म्हारम्हात्म्य नांवाच्या एक विक्षिप्त पुराणाचे मी मागील प्रकरणांत बरेच उतारे दिले आहेत. पुढील दोन उतारे मासलेवाईक दिसतात.
नाना जाती आठरा वर्ण | ह्यांचे उचिष्ट न खावें म्हाराने |
मिलंची वेगळा करोन | इतर जातींचें न खावें || १४
मिलंची आणि म्हार जाण | ही दोन्ही चंद्रवंशी उत्पन्न |
म्हणोनि तयाचे घरचें अन्न | खावें ह्याराने वेद घाये (?) ||१५
(अध्याय ५ वा)
येथे मिलंची हा शब्द म्लेंच्छ ह्याचा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ मागील तिस-या अध्यायांत मुसलमान असाच शब्द योजून कर्त्याने स्पष्ट केला आहे.
सेख सैय्यद मोंगल पठाण | अरब रोहिलेही मुसलमान |
रंगारी आत्तार बागवान | त्याच्या पोटी जावें || १८
म्हार आणि मुसलमान | हे दोघे एक वंशे उत्पन्न |
चंद्र वंश पूर्ण | सोम म्हणताति यालागे || १९
डॉ. आंबेडकर हे महारांचे एक विद्वान आणि प्रतापी पुढारी आहेत. त्यांना सर्वोचा नाही तरी पुष्कळांचा पाठिंबा आहे. त्यांच्यासाठी प्रत्यक्ष जीवाचीही आहुति देण्यास कांही अनुयायी तयार आहेत. ह्या 'म्हार म्हात्म्य' पुराणाचे कतें बाळकदास हे म्हारांचे एक पुरोहित गोसावी बुवा दिसतात. ह्यांनी आपल्या ग्रंथांच्या समाप्तीचा काळ व स्थळ ही शेवटीं दिली आहेत. शके १८८८ असें लेखकाचे चुकीने पडलें असावें. संदर्भावरुन शके १७८८ हें साल दिसतें. नीरानदीचे काठीं पुणें जिल्ह्यांत पाडेगांव म्हणून एक गाव आहे. तें स्थळ ग्रंथाचे शेवटीं दिलें आहे. ह्या गावीं म्हार गोसाव्यांची प्रसिद्ध घराणीं आहेत. ते असले ग्रंथ करितात, असें ऐकतों. ह्या बुवांच्या वरील मुसलमानांसंबंधी विधानाला म्हारांचा पाठिंबा आज मिळेल असें वाटत नाही. तरी म्हार मुसलमानांच्या कडे जेवतात. ते मुसलमानाप्रमाणें डुकराचें मांस अत्यंत त्याज्य मानून, गाईचें मांस मात्र उघड खातात हें प्रसिद्ध आहे. मुसलमान व महार हे दोघे चंद्रवंशी उत्पन्न झाले असें वर 'म्हारमहात्म्या'तून अवतरण दिलेंच आहे. चांद्रमास व निशाणावर चंद्राची कोर मुसलमानांची प्रसिद्धच आहे. मुलसमानी आमदानींत म्हारांवर त्यांच्या संस्कृतीचा परिणाम थोडा थोडका झाला असेल असें नाही. इंग्रज सरकाराचा व ख्रिस्ती मिशन-यांचा आताही तसाच होत आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करितां सुमारें पाऊणशें वर्षांमागें ह्या गोसाव्याने असें विधान केलेलें पाहून विशेष आश्चर्य मानावयाला नको. अशा विक्षिप्तपणाला 'उपास्यानां अनियम: | साधनानां अनेकता' अशी व्याख्या करुन लो. मा. टिळकांनी जरी आपली मूक संमति दिली आहे, तरी तिची मजल येथवर जाईल असें कोणालाही वाटणार नाही. कांही असो, आजकालच्या राजकारणाच्या ओढाताणींत आपण मुसलमान होऊं अशी धमकी केव्हा केव्हा. अस्पृश्य पुढारी देत असतात तिचा कोणताही संबंध वरील गोसाव्याच्या विधानाशीं मुळींच दिसत नाही. असता तर आपल्या पुराणांत तशी अधिक शिकवण दिल्याशिवाय तो न राहता. तें कसेंही असो, हिदु धर्माची शुद्धि व उत्कर्ष, आणि हिंदुसमाजाचें ऐक्य आणि दृढता वगैरेची चाड बाळगणा-या सर्वांनी अस्पृश्य वर्गांच्या खास प्रतिनिधीचे वरीलप्रमाणें उद्गार अगदीच टाकावू ठरवून घमेंडींत अत:पर राहूं नये, येवढाच तूर्त इषारा आहे.
मंदिराप्रवेशाचा मुद्दा ह्याच प्रकरणाखाली येईल असें कोणासही वरवर पाहतां वाटेल. पण त्यांत धर्म नसून अस्पृश्यांचे राजकारण आहे. आणि तें योग्यच आहे. व्हायकोम येथे प्रथम मंदिरप्रवेश सत्याग्रह झाला तेव्हा मी स्वत: त्यांत भाग घेतला. कारण सार्वजनिक देवळांत जाण्याचा प्रत्येक हिंदूचा धार्मिकच नव्हे तर सामाजिकही हक्क आहे. तो सामाजिक हक्क बजावण्यासाठी साधु शिवप्रसाद नांवाचे एक ब्राह्मसमाजाचे प्रचारक व मी तेथे गेलों. साधू शिवप्रसाद हे ब्राह्य होण्यापूर्वी तिय्या ह्या अस्पृश्य जातीचे होते; म्हणून त्यांनाही व्हायकोमच्या देवळाच्या नुसत्या वाटेवरही फिरण्याची मनाई झाली. ह्याचा खुलासा करुन घेण्याकरिता मला ब्राह्मसमाजाच्या वतीने व्हायकोमला जावें लागलें. मी त्या वेळीं दक्षिण कानडा जिल्ह्यांत मंगळूर ब्राह्मसमाजाचा आचार्य होतों. व्हायकोम गांव त्रावणकोर संस्थानांत आहे.
कलकत्याच्या साधारण ब्राह्मसमाजाने त्रावणकोर दरबारला शिवप्रसाद ह्या ब्राह्य प्रचारकाला झालेल्या मनाईबद्दल खुलासा विचारला असतां., कांहीच उत्तर मिळालें नाही. म्हणून मी तेथे गेलों. शिवप्रसादाच्या हातांत हात घालून मी सत्याग्रहाच्या फाटकांत शिरण्याचा प्रयत्न केला. पण मी येणार ही बातमी अगोदरच प्रसिद्ध झाल्याने मुख्य पोलीस सुपरिटेंडंट स्वत:च फाटकावर कडेकोट तयारीने उभे होते. त्यांनी मला वाट दिली इतकेंच नव्हे तर प्रत्यक्ष मंदिरांतही नेऊन दाखविण्याची तयारी दर्शवली. पण शिव प्रसादांना फाटकाच्या आंत जाऊं देईनात. सर्व पोलीस आम्हांशी आदराने व तितक्याच जबाबदारीपूर्वक निश्चयाने वागले. मग हें प्रकरण मी थेट त्रिवेंद्रम येथे दिवाणाकडे नेलें. त्यांनी प्रथम, झालेल्या प्रकाराबद्दल औपचारिक खेद प्रदर्शित केला. पण शेवटीं त्यांनी असा दप्तरी सल्ला दिला की शिवप्रसादाने आपण हिंदू नाही असें कबूल करावें. मग ते ब्राह्म असोत, आर्यसमाजाचे असोत, कोणी असोत; त्यांना फाटकांत जाण्याची परवानगी मिळेल. अर्थात् हा विक्षिप्त सल्ला स्वीकारण्यांत आला नाही. तें प्रकरण तेथेच थांबलें. पुढे पालघाट म्हणून एक गाव ब्रिटिश मलबारांत आहे तेथे आर्यसमाजांत प्रविष्ट झालेल्या अस्पृश्यांबाबत प्रश्न उत्पन्न झाला असतां, स्वामी श्रद्धानंद हे प्रसिद्ध आर्यसमाजाचे संन्याशी तेथे गेले. तरी अशा अस्पृश्यांना मंदिरप्रवेशाचाच नव्हे पण मंदिराच्या वाटेवरही फिरण्याचा हक्क मिळाला नाही. सार्वजनिक शांतताभंग होईल म्हणून उलट ब्रिटिश अधिका-यांच्या भिडेला श्रद्धानंदांना मात्र बळी पडावे लागलें. असें प्रत्यक्ष स्वामीजींनीच मला सांगितले. एकूण काय तर अस्पृश्य जोंवर हिंदु धर्मांत राहण्याचा आग्रह धरतील, तोंवरच त्यांच्यावर हा मंदिर बहिष्कार आहे ! ज्या दिवशीं ख्रिस्ती अगर मुसलमान यांसारख्या सत्ताधारी धर्मांचा ते उलट स्वीकार करतील, त्या दिवशी त्यांच्यावर बहिष्काराचें शस्त्र उगारण्याची इच्छा हिंदुलोकांत असो वा नसो, सामर्थ्य मात्र खास नाही, हीच गोष्ट वरील दक्षिण देशांतील सत्याग्रहाने सिद्ध झाली आहे !
व्हायकोमचा सत्याग्रह केवळ काँग्रेसच्या जोरावर बरेच महिने मोठ्या चिकाटीने चालला. तरी त्याला पूर्ण यश आलें नाही. त्यानंतर महाराष्ट्रांत उमरावतीची अंबाबाई, पुण्याची पर्वती, नाशिकचा काळा राम वगैरे देवळांपुढे सत्याग्रह पद्धतशीर झाला, पण कोठेच यश आलें नाही. महाड येथील तळ्यावरील पाणवठ्याचा सत्याग्रह मात्र बहुतांशी यशस्वी झाला आहे. वरील सर्व मंदिरप्रवेशाच्या सत्याग्रहांना यश येईपर्यंत अस्पृश्य हे हिंदू आहेत की नाहीत हा प्रश्न पुन: अनिश्तितच राहतो. तें कसेंही असो. वरील सत्याग्रही आपल्या धार्मिकच नव्हे तर सामाजिक हक्काबद्दलही भांडत आहेत. तरी पण ह्या धकाधकींत धर्म अथवा समाजसुधारणा नसून उभय पक्षांचें राजकारणच आहे असें माझें प्रांजल मत झालें आहे. आता ह्या राजकारणाला केवळ स्पृश्यांच्या हट्टाचें स्वरुप आलें आहे. स्पृश्यांनी हिंदुमहासभेचें व काँग्रेसचें ऐकून अस्पृश्यांना सामोपचारें ह्यापूर्वीच सर्व मंदिरे खुली करुन दिलीं असतीं तर अस्पृश्य मोठे धार्मिक व भक्तिभान् झाले असते, असें नव्हे. पण आजच्या त्यांच्या राजकारणाला खात्रीने निराळें वळण लागलें असतें. त्यांना-निदान त्यांच्यापैकी जे स्वतंत्र मतदारसंघ मागत आहेत त्यांना तरी-आपल्या आग्रहाला आधार उरला नसता. पण कांही अदूरदर्शी व आपमतलबी हिंदूंच्या हट्टामुळेंच स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आज अगदी न्याय्यच नव्हे तर अवश्य ठरत आहे. तिच्यामुळें राष्ट्राला धोका आहे हेंही खरेंच आहे. तो धोका हा की ह्या मागणीला अधिकच उग्र स्वरुप येऊन, पुढे सर्व सार्वजनिक देवळेंच नव्हत, तर खासगी देवघरेंही अस्पृश्यांना मोकळी केलीं तरी त्यांचा हट्ट कदाचित कांही काळ तसाच कायम राहिल. अशाने अस्पृश्यांचें म्हणण्यासारखें मोठेंसें कल्याण झालें नाही तरी परकीयांच्या कांही चेष्टेचें मात्र आणखी थोडें जास्त प्रदर्शन होईल. ह्या पेक्षा जास्त ह्या मंदिरप्रवेशाच्या मुद्याचा विचार ह्या प्रकरणांत करणें मुळींच जरुर नाही.