येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी-शुक्रवार ता. २२ ऑगष्ट १९३०

शुक्रवार ता. २२ ऑगष्ट १९३०
आज माझी नात चि. प्रतापाची पहिली मुलगी जन्मून दोन महिने झाले म्हणून मी तिचेसाठी प्रार्थना केली. तिचे मी विनोदाने तुरुंगी हे नाव ठेविले आहे. ती सुखी असो !!

शनिवार ता.२३ ऑगष्ट १९३०
आज सायंकाळी प्रतापराव मला भेटावयाला आला. बरोबर माधवराव केळकर१८, गोविंदराव शासने आले. विशेषतः मला अत्यंत आवडणा-या अहल्याबाई शिंदे ह्या आलेल्या पाहून मला गहीवर आला. चि. केशव१९, हिरू व शिवाजी ह्यांना त्यांनी आणले होते. पण त्यांना आत मजपर्यंत येण्याची परवानगी मिळाली नाही! कारण चारच माणसे एका भेटीत भेटू शकतात. मी दारात उभा राहून ह्या लहानग्यांना पाहू शकलो असतो व तीही मला पाहू शकली असती. पण ब-याच गोष्टी बोलावयाच्या होत्या. २० मिनिटे संपली म्हणून जेलर मि. एमीने तगादा चालविला. गर्दीत मुले बाहेर मोटारीत तशईच राहिली !

अहल्याबाई ऊर्फ मैनाबाई साळुंखे ह्यांना मी ता. २० ऑगष्ट रोजी रोजनिशीत काय त्यांचेसंबंधी लिहिले ते गर्दीत एक दोन वाक्यांत सांगीतले. ते त्यांना समजलेही नसेल. गणपतरावही आले असते तर किती बरे!

मला ता. १२ मे १९३० रोजी पकडले व त्याच रोजी संध्याकाळी ह्या तुरुंगात आणिले. त्याचे आदले दिवशी रविवारी मी शिवाजी शाळेत कौटुंबिक उपासना चालविली. रा. गणपतराव शिंदे त्याच दिवशी मुंबईस गेले होते, पण अहल्याबाई आल्या होत्या. संध्याकाळपर्यंत आमचे घरी राहिल्या. जाताना त्या मजकडे आल्या व नमस्कार करून "ह्यावर आता भेट केव्हा" हा अर्थपूर्ण प्रश्न केला. मला पकडण्याची गावात दाट वदंता होती. म्हणून पुनः भेटीचा हा प्रश्न होता की काय, त्यावेळी कळले नाही. पण दुसरेच दिवशी मला पकडले ! मी रविवारी सायंकाळी कोणास भेटावयास, फार थकल्यामुळे, कोठे गेलो नाही. गणपतरावांची भेट झालीच नाही.

वरील प्रसंगाचे स्मरण आज अहल्याबाईंना दिले. व विनोदाने म्हटले, अहल्याबाई मला तुमचा शाप बाधला काय? त्या पदराने डोळे पुसू लागल्या, तेव्हा मी विषय बदलला ! त्यांचे मैनाबाई हे नाव सांगावयास विसरलो. तरी तुरुंगीपासून सर्वांचा समाचार घेतला. माईची प्रकृती Aminic म्हणजे रक्ताचा कमी साठ्याची बाधा ऐकून काळजी वाटू लागली. असो. एकंदरीत अशा घरच्या भेटीमुळे सुखापेक्षा हुरहुरच फार वाटते. बहुतेक रात्री पुढे जागरणच होते ! सुखगर्भी दुःख व दुःखगर्भी सुख ह्याचे रहस्य ते हेच!!


रविवार ता. २४ ऑगष्ट १९३०
दर पंधरावड्याचे आमचे वजन करण्यात आले. मागील पंधरावड्याप्रमाणे आजही माझे वजन १४४ पौंडच भरले. कमी जास्त काही नाही.

आम्हाला तुरुंगात Illustrated Weekly of India हे एकच इंग्रजी चित्राचे साप्ताहिक मिळते. राजकीय मजकूर नसतोच म्हटले तरी चालेल. जी काही थोडी शनिवारची बातमी असते तिचेसाठी आम्ही आठवडाभर लाळ घोटीत टक लावून बसले असतो. चालू धर्मयुद्धाचा काही समेट झाल्याची बातमी आज मिळेल अशी आशा होती. पण अद्यापी काहीच निकाल कळत नाही असे वाचून निराशा झाली! तुरुंगवासापेक्षा आशेच्या व अपेक्षेच्या वेदना असह्य झाल्या आहेत. सुटकेचे दिवस जसे जसे जवळ येतात तशा ह्या वेदना तीव्र होऊ लागल्या आहेत
!ह्यामुळेच वजन कमी होत आहे !!


सोमवार ता. २५ ऑगष्ट १९३०
काल तिसरे प्रहरी माझ्या उजवीकडच्या ओटीत जांघेवरच्या पोटाच्या खालच्या भागात थोडेसे दुखल्यासारखे होऊ लागले. आज सकाळपासून ही कळ जास्त भासू लागली आहे. चालताना थोडे लंगडावे लागते. आज तिसरे प्रहरी वृषणाची उजवी गोटी सुजून बरीच मोठी झालेली आढळली. हात लावल्यावर उजवीकडे दुखते. उद्या बरे वाटले नाही तर डॉक्टरला कळवावे लागेल.

मंगळवार ता. २६ ऑगष्ट १९३०
सकाळी कॅथॉलिक उपासनेला गेलो.
रफ् नोट बुक पान ८ वर तेरदाळ देशपांडेकडून आलेले दोन गहाणखत, १ चंद्राबाई भ्रतार सिदरामप्पा पाटील २ कृष्णाबाई मंगसुळी ह्यांनी लिहून दिले ते व सोबतचे पाच कागद ह्यांचा तपशील लिहिला असे. अनुक्रमे २००० रू. व ३००० रू.

बुधवार ता. २७ ऑगष्ट १९३० गणेशचतुर्थी
आज अर्धा दिवस सुटी होती. म्हणजे आम्हाला १२ वाजेपर्यंत काम दिले. २।। वाजता जेवण मिळाले. ३ वाजण्याचे पूर्वीच खोलीत कोंडिले.
आज डॉक्टरास प्रकृती दाखविली. त्यांनी नित्याचे औषधात बदल केला. ओटीत जी कळ येत होती ती आज किंचित बरी आहे.

ता. २१ जुलै पासून "माझ्या आयुष्यातील आठवणी आणि अनुभव" हा विस्तृत लेख लिहावयास सुरुवात केली. आजपावेतो सुमारे २०० पाने झाली आहेत. आज थोडी प्रस्तावना लिहिली. ह्याचप्रमाणावर जर लिहीन तर हा ग्रंथ १००० पानावर जाईल.


मी इंग्रजी शाळेत असताना वाचलेले ग्रंथ :

धर्म - पांडवप्रताप, रामविजय, हरिवि., गुरुचरित्र, करवीरमाहात्म्य, शिवलीलामृत, शनिमाहात्म्य, व्यंकटेशस्तोत्र, गयासुरआख्यान, एकनाथी भागवत, नवनीत.
कादंब-या - मंजुघोषा, विचित्रपुरी, मदनमंजरी, शृंगारसुंदरी, वसंतकोकिळा, वेशधारी पंजाबी, वेताळपंचविशी, शुकबहात्तरी, बत्तिसपुतळी, अरबी नाइट्स, पंचतंत्र, नारायणराव आणि गोदावरी.
संभाजीचरित्र वाचले, पण शिवाजीचरित्र त्यावेळी झाले नव्हते !

गुरुवार ता. २८ ऑगष्ट १९३०
आज सुपरिंटेंडंटची साप्ताहिक तपासणी झाली. माझ्या हिस्टरी टिकेटमध्ये ता. २१ सपटंबर १९३० ही तारीख माझ्या सुटकेची संभवनीय तारीख म्हणून लिहिले आहे. हे टिकेट म्हणजे आमच्या तुरुंगातल्या हालहवालीचे तारीखवार दाखल्याचे छापील पुस्तक असते. आज मी सुपरिंटेंडंटना ह्यावरील तारिखेदिवशी खरेच माझी सुटका होईल काय, विचारले. ते म्हणाले, माझी सुटका ऑक्टोबरच्या मध्याला होईल. सक्तमजूरीच्या कैद्याला दर महिन्याला ४ दिवस माफी असते. नवंबर २१ तारिखेस माझे सहा महिने भरतात. ह्यांतून २४ दिवस वजा करता ता. १८ ऑक्टोबर १९३० ला माझी सुटका व्हावयाला पाहिजे. त्याप्रमाणे हिशेब करून सुपरिंटेंडंटने सांगितले असावे. पण वरील पुस्तकात उगाच २ महिन्याची माफी का लिहिली ते कळत नाही.

दर शनिवारी आम्हाला एकत्र उपासना करावयाला परवानगी असावी असे मी मि. रॉजर्सना विचारले तर ती मिळत नाही असे जेलरकडून कळले.


शुक्रवार ता. २९ ऑगष्ट १९३०
माझी धार्मिक वर्तमानपत्रे मला वेळेवर पोचत नाहीत. ४ पैकी २ तर मुळीच पोचत नाहीत. रात्रीचा दिवा ९।। पर्यंत असावयास पाहिजे तो नऊलाच बंद होतो, वगैरे तक्रारी पुष्कळ करून काही इलाज होत नाही, म्हणून मि. रॉजर्स (ची) बरीच कानउघाडणी केली. हा लास्ट जेलर आहे. व बी क्लासची देखरेख ह्याच्याकडे आहे. म्हणून हा रोज आमचेकडे येत असतो. हा आयरिश मनुष्य आहे. ह्याला हिंदी शिकावयाचे आहे. मनुष्य साधाभोळा बरा आहे. ह्याचा माझा बराच परिचय झाला आहे. बराच वेळ माझ्याशी सलगीने बोलत उभा असतो. मी त्याला म्हटले, आमच्या कामाची तू इतकी चौकशी करतोस व तसदी लावतोस, पण आमच्या गरजांचा व तक्रारींचा विचार करीत नाहीस, हे काय? आमच्या तक्रारीला तू मान न देशील तर तुझ्या तक्रारीला आम्ही तरी का मानावे ? तो म्हणतो, अशा सर्व गोष्टी सुपरिंटेंडंटकडेच आहेत.

आज ह्या स्वारीने मला सांगितले की "विविधवृत्त" हे पत्र आमचे खर्चाने आम्हाला मिळण्याची परवानगी I. G. Inspector of Gaols तुरुंगाच्या मुख्य इन्स्पेक्टराकडून मिळाली आहे ! आम्ही येऊन ३।४ महिने झाल्यावर ह्या लहानशा गोष्टीची आता दाद लागते ! तुरुंगात दुप्पट तिप्पट कैद्यांची गर्दी झाल्याने अधिका-यांना काम फार पडते ही त्यांची कुरकुर असतेच. आजच मी विविधवृत्त पत्र माझ्या खर्चाने मिळावे अशी लेखी मागणी केली आहे.


ता. ३० शनिवार ऑगष्ट १९३०
मि. रॉजर्स म्हणतो की सुपरिंटेंडंटची माझ्या चिठीवर सही घेऊन मला विविधवृत्त पत्र मिळावयाला ४।६ (दिवस) तरी लागतील ! तुरुंगात चार पाच हजारावर कैदी झाल्याने रात्रदिवस काम पडते. आज कामाला काथ्या संपला आहे. जुनी तरटे उकलावयास दिली. त्यांत ढेकूण गच्च भरले होते.

ता. ३१ रविवार १९३० ऑगष्ट
आजचा आठवड्याचा टाईम्स वाचून समेटाची आशा आणखी वाटू लागली. गेल्या रविवारी निराशा झाली होती ! जयकरसप्रू मिशन व्हाईसरॉयचा बराच अनुकूल निरोप घेऊन काल आज नेहरूद्वयाला तुरुंगात भेटून लवकरच म. गांधींना पुनः भेटावयाला येथे येणार आहेत.