संपादकाचे निवेदन

महर्षी विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. प्रतापराव यांनी आपल्या वडिलांच्या पश्चात त्यांची कागदपत्रे, पत्रव्यवहार, लेख इ. साहित्य जपून ठेवले. या सामग्रीचा योग्य उपयोग व्हावा अशी त्यांना तळमळ होती. त्यांच्याच प्रयत्नामुळे `शिंदे लेखसंग्रह` हा अण्णासाहेबांच्या वैचारिक लेखांचा संग्रह १९६३ मध्ये प्रसिद्ध झाला. श्री. प्रतापराव शिंदे हे माझे सासरे. त्यांनी त्यांच्या संग्रही असलेले साहित्य मला उपलब्ध करून दिले. म. शिंदे यांच्या संग्रहात काही छोट्या डाय-या व तुलनेने मोठ्या अशा तीन रोजनिशा आढळल्या. छोट्या डाय-यांत सामान्यतः स्मरणार्थ केलेल्या नोंदी वा टिपणे आहेत. त्यांच्या संग्रहातील मोठ्या रोजनिशा येथे संपादित केल्या आहेत.

पहिल्या दोन रोजनिशांचा उल्लेख म. शिंदे यांनींच `फर्ग्युसनमधील रोजनिशी` व `इंग्लंडमधील रोजनिशी` असा नंतरच्या काळात केला आहे. तिसरीवर `येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी` असे नाव स्वतः लिहिले आहे. `फर्ग्युसनमधील रोजनिशी` २२ सें.मी. x १६ सें.मी. आकाराच्या जाड, को-या, चतकोर कागदाच्या वहीवर लिहिलेली असून प्रत्येक पृष्ठावर सामान्यतः २०-२१ ओळीचा मजकूर आहे. तीवर त्यांनी पृष्ठक्रमांक टाकले आहेत. ह्या वहीची १०२ पृष्ठे लिहिलेली असून बाकीची कोरी आहेत. कागद अत्यंत जीर्ण झाल्याने सुरवातीच्या पृष्ठांचे कोपरे व कडा झिजून काही शब्द व ओळी गेलेल्या आहेत. वहीचा कागद चिकटल्यानेही काही शब्दांचे नुकसान झाले आहे. `इंग्लंडमधील रोजनिशी` ही ३१ सें.मी. x २० सें.मी. आकाराच्या जाड आखीव कागदाच्या जमखंडीस बांधून घेतलेल्या मोठ्या रजिस्टरसारख्या वहीवर लिहिलेली आहे. पृष्ठक्रमांक टाकलेले नाहीत. प्रत्येक पृष्ठावर २९ ओळी असून वहीची १०८ पृष्ठे लिहिलेली आहेत. को-या पानावर उलट बाजूने त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचा पक्का मजकूर त्यांचे धाकटे चिरंजीव रवींद्र यांनी उतरला आहे. `येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी` २० सें.मी. x १६ से.मी. आकाराच्या साध्या आखीव वहीवर लिहिलेली आहे. प्रत्येक पृष्ठावर २० ओळी असून दोन्ही पृष्ठांना मिळून एक असे क्रमांक म. शिंदे यांनी टाकले आहेत. वहीची अशी ४५ पाने त्यांनी लिहिली आहेत.

म. शिंदे यांच्या लिहिण्याच्या लकबा कायम ठेवून सामान्यतः नव्या शुद्धलेखनाचा अवलंब येथे केला आहे. शब्दारंभीच्या आणि उपांत्य स्वरांचे लेखन दीर्घ करण्याकडे त्यांचा कल आहे. उदाहरणार्थ - आभाव, आगत्य, आंगची, सुशिक्षीत, दूषीत, घातूक. `अवडंबर असतो`, `पोलाद लागली` ह्या प्रयोगात त्यांचा शब्दांच्या लिंगाचा उपयोग वेगळा आहे. `पंधरावड्यात` असा शब्द ते वापरतात. त्यांच्या ह्या सर्व लकबा येथे कायम ठेवल्या आहेत. अनेक नामे अथवा विशेषणे एकामागोमाग लिहिताना ते स्वल्पविरामांचा उपयोग करीत नाहीत. अशा ठिकाणी अर्थसौकर्यासाठी स्वल्पविराम दाखविले आहेत. अनुस्वारांचा उपयोग करण्याकडे त्यांचा कल कमीच आहे. पारंपरिक लेखनपद्धतीप्रमाणे ते अनुस्वारांचा विपुल उपयोग करीत नाहीत. प्रस्तुत संपादनात अनुस्वार व अंत्य स्वर नव्या शुद्धलेखनाप्रमाणे दाखविले आहेत.

महर्षी शिंदे यांनी मूळ रोजनिशीतच काही ठिकाणी गोल कंसात मजकूर लिहिलेला आहे. गोल कंसातील त्यांचा मजकूर नेहमीच्या टाइपात तसाच गोल कंसात ठेवला आहे. रोजनिशीचे लेखन करताना अनवधानाने म. शिंदे यांच्याकडून शब्द सुटला आहे असे जेथे संपादकाला वाटले तेथे अर्थ स्पष्ट होण्याच्या दृष्टीने गोल कंसात असा शब्द तिरक्या टाइपास दाखविला आहे. मूळ रोजनिशीतील कागद फाटल्याने वा झिजल्याने मुळात अर्धवट शब्द जेथे राहिला आहे वा अस्पष्ट आहे तेथे असा शब्द चौकटी कंसात दाखविला आहे. जिथून मजकूर अगदीच नाहीसा झाला आहे अशी स्थळे टिंबांच्या चिन्हांनी दाखविली आहेत.

प्रस्तुत रोजनिशीचे काम करताना मला अनेक वडिलधा-या व्यक्तींचे, मित्रांचे तसेच अपरिचितांचेही बहुमोल साह्य झाले याचा मी कृतज्ञतापूर्वक निर्देश करू इच्छितो. माझे सासरे श्री. प्रतापराव शिंदे यांनी अत्यंत विश्वासाने व आत्मीयतेने म. शिंद्यांचे हे साहित्य माझ्या हवाली केले. प्रा. वा. ल. कुळकर्णी, प्रा. मे. पुं. रेगे, आमदार श्री. पी. बी. साळुंखे, प्रा. म. वा. धोंड, डॉ. सुधीर रसाळ व डॉ. विद्याधर पुंडलिक यांनी ह्या कामाबद्दल आस्था दाखवून अनेक उपयुक्त सूचना केल्या. प्रत्यक्ष भेटीत वा पत्रद्वारे माहिती पुरविण्याच्या कामी अनेकांनी मदत केली. कोल्हापूरच्या श्रीमती सुशिलाबाई मोहिते, सौ. शकुंतलाबाई जमदग्नी, श्री. नानासाहेब सूर्यवंशी, डॉ. वि. बा. घुगे; जमखंडीचे श्री. विष्णू ऊर्फ बाबूराव दामोदर हुल्याळकर, डॉ. दामुअण्णा हुल्याळकर, श्री. बाळासाहेब अनिखिंडी; तेरदाळचे श्री. भाऊराव देशपांडे; अहमदनगरचे श्री. द. बा. डावरे; विजापूरचे पद्मश्री काकासाहेब कारखानीस; पुण्याचे श्री. गणपतराव शिंदे, श्री. बाबूराव जगताप, श्री. केशव नरहर कानिटकर, श्री. का. य. भांडारकर, श्री. ग. ह. खरे, म. म. दत्तो वामन पोतदार, श्री. म. श्री. दीक्षित, श्री. विश्वनाथ कृष्णराव भट, श्री. केशव गणपतराव शिंदे, श्री. द. ब. माडीवाले, श्री. हरिभाऊ जोशी, श्रीमती कमलाबाई भागवत; पुणे विद्यापीठातील प्रा. अरविंद महादेव देशपांडे, डॉ. एस्. आर्. साळकर; मुंबई विद्यापीठातील प्रा. जे. व्ही. नाईक; औरंगाबाद येथील श्री. मोतीलाल हिराचंद गांधी, बिशप अँब्रिओ, प्रा. रियाज फारूकी, प्रा. गंगाधर पानतावणे या मंडळींनी मला आवश्यक ती माहिती पुरविली. डॉ. सुधाकर चांदजकर व श्री. अरविंद कुरुंदकर यांनी मुद्रणप्रत तयार करण्याच्या कामी साह्य केले. या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. श्रीमती लक्ष्मीबाई शिंदे, श्री. अशोक शिंदे, श्री. दिलीप शिंदे, सौ. उमा शिंदे व सौ. सुजाता पवार ह्या कुटुंबीय मंडळीचे सर्व प्रकारे साह्य झाले याचा निर्देश करणे मला आवश्यक वाटते.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाने या पुस्तकाच्या प्रकाशनार्थ अनुदान दिले. याबद्दल मंडळाचा व मंडळाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा मी आभारी आहे.

या पुस्तकाचे मुद्रण श्री. सर्जेराव घोरपडे यांनी आपल्या व्यावसायिक नैतिकतेला धरून सुरेख, दक्षतापूर्वक तसेच स्नेहभावाने केले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

महर्षींचे चिरंजीव श्री. प्रतापराव व श्री. रवींद्रराव यांना वडिलांच्या साहित्याबद्दल फार आस्था होती. हे पुस्तक पाहण्यास ते आज जीवित नाहीत याची मला फार खंत वाटते.

शेवटी वाचकांना विनंती ही, की म. शिंदे यांच्या अभ्यासास उपयोगी पडू शकेल अशी माहिती कोणाकडे असली तर ती त्यांनी मला कळवावी. मी त्यांचा आभारी होईन.

गो. मा. पवार
मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद