अस्पृश्यवर्गीय लोकांची अस्पृश्यता नष्ट करावी व त्यांची स्थिती सुधारावी ह्या हेतूने एक मिशन काढून विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्यवर्गासाठी अशा प्रकारचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करू इच्छितात ही वार्ता प्रसृत झाली. ह्या कामाला अनुकूल अशा प्रकारचा प्रतिसाद प्रार्थनासमाजाचे उदार उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला ह्यांच्याकडून मिळाला. १६ ऑक्टोबर १९०६ रोजी शेठ दामोदरदास ह्यांनी अशा प्रकारची मंडळी स्थापन करण्यासाठी एक हजार रुपयाची देणगी दिली. दोनच दिवसांनी दिवाळी-पाडव्याच्या शुभदिनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी कार्तिक वद्य प्रतिपदेस शिंदे ह्यांनी ह्या कामाला आरंभ करण्याचे ठरविले. सकाळी ९ वाजता मुंबई येथील एल्फिन्स्टन रोडलगतच्या मुरारजी वालजी ह्यांच्या बंगल्यात भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरिता प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष न्या. चंदावरकर ह्याप्रसंगी रा. ब. नारायण त्रिंबक वैद्य, रा. बाळकृष्ण नारायण भाजेकर वगैरे बरीच समाजाची हिंतचिंतक मंडळी समारंभास आली होती. सुबोधपत्रिकेने ह्याबद्दलची बातमी देताना असे म्हटले आहे, “अस्पृश्य मानलेल्या लोकांकरिता व इतर गरीब लोकांकरिता येथील प्रार्थनासमाजाशी निकट संबंध असलेल्या काही मंडळींनी ही शाळा स्थापन केली.” ह्या शब्दप्रयोगावरूनही शाळा प्रार्थनासमाजाच्या वतीने उघडण्यात आली नसून नव्याने स्थापन होणा-या एका वेगळ्या मंडळीच्या वतीन ही शाळा सुरू होत आहे हे सूचित होते. ह्या बातमीच्या शीर्षकामध्येही ‘नीच मानलेल्या लोकांकरिता नवीन शाळा’ असे म्हटले आहे.१
“समारंभाच्या आरंभी ईशस्तवनाचे एक पद्य म्हटल्यावर रा. ब. काशीनाथ बाळकृष्ण मराठे ह्यांनी ईश्वरप्रार्थना करून प्रसंगास अनुरूप असे उपदेशपर भाषण केले. त्यावर रा. रा. विठ्ठल शिंदे, समाजाचे धर्मप्रचारक ह्यांनी नीच मानिलेल्या जातीविषयी थोडी माहिती सांगितली. देशातील एकंदर प्रजेपैकी एकसप्तमांश प्रजा अशा वर्गातली आहे असे त्यांनी मनुष्यगणतीच्या आधारे ह्याविषयावर एक नुकताच लेख प्रसिद्ध केला आहे, त्याचा उल्लेख करून सांगितले. ह्या लोकांस आम्ही विद्या देऊन शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत पण त्यांना वरच्या पायरीस घेण्यास लोकांनी तयार झाले पाहिजे असे ते म्हणाले.” ह्या प्रसंगी रा. रा. भाजेकर व सदाशिव पांडुरंग केळकर ह्यांचीही भाषणे झाली. शेवटी न्या. चंदावरकर ह्यांनी भाषण केले. त्यात ते म्हणाले की, “ह्या लोकांस खाली ढकललेले लोक (डिप्रेस्ड क्लासेस) असे वारंवार म्हणण्यात येते, पण खरे पाहिले तर आम्ही सर्वजण अशा नीच पदास पोहोचलो आहोत, तेव्हा आम्ही उच्च व तुम्ही नीच असे कोणास म्हणावयास नको. आम्ही सर्वांनीच आपली नीच झालेली स्थिती सुधारण्याचा यत्न केला पाहिजे.” ह्या प्रसंगी न्या. चंदावरकर ह्यांनी आपल्या भाषणात जे सूत्रवाक्य सांगितले ते फार महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, “ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःला वर आणीत आहोत. हे पवित्र कार्य करीत असताना ह्या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणात न शिरो आणि आम्हां सर्वांना ह्या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे असा साधा आणि सात्त्विक भाव आम्हामध्ये निरंतर जागृत राहो.”२
एकदा कार्याला प्रारंभ केल्यावर शिंदे ह्यांनी मिशनच्या कामाची पद्धतशीर मांडणी केली. एक मध्यवर्ती संस्था ठरवायची व तिचा हेतून आणि रचना ह्यासंबंधी आवश्यक तेवढेच नियम करावयाचे असे त्यांनी धोरण ठरविले. मातृसंस्था मुंबईत स्थापन करण्यात आली. प्राथमिक अथवा दुय्यम शिक्षणाची शाळा, उद्योगशाळा, विद्यार्थिवसतिगृहे, मोफत दवाखाना, धर्मशिक्षणाच्या आणि नीतिशिक्षणाच्या साप्ताहिक शाळा, केवळ सार्वत्रिक धर्माला अनुसरून म्हणजे जातिभेद आणि मूर्तिपूजा ह्यांना फाटा देऊन चालविण्यात येणारी उपासनालये एवढी निदान या मध्यवर्ती संस्थेची अंग असावीत, असे ठरविले. कार्याचा पुढे जसजसा अनुभव येईल त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रांतांतून भाषावार प्रांतिक शाखा आणि त्यांच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय पोटसंस्था स्थापन करण्याचा विचार ठरला. शिंदे ह्यांनी स्थानिक कार्यावर लक्ष केंद्रित करून ते काम पद्धतशीरपणे करणे ह्याला सुवर्णकार पद्धती असे म्हटले आहे व मोठ्या प्रमाणावर सर्व लोकांसाठी जाणीव उत्पन्न करण्याच्या स्वरूपाच्या कामाला मेघवृष्टीची कार्यपद्धती असे म्हटले आहे. मेघवृष्टीचे काम जाहीर व्याख्यानांद्वारे होते. प्रचाराच्या कामाची जबाबदारी स्वतः शिंदे ह्यांनी पत्करली तरी, सुवर्णकार पद्धतीच्या कामासाठी आजीव कार्यावाह मिळविणे आवश्यक होते.
मिशनच्या ह्या कामासाठी माणसे मिळविण्याचा प्रयोग शिंदे ह्यांनी स्वतःच्या घरापासूनच केला. घरच्या लोकांना घेऊन थोडेसे काम करून दाखविल्यावर आपले आध्यात्मिक घर म्हणजे प्रार्थनासमाज येथून आपल्याला माणसे मिळतील अशी त्यांची बळकट श्रद्धा होती. मिशनच्या मध्यवर्ती शाखेतील पदाधिकारी हे प्रार्थनासमाजातील पदाधिकारी होते. अध्यक्ष सर नारायण चंदावरकर, उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला, खजीनदार नारायणराव पंडित, सुपरिटेंडेंट डॉ. संतुजी रामजी लाड व मिशनचे जनरल सेक्रेटरी स्वतः शिंदे राहिले. कार्यवाहक म्हणून त्यांनी पनवेल येथे म्युनिसिपालटीच्या मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका असणा-या भगिनी जनाबाई ह्यांना त्यांनी बोलावून घेतले. प्रार्थनासमाजाच्या कामामध्ये उपासनेच्या वेळी भजन करणे, प्रसंगविशेषी गोरगरिबांचा समाचार घेणे वगैरे कामे त्या आधीपासून करीत होत्याच. मिशनच्या अण्णासाहेबांच्या कामात सहभागी होण्याच्या सूचनेवरून जनाबाईंनी पनवेलच्या शाळेतील मुख्याध्यापिकेच्या पदाचा राजीनामा दिला व मिशनच्या कामामध्ये त्या सामील झाल्या. अण्णासाहेबांचे आई-वडीलही आपल्या मुलांच्या पाठीमागे आले व मिशनच्या कामामध्ये शक्य होईल ती मदत त्यांना करू लागले. त्यांच्या घरोब्याचे सय्यद अब्दुल कादर हे मॅट्रिक पास झालेले तरुण मुंबई येथील इस्लामिया स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करीत होते. शिंदे ह्यांच्या प्रभावाने त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली होती. त्यांनीही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व ते मिशनचे आजीव कार्यवाह बनले. मुंबई प्रार्थनासमाजाचे दुसरे निष्ठावंत सभासद श्री. वामनराव सदाशिवराव सोहनी हे विल्सन हायस्कूलमध्ये नावाजलेले शिक्षक होते. प्रार्थनासमाजाच्या कामात व विशेषतः रात्रशाळेच्या कामात ते लक्ष घालीत असत. तेही मिशनच्या कामासाठी शिंदे ह्यांना येऊन मिळाले. ही सर्व मंडळी मिशनच्या कामाला स्वार्थत्यागपूर्वक तयार झालेली पाहून शिंदे ह्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.
मिशनचे हेतू पहिल्यापासूनच पुढीलप्रमाणे ठरविलेः १) हिंदुस्थानातील महार, मांग, चांभार, पारिया वगैरे (विशेष करून पश्चिम हिंदुस्थानातील) अस्पृश्य समजल्या जाणा-या वर्गांना व इतर अशाच रीतीने निराश्रित झालेल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, २) नोक-या मिळवून देणे, ३) सामाजिक अडचणींचे निवारण करणे, ४) सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत शील आणि नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार ह्या गरीब लोकांमध्ये करणे.
ह्या वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रयत्न काहीएक प्रमाणात स्थानिक पातळीवर केले जात असत. मात्र शेवटचे तीन हेतून केवळ मिशन निघाल्यामुळेच साधणे शक्य होणार होते. मिशनचे काम उदार धर्माच्या पायावर उभारण्यात आले. त्यासाठी दर शनिवारी व्याख्याने आणि कीर्तने होत. रविवारी सकाळी धार्मिक शिक्षणाचे वर्ग आणि सायंकाळी उपासना होत. प्रारंभी हे काम स्वतः शिंदे व त्यांच्या भगिनी जनाबाईही करीत असत. सणाच्या दिवशी सामाजिक मेळे भरविण्यास त्यांनी सुरुवात केली. अस्पृश्यवर्गीय स्त्री-पुरुष, वरिष्ठवर्गातल्या स्त्री-पुरुषांमध्ये समानतेच्या नात्याने भाग घेत. पहिल्या वर्षी ९ जाहीर व्याख्याने, ४ कीर्तने, ५ पुराणवाचने असे कार्यक्रम झाले.
पहिल्या वर्षातच मिशनच्या कामाने जोरात वेग घेतला. मिशनचे जनरल सेक्रेटरी म्हणून शिंदे ह्यांनी तयार केलेला तिस-या तिमाहीचा अहवाल ९ जुलै १९०७ ह्या तारखेस प्रसिद्ध झाला. तो ‘इंडियन सोशल रिफॉर्मर’ने प्रसिद्ध केला.
मिशनच्या सुरुवातीच्या काही अहवालांमध्ये मिशनचा उद्देश सांगताना काही आकडेवारी देण्यात येत असे. पहिल्या अहवालात दिलेली आकडेवारी खालीलप्रमाणेः
हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्याः २९ कोटी ४३ लक्ष ६१ हजार ०५६ पैकी एकूण हिंदूंची संख्या २० कोटी ७१ लक्ष ४७ हजार २० पैकी अस्पृश्य मानलेल्यांची संख्या ५ कोटी ३२ लक्ष ६ हजार ६३२. हे आकडे देऊन पुढे असे म्हटले आहे की, दर ७ हिंदुस्थानी माणसामागे १ दुर्दैवी अस्पृश्यप्राणी आहे की जो बोलण्याच्या अंतराइतका जवळ येऊ शकत नाही.” मुंबई इलाख्यात अस्पृश्य मानलेल्यांची लोकसंख्या हिंदूंच्या १७ टक्क्यांइतकी आहे. मुंबई शहराची लोकसंख्या ९ लाख ८२ हजार एवढी आहे. त्यांपैकी अस्पृश्यवर्गाची लोकसंख्या ८३ हजार १४ एवढी आहे. मात्र शाळेत जाणा-या अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या केवळ ३०० आहे. ह्या आकडेवारीवरून अस्पृश्य मानलेल्या वर्गाची स्थिती सुधारणे किती निकडीचे आहे हे ध्यानात येते, असे नमूद केले आहे. ह्या अहवालासोबत शिंदे ह्यांचा ‘मिशन काढण्याची आवश्यकता’ ह्या विषयावर इंग्रजी लेख प्रसिद्ध केला आहे.
मिशनने पुढील संस्था सुरू केल्याः १) मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशा मोफत दिवसाच्या २ शाळा(मराठी ५वी आणि ३-या वर्गापर्यंत), २) नोकरी करणा-या लोकांसाठी रात्रशाळा, ३) धर्मार्थ दवाखाना, ४) वाचनालय व ग्रंथालय, ५) मुलांसाठी तालीम, ६) महिलांसाठी शिवणवर्ग, प्रार्थना व व्याख्याने.
ह्याच अहवालामध्ये मुलांसाठी माध्यमिक शाळा, मुलींसाठी माध्यमिक शाळा, उद्योगशाळा व ग्रामीण भागांतून आलेल्या गरीब होतकरू मुलांसाठी वसतिगृहे असे नवीन उपक्रम सुरू करण्याचा मनोदय प्रकट केला.
२८ फेब्रुवारी १९०७ ह्या दिवशी परळ येथील ग्लोब मिलजवळील शाळेच्या जागेत होळीच्या निमित्ताने एक समारंभ आयोजित करण्यात आला. ह्या समारंभासाठी शेठ दामोदरदास सुखडवाला, गोकुळदास पारेख, सौ. रमाबाई भांडारकर, काशीताई नवरंगे इत्यादी स्त्री-पुरुष उपस्थित राहिली होती. ह्या प्रसंगी शिंदे ह्यांचे ‘शिमगा सणातील चांगले व वाईट प्रकार’ ह्या विषयावर उद्बोधक भाषण झाले. सायंकाळी ६ वाजता मुख्य पाहुणे सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर हे उपस्थित झाले. शिंदे ह्यांनी स्वागतपर भाषणामध्ये मिशनने केलेल्या कामाचा आढावा घेतला. मिशनमध्ये सध्या दोन पुरुष व दोन स्त्री शिक्षक असून त्यांपैकी शिक्षिका विनावेतन काम करतात अशी माहिती दिली.
फेब्रुवारी १९०७ अखेरपर्यंत दिवसाच्या शाळेत खालीलप्रमाणे विद्यार्थी येत होते.
दिवसाची शाळा : प्रारंभ १८ ऑक्टोबर १९०६
विद्यार्थी | महार | मांग | चांभार | इतर हिंदू | एकंदर विद्यार्थी |
मुलगे | ७७ | ५ | २३ | ३७ | - |
मुली | १८ | ० | ४ | ८ | - |
एकंदर | ९५ | ५ | २७ | ४५ | १७२ |
डिसेंबर १९०६ पासून मिशनच्या वतीने एक रात्रशाळा सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे दर रविवारी सकाळी धार्मिक व नैतिक शिक्षण देण्यासाठी मुलांचे वर्ग भरविण्यात येत. सुमारे २५ मुले हजर असत. ही नीतिशिक्षणाची शाळा १८ ऑक्टोबर १९०६ रोजी सुरू करण्यात आली. २२ नोव्हेंबर १९०६ पासून मिशनच्या वतीने मोफत दवाखाना सुरू करण्यात आला. ४ महिन्यांच्या अवधीत महार, चांभार, इतर हिंदू, मुसलमान व ख्रिश्चनवर्गातील १०९ आजारी व्यक्तींनी औषधोपचाराचा लाभ घेतला. डॉ. संतुजी रामजी लाड हे दररोज सकाळी ठाण्याहून येऊन टार तास रोगी पाहण्याचे काम करीत असत. डॉ. लाड केवळ दवाखान्यातच काम करीत असत असे नव्हे, तर आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार करीत असत असे नव्हे, तर आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार करीत असत. डॉ. लाड ह्यांच्या जोडीने डॉ एस. पी. नाशिककर हेही मिशनच्या दवाखान्याचे काम पाहत असत.
शेठ तुकाराम जावजी, बाबाजी सखाराम आणि कंपनी आणि मनोरंजक प्रसारक ग्रंथ मंडळ ह्यांनी पुस्तकाची मदत केल्यामुळे मिशनच्या वतीने एक ग्रंथालय जानेवारी १९०७ मध्ये उघडण्यात आले. ग्रंथालयात २३२ पुस्तके जमा झाली.
बुकबाइंडिंगचे काम दोन महार विद्यार्थी मिशनमध्ये शिकू लागले होते.
होळीच्या दिवशी होणा-या गैरप्रकाराला आळा बसावा ह्या हेतूने मिशनच्या भायखळा आणि परळ ह्या ३ शाळांच्या ठिकाणी मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने दारूच्या दुष्परिणामावर व्याख्याने देण्यात आली. तीन रात्री चांदण्याच्या प्रकाशामध्ये मिशनच्या शाळांतील मुले व परिसरातील माणसे स्वदेशी खेळ खेळत होते. ह्या खेळाचे संयोजन प्रार्थनासमाजातील काही तरुणांनी केले.
जनरल सेक्रेटरी शिंदे ह्यांच्या अहवालात नमूद केले आहे की, सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर ह्यांनी मुलामुलींना पारितोषिके दिली व मिशनने चालविलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. इतर ठिकाणी व्यसनात गढून प्रचंड गोंधळ चाललेला असताना ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यसनापासून दूर राहून मुले-माणसे खेळामध्ये भाग घेत आहेत हे चित्र आपल्याला फार आशाजनक वाटले असे त्यांनी सांगितले.
ह्या समारंभानंतर सर भालचंद्र ह्यांनी पायाने फूटबॉल उडवून मैदान क्लबचे उदघाटन केले.
मिशनच्या कामाचा चहूकडे बोलबाला होऊ लागला. ह्या नवीन कार्याबद्दल अनुकूल-प्रतिकूल मते वृत्तपत्रकार प्रसिद्ध करू लागले. ह्या काळातच अखिल भारतीय पातळीवरील अन्य संस्था सुरू होऊ लागल्या होत्या. गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली होती. धोंडोंपंत कर्वे ह्यांनी अनाथ महिलाश्रम आधीच स्थापन केले होते. अशा ह्या काळात मिशनचे काम सुरू झाले होते. ह्या सुमारास मुंबईत कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता परोपकारी कृत्ये करणारे दोन दानशूर गृहस्थ होते. एक, मलबारी नावाचे पारसी व दुसरे दयाराम गिडुमल.
एके दिवशी दयाराम गिडुमल ह्यांच्याकडून शिंदे ह्यांना आपल्याला समक्ष भेटून जावे अशाबद्दलची चिठ्ठि आली. शिंदे भेटीला गेल्याबरोबर त्यांना आपलेपणाने कवटाळून डोळ्यांत आसवे आणून विचारले की, हे अपूर्व मिशन काढण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? ह्या कामी अस्पृश्यवर्गातल्या महिलांसाठी तुम्ही काही तजवीज केली आहे काय? त्यावर शिंदे ह्यांनी स्पष्टपणे सांगितले, “ह्या हतभागी भारतामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची स्थिती अत्यंत दुर्बल व केविलवाणी आहे. हे मी जाणून आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या घरातल्या मंडळींनाही ही जाणीव असल्याने माझी त्यागी बहीण आणि पूज्य माता यांनी पाठबळ दिले आहे.”३ ही वार्ता दयारामजींच्या कानावर अगोदरच आली होती. म्हणूनच त्यांनी शिंदे ह्यांना समक्ष भेटीला बोलावून असे कळकळीचे स्वागत केले. अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी मिशनच्या मध्यवर्ती आश्रमात ‘निराश्रित सेवासदन’ ह्या नावाखाली एक स्वतंत्र शाखा काढण्याची तयारी शिंदे यांनी दाखविली. ह्या कार्यासाठी दयारामजींनी दरमहा १०० रुपयांची मदत देऊ केली आणि त्याप्रमाणे सदन निघाले. मिशनच्या तिस-या तिमाही अहवालात सेवासदन सुरू झाल्याचे वृत्त असून एका दानशूर परोपकारी गृहस्थांनी दरमहा १०० रु. ची मदत ह्या सदनासाठी देऊ केली आहे, असा उल्लेख आढळतो. दयारामजींनी आपले नाव गुप्त ठेवण्याबद्दल शिंदे ह्यांना सांगितले असले पाहिजे.
निराश्रित सेवासदनातील स्त्रीप्रचारकांना विविध प्रकारची कामे करावी लागत. अस्पृश्यवर्गीय मुलांसाठी नुसत्या शाळा काढून उपयोग नव्हता. कारण ह्या मुलांना रोजच्या रोज शाळेत जाण्याची सवय नसे व पालकांना रोजच्या रोज पाठवण्याचे महत्त्व वाटत नसे. शिक्षणाची अभिरुची लावून देण्यासाठी सदनातील स्त्रीप्रचारकांना घरोघरी जाऊन भेटी घ्याव्या लागत असत. हे काम करणा-या स्त्रिया ह्या ख्रिस्ती प्रचारक असल्या पाहिजेत असा अनेकांचा गैरसमज होऊ लागला. तो दूर करण्यासाठी या प्रचारक स्त्रियांनी भारत, भागवत, रामायण अशा हिंदू धर्मग्रंथांचे घरोघरी वाचन सुरू केले. आजा-यांची शुश्रुषा करण्यासाठी आणि बाळंतपणात मदत देण्यासाठी सदनातील स्त्रियांना शिक्षण देऊन तयार करण्यात आले. श्रीमती वेणूबाई, द्वराकाबाई आणि श्रीमती कल्याणीबाई सय्यद ह्या तीन स्त्रिया सदनात राहून ही कामे उत्तम रीतीने करीत असत. सदनातील घरगुती कामे शिंदे यांच्या भगिनी जनाबाई पार पाडीत. बाहेरच्या कामाचा सर्व बोजा सय्यद अब्दुल कादर यांनी उचललेला होता. ह्या कामासाठी निराश्रित महिला समाज ही निराळी संस्थाच जनाबाईंनी काढली. या महिलासमाजाचा पहिला वार्षिकोत्सव सौ. लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. ह्यावेळी सौ. कल्याणीबाई सय्यद यांनी वाचलेल्या रिपोर्टात पुढील माहिती आहेः “घरातील वर्ग सुमारे ६ महिने चालले. गेल्या वर्षी एकंदर १३ बायकांची प्रसूती करण्यात आली. पुष्कळांना दवाखान्याचा लाभ मिळाला. घरोघरी भेटी देऊन समाचार घेण्याचे काम वर्षभर चालले होते. पोलीस कमिशनरांकडून बेवारशी मुले व बायका मिळून पाच व्यक्ती आल्या, त्यांची निगा ठेवण्यात आली.”४
हया तिस-या तिमाही अहवालात विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा उल्लेख असून सुरू केलेली कामे जोरात चालू असल्याचे नमूद केले आहे. मिशनमध्ये विल्सन हायस्कूलमधील नव्याने राहण्यास आलेल्या गणेश आकाजी गवई ह्या महार विद्यार्थ्याचा निर्देश केला असून सेवासदनामध्ये त्याच्या राहण्याजेवण्याची मोफत सोय करण्यात आली असून होणा-या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला बसणार असल्याची माहिती दिली आहे. (सदर विद्यार्थी म्हणजेच पुढे प्रसिद्धीस आलेले मध्यप्रदेश कायदेकौन्सिलचे सदस्य झालेले प्रख्यात महार पुढारी होत.)
अस्पृश्य लोकांकरवीच स्वतःच्या उद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घेण्याच्या उद्देशाने पुरुषांसाठी सोमवंशीय मित्रसमाज ही संस्था २४ मार्च १९०७ रोजी भायखळा येथे इंप्रूव्हमेंट चाळीमध्ये स्थापन करण्यात आली. प्रारंभी १४ नियमित सदस्य पटावर नोंदले गेले. ही मंडळी दर शनिवारी रात्री मदनपु-यातील दगडी चाळीत भाड्याने घेतलेल्या एका खोलीत आजूबाजूच्या परिसरातील लोकांना एकत्र करीत. प्रारंभी भोजन झाल्यानंतर एखाद्या उपयुक्त विषयावर भाषण होई. मिशनचे प्रतिनिधी अधूनमधून तेथे जात असत. देवनार येथील म्युनिसिपल कॉलनीत राणा-या ५०० अंत्यजवर्गीयांसाठी एक दिवसाची व एक रात्रीची शाळा काढण्याची मिशनला गरज वाटू लागली. काही विशेष प्रसंगी ही मंडळी परळ येथील शाळेमध्ये येत असत.
मिशनचा वार्षिक खर्च सुमारे ३ हजार रुपयांइतका झाला. मिशनचे वाढते काम लक्षात घेता श्रीमंत, परोपकारी देशभक्तांनी त्याचप्रमाणे निराश्रित समाजाच्या मित्रवर्गांनी मिशनने चालविलेल्या उदात्त कामासाठी मुक्तहस्ताने मदत करावी असे आवाहन शिंदे ह्यांनी अहवालाच्या अखेरीस केले आहे. इंडियन सोशल रिफॉर्मरने हा संपूर्ण अहवाल छापून धनिकवर्गाने व नागरिकांनी मदत करण्याची आवश्यकता कशी आहे हे अखेरीस नमूद केले.५
स्थापनेपासूनच्या तीन वर्षांच्या अवधीत मिशनने कामाचा मोठाच विस्तार केला.
मिशनचा त्रैवार्षिक अहवाल १७ ऑक्टोबर १९०९ रोजी शिंदे ह्यांनी प्रसिद्ध केला असून त्यामध्ये तीन वर्षांतील कामाचा आढावा घेतला आहे. मुंबईतील मध्यवर्ती शाखेच्या संस्था पुढीलप्रमाणेः
१) परळ येथील शाळा : मराठी ४थी इयत्ता व इंग्रजी ४थी इयत्ता, शिक्षक ७, पटावरील मुलांची संख्या २७५, पुस्तके बांधणे आणि शिवणकामाचा वर्ग.
२) देवनार येथील प्राथमिक शाळा : मराठी ४थी इयत्ता, २ शिक्षक, ४७ मुले.
३) मदनपुरा प्राथमिक शाळा : मराठी ५वी इयत्ता, ४ शिक्षक, १५० विद्यार्थी.
४) कामाठीपुरा गुजराथी शाळा : ही भंगी लोकांसाठी मुंबई येथील पहिली शाळा होय. शिक्षक मिळणे दुरापास्त होते. तरी एक शिक्षक आणि ५१ विद्यार्थी.
५) रविवारच्या शाळा : एक परळ येथे व दुसरी मदनपुरा येथे. धर्मशिक्षण आणि नीतिशिक्षण दर रविवारी दिले जाते.
६) भजनसमाज : एक परळ येथे व दुसरा मदनपुरा येथे. पोक्त मंडळी भजनासाठी आणि उपदेशासाठी जमत आणि उपासना चालवीत.
७) व्याख्याने : वेळोवेळी उपयुक्त विषयांवर विविध ठिकाणी व्याख्याने होत.
८) परस्परसहाय्यक चामड्याचा कारखाना : शशिभूषण रथ व दुस-या एका जर्मन तज्ज्ञाच्या नेतृत्वाखाली नवीन त-हेचे बूट करण्याचा कारखाना काढला. सुरुवातीचे भांडवल २ हजार रुपये.
९) निराश्रित सेवासदन : दोन तरुण गृहस्थ आणि ३ स्त्रिया. ह्या ३ स्त्रिया गरीब लोकांच्या घरी समाचाराला जात. आजा-यांची शुश्रुषा करीत. निराश्रितांना सदनात आणीत व शिवणाचा वर्ग चालवीत. दोन तरुण गृहस्थ सर्व संस्थांची देखरेख करीत. परळ शाखेतील सुमारे १२ मुलांची निवासाची व्यवस्था व चौघांची जेवण्याची व्यवस्था सदनातील कार्यकर्त्यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. प्युरिटी सर्व्हंट ह्या नावाचे मिशनचे मुखपत्र दर महिन्याच्या १५ तारखेला प्रसिद्ध होत असे. त्यामध्ये मिशनची सर्व बातमी प्रसिद्ध होई व मद्यपाननिषेध व इतर सामाजिक विषयांवर लेख येत. मिशनच्या विविध शाखांची त्याचप्रमाणे भारतातील निराश्रितवर्गासंबंधी माहिती येत असे. त्याचे संपादक श्री. वा. स. सोहोनी हे होत.
सेक्रेटरी : वा. स. सोहोनी
मिशनच्या अन्य शाखा
१) पुणे : दिवसाची एक शाळा, २) रात्रीच्या दोन शाळा, ३) भजनसमाज, ४) चर्चामंडळ. शाळांमधील पटावरील संख्या अनुक्रमे १४९, २५ आणि ३३. भजनसमाज आणि चर्चामंडळ येथील सरासरी उपस्थिती ५०. सेक्रेटरी : ए. के. मुदलियार, बी. ए. रास्ते पेठ.
२) मनमाड : एक रात्रीची शाळा, विद्यार्थिसंख्या ४५. मद्यपान निषेध मंडळ कार्यरत. वडीलधा-यांनी दारू पिण्यास प्रवृत्त केले तरी आपण दारू घेणार नाही अशी शपथ ह्या मंडळातील सदस्यांनी घेतली होती.
३) इगतपुरी : एक दिवसाची शाळा, ६८ मुले. दोन महार तरुणांनी सुरू करून मुंबई प्रार्थनासमाजाच्या मार्गदर्शनाखाली चालविली. रविवारचा नीतिशिक्षणाचा वर्ग व भजनसमाजही चालू आहे. सेक्रेटरी : जी. व्ही. भाटवडेकर
४) इंदूर : एक रात्रशाळा, २० मुले व एक शिक्षक. सेक्रेटरीः आर. जी. मिटबावकर, ब्राह्मसमाज.
५) अकोला : दोन रात्रीच्या शाळा, ७२ विद्यार्थी, एक भजनसमाज. सेक्रेटरीः एस्. सी. होसल्ली, बार-ऍट-लॉ.
६) अमरावती : दोन रात्रीच्या शाळा, ५३ विद्यार्थी. सेक्रेटरीः जी. एन. काणे, वकील.
७) दापोली : एक दिवसाची शाळा, ३७ विद्यार्थी. ही शाखा गरजू मुलांना स्कॉलरशिप, पुस्तके व कपडे पुरविते. सेक्रेटरीः डॉ. वा. अ. वर्टी
८) मंगळूर : १८९७ सालापासून ब्राह्मसमाजाचे पुढारी के. रंगराव हे पारिया जातीतील लोकांची स्थिती सुधारण्यासाठी एकाकीपणे प्रयत्न करीत आहेत. एक दिवसाची शाळा, ४९ विद्यार्थी, सहा हातमागाची विणकामसंस्था, सात मुले असलेले बोर्डिंग. सर्व विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले जाते. के. रंगराव ह्यांनी २० गरीब पारिया कुटुंबांची मंगळूरजवळच्या सुंदर टेकडीवर वसाहत वसविली आहे. ही मंगळूरची संस्था मिशनशी संलग्न केली आहे. सेक्रेटरीः के. रंगराव
९) मद्रास : पारिय जातीच्या अस्पृश्यांसाठी दिवसाची एक शाळा, २३ विद्यार्थी व चांभार जातीच्या मुलांसाठी शाळा, विद्यार्थी २९. नीतिशिक्षणाचे वर्ग व भजनवर्ग नियमितपणे भरतात. सेक्रेटरीः व्ही. गोविंदन्.
नवीन शाखा
१०) महाबळेश्वर : मे १९०९ मध्ये गव्हर्नरच्या बंगल्यावर लेडी म्यूर मॅकेंझी ह्यांच्या आश्रयाखाली मिशनच्या हितचिंतकांची सभा भरली. मेजर जेम्सन हे अध्यक्ष होते. पूर्वी जमलेला ९००रु. चा फंड मिशनला देण्यात आला व ही शाखा उघडली. दोरखंड तयार करणे, वेताचे विणकाम करणे ही कामे होतात.
११) नाशिक : १९०९ च्या सप्टेंबरमध्ये मिशनचे जनरल सेक्रेटरी शिंदे हे इगतपुरी, मनमाड ह्या ठिकाणी पाहणी करून नाशिक येथे गेल्यावर तेथे जाहीर सभा होऊन जिल्ह्याची कमिटी नेमण्यात आली. जिल्ह्याचे कलेक्टर मि. जॅक्सन ह्यांना अध्यक्ष नेमण्यात आले.
अशा प्रकारे तिस-या वर्षाच्या अखेरीस मिशनच्या कामाची झपाट्याने वाढ झाली. मिशनच्या १२ शाखा, १६ दिवसाच्या प्राथमिक शाळा चालू होत्या. त्यातून १०१८ विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. सहा रविवारच्या शाळा, पाच भजनसमाज धर्मशिक्षणाचे व नीतिरक्षणाचे काम करीत होते. चार उद्योगशाळा चालू होत्या. मिशनच्या कामाला वाहून घेतलेले ७ कार्यवाह मिळाले व मिशनचे एक मुखपत्र सुरू झाले. तीन वर्षांच्या अवधीत एवढ्या कामाचा उठाव झाला ही गोष्ट स्वतः शिंदे ह्यांना व त्यांच्या सहका-यांना निश्चित उत्साहवर्धक वाटली. मिशनचे काम प्रत्यक्ष पाहून काही नामांकित व्यक्तींनी ह्या कामाबद्दल प्रोत्साहनपर अभिप्राय प्रकट केला. “धार्मिक आणि परोपकारी मंडळींनी देशामध्ये चालविलेले हे अत्यंत पवित्र कार्य आहे”, असे लाला लजपराय ह्यांनी म्हटले आहे. डॉ. भांडारकर ह्यांनी असे म्हटले आहे की, “विवेकशीलता ही अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह ह्यांच्या प्रांतावर हल्ला करण्याचा जो सांप्रतचा काळ आहे त्याचे निदर्शक म्हणजे ही संपूर्ण संस्था होय.” टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक स्टॅन्ले रीड ह्यांनी म्हटले आहे, “संस्थेच्या वतीने चालविण्यात येणा-या शाळांचे काम हे विशेषत्वाने स्तुत्य आहे. अस्पृश्यवर्ग ह्या शब्दप्रयोगापेक्षा अधिक भयंकर शब्दप्रयोग भाषेमध्ये असू शकत नाही. मिशनने चालविलेले उदात्त कार्य अंतःकरणातील मर्माला स्पर्श करणारे आहे.”
अहवालाच्या अखेरीस जनरल सेक्रेटरी शिंदे ह्यांनी म्हटले आहे की, “मिशनचा एकंदर वार्षिक खर्च १० हजाराइतका असून तो वाढतच आहे. मिशनच्या इमारतीसाठी, प्रशिक्षित शिक्षक व कार्यकर्ते उच्चवर्गातून मिळविण्यासाठी, त्याचप्रमाणे अस्पृश्य समजल्या
जाणा-या वर्गातून हुशार मुले निवडून त्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी व त्यांच्यामधून मिशनचे भावी कार्यकर्ते तयार करण्यासाठी मिशनला मोठ्या देणग्यांची आवश्यकता आहे.”
कामाचा अनुभव
निराश्रित सेवासदनाच्या खर्चाची तरतूद दयारामजी गिडुमल यांनी ३ वर्षांपूर्वी केली होती. ह्या काळामध्ये मिशनच्या कार्यकर्त्यांना अशा कामाचा आणि मनुष्यस्वभावाचा जो अनुभव आला तो फार महत्त्वाचा होता. लहान मुले आणि वार्धक्यामुळे अंथरुणाला टेकलेली माणसे ह्यांचे फार हाल होत हे स्वतः शिंदे ह्यांनी पाहिले होते. गिरणीमध्ये १२ तास काम करणा-या माणसाला आपली पोटची मुले आणि वृद्ध आजारी आईबाप ह्यांच्या जोपासनेस वेळ मिळत नसे. म्हणून अशांची सेवा करणे हे सदनाचे मुख्य काम असे. इंग्लंडमधील डोमेस्टिक मिशने अशा प्रकारची कामे करतात हे शिंदे यांनी पाहिले होते. सदन काढल्याबरोबर शिंदे ह्यांचे आईवडील व दोन बहीणी ग्लोब मिलच्या घाणेरड्या चाळीत जाऊन राहिले. मिशनच्या कामाचा पहिल्यापासूनच एक दंडक शिंदे ह्यांनी ठरविला होता की, मिशनमध्ये काम करणा-यांनी ज्या ठिकाणी अस्पृश्य लोक राहतात तेथेच त्यांच्यात मिळूनमिसळून राहावे. काम करणा-यांनी आपल्या कुटुंबासह येऊन राहावे. ह्या उद्देशाला अनुसरून ग्लोब मिल जवळच्या एका चाळीत मिशनने आपले ठाणे घातले व शिंदे ह्यांच्या भगिनी व आईवडील ग्लोब मिलच्या चाळीत जाऊन राहिले.
ह्या कामाच्या बाबतीत आलेले अनुभव शिंदे ह्यांनी नमूद केले आहेत. त्यांपैकी एक अनुभव असाः “मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आमच्यावर विश्वास बसावा म्हणून सदनाच्या ठिकाणी माझ्या आईबाबांकडे मुले आणून ठेवण्याचा प्रयोग करून पाहिला. लष्करातून सेवानिवृत्त झालेल एक महार जमादार समजूतदार गृहस्थ होते. ८ वर्षांची एक मुलगी व ६ वर्षांचा एक मुलगा अशी दोन अपत्ये त्यांना होती. ८-८ दिवस त्या मुलांना आमच्या सदनात ठेवण्यास ते कबूल झाले. अगदी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्यांना ठेवून घेण्यास माझी आईदेखील कबूल झाली. चंद्राबाई नावाची माझी मोठी बहीण नुकतीच वारल्यामुळे विरहाचा मोठा धक्का बिचारीला बसला होता. त्यातून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून तिने संगोपनाचे कार्य पत्करले. एक दिवशी सदनात गोडधोड झाले होते. म्हणून लहानग्या गंगूने (मुलीचे नाव) नेहमीपेक्षा जरा जास्त खाल्ले. गंगूला आपल्या स्वतःच्या बिछान्यात घेऊन आई निजत असे. असा लळा लावल्याशिवाय मुले घर सोडून राहण्यास तयार होण्यासारखी नव्हती. मध्यरात्रीनंतर गंगूला अंथरुणातच जुलाब होऊ लागले. बिचा-या आईने सर्व अंथरूण धुऊन काढून मुलीला साफसूफ करून, उबदार उपचार करून उजाडण्यापूर्वी नीटनेटके केले होते. मी रागावेन म्हणून घडलेला प्रकार तिने मला कळविला नाही, तरी तो मला कळलाच. मी माझ्या आईचे पाय धरले.
अशा गोष्टींनी ह्या लोकांचा विश्वास आमच्यावर हळूहळू बसू लागला. पुढे लवकरच आमच्या प्राथमिक व दुय्यम शाळा व एक मोठे विद्यार्थी वसतिगृह चांगले नावारूपास आले.”
अण्णासाहेब शिंदे ह्यांची बहीण जनाबाई ह्यांनाही अनेक खडतर अनुभव आले.
१) एका घरातील एक वृद्ध बाई अंथरुणास खिळली होती. सतत अंथरुणावर पडून राहिल्याने तिच्या पाठीला जखमा झाल्या होत्या. जनाबाई रोज तिची पाठ शेकण्यास जात. पाठीला शेकण्यासाठी पाणी तापविण्यासाठी जनाबाई चुलीकडे जाऊ लागल्या तेव्हा बाई म्हणाली, “बाई, तुमचे फार उपकार आहेत, पण माझ्या चुलीला शिवू नका. तुम्ही ख्रिस्ती लोकांनी चूल बाटविल्यास लोक मला नावे ठेवून वाळीत टाकतील.” जनाबाईंनी आपल्या घरचा स्टोव्ह नेऊन त्यावर पाणी तापवून त्या बाईची पाठ शेकली. ही गोष्ट दुस-या दृष्टीनेही उद्बोधक ठरते. गरीब अस्पृश्यांची सेवा आतापर्यंत जी थोडीफार केली होती ती ख्रिस्ती लोकांनीच. हिंदूंपैकी अशा प्रकारची सेवा करणाचे काम केवळ ह्या मिशनचे कार्यकर्तेच करीत होते.
२) राही नावाच्या एका वृद्ध बाईला असाध्य जखमा झाल्या होत्या. म्हणून प्रयत्नपूर्वक तिला जे. जे. हॉस्पिटलात पोहोचविण्यात आले. दुस-या दिवशी तिचा समाचार घेण्यासाठी जनाबाई तेथे गेल्या असता वृद्ध राहीबाईच्या मुलाने तिला घरी नेल्याचे समजले. जनाबाई तिच्या घरी समाचाराल गेली असता त्या मुलाकडून त्यांना शिव्यांचा प्रसादही मिळाला. घरी नेऊन मुलाने आपल्या वृद्ध आईच्या थोबाडीत मारल्याचे कळले. मुलगा दारूच्या नशेत होता म्हणून त्याच्याकडून असे घडले होते. तो कामावर गेल्यावर जनाबाई तिला भेटण्यास तिच्या घरी गेल्या. मुलगा रेल्वेमजूर होता. दारूच्या नशेत रेल्वेचा रूळ ओलांडीत असताना दोन डब्यांमध्ये चेंगरून तो जागच्याजागी ठार झाला. तेव्हा त्याची आई, “बाळा, माझ्या तोंडात मारायला तरी पुन्हा ये रे!” असे हंबरडे फोडू लागली. याच शोकात म्हातारीचा त्या रात्री शेवट झाला आणि जनाबाईंचे हे हृदयविदारक कामही संपले.
३) खालच्या वर्गात मुरळी सोडण्याचा त्या वेळी बराच प्रकार होता. मदनपु-यातील मिशनच्या शाळेत येणा-या एका मुलीला मुरळी सोडणार आहे, असे कळल्यावर सदनातील भगिनी मुलीच्या आईला समजुतीच्या गोष्टी सांगण्यासाठी गेल्या. पण आपल्या धर्मात हात घातल्याबद्दल तिला संताप येऊन त्या भगिनींना पुन्हा पुन्हा आमच्या अंगणात येऊ नका असे त्या मुलीच्या आईने दरडावून सांगितले आणि आपल्या मुलीला शाळेतून काढून घेतले.
४) मुरळी सोडलेली एक मुलगी पुण्याच्या डॉ. मॅन ह्यांच्याकडून सदनामध्ये पाठविण्यात आली. त्या मुलीला अंगभर वाईट रोग जडला होता. तिची कुठेही व्यवस्था होत नसल्याने निर्वाणीचा उपाय म्हणून डॉ. मॅन यांनी तिला सदनात पाठवले. पण मुलाबाळांनी भरलेल्या सदनात ही मुलगी ठेवणे धोक्याचे होते म्हणून भायखळा येथील शाळेजवळ एक स्वतंत्र खोली घेऊन ह्या मुलीला घेऊन जनाबाई तेथे राहिल्या. ही मुलगी फार आडदांड स्वभावाची होती. बरेच दिवस तिने फार त्रास दिला. तथापि, तिला तसेच शिकवून बरी केल्यावर आणि ती चांगली शिकल्यावर तिचा योग्य स्थळी विवाह करून देण्यात आला. ही मुलगी महार जातीची होती. पुढे ती हैदराबादमध्ये शिक्षिका झाली.
पुष्कळ स्त्रियांना गरोदरपणी व बाळंतपणी नाजूक उपचार करण्याची आवश्यकत असे. मिशनचे हितचिंतक मोठमोठे डॉक्टर होते. ते औषधोपचार सांगत पण शुश्रूषेची कामे सदनातील स्त्रियांवर पडत. एनिमा देणे वगैरे नवीन उपचाराचे काम आल्यास जुन्या मताच्या रोग्याला आवरणे फार कठीण होई. ते अत्यंत बीभत्स शिव्या देऊन निघून जात. अस्पृश्य म्हणून इतर अनाथालयात ज्यांचा शिरकाव होणे अशक्य होई, अशा मुलांना पंढरपूरच्या आश्रमात किंवा दयाराम गिडुमलशेठनी मालाड येथे काढलेल्या आश्रमात पाठविण्यात येई.
अशा प्रकारची दयार्द्रतेची कामे करण्यासाठी स्त्रियांचे सहकार्य मिळविणे आवश्यक होते असे अण्णासाहेब शिंदे ह्यांना जाणवले. मिशनच्या सर्व प्रकारच्या कामात त्यांचे संघटनाकौशल्य दिसून येते. समाजातील सर्वच स्तरांतील वजनदार व्यक्तींचे साहाय्य मिशनच्या कामासाठी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असे व ह्या कामी त्यांना यशही मिळत असे, असे दिसते. स्त्रियांच्या संदर्भात अशा प्रकारची कामे करण्यासाठी १९०८ साली पुढे नमूद केल्याप्रमाणे प्रतिष्ठित स्त्रियांची एक समिती नेमण्यात आली.
लेडी म्यूर मॅकेंझी – अध्यक्ष
लेडी चंदावरकर – उपाध्यक्ष
मिसेस स्टॅनले रीड – चेअरमन
सौ. सीताबाई सुखटणकर आणि सौ. लक्ष्मबाई रानडे – जॉइंट सेक्रेटरी
कु. एस. के. काब्राजी – खजिनदार
ह्यांपैकी डॉ. वासुदेवराव सुखटणकर ह्यांची पत्नी सौ. सीताबाई ह्या मँचेस्टर डोमेस्टिक मिशनचे बिशप ह्यांची कन्या होत्या. ह्यांनी इंग्लंडमध्ये असताना स्वतः मिशनचे काम केले होते व मुंबईत अण्णासाहेब शिंदे ह्यांनी सुरू केलेल्या ह्या मिशनसाठी इंग्लंडमधील युनिटेरियन लोकांची सहानुभूती मिळवून एकंदर ७०० रुपये जमा करून त्यांच्याकडे पाठविले होते. हिंदुस्थानात आल्यावर त्यांनी ह्या स्त्रियांच्या कमिटीचे सेक्रेटरीपद पत्करले. परंतु पुढे डॉ. सुखटणकरांवर मुंबई सोडून लाहोरला जावे लागले व ह्या बाईंचा मिशनशी संबंध सुटला. ह्या कमिटीवर असणा-या स्त्रिया मोठमोठ्या घरंदाज कुटुंबातील होत्या व त्यांचे पती अथवा संबंधित पुरुष जबाबदारीच्या मोठमोठ्या हुद्दयावर काम करीत असत. ह्या स्त्रियांच्या अनुकूल मनोभूमिकेमुळे त्यांचे मिशनला मोठेच साहाय्य झाले. त्यांनी व्यक्तिशः वेळोवेळी मिशनची काळजी घेतली आणि मोठमोठे निधी मिशनला जमवून दिले. लेडी म्यूर मॅकेंझी ह्यांनी त्यांचे पती काही दिवस ऍक्टिंग गव्हर्नर असताना १९०९ साली महाबळेश्वर येथील शाखा उघडण्यास गव्हर्नरच्या बंगल्यात सभा भरवून प्रत्यक्ष साह्य केले. १९०९ सालच्या सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या शाळेच्या बक्षीस समारंभात अध्यक्षस्थान स्वीकारून लेडी म्यूर मॅकेंझी ह्यांनी जोरदार भाषण करून श्रीमंतवर्गाचे मिशनकडे लक्ष वळविले. मलबार हिलवरील आपल्या बंगल्यात स्त्रियांच्या कमिटीची सभा भरविली. निधी मिळविण्यासाठी नाना प्रकारचे उपाय सुचविले. टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक सर स्टॅनले रीड ह्यांच्या पत्नीने १९०९ साली मिशनमध्ये सर्व मुलांचा एक मेळा भरवून त्यांना खाऊ वाटला. न्यायमूर्ती रानडे यांचे बंधू डॉ. श्रीधर यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या तर रात्रंदिवस मिशनचे काम करण्यात चूर असत. त्यांच्या ठिकाणी उत्तम प्रकारचा सभाधीटपणा होता. लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर वरचेवर निराश्रित सदनात येऊन खाऊच्या पाट्याच्या पाट्या भरून विद्यार्थ्यांना वाटीत असत. दादाभाई नौरोजी ह्यांची नात सौ. पी. कॅप्टन (मुंबई येथील असिस्टंट पोस्टमास्तर ह्यांची पत्नी) ह्या प्रसिद्ध देशाभिमानी बाईने सौ. सुखटणकरांनंतर स्त्रियांच्या कमिटेचे सेक्रेटरीपद पत्करून काम केले. पुढे पुण्याचा शाखा सुरू झाल्यावर तळेगाव-दाभाडे येथे मिशनने रात्रीची आणि दिवसाची शाळा काढली. त्याचा सर्व खर्च ह्या दंपतीने दिला. पुण्यातल्या शाखेला एक शिवणाचे यंत्र व एक हार्मोनियम बक्षीस दिला. मिशनच्या कामात प्रतिष्ठित स्त्रियांनी सहभागी होण्याचा मोठाच लाभ झाला.
ह्या सदनाच्या कार्यात निष्पन्न झालेले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे मुंबई शाखेचे परळ येथील वसतिगृह होय. अस्पृश्यवर्गाची उन्नती केवळ मोठमोठ्या शिक्षणसंस्था काढल्याने होणार नाही तर त्यांच्या जीवनामध्ये क्रमशः उत्क्रांती व पालट घडवून आणण्यासाठी जिवंत व्यक्तिगत पुढाकाराची आवश्यकता आहे असे शिंदे ह्यांचे मत होते व ते त्यांनी १९०५ सालच्या ‘मिशन स्थापन करण्याची आवश्यकता’ ह्या निवेदनात मांडले होते. कारण शाळांमध्येही अस्पृश्यवर्गातील मुले दिवसांतून फार तर पाच काम करीत. बाकीचा सर्व काळ आपल्या मागासलेल्या वर्गात घालवितात तोपर्यंत त्यांच्या नैतिक जीवनाचा विकास होणार नाही ही जाणीव शिंदे यांना होती. त्यांच्यासाठी स्वच्छ ऐसपैस जागेत २४ तास राहण्याची सोय व्हावी व ह्या कामात तयार झालेल्या कुलगुरूंच्या वैयक्तिक नजरेखाली दिवसातून चोवीस तास ही सगळी मुले असावीत म्हणून वसतिगृहाची जरुरी होती. परंतु हे उद्दिष्ट सुरुवातीला गाठता येणे कठीण होते. नुसत्या दिवसाच्या शाळेत येण्याची जिथे त्या मुलांची तयारी नव्हती तेथे ते आपल्या गावाला व आईबापांना सोडून मुंबईसारख्या शहरात राहावयास कोठून येणार? पण निराश्रित सदनाचे कार्य तीन-एक वर्ष चालले तेव्हा हे उद्दिष्ट साधण्याची चिन्हे दिसू लागली. मिशनच्या शाळांची वाढ ह्या तीन वर्षांत दुय्यम शाळा म्हणजे चौथी इयत्ता चालविण्यापर्यंत फेब्रुवारी १९०९ मध्ये, शाळांच्या जवळपास ज्यांची घरे होती अशा मुलांसाठी, सदनामध्ये बोर्डिंग सुरू करण्यात आले. जवळपास राहणा-या ह्या निवडक मुलांनी घरी दोनदा फक्त जेवावयास जाऊन बाकीचा वेळ सदनात घालवावा अशी त्यांना सवय करण्यात आली. सदनामध्येच त्यांना कपडेलत्ते पुरवून स्नान घालण्याची व्यवस्था करण्यात आली. खेळाची उपकरणे, अभ्यासाची पुस्तके व प्रशस्त पटांगण इत्यादी गोष्टी करून घरापेक्षा त्यांना शाळाच प्रिय वाटेल असा प्रयत्न करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात मुलांच्या जेवणाखाण्याचीही सोय करण्यात आली व डिसेंबर अखेरीस २१ मुले वसतिगृहात राहत. त्यांपैकी ३ मुली होत्या.
मिशन जरी अस्पृश्यांसाठी काढले होते तरी पटावरील संख्येपैकी निदान एकचतुर्थांश मुले स्पृश्यवर्गातील घेण्याची मुभा ठेवली होती. त्या पाठीमागे शिंदे ह्यांचा उद्देश दुहेरी होता. स्पृश्य मुलांशी मिळूनमिसळून वागावे, त्यांच्याशी अभ्यासात चढाओढ करून, त्यांच्या सवयींचे अनुकरण करून अस्पृश्यवर्गातील मुलांनी आपला फायदा करून घ्यावा; उलटपक्षी अस्पृश्यांविषयी जो तिटकारा स्पृश्यांमध्ये असतो तो निराधार आहे हे त्यांच्यासमवेत राहिल्यानेच स्पृश्य मुलांना कळावे व त्यांचा अस्पृश्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोण बदलावा. केवळ मुलांशी वागण्यातच नव्हे, तर मोठ्या माणसांमध्ये प्रचार करताना, पुढारलेल्या आणि मागासलेल्या समाजाशी वागताना, व्याख्यानपीठावरून बोलताना प्रचारकांना हा दुहेरी हेतू सांभाळावा लागतो असे शिंदे ह्यांनी ध्यानात घेतले होते. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांपेक्षा स्पृश्यांनाच शिक्षण देण्याचे काम कित्येकवेळा अवघड असते ह्याचाही त्यांना अनुभव येत असे.
वसतिगृहातील मुलांचा दैनिक कार्यक्रम नेहमीसाठी आखलेला होता. सकाळी पाच वाजता उठणे, साडेपाच वाजता प्रार्थना, सहा वाजता त्यांना कांजी देण्यात येई. सकाळी साडेसहापासून एक तास बुकबाइंडिंगचे काम त्यांना देण्यात येई. त्यानंतरचा दहापर्यंतचा वेळ त्यांना शालेतील अभ्यास, स्नान व न्याहारी ह्यासाठी ठेवला होता. सकाळी दहानंतर आणखी एकदा बुकबाइंडिंगचे काम मुलांना देण्यात येई. अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत दिवसाची शाळा असे. त्यामध्ये एक ते दीड असा वेळ भोजनासाठी ठेवलेला असे. शाळा सुटल्यावर पाच ते सहा वेळ त्यांच्या व्यायामासाठी असे. संध्याकाळी सहा वाजता भोजन झाल्यानंतर मुलांनी आपला शाळेतील अभ्यास करावा ही अपेक्षा असे. झोपण्याची वेळ रात्री दहा ही निश्चित केली होती.
ह्याखेरीज रविवार सकाळी मुलांसाठी नैतिक शिक्षणाची सोय केली होती. तिस-या प्रहरी विद्यार्थ्यांचे चर्चामंडळ व सायंकाळी साप्ताहिक उपासना होत असत. स्वयंपाकाकरिता एक बाई ठेवलेली असे. मात्र अन्य घरकामाकरिता एकही नोकर जाणीवपूर्वक ठेवलेला नसे. आपापली कामे करून समान कामाची वाटणी मुले बिनबोभाट करीत. वसतिगृहात अस्पृश्य व स्पृश्य अशा वर्गातील वेगवेगळ्या जातींचे मुले असत. परंतु कोणत्याही प्रसंगी जातिभेद पाळला जात नसे. ह्याबाबतीत कोणी कधी तक्रारही केली नाही. महार-मांग-ढोर इत्यादी अस्पृश्य जातींतही पाळला जाणारा जातिभेद वसतिगृहामध्ये मुलांनी संपुष्टात आणला. अन्न नेहमी शाकाहारी असे आणि ते मुलांना मानवत असे. स्वच्छता आणि नैतिकता ह्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वर्तनाकडे कसोशीने पाहण्यात येई.
मिशनने मोफत दवाखाना चालविण्याचा प्रयोग १९०६ नोव्हेंबरपासून १९०८ अखेरपर्यंत चालविला. डॉ. संतुजी लाड हे ठाण्याहून येऊन आजारी माणसांवर औषधोपचार करीत ह्याचा उल्लेख ह्या आधी केला आहे. हा दवाखाना सुरू करण्याच्या पाठीमागे मिशनचा संबंध अस्पृश्य मानलेल्या लोकांशी जडावा त्याचप्रमाणे औषधोपचाराची त्यांना सवय लागावी असा होता. सुमारे दोन वर्षांच्या अवधीत १, २३९ रोग्यांनी मिशनच्या ह्या दवाखान्याचा लाभ घेतला. मिशनच्या दवाखान्याचा लाभ घेणा-या ह्या लोकांमध्ये मराठा, महार, मोची, मांग, भंगी, मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू ह्या विविध जातिधर्मांतील पुरुष-स्त्रिया व मुले होती.
मिशनचे दुसरे मुख्य काम म्हणजे शिक्षणाचे. ह्यासाठी शाळाखाते मान्य करील अशा तज्ज्ञाची आवश्यकता होती. निराश्रित सेवासदनाचे काम बघून आणि त्यासाठी मिळालेल्या स्वार्थत्यागी माणसांची तयारी पाहून - विशेषतः शिंदे यांची तळमळ व त्याग पाहून-श्री. वामनराव सोहोनी हे अत्यंत प्रभावित झाले होते. अण्णासाहेबांच्या सूचनेवरून ते आपली विल्सन हायस्कूलमधील शिक्षकाची नोकरी सोडून मिशनमध्ये १९०८ सालच्या आरंभी दाखल झाले व शाळांची जबाबदारी त्यांनी पत्करली. श्री. सोहोनी हे विल्सन हायस्कूलमधील नावाजलेले शिक्षक होते. मिशनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी परळ येथील प्राथमिक शाळेचा दर्जा वाढवून तिचे माध्यमिक शाळेमध्ये रूपांतर घडवून आणले. शाळाखात्याचे सर्व नियम सांभाळून त्यांनी हे काम अत्यंत निष्णातपणे व चोखपणे केले. परळ येथील शाळेत १९०९ साली मराठी विभागात ११४ मुले-मुली होती तर इंग्रजी चौथीपर्यंत २७ मुले होती. देवनार कचरापट्टी येथील रात्रीच्या शाळेत ४० मुले होती. मदनपु-यातील दिवसाच्या शाळेत ९७ मुले, २५ मुली अशी १२२ मुलांची संख्या होती. कामाठीपुरा येथे भंगी लोकांसाठी एक दिवसाची शाळा उघडण्यात आली. ह्या शाळेसाठी जागा मिळण्याची तसेच शिक्षक मिळण्याची मारामार पडली. शेवटी बडोद्यास तयार झालेले एक धेड जातीचे गृहस्थ मिळाले. चौथी इयत्तेपर्यंत येथे शिक्षण दिले जाई व रोजची हजेरी सरासरी ६६ एवढी असे.
मुंबई येथील मिशनने अशा अनेकविध प्रकारच्या कामाला जोरदार सुरुवात केली. त्या कामाचा बोलबाला होऊ लागला. लोकमत हळूहळू बदलू लागले व सामाजिक जीवनामध्ये मनू पालटण्याची चिन्हे लोकांना दिसू लागली.
संदर्भ
१. सुबोधपत्रिका, २८ ऑक्टोबर १९०६.
२. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २२०.
३. तत्रैव, पृ. २२६.
४. तत्रैव, पृ. २२७-२२८.
५. दि थर्ड क्वार्टर्ली रिपोर्ट ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ९ जुलै १९०७.