इंग्लंडमधील रोजनिशी- टिपा

१. बाबण बापू कोरगावकर (१८७७-१३ मे १९५२). मुंबई विद्यापीठात अकौंटंट म्हणून नोकरी. मुंबई प्रार्थनासमाजाचे निष्ठावंत कार्यकर्ते. सेक्रेटरी, खजिनदार, ऑडिटर, प्रेसिंडेंट, ट्रस्टी इ. पदांवर काम केले. १८९१ मध्ये मुंबईस अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली. "पूर्वी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने बाबांचे घरी सामाजिक मेळे भरविले जाईत. तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्याकरिता जाणारे प्रमोथलाल सेन, हेमचंद्र सरकार, मोती बुलासा, अण्णासाहेब शिंदे, डॉ. सुखटणकर इत्यादिकांना निरोप देण्याकरिता व त्यांचे शुभ चिंतण्याकरिता त्यांचे घरी मेळे भरले आहेत." (बी. बी. केसकर, बाबण बापू कोरगावकर, मुंबई, रावसाहेब वामन सदाशिव सोहोनी, १९४३, पृ. ६०).

२. एकनाथ हे म. शिंदे यांचे धाकटे बंधू. जन्म १८८५. काही काळ डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या उद्योगशाळेत शिक्षकाची नोकरी. नंतर मुंबईस बर्माशेलमध्ये. चित्रकलेची आवड होती. मृत्यु १९४६.

३. ह्या रामतीर्थकरांची माहिती मिळू शकली नाहीं. हे कदाचित विजापूरच्या रामतीर्थकर कुटुंबापैकी कोणी असतील असे उगारचे श्री. श्री. अ. रामतीर्थकर ह्यांनी सुचविले.

४. द्वारकानाथ गोविंद वैद्य (१८७७-२९ फेब्रु. १९४०). प्रार्थनासमाजाचे निष्ठावंत कार्यकर्ते. मुंबई विद्यापीठात नोकरी. सुबोध पत्रिकेचे साक्षेपी कष्टाळू संपादक. सुमारे ३५ वर्षे संपादन केले. `प्रार्थनासमाजाचा इतिहास,` `डॉ. भांडारकर यांचे चरित्र` ह्या पुस्तकांचे लेखक. डॉ. भांडारकर, न्या. रानडे यांच्या धर्मपर व्याख्यानांची पुस्तके संपादिली. सुबोध पत्रिकेतून ६०० पेक्षा जास्त लेख. `संसार व धर्मसाधन` ह्या बी. बी. केसकरसंपादित पुस्तकात बरेचसे लेखन समाविष्ट. अण्णासाहेब शिंदे यांचे स्नेही. मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारकपद १९१० मध्ये अण्णासाहेबांनी सोडल्यावर दोन वर्षे त्यांच्या कौटुंबिक खर्चाची जबाबदारी यांनी घेतली होती.


५. सदाशिव पांडुरंग केळकर (१८४८-२० डिसेंबर १९०६). शिक्षण मॅट्रिकपर्यंत. प्रथम पत्नी निवर्तल्यावर १८७८ मध्ये गतभर्तृकेशी पुनर्विवाह. स्वदेशीचे पुरस्कर्ते. स्वदेशी उद्योगास उपयोग व्हावा या उद्देशाने पॅरिसचे प्रदर्शन पाहून आले. मुंबई प्रार्थनासमाजाचे १८८२ ते १८९४ पर्यंत प्रचारक. काही काळ सुबोध पत्रिकेचे संपादन. ह्यांच्या मराठी वळणाच्या शैलीबद्दल म. शिंदे यांनी गौरवोद्गार काढले आहेत.


६. हे विश्वनाथपंत उर्फ दादासाहेब संत असावेत. पुणे प्रार्थनासमाजाचे चिटणीस होते.


७. शिवराम नारायण गोखले. पुणे प्रार्थनासमाजाचे १८९८ पासून प्रचारक. अत्यंत साधे, सच्छील म्हणून प्रसिद्ध. अण्णासाहेबांच्या बरोबर १९०४ मध्ये जमखंडीच्या दौ-यावर गेले होते.


८. दीनानाथ विष्णू माडगावकर (१८४७-७ जानेवारी १९१७). मुंबई प्रार्थनासमाजाशी प्रारंभीच्या काळापासून संबंधित. प्रथम थॉईस्टिक असोसिएशनचे चिटणीस, नंतर समाजाचे हिशेब तपासनीस, चिटणीस, उपाध्यक्ष म्हणून उत्तम काम. समाजाचे प्रार्थनासंगीताचे पुस्तक तयार करण्यात परिश्रम घेतले. न्या. मू. रानडे व डॉ. भांडारकर यांची व्याख्याने उतरून घेतली. तुकारामाच्या अभंगांचा आस्थापूर्वक अभ्यास.


९. डॉ. वासुदेव अनंत सुखटणकर मूळ कोल्हापूरचे. अण्णासाहेबांचे पुण्यापासूनचे स्नेही. त्यांच्याबरोबरच प्रार्थनासमाजाकडे आकृष्ट होऊन दीक्षा घेतली. इंग्लंडला धर्मविषयक शिक्षण घेतल्यावर जर्मनीत तत्त्वज्ञानाची पीएच्. डी. पदवी संपादली. परत आल्यावर मुंबई प्रार्थनासमाजात १९०८-९ हे एकच वर्ष धर्मप्रचारक म्हणून काम. नंतरच्या काळात प्रामुख्याने वास्तव्य इंदूरमध्ये. तेथील होळकर कॉलेजात प्राध्यापक. अहल्याश्रमाचे संस्थापक व संचालक. भारतवर्षीय ब्राह्मसमाजाचे अनेक वर्षे कार्य केले.


१०. हे पत्र `जलप्रवास` ह्या शीर्षकाखाली सुबोध पत्रिकेत प्रसिद्ध. म. शिंदे यांच्या `लेख, व्याख्याने व उपदेश` ह्या पुस्तकात संगृहीत पृ. १ ते ९.


११. येथे नमूद केलेले अरबी शब्दाचे अर्थ बरोबर आहेत. त्यांचा उच्चार अरबी भाषेत `बाबुलमांदेब` असा केला जातो.


१२. कुलजुम् असा अरबीमध्ये उच्चार केला जातो. तांबडा समुद्र ह्या अर्थी बेहरे कुलजुम् अशा शब्दाचा उपयोग करतात. (ह्या दोन्ही टीपांतील माहिती : प्रा. रियाज फारूकी, औरंगाबाद).


१३. ह्या तारखेच्या सुमारास म. शिंदे आपल्या सर्व रोजनिशा चाळून पाहात होते असे दिसते. ७ सें. मी. x   १३ सें. मी. आकाराची दुसरी एक छोटी रोजनिशी इंग्लंडच्या प्रवासात त्यांनी बरोबर नेली होती. तीत अगदी छोटी टिपणे तारीखवार प्रारंभी केलेली आहेत. त्या रोजनिशीचा उपयोग त्यांनी ही मोठी रोजनिशी लिहिताना केला. त्या डायरीवरूनच प्रस्तुत मोठ्या रोजनिशीत खालील मजकूर उतरून काढला आहे. ह्या छोट्या डायरीत इंग्लंडमधील वास्तव्यात क्वचित वर्गातील वा स्वतःची टिपणे, कोडी, काव्यपंक्ती असा मजकूर लिहिलेला आढळतो.

 


१४. हे देऊळ व ते पाहून सुचलेले विचार ह्यावर लेख सुबोध पत्रिकेस २९-११-१९०१ रोजी ऑक्सफर्डहून पाठविला. (लेख, व्याख्याने व उपदेश, उनि., पृ. १३-१५).


१५. रोमेशचंद्र दत्त (१८४८-१९०९). बंगालमधील प्रारंभीचे आय. सी. एस. अधिकारी, थोर अभ्यासक, राष्ट्रसभेचे अध्यक्ष (१८९९). इतिहास, काव्य, कादंब-या यांचे लेखन इंग्रजी व बंगालीमधून. निर्भीड व स्वतंत्र वृत्तीचे अधिकारी. इतिहासाचा दांडगा व्यासंग. आय. सी. एस. अधिकारी म्हणून १८९७ मध्ये निवृत्त झाल्यानंतर १९०४ पर्यंत लंडन विद्यापीठात भारतीय इतिहासाचे प्राध्यापक. ह्या वास्तव्यकालातच म. शिंदे त्यांजकडे गेले होते. म. शिंदे यांच्या छोट्या डायरीत ७ ऑक्टोबर १९०१ ला पुढील नोंद आहे. "लंडन येथे पोचलो. ८२ नं. टालबट रोड बेजवाटर येथे उतरलो. ते हवा पालटण्याकरता बाहेरगावी गेले होते म्हणून त्यांच्याच खोलीत मी होतो."


१६. इंग्लंडच्या ज्या युनिटेरियन समाजाच्या वतीने अण्णासाहेबांना स्कॉलरशिप मिळाली होती तिचे हे सेक्रेटरी.


१७. V. G. Chertcov हे टॉलस्टॉयच्या धर्मविचाराचा प्रभाव पडून त्यांचे कट्टर अनुयायी झाले. सैन्यातील अधिकाराची नोकरी व संपत्तीचा त्याग करून शेतक-यासारखे साधे जीवन जगू लागले. टॉलस्टॉयची पत्नी प्रारंभी यांच्याशी स्नेहभावाने वागत होती, परंतु आपला नवरा ह्यांच्या पूर्ण आहारी गेला ह्या समजुतीने उत्तर काळात मत्सराने वागली.


१८. डॉ. आनी बिझांट (१८४७-१९३३). सुप्रसिद्ध तत्त्ववेत्त्या, वक्त्या व थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष (१९०७-३३). इंग्लंडच्या राजकारणात व समाजकारणामध्ये १८७३ ते १८९३ भाग. साक्षात्कारावर विश्वास बसून थिऑसॉफिस्ट बनल्या व १८९३ मध्ये भारतात आल्या. मॅडम ब्लॅव्हॅट्स्कीनंतर थिऑसॉफीच्या प्रमुख बनल्या. यांनी ३३० पुस्तके लिहिली. भारताच्या राजकारणात, सामाजिक कार्यातही भाग. १९१७ साली राष्ट्रसभेचे अध्यक्षपद. म. शिंदे यांच्या कार्याचा यांना परिचय होता व सहानुभूती होती. शिंद्यांच्या प्रेरणेने १९१७ च्या राष्ट्रसभेत अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर.


१९. चित्रे काढण्याची म. शिंदे यांना हौस होती असे दिसते. प्रस्तुत रोजनिशीतही दोन चित्रे आहेत; एक पवनचक्कीचे ता. ७ जानेवारी १९०३ च्या रोजनिशीत आहे; व दुसरे आगगाडीच्या पुलाचे (पृ. १२२).


२०. शामराव गाइकवाड यांच्यासंबंधी माहिती मिळू शकली नाही.

२१. `मार्सेय शहर`, लेख, व्याख्याने व उपदेश, उनि., पृ.१२-१३.

२२. रोमच्या पोपच्या प्रभुत्वापासून फुटून निघालेला पंथ. धर्मगुरू नेमण्याचा पोपचा अधिकार झुगारला. १७६९ मध्ये फिलाडेल्फिया येथे मेळावा भरून प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च हे नाव, स्वतंत्र घटना सिद्ध. अमेरिकेत या पंथाचा पुष्कळ प्रसार झाला.

२३. ह्या टोयोसाकीचे आकर्षक व्यक्तिचित्र म. शिंदे यांनी `माझ्या आठवणी व अनुभव (पृ. १२४)` ह्या पुस्तकात रेखाटले आहे. १९०३ मध्ये एम्स्टरडॅम येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषदेत झेनोसुके टोयोसाकी ह्यांनी जपानी प्रतिनिधी म्हणून भाग घेऊन निबंध वाचला. म. शिंदे यांनी १९१२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या `थीइस्टिक डिरेक्टरी` ह्या पुस्तकातील `लिबरल रिलिजन इन जपान` ह्या प्रकरणासाठी म. शिंदे यांना साहित्य पुरविल्याचे दिसते.

२४. रेव्हरंड चार्ल्स व्हायसे (१८२८-१९१२). १८५२ पासून लंडनमध्ये धर्मोपदेशक. नंतर विचारात फरक. बायबलमधील देवविषयक विचार चुकीचा आहे असे १८६५ पासून प्रतिपादन करू लागले, म्हणून नोकरीवरून काढले. १८८० मध्ये थीइस्टिक चर्च स्थापन करून स्वतंत्र विचाराचे प्रतिपादन. युनिटेरियन लोक येशूला आपला मार्गदर्शक मानतात हे त्यांना मान्य नव्हते, कारण तोही निर्दोष नव्हता असे त्यांचे मत.

२५. राजाराम पानवलकर यांची माहिती पुष्कळ प्रयत्न करूनही मिळाली नाही.