इंग्लंडमधील रोजनिशी (११ सोमवारी)

११ सोमवारी
सकाळी १० वाजता लॉख लोमंड सरोवरास६० निघालो. आगगाडीतून गोरॉकपर्यंत येऊन नंतर आगबोटीतून अरखर खेड्यास लॉख लाँगच्या शिखरावर आलो. ब्रॅड ह्यांचे हॉटेलात बि-हाड केले आहे. येथे जागा फार महाग आहेत. आठवड्याचे ३० शिलिंगप्रमाणे येथे दर आहेत हे मोठे भाय समजावयाचे. दुसरी ५०, ६०, ७० शिलिंग आठवड्याचे आहेत. येथून २ मैलावर लॉख लोमंडचे काठी टार्बेट गाव आहे. लाख लाँगचे काठाने झाडीतून व सुंदर दरीतून ९ मैल व्हिसलफिल्डपर्यंत चाललो. परत टार्बेटला आगगाडीतून सुंदर देखावा पाहिला. स्वच्छ उन पडले होते. दिवस सुखाचा गेला.

मंगळवार १२ ऑग्सट १९०२
सकाळी ९ वाजता टार्बेट पियरवरून राउर्डेनान धक्क्यावर आगबोटीने गेलो. हा बेनलोमंड पर्वताचा पायथा आहे. ह्या पर्वताचे शिखर ३१९२ फूट उंच आहे. ९।।। पासून चढू लागलो. १२। वाजता अगदी शिखरावर पोचलो. वाटेने अगदी एकटाच होतो. केव्हा तरी एकादे मेंढरू मात्र दिसे. डोंगर चढण्यास कठीण नव्हता. सुंदर देखावा पाहत स्वतःशीच रमत असता सुंदर विचार मनात यऊ लागले. मनुष्य आपला आपण किती चांगला सोबती आहे, गुरू उपदेशक आहे ते कळले. शिखरावर दोन जर्मन गृहस्थ भेटले. ते गेल्यावर ह्या उंचीवरच्या एकांतवासात २ वाजेतोपर्यंत तटस्थ पाहत बसलो होतो. वारा वाहत नव्हता. थंडी वाजत नव्हती. उष्मा वाटत नव्हता. इतका चांगला दिवस तश्या उन्हाळ्यातला येथे पहिलाच असे सांगतात. भोवतालचा ५० मैलाचा देखावा दिसत होता. ग्लासगोचा धूर व धूळ दिसत होती. येथे एक पाखरूही नव्हते. पुढे अनंत काल व अनंत विश्व साक्षात् जणू दिसू लागले. अशा उच्च वातावरणाचा उदात्त व पवित्र विचार सुचणे फार सोपे आहे. अशा एकांतवासात मन शुद्ध राखणे व तत्वज्ञानी होणे साहजीक आहे. पण जनसमूहात मिसळून जीवनकलहात गुंतलो असता मनाची अशी स्थिती ठेवणे मात्र अत्यंत कठीण. थोर पुरुषांस ते साधते. नीच इतक्या उंचीवर येऊनही नीचच असतात. खाली उतरल्यावर लेक लोमंड (सरोवराचे) काठी फराळ केला. काठाने फिरून ६ वाजता आगबोटीतून परत टार्बेटला आलो. नंतर घरी. एकंदर सुमारे २० मैल आज चालणे झाले. पर्वतावरून लोमंड सरोवराचा आकार पिंपळाच्या पानासारखा दिसत होता. दोन्ही बाजूने उंच पर्वत, मध्ये सुमारे २५ मैल लांब क्लाइड नदीपर्यंत हे पसरले आहे. एका बाजूस लाँग व दुसरे बाजूस काट्रिन ह्याच्या हाताप्रमाणे पसरलेली दिसली.

Inverhullan, Tarbet,
Loch Lomand

बुधवार १३

आरखर येथून ब्रॅड्स हॉटेलातून वरील झोपडीत आलो. येथे एक गरीब बाई आणि तिची ७ मुले राहत होती. झोपडी अगदी लोमंड सरोवराच्या काठी होती. लहानसे द्वीपकल्प सरोवरात गेले होते. त्यावर देवदाराची मोठी झाडे होती. आत एक चिमुकला तंबू उभा होता. संध्याकाळी तंबूत अगर अगदी पाण्याच्या काठी खुर्ची टाकून मी Pictorial Towns of the World जगाचा सचित्र प्रवास हे बूक वाचीत असे. शेजारी झिप-या मुली अँग्नेस व जेसी आणि उनाड जॉनी आणि टॉमी हुदोड्या घालीत. जेसी तीन विती पण फार धीट असे. तिने मला स्पष्ट सांगितले, तिची बाहुली माझ्याइतकी मोठी आहे. तीन दिवस ह्या रानातल्या गरीब कुटुंबाचा सहवास सुखाचा गेला.

शुक्रवार १५ आगष्ट
सकाळी १० वाजता डनव्हस्नेंडपर्यंत टार्बेटहून बोटीतून गेलो. नंतर पाच मैल लॉख कॅट्रिनपर्यंत चाललो. वाटेत एक जर्मन तरुणी भेटली. ही प्रदेशातून बायसिकलवरून एकटीच प्रवास करीत होती. फार धीट व हुशार दिसली. देखणी तर होतीच. येत्या ऑक्टोबरमध्ये ऑक्सफर्डास अभ्यासास येणार होती. लॉख कॅट्रीनवर ट्रॉसेक दरीपर्यंत पुनः बोट घेतली. एलनेस बेटाजवळ सरोवराचा देखावा अती रमणीय दिसला. स्कॉटच्या लेडी ऑफ दि लेकमधली हीच एलन होय.६१ ट्रॉसेक दरी ही स्कॉटलंडातील उत्तम देखाव्यापैकी एक आहे. दोहो बाजूस उंच डोंगरातील दरीतून एक मैलपर्यंत जी सडक आहे तिचे नाव ट्रॉसेकस. ह्या हंगामात ह्या प्रदेशात नेहमी रोज १००।१५० माणसे पाहून हिंडून जातात. वाटेत आर्कलट नावाच्या सरोवराच्या काठी प्रसिद्ध स्कॉच रामोशी रॉब रॉय ह्याची बायको जन्मली. जवळच त्याची गुहा आहे.
Woodburn cottege, Rowardennan,
Loch Lomand