विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यारंभाच्या काळी प्रार्थनासमाजाच्या आद्य संस्थापकांपैकी डॉ. भांडारकर सोडल्यास कोणी हयात नव्हते. डॉ. आत्माराम पांडुरंग(१८९८), भास्कर हरी भागवत(१८९४), तुकाराम तात्या पडवळ(१८९८), शंकर पांडुरंग पंडित(१८९४), मामा परमानंद व वामन आबाजी मोडक(१८९७), न्यायमूर्ती रानडे(१९०१) ही मंडळी परलोकवासी झाली होती. डॉ. भांडारकरांचे वास्तव्य पुण्यास होते. त्यामुळे सर नारायण चंदावरकर यांच्याकडेच मुंबई प्रार्थनासमाजाचे नेतृत्व होते. जुन्या व नव्या पिढीचा मेळ साधण्याचे कौशल्य चंदावरांकडे असले तरी त्यांना तरुण पिढीचे प्रतिनिधी म्हणणेच रास्त होते.
दोन वर्षांपूर्वी विठ्ठल रामजी शिंदे हे मुंबई प्रार्थनासमाजात एक तरुण म्हणून वावरत होते. प्रार्थनासमाजाच्या रात्रशाळा तपासणे यांसारखे समाजाचे काम ते उत्साहाने करीत होते. क्वचित प्रसंगी प्रार्थनासमाजाच्या व्यासपीठावरून उपासना चालवीत होते. असे असले तरी अल्लड तरुणपणामुळे आणि स्वमताच्या अभिनिवेशात प्रार्थनासमाजाला ते नावे ठेवण्यास कचरत नसत. आता त्याच प्रार्थनासमाजाचे ते एकनिष्ठ सेवक झाले होते. मध्यंतरीच्या काळात घडलेल्या पद्धतशीर शिक्षणामुळे, युरोपातील धर्मसंस्थांचे कार्य बघितल्याने व मुख्य म्हणजे धर्मोपदेशकाची जबाबदारी पत्करल्यामुळे एक प्रकारचा विचारीपणा, पोक्तपणा त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. त्यांच्या आधी श्री. सदाशिवराव केळकर व श्री. शिवरामपंत गोखले ह्या दोघांनी हे प्रचारकार्य केले होते. परंतु शिंदे यांच्या वेळी प्रचारकपदाचे स्वरूप वेगळे होते. प्रचारकार्यासाठी योग्य संस्थेतून तयार होऊन आल्यावर ते जीवितकार्याचा एकमेव हेतू म्हणून पत्करणे, आपल्या कार्याच्या योगक्षेमासाठी समाज जी काही व्यवस्था करील केवळ त्यावरच निर्वाह करणे, कार्याचा विस्तार जसजसा होईल तसतशी साधनसामग्री हातास कशी येते याची प्रचिती घेणे वगैरे गोष्टी अगदी नव्या होत्या. हिंदु, ख्रिस्ती, मुसलमान, बौद्ध यांची तत्त्वे आणि ध्येये जशी निरनिराळी आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या प्रचारकार्यपद्धतीतही वेगळेपणा आहे, हे उमजून ब्राह्मसमाजाने ह्या विविध कार्यपद्धतींचा समन्वय साधलेला होता. ब्राह्मसमाजाला या प्रकारचा समन्वय साधणे भाग होते. मुसलमान पद्धती लोकसत्तात्मक तर ख्रिस्ती पद्धती पितृवात्सल्याची. हिंदू प्रचारपद्धती भिन्न जाती व वर्ग यांच्यामध्ये विभागलेली, राजकारणी; तर बौद्धांची निःसंग उदासीन वृत्तीची. वस्तुतः देवेंद्रनाथांनी घालून दिलेली ब्राह्मसमाजाची उपासनापद्धती ख्रिश्चन पद्धतीची आहे, अशी केली जाणारी टीका शिंदे यांना रास्त वाटत नव्हती. केशवचंद्रावर चैतन्याचा, भक्तिमार्गाचा प्रभाव पडल्याने टाळ, मृदंग आणि पताका यांचा कल्लोळ ब्राह्मसमाजात झाला होता. उपासनापद्धतीचा विचार जरी बाजूस ठेवला तरी ख्रिस्ती लोकांच्या प्रचारपद्धतीत दिसून येणारा जोरकसपणा, सहानुभूती आणि व्यावहारिकता हे गुण शिंदे यांना स्तुत्य वाटत होते. व्यापार करण्याच्या पद्धतीत जर ख्रिस्ती लोकांची व्यावहारिकता आम्ही मुकाट्याने उचलतो, तर धर्मप्रचाराबाबत ती का हेटाळावी असे त्यांचे मत होते.
१९०३ सालच्या अखेरीस आपण प्रत्यक्ष प्रार्थनासमाजाचे कार्य सुसंघटित कसे करावे असा शिंदे यांच्यापुढे प्रश्न पडला. ते जरी एका प्रांतिक समाजाचे प्रचारक झाले होते तरी मुंबई प्रार्थनासमाजाचे कार्य केवळ मुंबई शहरापुरतेच चाललेले होते. पुणे, नगर, सातारा ह्या ठिकाणी जरी समाज होते तरी आर्थिकदृष्ट्या हे समाज मुंबई समाजापासून स्वतंत्र होते. परस्पर मदतीची देवघेव होत असली तरी मध्यवर्ती घटना नव्हती आणि तशी ती करण्याला फारसे कुणी अनुकूल नाही असेच त्यांना दिसून आले.
ब्राह्मधर्माचे विश्वरूपी कार्य, मुंबई प्रांतातील त्याचे असंघटित क्षेत्र यांतून मार्ग कसा काढावा असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. व्यक्तिगत पातळीवरून त्यांनी उपासना चालविणे, धर्मविषयक व्याख्याने देणे या कार्याला आरंभही केला होता. एवढ्यात डिसेंबर महिना जवळ आला. काँग्रेसचे अधिवेशन मद्रास शहरी भरणार होते.
भारतीय राष्ट्रसभेच्या (काँग्रेसच्या) निर्मितीमागे न्यायमूर्ती रानडे यांची प्रेरणा होती. राजकारण हा तिचा प्रमुख उद्देश होता. मात्र न्यायमूर्ती रानडे यांची दृष्टी सर्वांगीण सुधारणेची होती. राजकीय विषयांचा खल करण्यासाठी हिंदी राष्ट्रीय सभा जशी आहे, त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नांचा ऊहापोह करण्यासाठी व सामाजिक सुधारणेचे पाऊल पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक प्रातिनिधिक संस्था असावी असे त्यांना वाटले व त्यांनी सामाजिक परिषदेची स्थापना करून राष्ट्रीय सभेच्या वेळीच तिचे अधिवेशन भरविण्याचा प्रघात सुरू केला. उदार धर्माचा पाठिंबा राष्ट्रीय चळवळीस मिळणे आवश्यक आहे असे न्या. रानडे यांना वाटले व राष्ट्रसभेच्या चौथ्या अधिवेशनापासून म्हणजे अलाहाबादमध्ये १८८८ साली भरलेल्या अधिवेशनाच्या वेळेपासून भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद त्यांच्या प्रेरणेने भरविण्यास प्रारंभ झाला. १९०३ सालचा मद्रास येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या वेळी सामाजिक परिषद भरणार होती. तिचे अध्यक्ष न्या. सर नारायण चंदावरकर होते, तर एकेश्वरी धर्मपरिषेदच्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. सदाशिवराव केळकर होते. ब्राह्मधर्माचे प्रचारक या नात्याने प्रतिनिधी म्हणून या परिषदेस उपस्थित राहण्याची संधी विठ्ठल राजमी शिंदे यांना मिळाली होती. भारतातील एकेश्वरी धर्म परिषदेचे कार्य कसे चालावे याबद्दल त्यांच्या डोक्यात काही कल्पना घोळत होत्याच. शिवाय शिंदे हे नुकतेच अर्धा युरोप फिरून आले होते तरी महाराष्ट्रापलीकडचा भारत त्यांनी अगदी बघितला नव्हता. तो पाहून तेथील लोकस्थिती अजमावणे त्यांना आवश्यक वाटत होते. हिंदुस्थानातील वेगवेगळ्या प्रांती ब्राह्मधर्माची स्थिती कशी आहे याचेही अवलोकन करणे त्यांना जरुरीचे वाटत होते. तेव्हा भारतभर यात्रा करण्याची संधी ह्या राष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने आली होती ती त्यांनी आनंदाने पत्करली आणि खर्चाची तमा न बाळगता मद्रासला जाण्याचे ठरविले. “तत्त्वाने बेहोष झालेल्याला तपशिलाची कदर नसते अशांतला मी एक” असे त्यांनी या प्रसंगाच्या अनुरोधाने स्वतःबद्दल म्हटले आहे.
डिसेंबर १९०३च्या पहिल्या आठवड्यात शिंदे मद्रासला जाण्यासाठी निघाले. सुबोधपत्रिकेतल्या त्यांनी विलायतेहून लिहिलेल्या पत्रामुळे निदान महाराष्ट्रात तरी त्यांचा चांगला परिचय झाला होता. खानापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड, मंगलोर, कालिकत येथे व्याख्याने देत व उपासना चालवीत ते जाणार होते.
ब्राह्मसमाजाच्या धर्मविषयक विचाराच्या वेगळेपणामुळे विशेषतः ह्या धर्मात मूर्तिपूजेला स्थान नसल्यामुळे निदान काही मंडळींना हा भाग रुचणारा नसणार याची शिंदे यांना कल्पना होती. कर्मठ ख्रिस्ती लोकांकडून ब्राह्ममताला विरोध होतो याचा अनुभव त्यांनी मुंबईलाच घेतला होता. मुंबई प्रार्थनासमाजात ३० नोव्हेंबर १९०३ रोजी त्यांनी “तुकारामासारखी आपल्या अंतःकरणाची विकल स्थिती झाली पाहिजे” अशा प्रकारचा जो उपदेश केला होता त्याबद्दल एका ख्रिस्ती माणसाने शिंदे यांच्यावर ज्ञानोदयमधून टीका केली होती. ह्या टीकेचे खंडन सुबोधपत्रिकेने हिरिरीने केले. तीमध्ये असे म्हटले आहे, “हिंदुधर्मात भक्तिमार्गाच्या अनुयायांत जे भक्तशिरोमणी होऊन गेलेले आहेत त्यांची परमेश्वराबद्दलची निष्ठा, त्यांचे प्रेम, त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती यांचे मोजमाप मराठी बायबलातील शुष्क अर्थविरहित वाक्याने होणे नाही. जो खरा भक्त आहे त्यास आपण अत्यंत मलिन आहो, अत्यंत कुटिल आहो असेच सतत वाटत असते.”१ एरव्ही अतिशय संयमाने लिहिणा-या सुबोधपत्रिकेने “आम्ही रा. शिंद्यांचे वकीलपत्र घेतले नाही; व अशा प्रकारच्या टीकेकडे लक्ष देण्याचा आमचा विचार नाही,” असे म्हणत, ‘ख्रिस्तदासांवर’ कठोर शब्दात टीका केली आहे. संयत वृत्तीच्या सुबोधपत्रिकेच्या टीकेची दोन प्रमुख लक्ष्ये होती असे जाणवते. ती म्हणजे राजकीयदृष्ट्या जहाल असलेली मंडळी व कर्मठ ख्रिस्तोपदेशक.
खानापूर येथे वादाचे अथवा मतभेदाचे प्रसंग उपस्थित झाले. परंतु त्याचे स्वरूप वेगळे होते. खानापूर येथील मुक्कामात १० डिसेंबर रोजी शिंदे यांचे ‘ब्राह्मसमाज म्हणजे काय व त्याची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी श्री. तेलंग होते. शिंदे यांनी भाषण शांतपणे व सौम्य भाषेत केल्यामुळे सर्वांना ते पसंत पडले, तरी मूर्तिपूजेसंबंधी एकदोघांनी शंका विचारल्या. वादप्रसंग निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अध्यक्ष तेलंगांनी व्याख्यात्याची बाजू घेतली. वेदोपनिषदकालात मूर्तिपूजा अगदी नव्हती, मूर्तिपूजा ही हिंदू धर्माच्या अवनत दशेची द्योतक आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे विशेष वादप्रसंग झाला नाही.२
शनिवार दिनांक १२ डिसेंबर रोजी बेळगावास एका वृद्धाच्या क्लबामार्फत शिंदे यांचे व्याख्यान ठरले. अध्यक्षस्थानी श्री. रावजी खोत होते. शिंदे यांनी ‘ब्राह्मधर्म’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यावर बराच वादविवाद झाला. श्रोत्यांपैकी श्री. नातू वकील यांनी ब्राह्मधर्म हा धर्म आहे काय? तुमचे तत्त्वज्ञान काय? वगैरे प्रश्न विचारले. पुन्हा सोमवारी दिनांक १४ डिसेंबर रोजी शिंदे यांनी ब्राह्मसमाजाच्या सर्व अंगांसंबंधी सविस्तर व्याख्यान दिले. ब्राह्मधर्माचे सिद्धान्त द्वैतवादास अनुसरून कसे आहेत याचे विवरण केले. तसेच आधुनिक काळात तौलनिक धर्माच्या अध्ययनाने विचारी जगात काय फरक पडला आहे हे त्यांनी सप्रमाण व विस्तारपूर्वक सांगितले. या व्याख्यानानंतर कुणीही आक्षेप घेतले नाहीत. श्री. नातू वकिलांनी आभार मानते वेळी आपले सर्व गैरसमज दूर झाल्याचे सांगितले.
खानापूर-बेळगाव येथील व्याख्यानांवरून मराठी श्रोतृवर्गाला धर्मविषयक विचारांची मांडणी कोणत्या प्रकारे केली म्हणजे पेलवते व रुचते याची एक प्रकारे शिंदे यांना कल्पना होती, असे दिसून आले.
नंतर हुबळी, धारवाड, मंगलोर, कालिकत या ठिकाणी व्याख्याने देत व उपासना चालवीत ते बंगलोर येथे आले. बंगलोरला आल्यानंतर भाषा, संस्कृती या बाबतीत चित्र पालटल्याचे जाणवले. आर्य संस्कतीहून भिन्न असलेली द्रविड संस्कृती आणि तिच्यावरील पाश्चात्त्य संस्कृतीचा वरकरणी प्रभाव असे विचित्र दृश्य त्यांना दिसू लागले. “बाजारात भाजी विकणारी माळीण तुटक्या इंग्रजी शब्दात बोलते; कॉलेजातील एखादा अंडरग्रॅज्युएट तरुण इंग्रजी भाषाच तमिळ स्वरात बोलतो; पायात पाटलोण असली तरी तो अनवाणीच चालतो; गळ्यात कॉलर, नेकटाय असतानाही डोक्यावर काहीच न घेता शेंडीचा मोठा बुचडा तो मानेवर टाकतो अशी अनेक दृश्ये पाहून आपल्या निरीक्षणशक्तीवर फार ताण पडू लागला,” असे त्यांनी विनोदाने नमूद केले आहे.३
नाताळच्या प्रारंभी शिंदे मद्रासला पोहोचले. जॉर्ज टाऊन या भागातील ब्राह्म मंदिरात ते उतरले. ब्राह्मसमाजाच्या एकेश्वरी धर्मपरिषदेसाठी आलेल्या तमिळ, तेलगू, मल्याळ प्रांतातील ब्राह्मबंधूंच्या गाठीभेटी होऊ लागल्या. आंध्र साहित्यसम्राट वीरेशलिंगम पंतलू, कैलासम पिल्ले वगैरे धुरिणांसी त्यांच्या भेटी झाल्या. सामाजिक परिषदेचे अधिवेशन फार चांगले पार पडले. परिषदेसाठी न्या. चंदावरकर आले होते. त्यांचे वक्तव्य आणि भूमिका प्रभावशाली ठरली. न्या. रानडे यांच्यानंतर सामाजिक परिषदेचे पुढारीपण चंदावरकर यांच्याकडे आले होते. ही जबाबदारी ते उत्तम रीतीने पार पाडताहेत हे या अधिवेशनात दिसून आले.
परंतु राष्ट्रीय सभेच्या मुख्य अधिवेशनाच्या वेळी जोरदार वळवाचा पाऊस आला. ह्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे सभामंडप जणू काय वाहून गेला. आयत्या वेळी दुसरी व्यवस्था करणे शक्य नसल्याने राष्ट्रीय सभेचे काम काहीच होऊ शकले नाही.
ब्राह्मसमाजाचे कार्य ह्या दक्षिण प्रांती नीट चाललेले नाही, त्यामध्ये फारच विस्कळीतपणा आहे हे शिंदे यांना जाणवले. त्यामुळे आपले पहिले राष्ट्रीय कार्य म्हणून एकेश्वरी परिषदेची पुनर्घटना करावी ही प्रेरणा त्यांना मद्रासमध्ये झाली. पुढची काँग्रेस मुंबई येथे भरणार होती ही गोष्ट शिंदे यांच्या पथ्यावर पडली.
मद्रासच्या परिषदा आटोपल्यानंतर मुंबईस परत न येता आंध्र, ओरिसा या प्रांतातून दौरा करीत बंगालला जावे व तेथील ब्राह्मसमाजाचा वार्षिक सोहळा बघावा असे त्यांनी ठरविले.
मद्रासमधील त्यांचे वास्तव्य मात्र व्यक्तिगत दृष्टीने सुखाचे झाले नाही. युरोपातील दोन वर्षांच्या वास्तव्यात तिखट खाण्याची सवय त्यांना अगदी राहिली नव्हती. मुद्दाम सांगूनही तेथील गृहिणीकडून कमी तिखटाचे म्हणून मिळणारे जेवण त्यांना असह्य वाटत होते. त्यामुळे त्यांना अर्धपोटी राहावे लागत असे. तेथील हिवाळासुद्धा त्यांना युरोपातील उन्हाळ्यापेक्षा कडक भासत होता. युरोपातून परत आल्यावर स्वदेशाला चालतील असे नवीन कपडे करण्याचे आर्थिक बळ नसल्यामुळे तेच युरोपियन कपडे त्यांना काही काळ वापरावे लागले. “त्यामुळे वरून जरी मी मोठा साहेब दिसत होतो तरी आतून नेहमी पुढच्या प्रवासखर्चाची व प्रकृतीला न मानवणा-या अन्नाची धास्ती बाळगणारा एक कंगाल फकीर होतो,” असे त्यांनी आपल्या अवस्थेचे वर्णन केले आहे.
असा हा मद्रासमधील मुक्काम संपवून १९०४ सालच्या ३ जानेवारीस सकाळी ते बेजवाड्याकडे निघाले. शिंदे यांच्या मनात सदैव ब्राह्म समाजाचे, उदार धर्माचे काम कसे वाढविता येईल यासंबंधी विचार चालत असे. उत्तर मद्रासमध्ये अलीकडील आठ-दहा वर्षांत काही नवीन समाज स्थापन झाले आहेत आणि तेथील विद्यार्थ्यांमध्ये समाजधर्मासंबंधी विशेष आस्था व कळकळ आहे असे थिइस्टिक कॉन्फरन्सला आलेल्या काही तरुणांशी झालेल्या संभाषणावरूनही त्यांना जाणवले होते. म्हणून हे समाज स्वतः पाहावेत, तेथे व्याख्याने द्यावीत व तरुण मंडळींस धीराचे व सल्ल्याचे दोन शब्द सांगावेत या हेतूने ते बेजवाड्याकडे निघाले होते. दुसरा एक विशेष हेतूही त्यांच्या मनात होता. पुढच्या वर्षी मँचेस्टर कॉलेजमध्ये जो ब्राह्म विद्यार्थी जावयाचा तो मद्रास इलाख्यातून जाण्याची फार आवश्यकता होती. ह्या कामास दोन लायक तरुण त्यांच्या डोळ्यांसमोर होते. एक मसुलीपट्टणचे रामकृष्णराव व दुसरे बेजवाड्याचे राजगोपाळराव. हया दोघांशी समक्ष भेटून मँचेस्टर कॉलेजचा आपला अनुभव सांगून एकास तयार करण्याचा त्यांचा हेतू होता. बेजवाड्यापर्यंतच्या प्रवासात रामकृष्णराव सोबत होतेच. त्यांच्याशी संभाषण करून त्यांच्या ब-याच शंकांचे निरसन त्यांनी केले. दुस-या दिवशी सकाळी राजगोपाळराव यांच्याशी कळकळीचे संभाषण झाले. हे दोघेही तरुण त्यांना होतकरू वाटले. त्यांच्यापैकी एक मँचेस्टर कॉलेजला जाण्यास तयार होईल अशी आशाही त्यांना वाटली.
संध्याकाळी लायब्ररीत दहा-बारा विद्यार्थी उपासनेसाठी जमले होते. ब्राह्मसमाज म्हणजे काय? ह्या संबंधी शिंदे यांनी तरुण विद्यार्थ्यांसमोर विवेचन केले. दुस-या दिवशी सकाळी गंतूरला निघून नऊ वाजता पोहोचले. संध्याकाळी तेथील अमेरिकन एव्हान्जेलिकल कॉलेजात उपासना चालवून ‘अनुष्ठान’ ह्यावर उपदेश केला. ‘नापिताचे परी वरी वरी बोडी। परी आंतरिची वाढी उणी नोहे’। या नामदेवाच्या अभंगाच्या आधारे विवेचन केले. दुस-या दिवशी संध्याकाळी तेथेच ‘रिफॉर्म ऑन रिलिजस लाइन्स’ ह्यावर व्याख्यान दिले.४
ह्या दौ-यात जगन्नाथपुरी आणि कलकत्ता येथील मंदिरांमध्ये आपल्या येथील तीर्थस्थानांना व देवळांना किती ओंगळ, गलिच्छ आणि बीभत्स रूप आलेले आहे हे त्यांना जवळून निरखता आणि अनुभवता आले. जगन्नाथपुरीच्या देवळातील महंत बडवे अत्यंत स्वार्थी, कठोर मनाचे आणि पैसे मिळविण्याच्या विद्येत तरबेज असे त्यांना दिसले. जगन्नाथजीला भोग म्हणून रोज एक मणाचा भात शिजविला जायचा. रांजणात भरून ठेवलेल्या शिळ्या भातातच ताजा भात मिसळला जायचा व तोच यात्रेकरूंना खापरांतून विकला जायचा. जगन्नाथजींचा प्रसाद म्हणून चढाओढीने विकला जाणारा हा भात तोंडात घालण्याच्याही लायकीचा नसे. देवळाच्या फरसबंदीवर ह्या सांडलेल्या भाताची पुटे चढून घसरगुंडी झालेली, असे ओंगळ दृश्य सर्वत्र पाहावयास मिळत होते. गाभा-यातील देवाची मूर्ती तर अत्यंत भेसूर, बायकामुलांच्या अंतःकरणात धडकी भरविणारी अशी दिसली. जगन्नाथजींचे मंदिर सुंदर नसले तरी द्राविड संस्कृतीमधील मदुराई वगैरे अन्य ठिकाणच्या देवळातल्याप्रमाणे येथेही सर्व भिंतीवर कानाकोप-यांत खालपासून वरपर्यंत बीभत्स चित्रे कोरलेली. मंदिरामध्ये अश्लील, बीभत्स चित्रे कोरण्यामागे द्राविडांची एक कल्पना त्यांनी नमूद केली. ती अशी की, काही वाईट माणसांच्या दृष्टीत सुंदर वस्तूंचा भंग करण्याची शक्ती असते म्हणून त्यांच्या दृष्टीची लालसा कुरूप वस्तूत लय पावून सुंदर वस्तु सुरक्षित राहावी.
देऊळ बघितल्यानंतर मनावर झालेला परिणाम नाहीसा करावा या हेतूने शिंदे
समुद्रकिना-यावरील सुंदर व विशाल वाळवंटावर गेले. अनंतत्वात परमेश्वराचे अस्तित्व जाणवून घेणा-या शिंद्याच्या मनात आले, ‘जगाचा खरा नाथ कोठे आणि हा तोतया जगन्नाथ कोठे!’
जानेवारीच्या मध्याच्या सुमारास शिंदे कलकत्त्यास पोहोचले. तेथे माघोत्सव चालू होता. बंगाली वर्षाचा माघ महिना आपल्याकडील पौष महिन्यात येतो. त्यांच्या संपूर्ण माघ महिन्यात हा उत्सव चालू असतो. साधारण, नवविधान आणि आदी हे ब्राह्मसमाजाचे तीन पक्ष स्वतंत्रपणे हा उत्सव चढाओढीने करीत असतात. मुख्य उत्सव साधारणपणे २४ जानेवारीला येतो. बंगाल्यातील लहानथोर स्थानिक समाजातून ब्राह्म कुटुंबे मोठ्या श्रद्धेने ह्या उत्सवासाठी कलकत्त्यास येतात. सर्वांची व्यवस्था एकत्र केली असल्यामुळे परस्परांच्या परिचयाचा लाभ त्यांना होतो. मुख्य दिवशी पहाटेपासून भजनाला सुरुवात होते. टाळ-मृदंगाचा घोष चालतो. लताफुलांनी मंदिर सुशोभित करण्याचे काम आदल्या दिवसापासून चालू असते. तीन तास प्रवचन चालते. एकंदर सात तास ही मुख्य उपासना चालते. ह्या वर्षी मुख्य उपासना पंडित शिवनाथशास्त्री यांनी चालविली. ती अत्यंत भक्तिरसपूर्ण अशी होती. शिंदे यांच्या मनावर तिचा मोठा परिणाम झाला. शास्त्री महाशयांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते. शिंदे यांच्याजवळ प्रसिद्ध ब्राह्म पुढारी बॅरिस्टर आनंदमोहन बोस बसले होते. त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रुधार चालली होती. कलकत्त्यातील ब्राह्मोत्सव कसा चालतो हे शिंदे यांना अनुभवण्यास मिळाले.
कलकत्त्याच्या मुक्कामातील शिंदे यांच्या दृष्टीने आणखी दोन संस्मरणीय घटना म्हणजे महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर व प्रतापचंद्र मुझुमदार यांच्या भेटी. ३० जानेवारी १९०४ रोजी
तिस-या प्रहरी पंडित शिवनाथशास्त्री यांनी शिंदे व लाहोरचे प्रचारक भाई प्रकाशदेव यांना महर्षी देवेंद्रनाथ यांच्या भेटीस नेले. ब्राह्मसमाजातील तीन प्रमुख विभूतींपैकी देवेंद्रनाथ हे एक गणले जात. (कविवर्य रवींद्रनाथ टागोर हे महर्षी देवेंद्रनाथांचे पुत्र). हे तिघेजण त्यांच्या भेटीस गेले त्या वेळेला ते आपल्या घराच्या दुस-या मजल्याच्या कोचावर बसले होते. पंडित शिवनाथशास्त्र्यांनी शिंदे यांची गौरवपूर्वक ओळख करून दिली व मुंबईला राममोहन आश्रमाची उभारणी झाल्याची हकिकत सांगितली. अशा रीतीने मुंबईकडे नवचैतन्य निर्माण झाल्याचे ऐकून महर्षींना गहिवर आला आणि त्यांनी शिंदे यांच्या अंगावरून हात फिरविला. ह्या महापुरुषाच्या दर्शनाने त्यांनाही फार धन्यता वाटली. महर्षी देवेंद्रनाथ शिंद्यांना उद्देशून म्हणाले, “मी आता फार थकून गेलो आहे. शिवनाथ आणि तू आमचे कार्य पुढे चालव.”५
दुसरी महत्त्वाची भेट म्हणजे ब्रह्मानंद केशवचंद्र सेन यांचे शिष्य प्रतापचंद्र मुझुमदार यांची होय. बाबू प्रतापचंद्र मुझुमदार यांनी लिहिलेले केशवचंद्र सेन यांचे इंग्रजी चरित्र यांनी बी. ए. चा अभ्यास करताना वाचलेले होते. त्यांच्या या चरित्राचा विलक्षण परिणाम शिंदे यांच्या मनावर त्या वेळी झाला होता. शिंदे ब्राह्ममंदिरात गेले त्या वेळी बाबू प्रतापचंद्र मुझुमदार उपासनेला बसले होते. “शुभ्र लोकरी शाल, त्यावर त्यांची शुभ्र व विपुल दाढी, भव्य कपाळ, पाणीदार डोळे” असे त्यांचे दर्शन शिंदे यांना मोठे प्रेरक वाटले. प्रतापबाबूंचे इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व अपूर्व असल्याचे त्यांना जाणवले. ‘ओ गॉड ऑफ ऑल नेशन्स!’ या शब्दांनी त्यांनी आपली गंभीर प्रार्थना इंग्रजीत सुरू केली. ती आत्म्याला हालवून जागी करणारी आहे असा त्यांना अनुभव आला. हे दोन्ही महापुरुष पुढच्या वर्षीच वारल्याची दुःखद बातमी शिंदे यांना ऐकावी लागली. या दुःखात शिंदे यांना एवढेच समाधान होते की, कलकत्त्याच्या फेरीत या दोघांच्याही भेटीचा योग साधता आला. त्यांचे प्रेरक शब्द ऐकावयास मिळाले.
जगन्नाथपुरीतील मंदिरापेक्षाही अत्यंत किळसवाणा आणि निर्दय देखावा त्यांना कलकत्त्यास कालिमातेच्या देवळात पाहावयास मिळाला. नारळाची दुकाने असावीत त्याप्रमाणे येथे लहान लहान कोकरांची दुकाने होती. कित्येक दिवस खावयास न मिळाल्याने हे प्राणी अत्यंत रोडावलेले दिसत होते. मंदिर हुगळी नदीच्या काठी आहे. कालिमातेची मूर्ती अत्यंत भेसूर असून तिच्या तोंडातून भली मोठी जीभ बाहेर आलेली पाहून नवख्याच्या पोटात धडकी भरावी असे ते दृश्य होते. भक्त लोक कोकराला नदीत बुडवून आपणही सचैल स्नान करून वधस्थानी येतात. तेथील ब्राह्मण पुजारी दोन लाकडांमध्ये त्या बिचा-याची मान घालून एका झटक्यासरशी शिर धडावेगळे करतो व गरम रक्ताचा टिळा भक्ताच्या कपाळाला लावून त्याचा नवस पूर्ण करतो. असे चाळीसएक बळी अंगणातून अस्ताव्यस्त पडलेले शिंदे यांना दिसले. अंगणभर रक्तामांसाचा चिखल साठला होता. जगन्नाथाच्या देवळातील वैष्णव शोभा असो की, कालिमातेच्या मंदिरातील शाक्तांच्या लीला असोत, हिंदू धर्माची पुरातन काळापासून चाललेली ही अखंड विटंबना पाहून यांचे मन उद्विग्न झाले. हिंदू धर्माची उज्ज्वल स्थाने अन्यत्र आहेत हे मनोमन मान्य करूनही मूर्तिपूजेच्या नावाखाली चाललेला हा भयंकर प्रकार त्यांना उद्वेगकारक वाटला. या क्षेत्रात हिंदू धर्मी सुधारणा करणा-या महात्म्यांना अद्यापि सनातन्यांकडून विरोध होत असावा ही वस्तुस्थिती दुःखदायक वाटली.
शिंदे यांनी आपल्या आयुष्याच्या कार्यकालात यापुढेही भारताच्या विविध प्रांतांचा दौरा केला. मात्र या पहिल्या दौ-यात प्रथम त्यांना भारतीय जीवनाचे, तेथील लोकस्थितीचे जे स्वरूप पाहावयास मिळाले ते त्यांना निश्चितपणे बोधकारक वाटले असणार. सर्वसामान्य माणसे धर्माच्या बाबतीत, मूर्तिपूजेच्या बाबतीत कसा विचार करतात हे व्याख्यानप्रसंगी उमजून आले. हिंदुस्थानातील लोकजीवनात झालेले विविध संस्कृतींचे मिश्रण व त्यावर पडलेले पाश्चात्त्य संस्कृतीचे आवरण ध्यानात आले. हिंदुस्थानातील ब्राह्मधर्माच्या चळवळीतील विस्कळीतपणा जाणवला व तिला संघटित करण्याची आवश्यकता त्यांच्या मनावर ठसली. ब्राह्मधर्मप्रचाराबद्दल उत्साह वाटावा असे काही तरुणही भेटले. वैष्णव-शाक्तांच्या रूढ उपासनेचे उद्वेगकारक प्रकार पहायला मिळून उदार धर्ममताचा प्रसार जोमदारपणे करण्याची निकड त्यांना जाणवली आणि महर्षी देवेंद्रनाथ टागोर व बाबू प्रतापचंद्र मुझुमदार यांच्या भेटी उत्साहवर्धक व प्रेरक वाटल्या. कलकत्त्याला आपल्या
दौ-याची समाप्ती करून ते थेट मुंबईस परतले.
संदर्भ
१. सुबोधपत्रिका, ६ डिसेंबर १९०३.
२. तत्रैव, १३ डिसेंबर १९०३
३. विठ्ठल रामजी शिंदे, ‘बंगळूरच्या रस्त्यातील एक फेरी,’ लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. ६९-७१.
४. सुबोधपत्रिका, ७ फेब्रुवारी १९०४.
५. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १५८.