इंग्लंडमधील रोजनिशी (ता. ११ सप्टेंबर १९०३)

ता. ११ सप्टे. ०३. सकाळी ११ वाजता लूसर्न सोडून सायंकाळी जिनोव्हा येथे पोचलो. इतालीतील.

ता. १२. जिनोव्हातील कॅपो सँक्टो नावाचे अत्यंत विस्तीर्ण व सुंदर स्मशान पाहिले. येथील पुतळे अवर्णनीय आहेत. नंतर ५ दिवस सुमारे रोम येथील स्थळे पाहिली.

ता. १५ रविवार सप्टें. ०३. व्हॅटिकन येथील प्रसिद्ध चित्रे पाहिली. पोप पायसचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. भक्त त्याचे चरणाचे चुंबन घेत. मी नुसती आंगठी (हातावरील) चुंबली. सुमारे १८ शुक्रवारी नेपल्सला पोचलो.

ता. १९ शनिवारी पाँपी शहराचे जुने अवशेष पाहिले.

ता. २१ सप्टे. ०३ सोमवारी नेपल्सहून रुबातीनो बोटीने हिंदुस्थानाला निघालो.

ता. ६ आक्टो. ०३. मुंबईस पोचलो.

अँमस्टर्डाम (हॉलंड)
हॉलंडमधून जर्मनीत कॉन उर्फ कलोन शहरी पोचल्यावर दुस-या दिवशी खालील हकीकत लिहिली आहे.७४
Hotel Ewige Lampe
(Antonetty) and
Hotel de l' Europe
Koln
Besitzer – P. Urban

६ सप्टेंबर १९०३
ता. ४ सप्टेंबर १९०३ शुक्रवारी आमस्टर्डाम येथून, व्होलंदाम् नावाच्या एका जुन्या चालीच्या खेड्यास निघालो. बरोबर सुमारे २०० मंडळी इंटरनॅशनल लिबरल रिलिजस काँग्रेसची होती. आणि पाहुण्यांची व्यवस्था ठेवण्यास डच मंडळीही सर्व आली होती. १२।। वाजता दोन प्रहरी निघून सुमारे दोन वाजता व्होलंदाम् येथे पोचलो. हे खेडे समुद्रकाठी एका डाइकच्या आश्रयाखाली आहे. समुद्रसपाटीपेक्षा ह्या खेड्याची सपाटी ४।५ फूट तरी खाली असावी ! आमची इतकी गर्दी पाहण्यासाठी खेड्यातील सर्व माणसे मुलालेकरांना घेऊन दाराबाहेर उभी होती. डच लोकाची स्वच्छतेसंबंधी मोठी ख्याती आहे. त्याप्रमाणे दोन प्रहरी घरे धुण्याचे काम चालले होते. आम्ही कित्येक घरांत शिरून त्यांच्या चुली आणि निजावयाच्या जागा वगैरे पाहिल्या. साधेपणा, स्वच्छपणा आणि टापटीप पाहून आनंद झाला. ह्या लोकांच्या पायात ओबडधोबड लाकडी जोडे होते. घरात शिरताना ते आपले जोडे बाहेर ठेवीत. आम्हांला बुटांसह आत जाण्याला लाज वाटू लागली. तरी आम्हांला आत जाण्याला हे लोक खुशीने परवानगी देत. धक्क्यावरून एक दोन मैलावर आम्ही हिंडलो. एडाम ह्या खेड्यात आम्ही आगगाडीतून उतरल्यावर व्होलंदाम् ह्या खेड्यापर्यंत सुमारे २ मैल एका कालव्यातून जुन्या चालीच्या बोटीतून आम्हांपैकी काहीजण निघालो. ह्या बोटींना एक मोठा लांब लाकडी दांडा, त्यास खांदा देऊन माणसे बोटी पुढे ढकलीत असत. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत इकडे तिकडे हिंडल्यावर आगबोटीतून ७।। वाजता आम्ही आमस्टर्डाम येथे पोचलो. अशा रीतीने अगदी आनंदाने आमस्टर्डाम येथील परिषदेचा शेवट झाला.

नेपल्सजवळील पाँपीला भेट
ता. १९ सप्टेंबर १९०३ शनिवारी व्हेसूव्हियस ज्वालामुखीने नष्ट झालेले पाँपी शहर उकरून काढलेले जुने अवशेष पाहिले. माझे फर्ग्युसन कॉलेजमधले रोमच्या इतिहासाचे सर्व अध्ययन ह्या ठिकाणी आठवून आनंदाचे शहारे अंगावर आले. रस्ते बळकट फरसबंदीचे होते. त्यावर खटा-याची खोल चाकोरी दिसली. काही रस्ते अगदी अरुंद दिसले. काहींवर उंच पायरस्ते दिसले. एका चार चौरस फूट दगडावर उठावदार कोरलेले एक चित्र पाहिले. त्यात एक वर्तुळाकार आकाराभोवती एक सापाने विळखा दिला आहे असे हे कोरीव चित्र होते. ह्यावरून तेथे सर्पपूजा होती काय ? दारूची दुकाने व दारू ठेवण्याच्या रांजणावर शिंपा लावून नकशी केली होती. लोक मेण्यांत बसून जात होते, असे देखावे दिसले. कोंबड्यांची झुंझ, नरमेध वगैरे चित्रावरून दिसतात. एका घराच्या दिवाणखान्याचा तांबडा लाखेचा रंग अगदी ताजा दिसला. शेवटी रोमन लोकांची नीती फार बिघडली असे इतिहास सांगतो. मी तर ह्या घराच्या भिंतीवर अंतर्गुहात फार बीभत्स चित्रे स्पष्ट पाहिली. येथे बायकाशीच नव्हे तर पुरुषाशीदेखील सृष्टीविरूद्ध मैथुनकर्म केल्याची स्पष्ट चित्रे आहेत. येथील संग्रहालयात उकरून काढलेल्या १५ मानवी सांगाड्याच्या प्रतिकृती हुबेहुबे प्लेस्टर ऑफ पॅरीसच्या ठेवल्या आहेत. जेव्हा व्हेसुव्हिएसच्या राखेत हे शहर एकदम दडपले गेले, तेव्हा जी माणसे ज्या स्थितीत दडपली गेली, त्याच स्थितीचा हुबेहुब देखावा ह्या सांगाड्याने व पुतळ्याने स्पष्ट दिसत आहे. एक गरोदर बाई उलथी पडलेली, दोन दुस-या बाया पालथ्या पडलेल्या (आई व तिची मुलगी), एक तरुण मुलगी व तिच्या डाव्या हातावरील करांगुलीवरील सुंदर आंगठी, नार्सिस व मदनाचे सुंदर भिंतीवरील चित्र, वगैरे फार प्रेक्षणीय आहेत. भाकर, कपडे, निराळी धान्ये भाजून (भाजलेली) काळवंडलेल्या स्थितीत पाहण्यासाठी ठेविली आहेत. दाराजवळ एक कुत्रे दडपून मेलेले उलथे पडलेले दिसते. त्याच्या गळ्यातील पट्टा आणि साखळी ही जशीच्या तशीच दिसते. रांजण, हौद वगैरे दगडामातीच्या घरगुती वस्तू पाहून तसेच विस्तीर्ण बाजाराचे चौक, अर्धवर्तुळाकार मंडई, सार्वजनिक व्याख्यानाच्या जागा, भव्य जोती वगैरे पाहून तत्कालीन कौटुंबिक व सामाजिक स्थिती अजमावण्याची साधने दिसतात.

ही हकीकत ता. १९ सप्टें. ०३ च्या रोजनिशीचे पान शिशपेन्सलीने लिहिलेले जसेचे तसेच उतरून तयार केली असे.७५
वि. रा. शिंदे, पुणे ता. २४ मार्च १९२६

पुरवणी७६
ही रोजनिशी माझे मुख्यतः १९०१-०३ इ.स. ह्या वर्षी परदेशात माझे जे निरीक्षण व शिक्षण झाले त्या विषयीच आहे. मी इंग्लंडास केवळ धर्माचे मँचेस्टर कॉलेज (ऑक्सफर्ड) येथे पुस्तकी शिक्षण घेण्याकरिता गेलो नव्हतो. मुख्यतः तुलनात्मक पद्धतीने जगातील सर्व धर्माचा इतिहास ऊर्फ विकासाचे अवलोकन करून स्वतःची धर्मबुद्धी विशद करून धर्मप्रचाराची तयारी करणे हा तर मुख्य, पण एक हेतू. शिवाय युरोपातील काही प्रमुख देशांतील चालीरीती पाहव्या, वाङ्मय वाचावे, पंडित आणि सज्जनाच्या भेटी घ्याव्या, नव्याजुन्या संस्थांची वाढ पाहावी, निराळ्या वर्गांची-विशेषतः खालच्या व चिरडलेल्या वर्गांची अंतस्थ स्थिती निरखावी, त्यांच्यात रहावे, सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळे पाहावीत इ. दुसरेही हेतू होते.

मँचेस्टर कॉलेज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जरी सामील नव्हते तरी त्याचा अध्ययनाचा व अनध्यायाचा काळ इतर कॉलेजप्रमाणे नियमित केला होता. तो साधारपणे असा. पहिली टर्म आक्टोबर मध्यापासून तो दिशंबर मध्यापर्यंत ८।९ आठवड्याची, नंतर नाताळाची सुट्टी चार आठवडे. दुसरी टर्म जानेवारी मध्यापासून तो मार्च मध्यापर्यंत आठ आठवडे व नंतर ईस्टरची सुट्टी सहा आठवडे. तिसरी टर्म मेच्या सुरवातीपासून जवळ जवळ जून अखेर. नंतर उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी सप्टेंबरअखेर.

मी ऑक्सफर्ड येथे दोन वर्षे होतो. त्या काळात ६ टर्मस् व सहा सुट्या पडल्या. पहिली सुटी मी लंडनमध्ये घालविली. ती नाताळची होती. तिसरी सुट्टी इंग्लिश व स्कॉच लेक डिस्ट्रिक्टस् मध्ये पर्वतशिखरे व सरोवरप्रांत हिंडून पाहण्यात घालविली. पैकी १५ दिवस बॉरोडेल दरीत लीथ कॉटेजमध्ये प्रो. कार्पेंटरसो. चा मी पाहुणा होतो. चौथी सुट्टी नाताळची मी ऑक्सफर्डमध्येच घालविली. पाचवी मी कॉर्नवालमध्ये बस्टनहॅम वगैरेमध्ये घालविली. पैकी १५ दिवस पोल्ट्रनी येथे माझे मित्र मिस्टर व मिस् कॉककडे मी पाहुणा होतो. शेवटी सुट्टीला मी हॉलंड देशात सर्वराष्ट्रीय धार्मिक परिषद अँमस्टर्डम येथे भरली तेथे हिंदुस्थानचा प्रतिनिधी म्हणून गेलो. नंतर जर्मनी, स्विट्झर्लंड, इताली वगैरे देश पाहिले व स्वदेशी आलो. लुसर्न (आल्पस्), कोलोनचे कॅथिड्रल; व जिनोवा, नेपल्स ही शहरे पाहिली. व रूबातिनो बोटीने मुंबईस आलो.

माझ्या दोन वर्षांच्या प्रवासात मी इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, हॉलंड, जर्मनी, स्विट्झर्लंड, इताली हे सात देश थोडे बहुत पाहिले. एकंदरीत इंग्लिश लोक बरे दिसले. फ्रेंच अधिक उल्हासी व इतालीयन मात्र हिंदू लोकाप्रमाणे मेकॉलेने म्हटल्याप्रमाणे किंचित मनातून उतरतात. हा कॅथोलिक पंथाचा प्रभाव ? आल्पस पर्वत व -हाईन नदी प्रशस्त व रमणीय दिसली. इंग्लंडमध्ये विशाल असा देखावाच नाही. सर्व लहान प्रमाणावर व साधे व नयनमनोहर आहे. लोक घुम्मे पण व्यावहारिक शहाणे दिसले. श्रीमंती व दारिद्र्य हे सारखेच मिसलळेले होते तरी संतोष व शांती ह्या चिमुकल्या बेटात मूर्तिमंत दिसल्या. दारूचे व्यसन आणि लैंग्य व्यभिचार शहरामध्ये बोकाळला आहे. पण खेडी व राने शुद्ध आहेत. शेती खालावत आहे. भावी नाशाची चिन्हे अद्याप स्पष्ट दिसत नाहीत, पण साम्राज्याच्या पापाचा परिणाम भोगल्याविना सुटका नाही हे येथील बहिर्मुखी मुत्सद्यांना दिसेल तेव्हा खरे.

ख्रिस्ती धर्माचा पगडा अद्यापि सुरक्षित ह्याच बेटात आहे. मात्र तो संभावित स्वरूपातच विशेष आहे. परोपकाराची कामे मागे पडून संभावित धर्मच पोसला जात आहे. ह्या म्हणण्याला मुक्तीफौजही अपवाद नाही !

लैंगिक नीतीचा बोभाटा पारिस व फ्रेंच हद्दीवरील शहरांतून फार आहे. तरी पण इतर देशांतील, विशेषतः अमेरिकेतील, खुशालचेंडूच ह्या बोभाट्याला अधिक कारण आहे. खुद्द फ्रेंच राष्ट्र कॅथोलिक पेचातून सुटले नाही तरी वरपंगी स्वातंत्र्याच्या मोहाला बळी पडत आहे. मला आयर्लंड व रशीया व ग्रीस हे तीन (देश) पाहावयाला मिळाले असते तर बरे झाले असते. रशियातील कौंट टॉल्स्टायचे पट्टशिष्य चर्टकॉफ हे एकदा मँचेस्टर कॉलेजमध्ये मार्टिनो क्लबमध्ये व्याख्यान द्यावयाला आले होते. त्यांची मी खासगी भेट घेतली तेव्हा भावी युद्धाचे व रशियन क्रांतीचे मला स्वप्नही पडले नव्हते. तरीपण युरोपियन संस्कृतीच्या पोकळपणाचा मला जवळ जवळ वीट आला होता. "जनातून वनात व परत" ह्या माझ्या प्रसिद्ध लेखात माझा येविशी उद्गार काळजातून निघाला आहे.

हिंदुस्थानला शिकण्यासारखे युरोपात अद्यापि पुष्कळ आहे ते हिंदुस्थान शिकत आहेच, पण स्वतः युरोपला शिकण्यासारखे हिंदुस्थानात अझुनी बरेच आहे. ते मात्र स्वतः हिंदुस्थानच विसरत चालला आहे. मग यूरोप कोठून शिकणार !