महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी विचारवंत, लेखक आणि संशोधक म्हणून जे लेखनकार्य केले, त्याचा सांगोपांग परामर्ष घेणे विस्तारभयामुळे शक्य होणार नाही, मात्र त्यांच्या जीवनचरित्रग्रंथास परिपूर्णता येण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले वैचारिक स्वरुपाचे लेखन,ललित स्वरुपाच्या साहित्याची निर्मिती व संशोधनकार्य यांचा साररुपाने का होईना परिचय करुन देणे आवश्यक वाटते.
महर्षी शिंदे यांचे जीवन प्राधान्याने कृतिरुप होते. धर्मप्रसारकार्य व त्यातूनच उद्भूत होणारे विविध प्रकारचे सामाजिक कार्य, राजकीय चळवळी आणि सांस्कृतिक उपक्रम यांमध्ये भाग घेण्यात त्यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ गेला. मुंबई प्रार्थनासमाजाचे १९०३ साली ते प्रचारक झाल्यापासून १९२३ सालापर्यंत मिशनच्या कामाच्या जबाबदारीपर्यंत ते अखंडपणे कार्यव्यापृत राहिले. त्यानंतरच्या काळात त्यांनी राजकारणात भाग घेतला. शेतकरी चळवळीला तसेच संस्थानी प्रजापरिषदेला मार्गदर्शन करण्याच्या कामी ते सहभागी होत होते. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य असो, की धर्मप्रसाराचे कार्य असो, त्यामधून संपूर्णपणे निवृत्ती ही त्यांना शक्यच नव्हती. म्हणून या विविध प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कामामध्ये ते अखंडपणे गुंतून राहिले होते. मात्र शिंदे यांचा ह्या कामाकडे जसा ओढा होता, तसाच सामाजिक प्रश्नसंबंधी चिंतन करण्याकडे, संशोधन करण्याकडेही त्यांचा ओढा होता. धर्म आणि धर्माचे तत्त्वज्ञान या विषयात तर त्यांना आंतरिक स्वरुपाची आस्था वाटत होती. त्यांच्या ठिकाणी असणा-या स्वाभाविक रसिकतेमुळे साहित्यकडेही त्यांचा ओढा होता. मात्र सदैव कोणत्या ना कोणत्यातरी धार्मिक, सामाजिक वा राजकीय कार्यात ते गुंतलेले असल्यामुळे संशोधन वा साहित्यानिर्मिती यांकडे त्यांना जितके लक्ष देणे आवडले असते तेवढे देता आले नाही. असे असूनही विविध प्रकारच्या कार्याच्या अखंड धावपळीतसुद्धा त्यांनी जे वैचारिक स्वरुपाने ललित स्वरुपाचे व संशोधनात्मक वाड्मय निर्माण केले आहे ते उपेक्षणीय तर नाहीच उलट गुणवत्तेच्या आणि व्याप्तीच्या दृष्टीने भरघोस म्हणता येईल असे आहे. सुमारे ती हजार पृष्ठे भरतील एवढे लेखन त्यांच्या हातून झाले आहे.
ह्या प्रकरणामध्ये त्यांच्या वैचारिक स्वरुपाच्या लेखनाचा तर पुढील प्रकरणात त्यांच्या ललित स्वरुपाच्या व संशोधनपर लेखनाचा आपण परिचय करुन घेऊ.
विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या एकंदर लेखनापैकी त्यांच्या वैचारिक वाड्मयाची व्याप्ती पुष्कळच मोठी आहे. मराठी साहित्यिकांमध्ये लेखक म्हणून शिंदे यांचा वेगळेपणा अनेक बाबतीत जाणवतो. ते केवळ पेशाने लेखन असणा-यापैकी एक नव्हते. ते मूलत: एक धर्मपुरुष होते. धर्म हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता आणि धर्मप्रेरणा ही त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा होती मात्र याचा अर्थ असा नव्हे की ते व्यक्तिगत पातळीवर स्वत:ची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी एकांतात धर्मसाधना करणारे पुरुष होते. धार्मिक जीवन आणि ऐहिक जीवन अशी फारकत त्यांच्या धर्मविषयक धारणेत नव्हती. धर्मसाधना करणे, धर्मप्रचार करणे आणि समाजाची धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक उन्नती करणे या गोष्टी त्यांच्या धर्मविचारामध्ये एकरुप झालेल्या होत्या. त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणेला आणि त्यांच्या राजकारणातील सहभागाला अधिष्ठान होते ते त्यांच्या उन्नत अशा धर्मविचाराचे. या कारणाने त्यांची धार्मिक भूमिका, त्यांचे जीवन आणि त्यांनी केलेले सामाजिक-राजकीय स्वरुपाचे कार्य यांमध्ये पूर्णतया सुसंगती दिसून येते. त्यांच्या जीवितात या सा-याचा एकमेळ झालेला आहे असे प्रत्ययाला येते. या कारणाने समकालीन लेखकांनी मांडलेले धर्मविषयक तसेच सामाजिक, राजकीय स्वरुपाचे विचार यांच्यापेक्षा शिंदे यांचे विचार वेगळे आहेत, मूलगामी स्वरुपाचे आहेत असे जाणवते.
शिंदे यांच्या वैचारिक स्वरुपाच्या लेखनामध्ये त्यांनी केलेला धर्मविचार, अस्पृश्यतेसंबंधी सामाजिक अंगाने केलेला विचार, शेतक-यांच्या समस्येबद्दल मांडलेले विचार, त्याचप्रमाणे स्त्रियांचा प्रश्न, जातीयतेचा प्रश्न आणि शिक्षण या संबंधी केलेले वैचारिक स्वरुपाचे लेखन यांचा समावेश होतो.
ईश्वर व धर्मकल्पना
प्रथमतः आपण शिंदे यांच्या ईश्वर व धर्मविषयक विचारांचे स्वरुप ध्यानात घेऊ. लहानपणी घरातच त्यांच्यावर वारकरी ऊर्फ भागवत संप्रदायातील विचारांचे संस्कार झाले होते. विषमतेवर आधारलेल्या जातिजमातींमधील श्रेष्ठ-कनिष्ठभावाचा निषेध करणारा आणि निरर्थक कर्मकांड त्याज्य मानून नैतिक पातळीवर सदाचरणाला महत्त्व देणार असा हा धर्मपंथ.
शिंदे यांच्या घरातील वातावरण जातिभेदाला थारा न देणारे उदार स्वरुपाचे होते. वारकरी संप्रदायाला पहिला धार्मिक संस्कार शिंदे यांच्या धर्मविषयक विचाराच्या घडणीत प्रभावी ठरला. १८९२ मध्ये ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकावयास गेले असता मिल्, स्पेन्सर आणि आगरकर यांच्या नास्तिक्यवादी विचाराकडे ते काही काळ आकृष्ट झाले. परंतु नास्तिकपणाच्या वाळवंटात आपल्या मनाची तहान भागणे शक्य नाही हे त्यांना जाणवले. प्रो. मॅक्समुल्लरच्या धर्मविषयक वाड्मयाचे वाचन केल्यामुळे आणि मुळातील वारकरी संप्रदायाच्या बळकट प्रभावामुळे, काही काळ त्यांच्या मनावर पडलेले नास्तिकवादाचे पटल दूर झाले. १८९५ मध्ये रेव्ह. जी. टी संडरलॅंड या अमेरिकन युनिटेरियन धर्मनिष्ठाने व्याख्यान ऐकून व त्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर युरोपातील युनिटेरियन या उदार धर्ममताचा त्यांना परिचय घडला. वैचारिकदृष्ट्या वारकरी संप्रदायाशी व युनिटेरियन धर्मप्रणालीशी जुळणा-या प्रार्थनासमाजाकडे ते आकृष्ट झाले. प्रार्थनासमाजातील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर, का.बा. मराठे इत्यादी वडीलधा-या मडळींच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. एकनाथ, तुकारामादी संतांच्या वचनांच्या आधारे रानडे, भांडारकर करीत असलेले प्रतिपादन त्यांच्या मनाला भावले व उदार धर्माचे स्वरुप त्यांना अधिक सुस्पष्ट होत गेले.
इंग्लंडमध्ये मॅचेस्टर कॉलेजात त्यांनी विविध धर्मांचा ऐतिहासिक भूमिकेतून तुलनात्मक दृष्टीने व्यासंग केल्यामुळे सर्व धर्मांतील मूळ तत्त्वांचे उदार स्वरुप स्वाभाविकपणे त्यांच्या ध्यानात आले. तसेच हेगेल, कांट, बर्गसाँ यांच्या तत्त्वज्ञानाचे त्यांनी परिशीलन केले. स्पेन्सरच्या तत्त्वज्ञानातील उत्क्रांतिवाद त्यांच्या मनाला भावला होता, तरी त्याचा अपुरेपणाही त्यांना जाणवत होता. बर्गसाँच्या 'क्रिएटिव्ह इव्होल्यूशन'मधील विचाराने ही उणीव भरुन काढली व स्पेन्सरच्या जडवादी यांत्रिक स्वरुपाच्या उत्क्रांतिवादाऐवजी बर्गसाँच्या निर्माणक (क्रिएटिव्ह) विकासवादाचा प्रभाव त्यांच्यावर विशेषत्वाने पडला. विवेचकबुद्धी(रीझन) ही समग्र आकलन करण्याच्या बाबतीत अपुरी पडते, तिच्यापलीकडे जाऊन भावना (इमोशन्स) आणि उपजतबुद्धी (इन्सिंटक्ट) यांचे महत्व मानणे आवश्यक आहे अशी त्यांची धारणा झाली. एकंदरीत धर्माचाच नव्हे, तर जीवनाच्या सगळ्याच अंगांचा विचार करता विवेचकबुद्धीच्या पलीकडे जाऊन भावनेला महत्त्व देणे योग्य होय अशी त्यांची धारणा होती.
ऑक्सफर्ड येथे ते अध्ययनाला गेले तेव्हापासून त्यांच्या धर्मविषयक लेखनाला प्रारंभ झाला. आयुष्याच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते, म्हणून आयुष्यभर ते धर्मचिंतन करीत राहिले, धर्मप्रसार करीत राहिले. धर्मविषयक लेखन हा त्यांच्या धर्मप्रसारक कार्याचा भाग होता. प्रार्थनासमाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेसाठी त्यांनी इंग्लंडहून लिहून पाठविलेले लेख, नंतर भारतात आल्यावर प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद पत्करल्यानंतर त्यांनी वेळोवेळी दिलेली व्याख्याने, कौटुंबिक उपासनेच्या वेळी तसेच सार्वजनिक नित्य आणि नैमित्तिक उपासनेच्या वेळी केलेले उपदेश असे एकंदर शहाऐंशी लेख समाविष्ट करुन बी. बी. केसकर यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने आणि उपदेश हे पुस्तक १९९२ साली प्रसिद्ध केले. नंतरच्या काळातही त्यांचे या प्रकारचे विपुल धर्मविषयक लेखन वेळोवेळी प्रसिद्ध झाले असून एकंदरीत त्यांचे धर्मपर सर्व लेखन धर्म, जीवन व तत्त्वज्ञान या पुस्तकामध्ये एकत्रित केले आहे.
शिंदे यांच्यावर ऐतिहासिक विचारपद्धतीचा मोठाच प्रभाव पडला होता. धर्माचा आणि ईश्वराचा तात्त्विक विचार ते या भूमिकेतून करतात असे दिसून येते. मात्र ईश्वराचे तात्त्विक स्वरुप ते केवळ बौद्धिक पातळीवर समजून घेतात व प्रतिपादन करतात असे नव्हे. ते त्यांनी स्वत:च्या प्रेरणाबळाने व भावनाबळाने अनुभवले आहे, आत्मसात केले आहे असेच आपल्या प्रत्ययाला येते. अशा प्रकारे आत्मसात केलेल्या ईश्वरकल्पनेनुसार, धर्मकल्पनेनुसार ते आपले आयुष्य जगत राहिले. भले मग त्यांना कितीही यातना झालेल्या असोतl; त्यांचा ईश्वरी तत्त्वावर व ख-याखु-या धर्मावर विश्वास असल्यामुळे ते त्यांना शक्य झाले असावे असे दिसते.
मानववंशशास्त्र तसेच तुलनात्मक धर्मशास्त्र यांची ईश्वरविषयक विचार करण्याची दिशा शिंदे यांना मान्य आहे. "ईश्वर हा कोणी शरीरविशिष्ट व्यक्ती नसून सर्वव्यापी शुद्ध चैतन्य आहे; तो भोगायतन नसून केवल गुणाश्रय आहे. मनुष्यही स्वतः गुणाश्रय आहे, परंतु त्याच्या गुणाला शरीराची अपेक्षा आहे तेव्हा या त्यांच्या दोषामुळे तो कितीही ज्ञानी झाला तरी तो आपला स्वतःचा देहभाव सूक्ष्म मानाने नकळत का होईना, ईश्वरावर आरोपितोच. तो देहभाव (अँथ्रॉपॉमॉर्फिझम) पूर्ण नाहीसा करुन ईश्वर हा केवळ गुणाश्रय आहे, असे जाणणे ही त्याविषयी सम्यक भावना होय. म्हणजे ईश्वर आमच्यासारखा सुखी किंवा दुःखी नसून केवळ सुखस्वरुपच आहे, आमच्याप्रमाणे दयाळू किंवा निर्दय नसून दयेचा प्रेरक आहे, आमच्यासारखा प्रेमी किवा द्वेषी नसून प्रेमाचा प्रवर्तक आहे, हे आम्ही उत्तरोत्तर अधिक जाणिले पाहिेज."
गुण आणि दुर्गुण असे विरोधात्म द्वैत मानवी जीवनव्यवहारात दिसत असता ईश्वर मात्र चांगल्या गुणाला कारण आणि मनुष्य मात्र वाईटाला कारण असे म्हणणे म्हणजे ईश्वरावर ही मोठी मेहेरबानी करु पाहणे होय, असे सांगून ते या विरोधात्म मानल्या गेलेल्या चांगल्य-वाईट गुणांची वेगळी संगती लावतात. ते सांगतत, "मनुष्य प्रेमामुळे दुस-यावर उपकार करतो व लोभामुळे दुस-याला अपकार असतो असे दिसते, पण प्रेम आणि लोभ हे परस्परविरोधी पदार्थ नाहीत, तर उत्क्रांतीच्या निरनिराळ्या पायरीवरचे गुण असून दोन्ही सत्कार्याची साधनेच आहेत. प्राणिमात्रांनी आत्मसंरक्षण करावे, यासाठी ईश्वर लोभाचा प्रवर्तक होतो; आत्मसंरक्षणाचे खालचे कार्य चांगले स्थापित झाल्यावर त्याहून उच्च दर्जाचे जे परहितपोषण-उत्क्रांतीचे कार्य-त्यासाठी प्रेमाचा प्रवर्तक ईश्वरच होतो. आपण मात्र वरच्या पायरीवर पोहोचूनही वरच्या प्रेरणांना न जुमानता खालच्या प्रेरणांना वश झालो, तर आपल्याला दिलेल्या स्वतंत्रतेचा आपण दुरुपयोग केला असे होते. ईश्वर दुर्गुणांचा प्रवर्तक होत नाही. कारण दुर्गुण असा कोणताच नाही. याचप्रमाणे शौर्य आणि भीती, सहिष्णूता आणि क्रोध, जितेंद्रियता आणि काम, या सर्व गुणांचे प्रयोजन समजावे."
अशा सत्त्वप्रेरक ईश्वराचा आणि आपला संबंध जडतो कसा? तो बुद्धीपेक्षा विश्वासाच्या द्वारे अधिक जडतो अशी शिंदे यांची धारणा होती. बुद्धी आणि विश्वास यांचे स्वरुप सांगताना ते म्हणतात, " बुद्धी म्हणजे पुष्कळ प्रयत्नानंतर पुष्कळ सामग्रीच्या साहाय्याने अल्पज्ञान करुन देणारी शक्ती आणि विश्वास म्हणजे काहीच प्रयत्न न करता अल्पशा सामग्रीने पुष्कळसे ज्ञान प्राप्त करुन देणारी शक्ती. माणसामध्ये विश्वास म्हणून अधिक मोलाची आणि नवलाची शक्ती आहे. विश्वामध्ये सत्त्वाचा, शुभाचा आणि मांगल्याचा प्रसार करणारी ईश्वर ही शक्ती भरली आहे हे ज्ञान प्राचीन काळापासून कमी-अधिक मानाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे अवगत झाले आहेच. "थोडा कोठे एक विशेष प्रकारचा अंगस्पर्श होतो न होतो तोच नूतन बालकाचा आईवर केवढा दृढ आणि कायमचा विश्वास बसतो ! थोडी खुणेला खूण पटली की तरणी आपल्या माहेरचा सर्व वारसा सोडून देऊन परक्या तरुणावर आपल्या सर्व आयुष्याचा भार टाकते. ही विश्वासाची जादू होय. 'आकारैरिंगितैर्गत्या गृह्मतेsन्तर्गतं मनः' मनुष्याचा आतला मतलब समजण्याला आकार, हावभाव, बसणे, उठणे इत्यादीवरुन सहज उपजणारा विश्वास हा कारण होतो. येथे तर्काची प्रमाणे पंगू पडतात आणि मनुष्याप्रमाणेच अखिल विश्वाचा मतलब समजण्यालाही बुद्धीच्या कृत्रिम खटपटीपेक्षा उपजत विश्वासच कामाला येतो."
विश्वामध्ये सत्त्वाचा प्रवर्तक ईश्वर आहे असे केवळ अस्तित्वबोधक ज्ञान बुद्धीच्याही द्वारे मिळू शकते. मात्र सत्याचा आग्रह धरुन राहायला हे आयते ज्ञान उपयोगी पडत नाही, भाग पाडीत नाही किवा त्यांना धीरही देत नाही. तेथे विश्वासाची आवश्यकता असते असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात. "ईश्वर सत्त्वप्रवर्तक आहे असे नुसते मत असून चालत नाही तर तो सत्त्वाचा आणि शुभाचा प्रवर्तक आहे म्हणून मी सत्याचा आग्रह धरुन राहिलो तर माझे कितीही हाल झाले तरी माझी किवा कुणाचीही हानी मुळीच होणार नाही असा विश्वास पाहिजे आहे. अशा विश्वासामुळेच ईश्वराचा व आपला खरा किंवा निकट संबंध जडतो. बुद्धीचे जडत नाही."
आपल्या आत्म्याचा विकास करणे म्हणजे मीपणाचा सर्वस्वी नायनाट करणे नव्हे तर मीपणाला अमर्याद विस्तार करणे होय. त्याला कुटुंबाची, राष्ट्राचीसुद्धा मर्यादा पडणे संकुचितपणाचे ठरते, असे त्यांचे मत आहे. अहंकाराचा परीघ अमर्याद करणारा जो पुरुष असतो त्याला अवतार म्हणणेच योग्य. सर्वसामान्य माणसाचा हे कसे शक्य होणार, ही शंका शिंदे यांना रास्त वाटत नाही. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असणा-या आध्यात्मिक क्षमतेवर त्यांचा विश्वास आहे व प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. ते म्हणतात, "जी काय आमच्यात आत्मकला अंशभूत आहे; इच्छाशक्ती, बाहुबल, एक एक पाऊल स्वतः पुढे टाकण्याची शक्ती आहे; ती जाऊन, अवतारी व्यक्तीच्या विद्युदाकर्षणाने एकदम फार कामे होणार असतील, तर तो अवतार नको, व ती कामेही नकोत ! विकास विकासच झाला पाहिजे अवतारवादाने प्रदर्शित केलेला एक फार उंच व इतर सर्व अत्यंत नीच, खालावलेले असा विषम भाव मला पसंत पडत नाही. तर सर्वांची सर्व बाजूंनी व तीही स्वतःचे प्रयत्नांनी उन्नती होत जावी," हे शिंदे यांना श्रेयस्कर वाटते.
शिंदे यांनी हिंदू धर्मात सांगितलेल्या चार पुरुषार्थाचा आपल्या भूमिकेतून अर्थ सांगितला असून आत्म्याने परमात्म्याशी ऐक्य कसे साधावायाचे हे स्पष्ट केले आहे. अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी अर्थ हा केवळ साधनीभूत आहे आणि काम व धर्म या पुरुषार्थाचा स्वाभाविक घडणारा परिणाम म्हणजे मोक्ष हा आहे. म्हणजे खरे पुरुषार्थ दोनच राहतात. ते म्हणजे काम आणि धर्म हे होत. "काम म्हणजे विवादित दुष्ट वासना आणि धर्म म्हणजे देवाविषयी आणि परमार्थाविषयी काही गोष्ट," हा संकुचित आणि रुढ अर्थ त्यांना मान्य नाही. काम याचा अर्थ इच्छा किंवा मनाची भूक आणि धर्म याचा अर्थ कर्तव्यबुद्धी असा ते करतात. माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकपणे दोन प्रवृत्ती दिसून येतात. अमुक एक गोष्ट रुचकर आहे, अमुक एक हितकर आहे, अमुक एक सुंदर आहे, ती आपणास पाहिजे अशी इच्छा होणे ही एक प्रवृत्ती. अमुक गोष्ट रुचकर असो वा नसो, सुंदर दिसो वा न दिसो, किबहुना आपल्या स्वत:स हितकर असो वा नसो ती योग्य आहे म्हणून आचरलीच पाहिजे किवा अयोग्य आहे म्हणून टाकलीच पाहिजे अशी आतून प्रेरणा होणे ही दुसरी प्रवृत्ती. पहिलीचे नाव कामना व दुसरीचे नाव कर्तव्यबुद्धी. या दोन्ही प्रवृत्तींना अनुसरुन आत्म्यांना दोन भिन्न पुरुषार्थ साधावयाचे असतात. कामना आणि कर्तव्यबुद्धी वा दोन भिन्न प्रवृत्ती असल्या तरी प्रत्येकीचा विकास परस्परांवर अवलंबून आहे. कर्तव्यजागृतीच्या मुळाशी कामनेचा हव्यास असल्यामुळे जगाचे कल्याण झालेले आहे. संगीत, चित्रलेखन, शिल्प, वाड्मय इत्यादी कलांचा विकास कामनेमुले झालेला आहे. कामना आणि कर्तव्यबुद्धी या दोन्ही पुरुषार्थांचे आचरण करता करता त्यामधील अलगपणा नाहीसा होऊन त्यांची सांगड जुळते आणि कर्तव्यबुद्धी हीच एक कामना आणि कामना हेच एक कर्तव्य असे या दोन्ही पुरुषार्थांचे ऐक्य भासू लागते. असे झाल्यावर तेच एक पूर्णतेचे किंवा मोक्षाचे लक्षण होय, असे शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे.
माणसाचा अहंकार, त्याची एकदेशीयता नष्ट होऊन अनंतत्वाची प्रचिती येणे, विश्वचैतन्याचा अनुभव येणे यालाच शिंदे ईश्वरी तत्त्वाचा अनुभव येणे, साक्षात्कार होणे असे मानतात. या भूमिकेवरुन ते मरणाचा आणि जीवनाचा तात्त्विक अर्थ लावतात. जीवनात सारभूत असणारी वस्तू प्रेम ही आहे. या प्रेमावीण जीवन जीवनत्वास मुकते आणि मागे केळव अस्तित्व उरते. "आम्ही व इतर आत्मे यांमध्ये असणारे उपाधीचे पडदे बाजूला सारणे म्हणजे प्रेम करणे होय. ईश्वराचे ठिकाणी आम्हा सर्वांचा जो ऐक्यसंबंध आहे व जो या संसारात अनेक अदृष्ट कारणांमुळे तुटलेला असतो तो पुन्हा जोडणे म्हणजे प्रेम होय." या मॅक्समुल्लरच्या वचनाचाही ते आधार घेतात. व्यक्तीच्या जीवनाचा विकास जसजसा अधिक होतो तसतसा व्यक्ती आणि कुटुंब, व्यक्ती आणि जात, व्यक्ती आणि राष्ट्र आणि अखेरीस व्यक्ती आणि विश्व यांमधील पडदा क्रमाक्रमाने गळून पडतो. अशा प्रकारे व्यक्तीची मर्यादा अनंतत्वाप्रत पावल्यावर तिच्या आतापर्यंतच्या मर्यादित जीवनाचा शेवट अगर कळस होऊन तिच्या अमर्याद जीवनास सुरुवात होते. या दृष्टीने मरण म्हणजे मर्यादित अथवा एकदेशीय जीवनाचा अंत अथवा आत्म्याचे पूर्णपणे जागे होणे. या भूमिकेतून ते तुकाराममहाराजांच्या 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' या अंभगाचा अर्थ लावतात. अथवा हा अभंग मनात वागवून वरील विवेचन करतात असेही म्हणता येऊ शकेल.
अशा प्रकारे मनुष्य आणि त्याच्याभोवतीचे मानवी जग, मनुष्य आणि ईश्वर, आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध ते स्पष्ट करतात. या एकत्वाची आणि अनंतत्वाची प्रचिती येणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने ईश्वरी साक्षात्कार होय.
परमेश्वरी साक्षात्काराच्या बाबतीत असणारे गुढतेचे वलय शिंदे यांच्या भूमिकेमध्ये नाही.श्रद्धा आणि भावना यांच्या बळावर या प्रकारचा साक्षात्कार होतो. निसर्गाचे अति भव्य, अति सुंदर स्वरुप पाहिल्यानंतर अथवा एकांतामध्ये चिंतनावस्थेत असताना अंतःकरणातील श्रद्धा अतिशय उत्कट झाल्यानंतर अशा प्रकारचा साक्षात्काराचा अनुभव येऊ शकतो असा शिंदे यांचा स्वतःचाही अनुभव आहे. मॅंचेस्टर कॉलेजातील ग्रंथालयात ते बसले असताना, स्कॉटलंड येथील बेन लोमंड पर्वतावर आसमंत न्याहाळताना त्यांना हा अनुभव आला होता. तसेच इंग्लंडमध्ये असताना प्रो. कार्पेंटर या गुरुकडे वास्तव्य करीत असताना एकदा रात्री भोजनोत्तर ते बॉरोडेल दरीत शतपावलीस गेले होते त्यावळी त्यांना जो अनुभव आला तो या प्रकारचा होता, हे आपण यापूर्वी एका प्रकरणात पाहिले आहेच.
जगातील सर्व प्रमुख धर्माचा अभ्यास ऐतिहासिक व तुलनात्मक दृष्टीने त्यांनी केलेला असल्यामुळे त्यांच्या आकलनाला सखोलपणा व दृष्टिकोणाला व्यापकपणा आलेला होता, हे विविध धर्म अथवा धर्मपंथ यांचे त्यांनी जे आकलन प्रकट केले आहे त्यांमदून आपल्याला जावणते. भारतातील ब्राह्मधर्म म्हणजे पाश्चात्त्य युनिटेरियन धर्ममताची नक्काल नसून हिंदू धर्माची ती स्वाभाविक उत्क्रांती आहे असे मत ते मांडतात, मात्र मागील शतकारंभीच्या हिंदू धर्माचे वास्तव स्वरुप सांगताना हिंदुस्थानात खरे जुलमी साम्राज्य चालू आहे ते आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ यांच्यापैकी कुणाचे नसून रुढीचे आहे, असे त्यांनी प्रतिपादले आहे. हिंदू धर्मातील उन्नत धर्मविचारावर रुढीने कशी मात केली आहे ते त्यांनी नेमकेपणाने सांगितले आहे. शास्त्र, तत्त्वज्ञान, मीमांसा व इतिहास यांनी मानवी विचाराची व शोधाची जी प्रगती केली तिचे फळ युनिटेरियन पंथाच्या उत्क्रांत धर्मविचारात सापडले, म्हणून ते युनिटेरियन समाज म्हणजे सुधारलेल्या पाश्चात्य जगाचे 'प्रबुदध अंतर्याम' (एन्लायटन्ड कॉन्शन्स) होय असे मानतात. भेदापेक्षा अभेद पाहण्याची त्यांची दृष्टी असल्यामुळे ब्राह्मसमाज आणि आर्यसमाज या दोन धर्मपंथांतप्रधान गोष्टींमध्ये कसे साम्य आहे ते दाखवून देतात. "ईश्वर हे सर्वत्र जिवंत, जागृत, व्यापारमय, केवळ चिन्मय तत्त्व आहे म्हणून त्याला अवयवाची जरुरी नाही. आम्हा सर्व जीवांमध्ये जो अहंकारमूलक आत्मा आहे, तोही वस्तू आहे, केवळ भास नव्हे. ईश्वराच्या ठायीच त्याची वसती आणि वाढ आहे. ईश्वराची जी उपासना करावयाची ती बाह्योपचारिक नसावी. त्याच्या उपासनेत कल्याही जड साधनाची गरज नाही. याप्रमाणे एक ईश्वर, सतत विकास पावणारा आत्मा. आध्यात्मिक उपासना इत्यादी धर्माच्या पारमार्थिक तत्त्वासंबंधी ब्राह्म आणि आर्य या दोघांचे साम्यच नव्हे तर ऐक्य आहे." इतकेच नव्हे तर धर्म म्हणजे हे शुद्ध विचार इतके ठरवून स्वस्थ न बसता त्यांच्या पायावरच आपले ऐहिक आचरण करण्याचा दोघांचाही आग्रहपूर्वक यत्न आहे असे ते सांगतात. ब्राह्मसमाज आणि जोतीराव फुल्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज यांचा गाथा एकच आहे, हेही ते दाखवून देतात.
शिंदे यांनी आपल्या आयुष्यात अस्पृश्यतानिवारणाचे कार्य व इतर सुधारणेची जी कामे केली ती धर्मभावनेनेच. लौकिक जीवन आणि धार्मिक जीवन यांमध्ये ते एकात्मताच पाहतात. लैकिक व्यवहार करण्याच्या पाठीमागे जर उन्नत भावना असेल तर अशी भावना आणि धर्मभावना या एकच होत. ते लिहितात, "लहानपणी मुलांची खेळाची आवड, तरुणपणी तरुणीसंबंधी उदात्त रस आणि म्हातारपणी एखाद्या ऐहिक बाबतीतीत सात्त्विक चिंतामग्नता या तिन्ही भावनांहून भक्तीची भावना तत्त्वत: अगदी भिन्नच आहे असे म्हणता येणार नाही. ह्या भावनांत जी वयपरत्वे अंत:करणाची परिणती होत जाते तीची किंचित आणकी थोडी जास्त शुद्ध, जास्त व्यापक आणि जास्त जोरदार झाली की, तिला आम्ही भक्ती हे नाव देतो, ज्या सहज आनंदाने मूल खेळते, तरुण रमतो आणि वृद्ध सात्त्विक चिंतेने व्याकूळ होतो तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तीत आहे, हे माझे मत कित्येकांना विपरीत वाटेल. ऐहिक रस आणि पारमार्थिक रस यांना मी एकच माळेत गोवतो." रसिकता, भक्ती आणि प्रेम या गोष्टी त्यांच्या दृष्टीकोन एकरुप आहेत. ते म्हणतात, "माझ्या जीवनात सहज रसिकता ऊर्फ प्रेम ऊर्फ भक्ती ऊर्फ Love- कोणी काही म्हणोत, कोणी निंदोत, कोणी वानोत - प्रत्यक्ष ईश्वरही कृपा करो न करो - माझे प्रेमच मला खरे आणि म्हणूनच मला ते पुरे. त्यांच्या धर्मकल्पनेत निवृत्ती नसून प्रवृत्ती आहे व ते श्रद्धेच्या जोडीनेच निर्लोभ प्रेमाचा समावेश धर्मकल्पनेत करतात. प्रेमाचे स्वरुप सांगतात ते म्हणतात, "प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे, प्रेम म्हणजे जीवन, जीवनाचा कंटाळा नव्हे." समाजसेवेलाही या प्रेमाचेच अधिष्ठान असल्याचे ते सांगतात. त्यांच्या दृष्टीने प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधना होय. द्वा. गो. वैद्यांच्या लेखसंग्रहाला संपादकांनी दिलेल्या 'संसार आणि धर्मसाधन' या नावाला आक्षेप घेतातना ते म्हणतात, "धर्मसाधन म्हणजे काय? पोथी वाचणे, प्रार्थना करणे, स्तब्ध बसणे, तप करणे म्हणजेच धर्मसाधन काय? मुळीच नव्हे ब्राह्मसमाज म्हणतो, प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. एखादा प्रामाणिक सुतार, हुशार न्हावी, विशेषत: प्रेमळ भंगीदेखील पोटभरू पुरोहितापेक्षा शतपटीने धार्मिक म्हणता येणार नाही काय? असे जर आहे, तर संसार म्हणजेच धर्मसाधन ठरते."
अस्पृश्यताविषयक विचार
अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे व अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचे प्रत्यक्ष कार्य करण्याच्या बाबतीत शिंदे जसे अग्रेसर ठरतात त्याप्रमाणे अस्पृश्यताविषयक संशोधन करण्याच्या बाबतीत आणि अस्पृश्यतेचा प्रश्न सामाजिक पातळीवरुन मांडण्याच्या बाबतीतही हे प्रथमारंभीचे विचारवंत ठरतात.
माणसामाणसांत भेद पाळणे हे अमंगळ आहे अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाचा संस्कार त्यांच्या मनावर बालपणीच झाला होता. ज्या प्रार्थनासमाजाचे अथवा ब्राह्मणसमाजाचे ते अनुयायी झाले होते, त्याचे एक तत्त्व हे आहे की, सर्व मनुष्ये परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून भेद न राखता परस्परांशी बंदुभावाने वागावे, विठ्ठल रामजी शिंदे हे ब्राह्मधर्माचे सच्चे अनुयायी होते. म्हणून या तत्त्वाचे पालन केवळ व्यक्तिगत पातळीवरील व्यवहारात करुन त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते. या दुबळ्या आणि पीडितवर्गाच्या उन्नतीसाठी आपण आपले आयुष्य वाहून कार्य करावे अशी त्यांना प्रेरणा झाली व त्याचप्रमाणे आयुष्यभर त्यांनी कार्य केले व त्यानुसार विचार मांडले. त्यांच्या अस्पृश्यताविषयक संशोधनाचा अन्यत्र विचार केला आहे. येथे आपण त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी सामाजिक पातळीवरुन कोणते विचार मांडले हे ध्यानात घेऊ.
अस्पृश्यताविषयक कार्य करती असताना त्यामागे त्यांची जी वैचारिक भूमिका होती तिचाही आपण आवशयक तेथे निर्देश करु. कारण या कार्यामधूनही त्यांची वैचारिकता दिसून येते.
डिसेंबर १९०५ मध्ये सुबोधपत्रिकेतून त्यांनी 'इलेव्हेशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस' या शीर्षकाचा निबंध लिहून तीन भांगात प्रसिद्ध केला. त्यामध्ये सामाजिक पातळीवर अस्पृश्यता मानण्यामुळे या वर्गावर कसा अन्याय होतो याचे वर्णन करुन त्यांची उन्नती करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. १९०६ साली 'इंडियन सोशल रिफॉर्मर'मध्ये 'ए प्ली फॉर दि मिशन फॉर डिप्रेस्ड क्लासेस' या शीर्षकाचा निबंध लिहून त्यामध्ये अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या अडचणी, त्यांची प्रांतवार संख्या, त्यांच्या निवारणार्थ वरिष्ठवर्गाकडून आणि स्वतः त्या लोकांकडून होणारे प्रयत्न यांची प्रथमच पद्धतशीर मांडणी केली. लेखाच्या अखेरीस या अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या उद्धारासाठी नुसती शिक्षणसंस्था, मग ती कितीही मोठ्या प्रमाणावर असो, स्थापून चालवयाचे नाही, तर ज्यामध्ये जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे असे मिशन तयार झाले पाहिजे. अशा मिशनने ख्रिस्ती मिशन-यांप्रमाणे या लोकांच्या जीवितांमध्ये क्रांती घडवून न आणता विकास घडवून आणला पाहिजे, असे प्रतिपादन केले. या भूमिकेनुसारच पुढे त्यांनी ऑक्टोबर १९०६ मध्ये देशी मिशनच्या स्वरुपाची संस्थाही स्थापन केली, हा वृत्तान्त मागील एका प्रकरणात आपण पाहिल आहेच.
विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे मिशन स्थापन करताना ते एतद्देशीय असावे, ख्रिस्ती मिशनप्रमाणे या लोकांच्या जीवनात क्रांती करण्याची भूमिका न ठेवता या वर्गातील व्यक्तींचा विकास घडवून आणावा ही भूमिका ठेवली. ख्रिस्ती मिशनचा सेवाभाव त्यांना अनुकरणीय वाटत होता व त्याबद्दल त्यांना अशा मिशनबद्दल आदरभावही होता. परंतु बहुधा धर्मांतराच्या मार्गाने ते या लोकांच्या लौकिक स्थितीमध्ये, राहाटीमध्ये एकदम क्रांती घडवून आणू पाहतात. ही मिशन-यांची भूमिका शिंदे यांना योग्य वाटत नव्हती. ख्रिस्ती मिशनच्या धोरणामुळे या वर्गातील काही लोकांच्या स्थितीमध्ये बाह्यात्कारी पालट घडेल,परंतु या मार्गाने त्यांचा खराखुरा सर्वांगीण विकास होणार नाही, अस्पृश्य मानलेल्या समाजामध्ये स्वाभिमानाची व आत्मोन्नतीची जाणीव निर्माण होणार नाही असे शिंदे यांना वाटत होते. या वर्गातील लोकांचा क्रमशः विकास घडवून आणल्यामुळेच त्यांच्यात खरीखुरी सुधारणा होणार आहे अशी त्यांची धारणा झाली होती.
अशी धारणा होण्याला त्यांची पक्की वैचारिक बैठक कारणीभूत होती. त्यांच्या आध्यात्मिक विचारात आणि समाजसुधारणाविषयक विचारात सुसंगती आढळून येते. आध्यात्मिक बाबतीत अवतारवाद त्यांना मान्य नव्हता. त्याचप्रमाणे सामाजिक सुधारणेच्या बाबतीत विभूतिवाद त्यांना मंजूर नव्हता. म्हणूनच क्रांतीपेक्षा ते उत्क्रांतीला महत्त्व देतात.
समाजशास्त्राचे विद्यार्थी या नात्याने थॉमस कार्लाइलचा विभूतिवाद आणि हर्बर्ट स्पेन्सचा सामान्य माणसाचा प्रयत्नवाद या दोहोंची तुलनात्मक मीमांसा केल्यानंतर विभूतिवादावरील त्याचा विश्वास कमी होऊन सामान्य माणसाच्या विधायक प्रयत्नाकडे त्यांचा कल झालेला होता. त्यांच्या प्रयत्नवादाला श्रद्धेचे आध्यात्मिक पाठबळ होते. त्यांनी लिहिले आहे, "अस्पृश्यतानिवारणाच्या कामी आधुनिक काळात कोणी विभूती पुढे येत नाहीत आणि मी तर स्वत: अत्यंत सामान्य माणूस. ही वस्तुस्थिती पाहून ती हताश झालो नाही. श्रद्धेने पर्वत हलतात या ख्रिस्तोक्तीची प्रचिती पाहण्याची वेळ आली होती. श्रद्धा, मग ती एखाद्या विभूतीची असो वा सामान्य माणसाची असो, श्रद्धा ती श्रद्धाच ! तिने पर्वतही हलले पाहिजेत."
अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधीच त्याचे आकलन दुहेरी होते म्हणून त्यांच्या कार्यालाही दोन पैलू होते. शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादल्यामुळे अस्पृश्य ठरविलेल्या गेलेल्या वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करणे; त्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण करणे; त्यांना सुशिक्षित व उद्योगी बनविणे; व्यक्तिगत शील आणि नागरिकता या गुणांचा त्यांच्यामध्ये विकास करणे हा त्यांच्या कार्याचा एक भाग होता. दुसरा भाग म्हणजे, समाजात असणारी अस्पृश्यता नाहीशी करणे. अस्पृश्यता ही केवळ काल्पनिक भेदामुळे निर्माण झाली असून तिला कोणताही वस्तुनिष्ट आधार नसतो. तांबड्या फुलाचा तांबडेपणा जसा फुलाच्या ठिकाणी अभिन्नपणे असतो तसे काही अस्पृश्यतेचे वस्तुनिष्ठ स्वरुप नसते. स्वत:ला वरिष्ठ समजल्या जाणा-यांनी ही अस्पृश्यता मानली याचा आर्थ अस्पृश्यतेचे अस्तित्व त्या वरिष्ठ वर्णीयांच्या जाणिवेमुळे निर्माण झाले असे ठरते. तेव्हा समाजातील अस्पृश्यता नष्ठ करावयाची असेल तर तथाकथित वरिष्ठ वर्णीयांच्या मनामधील ही भ्रामक जाणीव नष्ट करणे हा त्यांनी आपल्या कार्याचा दुसरा भाग मानला. अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी शाळा, उद्योगशाळा, वसतिगृहे व तत्सदृश संस्था त्यांनी स्थापन केल्या; तर सामाजिक अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य त्यांनी व्याख्याने, परिषदा, मिरवणुकी, विविध प्रदर्शने इत्यादीद्वारा केले.
शिंदे यांच्या कार्यपद्धतीतून अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे त्यांचे सर्वांगीण आकलन व प्रगल्भ वैचारिकता दिसून येते. १९०८ साली श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या सूचनेवरुन बडोदा येथे त्यांनी महाराजांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यवर्गाच्या स्थितीसंबंदी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले व ते लगेच 'बहिष्कृत भारत' या शीर्षकाखाली मासिक मनोरंजनात व नंतर पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाले. भारतामध्ये पाळली जाणारी अस्पृश्यता म्हणजे एक भयंकर स्वरुपाची बहिष्कार असून एकंदर लोकसंख्येच्या सहावा हिस्सा असणा-या अस्पृश्यवर्गाचे वर्णन त्यांनी 'बहिष्कृत भारत' असे केले आहे. ( शिंदे यांनी केलेला हा शब्दप्रयोग डॉ. आंबेडकरांच्या मनाला इतका भावला की, त्यांनी पुढे सुरु केलेल्या आपल्या वृत्तपत्राचे नाव बहिष्कृत भारत असे ठेवले.) शिंदे यांनी लिहिलेल्या या लेखातील पहिलेच वाक्य असे आहे, "या पृथ्वीवर सर्व मनुष्यजातीच्या इतिहासात जर कोठे, कधी,कोणावर प्रचंड बहिष्कार घालण्यात आला असेल आणि तो पुरातन काळापासून चालत येऊन आजू पूर्णदर्शला पोहोचला असेल तर तो या भरतखंडातील नीच मानिलेल्या जातीवरचा भयंकर बहिष्कारच होय!" अस्पृश्यतेचे वर्णन त्यांनी बहिष्कार या भेदक शब्दाने करुन अस्पृश्यतेचे भयंकर, विदायक स्वरुप प्रकट केले आहे. यापुढील वाक्यात ते आवाहन करतात, "भारतवासीयांनो, स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरुन हा घातकी, पातळी आत्मबहिष्कार नाहीसा करा." यातील भाषा भावनिक परिणाम करणारी असली - आणि हा परिणाम करणे शिदे यांना अभिप्रेतही आहे - तरी अस्पृश्यतेच्या भयंकरतेचे वस्तुनिष्ठ वर्णनही त्यामध्ये केलेले आहे.
या लेखामध्ये त्यांनी प्रतिपादन केले आहे की, अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींमध्ये अनेक प्रसंगी, अनेक कारणांनी अन्य पुष्कळ जातींची भेसळ झाली असावी. काठेवाडकडील भंग्यांचे सहा पोटभाग असून त्या सर्वांची नावे मकवान, परमार, राठोड, सोळंकी, वाघेला व डोरी अशी अस्सल रजपुतांची आहेत. महाराष्ट्रातील महारांमध्येही अस्सल समजल्या जाणा-या मराठा शहाण्णव कुळांपैकी जाधव, साळुंके, पवार, मोरे, गायकवाड, शेलार, साळवी इत्यादी नावे आढळतात. महाराष्ट्रातील महारांची भाषा पाहिली असता त्यांचे उच्चार, स्वर व एकंदर बोलण्याची ढब मराठी कुणब्यासारखीच दिसून येते. त्यांच्या देव्हा-यावर मराठ्यांच्याच देवतांच्या मूर्ती दिसतात. त्यांची तीर्थक्षेत्रेही इतर मराठी माणसांप्रमाणे पंढरपूर, तुळजापूर हीच होत. या प्रकारचे मराठी वगैरे जातींशी असलेले अस्पृश्यवर्गाचे साम्य शिंदे यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्यामध्य इमानीपणा, करारीपणा, आणि शौर्य इत्यादी नैतिक गुण उपजत दिसून येतात. उत्तरेकडील रोहिदास चांभार, महाराष्ट्रातील चोखोबा महार इत्यादी महान साधुपुरुषांवरुन या वर्गातील लोकांमध्ये आत्मिक गुणांची उणीव नाही हेही ते निदर्शनास आणतात. असे असून त्यांच्यावर बहिष्कार टाकणे किती अन्यायाचे आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. मनुस्मृतीमध्ये चांडाल, श्वपच इत्यादी जातींना कोणत्या भंयकर स्वरुपाची वागणूक दिली जावी या संबंधातील श्लोक त्यांनी प्रस्तुत लेखात उद्धृत केले आहेत. हजारो वर्षांचा अशा प्रकारचा बहिष्कार वाट्याला आल्यामुळे या दुर्दैवी लोकांची सांपत्तिक, नैतिक व धार्मिक इत्यादी सर्वच बाजूंनी करुणास्पद स्थिती झाली आहे.
शिंदे यांनी प्रस्तुत लेखामध्ये १९०१ च्या खानेसुमारीच्या आधारे हिंदुस्थानातील विविध प्रांतांत अस्पृश्य मानलेल्या जातींची कोणकोणती नावे आहेत, त्यांची लोकसंख्या किती आहे ती ध्यानात घेऊन एकंदर लोकसंख्येच्या तुलनेत अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांची एकंदर संख्या एकषष्ठांशापेक्षा जास्त आहे, हे दाखवून दिले आहे.
अस्पृश्यवर्गाच्या दुःस्थितीचा आणि त्यांना दिल्या जाणा-या निर्दयपणाच्या वागुणकीचा साकल्याने विचार करताना त्यांनी दुसरी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आणली. स्वतःला उच्चवर्णीय समजणारा हिंदू समाज तर त्यांना वाईट वागवतोच, परंतु स्वतः वागवतोच, परंतु स्वत:ला न्यायी समजणारे इंग्रज सरकार हेही त्यांना समतेच्या भावनेने व स्वतःच्या माबाप सरकारच्या (पेरेंटल गव्हर्मेंटच्या) भूमिकेतून वागवीत नाही. "इंग्रज सरकारच्या सत्तेच्या, संपत्तीच्या आणि शहाणपणाच्या मानाने पाहता त्या लोकांची जी दाद लागत आहे ती फारच अल्प होय." इंग्रज सरकारच्या संदर्भात ते स्पष्टपणाने विधान करुन त्यांचा अन्यायीपणा दाखवून देतात. "मिठावरचा आणि जमिनीवरचा कर, जकात आणि दुस-या अशाच सर्वसाधारणण करांची वसुली करतेवेळी सरकार अमुक जाती उच्च आणि अमुक जाती नीच हा भेद पाहत नाही. पण असे असूनही न्यायकोर्टे, दवाखाने, शाळा, पोस्ट ऑफिसे इत्यादी सार्वजनिक जागी नीच मानिलेल्या वर्गास उच्च म्हणविणारांच्या दृष्टीने वागविण्यात येते. त्यामुळे आधीच रंजलेल्या बापड्यांस अनेक अपमान, अडचणी आणि पुष्कळ वेळा अन्यायही सोसावे लागतात. कर घेतेवेळी सरकार जी समदृष्टी ठेवते ती प्रजापालनाच्या वेळी का ठेवीत नाही?" सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत शिंदे हे राजकीय जहालांप्रमाणे सरकारच्या अन्यायाचा स्पष्ट निर्देश करुन रोखठोकपणे आक्षेप घेताना दिसतात.
१९०१ च्या खानेसुमारीच्या आधारे त्यांनी दाखवून दिले की, हिंदुस्थानच्या एकंदर २९ कोटी ४३ लक्ष ६१ हजार ५६ लोकसंख्येपैकी ५ कोटी ३२ लक्ष ६ हजार ६१२ एवढी अस्पृश्य मानलेल्यांची संख्या आहे. त्यांच्यापुढे मुख्य प्रश्न हा होता की, जवळ जवळ साडेपाच कोटी प्रजेने हीन स्थितीत राहून चालेल काय? हिंदूंनी जर आपला सोवळेपणा सोडला नाही तर आणि समजा, एवढ्या मोठ्या अस्पृश्य समाजाने धर्मांतर करावयाचे ठरविले तर काय दृश्य दिसेल? सध्या राष्ट्रीय पातळीवर हिंदू-मुसलमानांची दुही आहेच. अस्पृश्यांची जर ख्रिस्ती व्हावयाचे ठरविले तर पंधरा कोटी हिंदू, सहा कोटी मुसलमान आणि सात कोटी ख्रिस्ती ( एक कोटी बौद्ध, जैन, शीख वगैरे वेगळेच ) यांचा तिरपगडा होणार. समजा, हे मुसलमान झाले त? पंधरा कोटी मवाळ हिंदू आणि जवळ जवळ तितकेच कडवे मुसलमान आणि ख्रिस्ती मिळून या तिघांचे सूत कसे जमणार ? अशा प्रकारचे हिंदुस्थानच्या भवितव्यतेचे विपरीत दृश्य शिंदे यांच्या डोळ्यांसमोर येत होते. शिंदे हे हिंदू धर्माच्या अभिमानातून ही भूमिका मांडीत होते अशातला भाग नाही. ते स्वतः पारंपरिक हिंदू धर्माच्या पत्नीकडे गेलेले विश्वधर्माचे पाईक होते. त्यांना एकात्मतेचा ध्यास होता. म्हणून वाढत जाणा-या संभाव्य विषमतेचे चित्र त्यांनी विचारार्थ पुढे मांडून हिंदू समाजाने समतेचा आणि न्यायीपणाचा दृष्टिकोण घ्यावा या भूमिकेतून ते संभाव्य दुष्परिणामाचे चित्र पुढे ठेवीत होते.
प्रत्यक्ष डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन करुन अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीचे प्रयत्न शिंदे यांनी चालविले होतेच. त्याशिवायही अस्पृश्यवर्गीय समजलेल्यांना कायमस्वरुपी उद्योगधंदा पुरवून आपल्या समाजामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने ते विचार करीत होते. गुन्हेगार मानलेल्या मांग जातीच्या अस्पृश्य लोकांची एक शेतकी वसाहत वसवावी या दृष्टीने १९९४साली त्यांनी प्रयत्न केले. ह्या कामासाठी सरकारी जागा देण्याचे मुंबई सरकारने कबूलही केले होते. डॉ. मॅन यांच्या सहकार्याने कुपवाडजवळ सांगली संस्थानाच्या हद्दीत बाराशे एकर पडीक जागाही त्यांनी शोधून काढली होती. मात्र इंग्रज सरकारने मिशला दिलेले वचन पाळले नाही व गुन्हेगार मानल्या गेलेल्या अस्पृश्यांचे स्वतंत्र शेतकी खेडे वसविण्याची क्रांतिकारक कल्पना अमलात येऊ शकली नाही. ती जर अमलात आली असती तर अस्पृश्यवर्गाचा औद्योगिक, आर्थिक प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने ते क्रांतिकारक पाऊल ठरले असते.
अस्पृश्यवर्गाच्या उपजीविकेचा प्रश्न सन्मानाने सोडवणे शिंदे यांना आवश्यक वाटत होते म्हणून त्यांनी चालविलेल्या मिशनमध्ये शालेय शिक्षणाच्या जोडीने उद्योगधंद्याचे शिक्षण देण्यास प्रारंभ केलेला होता. त्यांची कल्पना अशी होती की, विद्यार्थ्यांच्या हातांना आणि डोळ्यांना व्यावहारिक वळण लागावे. अशा धंद्याची तयारी लहानपणापासून केली नाही तर ते पोकळ पंडित बनून आईबापांच्या आणि स्वतःच्या निराशेला कारणीभूत होतील. खेडेगावात राहून करता येण्याजोगा मुख्य उद्योग म्हणजे शेतीचा, हा विचार त्यांच्या मनात प्रारंभापासूनच होता. त्याचा निर्देश वर आला आहे. १९२६ साली पुणे येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या शेतकी परिषदेमध्ये त्यांनी याबाबत महत्त्वाचे विचार मांडले आहेत.
अस्पृश्यवर्ग हा शेतजमिनीचा मालक होणे कसे न्याय्य आहे व त्यासाठी त्याने प्रयत्न करणे कसे आवश्यक आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्यांनी म्हटले, "अस्पृश्य हेच महाराष्ट्राचे ऊर्फ दंडकारण्याचे मूळ मालक आहेत व आज मूळ मालक केवळ पहिल्या नंबरचा बलुतेदार म्हणून राहिला आहे." ते अस्पृश्य बांधवांना आवाहन करतात की, तुम्ही सर्वांनी दुर्भेद्य एकी करुन जमिनीवरील आपली गेलेली सत्ता पुन्हा मिळविली पाहिजे. सरकारजवळ आणि हिंदी संस्थानिकांजवळ अशा जमिनीचे अफाट प्रदेश पडलेले आहेत ते मिळविण्याचा व शेती करण्याचा मार्ग शिदे यांनी त्यांना दाखविला.
विसाव्या शतकांच्या आरंभापासून शिंद यांनी अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी दाखविलेली कळकळ, संस्थात्मक पातळीवरुन केलेले प्रयत्न व सामाजिक पातळीवरुन त्यांच्या प्रश्नांची केलेली मांडणी व त्यांच्या भावी उन्नतीची दाखविलेली दिशा या सगळ्याच बाबी अपूर्व म्हणाव्या लागतील अशा आहेत. अस्पृश्यवर्गाचा प्रश्न त्यांनी केवळ शिक्षण घेऊन व खेडी सोडून शहराकडे गेल्याने सुटणार नाही याची यथार्थ जाणीव ते प्रकट करतात. तीनचतुर्थांशापेक्षा जास्त लोकसंख्या खेडेगावातच असणा-या व शेती हाच प्रधान व्यवसाय असणा-या भारतासारख्या देशातील अस्पृश्यांचा प्रश्न सामाजिक पातळीवर सोडवावयाचा असेल तर शिंदे यांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करणे आजही मौलिक स्वरुपाचे आहे, असे या बाबतीत गेल्या शतकभरात झालेले प्रयत्न आणि आजची वस्तुस्थिती विचारात घेता म्हणावेसे वाटते.
अस्पृश्यवर्गाकडे पाहण्याचा दुष्टिकोण
विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यवर्गासंबंधी केलेले प्रत्यक्ष कार्य, मांडलेले विचार यांमधून त्यांची जी भूमिका दिसून येते ती जातीच्या उतरंडीवर आधारलेली व श्रेष्ठ-कनिष्ठ भावाला महत्त्व देणारी समाजव्यवस्था नष्ट करुन समाजाची पुनर्घटना करण्याची आहे हे स्पष्ट दिसते. मात्र तिचे यथायोग्य आकलन काही विचारवंतांकडू होताना दिसत नाही. शिंदे यांच्याबद्दल य. दि. फडके यानी लिहिले आहे; "भूतदयेवर आधारलेल्या व्यापक मानवतावादी भूमिकेतून अस्पृश्यता नष्ट करण्याचे त्यांनी चालविलेले प्रयत्न दलितमुक्तीबाबत उदासीन असलेल्याकाही ब्राह्मणेतर नेत्यांना फारसे आवडत नसत." शिंदे यांच्या अस्पृश्यतानिवारणकार्यामागील भूमिकेचे वर्णन करताना 'भूतदयेवर आधारलेल्या' ह्या शब्दप्रयोगाचा फडके यांनी केलेला उपयोग रास्त वाटत नाही. आपली श्रेष्ठता व दुस-याची कनिष्ठता गृहीत धरुन अनुकंपेने व दयाबुद्धीने दुस-याकडे बघणे व आपली श्रेष्ठपणाची भावना कायम ठेवून त्यांचा दु:खपरिहार त्याला खालच्या पायरीवर ठेवूनच करणे ह्या वृत्तीला भूतदयेची वृत्ती अथवा दृष्टिकोण म्हणता येईल. शिंदे यांना दृष्टिकोण या प्रकारचा होता असे मुळीच म्हणता यावयाचे नाही.
'सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद न राखिता परस्परांशी बंधुभावाने वागावे हे ईश्वरास प्रिय आणि मनुष्याचे कर्तव्य आहे.' हे प्रार्थनासमाजाच्या सहा मूलभूत तत्त्वापैकी एक तत्त्व होते. मिशनची स्थापना झाली त्या दिवशी सर नारायण चंदावरकर यांनी भाषण करताना हे निक्षून सांगितले होते की, " ह्या नीच मानल्या गेलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःलाच वर आणीत आहोत. हे पवित्र कार्य करीत असता ह्या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणार न शिरो." अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांच्या सुधारणेसंबंधी कार्य करताना कोणाच्याही मनात श्रेष्ठत्वाची, अहंकाराची जाणीव निर्माण होऊ नये. याबद्दलची स्पष्ट जाणीव चंदावरकरांच्या वरील विधानावरुन दिसून येते. मिशनच्या वार्षिक अहवालाच्या मुखपुष्ठावर सर चंदावरकरांचे वचन छापलेले असे : इन इलेव्हेंटिंग दि डिप्रेस्ड वुइ आर बट इलेव्हेटिंग अवरसेल्व्हज्. १९१२ साली शिंदे यांनी मिशनची माहिती देणा-या इंग्रजी पुस्तिकेवरही चंदावरकरांचे वरील वचन छापलेले आहे.
अस्पृश्यतेच्या मुळाशी असणा-या, काल्पनिक भेद करुन श्रेष्ठ-कनिष्ठ आणि स्पृश्य-अस्पृश्य ठरविण्याच्या मनोवृत्तीला शिंदे यांनी मानसिक व्याधी म्हटले आहे. सामाजिक उतरंडीची तात्त्विक भूमिका आणि त्या त-हेची समाजरचना आमूलाग्र उखडून काढण्याच्या त्यांच्या कार्याकडे डोळेझाक करणे अयोग्य होईल. शिंदे यांच्या विचारात आणि कार्यात प्रथमपासून शेवटपर्यंत वर्णजातीच्या पायावरील ही उतरंडीची समाजरचना नष्ट करण्याच्या म्हणजेच पूर्णतया जातिनिर्मूलनाच्या विषयाचा गाभ्याचे स्थान होते, त्यानुसार समाजाची पुनर्घटना करणे त्यांना अभिप्रेत होते हे कदापि विसरुन चालणार नाही.
शेतक-यांच्या समस्या
उदार धर्माचा प्रसार आणि अस्पृश्यतानिवारणाचे कार्य हे दोन प्रश्न विठ्ठल रामजी शिदे यांचे जीवन व्यापून टाकणारे होते. असे असले तरी समाजातील अन्य पीडितवर्गाच्या समस्यांकडेही ते लक्ष पुरवीत होते असे दिसते. शेतकरीवर्गावर होणा-या अन्यायामुळे व त्यांच्या दुःस्थितीमुळे या वर्गाबद्दलही त्यांना कळवळा वाटत होता. १९२६ ते १९३२ या कालखंडात शिंदे यांनी शेतक-यांच्या समस्यांकडे आस्थेवाईकपणाने लक्ष पुरविले आहे. १९२८ च्या पुणे येथे भरलेल्या मुंबई इलाखा शेतकरी परिषदेत अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहताना आपण हे धर्मकार्य समजूनच उपस्थित राहिलो आहोत असे त्यांनी प्रारंभी स्पष्टपणाने नमूद केले आहे. या सात-आठ वर्षांच्या कालावधीत मुख्यतः शेतक-यांच्या परिषदांमधून भाषणे करुन त्यांच्या समस्यांचे त्यांनी कसे मूलगामी विवेचन केले व भावी काळातील त्यांच्या कार्याची कोणती दिशा दाखविली हे आपण एका मागील प्रकरणात विस्ताराने पाहिले आहे.
शेतकरी परिषदेत केलेल्या भाषणामधून शिदे यांनी खरा शेतकरी कोण त्याचप्रमाणे त्यांचा खरा शत्रू कोण याची मीमांसा करुन शेतक-यांच्या उन्नतीच्या मार्गांचे मूलगामी विवेचन केले आहे. त्यांच्या मते जो आपल्या कुटुंबाच्या व आश्रितांच्या पोषणाला, शिक्षणाला आणि योग्य त्या सुखसोयींना आवश्यक इतकीच जमीन बाळगतो आणि आपण स्वतः आपल्या आप्तांच्या व आश्रितांच्या श्रमाने योग्य रीतीने खरोखर वाहतो तोच खरा शेतकरी होय, असे न करता इतर जे जे म्हणून जमीन धारण करतात किंवा तिच्यावर हक्क सांगतात, ते केवळ भांडवलदार आणि शेतक-यांचे दावेदार अथवा प्रतिस्पर्धी समजावेत, असेही सांगतात.
शेतक-यांच्या हिताचा शत्रू केवळ परकीय नाही. त्यांच्या दाराशीच उभा असणारा खेड्यातला जमीनदार असो किंवा शहरातला गिरणीवाला असो, सावकाराच्या (भांडवलदाराच्या) रुपाने तो शेतक-यांचे शोषण करीत आहे आणि उलट त्यालाच सरकार आणि संस्थानिकांचे लष्कर आणि पोलीस मिंधे झाले आहेत. यासाठी शिंदे हे शेतक-यांना संघटनेचा मंत्र सांगतात.
खेड्यातला शेतकरी आणि शहरातला कामगार हितसंबंधाच्या दृष्टीने एकच होत, असे त्यांना वाटते. एकच माणूस खेड्यातला शेतकरी आणि शहरातला कामगार अशी भूमिका करत असतो. अशी कितीतरी माणसे आहेत. शेतक-यांच्या तोंडातला घास काढून घेणारा जमीनदार हाही भांडवलदार व शहरातील गिरणीकामगारांची पिळवणूक करणारा गिरणीमालक हाही भांडवलदार. म्हणून शेतकरी आणि कामगार हे काही प्रमाणात एकच असतात. निदान त्यांचे हितसंबंध एकच असतात आणि त्यांचा समान शत्रू म्हणजे भांडवलदार. म्हणून शिंदे हे शेतक-यांना स्वतःची संघटना करा हे तर बजावून सांगतातच, शिवाय शहरातील कामगारांच्या संघटनेशी खांद्याला खांदा लावून मिळून संघटना करा, असा संयुक्त संघटनेचा मार्ग दाखवितात. १९४७ साली महाराष्ट्रात 'शेतकरी-कामगार पक्ष' या नावाचा पक्ष अस्तित्वात आला. त्याचे बीज शिंदे यांच्या विचारात होते, असे म्हणता येऊ शकेल.
शेतक-यांनी आपली संघटना उभी करणे हे कामे सोपे नाही, याची शिंदे यांना जाणीव होती. त्या दृष्टीने त्यांनी परखड विश्लेषण केले आहे. ही संघटना करण्यासाठी शेतक-यांना काँग्रेस उपयोगी पडेल असा त्यांना भरवसा वाटत नाही. काँग्रेस सुशिक्षितांच्या व श्रीमंतांच्या हाती गेलेली. शेतक-यांच्या संघटनेचे कार्य तिने आपल्या शिरावर घेतलेले नाही.
काँग्रेसचे कार्य सर्वांशी राजकारणाचे आहे व शेतक-यांचे कार्य अर्थकारणाचे किंवा सामाजिक स्वरुपाचे आहे. म्हणून शेतक-यांनी संघटनेसाठी काँग्रेसवरही अवलंबून राहू नये असे ते स्पष्टपणे सांगतात व आपली जूट त्यांनी स्वतंत्रपणाने करावी, असे बजावता.शेतक-यांना उद्देशून दुसरी महत्त्वाची गोष्ट ते सांगतात, "तुम्ही नेहमी काबाडकष्ट करणारे नांगरे म्हणूनच काळ न कंठता राष्ट्राच्या अर्थकारणात, तुम्ही आपला एक हात अर्थउत्पादनात गुंतवून दुसरा हात हा उत्पन्न केलेल्या अर्थाची पुढे विल्हेवारी कश चालली आहे हे पाहून त्या अर्थगाड्याच्या बैलांची शिगेदोरी खेचण्याकरिता नेहमी मोकळा ठेवणे जरुर आहे."
विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी शेतक-यांच्या उन्नतीसंबंधी जे विचार मांडले ते आजही तेवढेच महत्त्वाचे वाटतात. वस्तुत: १९२६ ते ३२ या कालखंडामध्ये , म्हणजे त्यांनी हे विचार मांडले त्या कालखंडात, महात्मा गांधीनी सुरु केलेला स्वातंत्र्याचा लढा ऐन भरात आलेला होता. सगळे वातावरण स्वातंत्र्याच्या आकांक्षेने भारुन गेले होते. देशाला राष्ट्रीय स्वातंत्र्य हाच जणू काय एकमेव निकराचा प्रश्न वाटत होता. खुद्द शिंदे हेही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते व त्यांनी त्यासाठी तुरुंगवासही भोगला होता. अशा या काळात शेतक-यांच्या हिताचा, त्यांच्या समस्यांचा विचार त्यांनी अत्यंत वस्तुनिष्ठपणे केला, यावरुन शेतक-यांच्या हिताबद्दल असणारी त्यांची कळकळ व त्यांच्या बुद्धीचा कणखरपणा दिसून येतो. कोणत्याही प्रश्नाचा विचार करीत असताना शिंदे त्या प्रश्नाचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन वर्तमान स्थितीचे आकलन करतात व या आकलनाला मूल्यनिष्ठेची जोड देऊन भविष्यकाळातील स्वरुपाचा विचार करतात. शेतक-यांच्या प्रश्नांचा विचार करताना त्यांच्या वैचारिकतेची ही सगळी वैशिष्टये आपल्या प्रत्ययाला येतात. त्यांनी केलेली शेतक-याची व्याख्या, शेतक-यांचे खरे दावेदार हे भांडवलदार होत हे आकलन; शेतक-यांनी आपल्या हितासाठी काँग्रेसवर अवलंबून राहू नये हा दिलेला इशार : शेतक-यांनी आपला प्रश्न अर्थकारणाचा आहे हे ध्यानात घेऊन त्यांनी आपली संघटना करावी, कामगारांशी जूट करावी असा केलेला उपदेश, या सा-यांतून त्यांच्या आकलनाचा मूलगामीपणा जसा प्रत्ययाला येतो, त्याचप्रमाणे पीडित-शोषित शेतक-यांबद्दल त्यांनी असलेला खराखुरा कळवळाही आपल्याला जाणवतो.
स्त्रीविषयक विचार
आपल्या आईच्या ठायी असलेल्या आत्मिक गुणांचा शिंदे यांच्यावर त्यांच्या लहानपणीच जो प्रभाव पडला त्याचा परिणाम त्यांचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडण्यात झाला. त्याचप्रमाणे स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा प्रगल्भ असा दृष्टिकोण तयार होण्यासाबाबतही झाला. हा परिणाम त्यांच्या कार्यातून आणि विचारातून दिसून येतो. ऑक्सफर्ड येतील मॅंचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षण घेत असताना १९०३साली तेथील चर्चामंडळात शिंदे यांनी एक ठराव मांडला तो असा : "धर्मकार्यात स्त्रिया अधिक प्रमाणात क्रियाशील झाल्या तर धर्मकार्य अधिक परिणामकारक रीतीने घडले" १९१९ साली पुणे नगरपालिकेने मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा विचार चालविला होता. त्या वेळी मुलांच्या बरोबरीनेच मुलींनाही सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी शिंदे यांनी चळवळ उभारली.
१९२० मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणेला अनुसरुन नोव्हेंबर महिन्यात मुंबई इलाख्यातील निवडणूक जाहीर झाली. या निवडणूकीस उभे राहताना बहुजन पक्ष या नावाने विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपला जाहीरनामा प्रसृत केला. या जाहीरनाम्यामध्ये विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबल नसल्यामुळे जो वर्ग मागासलेला राहिला होता त्याच्या हितासाठी झटण्याची व त्यांचा कैवार घेण्याची भूमिका शिंदे यांनी मांडली. या मागासलेल्या वर्गात त्यांनी शेतकरी, शिपाई, शिक्षक, उदमी, दुकानदार, मजूर व अस्पृश्यवर्ग यांच्या जोडीनेच स्त्रीवर्गाचा समावेश केला. स्त्रीवर्गाच्या हिताची कळकळ व स्त्रीवर्गाचे महत्त्व नमूद करताना त्यांनी या जाहीरनाम्यात म्हटले आहे, "चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाच्या हाती काहीच लाभले नाही. आमचा पक्ष विद्वानांचा नाही, वक्त्यांचा नाही, ओरडणा-यांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारा आहे असे थोडेच होणार आहे ? स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा ! त्यांची हयगय करु तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागले हे आम्ही पूर्णपणे जाणून आहो." १९२५ साली शिदे यांच्या प्रेरणेने कौटुंबिक उपासनामंडळ सुरु झाले. खरी धार्मिक उपासना सहकुटुंबच व्हावयास पाहिजे अशी भूमिका या मंडळाच्या कार्यामागे होती व कुटुंबाने सभासद होताना आई, बहीण अथवा बायको अशी स्त्रीव्यक्तीसह सदस्य झाले पाहिजे अशी अपेक्षा ठेवली होती. शिंदे यांच्या उपासनांमधून, व्याख्यानांतून स्त्रीबद्दल आदराची भावना सातत्याने प्रकट होते.
आपल्या आईच्या पहिल्या श्राद्धनिमित्त केलेल्या उपदेशामधून शिंदे यांनी स्त्रीविषयक महत्त्वपूर्ण असे विचार मांडले आहेत. स्त्री-स्वभावामध्ये असणारा सहनशीलता हा जो गुण आहे त्यामध्ये त्यांना ईश्वरी अंशाची प्रचिती येते. या गुणाच्या योगेच संसारातील सुखाच्या कच्च्या मालाचे रुपांतर ती पक्क्या सुखात करते. या सहनशीलतेच्या द्वारे स्त्री ही पिता, पती आणि पुत्र या तिघांची आज्ञा पाळते, इतकेच नव्हे तर त्यांचे 'लळेही पाळिते' वरवर पाहणारास ती पती आणि पिता यांची आज्ञा पाळते, असे दिसेल.पती, पिता, पुत्रादिकांचे ती सर्वच काळी अपराध सहन करिते, शुश्रूषा करिते आणि लाड पुरविते म्हणून ती सर्वांची सारखीच माता म्हणावयाची. म्हणून आपण केवळ 'मातृदेवोभव' असे न म्हणता 'स्त्रीदेवोभव' असे म्हटले पाहिजे... स्त्रीजातीच्या ठायी हे दैवी गुण स्वाभाविकच आहेत हे जाणून सर्व स्त्रीजातीला पूज्य मानून तिचा सत्कार करणे, हा सात्त्विक प्रकार होय. हेच सुधारकांचे लक्षण, हीच सभ्य गृहस्थाची चालरीत समजावी."
स्त्रीचे अधिकार पुरुषाच्या बरोबरीचे आहेत म्हणून तिला समानतेने वागवावे अशा प्रकारची व्यावहारिक भूमिका शिंदे मांडीत नाहीत, तर तिच्या ठिकाणी असणा-या आध्यात्मिक थोरवीचे ते आकलन करतात. शिंदे यांच्या स्वत:च्या ठिकाणी असलेल्या आध्यात्मिकतेमुळेच ते अशा प्रकारचे आकलन करु शकतात, असे म्हणावेसे वाटते.
१९२६ साली शिदे यांनी दिलेल्या एका व्याख्यानात स्त्रीचे एकंदर मानवी विकासक्रमात काय स्थान होते व सध्याच्या सुधारलेल्या मानल्या जाणा-या स्त्रीचे काय स्थान आहे याचे अत्यंत सखोल विश्लेषण केलेले आहे. मानवी जगाच्या इतिहासाच्या आरंभी घरात व बाहेर स्त्रीचीच सत्ता चालत होती, स्त्रीराज्य होते, असे ते सांगतात. या प्रारंभकाळी स्त्रीच्या ठिकाणी आज असलेल्या भावना ( इमोशन्स) व उपजतबुद्धीच्या (इंस्टिंक्ट) जोडीने विवेचक बुद्धी (रीझन) आणि यत्नशक्ती(वुईल) असली पाहिजे. नंतरच्या विकासक्रमामाध्ये वाढत्या पुरुषसत्तेमुळे तिच्या ठायी असलेल्या विवेचकबुद्धीचे आणि यत्नशक्तीचे खच्चीकरण होऊन त्यांनी पुरुषांच्या पुढे गौणत्व पत्करले असावे. असे असले तरी पाळण्याचीच नव्हे तर सर्वच घरगुती राज्याची दोरी स्त्रीच्याच हाती आहे. आध्यात्मिक अंतःपूर आजही स्त्रीच्याच स्वाधीन आहे. केवळ शिष्टाचारयुक्त वागण्यात मान दिल्याने स्त्रीला समानतेने वागविले असे होत नाही. तिला खरेखुरे स्वातंत्र्य दिल्याने तिचा विवेकबुद्धी आणि यत्नशक्ती यांची वाढ होऊ शकेल व घरात आणि घराबाहेर ती आपले खरेपुरे प्रेमाचे साम्राज्य चालवील, असे त्यांनी सुचविले आहे.
समकालीन सुधारकांपैकी शिंदे यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोण सर्वस्वी वेगळा आणि महत्त्वाचा वाटतो याचे कारण आध्यात्मिक अंगाने बघण्याची त्यांची भूमिका व समकालीनांहून वेगळी असणारी त्यांची संवेदनशीलत ही होत. स्त्रीच्या सुधारणांचा - त्यांचे हक्क, समान दर्जाचा पुरस्कार, कायद्याच्या निर्बंधातून स्त्रियांची मुक्तता करणे वगैरे बाबींचा- पुरस्कार विवेकवादी भूमिकेवरुन इतर समाजसुधारकांप्रमाणे त्यांनी केलेला आहे. शिवाय शिंदे हे मानववंशशास्त्र, विज्ञान, संस्कृतीचा इतिहास वगैरेंनी उपलब्ध करुन दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करतात. मात्र त्यांच्या ठिकाणी असणा-या आध्यात्मिकेची जोड त्यांच्या आकलनाचाल मिळालेली असल्याने त्यांचा स्त्रीविषयक विचार हा वेगळा आणि सखल स्वरुपाचा असल्याचे आपल्याला जाणवते.
सामाजिक सुधारणा व अन्य प्रश्न
विठ्ठल रामजी शिंदे हे धार्मिक-सामाजिक सुधारणेसाठी स्वतःचे आयुष्य वाहून टाकणारे कृतिवीर होते. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांनी जे विचार मांडले आहेत; त्यांना स्वाभाविकपणेच स्वनुभवाचे पाठबळ आहे. १९२५ साली प्रांतिक सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरुन बोलताना त्यांनी महत्त्वाचे विचार मांडले आहेत. प्रत्यक्ष कार्य करणा-या संस्थांचे पाठबळ मागे नसताना नुसत्या परिषदा भरविण्याच्या ते विरुद्ध होते. 'पाठीमागे विधायक कार्य करणा-या संस्था नसताना भरविल्या जाणा-या परिषदा या नुसत्या आवाज करणा-या घंटांसारख्या किंवा पर्जन्यविरहित वावटळीसारखा विफल होऊन त्यांच्या योगाने सार्वजनिक शांततेचा मात्र भंग होत असतो', असे त्यांनी प्रस्तुत भाषणात विधान केले आहे. या परिषदेतच त्यांनी हिंदू समाजास प्राप्त झालेल्या अवनत देशची मीमांसा करताना हिंदू समाजास जडलेल्या एका व्याधीचा निर्देश केला आहे. ती म्हणजे काल्पनिक भेद काढून त्यांना खाजगी व सार्वजनिक व्यवहारातसुद्धा उच्च दर्जाचे राजकारण व चारित्र्याचे पावित्र्य यांच्या वर स्थान देण्याची हिंदी लोकांच्या मनोवृत्तीला असलेली स्वयंस्फूर्त सवय ही ती मानसिक व्याधी होय. अस्पृश्यतेच्या मुळाशी ही काल्पनिक भेद करण्याची मनोवृत्ती कारणीभूत आहे, असे ते म्हणतात.
आपल्या देशात समाजसुधारणेचे कार्य इतके सावकाशीने व अल्प प्रमाणात चालते त्याचे एक महत्त्वाचे कारण शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते शुद्ध सामाजिक सुधारणेचे म्हणविले जाणारे कार्य अद्यापही बुद्धिपुरःसर धर्मापासून अलिप्त ठेवले आहे हे होय. आगरकरांसारखे जुन्या परंपरेतील समाजसुधारक या कार्याची उभारणी उपयुक्ततावाद, बुद्धिवाद, भूतदया वगैरे दुस-या कोणत्याही तत्त्वावर करावयास तयार असतात, पण धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्यास तयार नाहीत. अशी त-हेची ही धर्मविन्मुख प्रवृत्ती समाजसुधारकांमध्ये असावी ही गोष्ट त्यांना दुर्दैवाची वाटते. सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी ह्या आध्यात्मिक चळवळी असतात ही त्यांची भूमिका आहे.
विठ्ठल रामजी शिंदे यांनी शिवाजी महाराज, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, महात्मा गांधी इत्यादी विभूतींवर लिहिलेल्या लेखांतून त्यांची आध्यात्मिक दृष्टी जशी दिसून येते त्याचप्रमाणे राष्ट्राच्या इतिहासातील घटनांकडे पाहण्याचा व त्यांचा अर्थ लावण्याचा त्यांच्या बुद्धिमत्तेचा पल्ला फार मोठा आहे हेही जाणवते. अशा प्रकारच्या लेखांत त्यांनी भारतातील आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वास्तवाचे मार्मिक विश्लेषण केले आहे. अव्वल इंग्रजी अमदानीत अनेकविध कार्यक्षेत्रांत प्रभावी कामगिरी करुन केवळ नव्या मुंबईचीच नव्हे, तर महाराष्ट्रा्च्या जीवनाची नव्या मनुनूसार घडी बसविण्याचे अलौकिक कर्तृत्व दाखविणा-या नाना शंकरशेटला महाराष्ट्र का विसरला याची परखड व भेदक मीमांसा त्यांनी एका लेखात केली आहे. प्रत्यक्षात अलैकिक कार्य करणा-या विभूतींना भारतीय का विसरतात याची कारणे त्यांनी सूत्ररुपाने नमूद केली आहेत. एक, भारत ऐहिक निष्ठेपक्षा परलोकखुळा जास्त आहे. दुसरे कारण, धर्माच्या खालोखाल असलेले वाड्मयाचे वेड. त्यामुळे तो अशोक, अकबर, शिवाजी, महादजी, अहल्याबाईंपेक्षा कालिदास, टागोरदिकांना अधिक आठवील व ओळखील. नांगर करणा-या किर्लोस्करांपेक्षा रँग्लर परांजपे अधिक वाटतात. आमच्या सा-या इतिहासात राष्ट्रनिष्ठा दिसून येण्याऐवजी जातिनिष्ठा दिसते हेही कारण नमूद करतात. आपल्यात असणारे राजकारणाचे खूळ या कारणाचाही ते उल्लेख करतात. शिवाजी महाराज हे त्यांच्या ख-याखु-या श्रेष्ठत्वामुळे नव्हे, तर राजकीय पक्षपातामुळे आठवतात. आपल्यातील सांस्कृतिक उणिवांचे भेदक दर्शनच शिंदे यांनी घडविले आहे.
खुद्द महर्षी शिंदे यांना बह्यंशी विसरुन त्यांची घोर उपेक्षा होण्यामागे हीच कारणे नव्हेत काय?
इतर अनेक सामाजिक व सांस्कृतिक बाबीसंबंधी शिंदे यांनी मांडलेले विचार त्यांच्या स्वतंत्र बुद्धीचे द्योतक आहेत, त्याचप्रमाणे त्यांची एकात्मतेची दृष्टी प्रकट करणारे आहेत. महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग म्हणून ब्राह्मण, मराठे व अस्पृश्य यांच्यात एकजूट होण्यासाठी आवश्यकता ते प्रतिपादितात. १९२६ च्या सुमारास पुण्यामध्ये मराठी माध्यमाचे महाराष्ट्र विद्यापीठ स्थापण्यासंबंधीचा जोरदार विचार चालला होता. सामान्यतः मराठीचा अभिमानच नव्हे तर अभिनिवेश या संदर्भात प्रकट होत होता. शिंदे यांना मात्र या वेळी मराठी आणि कानडी यांच्यामधील ऋणानुबंधाची आठवण होते. मुंबई या उच्चभ्रूंच्या विद्यापीठात कानडीची दाद लागणार नाही याची त्यांना खात्री होती. म्हणून पुणे येथे नव्याने निघू पाहणा-या महाराष्ट्र विद्यापीठात सांगली, कोल्हापूर आणि धारवाड येथील कॉलेजे सामील करुन घ्यावीत आणि कर्नाटकांतील त्या कॉलेजांना भाषेचे माध्यम मराठी अथवा कानडी विकल्पाने ठेवण्याचा अधिकार द्यावा आणि कानडीचे जे मराठीवर उपकार झाले आहेत त्याची अशा त-हेने फेड करावी असे ते सुचवितात.
शिक्षणासंबंधीही शिंदे यांनी वेगळ्या प्रकरचा विचार मांडलेला आहे. शिक्षणाचे काम मूलतः आईबापांचे नंतर ते श्रमविभागामुळे गुरु व गुरुपत्नीकडे गेले. विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कुलभाव निर्माण झाल्याने भावंडपणा निर्माण होऊन शाळा म्हणजेच एक बृहत कुटुंब ठरेल व तेच खरे विद्यालयाने साधावयाचे आत्मीय शिक्षण होय, अशी त्यांची शिक्षणाबद्दलच्या उद्दिष्टाची कल्पना आहे. पुरुष-विद्यार्थ्यांबरोबरच स्त्री-विद्यार्थ्यांचे शिक्षण मनापासून व पूर्णपणे जबाबदारपणे चालले पाहिजे. गुरु आणि गुरुपत्नी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या प्रेमपंखाखाली घेऊन हे आत्मीय शिक्षण जबाबदारीने पार पाडले पाहिजे. यासाठी शिक्षकांची पत्नी हीसुद्धा सहानुभूतीची स्त्री असावयास पाहिजे, तरते आत्मीय शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होईल असा विचार ते मांडतात.
बडोदे येथे १९३५ साली भरलेल्या साहित्य संमेलनातील तत्त्वज्ञान व समाजशास्त्र शाखेच्या अध्यक्षपदावरुन केलेल्या भाषणात मराठीत स्वतंत्रपणे तत्त्वज्ञान निर्माण झाले नाही, तत्त्वज्ञानपर जे लेखन झाले आहे, ते भाष्यरुप ग्रंथाचे गारुड आहे व पुढे पुढे तर एका गीतेच्या घाण्याभोवती मराठीतील समग्र तात्त्विक विचारचक्र फिरू लागले अशी खंत त्यांनी प्रकट केली.
शिंदे एखाद्या सामाजिक प्रश्नाचा विचार करीत असताना ते त्या प्रश्नाचा ऐतिहासिक संदर्भ विचारात घेऊन वर्तमान स्थितीचे आकलन करतात व मूल्यनिष्ठतेची जोड देऊन त्याचे भविष्यकालीन स्वरुप कसे असावे ते सांगतात. त्यांच्या ह्या गुणवैशिष्टयांमुळे त्यांच्या सामाजिक स्वरुपाच्या विवेचनाला मौलिकता प्राप्त होते तसाच समकालीन संदर्भही प्राप्त होतो.