विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे धर्मप्रचाराचे कार्य मुंबईत तर जोराने चालले होतेच, शिवाय अन्य ठिकाणीही स्थानिक समाजाच्या निमंत्रणावरून त्यांना जावे लागे. मुंबई शहराशिवाय महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर येथे, गुजराथेत अहमदाबाद, बडोदे, नवसारी येथे आणि मध्यप्रदेशात इंदूर येथे प्रार्थनासमाज होते. त्यांचे वार्षिक उत्सव आठवडाभर चालत. त्यांत भाग घेण्यासाठी शिंदे ह्यांना जावे लागे. ब्राह्मधर्माचा प्रसार करण्याची ही चांगली संधी आहे असे समजून शिंदेही मोठ्या उत्साहाने जात असत. अशा उत्सवाच्या प्रसंगी शिंदे ब्राह्मसमाजाच्या मूलभूत तत्त्वांचे व्याख्यानांच्याद्वारा विवरण करीत असत. त्याशिवाय धर्मप्रसाराचे कार्य जोमाने कसे चालेल ह्यासंबंधी नवनवीन विचार मांडून ह्या कामास प्रेरणा देत.
१९०४च्या २७ व २८ ऑगस्ट या तारखांना बडोदा संस्थानातील नवसारी येथे प्रार्थनासमाजाचा वार्षिक उत्सव साजरा झाला. नवसारी येथील लक्ष्मण हॉल ह्या प्रशस्त सार्वजनिक इमारतीमध्ये २७ तारखेस गुजराथीमध्ये उपासना झाली. २८ तारखेस सकाळी शिंदे ह्यांनी ‘अहमदाबाद प्रार्थनामाला’ ह्या पुस्तकातून उपासना चालविली आणि त्यानंतर हरिकीर्तन केले. पुन्हा संध्याकाळी त्यांनी त्याच पुस्तकामधून उपासना चालविली व व्याख्यान दिले. ‘उदार धर्मचळवळीची आवश्यकता’ असा त्यांनी व्याख्यानासाठी विषय घेतला व नवसारी येथील प्रार्थनासमाज त्यामध्ये कोणत्या प्रकारे आपला वाटा उचलू शकेल तेही सांगितले. उपासनेला व व्याख्यानाला गावातील नागरिक आणि पारशीधर्मीय श्रोतेही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते व नवसारीचे जिल्हाप्रमुख अधिकारी सुभासाहेब रा. ब. खासेराव जाधव हे अध्यक्षस्थानी होते. शिंदे ह्यांनी व्याख्यानाच्या प्रारंभीच सांगितले की, संस्थानातील अधिकारी, नवसारी, सोनगड यांसारख्या ठिकाणी धर्मकार्यात भाग घेतात ही गोष्ट संस्थानाधिपतीचा धर्मकार्याविषयक दृष्टिकोण पुढे नेतात ह्याची द्योतक आहे. व्याख्यानाच्या ओघात त्यांनी असे दाखवून दिले की, धर्मसुधारणा ही केवळ एक सुधारणा नसून सर्व चांगल्याच्या मुळाशी असणारी ही एक गोष्ट आहे. जगातील आधुनिक उदार धर्मविषयक चळवळ ही विवेचक व समावेशक स्वरूपाची आहे. उदार धर्म हा आता विश्वधर्म होऊ पाहत आहे असेही व्याख्यात्यांनी अखेरीस सांगितले.
अध्यक्ष सुभासाहेब रा. ब. खासेराव जाधव ह्यांनी उत्तम भाषण करून धार्मिक शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादली. शिंदे ह्यांनी समाजाला एक ग्रंथालय असावे अशी सूचना केली व मुंबई येथून काही पुस्तके पाठविली. म्हणून तेथे ग्रंथालयाची स्थापना झाली.१
नवसारी जिल्ह्यामध्येच जंगलातील भागात सोनगड या गावी प्रार्थनासमाज चांगल्या प्रकारे चालला होता. १९०५ साली सोनगड येथील समाजास शिंदे ह्यांनी भेट दिली. ह्या भागामध्ये ढाणके नावाची जंगली जात राहत असे व त्यांच्या शिक्षणाची श्रीमंत सयाजीरावांनी चांगल्या प्रकारे सोय केली होती. मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी एक एक वसतिगृह स्थापन केले. प्रत्येक वसतिगृहात ५० विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलेली होती. मागासलेल्या लोकांना शिक्षण देताना श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्यांनी मुलांप्रमाणेच मुलींनाही शिक्षण देण्याची व्यवस्था केली. हा त्यांच्या व्यापक दृष्टिकोणाचा भाग होता. वसतिगृहाचे सुपरिटेंडेंट म्हणून रा. फत्तेखाँ नावाचे मुसलमान गृहस्थ मोठ्या कळकळीने काम करीत होते.
२७ मार्च १९०४ पासून इंदूर येथील प्रार्थनासमाजाचा उत्सव सुरू झाला. शिंदे हे ह्या उत्सवाला उपस्थित राहिले व त्यात सहभागी झाले. शिदे ह्यांची उपस्थिती प्रार्थनासमाजाच्या कार्याला प्रेरक, उत्साहवर्धक व दिशा देणारी ठरली. शिंदे हे किती वेगवेगळ्या पातळीवरून व रास्त दृष्टिकोणातून धर्मप्रसाराचे कार्य साधीत होते ह्याची कल्पना त्यांच्या सहभागावरून येऊ शकते. ह्या उत्सावत त्यांनी प्रौढ मंडळी तसेच अमराठी श्रोते ध्यानात घेऊन त्यांच्यासाठी दोन व्याख्याने इंग्रजीमधून दिली. १) ‘प्राच्य व पाश्चात्त्यांकडील आधुनिक उदार धर्माच्या काही कार्यपद्धती’ व २) ‘ब्राह्मसमाज आणि जगातील संतमंडळी’ हे त्यांच्या व्याख्यानाचे विषय होते. सर्वसामान्य श्रोत्यांसाठी त्यांनी वर्डस्वर्थचे चरित्र मराठीत सांगितले. त्यांच्या कविता वाचून दाखविल्या. त्यांचा सरळ, सोप्या भाषेत अर्थ विशद केला. विशेषकरून ‘वुई आर सेव्हन’ या कवितेतील साधे पण महत्त्वाचे तात्पर्य- आत्म्याचे अमरत्व-फार हृदयंगमपणे सांगितले. पुन्हा एकदा पूजनानंतर सभासद, हितचिंतक, गृहस्थ, गृहिणी ह्यांच्या मेळ्यासमोर शिंदे ह्यांनी बेळगाव, मद्रास, कलकत्ता इकडे नुकत्याच केलेल्या प्रवासातील अनुभव चटकदारपणे सांगितले. समाजातील मुलांचा मेळा झाला. त्यांच्यासमोर ह्या लहान लहान मुलांना नेहमी सत्य बोलत जाण्यासंबंधी त्यांच्याच भाषेत लहानशी गोष्ट सांगितली व ख्रिस्ताचा व कन्फ्युशियसचा माणसांनी कसे वागावे यासंबंधीचा सुबोध उपदेश केला. अधिक मोठ्या वयाच्या मुलांना “ज्ञान अधिकाधिक वाढू दे पण त्याबरोबर पूज्यबुद्धीही अंतःकरणात अधिकाधिक पोहचू दे” ह्या टेनिसनच्या वचनानुसार उपदेश केला. स्त्रियांच्या मेळ्यासमोरही शिंदे ह्यांनी भाषण केले. आभारप्रदर्शन भाषण करतेवेळी सौ. उमाबाई केळकर म्हणाल्या, “रा. शिंद्यांप्रमाणे प्रत्येकाची समजूत होईल तर स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या बाबतीत काहीतरी होईल.” शिंदे ह्यांचा स्त्रिविषयक दृष्टिकोण हा सौ. उमाबाई केळकर ह्यांच्यासारख्या स्त्रियांना अत्यंत महत्त्वाचा वाटला. उत्सवाच्या अखेरीस नगरसंकीर्तनानंतर रात्री १० वाजता मंडळी परत आल्यानंतर शिंदे ह्यांनी समाजबंधूस फार कळकळीने, अश्रूपूर्ण नेत्रांनी, मोठ्या निश्चयाच्या शब्दांत नगरसंकीर्तनाचा प्रसंग प्रत्येक वर्षी उत्सवात ठेवीत जा व लहानथोरांनी लाज सोडून आजच्याप्रमाणे नेहमी भक्तिरस लुटीत जावा असा उपदेश केला. त्यानंतर त्यांनी ईश्वरप्रार्थना केली व सभेची सांगता झाली.२
सातारा येथील प्रार्थनासमाज हा एक उत्तम प्रकारे चाललेला महाराष्ट्रातील समाज होता. रा. सीतारामपंत जव्हेरे हे प्रामुख्याने समाजाचे काम कळकळीने चालवीत असत व रावबहादूर काळे, रा. मोरोपंत जोशी व त्यांची कन्या मथुराबाई वगैरे मंडळी त्यांना मदत करीत असत. १९०५ सालच्या एप्रिलअखेरीस समाजाचा वार्षिक उत्सव उत्साहाने साजरा झाला. विठ्ठल रामजी शिंदे हे त्यामध्ये सहभागी झाले. त्यांचे ‘निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतार व विकास’ ह्या विषयावर अत्यंत उद्बोधक व प्रेरक असे मुख्य व्याख्यान झाले.३ त्यांनी व्याख्यानामध्ये प्रवृत्तिवादाचा जोरदार पुरस्कार केला. माणसाने आपल्या अहंकाराचा परिघ विश्वाइतका मोठा करावा असे प्रतिपादिले. व्यक्तीने स्वतःची सर्वांगीण उन्नती करणे आवश्यक आहे. तशा प्रकारची क्षमता तिच्यामध्ये येण्यासाठी विभूतीच्या अवतारावर विसंबून राहू नये. व्यक्ती अवताराच्या प्रभावाने एकदम खालून वर उचलली जाण्यापेक्षा तिचा स्वाभाविक, क्रमिक विकास होणे हे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. व्यक्तीच्या प्रतिष्ठेला, व्यक्तीच्या प्रयत्नाला व स्वाभाविक विकासाला महत्त्व देण्याची शिंदे यांची भूमिका होती. आध्यात्मिक विकासातही ते याच भूमिकेचा पुरस्कार करताना दिसतात.
उत्सवसमाप्तीच्या वेळेस समारोपादाखल केलेल्या भाषणात रा. सीतारामपंत जव्हेरे ह्यांनी शिंदे ह्यांच्या अहंकार सोडण्याच्या मुद्दयाचा आवर्जून उल्लेख केला. सातारा प्रार्थनासमाजाची एक विशेष गोष्ट म्हणून त्यांनी आपल्या समाजामध्ये उपासना वगैरेस येण्यास महारमंडळींना मुक्तद्वार आहे ह्याचा आवर्जून उल्लेख केला व ह्या लोकांसंबंधी आपले जे कर्तव्य आहे ते पार पाडणे आवश्यक असल्याचे सांगितले.
शिंदे हे उत्तरादाखल बोलले. प्रार्थनासमाजाच्या कामासंबंधी तीव्र स्वरूपाची आत्मीयता सर्वांच्या ठिकाणी निर्माण होणे आवश्यक आहे असे त्यांनी आवाहन केले. अन्यत्र कोठेही आढळून न येणा-या सातारा प्रार्थनासमाजातील दोन गोष्टींचा शिंदे ह्यांनी आवर्जून उल्लेख केला. १) महार जातीचा प्रार्थनासमाजामध्ये काहीएक प्रमाणात झालेला प्रवेश व दुसरी गोष्ट म्हणजे एका कुमारी स्त्रीने (कुमारी मथुराबाई जोशी) भर समाजात येऊन उपासना चालवून आपल्या धर्मानुभवाचा बंधू-भगिनींस मोकळेपणे लाभ करून देणे ही होय.४
अस्पृश्य समजल्या जाणा-या वर्गासंबंधी काहीएक कार्य व्हावे व आपल्या समाजव्यवस्थेत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावे ह्या दोन्ही विषयासंबंधी शिंदे ह्यांना फार कळकळ होती व त्या दोन गोष्टी साता-यास दिसून आल्यामुळे शिंदे ह्यांना स्वाभाविकच आनंद झाला.
उत्सवाच्या समाप्तीनंतर शहराच्या लष्कर भागामध्ये अस्पृश्यवर्गातील सैनिकांकरिता शिंदे ह्यांचे ‘धर्मजागृती’ ह्या विषयावर एक विशेष व्याख्यान झाले. “हल्ली इंग्रजांच्या राज्यात जर हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिस्ती ह्या प्रकारचा भेद पाळण्यात येत नाही तर ईश्वराचे राज्य, जे खात्रीने अधिक पवित्र असणार, त्यात कसा पाळण्यात येईल” असा प्रश्न उपस्थित करून सर्व धर्माच्या मुळाशी असणा-या तत्त्वाचा त्यांनी निर्देश केला.
ह्या व्याख्यानाकरिता मंडळी जमविणे व सभास्थानाची व्यवस्था राखणे हे काम एका मुसलमान पेन्शनर सद्गृहस्थाने व त्याच्या जातीतील काही मंडळींनी केले. व्याख्यानाची जागा चव्हाट्याच्या कोप-यावरील पोलीसचौकीमध्ये होती व रस्त्यात बाके मांडली होती. पोलीसचौकीतील खांब वेलीफुलांनी सुशोभित केले होते व मराठा लाईट इन्फंट्रीतील सुभेदार, जमादार वगैरे अंमलदार, हवालदार, शिपाई, मुसलमान, पारशी व इतर लोक असा सर्वधर्मीय श्रोतृवर्ग होता.
शिंदे ह्यांच्या व्यक्तिगत दृष्टीने दुसरी एक महत्त्वाची घटना घडली. साता-याहून जवळ असलेल्या वर्णे ह्या खेड्यातील सबरजिस्ट्रार रा. बापूजी बच्चाजी शिंदे ह्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. गपणपतराव शिंदे ह्यांनी विठ्ठल रामजींना मुद्दाम आपल्या गावी बोलावून नेले. खेड्यातील लोकांसाठी शिंदे ह्यांनी भजन केले व उपासना चालविली. ह्या लोकांना देण्यासाठी पोस्टल मिशनचे वाङमय पाठविण्याचेही शिंदे ह्यांनी कबूल केले; नंतर तशी व्यवस्था केली.
उदार धर्माचा प्रसार खेड्यात होणे तर जास्तच आवश्यक आहे ही शिंदे ह्यांची धारणा ते बी. ए. चा अभ्यास करीत होते तेव्हापासूनच होती. त्यांच्या ह्या आस्थेच्या विषयाबाबत कार्य करण्याला प्रारंभ ह्या निमित्ताने ह्यावेळी झाला. शिंदे ह्यांचा व्यक्तिगत लाभ म्हणजे श्री. गणपतराव शिंदे ह्या कविमित्राशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध ह्या प्रसंगी निर्माण झाला व त्यांच्या आयुष्याच्या अखरेपर्यंत टिकून राहिला.
१९०५ पासून विठ्ठल रामजी शिंदे अहमदनगर येथील प्रार्थनासमाजास वारंवार भेटी देत असत. तेथील साळी समाजाचे पुढारी रा. सहदेवराव बागडे हे प्रार्थनासमाजाचे काम आस्थेवाईकपणाने चालवीत असत. त्यांच्या वजनामुळे साळी जातीतील अनेक लोक प्रार्थनासमाजामध्ये जात. १९०६ सालच्या अहमदनगर समाजाच्या उत्सवासाठी शिंदे तेथे गेले. नेहमीप्रमाणे उत्सव चांगल्यीत रीतीने पार पडला. १९०५ सालापासून शिंदे ह्यांचा संबंध तेथील अस्पृश्यवर्गाच्या पुढा-यांशी आला. त्यांनी सहदेवराव बागडे ह्यांच्या साहाय्याने स्पृश्य मुलांसाठी एक व अस्पृश्य समाजातील वर्गासाठी एक अशा दोन रात्रीच्या शाळा काढल्या. मुंबईत ज्याप्रमाणे समाजाच्या रात्रशाळा चालू होत्या त्याच धर्तीवर शिंदे ह्यांनी पुणे, नगर येथे अशा प्रकारच्या रात्रशाळा सुरू केल्या व समाजाने आरंभिलेल्या ह्या कार्याचा विस्तार केला.
१९०४ नंतर पुन्हा १९०७ साली शिंदे हे इंदूर येथील प्रार्थनासमाजाच्या वार्षिक उत्सवासाठी गेले. त्यांच्याबरोबर पत्नी सौ. रुक्मिणीबाई आणि सहकारी स्वात्मानंद हे होते. इंदूर येथील प्रार्थनासमाज उत्साहाने चालला होता. डॉ. प्रभाकरपंत भांडारकर, होळकर कॉलेजचे प्रोफेसर देसाई, तेथील सुप्रसिद्ध पाटकर-जाधव ह्यांचे कुटुंब, चित्रकार रामचंद्र मिटबावकर ह्यांचा उत्तम सहभाग असे. शिवाय प्रार्थनासमाजाचे आधीचे प्रचारक रा. सदाशिवराव केळकरही तेथेच होते. उत्सवामध्ये नगरसंकीर्तन थाटाचे झाले व नगराबाहेर वनोपासनेत प्रीतिभोजनाचा समारंभही आनंददायी रीतीने पार पडला. शिंदे ह्यांचे लक्ष अस्पृश्यवर्गासाठी काहीएक कार्य करावे इकडे लागलेले होते.
१९, २४ एप्रिल १९०७ रोजी तेथील काही पुढारी मंडळींच्या मदतीने एक कमिटी स्थापन करून अस्पृश्यांसाठी ५ मे १९०७ रोजी एक संस्था उघडण्यात आली.
उत्सव ओटोपल्यानंतर जाधवमंडळींसमवेत शिंदे ह्यांनी पत्नीसह सफर काढली व धार, मांडवगड येथील प्रेक्षणीय स्थळे पाहिली. त्यांनी आपली पत्नी रुक्मिणीबाई ह्यांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी काही महिने जाधवमंडळींकडे ठेवले. अस्पृश्यवर्गाची सेवा करण्यासाठी त्यांनी उघडलेल्या निराश्रित सेवासदनामध्ये ह्या शिक्षणाचा आपल्या पत्नीला उपयोग होईल अशी त्यांची धारणा होती.
१९०७च्या ऑक्टोबर अखेरीस मंगळूर शहरातील ब्राह्मसमाजाकडून शिंदे ह्यांना तिकडे घेऊन जाण्यासाठी त्या समाजाचे रा. व्यंकटाप्पा कांतप्पा नावाचे सभासद मुंबईस आले. शिंदे हे भगिनी जनाबाईबरोबर आगबोटीने मंगळुरास निघाले. त्यांच्या स्वागतासाठी बंदरावर फार मोठा समुदाय उन्हामध्ये तिष्ठत वाट पाहत जमलेला होता. त्यांचे हे हार्दिक स्वागत पाहून शिंदे ह्यांना गहिवर आला. समाजाचे अध्यक्ष वृद्ध उल्लाळ रघुनाथय्या व सेक्रेटरी के. रंगराव हे होते. त्याशिवाय खजीनदार कृष्णराव गांगुली, कर्नूल सदाशिवराव व आणखी काही सारस्वत घराणी समाजामध्ये होती. बाकीचा मोठा वर्ग बिल्लव ह्या जातीचा होता. ही जात पूर्वी अस्पृश्यवर्गात मोडली जात असे. ब्राह्मसमाजात प्रवेश केल्यानंतर हे सर्व सभासद वरिष्ठवर्गात मोडले जाऊ लागले. ब्रह्मानंद केशवचंद्र सेनच्या अमदानीत प्रतापचंद्र मुझुमदार ह्यांनी मंगळूर येथे ब्राह्मसमाज स्थापण्यात पुढाकार घेतला होता. बिल्लव जातीचे आलसाप्पा नावाचे वजनदार पुढारी होते. त्यांच्या पुढाकाराने सुमारे ५ हजार बिल्लव जातीतील लोक दीक्षा घेण्यास तयार झाले होते.
बापू प्रतापचंद्र मुझुमदार यांचे इंग्रजीतील अमोघ वक्तृत्व आणि प्रेमपूर्ण प्रचार ह्याच्या जोरावर त्यांनी लवकरच वरिष्ठ आणि कनिष्ठवर्गावर छाप बसविली व ब्राह्मसमाजाची स्थापना केली. विठ्ठल रामजी शिंदे व त्यांची बहीण जनाक्का ह्यांना कानडी भाषा येत असल्यामुळे समाजातील मंडळींना त्या दोघांबद्दल फार आपुलकी वाटू लागली. प्रार्थनासमाजाचे उत्साही सेक्रेटरी के. रंगराव ह्यांना अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेबद्दल फार आस्था असल्याने शिंदे ह्यांच्या मुंबईतील मिशनच्या आधीच १९व्या शतकाच्या अखेरीस १८९७ मध्ये अस्पृश्यवर्गाच्या उद्धारासाठी त्यांनी शाळा सुरू केली होती. शिंदे ह्यांचे मिशनचे कार्य समजल्यामुळे के. रंगराव ह्यांना त्यांच्याबद्दल विशेष आस्था वाटली. त्यांनी शिंदेंना मंगळूर येथे बोलावून घेतले. के. रंगराव अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठी एकटेच झटत होते. शिंदे ह्यांनी त्या कामी त्यांना साहाय्य केले. शिंदे ह्यांनी त्या कामी पुनर्घटना केली. गावातील ५ प्रमुख पुढा-यांची एक कमिटी नेमली. ती के. रंगराव ह्यांच्या जोडीला दिली आणि अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची ही मंगळूर शाखा म्हणून तिच्याशी संलग्न केली. पुढे त्या संस्थेची झपाट्याने वाढ झाली.
ब्राह्म झालेल्या, शहरात राहणा-या बिल्लव जातीच्या लोकांच्या परिस्थितीमध्ये फरक पडला होता, तरी जंगलामध्ये राहणारे बिल्लव अद्यापि रानटी अवस्थेतच होते. ह्या लोकांचे निरीक्षण करण्यासाठी शिंदे ह्यांनी सफर केली व बिल्लव जातीच्या स्थितीचे निरीक्षण केले. मोठमोठ्या जमिनीवर हे लोक वंशपरंपरागत कुळे म्हणून खपतात. त्यांची स्थिती जवळ जवळ जनावरासारखी झाली आहे असे त्यांच्या ध्यानात आले. ह्या लोकांची मुले दिवसभर कुठेतरी झाडावरील चिंचा, बोरे व झाडपाला खाऊन पोट भरीत रात्री थोडीश कांजी मिळाल्यास ती चाटून चाटून खात. अशा लोकांची सुधारणा करावी, ह्या हेतूने के. रंगराव ह्यांनी मिशन काढले ते अगदी स्वाभाविकच होते. मंगळूर येथील प्रेमळ वातावरणात अण्णासाहेब शिंदे व त्यांची बहीण जनाक्का ह्यांनी एक महिना काढला व समाजाची आपल्या परीने सेवा केली.
विलायतेतून आल्याबरोबर कोल्हापूर येथे शिंदे ह्यांनी धर्मप्रचाराच्या कार्याला सुरुवात केली होती. कोल्हापूरबद्दल त्यांच्या मनाला विशेष जवळीक वाटत होती. कारण त्यांचे मित्र गोविंदराव सासने हे कोल्हापूरचे. विलायतेस जाण्याआधीही ते त्यांच्याकडे जात असत. केळवकरांशीही त्यांचा स्नेहभाव जुळला होता. कृष्णाबाई केळवकर ह्या प्रार्थनासमाजाच्या सभासद झालेल्या होत्या. इंग्लंडमधील वास्तव्यात १९०२ साली कृष्णाबाईंची त्यांची भेट झाली होती व त्यांना मिळालेले राजा राममोहन रॉय ह्यांचे केस कृष्णाबाईंच्या बरोबर कलकत्त्याच्या ब्राह्मसमाजाकडे पाठविण्यासाठी दिले होते.५ श्रीमंत शाहू छत्रपती ह्यांच्याशीही त्यांचा लोभ जडला होता. शाहूमहाराजांकडून विलायतेस जाण्यासाठी त्यांना ३००/- रुपये मदत मिळाली होती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये प्रार्थनासमाजाची स्थापना करावी व समाजाचे कार्य तेथे चालू राहावे असे शिंदे ह्यांना वाटणे स्वाभाविकच होते. शाहूमहाराजांचीही ह्या कामी अनुकूलता दिसून आली. आर्यसमाजाला त्यांनी भरपूर साहाय्य केले होते व आपल्या समाजकार्यात प्रार्थनासमाजाचाही प्रयोग त्यांना करून पाहावयाचा होता. म्हणून त्यांनी प्रार्थनासमाजाचे काही प्रसिद्ध पुढारी घेऊन कोल्हापुरास येऊन प्रचारकार्य करावे अशी शिंदे ह्यांना सूचना केली होती. त्यानुसार सिंधचे प्रोफेसर टी. एन्. वासवानी, भक्त डॉ. रुबेन, कलकत्त्याचे प्रमथलाल सेन व मुंबईचे प्रसिद्ध प्रो. वेलिनकर ह्या चौघांना घेऊन १९०९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात शिंदे कोल्हापुरास गेले. तेथील गणपत कृष्णाजी कदम वकील ह्यांचे प्रार्थनासमाजाकडे लक्ष लागले होते. राजाराम कॉलेजातील दिवाणखान्यात प्रो. वासवानी व वेलिनकर ह्यांची व्याख्याने, बाबू प्रमथलाल सेन ह्यांची उपासना आणि शिंदे ह्यांचे हरिकीर्तन वगैरे कार्यक्रम झाले. डॉ. रुबेन ह्यांच्या एकतारी भजनाने सर्वसामान्यांना आकृष्ट केले.
श्री. कदम ह्यांनी बळवंत कृष्णाजी पिसाळ ह्या तरुण गृहस्थाला बरोबर घेऊन प्रार्थनासमाजाच्या कार्याला हळूहळू सुरुवात केली. बॅरिस्टर खंडेराव बागल, डॉ. कृष्णाबाई केळवकर, गोविंदराव सासने ह्या मंडळींचे त्यांना ह्या कामास प्रोत्साहन मिळाले.
पुढे १९११ सालच्या मे महिन्यात शिंदे हे पुण्याचे गणपतराव कोटकर, गणपतराव आंजर्लेकर वगैरे मंडळींसह पुन्हा कोल्हापुरास गेले. कोल्हापूर प्रार्थनासमाजाच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. सरकारातून योग्य ती मदत प्रार्थनासमाजास मिळाली. ह्या मुक्कामात करवीर मठाचे जुने शंकराचार्य ह्यांनी शिंदे ह्यांचे हरिकीर्तन आपल्या मठात करविले. शंकराचार्य स्वतः श्रवणास उपस्थित होते. शिंदे ह्यांचे हरिकीर्तन त्यांच्या पसंतीस उतरले. त्यांनी नारळ आणि धोतरजोडी देऊन शिंदे ह्यांची संभावना केली बॅ. बागल व त्यांचे नातेवाईक बाबासाहेब सावंत वकील ह्यांच्या घरी कौटुंबिक उपासना झाल्या. डॉ. कृष्णाबाई केळवकर ह्यांच्या पुढाकाराने गावाबाहेरील एका सृष्टिसौंदर्याच्या ठिकाणी वनोपासना झाली. पिसाळ ह्यांनी विश्वबंधू नावाचे साप्ताहिक काही वर्षे चालविले व पोस्टल मिशनचेही काम त्यांनी केले.
संदर्भ
१. सुबोधपत्रिका, ४ सप्टेंबर १९०४.
२. तत्रैव, १० एप्रिल १९०४.
३. तत्रैव, २१ मे १९०५ व २८ मे १९०५.
४. तत्रैव, ७ मे १९०५.
५. (i) वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १३७.
(ii) डॉ. सरोजिनी वैद्य यांचा पत्रसंग्रह.
शिंदे यांनी इंग्लंडमध्ये असताना ब्रिस्टल येथे जाऊन राजा राममोहन रॉय यांच्या तेथे असलेल्या समाधीचे भक्तिभावपूर्वक दर्शन घेतले. रॉयना आपल्या लहानपणी पाहिलेल्या मिस कॅसल या वृद्ध बाईने शिंदे यांना रॉयचे केस असलेले लॉकेट भेट दिले. ते त्यांनी डॉ. कृष्णाबाईची तेथे भेट झाली असताना त्यांजजवळ दिले. डॉ. कृष्णाबाईंनी या संदर्भात ७ फेब्रुवारी १९५७ रोजी मुंबई प्रार्थनासमाजाचे श्री. ग. ल. चंदावरकर यांना पत्र पाठविले व नंतर ते लॉकेटही त्यांच्याकडे पाठविले. सध्या ते पत्र व लॉकेट डॉ. सरोजिनी वैद्य यांच्या संग्रही आहे.