निषाद आणि वृषल
चांडाल आणि पौल्कस ह्यांशिवाय यास्काच्या निरुत्त्कांत या जातींचा उल्लेख अध्याय ३ खंड १६ मध्यें पुढीलप्रमाणे आढळतो.
वदिती सिद्धोपमा । ब्राह्मणवत् वृषलवत् । ब्राह्मणा इव वृषला इव ।
ह्या मंत्रावर यास्कानेच जें भाष्य केलें आहे त्यांत वृषलाचा अर्थ सांगतांना केलेल्या 'वृषलो वृषशीलो भवति वृषाशीलो वा ।' ह्या व्युत्पत्तीवरुन वृषल नांवाची एक निराळी जात होती की बैलासारखा एखादा मठ्ठ अनार्य माणून इतकाच वृषल याचा अर्थ घ्यावयाचा, असा विकल्प प्राप्त होतो. चंद्रगुप्त मौर्याचा गुरु आणि दिवाण चाणक्य केव्हा केव्हा रागाऊन चंद्रगुप्तास 'रे वृषल' ( 'ए बैला') असा टोमणा मारीत असे ह्यावरुनही वृषल नांवाची एक निराळी जात नसावी अशी शंका येते.
निरुत्त्काचा अध्याय ३ खंड ८ यांत माणसांच्या निरनिराळ्या २५ प्रकारापैकी पंचजन हा एक प्रकार सांगितला आहे. ह्या पंचजन नांवाचा अर्थ सांगतांना यास्काचार्योनी 'चत्वारो वर्णा निषाद: पश्चंम इति औपमन्यव:।' असा औपमन्यव नांवाच्या प्राचीन स्मृतिकारांचा दाखला दिला आहे. त्याशिवाय 'निषाद: कस्मात्? निषदनो भवति, निषण्णमस्मिन् पापक्रम् इति।' म्हणजे, ज्याच्यामध्यें पाप दृढ होऊन बसलें असतें तो निषाद, असा अर्थ स्वत: यास्काचार्य देत आहेत. परंतु बुद्धोदय कालाच्या उपनिषदांतून फक्त शूद्र वर्णाचा उल्लेख सापडतो. पांचव्या वर्णाचा उल्लेख औपमन्यवांनीच प्रथम केला आहे. त्यावरुन औपमन्यवांचा काळ उपनिषदांचे मागूनचा म्हणजे बुद्धोदयानंतरचा किंवा फार तर तत्कालीन असावा; असें होतें. आणि यास्काचा काळ तर त्याच्याही मागूनचा असें सिद्ध होतें. मनुस्मृतीने यास्काच्याही मागून चांडालांना 'नास्ति तु पंचम:' असे म्हणूनही पुन: ५ व्या प्रकारांत गणिलें आहे. त्याचा विचार योग्य स्थळीं करुं.
वर जे यास्क, पाणिनि वगैरे प्राचीन ग्रंथकारांचे उल्लेख आले आहेत त्यांचा संदर्भ वाचकांनी फार सावधगिरीनेच समजला पाहिजे. कारण त्यांच्या कालनिर्णयासंबंधीने विद्वानांत फार वाद माजून राहिला आहे. जसजसे संशोधन जास्त होत आहे तसतसा हा वाद अधिकच माजत आहे. यास्क आधी किंवा पाणिनि आधी, आणि हे दोघेहि बुद्ध काळापूर्वी किंवा मागून, ही गोष्ट छातीवर हात ठेऊन अद्यापि सांगण्यास कोणी विद्वान धजत नाहीत. साधारणपणें यास्क पाणिनीच्या पूर्वी कित्येक शतकें झाला असावा अशी समजूत आहे. कारण 'पाणिनीने यास्क शब्द सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे ह्यावरुन हा पाणिनीच्या पूर्वी असावा. बृहदारण्यक उपनिषदांत व पिंगल छंद: सूत्रांत ह्याचा उल्लेख आहे, वगैरे पुण्याचे चित्रावशास्त्री आपल्या 'प्राचीन चरित्रकोशां'त लिहितात. राजवाडे पाणिनीचा काळ इ. स. पू. १२००-९०० इतका मागे नेतात, सर डॉ. भांडारकर ७००-६०० ठरवितात, पण कित्येक पुरावे असेही मिळतात की, पाणिनि फार तर इ. स. पूर्वी ४००-३५० पेक्षा मागे जाऊ शकतच नाही. राजशेखराची काव्यमीमांसा खिस्ती शकानंतर १००० च्या सुमारास झाली. तिच्यांत उल्लेख आहे तो असा :-
श्रूयते च पाटलिपुत्रे शास्त्रकारपरीक्षा
अत्रोपवर्षवर्षाविह पाणिनिपनलाविह ध्याडि: ।
वररुचिपतजली इह परीक्षिता : ख्यातिमुपजग्मु.।।
काव्यमीमांसा, १० (पृ. ५५)
ह्या पाणिनी पिंगल इत्यादि मंडळींच्या परीक्षा पाटलिपुत्र या राजधानींत झाल्या असल्या तर, पाटलिपुत्र हा गांव उदयी राजाने प्रतम राजधानीचा केला, त्यानंतरच झाल्या असाव्या. त्या उदयी राजाचा काळ इ. स. पू. ४५० हा आहे. हरचरितचिंतामणीच्या २७ व्या सर्गोत माहिती मिळते की, नंदाच्या पाटलिपुत्र राजधानींत शंकरस्वामीच्या वर्ष नांवाच्या पुत्रापासून पाणिनि हा विद्या शिकला. यावरुनही त्याचा काळ इ. स. पूर्वी ४००-३५०च्या सुमाराचा ठरतो.
तें कसेंही असो. ह्या प्राचीन ऋषीचा कालनिर्णय करण्याचे हे स्थळ मुळीच नव्हे. पण निरुत्त्काचा अध्याय ३ खंड ८ यांत माणसाच्या २५ जातींचा उल्लेख केला आहे असें वर म्हटलें आहे, तेथे यास्काचार्यांनी प्रथम - पत्राजना मभ होत्र जुषध्वम् । ऋग्वेदसंहिता, १०. ५३, ४. असा श्रुतिमंत्राचा आधार देऊन त्यावरील भाष्यांत स्पष्ट म्हटलें आहे-
गंधर्वाः पितरो देवा असुरा रक्षांसीत्येके । चरवोरो वर्णा निषादः पंचम इत्यौपमन्यवः ।।
येथे पंचजन ह्या शब्दाचे दोन अर्थ स्पष्ट सांगितले आहेत. 'गंधर्व, पितर देव, असूर, राक्षस' हा एक अर्थ आणि 'चार वर्णं, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि पांचवा निषाद, म्हणजे वर्णंबाह्य मानलेल्यांचा समुदाय, हा दुसरा अर्थ. आता हे औपमन्यव स्मृतिकार कोण व केव्हाचे असावेत हाच प्रश्न मुद्दयाचा आहे. ब्राह्मणकाळांत आणि अव्वल उपनिषद् काळांत तीनच वर्ण होते. पुढे चौथा शूद्रवर्ण समाविष्ट केला तो अव्वल उपनिषदांचा काळ नव्हे. तो पाणिनीचा काळ; म्हमून हे औपमन्यव पाणिनीच्या, किंबहुना ते ज्या अर्थी पांचवा वर्ण मानतात त्या अर्थी बौद्धांच्या काळी, किंवा त्या नंतरचे, असावेत असा तर्क होत आहे व त्यांचा उल्लेख ज्या यास्काचार्योनी केला ते पाणिनीनंतरचे असी अर्थांपत्ति निघत आहे. पण यास्काचार्योचा काळच बृहदारण्यक उपनिषदाचे वेळी ठरत असल्यास औपमन्यव त्याहूनही पूर्वीचे ठरून पांचवा वर्ण जो निषादांचा तो इ. स. पृ. ८००-९०० चा ठरून जवळजवळ श्री. कृष्णाच्या काळापर्यंत मागे जाऊं पातो. निषाद म्हणून कोणी एक विवक्षित जात नव्हती. पण शूद्रवर्णाहून ते निराळे व वर्णबाह्य होते हें खरें. तथापि ते आमच्या वरील व्याख्येप्रमाणे अस्पृश्य आणि ग्राम्यबाह्य होते असें ठरत नाही. वाचकांनी ह्या सर्व गोष्टी तारतम्याने व सावधपणानेच विचारांत घ्याव्यात हें बरे.
प्रो. मॅक्डोनेल व कीथ यांनी Vedic Index या नांवाचा वेदांतील शब्दांचा कोश तयार केला आहे. त्याच्यांत ४५३ पानावर निषाद शब्दासंबंधी पुढील खुलासा केला आहे.
Nishada is found in later Samhitas and the Brahmanas The word seems to denote not so much a tribe but a general term for the Non-Aryan tribes who were settled down but were not under Aryan control as the shudras were; for, the Aupamanyava took the five people panchajana to be the four castes and the Nishadas and the Commentator Mahidhara explains the word as Bhills.
अर्थ : - "निषाद हा शब्द नंतरच्या संहितांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये आढळतो. तो शब्द येथे विशिष्टजातिवाचक नसून सामान्येंकरुन ज्या आर्येतर जाति त्या वेळेस वसाहत करुन होत्या परंतु शूद्राप्रमाणे ज्या आर्योच्या सत्तेखाली आल्या नव्हत्या अशा सामान्य जातींचा वाचक आहे, असें वाटतें. कारण, औपमन्यव हे पंचजन याचा अर्थ चार वर्ण आणि निषाद असा घेता. तर; आणि भाष्यकार महीधर निषाद शब्दाची भिल्ल अशी व्याख्या करतो."
ह्यावरुन निषाद ही जमात चातुर्वर्ण्यांच्या बाहेरची होती, तरी ती अस्प्रश्य खात्रीने नव्हती; आणि भिल्ल, सांताळ गोंड वगैरे रानटी जाती आजही अस्पृश्य नाहीत हें ध्यानांत घेण्यासारखे आहे.
४. श्रीकृष्ण काल
बृहदारण्यकोपनिषद् हें सर्व उपनिषदांत अत्यंत प्राचीन असें जर्मन प्रोफेसर पॉल डॉयसन इत्यादिकांनी ठरविलें आहे. त्या काळापर्यंत म्हणजे इ. स. पूर्वी सुमारे ८०० वर्षें तरी-जास्तच पण कमी नव्हे चांडालांची व पौल्कसांची आताप्रमाणें बहिष्कृत आणि अस्पृश्य अशी स्थिती थोड्याबहुत अंशाने व्हावयास लागली होती. ह्याही पलीकडे आर्येतर शूद्र राष्ट्राचीं नांवें छांदस वाड्मयांत फार क्वचित् आढळतात. त्या राष्ट्रांची स्थिती बहिष्कृत आणि अनाचरणीय होतीच असा सबळ पुरावा सापडत नाही. उलट ती तशी नसावी असें समजण्यास जे पौराणिक उल्लेख सापडतात त्यांचा आता निर्देश करूं. ब्राह्मणांच्या मागील काळ म्हणजे भारतीय युद्धाचा काळ. हा श्रीकृष्ण वासुदेवाचा काळ होय. पुराणकालाचा शास्त्रीय, नि:पक्षपाती आणि सूक्ष्म असा विचार मि. एफ्. ई. पार्जिटर यांनी आपल्या Ancient Indian Historical Tradition ह्या अत्यंत परिश्रमाने तयार केलेल्या पुस्तकांत केला आहे. ह्या ग्रंथाच्या १५ व्या भागांत भारतीय युद्धाचा काळ इ. स. पूर्वी ९५० वर्षांचा असावा असा पुष्कळशा राजकुलांच्या वंशावळ्यांवरुन ठरविण्याचा पार्जिटरने प्रयत्न केला आहे. ह्याच्या अलीकडे कोणीही भारीतय युद्ध आणू शकत नाही. पौरस्त्य पंडित हा काळ दीड हजारांपासून दोन हजार वर्षे मागे नेतात. पण त्यांनी पार्जिटरइतके पुरावे दिले नाहीत.
श्रीकृष्णाचा काळ नक्की कोणताही असो. त्याच्या काळीं भारतात प्रबळ आर्येतर राष्ट्रे होती. त्यांत चांडाल हें राष्ट्र प्रमुख होतें. श्रीकृष्णाच्या अष्टनायिकांत जांबवती नांवाची एक अस्वल (?) जातीची कन्या होती. तिच्याशीं श्रीकृष्णाचा प्रीतिविवाह झाला. ती कृष्णाला इतकी प्रिय होती की तिचे पोटी पुत्र व्हावा म्हणून त्याने कैलासास जाऊन शंकराचा प्रसाद प्राप्त करुन घेतला व त्या योगाने त्याला सांब नांवाचा पुत्र झाला. हाच पुढे शिबि ह्या नांवाने प्रसिद्ध राजा झाला असा उल्लेख महाभारतांत आहे. हें शिबि नांवाचे आर्येतर राष्ट्र सिंधु नदीत्या आसपास होतें. व त्याच्याशी यदु ह्या आर्योचा शरीबसंबंध झाला होता असाही भारतात उल्लेख आहे. परंतु हाच दाखला आमच्या प्रस्तुत विषयाला बरोबर लागू पडेल अशा रीतीने पाली ग्रंथांतून अधिक स्पष्टपणें सांगितलेला आढळतो. तो येणेंप्रमाणे :
गाथाः अत्थि जंबावती नाम माता सिबिराजस्स ।।
सा भारिया वासुदेवस्स कण्हस्स अहोसि पियाsति ।।१४८५।।
अट्ठकथा (अर्थकथा ) जंबावतीति सिबिरम्मो माता कण्हायनगोत्तस्स दसभातिकानं जेट्ठस्स वासुदेवस्स पिया महेसी अहोसि । सो किर एकदिवसं, द्वारावतीतो निक्खमित्वा उय्यानं गच्छन्तो, चंडाल गामतो केनचिदेव करणीयेन पविसन्ती, एकं एकमन्ते ठितं अभिरूपं कुमारिकं दिस्वाsव पटिबद्धचित्तो हुत्वा, किंजातिकाति पुच्छापेत्वा चंडालजातिकाsति सुस्वाsपि पटिबद्धचित्तताय विप्पटिसारी हुत्वा सस्सामिकभावं पुच्छापेत्वा, अस्साभिकाsति सुस्वा, तमादाय, ततोsवनिवत्तित्वा निवेसनं नेस्वा, रतनारासिम्हि ठपापेत्वा, अग्ग महेसि अकाचि । सा सिविनामं पुत्तं विजायी । सो पितु अच्चयेन द्वारावतीयं रज्जं कारेसि तं संधाय इदं खुशं इति । सो इमं उदाहरणं आहे रित्वा एवरुपोपि नाम खत्तियो चंडालिया सद्धिवासं क्पोसि, अम्हेसु तिरच्छानगतेसु किंवचब्ब अम्मन्म संवासरोचन जेव पसाणंSति वत्वा अपरंSपि उदाहरणो आहे!
महाउमग्ग जातक (५४६), गाथा १४८५ (अट्टकथेसह)
मूळ ग्रंथांतले शब्द जसेच्या तसेच वाचकांस समजावेत म्हणून हा पाली उतारा घेतला आहे. ह्याचा मराठी भावार्थ असा होतो -
" शिबि राजाची आई जंबावती नांवाची कृष्ण कुळांतील वासुदेवाची प्रिय भार्या होती, " एवढीच मूळची गाथा. तिचेवर पुढील काळी अट्ठकथा उर्फ भाष्य झालें ते असें. "कृष्णायन गोत्रांतील १० भावांपैकी वडील जो वासुदेव त्यांची जंबावती नांवाची प्रिय राणी शिबी राजाची आई होती. तो (वासुदेव) एके दिवशी द्वारकेच्या बाहेर निघून बागेकडे जात असतां., चंडालवाड्यांतून कांही कामासाठी (मुख्य शहरांत) प्रवेश करणारी एक लावण्यवती कुमारिका एका बाजूला उभी राहिलेली पाहून, आकृष्ट-चित्त होऊन, ती कोणत्या जातीची आहे असें (दुस-याकडून) विचारवून, चंडाल जातीची आहे असे ऐकूनही, मोहित झाल्यामुळे विवश होत्साता तिला स्वामी (पति) आहे काय हें विचारून नाही असें ऐकून, तिला घेऊन, तेथून निघून, घरी नेऊन रत्नराशीवर बसवून तिला पट्टराणी करिता झाला ! तिला शिबि नावाचा पुत्र झाला. त्याने बापाच्या मागे द्वारावतीचे राज्य केलें. असे वृत्त आहे. क्षत्रियांने चांडालीशी विवाह केला ही तर गोष्ट असो; पण मनुष्य आणि पशु अशा भिन्नयोनींमध्येही संयोग होणे स्वाभाविक आहे. संवासाचे कारण जाति किंबहुना योनिही नसून केवळ प्रीतिच होय असें दाखविण्यासाठी दुसरें उदाहरण पुढे देत आहे..."
प्रस्तुत विषयावर इतका तपशीलवार स्पष्ट दाखला इतक्या प्राचीन काळांतील दुसरा मिळणें अत्यंत मुष्कील आहे. ह्यांतील मूळ गाथा जी आहे ती फार प्राचीन-बौद्धकाळापूर्वीची असावी. अट्टकथा उर्फ भाष्य जें आहे ते मात्र गौतमबुद्धानंतरच्या काळांतील आहे. मी ह्या उता-याविषयीचा एक निबंध भारत-इतिहास-संशोधन-मंडळाच्या एका संमेलनापुढे वाचला, तेव्हा 'भांडारकर इन्सिट्टयूट' चे सेक्रेटरी प्रो. परांजपे ह्यांनी असा आक्षेप घेतला की हा संबंध पालींतील उल्लेख व सर्व जातक कथा अलीकडच्या आहेत, इतकेंच नव्हे तर त्यांतून केवळ हिंदु ऐतिहासिक पुरुषांना ठिकठिकाणीं कमीपणा आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे त्या ग्रंथांचे ऐतिहासिक महत्त्व फारसे नाही. परांजप्यांचे म्हणणें काही असो. केवळ इतिहासाच्या दृष्टीने तुलाना करावयाची झाल्यास, हिंदू पुराणे वपाली वाड्मय यांचे दरम्यान सत्य, सरळपणा निहेंतुकपणा व सरसपणा इत्यादि गुणांचे पारडें हिंदु पुराणांपेक्षा पाली वाड्मयाकडे अधिक झुकते आहे हे नि:पक्षपाती पंडितांना पटेल अशी मला उमेद आहे.
जातकग्रंथ जरी अलीकडचे असले तरी ते हल्लीच्या महाभारताहूनही अलीकडचे असतील असें नाही. शिवाय त्या ग्रंथांत ज्या गाथा आहेत त्यांतील दंतकथांचा अंश प्रत्यक्ष गौतमबुद्धाच्याही काळापूर्वी उत्तर हिंदुस्थानांतच नव्हे तर मेसॉपोटेमियापासून गंगेच्या किना-यापर्यंत तत्कालीन आठवणींच्या वातावरणात वावरत होता हें प्राचीनेतिहासवेत्त्यांना सांगण्याची जरूरी नाही. म्हणून मला केवळ माझ्या प्रस्तुत विषयासाठी म्हणजे भारतीय इतिहासाचे टप्पे कसे कसे पडत गेले, हे पाहण्याच्या कामी हा वरील पाली भाषेंतील उतारा बिनमोल वाटत आहे. त्यांचें कारण असे-वरील गाथेंत जांबवती अथवा जबावती आणि वासुदेव ह्यांच्या नुसत्या नांवाचा आणि नात्याचाच उल्लेख आहे. जांबवती व वासुदेव हे भिन्न वंशांतले होते. पण तेवढ्यावरुनच त्या काळी अशा भिन्न वंशांत विवाहसंबंध होत नव्हते. किंवा जंबावतीच्या वंशाला अस्पृश्य मानण्यात येत होतेच असें समजण्यापुरता वरील गाथेंत तरी पुरावा नाही. ह्यावरुन प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या काळी आयेंतर लोकांवर-निदान चंडाला सारख्या राजवैभवी आर्येतरांवर-ग्रामबहिष्कार पडून ते लोक किंवा तें राष्ट्र अस्पृश्य बनलें होतें असे मला वाटत नाही. ह्याच काळीं भीमानेही हिडिंब नांवाच्या आयेंतराची मुलगी हिडिंबा हिच्याशी विवाह केला. तिच्या पोटी घटोत्कच नांवाचा पुत्र झाला. बाजीरावाला मस्तानीच्या पोटी समशेरबहादूर होऊन तो जसा पानिपतच्या युद्धांत हिंदूच्या बाजने कामास आला तसाच घटोत्कचही ३००० वर्षांपूर्वी घडलेल्या युद्धांत त्याच रणागणांत कामास आला हे भारतांत सांगितले आहे. तसाच अर्जुनाचा पुत्र बभ्रुवाहन हाही आईकडून आयेंतरच होता. न जाणो प्रत्यक्ष पांडव आणि त्यांचे साथीदार कृष्णायन गोत्र, हेही आर्य होते. की द्राविड होते हे ऐतिहासिक रीत्या सिद्ध करणें दिसतें तितके सोपे नाही. असो: तो आमचा प्रस्तुत मुद्दा नव्हे. आमचा प्रस्तुत प्रश्न इतकाच की भारतीय युद्धाचे काळीं हिंदुस्थानांत हल्लीच्या स्वरुपात ग्रामबहिष्कार व अस्पृश्यता होती की नव्हती ! मला वाटतें, आर्य-आर्यंतरांचा शरीरसंबंध झाल्याची वर दिल्याप्रमाणे अनेक उदाहरणे प्राचीन ग्रंथांत सापडतात त्यावरुन अस्पृश्यता त्या काळी नव्हती. होती असा सिद्धान्त कोणी करु पाहील तर त्याला इतक्या प्राचीन वाड्यांत पुरावाच तूर्त मिळत नाही. हा पुरावा पुढे बहृदारण्यकोपनिषदापासून मिळू लागतो; व तो बुद्धाच्या काळी भरपूर मिळून, तेव्हा मात्र अस्पृश्यतेची संस्था हल्लीच्या स्वरुपांत स्थापित झाली होती असें म्हणण्यास फारशी हरकत वाटत नाही.
वरील पाली भाषेच्या उता-यांतील जी गाथा आहे तिची वासलात अशी लागली. पण जें भाष्य आहे तें मात्र नंतरच्या ज्या काळांत हल्लीची विस्तृत भारत रामायण ही काव्यें रचली गेलीं, त्या नागरसंस्कृत व नागरपाली ह्या काळांतील असावें असा माझा तर्क आहे. ह्या काळी चंडालवाडे उर्फ महारवाडे मुख्य नगराच्या बाहेर बसविले जात होते. जंबावती बाजूला उभी होती. ( मलबारांत हल्ली देखील स्पृश्य वाटेने जाऊं लागला असतां अस्पृश्य मनुष्य बाजूला उभा राहतो.) ती चांडाल जातीची आहे असे ऐकूनही तिच्याशीं श्रीकृष्णाने विवाह केला हें जे आश्चर्य वाटत आहे तें नंतरच्या काळांतल्या भाष्यकाराला वाटणें साहजिक आहे पण प्राचीन गाथाकारांना वाटण्याचें कारण नाही. त्यांच्या काळी अस्पृश्यता नव्हती. प्रत्यक्ष कृष्णाचा म्हणजे भारती युद्धाचा काळ, किंबहुना पाली गाथाकारांचाही काळ, पाली अट्ठकथाकारांच्या बराच पूर्वीचा, किमान पक्षी पांचसहाशें वर्षे तरी अगोदरचा, असावा. गाथा आणि अट्ठकथा एकाच ग्रंथांत आहेत, एवढ्याचवरुन त्यांचा काळही एकच असावा असें गृहीत धऱतां येत नाही. त्यांतील विषयावरुन तरी तसें खास म्हणता येत नाही. संशोधक राजवाडे यांनी पालीभाषेचा काळ शालिवाहन शकापूर्वी १५०० वर्षे धरला आहे. पाणिनीय संस्कृताचाही काळ तितकाच प्राचीन धरला आहे. राजवाडे यांची अतिशयोक्तीकडे असलेली प्रवृत्ति ध्यानात घेतली असता पाणिनीचा काळ इतका मागे खेचतां येत नसला तरी पाली गाथांचा काळ भारतीय युद्धाचे काळापर्यंत मागे नेण्यास हरकत दिसत नाही. आणि ह्या काळांत कृष्णवासुदेव आणि पांडव व इतर ऐल (सोमवंशी) उर्फ आर्य क्षत्रिय हिंदुस्थानात त्यांच्याही पूर्वी आलेल्या सूर्यवंशी-म्हजे मिसरी उर्फ इजिप्शियन अथवा द्राविड-क्षात्रियांशी बेटीव्यवहार करीत असत, इतकेंच नव्हे तर शूद्र, नाग अथवा चांडालादि इतर क्षत्रिय कुलांशीही बेटीव्यवहार करीत असत, हें निर्विकार इतिहासज्ञास कबूल करणें. फारसें जड जाईल,असे मला वाटत नाही. अशा विधानास ग्रांथिक पुरावा मिळाल्यास ते चांगलेच. पण तै दुर्मिळ असल्यास त्याच्याविषयी आग्रह धरण्याचें संशोधकास कारण नाही. असा कोणी आग्रहच धरल्यास वरील पाली उतारा महत्त्वाचा आहे, असे मी समजतों. पण हा उतारा म्हणजे केवळ सिद्धांतच आहे, असेंही माझे म्हणणें नाही, ही गोष्ट वाचकांनी ध्यानांत बाळगावी. प्रागौतिहासिक काळांत प्रवेश केल्यावर प्रत्येक वाचकाने स्वत:च संशोधक बनावे. इतरांनी व्यर्थ वादांत पडू नये. वरील पाली गाथेचा व तिच्यावरील अट्टकथेचा कालत: तारतम्यपूर्वक बारीक विचार केला असतां असे दिसतें की श्रीकृष्णाच्या कालीं हल्लीची अस्पृश्यता मुळीच नसून केवळ अनाचरणीयता असावी. ती केवळ परकीयासंबंधींच असावी आणि तीही श्रीकृष्णाने उल्लंघिली.
५. वेद-मंत्र काल
ज्ञानकोश, भाग तिसरा, पान ३६३ वर 'वेदकालांतील शब्दसृष्टि' ह्या मथळ्याखाली वेदकालीन जातींची जीं नावें दिली आहेत त्यांतून हीन जातींची नावें निवडून पुढे दिलीं आहेत.
संहितेंतील नावे
(ऋग्वेद)
अनृतदेव दस्यु वृषल
कितव (जुगार खेळणारा ) दास शिश्रदेव
कृष्णयोनि मूर-(मूढ)-देव शूद्र
(कृष्णयजुर्वेद )
तस्कर पुंजिष्ठ (कोळी) श्वपति (कुत्रें खाणारा)
निषाद (निषध?) श्वनि ( कुत्रें नेणारा ) स्तेन
(अथर्ववेद)
अंग कैरातिका
संहितेतर श्रौत वाड्यांतील नांवे
कैंठ्य पुलिंद मूतिब
पौंश्चलेय (पुंश्चली=पुरुषाच्या मागे धावणारी, तिचा पुत्र,)
पुंड (पोडु-हल्ली बंगाल्यांत आढळतात ) मूचीप शबर
वरील यादींचा वेदकाल म्हणजे मंत्र, आरण्यक, उपनिषद् व सूत्रकालापर्यंतचा काल असें ज्ञानकोशकारांनी म्हटलें आहे. खास ऋग्वेदसंहितेंत वृषल हेंच एक नांव आढळतें. दहाव्या मंडळाशिवाय जातिवाचक शब्दच आढळत नाहीत असें, ऋग्वेदाचा अगदी बारकाईने अभ्यास ज्यांनी चालविला आहे, त्या गुरुवर्य प्रि. राजवाड्यांनी सांगितलें. तथापि अधिक शोधाअन्तीं जीं जातिवाचक नावें आढळली तीं पुढे दिलीं आहेत. जींत 'वृषल' हा शब्द आहे ती ऋग्वेदांतील ऋचा अशी आहे.
पूर्वाह्ये अश्वान्युयुजे हि बभ्रूनू । सो अग्नेरत्ने वृषल: पपाद ।।
ऋग्वेदसंहिता, १०. ३४. ११
अर्थ - जो (जुगार खेळणारा) सकाळीं तांबडे घोडे रथास जुंपून निघाला, तो दिवसाच्या (अग्नीच्या) शेवटी वृषल म्हणजे बैल हाकणारा होऊन पडला. म्हणजे जुगारांत हरला. येथेही वृषल ह्याचा अर्थ अस्पुश्य असा मुळीच होऊ शकत नाही. ह्यावरून अस्सल मंत्रवाड्यांत अस्पृश्यतेचा मागमूसही नाही हेंच सिद्ध होतें.
अस्पृश्यतेचा जरी प्रत्यक्ष पुरावा मंत्रकालांत मिळत नाही, तरी ऋग्वेदाच्या सातव्या मंडळांत कांही ऋचा आढळतात त्यावरुन कांही परधर्मी परजातीविषयी आर्य ऋषीना किती भयंकर तिटकारा वाटत होता ते दिसतें. ह्यापैकी कांहीचा परविच्छेद करुन त्या पुढे देत आहे.
किमीदिन
(१) इंद्रासोमा सम् अवsशंसम् अभि अघम् तपु: यसस्तु चरु: अग्निवान्sइव ।
ब्रह्मsद्विषे क्रव्यsअढे धोरsचक्षसे द्वेष: धत्तम् अनवायम् किमीदिने ।
ऋग्वेद पदपाठ, ७, १०४, २.
अर्थ : - हे इंद्रा आणि सोमा, दृष्ट किमीदिनाभोवती त्यांचें पाप विस्तवांत तापणा-या हांड्याप्रमाणे तापत राहो. प्रार्थनेचा शत्रु, कच्चें मांस खाणारा, भयानक डोळ्यांचा जो किमीदिन त्याच्याशी निरंतर द्वेष राख.
(२) मा. न: रक्ष: अभि नट् यातुsमावताम् अप उच्छतु मिथुना या किमीदिना ।
पृथिवी न: पार्थिवात् पातु अंहस: अन्तरिक्षम् दिव्यात् पातु अस्मानू ।
ऋग्वेद पदपाठ , ७, १०४, २३
अर्थ : जादूरागर राक्षस आम्हांजवळ न येऊ देत. उषा किमीदिनांच्या जोडप्यांना हाकून देवो. पृथ्वी आम्हांला पार्थिव संकटांपासून राखो आणि आकाशांतून येणा-या विघ्नांपासून अंतराळ राखो.
यातुधान
(३) य: मा अपातुम् यातुsधान इति आह य: वा रक्षा: शुचि: अस्मि इति आह ।।
इन्द्र: तम् हन्तु महता वधेन विश्वस्य जनतो: अधम: पदीष्ट ।।
अर्थ : मी राक्षस नसून मला जो राक्षस म्हणतो आणि स्वत: असून आपण राक्षस नाही असें म्हणतो, अशा दोघांनाही इंद्र तीव्र शस्त्राने मारो. सर्वांत अत्यंत नीच अशा राक्षसाचा नाश होवो.
मूरदेव
(४) इन्द्र जहि पुभांमस् यातुsधानम् उत स्त्रियम् मायया शाशदानाम् ।
विग्रीवास: मूरSदेवा: ऋदन्तु मा ते दृशन् सूर्यम् उतsचरन्तम् ।
ऋग्वेद पदपाठ, ७,१०४, २४.
अर्थ : रे इंद्रा ! जादुविद्येंत जय मिळविणा-या आणि एकत्र रमणा-या पुरुष व स्त्री राक्षसांना ठार मार. ज्यांचे देव मूर्ख आहेत आणि माना वाकड्या आहेत, अशा दुष्टांचे पतन होवो. ते कधीच उदहास येणा-या सूर्याला न पाहोत.
शिश्नदेव
(५) न यातव: इन्द्र जूजुदु: न: न वन्दना शविष्ठ वेद्याभि:।
स: शर्घतू अर्य: विषुणस्य जन्तो: मा शिश्नदेवा: अपि गु: ऋतम् न: ।।
ऋग्वेद पदपाठ, ७.२१.५.
अर्थ : हे बलवान् इंद्रा ! कोणाही दुष्ट शत्रूंनी आपल्या काव्यांनी आमचा पराभव केला नाही. आमचा खरा देव त्यांच्या कळपांना जिंको. हे बीभत्सपूजक आमच्या उपासनास्थानाजवळ न येवोत.
(६) स: वाजम् याता अपदु:sपदा यन् स्व:sसाता परि सदत् सनिष्यन् ।
अनर्वा यत् शतsदुरस्य वेद: घन् शिश्नsदेवानू अभि वर्पसा भूतू ।।
ऋग्वेद पदपाठ, १०, ९९, २
अर्थ : तो (अग्नि) अत्यंत शुभ मार्गाने युद्धास जातो. स्वर्गोतील ज्योति मिळविण्याकरितां तो झटतो. तो आपल्या विद्येने न अडखळता शंभर दरवाज्यांच्या किल्ल्यांतील भांडार लुटतो, आणि शिश्नदेवांना ठार करतो.