रोजनिशी प्रस्तावना
प्रस्तावना
महर्षी विठ्ठल रामजी ऊर्फ अण्णासाहेब शिंदे यांच्यासारख्या लोकोत्तर पुरुषाने काही काळ रोजनिशी लिहिली व ती प्रसिद्ध करण्यासाठी उपलब्ध होऊ शकली, ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आणि ही रोजनिशीही साध्या नोंदीच्या स्वरूपाची नव्हे, तर अंतरंग प्रकट करणारी आहे. त्यामुळे ह्या रोजनिशीला सामाजिक इतिहासाच्या दृष्टीनें तसेच वाङ्मयीन गुणवत्तेच्या दृष्टीनेही फार मोठे मोल आहे. आपल्याकडे सामान्य वा असामान्य व्यक्तीने रोजनिशी लिहिलेली असणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. त्याचे महत्त्वाचे कारण आपल्या परंपरेतच असावे. आपल्या समाजात एकंदरीतच व्यक्तीला व तिच्या भावजीवनाला महत्त्व कमी आणि तिच्या सार्वजनिक जीवनाला महत्त्व जास्त. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या अथवा विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात लिहिलेल्या रोजनिशा फारशा आढळत नाहीत. म्हणूनच महर्षी शिंदे यांच्या रोजनिशीचे महत्त्व अभूतपूर्व म्हणावे लागेल.
अण्णासाहेब शिंदेही दररोज आयुष्यभर रोजनिशी लिहीत होते अशातला भाग नाही. प्रचंड उद्योगात त्यांचा काळ जात असल्याने एरव्ही रोजनिशी लिहिण्यास त्यांना फुरसत मिळणेही कठीण. इ. स. १८९८ मध्ये ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, १९०१-१९०३ मध्ये धर्मशिक्षणासाठी ऑक्सफर्डला गेले असताना व कायदेभंग केल्यामुळे १९३० मध्ये येरवड्याच्या तुरुंगवासात असताना त्यांनी ब-याचशा विस्ताराने रोजनिशी लिहिली. ही जी तीन वेगवेगळ्या कालखंडात त्यांनी रोजनिशी लिहिली आहे, ती आजूबाजूच्या वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे, तशीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी आहे. हिचे यथार्थ स्वरूप कळण्यासाठी त्यांच्या जीविताचे, कार्याचे व मनाच्या घडणीचे थोडक्यात का होईना परंतु सामग्र्याने आकलन करणे आवश्यक आहे.
महर्षी शिंदे हे एक संपन्न, त्यागशील आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे पुरुष होते. विसाव्या शतकातील पहिल्या पंचवीस-तीस वर्षांत त्यांच्या कर्तृत्वाचा भरघोस आविष्कार झाला. आध्यात्मिक-सामाजिक ध्येयासाठी आयुष्यभर फकिरी पत्करणारी त्यांच्यासारखी विद्याविभूषित व्यक्ती महाराष्ट्रात तरी दुसरी आढळत नाही.
आपली नेहमीची विभागणी पत्करून म्हणायचे झाले तर आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय तसेच संसोधन- क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. १८९८ साली ते बी.ए. झाले. त्याच वर्षी प्रार्थनासमाजाची त्यांनी दीक्षा घेतली. ऐहिक सुख डोळ्यांसमोर दिसत असतानाही आजन्म ब्राह्म धर्मप्रचारक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला व युनिटेरियन शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी गेले. इंग्लंड व अमेरिकेतील युनिटेरियन अथवा एकेश्वरवादी मंडळींनी ही शिष्यवृत्ती सुरू केली होती. तेथून आल्यानंतर १९०३ पासून १९१० पर्यंत मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केले. या प्रचारकार्यातही त्यांनी कल्पकता आणि संघटनाकौशल्य दाखविले. पत्रद्वारा धर्मप्रचार करण्यासाठी `पोस्टल मिशन` च्या स्थापनेला प्रेरणा देऊन पुढे ते स्वतः चालविले. धर्मविषयाची गोडी वाढविण्यासाठी 'उदार धर्मग्रंथ वर्ग' चालविला. धर्मविधी चालवण्याचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी `तरुण ब्राह्मसंघ` काढला. १९०४-१९१३ पर्यंत राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या वेळीच `भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद` नियमितपणे भरविण्यात पुढाकार घेतला. सुबोध पत्रिका या प्रार्थनासमाजाच्या मुखपत्रासाठी अनेक लेख लिहिले व भारतातील अनेक ठिकाणी शेकडो व्याख्याने दिली. पुढील काळात मंगलोर येथील ब्राह्मसमाजाचे आचार्यपद सांभाळले. पुणे येथे `कौटुंबिक उपासना मंडळा`ची स्थापना केली व वाई येथे ब्राह्मसमाज स्थापन करण्यास प्रेरणा दिली. जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते.