ब्रह्मदेशाची यात्रा

मंगलोरहून परत आल्यानंतर १९२५-२६ साली विठ्ठल रामजी शिंदे यांनी बौद्ध धर्मासंबंधी विशेष अभ्यास केला. डी.सी. मिशनपासून वियुक्त होण्याचा प्रसंग व त्यानंतर मंगलोर येथे ब्राह्मधर्माचे आचार्य म्हणून गेल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर तेथूनही पुण्यास परत यावे लागण्याची घटना, यामुळे त्यांच्या मनाला एक प्रकारची अशांतता जाणवत होती. म्हणून पुण्यास आल्यानंतर बौद्ध धर्माचाच त्यांनी विशेष अभ्यास सुरु केला. विशेषतः पाली भाषेतील धम्मपद हा ग्रंथ प्रो. चिं.वि.जोशी यांच्याजवळ वाचल्यापासून मनाला शांती वाटू लागली, असा अनुभव त्यांना आला. याचा वेळेला आपण ब्रह्मदेशाला जावे व तेथील बौद्ध धर्मातील जीवन प्रत्यक्ष पाहावे आणि स्वतः अनुभवावे हा विचार त्यांच्या मनात बळावत चालला. बौद्ध धर्माच्या जिज्ञासेबरोबर ब्रह्मदेशाबद्दल दुसरी एक जिज्ञासा विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात होती. ती म्हणजे तेथील सामाजिक स्थितीचे स्वरुप न्याहाळावे. ब्रह्मदेशातील सामाजिक व कौटुंबिक स्थितीबद्दल त्यांना कुतूहल वाटत होते. ब्रह्मदेशात तर जातिभेद नाही, स्त्री-पुरुषांत समानतेचे नाते आहे, किंबहुना स्त्रियांचा वरचष्मा आहे असे त्यांनी ऐकले होते. या दुहेरी कुतूहलापोटी शिंदे यांनी ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे ठरविले. बौद्ध धर्माचे जीवन पाहावे, विशेषतः एकांत विहारात राहून त्या धर्माचे रहस्य अनुभवावे असाही विचार त्यांनी पक्का केला  ते ब्रह्मदेशाच्या यात्रेसाठी निघाले.


१९२७ सालच्या २४ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत कलकत्त्याला ब्राह्मसमाजाचा वार्षिकोत्सव म्हणजे माघोत्सव होता. या उत्सवाला उपस्थित राहून मग कलकत्त्याहून पुढे रंगूनला जावे असे त्यांनी योजिले. माघोत्सवामध्ये ब्राह्मधर्माच्या प्रचारकांची ऊर्फ मिशनरींची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत भाषण करीत असताना शिंदे यांनी 'मी बौद्ध आहे' हे विधान केले. त्यांचे हे विधान ऐकून ब्राह्म मिशनरी बंधू चमकले. अनेकांना त्यांचे हे विधान ऐकून आश्चर्य वाटले, तर काहींना त्यांचे हे विधान रुचले नाही. याबाबतीत शिंदे यांची भूमिका स्वच्छ होती. १९०१ ते ०३ पर्यंत ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षण घेत असताना प्रो. कार्पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पाली भाषा व बौद्ध धर्म यांचा विशेष अभ्यास केला होता. धर्माच्या अभ्यासासंदर्भात एक प्रकारची ऐतिहासिक दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती. १९१० साली पुण्यास 'बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार' या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी बौद्ध धर्म हा आमचा बिनमोल वरसा आहे असे सांगितले होते. आपल्या हल्लीच्या धार्मिक व सामाजिक जीवनाचा बौद्ध धर्म हा एक मोठा घटक आहे, अशी त्यांची धारणा होती. आपल्या हल्लीच्या धार्मिक व सामाजिक जीवनाचा बौद्ध धर्म हा एक मोठा घटक आहे, अशी त्यांची धारणा होती. बौद्ध धर्म हा प्रत्यक्षार्थवादी (पॉझिटिव्हिस्ट), व्यवहारवादी आणि प्रागतिक आहे ह्या धारणेमुळे बौद्ध धर्माकडे त्यांचा ओढा होता. शिवाय ब्राह्याला तत्त्वत: कोणताच धर्म परका नव्हता. म्हणून ब्राह्म मिशनरीच्या सभेमध्ये त्यांनी वरील प्रकारचे उद्गार काढले. आमच्या ब्राह्मसमाजात जर वेगवेगळ्या धर्मातून माणसे येतात, तर मी बौद्ध धर्मातून आलो असलो तर त्याच वावगे काय? आज जर गौत्मबुद्ध जिवंत होऊन आले तर त्यांना तुम्ही ब्राह्मसमाजात घेणार नाही काय? या प्रकारे शिंदे यांना ह्या वादंगामध्ये युक्तिवाद करावा लागला. अध्यक्षस्थानी गुरुदास चक्रवर्ती हे बौद्ध प्रचारक होते. या विषयावर वाद माजू लागला आहे हे पाहून त्यांनी उठून सांगितले, "श्रीयुत शिंदे यांचा आध्यात्मिक भाव मनात आणा. शब्दावर वाद नको. ब्राह्मसमाज सर्वसंग्राहक आहे आणि शिंदे हे त्याचे नमुनेदार उदाहरण होय. आता ते लवकरच ब्रह्मदेशात बौद्ध धर्म पहावयास जाणार आहेत. त्यांच्या ब्राह्मधर्माचा उदारभाव पाहून तेथील मंडळींचा, त्याप्रमाणे ब्राह्मसमाजाचा फायदाच होईल."


८ फेब्रुवारी १९२७ रोजी रात्रौ शिंदे रंगूनला पोहोचले. रंगून येथील डॉ. पी. के. मुजुमदार यांच्या घरी पाहुणा म्हणून ते राहिले. ब्रह्मदेशात आल्यानंतर धर्मविचाराची देवाणघेवाण करणे हाही त्यांनी आपला एक उद्देश ठेवला होता. ११ फेब्रुवारीला रंगून येथील ब्राह्ममंदिरात त्यांनी 'धर्माचा आत्मा" ( दि सोल ऑफ रिलिजन) या विषयावर व्याख्यान दिले व १२ तारखेस उपासना चालविली. स्थानिक ब्राह्मांच्या मेळाव्यामध्ये शिंदे यांनी 'ब्राह्मबंधूंमध्ये जास्तीजास्त सहकार्य व ऐक्य निर्माण होण्याची आवश्यकता' या विषयावर भाषण दिले आणि ब्रह्मदेशात ब्राह्मधर्माचा प्रसार करण्याच्या चळवळीची आवश्यकता यासंबंधीही प्रतिपादन केले. १३ तारखेस रविवारी रंगून येथील ब्राह्मसमाज मंदिरात इंग्रजीमध्ये त्यांनी उपासना चालविली. रंगून ब्राह्मसमाजाने शिंदे यांच्या गौरवार्थ तारीख १९ रोजी बेगॉल अॅकॅडेमीमध्ये चहापार्टी दिली. दुस-या दिवसापासून त्यांनी आपल्या प्रवासाला प्रारंभ केला.१ दक्षिण ब्रह्मदेशात पाश्चात्त्य सुधारणेचे संस्कार विशेष प्रमाणात झाले होते. शिक्षण, व्यापार, राजकारण यांमध्ये ते संस्कार दिसून येत होते. तर उत्तर ब्रह्मदेशात जुने वळण प्राधान्याने प्रचलित होते. प्रथमत: दक्षिण ब्रह्मदेशामध्ये यात्रा करण्यास विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवात केली.


२० फेब्रुवारीला सकाळी रंगूनहून निघून ते मेलोमनला पोहोचले. तेथील मुख्य पॅगोडे पाहून एका वृद्ध फोंजीला(भिक्षूला) भेटून त्याचा मठ पाहिला. नंतर थाईन या इतिहासप्रसिद्ध गावी शिंदे गेले. तेथे एक हजार फूट उंचीवर टेकडीवर असलेला म्या दबे नावाचा रमणीय पॅगोडा पाहिला. ह्या निर्जन आणि एकांतस्थळी शिंदे यांची ध्यानधारणा चांगल्या प्रकारे झाली. तेथील एक विहारात उ कोडन्ना नावाच्या फोंजीला ते भेटले. ते पूर्वाश्रमीचे डेप्युटी कलेक्टर होते. कोणाही प्रांपंचिक गृहस्थास काही काळ बुद्ध भिक्षूची दीक्षा घेऊन परत गृहस्थाश्रमास जाण्याला मुभा असते. ह्या सवलतीला अनुसरून उ कोडन्ना यांनी विश्रांतीसाठी आणि अध्ययनासाठी हा चतुर्थ आश्रम स्वीकारला होता. कोडन्ना यांची भेट शिंदे यांच्या मनाला फार समाधान देणारी वाटली. त्यांच्या भेटीने शांती आणि गंभीरपणा ह्याचा परिणाम त्यांच्या मनावर झाला. त्या विहाराचे वातावरणही आध्यात्मिक भावनांनी भारलेले होते. ह्या वातावरणाचा परिणाम होऊन विठ्ठल रामजी शिंदे यांना वाटले की, आपणही काही काळ बौद्ध धर्माची उपसंपदा (दीक्षा) घ्यावी. उ कोडन्ना हे विचारात अगदी नवीन वाटले. शिंदे यांनी त्यांना विचारले, "बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, ही तीन शरण्यरत्ने आहेत खरी. पण बुद्धालाच तेवढे शरण जाऊन माझा बौद्ध धर्मात प्रवेश होऊ शकणार नाही काय? आणि तुम्ही मला दीक्षा देऊ शकाल काय?" शिंदे यांच्या प्रश्नावर त्यांनी स्मितपूर्वक उत्तर दिले, "तुमचा आध्यात्मिक भाव पाहून मला आनंद वाटतो. तुम्हाला बाह्म उपसंपदेची जरूरी तरी काय उरली? शिवाय दीक्षा देण्याचा अधिकार मला नाही. तो मठाधिपतीकडे असतो. मी अद्यापि साधकच आहे.

एकंदरीत तुमच्या भेटीमुळे मला मोठे समाधान झाले." बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची प्रबळ उर्मी अण्णासाहेबांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तिचा आविष्कार अशा प्रकारे झाला.


२४ फेब्रुवारीला ते पेगूला गेले. तेथे श्वे थ याँ बुद्ध ( उजव्या हातावर मान टेकून निजलेला मोठा पुतळा) पाहिला. मोलेमन, थाटन आणि पेगू अशी स्थळे पाहून २५ ला सायंकाळी ते रंगूनला परत आले व मुजुमदार यांचे पाहुणे म्हणून राहिले. तारीख २६ ला रामदासनवमी होती. त्याचप्रमाणे तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथीही त्याच दिवशी होती. या निमित्ताने सायंकाळी महाराष्ट्र मंडळाच्या विद्यमाने अण्णासाहेबांनी मयेकर यांच्या घरी 'महाराष्ट्र धर्म' या विषयावर कीर्तन केले. ह्या कीर्तनासाठी त्यांनी मुद्दाम पुढील पद तयार कले. हे पद तयार करताना तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आहे, ही गोष्ट त्यांनी मनात वागविली.

महाराष्ट्र धर्म


बंधु हो भवाचा किल्ला    सर करणे आम्हा सकला ।।धृ।।
सिंहगड तो एकची नोहे    महाराष्ट्रामधला साचा ।।
तान्हाजि नव्हे एकुलता    शेलार मामाचा भाचा ।।
श्री शिवाजी होऊनि गेला   कधी काळी इतिहासाचा ।।


अशी गोष्ट न बोला कधीहि ।।
जीवन ये युद्धहि पाही ।।
दिनरात अंतरी बाहीं ।।


मग काहो स्वस्थसे बसला? ।।१।। बंधुहो...
संत आजवरी जे झाले ते संत नव्हत शिपाई ।।
भव-रणांगणा माझारी झुंझती ते ठाईठाई ।।
येरयेरा देती हाक या म्हणती आम्हालाहि ।।


आम्ही पहा कसे हे भ्रांत ।।
ठेवुनि कपाळी हात ।।
करितसे स्वत:चा घात ।।
चला उठा लागू कामाला ।।२।। बंधुहो...


जग नव्हे मराठ्यापुरते, पसरे ते अनाद्यनंती
राहणीचे जे जे साधे स्वार्थाबहिर जे पाहती ।।
सत्याची भूक जयांना अन्याया जे ना सहती ।।


ते सर्वची अस्सल मराठे ।।
कालदेश केव्हा कोठे ।।
सोडा हे विचार झूट ।।
महाराष्ट्र धर्म अपुला ।।३।। बंधुहो...


रामदास स्वर्गातुनिया ऐकुनि हे आनंदेल ।।
तान्हाजि शिवाचा कलिजा राखेतुनि पुन: उठेल ।।
तुक्याची म-हाटी वाणी कानीमनीं गुंजेल ।।


मग मी-तुपणाचे वारे ।।
निवारुनि जाईल सारे ।।
जगि उठा तुम्ही बारे ।।
महाराष्ट्र । जय जय बोला ।।४।। बंधुहो...


शिंदे यांनी या प्रसंगी गायिलेल्या प्रस्तुत पदावरुन त्यांनी भाषणात केलेल्या प्रतिपादनाची कल्पना येऊ शकते. आपले संत म्हणजे संत नसून संसाररुपी युद्धभूमीवर रात्रंदिवस लढणारे शूर शिपाई होत. सत्यासाठी, नैतिक आचरणासाठी त्यांचा सदैव लढा चाललेला असे ही भूमिका ते विशद करतात. त्याचप्रमाणे मराठा म्हणजे कोण ह्याबद्दलची व्यापक कल्पना ते मांडतात. ज्यांची ज्यांची राहणी साधी आहे; जे स्वार्थाच्या पलीकडे बघतात; ज्यांना सत्याची भूक आहे व ज्यांना अन्याय असह्म वाटतो, ते सर्व अस्सल मराठे होत. मग ते कोणत्याही काळातील व कोणत्याही देशातील असोत. अशा मराठ्यांचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म होय असे व्यापक स्वरुपाचे प्रतिपादन त्यांनी केलेले दिसते.

 

महाराष्ट्रापासून दूर ब्रह्मदेशासारख्या ठिकाणी असणा-या वेगवेगळ्या जातीच्या मराठी भाषिक मंडळींना त्यांचे हे प्रतिपादन आणि उन्नत विचार स्वाभाविकपणे आवडले असणार.
ब्रह्मदेशातील आपल्या ह्या मुक्कामात विठ्टल रामजी शिंदे विविध महत्त्वपूर्ण विषयांवर श्रोत्यांच्या स्वरुपानुसार भाषणे देत होते. २ मार्चला मिसेस मुजुमदार यांनी आपल्या घरी काही बायकांना बोलावले होते. ह्या स्त्रियांच्या पुढे त्यांनी 'महाराष्ट्रातील बायकांची कामे' ह्या विषयावर भाषण केले. आपल्या कुटुंबव्यवस्थेत स्त्रियांची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते याचे शिंदे यांनी वेळोवेळी आपल्या लेखनातून तसेच भाषणातून प्रतिपादन केलेले आहे.


मुख्यत: कौटुंबिक पातळीवरील महत्त्वाचे निर्णय घेणे व मुलांवर योग्य संस्कार करणे हे मौलिक स्वरुपाचे काम आपल्याकडील स्त्रिया करीत आलेल्या आहेत व जिजाबाईंसारख्या स्त्री-रत्नांची परंपरा महाराष्ट्रात पूर्वीपासून आहे असे त्यांचे मत होते. या स्वरुपाचे स्त्रियांना रुचेल असे व अमलात आणता येऊ शकेल अशा प्रकारचे प्रतिपादन विठ्ठल सामजी शिंदे यांनी केले असावे. तारीख ५ मार्च रोजी लक्ष्मीनारायण धर्मशाळेत 'बृहद् हिंदू धर्म आणि जनतेचा उद्धार' या विषयावर इंग्रजीत भाषण केले.


६ मार्च १९२७ रोजी अण्णासाहेबांनी 'महाराष्ट्र मित्रमंडळी'च्या वार्षिक सभेत अध्यक्ष या नात्याने भाषण केले. त्यांच्या भाषणाचा विषय 'हिंदू धर्माची जागृती' हा असावा असे उपलब्ध टिपणावरुन दिसून येते.२ अण्णासाहेबांनी 'हिंदू धर्माची जागृती' ह्या विषयावर दिलेल्या व्याख्यानात ऐतिहासिक दृष्टिकोणातून हिंदुस्थानात झालेल्या धर्मविषयक उलाढालींचा वेध घेत मौलिक स्वरुपाचे विचार मांडले. ह्या टिपणात हिंदू धर्माचे विशेष नोंदविले आहेत, ते अस: १) अनैतिहासिक २) व्यापक ३) संग्राहक ४) म्हातारा धर्म आणि ५) झोपाळू. टिपणात पुढे त्यांनी नमूद केले आहे की, हिंदू, ख्रिस्ती, मुसलमान, चिनी, बौद्ध, जैन वगैरे भिन्न धर्म नाहीत. धर्म एक; पंथ निराळे.


मोक्षधर्म आणि व्यवहारधर्म असा भेद कल्पून त्यांनी म्हटले आहे. मोक्षधर्म सर्वत्र एकच. तरी व्यवहारधर्मामुळे पंथ निराळे. एकं सत् विप्रा: बहुधा वदंति.


मोक्षाची बाजू सनातन असल्याने तिला झोप नाही व ती असामान्य ऋषिप्रणीत आहे. पण व्यावहारिक बाजूत मात्र झोप व जागृती असे हेलकावे (दिसतात.)


धर्माची सुधारणा म्हणून जी आहे ती ह्या व्यावहारिक ऊर्फ युगधर्मातच आहे. इतर धर्मपंथ जन्मण्यापूर्वी म्हणजे बुद्धकालीच हिंदू धर्मपंथाला म्हातारपण आले. बौद्ध व जैन धर्म ही पहिली सुधारणा ऊर्फ जागृती. बौद्ध सुधारणा ही जुनी झाल्यावर भागवत धर्माची दुसरी जागृती. हल्लीच्या (प्रार्थना) समाजधर्माच्या हेटाळणीप्रमाणेच सर्व पूर्व जागृतीचीही (हेटाळणी) झाली. झोपाळू मनुष्य झटकन न उठता आळेपिळे देतो तशीच ही हेटाळणी आहे. एक जागा झाला म्हणजे दुस-या झोपाळूची थट्टा करतो.


शंभर वर्षांत ह्या समाजाने जी कामगिरी केली ती आज म्हातारा हिंदू धर्म आता कबूल करीत आहे. ७ मार्च रोजी ते उत्तर ब्रह्मदेश पाहण्यासाठी मंडालेला निघाले. ८ मार्च रोजी मंडालेला पोहोचल्यानंतर दत्तात्रय सखाराम नागवंशे यांच्याकडे त्यांनी मुक्काम केला. नागवंशे हे मंडाले-मदाया रेल्वेत उपविभागीय अधिकारी होते. अहमदाबादचे डॉ. पायगुडे हे त्यांना भेटले. तारीख १० ला मंडाले येथील टेकडीवर श्वे या दो बुद्धाचा २५ फूट उंचीचा हात वर करुन उभा असलेला पुतळा पाहिला. मंडाले येथील मुख्य देवळातील महात्मा मुनीचा (बुद्धाचा) भव्य पितळी पुतळा तारीख ११ रोजी पाहिला. ह्या देवळामध्ये भाविकांची सतत गर्दी असे. बाहेरच्या अंगणात असलेल्या स्वच्छ तळ्यातून जिवंत मासे धरून काही लोक विक्रीस ठेवीत, आपण ते विकत घेऊन पुन्हा पाण्यात सोडल्यास पुण्य लागते अशी भाविक लोकांची समजूत असे. शिंदे यांनी म्हटले आहे, "पुन्हा पुन्हा तेच तेच मासे धरल्याने ते इतके माणसाळून गेले होते की, ते आपोआप टोपलीत येऊन पडत."


मंडाले येथील मुक्कामात शिंदे यांनी जुन्या राजाचा वाडा पाहिला. टिळकांना जेथे ठेवले होते तो राजकीय तुरुंगही पाहिला. अण्णासाहेब शिंदे जेथे जातील-मग ते पॅरिस असो की मंडाले असो-तेथील समाजशास्त्रज्ञांची आवर्जून भेट घेत असत व त्यांच्याकडून नवी माहिती मिळविण्याचा व आपले कुतूहल पूर्ण करुन घेण्याचा प्रयत्न करीत असत. मंडालेहून काही अंतरावर मेमियो हे हवा खाण्याचे सुमारे ३५०० फूट उंचीवर वसलेले ठिकाण आहे. तेथे टॉ सिन को या नावाच्या वास्तुशास्त्रज्ञाकडे एक दिवस त्यांनी पाहुणा म्हणून व्यतीत केला. हे विद्वान त्यांना ब्रह्मदेशाचे डॉ. भांडारकरच वाटले. त्यांच्याशी ब्रह्मी पुरातत्त्व वास्तुविषयासंबंधी शिंदे यांनी विचारविनिमय केला. शिंदे यांची फकिरीवृत्ती दिसत असूनही त्यांच्या ठिकाणी असलेली शोधक बुद्धी पाहून त्यांना आश्चर्य वाटले व तसे त्यांनी बोलून दाखविले. हे विद्वान गृहस्थ युरोपियन थाटात राहत असत. टेबलावर जेवीत असताना शिंदे यांनी एका चमत्कारिक विषयाबद्दलची पृच्छा केली. ब्रह्मी लोक मृतमांस खातात असे त्यांनी ऐकले होते. परंतु अधिकारवाणीने कोणी उलगडा अद्यापि त्यांच्याजवळ केलेला नव्हता म्हणून हा विषयमोठ्या नम्रपणे टॉसाहेबांकडे काढला. ब्रह्मी माणसे मृतमांस खातात हे त्यांनी कबूल करुन सगळीच माणसे मेलेल्या जनावराचेच मांस खातात, मग तो प्राणी मेलेला असो की मारलेला असो, असे एक प्रकारच्या आक्रमकपणाने सांगितले. खाते वेळी त्या प्राण्याचे मांस शुद्ध असणे महत्त्वाचे होय असे त्यांनी सांगितले.


१३ मार्च रोजी अण्णासाहेब शिंदे हे मंडालेहून दक्षिणेकडे ८ मैलावर असलेल्या अमरपुरा या गावी साँडर्स वीव्हिंग इन्सिटयूटचे प्राचार्य श्री. महादेवराव मांडे यांच्याकडे उतरले. एक दिवस व त्यांच्याकडे राहिले व पुढील १४ ते १८ तारखेपर्यंत सगाईन टेकडीवरील विहारात राहिले. तारीख १८ ला अमरपु-यास परत आल्यानंतर दोन दिवस ते अमरपुरा व मंडाले येथे राहिले.


दक्षिण ब्रह्मदेशात रंगून येथे ब्राह्मसमाज व महाराष्ट्र मित्र मंडळी ह्या दोन संस्था कार्यरत होत्या. परंतु येथील मंडळीस धर्माविषयी विशेष कळकळ आहे असे प्रारंभी विठ्ठल शिंदे यांना वाटले नाही. ब्राह्मसमाजात डॉ. पी. के. मुजुमदार व महाराष्ट्र मित्रमंडळीत श्री.रा.न. सबनीस हे दोन कळकळीचे पुरुष वाटले. सबनीस हे बर्मा रेल्वेच्या हिशोब खात्यात अधिकारी होते. उत्तरेकडे मंडाले येथे दत्तोपंत सखाराम नागवंशे आणि अमरपुरा येथे महादेवराव मांडे आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळी ह्यांना जरी ब्राह्मसमाजाविषयी त्यांच्या मनात विशेष आदर निर्माण झाला. श्री. मांडे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या घरी शिंदे यांनी ब्रह्मोपासना केली. सौ. मांडे व त्यांचा मुलगा विद्याधर हे श्रद्धेने उपासनेस बसले होते. मंडालेहून येऊन नागवंशे, भिडे ही मंडळीही हजर होती. ह्या उपासनेचा सर्वांवर एवढा इष्ट परिणाम घडला की, पुढील रविवारी सगाईनवरुन आल्यावर श्री. मांडे, पायगुडे, नागवंशे ह्या तिघांच्या कुटुंबातील मंडळीनी नागवंशे यांच्या बंगल्यावर सर्व दिवस उपासना, चिंतन, भजन, संभाषण यांमध्ये घालविण्याचे ठरविले. अण्णासाहेब शिंदे यांच्या वास्तव्याचा ह्या सर्वच मंडळींवर अत्यंत अनुकूल असा प्रभाव पडला. शिंदे यांच्या तेथील वास्तव्यात मांडे यांच्या घरी वरचेवर कौटुंबिक उपासना होई.


ब्रह्मदेशातील बौद्धधर्माची वर्तमानस्थिती अवलोकन करावी. तेथील बौद्ध मठ, विहार यांचे निरीक्षण करावे व शक्य तेथे जमेल तेवढा वेळ एकांतवासात ध्यानधारणा करावी हाही एक प्रमुख उद्देश ठेवून विठ्ठल रामजी शिंदे ब्रह्मदेशातील यात्रेवर निघाले होते. रंगून येथे श्वे डगून पँगोडा हे मोठे मंदिर त्यांनी पाहिले. श्रावण, कार्तिक, फाल्गुन अशा तीन महिन्यांमध्ये तेथे धार्मिकांचा मोठा मेळावा जमतो. त्या वेळी अन्नाच्या राशीच्या राशी जमा होतात. पण नैवेद्याचे हे अन्न वरिष्ठवर्गीय कोणीही खात नाहीत. ते फयाचून नावाच्या अस्पृश्यांना देण्यात येते. ह्या मंदिरातील लाकडी काम विठ्ठल रामजी शिंदे यांना फारच सुरेख वाटले. देवळाचे अंगण झाडण्यात पुण्य लाभले अशी धारणा असल्याने श्रीमंत व सभ्य कुटुंबातील लोकही देवळाचे अंगण झाडताना आढळत. हा पँगोडा टेकडीवर ३०० फूट उंचीवर बांधण्यात आलेला आहे. देवळात ठिकठिकाणी शेकडो मूर्ती दिसतात. सर्व प्रकारचे लोक देवळामध्ये प्रवेश करतात. कोणालाही तेथे बंदी नाही. ह्या देवळातील गंभीर वातावरणाचा शिंदे यांच्या मनावर उत्तम परिणाम झाला.


शिंदे यांनी बघितलेले दुसरे ठिकाण म्हणजे सगाईन टेकडीवरील महाशिव चाँग हे धर्मक्षेत्र होय. ब्रह्मी भाषेत विहाराला अथवा मठाला चाँग म्हणतात. ह्या टेकडीवर बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणींचे मिळून सुमारे चारशे विहार अथवा मठ त्यांना आढळले. भिक्षूंची संखअया एक हजार व भिक्षुणींची संख्या त्या वेळी सुमारे दोन हजार होती. श्रीयुत महादेवराव मांडे यांच्या प्रयत्नामुळे शिंदे सगाईन टेकडीवर राहण्याची उत्तम व्यवस्था झाली होती. ते सगाईन गावी राहणा-या उ माँ माँ नावाच्या श्रीमंत पारशी गृहस्थाकडे श्री. वासुदेव भिडे ह्यांच्यासह उतरले. श्री. भिडे ह्या पेन्शनर गृहस्थाला महादेवराव मांडे दुभाषी म्हणून पाठविले होते. भिडे यांना ब्रह्मी इंग्रजी व मराठी या भाषा उत्तम अवगत होत्या.

 

ब्रह्मदेशाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांचा शिंदे यांना फारच उपयोग झाला. उ माँ माँ यांनी आपली मोटर देऊन शिंदे यांना टेकडीवरील विहारामध्ये पोहोचविले. तेथे भिक्षू ऊ विलास हे ३२ वर्षांचे व मुख्य फौंजी ऊ कुमार हे ४५ वर्षांचे होते. ह्या दोघांनाही पाली भाषा थोडी थोडी येत होती. परंतु ब्रह्मी भाषेतील त्यांचे उच्चार फार वेगळे असल्याने शिंदे यांना त्यांच्या पालीचा उपयोग झाला नाही. शिंदे यांची उतरण्याची व्यवस्था मठाच्या आवारातील स्वतंत्र बंगल्यात केली होती. सकाळी भिक्षूंची न्याहरी व साडेअकरा वाजता मुख्य जेवण होत असे. त्यानंतर मात्र दुस-या दिवसापर्यंत भोजन मिळत नसे. शिंदे यांच्या जेवणाची ऊ माँ माँ यांनी स्वतंत्रपणे उत्तम व्यवस्था केली होती.


येथील वास्तव्यात अण्णासाहेबांनी भिक्षुणींचे मठ हिंडून पाहिले. इरावती नदीच्या काठी असलेल्या टेकड्यांच्या पाच-सात मैल रांगांमधून जागोजागी हे विहार होते. बरोबर ऊ विलास दाखविण्यासाठी होते. निरनिराळ्या टेकड्या, खोल द-यांवरील उंच शिखरे, उतरणीवरील मठ अशी सर्वत्र रमणीय शोभा दिसत होती. वरपासून खालपर्यंत दाट झाडी, अत्यंत स्वच्छ भूभाग, गर्द छाया आणि झुळझुळ वाहणारी शुद्ध हवा अशी शारीरिक व आध्यात्मिक सुखाची विपुल साधने ह्या पुण्यक्षेत्री भरलेली आहेत अशा शिंदे यांना प्रत्यय येत होता. ह्या पाच-सात मैलांत गृहस्थाश्रमाचा मागमूस नव्हता. भिक्षूंनी भिक्षा मागून तरी अन्न आणावे नाहीतर भिक्षुणींनी त्यांना आणून द्यावे. भिक्षुणींना भिक्षुंइतका मान देण्यात येत नसे. त्यांनी कोरान्न भिक्षा मागावी. जरूर पडल्यास शिजवून भिक्षूंस वाढावे अशी प्रथा होती. कोणी कितीही मोठ्या दर्जाचा व श्रीमंत मनुष्य असो भिक्षूच्या मठात शिरण्यापूर्वी त्याला पायातले जोडे हातात घ्यावे लागत असत. ते न काढल्याबद्दल युरोपियनांचेही खून पडलेले आहेत, असे त्यांच्या ऐकिवात आले. भिक्षुणींच्या मठात मात्र जोडे घालून जाण्यास परवानगी असे. शिंदे यांची तेथे एका विद्वान भिक्षुणीशी भेट झाली. ती आपल्या शिष्यिणीस 'धम्मपद' पुस्तकातील 'सहस्सवग्ग' हा अध्याय शिकवीत होती. समोरून भिक्षू आला तर इतर सामान्यजनाप्रमाणे भिक्षुणीस रस्त्यावर जमिनीला गुडघे व कपाळ टेकून भिक्षूला तीन वेळा नमस्कार करावा लागे. ब्रह्मदेशात व इतर सर्व ठिकाणी ऐहिकबाबतीत स्त्रियांना पुरुषांबरोबर किंबहुना काकणभर अधिकच मान असला तरी धार्मिकबाबतीत मात्र स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव करुन पुरुषांना मोठेपणा दिला जातो हे पाहून शिंदे यांना आश्चर्य वाटले. ह्या भेदाला ब्रह्मदेश जबाबदार नसून हिंदुस्थानातून आलेला बौद्ध धर्म कारणीभूत आहे असा त्यांनी अर्थ लावला.


बौद्ध भिक्षूंना मान देण्याची अजब त-हा शिंदे यांना पाहावयास मिळाली. शिंदे यांचे मुख्य फौंजीशी दोन तास संभाषण चालले होते. ह्या संबंध भेटीत मुख्य फौंजीला भेटायला आलेले दोन श्रीमंत ब्रह्मी गृहस्थ भिक्षूंचा मान राखण्यासाठी मांजराप्रमाणे जमिनीला बिलगून बसले होते. भिक्षू उभा असता उपासकाने ( सामान्य माणसाने ) जमिनीवर बसावे. भिक्षू बसला असता जमिनीला पडून बिलगावे, एकंदरीत भिक्षूपेक्षा उच्च पातळीवर जाऊ नये अशी ही भिक्षूला मान देण्याची ब्रह्मी त-हा शिंदे यांना पाहावयास मिळाली.
सगाईन टेकडीवर श्वे जिन आणि तू धम्म (सुधर्म) असे दोन मुख्य पंथ या टेकडीवर त्यांना आढळले. श्वे जिन हा पंथ बौद्धविनय (बुद्धशिस्त) कडकडीत पाळतो. उदाहरणार्थ, विडी न पिणे, विडा न खाणे, नाटके न करणे, न करु देणे व न पाहणे, पैशात न शिवणे, प्राण्याने ओढलेल्या गाडीत न बसणे, गावात छत्री वगैरे आढ्यतेचा प्रकार न ठेवणे. ह्या पंथामध्ये कित्येक भिक्षू शाकाहारी आहेत. ऊ खंतीच्या (क्षांती) प्रयत्नामुळे ब्रह्मदेशात शाकाहार वाढत असल्याचे त्यांना समजले. निदान गोहत्येला तरी काही प्रमाणामध्ये आळा बसला होता. सुधर्म पंथात इतका कडकडीतपणा नाही असे त्यांना दिसून आले. धर्ममतात मात्र कोणताच फरक नव्हता.


संभाषणाच्या अनुरोधाने शिंदे यांना तेथील भिक्षूंच्या मताबद्दलचा एकांगीपणा व आग्रहीपणा दिसून आला. शिंदे यांनी ब्राह्मसमाजाचे ध्येय सांगण्याचा प्रयत्न केला, पण संकुचित वृत्तीमुळे ते ऐकून घेण्याची त्यांची तयारी दिसेना. ब्राह्मसमाज म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असा त्यांचा गैरसमज होऊन त्यांचा क्षोभ वाढू लागल्याची चिन्हे दिसू लागली. स्वत: ऊ माँ माँ हे दुभाषीपणा करीत होते. त्यांनी चतुरपणाने ऊ कुमारांची समजूत घातली. नाहीतर शिंदे यांना मठातील पाहुणचारास मुकावे लागले असते. शिंदे हे एका मोठ्या धर्मचळवळीचे भिक्षू आहेत व जगामध्ये फिरुन बौद्ध धर्माचा मोठ्या अभिमानाने अभ्यास करीत आहेत हे नीट समजून दिल्यावर त्या बौद्ध भिक्षूंची समजूत पटली.


विठ्ठल रामजी शिंदे हे ह्या मठामध्ये साडेतीन दिवस राहिले. येथील पवित्र वातावरणाचा पहिल्याच दिवशी त्यांच्या मनावर अत्यंत अनुकूल परिणाम झाला. कोणताही विधिसंस्कार न करता स्वत:च्या मनानेच त्यांनी तेथे असेपर्यंत भिक्षूचे व्रत धारण केले. तेथील एकांतवास, शुद्ध चांदणे, कोणत्याही प्रकारची ददात नाही असे वातावरण त्यांना चिंतनाला व ध्यानाला अनुरुप वाटले. त्यांच्या डोळ्यांसमोर बौद्ध धर्माचा इतिहास साद्यंत उभा राहिला व गौतम बुद्धाचे चारित्र्य मूर्तिमंत दिसू लागले. रात्री ते उपासनालयाकडे गेले. दार झाकलेले होते. बाहेरच बसून त्यांनी कितीतरी वेळपर्यंत ध्यान केले. पुन्हा पहाटे हाच अनुभव त्यांनी घेतला.


या मठामध्ये वास्तव्य करणा-यांचे चार वर्ग शिंदे यांना दिसून आले. बाहेरून येणारे विद्यार्थी : १) कोईन् म्हणजे मुंज झालेले पीतांबरधारी, वीस वर्षांखालील शिष्य २) उब जेन् म्हणजे वीस वर्षांवरचे दीक्षा घेतलेले तरुण भिक्षू, ३) मठाचा मालक व चालक ऊर्फ शास्ता. ह्याला फौंजी असे म्हणतात आणि ४) कप्पियादायका नावाचा गृहस्थाश्रमी व्यवस्थापक मदतनीस कोठे कोठे आढळतो. बाहेरून येणारे विद्यार्थी सकाळचे जेवण विहारातच जेवतात. दोन प्रहरानंतर आपल्या घरी जेवून रात्री निजण्यास आपल्या विहारातच येतात. बाकीचे सर्वजण विहारातच राहतात. रात्री अंधार पडल्यावर कोणीही विहाराच्या बाहेर जरुरीच्या कामाविना आणि फौंजींच्या परवानगीशिवाय जाऊ नये असा सक्त नियम होता. अंधार पडल्यावर कोणतीही भिक्षुणी कोणत्याही सबबीवर भिक्षूच्या मठात येऊ शकत नाही.


साधनेच्या बाबतीत एक विशेष प्रकार शिंदे यांना आढळला. ते श्वे जिन पंथाच्या मुख्य आश्रमातील एका खोल गुहेत गेले असता एका कोप-यात उभा केलेले हाडांचा सांगाडा त्यांनी पाहिला. हा सांगडा तेथे लटकावण्याचा उद्देश असा असतो की, त्याच्यावर लय लावून अनित्याची (सर्व जग क्षणभुंगर आहे ही भावना) साधना साधावयाची असते.


उपोसथाच्या (उपवासाच्या) दिवशी उपासकांना (सामान्यजनांना), यात्रेकरुंना किंवा साधारण पांथस्थांना थोडे दिवस उतरण्यासाठी या (धर्मशाळा) एक किवा अधिक असतात. पाण्यासाठी विहिरी, तळी; बहिर्विधीसाठी पायखाने, चिंतनासाठी अगदी एकांत जागी बांधलेल्या झोपड्याही वेगळ्या असतात. बौद्ध विहारातील हा देखावा व तेथील वातावरण शिंदे यांना फारच शांतिदायक वाटले.


उपोषण करण्याचे दिवस म्हणून दोन अष्टम्या, पौर्णिमा व अमावस्या असे महिन्यातून चार दिवस पाळले जातात. त्या दिवशी गृहस्था लोक एकभुक्त राहून उपासनेसाठी विहारात येतात. ह्या दिवशी विद्यार्थ्यांना अनध्याय असतो. पण आश्रमाची झाडलोट करणे वगैरे कामे त्यांना करावी लागतात. आश्रम साधारणत: दहाबारा एकर एवढा विस्तीर्ण असतो. त्या झाडे, गुंफा वाटिका ब-याच असतात. ही सर्व झाडे रमणीय व स्वच्छ ठेवण्यात येतात. हे काम विद्यार्थी व कोईन करतात.


ब्रिटीश सरकारचा ब्रह्मदेशात अंमल सुरु होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षण देण्याचे काम हे बौद्ध विहारच करीत असत. इतर देशांच्या मानाने साक्षरतेचे येथील प्रमाण मोठे असल्याचे कारण हेच. आश्रमात कोणतेही काम मजुराकडून करवून घेण्यात येत नसे. तरीही लहानमोठी सर्व कामे लहानथोर बिनतक्रार व बिनबोभाट करीत असत. फौंजीशी व कोईनशी सर्वांचे वर्तन अत्यंत आदराचे असे. विहारामधील शाळा सरकारी विद्याखात्याने मंजूर केलेल्या असतात. ब्रह्मदेशात सर्वत्र पसरलेले हे विहार बौद्ध धर्माचा जिवंतपणा व उपयुक्तता दाखवितात असे शिंदे यांचे मत झाले.


१७ मार्च रोजी फाल्गुनी पौर्णिमा हा मुख्य उपोषणाचा दिवस होता. ऊ विलासने शिंदे यांना भिक्षुणींचे काही मठ दाखविले. हे मठ भिक्षूणी स्वतंत्रपणाने चालवीत असत. प्रपंचात तर सर्व व्यवहारात ब्रह्मी स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या वर त्यांना आढळला. परमार्थातही स्त्रियांचा हा स्वतंत्र बाणा पाहून शिंदे यांना कौतुक वाटले.


फाल्गुनी पौर्णिमेच्या तिस-या प्रहरी श्वे जिन पंथाचे सर्व भिक्षुक मुख्य मठात जमले. ऊ विलास यांनी शिंदे यांना तेथे नेले. त्या वेळी पालीत प्रदीर्घ प्रार्थना झाली आणि संघाचे ठराविक विधी झाले. अशा प्रकारे साडेतीन दिवसांच्या आपल्या संन्यासाचे पारणे फिटले असेच शिंदे यांना वाटले. ह्या पुण्यक्षेत्रातील अल्पकाळाचा संन्यासधर्माचा अवलंब हाही शिंदे यांच्या मनाला शांती व समाधान देणारा वाटला. १८ मार्चला ह्या रम्य अशा बौद्ध विहाराचा त्यांनी मोठ्या कष्टाने निरोप घेतला. पूर्वेकडील टेकडीच्या उतारावरील पाय-या उतरुन इरावती नदीच्या काठी असलेल्या पडावामध्ये बसून ते अमरपु-यास आले.


ब्रह्मदेशातील बौद्ध धर्मामध्ये असलेले एक विशेष अधिकारपद शिंदे यांना पाहावयास मिळाले. ख्रिस्ती धर्मात जसा पोप हा ख्रिस्ताचा इहलोकाचा प्रतिनिधी व सर्व पाद्रयांचा शास्ता असतो, तशाच प्रकारचा जवळ जवळ बुद्ध प्रतिनिधी म्हणून बौद्ध धर्मात अशा अधिका-यास जागा नाही. मात्र कोणाही भामट्याने पीतांबरधारी होऊन भिक्षू व्हावे आणि धर्मात व व्यवहारात गोंधळ माजवावा अशांचा योग्य बंदोबस्त करण्याच्या हेतूने, त्याचप्रमाणे आपल्या राजकीय अधिकाराला पाठिंबा मिळावा म्हणून हे धर्माधिकारी पद प्राचीन ब्रह्मी राजांनी निर्माण केले होते. बौद्धिक, सामाजिक व नैतिक दृष्टीने जनतेला वर आणण्याच्या कामी मठाचे मालक वा चालक असणारे बौद्ध फौंजी हे महत्त्वाचे प्रभावशाली अधिकारी असत. त्यांच्याच चळवळीवर व महत्त्वाकांक्षेवर योग्य ते नियंत्रण ठेवणे राजकीयदृष्टया शहरापणाचे कृत्य होते. म्हणूनच हे सर्वश्रेष्ठ धर्माधिका-याचे पद हेतुत: निर्माण करण्यात आले असावे असे शिंदे यांना वाटले.


१० मार्च रोजी विठ्ठल रामजी शिंदे मंडाले येथे गेले असता त्यांना एका बुद्ध भिक्षूची अंत्येष्टी पाहण्याचा योग आला. येथे भिक्षूचा अंत्यविधी म्हणजे एक प्रकारे मृत्यूचा उत्सवच साजरा केला जातो. फौंजी अथवा बुद्ध भिक्षू मेला असता त्याच्या पोटातील आतडी वगैरे काढून त्यात मसाला भरून त्याचे शरीर सहा महिने ठेवण्यात येते. त्याची तिरडी पालखीसारखी शृंगारण्यात येते. ठिकठिकाणचे भक्तगण वर्गणी काढून मोठा मांडव घालून फौंजीची तिरडी सजवून ठेवतात.


शिंदे यांना १० मार्च रोजी हा जो अंत्येष्टिविधी पाहावयास मिळाला त्या दिवशी शुद्ध अष्टमीचे चांदणे पडले होते. विहारामध्ये दोन-तीन दिवस मोठी उत्सव चालला होता. सुमारे तीन-चार हजार लोक जमले होते. मेवामिटाईची दुकाने होती. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ व नाच-तमाशे ठिकठिकाणी चालू होते. काही वृद्ध फौंजीदेखील हा उत्सव बघत हिंडत होते. चार उंच खांबावर एक मोठा पाळणा टांगून त्यात मृत भिक्षूची तिरडी झुलती ठेवली होती. त्यावर हिरवे वस्त्र घालून बेगड लावले होते. कोणी भक्तांनी एक रुपया दिल्यावर तेथे असणारा सेवेकरी मोठमोठ्याने रडक्या सुरात प्रार्थना करीत असे. डोळ्यांना पदर पुसून रडण्याचा आवाज काढीत असे. आपल्या इकडे पूर्वी गुजरातेत ज्याप्रमाणे प्रेतयात्रेच्या प्रसंगी भाडोत्री रडणारे असत, तसाच हा प्रकार शिंदे यांना वाटला ख-याख-या शोकाचे अथवा गंभीरपणाचे चिन्ह त्यांना दिसून आले नाही.


मलबारात मातृसत्ताकपद्धती कोणत्या प्रकारची होती याचे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अवलोकन केले तेव्हाच, ब्रह्मदेशातील मातृसत्ताक कुटुंबापद्धतीचे स्वरुप आपण न्याहाळावे असे कुतूहल त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले होते. ब्रह्मदेशातील आपल्या वास्तव्यात शिंदे यांनी बौद्ध मठामध्ये भिक्षुणींच्या संदर्भांत जे निरीक्षण केले, त्यात त्यांना असे दिसून आले होते की, पुरुषवर्गातील भिक्षूंपेक्षा भिक्षुणीचा दर्जा तेथे कमी मानला जातो व स्वत:कडे एक प्रकारचा दुय्यमपणा घेऊन भिक्षुणी ह्या मठामध्ये वावरत असतात. धार्मिक क्षेत्रातील स्त्रियांना मिळणारा हा गौणपणा भारतातून बौद्ध धर्म ब्रह्मदेशात गेलेला असल्यामुळे भारतीय वैशिष्टये तेथेही टिकून राहिली असावीत असा त्यांनी तर्क केला. ब्रह्मदेशात सामाजिक पातळीवर स्त्रियांचे निरीक्षण केले असता त्यांना जाणवले की, ब्रह्मी बायकांना अजूनही पुरुषांच्य जोडीने शिक्षणाचा हिस्ता मिळत नाही. टापटिपीने पोशाख करणे, केस विंचरणे, तोंडाला पावडर लावणे ह्या गोष्टी तेथील स्त्रिया सतत करीत असतात. अगदी दुकानात विक्रीचा व्यवहार करीत असतानाही त्यांचा हा साजशृंगार चालू असे. कुटुंबातील बाजारहाट, खरेदी-विक्री हे व्यवहार ब्रह्मी स्त्रियाच करतात. आपल्या शेतातील तांदूळ युरोपियन कंपनीला ती आपल्या जबाबदारीवर विकते व त्या ती नव-यापेक्षा जास्त फायदा काढते. वस्तुत:  घरची मालकीण स्त्रीच असते व पुरुष तिच्या हाताखाली वागत असतो. मुलाचे लग्न सामान्यत: १८ व्या वर्षी व मुलीचे चौदाव्या वर्षी होत असे. आई-बापांपासून पळून जाऊन लग्न केल्याचेी उदाहरणे नेहमी घडत असत. लग्नानंतर नवीन दंपती मुलीच्या माहेरच दोन-तीन वर्षे राहतात. जावई मुलीच्याच माहेरचा अक अशा रीतीने वागतो. मुलगी एकुलती एक असल्यास मुलीचे आईबाप तिच्या घरातच राहतात. घटस्फोटाची चाल त्यांना सर्रास आढळून आली. ब्रह्मी पुरुष हा श्रीमंत होण्याची अथवा कुठल्याही प्रकारची सत्ता मिळविण्याची महत्त्वाकांक्षा नसलेला संतुष्ट प्राणी आहे, असे शिंदे यांचे मत झाले.


ब्रह्मी लोकांचा व परकीयांचा मिश्र विवाह होण्याला येथे कोणताच अडथळा नसतो. पण असे विवाह फारसे होताना दिसत नाहीत. ब्रह्मी विवाह ही एक अत्यंत साधी गोष्ट असल्याचे शिंदे यांना समजले. तरुण व तरुणींची मने जमली की ती एकत्र राहू लागतात आणि पुढे सवडीनुसार काही मित्रमंडळींना बोलावून आपला विवाह झाला असे जाहीर करतात. घटस्फोटही विवाहाइतकाच तेथे सुलभ आहे. मात्र याचा अर्थ ब्रह्मी लोकांचे वैवाहिक जीवन शिथिल आहेअसा मात्र नव्हे. फक्त विधिसंस्काराचे आणि ब्राह्मोपचारांचे अवडंबर तेथे आले नाही. विवाहपद्धती स्वाभाविक आणि निसर्गस्वभावाशी सुसंगत असल्यामुळे तेथे वेश्या व्यवसायाला अवसरच मिळत नाही. म्हणूनच हिंदुस्थान, युरोप, अमेरिका येथील लहानमोठ्या शहरांतून वेश्या-व्यवसायाचे अथवा लैंगिक दुराचाराचे जे हिडीस प्रदर्शन बघावयास मिळते त्याचा ब्रह्मदेशामध्ये अत्यंत अभाव असल्याचे शिंदे यांना जाणवले.


ब्रह्मदेशाची यात्रा करण्याचे जेव्हा विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात आले होते, तेव्हा त्यांचा एक मुख्य उद्देश बौद्ध धर्माची साधना पाहण्याचा व एकांतावासात काही काळ ध्यानधारणा करावी असा होता. हे निर्वेधपणे करता यावे म्हणून ह्या काळात आपले अभ्यासविषयाचे कुतूहल आवरुन बाजूला ठेवावे असे त्यांनी खरे तर योजिले होते. परंतु ह्या विचित्र देशामध्ये ते जेव्हा संचार करु लागले तेव्हा पुरातत्त्वविद्या, तुलनात्मक भाषाशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादी त्यांच्या आवडत्या अभ्यासविषयांनी त्यांच्यावर एकदम हल्ला चढविला व ब्रह्मदेशात बहिष्कृतवर्ग आहे हे समजल्याने ह्या विषयाबद्दलची आस्था जोरदारपणे उफाळून आल्यामुळे तेथील बहिष्कृतवर्गाचे पद्धतशीरपणे अभ्यासविषय म्हणून निरीक्षण केल्यावाचून त्यांना राहवले नाही. ब्रह्मदेशात जातिभेद नाही, तेव्हा तेथे अस्पृश्यता अथवा बहिष्कृतवर्ग नसला पाहिजे ही सामान्य समजून खोटी पडून गेल्या हजार वर्षांपासून तरी तेथे खितपत पडलेले चारपाच बहिष्कृत मानववर्ग असल्याचे श्वे यो हे टोपणनाव धारण करुन एका इंग्रजाने Burman: His Life and Nation ह्या ग्रंथात केलेले वर्णन वाचून त्यांना आश्चर्च वाटले होते. ब्रह्मदेशात प्रत्यक्ष फिरुन चार वर्गांची स्वत: निरीक्षणे करुन त्यांनी माहिती मिळविली.


ब्रह्मदेशात ब्रिटीश राज्य स्थापन होण्यापूर्वी खालील पाच प्रकारचे बहिष्कृत हीन वर्ग आढळत असत:


पहिला वर्ग : युद्धात जिंकलेले कैदी आणि त्यांचे वंशज यांना देवळातील सेवेला वाहिलेले गुलाम करण्यात येत असे. ह्या वर्गातील लोकांना फयाचून हे नाव होते. फया हा शब्द बुद्ध या शब्दाचा चिनी भाषेतून आलेले अपभ्रंश आहे. हा शब्द ब्रह्मदेशात बुद्ध, त्याची मूर्ती, देऊळ अथवा कोणी सन्माननीय व्यक्ती या सर्वांबद्दल उपयोगात आणला जातो. चून म्हणजे नोकर असा अर्थ आहे.

 

दुसरा वर्ग : स्मशानातील मर्तिकादी अशुभ संस्काराशी संबंध असलेला, थडगी खणण्याची व ती संभाळण्याची वगैरे हीन कामे करणारा ग्रामबाह्म वर्ग तुबायाझा, संडाला डूनसंडाला या नावाने ओळखला जातो. तुबायाझा हा शब्द अशुभ राजा ह्यापासून तर संडाला डूनसंडाला हे शब्द चांडाल, डोमचांडाल ह्या भारतीय नावापासून व्यत्पन्न झाले असावेत.

 

तिसरा वर्ग : महारोगी व इतर असाध्य रोगांनी पछाडलेले व अपंग बनलेले लोक. ह्यांना केबा ( मला मदत करा) असे म्हणतात.

 

चौथा वर्ग : भयंकर गुन्हेगारांना माफी मिळून जेलरचे अथवा फाशी देण्याचे वगैरे बहिष्कृतकाम करणा-या लोकांचा वर्ग. ह्यांना पॅगवे (पोलीस) अथवा लेयोन्टो (चोपदार किंवा छडीदार ) असे नाव असे.

 

ह्या शिवाय तु-डैं-डो म्हणजे राजे लोकांचे हलालखोर म्हणून एक वर्ग पूर्वी असे. मंडालेपासून दहा-बारा मैलांवर यांचा एक गावही आहे असे शिंदे यांना समजले. परंतु प्रत्यक्ष तेथे जाऊन त्यांचे निरीक्षण करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. इतर चार वर्गांतील बहिष्कृतांचे मात्र त्यांनी गावोगावी जाऊन पद्धतशीरपणे निरीक्षण केले व 'ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्ग' म्हणून एक विस्तृत लेख पुमे येथील 'भारत इतिहास संशोधन मंडळा'त वाचला व अन्य नियतकालिकांतही प्रसिद्ध केला. शिंदे यांनी ज्या वेळेला ब्रह्मदेशातील या बहिष्कृतवर्गाचे निरीक्षण केले तेव्हा त्यांची संख्या हिंदुस्थानातील बहिष्कृतवर्गाच्या तुलनेत फारच थोडी म्हणजे एकंदर ब्रह्मदेशातच पाच-सहा हजार एवढी होती. त्यांची स्थिती हिंदुस्थानातील अस्पृश्यवर्गाएवढी करुणास्पद त्यांना वाटली नाही. हे लोक आपले मूळ ठिकाण सोडून व धंदा सोडून अन्य ठिकाणी सर्वसाधारण समाजात वावरु लागले तर इतर लोक त्यांची फारशी पर्वा करीत नसत. आपल्या मूळ गावातदेखील त्यांना हिंदुस्थानातल्याइतके कडक बहिष्कृत मानले जात नसे. तरी पण ह्या लोकांना गावात येण्याला व इतर धंदे करण्याला परवानगी नसे. अस्पृश्यता कडकपणे पाळण्यात जरी येत नव्हती तरी बहिष्कृतांचे व इतरांचे मोकळेपणाने व्यवहार घडत नव्हते. त्यांची स्थिती ब्रह्मदेशातील इतर जनसामान्यांसारखी चांगली नव्हती. शिंदे यांनी फयाचून लोकांचे निरीक्षण मोलमेन शहराजवळील थटून ह्या गावी जाऊन केले. तुबायाझावर्गातील बहिष्कृतांचे निरीक्षण पगान या गावी जाऊन केले व त्यांची प्रत्यक्ष स्थिती अवलोकिली. केबा हा बहिष्कृतवर्ग मंडालेपासून आठ-दहा मैलांवर असलेल्या मेंढाई या गावी वस्ती करुन असलेला त्यांनी बघितला. पँगवे अथवा लेयान्टो ह्या वर्गातील बहिष्कृत हे माफीचे गुन्हेगार असल्यामुळे ब्रिटीश अमदानीत दिसून येणे कठीण होते. ह्या अनेकविध ठिकाणी जाऊन विठ्ठल रामजी शिंदे यांनी या लोकांचा पूर्वेतिहास, त्यांची वर्तमान गृहस्थिती, सध्याचा उपजीविकेचा व्यवसाय व त्यांचा समाजामध्ये असलेला दर्जा याबद्दलची माहिती अनेक जणांच्या मुलाखती घेऊन मिळविली व भेटीच्या स्थलाचे तपशिलाने वर्णन करुन त्यांची जोड या माहितीला दिली. हिंदुस्थानातील अस्पृश्यता हा त्यांच्या संशोधनाविषयक आस्थेचा विषय १९०३ सालापासूनच होता. प्रत्यक्ष अस्पृश्यतेची निर्मिती कशी होते, तिची प्रक्रिया काय असते हे समजून घेण्याच्या दृष्टीने ब्रह्मदेशातील बहिष्कृतवर्गाचे त्यांनी जे निरीक्षण केले त्याचा त्यांना मोठाच उपयोग झाला.

 
ब्रह्मदेशाच्या या दौ-यामध्ये बौद्ध धर्माच्या आचरणाचे विठ्ठ रामजी शिंदे यांना अवलोकन करता आले. त्याचप्रमाणे काही काळ धर्मचिंतनात व तत्त्वचर्चेत घालविता आला.

ब्रह्मदेशातील लोकस्थितीचे, सामाजिक चालीरीतीचे व तेथे अस्तित्वात असलेल्या बहिष्कृतवर्गाचे निरीक्षण करता आले. हा तर त्यांच्या दृष्टीने लाभ होताच त्याचप्रमाणे ब्रह्मदेशात काही महाराष्ट्रीय व काही बंगाली माणसे लोभ करणारी भेटली, याचा त्यांना आनंद वाटला. खरे तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या सात्त्विक पुरुषाच्या समागमाचा लाभ झाला याबद्दल ब्रह्मदेशातील मंडळींना शिंदे यांच्याबद्दल फारच कुतज्ञता वाटून राहिली. दक्षिण ब्रह्मदेशात रंगून येथे विशेषत: बंगाली व्यक्तींच्या पुढाकाराने ब्राह्मसमाज चालविला होता. तेथे डॉ. पी. के. मुजुमदार यांचा पुढाकार होता व महाराष्ट्र मित्र मंडळीमध्ये श्री. रा. न. सबनीस हे पुढाकार घेऊन कामे करणारे उत्साही चिटणीस होते. उत्तरेकडे मंडाले येथे दत्तोपंत सखारामपंत नागवंशे आणि अमरपुरा येथील प्राचार्य महादेवराव मांडे, श्री. पायगुडे, श्री. भिडे ही मंडळी त्यांच्या सहवासात आली व त्यांच्यामध्ये परस्परांवर लोभ जडला. रंगून येथील मुक्कामात डॉ. पी. के. मुजुमदार यांनी मे २७ मध्ये लिहिलेल्या एका पत्रावरुन येऊ शकते. "आपल्या सहवासाने येथील मंडळी अतिशय आनंदित झाली होती व आपली वियुक्ती सर्वांना विशेषच जाणवत आहे. आमच्याबद्दल म्हणायचे झाले तर आपल्या सहवासामध्ये आम्हाला जो आनंदाचा अनुभव आला, त्याचप्रमाणे आपण इथून गेल्यानंतर आम्हाला जे वियुक्तीचे दु:ख झाले, त्याचे वर्णन भाषेच्या साहाय्याने करणे अशक्य आहे. आपल्या गोड आवाजाचा प्रतिध्वनी अजूनही आम्हाला घरामध्ये ऐकू येतो असे वाटते व आपण आमच्या घरातील ज्या खोलीत मुक्काम केला तेथे जाताच आपल्या वास्तव्यातील आनंददायक दिवसाची आठवण झाल्यावाचून राहात नाही. 'प्रवासी' ह्या नियकालिकातील आपल्याबद्दलचा लेख वाचून व अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी आपण जे अविरत कष्ट उपसले त्याची माहिती वाचून अतीव आनंद झाला." ह्या देशाला आपण वारंवार पावनभेट देत राहाल अशी आशा पत्राच्या अखेरीस त्यांनी प्रकट केली.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्वार्थत्यागपूर्वक आयुष्यभर अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी जे कार्य केले त्यामुळे तसेच शिंदे यांच्या साधुतुल्य प्रगल्भ व्यक्तिमत्त्वामुळे ब्रह्मदेशातील त्यांच्या सहवासात आलेली मंडळी अत्यंत प्रभावित झाली होती. त्यांचा ब्रह्मदेशातील मुक्काम संपत आला व त्या वेळेला रंगून येथील महाराष्ट्र मित्र मंडळीने त्यांना निरोपादाखल ३ एप्रिल रोजी सायंकाळी पानसुपारी देण्याचा कार्यक्रम आयोजित केला. ह्या कार्यक्रमातच अकस्मातपणे शिंदे यांना ३५१ रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. बॅ. पाटकर ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. शिंदे यांनी ही थैली कोणत्यातरी सार्वजनिक कार्यासाठी उपयोगात आणण्याची परवानगी मागितली; पण हे पैसे शिंदे यांच्या कुटुंबाच्याच उपयोगासाठी जमविले असून त्यासाठीच त्याचा उपयोग करावा अशी तेथील मंडळींनी आग्रहपूर्वक विनंती केली. ह्या रक्कमेची हुंडी ११ एप्रिल १९२७ रोजी शिंदे यांचे थोरले चिरंजीव श्री. प्रतापराव यांच्याकडे पाठविली व सोबतच्या पत्रात चिटणीस रा. न. सबनीस यांनी लिहिले, "ही रक्कम केवळ कौटुंबिक योगक्षेमार्थ आहे, हे पैसे जमविताना सभासदास ८ मार्च १९२७ रोजी पाठविलेल्या सोबतच्या नकलेवरुन व सोबतच्या थैलीवर लिहिलेल्या मजकुरावरुन आपल्या ध्यानात येईलच." सबनीस यांनी आपल्या पत्रातील 'केवळ कौटुंबिक योगक्षेमार्थ' हे शब्द अधोरेखित केले आहेत हे हाच हेतू श्री. प्रतापराव शिंदे यांच्या मनावर बिंबविण्यासाठी. महाराष्ट्र मित्रमंडळीने सभासदांना ८ मार्च १९२७ रोजी जे पत्र पाठविले. त्या पत्रामध्ये पुढील मजकूर आहे :


"अस्पृश्योद्धारक चळवळीचे जनक व गेली वीस वर्षे त्या सत्कार्यास स्वत:स वाहून घेतलेले रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए. हे बौद्ध धर्म व ब्रह्म संस्कृती यांची माहिती मिळविण्यासाठी येथे आले असून तारीख १५ मार्च १९२७ च्या सुमारास हिंदुस्थानात परत जाणार आहेत.


२) सन १८९८ मध्ये बी. ए. झाल्यावर पैसे मिळविण्याचा धंदा करावयाचे त्यांनी मनात आणले असते तर आज ते बडोदे संस्थानात मोठ्या हुद्द्यावर असते आणि त्यांची घरची मूळची अत्यंत गरिबी होती, हे ध्यानात घेतले म्हणजे आलेली सुखाची नोकरी स्वीकारणे हेच जगाच्या राहटीप्रमाणे स्वाभाविक होते. पण मागासलेल्या, हीन मानलेल्या गरीब अस्पृश्यांविषयी अंत:करणात अत्यंत कळकळा येऊन त्यांनी सुखाची नोकरी स्वीकारण्याचा मोह आवरुन धरिला व जन्मभर गरिबीत राहण्याचा निर्धार करुन अस्पृश्यांची उन्नती करण्याचा निश्चय केला व ते स्वीकृत कार्य अत्यंत यशस्वीरीतीने नावारुपास आणले. त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी त्यांना या कामी सहाय्य केले, पण कुटुंबाची सांपत्तिक स्थिती हलाखीची आहे.


३) रा. शिंदे पैशाबद्दल केव्हाच याचना करीत नाहीत, परंतु स्वार्थत्यागाने व कळकळीने, निर्लोभीपणाने व निर्वेतन जनसेवा करण्यात आयुष्य वेचणा-या विषयी लोकांसच सहानुभूती वाटून त्यांनीच समाजसेवकास सांपत्तिक मदत करुन त्यांचा योग्य परामर्श घेणे व निश्चित मनाने लोककार्य करण्यास त्यांस उत्तेजन देणे आवश्यक आहे, असा विचार करुन रा. शिंदे यांस त्यांच्या दीर्घकालीन व अभिनंदनीय लोकसेवेस साजेशी थैली त्यांच्या कौटुंबिक योगक्षेमार्थ अर्पण करण्याचे मंडळीच्या तारीख २७ फेब्रुवारी १९२७च्या सभेत सर्वानुमते ठरले आहे."


ह्या पत्राच्या अखेरीस, "रा. शिंदे यांस अर्पण करण्यास येणा-या पवित्र थैलीत आपल्या उत्पन्नाचा शक्य तितका जास्तीतजास्त अंश घालावा," अशी विनंती सभासदांस केली आहे. प्रतापरावांना पाठविलेल्या ह्या पत्राच्या नकलेमधील कौटुंबिक योगक्षेमार्थ हे शब्द तांबड्या शाईने अधोरेखित केले आहेत. शिंदे यांच्या त्यागी वृत्तीचा, त्यांनी केलेल्या अपूर्व कार्याचा व त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव रंगून येथील मंडळीवर किती पडला होता याचीच ही घटना निदर्शक आहे.


डॉ. पी. के. मुजुमदार ह्यांनी शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार पुढेही चालूच ठेवला. २१ नोव्हेंबर १९२८ च्या पत्रात त्यांनी आपल्या कौटुंबिक बाबी त्यांना कळविल्या आहेत. कलकत्याच्या ब्राह्म शतसांवत्सरिक उत्सवानिमित्त शिंदे कलकत्याला आले होते, त्या सुमारास ते रंगूनला येथील व पुन्हा आपली भेट होईल अशी मुजुमदार कुटुंबीय आशा बाळगून होते. शिंदे जाऊ न शकल्यामुळे त्यांची फारच निराशा झाली. २९ सालच्या डिसेंबरात शिंदे यांनी कलकत्यास यावे म्हणजे आपली सर्वांची भेट होईल. ही आशा बाळगून त्यांना मुजुमदारांनी आग्रहाची विनंती केली आहे.


रंगून येथील ब्राह्मसमाजीय मंडळींच्या मनामध्ये शिंदे यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली होती. ५ डिसेंबर १९२७ रोजी ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी श्री. बी. के. बसाक यांनी शिदे यांना एक पत्र लिहिले. त्यामध्ये रंगून येथे २० ते २७ जानेवारी १९२८ मध्ये होणा-या माघोत्सवासाठी मुख्य पाहुणे म्हणून शिंदे यांनी यावे अशी सेक्रेटरी बसाक यांनी सर्व ब्राह्मसदस्यांच्या वतीने रीतसर विनंती केली. परंतु शिंदे यांना ब्रह्मदेशाला आणखी एक फेरी करणे त्यांच्या अन्य व्यापांमुळे शक्य नव्हते.


उत्तर ब्रह्मदेशातील मंडालेजवळ असलेल्या अमरपुरा येथील 'साँडर्स वीव्हिंग इन्सिट्ट्यूट' चे प्राचार्य श्री. महादेवराव मांडे, त्यांचे कुटुंबीय तसेच मंडाले येथील नागवंशे, भिडे, पायगुडे ह्या मंडळीच्या मनामध्ये शिंदे यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. वस्तुतः  ह्या मंडळीना ब्राह्मधर्माविषयी फारशी माहिती नव्हती, परंतु शिंदे यांच्या दोन-चार दिवसांच्या सहवासामध्ये ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज याबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. श्री. मांडे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या घरी ब्रह्मोपासना झाली. सौ. मांडे व त्यांचा मुलगा विद्याधर हे श्रद्धेने उपासनेस बसले. ह्या समयी मंडालेहून आलेले श्री. नागवंशे, भिडे हेहे उपासनेस हजर होते. शिंदे यांनी चालविलेल्या उपासनेचा ह्या सर्वांच्या मनावर अत्यंत अनुकूल परिणाम झाला. शिंदे मंडाल्यावरुन परत आल्यावर मांडे, पायगुडे व नागवंशे ह्या तीनही कुटुंबातील मंडळींनी नागवंशे ह्यांच्या बंगल्यावर रविवारचा सर्व दिवस उपासना, चिंतन, भजन, संभाषण व भोजन ह्यात एकत्र घालविला. श्री. महादेवराव मांडे ह्यांच्या मनामध्ये तर शिंदे यांच्याबद्दल अतीव आदराची भावना निर्माण झाली. महादेवराव मांडे हे मूळचे देहू येथील देशस्थ ब्राह्मण. शिंदे यांना निरोप देताना मोठा गहिवर आला. त्यांनी शिंदे यांच्या वहाणा आठवणीदाखल स्वतःला ठेवून घेतल्या आणि बाजारातून पुष्कळ ब्रह्मी चिजा आणून आठवणीदाखल शिंदे यांना भेट दिल्या. ह्या प्रसंगाने एखाद्यावर एवढा विलक्षण प्रभाव पडावा असे विठ्ठल रामजी शिंदे यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते हे जसे जाणवते, त्याचप्रमाणे श्री. महादेवराव मांडे यांच्या ठिकाणी मनोवृत्तीची किती मोठी थोरवी होती, त्यांची आध्यात्मिक वृत्ती उन्नत होती, त्याचप्रमाणे सर्व लौकिक अथवा व्यावहारिक भेदाच्या अलीकडे जाण्याचा अंतःकरणाचा नितळपणा व निकोपपणा कसा होता, हे जाणवून हे दोन्ही पुरुष लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे होते असा ठसा आपल्या मनावर उमटतो.


अण्णासाहेब शिंदे ब्रह्मदेशाहून परत पुण्यास गेल्यावर महादेवराव मांडे यांना पत्र लिहिले व खास सौभाग्यवती मांडे यांच्यासाठी तुकारामांची गाथा व महादेवराव मांडे यांच्यासाठी इतर काही पुस्तके पाठविली. ९ सप्टेंबर रोजी श्री. महादेवराव मांडे यांनी, 'गुरुवर्य शिंदे' यांना पत्र पाठविले व त्यामध्ये आपण आधी एक पत्र पाठवून आपल्याला पाठविलेल्या पुस्तकांची एकंदर किती किंमत आहे अशी पृच्छा केली होती, त्याचे आपण उत्तर पाठविले नाही हे नमूद केले आहे व "आपण आम्हाला भेट देऊन आधीच उपकृत केले आहे. त्यामध्ये ह्या उपकारांचे ओझे अधिकच होत आहे," असे नमूद केले. श्री. महादेवराव मांडे यांनी आपल्या पत्नीने सौ. शिंदे यांना रेशमी कापड व मखमली सपाता भेट म्हणून पाठविल्या असल्याचा उल्लेख केला आहे. शिंदे यांच्या भेटीमुळे ब्रह्मदेशातील ह्या मराठी व बंगाली लोकांमध्ये सोहार्दाचे वातावरण निर्माण झाले ते अपूर्व म्हणावे लागेल. तसेच शिंदे यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व किती प्रभावशाली होते, याचाही पडताळा आपल्याला येतो.