प्रार्थनासमाज

मुंबईचा प्रार्थनासमाज हे बंगालमधील ब्राह्मसमाजाचे भावंड म्हणता येईल. मुंबईच्या प्रार्थनासमाज या संस्थेची स्थापना ३१ मार्च १८६७ रोजी फाल्गुन वद्य एकादशी म्हणजे पापमोचनी एकादशीच्या दिवशी झाली. प्रार्थनासमाज व  ब्राह्मसमाज ह्या संस्था बहुतेक सारखीच तत्त्वे प्रतिपादणा-या आहेत. मुंबई येथे प्रार्थनासमाज स्थापन होण्यामागे कोणती परिस्थिती होती, प्रार्थनासमाजाच्या स्थापनेस ब्राह्मसमाजाचे अस्तित्व काही एका प्रमाणात कारणीभूत झाले का, वगैरे इतिहास थोडक्यात ध्यानात घेऊ.

महाराष्ट्रामध्ये इ. स. १८१८ मध्ये पेशव्यांची सत्ता संपुष्टात येऊन इंग्रजी सतेचा अंमल सुरू झाला. पेशव्यांच्या दरबारात इंग्रजांचा वकील असलेला एल्फिन्स्टन मुंबईचा पहिला गव्हर्नर झाला. इंग्रजी अमलाबरोबर नवीन धर्तीच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला. मुंबई शहराची वस्ती वाढून उद्योगधंदे, व्यापार, सट्टे ह्या सर्वांच्या द्वारे धनाची विपुलता निर्माण झाली. वाढत्या संपत्तीबरोबर वेश्यांचे नाचगाणे व दुर्व्यसनांचे इतर प्रकार सुरू झाले. ख्रिस्ती मिशन-यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच महाराष्ट्रात शिरकाव करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. १८१४ मध्ये त्यांच्या प्रयत्नाला यश आले व मुंबईतील वास्तव्याला सरकारची परवानगी मिळाली. त्यानंतर हळूहळू त्यांनी धर्मविषयक विचाराच्या प्रसृतीला सुरुवात केली. त्यांचे हे काम जोमाने चालले होते. १८५२ साली स्वधर्माचा त्याग करून ख्रिस्ती झालेल्यांची संख्या एक लाख बाराशे पंचविस एवढी झाली. चर्च मिशनरी मंडळी, लंडन मिशनरी मंडळी, वेस्लियन मिशन इत्यादी मिशन-यांच्या संस्थांनी शाळा काढून शिक्षण देण्याचे काम झपाट्याने चालविले होते. या मिशन-यांच्या शाळांमध्ये सुमारे पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त मुले शिक्षण घेऊ लागली होती. इंग्रजी सत्तेमुळे येथे सुरू झालेल्या नव्या शिक्षणाच्या प्रथेबरोबर इंग्रजांच्या संस्कृतीचा, त्यांच्या धर्माचा, त्यांच्या राहाटीचा नव्याने परिचय इंग्रजी शिकलेल्या महाराष्ट्रातील तत्कालीन तरुण पिढीला होऊ लागला. त्यामुळे वास्तवाचे व विचारांचे एक नवे विश्व त्यांच्यासमोर खुले झाले. इंग्रजी संस्कृतीचा आणि विचाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे होऊ लागला, तर मिशन-यांचे आक्रमण अधिक स्पष्ट स्वरूपात घडू लागले. याचा स्वाभाविक परिणाम म्हणून आपला धर्म, आपल्या सामाजिक संस्था आणि आपली जीवनपद्धती याबाबत नवशिक्षित पिढी अंतःर्मुख होऊन विचार करू लागली. रूढ हिंदू धर्मातील अनेक चालीरीतींचा समाजावर कसा अनिष्ट परिणाम होत आहे हे त्यांना जाणवू लागले. मूर्तिपूजेमुळे, जातिभेदामुळे समाजाची अवनत अवस्था झालेली आहे, हेही त्यांना प्रकर्षाने जाणवू लागले. इंग्रजी संस्कृतीकडून मूकपणे घडणा-या व ख्रिस्ती मिशन-यांकडून उघडपणे होणा-या आक्रमणाला तोंड देण्याची, कृतिशील उत्तर देण्याची गरज निर्माण झाली. अशा काळात महाराष्ट्रातील तत्कालीन कर्त्या, जबाबदार पुरुषांनी प्रार्थनासमाजाची स्थापना धार्मिक, सांस्कृतिक आक्रमणाला एक प्रकारे कृतिशील उत्तर देण्याचा प्रयत्न केला असे म्हणणे रास्त ठरेल.

 मिशन-यांचे आक्रमण एका बाजूने सुरू असताना नवशिक्षित मंडळींनी दर्पण, प्रभाकर यांसारखी वृत्तपत्रे, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, गुजराती व मराठी ज्ञानप्रसारक सभा यांसारखे उपक्रम सुरू करून लोकशिक्षणाचे कार्य आरंभिले. त्याचबरोबर समाजातील विचारी वर्ग रूढ धर्मातील दुष्ट व वेडगळ समजुतींमुळे समाजाचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. विशेषतः स्त्रियांवर होणारा अन्याय व जाती-जतींमधील उच्चनीच भाव, सोवळेपणा ह्यामुळे आपल्या समाजचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. हे व या प्रकाचे विचार विशेषतः दादोबा पांडुरंग तर्खडकर, राम बाळकृष्ण जयकर, डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, तुकाराम तात्या पडवळ, बाळा भाऊ शिंत्रे, लक्ष्मणशास्त्री हळबे, भिकोबा लक्ष्मण चव्हाण वगैरे त्या वेळच्या कर्तबगार गृहस्थांच्या मनात घोळत असत. ह्या सुमारास पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा व राम बाळकृष्णांच्या भेटीचा योग मुंबई शहरामध्ये आला. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी, याबद्दलची ईश्वरचंद्राची तळमळ, त्यांची विद्वत्ता व सत्यनिष्ठा यांचा राम बाळकृष्णांच्या मनावर अत्यंत इष्ट परिणाम घडला. पंडित ईश्वरचंद्र हे महर्षी देवेन्द्रनाथांच्या तत्त्वबोधिनी सभेचे सभासद होते. पंडित ईश्वरचंद्र यांचे राम बाळकृष्ण आणि इतर मंडळींसमवेत ब्राह्मसमाजाविषयी बोलणे झाले असण्याची शक्यता आहे. कलकत्त्यातील ब्राह्मसमाजाप्रमाणे मोठी नसली तरी अल्प प्रमाणावर आपण येथे चळवळ सुरू करावी असा निश्चय करून ह्या मंडळींनी राम बाळकृष्णांसमवेत १८४० च्या सुमारास ‘परमहंस मंडळी’ नावाची संस्था स्थापन केली. प्रथमतः ही मंडळी गुप्त होती. प्रकटपणे समाजाला न रूचणा-या गोष्टींसंबंधी चळवळ करण्याला हा काळ अनुकूल नाही असे समजून परमहंस मंडळीचे काम गुप्त ठेवण्यात आले. मूर्तिपूजेचा निषेध, एकेश्वरी मताचा पुरस्कार व जातिभेदाचा उच्छेद हे परमहंस मंडळीचे मुख्य उद्देश होते. जातिभेद मोडल्याची साक्ष म्हणजे पावरोटी सर्वांसमक्ष खाणे. सभेस प्रारंभ होताना व अखेरीस देवाची प्रार्थना म्हणण्याचा प्रघात असे. दादोबा पांडुरंगांनी लिहिलेला हस्तलिखित स्वरूपातील ग्रंथ सभासदांना वाचावयास देत असत. कोणताही एक धर्म ईश्वरद्त्त नाही असे त्यामध्ये विवेचन केले होते. दादोबा पांडुरंग यांनी ‘पारमहंसिक ब्राम्ह्यधर्म’ नावाचे छोटे पद्यमय प्रकरण लिहिले होते व त्यामध्ये ईश्वरभक्ती व भूतद्या, भक्ष्याभक्ष्य विचार इत्यादी बाबींसंबंधी विवेचन केले होते. परमहंस मंडळींच्या शाखा मुंबईच्या बाहेर पुणे, अहमदनगर, सातारा, बेळगाव, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी निघाल्या व एकंदर सभासदसंख्या हजारापर्यंत गेली. परंतु कोणा एका नविन सभासदाने मंडळींचे दप्तर लांबविले. सभासदांची नावे प्रसिद्ध केली व सभेच्या हेतूचा विपर्यास करून टीका केली. ही सभासदमंडळी अमुक एक दिवशी ख्रिस्ती होणार अशी भुमका उठविली. याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये सभासदांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. सभासदांची उपस्थिती रोडावली व हळूहळू परमहंस सभेचे काम बंद झाले.

परमहंस सभा जरी संपुष्टात आली तरी तिच्यामुळे जी जागृती झाली ती नष्ट झाली नाही. परमहंस मंडळीतील काही सभासदांस धर्माचीच अत्यंत आवश्यकता वाटत होती. डॉ. आत्माराम पाडुरंग, भिकोबादादा चव्हाण इत्यादी मंडळी एकमेकांपासून दूर झालेली नव्हती. पुढे कोणत्या मार्गाचा अवलंब करावा याच्याबद्दल विचारविनिमय चाललेला होता. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, ज्ञानप्रसारक सभा, बाँबे असोसिएशन यांच्याद्वारा त्याचप्रमाणे हिंदू रिफॉर्मर, दंभहारक, प्रभाकर, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश इत्यादी वृत्तपत्रांच्या द्वारा व अप्रत्यक्ष रीतीने होत होताच. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, जनार्दन सखाराम गाडगीळ, विष्णुशास्त्री पंडित हे सामाजिक विषयात लक्ष घालून संस्थांच्या द्वारा व लेखलनाद्वारा उपयुक्त कामगिरी बजावित होते. १८६३ मध्ये इंदुप्रकाश निघाल्यापासून सामाजिक सुधारणेस अनुकूल असे धडाडीचे लेख प्रसिद्ध होत. अशा प्रकारे लोकजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू झाले होते. पंचवीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत सर्वांगीण सुधारणेला अनुकूल अशा प्रकारचे वातावरण निर्माण होऊ लागले.
 
मात्र १८६४ मध्ये आर्थिक आघाडीवर मुंबईत वेगळेच चित्र दिसू लागले होते. शेअर्सच्या सट्टेबाजीत हजारो लोक धनवान बनले. पैशाशिवाय अन्य गोष्टींकडे लक्ष देण्याची कुणाच्या ठिकाणी वासना राहिली नव्हती. अशा वेळी ब्राह्मधर्माचे प्रभावी प्रचारक ब्रह्मानंद केशवचंद्र सेन मुंबई व्याख्याने देण्यासाठी आले होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, अमोघ वक्तृत्व, उदार विचार आणि अंतःकरणास भिडावे अशा प्रकारचे उद्गार या कशाचाही परिणाम संपत्तीने उद्दाम बनलेल्या मुंबईकरांवर झाला नाही. मात्र पुढच्याच वर्षी म्हणजे १८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापा-यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला. फाल्गुन वद्य एकादशी, शके १८७८ रविवार दिनांक ३१ मार्च १८६७ रोजी ईश्वरोपासनेस प्रारंभ झाला. समाज स्थापण्याच्या वेळी उद्देश व मूलतत्त्वे निश्चित करण्यात आली. देव एकच व निराकार आहे; त्याचे मानसिक भजन, पूजन करणे योग्य व आपले कर्तव्य आहे; मूर्तिपूजा हा असन्मार्ग असून देवास अपमानकारक आणि मनुष्यास नीचत्व आणणारा व दुराचरणाप्रत नेणारा आहे, तेव्हा हा असन्मार्ग सुटून सन्मार्गात लोकांची प्रवृत्ती व्हावी हा या समाजाचा उद्देश आहे असे स्पष्ट करण्यात आले. त्याशिवाय मूलतत्त्वामध्ये मूर्तिपूजेवर माझी श्रद्धा नाही असे स्पष्ट कलम घातले. समाजाचा सभासद होणा-यांस ही तत्त्वे मान्य असावी लागत. शिवाय त्याला पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा करावी लागे. “मी प्रत्यही परमेश्वराचे चिंतन करीत जाईन. सत्कर्मे आचरावयास व असत्कर्मापासून दूर रहावयास मी यत्न करीन. स्वभावदोषाने काही वाईट कर्म मजकडून घडल्यास त्याविषयी पश्चाताप व्हावा एतदर्थ परमेश्वरापाशी प्रार्थना करीन. हे परमेश्वर, ह्या प्रतिज्ञा पाळण्याचे सामर्थ्य मला दे.”

संस्थेची स्थापना होतेवेळी प्रार्थनासमाज हे नाव दिले गेले नव्हते. ऑक्टोबर १८६७ मध्ये टीकेला उत्तर देताना समाजाच्या एका सभासदाने ह्या मंडळीचे नाव प्रार्थनासमाज आहे असे स्पष्ट विधान केले.

प्रार्थनासमाजाने स्थापनेच्या वेळी ब्राह्मसमाजाचा नमुना डोळ्यांसमोर ठेवला होता ही गोष्ट खरी असली तरी मुंबईच्या मंडळींनी आपले स्वतःचे स्वत्त्व कायम ठेवून तत्त्वांची रचना केली होती असे दिसते. खुद्द देवेंद्रनाथ हे स्वतः जरी मूर्तिपूजेच्या जोरदार विरोधात असले तरी आदि ब्राह्मसमाजाच्या तत्वामध्ये प्रतिमापूजनासंबंधाने जोरदार विरोध दिसत नाही. देवेंद्रनाथांच्या काळातच ब्राह्ममंदिरातील वेदीच्या पाठीमागे जाऊन केला जाणारा वेदमंत्राचा घोष, ट्रस्टडीडशी विसंगत ठरणारा अवतारवादाला अनुकूल असा उपदेशकांकडून प्रकट होणारा विचार हा अनुभव घेतल्यानंतर १८४४ मध्ये महर्षी देवेंद्रनाथांनी प्रतिमापूजनाचा आपण त्याग करीत आहोत अशी इतर वीस अनुयायांसह प्रतिज्ञा घेतली व जे प्रतिमापूजनाच्या विरोधात आहे्त तेच खरे ब्राह्म असे जाहीर केले. बंगालमधील हा अनुभव ध्यानात घेऊन मुंबई प्रार्थनासमाजाने प्रारंभिक काळात मूर्तिपूजेसंबंधी ही कठोर भूमिका अंगीकारली असावी.

३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थनासमाजाची स्थापना झाल्यानंतर त्यासंबंधीची बातमी ख्रिस्ती धर्ममताच्या ज्ञानोद्य ह्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. प्रतिमापूजन निषिद्ध मानून परमेश्वराची भक्ती करणा-या मंडळींकडे ख्रिस्ती लोक अपेक्षेने बघत असत. हे लोक पुढे-मागे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील अशी त्यांना आशा वाटत असे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ख्रिस्ती मंडळींना आत्मीयता वाटत असे. मुंबई प्रार्थनासमाजाचे पहिले आचार्य अशी मान्यता असलेले श्री. भिकोबादादा चव्हाण हे मोठे ईश्वरनिष्ठ व प्रगल्भ मनोवृत्तीचे गृहस्थ होते. २ जून १८६७ रोजी बघितलेल्या उपासनेचे वर्णन ज्ञानोद्याचे संपादक शाहूराव कुकडे यांनी केले आहे. डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या कांदेवाडीतील माडीवरील दिवाणखान्यात शंभराहून जास्त मंडळी जमली असल्याचा त्यांनी निर्देश केला. त्यांनी म्हटले, “आम्ही गेलो तेव्हा रा. भिकाजी लक्ष्मण म्हणून एक भंडारी मनुष्य सिंहासनावर उभा राहून ईश्वराची प्रार्थना कशी करावी व प्रार्थना करणा-यांनी कसे वर्तावे या विषयावर एक निबंध वाचीत होता... हे काम चालविण्याकरिता ह्या मंडळींसारखा कोणी विद्वान, सुधारलेला, वजनदार मनुष्य नेमावा... कुणी योग्य मनुष्य मिळेपर्यंत पूर्वोक्त भंडारी मनुष्य त्यांनी उभा केला आहे हे बरे केले. पण तो असल्या मंडळींत शोभत नाही व लायक नाही... जो व्याख्याने देतो तोही पोशाख, भाषण वगैरे गोष्टींनी संभावित असला पाहिजे.”१ भिकोबादादा चव्हाण हे ‘मनी स्कुला’त मराठी शिक्षकाचे काम करीत असत. त्यांचा प्रेमळ स्वभाव, उत्कट ईश्वरनिष्ठा, सरळ वृत्ती ह्यांची माहिती नसल्यामुळे व भंडारी लोक वापरीत तसे मोठे पागोटे, अंगरखा व धोतर असा पोशाख पाहून त्यांच्यासंबंधी ज्ञानोद्यकारांनी अशा प्रकारचे अप्रस्तुत गैर उद्गार काढले.

आपल्या मतानुसार ईश्वरावर किती आत्यंतिक स्वरूपाची निष्ठा असू शकते याचे उदाहरण म्हणून भिकोबादादा चव्हाणांकडे निर्देश करता येऊ शकेल. दीनानाथ माडगावकर यांनी भिकोबादादांच्या आय़ुष्यातील एका प्रसंगाचे वर्णन केले आहे. उतरवयामध्ये भिकोबादादांची ‘मनी स्कुला’तील मराठी शिक्षकाची नोकरी संपली होती. त्यांना मिळणारे अल्पस्वल्प वेतन थांबले होते. अशा अवस्थेत त्यांच्या एकुलत्या एक साठ-सत्तर रुपये कमविणा-या पस्तीस-छत्तीस वर्षांच्या मुलास देवाज्ञा झाली. त्या मुलाला पत्नी व दोन मुले होती. अशा विपन्नावस्थेत संसार चालविण्याचा भार भिकोबादादांवर येऊन पडला. भिकोबादादांच्या मुलाच्या निधनाचे वृत्त ऐकून प्रार्थनासमाजातील लहानथोर मंडळी त्यांना भेटून सांत्वन करण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरी गेली. त्याप्रसंगी कोमल अंतःकरणाच्या एकदोन सभासदांना तर भिकोबादादांना बघितल्यावर रडे कोसळले. आपल्या भेटीस आलेल्या मित्रांची स्थिती पाहून भिकोबादादा काही वेळपर्यंत तो दुःखाच उमाळा शांत होईल म्हणून त्या मित्राकडे टक लावून पहात राहिले. शेवटी म्हणाले, “हे तुम्ही काय आरंभिले आहे? हा तुमच्या अश्रूंचा लोट मजवर हा दुर्घट प्रसंग गुदरला याबद्दल आपणास अतिशय दुःख होत आहे त्याची साक्ष आहे आणि देवाने ह्या दुःखात मला घालू नये होते असे आपणास वाटले, याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे असा माझा समज झाला आहे. तो चुकीचा नसेल तर आपल्या ह्या मनोवृत्तीबद्दल मला फार वाईट वाटते. परमेश्वर मायबाप आहे. तो कृपासागर, करुणानिधान असून न्यायी आहे असे मानणारे व तोंडातून उद्गार काढणारे तरी आपण सर्व आहोत. मग असे परमेश्वराविषयी मनात येणे अथवा त्यास मनात थोडीही जागा देणे किती अनुचित आहे याचा तुम्हीच विचार करा. हा प्रसंग मजवर येणे योग्य नाही असे म्हणणे करूणामय देवावर क्रूरतेचे व अन्यायाचे दोषारोपण करणे होय आणि श्रद्धाळू मनुष्यास हे बोलणे तर काय पण असा विचार मनात येऊ देणेही शोभत नाही. हा प्रसंग दुःसह तर खराच आणि परमेश्वर कृपेने तो कुणावर न येवो पण तो ओढवल्यापासून देवांनी कृपा करून एकाच परंतु सुशील, आज्ञाधारक व माझे कधीच मन दुखविण्यासाठी निरंतर झटणा-या अशा मुलाची देणगी दिली आणि माझे अनेक ज्ञाताज्ञात अपराध पोटी घालून तो मुलगा एवढा मोठा होईपर्यंत माझ्या अंगी पात्रता येईल म्हणून वाट पाहिली; अखेरीस मी तिला अपात्रच ठरलो आणि तो परत घेऊन गेला; अशीच माझी खात्री झाली आहे. आपण मनसोक्त वागावे आणि देवास दूषण द्यावे यात काय अर्थ?”

भिकोबादादांचे उपदेश अत्यंत कळकळीचे व त्यांची निष्ठा आणि भक्ती प्रकट करणारे असत. प्रार्थनासमाजाच्या तिस-या वार्षिकोत्सवात त्यांनी पुढीलप्रमाणे उपदेश केलाः “आता आमच्या प्रार्थनासमाजस्थ बंधूच्या सेवेत सादर होतो. सज्जनहो! आपण सदविवेकाने आपल्या कर्तव्यापैकी हे सत्कार्य निवडिले हे चांगले केले. आपण प्रति सप्तकास सायंकाळी नेमलेल्या स्थानी एकत्र जमून पाळीपाळीने श्रीपरमेश्वराची प्रार्थना करून गीत व बोधपर विषय वाचितो, हे चांगले आहे. परंतु इतकेच करून हे सत्र सांग होते काय? आमचे ठायी जगदीश्वर प्रभूची सेवा करण्याचा अधिकार आला आहे काय? आपण दुर्गुण टाकून दिले काय? आपल्या कुटुंबात एकाच परमेश्वरास भजण्याचा सोपा क्रम तरी चालू केला काय? आपल्या बंधूजनांशी विश्वास, प्रीती, नम्रता इत्यादी सद्गुण धरून चालतो काय? परस्परांचे उपयोगी पडतो काय? दु:खितांचा समाचार घेतो काय? परमार्थाकरिता लोकनिंदा, छळ, अर्थहानी इत्यादी सोसायास सिद्ध झालो काय? देवांची नावे दीलेल्या मूर्ती पदार्थसंग्रहालयाच्या देव्हा-यात ठेवण्याची तयारी आहोत काय? हे जर नाही तर आपण एकाच परमेश्वराची भक्ती करतो ती कशी? चांगल्या गोष्टीविषयी मनात उत्कंठा नसता बाह्यात्कारी मात्र लोकांस  दाखविण्याकरिता जर प्रार्थना करीत असलो तर ती प्रार्थना नव्हे, ते ढोंग समजावे. आपण असमर्थ जाणून नम्रभावाने अंतःकरणापासून श्रीपरमेश्वरापाशी जे मागणे करावे तिला प्रार्थना म्हणतात... सत्कर्माची इच्छा धरणे ही एक मानसिक प्रार्थनाच आहे. ती केल्यावत मग दुसरी कोणती तोंडची प्रार्थना न केली तरी चालेल. परंतु त्यातूनही जे कोणी सदाचार न टाकिता आपला स्वधर्म बजावण्याचा प्रयत्न करतेवेळेस मानसिक व वाचिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रार्थना करितात ते सज्जन पुरूष या लोकी धन्य होत.” या प्रकारे उन्नत विचार भिकोबादादा आपल्या उपदेशातून प्रकट करीत असत. प्रार्थनासमाजातील त्या वेळच्या सुशिक्षित मंडळींनी भिकोबादादा चव्हाणांना आचार्यपदातचा मान दिला तो रास्तच म्हणावा लागेल. केवळ त्यांच्या पोशाखाकडे पाहून व त्यांच्या जातीचा विचार करून ज्ञानोद्यकारांनी त्यांना दिलेला कमीपणा सर्वस्वी अनाठायी म्हणावा लागेल.

प्रार्थनासमाजाची प्रारंभिक काळात घडण करणारे व समाजाची सेवा एकनिष्ठपणे करणारे प्रार्थनासमाजाचे दोन अध्वर्यू डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर व न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होत. हे दोघेही प्रार्थनासमाजाची स्थापना झाली त्या वेळी मुंबईमध्ये नव्हते. डॉ. भांडारकर कामानिमित्त बाहेरगावी गेले होते व १८६८ मध्ये न्यायमूर्ती रानडे बदली होऊन मुंबईमध्ये आले. हे दोघे मुंबईस एकत्र आल्यावर व सर्व मंडळींशी निकटचा संबंध येताच त्यांच्या ध्यानात असे आले की, प्रार्थनासमाजाची तत्त्वे असावी तितकी उदार, स्पष्ट व व्यापक नाहीत व त्यासंबंधी अधिक खुलासा होण्याची जरुरी आहे. रानडे व भांडारकर यांना आपल्या ध्येयाची चिकित्सा ज्यात केली आहे असा काहीतरी लेख असावा असे वाटू लागले व न्यायमूर्ती रानडे यांनी ह्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन ए थीइस्टस् कन्फेशन ऑफ फेथ म्हणजेच एकेश्वरनिष्ठाची कैफियत अथवा साधकाचा विश्वास हा लेख इंग्रजीत लिहून हिंदू रिफॉर्मर या वृत्तपत्रात प्रसिद्ध केला. रानडे यांच्या ह्या लेखामध्ये प्रार्थनासमाजास मान्य असणा-या धार्मिक कल्पनांचे ३९ कलमात विवेचन केले आहे. रानडे यांनी मांडलेल्या या ३९ कलमांचे एक प्रकारे सार काढून १८७३ साली डॉ. भांडारकर यांनी सहा तत्त्वे मांडली.२ प्रार्थनासमाजाची ही सहा मूलतत्तवे अशी :

१.    परमेश्वराने हे ब्रह्मांड निर्माण केले आहे. तोच खरा देव. तो एकच नित्य, अनंत, निराकार, आनंदमय आहे.
२.    केवळ त्याच्याच उपासनेने इहपरलोकी शुभ प्राप्त होते.
३.    त्याच्या ठिकाणी पूज्यत्वबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजनपूजन करणे, त्यास प्रिय अशी कृत्ये करणे हीच खरी उपासना.
४.    प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे.
५.    परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही एकग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही.
६.    सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून भेद न राखिता परस्परांविषयी बंधुभावाने वागावे. हे ईश्वरास प्रिय आणि मनुष्याचे कर्तव्य आहे.
 
रानडे यांच्या साधकाचा विश्वास या निबंधात प्रार्थनासमाजाची भूमिकाही मांडली गेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या धर्मकल्पनेचे पैलूही त्यामध्ये प्रकट होतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या बाबी अशा : प्रार्थनासमाजाची मूलभूत धारणा व श्रद्धा अशी आहे की, मानवी स्वभावात धार्मिक किंवा आध्यात्मिक अंश असतो. जीवात्म्याला धर्मवासना व धर्मइंद्रिये आहेत व ईश्वराच्या मार्गाकडे त्याची प्रवृत्ती होत असते. या धर्मवृत्तीच्या अस्तित्वाला आधार म्हणून सर्व देशांत व सर्व काळांत मनुष्याच्या सर्व जातींत ईश्वराच्या आराधनेचा प्रघात चालू आहे, या वस्तुस्थितीचा निबंधात उल्लेख केला आहे. धर्माचे जे प्रश्न, दिशा व काळ इत्यादी संबंधविहीन वस्तूविषयी असतात, त्यांचा निर्णय गोऊ शकत नाही. ही बुद्धीची मर्यादा त्यांनी मान्य केली आहे. मनुष्य अशा प्रश्नांबाबत स्वतःच्या मनातल्या विश्वासाचाच आधार घेत असतो. ईश्वराचे ठायी भक्ती व मनुष्यामात्रावर प्रेम ह्या दोन्हींचा उगम माणसाच्या स्वभावात आहे. आपण दीन, पराधीन आहोत असे वाटते याचा रूढ अर्थ ईश्वर सर्व शक्तीमान आहे या कल्पनेत असतो. ईश्वर व जड जगत् यांच्या परस्परसंबंधाचे यथावत स्वरूप साधकाला कळू शकत नाही. जीवन हे चैतन्यरूप आहे, त्याला पृथक अस्तित्व आहे असा साधकाचा विश्वास असतो म्हणूनच तो ईश्वरापासून स्वतःला वेगळे मानून त्याची भक्ती करू शकतो. मनुष्यप्राणी जन्मतःच पापी जन्मतो (व अगदी पहिल्या जोडप्याच्या पापाचे हे फळ आहे) हे ख्रिस्ती तत्त्व मान्य नसल्याने रानड्यांनी नमूद केले आहे. कारण असे मानणे परमेश्वराच्या न्यायीपणास शोभणारे नाही. एका कलमामध्ये रानड्यांनी आपल्य अंतःकरणाच्या उन्नतीसाठी परमेश्वराला प्रार्थनेच्या व्दारा शरण जाणे हे आवश्यक असल्याचे नोंदविले आहे. प्रर्थनासमाजाचे हे मूलभूत तत्त्वच आहे. परमेश्वर अवतार घेतो ही कल्पना साधकाला मान्य नसल्याचे एका कलमामध्ये नमूद केले आहे. प्रर्थनासमाजाने मान्य केलेल्या सहा तत्त्वांचे एक प्रकारे स्पष्टीकरण ‘साधकाचा विश्वास’ या लेखातील ३९ कलमांमध्ये पाहावयास मिळते. म्हणजे प्रार्थनासमाजाची जी धार्मिक, आध्यात्मिक बैठक आहे तिचा पाया तयार करण्याचे काम डॉ. भांडारकर व रानडे या दोघांनी केले असे म्हणणे यथायोग्य ठरेल.

प्रार्थनासमाजाची तत्त्वे केवळ पुरुषांनी स्वीकारली तर ते पुरेसे होत नाही. प्रार्थनासमाजास मान्य असणारी धर्मतत्त्वे कुटुंबातील पुरुषांप्रमाणे स्त्रियांसही मान्य झाली तर प्रतिमापूजनाचा त्याग वगैरेसारख्या बाबींचे आचरण घडणे शक्य आहे ही जाणीव डॉ. आत्माराम पांडुरंग, मामा परमानंद, प्रो, रामकृष्णपंत भांडारकर, वासुदेवराव नवरंगे वगैरे मंडळींच्या मनात येऊन विचारविनिमय करण्यासाठी २० जुलै १८७३ रोजी सभासदांच्या सर्वसाधारण सभेत विचारविनिमय होऊन सर्व सभासदांनी घरातील मनुष्ये येतील तर त्यांस बरोबर घेऊन ईश्वरोपासना करण्याचा प्रघात सुरू करावा असे ठरले. परंतु ह्या उपक्रमाला फारसे यश मिळाले नाही. एवढेच काशाला न्यायमूर्ती रानडे यांनी स्वतःच्या पत्नीला शिक्षण दिले असले  व त्यांच्यामागे रमाबाईंनी थोर कार्य केले असले तरी “रानड्यांनीही ब्राह्मधर्माच्या अनुष्ठानासंबंधाने करारीपणा दाखविला नाही.”३

मुंबई प्रार्थनासमाजाने धर्मविषयक कार्याची तसेच परोपकारी कामाची व्याप्ती वाढविण्याच्या हेतूने प्रार्थनासमाजाच्या अंतर्गत अथवा संलग्न स्वरूपात संस्था स्थापन करून विविध उपक्रम सुरू केले.

मुंबई येथील एकेश्वर उपासक मंडळी
बाबू केशवचंद्र सेन यांचे सहकारी व ब्राह्मधर्माचे प्रभावी प्रचारक बाबू प्रतापचंद्र मुजुमदार हे १८७२ मध्ये मुंबईस आले व सहा महिने तेथे वास्तव्य करून त्यांनी मुंबई प्रार्थनासमाजाच्या कार्याला चालना देण्याचे काम केले. तोपर्यंत प्रार्थनासमाजाच्या साप्ताहिक उपासनेपलीकडे काही काम होत नव्हते व उपासनेसही बाहेरची जी मंडळी येत ती दर वेळी वेगळीच असत. प्रार्थनासमाजाच्या कार्याला अधिक लोकांची सहानुभूती मिळावी, समाजाची मंडळी व बाहेरची मंडळी वारंवार एकत्र येऊन त्यांच्यात विचारविनिमय व्हावा व काही नवीन कार्ये दोघांनी मिळून हाती घ्यावीत या उद्देशाने बाबू प्रतापचंद्र मुजुमदार यांच्या खटपटीने १८७२ साली ‘बॉंम्बे थीइस्टिक असोसिएशन’ अथवा ‘मुंबईची एकेश्वर उपासक मंडळी’ ह्या संस्थेची स्थापना झाली. प्रार्थनासमाजाचे सर्व सभासद या मंडळीचे सभासद असत व बाहेरच्या मंडळींना आवर्जून सभासद करण्याचा प्रयत्न असे. उत्सवाच्या वेळी स्त्रियांना मुद्दाम पाचारण करून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने या मंडळींच्या वतीने आयोजित केली जात. सुबोधपत्रिका, रात्रीच्या शाळा आणि ‘चीप् लिटरेचर सोसायटी’ ही कामे ह्या संस्थेच्या वतीने सुरू झाली. १८७७ सालच्या दुष्काळाच्या वेळी ह्या संस्थेने सात-आठ हजार रूपये फंड जमविण्याचे मोठेच काम केले. परंतु सात-आठ वर्षांनंतर संस्थेच्या कामात शिथिलता येऊन ती मृतप्राय झाली. शेवटी १८९९ मध्ये ही संस्था एक ठराव करून बंद-करण्यात आली व रात्रीच्या शाळा व सुबोधपत्रिका ह्या दोन कार्याची जबाबदारी सर्व प्रकारे समाजाकडे आली. प्रार्थनासमाजाने स्वतःची जागा घेऊन १८७४ मध्ये एकंदर सव्वीस हजार रूपये खर्च करून प्रार्थनासमाज मंदिराची इमारत उभी केली.
 
रात्रीच्या शाळा
थीइस्टिक असोसिएशनच्या वतीने रात्रीच्या शाळा काढण्याचे ठरले तेव्हा प्रार्थनासमाजाचे आद्य पुरस्कर्ते व प्रथम आचार्य भिकोबा लक्ष्मण चव्हाण ह्यांनी भानू केशव गांगनाईक यांना मदतीस घेऊन १८७६ मध्ये पहिली रात्रीची शाळा चेऊलवाडी येथे उघडली. त्यानंतर १८८६ पर्यंत गिरगाव, गावदेवी, खेतवाडी व भायखळा येथे शाळा उघडण्यात आल्या. ह्या शाळा म्युनिसिपल शाळांच्या इमारतीत भरत असत व म्युनिसिपालिटी त्याचे भाडे घेत नसे. असोसिएशनच्या वतीने १८९० साली महार, चांभार वगैरे अस्पृश्य समजल्या
जाणा-या लोकांकरिता मदनपु-यामध्ये एक स्वतंत्र शाळा स्थापण्यात आली. श्री. बाबण बापू कोरगावकर हे म्युनिसिपालिटीमध्ये अधिकारी होते. म्युनिसिपालिटीत काम करणारे एक शिक्षक त्यांच्याजवळ बढती मागत होते तेव्हा कोरगावकरांनी त्यांना सुचविले की, तुम्ही अस्पुश्यवर्गातील विदयार्थी जमवून एक स्वतंत्र शाळा चालवून दाखवा, म्हणजे तुम्हाला अधिक पगार मिळू लागेल. ह्या गृहस्थाने मुले जमविली व शाळाही चालविण्याचे कबूल केले. मात्र आपल्या नावाचा बोभाटा करू नये अशी अट घातली. समाजाचे उपाध्यक्ष शेट दामोदरदास सुखडवाला ह्यांनी ह्या शाळेचा एक वर्षाचा खर्च देऊ केला व त-हेने अस्पृश्यवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा उघडली गेली. अस्पृश्यतेची जाणीव ह्या काळात किती तीव्र होती ह्याची निदर्शक घटना ह्या शाळेच्या संदर्भातच घडली. समाजाच्या वार्षिक उत्सवामध्ये रात्रीच्या शाळेतील मुलांस एकत्र करून उपदेश केल्यानंतर त्यांना मिठाई वाटण्याचा उपक्रम काही वर्षे चालू होता. १८९० मध्ये अस्पृश्य मुलांकरिता मदनपु-यात शाळा उघडल्यानंतर कार्यक्रमाच्या वेळी इतर शाळांतील मुले एकत्र केल्यावर अस्पृश्य मुलांना वेदीच्या उजव्या बाजूस बसविले. स्पृश्य विद्यार्थ्यांत प्रथम थोडी कुजबूज सुरू झाली. नंतर इतर विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा अस्पृश्य मुलांना मिठाई वाटण्यात आली तेव्हा काही स्पृश्य विद्यार्थ्यांनी मिठाई घेतली नाही व काहींनी घेतलेली फेकून दिली. १८९९ च्या ऑक्टोबर महिन्यात थीइस्टिक असोसिएशन बंद झाल्यावर शाळांची सर्व व्यवस्था समाजाकडे आली व समाजाने श्री. वामन सदाशिव सोहोनी यांना १९०० सालापासून सन्मान्य सुपरिटेंडेंट नेमले. सोहोनी हे अल्प वेतनावर एक इन्स्पेक्टर नेमून शाळांची व्यवस्था बघत असत. १८९९ व १९०० मध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे मुंबईस कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी राहिले असता त्यांनी या रात्रीच्या शाळांची तपासणी केल्याचा वृत्तान्त सुबोधपत्रिकेमध्ये पाहावयास मिळतो. सोहोनीनंतर श्री. विष्णू बल्लाळ वेलणकर हे रात्रीच्या शाळांचे काम पाहत असत. समाजाने चालविलेल्या रात्रीच्या शाळांतून ब्राह्मण, मराठा, भंडारी, लोहार, वाणी, ख्रिस्ती, कोळी, अस्पृश्य समजले जाणारे, मुसलमान असे अनेक जातींचे व धर्मांचे विद्यार्थी शिकत असत. दिवसा विविध प्रकारची कष्टाची कामे करणारे लोक ह्या शाळांतून शिक्षण घेत असत. ह्या शाळांमुळे कष्टकरी लोकांची फारच सोय झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस समाजाच्या वतीने अशा सहा शाळा चालविल्या जात होत्या.
   
साप्ताहिक ईश्वरोपासना
प्रार्थनासमाजाच्या स्थापनेपासून अखंडपणे चाललेले कार्य म्हणजे मंदिरातील साप्ताहिक उपासना होय. आठवड्यातून एकदा तरी ईश्वरोपासना झाली पाहिजे असा प्रार्थनासमाजाचा नेम आहे. उपासनेमागील भूमिका अशी मानली गेली आहेः “देव सर्वसमर्थ आहे. त्याच्यावर आपण अवलंबून आहोत. तो आमचा कल्याणकर्ता असा विश्वास उत्पन्न होऊन त्याजविषयी प्रेम आणि पूज्यत्वबुद्धी अंतःकरणात सहज उदित होतात. मग प्रेमाचा विषय जो आपला कल्याणकर्ता त्याच्या सन्निध जावे, पूज्यबुद्धी ज्याविषयी आहे त्याजपुढे आपला आत्मा अत्यंत नम्र करावा असे भाव अंतःकरणात उत्पन्न होऊन मनुष्य देवाचे भजन, पूजन करावयास लागतो.”४ प्रार्थनासमाजाने शुद्ध भजनपूजनाचा मार्ग प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला असता तो ख्रिश्चन धर्माचे अनुकरण करतो अशा प्रकारचा आक्षेप घेण्यात येत असे. यासारखा आक्षेप कसा अनाठायी आहे. हे डॉ. भांडारकरांनी रास्तपणे दाखवून दिले आहे विद्येचा प्रभाव आणि मिल-स्पेन्सर इत्यादी ग्रंथकारांच्या ग्रंथांचे अध्ययन यामुळे फैलावणारा अज्ञेयवाद आणि नास्तिकता याला प्रतिबंध करण्याचे व सद्वृत्ती, धर्मभावना आणि सदाचार वाढीस लावण्या काम प्रार्थनासमाजाने केले आहे असे त्यांनी प्रतिपादले आहे.५

सामाजिक उपासनेचेही महत्त्व प्रार्थनासमाजाने मानले आहे. व्यक्तिगत उपासनेत केवळ स्वतःच्याच आध्यात्मिक उन्नतीचा विचार होतो. मात्र सर्वांनी एक आकांक्षा मनात धरून एकत्र होणे, सर्वांच्या कल्याणाची दिशा एक आहे असा जागृत भाव मनात असणे, ह्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर अत्यंत इष्ट असा परिणाम होतो. अशा प्रकारे एक ध्येय असणारी माणसे जितकी वारंवार एकत्र होतील व एकमेकांच्या विचारांचा व संगतीचा परस्परांवर परिणाम करतील तितके ते इष्ट आहे हे जाणून सामाजिक उपासनेस महत्त्व प्राप्त झाले. भजन, प्रार्थनेच्या वेळी परमेश्वराचे स्वरूप आविर्भूत व्हावे आणि सर्वत्र परमेश्वर दिसून वृत्ती तन्मय व्हावी, ध्यान करीत  असता परमेश्वरच हृद्यापुढे स्फुरावा आणि चंचल मनास स्थिर करून परमेश्वराच्या ठायी दृढतेने संलग्न करण्याचा दुसरा उपाय सतसंगती करणे हा आहे हे ध्यानात वागवूनही सामाजिक उपासनेस महत्त्व प्राप्त झाले.६

प्रार्थना मंदिरात होणा-या सामाजिक उपासनेचे सहा भाग असतात. १. उद्बोधन, २. स्तवन व कृतज्ञतादर्शन, ३. ध्यान व प्रार्थना, ४. उपदेश, ५. प्रार्थना, ६. आरती.

उपातकाने जमलेल्या सर्व मंडळींची वृत्ती उपासनेला सन्मुख करण्यासाठी करावयाचे प्रास्ताविक भाषण म्हणजे उद्बोधन. उद्बोधनानंतर देवाचे वैभव, पावित्र्य, तेज, सामर्थ्य, प्रेम इत्यादी गुणांची स्तुती करणे म्हणजे स्तवन होय. ह्या गुणांचे स्तवन करण्याच्या पाठीमागे हे गुण अल्पांशाने का होईना आपल्यामध्ये असावेत अशी गर्भित इच्छा धरणे. व्यवहारातसुद्धा आपण आपल्यावर उपकार करणा-या व्यक्तीबद्दल कृतज्ञता प्रकट करीत असतो तर मग ज्याने आपल्यास ह्या सुंदर सृष्टीमध्ये निर्माण केले आणि आम्हांस सुखाची व उन्नतीची साधने सतत देऊन जो एकसारखे आम्हांवर कृपाछत्र धरत आहे; रात्रंदिवस आपल्यावर जो प्रेमाचा, दयेचा वर्षाव करीत आहे त्या जगदीश्वराबद्दल कृतज्ञता बुद्धी दखविणे सर्वथैव आवश्यक व आपल्या मनुष्यपणास धरून आहे. या कृतज्ञताबुद्धीच्या योगाने देवाविषयी आपले प्रेम वाढून त्यास अप्रिय अशी गोष्ट न करण्याविषयी आपली वृत्ती सफल होऊन आपले अंतःकरण उन्नत होते. कृतज्ञतादर्शन हा स्तवनाच्या अंतर्गत भाग होय.

स्तवन झाल्यानंतर काही वेळ स्तब्ध राहून परमेश्वराचे ध्यानानंतर परमेश्वराची प्रार्थना करावी असा भाग उपासनेत असतो. प्रार्थनेचा मधे व अंती समावेश केला आहे याचे कारण प्रार्थना जर केवळ अखेरीसच ठेवली तर ती एखाद्या वेळी उपासकांकडून राहून जाण्याची शक्यता असते. असे घडू नये यासाठी ही योजना आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थनेचे महत्त्व उत्तम रीतीने विशद केले आहे. परमेश्वर संपुर्णपणे ज्ञानगम्य आहे हे मत त्यांनी पूर्णपणे पत्करल्यासारखे वाटत नाही आणि ते खरे आहे असे गृहीत धरले तर त्यांचे म्हणणे असे, “केवळ ज्ञानविषय जे ब्रह्म ते कळले म्हणजे आपल्या हृदयाचे पूर्ण समाधान होईल असे नाही. कारण ज्ञान संपादन करण्याची इच्छा व बुद्धी यांचा आपण जी कृत्ये करतो त्यांच्याशी किती संबंध असतो हे तपासून पाहिले, तर जिज्ञासा व बुद्धी ह्यांच्या तृप्तीने मनास शांती होत नाही असे आढळेल. परमेश्वर-प्राप्त्यर्थ भक्ती होण्यापूर्वी त्याच्या स्वरूपाचे आपल्या शक्तीप्रमाणे ज्ञान झाले पाहिजे हे जरी खरे आहे, तरी ते ज्ञान केवळ बुद्धीने प्राप्त होणारे नाही. कारण परमेश्वर हृदयगम्य किंवा हृदयांतर्गत ज्या वृत्ती त्यांनाच गम्य आहे, यात संशय नाही. वृत्तीवर बहुधा आपले आचरण अवलंबून असते, म्हणून वृत्तींचे अथवा हृदयाचे खरे समाधान होईल व त्यास चांगले वळण लागेल असे करण्यासाठी भगवंताला वृत्तीच्या आत आणावयाचा प्रयत्न करणे आवश्यक आहे... उपासनेत प्रार्थनेला मुख्य जागा देण्यासंबंधाने सर्व धर्मांची एकवाक्यच आहे... निरूपण अथवा उपदेश हा उपासनेचा गौण भाग व प्रार्थना हेच तिचे खरे स्वरूप म्हटले असता चालेल.”७  डॉ. भांडारकर यांनीही प्रार्थनेचे महत्त्व उत्तम रीतीने स्पष्ट केले. “देवाची प्रार्थना करणे हा एक मार्ग देवानेच लावून दिला आहे. ज्याच्या मतीस जसा संस्कार असेल त्याप्रमाणे तो प्रार्थना करील. कुणी आपणास द्रव्य मिळो, संतती होवो, प्रतिष्ठा मिळो, शत्रूंचा नाश होवो अशी प्रार्थना करतील; कुणी अशा प्रकारची प्रार्थना न करता अहंकार, काम, क्रोध, मत्सर इत्यादिकांपासून आपली सुटका व्हावी; आपले अंतःकरणामध्ये प्रेम रूढ व्हावे; द्वेष नाहीसा व्हावा; देवाची भक्ती व्हावी; देवाने आपल्या अंतःकरणात वास करावा अशा प्रकारची प्रार्थना करतील. पहिल्या प्रकारची प्रार्थना मूढ जनांची; दुस-या प्रकारची तुकाराम, नामदेवांसारख्या साधुजनांची. आम्ही तिचेच अवलंबन केले पाहिजे आणि दुस-यासही करण्याचा उपदेश केला पाहिजे.”८

पहिली प्रार्थना झाल्यानंतर उपासकांनी निरूपण अथवा उपदेशात्मक भाषण करण्याचा प्रघात आहे. उपदेशास बहुतेक भक्तिपर विषय घेतला जातो. हा उपदेश एकंदर जीवनास साहाय्यभूत होण्यासारखा असावा अशी अपेक्षा असते. एखाद्या लौकिक बाबीचे आध्यात्मिक अंगाने केलेले विवरणही उपदेशामध्ये असू शकते. मात्र परधर्मनिंदा उपदेशात आणू नये याबाबत प्रार्थनासमाजाचा कटाक्ष असतो. सर्व प्रस्थापित धर्माबाबत आदर बाळगण्याची प्रार्थनासमाजाची भूमिका असते. अखेरीस निरूपणास अनुसरून लहानशी प्रार्थना करून आरती म्हटल्यानंतर साप्ताहिक उपासना संपूर्ण होते. प्रार्थनासमाजाने नियुकत केलेले प्रचारक एकंदरीत जास्त वेळा उपासना चालवीत असले तरी अन्य अधिकारी व्यक्तीने उपासना चालविण्याचा परिपाठही प्रार्थनासमाजात आहे.
 
धर्मप्रचार व्यवस्था
उदार अशा एकेश्वरी धर्ममताचा परिणामकारक रीतीने प्रचार व्हावा अशा प्रकारची आस्था न्यायमूर्ती रानडे, डॉ. रामकृष्णपंत भांडारकर यांच्यासारख्या प्रार्थनासमाजातील वडीलधा-या मंडळींना वाटत होती. मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रथम आचार्य मानले गेलेले भिकोबादादा चव्हाण हे अनेकदा प्रार्थनासमाजाच्या व्यासपीठावरून उपासना चालवीत असत व उपदेश करीत असत. त्यांची परमेश्वरावरची श्रद्धा अढळ होती व एकेश्वरी धर्ममतावर त्यांचा प्रगाढ विश्वास कसा होता याचे वर्णन या आधी आल आहेच; परंतु भिकोबादादा चव्हाण हेच काही एकमेव उपदेशक नव्हते. किंबहुना उपासना चालविणा-या अनेक व्यक्ती असणे हे आवश्यक असते. समाजाची स्थापना झाल्यानंतर दहा वर्षांत असेही आढळून येत होते की, सगळेच उपदेशक समविताराचे होते असे नव्हे. समाजाच्या धर्ममताचा प्रसार अविकृत स्वरूपात सातत्याने होणे ही गरजेची बाब आहे असेही जाणवत होते. कोणा एका धुरीणाचा समाजावर प्रभाव पडून सारा समाज त्याच्यामागून ओढला जाणे हे योग्य नव्हे असे डॉ. भांडारकर, रानडे यांना वाटत होते. काऱण बंगालमध्ये ब्राह्मसमाजाच्या बाबत असे घडले होते. केशवचंद्र सेन यांच्यावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पडला होता व त्यांचा ब्राह्मधर्म जणू काय अनेकांना येशू ख्रिस्तप्रधान ख्रिस्ती धर्माची आवृत्ती वाटू लागला होता आणि ब्राह्मसमाजाचा तर असा कटाक्ष होता की, देव व भक्त यांमध्ये कोणाही मध्यस्थाची जरूरी असू नये. हा कटाक्ष बाजूला राहून खुद्द केशवचंद्र सेन असा मध्यस्थ होण्याची भीती निर्माण झाली होती. अखेरीस देवेंद्रनाथांच्या प्रभावाखालील ‘आदि ब्राह्मसमाज’ असे नाव मिळून केशवचंद्र सेनप्रणीत ब्राह्मसमाजाची वेगळी आवृत्ती ‘नवविधान ब्राह्मसमाज’ या नावाने पुढे आली. प्रार्थनासमाजाबाबत असा प्रकार घडू नये व प्रार्थनासमाजाला मान्य असणा-या तत्त्वांचाच सुसंगपणे व सातत्याने प्रसार होत राहावा यासाठी धर्मप्रसाराची कायम स्वरूपाची काहीएक व्यवस्था व्हावी असा विचार रानडे यांच्या मनात १८७० सालीच आला होता. त्यानंतर १८८१ मध्ये मुंबईस ते प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट म्हणून आले असता या विचाराला चालना मिळाली. समाजास मान्य असणा-या धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रचारक असावा आणि त्याचा व समाजासंबंधी इतर खर्च भागविण्यासाठी सभासदांनी आपल्या प्राप्तीच्या मानाने दरमहा द्रव्य द्यावे असा विचार रानड्यांनी भांडारकर व अन्य काही मित्रांजवळ बोलून दाखविला. ३१ जुलै १८८१ मध्ये डॉ. भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली समाजाच्या सभासदांची सभा भरून ह्या कार्यासाठी सभासदांनी आपल्या मिळकतीतून दरमहा दोन टक्क्यांइतकी रक्कम देत जावी हा विचार सर्वानुमते मान्य झाला. ह्या फंडात जमा होणा-या रकमेचा विनियोग धर्मप्रचारकाच्या निर्वाहासाठी करावा, त्याचप्रमाणे पंढरपूर येथील अनाथ आश्रम, स्वस्त साहित्यनिर्मिती, शाळाखर्च वगैरे कामासाठी करण्यात यावा असे ठरले. ह्या योजनेनुसार श्री. सदाशिव पांडुरंग केळकर हे प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून १ जानेवारी १८८२ पासून काम पाहू लागले. त्यांनी १८९४ पर्यंत बारा वर्षं धर्मप्रचारक म्हणून उत्तम प्रकारे काम केले.

पुणे प्रार्थनासमाजाचे कार्य धर्मप्रचारक या नात्याने श्री. शिवराम नारायण गोखले १८८९ पासून पाहू लागले. मिशन फंडातून त्यांना दरमहा दहा रुपये देण्याची व्यवस्था करण्यात आली. १८९८ पासून शिवरामपंतांनी अन्य व्यवसाय सोडून धर्मप्रचाराच्या कामाला स्वतःला वाहून घेतले.

संगतसभा
नियमितपणे होणा-या साप्ताहिक उपासनेमुळे समाजातील सभासदांची धर्मभावना वाढीस लागण्याचे काम होत असे ही गोष्ट खरी असली तरी सभासदांच्या मनात निर्माण होणारे अनेक धर्मविषयक प्रश्न अथवा शंका यांची उत्तरे मिळण्याच्या दृष्टीने उपासनेच्या वेळी अवसर नसे. कारण उपासना मंदिरात परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व धर्मासंबंधी एखाद्या विषयावर व्याख्यान एवढे होत असे. तेव्हा धर्मासंबंधी विषयांचा विचार व चर्चा होण्याच्या दृष्टीने समाजामध्ये काहीएक साधन असण्याची गरज काही सभालदांना जाणवत होती. १८६० मध्ये केशवचंद्र सेन ह्यांनी कलकत्ता येथील आपल्या स्वतःच्या घरात एका संभाषणात्मक सभेची स्थापना केली होती व तेथे काही तरुण मंडळी धर्म, नीती, सामाजिक सुधारणा वगैरे विषयांवर मोठ्या आस्थेने विचारविनिमय करीत असत. ह्या सभेलाच पूर्वी ‘संगतसभा’ असे नाव प्राप्त झाले. अशा प्रकारच्या संगतसभेची हकीकत समजून पुण्याच्या प्रार्थनासमाजाच्या सभासदांनी संगतसभा स्थापन केली होती. १८८० मध्ये प्रोफेसर रामकृष्णपंत भांडारकर यांनी पुणे येथे संगतसभा स्थापन झाली असून चांगला उपयोग होतो असे सांगून तशाच प्रकारची संगतसभा मुंबईतही स्थापन व्हावी अशी सूचना केली. डॉ. भांडारकरांच्या सूचनेनुसार १४ एप्रिल १८८० रोजी मुंबई प्रार्थनासमाजामध्ये संगतसभेची स्थापना झाली. त्या वेळी डॉ. भांडारकर, मोरोबा विनोबा व दुसरे दहा-बारा गृहस्थ उपस्थित होते. प्रथम प्रार्थना झाल्यानंतर काही जणांनी धर्मविषयक शंका उपस्थित केल्या व त्यावर सभासदांनी चर्चा केली. दर बुधवारी नियमितपणे होणा-या या मुंबईच्या संगतसभेस प्रारंभी प्रो. भांडारकर, रावबहादूर पंडित, काशीनाथपंत तेलंग, न्यायमूर्ती रानडे, सदाशिवराव केळकर, गोविंदराव काणे वगैरे मंडळी येत असत. समाजातील व समाजाबाहेरील मिळून वीसपंचवीस गृहस्थ उपस्थित राहत असत व या सभेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर वादविवाद व विचारविनिमय होत असे. झालेल्या चर्चेचा सारांश सुबोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध होत असे. परंतु एक दीड वर्षापर्यंत संगतसभेचे काम जोरदारपणे झाल्यानंतर संगतसभेसंबंधीचा मंडळींचा उत्साह कमी कमी होत गेला. नियमित येणारे समाजाचे सभासद म्हणजे डॉ. भांडारकर व यशवंतराव मणेरीकर हे दोघे असत. ३१ ऑक्टोबर १८८१च्या सुबोधपत्रिकेच्या अंकामध्ये सभासदांनी संगतसभेला उपस्थित राहत जावे असे कळकळीचे आवाहन करण्यात आले.

संगतसभेमध्ये डॉ. भांडारकर, तेलंग, रानडे, पंडित इत्यादी मंडळी भाग घेत असत. त्या वेळी होणा-या चर्चेत अनेकविध विषयांवर महत्त्वाचे विचार प्रकट केले जात, हे सुबोधपत्रिकेमध्ये त्या त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या चर्चेच्या सारांशावरून ध्यानात येते. उदाहरणार्थ, स्त्री व पुरुष यांची योग्यता समान असून कोणीही कोणाला खालच्या पातळीवरील समजू नये. खरी प्रार्थना कोणती याबद्दल डॉ. भांडारकरांनी स्वतःचे मत मांडले. खरी प्रार्थना म्हटली म्हणजे चैतन्य परमात्मा जो त्याचा जीवात्म्यास साक्षात्कार होणे व तो साक्षात्कार होऊन जीवात्म्याने परमात्म्यास प्रेमफळे अर्पावी व परमात्म्याने जीवात्म्यास उन्नतिरूप रोजमुरा द्यावा ही होय. ‘आत्मा व परमात्मा-ज्ञानाची साधने’ ह्या विषयावर एकदा पूर्वपक्ष-उत्तरपक्ष अशा स्वरूपात चर्चा झाल्याचा वृत्तान्त पाहावयास मिळतो. त्यामध्ये उत्तरपक्ष डॉ. भांडारकरांनी केला होता. पापापासून मिळणा-या शिक्षेचे स्वरूप, वडिलधा-यांची इच्छा व व्यक्तीचे आचरण, ब्राह्मधर्म हा हिंदू धर्म आहे की नाही वगैरे विषयांवर डॉ. भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, बळवंतराव गोडबोले, शंकरराव पंडित वगैरे मंडळी व इतर संगतसभेमध्ये धर्मविषयक व आनुषंगिक अशा अनेक प्रश्नांचा सखोल विचारविनिमय करीत असत. सुबोधत्रिकेमधून ह्या चर्चा सारांशरूपाने प्रसिद्ध होत असत.

आर्य महिला समाज
प्रार्थनासमाजाने स्वतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र संस्था जरी स्थापन केल्या नाहीत तरी स्त्री-शिक्षणाच्या कामी पुढाकार घेण्याचे काम अगदी प्रारंभापासून प्रार्थनासमाजाच्या पुढारी मंडळींनी घेतलेले होते. ह्या मंडळींच्या पुढाकारानेच पुण्यातील मुलींची शाळा (फिमेल हायस्कूल) स्थापन झाले होते. पंडिता रमाबाईंच्या ‘शारदासदन’ ह्या संस्थेच्या स्थापनेच्या कामी त्यांचे साह्य होते. बाबू प्रतापचंद्र मुजुमदार हे १८७७ साली जेव्हा मुंबईस दुस-या वेळी आले तेव्हा स्त्री-शिक्षणाचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. प्रार्थनासमाजाच्या उपासनेस स्त्रिया क्वचितच येत असत त्यामुळे ब्राह्मधर्म हा केवळ पुरुषांचाच धर्म होऊन बसण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. स्त्रियांना जर ब्राह्मसमाजाकडे आकृष्ट करावयाचे असेल तर त्यांची अज्ञानाची स्थिती घालविणे आवश्यक आहे, म्हणजे त्या पुरुषांच्या विचाराशी समरस होऊ शकतील अशी जाणीव निर्माण झाली. म्हणून जगात काय चालले आहे, नवीन ज्ञानाने किती क्रांती घडवून आणली आहे हे स्त्रियांना पटवून देऊन ज्ञानार्जनाची गोडी लागावी अशी योजना त्यांनी करून स्त्रियांची सभा भरविण्यास प्रारंभ केला. बाबू प्रतापचंद्र मुजुमदार यांनी हिंदीमध्ये तर त्यांचे उत्साही सहकारी डॉ. सखाराम अर्जुन यांनी मराठीमध्ये पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे यांबद्दल माहिती सांगितली. डॉ. अर्जुन सखाराम यांनी सूक्ष्मदर्शक यंत्रे व मॅजिक लँटर्न अशा उपकरणांच्या साहाय्याने माहिती देण्याचा उपक्रम चालू ठेवला व काही दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा भरू लागला. दोन-अडीच वर्षांनंतर हा उत्साह बराच थंडावला तेव्हा सदाशिव पांडूरंग केळकर यांनी पुढाकार घेऊन या सभेच्या कामाला चालना दिली. सौ. रमाबाई रानडे, सौ. गंगुताई भांडारे यांनी सभेच्या कामी उत्साह दाखविला. १ मे १८८२ रोजी पंडिता रमाबाईंनी पुणे मुक्कामी ‘आर्य महिला समाज’ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर मुंबई येथे ३० नोव्हेंबर १८८२ रोजी आर्य महिला समाजाची स्थापना झाली. म्हणजे पूर्वीच्या स्त्रियांच्या सभेचे रूपांतर ह्या आर्य महिला समाजामध्ये झाले असे म्हणणे युक्त ठरेल. रमाबाई रानडे मुंबईस असताना त्या सभेच्या अध्यक्ष होत्या. आर्य महिला समाजाच्या चिटणिसाचे काम रमाबाई भांडारकर ह्यांनी निष्ठापूर्वक चालविले. आरंभीच्या काळाचा उत्साह ओसरल्यानंतर स्त्री-सदस्यांची फारशी उपस्थिती नसतानाही व अनेकदा व्याख्यान देण्यासाठी कुणी अधिकारी व्यक्ती मिळाली नसताना सभेच्या ठिकाणी एखाद्या ग्रंथातील निवडक भाग त्या वाचून दाखवीत असत. मात्र पुरुषांच्या बरोबरीने प्रार्थनासमाजामध्ये स्त्रियांनीही उपस्थित राहून सहभागी व्हावे हा उद्देशही फारसा सफल झाल्याचे शतकाअखेरीस तरी दिसत नाही.

बालहत्याप्रतिबंधक गृह आणि अनाथ बालकश्रम
मुंबई प्रार्थनासमाजाच्या वतीने सामाजिक स्वरूपाचे काम करण्याचा एक प्रमुख उपक्रम म्हणजे पंढरपूर येथील बालहत्याप्रतिबंधक गृह आणि अनाथ बालकाश्रम. ज्या जातींमध्ये विधवा-विवाह करावयाची चाल नाही त्या जातींतील ज्या स्त्रियांचे वाकडे पाऊल पडून अडचणीत येतात त्यांची सुरक्षितणे सुटका करावी व त्यांना होणा-या मुलांचा प्रतिपाळ करावा, ह्या हेतूने रा. ब. लालशंकर उमियाशंकर यांनी १८७५ मध्ये ही संस्था स्थापन केली. रा. ब. लालशंकर उमियाशंकर हे पंढरपुरास मुन्सफ असता एके दिवशी संध्याकाळी चंद्रभागेच्या वाळवंटात फिरावयास गेले होते. काही एका मऊ पदार्थाची ठेच लागली म्हणून त्यांनी पाहिले, तो कापडात गुंडाळलेले एक जिवंत मूल त्यांस आढळले. त्या बालकास त्यांनी आपल्या घरी नेले व त्यांच्या पत्नीने त्याची योग्य जोपासना केली. ह्या घटनेने त्यांना बालहत्याप्रतिबंधक गृह स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. पंढरपुरात काही घरांमध्ये अशा अडचणीतील स्त्रियांची प्रसूती केली जाते व ते मूल नंतर कोठेतरी अडचणीच्या जागी टाकून दिले जाते, अनेकदा अशा स्त्रियांची लुबाडणूक होते, वगैरे गोष्टी रा. ब. लालशंकर यांनी ऐकल्या होत्या. ह्याचा पडताळा त्यांना स्वतःलाच आला. अशा अर्भकांचे प्राण वाचावे व अडचणीतील स्त्रियांचे दुःख कमी करावे या हेतूने अशा स्त्रियांच्या प्रसूतीची व्यवस्था एखाद्या गृहात करावी म्हणून त्यांनी सन १८७५ मध्ये ‘बालहत्याप्रतिबंधक गृहा’ ची स्थापना केली. रा. ब. लालशंकर उमियाशंकर यांची पंढरपुराहून बदली झाली तेव्हा ही संस्था १८८१ मध्ये मुंबईच्या प्रार्थनासमाजाच्या हवाली केली गेली.

बालहत्याप्रतिबंधक गृहाला जोडूनच पंढरपूर येथे दुसरी जी संस्था स्थापन केली गेली ती म्हणजे अनाथ बालकाश्रम. सन १८७६-७७ मध्ये महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. सोलापूर व कलादगी जिल्ह्यांत तर दुष्काळाने कहर उडविला होता. अशा वेळी मुंबई प्रार्थनासमाजाने वर्गणी जमवून सोलापूर व कलादगी जिल्ह्यात गरजू लोकांना अन्न व कपडे वाटण्याची व्यवस्था केली. सरकारने ही पंढरपुरात एक अन्नछत्र उघडले होते. दुष्काळाचा तडाखा कमी झाल्यानंतर सरकारने अन्नछत्रे बंद केली. मोठी माणसे आपआपल्या गावी गेली. पण आईबाप, आप्तस्वकीय नसलेली मुले उघड्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली. मागणा-याच्या हेतूची अजिबात चौकशी न करता सरकार मागेल त्याला ही निराश्रित मुले देत सुटले. अशा वेळी ह्या अनाथ मुलांचा प्रतिपाळ करावा ह्या हेतूने लालशंकर उमियाशंकर यांनी एक कमिटी स्थापन केली व प्रार्थनासमाजाच्या साहाय्याने अनाथ बालकाश्रमाची स्थापना केली. ह्या कामास त्यांनी १८७८ मध्ये प्रारंभ केला. ह्यावेळी दीडशे अनाथ मुलांची व्यवस्था त्यांनी केली. ह्या गृहामध्ये वेगवेगळ्या जातींची चौदा वर्षांपर्यंतची मुले असत. लालशंकर यांची गुजराथेत १८७९ मध्ये बदली झाली तरी पंढरपुरातील बालहत्याप्रतिबंधक गृहाकडे व अनाथ बालकाश्रमाकडे ते मोठ्या आत्मीयतेने लक्ष पुरवीत असत. पुढच्या काळात अनाथाश्रमाचे सुपरिटेंडेंट असलेले श्री. केरो रावजी भोसले हे आश्रमाचे काम मोठ्या दक्षतेने करून मुलांचा प्रतिपाळ प्रेमळपणे करीत असत.

पुणे प्रार्थनासमाज
पुणे शहरामध्ये एकेश्वर मताच्या मंडळीची स्थापना होण्याचा पहिला प्रयत्न १८६२ मध्ये झाला असे म्हणावे लागेल. ‘मित्रमेळा’ (फ्रेंडली मीटिंग) या नावाची मंडळी १८६२ मध्ये एकत्र जमत होती. म्हणजे केशवचंद्र सेन यांच्या पहिल्या मुंबईभेटीच्या आधीच पुण्यामध्ये एकेश्वरवादी विचार आणि सुधारणेचा दृष्टिकोण ह्या मित्रमेळा मंडळीच्या द्वारा व्हावयास प्रारंभ झाला. १८७० मध्ये श्री. वामन आबाजी मोडक हे रत्नागिरीहून मुंबईस जात असता त्यांनी पुण्यास मुक्काम केला. ह्या मुक्कामात त्यांनी विश्रामबागेत ‘धर्माची आवश्यकता’ ह्या विषयावर व्याख्यान दिले. मोडकांच्या व्याख्यानामुळे मित्रमेळ्यामधील मंडळींचा उत्साह वाढीस लागला व पुण्यामध्ये श्री. केशव पांडुरंग गोडबोले यांच्या घरी काही मंडळी एकत्रित जमली व प्रार्थनासमाजाची स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ह्या जमलेल्या मंडळींमध्ये श्री. विश्वनाथशास्त्री केळकर, रामचंद्र दिनकर परांजपे, गणपत भास्कर कोटकर, गणपत गीर, रतन गीर, केशव पांडुरंग गोडबोले आणि अन्य काही मंडळी होती. १८७० च्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या रविवारी एकेश्वरी पंथाला अनुसरून उपासना करण्यात आली व हा दिवस प्रार्थनासमाजाचा स्थापना दिन म्हणून मानला जाऊ लागला. मुंबई प्रार्थनासमाजाचेच उद्देश आणि तत्त्वे पुणे प्रार्थनासमाजाने स्वीकारली.

प्रार्थनासमाजाच्या सभासदांच्या निमंत्रणानुसार स्वामी द्यानंद १८७२ मध्ये पुण्यास व्याख्यान देण्यासाठी आले असता समाजाला स्वतःची इमारत नाही ही उणीव विशेषत्वाने जाणवली. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रयत्नामुळे बुधवार पेठेतील पासोड्या विठोबाच्या मंदिराजवळील जागा विकत घेता आली व तेथे सामाजातसाठी तात्पुरती इमारत बांधण्यात आली. ह्या इमारतीचा साधेपणाच विठ्ठल रामजी शिंदे यांना १८९८ मध्ये भावला. पुणे प्रार्थनासमाजामध्ये संगतसभेची स्थापना मुंबई प्रार्थनासमाजाच्या आधीच एक वर्ष झाली. न्यायमूर्ती रानडे, डॉ. भांडारकर यांसारखी मंडळी संगतसभेमध्ये विचारविनिमय करीत असत. श्री. शिवराम नारायण गोखले यांनी पुणे प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून काही काळ काम केले. श्री गणपतराव कोटकर, श्री. शिवराम नारायण गोखले, न्यायमूर्ती रानडे, डॉ. भांडारकर यांच्या उपासना फारच प्रभावी आणि परिणामकारक असत. श्री. गणपतराव आंजर्लेकर यांचे प्रार्थनासंगीत प्रेरक असे. श्री. केशवराव गोडबोले हे समाजाचे सेक्रेटरी म्हणून निष्ठावंतपणे व तत्परतेने काम करीत असत. प्रार्थनासमाजाचे पुढे धर्मप्रचारक झालेले मोती बुलासा, विठ्ठल रामजी शिंदे, वासुदेव अनंत सुखटणकर हे मुळातील पुणे प्रार्थनासमाजातील सभासद होते.
   
 संदर्भ
१.    द्वा. गो. वैदेय, प्रार्थनासमाजाती इतिहास, पृ. ३८.
२.    तत्रैव, पृ. ५६-८२.
३.    तत्रैव, पृ. ९४-९५.
४.    तत्रैव, पृ. २१५.
५.    तत्रैव, पृ. २१६.
६.    तत्रैव, पृ. २१६-२१७.
७.    न्या रानडे यांची धर्मपर व्याख्याने, आवृत्ती ४ थी, पृ. १३-१४
८.    डॉ. रा. गो. भांडारकर, धर्मपर लेख व व्याख्याने, पृ. १५४-५५.