बंगालचीसफर

ब्राह्मधर्माची परिषद १८८९ साली प्रथम  मुंबईस भरल्यापासून एक दोन वर्षे खेरीज करून जरी सालोसाल दर काँग्रेसच्या वेळी भरत आली आहे, तरी तिजसंबंधी माहिती पुष्कळांना झालेली नव्हती. केवळ काँग्रेसकरिता आलेलेच लोक काय ते जमत व त्यांच्याही आठवणीत ती फार दिवस टिकत नसे. पण मुंबईस भरलेल्या १९०४ च्या परिषदेपासून हिची प्रसिद्धी होऊ लागली. ती काशी येथील परवाच्या परिषदेमुळे तर बरीच झाली. ह्या परिषदेत बंगाल्यातील दोन्ही पक्षांची परस्पर बरीच सहानुभूती वाढली व शिवाय निरनिराळ्या प्रांतांतील ब्राह्मांचा बराच स्नेह झाला. अशा हितकारक परिषदेची खबर अधिक पसरावी. मुंबईकडील कामाची हकीकत इकडच्या दूरदूरच्या समाजास कळवावी, (कारण प्रार्थनासमाज व आर्यसमाज यांतीलही भेद न जाणणारे काही ब्राह्म इकडे भेटले) काही प्रमुख सभासदांची प्रत्यक्ष ओळख करून घ्यावी, मुख्य मुख्य समाज समक्ष पहावे, शिवाय सर्व समाजांची एक डिरेक्टरी करावयाची आहे, त्याअर्थी काही माहिती स्वत: मिळवावी वगैरे हेतूने मी बंगाल व आसाम प्रांतांत फिरतीवर निघालो. ता. २ जानेवारी रात्री ११ वाजता मी......

बांकोपूर

बिहार प्रांतातील मुख्य शहर बांकीपूर येथे आलो. बांकीपूर, पाटणा व दिनापूर ही मोठमोठी शहरे एकमेकांला अगदी लगूनच भागीरथीच्या काठी आहेत. हा देश जरी बहारी (हिंदुस्थानी) लोकांचा, तरी येथे बंगाली लोकांची बरीच वस्ती आहे, व सरकारी नोक-या पटकावण्याच्या व विद्याव्यासंगाच्याबाबतीत ह्यांचा पुष्कळच पुढाकार आहे. अर्थात एतद्देशीय बहा-यास हे आवडत नाही, हे बंगाली जाणून आहेत. वायव्येकडील प्रांतात ज्याप्रमाणे एकही ब्राह्म एतद्देशीय सापडणे कठीण, त्याप्रमाणे सबंध बहार प्रांतातही बहारी ब्राह्मांची संख्या एकाच हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी आहे. पण ही उणीव केवळ ब्राह्मसमाजाचीच आहे असे नव्हे. स्त्रीशिक्षणासारख्या सर्वमान्य सामाजिक सुधारणेतही इकडे महागाई फार आहे. बांकीपूर येथे एक मुलींचे खासगी हायस्कूल आहे; ते मूळ बंगाल्यांनीच काढले. हल्ली एकंदर सुमारे १०० मुलींपैकी बहारी मुली ४ च आहेत. बाकीच्या बंगाली मुलींपैकी २४ ब्राह्मांच्या आहेत. सर्व स्त्री व पुरूषशिक्षक ब्राह्मच आहेत. ह्या शाळेची व्यवस्था बहुतेक येथील प्रमुख ब्राह्मांच्याच हाती आहे. ह्याचे श्रेय येथील वृद्ध पेन्शनर आचार्य बाबू प्रखाशचंद्र राय व विशेषेकरून त्यांची परलोकवासी पत्नी अघोरकामिनी ह्यांजकडे आहे. मध्ये एकदा ही शाळा मोडकळीस आली असता अघोरकामिनीने सर्व व्यवस्था आपल्याकडे घेतली व शाळा हायस्कूलच्या दर्जास आणून सोडिली. ब्राह्मसमाजाच्या दृष्टीने पाहता कलकत्त्याच्या खाली डाक्का व त्याचे खाली बांकीपूरचाच नंबर लागतो. येथे जरी दोन पक्षांचे हल्ली दोन समाज आहेत तरी परस्पर बरीच सहानुभूती आहे व ती वाढत्या कलेवर आहे. तथापि अगदीच भेद मिटून पूर्ण ऐक्य होण्याची नुसती आशादेखील तूर्त दिसत नाही. मात्र दोन्ही पक्षांकडून प्रामाणिकपणे यत्न होत आहे.

बांकीपूर ब्राह्मसमाज

हा नवविधान पक्षाचा आहे. हा सन १८६६ मे, ता. २४ दिवशी स्थापण्यात आला. ह्यापूर्वी एकदा केशवचंद्र ह्यांनी येथे येऊन एका व्याख्यानाने सर्व प्रदेश दणाणून सोडला असे सांगतात. हल्ली ह्या समाजातील उपासकांची संख्या स्त्रीपुरूष व मोठी मुले मिळून सुमारे ५० आहे. शिवाय हितचिंतक. हल्ली जुने मंदिर पाडून नवीन बांधण्याचे काम चालू आहे. अघोरकामिनीच्या परिश्रमाने स्थापन झालेल्या दोन संस्था हल्ली तिच्या नावाने चालू आहेत. अघोर नारी समिती नावाची सभा स्त्रियांच्या उन्नतीसाठी व इतर परोपकाराची कामे करीत आहे. अघोरपरिवार नावाचे सुमारे १०-१२ लहान मुलींचे बोर्डिंग बाबू गौरीप्रसाद मुजुमदार व त्यांची पत्नी ह्यांचे व्यवस्थेखाली आहे. शिवाय कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता एक बोर्डिंग आहे. त्यात हल्ली ११ विद्यार्थी राहत आहेत. हे जरी ब्राह्म नाहीत तरी त्यांस ब्राह्मधर्माचेच वळण लागत आहे.

बांकीपूर ब्राह्म काँग्रिगेशन

हे साधारण समाजपक्षाचे आहे. सन १८९६ चे सुमारास कलकत्त्याच्या साधनाश्रमातून भाई प्रकाशदेव, सुंदरसिंग, गुरूदास चक्रवर्ती, सतीशचंद्र चक्रवर्ती एम. ए. व श्रीरंग बिहारीलाल एम. ए. असे पाचजण केवळ ईश्वरावर भरंवसा ठेवून धर्मप्रचारार्थ निघाले ते वाटेत बहारप्रांती आरा येथे उतरले व तेथे त्यांनी एक साधनाश्रम स्थापिला. सन १८९६, ऑगस्ट महिन्यात तो आश्रम आरा येथून बांकीपूर येथे नेण्यात आला. तेव्हापासून ह्या समाजाची सुरूवात झाली. सुंदरसिंग परलोकी गेले, भाई प्रकाशदेव ह्यांनी लाहोरास ठाणे दिले व मागे राहिलेल्या तिघांनी जिवापाड श्रम करून नावजण्यासारखी कामे उभारली आहेत. ह्यांचे स्वत:चे अद्यापि मंदिर नाही. प्रचारक गुरूदास चक्रवर्ती ह्यांचे घरीच समाज दर रविवारी सायंकाळी भरतो. हल्ली ब्राह्मउपासकांची संख्या स्त्रिया, पुरूष व मुले मिळून एकंदर ६० आहे.

राममोहन राय सेमिनरी ही १८९७ जानेवारी ता. १ रोजी स्थापिली. ह्या शहरी हे एक पहिल्या नंबरचे हायस्कूल झाले आहे. लोक व सरकारी अधिकारी ह्य दोघांच्याही आदरास ते पात्र झाले आहे. शाळेस क भक्कम व पुरेशी इमारत स्वत:च्या मालकीची आहे व तिच्याभोवती विस्तीर्ण पटांगण व कंपौंड आहे. मुलांची संख्या १०९ आहे. शाळेतच ब्राह्ममुलांकरिता एक बोर्डिंग आहे. प्लेगमुळे बोर्डिंगात मुलांची संख्या फार कमी झाली आहे. हल्ली ६ मुले आहेत, पैकी २ च ब्राह्म आहेत. पण बाकीच्या चौघांस पूर्ण रीतीने ब्राह्म वळण लावण्याचे अटीवरच घेण्यात आले आहे. ह्या शाळेची इमारत विकत घेण्याचे बाबतीत बरेच कर्ज झाले होते ते शेठ दामोदरदास गोवर्धनदास ह्यांच्या उदार देणगीने फेडण्यात आले. ह्या बाबतीत चालक मंडळीनी फार फार आभार प्रदर्शित केले. ह्याशिवाय एक स्त्रियांची सभा. एक आदित्यवारचा लहान मुलांचा वर्ग आणि तरूण ब्राह्मगण अशा संस्था आहेत. गरीब लोकांकरिता एक रात्रीची शाळा आहे. दुष्काळात व विशेषेकरून प्लेगमध्ये आश्रमाने फार मेहनत घेतल्यामुळे प्रचारक मंडळीचे बरेच वजन आहे. ह्याशिवाय बहारी यंग मेनस् इन्टिट्यूट नावाची संस्था ह्यांच्याच हाताखाली आहे.

ता. ३ रोजी अघोरपरिवारात उपासना चालविली. ता. ४ रोजी सायंकाळी बाबू प्रकाशचंद्र राय ह्यांचे घरी दोन्ही पक्षांची प्रमुख मंडळी जमली. मी प्रथम मुंबईकडची सर्व हकीकत सांगितली. नंतर दोन पक्षांचे एकत्र कार्य कसे होईल ह्याविषयी संभाषण चालले. प्रकाशचंद्र राय हे जरी पक्के नवविधानी आहेत तरी ह्यांचा दोघांसही एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. शेवटी उत्सवात एकमेकांनी कार्यक्रम मिळून ठरवावा व एकमेकांच्या उपासनेस वगैरे पाळीपाळीने जावे असे ठरले. ता. ५ रोजी दोहोंकडील स्त्रियांची सभा मि. दास बॅरिस्टर ह्यांचे घरी जमली होती. पोस्टल मिशन, डोमेस्टिक् मिशन, सामाजिक मेळा वगैरे कामे स्त्रियांनी कशी करावयाची आहेत ह्याविषयी बोललो. मुलींनादेखील माझे इंग्रजी भाषण कळले. हेमंतकुमरी चौधरी सिलहतहून कॉन्फरन्सला आलेल्या डेलिगेटही त्यावेळी हजर होत्या. त्यांनी हिंदीत भाषण केले.

मोंगीर

ता. ६ रोजी दोनप्रहरी येते आलो. भागिरथीचे तटी हे मोठे रमणीय स्थान आहे. विशेषेकरून जुन्या किल्ल्यातील भाग मनोहर आहे. इंग्रज पाठलाग करीत असता मीरकाशीम ह्यांनी येथेच शेवटचे ठाणे दिले होते. पुराणातील राजा दानशूर कर्ण ह्याची दान देण्यास बसण्याची जागा गंगेच्या तीरावर एका लहानशा उंचवट्यावर अद्यापि दाखविण्यात येते. हल्ली ह्या ठिकाणी बेद रामपूरच्या जमीनदाराने सुंदर महाल ‘कर्णचौडा’ बांधला आहे. येथून पुढे गंगाजीचे विस्तीर्ण व बाकदार पात्र व माठोमोंगीर गावाभोवतालच्या टेकड्यांची अर्धगोल रांग व त्यावरची दूर क्षितिजात दिसणारी सुपारीची झाडे ह्या सर्वांचा एकंदर देखावा प्रेक्षकांचे म दंग करून टाकतो. एका फ्रेंट प्रवाशाने तर ह्या देखाव्यास अगदी अप्रतिम असे शिफारसपत्र दिल्याचे ऐकण्यात आले.

असो. ब्राह्म यात्रेकरूंस ह्या स्थळाचे महत्त्व असे सांगण्यात येते की, ब्राह्मसमाजात भक्तिसंप्रदाय जो सुरू झाला तो मूळ ह्या ठिकाणी. सन १८६८ च्या सुमारास इ. आय. रेल्वेचे ऑडिट ऑफिस जेव्हा कलकत्त्याहून मोंगीरजवळ जमलापूर येथे आणिले तेव्हा त्यातील ४-५ ब्राह्म कारकून मोंगीर येथे राहू लागले. पुढे त्यांच्या श्रमाने येथील समाज स्थापण्यात आला व नंतर १८७२ त हल्लीचे मंदिर बांधण्यात आले. मंदिरात एकदा काही वैष्णव मंडळीस भजनास बोलाविले होते. त्यापैकी एका चांडाळ जातीच्या भक्ताने इतके प्रेमळ व आवेशयुक्त भजन केले की त्याचा मंडळीवर विलक्षण परिणाम झाला. पुढे साधू अघोरनाथ ब्राह्मप्रचारक ह्यांचे भजनाविषयी प्रेम अधिकाधिक वाढून शेवटी स्वत: केशवचंद्रसेन एकदा येथे असता त्यांच्यावरही भजनाचा परिणाम घडला व येथे समाजाचे कार्य बरेच वाढले. पुढे हा भक्तीचा वेग जरी सर्व ब्राह्मसमाजात पसरला आणि मोंगीर समाजात एका काळी ४०-५० सभासद होते तरी हल्लीची येथली ओसाड व दीनवाणी स्थिती पाहून अंत:करण गहिवरते व मानवी मनाची अस्थिरता पाहून विस्मयते. मंदिरापुढील पटांगणात केशवचंद्रसेन, साधू अघोरनाथ, दीनानाथ चक्रवर्ती प्रचारक यांच्या तीन समाधी मध्यभागी एका चौथ-यावर बांधल्या आहेत. मंदिराकडे पाहून व इतिहास ऐकून मनास जी उदासीनता प्राप्त होते तिच्याच जणू ह्या तीन दृश्य मूर्ती.

पुढे लवकरच कर्ताभजा मंडळीचा कोणी एक पुरूष ह्या गावी आला. इकडे ह्या नावाची एक ईश्वराच्या कर्तृत्वगुणाची उपासक मंडळी आहे. ह्यांचे लक्षण जवळजवळ शाक्तमार्गीयांप्रमाणेच असावेसे वाटते. केवळ मनोविकारालाच वश होऊन समाजात आलेली काही नादलुब्ध मंडळी वरील पुरूषाच्या नादी लागली. सुमारे १८८० साली कृष्ण प्रसन्नसेन नावाच्या समाजातील एका हितचिंतकाने सनातनधर्म मंडळीची नवीनच एक ध्वजा उभारली. ह्या प्रकारे मंडळी कमी होता होता शेवटी मध्ये ऑडिट ऑफिसही पुन: पूर्वस्थळी गेले. १९०२ त ह्या गावी आर्यसमाजाची स्थापना झाली पण तोही नीट चालत नाही. हल्ली मंदिरात फार तर ३-४ जण उपासनेस जमतात. बागची बावू (द्वारकानाथ बागची) नावाचे एक वृद्ध गृहस्थ मंदिरातच असतात. कुचबिहारच्या महाराजांकडून त्यास दरमहा ४ रू. मिळतात. आपल्या पित्याच्या समाधीपुढे दिवा लावण्याकरिता म्हणून महाराणी दरमहा ३ रू. देते.

येथील कॉलेजातील एक तरूण प्रोफेसर बाबू सुरेशचंद्र राय हे सभासद आहेत व दुसरे एक बोर्डिंग सुपरिटेंडेंट हितचिंतक आहेत. त्यांच्याशी व इतर काही मंडळीशी दोनप्रहरी संभाषण झाले व येथील तरूण विद्यार्थ्यांकरिता काही धार्मिक संस्था काढावी असे ठरले. यानंतर

भागलपूर

येथे ता. ७ रोजी आदित्यवारी ७|| वाजता पोहोचलो. एकांतस्थळी एक लहानसे पण सुंदर मंदिर आहे. उपासना संपत आली होती. स्त्रिया-पुरूष मिळून उपासक १०-१२ होते. दुसरे दिवशी सकाळी आचार्य हरीसुंदर बोस ह्यांचे घरी केशवचंद्रसेन ह्यांच्या पुण्यतिथीसंबंधी उपासना त्यांनीच चालविली. येथील प्रमुख लोकांचा विशेष कल जरी नवविधान पक्षाकडे आहे तथापि मंत्री बावू निवारणचंद्र मुकरजी हे फार समजूतदार व वजनदार असल्याने समाजाचे एकंदर धोरण अगदी ति-हाईतपणाचे आहे. आनुष्ठानिक ब्राह्म उपासकांची एकंदर संख्या सुमारे ६० व इतर ५ आहे.

हा समाज ता. २२ माहे फेब्रुवारी सन १८६४ रोजी, विशेषेकरून बाबू ब्रजकृष्ण बसू व  नवकुमार राय ह्यांच्या प्रयत्नाने व प. वा. प्रतापचंद्र मुझुमदार ह्यांच्या सल्ल्याने स्थापित झाला. राजा शिवचंद्र बानर्जी नावाच्या एका अत्यंत आस्थेवाईक हितचिंतकाने स्वत: सर्व खर्च सोसून मंदिर बांधविले ते केशवचंद्र ह्यांचे हस्ते ता. २२ फेब्रुवारी १८८० रोजी उघडण्यात आले. ह्याचे पूर्वी सन १८७८ साली ह्या जागेला लागूनच एक भली मोठी जागा विकत घेऊन त्यात ५ ब्राह्म कुटुंबांनी आपली राहण्याची मोठमोठी घरे बांधली.

समाजात थोडी का होईनात पण बडीबडी प्रमुख व वृद्ध मंडळी आहेत. पण उपासनेशिवाय दुसरे काही काम होत नाही. संगत सभा, बायकांची सभा, तरूण ब्राह्मगण, मुलांसाठी शाळा, सामाजिक मेळे वगैरे बरेच सुखसोहळे उपभोगून हा समाज आता शांत झाला आहे. ता. ९ रोजी सायंकाळी सुमारे ५-६ तरूण पदवीधर ब्राह्म मंडळीपुढे मुंबईच्या तरूण ब्राह्मगणाचे छापील नियम वाचून दाखविले व विचाराअंती येथील पूर्वीची तरूणांची संस्था पुन: सुरू करण्याचे ठरले. ह्यानंतर रात्री ७ वाजता बाबू निवारणचंद्र मुकर्जी ह्यांचे घरी प्रमुख मंडळी जमली. त्यापुढे मी मुंबईकडील कामाची हकीकत सांगितली. बहुतेकांस ती नवीनच असल्याने ऐकून फार समाधान झाले व दोघांनी तर वारंवार अशी इच्छा प्रदर्शित केली की मुंबई व बंगालप्रांतातील ब्राह्मांचे अधिक निकट संबंध जुळविणे फार इष्ट आहे व त्याकरिता परस्पर विवाह-व्हवहार करणे, अवश्य आहे. मी म्हटले की, निरनिराळ्या प्रांतांतील ऐपतदार ब्राह्म गृहस्थांनी सहकुटुंब निरनिराळ्या प्रांतांत प्रवास केल्याविना वरील विवाह-व्यवहार कधीही शक्य होणार नाही आणि अशा प्रवासामुळे सर्वपक्षी अत्यंत हित होणार आहे. नवविधान व साधारण समाज ह्यांतील दुहीसंबंधाने मुंबईकडील समाजाचे अगदी ति-हाईतपणाचे वर्तन पाहून इकडील पुष्कळ ठिकाणच्या दोहोंपक्षांच्या कट्ट्या अभइमान्यांसही बरे वाटते हे मोठे सुचिन्ह आहे.

ता. १० सकाळी मी कुचबिहारकडे निघालो. भागलपुराजवळ वाळवंट व प्रवाह मिळून गंगेचे ७ मैल अफाट पात्र आहे. ते आगगाडी व आगबोटीतून ओलांडले. पुढे दोनप्रहरी

काठीहार

म्हणून रेल्वेचे जंक्शन लागले; तेथे माझ्या गाडीला बराच अवकाश होता. ह्या ठिकाणी मागे एक समाज होता असे नुसते भागलपुरास ऐकले होते. त्यासंबंधी काही शोध लागल्यास घ्यावा म्हणून सामान स्टेशनावर ठेवून गावात गेलो. ह्या गावात रेल्वे जंक्शनमुळेच महत्त्व आले असल्यामुळे चहूंकडे बकाली वस्तीच होती. बरीच चौकशी केल्यावर मंदिराचा पत्ता लागला. सुमारे २५ फूट रूंद चांगली पक्की चुनेगच्ची इमारत आहे. पण काम मध्येच बंद पडल्यामुळे दारे व खिडक्या मात्र लावावयाच्या आहेत आणि तेव्हापासून ही इमारत अशीच बेवारशी उघडी पडल्यामुळे हिला अकाली जीर्णावस्था आलेली पाहून फार वाईट वाटले आणि हे मुक्तद्वार गौडबंगाल आहे तरी काय ह्याचा पत्ता लावावा म्हणून मी रात्रीपर्यंत राहिलो. शेजारच्या एका मुसलमान गृहस्थाने सांगितले की, बहुतेक तयार झालेली ही इमारत अशी अनाथ पडल्यामुळे हिचा क्वचितप्रसंगी अत्यंत खेदजनक दुरूपयोग होतो.

रात्री एका जुन्या माहितगाराचा, तेथील हेडमास्तरच्या साहाय्याने पत्ता लागला. एका खोलीत चार रेल्वे नोकर कामावरून दमून येऊन करमणुकीसाठी बुद्धिबळे खेळत होते. अशात माझी त्यांची अवचित मुलाखत करण्यात आली. शेवटी माहिती मिळाली की सन १८८७ साली काही रेल्वेतील ब्राह्म नोकरांनी विशेषेकरून जानकीनाथ गांगोली व रखलदर्श चाटर्जी ह्यांच्या प्रयत्नाने येथे समाज स्थापन झाला. त्यावेळी १० सभासद होते. १८९९ साली हल्लीची इमारत बांधण्यास सुरूवात झाली. ८०० रू. चे काम झाले. आणखी १००-२०० रूपयांत काम पुरे होण्यासारखे आहे. पण इतक्यात येथील रेल्वे ऑफिस एकदम कलकत्ता येथे गेल्यामुळे येथे एकही ब्राह्म उरला नाही. इमारत तशीच पडली आहे. येथपर्यंत हकीकत ऐकत असताना ह्या इमारतीप्रमाणेच बुद्धिबळाचा डावही अगदी बहरात आलेला तसाच तहकूब पडला होता. मी मंडळीस म्हटले, दिवसभ काम करून तुम्हांला रात्री करमणूक अवश्य आहे पण करमणूक होऊन शिवाय आत्म्याला थोडीबहुत उन्नती व शांती मिळाल्यास कसे? आणि ह्यासाठी तुम्हांला ही इमारत पूर्ण करून वहिवाटीस मिळाल्यास कसे? मात्र एकच अट की ह्या ठिकाणी जे भजन होईल ते केवळ एकच ईश्वरास उद्देशून व हिंदू-मुसलमान इ. कोणाही धर्मीयांस चालेल असे झाले पाहिजे. संभाषणाअंती मंडळीस कल्पना पूर्ण पसंत पडली. मंदिर उपयोगास मिळाल्यास विच्छायतीचा व दिवाबत्तीचा खर्चही सोसण्यास मंडळी तयार झाली. पण मंदिर पूर्ण व्हावे कसे?

येथून १८ मैलांवर पूर्णिया हे जिल्ह्याचे गाव आहे. येथे बाबू हजारीलाल नावाचे आस्थेवाईक ब्राह्म गृहस्थ असतात. कॉन्फरन्समध्ये त्यांची ओळख झाली होती. पूर्णीयाकडे आगगाडी रात्री १० वाजता निघाली. तीतून निघून रात्री सुमारे एक वाजता

पूर्णीया

येथे बाबू मजकुरांचे घरी पोहचलो. आकस्मित येथे आलेले तारकनाथ राय नावाचे आस्थेवीक ब्राह्म मित्राची गाठ पडली. दोघांस हेतू कळविला. पूर्वीच्या फंडापैकी २०० रू. अद्यापि शिल्लक आहेत असे कळले. विचार ठरल्यावर झोपी गेलो. पूर्णीया येथे समाज आहे, मंदिर नाही. दोनच आनुष्ठानिक ब्राह्म कुटुंबे आहेत. प्रात:काळी दुस-या कुटुंबात उपासना झाली. दोनप्रहरी आम्ही चौघेजणही पुन: काठीहार येथे गेलो. सायंकाळी तेथील हायस्कुलात व्याख्यान झाले. येथील मुख्य अधिकारी मनसफ एक उदार मताचे मुसलमान बॅरिस्टर गृहस्थ आहेत. त्यांनी आपल्याच सहीनिशी सर्व रेल्वेवरच्या नोकर लोकांस आमंत्रणपत्रिका पाठविली व अध्यक्षस्थानही पतकरले. ह्या कामी येथील तरूण हेडमास्तरांनी मोठ्या उत्साहपूर्वक साहाय्य केले. व्याख्यानानंतर बाबू हजारीलाल हे येथील काही मंडळींच्या सल्ल्याने बाकी उरलेल्या शिलकेतून मंदिर पुरे करून देण्याचे ठरवून नंतर पूर्णीयाकडे निघाले आणि मी रात्री १ वाजता कुचबिहाराची वाट पुन: धरली.

ह्या प्रकारे बहार प्रांतातील काम झाल्यावर मी श्रीगंगेचा निरोप घेऊन तिचा पिता जो पर्वतराज हिमाचल त्याचे चरणांगुलीवर विराजमान झालेली वनश्रीची जणू माहेरकडची जिवलग सखी जी कुचबिहार नगरी तिच्या आत सायंकाळच्या शांत समयी अत्यादरपूर्वक प्रवेश केला.

कुचबिहार

बहार सोडून बंगाल्यात शिरल्यावर भोवतालच्या देखाव्यात हळूहळू पालट होतो. गीतलदाहा जंक्शनवर रेल्वेचा मुख्य रस्ता सोडून कुचबिहार संस्थानच्या लहानशा गाडीचा आश्रय करावा लागतो. सडक अरूंद आणि भुईसपाट, डबे चिमुकले, एंजिन तर घरच्या मांजराप्रमाणे मामसाळलेले, स्नानगृहे अगदी खोपटवजा, स्टेशनमास्तर व गार्ड वगैरे अधिकारी ह्यांची मुद्रा व पेहरावही अगदी साधे घरगुती, एकंदरीत जी. आय. पी. सारखा आढ्यतेचा व भोळ्यांना भेडसावणारा सरंजाम व फाजील धडपड कोठेच दिसत नव्हती हे पाहून मन किंचित विसंबले. भोवतालचा प्रदेश सौम्य, अफाट आणि अगदी रूळ फिरविल्यासारखा सपाट, त्यात मधूनमधून वेळूची बने, केळीचे कुंज आणि पोफळीच्या राया-फार काय सांगावे, श्रीमान हिमाचलाचेच ते प्रत्यक्ष आंगण. मोठ्यांच्या घरी प्रवेश करावयाचा तो विनम्रभावानेच केला पाहिजे. कोठे त्या विभूतीची दैवी थोरवी, कोठे आम्हा मानवी किड्यांची क्षुद्र आढ्यता ! म्हणून कुचबिहार स्टेट रेल्वेची लीनता व एकंदर संस्थानाची साधी रहाटी अगदी योग्य होती.

ह्या संस्थानची हद्द भूतानच्य हद्दीला लागूनच आहे. येथील मूळचे रहिवासी जे अर्धवट जंगली लोक शेतकी करून हेत त्यांची सांपत्तिक हद्दही कंगालपणाच्या शिवेला लागूनच आहे. ह्यांच्या चेह-यात आर्यछायेपेक्षा मोगली छाया अधिक दिसते. कुचबिहारचे राजघराणे ह्याच जंगली जातीचे आहे. राजा, प्रजा व मानकरी मंडळ हे सर्व एक जात असून, ह्यांचे दरम्यान अधिकारीवर्ग मात्र कारकुनापासून तो थेट दिवाणापर्यंत बंगाली बाबूंचाच आहे. आणि मनुष्यस्वभावास अनुसरून ह्यांचे एतद्देशीयांशी प्रसंगी अरेरावीचे वर्तन पाहून किंचित कौतुकच वाटते. हे संस्थान उत्पन्नाच्या मानाने पाहता जवळजवळ आमच्या कोल्हापुराइतके आहे. पण बंगाल्यात हे पहिल्या प्रतीचे गणले जाऊन शिवाय ब्रिटिश सरकारच्या मर्जीतले असावेसे दिसते. हल्लीचा राजा तर अगदी इंग्रजी तालमीत वाढला असल्यामुळे पक्का ‘जंटलमन’ बनला आहे. व्हाइसरॉयचे दरबारी आणि प्रत्यक्ष बादशहाच्या घरी परलोकवासी महाराणीच्या वेळेपासून ह्यांच्या कुटुंबातील माणसांचा फार घरोबा आहे, इतका की, एका कुमाराचे नाव प. लो. आजीबाईने आपले स्वत:चे म्हणून नाव व्हिक्टर असे ठेवले आहे. इंग्रज सरकारच्या वजनामुळे व येथील बरेच दिवस काम पाहत असलेल्या हुषार व अनुभवी दिवाणाच्या दक्षतेमुळे संस्थानची बरीच सुधारणा होत आहे. येथे एक एम. ए. पर्यंतचे पूर्ण दर्जाचे कॉलेज आहे. त्यात सुमारे ३०० विद्यार्थी आहेत, आणि फी तर सपशेल माफ आहे! शिवाय एतद्देशीय विद्यार्थ्यांसाठी एक फुकट बोर्डिंग आहे. ह्या मोफत छात्रालयात सुमारे ३० विद्यार्थ्यांची सोय आहे. असे उदाहरण दुसरीकडे कोठे मिळेलसे वाटत नाही. असो. ह्या प्रकारे राजघराण्यावर व संस्थानच्या काही खात्यांमध्ये पाश्चात्य सुधारणेचे परिणाम घडलेले दिसतात तरी प्रत्यक्ष कुचबिहार नगरावर व त्यातील अस्सल प्रजेवर अद्यापि हिमालयाचेच पुरातन साम्राज् यचालू आहे, व ते यावच्चंद्रदिवाकरौ चालण्यासारखे स्वत: हिमालयाइतकेच स्थिर व गंभीर आहे. राजाचा महाल, चार बड्या लोकांची घरे आणि काही ठळक ठळक सरकारी इमारती आणि एका कालीचे संस्थानचे देऊळ इतकी शिवाय करून गावातील बाकी सर्व लहान-मोठ्यांची घरे म्हणजे खरोखर खक्षरश: झोपड्याच. गावाकडे नजर फेकल्याबरोबर असे वाटते की, केळी-पोफळीच्या एका विस्तीर्ण व सुंदर वनात एकांत जागा पाहून आधुनिक सुधारणेच्या प्लेगाला कंटाळून जणू एक सेग्रिगेशन कँपच बांधले आहे. रूंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ह्या बांबूच्या झोपड्या, दरम्यान बरीचशी मोकळी जागा टाकून हारीने बांधलेल्या दिसतात. प्रथम सुमारे ३ फूट उंचीचा ओटा बांधून त्यावर झोपडी उभारलेली असते. तिची जमीन वेळूची, भिंती वेळूच्या वरचे छत व छप्पर वेळूचे, आतील सामान वेळूचे आणि बाहेरील भक्कम काँपौंडही वेळूचेच. ह्याची कारणे पुष्कळ आहेत. एक तर लोक गरीब आणि अल्पसंतुष्ट. दुसरे, देश दलदलीचा, सर्द व अति पावसाचा. तिसरे, घरे बांधण्यास दगड किंवा चिखल दोन्ही मिळत नाहीत. जमीन राखेच्या रंगाच्या बारीक व मऊ रेतीची, तिच्या विटाही वनत नाहीत. बरे, इतक्यालाही न जुमानता आढ्यतेने जर का एकादे पक्के घर उभारले, तर हिमालयबोवा वरचेवर भूकंपाचे धक्के देऊन जागे करण्यास तयार आहेतच. उलटपक्षी अशा दलदलीच्या जागी अशी वेळूची घरेच राहण्याला सोयीस्कर व आरोग्यकारक आहेत, आणि म्हणूनच, राजाचा सुमारे १३ लक्षांचा सुंदर व भव्य प्रासाद व भोवतालचा विस्तीर्ण बाग पाहून बाहेर राजरस्त्यात प्रेक्षक येतो, तोच दुतर्फा सेग्रिगेशन कँप पाहून त्याचा आधी बराच हिरमोड होतो, आणि मग, ही साधी रहाणीच बरी, हा वाडा काय तीन दिवसांचा, इ. नाइलाजाचे तत्त्वज्ञान मागून सुचू लागते.

असो, ब्राह्म यात्रेकरूंस कुचबिहारचे महत्त्व कोणते बरे? कुचबिहारचे नाव माहीत नाही असा कोणीतरी ब्राह्म असू शकेल काय? ब्राह्मधर्माचा दिग्विजय करण्याकरिता केशवचंद्राने जी प्रचारक सेनेची अभेद्य फळी उभारली होती, तिची दुफळी केली ती ह्याच कोप-यातल्या कुचबिहारने. कुचबिहारच्या राज पुत्राला केशवने आपली मुलगी दिली ती काय ईश्वरी प्रेरणेने किंवा धूर्त व लौकिक दृष्टीने, हे ठरिविण्यासाठी ही वेळ नव्हे व स्थळही नव्हे, पण केशवाचा हेतू काही असो, येथे येणा-या प्रत्येक ब्राह्म नवख्याला एक गोष्ट विशेष निरखून पहावी असे साहजिक वाटते, ती ही, बुद्धधर्माला जसा अशोक, ख्रिस्तीधर्माला जसा कॉन्स्टंटाईन तसा ब्राह्मधर्माला एकादा राजबिंडा पुरस्कर्ता कुचबिहारपुरता तरी झाला आहे की काय? पुढे काय होईल ते सांगवत नाही, पण हल्लीची वस्तुस्थिती थोडक्यात अशी आहे.

कुचबिहार ब्राह्मसमाज

ब्राह्मधर्माचे कार्य कुचबिहार येथे कुचबिहार विवाहाच्या पूर्वीपासून चालू आहे. रायबहादूर कालिकादास दत्त हे ब्रिटिश सरकारच्या एका बड्या नोकरीवरून सन १८६९ साली कुचबिहारचे दिवाण होऊन येथे आले. ते अद्यापि तेच काम करीत आहेत. हे गृहस्थ लहानपणापासून ब्राह्म लोकांच्या सहवासात वाढले असल्यामुळे ब्राह्मसमाजासंबंधी व विशेषेकरून महर्षी देवेंद्रनाथ, केशवचंद्र, शिवनाथशास्त्री वगैरे पुढा-यांविषयी ह्यांना फार आदर वाटत आहे. हे गृहस्थ व राय यादवचंद्र चक्रवर्ती बहादूर, त्या काळचे येथील न्यायाधीश, ह्या दोघांच्या निमंत्रणावरून प्रचारक विजयकृष्ण गोस्वामी हे सन १८७४ साली येथे आले व त्यांनी ब्राह्मसमाजाची स्थापना केली. त्यावेळी सुमारे १४ हितचिंतक मंडळी समाजात सामील होती. त्यांनी उपासनेकरिता एक झोपडी बांधली, ती दोन वर्षांनी जळल्यावर सुमारे ५ वर्षे उपासना बंद होती. त्यानंतर हल्लीचे जागी मंदिर बांधण्यात आले. तेही सन १८९७ च्या भूकंपात पडल्यामुळे त्याच्याच पायावर हल्लीचे पक्के मंदिर नुकतेच बांधले आहे. ह्यात सुमारे ६०-६५ मंडळी उपासनेस बसतील इतकी जागा आहे. भोवताली पुष्कळशी मोकळी जागा आहे. शेजारी मिशनरी कोणी आल्यास राहण्यास झोपडी तयार आहे. ह्या समाजात दीक्षित असे सभासद कोणीच नाहीत. मात्र समाजाचे कायमचे १८ वर्गणीदार आहेत. पण नित्याचे उपासनेत ह्यांपैकी क्वचितच कोणी तरी येतो. बाहेरचे ४-५ विद्यार्थी मात्र जमतात. कलकत्त्याच्या साधारण समाजाचा मिशनरी वर्षातून आपल्या फिरतीवर १-२ दा येऊन जातो. येथील दिवाणसाहेबच समाजाचे कायमचे अध्यक्ष आहेत व पैशाच्या वगैरे लौकिकबाबतीत त्यांचा मोठाच आधार आहे आणि स्वत: दिवाणसाहेबांचे विचारही पूर्णपणे उदार असूनही त्यांची व्यवहारकुशलता त्याहून पण परिपूर्ण असल्यामुळे त्यांची समाजाच्या बाबतीत आजपर्यंत केवळ हितचिंतक आणि उदार आश्रय ह्यापलीकडे मजल गेलेली नाही. ह्याबाबतीत त्यांच्याशी खुलाशाकरिता समक्ष एकदोन वेळा संभाषण झाल्यावेळी त्यांनी आपली खरी खरी बाजू मोकळेपणे सांगितली, ही एक त्यातल्यात्यात समाधानाची गोष्ट होय. दिवाणसाहेब मोठे सूज्ञ, आदरशील व उदार आहेत. संस्थानात त्यांचे अपरंपार वजन आहे. सर्व सूत्रे त्यांचेच हाती आहेत. साधारण ब्राह्मसमाजाकडून काही प्रचारणेप्रीत्यर्थ प्रयत्न होईल तर आपण शक्य ती मदत करू असे म्हणत आहेत. पण केवळ अशा लौकिक पुरूषाकडून हल्ली होत आहे त्यापेक्षा आणखी काय होणार! अशा स्थितीत साधारण समाजाकडून एकादा ताज्या दमाचा प्रचारक तेथे जाऊन काही दिवस तेथील सुमारे ३०० कॉलेजच्या विद्यार्थ्यात काम करील तर बरेच यश येण्यासारखे आहे.

कुचबिहार नवविधानसमाज

सन १८७८ साली केशव चंद्रसेन ह्यांच्या ज्येष्ठ कन्येचा विवाह कुचबिहारचा हल्लीचा राजा सर नृपेंद्र नारायण भूपबहादूर सी. आय. इ. ह्यांच्याशी झाला. कुचबिहार येथे पूर्वीपासून जो समाज होता त्यातील मंडळीस नवविधान पक्षाचे मते पसंत न पडल्यामुळे म्हणा, किंवा हल्लीचे दिवाण ह्यांच्या मुत्सद्दीपणामुळे त्यास, धर्माच्या कामाशी संस्थानाचा प्रत्यक्ष संबंध नसावा व जी पूर्वपरंपरा-संस्थानातून देणगी चालू आहे ती-तशीच चालावी असे वाटत असल्यामुळे म्हणा किंवा राजेसाहेबास आणि राणीसाहेबासच आपल्या बाजूचा एक स्वतंत्र समाज असावा असे वाटल्यामुळे म्हणा, सन १८८६ साली ऑगस्ट महिन्याच्या १५ व्या तारखेस कुचबिहार नवविधानसमाज स्थापण्यात आला. ह्याचे पूर्वी केशवचंद्र सन १८८४ त वारले होते. ते असेतोपर्यंत हा समाज निघाला नाही. इतकेच नाही पण त्यांच्या हयातीत केशव स्वत: येथे एकदोनदा आले असूनही व्याख्यान वगैरे देणे ही त्यांची नित्याची कामे त्यांनी ह्या गावी केल्याचेही ऐकण्यात आले नाही. ह्यावरून विवाहाच्याद्वारे संस्थानात समाजाचा शिरकाव करावा हा त्यांचा लौकिक हेतू असावा असे फारसे संभवत नाही. असो. हल्ली ह्या समाजाचे प्रमुख स्वत: राजेसाहेबच आहेत. पण खरी व्यवस्था राणीसाहेबांच्याकडूनच सर्व होते. राजाचे कुटुंब धरून समाजात एकंदर ११ अनुष्ठानिक कुटुंबे आहेत. त्यांत एकंदर सुमारे ७० मुलेमाणसे आहेत, शिवाय सुमारे ४० हितचिंतक आहेत. समाजाच्या खर्चाकरिता संस्थानातून सालीना ५,००० रू. ची नेमणूक आहे. त्यात एक कायमचा मिशनरी, एक गायक ह्यांचा खर्च व इतर खर्चही होत असतो. शिवाय आर्यनारीसमाजाची दरमहा १ सभा होत असते, महाराणी येथे असताना ही सभा दर आठवड्याला त्यांच्या अध्यक्षतेखाली भरत असते. हिच्यात सुमारे १५ सभासद व १० इतर स्त्रिया जमत असतात.

मंदिर

समाजाचे अर्थातच एक सुंदरसे मंदिर आहे. खरोखर इतके सुंदर ब्राह्ममंदिर हिंदुस्थानात दुसरीकडे कोठे नसेल, निदान माझ्या तरी पाहण्यात नाही. राजाश्रयाने बांधले गेले आहे म्हणून हे केवळ शृंगारून सुंदर केले आहे असे नव्हे तर ह्याचा एकंदरीत घाटच साधा, सात्विक आणि उपासनालयास साजेल असा आहे. डाक्का, कलकत्ता वगैरे ठिकाणी ह्यापेक्षा मोठमोठाली मंदिरे आहेत, पण ती केवळ व्याख्यान-मंदिरेच. आत्म्याला जागृत करण्यासारखा विशेष काही सात्विक भाव त्यांच्यात नाही. काव्य आणि गायनकला ह्यांचेद्वारे धर्माचे अंशत: कार्य निदान बंगाल्यात तरी होत आहे, पण शिल्पकला आणि चित्रकला ह्यांचेद्वारे आत्म्याचे किती तरी पोषण होण्यासारखे आहे. ह्याविषयी नीटशी कल्पना कोणातरी ब्राह्माच्या मनात आली असेल की नाही, ह्याविषयी मोठी शंकाच आहे. रविवारी सायंकाळी उपासना झाली, तीही मोठी गंभीर झाली. बराच धूप जळत असल्यामुळे चहूकडे मंदिरभर सात्विक गंध सुटला होता. नियमित वेळी गंभीर घंटानाद झाल्यावर नेमणुकीचे उपासक वेदीवर बसले. ते दुर्गानाथराय, हे केशवच्या प्रिय शिष्यांपैकी एक असून, फार साधे व सात्विक गृहस्थ आहेत. गायन सुस्वर आणि भजन प्रेमळ झाले. भजनाचा रस जेव्हा दाटत असे व मृदंगाचा नाद वरती धुमटात धुमू लागे तेव्हा पडद्यातील अदृश्य स्त्रियांनी आपल्याजवळचे मोठे शंख वाजवून त्यांच्या गंभीर ध्वनीचा मेळ भजनात असा मिळवून द्यावा की, श्रोत्यांची सर्व गात्रे बंद पडून तो केवळ काही वेळ आत्मरूपानेच उरावा!

मी कुचबिहार येथे ता. १९ रोजी गेलो. नदीच्या काठी ‘केशव-आश्रम’ नावाचा समाजाच्या मालकीचा एक मोठा बगीचा आहे, त्यात एक लहानशी इमारत बांधण्यात येत आहे. ह्या बागेतच राणीसाहेब आपला आर्यनारीसमाज भरवीत आहेत. ह्या बागेसमोरच्या जागेत, समाजाच्या खर्चाने कॉलेजातील ब्राह्म-विद्यार्थ्यांस राहण्याकरिता दोन सुंदर कुटिका करून दिल्या आहेत. त्यांत हल्ली चार विद्यार्थी राहतात, माझी राहण्याची व्यवस्था ह्या छात्रकुटिकेत केली होती. ता. १३ रोजी तिस-या प्रहरी येथील टाऊनहॉलमध्ये धर्म हा जीवनाचा पाया (Religion as the basis of life) यावर माझे इंग्रजीत व्याख्यान झाले. दिवाणसाहेबांनी अध्यक्षस्थान स्वीकारले होते. ता. १४ रोजी केशव-आश्रमात वनभोजन झाले, त्यावेळी दोन्ही समाजाच्या मंडळीने मोठ्या प्रेमाने भोजन केले. नंतर मी मुंबईकडची हकीकत सांगितली, त्याच दिवशी आदित्यवारची सायंकाळी मंदिरात उपासना झाली. उपासनेनंतर लगेच सुमारे २०-२५ तरूणांची सभा जमली, त्यांचेपुढे मुंबईच्या तरूण ब्राह्मगणाचे नियम खुलासेवार वाचण्यात आले. तेथील समाजातील तरूणांची सभा बरेच दिवस बंद पडली होती. तिची पुन: मुंबईच्या सभेच्या नियमाप्रमाणे रचना करून, ह्या सभेस जोडण्याचा विचार ठरला.

कुचबिहार येथे दोन समाज आहेत. एकाचे अध्यक्ष स्वत: राजेसाहेब व व्यवस्थापक राणीसाहेब, दुस-याचे अध्यक्ष, दिवाणसाहेब, शिवाय तत्त्वज्ञानाच्या अध्ययनाविषयी सर्व बंगाल्यात नावाजलेले प्रो. ब्रजेंद्रनाथ सील येथील कॉलेजचे विद्यार्थ्यांना प्रिय असलेले प्रिन्सिपॉल हेही ब्राह्म. मी तेथे असताना तेथील कॉलेजातील काही विद्यार्थ्यांनी दाखविलेली जिज्ञासा व तत्परता, तरूणांची सभा पुन: सुरू करण्याविषयीची उत्सुकता व त्यानंतर त्यांची आलेली पत्रे ह्या सर्वावरून, कुचबिहार संस्थानात एकादा ताज्या दमाचा प्रचारक पाठविल्यास पुष्कळ काम होण्यासारखे आहे. पण ते होईल तेव्हा होवो, मी मात्र मुकाट्याने जानेवारी ता. १५ रोजी सकाळी ब्रह्मपुत्रेची वाट धरली. दोन दिवस येथील लहान-थोर मंडळीने माझे फार स्वागत केले. गाडी सुटतेवेळी ह्या दूर देशच्या बांधवांचा निरोप घेताना माझे अंत:करण भरून आले!

ढुब्री

“ब्राह्मधर्माचा प्रचारक होण्यात मला जी धन्यता व सुख वाटत आहे त्यापुढे राजसुखही तुच्छ होय!” हे वाक्य जेव्हा मी बाबू उपेंद्रनाथ बोस, जे ढुब्री ब्राह्मसमाजाचे एक वजनदार पुरस्कर्ते ह्यापुढे उच्चारले तेव्हा त्यांची मुद्रा किंचित चमत्कारिक झाली. कोठे अरबी समुद्रावरील मुंबई बेट, कोठे आसाम प्रांतातील हा अप्रसिद्ध ढुब्री गाव. पण ज्या सनातन ब्राह्मधर्माचा मी वार्ताहर होतो त्याचा शुभ महिमा असा आहे की, त्यायोगे ह्या विशाल भरतखंडाचीच नव्हे तर ह्या विपुल पृथ्वीचीही दूरदूरची टोके पवित्र प्रेमरज्जूने एकत्र होणार आहेत व हल्ली होतही आहेत. तथापि वरील उद्गार ह्या विशिष्ट प्रसंगी निघण्याचे कारण केवळ हे अंतरीचे सुखच होते असे नव्हे तर त्यात भोवतालच्या शांतगंभीर देखाव्याची जबर भर पडली होती. सायंकाळी (ता. १५ जानेवारी) आगगाडीतून उतरल्याबरोबर बाबू मजकुराबरोबर मी ब्रह्मपुत्रेच्या उंच, विस्तीर्ण आणि शीतल तीरावर फिरावयास निघालो होतो. प्रथम अगदी अक्षरश: तटस्थ व एकांत स्थळी-जणू प्रार्थनेत मग्न झालेले-ब्राह्ममंदिर पाहिले. मंदिराच्या दाराशीच एका गत ब्राह्मबंधूची सुंदर संगमरवरी समाधी पाहिली. ह्या बंधूच्या प्रार्थना फार प्रेमळ व तन्मय होत असत. व अशीच एकदा प्रार्थना करीत असता तिच्या भरात ह्यांचे देहावसान झाले म्हणून त्या प्रसंगाच्या स्मारकार्थ समाजमंडळींनी ही समाधी बांधली आहे हे ऐकून व पाहून झाल्यावर मागे वळतो तोच साक्षात ब्रह्मपुत्रेने आपले विराट रूपाचे दर्शन दिले. ‘मृत्योर्मा अमृतं गमय’ असे केवळ मनात येते न येते तोच अमृताची पताकाच तीपुढे फडकू लागली. हिमालयाच्या पलीकडे कैलासपर्वताच्या पूर्व पायथ्याशी असलेल्या मानससरोवरातून निघून पित्यास प्रदक्षिणा घालून आलेली ही महाभाग ब्रह्मपुत्रा. हिने केवळ दर्शनहेळामात्रेकरून किती देशांची वार्ता सांगितली. किती कालाची साक्ष दिली. ढुब्री गावच्या तिन्ही बाजूंनी हिचा प्रवाह असल्याने हिने गावास अगदी कवटाळल्यासारखे दिसते. महासागरास पाहून ईश्वराच्या अनंतपणाची व गंभीरपणाची थोडी कल्पना येते खरी, पण अशा महानदाच्या विभूती पाहिल्याशिवाय ईश्वराचे कार्य व संसाराची प्रगती ह्याविषयीची प्रत्यक्षता येण्यासारखी नाही. असो. अस्तमान झपाट्याने होऊ लागला व सर्व दृश्य जगावर रात्रीचा अभेद्य पडदा पडू लागला, मातीच्या डोळ्याला जसजसे कमी दिसू लागले तसतसे स्मृतीच्या डोळ्यास अधिकाधिक स्पष्ट दुरदूरचा प्रदेश दिसू लागला. किती देश, किती भाषा, किती जाती, किती रीती,.... पण सदधर्माची किंचित आच लागल्याबरोबर हे सर्व भेद विरघळून जाऊन एकच प्रेमरस कसा पाझरतो! धर्माची पताका धारण करून निघालो म्हणजे किती पाहुणचार, किती आदर, किती कळकळ ही आपला जणू शोध काढीत येतात आणि मग आलेल्या वाटेने आपल्यामागे हे प्रेमसुताचे जाळे किती फैलावलेले दिसते, तशीच पुढील खाचखळग्याची दिसणारी वाट जसजशी पायांखाली येते तसतशी कशी सपाट होते, आजच्या चिंताच उद्याच्या आनंदास कशा कारणीभूत होतात, काल भोगलेले क्षणिक शारीरिक कष्ट आज कसे अक्षय मानसिक सुख देतात....ह्याप्रकारे बाहेरील ब्रह्मपुत्रेचे तरंग जरी दिसेनासे झाले तरी आतील मानससरोवरातून निघणा-या ह्या स्मृतिनदीचे सुखदाई तरंग एकावर एक स्वप्नवेगाने सुटू लागले असता वरील उद्गार माझे तोंडून सहज निघाले ह्यात काय नवल?

हा गाव लहान व येथला समाजही अगदी लहान आहे तरी समाजातील मंडळीची जूट व एकमेकांविषयी अगत्य पाहून संतोष झाला. विशेषकरून स्त्रियांमध्ये उपासनेसंबंधी आतुरता दिसली. त्याच रात्री मी घरी परत येऊन पोशाक बदलून प्रार्थनेला गेलो, तो स्त्रिया आधीच पडद्यात बसल्या होत्या. बहुतेक सर्व उपासना हिंदुस्थानीतच करावी लागली. माघोत्सवाची सुरूवात होती, म्हणून पुढे दोन दिवशी सकाळी दोघा सभासदांच्या घरी पहाटेस सामाजिक उपासना झाल्या. त्यांचे आधी काही सभासद नगरसंकीर्तन करीत. तेथे ता. १६ जानेवारी रोजी संध्याकाळी मंदिरात ‘Some ideals for Modern India’ ह्यावर माझे इंग्रजीत व्याख्यान झाले व ता. १७ रोजी सकाळी तरूणांसाठी शाळेत व्याख्यान झाले. ज्यांचे घरी मी उतरलो होतो, ते जरी समाजाचे सभासद नव्हते, तरी समाजास त्यांचाच सर्व प्रकारे मोठा आधार होता व जातिभेदापेक्षाही पडद्याचे जे बंड बंगल्यात फार आहे तेही ह्या गृहस्थाकडे नव्हते. ता. १७ रोजी तेथून निघून नदीवरून आगबोटीने मध्यरात्री जगन्नाथगंज येथे गेलो व नंतर ता. १८ रोजी

मैमनसिंग

येथे पोहोचलो. येथे हल्ली दोन पक्षांचे दोन समाज आहेत. बाबू इशानचंद्र विश्वास हे गृहस्थ येथे कलकत्त्याहून येऊन त्यांनी सन १८५५ चे सुमारास एका ब्राह्मसभेची स्थापना केली, त्यावेळी अगदी समाजाच्या पद्धतीने ३-४ जण उपासना करीत. नंतर डॉ. जगदीशचंद्र बोसचे वडील भगवानचंद्र येथे आल्यापासून ह्या समाजाची भरभराट होऊन, सुमारे २५-३० सभासद जमले, तथापि गावात ह्यांना फार हाल काढावे लागत. हा सर्व गाव येथील जमीनदाराचे ताब्यात असल्यामुळे व गावचे लोकांनी त्यांचे कान फुकल्यामुळे गावात मंदिर बांधण्यास मुळीच जागा मिळेना म्हणून अगदी गावाबाहेर लांब ‘साहेबक्वार्टस्’ म्हणजे सरकारी जागेत जागा घेऊन एक मंदिर प्रथम १८६९ त बांधण्यात आले. पण ते १८८६ सालच्या भूकंपात पडले म्हणून पुन: बांधण्यात आले. ह्याचे पूर्वीच १८७८ साली कुचबिहारचे लग्नामुळे ब्राह्मसमाजाला जो धक्का बसला होता तेव्हाच समाजमंदिराचे मालकीसंबंधी तंटा होऊन कोर्टमार्फत तडजोड झाली होती की, नवविधानी मंडळींनी आदित्यवारी सकाळी उपासना करावी व साधारणीयांनी सायंकाळी करावी. पुढे १८८६ साली मंदिर पडल्यावर साधारणी ह्यांनी गावात निराळेच मोठे मंदिर बांधिले. ह्याच धरणीकंपात ज्या जमीनदाराने गावात मंदिर बांधण्यास जागा दिली नव्हती, त्याचाही मोठा वाडा जमीनदोस्त झाला. पुढे जे ब्राह्ममंदिर बांधिले तेही पुन: १८९७ च्या जबर भूकंपात पार कोसळून गेले. हल्ली जे मंदिर बांधले आहे, त्याचे उंच व नकशीचे भारी किंमतीचे दरवाजे, तुळ्या व इतर सामान संगमरवरी दगड वगैरे बरेच सामान, ज्याच्याकडून पूर्वी जागाही मिळाली नाही त्याच जमीनदारांकडून मिळाले आहे, व तो जमीनदार आता चांगला वयात आल्यामुळे त्याला चांगले कळू लागले आहे. त्याची समाजासंबंधी सहानुभूती आहे. नवविधान समाजात एकंदर बायका, मुले, पुरूष मिळून २६ व साधारणसमाजाचे आचार्य श्रीनाथचंद्र ह्यांनी गावाबाहेर बरीच विस्तीर्ण जागा घेऊन तेथे ब्राह्मलोकांचे एक लहानसे खेडे वसविले आहे. हल्ली तेथे ८ ब्राह्मकुंटुंबे रहात आहेत. श्रीनाथबाबूंनी आपल्या घराला लागून, एक नित्याच्या उपासनेकरिता भजनमंदिर बांधले आहे. त्यात नित्य सकाळी खेड्यातील मंडळी भजनास जमतात. ता. १९ रोजी संध्याकाळी साधारण समाजमंदिरात महर्षी देवेंद्रनाथांच्या प्रथम श्राद्धासंबंधाने उपासना झाली, ती श्रीनाथबाबूंनी बंगालीत चालविली. नंतर महर्षींचे चरित्रासंबंधी इंग्रजीत व्याख्यान झाले. ता. २० रोजी सकाळी मी

फौरेड
म्हणून अगदी लहान खेडे मैमनसिंगहून डाक्काच्या वाटेवर आहे तेथे गेलो. हे खेडे  नामदार के. जी. गुप्त, कमिशनर ह्यांचे मालकीचे असून, शेतात साहेबमजकुराचे एक घर नदीचे अगदी काठीच आहे व जवळच एक सुंदरसे मंदिर आहे. बाबू कालीनाथ गुप्त हे वृद्ध गृहस्थ आपल्या भाविकपणाबद्दल व सात्विकपणाबद्दल सर्व ब्राह्मसमाजात प्रसिद्धच आहेत, ह्यांच्या आवडीचे हे घर व मंदिर आहे. एकंदरीत हे स्थळ शांत व पूर्ण एकांतिक आहे. कोणी अतिथी आल्यास त्याची सर्व प्रकारे सोय, नेमलेली नोकरमाणसे मोठ्या आदराने करीत. येथे माघोत्सवाचे वेळी आसपासची ब्राह्ममंडळी काही दिवस जमतात. येथे एक दिवस एकांत व आत्मसमागम भोगून ता. २१ रोजी डाक्का येथे गेलो.