प्रकरण आठवे : नांवांची व्युत्पत्ति व इतिहास

 
मेघ ( पंजाब गुजराथ )
मघ, मेघ, मेघवाळ : Maggi मॅग्गी नांवाची एक जादूटोणा करणारी इराणी लोकांची देवपूजक जात इराणच्या पश्चिमेकडे होती. ती सूर्योपासक होती. शिवदेवतेचा सूर्याशी संबंध आहे. हिंदुस्थानांत पूर्वी जेथे जेथे सूर्योपासना चालू होती तेथे ह्याच जातीकडे पौरोहित्य होते.


"सूर्यानें प्रसन्न होऊन आपली प्रत्यक्ष तेजोमयी मूर्ति सांबाला पूजेकरिता दिली. उपास्य मिळाल्यामुळे सांबाला आनंद झाला. व त्याने सूर्याच्या आज्ञेवरुन चंद्रभागेच्या तीरावर मनोहर देवालय बांधिले. तेथे देवस्थानाच्या पूजाअर्चादि व्यवस्थेकरिता हे सूर्यभक्त "मग" नांवाचे ब्राह्मण सांबाने शकद्वीपांतून आणिले. तेथे निमंत्रणावरून मगांची आठरा घराणीं राहिली. "
चित्रावशास्त्रीकृत चरित्रकोश, पान ४२० (सांगपुराण, २६; भविष्यपुराण, ब्राह्मखंड, ११७).


वरील सांब हा शिबि कुलांतली जांबवती नांवाची 'अस्पृश्य" (?) कन्यका श्रीकृष्ण वासुदेवांनी वरिलेली तिच्या पोटीं श्रीशंकराच्या प्रसादाने झालेला, पुढे राजा झाला, असा महाभारतांत उल्लेख आहे. हे मग लोक हिंदुस्थानांत जिकडे तिकडे तिरस्करणीय मानले गेले, असेही पुराणातून उल्लेख आहेत. ह्या मघ अथवा मेघ ह्याला, र हा द्राविडी अनेक वचनी प्रत्यय लागून मेघर असा शब्द तयार होतो. त्याचा अपभ्रंश मेहर होणें अगदी सहज आहे. हे मेहर, म्हेर, मेर आसामात, राजापुतान्यांत, मध्यप्रांतात विपुल आहेत. पंजाबांतील मेघ आणि गुजराथेंतील मेघवाळ ह्या अस्पृश्य जाती तर प्रसिद्धच आहेत.


येणेप्रमाणें तीन अगदी भिन्न व्युत्पत्ति आपल्या पुढे आहेत त्या अशा -
महत्तर, म्हेतर, म्हार - ह्यांत मह = मोठा, जुना,पसरणारा, ह्या अर्थांची संस्कृत धातु आहे.
मार, माल- ह्यांत मर-भल=  डोंगर ह्या अर्थांची द्राविड धातु आहे. मघ, मेघ - ह्यांत मघ धातु, हें एका वंशाचे (Maggi ) नांव होते. कदाचित् ह्या तीन्ही शब्दांचे मागे मह = पसरणें अथवा मर = पर्वत हीच धातु असावी. व्युत्पति कशीही असो, महार ही जात फारच पुरातन असून अभिजात असावी, असें माझें मत झालें आहे.


मांग ( महाराष्ट्र )
ह्या जातीचे दक्षिणेंत कानडी व तेलगु देशांत मादिग मध्ये महाराष्ट्रांत मांग, आणि उत्तरेकडे सुरतेच्या आसपास व गुजराथेंत मांगेले असे तीन प्रकार आढळतात. मात्र मांगेले हे अस्पृश्य समजले व्रात नाहीत. तरी पण जात एकच. हे मूळांत कोल (कोळी) वंशाचे असावेंत. मादिग अथवा मातंग हें संस्कृतीकरण मृताहगप्रमाणे मागाहूनचे शहाणपण दिसतें. मूळ मॉंग, मांग, मंग हाच शब्द खरा. हा ब्रह्मी शब्द मनुष्य अथवा भाऊ ह्या अर्थांचा असावा. इंग्रजी भाषेंत आडनावांच्या मागे मिस्टर जसा लागतो तसा ब्रह्मी भाषेंत मॉंड् हा लागतो. गल् हा प्रत्यय अनेकवचनी आहे, तो द्राविडी आहे. माँगल हं राष्ट्रवाचक नांव असें तयार झालें. माँगेल, मोग्गल अशी रुपें जुन्या पाली भाषेंत, तशीच अद्यापि मराठी प्रचारात प्रसिद्ध आहेत. किष्किधा म्हणून तुंगभद्रेच्या कांटावर जो प्राचीन देश होता; त्यांत मंग (माँग ) ह्या राष्ट्राची वस्ती होती. त्यांची रामायणात वानरांत गणना केलेली आहे. पण ती केवळ लक्षणा होय. मग म्हणजे वानर असा कानडी शब्द आहे. तो द्राविडी असून तोच इंग्रजीतल्या मेकी ह्या शब्दांतही आहे. मातंग असा शब्द सामान्य नाम आणि विशेष नाम ह्या दोन्ही रुपाने पाली आणि संस्कृत पौराणिक वाड्मयांत आढळतो. पण तेथे कोठेही जातिवाचक अर्थ नाही. असलाच तर तो अगदी अलीकडच प्रचार होय. थोर आणि श्रेष्ठ अशा अर्थाने नाग शब्द आढळतो, त्याच-हत्ती किवा सर्प अशा अर्थाने मातग हा शब्द आढळतो. महाभारताच्या अनुशासन पर्वात २७-२९ अध्यायांत मतंगाची कथा आहे. चांडाल असून ब्राह्मण होण्यासाठी ह्याने घोर तप केलें. ह्याला स्वर्गीय ऐश्वर्य मिळाले पण ब्राह्मण मिळाले नाही. ब्राह्मण कर्मावर अवलंबून नसून केवळ जन्मावरच अवलंबून आहे असा अर्थ दाखविण्यासाठी ही कथा आहे. अर्थात् हें मागाहून आलेलें शहाणपण महाभारतांत घुसटून दिलेलें आहे, हेंही उघडच आहे.


इ.स.च्या ६व्या शतकाच्या अखेरीस मांगलीश नांवाच्या चालुक्य राजाने मातंगांना जिंकले अशा अर्थाचा एक शिलालेख बादामी येथील माकुटेश्वराच्या देवळाजवळ पडलेल्या एका जयस्तंभावर आढळतो. मांगलांगा जिकणारा म्हणून मांगलीश हें नांव ह्या राजाला पडलेलं ह्यावरुन दिसते. ह्या ठिकाणीं मांगलांचे राज्य होतें. माकुटेश्वर=मांग+कुट+ईश्वर हा मांगांचाच देव दिसतो. गोव्याकडे मंगेश व शांतादुर्गा अशी जी दोन दैवते आहेत, तीं ह्या लोकांची मूळचीं नसावींत कशारुन? "मंगेश देवस्थान इतिहास" ह्या पुस्तकाच्या पान ३ वर जी मंगेश नांवाची व्युत्पत्ति दिली आहे ती, मंग नांवाच्या पुरुषापासून ह्या देवस्थानाची उत्पत्ति आहे अशी दिली आहे. शांतारी ह्या नांवाची मांगांची कोंकण किना-यावर देवी आहे.


तिरुपति येथील वेंकटेशाला मंगापति असें एक नांव आहे. हें नाव त्या प्रांतातील ब्राह्मणेतरांत, विशेषत: नायडू लोकांत, आढळते. मंगा ही वेंकटेशाची एक पत्नी. 'अलमेल मंगा' = कमलाकर प्रतिष्ठित झालेली मंगा, अशा नांवाने हिचें एक विस्तीर्ण आणि सुंदर देवालय तिरुपती टेकडीच्या पूर्वेस सुमारें सात मैलांवरील तिरुचन्नूर ह्या गांवांत आहे. तिरुपतीहून पश्चिमेस चंद्रगिरीस जातांना वाटेंत मंगापूर म्हणून एक गांव आहे. तेथे मंगा देवीचें एक भव्य पण ओसाड देऊळ आहे. आत देवीची मूर्ति मात्र नही. वेंकटेशाची मूर्ति एका बाजूस अंधारांत पडली आहे. ह्या ठिकाणीं मंगा देवीशीं वेंकटेशाचें लग्न झालें. पण पुढे वेंकटेशाने कोल्हापूरच्या महालक्ष्मीशीं लग्न लावलें म्हणून मंगादेवी रुसली व वरील तिरुचन्नूर गावीं अलमेलमंगा ह्या नांवाने प्रतिष्ठित झाली. हिला येथे पद्मावती असेंही नांव आहे. हे देखावे मी स्वत: जाऊन पाहिले व ह्या कथा निरनिराळ्या लोकांच्या तोंडून ऐकल्या आहेत. मंगापूर येथील मांगवाड्यात एका वृद्ध मांग गृहस्थांच्या तोंडून वरील मंगावतीचें नांव जंबावती असें ऐकून तर माझ्या मनावर निराळाच प्रकाश पडला. आठव्या शतकांतील तिरुमंगाई नांवाच्या एका वैष्णव आळवारने ह्याच वेंकटेशाची हरिहर ह्या रुपाने कांही स्तोत्रें रचली आहेत. एकंदरीत मंग हें नांव फार जुने असावें हें सिद्ध होतें. मंगल, मांगल नांवाच्या राष्ट्राचें राज्य ह्या प्रांती होतें. तें चालूक्यांची नष्ट केल्यावर ह्यांना हीनदशा प्राप्त झाली. ह्या झटापटीशी ह्या मंगादेवीचा संबंध कसा काय पोचतो हा भावी संशोधकांनी शोधून पाहण्यासारखा विषय खास आहे. चंडी जशी चंडालांची, मुंडी जशी मुंडाळांची तशीच मंगा उर्फ मातंगी ही देवी मांगांची हें ठरण्यास मात्र फारशा संशोधनाची जरुरी लागेल असें मला वाटत नाही.
हुलया, पुलया (कर्नाटक, तामीळ नाड )


ह्या नांवाची शेतावरच्या गुलामांची जात द्राविडदेशांत-कर्नाटक आणि मलबारांत-अफाट पसरली आहे. जुन्या कानडींतील प ह्या अक्षराचें नव्या कानडींत ह असें रुपांतर होतें. जसें, पल्लु-हल्लु= दांत, पालु-हालु=दूध, इत्यादि. पुलय हाच मूळचा शब्द, तो पुल्कस किंवा पुलह ह्याचा अपभ्रंश होय. पुल-हुल=विटाळ, हा द्राविडी अर्थ रुढीमुळें मागाहून झाला असला पाहिजे. रावण हा पौलस्त्य होता. मलबारांत आणि बनवासींत पूर्वी पुलयाचें राज्य होतें. असा उल्लेख वर झालेलाच आहे. हें राज्य मयूरवर्मा नांवाच्या उत्तरेकडील कदंब घराण्यांतील राजाने इ. स. सहाव्या शतकाच्या सुमारास दक्षिणेकडे केलेल्या स्वारींत नष्ट झालें असावे. मयूरवर्म्याने अहिक्षेत्राहून ब्राह्मण आणिले. ते हल्ली हैग, शिवळी ह्या नांवाने नैऋत्य किना-यावरील जमिनीचे मालक होऊन बसले आहेत. त्यांच्या दक्षिणेस नंबुद्री ब्राह्मणांनी जमिनीची मालकी पटकावली आहे. त्यांच्या जमिनीवर हे हुलया आणि पुल्या जातीचे हतभागी लोक हट्ट आळ, पण्णु आळ, मूळाड, सालाड, म्हणजे प्राचीन कर्जाखाली दडपून गेलेले पिढीजाद गुलाम बनून जनावराप्रमाणें कसा तरी गुजराणा करीत आहेत. ( आळ ह्याचा अर्थ माणूस व राष्ट्र असा कानडी भाषेंत होतो.) महाराष्ट्रांतील महारांचा व आंध्रांतील मालांचा तेथील रट्टांनी मालकी हक्क हिरावून, त्यांना बलुत्याचा तरी हक्क दिला आहे. पण नैऋत्येकडील ब्राह्मण जमीनदारांनी तोही न देतां केवळ गुलामगिरींत ह्यांना पुरून टाकिलें आहे.


मळबारांत पुलयांनाच चेरुमा असें दुसरें नांव आहे. ह्याचा अर्थ चेर माक्कळ म्हणजे चेर पुत्र, चेर देशाचे मूळ रहिवाशी, असा होतो. एल.के. अनंत कृष्ण अय्यर, ह्यांनी आपल्या 'कोचीन एथ्नीक सर्व्हे नं. ६' ( इ. स. १९०६) ह्या ग्रंथांत म्हटलें आहे की पुलय हेच पूर्वी मलबारचे राजे होते. एक्कर यजमान नांवाचा पुरुष त्या राजवंशांतला समजून अद्यापि सर्व चिरुमा जातींतले लोक त्याला फार मान देतात. त्रावणकोरची राजधानी त्रिवेंद्रमजवळ वेली नांवाचे तळ्याचे काठीं 'पुलयनार कोटा' नांवाची टेकडी आहे, तेथे पुलयांचे सिंहासन होतें. मी स्वत: ही टेकडी पाहिली व कथा ऐकली आहे. ओढिया जगन्नाथाच्या मूर्तीशी जसा तेथील अस्पृश्य शबरांचा, म्हैसूर इलाख्यांतील मेलकोट येथील मूर्तीशी जसा तेथील होलयांचा संबंध आहे, तसाच त्रिवेंद्रम् येथील पद्मानाभाच्या देवळाशी व मूर्तीशी तद्देशीय पुलयांचा संबंध आहे. तथापि ह्या देवळांत आता ब्राह्मणांशिवाय इतर सर्वोस मज्जाव आहे. महात्मा गांधीनांही तेथे मज्जाव झाला हें प्रसिद्ध आहे. एखाद्याचें राज्य पचविण्यास त्याचें देवस्थआन पचवावें लागतें. ही राजनिती आर्यांना कोणी शिकवायला नको. चेरुमान पेरुमाळ अशी मलबारच्या राजाचा पूर्वी संज्ञा होती. पुलया हे पूर्वी बौद्ध होते. अद्यापि त्यांच्या देवतांना चाटन=शास्ता अशीं नावें आहेत. संस्कृतांत त्यांची पारंगतता आहे. 'कुरळ' हा आदिद्राविड ग्रंथ एका पुलायनेच केला आहे.


परैय्या (परयन् ) (तालीम नाड)
हें नांव तामीळ भाषेंत परै म्हणजे ढोल ह्या अर्थाचा शब्द आहे, त्यावरुन पडलें असावें, असा तामीळ देशांत ब-याच विद्वानांचा समज असलेला मला आढळून आला. पण ही व्युत्पत्ति, मृताहर शब्दापासून महार ह्या नांवाचा छडा लावूं पाहण्यासारखीच अस मर्थनीय आहे. तामीळ भाषेंत परयन् असा एकवचनी व परयर असा अनेकवचनी नांववाचक हा शब्द आहे. ह्यांत मूळ पर अशी धातु. तिला य असा आदेश लागला आहे; जसा मलबारांत मला=डोंगर ह्याला य लागून मलयन असा नांववाचक शब्द तयार झाला आहे, तसाच हाही तयार झाला असला पाहिजे. बिशप् कॉल्डवेलच्या "द्राविडी भाषांचे तौलनिक व्याकरण" ह्या पुस्तकाच्या इ.स. १८७५ सालीं प्रसिद्ध झालेल्या दुस-या आवृत्तीच्या पान ४६३ व तौलनिक शब्दांची एक यादी दिली आहे. डॉ. गुंडर्टचे मते द्राविड भाषेंतून संस्कृतांत शिरलेले जे कांही शब्द आहेत अशांची ही यादी आहे. ह्या यादींत फल ह्या संस्कृत शब्दाचें मुळरूप पळ असा द्राविड शब्द असून त्यांत पर=प्राचीन, जुना, अशा अर्थाची अस्सल द्राविड धातु आहे असें कॉल्डवेलचें म्हणणें आहे. संस्कृतांत पर=थोर, प्राचीन, असा शब्द आहे तोहि द्राविडच ठरतो. त्यापासूनच परयन् हें नांव आलें असावें असा माझा तर्क आहे. मह=मोठा, महत्तर=म्हातारा, ह्यापासून म्हार हें नांव जसें आलें, तसेंच परपासून परयन् हे ह्या प्राचीन थोर जातींचें नांव उद्भवणें इतिहासाला अधिक धरुन आहे. ह्या जातीला हीनत्व आल्यावर ही ढोलकें वाजविण्याचे हीन काम करु लागली आहे. पण अनादि कालापासून ही जात ढोलकेंच वाजवीत होती, असें समजणें महार अनादि कालापासून मेलेली ढोरें ओढत आले आहेत असें समजण्याप्रमाणे निराधार आहे. अगोदर ह्या हतभागी लोकांचे स्वातंत्र्य व ऐश्वर्य हिरावून घ्यावयाचें आणि नंतर त्यांचा इतिहासही हिराऊन घ्यावयाचा आणि सर्वांवर कळस म्हणून त्यांच्या हल्लीच्या हीनत्वाला शोभेल अशीच त्यांच्या नांवाची निराधार व्युत्पत्ति त्यांना चिकटवावयाची ! हा प्रकार अन्यायाला अडाणीपणाची जोड देऊन दु:खावर पुन: डाग देण्याप्रमाणेंच निष्ठुर आहे. हें सर्व जाणून बुजून होत नसलें तरी अनुकंपनीय खास आहे. पर धातु आर्य भाषेंतली असो, द्राविड भाषेंतली, किवा दोन्ही भाषांतली समान असो, तिचा अर्थ पिकलेला. प्राचीन जुना, थोर असा आहे खास. त्यापासून परयन् हें नांव पडणें, म्हणजे त्या प्रदेशांत नवीन आलेल्या वंशांनी जुन्या वंशांना हें नांव देणें, अधिक संभाव्य आहे.


भाषेशिवाय इतिहासाचाही अधिक पुरावा आहे. विशप् कॉल्डघेल ह्या विद्धान भाषाशास्त्राने ह्याच पुस्तकांत (पान ५४०-५५४) परयर हे मूळचे द्राविड आहेत, की कोणी भिन्नवंशी आहेत, ह्यावर साधकबाधक प्रमाणें दिली आहेत. ते वंशाने कोणी असोत. दर्जाने मोठे अभिजात होते, हें मात्र उघड होतें. तीं सर्व प्रमाणे येथे देण्यास स्थळ नाही. कॉल्डवेलचा एकच उल्लेख मार्मिक आहे तो येथे दिल्या शिवाय मात्र राहवत नाही. मद्रास शहरांत जॉर्जटौन नांवाचा एक जुना भाग आहे. त्यांत मारी देवीचा एक वार्षिक उत्सव होत असतो. ही मारी उर्फ शीतला म्हणजे भूमि माता हीच देवी होय. आमच्याकडील तुळशीच्या लग्नाप्रमाणे हें मारीचें वार्षिक लग्न असतें. त्या वेळी मारी देवीच्या गळ्यांत ताळी बांधावयाची असते; ती अर्थात् तिच्या नव-यानेच बांधावयाची असते. ती बांधण्याचा अधिकार परयाहून इतर कोणालाही मिळू शकत नाही. ह्यावरुन परया हाच भूमीचा अर्थात् देशाचा पहिला पति असा स्पष्ट ध्वनि निघतो असें कॉल्डवेलचें म्हणणे आहे. ह्या विधीला "एगत्ताळ" असें नांव आहे. अशा प्रकारचा थोरपणाचा मान महाराष्ट्रांत म्हारांना व राजपुतान्यांत भिल्लांना मिळत असलेले पुरावे पुष्कळ गोळा करितां येतील असें मला वाटतें.


येझवा अथवा तिय्या ( मलबार )
ह्या जातीची मोठी संख्या मलबार, त्रावणकोर व कोचीन संस्थानांत आढळते. त्रावणकोर संस्थानचे इ.स. १९०१ च्या खानेसुमारीचे अधिकारी एन् सुब्रह्मण्णय्यर हे आपल्या रिपोर्टात पान २७८-७९ वर ह्या जातीच्या नांवाच्या व्युत्पत्तीची मीमांसा करितांना लिहितात की ही जात मूळ सिंहलद्वीपांतून मलबारांत व तामीळ देशांत आली. सिंहल ह्या नांवाचा अपभ्रंश ईझम् असा होऊन. त्यापासून येझ्वा असें हल्लीचे नांव आलें. इळ्वा असाही अपभ्रंश होय. नायर लोकांप्रमाणे ह्या लोकांची पूर्वी सैन्यांत भरती होत होती. ह्या लोकांनीच ताडीचे झाडाची लागवड सिंहलद्वीपांतून प्रथम हिंदुस्थानांत आणिली. ह्यांचा हल्लीचा धंदा शेतीचा-विशेषत: ताडी काढण्याचा व विकण्याचा आहे. त्यांची राहणी स्वच्छ आणि सुसंपन्न असूनही ताडीच्या निषेधामुळें ह्यांना अस्पृश्यता आली आहे. पण मूळचे हे अभिजात आहेत. ह्यांचा मूळ धर्म बौद्द. तेंही एक ह्यांच्यावरील बहिष्काराचें मुख्य कारण आहे.


पळ्ळन् ( तामीळ नाड )
महाराष्ट्रांत जशी महारांना मांगाची जोड, तशी तामीळ देशांत परैय्यांना पळ्ळांची जोड आहे. कर्नाटकाच्या खाली दक्षिणेंत सर्वत्र खालच्या वर्गांत बलगै (उजव्या हात कडचे ) आणि यडगै ( डाव्या हाताकडचे ) असा भेद आढळतो. हा ग्रामसंस्थेंतील दरजाचा मान दिसतो. ह्या उजव्या डाव्या मानाबद्दल नेहमी तंटे आणि मारामा-याही होतात. परयन् उजव्या मानाचा व पळ्ळन् डाव्या मानाचा आहे. पण हे दोघे अगदी भिन्न वंशाचे आहेत. कांचीचें पल्लव राजघराणें कोणी म्हणतात की इराणांतून आलेले पार्थव, तर कोणी म्हणतात इकडचे कोणी तरी मूळ एकद्देशीय. दुस-या पक्षीं, हेच आता अस्पृश्य बनलेले पळ्ळ असावेत.


चक्किलियन अथवा शक्लीया ( तामीळ नाड )
कातड्यांची कामें करणा-या ह्या जातीची संख्या ही मद्रासेकडे बरीच मोठी आहे. शिकलगार म्हणजे हत्यारांना शिकल करणारी, एक फिरस्ती गुन्हेगार जात मी कर्नाटकांत पाहिली आहे. त्यांचा व चक्किलियनांचा नांवाचा संबंध दिसतो. हत्यार पाजळण्यासाठी ह्यांच्या जवळ एक चाक किंवा चक्की असते. त्यावरून चक्किलियन हे नांव पडलें असावें. हत्यार पाजळण्याचा निषेध आहे व कातड्याची कामेंही घाणेरडीं असतात त्यावरुन ह्यांना अस्पृश्यता आली असावी. बंगाल्यांतील शक्ली जातीचाही ह्यांच्याशी संबंध असावा.


चांभार ( सर्व प्रांत )
सर्व मानीव अस्पृश्यांमध्ये चांभारांची संख्या अतिशय मोठी म्हणजे १.११.३७.३६२ आहे. ह्याचें कारण हिदुस्थानांतील बहुतेक प्रांतात कातड्याचीं कामे करणारे ह्याच नांवाने ओळखले जातात. पण ह्यावरून हे सारे एकाच वंशाचे असावेत, असे मुळीच नाही. अस्पृश्यता किंवा बहिष्काराच्या दृष्टीनेही ह्यांची स्थिती सर्व प्रांतांत सारखी नाही. ह्या दृष्टीने कांही प्रांतांत हे इतरांपेक्षा उच्च दरजाचे आहेत, तर दुस-या प्रांतांत नीच दरजाचे आहेत. चेहरेपट्टीवरुन व वर्णावरुन कांही प्रांतांत हे इतके उजळ आणि नीटस दिसतात की ते आर्यच असावेत, अशी खात्री होते. ते वेदकाळांत खात्रीने अस्पृश्य व बहिष्कृत नव्हते. असते तर तसा उल्लेख असता. चांभार हा चर्मकार ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. मोची म्हणून जी गुजराथेंत जात आहे ती मुळीच अस्पृश्य नाही. ह्यांचा धंदाही कमाईचा असल्याने व खाणें पिणें स्वच्छ असल्याने ह्यांना अलीकडे अस्पृश्यांत गणलेलें आवडत नाही.


नमशूद्र आणि राजबंशी ( बंगाल )
नमशूद्र, राजवंशी, कोच, पोड, वगैरे बंगाल्यांत व आसामांत ब-याच जाती आहेत, त्यांना ब-याच शतकांपासून जी चांडाल ही संज्ञा होती ती भाषेच्या दृष्टीने खरी असो किंवा नसो, ते पूर्वी अस्पृश्य व बहिष्कृत नसावेत. चंडाल म्हणून अगदी प्राचीन काळी हे स्वतंत्र राष्ट्र असावें. हे लोक चंड असले तरी अस्पृश्य खास नसावेत. विशेषत: पोड (पौंड) हे व्रात्य क्षत्रिय होते असा मनुस्मृतींत उल्लेख आहे. अलीकडे जोराची चळवळ करुन खानेसुमारींत ह्या जातीने आपली चंडाल ह्या संज्ञेपासून सुटका करुन घेतली आहे. तथापि त्यांची अस्पृश्यता पार नाहीशी झालेली नाही. पूर्व बंगाल्यांत मी ह्यांच्यामध्ये दोनदा जाऊन दोन चार महिने प्रत्यक्ष राहून ह्यांची घरगुती व सामाजिक स्थिती पाहिली आहे. त्यावरुन ते पूर्वी बौद्ध असावेत, आणि ह्यांची एकंदरीत प्रागतिकता पाहून ह्यांची अस्पृश्यता हे लवकरच झुगारून देतील ह्यांत मला संशय वाटत नाही.


बाऊरी, बाथुरी ( ओरिसा )
पहिल्या खंडांतील पांचव्या प्रकरणांत ह्या नांवाच्या जातीचा विस्तृत शोध कसा लागला ह्याचें वर्णन आहे ( पान ६४-६६ पहा). हे मूळ ब्राह्मण जातीचे आर्य असावेत असें प्रसिद्ध बंगाली संशोधक बाबू नगेंद्रनाथ बसू ह्यांचे ह्मणणे आहे. व त्यांनी सिद्धान्ताडंबर ह्या बाथुरी लोकांच्या ओरिसा भाषेंतील ग्रंथावरुन आपल्या Modern Buddhism ह्या ग्रंथांत (पान २३-३० भाग १ ला ) तसें सिद्ध केलें आहे.


सवर , शबर ( ओरिसा )
शबर, शक वगैरे जातीही व्रात्य क्षत्रिय म्हणून प्रसिद्धच आहेत. ही आता हीनत्वाला पोचलेली प्राचीन राष्ट्रे ओरिसा देशांतील, रानावनांतून हल्ली आपल्या बुद्ध धर्माचें गुप्तपणें अनुष्ठान लपून छपून करीत आहेत. त्यांच्या कित्येक जाती अगदी अस्पृश्य मानल्या जाऊन बहिष्कृत झाल्या आहेत, वगैरे माहिती मागील प्रकरणातून वरील Modern Buddhism ह्या ग्रंथांवरुनच दिलेली आढळेल.


बळाई ( माळवा )
उत्तर हिंदुस्थानांत विशेषत: माळव्यांत ह्या जातीची मोठी संख्या आढळते. ह्यांना अस्पृश्य गणावें की नाही हा मोठा प्रश्न आहे. हे शेतकरी गुलाम असावेत. ह्यांच्यापैकी पुस्कळांनी वैष्णव धर्म स्वीकारुन मांसाहार अगदीच वर्ज्य केला आहे. तरी दरजा फारसा वर चढला नाही. ह्या नांवाची व्युत्पत्ति नीटशी लागत नाही. बळ-बढ-बुढ-वृद्ध=प्राचीन, असा मी तर्क करीत आहें. पण ह्या ऐतिहासिक परावा नाही.


ढाणक ( गुजराथ गंगथडी वगैरे )
ह्या जातीची संख्या फार मोठी आहे. ह्यांची अस्पृश्यता अनिश्चित आहे. हे गुजराथेंत जंगली असले तरी अस्पृश्य नाहीत. स्थानिक अथवा धान्यक ह्या संस्कृत शब्दापासून ह्या नांवाची व्युत्पत्ति असावी. जैनांत ढाणक असा पंथ आहे. त्यांच्या नांवाचे मूळ स्थानकवासी असें आहे. ही जमात अगदी मूळची एकद्देशीय असावी. हे मूळचे शेती करणारे असावेत. यावरुन धान्यक हें मूळचें नांवही संभवतें. कापड विणण्याचा धंदा जसा वर्ज्य ठरवून धेड खादी विणणारे जसे अस्पृश्य ठरले तसेच कृषिकर्म करणें वर्ज्य ठरवून जैनांनी प्रथम व इतर हिंदूंनी नंतर ह्या शेतकरी गुलामांना अस्पृश्य ठरविलें असल्यास हिंदी इतिहासाच्या परंपरेला अगदी धरुनच आहे !


तूबायाझा ( ब्रह्मदेश)
ब्रह्मदेशांतील अस्पृश्य जातींत तूबयाझा या नांवाची जात प्रमुख आहे. ह्या नांवाची मूळ व्युत्पत्ति अशुभराजा असा संस्कृत शब्द आहे. हल्ली ह्या लोकांकडे जरी ब्रह्मदेशांत थडगीं खणण्याचें काम आल्याने त्यांच्या वसाहती स्मशानाजवळच आढळतात, तरी ब्रह्मदेशांत मध्ययुगीन काळांत ज्या वेळोवेळी राज्यक्रांत्या झाल्या त्यावेळीं यशस्वी राजांनी जिंकलेल्या राजघराण्यांतील सर्व माणसांनाच नव्हे तर प्रजेलाही गुलाम करुन त्यांना हलक्या दरजांत डांबून कसें ठेविले ह्याचें वर्णन पहिल्या खंडांत ब्रह्मदेशाचे प्रकरणांत आलेंच आहे. आता व्युत्पत्तीच्या दृष्टीनेही हीच माहिती खरी ठरते. ब्रह्मीभाषेंत संस्कृत मूळ च, स, र, ह्या वर्णांचा उच्चार अनुक्रमें स, त, य, असा होतो असेंही त्या प्रकरणांत सांगितले आहे. अशुभराजा ह्या शब्दाच्या पहिल्या अचा लोप होतो. कांही असो. ही जात पूर्वी अतिशय अभिजात होती हें सिद्ध होतें.


संडाला, डूनसंडाला ( ब्रह्मदेश )
संडाला हें नांव संस्कृत चंडाल आणि डूनसंडाला हें डोम चंडाल ह्या नांवांचा अपभ्रंश आहे हें उघडच आहे. पूर्वी चंड, मुंड, गंड, वगैरे प्रतापी मोगलवंशी राष्ट्रें होती. त्यांत आळ ह्या पदाची भर पडून चंडाळ, मुंडाल=मंडल अशीं रुपें सिद्ध झाली आहेत. आळ हा शब्द द्राविड असून, त्याचा अर्थ राष्ट्र असा आहे. मलयाळ ह्या शब्दांतही हाच आळ शब्द आढळतो. मुंडाळ नांवाचेंही राष्ट्र असावें. मुंडारी ही भाषा मुंडाळांचीच असावी. पूर्व बंगाल्यांतील अनेक नम:शुद्र घराण्यांना 'मंडळ' असें उपनांव असलेलं मी पाहिलें आहे. तें नांव मुंडाल ह्या शब्दावरुनच आलें असावें. चंड म्हणजे प्रतापी असा संस्कृतांत जो शब्द आहे तो व चंडी, मुंडी, चामुंडी ह्या देवतांची नांवे पुराणांत आढळतात त्यावरुनचही चंडाल, मुंडाळ, ही राष्ट्रे फारच प्राचीन इतकेंच नव्हे तर अभिजातही असावीत, पण राजकारणाच्या धकाधकींत फार प्राचीन काळीच त्यांना ही अवनति प्राप्त झाली असावी, असा तर्क करण्यास जागा आहे.


फयाचून अथवा फयाकून ( ब्रह्मदेश )
ह्या नांवाची व्युत्पत्ति पूर्णपणे समाधानकारक लागत नाही. तरी अर्धीमुर्धी लागते. फया हा शब्द बुद्ध ह्या शब्दाचा ब्रह्मी भाषेंतील अपभ्रंश आहे हें वाचून पुष्कळांस आश्चर्य वाटेल. पण तो तसा आहे हें निश्चित आहे. बुद्ध=बुढ्ढ=बु-ह=फर्र=फय्य=फया, अशी उक्रांती झाली आहे. शेवटी आश्चर्य हें की फया म्हणजे देव असाच अर्थ होऊन न राहतां देवूळ असाही अर्थ झाला आहे. पण चून ह्या शब्दाची व्युत्पति शोधून काढावयास मला ब्रह्मदेशांत वेळच मिळाला नाही. कदाचित फया सूनु=देवूळ पुत्र, देवळी, असा अर्थ असेल. पण सूनु ह्याचा अपभ्रंश तूनु असा व्हावयाला पाहिजे. आणि तूनु ह्याचा पुढे चून अथवा कून कसा झाला हें सांगवत नाही. तरी तें संभवनीय आहे. व्युत्पत्ति कशीही असो. पगानच्या अनिरुद्ध नांवाच्या ब्रह्मी राजाने दक्षिण ब्रह्मदेशांतील मनुहा ह्या नांवाच्या तेलंग राजाला इ.स. च्या ११ व्या शतकांत युद्दांत पादाक्रांत करुन पगान येथे त्याच्या परिवारासह नेऊन देवळी गुलाम बनविलें ह्याचें वर्णन पहिल्या खंडांत आलेंच आहे.