विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी प्रार्थनासमाजाची घेतलेली दीक्षा. मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना आगरकरांचा सुधारक वाचायला मिळू लागला होता. तेव्हापासून सुधारणावादी विचाराकडे त्यांचा कल जोराने होऊ लागला. त्यांचबरोबर बुद्धीलाच सर्वश्रेष्ठ मानून तिच्याच साह्याने देव आणि धर्म यांचा विचार करणे सयुक्तिक वाटून त्यांचा कल नास्तिकतेकडे झुकू लागला होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आल्यानंतर मिल आणि स्पेन्सर यांचे ग्रंथ मुळातून वाचल्यानंतर हा परिणाम तीव्र झालेला होता. १८९५ च्या अखेरीस त्यांचा परिचय रेव्ह. जे. टी संडरलॅंड यांच्यासशी होऊन पाश्चात युनिटेरियन अथवा एकेश्वरी धर्मपंथाची कल्पना त्यांना प्रथमतः आली. विठ्ठलरावांनी त्यांच्याशी चर्चाही केली. युनिटेरीयन पंथाचा परिचय झाल्यानंतर रूढ हिंदू धर्मातील बुद्धीला न पटणा-या कल्पना व आचार यांच्याशिवायही धर्मविचार असू शकतो याची त्यांना प्रथमतः स्पष्ट जाणीव झालेली असणार. स्पेन्सरसारख्यांनी सांगितलेल्या उत्क्रांतीसारख्या तत्त्वांचा अवलंब करून बुद्धिनिष्ठ पद्धतीने धर्माचा विचार करता येतो हे त्यांना जाणवले असावे. त्यामुळे विठ्ठलरावांच्या मनात धर्माचा फेरविचार सुरू झाला. ती त्यांची आतून जाणवणारी गरजही होती. कारण “मिलस्पेन्सरच्या विचारामुळे जो बंडखोरपणा माझ्या मनात व भोवताली माजला होता त्यांत माझ्या आत्म्याची भूक शमविण्याची शक्ती नव्हती. नास्तिकपणाच्या वाळवंटात मनाची तहान भागणे शक्य नव्हते,”१ असे त्यांनी नमूदही केले आहे. अशा मानसिक अस्वस्थतेच्या काळात त्यांनी प्रो. मॅक्सम्युलरचे ग्रंथ वाचले. धर्मावरील त्यांची विस्तृत व्याख्याने, भाषाशास्त्रचे अलोट ज्ञान व पौरस्त्य विचारांबद्दलची त्यांची समतोल वृत्ती यांमुळे ते त्यांना आप्तपुरूष वाटू लागले व धर्माकडे बघण्याची नवी दृष्टी त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली.
विठ्ठलरावांच्या मनाची घडणच अशी झाली होती की, त्यांच्या अंतःकरणामध्ये धर्माला मोठे स्थान होते. मुळात त्यांची धर्मप्रेरणा उत्कट आणि बळकट होती. त्यांच्या सश्रद्धतेवर मिल्-स्पेनरच्या विचारांचे काही काळ सावट आले तरी ते फार काळ टिकू शकले नाही. ह्या ओढाताणीच्या काळात ते गंभीरपणे आणि सखोलपणे धर्मचिंतन करीत होते व स्वतःची धर्मकल्पना सुस्पष्ट करून घेत होते. २२ मे १८९८ च्या रोजनिशीमध्ये त्यांनी लिहिले आहे, “आज संध्याकाळ किती थोर विचार मनात आले !... नेहमीप्रमाणे माझ्या धर्ममताच्या उत्कांतीची पाहणी चालली. आजपर्यंत अज्ञेयवादापर्यंत मजल पोचली होती. पण आज विचाराच्या तरंगात आमच्या अत्युच्च ब्रह्मतत्त्वाची कल्पना अगदी चित्तचक्षूपुढे सुबक झळकू लागली. होता होता मला, हल्लीच्या शास्त्रीय दृष्टीने पाहू लागलो तो ब्रह्मतत्वात व अज्ञेयवादात भेद दिसेना.”२
ह्या सुमारास बारामतीचे समाजसुधारक रामचंद्र अण्णाजी कळसकर यांची आणि विठ्ठलरावांची भेट झाली. २२ मे १८९८ रोजीच्या नोंदीमध्ये विठ्ठलरावांनी रा. कळसकर
बि-हाडी आल्याचा उल्लेख केला आहे. कळसकर यांनी ह्या सुमारास बारामतीच्या परिसरातील सहा खेड्यांमध्ये शाळा व उद्योगशाळा स्थापन करून महार, मांग या जातींमध्ये शिक्षणाचा फैलाव करण्याचे व या वर्गांमध्ये सुधारणा करण्याचे काम मोठ्या तळमळीने व त्यागपूर्वक चालविले होते. कळसकरांच्या वृत्तीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव विठ्ठलरावांवर जोरदार झाला. कळसकरांशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यासंबंधी लिहिले आहे, “त्यांचे साहस, उद्योग व स्वार्थत्याग ऐकतच होतो. त्यांचे स्वतःभाषण ऐकून तर ह्यांनी म्हार-मांग ह्या अतिनीच जातीची किती किती कळकळ दाखविली; त्यांनी काय काय केले पण आणखी कितीतरी करण्यासारखे आहे हे सर्व मनात येऊन मला स्वतःची मनःपूर्वक लाज वाचली व तिटकारा आला.”३
महात्मा जोतीबा फुल्यांनंतर अस्पृश्यांसंबंधी स्वार्थत्यागपूर्वक काम करणारे कळसकर हे एकमेव गृहस्थच एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस दिसतात. अस्पृश्यासंबंधी आपणही काही कार्य करावे ही प्रबळ प्रेरणा विद्यार्थिदशेतच विठ्ठलरावांच्या मनामध्ये कळसकरांच्या उदाहरणाने निर्माण झाली असावी. कळसकर ह्या कामी न्यायमृर्ती रानडे ह्यांचे साह्म घेत होते. त्यांच्या संस्थेसाठी पैशीची मदत मिळण्यासाठी रानड्यांचा उपयोग होत होता. रानड्यांच्या सहवासामुळे कळसकर हेही पुण्याला आले म्हणजे प्रार्थनासमाजात जात असत असे दिसते. विठ्ठलरावांनी २९ मे १८९८ रोजी लिहिलेल्या रोजनिशीत पुढील नोंद आढळते: “आज सकाळी आठ वाजता रा. कळसकर, हुल्याळ व मी प्रार्थनासमाजातील उपासना पाहावयास गेलो होतो. पुण्यातील मंदिरातील उपासना मी आजच प्रथम पाहिली. गेल्या डिसेंबरात मुंबईतील देवळांतील ढंग पाहून मला मुळीच बरे वाटले नाही. पूज्यभाव दूर राहू समाजाविषयी तेव्हापासून माझा किंचित दुराग्रह झाला होता. समाजाचे उद्देश, भाषण व मेंबरांची कृती अथवा वागणूक यांमधील विरोध पाहून तर मला अद्यापही चीड येत आहे. समाजात कसल्याही प्रकारे जातिभेद असता कामा नये असे असता इतर सुधारकांत व समाजात मला काही. भेद दिसत नाही. म्हणजे दोघेही अद्याप जातिभेद उघड उघड झुगारण्यास तयार आहेतसे दिसत नाही.” मुंबई प्रार्थनासमाजाच्या तुलनेत पुणे मंदिरातील उपासना पाहून विठ्ठलरावांची अनुकूल भावना निर्माण झाली याचे कारण मुंबईच्या मंदिरापेक्षा पुण्यातील मंदिर साधे होते. मुंबईतल्या प्रार्थनामंदिरात ते प्रथमच गेले असल्यामुळे त्यांना तेथील ख्रिस्ती चर्चमधल्या प्रेयरची हुबेहूब नक्कल वाटली. तेथील भपकही त्यांच्या मनाला रूचला नाही. त्यांनी असेही म्हटले की, “माझ्यासाख्या गावंढळास जर नव्याने दीक्षा घ्यावयाची असली तर माझी खात्री आहे की तो मुंबईच्या रंगमहालात कधीच दीक्षा घेणार नाही.”४ विठ्ठलरावांच्या या विधानावरून मुंबई प्रार्थनामंदिराबद्दलची नापसंती आणि पुण्याच्या प्रार्थनामंदिराबद्दलचा अनुकूल भाव तर प्रकट होतोच पण दुसरी गोष्टही सूचित होते. ती म्हणजे प्रार्थनासमाजाची आपण दीक्षा घ्यावी असाही विचार या वेळेसच त्यांच्या मनामध्ये चाललेला होता. रावबहादूर का. बा. मराठे यांची पुणे प्रार्थनासमाजातील प्रार्थना आणि व्याख्यान त्यांना फार चित्तवेधक वाटले. त्यांचे मन श्रद्धेने भरून आले व प्रार्थनेची पदे इतरांबरोबर त्यांनी मनोभावे गाइली. प्रार्थनासमाजाच्या ह्या उपासनेमध्ये त्यांना हिंदू धर्माचे निर्मळ आणि उज्ज्वल स्वरूप दिसले. प्रपंच साधून परमार्थ कसा करावा ह्याचे मराठे यांनी केलेले विवरण त्यांना चित्तवेधक आणि पटण्यासारखे वाटले. वारकरी पंथाच्या आचाराविचाराला जुळणारीच ही भूमिका आहे असे त्यांना वाटले असणार.
जनाबाई आपल्या मैत्रिणीसमवेत उपासनेला गेल्या होत्या. खरे म्हणजे विठ्ठलरावांच्या आधीपासून त्या प्रार्थनासमाजात अधूनमधून जाऊ लागल्या होत्या. जनाबाई पुण्यात आल्यावर पहिल्यांदा खिश्चन शाळेतच चार-सहा महिने जात होत्या. तेथील खिश्चन शिक्षिका उठल्या सुटल्या हिंदू देवदेवतांना, धर्ममतांना एवढेच नव्हे तर पोशाखादी राहणीपद्धतींना हीन लेखून हेटाळणी करीत असत. नंतर त्या फिमेल हायस्कुलात म्हणजे हुजूरपागेत आल्या. डॉ. भांडारकर हे या हायस्कूलच्या मुख्य चालकांपैकी एक होते. म्हणूनही कदाचित असू शकेल की, हायस्कूलमधील काही मुलींना प्रार्थनासमाजात जावेसे वाटले. जनाबाईंनाही तसे वाटले होते. विठ्ठलरावांना त्यांनी परवानगी विचारली. त्यांचा स्वतःचा कल अद्यापही प्रार्थनासमाजाकडे झालेला नव्हता, तरी त्यांनी जनाबाईंना परवानगी दिली. तेव्हा जनाबाई, त्रिवेणीबाई भाटवडेकर, छोटूबाई तावडे, जानकीबाई पानसे, कावेरीबाई उल्लाळ, लिंबाबाई अशा चार-पाचजणी प्रार्थनासमाजात जाऊ लागल्या. निदान प्रारंभी तरी त्या धर्मसाधनेच्या हेतूने नव्हे तर नावीन्य म्हणून प्रार्थनासमाजात जात होत्या. परंतु डॉ. भांडारकरांसारख्या विद्वानांच्या उपासना ऐकून त्यांच्या मनामध्ये समाजाबद्दल गोडी उत्पन्न होऊ लागली होती. शिंदे यांच्या वर उल्लेखिलेल्या रोजनिशीमध्ये चि. जनाक्का ही आपल्या मैत्रिणीबरोबर आली होती व तिलाही उपासना आवडली, तिला दर रविवारी जावेसे वाटत असे त्यांनी नमूद केले आहे. आपलाही दर रविवारी जाण्याचा मनोद्य येथेच त्यांनी प्रकट केला आहे. हुल्याळ यास मात्र प्रार्थनासमाज रूचला नाही. अशा त-हेने प्रार्थनासमाजाकडे विठ्ठलरावांचा आढा वाढत चालला होता.
२९ मे १८९८ रोजी प्रार्थनासमाजामध्ये कळसकरांच्या समवेत विठ्ठलराव उपासना पाहावयास गेले. तेव्हापासून प्रार्थनासमाजाबद्दलचा ओढा त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यानंतर दर रविवारी उपासनेसाठी प्रार्थनासमाजात नियमाने व आवडीने जाऊ लागले. ३१ जुलै १८९८च्या रोजनिशीमध्ये त्यांनी नमूद केले आहे, “गेले ५-६ रविवार मी नियमाने व मोठ्या आवडीने जात आहे. जनाक्काचा भाव तर आगदी दृढ बसला आहे. प्रार्थनेत ती तल्लीन होते. आज तर ती परमानंदाने डुलत होती. माझेही लक्ष ते दोन तास धार्मिक विचारातच गुरफटले(ले) असते. गीते म्हणत असता व प्रार्थना ऐकत असता ब-याच वेळा मी श्रद्धाळू होतो. शुद्ध भावाने उपासना करणा-यास पाहून मला फार आनंद होतो. एकंदर त्या जागेत त्या वेळी माझी भावना काही विलक्षणच होते. कल्पनाशक्ती व उच्च मनोवृत्ती ह्या जोराने उचंबळतात. इतर बाबतीप्रमाणे धर्माबाबतीतही केवळ बुद्धीच्या जोरावरच विचरण्याचा माझा पूर्वीचा आग्रह थोडा ढिला पडत चालला आहे व त्यासरशी श्रद्धा बळावत आहे. पण ह्या धांदलीत मनाची शांतता वाढत आहे!”५ प्रार्थनासमाजाच्या उपासनेस उपस्थित राहू लागल्यानंतर विठ्ठलरावांमध्ये झालेला ठळक फरक ह्या तारखेस नोंदला गेला आहे. धर्मबाबतीतही केवळ बुद्धीच्या जोरावर विचरण्याचा त्यांचा पूर्वीचा आग्रह थोडा ढिला पडत चालला व त्याबरोबरच श्रद्धा बळावत चालली हा स्वतःच्या मनोवृत्तीत झालेला फरक विठ्ठलरावांनी येथे नमूद केलेला आहे.
कळसकर यांचे खेड्यातील समाजाच्या तसेच महार, मांग या अस्पृश्य समजल्या जणा-या वर्गाच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न चालले होते ते विठ्ठलरावांच्या नजरेसमोर ठळकपणे होते. आपणही त्या प्रकारचे प्रयत्न करावे ही प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांनीच पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या त्यांच्या मंडळामध्ये चर्चा चालविली होती. विठ्ठलराव, माधवराव हुल्याळ, गोविंदराव सासने आणि केशवराव कानिटकर हे आपण भावी काळात सामाजिक कार्य करण्यासाठी एखादी मंडळी स्थापन करावी ह्यासंबंधी तासचे तास बसून वाटाघाट करू लागले.”६
विठ्ठलरावांचा प्रार्थनासमाजाकडील ओढाही वाढलेला असल्यामुळे ते समाजाच्या एका उत्सवाला रोज जाऊ लागले. तेथे श्री. गणपत भास्कर कोटकर या वृद्ध पेन्शनर गृहस्थाचा दाट परिचय घडला. त्यांच्या प्रेमळपणामुळे व कळकळीमुळे त्यांच्या उपासना विठ्ठलरावांना आवडू लागल्या. अधूनमधून समाजाचे प्रचारक श्री. शिवरामपंत गोखले यांचे अनुभव ऐकायला मिळत असत. त्यांच्या साधेपणाचाच प्रभाव चांगला पडत असे. समाजाचे सेक्रेटरी केशवराव गोडबोले यांचा नियमितपणा व कार्यतत्परता चोख होती. न्यायमूर्ती रानडे व डॉ. भांडारकर यांचाही थोडाफार समागम घडू लागला. विशेषतः डॉ. भांडारकरांचा प्रभाव सर्वात अधिक विठ्ठलरावांच्या मनावर झाला. समाजात गाण्याचा पुढाकार घेणारे वृद्ध पेन्शनर गणपतराव आंजर्लेकर यांची संगत घडू लागली.
प्रार्थनासमाजाच्या ह्या सर्व मंडळींचा आपल्यावर कसा परिणाम झाला हे सांगताना विठ्ठलरावांनी लिहिले आहे, “या सर्व वृद्ध मंडळींनी मला भारून टाकून तारुण्याचा आडमूठपणा, विचारांचा उच्छृंखलपणा व अनुभवाचा हिरवटपणा या भोव-यांतून माझी सुटका करून शुद्ध, उदार धर्माच्या शांत प्रवाहात मला आणून सोडले.”७
उत्सवाच्या शेवटी असणारे प्रीतिभोजन गणपतराव कोटकरांच्या राहत्या घरात झाले. बोटॅनिकल गार्डनजवळ ‘शांतिकुटिर’ नावाची कोटकरांची साधी झोपडी होती. विठ्ठलराव प्रार्थनासमाजाचे सभासद नसताही त्यांना बोलावणे आले. ह्या भोजनात पुणे समाजातील सर्व वृद्ध मंडळी व मुंबई समाजातील सर्व तरुण मंडळी एकत्र जमली होती. फराळ, भजन, प्रार्थना, उपदेश, भोजन, संभाषण आणि सहल वगैरे प्रकार दिवसभर झाले. हे प्रत्यक्ष दृश्य अनुभवून विठ्ठलरावांना वाटले की, ही नुसती एक रविवारची सभा नसून देवाच्या कन्यापुत्रांचे एक शुद्ध कुटुंब आहे. समाजाविषयी त्यांच्या मनात असणा-या आशंका, संशय व तेढ दूर झाली. गणपतराव कोटकर आणि सातारच्या समाजाचे सीतारामपंत जव्हेरे यांच्या सहवासात समाजाचा इतिहास कळला व तत्त्वांचा परिचय घडला.
प्रार्थनासमाजाची आपण दीक्षा घ्यावी अशी विठ्ठलरावांच्या ठिकाणी तीव्र ओढ निर्माण करणारी घटना म्हणजे प्रतापचंद्र मुजूमदार यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या केशवचंद्र सेन यांच्या चरित्राचे त्यांनी केलेले वाचन. हे चरित्र वाचल्यानंतर विठ्ठलरावांची चित्तवृत्ती कमालीची उत्तेजित झाली. विशेषतः या चरित्राच्या अखेरीस जोडलेल्या केशवचंद्रांच्या जीवनवेद या आत्मचरित्राच्या भागाचे वाचन करताना व त्यातील बॅप्टिझम ऑफ फायर(अग्रिस्नान) हे प्रकरण वाचून तर आपण प्रार्थनासमाजाचे केवळ सभासद होऊ नये, तर समाजाला आजन्म वाहून घेणारा प्रचारक व्हावे, अशी अनिवार ओढ विठ्ठलरावांना लागून राहिली.
केशवचंद्र सेन यांच्या जीवनवेद या नावाच्या आत्मचरित्राच्या पहिल्या प्रकरणात आपल्या जीवनात असलेले प्रार्थनेचे महत्त्व त्यांनी विशद केलेले आहे. केशवचंद्रांनी म्हटले आहे, “जीवनरूपी वेदापासून मी घेतलेला पहिला धडा प्रार्थना हा होय. ज्या वेळेला मला कुणाचेच साह्य मिळाले नाही, मी कोणत्याच धर्मसंस्थेचा सदस्य झालो नव्हतो वा कोणत्याच धर्मव्यवस्थेच्या गुणाचा निवाडा केला नव्हता अथवा कोणत्याही धर्मसंस्थेचा स्वीकार केलेला नव्हता, अथवा कुणाही सश्रद्धांच्या अथवा भक्तांच्या जवळ गेलो नव्हतो, अशा त्या आध्यात्मिक आयुष्याच्या पहाटेच्या वेळी माझ्या अंतःकरणामध्ये एकच आवाज घुमला -तो म्हणजे ‘प्रार्थना.’ प्रार्थनेचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे. कारण एके काळी प्रार्थनेशिवाय आपल्याला अन्य कुणाकडून साह्य मिळाले नाही. आपल्याला प्रार्थनेच्या अंती स्फूर्तीच्या रूपात आदेश मिळत गेले. मी कोणता धर्म स्वीकारावा? मी सर्व व्यावहारिक काम सोडून मिशनरी बनावे काय? माझे पत्नीशी संबंध कशा प्रकारचे असावेत? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रार्थनेच्या अंती मिळत राहिली. मला त्या वेळी प्रार्थनेमागील सिद्धान्त असा माहीत नव्हता, परंतु माझी अशी खात्री होती जो कोणी प्रार्थना करतो त्याला प्रतिसाद मिळतो. प्रार्थनेमुळे आपली बुद्धी स्वच्छ झाली. क्रमशः आपण ब्राह्मधर्माचा स्वीकार केला व भक्त, मिशनरी आणि प्रचारक बनलो. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी घडल्या. आपली प्रार्थनेवर श्रद्धा असल्यामुळेच आपल्या आयुष्याला सध्याचा आकार प्राप्त झाला.” अशा प्रकारे प्रार्थनेचे महत्त्व केशवचंद्रांनी आत्मचरित्राच्या पहिल्या प्रकरणात विशद केले आहे. विठ्ठलरावांच्या मनावर याचा परिणाम होणे स्वाभाविक होते. पण अंतिम आणि जोरदार परिणाम झाला तो ह्या जीवनवेदाच्या ‘अग्निस्नान’ ह्या तिस-या प्रकरणाच्या वाचनाचा.
जलस्नानाने विधिसंस्कार करून ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली जाते त्याला ‘बॅप्टिझम’ अथवा ‘बाप्तिस्मा’ असे सांप्रदायिक नाव आहे. केशवचंद्र सेनांनी जलस्नानाच्या ऐवज ‘अग्रिस्नान (Fire of Baptism) असा शब्दप्रयोग करून अग्नी हा शब्द उत्साह या अर्थासाठी वापरला आहे. त्यांनी लिहिले आहे, “मी जेव्हा माझ्या आत्म्याला विचारतो की, जीवनारंभी तुला धर्मदीक्षा कशा प्रकारे दिली गेली, तर माझा आत्मा उत्तरतो, ‘अग्निस्नान घालून.’ मी अग्निधर्माचा पूजक आहे. मी उत्साहसिद्धान्ताचा पक्षपाती आहे. माझी धारणा अशी आहे की, सतत अग्निपरीक्षा होत राहणे, उत्साहपूरित अवस्थेत राहणे म्हणजेच मोक्षाची अवस्था अनुभवणे. हा अग्निसंप्रदाय म्हणजे काय? मला कित्येकांची आयु्ष्ये अशी दिसतात की, त्यांच्यात केवळ थंडपणा असतो आणि अग्नी अगदीच नसतो. तर कित्येक माणसांची आयुष्ये अशी असतात की, त्यांच्यात अग्नी असतो आणि थंडगारपणा अजिबात नसतो. पहिल्या वर्गातील लोक सौम्य, कृतिविन्मुख असतात, जे काय करतील ते डोके थंड ठेवून करणारे असतात. त्यांची गती संथ असते. त्यांच्या शब्दात मनःपूर्वकतेची ऊब नसते आणि त्यांच्या अंतःकरणात उत्साहाचा लवलेश नसतो ह्याच्य विरुद्ध प्रकृतीचे लोक म्हणजे उत्साहरूपी अग्नि असणारे. उत्साहाने परिपूर्ण असणे हा त्यांचा जन्मजात स्वभाव असतो. तो क्षणिक पराक्रमाचा भाग नसतो. हा उत्साहरूपी अग्नि येणारा आणि जाणारा नसतो. धर्माच्या शब्दकोशातील व्याख्याः उष्णता म्हणजे जीवन, ह्या उष्णतेचा अभाव म्हणजे मरण. ज्या वेळेला वैद्याला आढळते की एखाद्या माणसाच्या शरीरातील उष्णता नष्ट होऊन ते थंडगार पडले आहे त्या वेळेला तो सांगतो, ह्या माणसाचा प्राण गेलेला आहे. धर्मजीवनातही तेच खरे आहे. म्हणून याच कारणाने आयुष्याच्या प्राथमिक अवस्थेपासून मी अग्नीचा (उत्साहाचा) पुरस्कर्ता आहे. जेव्हा माझ्यात थंडगारपणा निर्माण झाला आहे की काय अशी शंका येते, त्या वेळेला माझे हद्य भीतीने धडधडायला लागते. मी पापी आहे की नाही हे कळायला वेळ लागेल पण मी जिवंत आहे की मेलो आहे हे कळायला वेळ लागायचे कारण नाही. मी थंड आहे का उबदार आहे यावरून मी ते तात्काळ ठरवू शकतो. मी अग्नीमध्ये राहतो, मी अग्निला कवटाळतो, मी अग्नीला आलिंगन देतो, त्याला उच्च पदवी देतो... जिथे जिथे मला उबदारपणा आढळतो तिथे तिथे आशा, आनंद आणि धैर्य हेही आढळते. माझ्या अंतःकरणाभोवती, माझ्या समाजाभोवती मी सदैव उत्साहाचा अग्नी प्रज्जवलित ठेवला आहे. समाजाच्या एका घटकाची मी सेवा केल्यानंतर, अन्य समाजघटकाची सेवा करण्याची इच्छा माझ्यामध्ये उदभूत होते... मी सदैव नवीनाच्या पाठीमागे धावतो. नव्या गोष्टी, नवा आनंद, नव्या कल्पना यांची मी स्पृहा करतो... हा माझ्यातील गुण समजा की अवगुण, मला नेहमी उबदारपणा आवडतो. कृतिविन्मुख राहणे मला कठीण जाते. समाजापासून दूर जाऊन स्वतःला लपविणे मला केवळ अशक्य असते. मी आपादमस्तक अग्नीने परिपूर्ण आहे. या पद्धतीनेच मी धर्मसाधना केली आहे, धर्मसेवा बजावली आहे. जे थंड असतात ते सामान्यतः भित्रे असतात. पाच-दहा वर्षे काम केल्यानंतर ते पळ काढतात. म्हणून तुमच्यात अजून अग्नी आणि आवेग टिकून आहे की नाही हे लक्षपूर्वक पाहा... तुमच्या मुखातून निराशेचे थंडगार शब्द कधीही न निघोत. तुमच्यामध्ये इतका अग्नी असावयास पाहिजे की तुमच्या बोटांना स्पर्श करताच तो माझ्यामध्ये प्रविष्ट व्हावा.”८
केशवचंद्र सेन यांचे हे विचार आणि मनोवृत्ती विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अंतःकरणाला भिडणारी होती. त्यांचे अंतःकरण भावनाप्रधान व मनोवृत्ती उत्कट होत्या. त्यांच्या ठायी जीवनोत्साहाची ऊर्जा प्रचंड प्रमाणात होती व ती प्रकट होण्यासाठी, कार्यप्रवण होण्यासाठी जणू का वाट शोधत होती. केशवचंद्रांचे हे विचार आणि विठ्ठलरावांच्या ठायी असलेला जीवनोत्साहरूपी ऊर्जा यांचा संयोग होऊन त्यांना आपल्या भावी आयुष्याचे ध्येय स्पष्ट दिसू लागले. उन्नत धर्मकार्य करण्यासाठी आपण प्रार्थनासमाजाच्या कामाला स्वतःला वाहून घ्यावे ही ओढ त्यांना लागून राहिली. त्यांच्या डोक्यात रात्रंदिवस तेच तेच विचार सातत्याने येत राहिले. त्याच त्याच तरूण आणि वृद्ध मंडळींच्या गाठीभेटी घडत राहिल्याने समाजाशिवाय त्यांना सुचेनासे झाले. विठ्ठलराव, डेक्कन कॉलेजातील बी.ए.चे विद्यार्थी नानालाल दलपतरा कवी, न्यू इंग्लिश स्कूलमधील मारवाडी जातीचे पदवीधर तरूण शिक्षक मोती बुलासा, भांडारकरांचे धाकटे चिरंजीव देवदत्त, वासुदेव अनंत सुखटणकर, लक्ष्मणराव ठोसर वगैरे तरुण मंडळी समाजात आडवारी वरचेवर जमू लागली. त्यातच कोटकरांसारखी वृद्ध मंडळी मिळून मिसळून वागू लागली. परिणाम म्हणून ही सर्व तरुण मंडळी समाजाची रीतसर दीक्षा घेऊन सभासद झाली. विठ्ठलरावांनी अशा त-हेने प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. ते रीतसर ब्राह्मसमाजाचे अनुयायी बनले व आयुष्याच्या एका नव्या वळणावर आले.
संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १०९.
२. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. २७.
३. तत्रैव, पृ. २८.
४. तत्रैव, पृ. २८-२९.
५. तत्रैव, पृ. ३८.
६. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ११०.
७. तत्रैव, पृ. १११.
८. P.C. Muzumdar, The Life and Teachinge Keshub Chunder of Sen (3rd
ed.) The Nababidhan Trust, Caicutta, 1931, P. 325-331.