स्वदेशी आगमन, बडोदा भेट आणि धर्मप्रचारकार्याला आरंभ

नेपल्सहून निघालेली रुबातिने ही बोट ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई बंदराला पोहोचली. विठ्ठल रामजी शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी मुंबई समाजाची बरीच लहानथोर मंडळी मोठ्या उत्साहाने जमली होती. मायभूमीला पोहोचल्याचा, मित्रमंडळी भेटल्याचा आनंद स्वाभाविकपणेच त्यांना झाला. शिंदे विलायतेहून धर्मशिक्षण घेऊन आल्यानंतर मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून काम करणार, तर त्यांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच समाजामध्ये परप्रांताहून, बाहेरगावाहून येणा-या पाहुणेमंडळींच्या निवासाचीही व्यवस्था व्हावी या हेतूने प्रार्थनासमाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला यांनी प्रार्थनामंदिराच्या आवारात एक ‘राम मोहन राय आश्रम’ नावाची तीन मजली इमारत ते येण्यापूर्वीच बांधून ठेवली होती. प्रार्थनासमाजाची मंडळी शिंद्यांच्या आगमनाची उल्हासाने वाट पाहत होती. ४ ऑक्टोबर १९०३च्या सुबोधपत्रिकेच्या अंकामध्ये होळकर या सहीने एक चमत्कृतिपूर्ण स्वागतपर पद्यबंध प्रसिद्ध झालेला पाहावयास मिळतो. ह्या रचनेमध्ये शिंदे यांचे गुणगान केलेले असून त्यांच्या हातून विविध प्रकारची कार्ये घडोत व त्यांचा सहवास मिळो अशी इच्छा प्रकट केली आहे. ही पद्यरचना आर्या वृत्तात सात कडव्यांची असून तिच्या मध्यभागी इंग्रजी S ह्या अक्षरात रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए. अशी अक्षरे येतील अशा खुबीने शब्दयोजना केलेली आहे.१

दुस-या दिवशी बुधवारी सायंकाळी शिंदे यांच्या स्वागतासाठी समाजबंधूंचे एक संमेलन भरले. प्रार्थनामंदिराच्या लगत भगवानदास माधवदास नावाचे समाजबंधू राहत होते. त्यांच्या बंगल्यात हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे अशा प्रकारची सूचनाही रविवारच्या सुबोधपत्रिकेच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. ह्या स्वागत समारंभासाठी बरीच लहानथोर समाजीय मंडळी उपस्थित राहिली होती. डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती चंदावरकर, दीनानाथराव माडगावकर ह्यांनी उपस्थित राहून मोठ्या आनंदाने स्वागतपर भाषणे केली. याप्रसंगी शिंदे यांच्या स्वागतार्थ गायिलेली तीन पद्ये सुबोधपत्रिकेच्या अंकामध्ये आलेली आहेत. शिंदे यांना विलायतेला जातेवेळी निरोप देण्याच्या प्रसंगी त्यांचे वृद्ध मित्र दीनानाथराव माडगावकर यांनी एख पद्ये रचले होते. आता त्यांच्या आगमन प्रसंगीही त्यांनी रचलेले पद्ये गायिले.

तरुण असता स्वार्थत्यागी।
तुम्ही दिसता भले।।
प्रभुवर कृपे धर्माभ्यासी।
तुम्हां यश लाभले।।
तरि तुमचिया हस्ते।
धर्मप्रचार बरा घडो।।
तनुमन तसे देवापायी।
सदा तुमचे जडो।।

शिंदे यांच्या स्वागतानिमित्त न्या. मू. चंदावरकर यांनी उपासना चालविली.२

विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल समाजबंधूंच्या मनात मोठ्य अपेक्षा झाल्या होत्या. ह्या अपेक्षा निर्माण व्हाव्यात अशा प्रकारची गुणवत्ता त्यांच्या ठिकाणी आहे याची प्रचिती समाजबांधवांना आलेली होती. सुबोधपत्रिकेच्या ११ ऑक्टोबर १९०३च्या अंकामध्ये संपादकीयाऐवजी रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे यांस अनावृत्त पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये शिंदे यांच्या ठिकाणी असणा-या व प्रत्ययाला आलेल्या गुणवत्तेचा नेमकेपणाने निर्देश केलेला असून शिंदे यांच्यापासून समाजबांधवांच्या कोणत्या अपेक्षा आहेत हे प्रकट केले आहे.३ मुंबईचा समाज व आपली अनेक मित्रमंडळी आपले स्वागत करण्याचा विचार काय म्हणून करीत आहेत असा प्रश्न उपस्थित करून पत्रलेखकाने म्हटले आहे, “आपण एका उदारमतप्रचारक पाठशाळेत दोन वर्षांपर्यंत उत्तम रीतीने धर्माध्यन केलेत म्हणूनच समाजाने आपले स्वागत केले असे मला वाटत नाही. त्याचप्रमाणे परदेशी असता आपण जी जी स्थळे पाहिली, आपण जो जो अनुभव प्राप्त करून घेतला, ज्या ज्या नवीन गोष्टी शिकलात त्यासंबंधाने सुबोधपत्रिकेच्या वाचकांसाठी आपल्य रसाळ व काव्यरसप्रचुर भाषेत मोठमोठी पत्रे लिहिली व ती ती स्थले आपण प्रत्यक्ष पाहत आहोत, त्या त्या लोकांशी आपला प्रत्यक्ष परिचय होत आहे अगर त्या त्या नवीन गोष्टी आपणच स्वतः शिकत व अनुभवीत आहोत अशा प्रकारची मनोवृत्ती आपली पत्रे वाचणा-या अनेक वाचकांची होत असे, म्हणूनही हा स्वागतसमारंभ झालेला नसावा. परदेशी असता आपल्या सुटीच्या दिवसात आपण निरनिराळ्या ठिकाणी ईश्वरोपासना चालविल्या, आपल्या देशातील पुरातन उन्नत असा धर्मासंबंधाने तद्देशीय लोकांस ज्ञान प्राप्त करून दिलेत म्हणून आपला सन्मान झाला नसावा; तर आपण आमच्या समाजाला एक उत्तम बागवान सापडला आहात आणि आपण एका अमृतवल्लीचा रोपा लाविला आहात असा अनुभव आल्यावरून व आशा बागवानावाचून आणि त्याच्या त्या अमृतवल्लीशिवाय समाजाचे कार्य नीटसे होणे शक्य नाही, असा अनुभव असल्यामुळे आपला तो जोमात असलेला रोपा पाहून आपले स्वागत करणे, आपणास त्या रोप्याच्या कामी एक प्रचंड वृक्ष निर्माण करण्याच्या कार्यी उत्तेजन देणे हे आपले कर्तव्य होय असे समाजास वाटून हा समारंभ झाला असावा.”

पत्रलेखकाने आपल्या समाजाचे धर्मप्रचाराचे कार्य म्हणजे एक प्रचंड बागाईत जमीन आहे असे म्हटले असून तेथे ज्ञानप्रसाराची, धनदानाची वल्ली आणि विद्वत्तेचाही रोपा आढळेल. मात्र त्याची नीट जोपासना झालेली आढळणार नाही असे म्हणून शिंदे यांना “आपण स्वार्थत्यागरूपी अमृतवल्लीचा जोमदार रोपा त्या जागेत लावल्यामुळेच आपण आम्हास फार आदरणीय झाला आहात. त्या रोप्याचा मोठा वृक्ष झाला पाहिजे. त्याची जोमदार कलमे जिकडेतिकडे लावून त्यांचेही मोठे वृक्ष झाले पाहिजेत.” असे म्हटले आहे. पुढे आपल्या उदाहरणाच्या योगे आम्हा तरुणांमध्ये स्वार्थत्यागाची आवड उत्पन्न कराल अशी आशा प्रकट केली आहे.

प्रस्तुत अनावृत पत्रामध्ये शिंदे यांनी धर्मप्रचार कार्यासाठी जो अपूर्व स्वार्थत्याग केला त्याची यथार्थ जाण दाखविली आहे. आमच्या या बागेमध्ये स्वार्थत्यागारूपी अमृतवल्लीचा रोपा औषधालाही सापडावयाचा नाही. आजपर्यंत त्या अमृतवल्लीचा रोपा लावण्याचा कुणी प्रयत्न केला नाही तो आपण केला, म्हणून आपले अभिनंदन करणे हे पत्रलेखकास आपले कर्तव्य वाटले. आपले स्वीकृत कार्य अत्यंत बिकट आहे हे नमूद करूनही बिकट प्रसंगीसुद्धा स्वीकृत कार्य करीत राहण्याची स्फूर्ती आपणास सदैव मिळो अशी पत्रलेखकाने अखेरीस प्रार्थना केलेली आहे.

विठ्ठल रामजी शिंदे यांना हिंदुस्थानात परत आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करावयाची होती ती म्हणजे श्रीमंत सयाजीराव महाराज यांना भेटणे. शिंदे विलायतेहून निघण्यापूर्वी त्यांना महाराजांकडून पत्र आले होते की, स्वदेशी आल्यावर प्रथम त्यांना भेटावे. त्यानुसार ते लगोलग महाराजांना भेटण्यासाठी बडोद्यास गेले. त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज यांची आदरपूर्वक भेट घेतली. त्या वेळी बडोद्यास महाराजांनी सुरू केलेल्या अस्पृश्यांसाठीच्या दिवसा चालणा-या चार प्राथमिक शाळा होत्या. त्या शिंदे यांनी तपासाव्यात व काही सूचना करावयाच्या असल्यास प्रत्यक्ष महाराजांना भेटून त्या समक्ष करावयास सांगितले. शाळातपासणीविषयी व्यवस्था करण्यास महाराजांनी विद्याधिका-यांना फर्माविले. शिंदे यांनी तत्परतेने या शाळा तपासल्या. सर्व शाळा जोरात चालल्या होत्या. तरीही अस्पृश्यवर्गातील मुलांसाठी केवळ शालेय शिक्षणाचे प्रयत्न कितीह सद्हेतुमूलक असले तरी अशा प्रयत्नांची मर्यादा ध्यानात आली. मराठी पाचवी अथवा इंग्रजी दुसरी किंवा तिसरीचे शिक्षण संपताच ही मुले शाळा बंद करून हिंडत असत. कारण त्यांना पुढे नोकरीधंद्यात वाव नसे. पुस्तकी शिक्षणामुळे ती आपल्या वडिलांचे हलके धंदे करण्यास नाखूष होती. आपल्या जातीचा पारंपरिक अशोभनीय धंदा करण्यापेक्षा आळसात दिवस काढणे ती पसंत करीत असत. मराठी सहावी पास झालेली काही महार मुले रस्त्यावरून रिकामटेकडेपणाने फिरत असतात हे स्वतः शिंदे यांनी पाहिले. प्रत्यक्ष भेटीत महाराजांनी यांना शाळांच्या तपासणीबाबत विचारले असता आपल्याला जाणवलेली वस्तुस्थिती महाराजांना त्यांनी सांगितली. ह्या शिकलेल्या मुलांच्या नोकरीविषयी काही सोय करता आली तर करावी असे सुचविले. ह्या मुलांना जर पुढे नोकरीत वाव मिळाला नाही तर त्यांच्या या शाळांची वाढ तर होणार नाहीच; उलट त्या कितपत चालू राहतील याबद्दल आपल्याला शंका वाटते असेही त्यांनी महाराजांच्या निदर्शनास आणले. महाराजांनी लोकमत अनुकूल नसल्याने तुर्त ते शक्य नाही असे सांगितले. पण स्कॉलरशिपा देऊन पुढील शिक्षणाची सोय करता येईल असे ते म्हणाले.४

थोड्याच दिवसानंतर अस्पृश्यवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मोठ्या रकमांच्या स्कॉलरशिपची सोय महाराजांनी केली आहे असे वृत्तपत्रात शिंदे यांना वाचावयास मिळाले.

बडोद्याच्या या मुक्कामातच विठ्ठल रामजी शिंदे यांना एका बिकट प्रसंगाला तोंड द्यावे लागले. शिंदे बडोद्याला येत आहेत हे समजल्यानंतर शहरातील प्रमुख मंडळींनी त्यांचे स्वागत करण्यासाठी पानसुपारीचा एक जाहीर समारंभ करण्याचे ठरविले. श्री. खासेराव जाधव यांचा या बाबतीत पुढाकार होता. समारंभामध्ये एकामागून एक जी वक्त्यांची भाषणे झाली त्यामधून प्रतिकूल सूरच निघू लागले. शिंदे यांचे सर्व शिक्षण मराठा समाजाच्या खर्चातून झाले आहे, विलायेतेला जाण्यायेण्याचा खर्चही महाराजांकडून मिळाला आहे असे असता हे मराठा समाजाच्या सेवेला हजर न होता प्रार्थनासमाजात शिरले हे बरे केले नाही, अशा प्रकारची भाषणे करून शिंदे यांच्या गळ्यात जेव्हा माळ घालावयास मंडळी पुढे आली तेव्हा त्यांनी म्हटले, “असे जर आहे तर मी ही माळ घालण्यास लायक नाही. म्हणून मी हातातच घेत आहे. प्रार्थनासमाज सर्वांसाठी आहे आणि त्यासाठी मला तयार केले हे मराठ्यांस, विशेषतः महाराजांना भूषणावहच आहे. स्वतः महाराज हेच जर केवळ मराठ्यांकरिता नाहीत तर त्यांचा अनुयायी मी निराळा कसा होऊ?”५ शिंदे हे मुळातच जातिभेदातील अशा कौटुंबिक संस्कारात वाढले होते. आता तर ते केवळ जातीच्या, पारंपारिक धर्माच्या पलीकडे असलेल्या एकेश्वरी उदार विश्वधर्माचे पाईक बनलेले होते. बडोदेकर मराठा मंडळींना त्यांनी अश प्रकारचे उत्तर देणे त्यांच्या वृत्तीशी आणि भूमिकेशी सुसंगत होते. ह्या उत्तरातून विठ्ठलराव शिंदे संतुष्ट असले पाहिजेत. श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्याविषयी त्यांना अतीव आदर होता. महाराजांचे केवळ आर्थिक साह्यच त्यांना मिळाले होते असे नव्हे, तर पत्करलेल्या धर्मकार्यासाठी त्यांच्याकडून प्रोत्साहनही मिळाले होते. या भेटीत शिंदे यांना त्यांच्याबद्दलही कृतज्ञता प्रकट करता आली असणार आणि दुसरे, अस्पृश्य मुलांसाठी असलेल्या शाळा तपासण्याचे काम त्यांना करता आले. आयुष्यात त्यांनी महत्त्वाच्या मानलेल्या दुस-या एका कार्याचा प्रारंभही अशा प्रकारे झाला होता.

बडोद्याहून आल्यानंतर मुंबई प्रार्थनासमाजातील वडीलधा-या स्नेही मंडळींच्या आणि तरुण मित्रांच्या गाठीभेटी घेण्यात, चर्चा करण्यात शिंदे यांचे चार-सहा दिवस गेले. आपल्या वृद्ध, प्रेमळ मातापित्यांना भेटण्यास ते स्वाभाविकपणे उत्सुक असणार. मुंबईहून ते जमखंडीस गेले. त्यांच्या सहवासात काही दिवस राहून ऑक्टोबरच्या २७ तारखेस कोल्हापुरास आले. कोल्हापूरून लिहून आलेल्या व सुबोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या शिंदे यांच्याबद्दलच्या मजकुरावरून त्यांच्या ठिकाणी धर्मप्रचाराची तळमळ किती उत्कट होती, त्यांचा उत्साह किती दांडगा होता व कामाचा झपाटाही कसा वेगवान होता याची कल्पना येते. त्यात म्हटले आहे, “इंग्लंडहून येऊन १०/१५ दिवस झाले नाहीत तोच इकडे कोल्हापुरात हिंदुस्थानातील आपल्या धर्मप्रचाराच्या कार्यास त्यांनी सुरुवात केली असे म्हणावयास हरकत नाही. येथे असताना तीन-चार दिवसांत आपल्या मित्रमंडळींबरोबर बोलण्यास त्यांना ब्राह्मसमाजाशिवाय दुसरा विषयच नव्हता."६

कोल्हापुरातील तीन-चार दिवसांच्या मुक्कामातील पहिल्या रात्री राजारामीय क्लबमध्ये त्यांना निमंत्रित केले होते, तेथे जमलेल्या विद्वान मंडळींशी त्यांनी संभाषण केले. दुसरे दिवशी नेटिव्ह जनरल लायब्ररीमध्ये ‘धर्माचे शुद्ध स्वरूप’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानात प्रत्येक धर्माचे मूळ स्वरूप अत्यंत शुद्ध असून परिस्थितीप्रमाणे त्यांचे स्वरूप अशुद्ध कसे होत जाते ते दाखवून दिले. तसेच हल्ली शुद्ध धर्माची स्थापना होण्यासाठी सुधारलेल्या जगात त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज यांसारख्या संस्थांचे जे प्रयत्न चालले आहेत त्यांची माहिती देऊन सांगितलेल्या गोष्टींविषयी कळकळीने विचार करण्याची विनंती केली. तिस-या दिवशी उपासना चालवली. उपदेशासाठी तुकारामांचा ‘धाई अंतरिच्या सुखे। काय बडबड वाचा मुखे।‘ हा अभंग घेतला होता.

पत्रलेखकाने अखेरीस शिंदे यांच्या ठिकाणी आरंभीचा उत्साह असल्यामुळे काम झपाट्याने करण्याची उमेदही जबर आहे असा अभिप्राय प्रकट करून “तथापि त्या उमेदीमध्ये आपल्या प्रकृतीची हयगय न होऊ देण्याबद्दल त्यांस विनंती केल्याशिवाय राहवत नाही” असे अगत्यपूर्वक म्हटले आहे.

शिंदे यांच्या ठिकाणी धर्मप्रचाराचे काम करण्याचा उत्साह व काम झपाट्याने करण्याची उमेद जबरदस्त आहे असे जे म्हटले ते अगदी सार्थ होते. त्यांनी पुढील काळात मुंबई प्रार्थनासमाजाचे व अखिल भारतीय पातळीवर जे कार्य विविध प्रकारे केले ते पाहता ह्या अभिप्रायाची सत्यता पटते. कोल्हापूरहून निघून शिंदे हे साता-यास १ तारखेस पहाटे ४ वाजता पोहोचले आणि आधी ठरल्याप्रमाणे प्रार्थनासमाजामध्ये सकाळी ८ ते १० उपासना चालविल्या. सातारा प्रार्थनासमाजाचे निष्ठावंत ज्येष्ठ सभासद सीतारामपंत जव्हेरे यांनी त्यांना निमंत्रित केले होते. सातारा येथील उपासनेचा विशेष म्हणजे अंत्यजादी जातींचीही बरीच मंडळी जमली होती. उद्बोधन, स्तवन, प्रार्थना हा उपक्रम पद्धतशीरपणे झाल्यानंतर तुकाराममहाराजांच्या ‘बुद्धि झाली साह्य परि नाही बळ । अवलोकितो जळ वाहे नेत्री।' ह्या अभंगाच्या आधारे अखेरीस उपदेश केला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रा. ब. काळे यांच्या घरी संगतसभेप्रमाणे काही वेळ धार्मिक विषयाचे विवेचन झाले. त्यानंतर सातार युनियन क्लबमध्ये ठरल्याप्रमाणे साडेसहा ते साडेसात शिंदे यांचे भाषण झाले. श्रोतृवर्ग दीडेशेपेक्षाही जास्त होता. क्लबच्या धोरणानुसार अंत्यजादिक मानलेल्या मंडळींनाही निमंत्रण होते. व्याख्यान सगळ्यांना मनोवेधक वाटले. अध्यक्ष रावबहादूर नाडकर्णी यांनी व्याख्यात्याची प्रशंसा केली. रा. जव्हेरे यांनीही व्याख्यात्यांची साधी वागणूक वगैरे गुणांची प्रशंसा केली. सोमवारी दुपार होऊनही शिंदे उत्साहाने कार्यक्रमात भाग घेत होते. ४ ते ६ पर्यंत शहरातील रा. चिरमुले, रा. काळे, डॉ. बासू, रावबहादूर जोशी वगैरे मंडळींसमवेत वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा, संवाद झाले. संध्याकाळी सव्वासहा ते साडेसातपर्यंत एका अंत्यजाच्या घरी त्यांनी उपासना चालविली व उपदेश केला. बायका-मुलांसह सुमारे पन्नाससाठ अंत्यजादिक मंडळी उपस्थित होती. उदार धर्माच्या तत्त्वाचे यथार्थ परिपालन शिंदे यांच्या कार्यक्रमामधून दिसून येते. कोल्हापूरच्या पत्रलेखकाने नमूद केल्याप्रमाणे शिंदे यांच्या ठायी असलेला उत्साह व झपाट्याने काम करण्याची प्रचंड उमेद याचा पडताळा त्यांच्या कार्यकालाच्या प्रारंभापासून मिळत राहिला.

जमखंडी येथे जाऊन आई-वडिलांना भेटून व कोल्हापूर, सातारा येथील दौरा आटोपून ४ नोव्हेंबरच्या सुमारास विठ्ठलराव मुंबईस परतले. रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी प्रार्थनामंदिरात ‘कर्मयोग’ या विषयावर धर्मपर व्याख्यान दिले.७ भगद्गीतेतील ‘यस्त्विन्द्रियाणि मनसा’ हा भगवद्गीतेली तिस-या अध्यायातील श्लोक व तुकाराममहाराजांच्या ‘प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी’ या अभंगाचे सूत्र घेऊन त्यांनी सखोल तसेच सुलभ विवेचन केले. ज्ञानानंतर म्हणजे यथार्थ ज्ञानानंतर दोन प्रकारची म्हणजे वेदांतांची व भक्तांची नैष्कर्म्य वृत्ती कशी निर्माण होते ह्याचे सुलभ दृष्टांताधारे विवरण केले. “ज्ञानयोग साधून संसारातून उठावे आणि प्रकृतीचे दास्य करावे की कर्मयोग साधून ईश्वराचे मित्र होऊन पृथ्वीवर स्वर्ग आणावा ह्या दोन भागांपैकी हा कर्मयोग साधणे आमच्या समाजाचा धर्म आहे. संसारात आनंदाने राहणे आणि तदंगभूत कौटुंबिक, सामाजिक, राजकीय इत्यादी जी अनेक सत्कर्मे असतील ती केवळ जडहित साधण्याच्या हेतूनेच नव्हे तर ईश्वरी योजना असे समजून, त्याची सेवा जाणूनबुजून करणे म्हणजे वरील कर्मयोग होय. अशा प्रकारे कर्मयोगाचे त्यांनी विवरण केले. प्रार्थनासमाजातील या अगदी प्रारंभिक व्याख्यानात त्यांनी संसारत राहून जी कर्मे करावयाची त्यामध्ये कौटुंबिक कर्माबरोबर सामाजिक, राजकीय सत्कर्मांचा निर्देश केला होता. शिंदे यांची स्वतःची धारणाही अशीच बनलेली होती. प्रार्थनासमाजाने धार्मिक अंगाच्या जोडीने सामाजिक कार्याला प्रत्यक्ष आरंभ केला होताच. राजकारणही त्यांना वर्ज्य नव्हते.
 
शिंदे यांची धर्मप्रचारक म्हणून औपचारिक नेमणूक अद्याप व्हावयाची होती. न्यायमूर्ती चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रार्थनासमाजाची साधारण सभा १५ नोव्हेंबर १९०३ रोजी झाली व तीमध्ये शिंदे यांना सर्वानुमते समाजाचे धर्मप्रचार नेमण्याचे ठरले.८

शिंदे यांनी धर्मप्रचारकाच्या कार्याला आधीच आरंभ केला होता. आपल्या अंतःप्रेरणेने त्यांनी धर्मकार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला होता. औपचारिक नेमणुकीची ते थोडीच वाट पाहणार?

संदर्भ
१.    होळकर ह्या नावानेही पद्यरचना श्री. आत्माराम सदाशिव केळकर यांनी केलेली आहे, अशी माहिती श्री. बी. बी. केसकर यांच्या हस्तलिखित टिपणात आहे. आत्मारामपंत हे सदाशिवराव केळकरांचे चिरंजीव. ह्यावेळी केळकर कुटुंबीयांचे वास्तव्य इंदुरास होते. म्हणून होळकर हे टोपण नाव. शिंदे यांची कगदपत्रे.
२.    बी. बी. केसकर यांचे हस्तलिखित टिपण, शिंदे यांची कागदपत्रे.
३.    सुबोधपत्रिका, ११ ऑक्टोबर १९०३. हे अनावृत्त पत्र एका तरुण सभासदाकडून आलेले म्हणून छापलेले आहे.
४.    वि. रा. शिंदे, ‘इलेव्हेशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस’, सुबोधपत्रिका, १७ डिसेंबर १९०५.
५.    विठ्ठल रामजी शिंद, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १८९.
६.    सुबोधपत्रिका, नोव्हेंबर १९०३.
७.    तत्रैव, १५ नोव्हेंबर १९०३.
८.    तत्रैव, २२ नोव्हेंबर १९०३.