येरवड्याच्या तुरुंगातील रोजनिशी-सोमवार १८ ऑगष्ट १९३०

सोमवार १८ ऑगष्ट १९३०
सकाळी ११ वाजता पुनः आम्हाला पूर्वस्थळी म्हणजे अंधारीत वॉर्ड नं. १ व दोनमध्ये आणिले. येथे पंडित मोतीलाल व जवाहरलाल नेहरूंना ठेवण्यात आले होते. त्यांना परत नेल्यामुळे आम्हाला येथे पुनः आणिले. आम्ही सर्कल नंबर ३ बराक नंबर १ मध्ये होतो. तेथून येताना काही ढेकूण आणिले होते. एकंदरीत गेले सात दिवस आम्ही एकत्र सुखात घालविले. ही बराक ५२ लोकांसाठी होती. तेथे आम्ही १४ जण होतो. पण तुरुंगात अलीकडे गर्दी झाल्यामुळे ह्याच बराकीत आम्ही येण्यापूर्वी ८५ सी क्लासचे कैदी होते. हा बी आणि सी क्लासमध्ये फरक. आम्ही येथे गेल्या (वर) दुसरे दिवशीच सुपरिंटेंडंट तपासावयाला आले. ढेकूण फार आहेत असे सांगितल्याबरोबर ह्या नंबर १ च्या बराकीला उत्तम रीतीने चुना लावून साफसफाई करण्यात आली !

ह्या बराकीतून आम्हाला आळंदीचे वाटेवरील दोन डोंगर पावसाने हिरवेगार झालेले दिसत होते. ह्या तीन महिन्यात हा सृष्टीचा देखावा नवीनच पाहून फार आनंद होत असे. काही असो, आम्ही पूर्वीच्या जागी आलो तेव्हा तीच आम्हाला आवडते असे सर्वांच्या तोंडून आले !

आज घरच्या मंडळीला भेटीला बोलावण्या चि. जनाक्काला एक पत्र लिहिले. येताना एक दौत, साबणाची वडी, सुलभ संगीताची नवी प्रत मागितली.

मंगळवार ता. १९ ऑगष्ट १९३०
नित्याप्रमाणे कॅथॉलिक उपासनेला सकाळी गेलो. शेवटी फादर लॉडर म्हणाले, "तुम्ही पुढच्या मंगळवारी येणार नाही कदाचित ? कारण काही तरी समेट येत्या शनिवारच्या आत होईल असे पत्रे म्हणतात. तुम्ही सुटाल."
(ह्या आशेची पुढच्या रविवारचा Weekly पाहून निराशा झाली ! पण ता. ३१ रविवारचा अंक पाहून पुनः आशा वाटू लागली.)

बुधवार ता. २० ऑगष्ट १९३०
तुरुंगात अर्थात् बराच वेळ उदासीनतेत जातो. पण ह्यात मला हर्ष देण्यास कित्येक वेळा एक पक्षी येत असतो. तो साळुंकी हा होय । हिलाच मैनाही म्हणतात. हिची चोंच व पाय पिवळे असतात. आणि रंग मळकट काळसर भुरा असतो. चोंच लांबट आणि डोळ्याभोवतीही पिवळेपणा असतो. ह्या पक्षाकडे पाहिले की मला ज्यांच्याविषयी मनात अत्यंत आदरयुक्त प्रेम वाटते त्या अहल्याबाई शिंदे१४ ह्यांची आठवण येते.

सायंकाळी ५ वाजता खोलीत कोंडला गेलो म्हणजे पुष्कळ वेळा ह्या पक्ष्यांचे जोडपे माझ्या खोलीतील उंच छपराच्या वाशावर येऊन बसत असते. मला वाटते गणपतराव१५ व अहल्याबाईच मला भेटावयाला आले ! गणपतराव ! अहो, तुरुंगात असे बिगर परवाना यावयाचे नसते बरे ! अहल्याबाई, तुम्हीही असे अवचित यायचे! ही पाखरे ह्या गोड कल्पनेने मला फारच आवडती झालेली आहेत.

तुरुंगात चिमण्या कबुतरेही पुष्कळ, भाकरीचे तुकडे टाकलेले खावयाला येतात. पण, मला हे मैनांचेच जोडपे इतके का मोहून टाकते बरे. हा पक्षी फार लाजाळू आहे. चिमण्या, पारव्याप्रमाणे किंवा त्यांच्याइतका हा माणसाच्या वा-याला उभा राहात नाही. म्हणून ही जोडपी केव्हातरी - एकेकच जोडपे - आम्हाला कोंडल्यावर चहूकडे सामसूम झाल्यावर माझ्या खोलीपुढील आंगणात उतरत. ही पाखरे कळप करून राहात नाहीत, जशा चिमण्या किंवा पारवे राहतात. किंवा कावळ्याप्रमाणेच एकएकटेचही कधी हिंडताना दिसत नाहीत. ह्यांची नेहमी जोडीच दिसावयाची. गणपतराव व अहल्याबाई ह्यांची जोडीही मला अशीच भेटावयाला येतात. पण अहल्याबाई ! आमच्या घरी भेटावयाला येणे निराळे, आणि तुरुंगात असताना व तेही मला खोलीत कोंडल्यावर येणेचे निराळे. हे तुमचे मोठे धाडस ! गणपतराव, तुमचे मजवर किती प्रेम असले तरी तुम्ही असे तुरुंगाचे नियम मोडू नका हो ! पण तुम्ही कसचे ऐकता ! तुम्ही प्रेमांध कवी !!

हा पक्षी मोठा गाणारा आहे, हे मला पूर्वी माहीत नव्हते. म्हणून "साळुंकी मंजूळ करीतसे वाणी" हे तुकारामाचे वाक्य मला नीट समजत नसे. पण माझ्या खोलीच्या उंच खिडकीत बसून हे जोडपे गुलगुल बोलू लागले म्हणजे माझे काळीज जणू उडून त्या दोघांचे मध्ये जाऊन बसे. इतका आनंद मला होई ! तेव्हा मला वाटले की मैना नावाचा बोलका पक्षी हाच पण गणपतराव किंवा अहल्याबाई ह्या दोघांना गाता तर मुळीच येत नाही. हे मोठे वक्तेही नाहीत. गळा जरी गोड नाही तरी तुम्हा दोघांचा स्वभाव गोड - कितीतरी गोड आहे, नव्हे ? त्यामुळेच तर माझ्या उतारवयात मी इतरांची घरे व संगती वर्ज्य केली तरी धावून तुमचे घरी येतो ना ! आणि ती परतभेट तुम्ही मला ह्या उदासवाण्या तुरुंगात अशा काव्यमय मार्गाने देता काय ? धन्य तुमची ! गणपतराव, तुम्ही कवी खरे. आजपासून मी तुमचे नाव शिंदे हे रद्द करून साळुंखे हे काव्यमय नवे नाव चालू करितो ! आणि अहल्याबाई तुम्हाला आजपासून मैनाबाई म्हणून हाक मारीन. तुम्ही मला जी म्हणाल ना ? तुम्ही मैनाबाई साळुंखे !! असा नामकरणविधी आज झाला.


(ही काल्पनिक गोष्ट खरी, की पुढील खरी भेट कल्पना ?
पुढे ता. २३ शनिवारीच प्रतापराव मला भेटावयास आले. तेव्हा त्यांचेबरोबर अहल्याबाई शिंदे ऊर्फ मैनाबाई साळुंखे मला खरोखरीच भेटावयास आल्या हा काय योगायोग ! ह्या १५ मिनिटांच्या भेटी स्वप्नासारख्या भासतात !)

गुरुवार ता. २१ ऑगष्ट १९३०
नित्याप्रमाणे आज गुरुवारच्या साप्ताहिक तपासणीसाठी मेजर मार्टिन सुपरिंटेंडंट येऊन गेले. मी येथे आल्यापासून माझे वजन एकसारखे किती कमी होत आहे हे माझ्या  History Ticket बुकातून वजनाचे आकडे मार्टिन सो. ना दाखविले. तुरुंगात आलो तेव्हा माझे वजन १५६ पौंड भरले. दर पंधरावड्याला रविवारी सकाळी आमचे वजन होत असते. ता. १०-८-३० रोजी माझे वजन १४४ पौंड भरले. तीन महिन्यात माझे १२ पौंड वजन कमी झाले ! येत्या रविवारी किती वजन भरते हे पाहून पुनः सांगण्यास सुपरिंटेंडंटने सांगितले. मी येथे आल्यापासून जून महिन्याचे शेवटचे आठवड्यात आमांशाने आजारी पडलो. त्यातच मला (गौट) संधीवाताचा विकार झाल्याचे कळले. माझ्या उजव्या पायाची पहिली तीनी बोटे नखांजवळ पाळीपाळीने सुजून दुखू लागली. हा आजार मला पूर्वी कधी झाला नव्हता. मला हॉस्पिटलमध्ये सुमारे आठ दिवस ठेवण्यात आले होते.

ता. १४ ऑगष्ट शनिवारी चि. प्रताप, रा. पाताडे१६, सुभेदार घाटगे१७ व बाबूराव जेधे भेटून गेले. त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये होतो. भेटावयाला ऑफिसमध्ये जावयाला शक्ती नव्हती. काठी टेकीत कसा तरी गेलो. परत आल्याबरोबर अंगात ताप भरला. पायाचे बोट रात्रभर ठणकून फारच त्रास झाला ! प्रकृतीची काळजी वाटू लागली. बोटाला रोज तीनचारदा शेकण्यात येत होते. माझा बडदाशी, काळजी घेण्यास ठेवलेले मनुष्य फारच भला माणूस होता. तो फार जपत असे. दुसरे दिवशी सुजलेले बोट फुटले. पू गेल्यामुळे आराम पडला.

ता. ९ सोमवारी (जून) मला हॉस्पिटलमध्ये ठेविले. ता. १९ जून गुरुवारी मला हॉस्पिटलमधून पुनः अंधारी नंबर ३ वार्डमध्ये परत आणिले. ता. १ जुलै रोजी मला भास्कर जाधव भेटावयास आले !

शुक्रवार ता. २२ ऑगष्ट १९३०
तेव्हापासून प्रकृती नादुरुस्तच आहे.
जुलैचे शेवटी पुनः थोडासा आमांश किंवा अतिसारासा उपद्रव झाला. तेव्हा पासून सारखी अशक्तता वाढत आहे. हांतरुणात पडण्यासारखा आजारी नाही, नेहमीप्रमाणे खातो, पितो, कामही पण करितो. मात्र एक दिवसआड  रात्री कणकण येते. आतापर्यंत तीन आठवडे टॉनिकची बाटली (Iron) चालू आहे. डॉ. (Sayyad) नेहमी रोज सकाळी सर्वांलाच पाहून जातात. मधूनमधून क्वीनीन घेतो. पण उत्साह किंवा शक्ती काही आल्याप्रमाणे वाटत नाही. हांतरुणात निजलो असता हातपाय मोडून आल्यासारखे होतात. रोज काथ्या वळण्याचे काम ६।। तास करावे लागल्यामुळे हाताची बोटे दुखतात. पडल्या जागेवरून उठतानाही श्रम होतात. हा प्रताप वार्धक्याचा की तुरुंगांचा?