२९ मार्च १९२३ रोजी अण्णासाहेब शिंदे यांचे निवेदन ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध झाले, त्याच दिवशी पुणे शाखेच्या सर्व वर्गणीदारांची साधारण सभा सूचनेनुसार भरली. अण्णासाहेब शिंदे यांनी संस्था अस्पृश्यवर्गीयांच्या स्वाधीन करण्याचा जो मनोदय निवेदनामधून प्रकट केला होता त्यानुसार लगेच कार्यवाहीला प्रारंभ त्याच दिवशी भरविलेल्या मिशनच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आला. अर्थात पुणे शाखेच्या सर्व वर्गणीदारांची ही साधाण सभा होती. ह्या सभेला ७७ सभासद व नसलेले १२ गृहस्थ हितचिंतक म्हणून हजर होते. ह्या सभेने पूर्वीच्या कमिटीत भर घालून अस्पृश्यवर्गाच्या सभासदांचे बहुमत राहील असे केले व तिजला नवीन नियमांची घटना करण्याचा अधिकार दिला. ह्या नव्या घटनेचा खर्डा सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यासाठी १५ एपिल १९२३ रोजी पुढची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. पुनर्घटनेचे काम होत असताना काही मिशनमधील व काही बाहेरील लोकांकडून अडवणुकीचा मार्ग अवलंबिण्यात आला. वर्तमानपत्रातमध्येही ह्याची जाहीर वाच्यता होऊन क्वचित त्याला जातीय स्वरूप देण्याचाही प्रयत्न झाला. परंतु अण्णासाहेब शिंदे यांनी जे धोरण जाहीर केले होते ते सामान्यतः अस्पृश्यवर्गाला प्रिय झाले व महार, मांग, चांभार व भंगी इत्यादी जातींचे पुढारी आपसातील पुष्कळ दिवसाचे बखेडे विसरून आपले हित ओळखून एकोप्याने काम करू लागले. कमिटीच्या सभा दररोज रात्री होऊ लागल्या. कमिटीने नव्याने केलेला घटनेचा खर्डा मंजूर करून घेण्यासाठी १५ एप्रिल १९२३ रोजी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. ह्या सभेस केवळ सभासदांनाच उपस्थित राहण्याचा अधिकार होता व त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवण्यात आला. नियमांची नवी घटना मंजूर करण्यात आल्यावर पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सभासद नव्याने निवडण्यात आले. ह्या सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या मंडळींमध्ये शिवराम जानबा कांबळे, विठ्ठल रामजी शिंदे, श्री. रा. थोरात, डॉ. खेडकर, मा. भि. कदम, डॉ. नायडू, सुभेदार घाटगे, केशवराव बागडे, एम्.एल्.ए., डॉ. गोखले, भालेराव, संकपाळ, उबाळे, काळभोर, एम.एल.सी., बाबुराव वायदंडे, माधवराव घोरपडे हे प्रमुख सभासद होते, अध्यक्षस्थानी सुभेदार घाडगे यांची सर्वानुमते निवड झाली. सुभेदार घाटगे व विठ्ठल रामजी शिंदे यांची प्रास्ताविक भाषणे झाल्यावर पुढीलप्रमाणे ठराव मंजूर झाले. पहिल्या ठरावानुसार ११/४/१९२३ रोजी मंजूर केलेला मसुदा काही दुरुस्त्यांसह मंजूर करून त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यानुसार सभासदांची निवड जातवारीने करावी असे ठरले. एक चेअरमन (स्पृश्य), तीन व्हॉईस चेअरमन (प्रत्येकी एक महार, एक मातंग, एक चांभार), एक खजिनदार (अस्पृश्य), तीन जॉइंट सेक्रेटरी (दोन अस्पृश्य व एक स्पृश्य) अशा त-हेने आठ अधिका-यांपैकी सहा अस्पृश्य निवडावेत असे ठरले. नव्या घटनेत दुरुस्तीनंतर मंजूर करून त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यानुसार सभासदांची निवड जातवारीने करावी असे ठरले. एक चेअरमन (स्पृश्य), तीन व्हॉईस चेअरमन (प्रत्येकी एक महार, एक मातंग, एक चांभार), एक खजिनदार (अस्पृश्य), तीन जॉइंट सेक्रेटरी (दोन अस्पृश्य व एक स्पृश्य) अशा त-हेने आठ अधिका-यांपैकी सहा अस्पृश्य निवडावेत असे ठरले. नव्या घटनेत दुरुस्तीनंतर २२ सभासदांचे कार्यकारी मंडळ निवडावे, त्यात अस्पृश्यवर्गाचे दोनतृतीयांश सभासद असावेत व त्यांपैकी महार, चांभार, मांग, भंगी, मुसलमान यांचे प्रत्येकी दोन आणि पार्शी, मराठा, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या जातींचा प्रत्येकी एक असे जातवारीने १४ सभासद घेण्याचे ठरविले. आठ अधिका-यांपैकी सहा व तीन ट्रस्टीतील एक अस्पृश्यवर्गातील निवडण्याची तरतूद केली व त्याप्रमाणे पदाधिका-यांची व सदस्यांची निवड दुस-या ठरावाने करण्यात आली. जनरल बॉडीचे अध्यक्ष विठ्ठल रामजी शिंदे, कार्यकारी मंडळाचे चेअरमन डॉ. आर. व्ही. खेडकर, व्हाईस चेअरमन म्हणून शि. जा. कांबळे (महार), मा. भि. कदम (चांभार), सी. गे. बल्लाळ (मातंग), खजिनदार हरिभाऊ उबाळे (महार), जॉइंट सेक्रेटरी म्हणून डी. व्ही. गायकवाड, सुभेदार घाटगे (महार), कृ. गो. पाताडे (मराठा) हे निवडले गेले. सभासद म्हणून ए. के. घोगरे व रामजी थोरात (महार), प. शु. पवार व नारायण सदाशिव जमादार, (चांभार), ता. स. गायकवाड, बी. डी. वायदंडे (मातंग), नाथमहाराज (भंगी), डॉ. मोदी (पार्शी), केशवराव बागडे व सी. अ. माणूरकर (ब्राह्मणेतर), प्रिं. कानिटकर(ब्राह्मण), एम. सलाउद्दीन, एम.एल.सी., व ए.ए.खान, (मुसलमान), बाबुराव जगताप (मराठा) (एक चांभार, दोन मातंग व दोन मुसलमान यांची नावे कार्यकारी मंडळीने स्वीकृत केली.) बाबूराव जगताप (मराठा) (एक चांभार, दोन मातंग व दोन मुसलमान यांची नावे कार्यकारी मंडळे स्वीकृत केली.) हिशेब तपासनीस म्हणून मा. ह. घोरपडे व एस. एस. चव्हाण यांना घेण्यात आले.
तिस-या ठरावानुसार विठ्ठल रामजी शिंदे, शिवराम जानबा कांबळे व केशवराव बागडे (एम्.एल्.ए.) यांना संस्थेचे ट्रस्टी निवडण्यात आले. अध्यक्षांचे समारोपादाखल भाषण झाल्यावर विठ्ठल रामजी शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले व अध्यक्षांनी सभा बरखास्त केली. या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या वरील निर्णयाचे जाहीर प्रकटन संस्थेचे नवे जॉइंट सेक्रेटरी (सुभेदार) राघोराम सज्जन घाटगे, धाकजी विठ्ठल गायकवाड व कृष्णाजी गोविंद पाताडे यांनी वृत्तपत्रांकडे प्रसिद्धीला दिले.१
अण्णासाहेब शिंदे यांनी मिशनची नवी घटना तयार करून ती मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यामुळे सर्वसामान्यपणे अस्पृश्यवर्गाचे पुढारी हे संतुष्ट होते व अण्णासाहेबांबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञता भावच निर्माण झाला होता. मात्र त्यांच्याबद्दल काही असंतुष्ट मंडळी अजूनही आरोप करीत होती. याबद्दलची प्रतिक्रिया अस्पृश्यवर्गीय मंडळींनी वृत्तपत्रातून देऊन अस्पृश्यवर्गाचा भाव केलेला आहे. १९ एप्रिल १९२३च्या ज्ञानप्रकाशाच्या अंकात ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांचे जे तीन कॉलेजचे पत्र प्रसिद्ध झाले होते त्याला अनुलक्षून शिवराम जानबा कांबळे व अस्पृश्यवर्गातील अन्य पुढा-यांनी जाहीर उत्तर देऊन आपली भूमिका प्रकट केली आहे. त्या असे म्हटले आहे, घोलपांच्या पत्रामुळे “मराठ समाज व संबंध ब्राह्मणेतर पक्ष ह्यासंबंधी विनाकारण गैरसमज होण्याचा संभव आहे. ज्या मे. अण्णासाहेब शिंदे यांनी कोणत्याही जातीची अगर पक्षाची भीड न ठेवता केवळ अस्पृश्यवर्गाच्या हिताकडे लक्ष ठेवून अपूर्व अडचणी व स्तार्थत्याग सोसून आम्हा अस्पृश्यांना जन्मोजन्मीचे ऋणी केले आहे, त्यांच्यावर रा. घोलपांनी कारस्थानाचा नाहक आरोप केला, इतकेच नव्हे तर डी. सी. मिशनच्या पुणे शाखेवरही बेजबाबदार शिंतोंडे उडवले आहेत म्हणून आम्हाला हा खुलासा करणे भाग आहे. गुरुवर्य पुणे शाखेवरही बेजबाबदार शिंतोंडे उडवले म्हणून आम्हाला हा खुलासा करणे भाग आहे. गुरुवर्य अण्णासाहेबांनी ही शाखा भरभराटीस आणली. शहरातील मध्यवर्ती भागात सात एकर जमीन, तिच्यावरील एक लक्ष सात हजार रुपये किमतीच्या प्रचंड इमारती, जवळ जवळ दहा-पंधरा हाजारांची नगद शिल्लक इतकी मिळकत मिळवून पुन्हा आपण आता सर्व अधिकाराचा संन्यास करून तो नवीन कार्यकारी मंडळातील महार, मांग, चांभार, भंगी ह्या जातींच्या सन्मान्य प्रतिनिधींच्या बहुसंख्येच्या हवाली केला आणि बाकी राहिलेल्या अस्पसंख्येच्या ब्राह्मण, ब्राह्मणेतर, पारशी, मुसलमान समाजात योग्य प्रकारे करून आपल्या वचनाप्रमाणे पुनर्घटना करून ते मोकळे होतात न होतात तोच आमच्यापैकी काही उलट्या काळजाच्या निराश झालेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर आग पाखडण्यास सुरू करावी ह्यात अण्णासाहेबांची नालस्ती नसून आमच्या समाजाची नामुष्की आहे असे आम्हांस वाटत आहे.” ह्या निवेदनातच, ज्ञानप्रकाशमध्ये केवळ एकाच बाजूच्या निवेदनाला प्रसिद्धी देण्यात येते ह्याबद्दल आश्चर्य प्रकट करण्यात येते. “तसेच ‘फोडा आणि झोडा’ यान नीच तत्त्वाचा अवलंब करण्याचा ब्राह्मणेतर पक्षाचा डाव आहे, महारांचे शत्रू मराठे आहेत, बहिष्कृतांची दिशाभूल डी. सी. मिशनने चालविली आहे वगैरे शिंतोडे त्या निराशा झालेल्या एम.एल.सी. ने (घोलपांनी) उडवून म्हणजे अखिल अस्पृश्यवर्गांना खाली पहावयास लाविले आहे. त्यांचा मात्र तिरस्कारपूर्वक निषेध करणे आम्ही आमचे पवित्र कर्तव्य समजतो.” पुणे येथे १९ एप्रिल १९२३ रोजी प्रसिद्धीस दिलेल्या त्या निवेदनाच्या खाली शिवराम जानबा कांबळे (महार), माधव भिकाजी कदम (रोहिदास) सीताराम गेनू बल्लाळ (मातंग), हरिभाऊ उबाळे, आर. एस. घाटगे, मिल्ट्री सुभेदार आणि डी. व्ही. गायकवाड(महार), डी. सी. कार्यकारी मंडळाचे सभासद ह्या नावाने हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.२ विठ्ठल रामजी शिंदे आणि मिशन यांच्याबद्दल ज्या अस्पृश्यवर्गीय पुढा-यांच्या मनात आशंकाची पटले निर्माण झाली होती, ती मिशनची पुनर्घटना करण्यात आल्यानंतर नाहीशी झाली व अस्पृश्यवर्ग अण्णासाहेबांबद्दल कृतज्ञता भाव प्रकट करू लागला हे या पत्रामुळे दिसून येते.
मिशनच्या नव्या घटनेनुसार पदाधिका-यांची व कार्यकारी मंडळाची निवडूक झाल्यानंतर आपले कार्य आटोपले आहे असे शिंदे यांना वाटले. मातृसंस्थेतील व इतर शाखांतील सर्व अधिकार त्यांनी खाली ठेवले, फक्त मिशनचे संस्थापक ट्रस्टी एवढाच त्यांचा अधिकार राहिला. त्यांची व जनाबाईंची अल्पवेतनाची नेमणूकही त्यांनी सोडली. निर्वाहाचे नियमित स्वरूपाचे कोणतेही साधन आता उरले नव्हते. आपण ‘पुन्हा एकवार उघडे पडलो’ अशी उदासपणाची भावना त्यांच्या मनामध्य निर्माण झाली. पुणे शाखेच्या नव्या अधिका-यांनी अण्णासाहेबांना एखादे लहानसे पेन्शन द्यावे असा विचार पुढे आणला, पण आधी काही मिशन-यांनी काम सोडले होते व त्यांना कोणतीही पेन्शन देण्यात आली नव्हती. तेव्हा आपणच काढलेल्या मिशनमधून व आपणच मिळवलेल्या पैशामधून रिकामपणी पेन्शन घेणे हा विचारही त्यांना दुःखसह वाटला. काही अंशी शारीरिक विश्रांती आणि मानसिक शांती मिळते आहे हेच त्यांना पुरेसे वाटले.
संदर्भ
१. विजयी मराठा, २३ एप्रिल १९२३.
२. तत्रैव.