1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

प्रकरण नववे : धर्म

आतापर्यंतच्या विवेचनावरुन दिसून आलें असलें पाहिजे की हिंदुस्थानांत हल्ली ज्या मानीव अस्पृश्यांच्या अंसख्य जाती आहेत. त्या अगदी भिन्न भिन्न वंशांतून आलेल्या आहेत व त्यांची संस्कृति आणि दर्जाही भिन्न आहे; इतकेंच नव्हे तर त्यांच्या संस्कृतींत मध्यन्तरीच्या इतिहासांत चढउतार बरेच झाले आहेत. पण हेंही खरें की आजकालच्या अस्पृश्य जातीपैकी ज्यांनी प्राचीन काळीं वैभव भोगिलें असावें अशांवरही पुढे अस्पृश्यतेचा परिणाम बरींच शतकें होत आल्याने स्वाभाविकपणें त्यांच्या संस्कृतीचा फार बिघाड झालेला आहे. ह्या आणि पुढील प्रकरणांतील विषयाचा विचार करितांना ह्या जातींमध्ये घडलेल्या मध्यंतरींच्या कालवाकालवीकडे दृष्टि ठेवणें जरूर आहे. येरवी आमच्या विचारांना एकांगीपणा येऊन, ह्या बिचा-यांवर आणखी एका नवीन अन्यायाचा बोजा पडेल !

ह्या प्रकरणांत धर्म हा जो शब्द योजण्यांत आला आहे तो सामुदायिक धर्म म्हणजे धार्मिक पंथ किंवा संघ ह्या अर्थानेच योजिला आहे. धर्माचा जो आध्यात्मिक अथवा पारमार्थिक अर्थ आहे तो केव्हाही व्यक्तपुस्ताच असतो. तो सामुदायिक होऊं शकतच नाही. सामुदायिक अर्थ म्हणजे पंत अथवा संघ हा देश. काल अथवा जनसमाज यांच्या संकेताप्रमाणे बदलणारा भिन्न असतो. धर्माचा खरा अर्थ आध्यात्मिक असतो तो कांही कोणा समूहाच्या संकेताप्रमाणे बदलणारा नसतो. तो सनातन असून केवळ व्यक्तीच्या अनुभवांतच आढळून येणारा असतो. ती व्यक्ति स्त्री, पुरुष, गरीब,श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित कशीही असो. प्रौढ वय आणि शुद्ध भावना असली की पुरे. तिच्या अनुभवांत आणि जीवनव्यवहारांत कमी अधिक मानाने हा सनातन धर्म आढळणारच. हा सनातन धर्म ह्या प्रकरणाचा मुळीच विषय नव्हे. इतकेंच नव्हे, ह्या सार्वत्रिक धर्माला हिंदु, मुसलमान ख्रिस्ती वगैरे नांवांनी संबोधितांही येणार नाही.

येथून पुढील प्रकरणांत अस्पृश्यतेचा, अर्थात् हिंदुस्थानांत आज हजारों वर्षे वर दिलेल्या व्याख्येनुसार बळी पडलेल्या असंख्य जन समूहाचा प्रश्न धसाला लागत आहे. पहिला प्रश्न हा आहे, की ह्या अवाढव्य अस्पृश्य समाजाचा धर्म कोणता? म्हणजे सामाजिक आणि कायद्याच्या व्यवहाराच्या दृष्टीने सुधारलेल्या जगांत हल्ली जे दहापांच मोठे सर्वमान्य धर्मसंघ, अथवा गट, रुढ झाले आहेत, त्यांपैकी कोणत्यांत ह्यांचा समावेश होत आहे किंवा होण्यासारखा आहे? कोणी सहज विचारतील की हा प्रश्नच मुळी कसा उद्भवतो? अर्थात् ते सर्व लोक हिंदु धर्मसंगांत आजपर्यंत वावरत आले असून आताच ही विक्षिप्त दीर्घ शंका कां आली? शंका दीर्घ असो की विक्षिप्त वाटो, ती अनाठायीं नाही. अगोदर दिंदु धर्मांचीच ठाम व्याख्या होत नाही. यहुदी, झरदुष्टी (पार्शी), बौद्ध, जैन, खिस्ती, मुसलमान, ह्या मोठ्या आणि प्राचीन, किंवा शीख, लिंगायत, ब्राह्म समाज, आर्य समाज, देवसमाज वगैरे अर्वाचीन लहान संघांप्रमाणे, हिंदु संघाच्या मर्यादा इतिहासाच्या दृष्टीने, किंबहुना लोकव्यवहाराच्या दृष्टीनेही ठाम ठरवितां येत नाहीत. हिंदु धर्म ही एक केवळ पुरातन काळापासून चालत आलेली रुढि आहे. कोणत्याही रुदीच्या मर्यादा ठरविणें जितकें कठीण आहे. त्याहूनही ह्या हिंदूधर्मरुपी पुरातन रुढीच्या मर्यादा ठरविणें अनंत पटीने जास्त दुरापास्त आहे. जवळ जवळ हें काम अशक्य आहे. हिंदु धर्म हें एक मायपोट आहे! ह्यांत सगळ्या जगाचाही समावेश करु पाहणाराचा हात कोणालाही निदान तर्कशास्त्राचे दृष्टीने धरतां येणार नाही. कोणी म्हणेल हिंदु म्हणजे जातिभेद मानणा-यांचा एक गट आहे. पण शीख, लिंगायत, ब्राह्म समाज वगैरे अलीकडचे जातिभेद न मानणारे पंथही खानेसुमारीच्या अहवालांत बिनबोभाट हिंदु ह्या सदरांत गणले जात नाहीत काय? परवापर्यंत मिश्रविवाह करुं पाहणा-यांना आपण हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती वगैरेपैकी कोणी नाही असें लिहून दिल्याशिवाय इंग्रज सरकारचे रजिस्ट्रार त्यांचा विवाह नोंदण्याचें नाकारीत असत. पण अलीकडे सर हरिसिंग गौरच्या ह्या कायद्यांतील सुधारणेंमुळे ही खुंटीही अगदी ढिली झाली आहे. गौरच्या सुधारणेपूर्वीही अनेक मिश्रविवाहितांनी आपले विवाह नोंदून घेण्याचेंच मुळी साफ नाकारलें आहे. म्हणून तेवढ्यानेच ते हिंदू नाहीत असें कोण म्हणू शकेल? मनुस्मृतींत वर्णसंकराचा कितीही बाऊ दाखविला असला, तरी प्रत्यक्ष मनुस्मृतीच्या काळांतही चार वर्णांच्या मर्यादा ठरविणें जें अशक्य होतें, तें आता शक्य थोडेंच झालें आहे? तात्पर्य काय की हिंदुधर्माची खरी व्याख्या म्हणजे जो कोणी आपल्यास हिंदु म्हणवीत असेल, तोच हिंदु. जो हिंदु असूनही म्हणवून घेण्यास तयार नसेल त्याच्यावर कोण जबरी करुं शकेल? रोजच्या व्यवहाराच्या दृष्टीने इतक्या खोल पाण्यांत शिरण्याची तसदी कोणी घेत नाही. पण खानेसुमारी तयार करणारावर ह्या खोल पाण्यांत शिरण्याची जबाबदारी अलबत पडते; ती त्याला टाळतां येत नाही. आजच्या आमच्या ह्या खंडवजा मोठ्या देशांत असे अनेक असंस्कृत मागासलेले जनसमूह आहेत की, ते आपण हिंदु आहोंत की नाही, ह्या प्रश्नाला कांहीच उत्तर देऊ शकत नाहीत; किंबहुना देऊ इच्छितही नाहीत. अशा असंख्य असंस्कृतांच्या आचारविचारांची नीट पाहणी करुन व त्यांच्या लक्षणांची व्याख्या ठरवून त्यांना धर्माच्या सदरांत एक विवक्षित जागा देणें खानेसुमारीच्या खात्याला भाग पडतें.

इ.स. १९०१ सालीं हिंदी खानेसुमारीचें प्रमुखत्व जेव्हा सर एच. एच. रिस्ले ह्या नामांकित समाजशास्त्रज्ञाकडे सोपविण्यांत आलें, तेव्हा त्याला अशा अनेक असंस्कृत जाती ह्या देशांत आढळून आल्या की त्यांच्या धार्मिक आचारविचारांना आणि भावनांना हिंदु, मुसलमान, खिस्ती वगैरे पैकी कोणत्याच रुढ नांवाखाली समाविष्ट करणें अशक्य झालें. आणि साधारण गणकांना तर कांही तरी वट्ट हुकून फर्मावणें भाग पडलें. म्हणून धर्माचा प्रश्न आल्याबरोबर अशा धर्माच्या सदराखाली त्या त्या असंस्कृत जातींचेंच कामचलावू नांव नमूद करण्याविषयी हुकून देणें रिस्ले ह्यांना भाग पडलें. याप्रमाणे गणकांचे कम सोपें झालें. तरी अशा अनेक जातींना प्राथमिक प्राकृत धर्मांची लक्षणें पाहून कांही तरी एक सामान्य नांव नवीनच कल्पणें भाग पडलें. देशी रुढ भाषेंत असें नांव आढळेना. (१) Fetishism (जडवस्तुपूजा), (२) Shamanism ( श्रमणवाद उर्फ पंचाक्षरी मार्ग ), Animism (3) (भूतपूजा), हीं तीन नांवें त्यांनी आधुनिक समाज शास्त्रांतून अथवा तौलनिक धर्मशास्त्रांतून निवडून, त्यांपैकी सारासार विचार करुन तिसरें भूतधर्म अथवा पिशाच पूजा हें नांव पसंत केलें. व त्या नांवाच्या सदराखाली या सर्व जातींची सरगणना करण्यांत आली. सन १९०१ साली हिंदुस्थान, बलुचिस्थान आणि ब्रह्मदेश मिळून एकंदर लोकसंख्या २९,४३,६१,०५६ आणि एकंदर हिंदूंची संख्या २०,७१,४७,०२६ भरली. त्या हिंदूंशिवाय वरील भूतधर्मीयांची संख्या एकूण ८५,८४,१४८ दाखविण्यांत आली आहे. (खाने. रिपोर्ट १९०१; खंड १-अ, भाग २-कोष्टकें; कोष्टक ६ पान ५८-६२ पहा ) त्याच रिपोर्टाच्या पहिल्या पुस्तकांतील पुरवणी भागांत शेवटीं पान ५६०-५६९ पर्यंत एकंदरीत सर्व हिंदी लोकांचा सामाजिक दर्जा दाखविणारी जी कोष्टकें दिली आहेत त्यांत निरनिराळ्या प्रांतांतून जी अस्पृश्य मानलेल्या अनेक जातींची संख्या दिली आहे तिचा वट्ट आंकडा ५,१७,३८,६७३ हा तयार होतो. या विशिष्ट प्रांतवार कोष्टकांवरून उघड दिसतें की रिस्ले यांनी या मानीव अस्पृश्यांना पूर्ण विचारअंती व जबाबदारीपूर्वक हिंदु-धर्म-संघातच समाविष्ट केलें आहे. शास्त्रीय आणि केवळ औपपत्तिक दृष्टीने कांही ठरो, चालू लोकमत आणि लोकव्यवहार या दृष्टीने पाहतां, या गणनेंत आक्षेपाई असें कांही नाही असे कोणासही वाटेल; आणि मलाही असेंच वाटतें, पुढील दशवार्षिक म्हणजे इ.स. १९११ सालच्या शिरगणतीचें काम ई. ए. गेट यांचेकडे सोपविण्यांत आलें. हे गृहस्थ इ. स. १९०१ सालींही रिस्ले साहेबांचे सहकारी होते. या दहा वर्षांत पुढीलप्रमाणे वरील वट्ट आकड्यांत वाढ झालेली दाखविली आहे. एकूण हिंदी लोकसंक्या ३१,३५,४७,८४०, एकूण हिंदु २१,७५,८६,८९२, एकूण भूतधर्मीय १,०२,९५,१६८. या दहा वर्षांत हिंदूंच्या वट्ट लोकसंख्येविषयीं मुसलमानांनी वाद उपस्थित केला होता. पण तो या भूतधर्मीयांच्या संख्येबद्दल नसून केवळ अस्पृश्यांना हिंदूंत गणावें की वेगळें गणावें याबद्दल होता. इ. स. १८६७ सालापासून म्हणजे खानेसुमारी हिंदु स्थानांत सुरु झाल्यापासून या भूतधर्मीयांची संख्या हिंदूपासून अलगच दाखविण्यांत येत आहे; म्हणून त्यांच्यासंबंधाने वादाला कारणच नव्हतें. पण अस्पृश्यांच्याबद्ल वाद उपस्थित होण्यास सबळ कारण होतें. मानीव अस्पृश्यांची जेव्हा इ.स. १९०१ सालच्या स्वानेसुमारींत जवळ जवळ ५|| कोटी ही संख्या प्रांतवार पसरलेली आढळली, इतकेंच नव्हे पण या मानीव अस्पृश्यांतही कांही प्रांतांतून कांही कांही अस्पृश्य जाती भूतधर्मीयांच्या सदरांत दाखविलेल्या आढळल्या, तेव्हा सर्वच मानीव अस्पृश्यांसंबंधी वाद उपस्थित होणें साहजिकच होतें. कदाचित् या वादाला कांही अंशी बळी पडून म्हणा, किंवा ही कटकट चुकविण्याच्या हेतूने म्हणा इ.स. १९९१ सालीं मानीव अस्पृश्यांची संख्या वेगळी दाखविण्यांत आली नाही. इतकेंच नव्हे तर स १९०१ सालाप्रमाणे हिंदुधर्मांतर्गत निरनिराळ्या समाजांचा अथवा जातींचा परस्पर उच्चनीच दर्जा दाखविण्यारीं कोष्टकेंच स. १९११ सालच्या खानेसुमारींतून वगळण्यांत आली. त्यामुळें ह्या भूतधर्मीयापैकी किती जाती व त्यांची किती संख्या मानीव अस्पृश्य आहे, आणि उलट पक्षीं, ह्या मानीव अस्पृश्यांतील किती जाती व त्यांची किती संख्या भूतधर्मीय आहे, हें नक्की ठरविण्यास मार्गच उरला नाही. कांही असो. मानीव अस्पृश्यांच्या प्रचंड लोकसंख्येंत कांही तरी भूतधर्मीयांची गणना झालेली आहे ह्यांत शंका नाही. तथापि सर्वच मानीव अस्पृश्य भूतधर्मीय, असेंही म्हणतां येत नाही. कारण पहिल्यांची घट्ट संख्या दुस-यांच्यापेक्षा पांच पटीहून उघड उघड अधिक भरत आहे.

हा निर्णय झाला आधुनिक लोकमतानुसारें व लोकव्यवहाराच्या दृष्टीने. पण अगदी प्राचीन काळीं जेव्हा वेदधर्मीय आर्य (?) नांवाचे लोक हिंदुस्थानांत येऊन वसाहत करुं लागले त्या वेळीं हिंदुधर्माचा व्याप आणि अर्थ आजच्यासारखा व इतका स्पष्ट असणें शक्य नाही. अस्पृश्यतेची संख्या आर्यांच्या वसाहतीपूर्वी किंवा वसाहतीच्या काळी ह्या देशांत होती की नव्हती हें निश्चित ठरविण्यास साधन नाही. वेदसंहितेचा काळ ख्रिस्ती शकापूर्वी हजार बाराशें वर्षे इतका अलीकडे मानला तरी त्या काळच्या वाड्मयांत अथवा अन्य प्रकारें अस्पृश्यतेचा ग्रांथिक अथवा लेखी पुरावा मुळींच सापडत नाही, हें आपण पहिल्या खडांत पाहिलें. मानीव अस्पृश्य त्या वेळीं असेल तरी, त्यांची संख्या आणि आपत्ति आजच्या सारखी आणि इतकी तीव्र असणें शक्य नव्हतें. कारण तत्कालीन सामाजिक घटना आजच्याप्रमाणे सुसंघटित व दृढमूल झालेली नव्हती. पाणिनीच्या कालापासून अस्पृश्यतेचे उल्लेख मिळूं लागतात. यास्काचार्यांनी आपल्या निरुत्कांत अध्याय ३, खंड १६, मंत्र १० ह्यावर भाष्य करितांना केलेला "चत्वारो वर्णा निषाद: पंचम इति औपमन्व:|" हा पंचम वर्णाचा उल्लेख संस्कृत वाड्मयांत जवळ जवळ पहिलाच होय. वर्ण तर चारच. पांचवा जन म्हणजे वर्णबाह्य निषादांच्या जाती असा पंचम शब्दाचा अभिप्राय आहे.

औपमन्यवांच्या काळींही निषाद म्हणून जो लोकसमूह होता, तो सर्व आताप्रमाणें अस्पृश्य मानला जात होता ह्याला पुरावा नाही. निषाद म्हणजे आर्यांच्या वसाहतीबाहेरचे लोक; स्वत: वसाहत करुन स्वतंत्रपणे राहणारे त्यांचा व आर्यांचा संबंधच येत नसल्याने आधुनिक बहिष्काराचा व अस्पृश्यतेचा प्रश्नच त्यांच्या संबंधी उद्भवत नाही.

आजची अस्पृश्यता मनुस्मृतीच्या काळी पूर्णत्वाला आलेली आढळते. ह्या अस्पृश्यांची पूर्वपाठिका आणि हे कोणत्या कारणांनी अस्पृश्य ठरविण्यांत आले, ह्याविषयीं मनुस्पृतीची मीमांसा निराधार व अनैतिहासिक आहे, असें मी वर प्रतिपादिलें आहे. तरी त्या काळी आजचा बहिष्कार व अस्पृश्यता ह्यांचा जम पूर्ण बसला होता असें मानण्याला मनुस्पृतीचा पुरावा अगदी बिनतोड आहे, ह्यांत शंका नाही.

मनूच्या दहाव्या अध्यायांत वर्णसंकराने उत्पन्न झालेल्या कोणत्या जाती कशा व किती हीन, म्हणून अस्पृश्य व बहिष्कृत, ह्याचा निर्णय दिला आहे. ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष ह्यांच्या प्रतिलोमसंकरजन्य संततीला चंडाल ही संज्ञा देऊन ती जात पहिल्या पायरीची अस्पृश्य कल्पिली आहे. पण हा चंडाल आणि निषाद स्त्री ह्यांच्या संकरसंततील व अंत्यावसायी, पुक्कस, कारावर, आहिंडिक सोपाक वगैरे जातींना चंडालाहून अधिक नीच पायरीचे ठरविण्यांत आलें आहे. चांडाल झाला तरी शूद्रापासून म्हणजे वर्णांतर्गत शेवटच्या वर्णापासून झाला म्हणजे तो तुलनेने बरा. पण वर्णबाह्य निषाद आणि हा अस्पृश्य चांडाल ह्यांच्या संकराला अधिकाधिक नीच मानण्यांत आलें आहे. तरी पण स्वत: निषाद हा अस्पृश्य असण्याचें कारणच नव्हतें. कारण त्यांचा व आर्य वसाहतींचा अर्थाअर्थी संबंधच येत नव्हता. त्याचप्रमाणे हल्लीही बृहद् हिंदू समाजाशीं अगदी फटकून राहणा-या जंगली भूतधर्मीय जाती अस्पृश्य मुळीच नाहीत. ज्या असंस्कृत आर्येतरांचा आर्य वसाहतीशीं केवळ हीन कामधंद्यासाठी संबंध आला, किंबहुना ज्या स्वतंत्र जातींना जिंकून अगर त्यांच्याशी समजुतीने वागून, वसाहतीला चिकटूनच पण अगदी बाहेर डांबण्यात आलें त्याच तेवढ्या जमाती आजकालच्या बहिष्कृत अस्पृश्य जाती होत. केवळ जिंकण्यामुळें, अगर हीन धंद्यामुळेंच नव्हे तर पाखंडी धर्मावरील क्रूर बहिष्कारामुळेंही वेळोवेळीं व देशोदेशीं या बहिष्कृतांत भर पडत जाऊन आजकालची अवाढव्य संख्या कशी तयार झालेली आहे, हें मागील प्रकारणांत सिद्ध झालेंच आहे. पण अजून ज्यांचा वसाहतींशीं संबंध आलेला नाही, अशा जंगली जाती आजही अस्पृश्य नाहीत. पण त्यांचा धर्म मात्र प्राथमिक दर्जाचा म्हणजे भूतप्रेत-पिशाचादिकांची पूजा हा आहे.

आमचा प्रस्तुतचा मुद्दा 'अस्पृश्यांचा" धर्म कोणता हें ठरविण्याचा आहे. आज हजारो वर्षें मानीव अस्पृश्य जाती शहरांतून व खेड्यांतून वरिष्ठ  म्हणविणा-या हिंदु, मुसलमान इत्यादिकांच्या वसाहतीं. जवळ त्यांच्या सेवेंत राहत आल्यामुळे, या मानीव वरिष्ठांच्या धर्माचा व राहणीचा थोडा फार परिणाम या मानीव अस्पृश्यांवर होणें अगदी साहजिक आहे. बौद्ध, लिंगाईत, शीख, ख्रिस्ती, मुसलमान हे धर्मपंथ प्रसारक आणि प्रागतिक असल्याने मानीव अस्पृश्यांचा शिरकाम या निरनिराळ्या नवीन पंथांत हजारांनीच नव्हे तर लक्षांनी झाला आहे. येरवी या परकीय व पाखंडी समजले गेलेल्या पंथांना तरी प्रथम प्रथम रिक्रूट भरती कोठून मिळणार ? बंगाल्यांत, मध्यप्रांतांत विशेषत: मद्रासेंत आणि मलबारांत हल्लीच्या मुसलमानांच्या व ख्रिस्त्यांच्या संख्येपैकी शेकडा नव्वद हे मूळचे 'अस्पृश्य'च आहेत, असें जे खानेसुमारीच्या रिपोर्टात म्हणलेलें आढळते, तें मुळीच अतिशयोक्तीचें नाही. या नवीन सुधारक पंथांत न शिरतां, मागे सवयीच्या जोरावर ज्यांची मोठी संख्या पूर्व स्थितींत राहिली त्यांच्यापैकी बहुसंख्येवर हिंदुधर्मांतील हीन देवता आणि अडाणी विधिसंस्कार यांचा परिणाम कालवशात् झाला असलेल्या आता दिसतो व म्हणून त्यांना हिंदू हें नांव पडलें आहे यांत काय नवल? नवल हेंच की परकीयांनी व 'पाखंड्यांनी' या अस्पृश्यांचा एवढा मोठा भाग काबीज करुन घेतला असतां, उलट सोवळा हिंदूधर्म मात्र अद्यापि या बिचा-यांना झिडकारून हिरमुसले करीत आहे! इतकेंच नव्हे तर त्यांचे हाडवैर संपादन करीत आहे. तें कसेंही असो. अशा स्वाभाविक ओघाने अस्पृश्यांचा समावेश हिंदुधर्मांत झालेला आता दिसत आहे. ते संस्कारत: हिंदू नसून, केवळ संसर्गत: किंबहुना स्वभावत: हिंदू बनले आहेत असें म्हणणें क्रमप्राप्त आहे. एखाद्या मेजवानीचे वेळीं पक्कान्नाचा ताज वाटा सर्व 'वरिष्ठ" वर्गांना जाऊन मातींत मिसळलेल्या उष्टया पत्रावळी उकिरड्यावर टाकल्यावर, ज्याप्रमाणे खेड्यांतील 'अस्पृश्यांना'ना चाटावयाला मिळतात, त्याचप्रमाणे हिंदुधर्माचा हीन भाग मात्र नेमका यांच्या वाट्याला येतो. बंगाल्यांतला चैतन्यांचा वैष्णव भक्तिमार्ग, शिखांचा सत् अकाल, महाराष्ट्रांतील ज्ञानबा-तुकारामांचा वारकरी संप्रदाय अनुसरण्यास आणि द्राविडांतील कांही वरवरचीं सांप्रदायिक चिन्हे आचरावयास त्यांना मुभा आहे. पण उच्चवर्णी वैष्णवांत कोणी अस्पृश्य वैष्णवाने अगर शैवाने समान दरजाने मिसळूं म्हटलें किंवा देवळांतच काय पण कांही देवळांच्या नुसत्या वाटेवर पाय ठेवूं म्हटलें तर त्यांच्या जीवावरच येऊन बेतते, इतकेंच नव्हे तर सार्वजनिक शांतीच्या सबबीवर इंग्रज बहादुरांचे सोटेशाही पोलीस व लष्कर सोवळेवाल्यांचीच बाजू घेऊन या हतभाग्यांवरच घसरतें. असो, या अपवादक गोष्टी सोडून दिल्या तर आज मानीव अस्पृश्यांचा बहुजनसमाज भुताखेताच्या पुजेंतच गुरफटलेला दिसत आहे. तो केवळ नामधारी खानेसुमारींतलाच हिंदू आहे असे म्हटल्यास निदान तज्ज्ञांना तरी आम्हांवर राग होणार नाही अशी आशा आहे.

बहुतेक मानीव अस्पृश्यांची प्रमुख प्रमुख प्राचीन राष्ट्रें, उदाहरणार्थ महाराष्ट्रांतील महार मांग, मद्रासेकडील पारिया पुलया, बंगाल्यांतील नमशूद्र राजबंसी इ. यांचे मूळ राष्ट्रदैवत म्हणजे एकच; ती मरी आई हेंच होय. हें दैवत भूमिमातेंचेंच एक रुपक अथवा प्रतीक आहे, हें तौलनिक धर्मशास्त्राने सिद्ध होण्यासारखें आहे. हे आद्य दैवत केवळ आजकालच्या अस्पश्यांचेच नव्हे. तर प्राचीन काळच्या बहुतेक सा-याच प्राथमिक राष्ट्रांच्या देव्हा-यावर कोणत्या ना कोणत्या तरी स्वरुपाने प्रतिष्ठित होतेंच. इतकेंच नव्हे तर आजही हिंदुस्थानांतील ब्राह्मण, क्षत्रिय आदिकरुन वरिष्ठ गणलेल्यांचे कुलदैवत अगर इष्ट दैवत दुसरें कितीही उच्च असलें, तरी त्यांच्या बायकांकडून प्रसंगविशेषी, शितळादेवी, सटवाई, मेसाई, मरी आई या गांवाच्या शिवेवर ठाण मांडून बसलेल्या माताच पूजेचा मान आणि हक्काचा नैवेद्य उगविल्याशिवाय राहत नाहीत. शिव आणि काली ही दैवतें जी प्रसिद्धपणेंच मूळच्या रहिवाश्यांची होती ती मागाहून आलेल्या सुधारलेल्यांनी आपलींशी करुन घेतलीं. त्यांना आता प्रतिष्ठा आली आहे. पण वरिष्ठ वर्गोंचे लौकिक व्यवहार आणि लोकभ्रम यांजकडे दृष्टि फेकली तर पिंपळावरचा मुंजा, भिंतीवरचा नागनरसेबा, नदीनाल्यांतल्या जकण्या, दाट झाडींतली काळूबाई, यांचा अंमल 'अस्पृश्या'प्रमाणे अद्यापि 'स्पृश्यां' वर देखील इतका जारी चालू आहे की या हिंदुधर्माच्या मायपोटांत संस्कृत धर्माची हद्द संपते कोठे व प्राकृतधर्मांची सुरु कोठे होते, हें शोधणें म्हणजे मृगजळाच्या मर्यादा शोधण्याप्रमाणें व्यर्थ ठरतें. अशा परिस्थितींत बिचा-या 'अस्पृश्यां'नाच हसण्यांत कोणता शहाणपणा आहे? वरिष्ठ वर्गाचा असला तिरस्कार व छळ सोसून अद्यापि या भोळ्या जाती आपल्यास हिंदू म्हणविण्याचा आग्रह सोडीत नाहीत हेंच वरिष्ठ म्हणविणारांनी आपलें मोठें भाग्य समजावें. असे असून आजकालच्या वर्णाश्रम स्वराज्य परिषदा अस्पृश्यांच्या गोष्टी सांगावयास येतों म्हणणा-या अस्सल ब्राह्मण विद्वनांना, देशाभिमानी पुढा-यांना व विरक्त संन्याशांना देखील आपल्या आजूबाजूला फिरकूं देत नाहीत, या अन्यायाला काय म्हणावें ! म्हणावयाचें काय, ह्या अपूर्व अन्यायाचेंच नांव अलीकडे 'सनातनी हिंदु धर्म' असें रूढ झालें आहे.

केवळ संघाच्या दृष्टीने पाहतां मात्र ह्या अस्पृश्यांच्या प्रचंड समूहाला हिंदूधर्मांत जागा आहे असें मानण्यांच्या उलट आणखी एक मोठा प्रबळ व प्रतिकूल पुरावा अभेद्य परंपरेने चालत आलेला आहे, तो दृष्टीवेगळा करुन चालावयाचें नाही. हिंदु संघाच्या शेजारीं राहून अनुकरणवशात् मानीव अस्पृश्यांतील कांही सुधारलेल्या समाजांनी हिंदु उपासनेचा स्वीकार केला तर तिकडे हिंदु धर्माचा पुरोहित वर्ग फार तर दुर्लक्ष्य करील. प्रत्यक्ष हरकत करण्याची दगदग करणार नाही. पण स्वत: जाऊन अस्पृश्यांचे पौरोहित्य आजवर कोणत्याही प्रांतांत कोणाही ब्राह्मणांने केलेलं नाही. किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या धर्माचा नुसता उपदेशही केलेला नाही ! लग्नविधि असो किंवा स्मशानविधि असो, बारसें असों किंवा मृताचा दिवस असो, अशी सर्व शुभाशुभ धर्मकृत्यें करावयाला ह्या सर्व अस्पृश्य जातीचें आपल्यापैकीच गुरु अथवा गोसावी असतात. त्यांच्या परंपरा चालत आलेल्या असतात. त्यांना जातीकडून अथवा क्वचित् राजाकडूनही उत्पन्ने असतात. व्यक्तिश: दक्षिणाही मिळते. ह्यावरुन धर्मसंघाच्या दृष्टीने ह्या ग्रामबाह्य जाति आचारबाह्य आहेत असें स्पष्ट होतें. लोकमा्य टिळकांनी .

प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानामनेकता |
उपास्थानामनियम: एकद्धर्मस्य लक्षणम् ||

अशी एकदा हिंदुधर्माची एक कामचलावू व्याख्या केली होती. ती किती जरी ऐसपैस त्या वेळीं वाटली, तरी ह्या जातींला ती देखील लागू पडत नाही. 'उपास्यानामनियम:' आणि 'साधनानामनेकता' ही व्यतिरेकी लक्षणें जीं अधर्माचीं आहेत, तींच पुन: धर्माचीं कशीं होऊं शकतील? ती कांही तरी विधायकच असलीं पाहिजेत ना? ख्रिस्ती व मुसलमानी धर्मसंघांत उपास्यांचा नियम आहे. तो हिंदुधर्मसंघांत नाही. येवढ्यावरुन तो हिंदूंचें वैशिष्टय होऊ शकत नाही. कारण असा अनियम बौद्ध व इतर समाजातही आढळतो. 'प्रामाण्यबुद्धिवेंदेषु' म्हणजे वेद प्रमाण मानणें हेंही तत्व व्यवहारांत फारच गैरसोयीचें झालें आहे. कोणाही स्पृश्य ब्राह्मणेतराचे घरीं पूजा अथवा गृह्ससंस्कार चालविण्यास ब्राह्मण गेला तर तेथे वेदमंत्र म्हणण्यास तो तयार नसतो. ब्राह्मणेतरांसाठी पुराणोत्तक निराळे मंत्र तयार आहेत. जेथे ब्राह्मणेतरांच्या बाबतींत स्वत: ब्राह्मणांचीच प्रामाण्यबुद्धि अशी लटपटते, तेथे अस्पृश्यांच्या आणि वेदांच्या संबंधाची नुसती कल्पनाही कशी शक्य होणार ! मग अस्पृश्य हिंदु कसे हा एक खरोखर प्रश्नच आहे. आज ज्या क्षुद्र देवतांच्या उपासना अस्पृश्य करीत असलेले दिसतात, त्यांची उपासना वरिष्ठ म्हणविणारे हिंदूही राजरोस करितात एवढ्यावरुनच अस्पृश्यांना हिंदु म्हणावयांचें ना ? पण ह्या देवता अस्पृश्यांनी स्पृश्यांपासून घेतल्या की स्पृश्यांनी अस्पृश्यांपासून ? कोणी म्हणेल स्पृश्यांस्पृश्यतेचा उद्भव होण्यापूर्वीपासूनच ह्या देवता आणि त्यांची उपासना सर्वत्रच चालू आहे. पण मग तेवढ्यानेच अस्पृश्य हिंदु कसे ठरतात? अशा उपासना महायान बौद्ध धर्माच्या हीन अनुयायांमध्ये अद्यापि हिंदुस्थानाच्या सरहद्दीवर व बाहेरही चालू आहेत. मग तेही हिंदुच काय? मुसलमान ताबूत करितात, व त्यांचे पाहून कांही हिंदु मुसलमानांपेक्षाही अधिक बेहोष होऊन ताबुतापुढे नाचतात, म्हणून हिंदूंना काय मुसलमान म्हणावयाचें ? की ताबुतांना हिंदुधर्माचें साधन म्हणावयाचे ? ह्या विक्षिप्त संबंधाला जसें केवळ अनुकरणसंबंध म्हणता येईल, तसेंच स्पृश्यांच्या व अस्पृश्यांच्या दरम्यान आज दिसणारा धार्मिक संबंधही केवळ अनुकरणसंबंध का म्हणूं नये? हा संबंधही केवळ उपासनेच्या कांही भागापुरताच दिसतो. सर्वच उपासना तरी स्पृश्यांप्रमाणे अस्पृश्यांत कोठे रुढ आहेत? गाय, ब्राह्मण आणि तुळशीवृंदावन हीं तीन पुजास्थाने हिंदु बहुजनसमाजामध्ये रुढ आहेत, तशी तीं अस्पृश्यांमध्ये आहेत काय? मुळीच नाहीत. ख्रिस्ती-मुसलमानांप्रमाणे, शीख आणि लिंगायतांनी पुष्कळ प्रमाणाने व शैव वैष्णवांनी थोड्या प्रमाणाने ह्या बहिष्कृत वर्गांना आपल्यांत घेण्याचा प्रयत्न केला; पण ख्रिस्ती-मुसलमानांचे ह्या बाबतींतलें यश उत्तम, शीख-लिंगायतांचे यश मध्यम, आणि शैव-वैष्णवांचें यश कनिष्ठ का ठरलें? लिंगायतांत च्छलवादी आणि शीखांत मजबी अथवा लालबेग म्हणून जे लोक असतात ते अस्पृश्यांतूनच आलेले असतात. ते अद्यापि अस्पृश्यच आहेत! पहिल्यांनी अस्पृश्यांना एकदम आपल्या धर्मसंघांत एकजीव करुन घेतलें, दुस-यांनी धरसोड चालविली आहे, व तिस-यांनी तर अस्पृश्यांना आपल्या वेदांच्या, देवळांच्या आणि संघाच्या बाहेर लांब ठेवलें आहे. हिंदुधर्माची परंपरा, सांधिक शासन, विधि संस्कार, पठन पाठन, मग ते वैदिक असो, पुराणोत्तक असो, संस्कृत असो वा प्राकृत असो, त्याचा अधिकार मानीव अस्पृश्यांना स्वप्नांत देखील मिळणे शक्य नाही. तो मिळविण्यासाठी अस्पृश्याने मरुन पुन: स्पृश्यांत जन्मलें पाहिजे; येरवी नाही. असाच खरोखर त्यांच्या वरील बहिष्काराचा अर्थ आहे. ह्या अर्थाचा निषेध व निराकरण करुन धमक असेल तर हिंदु समाजाची व संघाची नवी घडी घालणें हें सुधारकाचें काम आहे. नुसती अर्थाची शाब्दिक लावालावी करुन वास्तविक बदल कसा घडेल? तोंवर अस्पृश्यांच्या धर्माचें कोडें कसें उकलणार?

हिंदुस्थानांतील कोट्यवधि अस्पृश्य आज कित्येक शतकें बिनबोभाट आपल्यास हिंदु म्हणवीत आहेत, त्यांचा प्रत्यक्ष छळ करणारे स्पृश्य वर्गही नुसतें नांवाने हिंदु म्हणवून घेण्याला त्यांना हरकत करीत नाहीत. इतकेंच नव्हे, कपट राजनीतीत कुशल असलेल्या इंग्रज सरकारच्या खानेसुमारी खात्याच्या प्रमुखांनी प्रति दशवार्षिक अहवालात, निर्विकार समाजशास्त्राचें आलोडन करुनही अस्पृश्य वर्गांची गणना हिंदु धर्माच्या सदरखालीच केली आहे. असें असूनही त्यांच्या हिंदुच्वावि।ई मी जी वर शंका प्रगट केली आहे, ती कांही आमच्या राष्ट्राच्या पससांतील गृहकलह जो एकदा कसा तरी दृष्टीआड झाला आहे त्याची खपली पुन: उकरुन नसतें नवीन वितुष्ट माजविण्याच्या कुस्तित हेतूने नव्हे. तर हें जें आमच्या राष्ट्रशरीराचे अगदी जुनाट हाडव्रण, आज जें भरून आल्याप्रमाणे दिसत आहे, तें आंतून भरून आलें नसून, नुसते बाहेरुन वरवर भरलेलें दिसतें. ते केव्हा ना केव्हा आणि पुन: पुन: चिघळणारच अशी प्रामाणिक भीति मला वाटत आहे. अशा प्रकरणांत भिडस्तपणा किंवा चालढकलपणा फार घातकी आहे. म्हणून वरील इषारा देणें मला अगदी जरुर वाटतें. मला हेंही ठाऊक आहे की अलीकडे -विशेषत: आमच्या महाराष्ट्रांत अगदी सोवळे ब्राह्मण भटजी केवळ दक्षिणेच्या आशेने लावतांना आणि सत्यनारायणाच्या पोथ्याही वाचतांना आढळतात. पण अशा प्रसगीं ते किती सुरक्षित रीतीने दूर उभे राहतात, आणि आपणच शिजविलेला सत्यनारायणाचा प्रसाद असूनही स्वत: आपण सेवन करण्याचें कसें टाळतात; आणि लपंडावांमुळे लग्ने आणि पोथ्या तात्पुरत्या पार पडल्या तरी चतुर अस्पृश्यांच्या मनाला अपमानाच्या नवीन जखमा होऊन नवीन वाद व नव्या चळवळी कशा जोरावतात, तेंही ध्यानांत घेणें जरूर आहे. पुराणोत्त्काची धूळ डोळ्यांत सलूं लागल्यामुळे स्पृश्य ब्राह्मणेतरांत ज्याप्रमाणे सत्यशोधकांची चळवळ सुरु होऊन ब्राह्मणांचा शिरकाव कांही झालें तरी आपल्या धर्मकृत्यांत घडू द्यावयाचा नाही, अशी नवी तेढ बळावू लागली आहे, तिचाच प्रसार अस्पृश्यांमध्ये अलीकडे होऊ लागला आहे. आणि समंजस अस्पृश्य लोकही आपले संस्कार आपल्याच लोकांकडून करुन घेऊं लागले आहेत. ह्याला जबाबदार कोण? तोंड दाबून बुक्क्यांचा मार कोठवर सहन होणार? बुक्क्या तरी बंद नाही तर तोंड तरी मोकळें झालेंच पाहिजे ना? महारांची दक्षिणा पाहिजे पण त्यांचा स्पर्श नको, हें व्हावें कसें ?

हिंदु धर्माची आणि समाजाची एकता व दृढता न्यायाच्या दृष्टीने निर्विवाद सिद्ध व्हावी ही कळ आता हिंदुमहासभेसारख्या उद्धारक संस्थांना, पंडित मालवीय व डॉ. मुंजे सारख्या सोवळ्या आणि ओवळ्या ब्राह्मण पुढा-यांना सारखीच भासूं लागली आहे. कोल्हापूरच्या क्षत्रिय जगद्गुरूंनी शेंकडो अस्पृश्यांना क्षत्रियत्वाची दीक्षा स्वहस्ते दिली, मालवीयजी आपल्या हातांनी अस्पृश्यांच्या गळ्यांत जानवी अडकविली, रत्नागिरीकडे डॉ. सावरकरांच्या अविश्रांत परिश्रमाने व डॉ. कुर्तकोटीसारख्या सुधारक शंकराचार्यांच्या अनुज्ञेने अस्पृश्यांच्या तोंडून प्रत्यक्ष वेदमंत्र म्हणून मूर्तीची षोडशोपचार पूजा झाली, इतकेंच नव्हे तर थाटाचें सर्व जातींचें सहभोजनही झाले, अशा वर्तमानपत्रांतून नित्यश: बातम्याप्रसिद्ध होत आहेत. प्रसंगविशेषी एखादें आडबाजूचें मारुतीचें देऊळ किंबहुना शेट जन्मालाल बजाज सारख्या देशभक्ताच्या वैयक्तिक वजनाखाली चाललेलें मोठें देऊळही अस्पृश्यांना उघडें होतें. ही धामधूम अशीच खरोखर सर्वत्र चालून अखेर ज्या दिवशी लहान थोर अस्पृश्य स्त्रीपुरुष हिंदु स्पृश्यांच्या सहवासांत समसमान दर्जाने सर्वच बाबतींत वावरुं लागतील, तेव्हाच त्यांची गणना हिंदुधर्मांत यथार्थ झाली, असें कोणीही म्हणेल, असें झाल्यावर अस्पृश्य हे खरे हिंदु आहेत की भूतधर्मीय आहेत, का आणखी कोणी आहेत, हें पाहण्यासाठी सरकारी खानेसुमारीचीं पुस्तके चाळण्याची कशाला जरुरी पडेल? असें होणार नसेल, तर ही पानें चाळून तरी काय फायदा ?

शेवटीं एका नाजूक गोष्टीचा उल्लेख करुन हें प्रकरण आटपूं वर जी मी शंका प्रदर्शित केली ती केवळ काल्पनिक नाही. सांधिक धर्माची व राजकारणाची नेहेमी गुंतागुंती पडते. परवा डॉ. आंबेडकरांनी कलकत्त्यास सायमन कमिशनच्या पोटकमिटीने एक सभासद ह्या नात्याने २३ ऑकटोबर १९२८ रोजीं भरलेल्या त्या कमिशनच्या संयुक्त परिषदेपुढे साक्ष दिली; तेव्हा त्यांनी स्पष्ट आणि जबाबदारीपूर्वक सांगितलें की, - "There is really no link between the Hindus and the Depressed classes.Therefore we must be regarded as a distinct and independent community, separate from the Hindus."

(अर्थ - "अस्पृश्यांचा व हिंदूंचा अर्थाअर्थी कांही संबंध नाही. त्यांचा एक स्वतंत्र निराळा असा अल्पसंख्याक समाज आहे, असें समजून त्यांना तसें वागविण्यांत यावें.") डॉ. आंबेडकरांच्या ह्या विधानाला व मागणीला सर्वच अस्पृश्यांचा पाठिंबा आहे, असें मुळीच नाही. पण कोणाच्या कोणत्या विधानाला ह्या जंगात कधी सर्वोचाच पाठिंबा मिळावा आहे? म्हणून डॉ. आंबेडकरांच्या ह्या विधानांची आम्हांला हेटाळणी करतां येईल? असो ह्या मुद्दयांचा विचार पुढे राजकारणाच्या प्रकरणांत अधिक करणें बरें होईल. तूर्त असेंच आणखी एक अगदी गैरसोईचें विक्षिप्त विधान अगदी अनपेक्षित दिशेने मला आढळलेलें येथे उल्लेखिल्याशिवाय मला राहवत नाही.

Read more: प्रकरण नववे : धर्म

प्रकरण दहावे : सामाजिक स्थिती

"परदु:ख शीतळ " ह्या खोचदार म्हणीचें मर्म मानीव अस्पृश्यांच्या आजच्या समाजस्थितीची अटकळ करतांना फार चांगलें ध्यानांत भरतें. पुष्कळ सहृदय पण वरवर विचार करणा-या माणसांना, किंबहुना खोल विचार करणा-या पण अनेक व्यवहारांच्या दगदर्गीत गुंतलेल्या मुत्सद्दयांना अलीकडे असें वाटणें अगदी सहज आहे की अस्पृश्यांचा प्रश्न प्रथमदर्शनीं वाटतो तितका उग्र आणि तळमळीचा आता उरला नाही. चहूकडे चाललेल्या केवळ अस्पृश्यतानिवारक प्रयत्नांमुळेंच नसलें तरी, हल्लीच्या सार्वजनिक हालचालीमुळें जग जें सहजच पुढे ढकललें जात आहे, त्या धकाधकींत अस्पृश्यांची स्थिती आता पूर्वीप्रमाणे घोर कष्टमय उरली नाही. कांही भावनामय सुधारकांचे तर, 'ह्या जुन्या जुलुमाचा अलीकडे उगाच बाऊ करुन ठेविला आहे, तिकडे आता कमी लक्ष दिलें तरी चालेल,' वगैरे अभिप्राय व उद्गार अलीकडे उघड उघड ऐकूं येत आहेत. अशा परदु:खशीतळांना जगांतले कोणतेंही दु:ख, मग तें सामाजिक असो की व्यक्तीचे असो, अगदी हलकेंच वाटणार ! उलटपक्षी एखाद्या उदासीन विरक्ताला अगर मायावादी वेदांत्याला तरी ह्या गोष्टीची कशी तळमळ लागणार आहे? फार तर काय, स्वत: अस्पृश्य जनतेचा असा एक भला मोठा भाग, ह्या अवाढव्य देशाच्या कानाकोप-यांत किंवा जागतिहीन निश्चल प्रदेशांत असा खुशाल वावरत आहे की त्यालाच आपल्या स्वत:च्या हीन स्थितीची जाणीव नाही ! मग अस्पृश्यांच्या प्रस्तुत स्थितीची योग्य अजमावणी, वर निर्दिष्ट केलेल्या भिन्न प्रकारच्या धन्य पण अपवादक व्यक्तींना कधीच होणें शक्य नाही. मानवी जीविताचें ध्येय काय, सुधारलेल्या जगाची मजल आज कोठवर गेली आहे, आणि ह्या जागतिक सुधारणेंत स्वत: हिंदुस्थानाने मागे किती कर्तृत्व बजावलें आहे व पदे किती बजावायचे आहे, ह्या सर्व पूर्वापार वृत्तान्ताचा आाडावा घेऊन, आजही हिंदु समाजाचा केवढा मोठा भाग दीन स्थितींतच दबून गेला आहे ह्याची पूर्ण जाणीव करुन घेणें आमच्या ख-या पुढा-यांना अगदी जरुर आहे. ती जाणीव होईपर्यंत अस्पृश्यांच्या आजच्या समाजस्थितीची योग्य आजमावणी शक्य नाही, हें खास.

ह्या दुस-या खंडाच्या पहिल्या प्रकरणांत अस्पृश्य जातींच्या संख्या देतांना स्वच्छ आणि अस्वच्छ असे दोन भेद केलेले आहेत. त्यांवरुन दिसेल की सर्वच अस्पृश्य अगदी ओंगळ आणि हीन दशेंत आहेत असें नाही. बंगाल्यांतील नम:शूद्र व राजवंशी आणि मलबारांतील येझवा अथवा तिय्या या जाती इतरांच्या मानाने राहणीने स्वच्छ, खाऊन पिऊन सुखी, इतकेंच नव्हे तर आत्मोद्धाराच्या मार्गाने झपाट्याने चाललेल्या आहेत. पण त्यांच्यावरही अद्यापि निरर्थक सामाजिक बंधने आहेत व त्यांनाही पदोपदीं अपमान सहन करावा लागतो; त्यामुळे त्यांच्या जागृत झालेल्या मनाला तीव्र वेदना होतात, की ज्या अज्ञानांधकारांत सुखी झोपलेल्या इतर हीन जातींला होणे शक्य नाही. हीनता नाही तेथे टोचणी आहे, टोचणी नाही, तेथे गाढ हीनता आहे. पण हे दोन्ही भाग अपवादच होत. ह्या दोघांमध्ये असणारा जो बहुसंख्याक अस्पृश्य वर्ग त्यांत हीनता आहे आणि टोचणीही आहे. म्हणून एकंदर मानीव अस्पृश्य समुदाय प्रबुद्ध भारताच्या विचाराचा व प्रयत्नाचा सतत विषय असणें जरुर आहे. असें नसेल तर स्वत: भारतच प्रबुद्ध नाही; म्हणून तोच समग्र नष्ट होण्याला योग्य आहे, असेंच म्हणणें क्रमप्राप्त होईल !

अस्पृश्यांचे विद्वान आणि कर्तृत्ववान पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर ह्यांनी लोदियन फ्रॅंचाइस कमिटीचे एक सभासद ह्या नात्याने, तिचे रिपोर्टाला आणखी एक स्वतंत्र मतपत्रिका जोडली आहे. (पुस्तक १ लें पान २०४ पहा. ) तिच्यांत त्यांनी बिहार आणि ओरिसा प्रांताच्या इ.स. १९२१ सालच्या खानेसुमारीचे सुपरिंटेंडेंटचा एक मार्मिक उतारा दिला आहे. त्यांतलें पुढील एक वाक्य विशेष लक्षांत घेण्यासारखें आहे.

But because the facts of everyday life make it impossible ot follow the same practical rules as were followed a hundred years ago, it is not to be supposed that the distinctions of pure impure, touchable and untouchable, are no longer observed....." ह्यानंतर डॉ. भीमराव स्वत:चे मत देतात - आणि तें निराळ्या टाइपांत छापलें आहे- तें असें. "If this is a correct statment of facts of life, then the difference between untouchalbility in its literal and notional seuse is a distinction which makes no difference to the ultimate situation; for as the extract shows, untouchability in its notional sense persisits even where untouchability in its lileral sense has ceased to obtain. This is why I insist that the test of untouchability must be applied in its notional sense" हा अभिप्राय अधिक स्पष्ट करुन दाखविणे जरूर आहे. आजकाल व्यवहाराच्या जरुरीमुळे अगदी जुन्या मताचे पुरुषच नव्हेत तर बायकाही बाजारांत, यात्रेंत,कचे-यांतून व आगगाडींतून अस्पृश्यांशी मिसळतात. घरी आल्यावर स्नान करुन शुद्ध होतात किंवा होतही नाहीत. तरी अशा व्यवहाराचे प्रसंग नसतांना ते अस्पृश्यांशी कधी मिसळणार नाहीत हें उघड आहे. कारण त्याच्या मनांतील अस्पृश्यतेची भावना कायमच असते. कितीही जुन्या वळणाचा माणूस असला तरी कोणत्याही स्पृश्य जातीशीं भेटीव्यवहार करण्यास तो कचरत नाही. परंतु अस्पृश्यांना भेटण्याचा प्रसंगच आला तर स्पृश्य जातींतील माणसें मनांतून तरी कचरतील व त्याबाबतींत शक्य तितकी टाळाटाळ करतील. ह्यावरुन अस्पृश्यतेची गोम बाहेरील वागणुकीवर नसून मनांतील समजुतीवरच अवलंबून आहे हें सिद्ध होतें. आज इंग्रज सरकाराच्या तुरुंगांतील कैद्यांच्या भोजन व्यवहारांत जातिभेद कोठे केव्हाच पाळला जात नाही. पण आज शेंकडो वर्षे हा तुरुंगांतील अभेदभाव चालूनही तेवढ्यावरुनच तुरुंगाबाहेरील जातिभेद कमी झाला, असें मानणें जसें समर्थनीय होणार नाही, त्याचप्रमाणे आग गाडींतून, बाजारांतून प्रत्यक्ष होटेलांतूनही अस्पृश्यांशी स्पृश्य मिसळतात, म्हणून तेवढ्यावरुनच अस्पृश्यता नाहीशी झाली किंवा तिची तेढ व्हावी तितकी कमी झाली, असें मानणेंही समर्थनीय होणार नाही. अस्पृश्यतेची समजूत, तिची मळमळ, मनाच्या तळाशीं दडून बसली आहे, तोपर्यंत ती केव्हा कशी बाहेर फुटून येईल, ह्याची खात्रीच धरवत नाही. फार तर काय, सुधारकांनी आणि देशभक्तांनी एखाद्या एम् सी राजांना किंवा आंबेडकरांना मोठ्या सार्वजनिक सन्मानाने एखाद्या ब्राह्मण सभेच्या मंदिरांत बरोबर जेवणास घेतलें, तरी सिद्ध काय होतें की इतर पुष्कळ जुनी जनता त्यांना बरोबर घेऊन जेवायला तयार नाही हेंच ! येरवी असले समारंभ झालेच नसते: कारण त्यांची जरुरीच नसती! ह्यावरुन मी अशा सुधारणेंचें महत्त्व कमी मानतों असें मुळींच नव्हें. माझें म्हणणें एवढेंच की रोगी औषध आनंदाने घेतो; आणि औषध गुणकारी आहे, एवढ्यावरुन रोगच उरला नाही असें समजण्याची दिशाभूल स्वत: सुधारकांचीच केव्हा केव्हा होण्याचा संभव आहे. मग ज्यांना अशा सुधारणेची दगदग करावयाचीच नसते त्यांच्या तर्कटाला किती ऊत येईल ह्याची नुसती कल्पनाच करणें बरें!

कुणबाऊ गुलामगिरी
असो. आजकालच्या जगाच्या सुधारलेल्या स्थितींतही हिंदुस्थानातील अस्पृश्यांची निरनिराळ्या दिशेने कशी हलाखी चाललेली आहे ह्या विषयींच्या कांही बाबींचा केवळ उदाहरणार्थ विचार करुं. अस्पृश्यतेच्या लक्षणांपैकी एक मुख्य लक्षण म्हणजे अस्पृश्यजन हा एक जमिनीवरचा परंपरागत गुलाम आहे; त्याची ती गुलामगिरीच होय. ही शेतकरी गुलामगिरीची परंपरा द्राविड देशांत विशेषत: नंबुद्री ब्राह्मण आणि नायर जमीनदारांच्या दडपशाहीमुळें मलबार प्रांतांत अद्यापि फारच कष्टप्रद आहे. ह्या गुलामगिरीचें मूळ दोन ऐतिहासिक कारणांत आहे. तीं कारणें म्हणजे एक नायरांची मूलूखगिरी आणि दुसरी नंबुद्रीची जमीनदारी. नायर लोकांनी जेव्हा मलबार प्रांत पादाक्रांत केला व ते आपण राजे बनले, तेव्हा त्यांनी तेथील मुळचे जमिनीचे मालक पुलया, चेरुमा नायाडी, इत्यादि जातींना त्यांच्याच जमिनीवर वंशपरंपरेचे राबणारे गुलाम केलें. जमिनी काबीज केल्या तरी वाहण्याला मजूर पाहिजेच होते. ह्या नविन राजकीय कैद्यांपेक्षा अधिक चांगले फुकटे मजूर दुसरे कोण मिळणार ? आजकाल आसाम, सिंहलद्वीप वगैरेकडील गौरकाय चहाच्या मळेवाल्यांना आपल्या बादशाही सत्तेमुळे जसे मुदतबंदी मजूर उर्फ गुलाम मिळतात तसेच पुरातन काळच्या नायरांना हे आयते मजूर अधिक सवलतीने मिळाले. हल्लीच्या चहाच्या मळ्यांतून मजुरांना गुरांप्रमाणे वागविण्यांत येते; त्यांची दाद सहजासहजीं लागणें शक्य होत नाही. त्याचप्रमाणे नायर राजांच्या कारकीर्दीत ह्या गुलामांची स्थिती होती. त्या वेळीं एखाद्या साध्या नायर शिलेदाराने एखाद्या चेरुमाचा करमणुकीखातर जरी प्राणही घेतला, तरी चालत असे, असे तद्देशीय गॅझेटियर मधून उल्लेख आढळतात ! रावांचा रंकावर थोडक्या शतकांपूर्वी असा दरारा पाश्चात्य सुधारलेल्या देशांतही चालत असे, मग मलबारांत अशा गोष्टीचा पुरावा शोधण्याची जरुरीच नाही. चेर देश हा मूळचा चेरुमांचाच. हें त्यांच्या नांवावरुनच सिद्ध होतें. पण तो आज आपल्या मायभूमींत आपणच बंदा गुलाम झाला. कालांतराने मलबारांत नंबुद्री ब्राह्मणांकडून आपला धार्मिक ताबा स्थापण्यांत आला. आता बहुतेक जमिन नंबुद्रीही अशी रुढि झाली आहे. चोरावर मोर असा हा न्याय आहे ! ह्या राजकीय-धार्मिक जोड पकडीला ब्रिटिश रिसायतीच्या छत्राखाली भांडवलशाहीचा तिसरा पाठिंबा मिळाल आहे. ब्रिटिश सत्ता म्हणजे भांडवलशाहीची इष्टदेवताच. मग मलबारांतील कुणबावा कसा चालत असे ह्याची कल्पना देखील सहज होणें कठीण. मलबारांतील जमीनदार नंबुद्री ब्राह्मण झाल्यावर कुणबी उर्फ जमिनी वाहणारे हे नायर किंवा तिय्या जातीचे झाले आहेत. पण त्यांच्या शेतांवर प्रत्यक्ष देह झिजविणारी जनावरें म्हणजे मूळ मालक 'चेरुमा' हेच आहेत.जमिनीवरच तात्पुरत्या झोपड्या बांधून हे चेरुमा वंशपरंपरेने असतात. एखाद्या जमिनीची विक्री अगर मोबदला झाला तर त्या जमिनीवरची झाडें, दगड, माती, निधि, निक्षेप ह्यांची सुद्धा जशी विक्री अगर बदला झाला असेंच समजण्यांत येतें, तसेंच ह्या जमिनीवरील झोपड्या आणि त्यांत राहणा-या मानवी जनावरांचाही सहकुटुंब मोबदला होतो. ते नव्या मालकाचे कायदेशीर ताबेदार होतात. त्यांनी ह्या नव्या मालका विरुद्ध कांही हलगर्जीपणा केला, तर आजकालचा सुधारलेला ब्रिटिश कायदा देखील तात्त्विक न्यायापेक्षा व्यावहारिक रुढीच्या बाजूलाच अधिक कलतो. हे सर्व प्रकार तेथे जाऊन बारकाईने आणि सहानुभूतीने निरीक्षण केल्याशिवाय कळून येणें शक्य नाही.

मी एकदा ब्रिटिश मलबारांत फिरतीवर असतांना कालीकत येथे रारीचन् मुप्पन् नांवाच्या एका श्रीमंत नायर मित्राकडे पाहुणा म्हणून उतरलों होतों. चेरुमा जातीची पुष्कळ पिढीजाद मजूर कुळें त्याच्या इष्टेटीवर शेंकडो होती. आमच्याकडील शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या शेतावर आपल्या बैलांना औताचें काम नसेल तेव्हा दुस-याच्या शेतावर किंवा इतर कामावर आपले बैल भाड्याने देतात, तसें हे राजश्री मुप्पन् आपल्या ताब्यांतल्या मजुरांना आपलें काम नसेल तेव्हा दुसरीकडे भाड्याने पाठवीत व त्यांचें भाड्याचें उत्पन्न खुशाल आपण घेत. ही गोष्ट त्यांनीच प्रांजलपणें मला सांगितली ! ह्या गुलामांच्या योगक्षेमाची व्यवस्था ज्या रुढीमुळें ह्यांच्या मालकी घराण्याकडे आली होती, त्याच रुढीच्या जोरावर ह्या प्राण्यांच्या कष्टांचें उत्पन्न ह्या मालकाकडेच येणें क्रमप्राप्तच होतें. मग हा व्यवहार ऐकून मला आश्चर्य का वाटावें ह्याचेंच उलट कोडें रा. मुप्पन्न ह्यांना पडलें ! थोड्याच चौकशीनंतर चेरुमांचा कायदेशीर दर्जा मला कळला व माझी हळहळ मिटली ! नाइलाजाची खात्री पटल्यावर व्यर्थ हळूहळू काय उपयोगाची !

अशा गुलामाचें भाडेंच काय, पण रीतसर खरेदीपत्र करुन अशा गुलामाची विक्री झाल्याबाबतचा एक खटला स. १९१४ साली झालेला मी वर्तमानपत्रांत वाचला. खालील अर्थाची तार असोशिएटेड प्रेसची मी वाचली. उत्तर मलबारांत क्किलांडी जिल्हयाच्या माजिस्ट्रेटपुढे हा खटला सुनावण्यांत आला. पलचेरुवट महमद व कोरोथ महमद नांवाचे दोन श्रीमंत भोपले गृहस्थ होते. पहिल्याने दुस-यास वेलन् नांवाच्या आपल्या ताब्यांतील चेरुमा जातीच्या दासाला (Serf) अवघ्या दहा रुपये किमतीला विकलें. सुमारे दोन वर्षांनी नव्या मालकाच्या जुलमाला कंटाळून वेलनू हा पळून गेला. तो परत मिळावा म्हणून कोरोथने पलचेरुवर ही फिर्याद जिल्ह्याच्या मुनसफाकडे केली. तेव्हा कोठे ब्रिटिश कायद्याचे डोळे उघडले. मुनसफांनी अर्थात् हा विक्षिप्त दावा काढून तर टाकिलाच, पण हें प्रकरण कागदपत्रांसह पोलिस चौकशीसाठी मॅजिस्ट्रेटकडे पाठविण्यांत आलें. कारण मनुष्यविक्रीचा फौजदारी गुन्हा घडल्याचा पुरावा मिळाला, वगैरे वगैरे सुमारें ७५ वर्षांपूर्वी गुलामगिरीचा कायदा हिंदुस्थानांत पास झाला असूनही त्यावेळी मलबारांत हा क्रयविक्रय इतक्या उघड रीतीने -कदाचिच् न कळत-चालावा हाच मुद्दा मुख्य आहे. शिमगा संपला तरी कवित्व उरतें, ह्या न्यायाने गुलामगिरी कायद्याने बंदल झाली, तरी अद्यापि ह्या बिचा-यांची ताबेदारी कोणत्या ना कोणत्या रुपाने तरी त्यांच्या स्वातंत्र्याच्या, सुखाच्या व प्रगतीच्या आड येत आहेतच.

वर सांगितलेल्या जमीनदारीच्या जुलुमांत सावकारी जुलमाची पुन: अधिक भर पडते. कर्नल ऑल्कॉट ह्यांनी आपल्या Poor Pariah ह्या पुस्तकांत ( पान ५ पहा ) एका मासलेवाईक कर्जरोख्याचा उतारा दिला आहे. ह्याची तारीख २२ मे १९०० ही दिली आहे. हा रोखा रंग सैदिनी पदयाची नांवाच्या सावकाराला इरुला मोट्टयार नांवाच्या पारिया कुळाने लिहून दिला आहे. तो अशा अर्थाचा आहे:-

" तुमचे वडील नारायणस्वामी ह्यांनी आम्हांला ६८ रुपये कर्जाऊ दिले म्हणून आजवर मी स्वत: आणि माझी तीन मुलें, वडील मुलगा पेरिआप्पल ( वय १९ वर्षे ), मधला चिन्न अप्पयल ( वय १२ वर्षें), धाकटा चिन्न स्वामी ( वय ९ वर्षे) सदर नारायणस्वामीची नोकरी करीत आलों. तुमच्या वडिलांनी आपल्या मागे तुमच्या हवाली आम्हांला केले आहे, म्हणून आणखी दोन वर्षे आम्ही चौघांनी तुमची नोकरी केली. वरील तारखेच्या नंतर तुमच्या वडिलांकडून व स्वत:कडून आम्हांला आणखी लहान लहान रकमा कर्जाऊ मिळून, एकंदर मुद्दल आजवर ९३ (रुपये त्र्याण्णव ) झालें आहे. ह्याच्या व्याजांत मी, माझी पत्नी, माझी तीन मुलें मजूरी घेऊन वरील मुद्दल फिेटेपर्यंत नोकरी करीत राहूं. नोकरी करण्यांत कसूर होईल तर वरील रक्कमेची फेड करुं.

निशाणी हाताचा आंगठा
ह्या शतकांतही असे कर्जरोखे सर्व कुटुंबास गहाण ठेवून त्यांच्या तारणावर लिहून घेतले जात आहेत हाच मुद्दा लक्षांत घेण्यासारखा आहे. ह्याहून आश्चर्य हें की असलें कर्ज पिढ्यानुपिढ्या फिटत नसतें. असले रोखे अलीकडे कमी झाले असले तरी हा मासलेवाईक हवालदीलपणा अजीबात नष्ट झाला आहे, असें नाही. इ. स. १९१८ सालीं मद्रास इलाख्यांत तंजावर त्रिचनापल्लीकडे जमीनदार आणि कुळे ह्यांच्यामध्ये कटकट उत्पन्न झाली होती म्हणून मी आमच्या मिशनच्या बंगलोर शाखेच्या सुपरिटेंडेंटला बरोबर घेऊन हें प्रकरण स्वत: पाहून कांही इलाज घडत असल्यास पाहावें म्हणून गेलों. त्यावेळी लॉर्ड पेंटलंड हे मद्रासचे गव्हर्नर होते. त्यांनी अस्पृश्य वर्गांच्या हिताकरिता लेबर ऑफिसर म्हणून एक खास अधिकारी नेमला होता. जमिनीचा मालकी हक्क अस्पृश्यांना नव्हता, म्हणून त्यांना कांही जमिनी खास मालकी हक्काने करतां याव्या म्हणून कांही पड जमिनी अस्पृश्यांच्या वहिवाटीला देण्याकरितां मद्रास सरकारकडून राखून ठेवण्यांत आल्या होत्या. अस्पृश्यांना हे हक्क प्राप्त झाल्यास मोठी आपत्ति घडेल ह्या भीतीने ह्या जिल्ह्यांतील जमीनदारांनी मोठाच गिल्ला चालविला होता. मद्रासेंत प्रत्यक्ष गव्हर्नर साहेबांनी गाठ घेऊन त्यांची सहानुभूति संपादून आम्ही दोघे ह्या जिल्ह्यांत गेलो. त्याच वेळीं हिंदू मुसलमानांची राष्ट्रीय एकी घडविण्यासाठी 'लखनो पॅक्ट' लो. टिळकांनी घडवून आणिला होता. आणि पुणें मुंबई येथे मी आणि आमच्या मिशनचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर ह्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्य ह्यांची एक घडविण्यासाठी मोठमोठ्या जंगी जाहीर सभा भरवून अस्पृश्यांची जोड राष्ट्रकार्याला व राष्ट्रीसभेची जोड अस्पृश्योद्धाराला मिळविण्याचा प्रयत्न चालविला होता. पण कांही झालें तरी आम्ही वरील चौकशी करण्याकरिता त्रिचनापल्लीकडे गेलों असतां, तेथील जमीनदारांनी आमच्या जीवालाच धोका येईल अशा धमक्या दिल्या, आणि राष्ट्रीय व सामाजिक कार्यांतील आमच्या कांही पुढारी मित्रांनी तर ज्या खेड्यांतूनहे रण माजलें होतें तेथपर्यंत आम्हांला जाऊंच दिलें नाही ! आमच्या सुरक्षितपणाचा प्रश्न कसाही असो ( त्याविषयी प्रत्यक्ष गर्व्हनर साहेबांनी आश्वासन दिले होतें तरी ), आमच्या जाण्याने स्वत: अस्पृश्यांच्या हितालाच अपाय घडेल व त्यांच्या बाजूने जो प्रयोग सुरु झाला होता त्यालाच मोठी खीळ पडेल हा पोक्त सल्ला आम्हांला ऐकणें भाग पडलें. आम्ही परत फिरलों. कार्यबाहुल्यामुळें पुन: इतक्या दूर जाणेंच झालें नाही. ही मोठी नामुष्कीची गोष्ट झाली !

ह्या दक्षिण देशांत अस्पृश्य वर्गांतून खिस्ती धर्मांत मोठी प्रचंड भरती झाली आहे हें प्रसिद्धच आहे. खेड्यांत ह्या लोकांची वर सांगितलेली दैना; तर शहरांत आम्हांस काय प्रकार प्रत्यक्ष ख्रिस्ती झालेल्या पारिया लोकांचा दिसला ! त्रिचनापल्ली हें एका मोठ्या जिल्ह्याचें राज घानीचें शहर. ह्या ठिकाणीं ख्रिस्ती मिशनचीं मोठमोठीं केंद्रे जाणि मंदिरें आहेत. वरिष्ठ वर्गांतून ख्रिस्ती झालेल्यांची स्थिती सुसंपन्न असून किती तरी व्यक्ति ब्रिटिश दरबारांत अधिकारारूढ दिसल्या. पण बहुजनसमाजाची स्थिती कशी दिसली ? एके दिवशी मी एका मोठ्या रस्त्याने चाललों असतांना समोरून एक मोठा म्युनिसिपालिटीचा अवजड केराचा छकडा रखडत येत होता. त्यास एकीकडे एक म्हातारा रेडा जुंपला होता व दुस-या बाजूस एका तरुण मजुरानेच आपली मान लाविली होती. मोठ्या करुणेने मी त्यास तरुणास त्याची जात विचारली. पण त्याने मोठ्या आड्यतेने आपण रोमन कॅथॉलिक (ख्रिस्ती) आहों असें सांगितलें. मला पूर्वींच आलेली शंका हें उत्तर ऐकून अर्थात् तुफान वाढली. मी धैर्य करुन व अत्यंत सहानुभूतीने त्याच्या पूर्वाश्रमाची जात विचारिली. त्याने 'पारिआ' असें सांगितले. पुढे काय सांगावयाचे आहे!

बंगालकडे ब्रिटिश सरकारांनी पुढचा मागचा विचार न करिता केवळ आपली बैठक बळकट बसावी म्हणून कायम जमीन-धारा-पद्धति रुढ केली आहे. तेथील जमिनीची मशागत करणारा वर्ग मुख्यत: नम:शुद्र, राजवंशी, वगैरे अद्यापि अस्पृश्य असलेले वर्ग किंवा अशाच वर्गांतून मुसलमानी धर्मांत शिरलेले कष्टाळू गरीब स्पृश्य वर्ग आहेत. मद्रासेइतकी त्यांची स्थिति हताश नाही. जरी जमीनदार वर्गोकडून शिक्षण, आरोग्य, धार्मिक व घरगुती वहिवाटीच्या नाजूक बाबतींत खेड्यांत राहणा-या ह्या कुळांना, उघड बोलून दाखविता येत नाही अशा प्रकारें, उतसर्ग पोचत असलेला मी त्यांच्यांतच मिसळून असताना माझ्या कानावर वारंवार येत असे. फार तर काय, खेड्यांत उकिरडा साचला तर खत म्हणून विक्री करणें, किंवा केवळ त्याची घाण आपल्या घरापासून दूर करण्याच्या बाबतींतही जमीनदाराचा दील खुष करुनच काम होणें शक्य होत असे. ह्यांच्यातील न्हावी, धोबी, ब्राह्मण वगैरे सर्व शार्गिर्दपेक्षा जरी अस्पृश्य जातीचाच पूर्वीपासून असला तरी तोही मातब्बर जमीनदारांच्याच भ्रुकुटीवर नाचणारा. नम:शुद्रासारख्या पुढारलेल्या वर्गांची जर अशी अनास्था, तर मग हारी, पान, डोम इ. अति कंगालांची स्थिती काय वर्णावी १ पण, नंगेसे खुदा बेजार ह्या न्यायाने उलट ह्या कंगालांचीच स्थिती केव्हा केव्हा बरी म्हणवत असे ! प्रतिष्टित नम:शूद्रांना मात्र त्यांची मानहानि अत्यंत दु:सह होत असे.

आमच्या महाराष्ट्रांत हाडकी हाडोळीचीं क्षुद्र वतनें आणि अलुत्या बलुत्याचे लहानसान हक्क महारामांगाचे आहेत. पण अलिकडे महाराच्याच पुढा-यांच्या लक्ष्यांत ही गोष्ट येऊन चुकली आहे की जोंवर ह्या हक्कावर हा प्रचंड वर्ग हात टेकून आहे तोंवर ह्यांचा पाय पुढे  कधीच पडणार नाही. शेत पिकलेंच तर थोडे बलुतें मिळणार. पण गांवक-यांचा, रयतेचा, येणा-या जाणा-या बड्या अधिका-यांच्या सरबरायीचा ससेमिरा महारांच्यामागे कायमचाच लागलेला आहे. जेथे पांच महार गांवकामासाठी पुरतात तेथे पंचवीस झाले तरी ते सर्व आपापल्या पाळीची वाट पाहात स्वस्थ बसणार! ही स्थिती आता पालटत आहे, तरी जी एकदम बंद  झाली पाहिजे ती हळू हळू पालटत आणि लोंबकळत ठेवण्यांत काय फायदा ? परंपरेचा मोह सुटत नाही, हा अस्पृश्यांचाच दोष होय. तेच हट्ट धरुन बसतात. त्यांत सरकार आणि रयत ह्यांचा फायदाच आहे. डॉ. आंबेडकरांनी मागे ह्या बाबतींत एक बिल आणिलें होतें. पण ते कौन्सिलच्या टेबलापर्यंत पोचण्यापूर्वीच लोकांच्या हट्टामुळे मध्येच गहाळ झालें. तूर्त अशा विधायक कार्याकडे कोणाचेंच लक्ष लागणें कठीण झालें आहे. हे महारांचे हक्क आणि त्यांची कर्तव्ये इतकी जुनी आणि त्यांनाच अवनतिकारक झालीं असूनही ह्या गोष्टी त्यांच्या ध्यानांत भरत नाहीत. परकीय सरकार उदासीन असल्यामुळे, ह्या बाबतींत कायद्याच्या जोरावर सुधारणा करु इच्छीत नाही. सरकारी अधिका-यांना ह्या बाबतींत सुधारणा होण्यांत स्वत:ची मोठी गैरसोय होणार हें माहीत आहे. कारण खेड्यांत फिरतीवर गेलें असतां विशेषत: मुलकी आणि पोलीस खात्याच्या अधिका-यांना आपली सरबराई ह्या गरिबांकडून हल्ली थोड्या मजूरीवर पण वाटेल त्या धाकदपटशाहीने करतां येते. दुस-या शब्दांत सांगावयाचें म्हणजे ह्या अडाणी लोकांवर एक प्रकारची पुरातन वेठ बिगार आजही राजरोस चालली आहे. आणि त्यांच्या मूर्ख हट्टामुळें ते ह्या अन्यायाला अगदी पात्रच ठरतात.

Read more: प्रकरण दहावे : सामाजिक स्थिती

प्रकरण तिसरे : बौद्ध कालांतील अस्पृश्यता

हा काळ हिंदुस्थानच्या इतिहासांत अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्याच काळांत ह्या प्रचंड देशांत अनेक दृष्टींनी अेक क्रांत्या झाल्या. त्या अशा १ येथूनच हिंदुस्थानाच्या ऐतिहासिक काळाला सुरुवात झाली. ह्या पूर्वीच्या प्रागैतिहासिक काळांतील घडामोडी बहुतेक निश्चित पुराव्याच्या अभावी अनुमानानेच ठरवाव्या लागतात.

२. ह्या काळीं हिंदुस्थानचें आद्ययुग अथवा युगें संपून, मध्य युगाला सुरुवात होते. ह्या मध्ययुगाचा अमल जवळ जवळ दीड हजार वर्षें म्हणजे हिंदुस्थानावर मुसलमानांच्या स्वा-या होऊन त्यांचे आधिराज्य व त्यांच्या संस्कृतीचा परिणाम होऊं लागेपर्यंत चालू होता.


३. वैदिक आणि तत्सम इतर बाह्य संस्कृतींचा जो बरा वाईट परिणाम हिंदी समाजस्थितीवर ह्या काळापर्यंत होत होता त्याला येथून पुढे बौद्धजैनांनी चालविलेल्या सुधारणांचा विरोध होऊ लागला ह्या कलहांत जी कालेंकरुन तडजोड झाली तिला बौद्ध ब्राह्मणी संमिश्र संस्कृति असें नांव देतां येईल. ह्या मिश्र संस्कृतीचा काळ म्हणजे हें मध्ययुग होय.


४. ह्याच युगात संस्कृत वाड्मयाच्या जोडीला उत्तरदेशांत पाली व प्राकृत, तशीच दक्षिण देशांत तामीळ कानडी इत्यादि तद्देशीय वाड्याची भर पडली. ह्या युगापूर्वीच उत्तर हिंदुस्थानांत बाहेरून आलेल्या आर्य, शक वगैरे प्रतापी अभिजात मानववंशांची व त्यांच्या संस्कृतीची पूर्ण प्रतिष्ठा झाली होती. ह्या वंशांचा व संस्कृतीचा ह्या मध्ययुगाच्या आरंभापासून दक्षिण हिंदी द्वीपकल्पांत जोराचा शिरकाम होऊन सुमारे ख्रिस्ती शकाच्या आरंभीच म्हणजे अर्धसहस्त्रकांतच हें 'दक्षिणापथ' नांवाचे द्वीपकल्प भरतखंडांत, एकजीव झालें नाही तरी, सामील झाले.


६. ह्याच मध्ययुगाच्या आरंभी अलेक्झांडरच्या स्वारीमुळे उत्तर हिंदुस्थानाचा, पश्चिम आशियाशींच नव्हे तर पूर्व युरोपखंडाशीही संबंध जडला. इतकेंच नव्हे तर ह्या स्वारीला ज्या मौर्य साम्राज्याने यशस्वी रीतीने मागे हटविलें त्या प्रतापी आणि अस्सल हिंदी साम्राज्याने उत्तर आणि दक्षिण ह्या दोन भिन्न व तुटक हिंदी देशभागांची एकाच छत्राखाली संयुक्त घटना ( फेडरेशन) केली. इतकेंच नव्हे तर पूर्वेकडे ब्रह्मदेश, सयाम, मलाया द्वीपकल्प आणि दक्षिणेकडे सिंहलद्वीप येथपर्यंत आपल्या संस्कृतीचे हात पसरिले.


७. ह्या मध्ययुगापूर्वी भारतांत, निदान आर्यावर्तोत, ब्राह्मणी संस्कृतीचाच वरचष्मा होता. ही संस्कृति बहुश: 'आध्यात्मिक,' भावनात्मक, वाड्मयविषयक उर्फ शाब्दिक होती. मौर्य साम्राज्याचा व्यवहारवाद आणि बौद्धजैनांचा शुद्ध बुद्धिवाद ह्यांचें सहकार्य ह्या मध्ययुगांत घडून ह्या नवीन शक्तींशी ब्राह्मणी संस्कृतीला तडजोड करावी लागली.


८. ह्याच मध्ययुगांत हिंदी समाजाची पुनर्घटना वर्णाश्रमधर्म वगैरे-सारख्या अल्पसंख्याप्रेरित भावनात्मक पायांवरुन अर्थशास्त्राच्या आणि बहुजनसत्तेच्या नवीन पायावर झाली.


९. ह्याच मध्ययुगांत हिंदी समाजस्थितीची सुधारणा व लोकस्थितीची ऐहिक भरभराट जशी झाली तशीच भावी दुर्बळतेचीं आणि परवशतेची बीजेही कायमची पेरलीं गेली! येणेंप्रमाणे हा काळ चांगलाही आहे आणि तितकाच वाईटही आहे. कारण ह्या सबंध काळांत बौद्ध आणि ब्राह्मणी संस्कृतीची सारखी तडजोड चालली होती. आणि अशा मिश्रणाचा परिणाम भरत खंडाच्या भवितव्यतेवर पुढील म्हणजे अर्वाचीन युगांत अनिष्टच झाला ह्यांत नवल नाही! असो. आम्हांला ह्या कालांत आमचा प्रस्तुत विषय जी अस्पृश्यता तिचा विकास कसा झाला हे पाहावयाचे आहे.


अस्पृश्यतेचा व्याप आणि घटना कमी अधिक मानाने सर्व जगभर आहे हें वर सांगितलेंच आहे; तरी हिंदुस्थानांत ह्या घटनेला विशेष स्थैर्य आणि यश आले आहे ही गोष्ट ध्यानांत घेण्यासारखी आहे. आणि हिच्या कारणांचा शोध व मीमांसा शक्य तोंवर करणें जरूर आहे. हिंदुस्थानांतही त्यांतल्या त्यांत उत्तरेपेक्षा दक्षिण भागांत अस्पृश्यतेचा पाया अधिक खोल व दृढ रोविला असून त्याचा परिणाम किती तरी अधिक तीव्र दिसतो, ह्याचें कांही तरी विशेष कारण असलें पाहिजे. कदाचित् आर्यांच्या आगमनापूर्वीही ह्या देशांत ही संस्था होती किंवा काय अशी शंका मनांत येते. पण ह्या शंकेचे समाधान होण्यासारखा एकही पुरावा मिळण्याचें कांही साधन आता उरले नाही. उत्तर हिंदुस्थानांतील अस्पृश्यतेचा जो विकास आम्ही वर पाहिला आणि त्यासंबंधी आर्यांच्या वाड्मयांतून बौद्ध काळाच्या मागे मागे जाऊन जे मिळालेले उल्लेख वर उद्धत केले आहेत त्यांवरुन एक अनुमान असें निघत आहे की, आर्यांपूर्वी ह्या देशांत कायमची वसति करुन राहिलेल्या धनसंपन्न मानवजाति होत्या त्यांच्या सहवासाने कदाचित् अस्पृश्यतेचा शिरकाव आर्यांच्या समाजघटनेंत झाला असावा. हा सहवास जसजसा जास्त काळ व जास्त प्रमाणावर झाला तसतसा हा शिरकाव जास्त झालेला दिसत आहे. येरव्ही आर्य ग्रंथांतून शोध घेत जसजसे मागें जावें तसतसे अस्पृश्यतेचे दाखले कमी कमी कां आढळावे ह्या गोष्टीचा उलगडा नीट होत नाही.


मी दक्षिण हिंदुस्थानांत तामिळ देशांत समाजशास्त्रांचे संशोधन करीत असतां ब-याच मुदलियार, पिल्ले वगैरे द्राविड पंडितांनी मला सांगितले की आर्यांप्रमाणे अत्यंत प्राचीनकाळी द्राविड देशांतही एक प्रकारचें चातुर्वर्ण्य होते. १ किना-यावर राहणारे, २ अंतर्देशांतील मैदानांत राहणारे, ३ जंगलांत झाडींतून राहणारे व ४ डोंगरपाठारावर राहणारे, असे हे चार भिन्न समाज होते. सांपत्तिक दृष्टया ह्यांच्यांत उच्चनीच भाव होता. पण आर्यांप्रमाणें तो भेद सामाजिक होता की नाही हे तेवहा मला समजले नाही. बिशप कॉल्डवेल ह्यांनी 'द्राविड भाषांचे तौलनिक व्याकरण' (Comparative Grammar of dravidian Languages) ह्या नांवाचा जो एक अत्यंत परिश्रमाने लिहिलेला अमूल्य ग्रंथ आहे त्यांत Depressed Classes म्हणजे दलितवर्गांसंबंधी एक निबंध आहे. त्यांत विशप कॉल्डवेल म्हणतात, "द्राविड देशांत जे लोक आपल्यास शूद्र म्हणवितात, ते स्वत:स शूद्र म्हणजे आर्येतर येवढ्याच अर्थाने समजतात, नीच ह्या अर्थाने नव्हे. मात्र शूद्र म्हणजे द्राविड देशाचे अस्सल रहिवासी असाहि एक अर्थ शूद्र म्हणून घेण्यांत आहे. मानीव अस्पृश्य ह्यांना ते शूद्र हें बहुमानाचे नांव देत नसत. मुदलीयार ह्या शब्दाचा यौगिक अर्थच 'मूळचा' असा आहे. ह्यावरून अस्पृश्य जे पारिया लोक त्यांना परके समजण्यांत येत असे, असें दिसतें. ह्यावरून प्राचीन द्राविडांतही अस्पृश्यता स्वतंत्र रुपाने होती अशी शंका येते. पण ह्या कल्पनेस शिलालेखी अगर वाड्मयीन आधार नाहीत.


अस्पृश्यता रूढ होण्याची दोन स्वाभाविक कारणें उघड आहेत. पहिलें जातिद्वेष अथवा वर्णद्वेष आणि दुसरे वृत्तिमत्सर. उत्तर हिंदुस्थानांत आर्यांचा जम हळूहळू बंसू लागल्यावर त्यांनी जेव्हा वर्णांची व्यवस्था लाविली तेव्हा त्या अवस्थेंत शुभ्र, ताम्र, पीता आणि कृष्ण ( ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ) अशा भिन्न वंशांचा समावेश यशानुक्रम करुन घेतला आहे. सर्व ब्राह्मण पांढरे, सर्व क्षत्रिय तांबडे अथवा जांभळ्या वर्णाचे, सर्व वैश्य पिवळे आणि शूद्र तितके एक जात काळेच होते असें माझें म्हणणें नाही. कातडीच्या रंगावरुन वर्णांची लाविलेली उपपत्ति इतिहासज्ञ कै. राजवाड्यांची आहे. माझी नव्हे. मला ती पसंत नाही. मात्र हे सगळेच रंग आताच्या ह्या सगळ्याच वर्णोत व पोट-जातींत आढळतात, त्याअर्थी ते पूर्वीही आढळले असावेत असा माझा तर्क आहे. रामकृष्ण काळे होते. न जाणों वसिष्ठ वाल्मीकि कश्यप हेही काळे असतील. तेव्हा शुभ्रकाय ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यांचा गुणकर्मानुसार परिस्थितीवशात् शिरकाव झाला असावा; आणि ज्यांच्या गुणकर्मांचा-केवळ बाह्य रंगाचाच नव्हे-तिटकारा आला अशा घोर जंगली जातींना दूर ठेवण्याची प्रवृत्ति पूर्वीच्या आयेंतरांच्या सहवासाने आर्योचीही झाली असावी, असें मला वाटतें. पण पुढे अर्थशास्त्राच्या पायावर आर्यांमध्ये निरनिराळ्या वृत्तीचा उर्फ धंद्यांचा विकास झाला तसतशी वर्णद्वेषांत वृत्तिमत्सराची भर पडून पूर्वीच दूर ठेवलेल्या जातीमध्ये वृत्तिबहिष्कृत अशा लोकांची भर पडूं लागलून अस्पृश्यतेचा विस्तार होऊं लागणें संभवते. पुढे आर्यांच्या वसाहती दक्षिण हिंदुस्थानांत जसजशा होऊ लागल्या तसतसा वर्णद्वेष आणि वृत्तिद्वेष ह्या जोडगोळीमुळे दक्षिणेकडे अगोदरच असलेल्या अस्पृश्यतेला अधिक ऊत आला असावा हें उघड दिसतें. येरव्ही दक्षिणेकडील व उत्तरेकडील अस्पृश्यतेंत इतका तीव्र फरक का असावा हे कळत नाही.


प्रो. टी. डब्ल्यु. व्हिस डेव्हिड्स ह्या विद्वान शोधकांनी आपल्या Buddhist India ('बौद्धकालीन हिंदुस्थान') ह्या पुस्तकांत ( प्रकरण ४, पान ५३-५५) आर्यांच्या वर्णव्यवस्थेंत बौद्धकाळी आर्थिक वृत्तिव्यवस्थेची भेसळ कशी होऊं लागली हे पाली भाषेंतील निरनिराळ्या जातक ग्रंथांतून मार्मिक उतारे देऊन स्पष्ट केलें आहे. पुढे दिलेल्या भाषांतरित उता-यावरुन त्यांचा आशय स्पष्ट होईल.
भरतखंडावर स्वारी करणा-या ज्या आर्य जमाती त्यांच्या नायकाशीं आपला वंशसंबंध जोणारे 'क्षत्रिय' हे तत्कालीन समाजाचे म्होरके होते... यशयाग करणा-या पुरोहितांच्या वंशावर हक्क सांगणा-या ब्राह्मणांची पायरी त्यांच्यानंतरची होती. त्यांच्याखाली शेती कसणारा सामान्य जनसमाज म्हणजे वैश्यवर्ग होता. सर्वांच्या शेवटीं अनार्थ वंशांत जन्मलेल्या शूद्रांची गणना होत होती. हे लोक मजुरी, हस्तकौशल्याची कामें किंवा सेवाचाकरी करीत. हे वर्णांने इतरांपेक्षा अधिक काळे होते....


येवढ्यानेच हें परिगणन संपले असें नाही. चा-ही वर्णांच्या तळाशी म्हणजे शूद्रांच्या खालच्या पायरीवर हलक्या जमाती व हलक्या धंद्यांचे लोक ('हीन जातीय' आणि 'ही शिप्पाणि') असत. 'हीन जाती'मध्ये चटया विणणारे, फासेपारधी व गाड्या तयार करणारे यांचा समावेश होत असे. हे लोक हिंदुस्थानांतील मूल वंशापैकी असून वंशपरंपरेने ही तीन कामें करणारे होते. 'हीन शिल्पी' - बुरूड, न्हावी, कुंभार,कोष्टी, चांभार इ. जे असत त्यांच्यामध्ये जन्मत: निश्चित झालेला पृथकृपणा नसे. या 'हीन शिल्पापैकी एखादा धंदा सोडून दुसरा धंदा त्यांस स्वीकारतां येत असे व कित्येक तसें करीतही असत. उदाहरणार्थ, पांचव्या जातकामध्ये एकप्रेमसंबंधांत निराश झालेला क्षत्रिय, बिलकुल मानहानि किवा दंड सोसावा न लागतां कुंभाराचा, बुरूडाचा, वेतकाम करणा-याचा माळ्याचा, आणि स्वयपाक्याचा-इतके धंदे एकामागून एक करतांना दिसतो. सहाव्या जातकामध्ये एक वैश्य शिंप्याचा व कुंभाराचा धंदा करीत असलेला आढळतो; असें असूनही त्याच्या नातेवाईकांची त्याजविषयीची आदरबुद्धि ढळलेली दिसत नाही.


अखेर, या 'हीन जाति' व 'हीन शिल्पा' पेक्षाही तिरस्कृत असलेल्या चंडाल व पुल्कस या मूलवासीयांच्या जमाता जैन व बौद्ध ग्रंथांतून उल्लेखिलेल्या दिसून येतात. ह्या उता-यावरुन दिसून येतें की आर्यांच्या चातुर्वर्ण्यात आपसांत वाटेल तशी आदलाबदल झालेली चालत असे; पण ह्या चातुवर्ण्याबाहेर ज्या बहिष्कृत व तिरस्कृत जाती असत त्यांचा आंत शिरकाव होत नसे.


ह्याच भागात प्रो. व्हिस डेव्हिड्स ह्यांनी पान ५६, ५७ वर खालील दहा उदाहरणें जातकांच्या संदर्भासह दिलीं आहेत.
१. एक क्षत्रिय राजपुत्राने आपल्या प्रीतिपात्रासाठी कुंभार, बुरुड, मालाकार इत्यादिकांची वृत्ति पत्करली तरी त्याचा सामाजिक दरजा कमी झाला नाही.
२. दुस-या राजपुत्राने आपल्या राज्याचा वाटा आपल्या बहिणीला बहाल करुन आपण वैश्यवृत्ति स्वीकारिली.
३. तिस-या राजपुत्राने एक व्यापा-याजवळ राहून हाताने काम करुन पोट भरले.
४. एका उमरावाने पोटासाठी तिरंदाजी केली.
५. एक ब्राह्मणाने वैश्यवृत्तीने पैसे मिळविले.
६. दुस-या दोन ब्राह्मणांनी तसेंच पोट भरलें.
७. दुसरा एक ब्राह्मण एकां तिरंदाजाचा मदतनीस झाला.
८,९. ब्राह्मणांनी शिकारी आणि फासे पारध्याची वृत्ति चालविली.
१०. एक ब्राह्मण सुतार झाला.


ब्राह्मण उघडपणें शेतकी करुन शेळ्या मेंढरें राखीत असत. क्षत्रियाने टाकलेल्या बायकोशीं ब्राह्मणाने विवाह केला ( जातक ५. २८०) अनुलोमच नव्हे तर प्रतिलोम विवाहही होत असत. म्हणजे वरिष्ठ वर्णाच्या बायका कनिष्ठांशी लग्न करुन राहात. वर उद्धत केलेले उ्म्मग्ग जातकांतील श्रीकृष्णाने जांबवतीशीं केलेल्या विवाहाचें उदाहरण लक्षात घेण्यासारखे जरी भेदभाव डळमळीत होत तरी भेदाचा खुंटा हालून हालून अधिक बळकटच होत होता अशी प्रो. डेव्हिड्सलाही कबुली द्यावी लागली आहे. ( पान ६०).


गौतम बुद्धाच्या वेळची डळमळीत स्थिती मौर्य साम्राज्याच्या वेळी अस्पृश्यांपुरती तरी बळकट झालेली दिसते. मोठमोठ्या शहरातं, विशेषत: पाटलीपुत्र (पाटणा) नगराच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या धंद्यांच्या लोकांची वसति वसल्याचीं वर्णनें मेगास्थिनीसच्या लेखांतून आणि कौटिलीय अर्थशास्त्र ह्या ग्रंथांतून आढळतात. ह्या ग्रंथांचे अधिकरण २ रें, प्रकरण २२, भाग चौथा, पान ५४ वर स्पष्ट उल्लेख आहे की :- पार्षडचंडालानां स्पशानांन्ते वास:।

 
हे पाषंड कोण नीटसें समजत नाही. बौद्ध जैन नसावेत. ते चार्वाक, लोकांयातिक, पाशुपत असावेत. पण ते बहिष्कृत असल्यास मोठे आश्चर्य होय. पण चंडालांची वसति मात्र गांवाबाहेरील स्मशानाच्या पलीकडे असल्याचा हा पुरावा महत्त्वाचा आणि स्पष्ट आहे.


आर्यांची भारतीय ग्रामसंस्था फार प्राचीन आहे. आर्य हे ह्या देशांत उपरे असल्यामुळे त्यांचा अभिजात आर्येतरांशीचं केवळ नव्हे तर अनभिजात आयेंतराशींही व्यवहार फटकून राहण्यापेक्षा मिळते घेऊन राहाण्याचाच जास्त होता, व असणे जरूर होते; कारण ते जरी उपरे होते तरी दक्षिण आफ्रिकेंतील हल्लीच्या शुभ्रकायांप्रमाणे त्यांच्या वसाहती मूळ देशांशी संबंध ठेवणा-या दीर्घसूत्री व दृढ नव्हत्या. हिंदी आर्यांना येथील भिन्न आयेंतरांशी जमते घेऊन वेळोवेळी समरस झाल्या शिवाय त्यांच्या ग्रामसंस्थांची उभारणी होणे शक्य नव्हतें. ते उपरे असले तरी भारतवर्षांत कायम राहण्यास आले होते. मूळदेशांशी त्यांचे लागेबांध्ये नसून त्यांच्यामागे इंग्रज राजकर्त्यांप्रमाणे 'होमचार्जेस' (Home charges) चा उर्फ घऱच्या देण्याचा ससेमिरा नव्हता. त्यामुळे आद्य आर्यांनी भारतवर्षांत आयेंवर्षांत आयेंतरांशी जे मुदतबंदी मजुरीचे आणि अलुत्याबल्युत्याचे नियम केले ते हल्लीच्या गौरकायांपेक्षा अधिक सढळ हाताने, अधिक संभावितपणाने केलेले आढळतात, हें खालील उता-यावरुन दिसते.
 

 

नमस्तक्षम्यो रथकारेभ्यश्र वो नमो, नम: कुलालेभ्य: कर्मारेभ्यम

वो नमो, नमो, निषादेभ्य: पुअिष्ठेभ्यश्र वो नमो, नम: श्वनिभ्यो भृगयुभ्यश्च वो नम: ।।
माध्यन्दिन ( शुक्लयजुर्वेद ) संहिता, १६, २७


यशकर्माला निरनिराळी कर्मज, खनिज, प्राणिज सामग्री लागत असे, तिच्यासाठी मोठमोठे ऋत्विज वर सांगितलेल्या सच्छूद्राच्याच नव्हे, तर निषाद, पुक्कस, श्वनि म्हणजे कुत्रे पाळणारे आणि मृगयु म्हणजे भिल्ल, इत्यादि जंगली लोकांच्याही पाया पडत. नवरात्रात 'घटाला घावरी,' दिवाळींत 'रांगोळी' असा मोठ्याने आवाज काढून रस्त्यातून ओरडत जाणा-या वैदू बायांशी किंबहुना 'शॉन (शेण)च्या व शॉन' असे ओरडणा-या भोकरवाडींतील मांगिणींशीं देखील सदाशिव पेठेंतील ब्राह्मणांच्या बायका किती आर्जवाने वागतात, त्याचें वरील यजुवेंदांतल्या नमस्कारांशी फार साद्दश्य भासते! परंतु बौद्ध आणि जैन धर्माच्या प्रसारामुळे व सहवासामुळे यज्ञक्रिया संपृष्टांत आल्यावर पुढे लौकरच म्हणजे मनुस्मृतीच्या काळांत सुतारलोहारादि कुशल पांचाळांची मान्यता जरी वाढलेली दिसते तरी अकुशल श्रम करणा-या व अंगी विशेष क्षात्रतेज नसलेल्या आर्यंतरांची गणना अस्पृश्यांत होऊन त्यांना गांवबाहेर डांबून ठेवण्यांत आलेलें आढळतें. बौद्ध आणि जैन धर्म जरी जातिभेद मानीत नसत तरी त्यांच्या अमदानींत अनेक नवीन जातिसंघाना पूर्वीपेक्षाही अधिक मान्यता मिळून अशोक मौर्याच्या साम्राज्यानंतर कुशलांची वैश्य वर्गामध्ये विशेष चढती आणि अकुशलांची सामान्य शुद्धांत गणती होऊन जातिभेदाचे पर्याय फार वाढले. बौद्धांच्या व जैनांच्या उदार विचारांमुळे यज्ञविषयक हत्या व अत्याचार यांना जरी आळा बसला, तरी सामाजिक रचनेची संकीर्णता कमी न होता उलट फार वाढली यांत शंका नाही. विशेषत: ग्रामबाह्य हीन मानिलेल्या जातींचे सारे व्यवहार हत्त्या व हीन कर्मोशीच अधिक अधिक निगडित होत गेल्यामुळे त्यांची अस्पृश्यता व बहिष्कार उत्तरोत्तर दुणावत व दृढावत जाणेंच क्रमप्राप्त होतें.

बौद्धांची अहिंसा व जैनांचा कडकडीत शाकाहार ह्यामुळे ह्या दोघांही उदारघींचा ओघ अस्पृश्यतानिवारणापेक्षा दृढीकरणाकडेच होणें स्वाभाविक होतें. उलटपक्षीं यज्ञयागादि हत्त्येच्या अत्याचारांत वावरणा-या ब्राह्मणांचा सहवासाच ह्या बहिष्कृत वर्गांशी अधिक असण्याचा संभव जास्तआहे, हें शूलगवादि गृह्यसूत्रांतील विधीवरुन व हल्लीच्या मरीआईच्या भयंकर जत्रांवरून स्पष्ट दिसते. मरीआईच्या जत्रेंत ज्याप्रमाणे रेड्याचें डोके कापून ते गांवाभोंवती फिरवून शिवेवर नेऊन पुरतात किंवा वाटून खातात. तशाच प्रकारचा विधि गृह्यसूत्रांत शूलगव नांवाचा होता. असो. एक पक्षी बौद्ध जैनांचा सोवळेपणा, औदासीन्य आणि वैराग्य आणि दुसरे पक्षी ब्राह्मणधर्मीयांचा हत्याप्रिय कर्मठपणा ज्याला राजवाड्यांनी आचरटपणा हें निरुत्कासिद्ध समर्पक नांव दिलें आहे - ह्या दोन भिन्न प्रवृत्तींचा मिलाफ होऊन चिचा-या अस्पृश्यांचा बुडता पाय बहिष्काराच्या चिखलांत कायमचा जो रुतला तो रुतलाच !


मौर्य साम्राज्याच्या विस्तारामुळें आर्यांचें आणि तत्समांचें सामाजिक वर्चस्व नर्मदेच्या उत्तरेपक्षा दक्षिणेकडे विशेष आढळतें. त्यामुळे जरी बौद्ध आणि जैन ह्या उदार धर्मांचा दक्षिणेकडे प्रसार झाला तरी त्याबरोबरच मायावी आर्य राज्यव्यवस्था, कृत्रिम वर्णव्यवस्था आणि स्वार्थी ग्रामसंस्था आणि ह्या सर्वांची विषारी नांगी जी अस्पृश्यता तिचा विशेष विकास उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे अधिक झालेला समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहणा-यास स्पष्ट दिसत आहे. ह्या बाबतींत प्रसिद्ध समाजशास्त्री हेन्री मेन व सेन्सस रिपोर्टर आर. व्ही. रसेल ह्यांच्या ग्रंथांतील कांही उल्लेख फार महत्त्वाचे आहेत, त्यांचें भाषांतर पुढेत देतों.


"मद्रासेकडे मिरासी वतनबाबीचा जो कायदा आहे तो प्राचीन ग्रामसंस्थेचा कदाचित अवशेष असावा. ह्या कायद्याअन्वयें जमिनीच्या मालकीचा हक्क फक्त कांही थोड्या वरिष्ठ जातींना देण्यांत आला. पुढे भोवतालच्या पडिक जमिनी वाहण्याचा मक्ता ह्या थोड्या आद्य मालकांकडेच राखून ठेवण्यांत आला. ह्यांनीच प्रथम ही नवीन जमीन लागवडीस आणल्याशिवाय इतरांना अशा जमिनी संपादन करण्याचा हक्कच नसे. पारिया किंवा इतर अस्पृश्य वर्गांना तर जमिनीच्या मालकीचा हक्क नाही."


Russel's Tribes and Castes of the Central Provinces. पान ४१.


ह्या आद्यमालकांना हल्ली मुदलियार असें नांव आहे. मोदल (मुद्दल) हा शब्द तामीळ भाषेंतील विशेषण असून त्याचा अर्थ पहिला, अव्वल, पूर्वींचा असा आहे. मोदलियार हें अनेकवचनी रूप आहे. ह्यावरून मोदलियार म्हणजे प्रथम वसाहत करणारे शिष्टजन असा अर्थ होतो. ह्यावरुन ही ग्रामसंस्था आर्यांच्याही आधीची द्राविडी दिसते. मलबारांत नंबुद्री ब्राह्मण हे आर्य आहेत. त्यांनी हीच द्राविडी संस्था अधिक बळकट करुन सारी जमीन आपल्याच मुठींत वळून, तद्देशीयांना पशूंप्रमाणे त्याच जमिनीवर राबविण्याची जी अमानुष रुढि पाडली आहे ती अद्यापि जारी आहे. रसेलने सर हेन्री मेन यांच्ा प्रसिद्ध 'ग्रामसंस्था' (Village Commonity) ह्या ग्रंथांतून पान १२७ वर पुढील निर्णायक उतारा दिला आहे.


"मध्य आणि दक्षिण हिंदुस्थानांत अशी कित्येक खेडीं ( गावं) आहेक की ज्यांच्या शिवेला लागूनच काही जातींची वस्ती आहे. ह्या जातीच्या माणसांचा संबंध ह्या गावांतील कोणत्याही स्वाभाविक व सांधिक स्थितीशी येणें शक्य नसते. हे लोक निसर्गत;च अस्पृश्य समजण्यांत येतात. त्यांना गांवांत मज्जाव असतो किंवा कांही राखीव जागेंतच जाण्यास त्यांना परवानगी असते. तेव्हाहीं त्यांचा स्पर्श टाळण्यांत येतो. स्वत:च्या शरीरावर आपल्या मूळ जातित्वाचा स्पष्ट चिन्हे वाहण्याची त्यांच्यावर सक्ती असते. त्यांचा गांवांत जरी शिरकाव नसतो तरी गांवाच्या ब-यावाईटाशी अभेद्य संबंध असलेला एक चिकटवलेला भाग म्हणून ह्या लोकांची धस्ती असते. त्यांची वृत्ति (कामें) निश्चित असतें. त्यापैकी गांवांच्या परस्पर मर्यांदांचा निश्चय करणें हा एक त्यांचा मुख्य अधिकार असतो. ह्या बाबतींत त्यांचा निकाल शेवटला समजण्यांत येतो. ह्यावरून ह्यांचा वंश भिन्न असून गांवांत राहणा-या वसाहतवाल्यांनी ह्यांच्या जमिनी बळकावस्या आहेत हें उघड दिसतें."


सर हेन्री मेन हे ह्या देशांत परके असल्याने वर वर्णिलेला प्रकार 'कित्येक' खेड्यांत आहे असें त्यांनी म्हटलें आहे. कारण त्यांना सर्व खेडी पाहणे शंक्य नव्हतें. वस्तुत: वरील प्रकार सर्वच खेड्यांत आहे. म्हणूनच गांव आहे तेथे महारवाडा आहे अशी मराठींत म्हण पडली आहे. ह्या प्राचीन ग्रामसंस्थेचे दृश्य जितके अद्यापि महाराष्ट्रांतील खेड्यांत स्पष्ट दिसतें त्याहून अधिक स्पष्ट हिंदुस्थानांत किंबहुना सर्व जगात कोठे आढळणार नाही. उत्तरेकडील मौर्यांच्या साम्राज्यपीठाचा अपहार शुंग आणि कण्व ह्या ब्राह्मणी नोकर घराण्यांनी केल्यामुळे व ही दोन्ही घराणीं दुबळ व राजकारणांत गैरवाकव ठरल्यामुळे तीं अल्पकाळात नष्ट झाली. अशोकाच्या मागे लवकरच दक्षिणेंत शातवाहन नांवाचे बादशाही घराणें उदयास आलें. त्याने मगध देशापर्यंत आपल्या राज्याची हद्द उत्तरेकडे नेली व दक्षिणेंत त्याच्या शिवेवर तिन्ही बाजूला समुद्राचें वलय होतें. अशा अर्थाने किंचित् अतिशयोक्तीचे शिलालेख आढळतात. मौर्यांइतके बादशाही सामर्थ्य शुंग व कण्व ह्यांच्यांत नव्हते म्हणून दक्षिणेकडील शातवाहनांना बादशाही स्थापण्यास संधि मिळाली. ती त्यांनी उत्तरेपर्यंत भिडवली. हे शातवाहन उर्फ साळवी मराठी 'मुलखांतून रद्द अथवा महाराष्ट्र आणि तेलगू व कानडी मुलखांतून रड्डी ह्या नांवाने अद्यापि प्रसिद्ध आहेत.

 

जमिनीची बहुतेक सर्व मालकी अथवा मिरासी ह्या अफाट प्रदेसांत ह्यांचेकडेच आहे. कृष्णा आणि तुंगभद्रा ह्यांच्या मधला, आणि उत्तरेला माळव्यांत थेट शोणभद्रेच्या खो-यापर्यंत, सर्व मध्यदेश ह्यांच्या निशाणाखाली आला. ह्याला महाराष्ट्र असें मधून मधून लोक संबोधीत असत. ह्यूएन संग ह्या चिनी प्रवाशाने 'महोलोख' म्हणून जें गाव योजिलें ते ह्याच महाराष्ट्र शब्दाचा अपभ्रंश असून त्या प्रवाशाने ज्या राष्ट्राशी स्वभावलक्षणे वर्णिलीं आहेत ती सर्व मराठ्यांना व रड्डीना तंतोतंत जुळतात. ह्याच महाराष्ट्रात हेनरी मेनन वर वर्णिलेली ग्रामसंस्था अद्यापि जीव धरुन आहे. ह्यांतील कोणत्याही खेड्यांत जा, तेथे महार(माल), मांग (मादिग ), चांभार (समगार) ह्यांचे प्रत्येक गांवानजीक वाडे आणि बलुत्याचे वगैरे बावन हक्क आणि कामें अद्यापि कोणाही संशोधकाला तपशीलावार स्पष्ट दिसतील.

 

खेड्यातील पाटील उर्फ गौडा ( ग्रामडा) ग्रामणी असेंही वेदकालचें नाव पुष्कळ ठिकाणी आढळतें-हा हल्ली मराठी, तेलगू, कानडी, गुजराथी, अथवा हिंदी ह्या पैकी कोणतीही भाषा बोलत असो, त्याचा धर्मपंथ आज वैष्णव, शैव, नाथपंथी, मानभावी, लिंगायत, जैन, किंबहुना मुसलमानीही असो, परंतु त्याचा वंश रट्टच आढळणार. ह्या रट्टांचे अथवा रेड्डींचे व त्यांच्या प्रभावळींत गोविलेल्या महार, मांग, चांभार ह्या भिन्न वंशांचे सहवास, सहकार्य व सहवीर्य पुरातन काळापासून आजवर अखंड चालत आलेले आहेत. सहवीर्य ह्या शब्दावरुन रड्डीचा व ह्या बहिष्कृतांचा शरीरसंबंध होत असावा असें सुचविण्याचा माझा इरादा नाही. तसा पुरावा मिळाल्यास तसेंही विधान मी आनंदाने करीन. महार मांग व रेड्डींनी शूरत्वाची कृत्ये सहकार्याने केली येवढाच येथे अभिप्राय आहे. केवळ आडनावांचाच प्रश्न असता तर रट्टांच्या कुळीची नावें 'अस्पृश्यांनी' आश्रय-आश्रित संबंधाने घेतलीं असावींत असें सांगून कोणीही मोकळा होईल. पण देवकें, दैवतें, सोएर सुतक, स्मशानविधी पांचवी, सट, बारसे, लग्नविधी व तत्संबंधी परातून चालीरीती इ. समाजशास्त्राने महत्त्वाची मानलेल्या जाळ्यांची गुंतागुंती ह्या आश्रय-आश्रितांमध्ये निरखीत जाऊन जर कोणी त्यांचा माग काढीत मुळाकडे धैर्याने मागे मागे जाऊ लागला, तर तो शातवाहनांच्याच काय, पण गौतमबुद्धाच्याही मागे प्रागेतिहासिक काळांत जाऊन भिडेल. सारांश काय, तर महाराष्ट्रातील ग्रामसंस्था वेदांपेक्षाही जुनी असूं शकेल, किंबहूना ती आर्यांचीच विशेष आहे की तत्पूर्वीच्या द्राविडांच्या समाजव्यवस्थेंतही अंगभूत होती ह्याचा ठाम निर्णय करणें अशक्य होईल.


आर्यांच्या वर्णव्यवस्थेशी भारतीय अस्पृश्यतेच्या उगमाचा व विकासाचा जितका संबंध आहे त्याहूनही जास्त आर्यांच्या व कदाचित् द्राविडांच्याही ह्या सर्वगामी ग्रामसंस्थेशी आहे. दुस-या भाषेंत हीच गोष्ट सांगावयाची झाल्यास, परजातिद्वेष हे राजकीय अथवा सामाजिक कारण जितकें ह्या अस्पृश्यतेच्या मुळाशीं व वाढीशीं संबद्ध आहे, त्याहूनही जास्त स्वकीय वृत्तीचा लोभ आणि परकीयांचा मत्सर हें आर्थिक कारण भारतीय अस्पृश्यतेच्या मुळाशीं, विशेषत: दक्षिण भारतांतील अस्पृश्यतेच्या वाढीशीं व दृढतेशीं गुतलेलें आहे, असें दिसतें. जेथे जेथे उप-या जेत्यांनी तद्देशीयांच्या जमिनी व राज्ये बळकावलीं आहेत. तेथे तेथे असल्या ग्रामसंस्था उर्फ मालकी व बलुत्याचे विपरीत संबंध निर्माण झाले आहेत. आधुनिक मुदतबंदी मजुरीची पद्धत आणि वसाहतींतील आगमनिर्गमाचे सर्व कायदेकानू असल्या ग्रामसंस्थांची म्हणजे स्वकीय वृत्ति-लोभाची व परजाति-द्वेषाची स्पष्ट द्योतकें होत ह्यांत काय संशय आहे?


भारतीय वर्णव्यवस्थेंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व त्रैवर्णिक आर्य समजले जातात; आणि शूद्र हा मागाहून ह्या व्यवस्थेंत आर्यांनी आपलासा करुन घेतलेला भिन्न वंश सामान्यत: सर्व भारतांत-विशेषत: दक्षिण भारतात-द्राविंडवंशी समजला जातो. हा भेद केवळ मानीव वर्ण व्यवस्थेच्या दृष्टीने झाला. पण ग्रामसंस्थेच्या आर्थिक दृष्टीने पाहतां मालकी अथवा मिराशी आणि बलुतें ह्यांचा निकष लावला तर आर्य आणि द्राविड ह्यांची सर्वत्र भेसळ झालेली आढळेल. पुष्कळ ठिकाणीं द्राविडवंशी शूद्र समजले जाणारे ग्रामणीचा उर्फ मालकीचा किंवा मिराशीचा हक्क भोगणारे संपन्न अवस्थेंत आढळतात; तर उलट पक्षीं वर्णगुरु म्हणविणारे ब्राह्मण जोशी, वैद्य, देवपूजक, गुरव इत्यादिकांच्या हीन वृत्तीवर किंवा बलु-याच्या हक्कावर तृप्त असतात. तसेच कांही अर्धवट रजपूत मध्य प्रातांत हाळब, रामोशी, जागले, चौघुले ह्या नात्याने अशांच्या हीनवृत्ति चालवून गुजराणा करतांना आढळतात. पण ह्यापैकी कोणीही अरपृश्य झाले नाहीत, किवा अशा हीन वृत्तींना कायमचे चिकटले नाहीत. हल्लीच्या अस्पृश्य जातीच मात्र ह्या बलुत्यांचे चिरंतन गुलाम बनलेल्या आहेत. इतकेंच नव्हे तर ह्या वतनावर पाणी सोडून स्वतंत्रपणें कोणी निर्वाह चालवूं म्हटल्यास त्याच्यावर वरिष्ठ वर्गांकडून जबरी होते. बाहेर तर काय, प्रत्यक्ष हिंदुस्थानांतील युरोपिअनाने चालविलेल्या चहाच्या व निळाच्या मळ्यांवर मुदतबंदीने राबणा-या एखाद्या मजुराचा खून झाला तर त्याची लवकर दाद लागत नाही; त्याचप्रमाणे एखाद्या महाराने मेलेले ढोर ओढण्याचें नाकारलें म्हणून त्याचा खून झाल्याच्या आरोपावरुन हायकोर्टापर्यंत खटले चालूनही पुराव्याच्या अभावामुळें कोणास शासन न झाल्यांची उदाहरणें अद्यापि आढळतात ! एकंदरीत ह्या ग्रामसंस्थेमुळे वरील चार वर्णांपैकी समजले जाणा-या सर्व ग्रामस्थांचा योगक्षेम नीट चालून, ग्रामबाह्यांच्या मात्र उन्नतीच्या सर्वही वाटा बंद झाल्या आहेत.


"असुनि जन्मभूमी ज्याची होत बंदिशाळा ! परवशतापाश दैवें ज्यांच्या गळां लागला ।।" ही चोराची उलटी बोंब पुन: ह्याच वरिष्ठांच्या तोंडून त्यांच्या दुष्कर्मविपाकामुळें हल्ली ऐकू येत आहे !
अस्पृश्यांची बलुतीं आणि बावन वतनें म्हणजे वेदांतांत वर्णिलेला शुकनलिका न्याय होय. पिंज-यांतला पोपट दार उघडलें की पळून जाईल, पर पारध्याची नलिका आपल्याच पायाने घट्ट धरिलेला पोपट प्रत्यक्ष पारधी येऊन ओढूं लागला तरी ती सोडीत नाही असें जें इतिदास रसभरित रीतीने सांगत असतात त्यांत मोठें धार्मिक तत्त्व आहे. ह्या बलुत्यांच्या हक्कापायी भारतीय अस्पृश्य जातींची मानसिक अवनति किती झाली आहे आणि मुदतबंदी मजुरीचा प्रयोग निदान पूर्ण यशस्वी झाला आहे ह्याची हीं क्षुद्र बलुतीं स्पष्ट द्योतके आहेत. अलीकडे अस्पृश्यांनी अस्पृश्योद्धारासाठी ज्या परिषदा भरविल्या आहेत व जे प्रयत्न चालविले आहेत त्यांतून चालू असलेली त्यांच्यातील सुधारक-उद्धारकांची खेचाखेची म्हणजे वरील शुकनलिकान्यायच होय. कारण स्वतः अस्पृश्यच !

प्रकरण चवथें : मनुस्मृतिकालीन अस्पृश्यता

मनुस्मृतीचा काळ अद्यापि नक्की ठरत नाही. पण मनुस्मृति हल्ली ज्या स्थितींत आढळते ती गुप्तसाम्राज्याच्या वेळची असावी असा तर्क करण्यास पुष्कळ जागा आहे. ह्या वेळी बौद्ध संस्कृतीचा पूर्ण नायनाट झाला नसला तरी ती घसरणीला खास लागली होती आणि त्याच मानाने ब्राह्मणी संस्कृतीची मेढही प्रतिष्ठित झाली होती. इतर गोष्टी कशाही असोत, आमच्या पूर्वोत्त्क व्याख्येवरहुकुम असलेली अस्पृश्यता उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम म्हणजे सर्वच भरतखंडांत रूढ झाली होती. मानवधर्मशास्त्राच्या उर्फ मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायांत चंडाल, पुक्कस, निषाद वगैरे मानव वंशांची जी ऐतिहासिक मीमांसा केलेली आहे ती शुद्ध इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत निराधार आहे. ह्या काळीं वर्णव्यवस्था बौद्ध संस्कृतीच्या शेगडींतून जळून पोळून वर्णत्वाचा तिचा आत्मा नाहीसा होऊन हल्लीच्या जातिभेदाच्या स्वरुपाला येऊन पोहोंचली होती. चडालादि स्वतंत्र मानववंश असून त्यांची उपपत्ति ब्राह्मण स्त्रिया आणि शूद्र पुरुष ह्यांची संकरजात अशी करणें म्हणजे केवळ वर्णद्वेषाचें खूळ होय. हें खूळ गुप्तकाळापासून पुढे आतापर्यंत सारखे वाढतच आहे. वर्णसंकर झाला नाही असें कोणाचेंही म्हणणें नाही. पण हल्लींच्या सर्व जाती केवळ वर्णसंकरामुळेंच झाल्या आणि ब्राह्मण शिवाय करुन सर्व जाती वर्ण-संकरजन्यच आहेत, आणि त्यांतल्या त्यांत अस्पृश्य वंश म्हटलें की, केवळ वर्णसंकरापलीकडे त्याला अस्तित्वच नाही, ही उपपत्ति खास ऐतिहासिक नाही. मनुस्मृतीच्या १० व्या अध्यायांतला चवथा श्लोक खालील प्रमाणें आहे:


ब्राह्मण: क्षत्रियो वैश्यस्त्रयो वर्णां द्विजातय:।
चतुर्थ एकजातिस्तु शूद्रो नास्ति तु पंचम:।।


अर्थ :- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीन वर्ण दोनदा जन्मतात; म्हणजे एकदा सृष्टिक्रमाने व मागून उपनयन संस्काराने. शूद्र सूष्टिक्रमाप्रमाणे एकदाच जन्मतो. ह्या चारांपेक्षा पांचवा असा वर्णच नाही.


पांचवा वर्ण नाही, आणि अस्पृश्य जातीची लोकसंख्या तर भारतात चोहोंकडे पसरली आहे हें पाहून त्यांच्या उपपत्तीची काळजी ह्या स्मृतिकाराला पडली. आणि त्यांच्या हीनत्वाचा नगारा मोठ्याने वाजविण्यासाठी वर्णसंकराशिवाय दुसग तोडगा त्याला कोणता मिळणार? तो तोडगा त्याच अध्यायांत श्लोक १२ मध्यें येणेंप्रमाणे वर्णिला आहे :-


शूद्रादायोगव: क्षत्ता चंडालश्चोधमो नृणाम् ।
वैश्यराजन्यविप्रासु जायन्ते वर्णसंकरा: ।।


अर्थ :- शूद्र पुरुष आणि त्याहून श्रेष्ठ अनुक्रमें वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण जातींतील स्त्री ह्यांच्यामध्ये प्रतिलोम म्हणजे उलट्या शरीरसंबंधामुळे जी प्रजा होते तिला अनुक्रमें आयोगव, क्षत्ता आणि चंडाल अशी नावें आहेत; त्यांत शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री ह्यांची जी संतति तिलाच मात्र चंडाल समजून अत्यंत नीच आणि अस्पृश्य मानण्यांत आलें आहे. मनूने वर्णसंकराचा जो निषेध केला आहे तो प्रतिलोमाचाच. म्हणजे खालच्या जातीचा पुरुष आणि वरच्या जातीची स्त्री ह्यांच्या संबंधाचाच केला आहे. ह्याच्या उलट जो अनुलोम संकर त्याचा निषेध केला नाही, इतकेंच नव्हे तर उलट गौरवच केला आहे. त्याच १०व्या अद्यायांत खालील दोन श्लोक ध्यानांत घेण्यासारखे आहेत.
 

 

शूद्रायां ब्राह्मणाजात: श्रेयसा चेत्प्रजायते ।
अश्रेयान्श्रेयसीं जातिं गच्छत्यासप्तमाद्युगात् ।।६४।।


शूद्रा ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्रैति शूद्रताम् ।
क्षत्रियाजातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च ।।६५।।


अर्थ :- शूद्र कन्येला ब्राह्मणापासून कन्या झाली, त्या कन्येला पुन: ब्राह्मणापासूनच कन्या झाली आणि अशा सात पिढ्या झाल्यावर ती अगदी ब्राह्मणच उपजली असें होतें. ह्याप्रमाणे शूद्राचा ब्राह्मण व ब्राह्मणाचा शूद्र बनतो आणि ह्याप्रमाणे क्षत्रिय आणि वैश्यही समजावे.


ह्यावरून त्या काळच्या वर्णव्यवस्थेच्या कल्पना किती अनैतिहासिक, अस्वाभाविक, एकांगी आणि डोईजड झाल्या होत्या हें उघड होतें. अशा व्यवस्थेमुळे चोहोंकडेच सर्वांचाच वर्णसंकर होऊन वर्ण बाह्य अस्पृश्य जातींशिवाय शुद्ध जात कोठेच उरली नव्हती असा ह्या भयंकर तोडग्याचा खरा अर्थ होतो हें ह्या स्मृतिकाराच्या लक्षांत आलेलें दिसत नाही. ह्यांत चार वर्णांतील पुरुषांचाच अपमान होतो असें नसून स्त्रीजातीलाही हीन मानल्यामुळे तिचाही भयंकर अपमान केला गेला आहे. पुरुष म्हणजे बीज, स्त्री म्हणजे क्षेत्र, बीजालाच सर्व महत्त्व आणि क्षेत्राला कांहीच नाही, अशी ही एकांगी उपपत्ति आहे. दुस-या भाषेंत सांगावयाचे पडद्यांत व सोवळ्यांत डांबावयाचें ही हल्लीची मुसलमानांची नीति मनुस्मृतींत चांगली वर्णिलेली आहे. 'स्त्रीषु दुष्टासु जायते वर्णसंकर:' हा भगवद्गीतेचाही भावार्थ आहे. तोही ह्याच काळाला शोभतो. अस्सल बौद्ध काळांत असेल अनुलोम प्रतिलोम दोन्ही शरीरसंबंध होत होते, पण वरील कल्पनांचा गांधा-गोंधळ मात्र नव्हता. बौद्ध संस्कृति किंबहुना तत्पूर्वींची खऱी आर्यसंस्कृति निर्वीर्य झाल्यावरच असल्या एककल्ली विचारांना मान्यता मिळणें शक्य आहे. सामान्य वर्णव्यवस्थेचें कसेंही असो. अस्पृश्य मानिलेल्यांच्या दु:खावर हा नवीनच विषारी डाग जो दिला गेला आहे तोच आमचा प्रस्तुत मुद्दा आहे. वर्णद्वेष आणि वृत्तिलोभ ह्या जोडगोळींने मानीव अस्पृश्यांना हतवीर्य करुन त्यांना कायमचें शारीरिक आणि बौद्धिक गुलाम बनवून, पुन: त्यांच्या वंशाची उतपत्ति अशी लावणे, म्हणजे अविवेकाचाच नव्हे तर अन्यायाचा कळस होय !


नुसती उपपत्ति लावूनच स्मृतिकार तृप्त झाले नाहीत. ह्या मानवी वर्णसंकराच्या गुन्ह्याला खरी, कायमची आणि कडेलोटीची पुढील शिक्षा ह्याच १० व्या अध्यायांत फर्मविण्यांत आली आहे.


चंडालश्वपचानां तु बहिग्रामात्प्रतिश्रय:।
अपपात्राश्च कर्तव्या धनमेषां श्वगर्दभम् ।।५१।।


बासांसि मृतचेलानि भिन्नभांडेषु भोजनम् ।
काषर्णायसमलंकार: परिवज्या च नित्यश: ।।५२।।


न तै: समयमन्विच्छेत्पुरुषो धर्ममाचरन् ।
व्यवहारो मिथस्तेषां विवाह: सद्दशै: सह ।।५३।।


अन्नमेषां पराधीनं देयं स्याद्भिन्नभाजने ।
रात्रौ न विचरेयुस्ते ग्रामेषु नगरेषु च ।।५४।।


दिवा चरेयु: कार्यार्थ चिह्यिता राजशासनै: ।
अबांधवं शवं चैव निर्हरेयुरिती स्थिति:।।५५।।


वध्यांश्च हन्यु: सतंतं यथाशास्त्रं नुपाज्ञया ।
वध्यवासांसि गृहीयु: शथ्याश्चाभरणानि च ।।५६।।


अर्थ :- चांडाल, श्चपच इत्यादि जातींनी गावाबाहेर राहावें; त्यांच्या जवळ फुटकीं भांडीच असावींत; कुत्री आणि गाढवें हेंच त्यांचे धन; प्रेतांवरील कपडे हीचं त्यांची वस्त्रें; त्यांनी फुटक्या मडक्यांतच खावे; काळ्या लोखंडाचे अलंकार ल्यावे; नित्य भटकत असावें; इतरांनी त्यांच्याशी कसलाही व्यवहार (सामोपचाराचाही) करु नये; त्यांचे विवाह त्यांच्यांतच व्हावे; त्यांना अन्न द्यावयाचे असल्यास दुस-याकडून खापरांतून द्यावे; शहरांत किंवा खेड्यांत त्यांनी रात्री येऊ नयें; दिवसा कामासाठी कायद्याने ठरविलेली चिन्हे धारण करुनच यावें; तें काम म्हणजे बेवारशी प्रेतें नेणें, देहान्तशिक्षा झालेल्यांचा राजाज्ञेने वध करणे व त्यांचे कपडे, दागिने वगैरे घेणें, हे होय.


वर छांदोग्य उपनिषदाच्या ५ व्या अध्यायाच्या २४ व्या खंडांतील ४ था श्लोक ( पान २४ पहा) उद्धृत केलाच आहे. त्यांत स्पष्ट म्हटलें आहे की चांडालाला उष्टें दिलें तरी वैश्वानर आत्म्यामध्ये आहुति दिल्याप्रमाणे पुण्य आहे. हें छांदोग्याचें औदार्य कोणीकडे आणि ज्या मनुस्मृतीच्या ४ थ्या अध्यायांतील खालील श्लोकां शूद्रालाही उच्छिष्ट देऊं नये आणि चांडाल-पुक्कसांच्या तर वा-यालाही उभें राहूं नये असे फर्माविले आहे, तिचा कडकडीत तुसडेपणा कोठें? बुद्धपूर्व आणि बुद्धोत्तर काळांत केवढा हा फरक !


न शूद्राय मतिं दद्यात् नोच्छिष्टं न हविष्कृतम् ।
न चास्योपदिशेद्धर्म न चास्य व्रतमादिशेत् ।।८०।।


अर्थ : - शूद्राला सल्ला देऊं नये; उच्छिष्ट किंवा हवन होऊन शिल्लक उरलेलें अन्न देऊं नये; प्रत्यक्ष धर्मोपदेश किंवा प्रायश्चित्तोपदेशही देऊ नये. साध्या शूद्रावर जर असा बहिष्कार, तर अतिशूद्राविषयी खालील श्लोकांत वर्णिल्याप्रमाणे कट्टा द्वेष असावा ह्यांत काय नवल !

 
न संघसेच पतितैर्न चांडालैर्न पुल्कसै: ।
न मूखैंर्नावलिप्तैश्व नान्त्यैर्नोन्त्यावसायिमि: ।।७९।।


अर्थ : - पतित, चांडाल, पुल्कस, मूर्ख, गर्विष्ठ, अंत्य व अंत्यावसायि यांच्या बरोबर ( एका वृक्षाच्या ठिकाणी) एकत्र बसूं नये. ह्या श्लोकावर भाष्यकारांनी खालील अर्थांची पुरवणी जोडली आहे; शूद्रजातीय स्त्रीचे ठिकाणी निषादापासून झालेला जातीने पुल्कस होत असतो; अंत्य म्हणजे परीट, चांभार, बुरूड वगैरे: चांडालापासून निषाद स्त्रीचे ठिकाणी झालेले अंत्यावसायि होत.


मनुस्मृतीनंतर हल्लीच्या स्वरुपांत आढळणा-या अठरा महापुराणांचें व अनेक उपपुराणांचे विशाळ मध्ययुगीन संस्कृत वाड्मय लिहिलें जात होते. ह्याच बौद्ध जैन संस्कृतीशीं उघड हेवादावा आणि विरोध चालत होता. ह्या ( सुमारे ५०० वर्षांच्या) काळांत ब्राह्मणी संस्कृतीची घडी बौद्धादिकांच्या विरोधाने विस्कटलेली पुन: बसून अर्वाचीन समाजस्थितीचा पाया घातला जात होता. ह्या वाङ्मयांतून उतारे देऊं गेल्यास ग्रंथविस्तार मर्यादेपलीकडे जाईल. अस्पृश्यतेची घडी वरील स्मृतीने जी बसविली ती अगदी आजतागायत जशीच्या तशीच शाबूत दिसत असल्यामुळें त्या पुराणवाड्यांतून नवीन ऐतिहासिक माहिती मिळण्याचीही कांही आशा नाही. म्हणून जी मिळते ती देऊन जागा अडविणें इष्ट दिसत नाही. वर्ण-संकराची उपपत्ति जुळवून क्षत्ता, आयोगव इत्यादि ज्या अनेक संकरजन्य उपजातींचा उल्लेख मनुस्मतिकार करितात त्यांचा आता, किंबहुना पूर्वींही, प्रत्यक्ष मागमूस आढळत नाही. चांडाल, पुल्कस, निषाद वगैरे थोड्या नावांपलीकडे, आजच्या समाजस्थितींत, महार, मातंग, ढोर, धेड, पारिया, चिरुमा, नामशूद्र, मेघवाल, बळ्हई, वगैरे अनेक मानव अस्पृश्य जातींचीं नावें आढळतात त्यांचा उल्लेख मनूंत अथवा इतर स्मृतींत किंवा पुराणांतूनही आढळत नाही. आणि ह्या जाती तर ह्या विशाल देशाच्या सर्व अंगांतून व काना कोप-यांतून राजरोस आढळतात. ह्या वरून येवढेंच सिद्ध होत आहे की आजकालच्या मानीव अस्पृश्यांची उपपत्ति केवळ वर्णव्यवस्थेच्या काल्पनिक धोरणावरुन लावीत न बसता, ती राजकीय, समाजिक आणि विशेषत: आर्थिक कारणांवरुन लावण्याचा आम्ही जो वर प्रयत्न केलेला आहे त्याच दिशेने पुढील शोधकांनी प्रयत्न चालविणें अधिक शास्त्रीय ठरेल.


वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे स्मृति व पुराणे हल्ली प्रचलित असलेल्या अनेक जातींची अथवा त्याच्या नांवांची मीमांसा करण्याची योग्य साधनें नव्हत, ह्यांत कांही मोठेसें आश्चर्य आहे असें मुळींच नव्हे. हे ग्रंथ म्हणजे आताच्या 'सेन्सस रिपोर्ट' अथवा 'एथ्नोग्राफिक सर्व्हे' ह्यांप्रमाणे आधुनिक शास्त्रीय पद्धतीनुसार लिहिलेले ग्रंथ नव्हतं. बोलून चालून हे पक्षाभिनिविष्ट ग्रंथ होते.' अनुलोम प्रतिलोम शरीरसंबंध बंद पाडून कांही विशिष्ट मानीव वर्णांचा टेंभा मिरविण्याचा त्यांचा उघड उद्देश होता. हा उद्देश साध्य करण्यास त्यांना कृत्रिम इतिहास प्रतिष्ठित करावयाचा होता. आज देखील डोईजड जाती अथवा वर्ग असले बनावट इतिहास तयार करुन जगाला झुलवीत आहेत, मग आमच्या स्मृति-पुराणांनी तर मानवी स्वभावाविरुद्ध काय केलें आहे म्हणून आश्चर्य मानावयाचें आहे? अगोदर वर्णसंकराची उपपत्ति बसावावयाची, मग त्या संकराला निषिद्ध मानावयाचें आणि मग क्षत्ता, आयोगव इत्यादि संस्कृत उर्फ कृत्रिम नांवें घ्यावयाची हा सर्व प्रकार केवळ अहमन्यतेचा विलास होय. महार, ढोर, पारिया, चिरुमा, नमशूद्र, बळहई इत्यादि आजकालच्या "अस्पृश्यांची" नावें निरनिराळ्या प्रांतांतून आढळतात, तीं ह्या पुराणग्रंथांतून का आढळत नाहीत, हाही प्रश्न उभ्दवतच नाही. भिन्न धंदे, भिन्न परिस्थिती, वगैरेवरुन हीं नावें ह्या ग्रंथानंतरच्या अलीकडच्या काळांत पडलेलींच असावींत. ह्या बाबीचा विचार दुस-या खंडांतील. "नांवांच्या व्युत्पत्ति" ह्या प्रकरणांत करण्यांत आला आहे. ह्यांतील कांही नांवें पुराण-स्मृतिग्रंथांच्या पूर्वींही होती. उदाहरणार्थ, चंडाल, पुल्कस ( पुलय), मेध(मघ) वगैरे. पण त्या जमातींचीही पूर्वपीठिका समाजशास्त्रान्वयें ठरवितांना स्मृतीचा पुरावा घेणें अगदीच अप्रयोजक आहे हें वाचकांनी ध्यानांत घ्यावे.

 

प्रकरण आठवे : नांवांची व्युत्पत्ति व इतिहास

आता कांही मुख्य जातींच्या नांवांची मूळ व्युत्पत्ति काय असावी ह्याचें भाषाशास्त्राच्या निर्विकार दृष्टीने विवेचन करुन ह्या हीन मानलेल्या जाती खरोखर मुळांतच हीन होत्या, किंवा त्यांच्या नांवांतूनही कांही उज्ज्वल पूर्वेतिहासाचा पुरावा बाहेर डोकावत आहे. हें पाहण्याचा मी प्रयत्न करीत आहें. हें विवेचन करण्यासाठी ज्या थोड्या जाती मी निवडल्या आहेत त्या जातींच्या लोकांमध्ये मी स्वत: बहुश: दोन दोन चार चार महिने, क्वचित् वर्ष वर्ष भरही, जाऊन राहिलों आहें. त्यांत माझा हेतु हा होता की त्यांचे खाद्य, पेय, पेहराव, डामडौल, व्यक्तिविषयक आवडी, घरगुती चालरीत, जातीय परंपरा, ह्या गोष्टी समक्ष निरखून पहाव्या. आज माझ्या तीस वर्षांच्या सूक्ष्म निरीक्षणानंतर मला ह्या कित्येक हतभागी जातींचे उर्फ राष्ट्रांचे मूळ उज्जवल असावें, असें स्वतंत्रपणें वाटत आहे. पुढील व्युत्पत्तीमध्य माझे भाषाशास्त्र सपशेल जरी चुकलें असलें, तरी त्यामुळे माझ्या इतर निरीक्षणाला बाधा येत नाही. उलट पक्षीं, माझी व्युत्पत्ति खरी ठरल्यास मात्र तो एक स्वतंत्र पुरावा होईल. एवढ्याच उद्देशाने माझ्या ह्या ऐतिहासिक विषयाला पुरावा होईल. एवढ्याच उद्देशाने माझ्या ह्या ऐतिहासिक विषयाला हें जें व्युत्पत्तीचें ठिगळ मी जोडण्याचे धाडस केलें आहे, ते अगदीच अनाठायीं ठरेल, असें मला वाटत नाही.


महार ( महाराष्ट्र)
महार ह्या नांवाचा विस्तार मराठी भाषेपुरता अथवा महाराष्ट्रापुरताच नसून पंजाबी, सिधी, गुजराथी, राजस्थानी, हिंदी, बंगाली ओरिया, तेलगू, आसामी, इतक्या भाषांतून व अनुक्रमें देशांतून आढळतो. तो असा :- महार, म्हार-आधुनिक महाराष्ट्र, मध्य हिंदुस्थान; म्हेतर, म्हेर, मेर- गुजराथ, मारवाड, माळवा, राजपुताना आणि मध्य प्रांताचा हिंदी भाग; मेघ मघ, मेघवाळ. मोघिया-पंजाब, गुजाराथ, ग्वाल्हेर; माल, मालो, माली, मलयन -बंगाल, ओरिसा, आंध्र, मलबार, महार ह्या नांवाची आजवर अनेक निरुत्कें सुचविण्यांत आली आहेत. त्यापैकी कांही विक्षिप्त आहेत तर कांही विचार करण्यासारखी आहेत. महाअरी=मोठा शत्रु, अशी व्युत्पत्ति जोतीबा फुले ह्यांनी सुचविली आहे. दुसरी अशी आहे :- पार्वतीच्या कपाळावर घामाचा बिंदु आला, तो एका कमळपत्रावर पडला; त्याचें सुंदर मूल होऊन खेळू लागलें. तें रांगत बाहेर जाऊन एक मेलेली गाय खाऊं लागलें. म्हणून शिवाने रागावून त्यास महा आहारी मोठी खादाड होशील असा शाप दिला. तो महार झाला. ही विक्षिप्त निरुत्कें.


मृताहार : प. लो. वा . डॉ. सर भांडारकर ह्यांनी मृताहर अशी व्युत्पत्ति सुचविली होती. इ.स. १९९२ सालीं पुण्यांत डी.सी.मिशनची पहिली अस्पृश्यता-निवारक परिषद भरली, तिचे अध्यक्ष ह्या नात्याने डॉक्टरसाहेबांनी ही प्रथमत:च पुढे आणिली. मृत + आहार=मेलेलीं गुरें ओढून नेणारा, हा अर्थ ह्या लोकांच्या चालू धंद्याला लागू पडतो. पण संस्कृत वाड्मयांत ह्या नांवाचा असा प्रचार कोठे आढळत नाही. मार्केंडेय पुराणांतील ३२ व्या अध्यायांत पुढील श्लोक आहेत :-


उदक्याश्वश्रृगालादी न्सूतिकान्त्यावसायिन:|
स्पृष्टा स्नायीत शौचार्य तथैच मृतहारिण: ||३३||


मृतनिर्यातकाश्चैव परदारारताश्च ये |
एतदेव हि कर्तव्यं प्राज्ञै: शोधनभात्मन: ||४०||


अभोज्यसूतिकाषंढमार्जाराखूश्वकुक्कुटान् |
पतिताविद्धचंडालान् मृताहारांश्व धर्मविद् ||४१||


संस्पृश्य शुद्धयते स्नानादु दक्याग्रामसूकरौ |
तद्वच्च सूतिकाशौचदूषितौ पुरुषावपि ||४२||


वरील उता-यात चंडाल, अन्त्यावसायी, असे शब्द योजून पुन: मृताहार, मृतहारि, मृतनिर्यातक असे शब्द घातले आहेत. मृत ह्याचा अर्थ मृत मनुष्य अथवा प्रेत असाच आहे. मेलेलीं ढोरें अशा अर्थाचा संदर्भ ह्या ठिकाणी मुळीच संभवत नाही. वरिष्ठ जातीच्या माणसांची प्रेतें महार नेऊं शकणार नाही. म्हणून मृतांचे आप्त असाच येथे अर्थ आहे. मृताहार म्हणजे मेलेलीं ढोरें ओढणारा असा अर्थ डॉ. भांडारकर ह्यांनी नव्यानेच केलेला दिसतो. महार असें मागाहून संभावित मराठींत रुपान्तर झालें. त्याचें मूळरुप म्हार असें गांवढळांचे तोंडात अद्यापि आहे, तेंच रुप पहिलें असावें. माळव्यांत व नागपुराकडे हिंदी भाषेंत म्हेर असें रूप हल्लीही आहे; त्याचा संभावित अपभ्रंश महार असा करून, पुन: त्याचें मृताहर असें संस्कृत रुप मानण्यांत फारच दूरान्वय होत आहे. म्हार हे पूर्वीपासूनच मेलेलीं गुरें ओढणारे होते, ही कल्पना इतिहासाला धरून नाही; म्हणून ही व्युत्पत्ति असमर्थनीय ठरते. माळव्याप्रमाणे गुजराथेंतही म्हारांना म्हेत्तर असें म्हणतात. त्यापासून म्हेर असें रुप होणें शक्य आहे. अजमीर-मेरवाडामध्ये म्हेर असें रूप आहे. म्हेतर (महत्तर) म्हणजे मोठा अथवा जुना माणूस म्हातारा शब्दाचीद्दी हीच व्यत्पत्ति आहे. आणि हिच व्युत्पत्ति ह्या प्राचीन जातीच्या इतिहासाला अधिक सुसंगत दिसते.


म्हार म्हात्म्य : ह्या पुराणाची हस्तलिखित पोथी इ.स. १९०७ सालीं परळ येथील आमच्या रात्रीच्या शाळेंतील एका भाविक म्हार मुलाने मला दिली. तिची भाषा मासलेवाईक म्हारी आहे. ह्यांत म्हार, म्हादेव, म्हामुनि असे नमुनेदार शब्द आहेत. ह्याच्या दुस-या अध्यायाच्या आरंभी खालीलप्रमाणें मूळ वर्णिलें आहे.


आद्यन्त तुमच्या ववस्याचे म्हैसा | सेस न वर्णवी झाली सीमा | वेदा न कळे आगमा | सोमववष अप्रंपार ||२|| हे म्हार म्हात्म्य कथा आगळी | जो का धरील हृदयकमळी | तयाचे द्वीतभावाची होळी | करील रुषि मार्केंडी || ३|| .... तरी हा मार्केडी मूळ पुरुष | तयापासून म्हाराचा बवस | ऐका तजना हो सावकास | चित्ती विश्वास धरुनिया ||५|| अनंत यौगापासून | कितीक राजाचे ढळले जन | परी हा म्हार जूनाट पुरातन | न ढळेची कल्पान्ती ||६|| देव झाले उदंड | परि हा म्हार अक्षय्य काळदंड | ह्याच्या स्वाधीन नवखंड | केले मुळींच क्रत्यांनी ||७||

 
मुसलमानाचा संबंध मोठा चमत्कारिक उल्लेखिला आहे.


म्हार आणि मुसलमान | हे दोघे एक वंशे उत्पन्न | चंद्र वंध पूर्ण | सोम म्हणती तयालागे || अ. ३. ओवी १९.


तिस-या अध्यायाच्या आरंभी आचार विलक्षण सांगितला आहे. ह्या अध्यायाची ७६ वी ओवी अशी आहे.


म्हाराचा मूळ पुरुष सोमाजी नाम| दैवत सिव, देस मार्वड उत्तम |
रुषि मार्केडेय तयाचा उत्तम | घाई पूर्ण गरजतसे ||७६||


सहाव्या अध्यायांत ४९ व्या ओवीपासून आद्य शून्यवादाचें वर्णन आहे. ह्यांत महायान बौद्ध धर्माची छटा दिसते. सातव्या अध्यायांत कर्त्याचें नांव आहे.


"पूर्वी व्यास वाल्मिक मुनी | सुखसनकादिक आदि करुनी |
तयानें हें म्हार म्हात्म्य रत्नखाणी | कल्पित करोनी ठेविलें ||१६|| तयाची चतुरा ऐसी | कलियुगीं अवतरला बाळकदास | त्यांनी ह्या म्हार म्हात्म्याचा प्रकास | करोनि दाखविला कलियुगी ||


सातव्या अध्यायाच्या शेवटी ग्रंथसमाप्तीचे स्थळ व काळ सांगितला आहे.


"पूर्वे सन्निध पने पाकन | पावणे दोन योजन | दक्षिणेस गोदावरी पूर्ण | तीन योजने जाण बा ||८०|| पश्चिमेस नीराबाई मध्ये | उत्तरभागी पाडेगाव आहे | ग्रंथ कर्त्याचा अवतार पाहे | तेथे झाला जाणिजे ||८१|| शके १८८८ (?) सर्वधारी नाम संवत्सर प्रवेसी | वैशाख वद्य पंचमीस | ग्रंथ समाप्त झाला पै ||८२|| चंद्रवार ते दिसि | सोमवंश प्रवेसी | प्रथम प्रहारासी | ग्रंथ समाप्त केला हो ||८३ ||

 
शके १८८८ असें चुकून पडलें असावें. शके १७८८ असावें. येरवी पुढील ओवीचा प्राप्त जुळणार नाही. शके १८८८ पुढे याव यांचें आहे.


माल ( बंगाल, आंध्र )
माल, मालो, माली : ह्या नांवाच्या जाती बंगाल, ओरिसा, तेलंगण देशांत पुष्कळ आहेत. त्या अगदी महाराप्रमाणेंच आहेत. हे वंशाने एकच असावेच असें म्हणवत नाही. त्यांचा आपसांत रोटी बेटी व्यवहारही होत नाही. त्यांची व्युत्पत्ति मल्ल आणि मार ह्या दोन भिन्न शब्दांपासून संभवते. गौतम बुद्धाचे काळीं, झल्ल, मल्ल नांवाची क्षत्रिय राष्ट्रें शाक्यांच्या शेजारी राहात होती. किंबहुना तींही शाक्याचीच पोटजात असावीत. कालवशाने हीं राष्ट्रे झालो, मालो ह्या नांवाने अस्पृश्यतेप्रत पोचलीं असावीत. तुकारामाच्या अभंगात सालोमालो म्हणजे य:कश्चित माणूस ह्या अर्थाने हा शब्द आला आहे. साळी माळी ह्याच मूळ क्षत्रिय नांवांपासून आले असावेत. एक प्रांतात जी जात प्रतिष्ठेप्रत चढली किंवा पूर्वी प्रतिष्ठेंत होती तीच दुस-या प्रांतात हीनत्वाप्रत गेलेली अशीं आणखीही उदाहरणें ह्या अफाट देशांत आहेत. बंगाल्यांत माळी ही जात अस्पृश्य आहे, ती मालाकार म्हणजे फुलमाळी ह्या जातीपासून अगदी वेगळी आहे. मालाकार हे नवशाखा शूद्रांपैकी आचरणीय आहेत. माळी अनाचरणीय आहेत. हर प्रसाद शास्त्री म्हणतात त्याप्रमाणे पूर्वीचें मल्ल राष्ट्र पूर्वी बौद्ध असून मुसलमानांच्या स्वारीनंतर बौद्ध धर्माचा उच्छेद झाल्यामुळे बहिष्कृत झालें असावें. झालिया (जाळी विणणारे) म्हणून दुसरी बहिष्कृत जात आहे ती झल्ल असावी. महाराष्ट्रात जसे मांगाबरोबर महार, तसे आंध्रदेशांत मादिगाबरोबर माल म्हणून एक अस्पृश्य ग्रामबाह्य जात आहे. मराठ्यांचा महारांशी मांगांशी जसा सेव्य सेवक अथवा जेते जित असा संबंध आहे, तसाच आंध्र देशांत रेड्डी ह्यांचा मालांशी आणि मादिगांशीं आहे. रेड्डींनी (रट्टांनी) ह्या मालांना आपल्या मूळ मगध देशांतून निघतांना तेलंगणांत आपल्या ग्रामसंस्थेच्या योगक्षेमासाठी बरोबर आणिलें असावें. महारांप्रमाणेच मालही बलुतेदार आहेत. त्यांची महारांप्रमाणे मरीअम्मा ही ग्रामदेवता प्रत्येक गावाच्या शिवेवर असते. तिला रेड्डी फार भजतात. कित्येक ठिकाणीं ह्या मरीअम्मेचा पूजारीपणाही रेड्डींकडेच असलेला मी पाहिला आहे. पण मुळांत ही मारी अम्मा मालांचीच ह्यांत शंका नाही. बुद्धाचे काळी मार नावाचे जें दृष्ट व खुनशी दैवत होतें त्याचीच नातलग ही मरी दिसते. ओरिसाच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशांत खोंड वगैरे रानटी जाती ह्या मरी आईला भयंकर रीतीने नरबळी देत असत. ते बंद करण्याचे प्रयत्न लॉर्ड डलहौसीच्या काळापर्यंत ब्रिटिश सरकार करीत आलें. पण अद्यापि हा प्रकार तुरळक चालू आहेच. मार आणि मरी हे शब्द फार चिंतनीय आहेत. मॅक्स मुलरने आपल्या Physical Religion-Gifford Lectures मध्ये पान ३२० वर म्हटलें आहे - " पाली भाषेमध्यें मारु असें पद दुष्ट देवतेसंबंधी योजलेलें आढळते." मला वाटते ह्या पदांत मल अथवा मर = डोंगर ही द्राविड धातू मूळ असावी. तिच्यापासून मार, माल म्हार वगैरे पर्याय होणें अगदी संभवनीय आहे.

Read more: प्रकरण आठवे : नांवांची व्युत्पत्ति व इतिहास
  1. प्रकरण अकरावे : राजकारण
  2. प्रकरण सहावे - ब्रह्मदेशांतील बहिष्कृतवर्ग
  3. प्रकरण पाचवे : उत्तरयुगीन अथवा अर्वाचीन अस्पृश्य
  4. प्रकरण पहिले : सामान्य आलोचन
  • 136
  • 137
  • 138
  • 139
  • 140
  • 141
  • 142
  • 143
  • 144
  • 145
Page 144 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी