथवा घोडेसटवाईची पूजा म्हणून एक विधी मूल जन्मल्यापासून त्यांचें जावूळ काढावयाच्या अगोदर करण्यांत येत असतो. हा विधी रानांतच करावयाचा असतो. रानसटवाईच्या पूजेंत बकरें जिवंत मारून त्याचा नैवेद्य सटवाईला दाखवावयाचा असतो. पण घोडेसटवाईच्या पूजेंत एक बकरें आणून त्याचा बळी देऊन ते जिवंतच सटवाईच्या नांवाने सोडावयाचें असतें. नैवेद्य व जेवण पुरणपोळीचेंच असते. माझ्या बाळपणी माझ्यामागून जन्मलेल्या सर्व भावंडांचे जावूळ काढ्यापूर्वी हा घोडेसटवाईचा विधी माझ्या वडिलांनी केलेला मी स्वत: पाहिला आहे घोडेसटवाई या नांवावरुन पूर्वी घोडे जिवंत सोडले जात असावेत पण गरिबीमुळें ती पाळी बक-यावर, कोंबड्यावर व शेवटी अंड्यावर आणि लिंबावरही आली असावी. हाच प्रकार तैत्तिरीय ब्राह्मणाच्या तृतीय कांडांत वर्णन केलेल्या पुरुषमेधाचाही आहे. हा पुरुषमेध म्हणजे ऋग्वेदाच्या १० व्या मंडलांतल्या पुरुषसूक्तांतील विराट्पुरुषाच्या मेधाप्रमाणे रुपकवजाच आहे. ह्या तृतीय कांडांतील ४ थ्या प्रपाठकांत निरनिराळ्या लहान मोठ्या देवतांना निरनिराळ्या जातींच्या पुरुषांच्या बळींची विधि सांगितला आहे. ह्या देवतांच्या महत्तवाप्रमाणे पुरुषांच्या जातीचें महत्त्व अथवा लघुत्व दिसून येते. १४ व्या मंत्रांत "बीभत्सायै ( देवतायै) पौल्कसम" आणि १७ व्या मंत्रामध्ये "वायवे (देवतायै) चाण्डालम्" असे उल्लेख स्पष्ट आहेत. ह्यावरुन पौल्कस जातीचे लोक बीभत्स ( सिश्र-देवतेची) पूजा करीत असावेत व चांडाल वायु देवतेची पूजा करीत असावेत असा तर्क करावा लागत आहे. वायु देवतेचा संबंध रूद्र उर्फ शिव देवतेशीं पोहोचतो. ह्यावरुन चांडाल आणि पौल्कस आताप्रमाणेंच तेव्हाही शक्तीचीं आणि शिवाची उपासक रा्ष्ट्रें असलीं पाहिजेत' इतकेंच सिद्ध होते. ह्या पूजेचे प्रकार तेव्हा बीभस्त असते तरी ह्या जाती तेवढ्यावरुनच अस्पृश्य होत्या असा मुळीच ध्वनि निघत नाही.

Read more: प्रकरण दुसरे : पुरातन अस्पृश्यतेचे रुपनिदर्शन
  • 136
  • 137
  • 138
  • 139
  • 140
  • 141
  • 142
  • 143
  • 144
  • 145
Page 145 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी