मिशनमधील सहकारी व सहका-यांच्या दृष्टीतून विठ्ठल रामजी शिंदे

१९०६ सालापासून १९२३ पर्यंत म्हणजे सुमारे १६-१७ वर्षे अण्णासाहेब शिंदे यांनी अस्पृश्यवर्गीयांच्या सर्वांगीण सुधारणेसाठी अखिल भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळ अथवा डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था चालविली. विसाव्या शतकाच्या आरंभी हिंदुस्थानमध्ये अस्पृश्यतेचा म्हणून काही एक अखिल भारतीय पातळीवरील प्रश्न आहे, याची फारशी जाणीव कोणाला नव्हती. अस्पृश्यतानिवारणाचेजे थोडेफार प्रयत्न होत होते त्यांचे स्वरूप सामान्यतः स्थानिक पातळीवरचेच होते. अशा काळात व वातावरणात, हा प्रश्न सोडविणे व अस्पृश्यवर्गीयांना बरोबरीने वागविणे हे माणुसकीच्या तत्त्वाला धरून आवश्यक आहे; धर्मदृष्टीने ते कर्तव्य आहे, ह्या नैतिक जाणिवेतून शिंदे यांनी ह्या कार्याला आरंभ केला. शिवाय हा प्रश्न माणुसकीच्या पातळीवरून वेळीच सोडवून, अस्पृश्यता जर सवर्ण हिंदूनी नष्ट केली नाही तर, सामाजिक व राजकीय पातळीवर हा प्रश्न उग्ररूप धारण करील, ह्याचीसुद्धा शिंदे यांना जाणीव होती व ती त्यांनी १९०८ साली बडोदा येथे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या ‘बहिष्कृत भारत’ ह्या व्याख्यानामध्ये प्रकट केली. मात्र शिंदे यांच्या संदर्भात हे लक्षात ठेवले पाहिजे की, अस्पृश्यतेचा प्रश्न निकाली काढणे हे त्यांना माणुसकीच्या, न्यायाच्या व धर्मबुद्धीच्या दृष्टीने अत्यावश्यक वाटत होते. सामाजिक, राजकीय स्वार्थासाठी आवश्यक वाटत होते असे नाही, तर त्यांच्या धर्मबुद्धीमुळे ते आवश्यक वाटत होते.


विसाव्या शतकाच्या प्रारंभी मद्रास, कलकत्ता, मुंबई येथे अस्पृश्यांच्या सुधारणेबाबत जे तुरळक प्रयत्न चालू होते, ते सर्वस्वी स्थानिक पातळीवरचेच होते व अस्पृश्यवर्गातील विद्यार्थियांना शिक्षण द्यावे एवढ्या शैक्षणिक बाबीपुरतेच मर्यादित होते. तो काळच असा होता की, सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आग्रह धरण्याचा विचार स्पृश्यवर्गीय पुढा-यांच्याच काय पण अस्पृश्यवर्गीय पुढा-यांच्यादेखील मनामध्ये आलेला नव्हता. अशा काळामध्ये मिशनसारखी संस्था शिंदे यांनी अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे कार्य करण्यासाठी व अस्पृश्यवर्गाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी स्थापन केली. दरवर्षी काँग्रेस अधिवेशनाच्या जोडीने होणा-या सामाजिक परिषदेमध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न सातत्याने तत्कालीन भारतीय पातळीवरील समाजधुरिणांसमोर मांडून ह्या प्रश्नाबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मिशन ह्या संस्थेची प्रांतिक तसेच भारतीय पातळीवर अधिवेशने भरविली. जसजशी अस्पृश्यवर्गाच्या प्रश्नाबद्दल जागृती वाढत गेली त्याबरोबर त्यांनी अस्पृश्यवर्गासाठी राजकीय हक्क मागावयासही सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नामुळेच डॉ. अँनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर करण्यात आला व अस्पृश्यवर्गाच्या सर्वांगीण सुधारणेचा प्रश्न अखिल भारतीय पातळीवरील प्रश्न आहे व तो सोडविण्याची निकड आहे, ह्या बाबीला काँग्रेसने मान्यता दिली. डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन झाले तो १९०६ मधला काळ व अण्णासाहेब शिंदे यांनी हे मिशन १९२३ साली प्राधान्याने अस्पृश्यवर्गीय व्यक्तींच्या स्वाधीन करून ते स्वतः मिशनच्या जबाबदारीतून बाजूला झाले तो काळ ह्म काळातील तफावत पाहता अस्पृश्यवर्गीयांच्या प्रश्नाबद्दल विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी मिशन ह्या संस्थेच्या द्वारा किती अपूर्व कार्य देशाच्या पातळीव केले ह्याची आपल्याला कल्पना येऊ शकते.


अस्पृश्यवर्गीयांसाठी एखादी संस्था चालविणे व ती दीर्घकाळ टिकवणे ही गोष्ट किती कठीण आहे हे ह्याबाबतीत संस्था काढण्याचे इतर जे प्रयत्न झाले त्यांचे अवलोकन केल्यावर येऊ शकते. खुद्द अस्पृश्यवर्गीयांकडून निदान प्रारंभिक काळात तरी अशा प्रकारे व्यापक पातळीवर संस्था काढण्याचे प्रयत्न झाले नाहीत. शिंदे यांच्या मिशनला अस्पृश्यवर्गीयांकडूनच ज्या वेळेला विरोध होऊ लागला, त्या वेळेस श्री. वा. रा. कोठारी, शिवराम जानबा कांबळे इत्यादी पुढा-यांनी पुढाकार घेऊन डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन यांच्या अध्यक्षतेखाली ‘डिप्रेस्ड क्लासेस कमिटी’ ह्या नावाची संस्था १६ एप्रिल १९२१ रोजी स्थापन केली. परंतु ह्या संस्थेद्वारा अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठी कोणतेही कार्य झाले नाही, एवढेच नव्हे तर ह्या संस्थेच्या रीतसर सभा झाल्या नाहीत, त्यांचा जमाखर्चाचा हिशोब कधी झाला नाही असे शिवराम जानबा कांबळे यांनी श्री. वा. रा. कोठारी यांना पाठविलेल्या एका पत्रावरून दिसते. हे पत्र पुढीलप्रमाणे आहे.१


कामाठीपुरा पाचवी गल्ली,
पुणे.
ता. २/४/१९२८


रा. रा. वा. रा. कोठारी यांस
सा. न. वि. वि.
आपल्या तारीख २७/३/२८चा जोडकार्ड पोहचला. डिप्रेस्ड क्लासेस कमिटीच्या असलेल्या शिल्लक रकमेचा व्यय पुढे कसा करावयाचा असे डॉ. मँन यांनी विलायतेहून लिहून विचारले आहे आणि त्याप्रमाणे आपण ही रक्कम बाबीच्या अस्पृश्य विद्यार्थिगृहाला व येथील चांभार विद्यार्थिमंडळाला द्यावी असे आपले मत व्यक्त केले आहे. तरी आपण दोघांनीच या रक्कमेची विल्हेवाट लावणे हे मला बरे दिसत नाही.


आपली संस्था स्थापन होऊन आज सुमारे सात वर्षे होऊन गेली आहेत. एवढ्या अवधीत जमाखर्चाचा हिशोब कमिटीपुढे एकदाही ठेवण्यात आला नाही. तेव्हा आता आपणाला संस्था बंद ठेवायची असेल तर तिच्या सभासदांची मिटिंग बोलवून ह्या गोष्टीचा विचार कराव अशी माझी सूचना आहे.
आपला
शिवराम जानबा कांबळे

 

श्री. शिवराम जानबा कांबळे हे स्वतः अस्पृश्यवर्गातील कर्तबगार पुढारी होते. श्री. वा. रा. कोठारी हे बुद्धिमान वृत्तपत्रकार असतानाही त्यांना अस्पृश्यवर्गीयांसाठी संस्था चालविणे शक्य झाले नाही असे दिसते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनीही अस्पृश्यवर्गाच्या सर्वांगीण उद्धारासाठी संस्थात्मक पातळीवर कार्य करावे असे योजिले होते. ९ मार्च १९२४ रोजी मुंबई येथील दामोदर हॉलमध्ये निमंत्रित समाजसेवकांची ह्याबाबतीत विचारार्थ बैठक त्यांनी बोलाविली व ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ ह्या नावाची संस्था स्थापन करावी असे योजिले. ‘एज्युकेट, एजिटेड अँण्ड ऑर्गनाईज’ (शिकवा, चेतवा आणि संघटित करा) असे संस्थेचे ब्रीदवाक्य त्यांनी ठरविले व २० जुलै १९२४ रोजी ही संस्था स्थापन झाल्याचे जाहीर करण्यात आले. संस्थेचे अधिपती सर चिमणलाल सेटलवाड, उपमुख्य अधिपती म्हणून जी. के. नरीमन, र. पु. परांजपे, डॉ. वि. पां. चव्हाण, बा. गं. खेर ही मंडळी होती, तर व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर, सेक्रेटरी म्हणून सीताराम नामदेव शिवतरकर, खजिनदार निवृत्ती तुळशीराम जाधव हे होते. सभासद, हिशेबतपासणीस, पंचमंडळी इत्यादी एकंदर ३८ सदगृहस्थ या संस्थेचे पदाधिकार ठरविण्यात आले. संस्थेचे उद्देश म्हणून बहिष्कृतवर्गाच् हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून सवलती मिळविणे; बहिष्कृतवर्गात जागृती करणे व त्यासाठी प्रचारक नेमणे; बहिष्कृतवर्गात हक्कांची जाणीव उत्पन्न करून ते त्यांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणे इत्यादींचा समावेस केला होता. त्याबरोबरच शिक्षणप्रसार करणे; विद्यार्थिवसतिगृहे काढणे; लायक विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देणे; समाजजागृतीसाठी कीर्तने, व्याख्याने वगैरेची व्यवस्था करणे इत्यादी उद्देश नमूद करण्यात आले. मुंबई इलाखा प्रांतिक बहिष्कृत परिषदेच्या वतीने निपाणी येथे एक अधिवेशनही पार पडले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना संस्थेच्या उद्देशात नमूद केल्याप्रमाणे बहिष्कृत हितकारिणी सभेस कार्याचा विस्तार करण्यात फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही. शिवतरकर ह्या सचिवाबद्दल असणारा अन्य सभासदांचा विरोध, त्याचप्रमाणे अंतःस्थ बखेडे यामुळे ही संस्था फारशी कार्यप्रवण होऊ शकली नाही. मॅनेजिंग कमिटीच पंधरा सदस्य होते. घटनेनुसार पाच सदस्यांचा कोरम ठरविण्यात आला होता. कोरमच्या अभावी मॅनेजिंग कमिटीच्या सभाही होऊ शकत नसत असे वत्तान्तवरून दिसते. ‘बहिष्कृत भारत’ ह्या वृत्तपत्राद्वारा लोकजागृतीचे कार्य आपण अधिक परिणामकारकरीत्या करू शकतो असे बाबासाहेबांना वाटले असावे. परंतु हे वृत्तपत्र चालविण्यासाठी जमलेली पुंजी १९२९ सालापर्यंतच टिकली व ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र बंद करणे त्यांना भाग पडले. बहिष्कृत हितकारिणी सभेचे कार्यही अंतःस्थ बेबनावामुळे व सभासदांच्या कार्यप्रवणतेच्या अभावामुळे चालू ठेवणे शक्य झाले नाही, म्हणून १४ जून १९२८ रोजी सभेची एक बैठक घेऊन ही संस्था बंद करण्याचा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांना घ्यावा लागला.२ डॉ. आंबेडकरांसारख्या अस्पृश्यवर्गात जन्मलेल्या लोकोत्तर कर्तृत्वशक्ती असलेल्या पुरुषालाही अस्पृश्यवर्गीयांच्या हितासाठी त्या काळात संस्था चालविणे व तिच्याद्वारा काम करणे शक्य झाले असे दिसत नाही. संस्थात्मक पातळीवर अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी कार्य करणे एवढे दुष्कर असताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळात डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन करून स्पृश्य-अस्पृश्यवर्गातील सगळ्या जातींतील पुढारी, जहाल-मवाळ राजकीय नेते, संस्थानिक तसेच सरकारी अंमलदार ह्या सर्वांचे सहकार्य घेऊन अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याचा भारतभर उठाव केला ही गोष्ट अभूतपूर्वच म्हणावी लागले. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी असलेली अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेसाठीची आत्यंतिक तळमळ, ह्या कार्यासाठी स्वतःचे आयुष्य झोकून त्यांच्यामध्येच राहून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला अपूर्व स्वार्थत्याग, स्वतःच्या त्यागाच्या उदाहरणाने इतरांवर प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्त्व ह्या बाबी तर कारणीभूत आहेतच; शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडून स्वतःचे जीवन स्वार्थत्यागपूर्वक ह्या कामासाठी वाहणारे सहकारी व कार्यकर्ते ते मिळवू शकले. या सहका-यांच्या सहकार्यामुळे ह्या कामाचा अभूतपूर्व विस्तार अण्णासाहेब शिंदे करू शकले.


मिशनच्या कामासाठी माणसे मिळविण्याचा प्रयोग विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्वतःच्या घरापासूनच केला. त्यांच्या भगिनी जनाबाई पनवेलला म्युनिसिपालटीच्या मुलींच्य शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व त्या मिशनच्या कामामध्ये सामील झाल्या. अण्णासाहेबांचे आई-वडील मुलाच्या ह्या कामामध्ये सामील झाले. वडील रामजीबाबा हे मिशनकडून कोणतेही वेतन न घेता मिशनच्या जमाखर्चाचे काम चोखपणे करीत असत. निराश्रित सेवासदनाची स्थापना झाल्यानंतर मिशनच्या धोरणानुसार मिशनच्य कार्यर्त्यांनी व कुटुंबीयांनी अस्पृश्यवर्गीयांत काम करण्यासाठी त्यांच्या वस्तीत राहावयास जावे असे ठरविले होते. त्यानुसार निराश्रित सेवासदनासाठी ग्लोब मिलच्या अस्पृश्य वस्तीतील चाळीमध्ये जागा घेतल्यानंतर अण्णासाहेबांचे वृद्ध आई-वडिल, भगिनी जनाक्का व सय्यद यांचे कुटुंब तेथे राहावयास गेले व अस्पृश्यवर्गीतयांच्या सेवाशुश्रूषेचे काम करू लागले.


सय्यद अब्दुल कादर हे अण्णासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांपैकी बनलेले होते. खरे तर सय्यदांचे वडील सय्यद मीरासाहेब हतरूट हे जमखंडीस बुक-बायंडर म्हणून काम करीत होते. मुसलमान धर्माच्या शरीयतप्रमाणे मुसलमानधर्मीयांचे लग्न कोणासही लावता येते व काजीला फी घेण्याचा अधिकार मुसलमान धर्माच्या कायद्याप्रमाणे नाही, हे सिद्ध करून नवी सुधारणा अमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ह्या बाबतीत लॉ रिपोर्टरच्या काही भागाचे भाषांतर करण्याच्या कामी जमखंडीस इंग्रजी सहावी-सातवीत असताना विठ्ठल रामजी त्यांना साहाय्य करीत होते व तेव्हापासून विठ्ठल रामजी शिंदे यांचा या घराण्याशी स्नेहसंबंध जुळला होता. सय्यद अब्दुल कादर हे मीरासाहेबांचे चिरंजीव अण्णासाहेबांपेक्षा सोळा वर्षांनी लहान होते. त्यामुळे अण्णासाहेबांचे त्यांच्यावर मुलासारखे प्रेम होते व सय्यदांचे कुटुंब अण्णासाहेबांच्या कुटुंबाचा भाग बनून राहिले होते. सय्यद हे आपली बहीण हाजरा हिच्यासमवेत ग्लोब चाळीत मिशनचे काम करण्यासाठी राहिले. सय्यद अब्दुल कादर १९०४ साली मुंबईस अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये प्रथमतः शिक्षक होते. अण्णासाहेब शिंदे यांच्या प्रभावाने, १९०४ साली त्यांनी पं. शिवनाथशास्त्री मुंबईस आले असताना अण्णासाहेबांकडूनच प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. ह्या कारणाने हायस्कूलच्या अधिका-यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. १९०७ साली ते मुंबईला पोर्टट्रस्टमध्ये नोकरी करू लागले. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रभावाने मिशनच्या कामाला वाहून घेण्याचा त्यांनी निश्चय केला व पोर्टट्रस्टमधील नोकरी सोडली आणि ते पूर्णवेळ मिशनचे काम करू लागले. १९०९ साली सारस्वत समाजातील कल्याणीबाई हिच्याशी त्यांचा प्रार्थनासमाजाच्या पद्धतीने विवाह झाला. त्यानंतर हे दोघेही मिशनचे काम करू लागले. १९१२ साली कर्नाटक येथील हुबळी शाखा उघडण्याचे व तिला नावारूपाला आणण्याचे काम सय्यद पतिपत्नींनी चार वर्षे केले. १९१६ नंतर एक वर्ष नागपूर येथील मिशनच्या शाखेचे काम त्यांनी उत्तम प्रकारे केले. पुढे १९२० पर्यंत सय्यदांनी अण्णासाहेबांच्या हाताखाली सहकारी म्हणून पुण्यास काम केले. सय्यदसारखा मुसलमान धर्मातील आजीव कार्यवाह मिशनला हा अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचाच प्रभाव म्हणावा लागेल.


अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या ‘आठवणी’मध्ये आपल्याला मिशनच्या कामामध्ये सहकार्य करणा-या या सा-या सहका-यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून त्यांच्या कामाचा व त्यांच्याकडून मिळालेल्या साहाय्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. मिशनमध्ये असणा-या त्यांच्या सहका-यांनी आठवणीदाखल आत्मनिवेदनपर मजकूर शिंदे यांच्या ‘आठवणी व अनुभव’ ह्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी पाठवून दिला. वामनराव सदाशिवराव सोहोनी हे अण्णासाहेब शिंदे यांचे मुंबईमधील एक उत्तम सहकारी होते. मुंबई येथील मिशनचे काम अत्यंत कुशलपणे व मिशनच्या धोरणानुसार चालविण्यामध्ये सोहोनी यांचा मोठाच वाटा होता.


विठ्ठल रामजी शिंदे हे १९०० साली मुंबईस कायद्याचा अभ्यास करीत असताना मुंबई प्रार्थनासमाजाच्या कामातही सहभागी होत होते. त्यांच्याप्रमाणेच मुंबई समाजाचे काम पाहणा-या तरुणांपैकी वामनराव सोहोनी हे होते. विठ्ठल रामजींनी इंग्लंडमधून सुबोधपत्रिकेसाठी जी पत्रे लिहून पाठविली त्यामुळे समाजामध्ये त्यांच्याबद्दलचा आदरभाव वृद्धिगंत झाला व वामनराव सोहोनी व इतर तरुण त्यांच्या येण्याची उत्कंठेने वाट पाहू लागले. “प्रार्थनासमाजाचे प्रचारक झाल्यावर त्यांनी समाजातील व समाजाबाहेरील अनेक तरुणांना एकत्र करून प्रार्थनासमाजाच्या जीवनात नवचैतन्य उत्पन्न केले,” असे नमूद करून सोहोनी पुढे लिहितात, “त्यांच्यासारक्या कर्तबगार माणसाला गिरगावातील समाजजीवन कार्य करण्यास पुरेसे वाटले नाही, ह्यात आश्चर्य नाही. विलायतेस असताना त्यांनी समाजसेवेच्या भिन्न भिन्न कार्यांचे निरीक्षण केले होते. साहजिकपणे त्यांचे लक्ष अस्पृश्यांच्या दुःखस्थितीकडे वळले.” १९०६ साली होळीच्या दिवशी परळ भागातील अस्पृश्यांची स्थिती पाहण्यासाठी विठ्ठल रामजी व वामनराव सोहोनी परळ भागात गेले होते. अस्पृश्यांच्या करुणामय स्थितीचा परिणाम वामनरावांच्या मनावरही विलक्षण झाला. अण्णासाहेब शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था १९०६ साली स्थापन केली; त्या वेळी सोहोनी हे विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक होते. मात्र त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “पण माझे अंतःकरण निराश्रित साहाय्यकारी मंडळीत होते.” विठ्ठलरावांच्या आग्रहावरून १९०८ साली त्यांनी मुंबई शाखेचे काम अंगावर घेतले. १९०८ ते १९२१ पर्यंत १३ वर्षे त्यांनी मुंबई शाखेचे व काही वर्षे मंडळीच्या असिस्टंट सेक्रेटरीचे काम उत्तम प्रकारे केले. मुंबई शाखेच्या कामाची जबाबदारी सोहोनी पार पाडीत असल्यामुळे त्यांनी लिहिल्याप्रमाणे “रा. विठ्ठलराव येथील काम मजवर सोपवून अस्पृश्यतेच्या कार्याची जागृती करण्यासाठी देशभर दौरे काढीत.

ऊन-पाऊस, थंडी-वारा यांना न जुमानता, सापडेल तेथे वस्ती करावी, मिळेत ते जाडेभरडे जेवावे, तिस-या वर्गातून, कधी कधी चौथ्या वर्गातून (काठेवाडात) प्रवास करावा, अशा प्रकारचे त्यांचे दगदगीचे जीवन होते. त्यांची शरीरयष्टी बळकट व काटक म्हणूनच ते इतक्या प्रचंड गैरसोयीत राहू शकले.” विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे कार्य, धोरण व वृत्ती ह्यांचे जवळून निरीक्षण केलेले वामनराव सोहोनी त्यांच्याबद्दल व मुंबईच्या एकंदर कार्याबद्दल लिहितात, “अस्पृश्यतानिवारणाला रा. विठ्ठलरावांच्या आधी महात्मा जोतीबा फुले यांनी सुरुवात केली. मुंबईच्या प्रार्थनासमाजाने अस्पृश्यांच्या शिक्षणाला अल्पप्रमाणात सुरुवात केली होती. परंतु मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित प्रयत्न रा. विठ्ठलरावांनीच केले.त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळीने अस्पृश्यतेचा प्रश्न आपलासा केला होता. त्यांना अनेक उच्चवर्णीय तरुणांचे साहाय्य मिळाले, पण कार्याची धडाडी रा. विठ्ठलरावांची. अस्पृश्यांनी स्वावलंबी बनावे; उच्चवर्णीयांच्या तोंडाकडे न पाहता आपली सुधारणा आपणच करावी, पण ती करताना दुस-याशी अकारण वितुष्ट वाढवू नये अशी त्यांची दृढ भावना होती व तिला अनुसरून त्यांचे कार्य होई. त्यांनी अस्पृश्य बालकांची स्वतःच्या बालकांप्रमाणे केलेली सेवा मी प्रत्यक्षपणे पाहिली आहे. मुंबईच्या विद्यार्थिगृहात अस्पृश्यांची सर्व जातींची मुले एकत्र राहत व कोणताही भेदाभेद न करता खाणेपिणे होई. त्यांची टापटीप, त्यांची स्वच्छता, त्यांची ज्ञानलालसा, त्यांची वागणूक व त्यांचे परस्पर साहाय्य पाहून विठ्ठलरावांना अत्यंत आनंद होई.”

ह्या शाळा व तेथील वसतिगृह उत्तम प्रकारे व शिस्तशीरपणे चालविण्याचे श्रेय प्राध्यान्याने वामनराव सोहोनी यांच्याकडे जाते. अस्पृश्यवर्गासाठी चालविलेल्या ह्या शाळा मुंबईमध्ये आदर्श म्हणून गणल्या जाऊ लागल्या. ह्या शाळांच्या स्वरूपाबद्दल वामनराव सोहोनी यांनी पुढे लिहिले आहे. “मुंबई शाखेने आठ शाळा चालविल्या होत्या. त्या शाळांची कार्यक्षमता आजूबाजूच्या स्पृश्य रहिवाशांच्या नजरेस आल्यामुळे स्पृश्यांची मुलेही –विशेषतः परळ येथील-मुलामुलींच्या शाळांत प्रविष्ठ होऊ लागली. त्यांच्या संख्येला आळा घातला नसता तर ह्या शाळा स्पृश्यांच्याच झाल्या असत्या. स्पृश्य मुलांच्या भरतीने संस्थेचा हेतू शेवटास जाण्यास बरीच मदत झाली.” विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी १९०६ सालापासून सुरू केलेल्या अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याचे वामनराव सोहोनी हे केवळ साक्षीदार नव्हते तर ह्या कार्यातील त्यांचे सहकारीही होते. संस्थेच्या कारभाराच्या संदर्भात १९२०-२१च्या सुमारास विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी त्यांचे काही मतभेदही झाले होते. १९४०च्या सुमाराला त्यांनी शिंदे यांच्या कार्याचे जे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे मूल्यमापन केले आहे, ते महत्त्वाचे आहे. संस्थेची कार्यक्षमता ज्यामुळे कमी झाली अशा दोन मोठ् चुका विठ्ठलरावांनी केल्या असे नमूद केले आहे. एक मुंबईच्या ऐवजी पुणे हे संस्थेच्या कार्याचे मुख्य ठिकाण केले.

द्रव्यसाहाय्य मिळविण्याच्या दृष्टीने ते निरुपयोगी होते. मुंबईस संस्थेच्या मालकीची इमारत झाली असती तर ह्या कार्याला स्थायी स्वरूप आले असते. त्यांची दुसरी चूक म्हणजे, संस्थेच्या कार्यकारी मंडळात केवळ एकाच राजकीय मतांचा शिरकाव करणे ही होय. ह्या मंडळीचे हातून (वामनराव सोहोनी यांना राजकी.य जहाल मतांचे लोक अभिप्रेत होते. बरेच काम होईल असा त्यांचा विश्वास असावा, पण तो भ्रम ठरला.”


असे असले तरी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचे सहत्त्व वर्णन करताना ते म्हणतात, “मला राहून राहून एका गोष्टीविषयी दुःख होते. अस्पृश्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला हात घातला रा. विठ्ठलरावांनी. त्या कामी कमालीचा स्वार्थत्याग करून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी देशभर जागृती घडवून आणली. ह्या प्रश्नाला राष्ट्राची मान्यता मिळण्याचे यशस्वी श्रमही त्यांचेच. पण अलीकडे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या प्रश्नाचा जेव्हा जेव्हा उल्लेख करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ज्यांनी ह्याबाबतीत केवळ वाचिक कार्य केले आहे अशांनाच झालेल्या जागृतीचे श्रेय अर्पण करण्यात येते व भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी व विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यावर पद्धतशीर बहिष्कार घालून त्यांचा चुकूनही नामनिर्देश केला जात नाही. रा. विठ्ठलराव श्रेयाला हपापले आहेत असा प्रकार नाही. पण अशा संघटित बहिष्काराने सत्याचा अपलाप होते. आपल्या अखिल जीवनाने व सेवाव्रताने रा. विठ्ठलरावांनी आपली केवढी उन्नती केली आहे ह्याची साक्ष देण्याला हजारो अस्पृश्यमंडळी आजही हयात आहेत.” १९४० साल वामनराव सोहोनी ह्यांनी उल्लेखिल्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याची उपेक्षा दुर्दैवाने अजूनही चालू आहे.


श्रीयुत दामोदर नारायण पटवर्धन हे विठ्ठल रामजी शिंदे यांचे मिशनमधील आणखी एक महत्त्वाचे सहकारी. १९०९ ते १९१२ पर्यंत ते मिशनमध्ये केवळ शिक्षक होते. शिंदे यांचा प्रत्यक्ष सहवास घडल्याने व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्याने शिंदे यांच्या ह्या कार्यात केवळ शिक्षक म्हणून वरवरचे काम न करता प्रत्यक्ष प्रचारक म्हणून ह्या कार्याला वाहून घ्यावे, असा त्यांचा निश्चय होऊ लागला. त्यामुळे हायकोर्ट वकिली किंवा सरकारी ट्रेनिंगकडे न जाता ते आपला बराच वेळ संस्थेतच घालवू लागले. १९१२ पासून १९२१ पर्यंत पुणे शाखेमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्य केले. १९१२ साली पुण्यास मिशनने जी महाराष्ट्र परिषद आयोजित केली तीमध्ये “स्वागत कमिटीचे दुय्यम चिटणीस रा. दा. ना. पटवर्धन ह्यांनी ही परिषद घडवून आणण्यासाठी जे अविश्रांत श्रम केले त्याचे वर्णन शब्दाने करवत नाही,” असे विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे. ह्या परिषदेचा सुमारे पाऊणशे पानांचा अहवाल पुस्तकरूपाने प्रसिद्ध करून परिषदेच्या वाङमयात त्यांनी एक संस्मरणीय भर टाकली असेही अण्णासाहेब शिंदे यांनी नमूद केले आहे. पुणे शाखेचे श्री. ए. के. मुदलियार ह्यांच्या हाताखाली त्यांना दक्षतेचे आणि तत्परतेचे वळण लागले होते असे नमूद करून श्री. मुदलियार यांचाही अण्णासाहेब शिंदे यांनी गौरवाने उल्लेख केला आहे. मिशनच्या कामाच्या संदर्भात १९२१च्या सुमारास श्री. दा. ना. पटवर्धन यांचेही विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी मतभेद झाले होते. पण या मतभेदाचे पटल शिंदे यांच्या कार्याचे आकलन आणि मूल्यमापन करताना पटवर्धनांनी येऊ दिले नाही. सुमारे दशकभराच्या निकट सहवासात विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्वभावविशेषांचे दा. ना. पटवर्धन यांना जे दर्शन घडले त्याचे वर्णन त्यांनी पुढीलप्रमाणे केले आहे :


सर्वांशी समानतेची वागणूक : रा. शिंदे मराठा समाजातील प्रख्यात विद्वान असल्यामुळे त्यांच्याकडे श्रीमंत, सरदार, नामांकित विद्वान भेटीला येत असत. त्याचप्रमाणे पत्करलेल्या कामामुळे अस्पृश्यांतील अविद्वान व दरिद्री माणसेसुद्धा येत. अशा वेळी आपणांकडून करता येईल त्यांची कामगिरी करून त्यांना संतोषित करून वाटेला लावणे हे मोठे कौशल्याचे काम आहे. पण हे काम रा. शिंदे आपल्या गोड व सुविनीत वाणीने उत्तम प्रकारे पार पाडीत. अशिक्षितांच्या सभा असोत की, सुशिक्षितांच्या परिषदा असोत प्रत्येक प्रसंगी त्या त्या उपस्थित समाजात योग्य असा शब्दसमूह वापरून त्यांची व्याख्याने होत. आलेल्यांचे आदरातिथ्य आपल्या पदरास खार लावून व घरच्या मंडळींस कष्टवून ते करीत, आपल्या प्रोफेसर व श्रीमंत मित्रांप्रमाणेच अस्पृश्यांनाही ते वागवीत. यामुळेच श्रीमंत व गरीब यांमधील संबंध जुळविणारा हा परोपकारी दुवा माझ्यासारख्यांना फार आवडे. त्यांचा हा माणुसकीचा कित्ता मी आपल्यापुढे ठेवला आहे.


राष्ट्रीय कार्याची तळमळ : रा. शिंदे प्रत्येक पक्षाच्या लहानथोर कार्यकर्त्यास आपला कार्यक्रम नीटपणे समजावून देत व आपल्या कार्यास सर्व पक्षांची जरुरी आहे व हे सर्व पक्षांनी करावयाचे राष्ट्रीय कार्य आहे अशी त्यांची खात्री करून देत. त्यामुळे त्यांचे पक्षातीत धोरण संस्थेला फायदेशीरच झाले. आपण पत्करलेले काम सामाजिक व शिक्षणाविषयक असले तरी वेळोवेळी होणा-या राजकीय व सामाजिक कामांतून इतर पक्षांबरोबर सहकार्य न भिता करीत. कामाची राष्ट्रीयता ओळखण्याची पात्रता व तळमळ ही मी बरेच प्रसंगी अनुभवलेली असल्यामुळे व मला तेच तत्त्व पटल्यामुळे माझी रा. शिंदे यांजवरील निष्ठा वाढली. राष्ट्रीय चळवळीत सर्व पंथ, धर्म, वर्ग व पक्ष एकजीव होऊन झटले तरच यश मिळते. पण कधी कधी रा. शिंदे यांच्या या धोरणामुळे आमच्या संस्थेतील अधिकारी म्हणजे कै. डॉ. भांडारकर, न्या. चंदावरकर इत्यादी सभासदांचा रोषही त्यांना सोसावा लागला.
“सहका-यांशी बंधुत्वाचे वर्णनः वयाने मी लहान असल्याने माझ्याशी ते धाकट्या भावाप्रमाणे वागत व माझ्या कुटुंबातील मंडळींशी तसेच वागत. त्यांच्या कुटुंबातील मंडळी म्हणजे सौ. वहिनीसाहेब  भगिनी जनाबाई ह्या आम्हाला वहिनी-भगिनीप्रमाणेच वाटत व वाटतात. डी. सी. एम. सोडताना आमचा मतभेद व वादविवाद चांगलाच झाला. पण त्यांचे कार्य झाल्यानंतर आता माझ्या मनात मागील स्नेहाची आठवण येते व पुण्यास मी जातो तेव्हा एकदा तरी त्यांचे भेटीस जाऊन येतो. अस्पृश्यतानिवारकाचे रा. शिंदे गुरू असल्यामुळे थोड्याशा मतभेदामुळे त्यांच्या गुणांची योग्यता कमी करणे कधीही अयोग्यच ठरेल.”


शिंदे यांच्या स्वभावविशेषांतून दिसून येणा-या त्यांच्या थोर माणुसकीचे व श्रेष्ठ नैतिकतेचे तसेच त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे वर्णन तर दा. ना. पटवर्धनांनी केले आहेच. ‘अस्पृश्यतानिवारकाचे गुरू’ असे त्यांनी केलेले वर्णन ऐतिहासिकदृष्ट्याही अत्यंत सार्थ म्हणावे लागले.


विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मिशनच्या उत्तरकालीन सहका-यांपैकी गणेश हरी टंकसाळे व कृष्णराव गोविंदराव पाताडे हे प्रमुख होते. १ ऑक्टोबर १९२० रोजी टंकसाळे पुणे शाखेत दाखल झाले. पहिली दोन वर्षे त्यांनी शिक्षकाचे काम केले. त्यांची अस्पृश्यांविषयी कळकळ पाहून व कार्यक्षमथा लक्षात घेऊन अण्णासाहेब शिंदे ह्यांनी त्यांना पुणे शाखेच्या असिस्टंट सुपरिटेंडेंट ह्म जागी नेमले. संस्थेसाठी वर्गणी जमविणे, सभा भरवून त्या पार पाडणे, दुष्काळामध्ये गरिबांना डोल वाटणे इत्यादी संस्थेची कामे त्यांनी आपुलकीने, मेहनतीने व शिस्तशीरपणे केली. १९२९च्या सुमाराला त्यांनी मिशनचे काम सोडले त्या वेळेला त्यांच्या सत्कारार्थ सभा भरवून त्यांना पान-सुपारी करण्यात आली. अण्णासाहेब शिंदे यांच्याबद्दल त्यांच्य मनात अतीव आदराची भावना होती. अण्णासाहेबांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या काव्यातून ही आदराची भावना उत्तम प्रकारे प्रकट झाली आहे.
मिशनच्या कामामध्ये व संस्थेतील अंतर्गत कलहाच्या काळात कृष्णराव गोविंदराव पाताडे यांचे अण्णासाहेबांना विशेष साहाय्य झाले. हे मुरबाडचे मराठा जातीतील गृहस्थ होते. स्वावलंबनाने त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. पुणे, बंगलोर, मुंबई या शाखांमधून मिशनचे काम त्यांनी मोठ्या धडाडीने केले. अण्णासाहेब शिंदे यांचे एकनिष्ठ शिष्य म्हणता येतील अशी त्यांची अण्णासाहेबांप्रमाणेच राजकीय, सामाजिकबाबतीत मते होती व काम करण्याची अपूर्व धडाडी व हातोटीही त्यांच्या ठिकाणी होती. मुंबई शाखेची जबाबदारी त्यांनी काही काळ सांभाळली. पुणे-बंगलोर शाखेमध्येही त्यांनी मिशनचे काम मन लावू केले.


हिंदुस्थानचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भोकरवाडीला व मिशनला भेट घडवून आणण्याचे श्रेय मुख्यतः पाताडे यांचे होते. त्यात त्यांची पाहण्याची आपली इच्छा आहे असे त्यांनी उदगार काढले होते. पुणे भेटीच्या वेळी त्यांना मुळीच वेळ नसल्यामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी बंद ठेवले होते. पण अण्णासाहेब शिंदे यांनी व्हाईसरॉयसाहेबांना एक खाजगी चिठ्ठी लिहून ती श्री. पाताडे यांच्याजवळ दिली. पाताडे हे बालवीर चळवळीत भाग घेत असत. शनिवारवाड्यासमोर बालवीरांचा मोठा मेळा भरविण्याचा कार्यक्रम होता व त्याला मुंबईचे गर्व्हनर सर लेस्ली विल्सन आणि लॉर्ड आयर्विन उपस्थित राहिले होते. बालवीर चळवळीत असलेल्या पाताडेंनी बालवीराचा वेष धारण करून लॉर्ड आयर्विन जिथे उभे होते तिथे शिरकाव करून त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीच्या हातात शिंदे यांची चिठ्ठी दिली. सर लेस्ली विल्सन यांनी त्या सुमाराला नुकतीच भोकरवाडीला भेट देऊन ती पाहिली होती. पाताडे यांनी पोहोचविलेल्या अण्णासाहेबांच्या चिठ्ठीचा योग्य तो परिणाम होऊन गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांच्या शिफारशीवरून लॉर्ड आयर्विन यांनी १ ऑगस्ट १९२६ रोजी रविवारी सकाळी १० वाजता अहल्याश्रमास भेट दिली. बरोबर सर लेस्ली विल्सनही होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. पाहुण्यांना मिशनच्या संस्था दाखवल्यावर भोकरवाडीच्या अरुंद आणि गलिच्छ चाळी त्यांना दाखविण्यात आल्या. दोन एकराहून कमी जागेत दोन हजारांहून जास्त जिवंत माणसे कशी गर्दीने राहतात व अस्पृश्यवर्गीयांची स्थिती कशी कमालीची दरिद्री व कारुण्यपूर्ण आहे, हे व्हाईसरॉयनी समक्ष पाहिले. एका बाईच्या कडेवर एक वर्षाचे उघडे-नागडे मूल होते. ते व्हाईसरॉयनी पाहिले. तेव्हा शिंदे म्हणाले, “हिचे नाव हिंदुस्थानची गरिबी.” पण मुलीच्या आईने तो-याने सांगितले, “हिचे नाव लक्ष्मी.”


१९३० साली म. गांधींनी दांडीचा सत्याग्रह केला. त्या वेळीही कृष्णराव पाताडे यांनी एक धडाडीचे कृत्य केले. काँग्रेस व महात्मा गांधी अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे द्यावे तसे लक्ष देत नाहीत, अस्पृश्यांच्या प्रश्नाची त्यांना आच नाही अशी अण्णासाहेब शिंदे यांची तक्रार होती. म. गांधीबरोबर झालेल्या पत्रव्यवहारात शिंदे यांनी ही तक्रार निर्भीडपणे केलेली होतीच. राजकारणापेक्षाही अस्पृश्यांच्या प्रश्नांकडे म. गांधींनी व काँग्रेसने आपले लक्ष वेधणे आवश्यक आहे असे वाटल्यावरून शिंदे यांच्याशी विचारविनिमय करूनच कृष्णराव पाताडे यांनी एक धडाडीचे कृत्य केले. ते म्हणजे पाताडे व सुभेदार घाटगे यांनी दांडी येथे जाऊन म.गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहाला विरोध दर्शविण्यासाठी तेथील मिठाचे मडके आपल्या ताब्यात घेतले.  ह्या कारणाने तेथे मोठीच दंगल उसळली. पाताडे यांचा हेतू महात्माजींच्या मिठाच्या सत्याग्रहाला विरोध दर्शविण्याचा नव्हता तर मिठाचा सत्याग्रह करण्यापूर्वी अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी सत्याग्रह कराव अशी त्यांची भूमिका होती. सत्याग्रहाच्या ठिकाणी झालेल्या दंगलीचे वृत्त महात्माजींचेया कानी पडल्यावर त्यांना ह्या दोघांचे कौतुकच वाटले. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होऊ नयेत ह्याचा बंदोबस्तही त्यांनी केला. गांधीजींना केलेल्या विरोधाची खूण म्हणून दांडी येथील सत्याग्रहीच्या प्रसंगी हिरावून आणलेले मिठाचे मडके पाताडे यांनी अहल्याश्रमात कित्येक दिवस जपून ठेवले होते. पुणे येथे तुरंगात असताना अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाबाबत महात्माजींनी उपोषण केले होते. त्यानंतर पुणे करार झाला. त्या वेळी शिंदे हे पाताड्यांना बरोबर घेऊन महात्माजींना भेटण्यासाठी येरवड्याच्या तुरंगात गेले. महात्माजींनी पाताडे यांना हसत जवळ बोलावले आणि ते म्हणाले, “दांडी येथील तुमच्या विरोधाची किंमत मी ओळखतो. तुरुंगातून सुटल्यवार एक वर्ष मी तुमच्या अस्पृश्यतेच्या कामाला वाहून घेईन. त्या सबंध वर्षात अस्पृश्यतानिवारणाशिवाय दुसरे काही मी करणार नाही.”


मिशनच्या कामासाठी पाताडे जिवापाड परिश्रम करत असत. २२ मार्च १९३३ रोजी श्रीमंत सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली अहल्याश्रमात एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या तयारीत पाताडे यांना फार मानसिक व शारीरिक कष्ट पडले. पुढील उन्हाळ्यात त्यांच्यामध्ये मानसिक बिघाड होऊन त्यांना वेड लागले व येरवड्याच्या वेड्यांच्या इस्पितळात त्यांना पाठविण्यात आले. तेथे न्युमोनियाचा विकार होऊन १४ एप्रिल १९३३ रोजी त्याचे दुःखद निधन झाले. ह्या सुमारास अण्णासाहेब इंदूर-उज्जयनीकडे प्रवासात होते. पाताडे यांच्या निधनाची वार्ता त्यांना प्रवासातच समजली. त्यांना अतोनात दुःख झाले. कृष्णराव पाताडे हे अण्णासाहेब शिंदे यांना आपल्या मुलाप्रमाणे प्रिय होते. पाताडे कुटुंबीयांच्या नंतरच्या पिढीतही शिंदे कुटुंबाशी त्यांचा स्नेह टिकून राहिला.


डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे काम विठ्ठल रामजी शिंदे उत्तम त-हेने संघटित करू शकले; ह्या कामाचा भारतभर विस्तार करू शकले व अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल अखिल भारतीय पातळीवर जागृती करू शकले, ही त्या काळामध्ये घडलेली अपूर्व गोष्ट म्हणावी लागेल. मिशनला जे यश मिळाले त्याचे कारण शिंदे हे ह्या कामी मदत करणा-या अनेक धुरिणांचे, कर्तबगार व्यक्तींचे साहाय्य घेऊ शकले. ह्या साहाय्यकर्त्यांमध्ये सर नारायणराव चंदावरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०५च्या डिसेंबरमध्ये ‘इंडियन सोशल रिफॉर्मर’ ह्या वृत्तपत्रात भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात यावे व या विचारातून काही फलनिष्पती व्हावी या दृष्टीने शिंदे यांच्या ह्या लेखाला व्यापक पातळीवर प्रसिद्धी मिळण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन दिले. अंत्यज लोकांची भारतामध्ये काय स्थिती आहे, ह्याचे निरीक्षण करण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी कोणते प्रयत्न चालले आहेत व कोणत्या दिशेने आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे हे पाहण्यासाठी शिंदे यांनी १९०३ ते १९०५ ह्या तीन वर्षांच्या अवधीत हिंदुस्थानभर सफरी केल्या. त्यांच्या ह्या सफरींचा चंदावरकरांनी १९०५ सालच्या सामाजिक परिषदेतील आपल्या प्रास्ताविक व्याख्यानात उल्लेख केला. शिंदे यांना सर नारायणरावांनी ह्या कामी प्रोत्साहन दिले.


विठ्ठल रामजी शिंदे यांनी ज्या वेळेला मिशन स्थापन करावयाचे ठरविले त्या वेळेला त्यांनी ह्या संस्थेचे अध्यक्षपद सर नारायणरावांनी स्वीकारावे ही गोष्ट कार्यसाफल्याच्या दृष्टीने व या उपक्रमाला महत्त्व मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारी होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारणामध्ये चंदावरकरांना मोठीच प्रतिष्ठा होती. ते उच्चविद्याविभूषित व सच्चरित अशा प्रकारचे आदरणीय नेते होते. देशाच्या उन्नतीची कळकळ त्यांच्या ठिकाणी होती. इतर अनेक मवाळ नेत्यांप्रमाणे चंदावरकरांची अशी धारणा होती की त्या काळी इंग्रज सरकारशी विरोध न करता सरकारच्या सहकार्यानेच देशकार्य करणे आवश्यक आहे व हेच धोरण अंतिमतः देशहिताचे ठरू शकेल असाही त्यांचा विश्वास होता. चंदावरकरांच्या या राजकीय धोरणामुळे सरकारामध्ये त्यांना मानमरातबव प्रतिष्ठा होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या कामकाजात ते भाग घेत असत व तेथेही त्यांना मोठी मान्यता होती. मुंबई शहराच्या कारभारामध्ये-ते मग मुंबई विद्यापीठ असो, प्रार्थनासमाजासासारखी धार्मिक चळवळ असो, की एखादा शैक्षणिक उपक्रम असो-ते भाग घेत असत. न्या. रानडे व डॉ. भांडारकर यांच्यानंतरच्या पिढीतील ते असल्यामुळे तरुणांचे नेतृत्व ते करीत असत. त्याचबरोबर जुन्या पिढीचा विश्वास संपादन व्हावा अशा प्रकारचे त्यांचे संयमपूर्ण वर्तन व धोरण असल्यामुळे जुन्या व नव्या पिढीचा दुवा सांधण्याचे काम ते उत्तम प्रकारे करू शकत होते. अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे महत्त्व त्यांना समजले होते. म्हणून त्यांनी ह्या कामी अंतःकरणपूर्वक भाग घेतला. ह्या प्रश्नाची सोडवणूक करताना त्यांनी अवलंबिलेले धोरण व मनोवृत्ती उपयुक्त तसेच नैतिकदृष्ट्या उच्च प्रकारची होती. अस्पृश्य मुलाला शिक्षणाचा पहिला धडा देऊन मिशनच्या कामाला प्रारंभ करण्याच्या प्रसंगी त्यांनी जे भाषण केले त्यामध्ये त्यांचा दृष्टिकोण विशद होतो. अस्पृश्यवर्गाची उन्नती करणे म्हणजे आपली स्वतःचीच उन्नती करणे होय. (बाय इलेव्हेटिंग दि डिप्रेस्ड क्लासेस वुइ इलेव्हट अवरसेल्व्हज्.) असे त्यांनी विधान करून अस्पृश्यवर्गाची उन्नती करीत असताना स्वतःकडे मोठेपणा घेणे हे गैर मनोवृत्तीचे द्योतक आहे ह्याचा तर इशारा त्यांनी दिलाच; शिवाय स्पृश्यांनी अस्पृश्यवर्गावर शतकानुशतके अन्याय करण्याचे जे पाप केले व त्यामुळे स्पृश्यवर्गाचे जे नैतिक स्खलन झाले त्याचे परिमार्जन करण्याची ही संधी आहे ह्या दृष्टिकोणातून ह्या कार्याकडे पाहावे अशी भूमिका त्यांनी मांडली.


प्रार्थनासमाजातील कार्यकर्त्यांच्या साहाय्यानेच हे मिशन चालविले जाणार होते तरी ते प्रार्थनासमाजाच्या कामाचा एक भाग म्हणून चालवावे की स्वतंत्रपणे चालवावे असा एक नाजूक प्रश्न मिशनच्या स्थापनेच्या वेळी निर्माण झाला होता. प्रार्थनासमाजाच्या कार्यकर्त्यांत दोन पक्ष निर्माण झाले होते. मिशन स्वतंत्रपणे चालवावे असे विठ्ठल रामजी शिंदे यांना वाटत होते व सर नारायणरावांनी त्यांच्या बाजूनेच कौल दिला. सतत बारा वर्षे ते मिशनचे अध्यक्ष राहिले. अध्यक्ष म्हणून त्यांनी आदर्श स्वरूपाचे काम केले. मिशनच्या कमिटीच्या सर्व सभांना ते वक्तशीरपणे उपस्थित राहत व योग्य ते मार्गदर्शन करीत. त्यांच्या शिस्तशीरपणाचा भार इतर सभासदांवर पडून मिशनचे काम सुरळीतपणे चालण्याला त्यांच्या अध्यक्षपदाचा फारच उपयोग झाला. मिशनची दरसाल १००० रु. वर्गणी ते नेमाने पाठवीत. मिशनच्या कामामध्ये शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने काम करण्याची त्यांना पूर्ण मोकळीक देत असत. मिशन चालविण्याच्या कामी शिंदे ह्यांना सर नारायणराव चंदावरकरांच्या मार्गदर्शनाचा मोठाच लाभ झाला.


मिशनसारखे काम हाती घ्यावयाचे योजिले तर त्यासाठी मोठ्या आर्थिक साहाय्याची स्वाभाविकपणेच आवश्यकता होती. ह्या कामाचे महत्त्व ओळखून आर्थिक साहाय्य करण्यासाठी पुढे सरसावले ते शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला. १८९८ मध्ये ते मुंबई प्रार्थनासमाजाचे सदस्य झाले होते. व्यापारामध्ये त्यांनी विपुल धनसंपत्ती गोळा केली. त्यासाठी ते रात्रंदिवस राबतही असत. परंतु ही सारी धनसंपत्ती वार्वजनिक कामासाठी खर्च करता यावी अशीच त्यांची दृष्टी होती. मुंबईत फोर्टमध्ये पाच लक्ष रुपये खर्च करून पीपल्स फ्री रीडिंग रूम हे वाचनालय त्यांनी स्थापन केले होते. मुंबईत अन्य दहा-बारा ठिकाणी वाचनालये काढली होती. इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण संपवून विठ्ठल रामजी शिंदे हे मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून १९०३ सालच्या अखेर येणार हे ठरलेले असल्यामुळे प्रचारकाच्या वास्तव्यासाठी गिरगावामध्ये राममोहन आश्रम ही इमारत त्यांनी बांधून तयार ठेवली होती. ब्रिस्टल येथील राममोहन यांच्या समाधीच्या जीर्णोद्धार शेठ सुखडवाला यांच्याच आर्थिक साहाय्यामुळे होऊ शकला. परोपकारासाठी लक्षावधी रुपये खर्च करूनही त्यांची वृत्ती अखेरपर्यंत निरहंकारी, शांत व निरपेक्ष राहिली. स्वतःच्या व्यक्तिगत प्रसिद्धीचा तर सोस त्यांना नव्हताच, उलट प्रसिद्धीपासून विन्मुख राहावे अशीच त्यांची वृत्ती होती. पुणे शाखेलाही त्यांनी सात हजार रुपयांची देणगी दिली. शिंदे यांच्य कार्यामुळे दामोदरदास सुखवडवाला यांना त्यांच्याबद्दल फार लोभ वाटत असे. १९०९ साली ते शिंदे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना बरोबर घेऊन महाबळेश्वर येथे एक महिना मुक्कामाला होते. मिशनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार सांभाळला व मिशनच्या कामी शिंदे यांना आर्थिक विवंचना भासू नये याची काळजी घेतली. १३ नोव्हेंबर १९१३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


मिशनला साहाय्यकारी ठरणा-या अन्य ज्येष्ठ व्यक्तींमध्ये डॉ. संतुजी रामजी लाड हेही एक महत्त्वाचे मार्गदर्शक व साहाय्यकारी होते. त्यांचा जन्म धनगर जातीत झाला. जोतीबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा त्यांना मोठा अभिमान असे. मिशनच्या पाच आद्य संस्थापकांपैकी डॉ. संतुजी लाड हे एक होते. मिशनने चालवलेल्या परळ येथील दवाखान्यात ते रोज ठाण्याहून येत असत. ठाण्यापासून परळपर्यंतचा प्रवासखर्चही ते मिशनकडून घेत नसत. वृत्तीने ते अतिशय प्रेमळ होते. त्या काळात १९०६ च्या सुमारास अस्पृश्यवर्गातील रोग्याला डॉक्टर शिवून घेत नसत, अशा काळात डॉ. लाड अस्पृश्य रोग्याला शिवून प्रेमळपणाने त्याची तपासणी करीत असत व औषध देत असत.३ पंढरपूर ऑर्फनेजमधून त्यांनी मुली प्रार्थनासमाजाकडून मागून घेतल्या होत्या. त्यांचा प्रतिपाळ करून त्यांची त्यांनी लग्ने लावून दिली. डॉक्टरीच्या कामामध्ये ते मोठे निष्णात होते. सेवानिवृत्तीच्या काळात मुंबई येथील मराठा प्लेग हॉस्पिटलमध्ये हाऊस सर्जन म्हणून त्यांनी काम केले. दीनदुबळ्यांना मदत करायला ते सदैव तत्पर असत व आपल्या संपत्तीचा विनियोग त्यांनी सार्वजनिक कामासाठी व गोरगरिबांच्य साहाय्यार्थ केला. नोव्हेंबर १९१६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. डॉ. संतुजी लाड यांच्या सेवावत्तीबद्दल व त्यांनी केलेल्या साहाय्याबद्दल शिंदे यांना फार कृतज्ञता वाटत होती.


मुंबई येथे मिशनचे कार्य करीत असताना मुंबई कॉर्पोरेशनमध्ये इंजिनिअर असलेले अमृतलाल व्ही. ठक्कर ऊर्फ ठक्करबाप्पा यांचे शिंदे यांना मोठेच साहाय्य झाले. चेंबूर येथे महालक्ष्मी रोड, माझगाव येथे भंग्यांची चाळ अशा काही ठिकाणी अस्पृश्यवर्गासाठी शाळा उघडण्याच्या कामी ठक्कर यांनी फार मदत केली. काठेवाड आणि बांकीपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात मीशनच्या सभा भरविण्याच्या कामी विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यांनी मोठे साहाय्य केले. पुण्यास भोकरवाडी येथे अहल्याश्रमाच्या इमारती बांधण्याच्या कामी नकाशे व अंदजपत्रके तयार करण्याचे दगदगीचे काम त्यांनी मोठ्या दक्षतेने केले. पुढील काळात भिल्लांची सुधारणा करण्याच्या कामी त्यांनी लक्ष घातले. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या हरिजन संघाची जबाबदारी पत्करून हे काम त्यांनी निरलसपणे चालविले. आदिवासी भिल्लांमध्ये त्यांनी जे स्वार्थत्यागपूर्वक काम केले त्यामुळे ठक्करबाप्पा असे नाव त्यांना मिळाले व हरिजनांच्या सेवेमुळे भारतभर त्यांचा नावलौकिक झाला.


ठक्करबाप्पा यांनी आपल्या ७९व्या वाढदिवसानिमित्त मुंबईस झालेल्या सत्कार-सभेत अण्णासाहेब शिंदे यांचा मोठा आदरपूर्वक उल्लेख करून त्यांच्या आठवणी सांगितल्या. अस्पृश्यतानिवारणाच्या कामी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडूनच आपल्याला प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले असे त्यांच्याबद्दल ठक्करबाप्पा कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. शिंदे यांच्याबद्दल ठक्करबाप्पांनी लिहिले आहे, “ते माझ्या चार गुरूंपैकी एक होते. माझ्या जन्मदात्यानंतर मी त्यांनाच मानतो. त्यांच्या पायाशीच मी सार्वजनिक कार्याचे धडे घेतले. माझ्यापेक्षा ते वयाने लहान असले तरी राष्ट्रहितासाठी करावयाच्या चळवळीबाबतच्या अभ्यासात त्यांची फार मोठी प्रगती होती. ही गोष्ट सर्वज्ञात आहे की, मुंबई प्रांताकडील अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेच्या चळवळीचे ते जनक होते. पंजाब व उत्तरप्रदेश सोडला तर सर्व भारतातील या प्रकारच्या कार्याचा प्रारंभ करणारे ते पहिले पुरुष व या कार्याचे अग्रदूत होते. मी १९०६-०७च्या सुमारास मुंबई म्युनिसिपालटीच्या नोकरीत असताना मैला वाहणा-या भंग्यापेक्षाही करचा हलविण्याचे घाणेरडे काम दोन-तीनशे महार-मांग लोकांकडून करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्या वेळी ह्या लोकांच्या मुलांसाठी शाळा कशा चालवाव्यात व मुंबई येथील या निकृष्ट जातीतील कामगारांसाठी जास्तीतजास्त फायदे कसे मिळवावेत याचे त्यांनी मला शिक्षण दिले. १९०८ साली काठेवाड संस्थानातील एका छोट्या सभेत त्यांनी मला आयुष्यात पहिल्यांदाच बोलायला कसे प्रवृत्त केले तेही मला आठवते. त्या वेळी मी गुजरातीतून जे भाषण केले त्याचे त्यांनी कौतुक करून मला उत्तेजन दिले. मिशनरी म्हणून त्यांना मिळणारा पगार अत्यल्प होता. परंतु त्यांनी जे जीवितमध्येय ठरविले होते, ते पार पाडण्याचा त्यांचा उत्साह प्रचंड होता. स्वेच्छेने पत्करलेले दरिद्री जीवन ते जगत राहिले... तरुण पिढीला शिंद्यांबद्दल फारसे माहीत नाही. ते दूरदृष्टीचे व उच्च ध्येयाने प्रेरित झालेले उदात्त पुरुष होते. एकषष्ठांश भारत असलेल्या पाच कोटी अस्पृश्य गणल्या गेलेल्या वर्गावर सनातन काळापासून जो अन्याय होत होता तो दूर करण्याचे उदात् ध्येय त्यांनी आपल्यासमोर ठेवले होते.”४


प्रार्थनासमाजाचे आणि मिशनचेही काम करीत असताना शिंदे यांना अन्य काही व्यक्तींचेही महत्त्वाचे साहाय्य लाभले. त्यामध्ये सौ. लक्ष्मीबाई रानडे (मृत्यू १७.६.१९१३) ह्या एक होत. न्यायमूर्ती रानडे यांच्या डॉक्टर असलेल्या श्रीधर ह्या बंधूंच्या त्या पत्नी.५ मिशनच्या अनेक जनसेवेच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. त्याचप्रमाणे मिशनला मदत मिळविण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले. गिरिजाशंकर त्रिवेदी (मृत्यू १०.१.१९३२) ह्यांनी प्रार्थनासमाजाचे काम केले तसेच मिशनलाही साहाय्य केले. राममोहन हायस्कूल काढण्याची कल्पना त्यांचीच. पंढरपूर अनाथाश्रमासाठी त्यांनी मोठाच द्रव्यनिधी जमविला. मिशनचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. डॉ. काशीबाई नवरंगे यांनीही मिशनला उत्तम प्रकारे मदत केली.


विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून त्याचप्रमाणे मिशनचे संस्थापक म्हणून द्वा. गो. वैद्य यांचे उत्तम प्रकारचे सहकार्य मिळाले. सुबोधपत्रिकेचे ते सुमारे चाळीस वर्षे संपादक होते. विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडला निघाले असतानाच त्यांनी विलायतेहून सुबोधपत्रिकेसाठी लेख लिहावेत असे वैद्यांनी कबूल करून घेतले होते. शिंदे यांची योग्यता त्यांनी लिहिलेल्या लेखाच्या द्वारा ते भारतात परत येण्याआधी सुबोधप्रत्रिकेच्या वाचकांपर्यंत पोहोचविण्यास वैद्य एक प्रकारे कारणीभूत ठरले. शिंदे यांच्या प्रचारक म्हणून कार्याला तसेच डी. सी. मिशनच्या कार्याला सुबोधपत्रिकेतून यथायोग्य प्रसिद्धी दिली. गरज भासेल त्या वेळेला मिशनची बाजू निर्भीडपणे मांडली. शिंदे यांचे ते व्यक्तिगत पातळीवर चाहते आणि मित्र होते. मिशनची स्थापना केल्यानंतर शिंदे यांच्याबद्दल मुंबई प्रार्थनासमाजामध्ये गैरसमजाचे वातावरण निर्माण झाले व त्याचे पर्यवसान म्हणून १९१० पासून प्रार्थनासमाजाकडून प्रचारक म्हणून मिळणारा पगार घेण्याचे विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी थांबिवले. १९१०च्या नोव्हेंबरमध्ये मुंबई प्रार्थनासमाजाने प्रचारक म्हणून असलेला शिंदे याचा संबंध संपुष्टात आणला. मिशन मुंबईत सुरु केले असल्यामुळे मिशनच्या कामासाठी आणखी काही काळ त्यांनी मुंबईत वास्तव्य करणे आवश्यक होते. शिंदे यांच्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी तर पैशाची गरज होतीच. अशा अत्यंत अडचणीच्या काळात द्वा. गो. वैद्या ह्या कामी आपल्या अनेक परिचितांकडून द्रव्यसाहाय्य मिळवून ते कोणाकडून घेतले आहे ह्याचा पत्ता लागणार नाही अशा बिनबोभाट प्रकारे शिंदे यांच्या घरी दरमहा खर्चासाठी पोहोचते करीत असत. अशा प्रकारचे बिनबोभाट आर्थिक साहाय्य शिंदे मिशनचे ठाणे १९१२ साली पुण्यात हालवीपर्यंत, म्हणजे सुमारे दोन वर्षे शिंदे यांच्या मुंबईतील वास्तव्य काळात द्वा. गो. वैद्य करीत होते. सुबोधपत्रिकेच संपादक म्हणून, त्याचप्रमाणे न्या. रानडे, चंदावरकर यांची चरित्रे व ‘प्रार्थनासमाजाचा इतिहास’ लिहून द्वा. गो. वैदेय यांनी प्रार्थनासमाजाच्या वाङमयामध्ये मोलाची भर घातली. अखेरपर्यंत ते शिंदे यांचे हितचिंतक व मित्र राहिले.


संदर्भ
१.    हरिचश्चंद्रराव नारायणराव नवलकर, श्रीयुत शिवराम जानबा कांबळे यांचे त्रोटक चरित्र आणि पर्वती सत्याग्रहाचा इतिहास, पुणे, १९३०. पुस्तकाच्या प्रारंभी श्री. कांबळे यांच्या हस्ताक्षराचा नमुना म्हणून छापलेले पत्र.
२.    धनंजय कीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकारशन, मुंबई, दु. आ. १९७७, पृ. ५७-६३; आणि (ii) धनंजय कीर यांची कागदपत्रे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
३.    डॉ. ग. वा. खराटे, डॉ. संतुजी रामजी लाड यांचा परिचय, विठ्ठल रामजी शिंदे यांनी पत्राद्वारा कळविलेले माहिती.
४.    ठक्करबाप्पा एटिंथ बर्थ डे कमेमोरेशन व्हॉल्युम, (संपा.) टी. एन. जगुदिका-शामलाल, मद्रास १९४१, पृ. ३४६-४७, उद्धृत इंडियन सोशल रिफॉर्मर, ८ एप्रिल १९४४ वरून.
५.    आनंदीबाई शिर्के, सांजवात, मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९७२.